Home Blog Page 724

छतावर सौर ऊर्जानिर्मितीसाठी महावितरणतर्फे मोफत नेट मीटर

0

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२४- छतावर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवून मोफत वीज मिळविण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत आता महावितरणतर्फे ग्राहकांना मोफत नेट मीटर मिळेल. त्यामुळे ग्राहकांना आपल्या प्रकल्पात किती वीजनिर्मिती झाली व घरामध्ये किती विजेचा वापर झाला याची अद्ययावत माहिती मोबाईल ॲपवर मिळेल. मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून ग्राहकांना ही सवलत देण्यात येत आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. त्या अंतर्गत तीन किलोवॅटपर्यंतच्या क्षमतेचे प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळते.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत ग्राहकाच्या छतावर बसविलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पात किती वीज तयार झाली, ग्राहकाने घरात किती वीज वापरली व किती अतिरिक्त वीज ग्राहकाकडून महावितरणला विकली गेली याची नोंद करण्यासाठी एक वेगळा नेट मीटर बसवावा लागतो. आतापर्यंत त्याचा खर्च ग्राहकाला करावा लागत होता. आता महावितरणने ग्राहकांना सोलर नेट मीटर विनामूल्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांचे पैसे वाचण्यासोबत त्यांना मोबाईल फोनवरच वीजनिर्मिती, वीज वापर, अतिरिक्त युनिट इत्यादी माहिती दररोज मिळेल. त्यानुसार त्यांना वीजवापराचे नियोजन करून वीजबिल शून्य येण्यासाठी नियोजन करता येईल.

राज्यात सध्या ३ लाख २३ हजार ग्राहकांनी महावितरणकडे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. या सर्व ग्राहकांना महावितरणच्या सोलर नेट मीटर विनामूल्य देण्याच्या निर्णयाचा लाभ होईल.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू झाल्यापासून राज्यात ८३,०७४ ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवून योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांची एकत्रित क्षमता ३१५ मेगावॅट आहे व त्यांना केंद्र सरकारकडून ६४७ कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे. 

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी www.pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी लागते. महावितरण ही या योजनेची अंमलबजावणी करणारी राज्यातील नोडल एजन्सी आहे. महावितरणने यासाठी एक स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना व पुरवठादारांना महावितरणच्या कार्यालयात येण्याची आवश्यकता राहत नाही. नोंदणी केल्यापासून अंतिम मंजुरीनंतर प्रकल्प सुरू करेपर्यंत ‘फेसलेस’ व ‘पेपरलेस’ पद्धतीने काम चालू राहते. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत गतिमानता आली आहे.

बाल आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांनी घेतले व्यवहारज्ञान 

विद्यार्थ्यांनी लावले सुमारे ३० स्टॉल
पुणे : विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान प्राप्त व्हावे आणि गणित विषयाच्या मूलभूत क्रियांना चालना मिळावी, या उद्देशाने बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि. मराठी शाळेच्या प्रांगणात ‘बाल आनंद मेळावा’ आयोजित करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ, भाजीपाला, शैक्षणिक साहित्य, खेळण्यांची छोटी दुकाने मांडून व्यवहारज्ञानाचा अनुभव घेतला. याशिवाय नेमबाजी, रिंग फेकणे आणि गंमत जत्रेतील विविध खेळांमधून मुलांनी आनंद घेतला.

शिक्षण प्रसारक मंडळीच्या नू.म.वि. मराठी शाळेच्या प्रांगणात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन शि. प्र. मंडळीचे श्रीकृष्ण चितळे, पराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका माया सोयाम, पर्णल ठाकूर हे उपस्थित होते.

पराग ठाकूर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक जडणघडणीबरोबर स्वसंरक्षणासाठी शाळेत लाठी-काठीचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचप्रमाणे, आधुनिक तंत्रज्ञानाशी त्यांचा संपर्क वाढावा यासाठी कॉम्प्युटर लॅब सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान मिळावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा याकरिता आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.

या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सुमारे ३० स्टॉल लावले होते. विद्यार्थी व पालकांनी मिळून धान्य, कडधान्य, भाजीपाला, शैक्षणिक साहित्य, खेळणी, तसेच घरी बनवलेले केक, चॉकलेट, बिस्किट, मोदक यांसारख्या खाद्यपदार्थांचे प्रदर्शन सादर केले. रिंग फेकणे, बॉलने ग्लास पाडणे, पाळणा, जम्पिंग जॅक अशा खेळांमधून उपस्थितांनी आनंद लुटला.

