Home Blog Page 759

प्राचार्य डॉ.राजेंद्र झुंजारराव यांच्या वंदन या काव्यसंग्रहाचे प्रकाशन


पुणे : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे ५ येथील प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांच्या वंदन या दहाव्या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ महाराष्ट्र साहित्य परिषदेत पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालभारती,पुणेचे संचालक डॉ. कृष्णकुमार पाटील हे होते. प्रा.माधव राजगुरू हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘कवीची कविता ही उत्स्फूर्त अशी असते पण त्यावर संस्कारही तितकेच महत्त्वाचे असतात’, असे मत प्रा.माधव राजगुरू यांनी मांडले. भारत देशासाठी उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्तींच्या कार्यावर आधारित ४० कवितांचा या संग्रहात समावेश आहे.वंदन मधील कविता या विद्यार्थ्यांना आणि सर्वांनाच प्रेरक अशा आहेत, असे मत बालभारतीचे संचालक डॉ.कृष्णकुमार पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉक्टर अंजली सरदेसाई यांनी केले. आभार प्रदर्शन अभिरुची पब्लिकेशनच्या डॉ.वैजयंती जाधव- भोसले यांनी केले.

पुण्यातील13 टेकड्यांसह 20 ठिकाणांच्या सुरक्षेसाठी गृह विभागास पुणे पोलिसांचा 70 कोटींचा प्रस्ताव

पुणे-हनुमान टेकडी, जुना कात्रज बोगदा घाट, तळजाई, सुतारदरा, एआरएआय टेकडी, अरण्येश्वर मंदीर, बाणेर टेकडी, बोलाई माता मंदिर, जोगेश्वर मंदीर, वेताळबाबा टेकडी, चतु:श्रृंगी टेकडी, बोपदेव घाट, पारसी ग्राऊंड, पर्वती, कॅनॉल रोड या टेकड्यांसह अन्य ठिकाणी आणि ब्लॅक स्पॉटवर 600 अत्याधुनिक कॅमेरे बसवणे . त्यात 200 पीटीझेड कॅमेरे, 400 फिक्स कॅमेरे, 100 एएनपीआर कॅमेरे यांचा समावेश करणे आणि एकूणच पुणे शहरातील टेकड्या व अन्य ब्लॅक स्पॉट सुरक्षित केले जावे यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष उपाययोजना करण्यासाठी पुणे पोलिस सुमारे 70 कोटींचा प्रस्ताव गृह विभागास लवकरच देणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील 13 पेक्षा अधिक टेकड्या आणि 7 पेक्षा अधिक ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले असून, संबंधित ठिकाणे सीसीटीव्ही आणि लाईट्स च्या माध्यमातून सुरक्षित केली जाणार आहे.पुणे शहरातील 13 टेकड्यांचेसह 20 ठिकाणांच्या सुरक्षेसाठी हा प्रस्ताव लवकरच देणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

याशिवाय रेकॉर्डवरील गुन्हेगारांसाठी फेस रिडींग कॅमेरे देखील बसवण्यात येणार आहेत. टेकड्यांसह ब्लॅक स्पॉटवर पॅनिक बटण देखील असणार आहे. पॅनिक बटण दाबताच थेट पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला अलर्ट मिळणार आहे. याशिवाय पॅनिक बटण दाबताच त्या परिसरातील अन्य कॅमेरे देखील अलर्ट मोडवर जातील असे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. पोलिसांच्या पेट्रोलिंग वाहनात देखील पॅनिक बटणचा वापर होताच मोठा आलार्म वाजणार आहे, जेणेकरून पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना लगेचच संबंधित ठिकाणी पोहोचण्यास मदत होणार आहे.

यासोबतच या ठिकाणी कमीत कमी वेळेत पोलिस पोहोचावे यासाठी ७ विशेष मोबाईल सर्विलन्स व्हेईकल देखील तैनात करण्यात येणारआहेत. पोलिसांच्या या सातही वाहनांमध्ये ड्रोन कॅमेरे देखील असणार आहे. यासाठी अंदाजे 70 कोटी रुपये खर्च येणार असून, यामध्ये पाच वर्षांच्या देखभाल दुरूस्तीचा देखील समावेश असणार आहे.तसेच संबंधित ठिकाणी टु वे पीए सिस्टिम (माईक आणि स्पिकर) देखील लावले जाणार आहेत. याशिवाय रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसावे म्हणून 177 पेक्षा अधिक फ्लड लाइट्स देखील लावले जाणार आहेत. सिटी सर्वेलन्सचे बेस्ट फिचर्स यामध्ये समाविष्ट करण्यात आले असून, यामुळे अनेक अनधिकृत, अवैध घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना गदिमा पुरस्कार जाहीर:

