Home Blog Page 645

आता PMRDA ऑनलाईन प्रणालीद्वारे बांधकाम परवाने देणार

ऑनलाईन प्रणालीच्या माध्‍यमातून चालणार विकास परवानगी व‍िभागाचे कामकाज

पारदर्शक, गत‍िमान कारभारासाठी पीएमआरडीएच्या महानगर आयुक्तांनी घेतला न‍िर्णय

पुणे (दि.२४) : शासनाच्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमानतेसह विहित कालमर्यादेत देण्याच्या अनुषंगाने पुणे महानगर प्रदेश व‍िकास प्राधिकरणात तातडीने पाऊले उचलली जात आहे. त्यानुसार पीएमआरडीएच्या हद्दीत एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) लागू असलेले क्षेत्रासह या व्यतिरिक्त सद्यस्थितीत प्राधिकरणाची २०१८ ची नियमावली लागू असलेले उर्वरित क्षेत्रात विकास परवानगी / जोते / भोगवटा व इतर परवाने निर्गत करण्याची प्रक्रिया दि. २६/०२ /२०२५ पासून ऑनलाईन प्रणालीद्वारे राबविण्याचा न‍िर्णय महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी घेतला आहे.

बांधकाम परवानगी प्रक्रियेचे एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली UDCPR नुसार प्रमाणन करण्याच्या दृष्टिने बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणाली (BUILDING PLAN MANAGEMENT SYSTEM -BPMS) हे पोर्टल महाराष्ट्र राज्यात लागू केले आहे. शासनाच्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान आणि विहित कालमर्यादित देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अमलात असून या अंतर्गत नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन शासकीय सेवा देण्याच्या दृष्टीने शासनाचे निर्देश असून त्यांची अंमलबजावणी पीएमआरडीएमध्‍ये करण्यात येत आहे.

अर्जदारांनी या ऑनलाईन प्रणालीत विकास परवानगीचा आवश्यक कागदपत्रांसह आपला प्रस्ताव ऑनलाईन दाखल करायचा आहे. दाखल प्रस्तावाची सदर प्रणालीमार्फत नियमावलीनुसार ऑनलाईन छाननी होऊन प्राधिकरणाकडील विविध टप्प्यांवरील मान्यतेची कार्यवाही पूर्ण झाल्यावर चलन निर्गत करणे तथा अर्जदार यांनी चलनाचा भरणा केल्यानंतर विकास परवानगी / जोते / भोगवटा आदी प्रमाणपत्र ऑनलाईन निर्गत केले जाईल. यामुळे नागरिकांना कार्यालयात येण्याची गरज राहणार नाही. संबंधितांना आपली फाईल कुठल्या मान्यतेच्या टप्प्यावर कार्यवाहीसाठी आहे, याची माहिती अर्जासोबत नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून कळणार आहे. सदर सेवा https://mahavastu.maharashtra.gov.in/ या संकेत स्थळावर नागरिकांसाठी दि. २६/०२/२०२५ पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यास अडचणी आल्यास प्राधिकरणाच्या विकास परवानगी विभागाला भेट द्यावी. त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याकरिता नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी कळवले आहे.

‘फ्रीमेसनरी’ समुदायासंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘ओपन हाऊस’चे आयोजन

पुणे : ‘फ्रीमेसनरी’ या समुदायाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची संधी पुणेकर नागरिकांना मिळणार आहे. येत्या रविवार दि. ०२ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान कॅम्प परिसरात पुणे रेस कोर्स जवळील ६ ए एक्झिबिशन रस्ता येथे फ्रीमेसनरी हॉल या ठिकाणी हे ओपन हाऊस होणार असून यासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. 

इंग्लंडच्या युनायटेड ग्रँड लॉजच्या अंतर्गत दी लेस्ली विल्सन लॉज नं ४४८० यांच्या वतीने सदर ओपन हाऊसचे आयोजन करण्यात आले असून फ्रीमेसनरी समुदायासंदर्भात सकाळी १०.३०, आणि दुपारी १२:३० या वेळांमध्ये “ओपन हाऊस” दरम्यान उपस्थितांना प्रास्ताविकपर माहिती देखील देण्यात येणार आहे.

या विषयी अधिक माहिती देताना डिस्ट्रीक्ट डेप्युटी ग्रँड मास्टर असलेले देवेश हिंगोरानी म्हणाले, “फ्रीमेसनरी समुदायाबद्दल जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने आम्ही या ओपन हाऊसचे आयोजन केले असून या वेळी सामान्य नागरिक लॉजच्या परिसरात प्रत्यक्ष फेरफटका मारू शकतात. इतकेच नाही तर फ्रीमेसनरी, त्यांचे प्रतीकवाद (सिंम्बॉलिझम) व आजच्या काळातील संदर्भ या बद्दलही यावेळी माहिती देण्यात येईल.”

याबरोबरच त्याच स्थळी व वेळी, नयन आरोग्य शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले असून यामध्ये डोळ्यांची विनाशुल्क तपासणी करुन घेता येईल असेही हिंगोरानी यांनी सांगितले.

पुणे विभागासंदर्भात अधिक माहिती –
बॉम्बे प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर एच. ई. सर लेस्ली ओर्मे विल्सन यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावे पुण्यातील लेस्ली विल्सन लॉजची उभारणी ही ३ नोव्हेंबर १९२६ रोजी करण्यात आली. अनेक मोठे उद्योजक, व्यवसायिक, व्यवस्थापकीय संचालक, चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, डॉक्टर, वकील आणि उच्च दर्जावर कार्यरत अधिकारी,  व्यावसायिक यांचा या समुदायामध्ये समावेश आहे. काही प्रसिद्ध भारतीय फ्रीमेसन्समध्ये स्वामी विवेकानंद, फिरोजशाह मेहता, पंडित मोतीलाल नेहरू, सर दोराबजी जमशेदजी टाटा, डॉ. सी. राजगोपालाचारी, सर सुलतान मोहम्मद शाह आगा खान, महाराजा दुलीप सिंग, महाराजा जिवाजी राव सिंदिया, अभिनेते डेव्हिड अब्राहाम, क्रिकेटपटु मन्सुर अली खान पतौडी यांचा समावेश होतो.

फ्रीमेसनरी या समुदायाबद्दल –

चरित्रसंपन्न पुरुषांची जगातील सर्वांत जुनी संस्था म्हणून फ्रीमेसनरी हा समुदाय ओळखला जातो. इंग्लंड, वेल्स, अनेक द्वीपसमूह यांबरोबरच जगभरातील आयल ऑफ मॅन आणि भारतासह परदेशातील जिल्ह्यांमध्ये फ्रीमेसनरीची प्रशासकीय संस्था म्हणून युनायटेड ग्रँड लॉज ऑफ इंग्लंड (UGLE) काम पाहते. इ. स. १७१७ मध्ये याची स्थापना झाली असून जगातील सर्वात जुने ग्रँड लॉज म्हणून ते ओळखले जाते. आज या लॉजच्या अंतर्गत जगभरातील तब्बल १० हजार लॉज कार्यरत असून जगभरात समुदायाचे ४ लाख सदस्य आहेत.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ थेट नागरिकांच्या भेटीला !

  • खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
  • राज्यमंत्री माधुरी मिसाळही अभियानात सहभागी

पुणे

पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाच्या पाचव्या टप्प्याला पर्वती विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वैयक्तिक कामे, नागरी समस्या, सार्वजनिक आणि नव्या कल्पनांसह सहाशेहून अधिक नागरिक थेट केंद्रीय मंत्री मोहोळ यांना भेटले. राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचीही या उपक्रमास पूर्णवेळ उपस्थिती होती.

नागरिकांचे प्रश्न समजून घेता यावेत आणि ते वेळेत सुटावेत यासाठी खासदार मोहोळ यांनी खासदार जनसंपर्क सेवा अभियान अर्थात जनता दरबार कोथरुड विधानसभा मतदारसंघातून सुरु केला. त्यानंतर कसबा, कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातही हा उपक्रम राबविण्यात आला. पर्वती विधानसभा मतदारसंघात झालेला हा पाचवी टप्पा होता. नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासह शासनाच्या विविध योजनांचे स्टॅाल्स, आधार कार्ड संदर्भातील स्टॅाल्सही यावेळी उपलब्ध करुन देण्यात आले. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा उपक्रम राबविला जातो.या संदर्भात अधिक माहिती देताना केंद्रीय मोहोळ म्हणाले, ‘पर्वतीच्या अभियानात ६०० पेक्षा अधिक नागरिकांनी टोकन घेत भेट घेतली. थेट नागरिकांना भेटताना नागरिकांसह मलाही मिळणारे समाधान मोठे आहे. भेंडीमध्ये विशेषतः वैयक्तिक कामे आणि नागरी प्रश्न सांगण्यावर नागरिकांचा कल दिसला. जे विषय लगेचच सुटू शकतील अशा कामांसंदर्भातील सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच दीर्घकालीन कामांसंदर्भातही अधिकाऱ्यांना कालबद्ध कार्यक्रम आखण्यासंदर्भात सूचित केले’


टोकन व्यवस्थेमुळे प्रत्येकाला मिळते भेटण्याची संधी !खासदार जनसंपर्क सेवा अभियानांतर्गत खा. मोहोळ यांची भेट घेण्यासाठी सुरुवातीला टोकन द्वारे नोंदणी करुन घेतली जाते. त्या टोकनच्या क्रमांकद्वारे नागरिकांना थेट भेटण्याची संधी मिळते. शिवाय भेटासाठी किती कालावधी लागू शकतो याचा अंदाजही नागरिकांना येतो. या टोकन प्रक्रियेमुळे अभियानात सहभाग घेण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे.

८ मार्चला बीड जिल्ह्यात काँग्रेसची सद्भावना पदयात्रा: हर्षवर्धन सपकाळ

नारायणगड, भगवानगड येथे सद्भभावनेसाठी साकडे घालून मस्साजोग येथून ८ मार्च रोजी पदयात्रेला सुरुवात

दोन दिवसात ५१ किलोमीरचे अंतर पार करून ९ मार्च रोजी बीड शहरात सद्भावना मेळाव्याने समारोप

मुंबई, दि. २४ फेब्रुवारी २५
महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बस्वेश्वर, चक्रधर स्वामी या महापुरुषांचा व जगद्गुरु संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासह महान संतांच्या विचाराचा वारसा लाभलेला आहे. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राने कायमच देशाला दिशा दिलेली आहे. परंतु मागील काही दिवसात राज्यातील सामाजिक वातावरण बिघडलेले दिसत आहे. महाराष्ट्राची उज्ज्वल संस्कृती व परंपरा लक्षात घेऊन सद्य परिस्थितीत बंधुभाव व सामाजिक सौहार्द वाढवण्यासाठी व महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी सद्भावनेची गरज आहे. म्हणून काँग्रेस पक्षाने सद्भावना पदयात्रेचे आयोजन केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सद्भावना पदयात्रेबद्दल सविस्तर माहिती दिली, ते पुढे म्हणाले की, इंग्रजांना देशातून बाहेर काढताना केवळ राजकीय स्वातंत्र्यच नाही तर व्यवस्था परिवर्तनाचाही महत्वाचा भाग होता. स्वातंत्र्याच्या आधीपासून असलेल्या काँग्रेस पक्षाच्या डीएनएमध्येच समाजवाद आहे. जाती भेदाच्या पलिकडे पाहण्याचा वारसा काँग्रेस पक्षाला वारसा लाभलेला आहे. सामाजिक सद्भावनेचा तोच वारसा आपल्या संविधानातही आलेला आहे. एकीकडे संस्कृती, परंपरा व जाज्वल्य इतिहास आहे तर दुसरीकडे काही लोक आपल्या फायद्यासाठी जातीभेदाचे विष पसरवून सामाजिक भेद निर्माण करत आहेत हे अत्यंत दुर्देवी असून महाराष्ट्राच्या हिताचे नाही. यात बीड जिल्ह्याचा वारंवार उल्लेख होत आहे. या जिल्ह्यात स्त्री-पुरुष लोकसंख्येच्या गुणोत्तरात ही मोठी तफावत आहे. स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न या जिल्ह्यात ऐरणीवर होता. जागतिक महिला दिनाचे औचित्य लक्षात घेऊन बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथून ही पदयात्रा सुरु केली जाणार आहे. भगवानगड व नारायणगड या महत्वाच्या प्रेरणास्थानी वंदन करून सामाजिक सद्भावनेसाठी साकडे घातले जाणार आहे. त्यानंतर ८ मार्च रोजी सकाळी मस्साजोग येथून ही पदयात्रा सुरु होईल. तिथून नांदुरफाटा, येळंब, नेकनूर, मांजरसुंभा, पाली या मार्गावरून ५१ किलोमीटरचा प्रवास करून यात्रा बीड शहरात पोहोचेल व बीड शहरात सद्भावना सभेने या यात्रेचा समारोप होणार आहे असे सपकाळ म्हणाले.

सद्भावना यात्रा ही राज्यातील सामाजिक सलोखा आणि बंधुभाव पुर्नस्थापित करण्यासाठी आहे. हा फक्त राजकीय नाही तर एक सामाजिक उपक्रम आहे ज्याची सध्या महाराष्ट्राला अत्यंत आवश्यकता आहे. सध्या दूषीत झालेले सामाजिक वातावरण बदलण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक, तरुण, महिला, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, पत्रकार, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांनीही मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी व्हावे अशी विनंती करून आगामी काळात परभणी व इतर ठिकाणीही अशीच सद्भावना यात्रा काढण्याचा विचार आहे असेही सपकाळ यांनी सांगितले.

दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील राजकीय विधानासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, साहित्य संमेलनाच्या माध्यमातून वेदना, व्यथा व कथा मांडल्या जातात, विचारांची देवाण घेवाण होते, वेदनांवर फुंकर घालण्याचे काम या व्यासपीठावरून व्हावे ही अपेक्षा असते. परंतु या व्यासपीठावरून अनावश्यक वक्तव्य करणे चुकीचे आहे, परंपरेला न शोभणारे आहे असे सपकाळ म्हणाले.

