Home Blog Page 639

बोपदेव घाटातील अंधाराची अन उजेडाची डॉ. नीलम गोऱ्हेंनी केली पाहणी

आवश्यक सोयीसुविधा उभारण्याबाबत ऊर्जा विभाग, महापालिका आणि पोलीस आयुक्तांकडे करणार पाठपुरावा

पुणे दि.१७: बोपदेव घाट व परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीला शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट देऊन पाहणी केली व आढावा घेतला. तसेच भविष्यात चुकीच्या घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याबाबत पोलीसांना सूचना दिल्या. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी घाटातील रस्त्यांवर प्रचंड अंधार असल्याने प्रकाश खांब लावणे गरजेचे असून याबाबत ऊर्जा विभाग, महापालिके आणि पोलीस विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तसेच येथील चौकीत असणाऱ्या पोलिसांकरिता मोबाईल टॉयलेटची सोय, चौकीतील खिडक्यांना सुरक्षा जाळी आणि घाट क्षेत्रात मोबाईल नेटवर्क सुविधा वाढविणे यांकरिता पोलीस आयुक्तांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याखेरीज पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेली सर्च लाईट व्यवस्था, ध्वनिक्षेपकाद्वारे करण्यात येणारी घोषणा आणि या भागात तैनात करण्यात आलेले दहा पोलिसांचे गस्ती पथकाबाबत डॉ. गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले.

गुणीजान बंदिश स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार शनिवारी

पुणे : गुणीजान रिसर्च आर्ट कल्चर अँड एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे (ग्रेस) प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या 100व्या जयंतीनिमित्त देशपातळीवर घेण्यात आलेल्या गुणीजान बंदिश स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी (दि. 19) रंगणार आहे.
अंतिम फेरी 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:30 वाजेपासून डॉ. श्रीराम लागू रंगावकाश, हिराबाग, पुणे (ज्योत्स्ना भोळे सभागृह आवार) येथे होणार आहे. उपउपांत्य फेरीसाठी महिला गटात 11 स्पर्धकांची तर पुरुष गटात 10 स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. उपउपांत्य फेरीतील स्पर्धकांचे सादरीकरण गुरुवारी झाले. त्यातून उपांत्य फेरीसाठी प्रत्येक गटातून सहा स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे.
ज्येष्ठ गायिका अभिनेत्री निर्मला गोगटे, पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर, पद्मभूषण पंडित साजन मिश्रा, पद्मश्री पंडित सतिश व्यास, पंडित सुहास व्यास, विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे, विदुषी देवकी पंडित यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

महिला गटात निवड झालेले स्पर्धक : आद्या मुखर्जी, सोमदत्ता चॅटर्जी, युगंधरा केचे, नंदिनी गायकवाड, स्वाती तिवारी, तेजस्विनी वेर्णेकर

पुरुष गटात निवड झालेले स्पर्धक : इशान घोष, अथर्व वैरागकर, ऋषिकेश करमरकर, मेहेर परळीकर, दर्शन मेलमंकी, चैतन्य परब

पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दि. 20 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता डॉ. श्रीराम लागू रंगावकाश, हिराबाग, पुणे (ज्योत्स्ना भोळे सभागृह आवार) येथे आयोजित करण्यात आला असून पारितोषिक वितरण मान्यवर परीक्षकांच्या हस्ते होणार आहे.
देशपातळीवर आयोजित करण्यात आलेल्या गुणीदास बंदिश स्पर्धेतील सादरीकरण रसिकांसाठी खुले असून पुण्यातील संगीतप्रेमींनी आवर्जून उपस्थिती लावून स्पर्धकांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

सीमेवरील जिल्ह्यांनी आचारसंहितेच्या कालावधीत संशयीत वाहतूकीवर कडक नजर ठेवून कारवाई करावी-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे: पुणे जिल्ह्यासह सीमेवरील अहिल्यानगर, सोलापूर, ठाणे, सातारा व रायगड या जिल्ह्यांनी आपापल्या चेक पोस्टवर आचारसंहितेच्या कालावधीत संशयीत वाहतुकीवर कडक नजर ठेवून कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केल्या.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील अहिल्यानगर, सोलापूर, ठाणे, सातारा व रायगड या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांची दूरदृश्य प्रणाली द्वारे आंतरजिल्हा सीमा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी डॉ. दिवसे बोलत होते.

