एमआयटी डब्ल्यूपीयूत
‘समिट-२०२१’ क्रीडास्पर्धेचे उद्घाटन
पुणे, दि. १७ डिसेंबर: “अपयश ही यशाची पहिली पायरी आहेे. त्यामुळे जीवनात जे अपयश येते त्यात खचून न जाता काही तरी नवीन शिकत रहावे. कोणत्याही खेळामध्ये जिंकण्याचे लक्ष न ठेवता खिलाडूवृत्तीने खेळ खेळून त्याचा आनंद घ्या. त्यामुळे यश हे आपोआप तुमच्या मागे धावत येईल.” असा सल्ला भारताची महिला क्रिकेटपटू पूूनम राऊत यांनी खेळाडूंना दिला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या १५ व्या राष्ट्रीय पातळीवरील आंतर-अभियांत्रिकी ‘समिट-२०२१’ या क्रीडास्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड हे होते.
माईर्स एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. एस.एस.दराडे-पाटील, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा.डॉ.आर.एम.चिटणीस, कुलसचिव डॉ. प्रशांत दवे, क्रीडा संचालक प्रा. डॉ.पी.जी.धनवे, विलास कथुरे व पद्माकर फड हे उपस्थित होते.
या समारंभात कबड्डी क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल कबड्डी कोच व महाराणा प्रताप संघाचे संस्थापक सदस्य शरदआण्णा चव्हाण यांना एमआयटी-डब्ल्यूपीयू क्रीडा महर्षि पुरस्कार आणि माजी क्रिकेट कोच उमेश पटवाल यांना एमआयटी-डब्ल्यूपीयू क्रीडा आचार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र व पदक असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
पूनम राउत म्हणाल्या,“इंजिनियरच्या विद्यार्थ्यांनी खेळामध्ये आपली चमक दाखवून देशाचे भविष्य उज्ज्वल करावे. कोणताही खेळ असो त्यामध्ये १०० टक्के समर्पण भावनेने उतरवावे. खेळामध्ये सतत चढ-उतार येत असतो, त्यामुळे खचून न जाता त्यातून काही तरी शिकावे व पुुन्हा जोमाने कार्य करावे.”
आपला अनुभव सांगताना पूनम राउत म्हणाल्या,“ क्रिकेटची प्रचंड आवड असल्याने १० व्या वर्षापासून मुलांबरोबर क्रिकेट खेळत होते. शाळेत व शाळा सुटल्यानंतर दिवसभर मैदानात असे. शेवटी वडिलांच्या प्रेरणेने प्रशिक्षक संजय गायतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले. आई वडिलांच्या आशिर्वादाने पुढे भारताच्या टीममध्ये खेळून देशाचे नाव लैकिक वाढविण्याचा मला अभिमान वाटतो. जीवनात मला पुस्तकांपेक्षा क्रिकेट ने खूप काही शिकविले.”
प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड म्हणाले,“ विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये चारित्र्य आणि शिस्त गरजेची आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकांनंद यांनी वयाच्या १६ वर्षी अद्वितीय कार्य केले. त्या वयातीलऊर्जा लक्षात घेऊन प्रत्येक कार्याबद्दल श्रध्दा आणि निष्ठा ठेवावी. स्वामी विवेकानंद म्हणत असे युवकांनी खेळाच्या मैदानात उतरावे. खिलाडूवृत्तीच्या माध्यमातून राष्ट्र निर्मिती होऊ शकते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी शरीराने तंदुरूस्त, मनाने सतर्क, अध्यात्मिक दृष्ट्या उन्नत आणि कुशाग्र बुध्दीमत्ता असणे आवश्यक आहे. संपत्ती आणि पैशांपेक्षा काय महत्वाचे आहे हे युवकांनी ओळखावे. तसेच, भारतीय संस्कृती विसरू नये.”
शरदआण्णा चव्हाण म्हणाले,“डॉ. विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वातील एमआयटी संस्थेने विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्कार देण्याचे कार्य करीत आहे. त्यांनी संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांचे संस्कार घेऊन नवी पिढी निर्माण करीत आहेत. त्यांनी आळंदीचा कायापालट करुन वारकर्यांसाठी संजीवनी देण्याचे कार्य केले आहे. तसेच कार्य खेळामध्ये सुद्धा करीत आहेत.”
उमेश पटवाल म्हणाले,“कठीण परिश्रम, प्रामाणिकता आणि लक्ष निर्धारित करुन कोणत्याही खेळामध्ये सर्मपित झाल्यास यश आपोआपच मिळते. विद्यार्थ्यांनी खेळतांना संघ भावना व खिलाडूवृत्तीने खेळावे.”
समिट २०२१या स्पर्धेत संपूर्ण भारतातून एकूण ९७ संघाच्या माध्यमातून १,५०० हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी सर्व खेळाडूंचे स्वागत करून समिट २०२१ला शुभेच्छा दिल्या.
रोहित पाटील यांनी स्पोर्टस रिपोर्ट वाचून दाखविला.
वेदांत रावल, ईश्वरी पाटील व श्री पात्रा यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रशांत दवे यांनी आभार मानले.