टिळक भवनमध्ये जिल्हा अध्यक्षांची बैठक संपन्न!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज टिळक भवनमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी कुणाल चौधरी, खा. कल्याण काळे, प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. संघटनात्मक बाबी व पुढील राजकीय रणनितीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. उद्या मंगळवार दिनांक २५ फेब्रुवारीला काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक टिळक भवनमध्ये होणार आहे.

प्रयत्नांची पराकाष्ठा, सकारात्मक दृष्टीने यशप्राप्ती-डॉ. दत्ता कोहिनकर यांचे मत

; व्हीलचेअर रेसमधे १०० दिव्यांगांचा सहभाग
पुणे: “प्रयत्नांची पराकाष्ठा, मनातील जिद्द आणि सकारात्मक दृष्टी तुम्हाला यशाच्या मार्गावर घेऊन जाते. जीवनात येणाऱ्या संकटाना आत्मविश्वासाने सामोरे जात प्रामाणिक प्रयत्न केल्यास हमखास यश मिळते,” असे मत माईंड पॉवर ट्रेनर व लेखक डॉ. दत्ता कोहिनकर यांनी व्यक्त केले. एनेबलर चॅरिटेबल ट्रस्ट आणि ‘सक्षम’च्या वतीने प्रथमच व्हीलचेअरवरील दिव्यांग महिला व पुरुष यांच्यासाठी ‘व्हीलचेअर रेस’चे आयोजन केले होते.
एस. पी. कॉलेजच्या मैदानावर या स्पर्धा झाल्या. एकूण १०० दिव्यांग बंधू-भगिनींनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धा चार गटात झाल्या. स्पर्धक, पालक मिळून २५० जण उपस्थित होते. स्पर्धेचे संपूर्ण आयोजन सीमा दाबके, अमोल शिनगारे, अशोक बोत्रे, संतोष गायकवाड, अभिजित पोवार, निलेश कांबळे, रामा चलवादी, प्रकाश शेलार, अनंत माखे, कासीम शेख, सोहेल मुलानी यांनी केले. अशोक नांगरे, रवींद्र जोशी, प्रशांत पडदे, सेवा चव्हाण, आकाश कासूर्डे यांनी पंच म्हणून काम केले. ‘एमआयटी’च्या नेकी क्लबचे सभासदांनी स्वयंसेवक म्हणून काम केले.
सामान्य दिव्यांग पुरुष गटात अण्णासाहेब वाघमारे (प्रथम), दिपक बेंडाले (द्वितीय), युवराज अहिरे (तृतीय), महिला गटात पद्मा परभणे (प्रथम), वैशाली इंगवले (द्वितीय), भाग्यश्री मोरे (तृतीय), दिव्यांग खेळाडू पुरुष गटात सदाशिव शिंदे (प्रथम), रोहन ढमाले (द्वितीय), सोमनाथ जाधव (तृतीय), महिला दिव्यांग खेळाडू गटात भाग्यश्री मझीरे (प्रथम), रेखा पडवळ (द्वितीय) व तृप्ती चोरडिया (तृतीय) यांनी पारितोषिके मिळवली. प्रथम क्रमांकास ५००० रुपये, द्वितीय क्रमांकास ३००० रुपये, तृतीय क्रमांकास २००० रुपये व सर्वांना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.  सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल लायन राजकुमार राठोड यांच्या हस्ते झाले. दिव्यांग विभाग प्रमुख सीमा दाबके, एनेबलर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अमोल शिनगारे, स्वाती मोहोळ, सुनील पटवर्धन, दिपीका खिंवसरा, दिपक लोया उपस्थित होते. बक्षिस वितरण माजी नगरसेविका मोनिका मोहोळ, संदीप खर्डेकर यांच्या हस्ते झाले. प्रसंगी मुरलीधर कचरे, अमित बराटे, उदय जगताप, महेश करंदीकर, केतकी कुलकर्णी, बाजीराव पारगे, शिवाजी भेगडे उपस्थित होते.
दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना प्रेरणा देणारे उपक्रम सातत्याने घेतले पाहिजेत, असे लायन राजकुमार राठोड म्हणाले. स्पर्धेत सहभाग घेतला म्हणजे स्पर्धा जिंकल्यासारखी आहे. यश, अपयश येत-जात राहते. त्याचा फार विचार न करता प्रयत्न करावेत, असे मोनिका मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. स्वतःला दिव्यांग समजून मागे राहू नका. अशा उपक्रमात एकत्र या. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजेच उपक्रम यशस्वी झाल्याचे समाधान आहे, अशी भावना संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केली.

प्रामाणिक माणसेच व्यवस्था बदलू शकतात: ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक आणि मुख्य संयोजक संजय नहार यांचे प्रतिपादन

0

दिल्ली, २४ फेब्रुवारी २०२५ : “प्रामाणिक माणसे इतिहास घडवतात. अशा माणसांचा इतिहास लिहल्यास त्यांच्या कार्याला न्याय मिळतो. हीच माणसे व्यवस्था बदलू शकतात. आणि म्हणूनच व्यवस्था बदलासाठी आपल्या चांगुलपणाची जाणीव होणे महत्वाचे असते.”  असे प्रतिपादन ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक आणि मुख्य संयोजक संजय नहार यांनी केले. दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम वर  आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील छत्रपती संभाजी महाराज खुल्या अभिव्यक्ती मंचावर यावेळी ते बोलत होते. 
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खुल्या अभिव्यक्ती मंचाचे संयोजक डॉ. शरद गोरे, शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप पाटील, तुकाराम महाराजांचे वंशज रामदास मोरे, कवी युवराज नळे, विक्रम मालन आप्पासो शिंदे, कवी अमोल कुंभार आदी यावेळी उपस्थित होते.
संजय नहार म्हणाले, “उपेक्षित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी विचारमंच दिलाच पाहिजे. ही साहित्याची प्रचलित व्यवस्था बदलायची असेल तर सामान्य माणसाची लढाई ही सन्मानाची आहे. साहित्यिकांचे विचार आणि कृती सारखी असेल तरच त्याचे समाज व्यवस्थेमध्ये योगदान लाभू शकते. शरद गोरे हे संत नामदेवांच्या मार्गाने विद्रोह करणारे असून साहित्यिकांसाठी त्यांनी हक्काच विचारपीठ निर्माण केले आहे. बंडखोरी ही आपली ताकद आहे. साहित्यिक बंडखोरच असले पाहिजेत. “प्रदीप पाटील म्हणाले,” सत्कार्याचे काम करत असताना लोकं त्याच्यावर शिंतोडे उडवत असतात.  सर्व महापुरुषांनी हा सर्व छळ सहन केला म्हणून त्यांना अमरत्व प्राप्त झालं. साहित्यातून समाज उपयोगी कार्य करत रहा. आपल्या मराठीचा डंका आता साहित्यिकच अटकेपार नेऊ शकतो.”
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध साहित्यिक रमेश रेडेकर यांनी केले. प्रास्ताविक मराठा महासंघाचे गणेश दिवेकर यांनी केले. आभार  विक्रम मालन आप्पासो शिंदे यांनी मानले. 
” ज्ञानोबांचा जागर या संमेलनात झाला ही अभिमानाची बाब आहे. मात्र संत तुकाराम महाराजांचे सामाजिक आणि साहित्यिक योगदान हे सर्वोच्च असून देखील त्यांची या संमेलनात प्रतिमा किंवा प्रतिकृती कुठेच लावली नाही. त्याचबरोबर कोणत्याच सभामंडपाला त्यांचे नाव देखील दिले नाही. याची खंत आहे.”           – रामदास मोरे, तुकाराम महाराजांचे वंशज.