पुणे जिल्ह्याच्या संदर्भात डॉ. दिवसे म्हणाले, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी नाके (चेक पोस्ट) लावण्यात आलेल्या ठिकाणी पुन्हा ते लावण्यात यावेत. तसेच आवश्यकतेनुसार चेक पोस्टची जागा बदलण्यात यावी. चेक पोस्टवर सीसीटीव्ही कॅमेरे, छायाचित्रीकरण अनिवार्य करावे. येणारी वाहने ज्या जिल्ह्यात प्रवेश करतील त्या जिल्ह्यातील चेक पोस्टवर तपासणी करून संबंधित चेक पोस्ट ने अंतिम कारवाई करणे अपेक्षित आहे.

पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाट, भोर परिसरातील पश्चिम भागात छुप्या रस्त्याने अंमली पदार्थ, गावठी दारूची वाहतूक होऊ नये यासाठी वारंवार तपासणी करण्यात यावी. तसेच जल, वायू या मार्गानेदेखील वाहतूक होऊ नये यासाठी तपासणीच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

पुणे जिल्ह्यात 204 मावळ, 199 दौंड, 200 इंदापूर, 201 बारामती, 195 जुन्नर व 198 शिरूर या विधानसभा मतदारसंघाची हद्द शेजारील रायगड, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा व ठाणे या जिल्ह्याशी जोडलेली आहे.
0000

इंडियन आयडॉल 15: स्नेहा शंकरची निवड-नेपोटिझम की अस्सल प्रतिभा?

भारताचा अत्यंत लाडका गायन रियालिटी शो इंडियन आयडॉल आपला 15 वा सीझन घेऊन, देशातले अनोखे आवाज घेऊन सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर परत येत आहे. ऑडिशनमध्ये असामान्य गान प्रतिभा लाभलेले अनेक स्पर्धक समोर आले. अशीच एक स्पर्धक म्हणजे 18 वर्षांची स्नेहा शंकर.

स्नेहा शंकर ही भारतीय फिल्म संगीतकार आणि गायक राम शंकर यांची मुलगी आहे. राम शंकर यांनी प्रामुख्याने बॉलीवूडमध्ये काम केले आहे आणि आजही ते भारतीय संगीत क्षेत्रात योगदान देत आहेत. स्नेहाचा जन्म मुंबईत एका संगीतप्रेमी आणि गायकांच्या घराण्यात झाला. स्नेहाचे आजोबा स्व. श्री. शंकरजी एक प्रसिद्ध सूफी गायक होते, ते आपल्या शंभूजी या भावासोबत जोडीत गात असत. त्या दोघांनी मिळून ‘शंकर शंभू कव्वाल’ असे मोठे नाव कमावले होते. स्नेहा या स्पर्धेत आली, तेव्हा परीक्षकांनी तिला ओळखले पण विशाल ददलानीला तिने केलेली गाण्याची निवड पसंत पडली नाही. तिने सूफीपेक्षा वेगळे काही तरी गायला हवे होते असे त्याचे मत होते.

या विरुद्ध, बादशाह मात्र तिच्या एकंदर परफॉर्मन्सने खूप प्रभावित झाला आणि तिचे कौतुक करताना म्हणाला, “मी या आधी तुला कधीच ऐकलेले नाही. पण आज जेव्हा तू गायलीस आणि जेव्हा मला तुला मिळालेला वारसा समजला तेव्हा मला वाटले की तू योग्य गाणे निवडलेस. तू दिसतेस तर राम शंकरजींसारखीच, पण त्यांची परंपरा देखील पुढे नेणार असे वाटते आहे. जेव्हा विशाल सरांनी तुझ्या परफॉर्मन्सवर टिप्पणी केली तेव्हा मी मनातून घाबरलोच! माझे काही चुकते आहे का असे वाटू लागले, कारण मला तुझे गाणे फारच आवडले! असे गाणारे स्पर्धकच आम्हाला हवे आहेत. पण, विशाल सर म्हणाले तसे तू हे लवकर शिकले पाहिजे. असा विचार कर की एक रेषा आहे, जिच्या एका बाजूला सुरक्षितता आणि कम्फर्ट आहे. तू कम्फर्टच्या जितकी जवळ राहशील तितकी महानतेपासून दूर राहशील आणि महानतेच्या जवळ जाण्यासाठी तुला कम्फर्टपासून दूर जावे लागेल. हा तुझा कम्फर्ट झोन आहे. आणि येथे तुझी कामगिरी उत्तम आहे. तुझ्यात महान बनण्याची पूर्ण क्षमताही आहे. मला माहीत आहे, हे इंडियन आयडॉल आहे आणि तू शंकरचा वारसा घेऊन आली आहेस, पण जर तू हे करू शकली नाहीस तर दुसरे कोण करू शकणार?”