पुणे-गदिमा प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार, तर दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांना गदिमांच्या पत्नी विद्या माडगूळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रसिद्ध कथा, पटकथा, संवादलेखक आणि गीतकार क्षितीज पटवर्धन यांना यंदाचा चैत्रबन पुरस्कार, तर प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल यांना विद्या प्रज्ञा पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रा. प्रकाश भोंडे आणि शिवराम कोल्हटकर उपस्थित होते. आधुनिक महाराष्ट्राचे वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त १४ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी पाच वाजता टिळक स्मारक मंदिर येथे होणाऱ्या गदिमा स्मृती समारोहात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नाटककार श्रीनिवास भणगे उपस्थित राहणार आहेत. एकवीस हजार रूपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे गदिमा पुरस्काराचे स्वरूप आहे. अकरा हजार रूपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे गृहिणी सखी सचिव या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर पाच हजार रूपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे चैत्रबन आणि विद्या प्रज्ञा पुरस्कारांचे स्वरूप आहे. या सोहळ्यानिमित्त गदिमांचे निकटवर्ती स्नेही आणि महाराष्ट्राचे नामवंत भाषा आणि शिक्षणतज्ञ ज्येष्ठ लेखक डॉ. न. म. जोशी यांचा प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येणार आहे. सन्मान चिन्ह आणि शाल असे सत्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या उत्तरार्धात गदिमांचे कनिष्ठ बंधू डॉ. अंबादास माडगूळकर यांच्या स्मरणार्थ, गदिमा पुरस्कार विजेत्या आशा काळे यांच्या आवडीच्या “गदिमा गीतांचा” खास कार्यक्रम स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे सादर केला जाणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन गदिमा प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

एन.डी.स्टुडीओचे परिचालन आता गोरेगाव फिल्मसीटीच्या ताब्यात

0

सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केली एन.डी.स्टुडीओची पाहणी

मुंबई दि. २८: दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारलेला कर्जत येथील एन.डी.स्टुडीओ महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने परिचालनासाठी (operations) ताब्यात घेतला असून सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी गुरुवारी एन.डी. स्टुडीओला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. त्यामुळे आता एन.डी.स्टुडीओचे परिचालन व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.

या पाहणी दौऱ्याकरीता महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर, उप सचिव महेश व्हावळ, मुख्य लेखावित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे, उप अभियंता ( स्थापत्य ) विजय बापट, विशेष कार्यकारी अधिकारी संजय कृष्णाजी पाटील, कक्ष अधिकारी अनिरुद्ध देशपांडे उपस्थित होते.

राष्ट्रीय कंपनी विधी प्राधिकरणाने ( NCLT ) महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सादर केलेल्या Resolution plan ला १४ नोव्हेंबर २०२४ रोजी मान्यता दिल्याने यापुढे एन.डी.स्टुडीओचे दैनदिन प्रशासन, सुरक्षा, चित्रीकरणे, महसूल वाढ, लेखा विषयक कामे शासनाच्या वतीने महामंडळाच्या नियंत्रणाखाली सुरु राहणार आहेत.

त्यामुळे हे सर्व कामकाज जाणून घेण्यासाठी श्री.खारगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने एन.डी. स्टुडीओची प्रत्येक्ष पाहणी केली. तसेच येथील कार्यरत असलेल्या व्यवस्थापनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधून नियमित कार्यप्रणाली समजून घेतली.

विशेष कृती पथकाची स्थापना

प्रशासकीय आणि विकासात्मक कामांमध्ये सुसूत्रता येण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक यांच्या सनियंत्रणाखाली विशेष कृती पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकामध्ये सह व्यवस्थापकीय संचालक समन्वयक, विशेष कार्यकारी अधिकारी उप समन्वयक, मुख्य प्रशासकीय अधिकारी, मुख्यलेखावित्तधिकारी, व्यवस्थापक कलागारे, उप अभियंता ( स्थापत्य ), उप अभियंता (विद्युत) आदि अधिकारी सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. तसेच वित्तीय, विधी, आयटी, मनुष्यबळ आदि क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागारांचा देखील समावेश आहे.

सध्यस्थितीमध्ये व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर आणि विशेष कार्यकारी अधिकारी संजय कृष्णाजी पाटील प्रशासकीय कामकाज पाहणार आहेत.

खरगे म्हणाले-EVM मुळे निवडणूक प्रक्रिया संशयास्पद, महाराष्ट्राच्या निकालाने चाणक्यही संभ्रमात ..

– काँग्रेस संघटनेत बदलाची गरज:
दिल्ली- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाबाबत काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) शुक्रवारी दिल्लीत बैठक झाली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले – निवडणुकीच्या निकालाने निराश होऊ नये. पक्ष मजबूत करण्यासाठी वरपासून खालपर्यंत बदल आवश्यक आहेत.
खरगे यांनी बैठकीत पुन्हा एकदा ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले- ईव्हीएमने निवडणूक प्रक्रिया संशयास्पद बनवली आहे, निवडणूक आयोगाने मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घ्यायला हव्यात.
खरगे म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निकालाची कोणतीही आकडेवारी समर्थन करू शकत नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने (MVA) ज्या प्रकारे कामगिरी केली, ते पाहता विधानसभा निकाल पाहून चांगले चांगले चाणक्यही संभ्रमात पडले आहेत.

