पुणे दि.12: भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवअंतर्गत स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन सोमवार १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विधान भवन (कौन्सिल हॉल) येथे सकाळी ९.०५ वा. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे.
मुख्य शासकीय समारंभात भाग घेता यावा यासाठी सकाळी ८.३५ ते ९.३५ वा. च्या दरम्यान ध्वजारोहणाचा अथवा इतर कोणताही शासकीय व निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. अन्य कार्यालयांना सकाळी ८.३५ पूर्वी किंवा ९.३५ नंतर ध्वजारोहण कार्यक्रम साजरा करता येईल.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ७.३० वाजता आणि शनिवार वाडा येथे सकाळी ८ वा. ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी कळविले आहे.
ध्वजारोहणानंतर तंबाखूमुक्तीची शपथ
शासकीय, निमशासकीय कार्यालये आदी सर्व ठिकाणी स्वातंत्र्यदिनानिमित्त सार्वजनिक ध्वजारोहणानंतर तंबाखूमुक्तीची शपथ घेण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळवण्यात आले आहे.