रेल्वे बुकिंग कालावधी कमी करण्याचा मोदी सरकारचा निर्णय एजंटसाठी की जनतेसाठी? -माजी आमदार मोहन जोशी

पुणे – रेल्वे तिकीट आरक्षणाचा (बुकिंग) कालावधी १२० दिवसांवरून ६० दिवसांवर आणण्याचा मोदी सरकारचा निर्णय सामान्य जनतेच्या सोयीचा नसून एजंटांच्या फायद्याचा आणि सरकारच्या नफेखोरीसाठी घेतलेला आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केला आहे.

रेल्वे प्रवासाचे तिकीट बुकिंग १२० दिवस अगोदर करण्याची मुभा होती. तीर्थयात्रा, सहली, मंगलकार्य अशासाठी सामान्य प्रवासी १२० दिवस आधीच बुकिंग करून ठेवत असे. याचा फायदा त्यांना सवलत मिळविण्यासाठी आणि दीर्घ प्रवासाचे नियोजन करण्यासाठी होत असे. ही सवय लोकांच्या अंगवळणी पडली होती. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अचानकपणे बुकिंग चा कालावधी१२० दिवसांवरून ६० दिवसांवर आणला. मध्यमवर्गीय प्रवासी यामुळे नाराज झाले आहेत. कालावधी कमी केल्याने सरकारला सवलती द्याव्या लागणार नाहीत, मोदी सरकारची नफेखोरी चालू रहाणार आहे आणि एजंटांचे फावणार आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या या निर्णयाचा निषेध करतो. रेल्वे खात्याचा कारभार सामान्य माणसासाठी सोयीचा न रहाता वैष्णव यांच्या काळात अव्यवहार्य आणि मनमानी राहिलेला आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

ज्येष्ठ नागरिकांची सवलत चालू ठेवा

वयाची साठी उलटलेल्या ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटात सवलत दिली जात होती. करोना साथीचे निमित्त करून मोदी सरकारने ती सवलत रद्द केली. ती सवलत अद्यापपर्यंत पुन्हा सुरू झालेली नाही. अनेक वर्ष ज्येष्ठ नागरिकांसाठी मिळत असलेली ही सवलत पुन्हा चालू करावी, अशी मागणी मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

मुस्लिम समाजाचे आजचे आंदोलन स्थगित

पिंपरी पुणे (दि. १८ ऑक्टोबर २०२४) मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळांवर होत असलेल्या भेदभावपूर्वक कारवाईच्या विरुद्ध तसेच कोणत्याही धर्मीयांची प्रार्थना स्थळे पाडू नये या प्रमुख मागणीसाठी आज शुक्रवारी (दि.१८ नोव्हेंबर) दुपारी पिंपरी महानगरपालिका भवन येथे मूक धरणे आंदोलन आयोजित केले होते. सदर आंदोलन प्रशासनाची झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे पुढील दोन महिन्यांसाठी स्थगित करण्यात आलेले आहे.
महानगरवपालिक आयुक्त व पोलिस आयुक्त तसेच शिष्ठमंडळाशी झालेल्या चर्चेत खालील मागण्या मंजुर करण्यात आल्या आहेत.
१) मुस्लिम समाजाच्या तसेच अन्य कोणत्याही धार्मिक स्थळांवर (विकास कामांच्या आड येणाऱ्या स्थळांव्यतिरिक्त) कारवाई करण्यात येणार नाही.
२) मुस्लिम समाजाला दिल्या जात असलेल्या भेदभावपूर्वक वातावरणाची वस्तुस्थिती लक्षात घेता पुढील कालावधीमध्ये मुस्लिम धर्मियांची प्रार्थना स्थळे मदरसे, दफनभूमी इत्यादीसाठी पालिकेच्या वतिने विकास आराखड्यात जागा आरक्षित करून देण्यात येतील.
३) पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या मुस्लिम समाज बांधवांसाठी एकावेळी पाच हजार लोक सामावले जातील या क्षमतेचे सांस्कृतिक भवन अर्थात मुस्लिम कम्युनिटी सेंटर उभे करण्यात येईल.
४) महानगरपालिकेच्या उर्दू शाळेतील वर्ग संख्या वाढवण्यात यावी तसेच उर्दू शिक्षकांची नव्याने भरती करून यापूर्वीच्या व आताच्या शिक्षकांना कायम सेवेत सामावून घेण्यात येईल.
५) मुस्लिम समाजाकडून गेल्या अनेक वर्षापासून स्लॉटर हाऊस सुरू करण्याची मागणी आपणाकडे करण्यात येत असून यास आपण वेळोवेळी सहमती दर्शवलेली आहे. तरी सदर स्लॉटर हाऊस तात्काळ उभारण्यात येईल. तात्पुर्ती व्यवस्था लवकरच करु असेही अश्वासन दिले आहे.

