Home Blog Page 526

संतोष देशमुख यांची हत्या कोणी केली?:सूत्रधार कोण हे उभ्या महाराष्ट्राला माहिती, पण सरकार शांत झोपलंय- जितेंद्र आव्हाड

मुंबई-संतोष देशमुखची हत्या कोणी केली, हत्येचा सूत्रधार कोण उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.दरम्यान जितेंद्र आव्हाड म्हणाले की, बीडमध्ये निघणाऱ्या मोर्चाला घाबरून सरकार वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांना अटक करेल. पण, अजूनही वाल्मीक कराडला खुनाचा आरोपी केलेला नाही. हे सरकार किती निर्ढावलेले आहे ते बघा.

आव्हाडांचे ट्विट काय?

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, चलो बीड ! दिनांक 28 डिसेंबर!! सकाळी 11.00 वाजता संतोष देशमुख याची निर्घृण हत्या, बीडमध्ये वाढत चाललेली खुनांची मालिका आणि त्यावर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरलेले सरकार या निषेधार्थ भव्य मोर्चा ! महाराष्ट्रातील तमाम नागरिकांनी पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून सहभागी व्हावे !! मी जाणार आहे, तुम्ही पण या. कदाचित, मोर्चाला घाबरून सरकार वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना अटक करेल. पण, अजूनही वाल्मिक कराडला खुनाचा आरोपी केलेला नाही. हे सरकार किती निर्ढावलेले आहे ते बघा. उभ्या महाराष्ट्राला माहित आहे की, संतोष देशमुखची हत्या कोणी केली, हत्येचा सूत्रधार कोण आहे. मागील दोन वर्षात झालेल्या हत्यांच्या मागे कोण आहे? असे असूनही सरकार शांत झोपलेय. सरकारला खडबडून जाग आणण्यासाठी चलो बीड !
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा खून होऊन 16 दिवस उलटले तरी मुख्य आरोपी फरार आहेत. पोलीस आणि सीआयडीच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पोलीसच आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधक करत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी पोलिसांच्या तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मद्यधुंद कारचालकाची अनेक वाहनांना धडक

पुणे : शिवाजी रोडवर एका मद्यधुंद कारचालकाने मोटारसायकलला धडक दिली. त्यानंतर त्याने पळून जाताना अनेक वाहनांना धडक दिली. शेवटी त्याला दीप बंगला चौकात लोकांनी अडवून पोलिसांच्या ताब्यात दिले. चतु:श्रृंगी पोलिसांनी त्याची मेडिकल टेस्ट करुन त्याला पुढील कारवाईसाठी खडक पोलिसांच्या ताब्यात दिले.

दयानंद केदारी असे या कारचालकाचे नाव आहे. याबाबत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी सांगितले की, शिवाजी रोडवर प्यारा हॉटेलसमोर एका कारचालकाने मोटारसायकलला धडक दिली होती. या अपघातानंतर कारचालक पळून जात असताना त्याने आणखी काही वाहनांना धडक दिली. मोटारसायकलचालकाने त्याचा पाठलाग केला. त्याला दीप बंगला चौकात अडविले. तेथे लोकांनी त्याला पकडून ठेवून चतु:श्रृंगी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याची मेडिकल टेस्ट करुन पुढील कारवाईसाठी खडक पोलिसांच्या ताब्यात दिले.

खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितले की, हा कारचालक एका हॉटेलमध्ये किचन मॅनेजर आहे. तो दारुच्या नशेत कार चालवत असताना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास त्याची मोटारसायकलला धडक बसली. त्यानंतर त्याने अनेक वाहनांना धडक दिली. परंतु, ही धडक किरकोळ असल्याने कोणीही तक्रार न करता निघून गेले. खाली पडलेल्या मोटार सायकलचालकाने या कारचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्यात पळून जाताना त्याने आणखी काही जणांना धडक दिली. दीप बंगला चौकात त्याला लोकांनी पकडले. चतु:श्रृंगी पोलिसांनी त्याला खडक पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याच्यावर कारवाई केली जात आहे

समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेता येईल अशा बंगल्यांच्या प्राप्तीसाठी मंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर दबाव

