पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची प्रमुख उपस्थिती
पुणे – इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉ्र्मेशन टेक्नॉलॉजी (आय स्क्वेअर आयटी) व नटराजन एज्युकेशन सोसायटी, नॅसकॉम यांच्या संयुक्त विद्यमाने १२ व्या ‘वुमन प्रोवेस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आय स्क्वेअर आयटी येथील मोहिनी छाब्रिया कन्वेन्शन सेंटर येथे हा कार्यक्रम नुकताच पार पडला.
महिलांच्या सशक्तीकरणासाठी तसेच त्यांच्या यशासाठी प्रोत्साहन व प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुण्याच्या पोलीस आयुक्त माननीय रश्मी शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली, लोकप्रिय टीव्ही अँकर आभा बकाया यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन वेगवेगळ्या चर्चासत्रांद्वारे महिलांच्या हितांसाठी चर्चा करण्यात आली.
सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर नटराजन एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त डॉ. गणेश नटराजन यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ते म्हणाले, महिलांनी चुलीपासून दूर येऊन नव्या आव्हानांना सामोरे जाणे महत्त्वाचे आहे. समाजातील प्रचलित रुढींना मोडीत काढून महिलांनी स्वतःला सशक्त बनवले पाहिजे. भारत हा येणाऱ्या काळातील महासत्ता असून युवा वर्गाला पुढाकार घेऊन भारताला आर्थिक महासत्ता बनवण्यासोबतच सामाजिक महासत्ताही बनवावे लागेल.
यावेळी बदलत्या भारतातील महिलांची भूमिका या विषयावरील चर्चासत्रात ग्लोबल टॅलेन्ट ट्रॅकच्या सीईओ डॉ. उमा गणेश, केपीआयटीच्या उपप्रमुख वैशाली वैद, अहमुने बायोसायन्सेसच्या प्रमुख डॉ. पारूल गंजू, फ्यूचर ग्रुपच्या सीईओ इका चतुर्वेदी-बॅनर्जी यांनी सहभाग नोंदवला. कोणत्याही देशाच्या आर्थिक व सामाजिक रचनेत एखादी महिला कशा प्रकारे निर्णायक भूमिका बजावते, याबाबत वरील मान्यवरांनी आपले विचार मांडले.
चर्चासत्रानंतर प्रमुख पाहुण्या आभा बकाया यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी समाजातील महिलांच्या भूमिकेचे महत्त्व तसेच महिलांचे समाजातील प्रगतीतील योगदान यांबाबत आपले मत व्यक्त केले. आभा यांनी त्यांची आतापर्यंतची वाटचाल व त्यांच्या सध्याच्या कर्तृत्वामागची कहाणी उपस्थितांना सांगितली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रमुख वक्त्या रश्मी शुक्ला यांनी समाजातील प्रत्येकाच्या आयुष्यातील महिलांचे महत्त्व समजावून सांगितले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, एक स्त्री नेहमी दुसऱ्यांचे संवर्धन करते, मात्र जेव्हा ती स्वतःचे संवर्धन करेल, तेव्हा ती खूप काही साध्य करू शकते. भारतासारख्या देशात साधारणपणे महिलांकडे या दृष्टीने पाहिले जात नाही. पण आता समाजाला बदल गरजेचा आहे.
आयस्क्वेअर आयटीच्या प्रेसिडेंट अरुणा कटारा यांनी उपस्थितांचे आभार मानले. मागील १२ वर्षांतील वुमन प्रोवेस च्या यजमानपदाचा अनुभव सर्वांसोबत शेअर केला. विद्यार्थ्यांमध्ये समानता, महिला सशक्तीकरण तसेच महिलांचा सन्मान वाढवणे हे आजच्या काळात महत्त्वाचे असल्याचेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमास पुण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक वर्गाची उपस्थिती होती.

