Home Blog Page 560

पुणे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

पुणे, दि. २९: केंद्र शासनाच्यावतीने १२ ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवात जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंना सहभागी होता यावे, याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे, नेहरु युवा केंद्र संघटन, पुणे व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरावर युवा महोत्सवाचे ५ व ६ डिसेंबर २०२४ रोजी डॉ. ए. आर. शेख असेंब्ली सभागृह, आझम कॅम्पस, पुणे येथे आयोजन करण्यात येणार आहे.

युवा महोत्सवामध्ये संकल्पना आधारीत स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत लोकनृत्य व लोकगीत, कौशल्य विकासाअंतर्गत कथा लेखन, कविता, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, भारत यंग लीडर्स डायलॉग (पंतप्रधान यांच्या समवेत चर्चा) व युथ आयकॉन या उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी संबंधित शाळा, महाविद्यालये अथवा युवक युवतींनी त्यांचे प्रवेश dsopune6@gmail.com वर किंवा ९५५२९३१११९ या व्हॉटसॲ क्रमांकावर ३ डिसेंबर २०२४ तर विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग (पंतप्रधान यांच्या समवेत चर्चा) या उपक्रमात युवा संस्थांनी सहभागी होण्याकरीता https://mybharat.gov.in/ या संकेतस्थळावर ५ डिसेंबर २०२४ पर्यंत नोंदवावेत.

जिल्हा व विभागस्तरावरील विजयी युवक, युवती, राज्यस्तरावर व राज्यस्तरावरुन निवड केलेला राज्याचा संघ राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभागी करण्यात येणार आहे. अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी, सर्व्हे नं. १९१, ग्यानबा मोझे हायस्कुल समोर, विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा, पुणे -०६ दूरध्वनी क्र. ०२०-२६६१०१९४ येथे किंवा dsopune6@gmail.com या ईमेल पत्त्यावर संपर्क साधावा. तरी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, युवक मंडळे यातील इच्छुक कलावंत, स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.
0000

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामगाव मावळ येथील विद्यार्थ्यांचा सायबर सिक्युरिटी चर्चासत्रात सहभाग

खामगाव मावळ,पुणे: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामगाव मावळ येथील विद्यार्थ्यांनी ‘बाल रक्षा भारत’ आणि ‘नॉर्टन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायबर सिक्युरिटी चर्चासत्रात सहभागी होऊन एक महत्त्वपूर्ण अनुभव घेतला. या चर्चासत्रात देशभरातील आठ राज्यांमधील विविध विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सायबर सिक्युरिटी या विषयाचा वाढता महत्त्व लक्षात घेऊन या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.इंटरनेट आणि मोबाईलचा वापर करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि चुकीच्या वापरामुळे येणाऱ्या अडचणी कशा टाळता येतील, यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः लहान मुलांसाठी सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीने सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यात आले.या कार्यक्रमात सेव्ह द चिल्ड्रन संस्थेचे श्री. हनुमंत पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन सुरक्षा राखण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय सांगितले. उदाहरणार्थ, पासवर्ड सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व, अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संवाद टाळणे, सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करताना खबरदारी घेणे, आणि ऑनलाइन फसवणूक कशी ओळखावी यावर सखोल चर्चा केली.
विद्यार्थ्यांनी या चर्चासत्रात उत्साहाने सहभाग घेतला आणि तज्ज्ञांकडून समर्पक उत्तरांची माहिती मिळवली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. उमेध धावारे यांनी आणि शिक्षकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. ग्रामीण भागातील मुलांना अशा जागतिक चर्चासत्रात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने त्यांच्यात आत्मविश्वास वाढल्याचे त्यांनी नमूद केले.
‘बाल रक्षा भारत’ आणि ‘नॉर्टन’ यांच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर जागरूकता निर्माण झाली असून, ते इंटरनेटचा सुरक्षित आणि सकारात्मक वापर करण्यासाठी सजग होणार आहेत. हनुमंत पवार यांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रात सहभागी होण्याची संधी मिळाली, हे विशेष.