हे साहित्य संमेलन अभूतपूर्ण होण्यामागे संजय नहार यांचे योगदान आहे. संमेलन कसे असावे याचा वस्तुपाठ  नहार यांनी देशाला दाखवून दिला. साहित्य संमेलनाचा हेतू हा माणसांना जोडणारा असावा. साहित्य क्षेत्रातील विपरीत गोष्टी बाजूला काढून साहित्य क्षेत्रात शुद्धीकरण करण्याचं काम संजय नहार यांनी केले.”           – डॉ. शरद गोरे, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद. 

भक्तीसंगीतातून गजानन महाराज प्रकटदिन उत्सव साजरा

श्री गजानन महाराज सेवाधारी न्यास पुणे च्यावतीने श्री गजानन महाराज (शेगांव)  प्रकट दिन  उत्सवाचे आयोजन ः ह.भ.प अभय नलगे व सहकाऱ्यांचा सांगितीक कार्यक्रम संपन्न
पुणे ः पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग… सदनी श्री गजानन आले, आज माझे घर मंदिर झाले… खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे… अशा भक्तीगीतांच्या भावपूर्ण सादरीकरणाने श्री गजानन महाराज (शेगांव) प्रकट दिन उत्साहात साजरा झाला.

श्री गजानन महाराज सेवाधारी न्यास पुणे यांच्यावतीने श्री गजानन महाराज शेगाव  १४७ व्या  प्रकट दिनानिमित्त उत्सव  सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवानिमित्त भक्ती संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ह.भ.प. अभय नलगे, कल्याणी शेटे, रेखा मानवतकर यांनी भक्तीगीतांचे सादरीकरण केले. तर प्रसाद भांडवलकर (तबला ), राजेंद्र महाराज बधे (मृदुंग), अश्विनी शेळगे ( टाळ) यांनी साथसंगत केली. एमआयटी महाविद्यालयाचे व्हाईस चान्सलर डाॅ.मिलिंद पांडे आणि संजय जोशी सह प्रा. शुभलक्ष्मी जोशी यांच्या हस्ते  लघुरुद्र अभिषेक संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात ओंकार प्रधान रूप गणेशाचे… या गणेश वंदनेने झाली. त्यानंतर आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर… खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे… या गीतांनी कार्यक्रमाचा पूर्वार्ध  भक्तीमय झाला. 
मदन कस्तुरे म्हणाले, श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त संस्थेच्या वतीने उत्सवाचे आयोजन करण्यात येते. उत्सवाची सुरुवात लघुरुद्र अभिषेकाने झाली. त्यानंतर श्री गजानन विजय ग्रंथातील प्रथम अध्यायाचे वाचन करण्यात आले. तसेच यावेळी श्री गजानन महाराज यांची उपासना करण्यात आली. उत्सवात संत साहित्यावरील व्याख्यान संपन्न झाले. तसेच उत्सवा दरम्यान भक्तांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले.

संविधानातील मूल्यांचे उल्लंघन करणारे बजेट 

आरोग्य, शिक्षण, कृषी, जेंडर अशा महत्त्वाच्या सगळ्या विभागांच्या तोंडाला काळे फासणारे बजेट 
पुणे(प्रतिनिधी): 
संविधान प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क बहाल करते त्याचबरोबर राज्य आणि केंद्र यांनाही काही कर्तव्य बजावायला सांगते. मात्र केंद्रीय बजेट २०२५-२६ संविधानाच्या या मूल्यांचे उल्लंघन करणारे आहे. आरोग्य, शिक्षण, कृषी, जेंडर, अल्पसंख्याक, दलित-आदिवासी अशा सर्व महत्त्वाच्या विभागांच्या तोंडाला काळे फासणारे हे बजेट असल्याचे अर्थतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते नीरज जैन यांनी परखडपणे मांडले. लोकायत, ज्ञानभरती प्रतिष्ठान आणि अलर्ट आयोजित केंद्रीय बीजेच्या २०२५: बजेटने जनतेला काय दिले व काय नेले या बजेट विश्लेषण व्याख्यानात ते बोलत होते. कोणत्याही देशाचा विकास मोजायचा झाल्यास जनता केंद्रस्थानी असते. मात्र भारताच्या बाबतीत विचार केल्यास दरडोई भारताची अर्थव्यवस्था १४० व्या स्थानावर असून अर्थमंत्र्यांनी बजेट सादर केले तेव्हा त्या भाषणात भाषणात म्हणतात की जागतिक अर्थव्यवस्था मंदावत असताना भारताची अर्थव्यवस्था मात्र वेगाने वाढत आहे. येत्या दोन वर्षात ५ ट्रिलियन डॉलर आणि पुढील काही वर्षात १० ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल. मात्र त्यांच्या भाषणात आणि बजेटमध्येही कुठेच अत्यंत ज्वलंत प्रश्न असलेल्या बेरोजगारी, गरिबी यावर कोणतीच चर्चा नाही. गुजरातमध्ये फेब्रुवारी २०२४ मध्ये तृतीय श्रेणीच्या पदासाठी  १२५८ जागांसाठी ५.५ लाख उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यात डबल ग्रॅज्युएट, इंजिनियर झालेल्यांचाही समावेश होता. अन्न अनुदानात ७४% टक्के कपात केली आहे. खतं, गॅस अनुदानात २०१४-१५ च्या तुलनेत ५० टक्के कपात केली आहे. ५० टक्के लोकसंख्या आजही शेतीवर अवलंबून असताना शेतीवरील अनुदानात एकूण बजेटच्या केवळ २.९ टक्के तरतूद म्हणजे गेल्या सहा वर्षात २७ % कपात केली आहे. खतांवरील अनुदानात गेल्या ३ वर्षात ४८%कपात केली आहे. परिणामी २०१४ ते २०२२ दरम्यान १ लाख शेतकरी-शेतमजुरांनी आत्महत्या केल्या आहेत. अभिजात सरकारी शाळा जसं की नवोदय, केंद्रीय, पीएम श्री शाळा यांच्यावरील २८% बजेट जाहीर केले आहे जेव्हा वास्तवात सामान्य कुटुंबातील मुलं सरकारी शाळामंध्ये जातात, म्हणजेच २०१४-२०१४ च्या तुलनेत सामान्य सरकारी शालेय शिक्षणावरील बजेटमध्ये ४८% कपात केली आहे. महाविद्यालयीन शिक्षणात नवीन शैक्षणिक पॉलिसीअंतर्गत ७०% महाविद्यालये खाजगीच्या वाटेवर, १५ वर्षात सर्व महाविद्यालये स्वायत्त होतील म्हणजे साहजिकच फीमध्ये भरमसाठ वाढ होणार परिणामी सामान्य कुटुंबातील मुलं शिक्षणातून बाहेर पडणार, त्यांच्यासाठी कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सरकार रेटू पहात आहे, म्हणजे पुन्हा एकदा देशात बारा बलुतेदारी आणून देशाला मध्ययुगात नेऊ पहात आहे. आरोग्य बजेटमध्ये तर भारत १८९ देशांमध्ये १७९ व्या स्थानावर आहे. यावरूनच समजेल की आरोग्य विभागाचे काय होतंय. अंगणवाडी बजेटमध्ये ३३ टक्के कपात केली असून मातृवंदना योजनेत केवळ २५ टक्के मातांना आर्थिक साहाय्य मिळणार, मध्यान भोजन योजनेत ३२टक्के कपात केली आहे. स्त्रियांबाबतीतले जेंडर बजेट जे अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यात स्त्रियांच्या सुरक्षेच्या नावाखाली अनेक योजना आहेत, प्रत्यक्षात केवळ त्यांच्या जाहिरातींवर एकूण जेंडर बजेटच्या ७०% खर्च केला आहे, स्त्रियांसाठी अत्यंत असुरक्षित देश असं जगभरात  भारताचं नाव आहे. अनुसूचित जातींसाठी केवळ ३.३ टक्के, आदिवासींसाठी २.६ टक्के, अल्पसंख्याकांसाठी ०.७ टक्के तरतूद केली असून पुन्हा एकदा देश केवळ श्रीमंत आणि अतिश्रीमंतांसाठी चळवळ जात असल्याचे ठळकपणे दिसत असून रस्ते- वंदे भारत सारख्या खाजगी रेल्वेसाठी अनुदानाची खैरात दिली आहे. त्याचवेळी जगभरातले अनेक देश श्रीमंत-अतिश्रीमंतांवर ७०% कर लावून अनुदानाच्या तरतुदी करत असताना भारत मात्र सामान्य गरीब-मध्यमवर्गीयांवर जीएसटी सारखे कर लावत आहे. बजेटमधल्या तरतुदी-अनुदान वाढवायचे असेल तर जगभरातल्या देशांकडून शिकून श्रीमंत-अतिश्रीमंतांवरील दरवर्षी रु. ५/६ लाख कोटी करमाफी दिली जात ती दिली नाही तसेच दरवर्षी २०/२५ लाख कोटी (व्याजासहित)कर्जमाफी दिली नाही तर हा सर्व जमा होणार पैसा जनतेवर खर्च करता येईल. बेरोजगारी-गरिबी-शिक्षण-आरोग्य-शेतीतील वाढ सर्व अपेक्षितरित्या होऊ शकेल, हे बजेटच्या तरतुदींवरील उपायही त्यांनी शेवटी सांगितले. हे जर सर्व होऊ शकले तर संविधानातील मूल्यांनुसार प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगता येईल आणि तेच एका देशाचे ध्येय असू शकते, असेही जैन शेवटी म्हणाले.