0

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचे खातेवाटप होताच मंत्र्यांना मंत्रालयातील दालने तसेच निवासासाठी बंगले, फ्लॅट्सचे वाटप केले. काही मंत्र्यांनी मलबार हिल या मुंबईतील महत्त्वाच्या भागातील आलिशान बंगले लाटण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे सुरू केले आहे.मंत्र्यांना दालन, बंगल्यांचे वाटप सामान्य प्रशासन विभागाने करून आदेश काढले असले तरी, त्या खात्याचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे दालन, बंगल्यांच्या वाटपाची अंतिम यादी फडणवीस यांच्याकडूनच मंजूर झाली. त्यामुळे मंत्री छुपेपणाने बंगले, दालनांना विरोध करत आहेत. पक्ष कार्यालयासाठी ३ आणि अतिरिक्त २ अशा एकूण ५ बंगल्यांचा वापर होत असल्याने ३१ बंगल्यांमध्ये ३३ कॅबिनेट मंत्र्यांसह ६ राज्यमंत्र्यांना निवासाची सोय करण्याची तारेवरची कसरत सामान्य प्रशासन विभागाकडून केली जात आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आधी रामटेक देण्यात आला होता. रामटेक बंगल्याचा पूर्वेतिहास लक्षात घेऊन त्यांनी मला रामटेक नको, असे बजावले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी धावपळ करत त्यांना चित्रकूट बंगला दिला. आता त्याच चित्रकूटसाठी नितेश राणे आग्रही असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलेे. हा बंगला कधीकाळी त्यांचे वडील नारायण राणे यांना मिळाला होता. त्यामुळे जुन्या आठवणींमुळे राणेंकडून हा बंगला मिळण्यासाठी जोर लावलेला दिसून येत आहे. याच दरम्यान, बावनकुळे यांनी नाकारलेला रामटेक बंगला पंकजा मुंडे यांनी घेतला. त्यांचे वडिल गोपीनाथ मुंडे १९९५ च्या युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना याच बंगल्यात राहत होते. त्यामुळे पंकजांनी रामटेक बंगला ताब्यात घेतला आहे.मलबार हिलवरील सर्वात प्रशस्त आणि सी-फेसिंग व्ह्यू असलेल्या रामटेक बंगल्यात राहणारे मंत्री नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडतात, असे म्हटले जाते. त्यामुळे या आधी काही मंत्र्यांनी वास्तुशास्त्रात दोष असल्याचे कारण दाखवून रामटेकला नाकारले होते. आताही बावनकुळेंनी पंकजा मुंडेंशी बोलून बंगल्यांची अदलाबदल केली. तसे शासन आदेशही काढण्यात आले. पंकजांनी वडिलांची आठवण म्हणून रामटेक बंगला स्वीकारला आहे.

काही माध्यमांच्या माहितीनुसार , वन मंत्री गणेश नाईक यांना ब -४ पवनगड, राज्यमंत्री योगेश कदमांना सुनीती १०, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांना सुरुची १५ तर अन्न औषदी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांना सुरुची ०९ निवासस्थान देण्यात आलेे. त्यांंनी चांगल्या बंगल्यांसाठी थेट सामान्य प्रशासन विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून दबाव टाकला आहे. मंत्र्यांसाठी सध्या एकूण ३६ बंगले आहेत. त्यापैकी ३ बंगले राष्ट्रवादी अजित पवार, एकनाथ शिंदे शिवसेना तर उद्धवसेना पक्ष कार्यालयासाठी देण्यात आले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

रामटेक बंगला लाभला तो फक्त शरद पवारांना …

शरद पवार : १९७८ मध्ये वसंतदादा मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी रामटेक बंगल्यात बसून वसंतदादांचे सरकार पाडले होते. नंतर ते मुख्यमंत्री झाले.

सन 1995 ला रामटेकमध्ये विलासराव देशमुख वास्तव्यास असतानाच त्यांचा मोठा पराभव झाला.

गोपीनाथ मुंडे : १९९५ मध्ये उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे रामटेकमध्ये राहत असताना त्यांच्यावर एका नर्तिकेशी जवळचे संबंध असल्याचा आरोप झाला. हा आरोप ४ वर्षे मुंडेंचा पिच्छा सोडू शकला नाही. अखेर १९९९ मध्ये मुंडे सत्तेबाहेर गेले.

छगन भुजबळ : १९९९ मध्ये आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री आणि त्यासोबतच गृह, पर्यटनमंत्र्यांचा भार असलेल्या छगन भुजबळांवर २००३ च्या दरम्यान तेलगी घोटाळ्याचा आरोप झाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला.

एकनाथ खडसे : २०१४ मध्ये एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले. त्यामुळे त्यांना मंत्रिपदासह रामटेक बंगलासुद्धा गमवावा लागला.