अखंड ध्यानामध्ये स्वतः जगायला शिका – सरश्री

पुणे-अध्यात्मिक गुरु व लेखक सरश्री यांचा “या… ध्यानामध्ये जगायला शिकूया” हा अध्यात्मिक कार्यक्रम सिंहगड रोड येथील मनन आश्रम येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी सरश्री यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. आजच्या धावपळीच्या युगात ध्यान करणे किती गरजेचे आहे. याचे त्यांनी महत्त्व पटवून देत त्याच बरोबर ध्यानामध्ये कसे जगायचे याचा त्यांनी उपस्थितांना कानमंत्र दिला.यावेळी बोलताना सरश्री म्हणाले, की “एखादी गोष्ट मिळवण्यासाठी लोक हजारो तंत्र, मंत्र शिकत असतात, हे करा, ते करा, हे कसे मिळवायचे, ते कसे मिळवायचे याचे मंथन करत बसतात.” सोशल मीडियावर जावून अशा प्रकारचे हजारो व्हिडीओ लोक बघतात. मी कोण आहे. याचा विचार न करता स्वतःला सोशल मीडियावरती शोधत असतात. ज्या ठिकाणी तुम्ही नाहीत. त्या ठिकाणी तुम्ही कसे सापडाल. त्यामुळे आभासी दुनियेत न रमता खऱ्या आयुष्यात आपण सर्वांनी जगायला शिकले पाहिजे. तुम्ही नसलेल्या गोष्टी बनवण्याचा विचार केलात तर तुम्हाला पूर्णत्व मिळणार नाही. तुम्ही म्हणाला मी एक स्त्री आहे, तर स्त्री हे पूर्ण ज्ञान नाही, तो स्त्री असण्याचा एक भाग आहे. आपण जे काही झालो त्यात फक्त समाधान आहे, तुम्ही जे जीवन जगत आहात ते आता संपून जाईल. तुम्हाला स्वत:ला स्वतःबद्दल जाणून घ्यायचे आहे ? मग ध्यान करताना तुम्ही काय गृहीत धरत आहात, जे तुम्ही गृहीत धरत आहात त्यात समाधान आहे ? ध्यानात बसलेले असताना, तुम्हाला काय वाटत आहे? याचा विचार व्हायला हवा. ध्यानामध्ये आपण जगायला शिकल्याशिवाय आपण जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. 

सेलिब्रेटी मास्टरशेफ कार्यक्रमात फराह खान आता सेलिब्रेटिंनाच धारेवर धरणार!

(Sharad Lonkar)

नव्या वर्षात सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर मास्टरशेफ इंडिया हा बहुप्रतिक्षित कार्यक्रम आता पूर्वीपेक्षा जास्त उत्साहवर्धक असेल, हा कार्यक्रम आता सेलिब्रेटी मास्टरशेफ- अब उन सबकी सिटी बजेगी.. या नावाने परत येत आहे.
विविध खाद्यपदार्थांची आवड असलेल्या आणि मनोरंजन करणाऱ्या फराह खान या सदर सेलिब्रेटी मास्टरशेफ कार्यक्रमात सूत्रसंचालन करतील. संबंधित पदार्थांच्या कहाण्या तससेच त्यासंबंधीचे किस्से त्या या कार्यक्रमात सांगतील. रोखठोक आणि अत्यंत प्रामाणिक प्रतिक्रियेसाठी प्रसिद्ध असलेल्या फराह खान या आपल्या किचनमधील सर्वात कठीण टीकाकार असतील. समोर सेलिब्रेटी असले तरीही त्या शब्दांमध्ये भेदभाव करत नाहीत. धारदार प्रतिक्रिया आणि वन लायनर्स याद्वारे त्या स्पर्धकांना जमिनीवर ठेवतात तसेच प्रत्येक डिश तयार करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देतील.

या कार्यक्रमाबद्दल बोलताना फराह खान म्हणाल्या, “मी खाद्यपदार्थांची शौकिन आहे. पाककृतींचे प्रयोग करणे, नवे पदार्थ चाखून पाहणे, त्यात माझे काही बदल करणे मला आवडते. माझे स्वत:चे डिजिटल चॅनेल तयार करून मी माझे खाद्यपदार्थाबद्दलचे प्रेम प्रवाही केले आहे. मी सेलिब्रेटी मास्टरशेफ या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करण्याची संधी मिळाली तेव्हा मी ती सोडली नाही. या कार्यक्रमाचे स्वरुप मला खूप आवडते. तसेच या स्पर्धेतले उत्कृष्ट शेफ जज, प्रतिभाशाली रणवीर ब्रार आणि विकास खन्ना यांच्याशी मैत्री झाल्याने मला आनंद झाला. मास्टरशेफचा परिवार पहिल्यांदा भारतात आला तेव्हा मी त्याचा एक भाग होते आणि आता सध्याच्या भागात सहभागी असलेले सगळेच अविश्वसनीय सेलिब्रेटी माझ्या चांगलेच परिचयाचे आहेत. त्यामुळे आता आम्ही कार्यक्रमात चांगलाच धुडगूस घालणार आहोत. सूत्रसंचालक या नात्याने मी मास्टरशेफच्या किचनमध्ये मेजनानी देण्यासाठी मी उत्सुक आहे. रोखठोक, आरपार प्रामाणिक प्रतिक्रियांचीच इथे अपेक्षा करा.. कारण ‘सेलिब्रेटी मास्टरशेफमध्ये फराह खान शिट्टी वाजवणार…’ प्रेशर सुरु झाले आहे.. फक्त उत्कृष्ट कलाकारच चमकणार..’’