१४लाख ६०हजाराचे MD आणि पिस्तुलसह बॉबी आणि लड्डू च्या आवळल्या मुसक्या …

पुणे- मॅफेड्रॉन (एम.डी.) १४,६०,०००/- रु. किं.चा व देशी बनावटीचे पिस्तल राऊन्डसह बॉबी आणि लड्डू नावाच्या दोन तरुणांना पुणे पोलिसांनी फरासखाना परिसरात पकडले आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ पोलीस आयुक्त यांनी पुणे शहरातील अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन करणेबाबत सुचना दिले असून त्या अनुषंगाने दि.२९/११/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक तसेच अधिनस्त पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणेच्या परीसरात पेट्रोलींग करीत असताना डायमंड बिल्डींगचे खाली गारुती मंदिराजवळ शुक्रवार पेठ, पुणे. येथे सार्वजनिक ठिकाणी इसम नामे १) बॉबी भागवत सुरवसे, वय २८ वर्षे, रा. गजराज हेल्थ क्लबजवळ, सर्वे नं. १२, लक्ष्मीनगर येरवडा, पुणे. २) तोसिम ऊर्फ लडडु रहिम खान, वय ३२ वर्षे, रा. १२८२ दर्गारोड, कसबा पेठ, पुणे यांच्या ताब्यातुन एकुण १६,५७,०००/- रु. किंमतीचा ऐवज त्यामध्ये एकुण १४,६०,०००/- रु.कि.चा ७३ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) असा अंमली पदार्थ व ६७,०००/- रु.कि.चे एक देशी बनावटीचे लोखंडी स्टील बॉडी असलेले पिस्टल, एक मॅगजीन व दोन जिवंत काडतुसे, व इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द फरासखाना पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.२५२/२०२४, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (क), २९, भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, अं.प.वि.प.२, गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची नमुद कारवाई ही पोलीस आयुक्तअमितेश कुमार,सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे.२,राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २, तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, सपोफौ सुनिल पवार, पोलीस अंमलदार साहिल शेख, उदय राक्षे, सुरेंद्र जगदाळे, योगेश मांढरे, नितीन जगदाळे, अझिम शेख, आझाद पाटील, अझिम शेख, अमोल राऊत, पवन भोसले, निलम पाटील, यांनी केली आहे.

आपलं कोणी हरवलंय काय ?”ऑपरेशन मुस्कान-१३”

पुणे-अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा आता पुणे शहर राज्यात “ऑपरेशन मुस्कान-१३” ही शोध मोहीम राबवत आहे
राज्यात हरविलेल्या बालकांच्या व महिलांच्या, प्रत्येकाच्या संदर्भात “ऑपरेशन मुस्कान-१३” ही शोध मोहीम दिनांक ०१/१२/२०२४ ते दिनांक ३०/१२/२०२४ या कालावधीत राबविणेबाबत राज्यात निश्चित केले आहे , याचदरम्यान पुणे शहरामध्ये हरविलेल्या बेपत्ता बालके (१८ वर्षाखालील) व महिलांचा (१८ वर्षावरील) शोध घेण्यासाठी ही मोहिम राबविण्यात येत आहे,
या मोहिमेच्या अनुषंगाने प्राप्त निर्देशाप्रमाणे अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर येथे सर्व परिमंडळ मधील पोलीस स्टेशन निहाय टिम तयार केली असुन सदर टिम पुणे शहरातील सर्व पोलीस स्टेशनला भेटी देऊन या मोहिमेबाबत पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांना समक्ष भेटुन सदर मोहिमेबाबत माहिती देणार आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे आपल्या पोलीस स्टेशन स्तरावर सदर मोहिमेकरीता एक अधिकारी व तिन पोलीस अमंलदार असे विशेष टिम तयार करुन त्यांचेकडुन ऑपरेशन मुस्कान १३ शोध मोहिम हरविलेल्या सर्व बालकांचा व १८ वर्षावरील महिलांचा प्रभाविपणे शोध दिनांक ०१/१२/२०२४ ते दिनांक ३०/१२/२०२४या कालावधीमध्ये घेणार आहे.
तरी “ऑपरेशन मुस्कान-१३” प्रभाविपणे पार पाडण्यासाठी जनमानसात सदर मोहिमेचा प्रसार व्हावा व त्यायोगे जनसहभाग वाढावा तसेच जनसामान्यांना निदर्शनास आलेली बेवारस मुले व महिला यांचेबाबत संबधित पोलीस स्टेशनला जनसामान्यांनी माहिती देणेकरीता पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धापुण्याचे खेळाडू नेत्रदीपक कामगिरी करतील : उदय भालचंद्र

पुणे दिनांक २९ नोव्हेंबर
पुणे जिल्हा संघांमधील सर्वच खेळाडूंनी यंदाच्या मोसमातील स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे त्यामुळे आगामी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेतही ते पुण्याचा नावलौकिक उंचावतील असा आत्मविश्वास बालुफ ऑटोमेशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तसेच पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष उदय भालचंद्र यांनी व्यक्त केला. राज्य स्पर्धा दिनांक २ डिसेंबर पासून पुण्यात आयोजित केली जाणार आहे.

पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीने
पुणे जिल्ह्याच्या ११, १३, १५ वर्षाखालील मुले व मुलींच्या संघांची निवड करण्यात आली असून. या संघांचे सराव शिबिर शारदा सेंटर येथे सुरू झाले आहे.या शिबिरास बालुफ ऑटोमेशन कंपनीचे प्रायोजकत्व लाभले आहे.

बालुफ ऑटोमेशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तसेच पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष उदय भालचंद्र यांनी या शिबिरास भेट देऊन खेळाडूंना मार्गदर्शन केले‌. ते स्वतः राष्ट्रीय खेळाडू असल्यामुळे त्यांनी महत्त्वाच्या क्षणी खेळावर कसे नियंत्रण ठेवावे याबाबत बहुमोल मार्गदर्शनही केले. यावेळी जिल्हा संघटनेचे आशिष बोडस, सौ स्मिता बोडस, प्रशिक्षक सुरेंद्र देशपांडे आदी उपस्थित होते.

 हे शिबिर पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या वतीने शारदा स्पोर्ट्स सेंटरच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे. आगामी राज्य स्पर्धेत पुणे जिल्ह्याच्या खेळाडूंची कामगिरी सर्वोत्तम व्हावी या दृष्टीनेच या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी असे शिबिर आयोजित केले जात असून त्याचा फायदा खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी झाला आहे.

शौरेन सोमण व नैशा रेवसकर
यांच्याकडे पुण्याचे नेतृत्व
आगामी राज्य स्पर्धेसाठी मुलांच्या संघाचे नेतृत्व शौरेन सोमण याच्याकडे सोपवण्यात आले असून प्रशिक्षकपदी वैभव दहिभाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुलींच्या संघाचे नेतृत्व नैशा रेवसकर हिच्याकडे देण्यात आले आहे आणि प्रशिक्षकपदाची जबाबदारी पवन कदम यांच्याकडे सोपवण्यात आली आहे

पुण्याचे संघ-मुले
१५ वर्षाखालील – शौरेन सोमण (कर्णधार) श्रेयस माणकेश्वर, आदित्य सामंत, नील नवरे,
१३ वर्षाखालील- मोहील ठाकूर, धैर्य शहा, शारंग गवळी, नीरव मुळ्ये
११ वर्षाखालील मुले – वरदान कोलते, नभ पंचोलीया, सर्वेश जोशी, ऋग्वेद दांडेकर.
प्रशिक्षक- वैभव दहिभाते
मुली- १५ वर्षाखालील-नैशा रेवसकर कर्णधार, सई कुलकर्णी, आद्या गवात्रे, वेदांगी जुमडे.
१३ वर्षाखालील-नीरजा देशमुख श्रेया कोठारी दिया शिंदे शरण्या पटवर्धन.
११ वर्षाखालील-आहाना गोडबोले, स्पृहा गुजर, शरण्या पटवर्धन, श्रीनिका उमेकर
प्रशिक्षक – पवन कदम.