दालनांचे वाटप –
देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस. मुख्यमंत्री – मंत्रालय मुख्य इमारत, ६ वा मजला (पश्चिम बाजू)
एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, उप मुख्यमंत्री – मंत्रालय मुख्य इमारत, ६ वा मजला (उत्तर-पूर्व बाजू), ६वा मजला, पूर्व बाजू (उप मुख्यमंत्री दालन, सभागृह, कार्यालय मुख्य सचिव कार्यालयाकडे जाताना डाव्या बाजूला), ६वा मजला, मुख्य सचिव कार्यालयाकडे जाताना दरवाज्याच्या उजव्या बाजुचे दालन (अगोदरचे प्रतिक्षालय), ६वा मजला पूर्व बाजू ब्रीजवरील पॅसेज (टपाल कक्ष), ७ वा मजला, दालन क्र.७१७ मधील वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या बाजूचा जनसंपर्क कक्ष/कार्यक्रम कक्ष
अजित आशाताई अनंतराव पवार, उप मुख्यमंत्री – मंत्रालय मुख्य इमारत, ६ वा मजला (उत्तर बाजू). ७ वा मजला (पूर्व बाजू)- दालन क्र.७१७ मधील निधी कक्षाच्या दालनातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर येणारा कक्ष, दालन क्र.७२२,७२३. ५वा मजला, दालन क्र. ५०३ (उत्तर बाजू)
चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे – दालन क्र. १०१, १०१ (अ), १०१ (व), १०४ ते १०८ १ ला मजला, मंत्रालय विस्तार इमारत
गिरीश गोता दत्तात्रय महाजन – दालन क्र. ६०५, ६०७ व ६०९ ६ वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक – दालन क्र. ५३६, ५३८,५४० ५ वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील दालन क्र. ४०२, (मध्य बाजू), ४ था मजला, मंत्रालय मुख्य इमारत
दादाजी रेश्माबाई दगडू भुसे दालन क्र. ७००, ७०१ ७ वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
संजय प्रमीला दुलिचंद राठोड दालन क्र. १०२ (मध्य बाजू) १ला मजला, मंत्रालय मुख्य इमारत
धनंजय रुक्मिणी पंडितराव मुंडे दालन क्र. २०१, २०२, २०४, २१२ २ रा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
मंगलप्रभात प्रेमकंवर गुमनमल लोढा दालन क्र. २०२, (मध्य बाजू) २ रा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
उदय स्वरुपा रवींद्र सामंत दालन क्र. १०१ (दक्षिण बाजू) १ला मजला, मंत्रालय मुख्य इमारत
जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल दालन क्र. ४०७, ४था मजला, मंत्रालय विस्तार इमारत
पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे दालन क्र. ४०३ (उत्तर बाजू) ४था मजला, मंत्रालय मुख्य इमारत
अतुल लिलावती मोरेश्वर सावे दालन क्र. ५०१ (दक्षिण बाजू) ५वा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
अशोक जनाबाई रामाजी उईके दालन क्र. ५०२ (मध्य बाजू) ५वा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई दालन क्र. ३०२ (मध्य बाजू) ३रा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
आशिष मिनल बाबाजी शेलार दालन क्र. ४०१ (दक्षिण बाजू) ४था मजला, मंत्रालय मुख्य इमारत
दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे दालन क्र. ३०१ (मध्य बाजू) ३रा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
आदिती वरदा सुनिल तटकरे दालन क्र. १०३ (उत्तर बाजू) १ला मजला, मंत्रालय मुख्य इमारत
शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले दालन क्र. ६०१, ६०२, ६०४ ६वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे दालन क्र. २०३ (उत्तर बाजू) २रा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
जयकुमार कमल भगवानराव गोरे पोटमाळा (१), मंत्रालय मुख्य इमारत
नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ दालन क्र. २०१ (दक्षिण बाजू) २ रा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
संजय सुशिला वामन सावकारे दालन क्र. ३०३ (उत्तर बाजू) ३ रा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
संजय शंकुतला पांडूरंग शिरसाट दालन क्र. ७०३, ७०४, ७०४ (अ), ७१० ७ वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
भरत विठाबाई मारुती गोगावले दालन क्र. ३१४, ३१६, ३१८ ३ रा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील) दालन क्र. ३३६, ३३८ ३ रा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
नितेश निलम नारायण राणे पोटमाळा (२), मंत्रालय मुख्य इमारत
बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील – दालन क्र. ५०१, ५०२ ५वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर – दालन क्र. २२७ (मुख्य व विस्तार इमारतीसजोडणारा ब्रिज), २३१ २ रा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
राज्यमंत्री-
आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल – दालन क्र. ६२६ ते ६२८ (मुख्य व विस्तार इमारतीस जोडणारा ब्रिज), ६वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
माधुरी मीरा सतिश मिसाळ दालन क्र. १३८ व १४० १ ला मजला, मंत्रालय विस्तार इमारत
डॉ. पंकज कांचन राजेश भोयर दालन क्र. २३७ व २४१ २ रा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
मेघना दिपक साकोरे-बोडीकर – विधान भवन दालन क्र. १२५ व १३०, ए व सी, तात्पुरती व्यवस्था
इंद्रनिल अनिता मनोहर नाईक – विधान भवन दालन क्र. १२३ व १२४, तात्पुरती व्यवस्था
योगेश ज्योती रामदास कदम – विधान भवन दालन क्र. ११७ व १२२, तात्पुरती व्यवस्था

मराठी भाषा विभाग प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून काम करावे – मराठी भाषा मंत्री उदय सामंत

पुणे, दि. २४: मराठी भाषा विभागाने मराठी भाषेचा गौरव वाढेल अशा पद्धतीने काम करतानाच हा विभाग प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने काम करावे, असे निर्देश मराठी भाषा मंत्री उदय सामंत व्यक्त केली.