  1. संस्थेत वरपासून खालपर्यंत बदलाची गरज
    खरगे म्हणाले- राज्यातील निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी हे आमच्यासाठी आव्हान आहे. पक्षश्रेष्ठींमध्ये ऐक्याचा अभाव आणि एकमेकांविरोधातील भाषणबाजीमुळे निवडणुकीत आपले नुकसान होत असून, कडक शिस्तीची गरज आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी तळागाळापासून एआयसीसीमध्ये बदल करावे लागतील.
  2. अनुकूल वातावरण म्हणजे विजयाची हमी नाही
    बैठकीत खरगे म्हणाले – निवडणुकीचे वातावरण आमच्या बाजूने असल्याने विजयाची हमी मिळत नाही. कालबद्ध रणनीती आखून पक्ष मजबूत करण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी वर्षभर अगोदर करावी लागेल, मतदार याद्या तपासाव्या लागणार आहेत.
  3. आम्हाला आमची निवडणूक रणनीती सुधारावी लागेल
    खरगे म्हणाले- महाराष्ट्रात आकडेवारीच्या निकालाला कोणीही न्याय देऊ शकत नाही. MVA लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पोल्स चाणक्यही संभ्रमात आहेत. आम्हाला आमची निवडणूक रणनीती सुधारायची आहे. चुकीची माहिती आणि चुकीच्या माहितीचा प्रतिकार करण्याचे मार्ग विकसित करावे लागतील.
  4. काँग्रेसचे सत्तेत येणे महत्त्वाचे आहे
    देशभरात जनतेचा अजेंडा राबविण्यास मदत होणार असल्याने काँग्रेसचे सत्तेत येणे महत्त्वाचे आहे, असे खरगे म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या चांगल्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीच्या निकालाने आम्हाला धक्का बसला असून, आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील, असे ते म्हणाले.
  5. मणिपूरपासून संभलपर्यंत अतिशय गंभीर समस्या आहेत
    खरगे म्हणाले- अनेक गोष्टी आहेत. मणिपूरपासून संभलपर्यंतचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. आपल्या अपयशावरून देशाचे लक्ष वळवण्यासाठी भाजप विविध माध्यमांतून अनेक धार्मिक मुद्द्यांवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करत आहे. सत्तेत असलेल्या फुटीरतावादी शक्तींना कोणत्याही किंमतीत पराभूत करायचे आहे. कारण आपण हा अद्भुत देश घडवला आहे.

सैन्यदलातून सेवानिवृत्तीनंतर शासनाच्या सेवेत आलेल्या रोहिदास गावडे यांचे योगदान प्रेरणादायी-उपसंचालक वर्षा पाटोळे

पुणे दि.२९: सैन्यदलात २० वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्तीनंतर शासनाच्या सेवेत आलेल्या रोहिदास गावडे यांचे योगदान प्रेरणादायी असून त्यांच्याकडून कामाप्रती असलेली शिस्त व आरोग्याप्रती असलेली जागृतता विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अंगीकृत करावी; तसेच कामे करताना जिद्द, चिकाटीसह नवनवीन कल्पना स्वीकारताना त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी, असे प्रतिपादन उपसंचालक वर्षा पाटोळे यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालय येथे उपसंपादक रोहिदास गावडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित निरोप समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, माहिती अधिकारी सचिन गाढवे, सहायक संचालक जयंत कर्पे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

श्रीमती पाटोळे म्हणाल्या, रोहिदास गावडे यांनी भारतीय सैन्य दलातील सेवा बजावल्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत माहिती व जनसंपर्क विभागात सन 2008 मध्ये रुजू झाले. त्यांनी अतिशय कमी काळात विभागातील कामकाज जबाबदारीपूर्वक पार पाडले. त्यांच्या अंगी असलेला कामाप्रती जिद्द, बाणेदारपणा, कर्तव्यपारायणता, समयसूचकता आणि आरोग्यविषयी जागृतता वाखाण्याजोगी आहे. सैन्यसेवेतील त्यांची शिस्त कार्यालयीन कामकाजात नेहमी दिसून आली. नवीन क्षेत्रात काम करताना चिकाटीने नव्या क्षेत्राशी त्यांनी जुळवून घेतले, असे सांगून श्रीमती पाटोळे यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

डॉ. ठाकूर म्हणाले, सैन्यदलातून राज्यसेवेत दाखल झालेल्या कर्मचारी आपल्याकरीता प्रेरणादायी असतात. त्यांनी सैन्यदलात देशाप्रती दिलेले योगदान कौतुकास्पद आहे, त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे. त्यांना सन्मानाची वागणूक देणे हे आपले कर्तव्य आहे, असेही डॉ. म्हणाले.