कॉंग्रेसचे बहूजनांसोबचे वर्तन द्वेषपूर्ण-डॉ.हुलगेश चलवादी

बहुजन विरोधी पक्षांपासून सावध राहण्याचे आवाहन 
पुणे:-

प्रस्थापित राजकीय पक्षांकडून सातत्याने बहुजनांच्या राजकीय नेतृत्वाबद्दल अपप्रचार केला जातो. बहूजन समाज पक्षासंदर्भात असलेली द्वेषपूर्ण मानसिकता काँग्रेस-भाजप च्या वर्तनातून दिसून येते.असे असताना बीएसपी भाजपची ‘बी टीम’ असल्याचा अपप्रचार करणे कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांना शोभत नाही,असे मत बहूजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी सोमवारी (दि.2४) व्यक्त केले.

देशाच्या आयरन लेडी, उत्तर प्रदेशच्या चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या सुश्री बहन मायावती जी यांनी कॉंग्रेसला त्यांची जागा दाखवण्याचे काम केले आहे.बहुजनांना त्यामुळे संभ्रमित करण्याचे काम काँग्रेस करीत असल्याचा दावा डॉ.चलवादी यांनी केला.विशेष म्हणजे कॉंग्रेस बळकट असलेल्या राज्यात बसपा आणि कॅडर बद्दलची कॉंग्रेसची भावना द्वेषपूर्ण आणि जातीयवादी राहीली आहे. मात्र, उत्तर प्रदेश सारख्या राज्यात ज्या ठिकाणी कॉंग्रेस कमकुवत आहे, त्या ठिकाणी राजकीय स्वार्थासाठी बीएसपीला सोबत घेण्याची भूमिका मांडणे, या पक्षाचा दुटप्पी चेहरा दाखवणारा असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

जेव्हाही बहूजन हितार्थ काँग्रेस सारख्या जातीयवादी पक्षांसोबत आघाडी करीत बसपाने निवडणूक लढवली तेव्हा बसपाची मत कॉंग्रेसला ट्रान्सफर झाली. परंतू, कॉंग्रेसची मत बीएसपीला ट्रान्सफर झाली नाहीत. बसपाला त्याचा फटका बसला. भाजप आणि कॉंग्रेसचे चरित्र सदैव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकरी अनुयायी , बीसएपी आणि त्यांचे नेतृत्व, दलित-बहूजन अनुयायी तसेच आरक्षण विरोधी राहीले आहे. त्यामुळेच देश संविधानाच्या समता आणि कल्याणकारी उद्दिष्टपूर्ती पासून बराच मागे राहीला असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने भाजपची बी टीम म्हणून काम केल नसते तर त्यांची अशी स्थिती झाली नसती.कॉंग्रेसच्या अनेक उमेदवाराचे जामीन जप्त झाले. अशात राहूल गांधी यांनी कुठल्याही मुद्दयांवर विशेषत: बसपा प्रमुख सुश्री बहन मायावती जी यांच्या संदर्भात बोलण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा आणि आपल्या पक्षाच्या अवस्थेकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला डॉ.चलवादी यांनी दिला आहे.

