पुणे :
भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आय.एम.ई.डी.) च्या वतीने ‘सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थ सेवन यातील धोके आणि खबरदारी’ याविषयी एक दिवसीय जनजागृतीपर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारती विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि ‘आय. एम. ई. डी.’चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या जनजागृती शिबिराचे आयोजन आय.एम.ई.डी मध्ये अलिकडेच करण्यात आले होते.
गुन्हे शाखेच्या अॅन्टी नार्कोटिक्स सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम चित्रफितीद्वारे समजवून सांगितले. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा (पुणे शहर)च्या श्रीमती गिरीशा निंबाळकर यांनी ‘इंटरनेट वापरातील धोके आणि खबरदारी’ याविषयी मार्गदर्शन केले. प्रा. अॅन्थनी रोझ यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
‘सायबर गुन्हे टाळण्यासाठी तसेच व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण होणे या प्रमुख उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते’, असे अँन्थनी रोझ यांनी सांगितले. या शिबिराला आय.एम.ई.डी.मधील सर्व शाखांतील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