सत्कारमुर्ती श्री. गावडे म्हणाले, सैन्यदलातील योगदानानंतर पुन्हा देशाची सेवा करता आली हे आपले भाग्य समजतो. विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकारांची मोलाची साथ लाभली, यापुढेही देशसेवेकरीता कार्यरत राहीन, असे श्री.गावडे म्हणाले.

यावेळी श्री. गाढवे, श्री, कर्पे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यकत केले.

कचरा व्यवस्थापनासाठी ‘इंदौर पॅटर्न’ राबवा :आमदार बापूसाहेब पठारे अॅक्शन मोडवर..

अतिरिक्त महापालिका आयुक्तांसोबत मतदारसंघाची पाहणी

वडगाशेरी, पुणे: वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे विजयानंतर लगेचच विकासकामे करण्यासाठी तयारीनिशी उतरल्याचे दिसते. काल (ता. २९) अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्यासमवेत येरवडा, कळस येथील कचरा हस्तांतरण केंद्राची पाहणी केली. प्रामुख्याने कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने ही पाहणी पार पडली. कचरा व्यवस्थापनासाठी ‘इंदौर पॅटर्न’ सारख्या ठोस उपाययोजनांची गरज असल्याचे पठारे यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, “रोगराईला आमंत्रण देऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी कठोर पावले उचलून हा प्रश्न मार्गी लावणार आहे. कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण, संकलन आणि व्यवस्थापन हे आपल्या एकूणच मतदारसंघाच्या स्वच्छतेसाठी व पर्यावरणाच्या संतुलनासाठी अत्यावश्यक आहे.”

पाहणी दरम्यान, येरवडा भागातील कचरा हस्तांतरण केंद्राची सुधारून कचरा व्यवस्थापन सुरळीत करावे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराजवळील कचरा तातडीने उचलावा, कचरा गाड्यांची वेळोवेळी देखभाल व दुरूस्ती करून पर्यायी व्यवस्थेचीही सोय करावी, कळस येथील कचरा हस्तांतरण केंद्र बदलावे इत्यादि कचऱ्यासंबंधी सूचना व आदेश पठारे यांनी दिले.

कळस येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यामागे उघडी ड्रेनेज लाईन बंदिस्त करावी, कळस येथील शाळांमधील उद्यान मुलांसाठी वापरण्यासाठी उपलब्ध करावे, कळस येथील बॅास्केटबॅाल कोर्ट सर्व सोयी-सुविधा देऊन चालू करावे. तसेच, त्या ठिकाणी असलेले अवैध धंदे बंद करावे, कळस येथील पाण्याची टाकी दुरूस्त करावी, स. न. ११८ डीपी रस्ता लवकरात लवकर सुरू करावे, याही सूचना यावेळी त्यांनी केल्या.

आमदार बापूसाहेब पठारे यांच्या कामाबाबत मतदारसंघातील नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा होताना दिसत आहे. योग्य उमेदवाराला मतदान केले असल्याचे नागरिकांनी मत व्यक्त केले आहे.

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळित धान्य पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन

पुणे, दि.२९ : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. प्रयोगशील शेतक-यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यास शेतक-यांचे योगदान मिळेल, या उद्देशाने राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. रब्बी हंगाम सन २०२४ पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत संधी असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकस्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे विस्तार व प्रशिक्षण कृषी संचालक रफिक नाईकवाडी यांनी केले आहे.

कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या ५ पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र असून सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.३०० व आदिवासी गटासाठी रक्कम रु. १५० राहील. स्पर्धेत भाग घेण्याृसाठी शेतकऱ्याकडे स्व तःच्याध नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यधक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. तसेच पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी स्पर्धकास शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा आदी कागदपत्र आवश्यक आहेत. अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्या पुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात येईल. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते निवडण्यात येतील. स्पर्धेसाठी पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम रुपये ३०० व आदिवासीगटासाठी रक्कम १५० रुपये प्रवेश शुल्क राहील.स्पर्धेतील विजेत्यांना तालुका पातळीवर अनुक्रमे ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपये, जिल्हा पातळीवर १० हजार, ७ हजार व ५ हजार रुपये तर राज्य पातळीवर ५० हजार, ४० हजार व ३० हजार रुपये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात येईल. पिकस्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही श्री. नाईकवाडी यांनी केले आहे.

६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्रवेशिकेस मुदतवाढ

0

२७ डिसेंबर २०२४ पर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

मुंबई दि.२८: ६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्रवेशिकेस मुदतवाढ देण्यात आली असून निर्मात्यांनी २७ डिसेंबर २०२४ पर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केले आहे.

दिनांक १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत सेन्सॉर झालेल्या मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी आवश्यक असणारी प्रवेशिका महामंडळाच्या filmcitymumbai.org या संकेतस्थळावर तसेच जनसंपर्क विभागात उपलब्ध आहे. त्यामुळे निर्मात्यांनी विहित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह प्रवेशिका महामंडळाच्या जनसंपर्क विभागात सादर कराव्यात असे आवाहन महामंडळ प्रशासनाने केले आहे.