धनंजय मुंडेंना सातपुडा,पंकजा मुंडेंना पर्णकुटी बंगला .. मुंबईतील बंगल्यांच्या चाव्या..कोणत्या मंत्र्याला कोणता बंगला ..पहा

मुंबई : राज्यात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अखेर 8 दिवसांनी मंत्र्‍यांचे खातेवाटपही पार पडले. त्यामध्ये, अनेक नेत्यांच्या खात्यांची खांदेपालट करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. तर, काही नेत्यांना पहिल्यांदा मंत्रि‍पदाची संधी मिळाल्यानंतर महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देखील देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ (Minister) खातेवाटपानंतर आता मंत्र्यांना मंत्रालयातील दालनाचे आणि दालनाच्या पाठोपाठ सरकारी बंगल्यांचेही वाटप करण्यात आले. त्यामध्ये, विधानपरिषद सभापती राम शिंदे यांना ज्ञानेश्वरी हा बंगला देण्यात आला असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul narvekar) यांना शिवगिरी बंगल्याची चावी मिळाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला देण्यात आला आहे.चंद्रकांत पाटील यांना सिंहगड बंगला देण्यात आला आहे.

महायुतीच्या 31 मंत्र्यांना बंगल्याचं वाटप करण्यात आलं असून त्याची यादीही समोर आली आहे. त्यानुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक, राधाकृष्ण विखे पाटलांना रॉयलस्टोन, पंकजा मुंडेंना पर्णकुटी, शंभूराज देसाईंना मेघदूत तर गणेश नाईकांना पावनगड बंगला देण्यात आला आहे. धनंजय मुंडेंना सातपुडा, देण्यात आला आहे.

शि. द. फडणीस यांना मानाचे रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्ड

पहिल्या रोटरी डिस्ट्रिक्ट साहित्य संमेलनात होणार गौरव

पुणे : जानेवारीत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलनात सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्ड देऊन गौरव केला जाणार आहे, अशी माहिती प्रांतपाल 3131चे शितल शहा यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
शनिवार, दि. 4 आणि रविवार, दि. 5 जानेवारी 2025 या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. व्यवसायिक सेवा देताना सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीस मानाचे रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्ड देऊन गौरविले जाते. संमेलनाचे निमित्त साधून फडणीस यांचा गौरव केला जाणार आहे.
वयाच्या शंभरीत पदार्पण केलेले शि. द. फडणीस हे आजही तेवढ्याच उर्जेने आणि उमेदिने कार्यरत आहेत. आजही त्यांची व्यंगचित्रे विविध माध्यमांधून प्रसिद्ध होत असून ते आपल्या व्यंगचित्रांद्वारे लोकांना हसवत आहेत. व्यंगचित्रे समाजातील विसंगतीवर टिकात्मक पद्धतीने भाष्य करणारी असतात हा समज फडणीस यांच्या व्यंगचित्रांमधून खोटा ठरला आहे. त्यांच्या शब्दविरहित चित्रांनी खमंग, खुसखुशीत विनोद निर्मिती केली आहे. अनेक लेखकांची पुस्तके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांच्या मख्यपृष्ठांद्वारे त्यांची व्यंगचित्रे समाजमनास भिडली आहेत. शि. द. फडणीस यांच्या प्रयत्नाने कायदाच्या माध्यमातून चित्रकारांना कॉपीराईटचे हक्क मिळवून दिले आहेत. शि. द. फडणीस यांची व्यंगचित्रे देश-परदेशातील आर्ट गॅलरीमध्ये झळकली आहेत.

रंगत-संगत प्रतिष्ठानचा भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार शाम खामकर यांना जाहीर

पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मराठीतील आद्य शायर भाऊसाहेब पाटणकर यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध कवी, गझलकार शाम खामकर (खडकवाडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांचा भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्काराने गौरव केला जाणार आहे.
कार्यक्रम रविवार, दि. 29 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला, नेवी पेठ येथे होणार असून पुरस्काराचे वितरण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांच्या हस्ते होणार आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफल असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून सिने-नाट्य अभिनेत्री, कवयित्री भाग्यश्री देसाई यांची उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गझल मुशायरा आयोजित करण्यात आला असून यात प्रमोद खराडे, नचिकेत जोशी, डॉ. मंदार खरे, सुनिती लिमये, नूतन शेटे, कविता क्षीरसागर, चंचल काळे, डॉ. मृणालिनी गायकवाड, स्वाती यादव, उर्मिला वाणी, डॉ. मृदुला कुलकर्णी-खैरनार, प्रभा सोनवणे, स्वप्नील पोरे यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावातच नाथ असल्यामुळे अनाथांना काळजीचे कारण नाही- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे.

पुणे दि. २३: सनाथ वेल्फेअर फाउंडेशन वर्धा यांच्यावतीने दोन दिवसीय मार्गदर्शन शिबिर व अनाथांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम ताई गोऱ्हे यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे मार्गदर्शन केले.

याप्रसंगी बोलताना नीलमताई म्हणाल्या की, “भविष्यकाळात स्त्रियांच्या चळवळीमध्ये राजकारणामध्ये अनाथ मुलींचा नक्कीच सहभाग मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येईल. त्याचप्रमाणे ४ थे महिला धोरणामुळे मुलींच्या आर्थिक प्रगतीकडे तसेच महिला सक्षमीकरणाच्या विषयात आपल्या सर्वांना निश्चितच प्रगती झाल्याची पाहायला मिळेल.

मुलींच्या अनाथ गृह संस्थांची sop करणे गरजेचे आहे. अनाथ मुला- मुलींच्या विवाह जमावण्यासंबंधी राज्यातील विविध संस्थांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. अनाथ मुलींना बाळंतपणासाठी माहेरवाशींचे प्रेम मिळावे म्हणून अनेक मोठ्या संस्थांशी चर्चा करून एक कक्ष उभारणी बाबतीत सकारात्मक पाऊल उचलण्याविषयी नक्कीच प्रयत्न केला जाईल”, असे मत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

“आफ्टर केअर वस्तीगृहाच्या निर्मितीकरिता शासनाकडे पाठपुरावा करणार”, असे मतही यावेळी उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांनी मांडले.

माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना फाशी द्या:त्याचा पार हाडे मोडून जीव घेतला, राहुल गांधींच्या भेटीनंतर सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा टाहो

0

परभणी – माझ्या मुलाच्या मारेकऱ्याला फाशी द्या. सोमनाथला 4 दिवस मारले, त्याची पार हाडे मोडून त्याचा जीव घेतला, अशा शब्दांत परभणी हिंसाचारात बळी गेलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीनंतर न्यायाची याचना केली आहे.

राहुल गांधी यांनी सोमवारी दुपारी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या तो दलित आहे म्हणून करण्यात आल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर सोमनाथ यांच्या आईने पत्रकारांशी बोलताना न्यायाची मागणी केली आहे.

पीडित माता पत्रकारांशी बोलताना म्हणाली, माझ्या मुलाला मारणाऱ्यांना कठोस शिक्षा द्या. त्यांना फाशी द्या अशी मागणी मी राहुल गांधी यांच्याकडे केली. आमचा न्याय लवकर करा अशी विनंती केली. त्यावर त्यांनी जी कायदेशीर कारवाई आहे ती होईल अशी ग्वाही दिली. माझ्या मुलाची मारहाण करून हत्या करण्यात आली. त्याचा खूनच झाला. कारण, माझ्या मुलाला कोणताही आजार नव्हता. त्याला व्यसनही नव्हते. त्याला 4 दिवस मारहाण करण्यात आली. पार हाडे मोडून त्याचा जीव घेण्यात आला. या प्रकरणी संशय तर आहेच.

राहुल गांधी यांनी आम्हाला काय झाले? कसे झाले? याची विचारणा केली. त्यावर आम्ही जे घडले ते सांगितले. माझा मुलाचा मृत्यू झाल्याची गोष्ट पोलिसांनी आम्हाला 5 दिवसांनंतर सांगितली. तुमच्या मुलाचा मृत्यू झाला असून, येऊन बॉडी घेऊन जा असे ते म्हणाले. त्यानंतर आम्ही धावत येत मृतदेह ताब्यात घेतला. आता मुख्यमंत्री माझ्या मुलाचा मृत्यू दमा व हृदयविकाराच्या झटक्याने झाला असे कसे काय सांगू शकतात? असा प्रश्न मी राहुल गांधी यांना विचारला.

विकास प्रकल्पांमध्ये दस्तावेजीकरण, सुरक्षेला अधिक प्राधान्य हवे-अविनाश पाटील

बिल्डर्स असोसिएशनतर्फे रमेश धूत यांना ‘निर्माणरत्न २०२४’ जीवनगौरव पुरस्कार प्रदान
पुणे : “बांधकाम क्षेत्रात तंत्रज्ञान, कलात्मकतेचा अंतर्भाव होत असल्याने दिवसेंदिवस बांधकामाची गुणवत्ता वाढली आहे. बांधकाम क्षेत्रात कार्यरत विकासकांनी दस्तावेजीकरण व सुरक्षेकडे अधिक प्राधान्याने पाहायला हवे. नगरनियोजन विभागाकडून ग्रामीण भागातही अनेक प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्याच्या बांधणीत शहरी भागातील चांगल्या विकासकांनी पुढाकार घ्यायला हवा,” असे प्रतिपादन राज्याच्या नगर नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील यांनी केले.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटरतर्फे आयोजित आणि बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड प्रायोजित २८ व्या ‘बीएआय-शिर्के वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन २०२४’ या पुरस्कार वितरण सोहळ्यात अविनाश पाटील बोलत होते. हॉटेल शेरेटॉन ग्रँडमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी ऑल इंडिया ‘बीएआय’चे अध्यक्ष के. विश्वनाथन, ‘बीएआय’ पश्चिमचे उपाध्यक्ष आनंद गुप्ता, बी. जी. शिर्के कंपनीचे उपाध्यक्ष बिपीन कुलकर्णी, डब्ल्यूबीएससीचे अध्यक्ष धैर्यशील खैरेपाटील, बीएआय पुणे सेंटरचे अध्यक्ष सुनील मते, उपाध्यक्ष अजय गुजर, महेश मायदेव, सचिव राजाराम हजारे, खजिनदार शशिकांत किल्लेदारपाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यंदा ‘बीएआय-पद्मश्री बी. जी. शिर्के जीवनगौरव पुरस्कार’ (निर्माणरत्न २०२४) धूत उद्योग समूहाचे रमेश धूत यांना प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि एक लाख अकरा हजार रोख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. धूत यांनी पुरस्काराची रक्कम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक मदत करण्यासाठी ‘बीएआय’कडे सुपूर्द केली. यावेळी ‘बीएआय’च्या इंजिनीअरिंग डायरीचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बांधकाम क्षेत्रातील विविध विभागात उल्लेखनीय काम करणाऱ्या कंपन्यांना सन्मानित करण्यात आले. जीआरआयटी-एन्व्हायरॉन्मेंटल डिझाईन प्लस रिसर्च स्टुडियो, प्राईड बिल्डर्स, निर्माण डेव्हलपर्स, कव्हलकेड प्रॉपर्टीज यांना निवासी श्रेणीत, प्राईड बिल्डर्स एलएलपी, विलास जावडेकर इको शेल्टर्स, फिनिक्स ग्रुप हैद्राबाद यांना कमर्शियल श्रेणीत, पुण्याबाहेरील उद्धव गावडे बारामती यांना निवासी व कमर्शियल श्रेणीत, एस्कॉन प्रोजेक्ट्स, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना औद्योगिक, रोहन बिल्डर्स इंडिया, ए. एस. देसाई इन्फ्रास्ट्रक्चर यांना पायाभूत सुविधा उभारणी, हर्ष कंस्ट्रक्शन्स यांना सरकारी प्रकल्प उभारणीत, मिलेनियम इंजिनियर्स अँड प्रायव्हेट लिमिटेड यांना वर्क अप टु बेअर शेल श्रेणीत, अक्रॉस नोड्स ट्रान्सीट सोल्युशन्स यांना बेस्ट ब्राऊनफिल्ड प्रोजेक्ट, वृक्ष लँडस्केप्स यांना लँडस्केप या श्रेणीमध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