संगीत साधना ही माझ्यासाठी ईश्वरसेवा-ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर

: श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर महाशिवरात्र संगीत महोत्सवात ‘रंग उषेचे’ कार्यक्रम संपन्न
पुणे:  संगीताच्या माध्यमातून मी अनेक देवी देवतांची गाणी गायली. संगीताद्वारे एक प्रकारे ईश्वर सेवा माझ्या हातून घडली. संगीत हे आमच्या घराण्याच्या मुळामध्येच असून माझ्यासाठी संगीत साधना ही ईश्वर साधना आहे, असे मत ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी व्यक्त केले. 
शिवाजीनगर मधील श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाशिवरात्र संगीत महोत्सवात  ‘रंग उषेचे’  या कार्यक्रमात सिद्धार्थ बेंद्रे यांनी उषा मंगेशकर यांची मुलाखत घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत बहिरट पाटील, सचिव सुधीर दुर्गे, खजिनदार शशिकांत भोसले, विश्वस्त महेश दुर्गे, संजय सातपुते यावेळी उपस्थित होते. डाॅ.आसावरी पाटणकर आणि शिष्या यांचा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम महोत्सवात सादर झाला.  
उषा मंगेशकर म्हणाल्या, लता मंगेशकर यांच्या इतका महान गायक आणि विनम्र व्यक्ती मी आतापर्यंत पाहिली नाही ‘ओम नमोजी आद्या’ हे गाणे गाण्यापूर्वी लतादीदी यांनी हे गाणे तुम्ही कशाप्रकारे गाता हे मला शिकवा अशी विनंती केली यातूनच त्यांचा विनम्रपणा दिसतो. त्यांच्यातील साधेपणा आणि विनम्रपणा मी आयुष्यभर माझ्या मध्ये जपण्याचा प्रयत्न केला.
मंगेशकर घराणे हे मंगेशी देवाला म्हणजेच भगवान शंकराला आराध्य मानते. वृद्धेश्वर सिद्धेश्वर महोत्सवाच्या माध्यमातून मी माझ्या संगीताद्वारे भगवान शंकराच्या चरणी सेवा अर्पण करत आहे ही संधी मला दिल्याबद्दल मी देवस्थानची आभारी आहे, अशी भावना ही उषा मंगेशकर यांनी यावेळी व्यक्त केले.
मुलाखती दरम्यान श्री रामचंद्र कृपाळू, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, आम्ही ठाकरं ठाकरं या रानाची पाखरं, निसर्ग राजा ऐक सांगते, झुळझुळ वाहे पुण्याजळाचे निर्झर हो अशा विविध प्रकारच्या गाण्यांच्या सुरेल सादरीकरणाने कलाकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. उषा मंगेशकर यांच्या सह चंद्रशेखर महामुनी आणि नेहा चिपळूणकर यांनीही गाणी गायली.

साहित्ययात्री रंगले साहित्यानंदात

0


मराठी साहित्ययात्री संमेलनात सुरू आहे मराठीचा जागर..
महादजी शिंदे एक्स्प्रेसमधून :
दिल्लीतील साहित्य संमेलनातून परतीच्या वाटेवर असलेल्या साहित्यिक, साहित्य रसिकांचे फिरत्या चाकांवरील मराठी साहित्ययात्री संमेलनात मराठीचा जागर सुरूच आहे. पोवाडे, अभंग, कथाकथन, कविता वाचन असे उपक्रम उत्साहाने सुरू आहेत. पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे या विशेष रेल्वेत हे साहित्ययात्री संमेलन सुरू असून ही विशेष रेल्वे पुण्यात पोहोचल्यानंतर संमेलनाचा समारोप होणार आहे. या विशेष रेल्वेला शूर सेनानी महादजी शिंदे यांचे नाव देण्यात आले आहे. तर बोग्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले साहित्यिक, साहित्य रसिकांनी महादजी शिंदे एक्स्प्रेसमधून दिल्लीत आल्यानंतर 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उत्साहाने भाग घेतला. रविवारी सायंकाळी संमेलनाचा समारोप झाल्यानंतर दिल्ली येथून रात्री 11:30 वाजता ही विशेष रेल्वे पुण्याकडे निघाल्यानंतर साहित्ययात्री संमेलनचा दुसरा टप्पा सुरू झाला. या संमेलनाचे अध्यक्ष लेखक शरद तांदळे आहेत, तर वैभव वाघ हे कार्यकारी अध्यक्ष आहेत.
सोमवारची सकाळ अभंग, भजन, कीर्तनासह, पोवाड्याच्या सादरीकरणाने भक्ती आणि वीररसात चिंब झाली. ‌‘वाटेवरचा देवनाम‌’, ‌‘एका जनार्दनी शिव‌’, ‌‘ॐ नमो ज्ञानेश्वरा, करूणाकरा दयाळा‌’ आदी भक्तीगीते सादर करण्यात आली. विविध बोग्यांमध्ये सुरू असलेले कविता, कथा वाचन तसेच विविध कलांच्या सादरीकरणातून रसिकांना विविध साहित्य, कलाकृतींची आनंद मिळत आहे. ढोल-ताशा पथकातील वादक तसेच अनेक हौशी कलाकारही मोठ्या उत्साहाने कला सादर करत आहेत. त्यामुळे साहित्य संमेलनाचा आनंददायी प्रवास सुरूच आहे.
नाशिक येथील वारकऱ्यांनी अभंग, हरिपाठ आणि भजन सादर केले. यात राजेंद्र सपकाळ, बाळासाहेब फराटे, सुखदेव सांगळे, लक्ष्मी घुले यांचा सहभाग होता. सिंहगर्जना ढोल-ताशा पथकाच्या वादकांनीही कला सादर केली. सोलापूरचे कवी सुरेशकुमार लोंढे, बेळगावचे कवी महादेव खोत, कोल्हापूरचे कवी मकरंद वागणेकर यांनी कवितांचे वाचन केले. रेल्वेत प्रवाशांची काळजी घेणाऱ्या स्वयंसेवकांनी सामुहिक नृत्य-वादन करून सर्वांचे मनोरंजन केले. आटपाडीचे ढोलकी वादक सिद्धनाथ जावीर व माळशीरसचे संवदिनीवादक राजवर्धन वाघमारे यांच्या साथीने प्रवाशांनी भक्तीरचना सादर केल्या.
पुणे ते दिल्ली आणि परतीच्या प्रवासादरम्यान सरहद, पुणेच्या वतीने प्रवाशांच्या दिमतीला अनेक कार्यकर्ते मनापासून झटत आहेत. तसेच कर्तव्य मेडिकल असोसिएशनचे डॉक्टरांचे पथक असून या पथकात आठ जणांचा समावेश आहे. रेल्वेत हे पथक प्रवाशांची सतत विचारपूस करत आहेत आणि कोणाला आरोग्याची समस्या जाणवल्यास त्यांना वैद्यकीय मदत करत आहेत. डॉ. फैज सय्यद, डॉ. ऋषिकेश पाटील, डॉ. यश थोरात, डॉ. क्षितिज कुचेकर यांच्यासह गौरव गायकवाड, अनिकेत मोगरे, गणेश जानकर, यशवंत पवार यांचा वैद्यकीय पथकात समावेश आहे.