राष्ट्रपती मुर्मु यांनी दिल्या युवा अभिनेत्री ईशा अगरवालला शुभेच्छा

पिंपरी, पुणे (दि. २९ नोव्हेंबर २०२४) तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्या क्षेत्रात अत्युच्च शिखर गाठण्यासाठी प्रामाणिकपणे सकारात्मक प्रयत्न करा. भारतीय युवकांमध्ये खूप ऊर्जा आणि क्षमता असून ते आकाशाला देखील गवसणी घालू शकतात. पुढील काळात विकसनशील भारतात युवकांना अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध होतील त्या संधीचे तुम्ही सोने करा असे शुभ आशीर्वाद राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनी पुण्यातील युवा कलाकार ईशा अगरवाल हिला दिले.
पुण्यातील युवा अभिनेत्री व औंध, बाणेर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाची साधक ईशा अगरवाल हिने प्रियांका चोप्रा ची आई मधू चोप्रा, दीपक हारके यांच्या समवेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची दिल्लीमध्ये नुकतीच भेट घेतली. यावेळी ईशा अगरवाल हिने स्वतः काढलेले “एंजल” हे ॲक्रेलिक पेंटिंग राष्ट्रपती मूर्मु यांना भेट दिले. यावेळी राष्ट्रपतींनी ईशाला शुभ आशिर्वाद आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
माध्यम प्रतिनिधीशी बोलताना ईशा अगरवाल यांनी सांगितले की, मी मूळची लातूरची असून उच्च शिक्षणासाठी मागील दहा वर्षांपासून पुण्यात राहत आहे. सिंबायोसिस महाविद्यालयातून एमबीए पुर्ण केले आहे. ॲक्टिंग, मॉडेलिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. अमेरीका, रशिया, थायलंड, युरोप मध्ये भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ब्युटी प्लेजंट मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. झोल झाल, बॅक टू स्कूल या मराठी चित्रपटासह तमिळ, तेलुगू चित्रपट काम केले आहे लवकरच मराठीतील एक वेब सिरीज लॉन्च होणार आहे. कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये पेंटिंग चा छंद जोपासला. एक वर्ष मेहनत करून एंजल नावाचे अक्रेलिक चित्र रेखाटले आणि हेच चित्र राष्ट्रपतींना भेट देण्याचे मला भाग्य लाभल्याचे ईशा अगरवाल हिने सांगितले.

पूरपरिस्थिती पुन्हा उद्भवू नये याकरिता यंत्रणांनी राहावे सतर्क: डॉ नीलम गोऱ्हे.

मुंबई, दि.२९ : पुणे शहरामध्ये नदीपात्रामध्ये बांधकाम क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक राडारोडा टाकून नदीपात्रामध्ये अतिक्रमण करत असल्याचे निदर्शनास आले आहे.या संदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी पुणे पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्राधिकरण यांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना आज दिल्या.

शहरामध्ये मागील पूर परिस्थिती दरम्यान राज्याचे मा. मुख्यमंत्री यांचे समवेत डॉ गोऱ्हे यांनी बाधित क्षेत्राची पाहणी केली होती. यामध्ये बऱ्याच नागरिकांचे स्थलांतरण करावे लागले होते. यामध्ये नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले होते. नदीपात्रातील अतिक्रमणामुळे पूरस्थिती निर्माण होऊ नये याकरिता सूचना देण्यात आल्या होत्या. त्याची गांभीर्याने दखल घेऊन सीसीटीव्ही सर्वेलंस, भरारी पथक,तपासणी नाके इत्यादी आवश्यक त्या उपाययोजना स्थानिक प्राधिकरणांनी कराव्यात अशा सूचना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

एकनाथ शिंदे अचानक गावी निघून गेले, महायुतीची मुंबईतील बैठक रद्द:CM वर रविवारी फैसला

मुंबई-
मुंबईत आज होणारी महायुतीची एक महत्त्वाची बैठक रद्द करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळगावी गेल्यामुळे अमित शहांच्या सूचनेनुसार होणारी ही बैठक रद्द करण्याची वेळ आली आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, आता 1 डिसेंबर रोजी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्यात 2 पक्ष निरिक्षकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाईल. भाजप या प्रकरणी मराठा चेहऱ्यावरही विचार करू शकते. या बैठकीनंतर महायुतीची बैठक बोलावण्यात येणार आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी खातेवाटपाची यादी अमित शहा यांना सुपूर्द केली आहे. आता शिंदे यांनी भाजपला या यादीवर निर्णय घेण्यासाठी वेळ दिला आहे. त्यामुळे ते अचानक गावी गेलेत.

तत्पूर्वी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवण्यासाठी गुरुवारी रात्री मध्यरात्रीपर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. जवळपास अडीच तास चाललेल्या या बैठकीत मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावरही चर्चा झाली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी शहांसोबत बंद दाराआड चर्चा केली.सूत्रांच्या मते, अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद किंवा केंद्रातील मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. शिंदेंनी ही ऑफर स्वीकारून केंद्रात मंत्रिपद स्वीकारले तर शिवसेनेच्या अन्य एखाद्या नेत्याला राज्याचे उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल.

