पुणे- महानगरपालिकेतील भाजप कार्यालयात मंगळवारी स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीवरून जोरदार राडा झाला. यावेळी गणेश बीडकर आणि गणेश घोष यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.सभागृहनेता श्रीनाथ भिमाले यांच्या कार्यालयात हा राडा झाल्याने येथील फर्निचर ची तोडफोड झाली .पुणे भाजपच्या कार्यालयात आज स्वीकृत नगरसेवकपदासाठी अर्ज भरण्यात येणार होते. यामध्ये गणेश घोष यांना स्वीकृत नगरसेवकपद मिळणार हे जवळपास निश्चित होते. मात्र, अखेरच्या क्षणी घोष यांना डच्चू देण्यात आला आणि पक्षाकडून गणेश बीडकर यांच्या नावाला पसंती देण्यात आली. मुळात भाजपकडून महानगरपालिका निवडणुकीपूर्वी एखाद्याला नगरसेवकपदासाठी उमेदवारी दिल्यास भविष्यात त्याचा अन्य कोणत्या पदासाठी विचार करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, गणेश बीडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून ऐनवेळी चक्रे फिरवून स्वीकृत नगरसेवकपद पदरात पाडूनघेतल्याने घोष यांचे कार्यकर्ते संतापले होते .
पुणे महापालिकेच्या स्वीकृत पदासाठी आज अर्ज दाखल केले जाणार होते. यामध्ये भाजप 3, राष्ट्रवादीकडून 1 आणि शिवसेना – काँग्रेस चिठ्ठीतून 1 निवडला जाणार आहे. यामुळे प्रत्येक पक्षाकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये भाजपकडून शेवटच्या क्षणापर्यंत गणेश घोष यांचे नाव निश्चित होते. मात्र, शेवटच्या क्षणी गणेश बिडकर यांचे नाव निश्चित केल्याने गणेश घोष यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपच्या दोन्ही कार्यालयाची तोडफोड करीत पक्षाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. तर गणेश बिडकर घोष यांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुकी देखील केली. गणेश बिडकर यांना पुन्हा महापालिकेची दारे उघडण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाचा वाटा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकण्यास मिळाली.
पुणे महानगरपालिकेमध्ये 162 नगरसेवकांपैकी सर्वाधिक भाजपचे 98 नगरसेवक निवडून आले आहे. त्यामुळे महापालिकेमध्ये जे 5 स्वीकृत म्हणून निवडले जाणार आहे. त्यातील 3 जण भाजपचे, राष्ट्रवादी 1 आणि शिवसेना-काँग्रेसमधून चिठ्ठीमधून 1 निवड होणार आहे. तर या पदासाठी आज पुणे महापालिकेत अर्ज दाखल केले जाणार होते. या दरम्यान प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांच्या नावांची देखील घोषणा करण्यात येणार असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती की,पक्ष कोणाला संधी देते याकडे गोपाल चिंतल, रघुनाथ गौड आणि गणेश घोष यांची नावे निश्चित असल्याची चर्चा शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, ऐनवेळी प्रदेशकडून गणेश घोष यांच्या ऐवजी गणेश बिडकर यांचे नाव निश्चित करण्यात आले.
गणेश घोष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच सभागृह नेत्याच्या ऑफिसमध्ये गणेश घोष आणि श्रीनाथ भिमाले यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्याच वेळी सभागृह नेत्याच्या ऑफिसमध्ये गणेश बिडकर हे उपस्थित होते. त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. यामध्ये बिडकर यांचा टी शर्ट फाटला. तर तोवर घोष यांच्या कार्यकर्त्यांनी सभागृह नेत्याची दोन्ही ऑफिसची तोडफोड केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पक्षनेत्यांच्या ऑफिस बाहेर असणाऱ्या कुंड्या, टेबलची देखील तोडफोड करण्यात आली.
या सर्व प्रकारामुळॆ नेहमी महापौर कार्यालयात शहराच्या विविध भागातून येणाऱ्या नागरिकांना काही समजत नव्हते. त्यांच्यामध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सर्व पक्ष नेत्याच्या ऑफिसमध्ये नागरिक अडकून पडले होते.तसेच बाहेर कोण काय करते हे कोणाला माहिती नव्हते. सर्व जण जीव मुठीत धरून आतमध्ये बसले होते. याच दरम्यान महापालिकेत पोलीस दाखल झाल्यावर परिस्थिती निवळली. या घटनेची शहरात काही क्षणांत चर्चा झाली.
या घटने विषयी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की, महापालिकेतील कार्यालयाची तोडफोड ही घटना दुर्देवी असून गणेश बिडकर यांचे नाव पक्षाकडून निश्चित करण्यात आले आहे. या घटनेबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोन्ही कार्यलायच्या तोडफोडीचा खर्च पक्षाकडून केला जाणार आहे, असे ही त्यांनी सांगितले.
सभागृह नेते श्रीनाथ भिमाले म्हणाले की, महापालिकेत घडलेली घटना निंदनीय असून तीनही उमेदवारांची नावे पालकमंत्री आणि शहर अध्यक्षांच्या आदेशानुसार निश्चित करण्यात आली आहे. या स्वीकृत नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये गणेश घोष यांच्यावर अन्याय झाल्याची कबुली देखील त्यांनी दिली.
या विषयी गणेश बिडकर म्हणाले की, स्वीकृतपदाची संधी दिल्याबद्दल पक्षाचे आभार मानले आहेत. भाजपमध्ये निष्ठावंतावर अन्याय होत नाही. या संधीसाठी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांचे मी आभार मानतो. तसेच आज महापालिकेत घडलेला प्रकार निंदनीय होता.
काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी या प्रकारावर टीका करत, भाजपकडून असा प्रकार दुस-यांदा झाला आहे. यापूर्वीही त्यांनी अशाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असलेले सभागृह फोडले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीने स्वीकृत सदस्यांची नावे पाठवण्यात आली होती. तरी सुद्धा हा प्रकार घडला. हा सर्व प्रकारातून एक प्रकारे मुख्यमंत्र्यांचाच निषेध करण्यात आला आहे. तसेच ज्यांनी कोणी तोडफोड केली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे व भाजपने स्वखर्चातून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.