आयएमईडीच्या राष्ट्रीय पातळीवरील ‘डॉ.पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न
125 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
पुणे :
‘आजच्या काळामध्ये स्पर्धा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. विद्यार्थ्यांच्या गुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांच्या गुणांना वाव दिला तर त्यांचा योग्य विकास होईल, अशी भावना ज्येष्ठ व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ.प्र.चिं.शेजवलकर यांनी व्यक्त केली.
निमित्त होते भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी)च्या वतीने आयोजित राष्ट्रीय पातळीवरील ‘डॉ.पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धेच्या -2017’ पारितोषिक वितरणाचे. यावेळी ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.
ही स्पर्धा सोमवारी आयएमईडी, पौड रोड येथे आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी केले. या स्पर्धेचे संयोजन डॉ.एच.एम.पाडळीकर, डॉ. प्रमोद पवार, डॉ.विजय फाळके, डॉ. सचिन ऐरेकर, सुजाता मुळीक यांनी केले होते.
स्पर्धेमध्ये एकूण 125 विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रथम क्रमांक विभागून 1) सोनाली शुक्ला (आय.एम.ई.डी, पुणे ) आणि 2) डिंपल साहजानवाला (फर्गुसन कॉलेज), द्वितीय क्रमांक विभागून भारत (देवगिरी कॉलेज, औरंगाबाद), निखिल नगरकर (एस.एस.जी.एम. कॉलेज, कोपरगांव), तृतीय क्रमांक विभागून नीलेश परबात (कॉलेज ऑफ एज्युकेशन, संगमनेर), सूरज सिंग (बी.व्ही.डी.यू. आयुर्वेद कॉलेज, पुणे) तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक विभागून हुसैन काटे आणि चेतना अरोरा यांना देण्यात आले.
या स्पर्धेचे हे चौथे वर्ष होते. महाविद्यालयीन सर्व विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आङ्मोजित करण्यात आली होती. पारितोषिकांचे स्वरूप प्रथम क्रमांकास रुपये दहा हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांकास रुपये सात हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांकास पाच हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे होते.
‘मानवता हा धर्म व माणूसकी ही जात’, ‘आरक्षणाचे फायदे व तोटे’, ‘जातिव्यवस्था नष्ट झाली पाहिजे का?’, ‘भ्रष्टाचार मुक्त जीवनाचे परिणाम’, ‘स्त्री सबलीकरण व तिची सुरक्षा’, ‘दहशतवाद-धर्म व आंतरराष्ट्रीय राजकारण’, ‘स्वातंत्र्याची सत्तरी’, ‘डिजीटल इंडिया’, ‘पर्यावरणाचे महत्व व त्याचे रक्षण’ हे स्पर्धेचे विषय होते.