‘एमआयटी एडीटी’त रक्तदानाद्वारे “नशा मुक्त अभियाना”चा संदेश

पुणे – सामाजिक जागृती आणि मानवतावादाचा अभूतपूर्व संदेश देत, येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठात “नशा मुक्त अभियान” आणि रक्तदान शिबिर यासारख्या प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची भावना रुजवण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात एमआयटी इम्पॅक्ट स्टुडंट कौन्सिल आणि इलेक्टोरल लिटरसी क्लबने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करून केली. यानंतर “से नो टू ड्रग्स” या संदेशाने सुसज्ज जनजागृती रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहाने भाग घेतला. या मोहिमेत समाजाला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

यानंतर, विद्यार्थी व्यवहार कार्यालय व आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या (एएफएमसी) संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. एनएसएस व एनसीसी सदस्यांच्या सक्रिय सहभागामुळे शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. ज्यात 101 हून अधिक लोकांनी रक्तदान करून या उपक्रमास यशस्वी केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन डाॅ.विपुल दलाल, एएफएमसी मेजर शाहीन खान भाटी, जयश्री मोदी तलसेरा, डाॅ.सुदर्शन सानप, डाॅ.सुराज भोयार, डाॅ.अतुल पाटील यांच्या उपस्थितीत झाले. तसेच, विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, डॉ. महेश चोपडे (रजिस्ट्रार) यांचे या उपक्रमासाठी मोठे सहकार्य लाभले.

कोट

रक्ताचा प्रत्येक थेंब हा जीव वाचवण्याचा आणि सशक्त समाज निर्माण करण्याचा संदेश देतो. आमचे विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी दाखवलेल्या एकात्मतेने आणि सेवाभावाने आजचा कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण झाला आहे. एमआयटी एडीटी कायमच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत असते. 

प्रा.डाॅ. मंगेश कराड, कार्यकारी अध्यक्ष तथा कुलगुरू 

एअर इंडियाचा 96-तासांचा ब्लॅक फ्रायडे सेल,

वेबसा आणि मोबा अॅपवर तिकीट दरांवर 20% पर्यंत सूट

●        सेलमधील तिकीट दर फक्त एअर इंडियाच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर उपलब्ध

●        सेल कालावधीत एअर इंडियाच्या वेबसाइट आणि अॅपवर कोणतेही सुविधा शुल्क नाही

●        विविध पेमेंट पद्धतींवर अतिरिक्त बचत

गुरुग्राम, 29 नोव्हेंबर 2024: एअर इंडियाने आज मर्यादित कालावधीसाठी ब्लॅक फ्रायडे सेलची घोषणा केली आहे. यामध्ये भारतातील फ्लाइट्ससाठी बेस फेअरवर 20% पर्यंत आणि अमेरिका, युरोप (युनायटेड किंगडमसह), ऑस्ट्रेलिया, दक्षिण-पूर्व आशिया, तसेच दक्षिण आशियाच्या फ्लाइट्ससाठी 12% पर्यंत सूट दिली जाईल. हा सेल केवळ एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाइट आणि आयओएस व अँड्रॉइड मोबाइल अॅपवर उपलब्ध आहे.

सेलअंतर्गत बुकिंग 29 नोव्हेंबर 2024 रोजी पहाटे 12:01 वाजता (IST) सुरू होतील आणि 2 डिसेंबर 2024 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत (IST) उपलब्ध असतील. प्रवास 30 जून 2025 पर्यंत करता येईल (भारत ते ऑस्ट्रेलिया आणि उत्तर अमेरिका यांमधील फ्लाइट्ससाठी प्रवास कालावधी 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत आहे).

वेबसा आणि अॅपवर बुकिंगसाठी कोणतेही सुविधा शुल्क नाही

सेलच्या कालावधीत, एअर इंडिया आपल्या अधिकृत वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर बुक केलेल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्ससाठी कोणतेही सुविधा शुल्क आकारणार नाही. यामुळे देशांतर्गत बुकिंगसाठी INR 399 आणि आंतरराष्ट्रीय बुकिंगसाठी INR 999 पर्यंतची अतिरिक्त बचत होईल.

विविध पेमेंट ऑफर्ससह अतिरिक्त बचत

एअर इंडियाने प्रवाशांसाठी अनेक पेमेंट ऑफर्सद्वारे अतिरिक्त सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यामुळे त्यांना आणखी जास्त बचत करता येईल.