रमेश धूत म्हणाले, “या पुरस्काराची सुरुवात झाली, तेव्हा निवड समितीचा अध्यक्ष होतो. आज बीएआयच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारताना आनंद होतो आहे. अभियंता झाल्यावर बांधकाम क्षेत्रात एक छोटा कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम सुरु केले. आज याचे उद्योग समूहात रूपांतर झाले आहे. माझ्या वाटचालीत घरच्यांचा सहभाग मोलाचा आहे. स्थापत्य अभियंत्यांकडे कठोर मेहनत, प्रामाणिकपणा जपावा. अभियंत्यांचे काम हे सैन्यासारखे आहे. स्थापत्य अभियंत्याला कुठेही जाऊन काम करावे लागते.”

के. विश्वनाथन म्हणाले, “बीएआय पुणे सेंटरचे कार्य कौतुकास्पद आहे. उच्च दर्जाची ही स्पर्धा घेऊन बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व समूहांना सन्मानित करण्याचे काम प्रेरक आहे. यातून बांधकाम विभागातील नावीन्यता सर्वांसमोर येत आहे.”

आनंद गुप्ता यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. सुनील मते यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. राजाराम हजारे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय आपटे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अवमानकारक वक्तव्‍य केल्याबद्दल माफी मागावी-खा. रजनीताई पाटील

पुणे- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्‍य केल्याबद्दल माफी मागावी व पंतप्रधानांनी तोबडतोब त्यांची हकलपट्टी करावी अशी मागणी आज काँग्रेस भवन येथे खासदार मा. रजनीताई पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून केली. यावेळी खासदार मा. रजनीताई पाटील पत्रकारांना संबोधित करताना म्हणाल्या की, ‘‘भाजपाच्या पोटात होते तेच ओठावर आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपाच्या मनात किती राग आहे ते उघड झाले. सत्ताधारी भाजपाने लोकसभेला आखाडा बनवले आहे. भारतीय जनता पक्ष व त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या मनात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रचंड राग आहे. भाजपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कधीच आदर नव्हता आणि आजही नाही. महापुरुषांचा अपमान करण्याची आरएसएस भाजपाची विकृती असून त्याच विकृतीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधाननिर्मात्यांचा घोर अपमान केला आहे. दलित, आदिवासी, मागासवर्गीय समाजाबद्दल भारतीय जनता पक्षाची मानसिकता अत्यंत द्वेषाची आहे. भाजपा शासित राज्यात मागासवर्गीय समाजावर अनन्वीत अत्याचार होत आहेत. तरीही पंतप्रधान मूग गिळून गप्प कसे काय आहेत? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या गृहमंत्री अमित शाहांची मंत्रिमंडळातून पंतप्रधानांनी तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी आम्ही करीत आहोत.’’ यावेळी प्रवक्ते गोपाळ तिवारी, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, देवीदास भन्साळी, कैलास गायकवाड,, राज अंबिके, प्राची दुधाने, अर्चना शहा, प्रा. वाल्मिक जगताप, माजी नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख,आदी उपस्थित होते.

दलित आहे म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या:राहुल गांधी यांचा पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर आरोप; फडणवीस खोटे बोलल्याचा दावा

0

परभणी- येथे गत 10 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती. या घटनेच्या 12 दिवसांनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आज परभणीत येऊन या घटनेत बळी गेलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी सोमनाथ यांची पोलिसांनी हत्या केल्याचा गंभीर आरोप केला. तसेच या प्रकरणी न्यायाचीही मागणी केली. राहुल यांनी पीडित कुटुंबीयांशी चटईवर बसून संवाद साधला.