पिंपरी चिंचवड येथे मराठी भाषा विभाग आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागाचे सहसचिव नामदेव भोसले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मराठी भाषा विभागाचे अवर सचिव नितीन डंगारे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक तथा विश्वकोश निर्मिती मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. शामकांत देवडे, भाषा संचालक विजया डोणीकर, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील, विभागाच्या कक्ष अधिकारी ऐश्वर्या गोवेकर आदी उपस्थित होते.

मंत्री उदय सामंत म्हणाले, राज्यभाषेला अभिजात भाषेचा दर्जा असलेल्या तामिळनाडू किंवा अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रानेही आपल्या भाषेच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून अधिकाधिक निधी मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवून गतीने पाठपुरावा करावा.

ते पुढे म्हणाले, दुसरे विश्व मराठी संमेलन 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च असे तीन दिवस पुणे येथे घेण्यात येईल. त्यासाठी विभागाने तयारी करावी. तसेच दिल्ली येथे होणाऱ्या विश्व साहित्य संमेल्लनात मराठी भाषेसाठी एक तास राखून त्या माध्यमातून जागतिक स्तरावर मराठी भाषा जाईल यासाठी प्रयत्न करावेत.

राज्यस्तरावर महिला साहित्य संमेलन तसेच विभागनिहाय युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचे नियोजन करावे, असे निर्देशही मराठी भाषा मंत्री श्री. सामंत यांनी दिले. देशातील सर्व बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळांना आमंत्रित करुन मराठी भाषेसाठी काय योगदान देता येईल यासाठी त्यांच्या सूचना जाणून घ्याव्यात. सर्व महाविद्यालयात मराठी भाषा विभागाची प्रकाशने ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.

सर्व विद्यापीठातील मराठी भाषा विभागात मराठी भाषा संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी प्रस्ताव करावेत. पुस्तकांचे गाव या संकल्पनेच्या अनुषंगाने त्या त्या जिल्ह्यातील नामांकित लेखकांची नावांची यादी करावी, त्याचप्रमाणे कवितांचे गाव या संकल्पनेवरही काम करावे. शासनाच्या सर्व विभागांच्या प्रदर्शनात मराठी भाषा विभागाचे दालन असले पाहिजे, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

मराठी भाषेला अभिजात मिळाल्याचे महत्त्व तसेच त्यामुळे होणारे लाभांची माहिती युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. मराठी भाषा विभागांतर्गत असलेल्या सर्व संस्था, मंडळ, संचालनालयांना चांगली जागा मिळण्यासाठी प्रस्ताव करावेत, त्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

उद्योगांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील- उद्योगमंत्री

पुणे, दि. २४: उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. रस्ते, वाहतूक कोंडी, पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासह आवश्यक तेथे उद्योगांना जागा, पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

पिंपरी चिंचवड येथे उद्योग विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता नितीन वानखडे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता अशोक भालकर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेंद्र राजपूत, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी अर्चना पाठारे, अधीक्षक अभियंता निलेश मोढवे आदींसह उद्योग संघटना, उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत हिंजवडी, पिंपरी चिंचवड, तळवडे आदी ठिकाणच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हद्दीतील उद्योगांच्या समस्यांचा आढावा मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी घेतला. ते म्हणाले, पीएमआरडीए च्या माण – म्हाळुंगे टी. पी. स्कीमला लवकरच मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळणार असल्याने हिंजवडीसाठी पर्यायी रस्त्याच्या कामाला गती मिळणार आहे.

ते पुढे म्हणाले, वाहतूक कोंडी होणाऱ्या चौकातील टपऱ्या पोलीस विभागाच्या सहकार्याने हटवाव्यात. उद्योगांनी त्यांच्याकडील वाहने रस्त्यावर थांबणार नाहीत याची काळजी घ्यावी. एमआयडीसीने दोन्ही महानगरपालिका तसेच पीएमआरडीएच्या हद्दीतील मोकळ्या जागा शोधून तेथे उद्योगांसाठी येणाऱ्या ट्रक आदी वाहनांचे पार्किंगसाठी प्रयत्न करावेत.

राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील रस्त्यातील खड्डे, दुभाजक, पदपथ आदींची देखभाल दुरुस्ती तातडीने करण्याच्या दृष्टीने प्रस्तावाचा पाठपुरावा करावा. सुविधांसाठी उद्योगांकडून घेण्यात येणारे सेवा शुल्क उद्योगांना परवडेल अशा पद्धतीने त्यांचेशी समन्वय साधून वाढविण्यात यावे, असेही ते यावेळी म्हणाले.

तळेगाव येथील फ्लोरीकल्चर पार्कमधील उद्योगांना वाटप केलेल्या भूखंडांबाबत वस्तुस्थिती तपासून घ्यावी. तसेच वाटप केलेले विनावापर भूखंड अन्य उद्योगांना देण्याबाबत विचार करण्यात येईल. तळवडे माहिती तंत्रज्ञान पार्क येथील उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी संरक्षण विभागाशी संपर्क साधण्याचे निर्देशही त्यांनी विभागाला दिले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी, पीएमआरडीए, पोलीस विभाग, पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका, एनएचएआय, जिल्हा परिषद आदी सर्व संबंधित विभागांनी उद्योगांच्या समस्या समन्वयाने सोडवाव्यात.

राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील टप्पा क्र. 3 येथील पोलीस चौकीसाठी आवश्यक त्या जागेचा ताबा पोलीस विभागास देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी सीसीटीव्ही प्रकल्प, लक्ष्मी चौक येथे उड्डाणपूल बांधणे, घनकचरा व्यवस्थापन, पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी पावसाळी पाण्याची वाहिनी तसेच बॉक्स कल्व्हर्टचे बांधकाम आदींच्या अनुषंगाने विभागाच्यावतीने माहिती देण्यात आली.

निवडणुका जाहीर होण्याआधीच पुणे महापालिकेचे विभाजन हा प्राधान्याचा विषय-मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे-साधारण १ ते १५ जानेवारीपर्यंत सरकार नियमित कामाला लागलेले असेल. त्यांच्यापुढचा प्राधान्याचा विषय पुणे महापालिकेचे विभाजन हाच असेल. त्यावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल, असे सूतोवाच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.मागील अडीच वर्षे रखडलेल्या महापालिका निवडणुका जाहीर होण्याआधीच शक्यतो हा निर्णय होईल, असेही ते म्हणाले.

श्रमिक पत्रकार संघाने पुणे शहरातील नवनिर्वाचित आमदारांचे पत्रकारांबरोबर वार्तालापाचे आयोजन मंगळवारी सकाळी पत्रकार संघात केले होते. पाटील यांच्यासमवेत राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, चेतन तुपे, बापू पठारे, सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते. हेमंत रासणे व सुनील कांबळे या आमदारांनी कामामुळे शहराबाहेर असल्याने उपस्थित राहता येणार नाही, असे कळविले होते. संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी आमदारांचे स्वागत केले. पुण्यातील वाहतूक, पाणी, गुन्हेगारी, नव्याने सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे होणाऱ्या अडचणी, अशा अनेकविध समस्यांना स्पर्श करत आमदारांनी त्यावर काय कामकाज सुरू आहे याची माहितीही दिली. मेट्रोचे जाळे वाढविण्यात भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, महापालिकेची निवडणूकच नसल्याने नगरसेवक व नागरिक यांच्यात संवाद राहिला नाही. आमदारांची नसलेली कामे आमदारांना करावी लागत आहेत. मात्र, आता सरकार लवकरच कामकाजाला लागेल. त्यानंतर काही विषय प्राधान्याने घेण्यात येणार आहेत. त्यात हाही विषय आहे. मेट्रो, नदी सुधार, ड्रेनेजच्या पाण्याचे शुद्धीकरण प्रकल्प, असे विषय आमदारांशी संबंधित असतात. पुण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे. मुळशी धरणाबाबत सरकार व टाटा कंपनी यांच्यात बोलणी सुरू आहे. आता धरणातून वीज तयार होत नाही. त्यामुळे ‘धरणच ताब्यात द्या’ अशी आमची मागणी आहे. तसे झाले तर पुण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यातील वाढती लोकसंख्या विचारात घेतली तरीही सुटू शकेल.

महापालिकेचे विभाजन होणे गरजेचे आहे. मात्र, त्यात राजकीय सामाजिक, भौगोलिक असे अनेक विषय गुंतलेले आहेत. त्यामुळे यावर व्यापक चर्चा अपेक्षित आहे. नावांचा प्रश्न अशा वेळी अतिशय महत्त्वाचा ठरतो. त्यातही पुणे नावाला इतिहास आहे. त्यामुळे पुणे नावाचा समावेश असलाच पाहिजे, याबाबत सगळेच आग्रही असणार. अशा अनेक गोष्टींचा साधकबाधक चर्चा झाल्यानंतरच महापालिकेच्या विभाजनाचा निर्णय होईल, असे पाटील यांनी सांगितले.

पुणे शहराच्या समस्या हा विषय असला तरी राजकीय प्रश्न येणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे चंद्रकांत पाटील यांना पुण्याचा दादा कोण? असा प्रश्न विचारला असता, त्यांनी हा जटिल प्रश्न आहे, असे उत्तर दिले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डोके सुपीक आहे. २३७ इतक्या मोठ्या संख्येने प्रथमच आमदार आहेत, त्यांनी बरोबर मंत्रिमंडळ तयार केले. आता हाही प्रश्न ते समाधानकारक पद्धतीने निकाली काढतील, असे पाटील म्हणाले.