Payment ModeDiscountPromo Code
UPIदेशांतर्गत फ्लाइट्सवर प्रति प्रवासी INR 400 पर्यंत बचतआंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर प्रति प्रवासी INR 1200 पर्यंत बचतUPIPROMO
Internet Bankingदेशांतर्गत फ्लाइट्सवर प्रति प्रवासी INR 400 पर्यंत बचतआंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर प्रति प्रवासी INR 1200 पर्यंत बचतNBPROMO
ICICI Bank
Credit Cards
राउंड-ट्रिप देशांतर्गत फ्लाइट्सवर INR 750 पर्यंत बचतICICI750
आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर INR 2500 पर्यंत बचतICICI2500
बिझनेस क्लास बुकिंग्सवर INR 3000 पर्यंत बचतICICI3000

एअर इंडियाच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर इतर पेमेंट पद्धतीही स्वीकारल्या जातात. जसे की, भारतातील किंवा परदेशातील प्रमुख बँकांनी जारी केलेले डेबिट व क्रेडिट कार्ड्स, रुपे कार्ड्स आणि पेमेंट वॉलेट्स. या पद्धतींवर अतिरिक्त सवलत लागू होणार नाही.

विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी संभाव्य बचत
एअर इंडियाच्या विद्यमान सवलतींसह नवीन पेमेंट ऑफर्स व सुविधा शुल्कमाफीचा लाभ घेतल्यास, विद्यार्थी बेस फेअरवर 25% पर्यंत व ज्येष्ठ नागरिक 50% पर्यंत बचत करू शकतात.

सेल बुकिंग एअर इंडियाच्या थेट चॅनेल्सवर उपलब्ध
सेलअंतर्गत बुकिंग एअर इंडियाच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर उपलब्ध आहेत. सेलमधील सीट्स मर्यादित असून, पहिल्यांदा बुक करणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल (ब्लॅकआउट तारखा लागू होतील). भाडेदर विविध शहरांतील विनिमय दर आणि करांच्या आधारे किंचित बदलू शकतात.

किरण पुरंदरे, ‘आपलं घर’ यांना प्रार्थना समाजाचे पुरस्कार जाहीर

पुणे प्रार्थना समाजाचा वार्षिकोत्सव : संस्थेचे १५५ व्या वर्षात पदार्पण

सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार

पुणे : पुणे प्रार्थना समाजाच्या स्थापनेस ४ डिसेंबर रोजी १५४ वर्षे पूर्ण होत आहेत. संस्थेच्या वार्षिकोत्सवानिमित्त विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. बुधवार, दिनांक ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता, भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष vv, पर्यावरण तज्ञ किरण पुरंदरे, आपलं घर संस्था यांना यंदाच्या वार्षिकोत्सव सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थेचे सचिव डॉ. दिलीप जोग यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पुणे प्रार्थना समाजाचे खजिनदार प्रशांत पाडवे उपस्थित होते. डेक्कन महाविद्यालयाचे माजी कुलगुरु डाॅ. गो.बं. देगलूरकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.

निसर्ग वेध संस्थेचे संस्थापक किरण पुरंदरे यांना रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पर्यावरण जतन व संवर्धन तसेच जनमानसात पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणे आणि पक्षी निरीक्षण या क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पुरंदरे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. समाजातील विविध घटकांसाठी विविध क्षेत्रात दिलेल्या प्रदीर्घ व बहुमोल योगदानाबद्दल त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

‘आपलं घर, पुणे’ या संस्थेची डेव्हिडा रॉबर्टस पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. अनाथ बालकांचे शिक्षण, कौशल्य विकसन, आरोग्य रक्षण यासाठी सुमारे २० वर्षे संस्था कार्यरत आहे. रुपये २५ हजाराचा धनादेश व मानचिन्ह असे तीनही पुरस्काराचे स्वरूप आहे.

रविवार दिनांक १ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता बुधवार पेठेतील हरिमंदिर, पुणे प्रार्थना समाजात दिपोत्सव होणार आहे. तर ७ वाजता ब्रह्मोपासना होणार आहे.

डॉ. दिलीप जोग म्हणाले, शनिवार दिनांक ७ डिसेंबर रोजी ‘युवक मेळा’ कार्यक्रमांतर्गत सायंकाळी ४.३० वाजता ‘प्रार्थना समाजाची ओळख’ या विषयावर इतिहासकार प्रा.डॉ. राजा दीक्षित यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर संगणकतज्ञ योगेंद्र धर्माधिकारी यांचे ‘आपण सारे एक’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ.महेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. रविवार दिनांक १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता स्नेहमेळा असून पुणेकरांनी संस्थेला आवर्जून भेट द्यावी.