2 तारखेपर्यंत मुहूर्त नाही म्हणून सरकारची स्थापना नाही

0

मुंबई- विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 6 दिवस उलटले तरी अद्याप सरकार स्थापन झाले नाही. महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार अशा चर्चा सुरू असून शपथविधी आणि सरकार कधी स्थापन होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अशात शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी शपथविधी कधी होणार यावर भाष्य केले आहे. सध्या मुहूर्त नसून येत्या 2 तारखेपर्यंत कोणताही चांगला मुहूर्त नाही. 2 तारखेनंतर जेव्हा चांगला मुहूर्त असेल तेव्हा सरकार स्थापन होईल. 2 डिसेंबरनंतर कधीही सरकार स्थापन होऊ शकते, असे दीपक केसरकर म्हणाले. तसेच या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि सर्व राज्याचे मुख्यमंत्री अशी अनेक लोक उपस्थित राहू शकतात. त्यांच्या सुविधेप्रमाणे सगळे ठरविले जाईल, असेही केसरकर म्हणाले.

सध्या चांगला मुहूर्त नाही, येत्या 2 तारखेनंतर जेव्हा चांगला मुहूर्त असेल तेव्हा सरकार स्थापन होईल, असे दीपक केसरकर यांनी सांगितले. तसेच एकनाथ शिंदे यांचा योग्य तो सन्मान ठेवला जाईल, असे दिल्लीतून सांगण्यात आल्याचेही ते म्हणाले.
दिल्ली काय घडामोडी होत आहेत, याबाबत मला माहिती नाही. दिल्ली एकनाथ शिंदे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. एकनाथ शिंदे यांचा योग्य तो सन्मान केला जाईल, असे दिल्लीतून सांगण्यात आले आहे. त्यांचा सन्मान म्हणजे आम्हा सगळ्यांचा सन्मान आहे. मी शिंदेंच्या मागे ठामपणे उभे राहणार आहे. अमित शाह सांगतील, त्याप्रमाणे काम करायचे आहे, असे केसरकर म्हणाले.दरम्यान, नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी प्रशासनाने विविध जागांची चाचपणी सुरू केली आहे. त्यानुसार पहिली पसंती शिवाजी पार्कला असल्याची माहिती आहे. पण याचवेळी रेसकोर्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, राजभवन या पर्यायांचीही चाचपणी केली जात आहे. राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर व मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी यासंबंधी शिवाजी पार्कची पाहणी केल्याची माहिती आहे. आझाद मैदान, महालक्ष्मी रेसकोर्स व एमएमआरडीए मैदानाचाही प्रशासनाकडून विचार सुरू आहे.

खाली वाचा भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

देवेंद्र फडणवीस
गिरीश महाजन
पंकजा मुंडे
राधाकृष्ण विखे पाटील
गणेश नाईक
रविंद्र चव्हाण
मंगलप्रभात लोढा
चंद्रशेखर बावनकुळे
आशिष शेलार
नीतेश राणे
शिवेंद्रसिंहराजे भोसले
राहुल कुल
भिमराव तापकीर

संजय कुटे
गोपीचंद पडळकर
आता पाहा शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

उदय सामंत
शंभूराज देसाई
संजय शिरसाट
गुलाबराव पाटील
भरत गोगावले
प्रकाश सुर्वे
प्रताप सरनाईक
तानाजी सावंत
नीलेश राणे
राजेश क्षीरसागर
आशिष जैस्वाल
खाली पाहा एनसीपीचे संभाव्य मंत्री

अजित पवार
छगन भुजबळ
हसन मुश्रीफ
अनिल पाटील
धनंजय मुंडे
आदिती तटकरे
धर्मरावबाबा आत्राम

स्मार्ट यूजर बना, मात्र डिजिटल प्रेझेन्स मर्यादित ठेवा

mपीएमएच्या आयोजित व्याख्यानात ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांचा सल्ला