वाहतुकीच्या कोंडीने संपूर्ण शहर त्रस्त आहे. त्यासाठीच मी येत्या ५ वर्षांत स्वारगेट ते खडकवासला या मेट्रोसाठी प्रयत्नशील आहे. नागरिक किंवा पत्रकार तक्रारी सांगतात, काही विषय समोर आणतात, त्याचा कधी राग येत नाही. कामाला संधी यादृष्टीने आम्ही त्याकडे पाहात असतो. त्या कामांचा पाठपुरावा केली की कामे मार्गी लागतात, असा माझा अनुभव आहे. -भीमराव तापकीर, आमदार, खडकवासला

मतदारसंघातील बसस्थानकाचा प्रश्न कालच आम्ही सोडवला आहे. तसेच वाहतूक प्रश्न गंभीर होत आहे. त्यासाठी नगरविकास मंत्री आता पुण्याचे आहेत, त्यांच्याशी बोलून हा प्रश्न सोडवू. रिंगरोड होणार आहे, तो लवकर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मेट्रोमुळे देखील वाहतुकीवरील बराचसा ताण कमी होऊ लागला आहे.- आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुण्याचा विस्तार प्रचंड होत आहे. तो कुठेतरी मर्यादित करायला हवा. पुणे वाढत असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. रिंगरोडच्या बाहेर पुण्याची हद्द वाढणार नाही, असे काही धोरण करायला हवे. आपण ठोस भूमिका घेतली नाही तर पुणे वाढतच राहील. बिल्डर बांधकामे करतात, पण पाण्याची समस्या मात्र पाहिली जात नाही. वाहतूक हा एक गहन प्रश्न आहे. त्यावर काम करणे अपेक्षित आहे. रिंगरोडला जोडणारे रस्ते बनवणे गरजेचे आहे. – आमदार बापू पठारे


पुण्याचा झपाट्याने होणारा विकास आपण पाहतोय. त्यासाठी आपण भविष्यासाठी योग्य नियोजन करत आहोत. आपल्याकडे त्याचा आराखडा आहे. मेट्रो केली आहे, रिंगरोड करत आहोत. त्यामुळे बरेचसे प्रश्न सुटणार आहेत. पुण्याचा विकास २०५० पर्यंत नियोजनबद्ध झालेला असेल. समाविष्ट गावांचाही प्रश्न असून, तेथेही योग्य पायाभूत सुविधा उभ्या करणार आहोत. – नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ

वाहतुकीच्या समस्येवर सार्वजनिक प्रवासी वाहतुकीसाठी मेट्रोचे जाळे वाढविणे हा उपाय आहे. आमचे त्याकडे लक्ष आहे. पाणी समस्येवर आधी महापालिकेने वितरणातील गळती थांबविणे आहे. वाढती लोकसंख्या हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांच्यासाठी नागरी सुविधा तयार करणे, त्यांची कार्यक्षमता राखणे, या दृष्टीने काम होणे गरजेचे आहे. ते व्हावे यासाठी आमचा प्रयत्न आहे. – चेतन तुपे, आमदार, हडपसर

१५ वर्षे झाली ..३ इडियट्सची जादू कायमच …

  ३ इडियट्स ह्या चित्रपटात रॅंचो, फरहान आणि राजू या इंजिनियरिंगच्या तीन विद्यार्थ्यांची गोष्ट होती. इंजिनियरिंगचे शिक्षण घेत असताना शैक्षणिक उत्कृष्टता साध्य करण्यासाठी त्यांच्या मनावर सतत असलेला तणाव, समाजाच्या, कुटुंबाच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा यांचे अत्यंत प्रभावी चित्रण या चित्रपटात बघायला मिळाले होते. २५ डिसेंबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होऊन १५ वर्षे पूर्ण होत आहेत. हा सोहळा साजरा करण्यासाठी सोनी मॅक्सवर हा चित्रपट आणि त्यातील कलाकारांचे शॉट प्रसारित करण्यात येणार आहेत. चला, या चित्रपटाच्या आठवणींची एक सैर करू या आणि हा चित्रपट तयार होत असतानाच्या गंमतीजमती पुन्हा शेअर करू या.

पात्रांसाठी योग्य अभिनेत्यांची निवड!

राजकुमार हिरानी यांनी जेव्हा आमीर खानला पाहिले, तेव्हा ‘गजनी’ चित्रपटातला तो पिळदार शरीराचा आमीर होता. त्यांच्या कल्पनेत जो एक इडियट होता, तसा अमीर दिसू शकेल का याबाबत हिरानी साशंक होते. ते म्हणतात, “मला एक बारकासा, मोठ्या डोळ्यांचा मुलगा हवा होता, जो थोडा खुळचट असेल आणि स्वतःच्या स्वतंत्र विचाराने वागणारा असेल!” हिरानी यांना विश्वास होता की, आमीर या पात्रासाठी अनुरूप ते बदल स्वतःच्या शरीरयष्टीत करण्यास समर्थ आहे. या चित्रपटात आमीरने रॅंचोची भूमिका केली होती, ज्याचे वय आमीरच्या वयाच्या अर्ध्याहूनही कमी होते. त्यामुळे त्याला तरुण दाखवणे हे सगळ्यात मोठे आव्हान होते. आमीरने जिममध्ये जाणे थांबवले आणि असा आहार तो घेऊ लागला, ज्याच्यामुळे मसल्स कमी होतील.