रसिकांची दाद हाच कलाकारासाठी आशीर्वाद : पंडित विनायक तोरवी

गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे गुरू गौरव, संगीत गौरव, संगतकार पुरस्करांचे वितरण

पुणे : कलाकार हा कधीच पैशांसाठी, पुरस्कारासाठी किंवा प्रतिष्ठेसाठी कलेचे सादरीकरण करत नसतो. स्वत:ला आनंद मिळावा, तो आनंद इतरांनाही देता यावा यासाठी त्याचा प्रयत्न असतो. रसिकांची दाद म्हणजेच आशीर्वाद, अशा भावना कलाकारांच्या असतात. पुरस्काराने कलाकारांची जबाबदारी वाढते, असे भावोद्गार प्रसिद्ध गायक पंडित विनायक तोरवी काढले.
गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे गुरू गौरव, संगीत गौरव आणि संगतकार पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात आयोजित कार्यक्रमात पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर गुरू गौरव पुरस्काराने सुप्रसिद्ध गायक पंडित विनायक तोरवी (बंगळुरू), पंडित विनायक बुवा पटवर्धन संगीत गौरव पुरस्काराने ज्येष्ठ संवादिनी वादक डॉ. अरविंद थत्ते (पुणे), पंडित चंद्रकांत कामत संगतकार पुरस्काराने तबला वादक पंडित रवींद्र यावगल (बंगळुरू) तर पंडित तुळशीदास बोरकर संगतकार पुरस्कराने संवादिनी वादक पंडित अजय जोगळेकर (मुंबई) आणि पंडित विनय मिश्रा (दिल्ली) यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी सत्काराला उत्तर देताना पंडित तोरवी बोलत होते. पुरस्काराचे वितरण एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, उपप्राचार्या परिणिता मराठे उपस्थित होते. संगीत गौरव व गुरू गौरव पुरस्काराने सन्मानित कलाकारांना 21 हजार रुपये तर संगतकार पुरस्कारप्राप्त कलाकारांना 10 हजार रुपये पुरस्काराच्या रूपाने देण्यात आले. गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी प्रास्ताविकात पुरस्कारामागील संकल्पना विशद केली.
ज्येष्ठ संवादिनी वादक डॉ. अरविंद थत्ते म्हणाले, कलेच्या क्षेत्रात माझ्याकडून जे कार्य झाले आहे त्याचे श्रेय माझे आई-वडील, गुरुजन, माझे शिष्य आणि रसिक या सगळ्यांचे आहे. पंडित विनायकबुवा पटवर्धन यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही दडपण येणारी गोष्ट आहे. हा पुरस्कार माझ्या गुरू मालिनीताई राजुरकर आणि गुरुस्थानी असलेल्या कलाकारांना समर्पित करतो.
भूषण गोखले म्हणाले, गांधर्व महाविद्यालयाला मोठा इतिहास असून ते स्वरमंदिरच आहे. महाविद्यालयातील गुरूकुल पद्धत ही एक उत्तम शिक्षणपद्धती आहे. ते पुढे म्हणाले, ज्याचे पाय कायम जमिनीवर असतात त्या व्यक्ती आयुष्यात कायम मोठ्या उंचीवर पोहोचतात. पुरस्कार मिळालेले सर्व कलाकार आपआपल्या क्षेत्रात इतक्या उंचीवर असूनही अतिशय नम्र आहेत. त्यामुळे ते त्यांच्या शिष्यांसमोर आदर्श आहेत.
यावेळी पंडित विनय मिश्रा यांच्या सुरेल एकल संवादिनी वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आशय कुलकर्णी यांनी तबला साथ केली. पंडित रवींद्र यावगल याचे एकल तबला वादन झाले. त्यांना अभिषेक शिनकर यांनी संवादिनीची साथ केली. दिली. पंडित विनायक तोरवी यांच्या दमदार अशा गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यांना पंडित रवींद्र यावगल (तबला), पंडित विनय मिश्रा (संवादिनी) समर्पक साथसंगत केली. मंजिरी धामणकर यांनी सूत्रसंचालन केले.

जागा हडपणे,अतिक्रमणे करणे,वेळेवर फ्लॅटचा ताबा न देणाऱ्या बिल्डरांना पोलीस आयुक्तांनी दिली तंबी:म्हणाले, पोलिसांपुढे आका, काका चालणार नाही

पुणे :पैसे घेऊनही वेळेवर फ्लॅटचा ताबा न देणारे, बनावट कागदपत्रे बनवून जागांवर अतिक्रमण करणार्‍या बांधकाम व्यावसायिकांवर एमपीआयडी नुसार करवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले की बनावट कागदपत्रे तयार करुन जमिनीवर अतिक्रमण केल्याबाबत तक्रार आल्यास पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. जागेच्या मालकीचा मुद्दा हा दिवाणी दावा आहे. पोलीस निवाडा करणार नाही़ तर पोलीस जागेचा ताबा कोणाकडे होता, हे पाहून ती स्थिती कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

महारेराच्या टाईम लाईन नुसार फ्लॅटचा ताबा देण्याबाबतचे उल्लंघन केले असेल तर फ्लॅट घेण्यासाठी ग्राहकाने दिलेली रक्कम ही गुंतवणूक केल्याचे मानून संबंधितांवर एमपीआयडीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून होणार्‍या फसवणुकीबाबत नुकतीच क्रीडाईसोबत बैठक घेण्यात आली असून त्यातून काय मार्ग काढता येईल, हे पाहिले जाणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या पुत्राच्या अपहरणावरुन विचारलेल्या प्रश्नाबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, अपहरण, मिसिंग याकडे संवेदनशीलपणे पहाण्यास सांगण्यात आले आहे. सावंत प्रकरणात पोलिसांकडे जेव्हा अपहरणाची तक्रार आली तेव्हा, पोलीस तातडीने सतर्क झाले. तो अपहरणाचा प्रकार नव्हता, हे नंतर पुढे आले. पण, विमान भारताच्या हद्दीबाहेर गेले असते तर ते पुन्हा परत मागे आणणे अवघड गेले होते. मुलींच्या मिसिंगबाबत अनेकदा आपण स्वत: रस्त्यावर उतरुन शोध घेतला आहे. पोलिसांना कोणी वापरुन घेऊ शकणार नाही. पोलीस ठाण्यात कोणी आका, काका नाही. गुन्हा केला असेल तर त्याला कोणी वाचवू शकणार नाही.

गेल्या वर्षभरात खेळाडुव्यतिरिक्त कोणालाही नवीन शस्त्र परवाने देण्यात आले नाही. गरजेशिवाय तसेच ज्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे व ज्यांनी नुतनीकरण केले नाही, अशा ३०० जणांचे शस्त्र परवाने रद्द केले आहेत. याशिवाय ४०० जणांना शोकॉज नोटीस देण्यात आल्या आहेत.

पोलिसांना राजकीय, गुंडांचा दबाव नाही़ तर दबाव आहे तो जनतेचा, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. शहरातील वातावरण चांगले असावे, ही जनतेची अपेक्षा आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये, याचा दबाव पोलिसांवर आहे.