दरम्यान, राहुल गांधी आंबेडकरी कार्यकर्ते विजय वाकोडे यांच्याही कुटुंबीयांची भेट घेतली. वाकोडे यांचे हिंसाचारानंतर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांचे येथील हिंसाचार रोखण्यात मोठे योगदान होते.
मी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. मी मारहाण झालेल्या लोकांचीही भेट घेतली. त्यांनी मला शवविच्छेदन अहवाल दाखवला, व्हिडिओ व फोटो दाखवले. हा 99 टक्के नव्हे तर 100 टक्के कोठडीत झालेला मृत्यू आहे. पोलिसांनी त्यांची हत्या केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना संदेश देण्यासाठी खोटे निवेदन केले आहे. सोमनाथ सूर्यवंशी हा दलित होता व तो संविधानाचे संरक्षण करत होता म्हणून त्याला मारण्यात आले आहे, असे राहुल गांधी यावेळी बोलताना म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत उत्तर देताना सोमनाथ सूर्यवंशी यांनी मला कुठलीही मारहाण झालेली नाही, असे न्यायाधीशांसमोर सांगितल्याचे फडणवीसांनी म्हटलं होतं. आता, राहुल गांधी यांनी भेट दिल्यानंतर थेट देवेंद्र फडणवीसांनाच लक्ष्य केलं आहे, तसेच फडणवीस खोटं बोलत असल्याचंही ते म्हणाले.

मी आज सोमवंशी कुटुंबीयांची भेट घेतली, ज्यांना मारहाण झाली त्यांचीही भेट घेतली. मला त्यांनी पोस्टमार्टम रिपोर्टंस दाखवले, व्हिडिओ दाखवले, त्यावरुन ही 100 टक्के न्यायालयीन मृत्यू आहे, पोलिसांनीच त्यांची हत्या केली आहे. मुख्यमंत्री विधानसभेच्या सभागृहात पोलिसांना पाठीशी घालण्यासाठी खोटं बोललेय, असे म्हणत राहुल गांधींनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरच हल्लाबोल केला. सोमनाथ सूर्यवंशी हे दलित आहेत, ते संविधानाचे रक्षण करत होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. ज्या लोकांनी हे केलंय, त्यांना शिक्षा व्हावी, अद्यापपर्यंतच्या कारवाईवर मी संतुष्ट नाही. हे कुठलंही राजकारण नाही, मुख्यमंत्री जबाबदार आहेत, असे म्हणत राहुल गांधींनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय. दरम्यान, खासदार राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई वत्सलाबाई सूर्यवंशी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की, सोमनाथ सोमवंशी यांना दम्याची बिमारी होती आणि त्यामुळे ते मृत्युमुखी पडले. पण, मुख्यमंत्री खोटं बोलले आहेत, विधानसभेची त्यांनी दिशाभूल केली. त्यामुळे काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री यांच्यावर आम्ही प्रिविलेज मोशन आणू, असे म्हणत नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध हक्कभंग आणणार असल्याचे म्हटले. इथे भेट घेतल्यानंतर राहुल गांधी लोकसभेत सुद्धा भूमिका मांडतील आणि सरकारचं पितळ उघड करतील. ज्या पद्धतीने ठरवून मागासवर्गीयांना आणि बौद्धांना आणि अल्पसंख्यांकांना टार्गेट करण्याचं काम बीजेपी करत आहे, ते या ठिकाणी दिसलं आहे. म्हणून या सर्व गोष्टीचा आवाज लोकशाही पद्धतीने काँग्रेस प्रत्येक ठिकाणी उचलेल, असेही नाना पटोले यांनी म्हटलं.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल. न्यायालयीन चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. मात्र, शवविच्छेदन अहवालानुसार सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्धर आजार आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंगावरील जुन्या जखमांचाही उल्लेख आहे. पोलीस कोठडीतून ते जेव्हा एमसीआरमध्ये गेले. तेव्हा सूर्यवंशी यांना जळजळ होत होतं. तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

पुण्यात मध्यरात्री:मद्यधुंद डम्पर चालकाने पदपथावर झोपलेल्या ९ जणांना चिरडले,तिघे ठार

पुणे- काल रात्री 12.30 च्या सुमारास पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुण्यातील या अपघाताने सगळीकडे खळबळ उडाली आहे.वाघोली परिसरात केसनंद फाट्यावर डंपर चालकाने हा अपघात केला आहे. डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. या अपघातात 9 जणांना चिरडले आहे. यामध्ये दोन लहान मुले असल्याची माहिती मिळाली आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहे. या जखमींधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

या तिघांचा मृत्यू

  1. विशाल विनोद पवार वय 22 वर्ष, रा. अमरावती मूळ जिल्हा
  2. वैभवी रितेश पवार वय 1 वर्ष
  3. वैभव रितेश पवार वय 2 वर्ष

हे 6 जण जखमी

  1. जानकी दिनेश पवार, 21 वर्षे
  2. रिनिशा विनोद पवार 18
  3. रोशन शशादू भोसले, 9 वर्षे
  4. नगेश निवृत्ती पवार, वय 27 वर्षे
  5. दर्शन संजय वैराळ, वय 18
  6. आलिशा विनोद पवार, वय 47 वर्षे

आरोपी – डंपर चालक गजानन शंकर तोट्रे, 26 वर्षे रा. नांदेड याला ताब्यात घेतला असून मेडिकल करण्यासाठी रुग्णालयात नेले आहे. त्यांच्याविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमींना प्राथमिक उपचार आयनॉक्स हॉस्पिटल येथे करून ससून रुग्णालयात रवाना केले आहे. मृतदेह आयनॉक्स हॉस्पिटलमधून ससून येथे पाठवले आहेत.

अपघातात जखमी झालेले सर्व मजूर आहेत. रविवारी रात्री ते अमरावतीहून कामानिमित्त आले होते. या पदपथावर एकूण 12 जण झोपले होते. बाकीचे लोक फूटपाथच्या बाजूला झोपडीत झोपले होते. भरधाव डंपर थेट फूटपाथवर जाऊन झोपलेल्या लोकांना चिरडले.