२४ कॅरेट गोल्ड साँग ऑफ आर डी बर्मन कार्यक्रम उत्साहात

पुणे-डॉ. जोहरभाई चूनावाला आयोजित “२४ कॅरेट गोल्ड साँग ऑफ आर डी बर्मन” हा लाईव्ह संगीत मैफिलीला रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. सदरील कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे मोठ्या जल्लोषात पार पडला. पोलिओग्रस्तांच्या मदतीसाठी आयोजित असलेला हा कार्यक्रम डॉ. जोहरभाई चूनावाला आणि रोटरी क्लब पुणे कॅम्प, डिस्ट्रिक्ट ३१३१ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला होता. सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असलेले विविध नावाजलेल्या पुरस्कारांनी सन्मानित ते सन्मानित झाले आहेत.

यावेळी हिंदी चित्रपटातील अजरामर गीते सादर करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने पिया तू अब तो, जय जय शिव शंकर, पद घुंगरू पायल, आज रपट जाये तो, लगजा गले की फिर, आज पिया तुम्हे प्यार, तुमसे मिलकर अशी गीते सादर झाली.

या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शितल शहा आणि सौंदर्यवती ऐश्वर्या दवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, या प्रसंगी पुण्यातील गुणी गायकांना ‘पुणे आयडॉल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रंगीबेरंगी लाईट्सचा झगमगाट तसेच संगीतकारांचे श्रवणीय संगीत आणि गायक हिम्मतकुमार पांडिया, राजेश्वरी पवार, डॉ. संजीव तांदळे, मोनाली दुबे, आकाश सोळंकी या गायकांच्या सुमधुर आवाजात आणि संदीप पंचवटकर यांच्या माहितीपूर्ण निवेदनाने रंगलेला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

गरिबांचे पैसे खाणाऱ्या ठेकेदाराने भरपाई करावी;आमदार बापूसाहेब पठारे आक्रमक

प्रादेशिक मनोरुग्णालयातील ठेकेदारावर कडक कारवाईचे आदेश

पुणे: येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील सफाई व इतर कंत्राटी कामगारांच्या वेतानाबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. कंत्राटी कामगारांच्या दरमहा वेतनातील अर्धे वेतन ठेकेदार घेत असल्याचे समजते. बेकायदेशीरपणे होणाऱ्या या कपातीने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

यावर, वडगावशेरी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार बापूसाहेब पठारे यांनी मनोरुग्णालयातील मनोरंजन गृह या ठिकाणी कामगारांची भेट घेतली. यावेळी, अनेक महिन्यांपासून वेतन कपातीचा घडत असलेला नेमका प्रकार समजून घेत संबंधित डॉक्टरांना ठेकेदारावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. कामगारांना दरमहा १४,००० रुपये इतके वेतन मिळते, परंतु ठेकेदार केवळ ६ ते ७ हजार रुपये हातावर टेकवतो, असेही कामगार महिलांनी सांगितले.

“पूर्ण वेळ काम करूनही आणि अधिक वेळ काम करूनही ६-७ हजारच रुपये दिले जातात म्हणजे एक प्रकारचा अन्यायच आहे. ठेकेदाराने गरिबांचे इतके पैसे खाणे अजिबात योग्य नाहीये. या प्रकाराला कुठेतरी आळा बसला पाहिजे. गेली ५ वर्षाहून जास्त काळ ही गरीब, कष्टकरी कामगार मंडळी काम करत आहेत, १४ नाही तर १६ हजार वेतन मिळाले पाहिजे”, असे मत यावेळी बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केले.

लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावून आत्तापर्यंतची सर्व भरपाई करण्याचेही पठारे यांनी संबंधितांना सांगितले आहे. यावेळी उपस्थित कामगार महिलांनी आमदार बापूसाहेब पठारे यांचे आभार मानले.

