दिग्दर्शक अजय नाईक यांनी आत्तापर्यंत बावरे प्रेम हे, लग्न पाहावे करून आणि सतरंगी रे यांसारखे चित्रपट दिल्यानंतर ते आता पुन्हा एकदा ‘हॉस्टेल डेज‘ या आगामी चित्रपटातून रसिकांसमोर येत आहेत. हा चित्रपट १२ जानेवारी २०१८ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असून त्यांत प्रार्थना बेहेरे, आरोह वेलणकर, विराजस कुलकर्णी, अक्षय टंकसाळे आणि संजय जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.त्यांशिवाय या चित्रपटात पुण्यातील चिन्मय पटवर्धन, सागरिका रुकरी, पूर्वा देशपांडे, पूर्वा शिंदे, अंकिता लांडे आणि गणेश बिरंगल यांचा त्यांत समावेश आहे.या चित्रपटाची प्रस्तुती श्री पार्श्व प्रॉडक्शन्स आणि ट्वेन्टी फोर स्टुडिओ यांनी केली आहे आणि चित्रपटाची निर्मिती श्री पार्श्व प्रॉडक्शनच्या सुभाष बोरा, चंदन गेहलोत आणि हरविंदर सिंग यांनी अजय नाईक प्रॉडक्शनच्या सहकार्याने केली आहे.“हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात हॉस्टेलमधील दिवसांची एक वेगळी अशी विशेष आठवण असते. ज्यांनी हे हॉस्टेलचे आयुष्य कधीच अनुभवले नाही, त्यांना या आयुष्याबद्द्ल नेहमीच कुतूहल लागून राहिलेले असते. हॉस्टेलमधील त्या दिवसांबद्दल आठवण आली कि कोणीहि नॉस्टॅल्जिक होतोच,” असे उद्गार चित्रपटाचे दिग्दर्शक अजय नाईक यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तरीख जाहीर करताना काढले.ही कथा आहे १९९४ मधील; साताऱ्यातील कोपरगाव या काल्पनिक ठिकाणी स्थित एका हॉस्टेलची. १९९० च्या या दशकात महाराष्ट्राच्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये फार मोठे बदल अनुभवले गेले. याच दशकात अनेक खासगी महाविद्यालये सुरु झाली. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे विद्यार्थी शिक्षणासाठी येवू लागले. समाजामध्ये त्यामुळे फार मोठे बदल झाले आणि महाविद्यालयांच्या वातावरणातही बदल झाले. ‘हॉस्टेल डेज’ची कथा हेच बदल अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने, विनोदाच्या अंगाने आणि सकारात्मकरित्या मांडते.१९९०चे दशक हे मधुर गाण्यांसाठीही ओळखले जाते आणि त्याचमुळे या दशकाला जागणारा ‘हॉस्टेल डेज’ हा एक सांगीतिक चित्रपट आहे. या चित्रपटात एकूण आठ मधुर गाणी आहेत आणि ती आघाडीच्या बॉलीवूड गायकांनी गायली आहेत. सोनू निगम, कुमार सानू, शंकर महादेवन, शान, कुणाल गांजावाला, अवधूत गुप्ते आणि बेला शेंडे यांसारखे गायक कलाकार त्यासाठी एकत्र आले आहेत.चित्रपटाचे दिग्दर्शक आणि संगीतकर अजय नाईक यांना १९९०च्या दशकातील हा काळ ‘हॉस्टेल डेज’मध्ये त्याचप्रकारची गाणी देवून पुनरुज्जीवीत करायचा होता. या सर्व गायकांनी चित्रपटासाठी गावे अशी त्यांची इच्छा होती. “या दिग्गजांनी गाणी गायला होकार दिला आघाडीच्या सहा बॉलीवूड गायकांनी एका मराठी चित्रपटासाठी गाण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल,” असे उद्गार अजय नाईक यांनी काढले. त्यांच्याबरोबर मराठीतील आघाडीचे गायक प्रियांका बर्वे, आनंदी जोशी आणि रुचा बोंद्रे यांनीही यातील गाणी गायली आहेत.नाईक पुढे म्हणाले की, कॉलेज जीवनावर कित्येक यशस्वी चित्रपट आले आहेत आणि जगभरात कित्येक भाषांमध्ये त्यांची निर्मिती झाली आहे. पण हॉस्टेल जीवनावर बेतलेला हा एक आगळा असा चित्रपट आहे. म्हणूनच या चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये आत्ताच मोठया प्रमाणावर उत्सुकता लागून राहिली आहे.