ती व्यक्तिरेखा अस्सल दिसावी यासाठी आमीरला त्यावर खूप काम करावे लागले. तो म्हणतो, “मला वाटले की, त्याचे कपडे विकत घेण्याऐवजी ते कुणाकडून तरी घ्यावेत. जुने कपडे सहजपणे पोक्त दिसतात.” तो पुढे म्हणतो, “रॅंचोच्या भूमिकेत मी जे कपडे घातले ते मोठ्या मापाचे होते, आणि त्याने माझे काम साधले. माझ्या जीन्स ३-४ साईझ मोठ्या होत्या. टी-शर्ट देखील अगदी ढगळ होते. मी विशिष्ट प्रकारे उभे राहण्याची लकब घेतली होती, ज्यामुळे मी थोडा लहान दिसायचो. मी लहान आणि पोरगेलासा दिसू लागलो. त्यामुळे शेवटी योग्य त्या वयाचा मी दिसू शकलो.”

तोहफा कबूल करो!

आर. माधवन म्हणजे फरहानने सांगितले की, पहिल्या दिवसाचे शूटिंग बंगळूरात होते आणि तेही मुलींच्या वसती गृहात. जे दृश्य शूट व्हायचे होते, ते म्हणजे, तो प्रसिद्ध संवाद ‘जहापनाह तुस्सी ग्रेट हो, तोहफा कबूल करो!” या दृश्यात अभिनेत्यांना आपल्या पॅन्ट खाली उतरवायच्या होत्या आणि सगळ्यांसमोर अंडरवेअरमध्ये यायचे होते! माधवन म्हणतो, “म्हणजे, तुम्ही हीरोसारखे वावरता, सगळ्यांना स्वाक्षरी देता आणि दुसऱ्याच क्षणी ते सगळे काही अगदी पार बदलून जाते. जेव्हा शॉट तयार झाला, तेव्हा आम्ही सगळे पॅन्ट काढण्यास कसेबसे तयार होतो! हा सीन बघायला खूप रोचक असला तरी आम्ही मात्र तो करताना खूप अवघडलो होतो.”

खोडकर आमीर खान

करीना कपूरला जेव्हा विचारण्यात आले की तिला स्कूटर चालवता येते का, तेव्हा ती उडालीच! ती तर आमीर खानच्या मागे स्कूटरवर बसायला देखील घाबरत होती. त्या दृश्याची आठवण काढत करीना म्हणते, “माझ्या बाबतीत दोनदा असे झाले आहे की, मी एका अभिनेत्याच्या मागे बाइकवर बसले आणि पडले! त्यामुळे यावेळी हॅट्रिक होणार अशीच भीती माझ्या मनात होती.” बेबोची ही भीती मुख्यतः तिच्या भूतकाळातल्या अनुभवांमुळे असली, तरी आमीरनेही त्यात भर घातली होती. आमीर खान म्हणतो, “करीनाला असे सांगण्यात आले होते की, मला स्कूटर चालवता येत नाही. त्यामुळे जेव्हा ती माझ्या मागे बसायची, तेव्हा तिला वाटायचे की ही आपली शेवटची राइड असणार” आमीर खान हसत हसत पुढे सांगतो, “मी तिला सांगितले की मला स्कूटर चालवता येत नाही. जेव्हा जेव्हा मी स्कूटर चालवतो, तेव्हा पडतोच! त्यामुळे माझ्यामागे स्कूटरवर बसायला ती भलतीच घाबरायची!”

हा चित्रपट पुन्हा एकदा हसू, आसू आणि एक सुंदर, मौलिक संदेश, मैत्रीचे नाते, आपल्या पॅशनचा पाठपुरावा करण्याचा आग्रह घेऊन छोट्या पडद्यावर येत आहे.

 इडियट्सची जादू अनुभवण्यासाठी आणि या कालजयी मास्टरपीसच्या १५ वर्षांचा प्रवास साजरा करण्यासाठी बघासोनी मॅक्स२५ डिसेंबर रोजी

कष्टांची जाणीव मुलांना करून देणे गरजेचे-अमनोरा येस फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे 

अमनोरा येस फाउंडेशन आणि अमनोरा सिटीझन सोशल वाॅरियर्स अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट विद्या’ ची वर्षापूर्ती
पुणे : आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी महिला इतरांच्या घरातील धुणी भांडी करणे, त्यांच्या मुलांना सांभाळणे हे मोठे आव्हानात्मक, कष्टाचे काम करतात. तुम्ही करत असलेल्या या कष्टाचे चीज करायचे असेल तर तुमच्या मुलांना तुम्ही करत असलेल्या काबाडकष्टाची जाणीव करून देणे आवश्यक आहे, त्याशिवाय त्यांचे उज्वल भविष्य घडणार नाही, असे मत अमनोरा येस फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी केले.