डॉ. शरद गोरे यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने रंगले कवी संमेलन

0

खुल्या कवी संमेलनात २६० कवींचा २२ तासांचा विक्रम
दिल्ली, २४ फेब्रुवारी २०२५ : दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम वर सुरू असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील शेकडो कवींनी स्वरचित कविता सादर करून कवी संमेलनात अनोखा विक्रम नोंदवला. नवतरुणी तिचे सौंदर्य, प्रेम प्रकरण, प्रेमभंग, निसर्ग कविता, निसर्गाचे विविध रूप, शेतकऱ्यांची व्यथा, शाळा, शाळेतील आठवणी, व्यवस्थेतील प्रश्न, सरकारचा अनास्थेपणा, राजकारण, समाजकारण, गाव, शहर,  आदींवर भाष्य करणाऱ्या कवितांनी दिल्लीतील तालकटोरा येथील छत्रपती शिवाजी नगरीतील सयाजीराव गायकवाड सभामंडपात कवी संमेलनाने तब्बल २२ तासाहून अधिक काळ सुरू राहण्याचा विक्रम केला. डॉ. शरद गोरे यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने हे कवी संमेलन रंगले होते. ९८ वर्षात पहिल्यांदाच झालेल्या या खुल्या संमेलनामुळे अनेक नवोदित पण दर्जेदार कवींना संधी मिळाली.  डॉ. शरद गोरे यांच्या प्रयत्नांमुळे या ऐतिहासिक विचारपीठाची निर्मिती झाली.
राज्यभरातून आणि महाराष्ट्र बाहेरील आलेल्या कवींनी आणि त्यांना दाद देणाऱ्या काव्यप्रेमींनी दिवसभर सयाजीराव गायकवाड सभामंडप हाऊसफुल झाला होता. रात्री दहा पर्यंत  या सभामंडपात मोठ्या प्रमाणात गर्दी ओसंडून वाहत होती. 
श्रीमंत सयाजीराव गायकवाड सभामंडप व छत्रपती संभाजी महाराज विचारपीठ येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली खुले कवी संमेलन आयोजित करण्यात आहे होते. या संमेलनाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, प्रदीप पाटील, आयएएस रोहिणी भाजीभाकरे, युवराज नळे, ज्ञानेश्वर मोळक, विक्रम मालन आप्पासो शिंदे, महिला व बालकल्यांच्या प्रशासकीय अधिकारी सुवर्णा चव्हाण, रमेश रेडेकर आदी उपस्थित होते. यावेळी देहू येथून आलेले तुकाराम महाराजांचे वंशज रामदास महाराज मोरे यांच्यासह देहूतील इतर वारकऱ्यांसह सरहद्द संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
तसेच प्रशासकीय अधिकारी सुवर्णा पवार लिखित मॉरीशस एक प्रवास, प्रतिभा मगर लिखित उन्हाळीवाटा, गणेश चप्पलवार लिखित कृषी पर्यटक उद्योजकांची यशोगाथा, भास्कर भोसले लिखित मेघळा या पुस्तकांचे यावेळी मान्यवरच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या सभामंडपात संमेलनाच्या दोन्ही दिवशी २६० कवींनी आपल्या कविता सादर केले. या खुल्या कवी संमेलनात प्रेमापासून ते विद्रोहापर्यंत सर्वच प्रकारच्या कवितांनी हे सभामंडप बहरून गेला. महाराष्ट्रासह बेळगाव, धारवाड, निपाणी, बीदर, कारवार, भालकी, खानापूर, गोवा, दिल्ली, हैदराबाद, गुजरात, मध्यप्रदेश या भागातून आलेल्या २५ हून अधिक कवींनी सहभाग नोंदवला. कविता सादरीकरणामध्ये प्रामुख्याने विक्रम मालन आप्पासो शिंदे, रमेश रेडेकर, प्रा. नितीन नाळे, जयश्री तेरकर, मीना महामुनी, बाळासाहेब गिरी, जितेंद्र सोनवणे, प्रतिभा मगर, कृष्णा साळुंखे, युसूफ सय्यद आणि बेळगाव येथून आलेले रवींद्र पाटील यांच्यासह २६० कवींनी सहभाग नोंदवला. याशिवाय कथाकथन, चर्चासत्र, एकपात्री नाटक, मराठी भावगीते, भारुड, गौळण अशा विविध मराठी साहित्य प्रकारांचे सादरीकरण ही या मंडपात झाले. 
या सभामंडपाला सकाळचे संपादक सम्राट फडणीस, साहित्य अकादमी विजेत्या साहित्यिका डॉ. संगीता बर्वे, ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप आवटे, शिवस्फूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोळक, बालभारतीच्या किशोर या मासिकाचे मुख्य संपादक किरण इंदू केंद्रे, गीतकार प्रांजल बर्वे, लोकमतचे मुख्य संपादक संजय आवटे, ॲड. नर्सिंग जाधव, टीव्ही 9 चे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव, साम टीव्हीचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये, राजेंद्र वाघ, रवींद्र कोकरे आदींनी या सभामंडपात विचारपीठाला भेट देऊन सर्व कवींशी संवाद साधला. या कविसंमेलनाचे आयोजन अमोल कुंभार, सुनील साबळे, महादेव आबनावे, अजिंक्य बनसोडे, अभय जगताप, आदर्श विभुते, गणेश दिवेकर, समीर बुधाटे, तानाजी गायकवाड, बाळासाहेब केमकर, सुरज शिंदे यांनी केले. 

कोथरूडमध्ये खून: गोळीबार, कोयता अन् तलवारीने हल्ला; 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे-वेगवेगळया गुन्हयात काेयत्याचा वापर पुणे शहरात गुन्हेगार सातत्याने करत असून त्याच्यावर निर्बंध आणण्यात पोलिसांना अपयश येत आहे. अशाचप्रकारे रविवारी मध्यरात्री पुण्यातील काेथरुड परिसरातील शास्त्रीनगर मध्ये दत्त मंदिराजवळ पुर्ववैमनस्यातून एका तरुणावर गाेळीबार करुन नंतर त्याचा तलवार , सत्तुर व काेयत्याचा वापर करुन निघृण खून टाेळक्याने केल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी घटनास्थळ येथून तलवार , सत्तुर आणि गावठी पिस्तूल जप्त केले आहे.

गाैरव अविनाश थाेरात (वय- 22) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी काेथरुड पोलिस ठाण्यात सागर वसंत कसबे (वय- 47) यांनी आराेपी विराेधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार लखन शिाेळे (वय- 27), दिनेश भालेराव (27), साहिल वाकडे (25), साेहेल सय्यद (24), राकेश सावंत (24), अनिकेत उमाप (22) व बंडया नागटिळक (18) यांच्यासह इतर आराेपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गाैरव थाेरात हा त्याच्या मित्रांसाेबत शास्त्रीनगर मधील दत्त मंदिरजवळ गप्पा मारत रविवारी मध्यरात्री बसला हाेता. त्यावेळी आराेपींचे टाेळके त्याठिकाणी आले, आराेपी साेहेल सय्यद याने जुन्या भांडण्याच्या कारणावरुन गाैरव याच्या दिशेने गाेळी झाडली परंतु ती गाेळी त्यास लागली नाही. त्यानंतर आराेपींनी काेयता व तलवारीने गौरव याच्या डोके, मान , पोट, पायावर वार करुन त्यांचा खून केला. त्यानंतर आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध पोलीस पथके घेत आहे.याप्रकरणी पुढील तपास काेथरुड पोलिस करत आहे