या सकारात्मक चर्चे मुळे आज शुक्रवारी होणारे मूक धरणे आंदोलन रद्द केले आहे, याची नोंद घ्यावी अशी विनंती आंदोलनाचे आयोजक शहाबुद्दीन शेख, राहुल डंबाळे, याकुब शेख, युसुफ शेख, हाजी गुलाम रसुल, फजल शेख यांनी केली आहे.

बाणेर टेकडीवर पायी चालायला जाणाऱ्यांना लुटणारी टोळी जेरबंद

पुणे-बाणेर टेकडीवर पायी चालायला जाणाऱ्यांना लुटणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणासह २ अल्पवयीन मुलांना चतुःश्रृंगी पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून लुटीचा ऐवाझी हस्तगत केला आहे .

या संदर्भात पोलीसंनी सांगितले कि,’बाणेर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये दिनांक-१३/१०/२०२४ रोजी १६/१५ वाजे चे सुमारास, बाणेर टेकडी, बाणेर पुणे. येथे वॉकींग करण्यासाठी गेलेल्या नागालँन्ड मधील महिला फिर्यादी नामे अबिनीयु खांन्गबुबो चवांग, वय-३६ वर्ष, धंदा-नोकरी, रा-रोहन निल अपार्टमेंन्ट, जी/ब्लॉक, फलॅट नं.१०१, औंध पुणे. मुळपत्ता-समजीरम गाव, जल्युकेई जि. पेरेन, राज्य-नागालँन्ड, या व त्यांची मैत्रीण नामे चिंगमलिऊ पामेई, अपर पामेई असे वॉकींग करुन परत जात असताना ०४ अनोळखी इसमांनी सदर ठिकाणी येवुन त्यांना शिवीगाळ करुन त्यांना लोखंडी हत्याराने मारहाण करुन त्यांचेकडील अॅपल कंपनीचा मोबाईल फोन, बर्डस, सॅक असा एकुण ५१,०००/-रुपये किंमतीचा मुददेमाल, जबरदस्तीने हिसकावुन घेवुन पळुन गेले होते त्याबाबत यातील फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर, गु.र.नं. ८११/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम-३०९ (६), ३५२,३ (५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम-३७ (१) (३) सह-१३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयाचे घटनास्थळी वरिष्ठांनी भेट देवुन दाखल गुन्हयाबाबत सुचना दिल्याने सदर गुन्हयाचा पुढील तपास हा वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व अंमलदार करीत असताना तपास पथकातील अधिकारी/अंमलदार यांनी यातील आरोपीची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करुन यातील आरोपी नामे द्रापेत ऊर्फ विशाल प्रभाकर समुखराव, वय-१९ वर्ष, रा-कुंभार यांची चाळ, बोराडेवाडी, गोल्ड जिम समोर, वाघेश्वर कॉलनी, जाधवाडी चिखली पुणे. मुळपत्ता-मु.पो. म्हाळुंगी, ता. चाकुर, जि. लातुर व ०२ विधीसंघर्षीत बालक यांचा हददीत/परहददीत शोध घेवुन त्यांचा मोटार सायकलवर पाठलाग करुन त्यांना शिताफीतीने ताब्यात घेवुन त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांचेकडुन दाखल गुन्हयात जबरदस्तीने हिसकावुन चोरुन नेलेला व गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल व लोखंडी धातुचा कोयता असा एकुण-०१,१०,७००/-रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे.

तसेच सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त पुणे शहर. अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०४ पुणे शहर हिंम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर अनुजा देशमाने, यांचे मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस स्टेशन पुणे शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, चतुः श्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजयानंद पाटील, तपास पथकाचे अधिकारी, पोलीस उप-निरीक्षक, प्रणिल चौगले, पोलीस हवालदार श्रीकांत वाघवले, पोलीस हवालदारबाबुलाल तांदळे, पोलीस हवालदारसुधाकर माने, पोलीस हवालदारइरफान मोमीन, पोलीस हवालदारबाबासाहेब दांगडे, पोलीस हवालदारश्रीधर शिर्के, यांनी केली आहे.

कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे समाज समृद्ध होतो: डॉ. मनमोहन वैद्य

पुणे :

विवेकानंद केंद्राचे जीवनव्रती ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वास लपालकर यांनी  तीस वर्षांत अरुणाचल प्रदेश आणि आसाम या प्रांतात दिलेल्या शैक्षणिक योगदानाचा,अनुभवांचा  आढावा घेणाऱ्या ‘अरुण रंग’  या पुस्तकाचे प्रकाशन   पुण्यात संघ परिवारातील मान्यवरांच्या   हस्ते झाले . विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, महाराष्ट्र प्रांत मराठी प्रकाशन विभागाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.डॉ.मनमोहन वैद्य(अ.भा.कार्यकारिणी सदस्य,रा.स्व.संघ ),प्रदीप जोशी(सह प्रचारप्रमुख, रा.स्व.संघ ),भानुदास धाक्रस (अखिल भारतीय महासचिव, विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी) या मान्यवरांच्या हस्ते हे प्रकाशन  गणेश सभागृह(न्यू इंग्लिश स्कूल,टिळक रस्ता ) येथे झाले.

विश्वास लपालकर यांनी १९८१ ते २०११ या तीस वर्षांत अरुणाचल प्रदेश आणि आसाम या प्रांतात शैक्षणिक उपक्रमांच्या संचालनादरम्यान तेथील जन-जीवनाचा घेतलेला अनुभव आणि त्यांना भेटलेल्या पालकांच्या,विद्यार्थ्यांच्या आठवणी यावर  ‘अरुण’ रंग’ हे पुस्तक आधारित आहे.विवेकानंद केंद्राचे जीवनव्रती, पश्चिम बंगाल आणि अंदमान प्रांताचे संघटक म्हणून विश्वास लपालकर यांनी योगदान दिले आहे.डॉ. गो. बं. देगलूरकर,अभय बापट (प्रांत प्रमुख,विवेकानंद केंद्र),किरण कीर्तने( प्रांत संचालक,विवेकानंद केंद्र),सुधीर जोगळेकर(सचिव,विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, महाराष्ट्र प्रांत मराठी प्रकाशन विभाग) उपस्थित होते. पुस्तकाचे प्रकाशनानंतर  श्री.लपालकर यांच्याशी अनौपचारिक गप्पागोष्टीचे आयोजन करण्यात आले . शैलेंद्र बोरकर यांनी सूत्रसंचालन केले.सुधीर जोगळेकर यांनी प्रास्ताविक केले.सुनील कुलकर्णी,सौ.कांचन जोशी यांनी लपालकर यांची प्रकट मुलाखत घेतली.

डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले,’ अरुणाचल मध्ये श्री. लपालकर यांच्या सारख्या कार्यकत्यांनी जिद्दीने प्रतिकूल परिस्थितीत योगदान केले.हे पुस्तक वाचून वाचकांच्या मनात ध्येय्य जागृती होऊ शकते.  या पुस्तकात अनुभवाचे बोल असल्याने त्याची शक्ती मोठी आहे.

   कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे समाज समृद्ध होतो. समाजाला काही ना काही देत राहणे, हाच धर्म आहे. उपासना वेगळी असू शकते. हाच विचार भारताचा प्राण आहे. भारतातील समाज हा धर्मावर टिकलेला आहे. आध्यात्मिकता जागवून भारत घडवायचा आहे. त्यातून जीवन सार्थक होईल. 

भानुदास धाक्रस यांनी विवेकानंद केंद्राच्या कार्यात जीवनव्रतींचे योगदान उलगडून सांगितले. ते म्हणाले,’राष्ट्र बलशाली करण्याचे व्रत प्रत्येकाने घेतले पाहिजे. स्वामी विवेकानंदांचे विचार सर्वत्र पोहोचवले पाहिजे. त्याग, सेवा करीत मार्गक्रमण करावे.’

विश्वास लपालकर म्हणाले,’युवकांसाठी महाविद्यालयात काम करण्याची प्रेरणा एकनाथ रानडे यांनी दिली.अरुणाचल मध्ये लोकांचे मन फार मोठे आहे. त्याचा पदोपदी अनुभव घेतला आणी तिथेच काम करण्याचे ठरवले.विवेकानंद केंद्राच्या कामात लवचिकता आहे आणि आत्मीयता आहे.सातत्याने प्रवास करून कष्टप्रद काम केले कारण विवेकानंद केंद्रासाठी घराघरात प्रार्थना होते. विवेकानंद केंद्राचे काम समाजामुळेच उभे आहे.’