प्रत्यक्षदर्शी म्हणाला की, आम्ही 40 जण कामासाठी इथे पुण्याते आलो आहोत, इकडे काम भेटतं म्हणून आम्ही अमरावती वरून पुण्याला काल रात्री आलो. आम्ही चार वर्षाआधी पण इथे काम करत होतो. आम्ही इथेच राहतो. गेल्या चार वर्षापासून आम्ही इथून कुठे गेलो नाही, आम्ही इथे झोपल्यानंतर डंपर चालक सरळ अंगावर आला, आणि बाळांच्या अंगावर घातला.

दुसरा प्रत्यक्षदर्शीं म्हणाला की, आम्ही कालच अमरावती वरून पुण्याला आलो होतो. आम्ही सर्व जण झोपलेले असताना बारा एक वाजण्याच्या सुमारास डंपर फुटपाथवरून आत घुसल्यानंतर आरडाओरडा सुरू झाली. त्यानंतर आम्ही सगळे उठलो डंपरचालकाने मुलांना चिरडले होते. तसाच तो पुढे गेला. तर तिथे उपस्थित असलेल्या एका महिलेने सांगितले की, जर तो डंपर दुसऱ्या बाजुला वळला असता तर आणखी 15-16 जणांचा बळी गेला असता. तिथे असलेल्या अनेकांनी आरडा-ओरड केली त्यामुळे अनेक जण वाचले अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. डंपरचालकाने दारू पिलेली होती. त्यांनी मुलांच्या अंगावरून वाहन घातलं.

21 डिसेंबरची रात्र ही श्रीनगरमधील 50 वर्षांतील सर्वात थंड रात्र- तापमान उणे 8 अंश

0

21 डिसेंबरची रात्र ही श्रीनगरमधील 50 वर्षांतील सर्वात थंड रात्र होती. येथील तापमान उणे 8 अंश होते. 22 डिसेंबरला तापमान 4 अंशांच्या जवळ नोंदवले गेले.उत्तराखंडच्या उंच हिमालयीन भागात बर्फवृष्टी आणि पावसामुळे कडाक्याची थंडी जाणवत आहे. अनेक ठिकाणी तापमान उणे 10 अंशांच्या खाली पोहोचले आहे.

आज २३ डिसेम्बर -Kashmir Region:

Srinagar = -3.6°C

Qazigund = -4.8°C

Pahalgam = -5.0°C

Kupwara = -4.3°C

Kokernag = -4.0°C

Gulmarg = -4.8°C

Sonamarg = -5.1°C

Bandipora = -4.4°C

Baramulla = -3.4°C

Budgam = -4.8°C

Ganderbal = -4.2°C

IMD ने आज हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादच्या काही भागांमध्ये #कोल्डवेव्ह स्थितीचा अंदाज वर्तवला आहे. हरियाणा, ओडिशा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, राजस्थान आणि मणिपूरमध्ये आज रात्री उशिरा आणि पहाटे दाट धुके राहण्याची शक्यता आहे, असे IMD म्हणते. पुढील २-३ दिवस मेघालय, नागालँड, मिझोराम आणि आसाममध्येही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.

चिल्लई कलानच्या तिसऱ्या दिवशी दल सरोवरही गोठले. येथे तलावाच्या पृष्ठभागावर बर्फाचा अर्धा इंच जाडीचा थर दिसतो.

बद्रीनाथ धामाजवळील उर्वशी धाराचा धबधबा सततच्या बर्फवृष्टीमुळे वाहत असताना पूर्णपणे गोठला आहे.

हवामान खात्याने 23 ते 28 डिसेंबरदरम्यान मध्य प्रदेशात पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. राजस्थानमध्येही आज पावसाची शक्यता आहे.जम्मू-काश्मीरमधील चिल्लई कलान दरम्यान, अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान उणे आहे. सोमवारी सकाळी श्रीनगर पारा -3.6°, पहलगाम -5.0°, गुलमर्ग -4.8°, सोनमर्ग -5.1°, झोजिला -25.0°, अनंतनाग -6.1°, शोपियान -7.3°, लेह -9.2°, कारगिल -9.5° सेल्सिअस नोंदवले गेले .

पुढील ३ दिवसांचे हवामान…

24 डिसेंबर : 4 राज्यांमध्ये दाट धुके, 2 राज्यात पाऊस

पंजाब, हरियाणा, आसाम, मेघालयमध्ये दाट धुके असेल.
हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाखमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा.
दक्षिणेकडील राज्यांमध्ये (रायलसीमा, आंध्र प्रदेश) मुसळधार पाऊस पडू शकतो.
हिमाचल प्रदेश, आसाम, मेघालय, अरुणाचलमध्ये दंव पडण्याची शक्यता.
25 डिसेंबर : 2 राज्यांमध्ये तीव्र थंडीच्या लाटेचा इशारा

पंजाब, चंदीगड, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशात धुक्याचा इशारा.
जम्मू-काश्मीरमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा, इतर राज्यांमध्ये सामान्य हवामान.
हिमाचल प्रदेशात थंडीची लाट आणि दंव (जमीन दंव स्थिती) येण्याची शक्यता.
दक्षिणेकडील राज्यांमध्ये (रायलसीमा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी) मुसळधार पाऊस.
26 डिसेंबर : 4 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

