सामन्यात जडेजाने घेतल्या 9 विकेट्स
मोहाली -रवींद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताने मोहाली येथील पहिल्या कसोटीत श्रीलंकेचा एक डाव आणि 222 धावांनी पराभव केला. यासह भारतीय संघाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. फॉलोऑन खेळण्यास भाग पाडल्यामुळे श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावात 178 धावांत आटोपला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 574/8 (घोषित) धावसंख्या केली. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा पहिला डाव 174 धावांत आटोपला.
जडेजाने या कसोटी सामन्यात 175 धावांची नाबाद खेळी करत श्रीलंकेच्या पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 4 विकेट्स घेतल्या. रविचंद्रन अश्विनने कसोटीत 7 बळी घेतले. तो आता कपिल देवला मागे टाकून कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज बनला आहे. दुसरा कसोटी सामना 12 मार्चपासून बेंगळुरू येथे खेळवला जाणार आहे.
टीम इंडियाचा हा कसोटी क्रिकेटमधील श्रीलंकेविरुद्धचा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी 2017 मध्ये नागपूर कसोटीत भारताने श्रीलंकेचा एक डाव आणि 239 धावांनी पराभव केला होता.
अश्विनने तोडला कपिलचा विक्रम
स्टार ऑफस्पिनर आर अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. मोहाली कसोटीच्या दुसऱ्या डावात चरिथ असलंका (9) च्या विकेटसह अश्विनने हा विक्रम केला आणि कपिल देवचा (434) विक्रम मोडला. भारतीय संघाकडून सर्वाधिक कसोटी बळी घेण्याचा विक्रम अनिल कुंबळे (619) यांच्या नावावर आहे.
श्रीलंकेने दुसऱ्या डावातही केली निराशा
फॉलोऑन खेळताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली आणि 10 धावांच्या आतच संघाने पहिली विकेट गमावली. लाहिरू थिरिमानेला आर अश्विनने खाते न उघडता बाद केले. दुसऱ्या स्लिपमध्ये रोहितने थिरिमानेचा झेल टिपला. लंचनंतर अश्विनने पाथुम निसांकाची (6) विकेट घेतली. पंचांनी निसांकाला नाबाद दिले, पण भारताने रिव्ह्यू घेतला आणि यश मिळवले. श्रीलंकेच्या फलंदाजाची धार घेत चेंडू ऋषभ पंतच्या हातात गेला.
यानंतर मोहम्मद शमीने भारतीय संघाला तिसरे यश मिळवून दिले. त्याने 27 धावांवर कर्णधार दिमुथ करुणारत्नेला विकेटच्या मागे झेलबाद केले. धनंजय डी सिल्वा आणि अँजेलो मॅथ्यूज यांनी चौथ्या विकेटसाठी 102 चेंडूत 49 धावा जोडून डाव सांभाळला. ही भागीदारी रवींद्र जडेजाने धनंजयला (30) बाद करून फोडली. त्यानंतर जडेजाने त्याच षटकात अँजेलो मॅथ्यूज (28) आणि सुरंगा लकमल (0) यांचे बळी घेतले.
जडेजा स्पेशल क्लबचा झाला भाग
मोहाली कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने एक विक्रम केला आहे. कसोटी सामन्यात शतकाव्यतिरिक्त एका डावात 5 बळी घेणारा तो भारताकडून चौथा खेळाडू ठरला आहे. आर अश्विनने हा पराक्रम तीनदा केला आहे. अश्विनने 2011 आणि 2016 मध्ये वेस्ट इंडिज आणि 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध हा विक्रम केला होता. विनू मांकडने 1952 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदा हा पराक्रम केला होता. त्याच वेळी, पॉली उमरीगरने 1962 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत शतक झळकावण्याव्यतिरिक्त 5 विकेट्स घेतल्या होत्या.
यासह सर जडेजा कसोटीत 150+ धावा करणारा आणि एका डावात 5 बळी घेणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
दोन्ही संघ:
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि जयंत यादव.
श्रीलंका: दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, पथुम निसांका, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा, निरोशन डिकवेला, सुरंगा लकमल, विश्वा फर्नांडो, लसिथ एम्बुल्डेनिया आणि लाहिरू कुमारा.

