पुणे-आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली . आज अनिल देशमुख ईडीसमोर हजर झाल्यानंतर चंद्रकांत पाटील या वर म्हणाले की, ‘अनिल देशमुख हे आज प्रकट झाले पण मग ते या पूर्वीच का आले नाहीत? आता काय कारवाई करायचे ते ईडी ठरवले. जर ते आज ईडीसमोर आले नसते तर त्यांना फरार घोषित करण्यात आले असते. ते टाळण्यासाठीच ते आज ईडी कार्यालयातमध्ये दाखल झाले आहेत. हे सर्व प्रयत्न अटक टाळण्यासाठी करेले जात तआहेत. मात्र, त्यांना शरण जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी या पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे –
संकटात सापडलेले शेतकरी, महिलांवरील वाढलेले अत्याचार, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अशा गंभीर विषयांवर बोलण्यासारखे काही नसल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून कोणाला तरी उभे केले जाते. त्याच पद्धतीने अल्पसंख्यांक कल्याणमंत्री नवाब मलिक बेछूट आरोप करत आहेत. पण भारतीय जनता पार्टी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या वादात ओढण्याचे गंभीर परिणाम मलिक यांना भोगावे लागतील.नवाब मलिक यांनी ‘एनसीबी’चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर बेछूट आरोप केले. वानखेडे यांच्या पाठीशी समाज उभा आहे. भारतीय जनता पार्टीही अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.नीरज गुंडे हे चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत.तरीही त्यांच्याविरोधात काही पुरावे आढळले तर चौकशी करा. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि कोणाच्या विरोधात काही पुरावे असतील तर बिनधास्त चौकशी करावी.पण प्रसिद्धी माध्यमांसमोर आक्रोश कशाला करता ? रोज तोंडाची वाफ का दवडता, असे पाटील यांनी सांगितले.
भाजपाच्या अनेक योजनांवर मविआ सरकारने आरोप केले, चौकशी केली. त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. सरकार तुमचे आहे आणि तुम्हीच अन्यायाचा कसला आक्रोश करत आहात ? जर तुमच्यावर अन्याय होत आहे, तर त्याचीही चौकशी करा !
मविआ सरकार महत्त्वाच्या प्रश्नांना बाजूला सारून इतर गोष्टींकडे जास्त रस दाखवते. महाराष्ट्रात लाखो शेतकऱ्यांचे नुकसान झाले, एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, कोविडमध्ये घोषित केलेल्या पॅकेजचा थांगपत्ता नाही, या सर्व प्रश्नांवर मविआ सरकार का बोलत नाही ?
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारने आमच्यासोबत बसून चर्चा करावी. हे आरक्षण कोणामुळे गेलं ते सगळं बाहेर पडेल. राज्याचे प्रमुख म्हणून उद्धव जी यांनीतरी चर्चा करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे !
‘देवेंद्र फडणवीसांनी कधी कोणाच्या बायकोवर आरोप केले का? रोज उठून अमृता फडणवीसांवर आरोप करत आहात. त्यांनी किती संयम बाळगायचा? आमच्याकडून राऊत किंवा पवार साहेबांच्या कुटुंबियांवर कोणी बोलले नाही. दरवेळी तुम्हाला बोलण्यासाठी अमृता फडणवीसांचे नाव का लागते? त्या शांत राहतात त्यामुळे आम्हाला वाईट वाटते. तुम्ही शांत का बसता असे विचारल्यावर त्या ठीक आहे, मोदींकडून काही शिकले पाहिजे की नाही असे म्हणतात. मोदी कधी बोलत नाही, पत्रकार परिषद घेत नाही. शांतपणे काम करत असतात, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, सरकारमध्ये असतानाही शिवसेनेची बाहेर पडण्याची हिंमत नव्हती. त्यावेळी ते कोरे कागद घेऊन फिरायचे. राज्यात ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे त्याची सुरुवात कोणी केली ते एकदा तपासले पाहिजे. तुम्ही रोज उठून नरेंद्र मोदींना चौकीदार चोर हे म्हणता, हे चालणार नाही. रोज उठून मोदींना चौकीदार चोर हे म्हणायचे. आई वडिलांपेक्षा सुद्धा श्रद्धा आहे आमची मोदींवर आहे. गप्प बसणार नाही. असंही ते म्हणाले.