पुणे : आगामी काळ कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित तंत्रज्ञानाचा असेल, ही वस्तुस्थिती ओळखून, तंत्रस्नेही व्हा, स्मार्ट यूजर बना, मात्र स्वतःचा डिजिटल प्रेझेन्स मर्यादित ठेवा, असा सल्ला ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ, लेखक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी दिला.
पुणे मॅनेजमेंट असोसिएशन (पीएमए) आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर सेंटर (आयएमसीसी) यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित विशेष व्याख्यानप्रसंगी डॉ. शिकारपूर बोलत होते. पीएमएचे उपाध्यक्ष प्रदीप तुपे यावेळी उपस्थित होते. आयएमसीसी, बालशिक्षण मंदिर आवार, मयूर कॉलनी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. शिकारपूर यांनी विविध कॉर्पोरेट कंपन्यांच्या मनुष्यबळ विकास विभागातील अधिकाऱ्यांशी कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधित तंत्रसाधनांविषयी संवाद साधला. आगामी काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेशी (एआय) संबंधित विविध तंत्रसाधनांचा (टूल्स) असेल. मनुष्यबळ विकास विभागाशी (एच आर) निगडित अनेक बाबतीत एआय टूल्स यापुढे वापरली जातील. त्यामुळे अनेक पारंपरिक रोजगारांवर गदा येईल, पण एआय क्षेत्रात नवे रोजगारही निर्माण होतील, असे सांगून डॉ. शिकारपूर म्हणाले, आगामी काळात अनेक ठिकाणी मानवी हस्तक्षेपाची गरज एआय साधने पूर्ण करतील. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाची भीती वा असुरक्षितता न बाळगता, नव्या तंत्रांशी मैत्री करा, स्मार्ट यूजर व्हा आणि नव्या काळाच्या गरजांशी सुसंगती राखा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
या पुढील काळात कंपन्या, संस्थांनी वरिष्ठ पातळीवर स्वतःच्या व्यवसायाचे एआय धोरण ठरवणे गरजेचे आहे. ऑटोमेशन हाच परवलीचा शब्द राहणार आहे, हे ओळखून आभासी पद्धतीने काम करण्याची सवय लावून घ्या. कृत्रिम बुद्धिमत्तेचे विश्व आता मानवी भावनात्मक रूपही धारण करण्याच्या वाटेवर आहे. इमोटिव्ह रोबोटिक्स ही विद्याशाखा वेगाने प्रगती करत आहे. त्यामुळे यापुढे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग ही विद्याशाखा महत्त्वाची ठरणार आहे. तंत्रस्नेही होताना, वैयक्तिक पातळीवर समाजमाध्यमांचा वापर विवेकी पद्धतीने करा, असे डॉ. शिकारपूर म्हणाले.
पीएमएचे उपाध्यक्ष प्रदीप तुपे यांनी डॉ. दीपक शिकारपूर यांचे स्वागत केले. अविनाश आर्वीकर यांनी परिचय करून दिला. नितीन दांगल यांनी सूत्रसंचालन केले.

भ्रष्टाचार हा देशाच्या सुरक्षेतील सर्वात मोठा धोका : अविनाश धर्माधिकारी

पुणे : पाकिस्तान आणि चीनपेक्षा देशांतर्गत असलेला भ्रष्टाचार हा भारताच्या सुरक्षितेतील सर्वात मोठा धोका आहे. भ्रष्ट चारित्र्य आणि अमर्यादित स्वार्थ यामुळे देशाचे अतोनात नुकसान झाले आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या पदांवर चारित्र्यवान व्यक्ती असल्या पाहिजेत, अशी अपेक्षा चाणाक्य मंडल परिवाराचे संस्थापक, निवृत्त आएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केली. जगात पसरलेल्या नक्षलवाद आणि इस्लामवादाचा धोका जगाबरोबरच भारतालाही आहे. नक्षलवादी हे चीनचे तर इस्लामवादी हे पाकिस्तान आणि बांगलादेशाचे हस्तक आहेत, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

अनुबंध प्रकाशनतर्फे ब्रिगेडिअर हेमंत महाजन (निवृत्त) यांच्या ‌‘भारताची सागरी सुरक्षा : आव्हाने, चिंता आणि पुढील वाटचाल‌’ या भाग 1, भाग 2, भाग 3 या तीन पुस्तकांचे प्रकाशन गुरुवारी (दि. 28) धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. बेळगाव तरुण भारतचे समूह सल्लागार किरण ठाकूर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर नॅशनल शिपिंग बोर्डचे माजी अध्यक्ष प्रदीप रावत यांची प्रमुख उपस्थिती होती. अनुबंध प्रकाशनचे संचालक अनिल कुलकर्णी मंचवार होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

धर्माधिकारी पुढे म्हणाले, आजच्या काळात सैन्याच्या माध्यमातूनच केवळ युद्धे लढली जात नाही तर तंत्रज्ञानाचा आधार घेऊन युद्धनिती रचल्या जात आहेत. एकसंघ राष्ट्राच्या निर्मितीसाठी देशातील जनतेने एक होणे आवश्यक आहे. तेव्हाच राष्ट्रीयत्व बळकट होईल. देशाच्या सुरक्षेसाठी ठोस धोरण अवलंबिले गेले पाहिजे. सागरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून केलेल्या उपाययोजांनी माहिती ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांच्या पुस्तकातून मिळत असून त्याचे संपूर्ण जीवन भारताच्या सुरक्षेच्या विषयांवर अभ्यास करण्यासाठी वाहिलेले आहे.

