पुणे- शहराचे पाणी पोलीस बंदोबस्तात कमी करण्याच्या पाटबंधारेच्या भूमिकेवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी संताप व्यक्त करत जलसंपदाचा हा सुलतानी कारभार आणि दादागिरी पुणेकर कदापिही सहन करणार नाहीत असा इशारा देखील दिला आहे .
महापौर मोहोळ म्हणाले ,पुणेकरांना गरजेचं असणारं पाणी कमी करण्याचा डाव पाटबंधारे विभागाकडून सुरू आहे. उद्यापासून पुणे शहराचे पाणी कमी करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे, याचा समस्त पुणेकरांच्या वतीनं मी तीव्र निषेध करतो आहेच पण जलसंपदाचा हा सुलतानी कारभार आणि दादागिरी कदापिही सहन करणार नाही.याचे देखील त्यांनी भान ठेवावे . शेतीला पाणी देण्यास आम्हा पुणेकरांचा अजिबातही विरोध नाही. मात्र प्राधान्य नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला असायला हवं, याचं थोडंही भान जलसंपदा विभागाला असू नये? असा सवाल करत मोहोळ म्हणाले ,’पुणे शहरात नव्याने समाविष्ट झालेली २३ गावे आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता दैनंदिन १ हजार ४६० एमएलडी पाणी खडकवासलातून आणि ३८० एमएलडी पाणी भामाआसखेडमधून पुरवठा होतोय. परंतु उद्यापासून पोलीस बंदोबस्तात पाणी कमी करण्याचा प्रयत्न पाटबंधारे विभाग करत आहे.पालकमंत्री अजितदादा पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना माझी विनंती आहे, पुण्याचं पाणी कृपया कमी करु नका. पाणीगळती थांबवणे, पाणीबचत करणे, यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करत आहोत.२४x७ समान पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत वेगाने सुरु असून ते काम लवकरच पूर्ण करणार आहोत. आमचे अनेक प्रयत्न सुरु असतानाही पोलीस बंदोबस्तात पाणी कमी करण्याचा निर्णय चीड आणणारा आहे.जलसंपदाचा हा सुलतानी कारभार आणि दादागिरी पुणेकर कदापिही सहन करणार नाहीत.