फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस आपल्या ‘हृदयांतर’ चित्रपटाव्दारे निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतोय.विक्रम फडणीस प्रॉडक्शन, यंग बेरी एन्टरटेन्मेट (प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा पुर्वेश सरनाईक) ह्यांच्या ‘हृदयांतर’ ह्या चित्रपटात मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे ह्यांच्या मुख्य भुमिका आहेत. ‘हृदयांतर’ हा एक भावनिक चित्रपट आहे.
विक्रम फडणीसचा मित्र आणि शुभचिंतक शाहरूख खानने मुहूर्ताचा क्लॅप देऊन आणि अभिनेता अर्जुन कपूरने मुहूर्ताचा नारळ फोडून मुंबईच्या ऑलिव्ह रेस्टॉरंटमध्ये सिनेमाचा शुभारंभ केला. सुपरस्टार शाहरूख खान ह्या समारंभाला आल्याने हा कार्यक्रम सिनेमाच्या कलाकारांसाठी अविस्मरणीय बनला.
शाहरूख खानशिवाय दिग्दर्शक जोडी अब्बास-मस्तान, विपुल शाह, संजय गुप्ता, सोहेल खान, आथिया शेट्टी, संजय कपूर, रितेश सिधवानी, संजय कपूर, बाबा सिद्दीकी, कियारा अडवाणी, मलायका अरोरा आणि तिची बहिण अमृता अरोरा, नील नितिन मुकेश, श्वेता बच्चन नंदा, अनु दिवाण ह्या सेलिब्रिटींनी कार्यक्रमाला हजेरी लावली.
शाहरूख खान यावेळी म्हणाला, “पहिला चित्रपट प्रत्येकासाठीच खुप महत्वाचा असतो. आणि तो आपल्या पहिल्या बाळासारखा असतो. मी ब-याच अवधीपासून विक्रमला ओळखतोय. प्रत्येक प्रोजेक्टसाठी तो किती मेहनत घेतो, ते मला माहित आहे. मला आशा आहे की, विक्रम हिंदी सिनेमेही बनवेल. ‘हृदयांतर’ सिनेमाच्या संपूर्ण टिमला माझ्याकडून शुभेच्छा. चांगलं चित्रीकरण करा. आणि सुंदर सिनेमा बनवा.”
निर्माता-दिग्दर्शक विक्रम फडणीस म्हणाले, “मराठी सिनेमा आता एका उंचीवर पोहोचलाय. आता हरत-हेच्या कथेला आणि शैलीला आपलं वेगळं स्थान निर्माण करता येईल. मी एक महाराष्ट्रीयन आहे. मी मराठी भाषा बोलतो आणि माझ्यासाठी ह्या भाषेत सिनेमा बनवणं सोयीस्कर आहे. मला असं वाटतं मला ज्यापध्दतीची कथा घेऊन यायचंय, त्यापध्दतीचे मुक्ता बर्वे आणि सुबोध भावेसारखे उत्तम कलाकार मला मिळालेत. योग्य पात्ररचनेसोबत, योग्यवेळी मी मराठी सिनेमा बनवतोय, असं मला वाटतं. असं नाही आहे, की, मी हिंदी फिल्म बनवू इच्छित नाही. पण ज्या पध्दतीची संवेदनशील कथा मी ह्या सिनेमाव्दारे सांगू इच्छितो, त्यापध्दतीचे कलाकार, आणि कथा मला मिळालीय. आणि ती मराठीत मोठ्या पडद्यावर आणावी असं मला वाटतंय.”
निर्माता प्रताप सरनाईक म्हणाले, “माझा मित्र विक्रमच्या पहिल्या चित्रपटाशी मी निगडीत असल्याचा मला आनंद आहे. त्याची कथा मोठ्या पडद्यावर येण्याचा मला आनंद आहे. मराठी चित्रपटसृष्टीत आता सिनेमा १०० कोटींच्या पार चालेला आपण पाहतोय. आणि ‘हृदयांतर’ सिनेमा एक नवीन रेकॉर्ड बनवेल अशी मला खात्री आहे.”
निर्माता पुर्वेश सरनाईक म्हणाला, “ आम्हांला नेहमीच चांगले सिनेमे बनवायचे आहेत. ‘हृदयांतर’ सिनेमा मराठी सिनेसृष्टीला एका वेगळ्या उंचावर नेईल असं मला वाटतं. ही कथा कौटुंबिक नात्यांवर आहे. आणि आमच्या हृदयाच्या अगदी जवळची आहे.”
दिग्दर्शक व्दयी अब्बास-मस्तान म्हणाले, “हृदयांतर सिनेमाव्दारे विक्रम सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करतोय. आणि तो खूप पूढे जाईल, अशा आम्हांला आशा आहे. त्याला आणि त्याच्या टीमला आमच्या शुभेच्छा.”
अर्जुन कपूर म्हणाला, “मी विक्रमला ब-याच अवधीपासून ओळखतो. विक्रमचं स्वप्न आता सत्यात येतंय. मराठी सिनेसृष्टी आता बहरत चाललीय. विक्रमच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिस यश लाभो, ह्यासाठी माझ्या शुभेच्छा .”
विक्रम फडणीस प्रॉडक्शन, यंग बेरी एन्टरटेन्मेट (प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा पुर्वेश सरनाईक) ह्यांचा ‘हृदयांतर’ सिनेमाचं दिग्दर्शन विक्रम फडणीस करत आहे. ११ डिसेंबर २०१६ पासून चित्रीकरणाला सुरूवात झालीय.