पुस्तक लिखाणामागील भूमिका विशद करताना ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी सागरी सुरक्षेचा इतिहास, वर्तमानातील धोके, राष्ट्रीय सुरक्षा, महासागरी व्यूहरचनेची उत्क्रांती, बाह्य आणि अंतर्गत धोके, सागरी सुरक्षा आणि भारतीय तटरक्षक, समुद्री परिस्थिती, पायाभूत सुविधा, नियोजन, वित्त व्यवस्थापन अशा विविध मुद्द्यांवर लिखाण केले असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना किरण ठाकूर म्हणाले, ब्रिगेडिअर हेमंत महाजन हे व्याख्याने, लेखमाला, पुस्तके अशा विविध माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. ते पुढे म्हणाले, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्या-राज्यांनी एकत्रितरित्या विचार न केल्यास भविष्यात धोके वाढण्याची भीती आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भारताच्या परराष्ट्रीय धोरणात बदल झाले आहेत. देशासमोरील धोके ओळखून सैन्य दलांना अत्याधुनिक युद्ध सामुग्री मिळणे आवश्यक आहे.

देशाला मोठ्या प्रमाणावर सागरी किनारा लाभला असूनही सागरी सत्ता बनण्याची आकांक्षा नव्हती असे सांगून प्रदीप रावत म्हणाले, त्यामुळे समुद्रमार्गे भारतावर अनेक आक्रमणे झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरक्षेच्या दृष्टीने सागरी सत्ता बनण्याचे आत्मभान जागृत केले. ते पुढे म्हणाले, समुद्रामार्गे आज देशाची कोंडी होत आहे. अशा परिस्थितीत होत असलेले धोरणात्मक बदल आश्वासक वाटत आहेत.
प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करून अनिल कुलकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले तर आभार अस्मिता कुलकर्णी यांनी मानले.

रविवार १ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजता प्रारंभ होणार

यंदाच्या ‘नाईट मॅरेथाॅन’ला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद

पुणे३८वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथाॅन ‘नाईट मॅरेथाॅन’ असणार असून रविवार दि १ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजता सणस मैदान येथून स्पर्धेचा प्रारंभ होईल. पहाटे ३.०० वाजता मुख्य मॅरेथाॅनला व पाहटे ३.३० वाजता अर्ध मॅरेथाॅनला सणस मैदान येथून फ्लॅग ऑफ करण्यात येईल. सकाळी ६.३० वाजता १० कि.मी, सकाळी ७.०० वाजता ५ कि.मी व सकाळी ७.१५ वाजता व्हीलचेअर स्पर्धा सुरु होऊन, सकाळी 8.३० वाजता स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सणस मैदान येथे होणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जेष्ठ नेत्या खा. सुप्रिया सुळे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, खा.प्रा मेधा कुलकर्णी, आ. बापू पठारे, अॅड वंदना चव्हाण, रवींद्र धंगेकर, मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले व उद्योगपती विशाल चोरडिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. स्पर्धेतील विजेत्यांना पुणे महानगरपालिकेतर्फे ३५ लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. ‘शाश्वत पर्यावरणासाठी पळा’ हे यंदाचे घोषवाक्य आहे.
यंदा सणस मैदान – सारसबाग – स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा – सिंहगड मार्ग – नांदेड सिटी व आत जाऊन परत अशी दोन फेऱ्यांची ४२.१९५ कि.मी ची पूर्ण मॅरेथाॅन व त्याच मार्गे एका फेरीची अर्ध मॅरेथाॅन संपन्न होणार आहे. यामध्ये १२,०००हून अधिक धावपटू धावणार असून त्यात सुमारे ८० परदेशी स्पर्धक आहेत. याशिवाय सेनादल, बी.ई.जी, ए.एस.आय, रेल्वे तसेच सरहद, कारगिल, आंतरराष्ट्रीय मॅरेथाॅन मधील विजेते महिला व पुरुष धावपटू हे देखील लक्ष वेधून घेतील.
यास्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून सुमारे २,५०० स्वयंसेवक, ५००हुन अधिक तांत्रिक अधिकारी, पोलीस व वाहतूक पोलीस, भारती विद्यापीठ, सिंम्बोयसिस, नवले हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल आदींचे २०० डॉक्टर, २५० नर्सेस, मार्गावर १०८ अॅम्ब्यूलंसेस , पाणी, एनर्जी ड्रिंक, स्पंजींगची सोय, भरपूर प्रकाश योजना आणि सणस मैदान येथे मिनी हॉस्पिटलची उभारणी आदी. तयारीवर शेवटचा हात फिरवला जात आहे. चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयातीलही शेकडो मुले स्पंजिंगची जबाबदारी समर्थपणे पार पाडतिल
या वर्षी सायकलोहोलिक्स संघटनेचे ५० सायकल पायलट स्पर्धा मार्गावर धावपटूना पायलटिंग करणार आहेत, पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेचे ५० राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पंच या स्पर्धेची तांत्रिक बाबी , अंतिम निकाल तयार करणे. इ. बाबी सांभाळतील तसेच इलेक्ट्रॉनिक टायमिंग सिस्टीम मॅट्स ,सेनसर्स सुध्दा स्पर्धा मार्ग आणि प्रारंभ ,टर्निंग पॉइंट , अंतिम रेषेवर लावली जातील.
शुक्रवारी बहुतेक परदेशी धावपटू पुण्यात पोहचले असून शुक्रवारी सायं. ५ नंतर सणस मैदान येथे या परदेशी महिला व पुरुष धावपटूंनी सराव केला. सहभागी सर्व गटातील खेळाडूंना टी-शर्ट, कॅप, चेस्ट नंबर देण्यात आले आहेत. पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर ठळकपणे नोंदवणाऱ्या या ‘नाईट मॅरेथाॅन’च्या स्वागतासाठी मार्गावरील सार्वजनिक मंडळे व नागरिकांनी जरूर यावे असे आव्हान पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथाॅन ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. अभय छाजेड आणि जाॅइंट रेस डायरेक्टर रोहन मोरे यांनी केले.