प्रदीप जोशी म्हणाले,’ कार्यकर्त्याच्या जीवनातील प्रसंगांचे पुस्तक होणे, ही महत्वपूर्ण घटना आहे. कोणताही डोंगराळ प्रदेशातील समाज आपल्या पासून वाटतो तितका दूर नाही,हे या पुस्तकातून लक्षात येते.या समाजाची प्रगती होताना पाहिली की निरलस कार्यकर्त्यांनी केलेल्या योगदानाची कल्पना येते. त्यातून सकारात्मक, सृजनात्मक शक्ती उभी राहत आहे. कार्यकर्त्यांची सर्वसमावेशकता अशा कामात उपयोगी पड़ते.

बलशाली समाज निर्मितीसाठी संस्कारक्षम ग्रंथ निर्मिती विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागातर्फे केली जाते, अशी माहिती सुधीर जोगळेकर यांनी दिली. अरुण रंग हे या प्रकाशन विभागाचे १६६ वे पुस्तक आहे, असेही त्यांनी सांगितले.

७५ व्या वषा वर्षात पदार्पण केल्याबद्दल प्रदीप जोशी यांच्या हस्ते श्री. लपालकर आणि सौ. सुजाता लपालकर यांचा सत्कार केला.

स्वामी विवेकानंद यांच्या समग्र चरित्राच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशनही करण्यात आले

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय यंत्रणेकडून शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा घेण्याचा आग्रह

मुंबई–माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सावध झाली असून राज्यातील आढावा घेतला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याबाबत निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. यासाठी सुरक्षा यंत्रणा शरद पवार यांच्याशी संपर्क साधणार आहे. दरम्यान, केंद्रीय यंत्रणांनी यापूर्वीही शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा प्रदान केली होती, पण तेव्हा शरद पवारांनी सुरक्षा नाकारली होती.

काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दिकी यांची वांद्रे पूर्व येथे रात्रीच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या केली होती. बिश्नोई टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. विधानसभा निवडणुकांच्या आधी घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या घटनेमुळे केंद्रीय यंत्रणा सज्ज झाल्या असून त्यांनी राज्यातील सुरक्षेचा आढावा घेतला आहे.

या दरम्यान, केंद्रीय यंत्रणांकडून खासदार शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा घेण्याबाबत विनंती केली आहे. मात्र, शरद पवारांना धोका काय आहे? याबाबत कोणतही माहिती समोर आली नाही. फक्त शरद पवारांनाच या धोक्याबाबत माहिती देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे झेड प्लस सुरक्षाबाबत शरद पवार काय निर्णय घेतात, हे पहावे लागणार आहे.केंद्र सरकारने याआधी देखील झेड प्लस सुरक्षा दिली होती. मात्र, शरद पवार यांनी या सुरक्षेबाबत संशय व्यक्त करत ती सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. झेड प्लस सुरक्षा म्हणजे निवडणुकीच्या काळात खात्रीलायक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते, असे शरद पवार त्यावेळी म्हणाले होते.

विधानसभा निवडणुकीदरम्यान पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी मुंबई प्राप्तिकर विभागाने स्थापन केला 24×7 नियंत्रण कक्ष

नागरिक फोन, व्हॉट्सॲप किंवा टेक्स्ट मेसेज किंवा ईमेलद्वारे याबाबत माहिती कळवू शकतात

मुंबई, 17 ऑक्टोबर 2024

आगामी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक, 2024 दरम्यान पैशांचा  गैरवापर  रोखण्यासाठी मुंबई प्राप्तिकर विभाग वचनबद्ध आहे. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी आणि निवडणुकीचे पावित्र्य कायम राखण्यासाठी, 24×7 कार्यरत असलेल्या निवडणूक खर्च देखरेख यंत्रणेचा समावेश असलेला नियंत्रण कक्ष मुंबई प्राप्तिकर विभागाने स्थापन केला आहे.  आदर्श आचारसंहिता लागू असेपर्यंत हा नियंत्रण कक्ष कार्यरत राहील.  हा नियंत्रण कक्ष कर्तव्यनिष्ठ जनतेला आणि राज्यातील नागरिकांना निवडणूक प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रोख आणि मौल्यवान वस्तूंबद्दल माहिती देण्यासाठी सक्षम बनवेल. खालील टोल फ्री क्रमांक, व्हॉट्सॲप नंबर किंवा टेक्स्ट मेसेज क्रमांक आणि ईमेलद्वारे नियंत्रण कक्षाला माहिती देता येईल :