जम्मू-काश्मीरमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा, इतर राज्यांमध्ये सामान्य हवामान.
हिमाचल प्रदेशात थंडीची लाट आणि दंव (जमीन दंव स्थिती) येण्याची शक्यता.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस पडू शकतो.
दक्षिणेकडील राज्यांमध्ये (रायलसीमा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी) मुसळधार पाऊस.
जम्मू-काश्मीरमधील चिल्लई कलान, 27 डिसेंबरपासून महाविद्यालये बंद

21 डिसेंबरपासून जम्मू-काश्मीरमध्ये चिल्लई कलान सुरू झाले. म्हणजे खूप थंडी. अनंतनाग, शोपियान, पहलगाम, गुलमर्ग आणि काश्मीर खोऱ्यात पारा उणे १० अंशांच्या खाली पोहोचू शकतो.
जम्मू-काश्मीर सरकारच्या उच्च शिक्षण विभागाने शुक्रवारी महाविद्यालयांना हिवाळी सुट्टी जाहीर केली. काश्मीर विभागातील सरकारी पदवी महाविद्यालये आणि जम्मू विभागातील हिवाळी विभागातील महाविद्यालये 27 डिसेंबर ते 14 फेब्रुवारी 2025 या कालावधीत हिवाळी सुट्टी पाळतील.
जम्मू विभागातील उन्हाळी विभागातील महाविद्यालये 1 जानेवारी ते 10 जानेवारी 2025 पर्यंत सुट्टी साजरी करतील. सरकारने यापूर्वीच काश्मीर झोन आणि जम्मू विभागातील हिवाळी विभागातील शाळांना हिवाळी सुट्टी जाहीर केली आहे.

‘इलू इलू’ म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

दिमाखदार सोहळ्यात पहिली झलक आली समोर

एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे बॅाक्स आॅफिसवर काही मराठी चित्रपट भरघोस कमाई करताना दिसत आहेत. त्यामुळे हिंदीपासून इतर भाषिक कलाकार मराठी सिनेसृष्टीकडे आकर्षित झालेले पहायला मिळत आहेत. यात आता प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री एली आवराम हे नाव देखील सामील झालं आहे. एव्हाना बॉलीवूड मध्ये आपला चांगला जम बसवलेली एली ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.

फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ मनोरंजक लव्हस्टोरी ३१ जानेवारीला आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा रंगतदार टिझर एका शानदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटातील ‘इलू इलू’ या रोमँटिक गाण्यावर बहारदार परफॉर्मन्स करत एली आवरामने उपस्थितांची मने जिंकली.

२०१३ मध्ये ‘मिकी व्हायरस’ या चित्रपटाद्वारे हिंदीत दाखल झालेल्या एलीनं आजवर ‘किस किस को प्यार करूं’, ‘नाम शबाना’, ‘पोस्टर बॅाईज’, ‘बाझार’, ‘मलंग’, ‘कोई जाने ना’, ‘गुडबाय’ या हिंदी चित्रपटांसोबतच तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटात एली ‘मिस पिंटो’ या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. पण हि व्यक्तिरेखा यशस्वीपणे साकारण्यासाठी एलीनं खूप मेहनत घेतली आहे. आपल्याला अवगत नसलेल्या भाषेतील चित्रपटातील मुख्य भूमिका तिनं मोठ्या धाडसानं आणि आत्मविश्वासानं साकारल्याचं चित्रपट पाहताना प्रेक्षकांना जाणवेल.

मराठीत एन्ट्री करण्याबाबत एली म्हणाली की, ‘मला नेहमीच नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. स्वीडीश, हिंदी, तामिळ आणि कन्नड चित्रपटांनंतर ‘इलू इलू’ च्या निमित्तानं मराठी भाषेची गोडी चाखण्याची संधी मिळाली आहे. यातील कॅरेक्टर माझ्या आजवर साकारलेल्या व्यक्तीरेखांपेक्षा खूप वेगळं आहे. एका नव्या लुकमध्ये मी प्रेक्षकांसमोर येणार आहे. सुरुवातीला जेव्हा या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा थोडं दडपण जाणवलं होतं, पण पटकथा आणि कॅरेक्टर समजल्यावर मराठीत एंट्री करण्यासाठी हीच अचूक संधी असल्याची जाणीव झाल्यानं होकार दिल्याचंही एली म्हणाली’.

मराठमोळ्या रूपातील एलीला पाहण्यासाठी मराठी प्रेक्षकांसोबतच तिचे चाहतेही आतुरले आहेत.

एलीसोबत वीणा जामकर, आरोह वेलणकर, मीरा जगन्नाथ, वनिता खरात, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, आनंद कारेकर, निशांत भावसार, अंकिता लांडे, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत हे कलाकार चित्रपटात आहेत.

‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत. छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे. वैभव जोशी, वैभव देशमुख, प्रशांत मडपुवार यांच्या गीतांना अवधूत गुप्ते, ऋषिकेश रानडे, आर्या आंबेकर, रोहित राऊत, जनार्दन खंडाळकर यांचा स्वरसाज लाभला आहे. संगीत रोहित नागभिडे, विजय गवंडे यांचे आहे. कलादिग्दर्शक योगेश इंगळे आहेत.

‘इलू इलू’ ३१ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होतोय.