⁠पुणे-दिल्ली दरम्यान ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ सुरु करा -मुरलीधर मोहोळ आग्रही

पुणे-

पुणे आणि पुण्याशी संबंधित विविध विषयांसंदर्भात नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे आणि सूचना-प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेतली.आणि ⁠पुणे-दिल्ली दरम्यान ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ सुरु व्हावी,⁠पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक, पुणे-कोल्हापूर या दरम्यान ‘वंदे भारत’ तरतूद व्हावी.अशी जोरदार आग्रही मागणी केल्याने अश्विनी वैष्णव यांनी त्या अनुषंगाने मागण्यांच्या पूर्ततेसाठी संबधित विभागांना तातडीने कार्यवाही अहवालठेवण्याचे निर्देश दिले आहेत . यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सहप्रभारी म्हणून जबाबदारी यशस्वीपणे निभावल्याबद्दल वैष्णव यांचे मोहोळ यांनी अभिनंदनदेखील केले.

बैठकीत खालील विषयांवर चर्चा झाली…

१. पुणे आकाशवाणीचे प्रसारण मुंबईऐवजी पुणे केंद्रावरूनच व्हावे आणि पुण्यासाठी ‘रेन्बो’ रेडिओ चॅनेल सुरु करावे.
२. पुणे आकाशवाणीत अद्ययावत सामग्री उपलब्ध व्हावी आणि कार्यक्रम विभागातील रिक्त जागा तातडीने भराव्यात.
३. ⁠पुणे-दिल्ली दरम्यान ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ सुरु व्हावी.
४. ⁠पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक, पुणे-कोल्हापूर या दरम्यान ‘वंदे भारत’ तरतूद व्हावी.
५. ⁠पुणे दूरदर्शन केंद्र अद्ययावत व्हावे.
६. ⁠पुणे ते जोधपुर (राजस्थान) दरम्यान सुरु असलेल्या रेल्वे फेऱ्यांची संख्या वाढावी.

वरील सर्व विषयांवरील चर्चेअंती वैष्णव यांनी विषयांच्या पूर्ततेसाठी योग्य ते निर्देश दिले आहेत.

पुणे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

पुणे, दि. २९: केंद्र शासनाच्यावतीने १२ ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवात जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंना सहभागी होता यावे, याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे, नेहरु युवा केंद्र संघटन, पुणे व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरावर युवा महोत्सवाचे ५ व ६ डिसेंबर २०२४ रोजी डॉ. ए. आर. शेख असेंब्ली सभागृह, आझम कॅम्पस, पुणे येथे आयोजन करण्यात येणार आहे.

युवा महोत्सवामध्ये संकल्पना आधारीत स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत लोकनृत्य व लोकगीत, कौशल्य विकासाअंतर्गत कथा लेखन, कविता, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, भारत यंग लीडर्स डायलॉग (पंतप्रधान यांच्या समवेत चर्चा) व युथ आयकॉन या उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी संबंधित शाळा, महाविद्यालये अथवा युवक युवतींनी त्यांचे प्रवेश dsopune6@gmail.com वर किंवा ९५५२९३१११९ या व्हॉटसॲ क्रमांकावर ३ डिसेंबर २०२४ तर विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग (पंतप्रधान यांच्या समवेत चर्चा) या उपक्रमात युवा संस्थांनी सहभागी होण्याकरीता https://mybharat.gov.in/ या संकेतस्थळावर ५ डिसेंबर २०२४ पर्यंत नोंदवावेत.

जिल्हा व विभागस्तरावरील विजयी युवक, युवती, राज्यस्तरावर व राज्यस्तरावरुन निवड केलेला राज्याचा संघ राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभागी करण्यात येणार आहे. अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी, सर्व्हे नं. १९१, ग्यानबा मोझे हायस्कुल समोर, विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा, पुणे -०६ दूरध्वनी क्र. ०२०-२६६१०१९४ येथे किंवा dsopune6@gmail.com या ईमेल पत्त्यावर संपर्क साधावा. तरी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, युवक मंडळे यातील इच्छुक कलावंत, स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.
0000