टोल फ्री क्रमांक: 1800-221-510

व्हॉट्सॲप किंवा टेक्स्ट मेसेज क्रमांक: 8976176276/ 8976176776

ईमेल आयडी: mumbai.addldit.inv7@incometax.gov.in

नियंत्रण कक्षाचा पत्ता: खोली क्र.  316, तिसरा मजला, सिंधिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-400001

सुस्वरांनी रंगली राहुल देशपांडे यांची संगीत संध्या

देशप्रेमी मित्र मंडळातर्फे राहुल देशपांडे लाईव्ह इन कॉन्सर्टचे आयोजन
पुणे : विविध रागांनी सजलेले सूर, तबल्याची अप्रतिम साथ आणि कलाकारांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणाला रसिकांची मनमुराद दाद अशा संगीत आणि सुरांच्या मिलापाने गायक राहुल देशपांडे यांची संगीत मैफल रंगली. 
देशप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने कोथरूड मधील गांधी लॉन्स येथे राहुल देशपांडे लाईव्ह इन कॉन्सर्ट चे आयोजन करण्यात आले होते. सूर, ताल आणि लय यांनी नटलेल्या या मैफिलीमध्ये रसिकांनी राहुल देशपांडे यांच्या गायकीचा मनमुराद आनंद लुटला. निखिल पाठक, विशाल धुमाळ आणि प्रसाद जोशी यांनी राहुल देशपांडे यांच्या मैफिलीला साथ संगत केली. मंदार बलकवडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. केंद्रीय सहकार आणि विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सोलवूड वेंचर्स  आणि मॅजेस्टिक लँडमार्क यांनी कार्यक्रमाच्या संयोजनासाठी सहकार्य केले. 
पुरिया धनश्री रागातील ‘पायलिया झंकार बाजे’ या गाण्याने राहुल देशपांडे यांनी आपल्या मैफिलीला सुरुवात केली. ‘पिया समझावत, समझत नाही पायलिया मोरे’ या गाण्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले. पंडित वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेली  बिंदिया ले गयी हमारी रे मछलिया जाये काही कोई मोरे छोटे देवर’ से या ठुमरी ने राहुल देशपांडे यांनी रसिकांची मने जिंकली. ‘बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात भेट आपली का स्मरशी काय तो मनात’ या पंडित वसंतराव देशपांडे यांच्या अप्रतिम गाण्याचे सादरीकरण करून राहुल देशपांडे यांनी रसिकांना आपल्या सुमधुर स्वरांनी जिंकले.
राहुल देशपांडे म्हणाले, कोथरूड मधील या भागामध्ये मी प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर सांघिक कार्यक्रमाचे आणि तेही शास्त्रीय गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन झालेले पाहत आहे. मंदार बलकवडे यांनी या कार्यक्रमाचे अत्यंत काटेकोरपणे आयोजन करून त्यांनी त्यांची संगीताविषयी आणि कलाकारांविषयी असलेले प्रेम दाखवून दिले आहे. शास्त्रीय संगीत लोकांच्या घराघरापर्यंत आणि विशेषता तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा प्रकारच्या भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे. आदिती द्रविड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

शनिवारपर्यंत मतदार नोंदणीची संधी; नाव नोंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे, दि. 17: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी येत्या शनिवार दि. 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज क्र. 6 भरुन नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक 29 ऑक्टोबर असून त्यापूर्वी 10 दिवसांपर्यंत म्हणजेच 19 ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करता येते. त्यासाठी मतदारांनी आपले नाव यादीत आहे किंवा नाही याची खात्री https://electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळावर करावी. मतदार यादीत नाव नसल्यास अर्ज क्र. 6 भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे 19 ऑक्टोबरपूर्वी सादर करावा, असेही डॉ. दिवसे यांनी कळविले आहे.

‘लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरातबाजीवर भाजपा युती सरकारकडून २०० कोटी रुपयांची उधळपट्टी: अतुल लोंढे

भगिनींना मदत करताना जाहिरातबाजी व चमकोगिरीची गरज काय?