खराडी-शिवणे रस्ता पूर्ण तातडीने पूर्ण करा- आमदार पठारे यांच्या महापालिका आयुक्तांना सूचना

पुणे: मागील काही वर्षांत वडगावशेरी मतदारसंघात लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. परिणामी, वाहनांची संख्या व वाहतूक कोंडी त्याच पटीने वाढलेली दिसते. पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी हा नागरिकांपुढे निर्माण झालेला मोठा प्रश्न आहे. यावरच तोडगा काढण्यासाठी खराडी-शिवणे हा नदीपात्रातील प्रलंबित रस्ता पूर्ण करण्यासाठी नवनिर्वाचित आमदार बापूसाहेब पठारे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

काल (ता. २७) पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. पृथ्वीराज बी. पी. तसेच इतर अधिकाऱ्यांची पठारे यांनी भेट घेतली. भेटीदरम्यान, खराडी-शिवणे या रस्ता प्रकल्पातील रखडलेले भुसंपादन, निधी, कामाची सद्यस्थिती यांवर विस्तृत चर्चा पार पडली. महानगरपालिका प्रशासनाकडून काही दिवसांत या प्रकल्पाची पाहणी होणार असल्याचे समजते.

“खराडी-शिवणे हा रस्ता प्राधान्याने पूर्ण करणे फार गरजेचे आहे. हा पर्यायी रस्ता वाहतूक कोंडी लक्षणीयरित्या कमी करू शकतो. पालिका प्रशासनच्या सहकार्याने हे काम लवकरात लवकर पूर्णत्वाला नेण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. मागील १० वर्षांत रस्त्याच्या कामाकडे झालेले दुर्लक्ष आणि चालढकलीमुळे नागरिकांना झालेला त्रास येणाऱ्या काळात कमी होईल. पालिका प्रशासनचाही या कामात मोठा हातभार लागणार असून तत्परतेने हे काम करण्यावर भर असणार आहे”, असा विश्वास यावेळी बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रासह कर्नाटक व मध्यप्रदेशमधील ४० हून अधिक मूर्तींची छायाचित्रे व माहिती

‘देवाचे हात’ प्रदर्शनात अद्वितीय मंदिरे व मूर्तींची छायाचित्रे

 पुणे :  रावण गर्वहरण गणपती, दशभुज लक्ष्मी गणेश, सिद्ध लक्ष्मी महागणपती अशा नानाविध नावांसह २१ मुखी ४२ हातांचा गणपती, १० तोंडे २० हातांचा रावण, १२ हातांचा कार्तिकस्वामी, १० हातांचा मारुती अशा अविस्मरणीय व अद्वितीय मूर्तींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन पुण्यात आयोजित करण्यात आले आहे.
बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित ‘देवाचे हात’ हा प्रदर्शनात महाराष्ट्रासह कर्नाटक व मध्यप्रदेशमधील ४० हून अधिक मूर्ती व मंदिरांची छायाचित्रासह माहिती देण्यात आली आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन तालयोगी पद्मश्री पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी पद्मश्री पं. विजय घाटे, आयोजक प्रभाकर कुंटे आदी उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले. 

कै. मोरेश्वर कुंटे व विजया कुंटे यांनी दुचाकी वरून प्रवास करीत छायाचित्राच्या माध्यमातून संकलित केलेल्या महाराष्ट्रातील १८ हजार मंदिरांपैकी काही अविस्मरणीय व अद्वितीय मंदिरे यानिमित्ताने पुणेकरांना पाहण्याची संधी मिळत आहे. तसेच मूतींमधील विविध वैशिष्ट्ये व माहिती देखील यानिमित्ताने मिळणार आहे.

ठाणे, कोपरागाव, नंदुरबार, वाशीम, परभणी,नगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नागपूर, बीड, धुळे, नाशिक, सोलापूर, रायगड, अमरावती, मुंबई येथील मंदिरे व मूर्तींची छायाचित्रे प्रदर्शनात आहेत. विविध ठिकाणच्या मंदिरातील ८ हातांचा कृष्ण, ७ हातांचा अग्निदेव, ४ हातांचा मारुती, ४ हातांचा विठ्ठल व २ हातांच्या गणपतीचे छायाचित्र देखील प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. याशिवाय ‘गाणारे दगड बोलणारे पाषाण’ व पाण्यावर तरंगणाऱ्या विटा देखील ठेवण्यात आल्या आहेत. बालगंधर्व रंगमंदिर येथे दि. ३० नोव्हेंबर पर्यंत सकाळी १० ते रात्री ८. ३० यावेळेत हे प्रदर्शन असून विनामूल्य प्रवेश आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन प्रभाकर कुंटे यांनी केले आहे.