मुंबई, दि. १७ ऑक्टोबर
काँग्रेस सरकारने कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमध्ये महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणली, बसमधून मोफत प्रवासाची योजना लागू केली, शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले, त्यासाठी काँग्रेस सरकारने इव्हेंट वा जाहिरातबाजी केली नाही, परंतु टेंडर घ्या व कमिशन द्या या भाजपा महायुती सरकारच्या धोरणानुसार ‘लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरातीवर भाजपा युती सरकारने २०० कोटींची उधळपट्टी केली आहे. जनतेच्या कष्टाचा पैसा अशा पद्धतीने इव्हेंट, जाहिरातीबाजी आणि चमकोगिरीवर उधळून लूट सुरु आहे, असा प्रहार प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, भाजपा सरकारने प्रचंड महागाई करुन ठेवली आहे, ७० रुपयाचे तेल १२० रुपये केले, साखर, गुळ, डाळी, रवा अशा जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगणाला भिडल्या आहेत. नोकऱ्या नाहीत त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे, शेतकऱ्यांना मदत नाही अशा परिस्थितीत ‘लाडकी बहिण’ योजनेची जाहिरातबाजी करून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना काय दाखवायचे आहे? यांनी घरातून पैसे दिले, की प्रॉपर्टी विकून पैसे दिले? ते जनतेचे पैसे आहेत, जनतेच्या कराच्या पैशांची अशा पद्धतीने उधळपट्टी केली जात असल्याने सामान्य माणसाला चीड आल्याशिवाय राहणार नाही, असेही अतुल लोंढे म्हणाले.

घोरपडे पेठ, पंचहौद टॉवर परिसरात आग

पुणे-गुरुवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील घोरपडे पेठ, पंचहौद टॉवर परिसरात जोशी वाड्यामध्ये पाच घरे व एका छोट्या दुकानाला भीषण आग लागल्याचा प्रकार घडला. या घटनेत इमारतीच्या वरच्या मजल्यावर ठेवण्यात आलेला कपड्याचा साठा भस्मसात झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच या आगीवर नियंत्रण मिळवत दोन सिलेंडर इमारतीबाहेर काढले. यामुळे पुढील अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

अग्निशमन अधिकारी प्रशांत गायकर व सुनिल नाईकनवरे यांनी सांगितले की, गुरुवारी पहाटे 3.47 वाजता घोरपडे पेठ, पंचहौद टॉवर जवळ, जोशी वाडा याठिकाणी काही घरांना आग लागल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानुसार अग्निशमन दलाकडून एकूण 5 फायरगाडी व 2 वॉटर टँकर (मुख्यालयातून 2 फायरगाडी व 2 वाॅटर टँकर व कसबा, एरंडवणा, गंगाधाम अग्निशमन केंद्र प्रत्येकी 1) घटनास्थळी रवाना करण्यात आले होते. जोशी वाडा येथील पाच घरे व एक छोटे दुकान या भीषण आगीत जळाले असून घरामध्ये वरच्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात साठा असलेला कपड्याचा माल ही संपूर्ण जळाला आहे. सदर ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवानांनी चार ही बाजूने पाण्याचा मारा करत आग काही वेळात पूर्ण विझवली आहे. या घटनेत कोणी जखमी वा जिवितहानी झालेले नाही. यावेळी घरामधून दोन सिलेंडर देखील बाहेर काढले गेले. संबधित आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

‘ढोल बाजे’ मध्ये ४५०० पीसीईटीयन्स चा सहभाग

पीसीईटी मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील सर्वांत मोठा गरबा नाईट आयोजित

पिंपरी, पुणे (दि. १७ ऑक्टोबर २०२४) देशातील अग्रमानांकित शैक्षणिक संस्थापैकी एक असणाऱ्या, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट मध्ये ‘ढोल बाजे – दांडिया नाईट’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पीसीईटी आकुर्डी कॅम्पस मधील ४५०० पीसीईटीयन्स या दांडिया नाईट मध्ये सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थी – विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी यांनी रास-दांडिया, पारंपरिक गरब्याचा आनंद लुटला. यंदाचे या दांडिया नाईटचे तीसरे वर्ष होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताच्या उद्योग क्षेत्र आपल्या कर्तृत्वाने उजळून टाकणाऱ्या टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष पद्मविभूषण स्वर्गीय रतन टाटा यांना आदरांजली वाहण्यात आली. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे नरेंद्र ज्ञानेश्वर लांडगे यांनी सपत्नीक देवीची आरती करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
ढोल बाजे दांडिया नाईट यशस्वी करण्यासाठी पीसीईटी कॅम्पस डायरेक्टर प्रताप देवकर, पीसीईटीचे डिजिटल मार्केटिंग हेड डॉ. केतन देसले, प्रा. आनंद बिराजदार व झोलोस्कॉलर ची संपूर्ण टीम यांनी परिश्रम घेतले.
या गरबा नाईटच्या यशस्वी आयोजनासाठी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी मार्गदर्शन केले.