अमनोरा टाउनशिप मध्ये घरकाम करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी अमनोरा येस फाऊंडेशनच्या वतीने आणि अमनोरा सिटीझन सोशल वाॅरियर्स अंतर्गत  ‘प्रोजेक्ट विद्या’ हा उपक्रम राबविण्यात येतो, या प्रोजेक्टच्या वर्षपूर्ती निमित्त त्या मुलांसाठी आयोजित विविध गुणदर्शन कार्यक्रमात देशपांडे बोलत होते. यावेळी अमनोरा येस फाऊंडेशनचे विवेक कुलकर्णी, पदाधिकारी, अमनोरा मधील रहिवासी उपस्थित होते. 

अनिरुद्ध देशपांडे म्हणाले, अमनोरा टाऊनशिप मध्ये घरकाम करणाऱ्या महिलांना अवंतिका असे संबोधले जाते. प्रोजेक्ट विद्या अंतर्गत फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्पोकन इंग्लिश, पुणे दर्शन सह अन्य उपक्रमात मुलांचा सहभाग आमचा उत्साह वाढवणारा आहे. आज या विशेष कार्यक्रमात ४० हून अधिक मुलं – मुली आपली कला सादर करत आहेत आमची इच्छा आहे की पुढच्या वर्षी ही संख्या शंभर पर्यंत पोहोचली पाहिजे. आम्ही फाउंडेशनच्या वतीने मुलांना मदत म्हणून नव्हे  राष्ट्रासाठी गुंतवणूक या भावनेतून आर्थिक, शैक्षणिक मदत करतो असेही देशपांडे यांनी नमूद केले.

या महिलांच्या मदतीने टाउनशिप मध्ये पाणी बचत मोहीम राबविण्यात येत असून त्याचा सकारात्मक परिणाम बघायला मिळत असल्याचे अनिरुद्ध देशपांडे यांनी सांगितले. या पाणी बचतीच्या माध्यमातून आमच्या अवंतिका लाखों कार्बन फुटप्रिंट कमी करत असल्याचे नमूद करताना प्रती व्यक्ती किमान २५ लीटर पाणी वाचवण्यात यश येत असल्याचे सांगितले. या महिला करत असलेल्या जन जागृतीमुळे आम्ही टँकर मागवत नाही. पाणी बचती मुळे वीजवापर कमी झाला आहे. यामुळे पाणी बचत हा उपक्रम संपूर्ण पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
अमनोरा सिटीजन सोशल वॉरियर्स ही संस्था अमनोरा मधील नागरिकांनी स्थापन केली आहे. या मार्फत अवंतिकांच्या मुलांना इंग्रजी, गणित आणि विज्ञान असे विषय त्याच बरोबर विविध कलागुणांना वाव देण्यासाठी उपक्रम राबविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगला बदल दिसून येत आहे. वर्षपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात मुलांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच ग्लोबल वॉर्मिंग, पाणीबचत, वाहतूक शिस्त, सोशल मीडियाचा अतिवापर, राष्ट्रप्रेम या विषयावर मुलांनी सादरीकरण केले.

प्रोजेक्ट विद्या या उपक्रमामध्ये शशी अग्रवाल, सपना अग्रवाल, स्वाती प्रदीप, हर्षा गाजरे, कनिका शर्मा, स्वाती पेंडकर, योगिनी पटवारे, कल्पना सैंदाणे या नागरिकांनी वेगवेगळ्या विषयांचे वर्ग घेतले.

आमदार बापूसाहेब पठारे यांची पालिका अधिकाऱ्यांसमवेत रस्ते पाहणी

खराडीत आयटी पार्क असल्यामुळे दररोज ३ ते ४ लाख नागरिक कामासाठी येतात. सध्या अस्तित्वात असलेले रस्ते पुरेसे नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. भविष्यात होणाऱ्या आयटी पार्क कंपन्या व कंपन्यांमध्ये येणाऱ्या नोकरदारांसाठी सोयीस्कर असणारे प्रामुख्याने हे चार रस्ते पूर्ण केल्यानंतर खराडीतील तसेच पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल.सकाळी झालेल्या पाहणी नंतर पठारे यांनी महानगरपालिकेमध्ये जाऊन पथविभाग उपायुक्त अनिरूद्ध पावस्कर यांचीही भेट घेतली. भेटीदरम्यान, रस्त्यांच्या पाहणीसंदर्भातील मुद्दे स्पष्ट करत पुढील कार्यवाही सुरू करण्यासंबंधी पावले उचलावीत, असे सांगितले.

वडगावशेरी: “आमच्या मतदारसंघाचा रस्ते हाही एक मूलभूत प्रश्न आहे. अनेक वर्षांपासून त्याकडे दुर्लक्ष झाले असून, रस्त्यांची वाताहात झाली आहे. रस्ते चांगले असतील तरच विकासाचा मार्ग मोकळा होईल, अशी माझी धारणा आहे. पाहणीदरम्यान, अधिकारी वर्गाला रस्त्यांच्या विविध कामांसंबंधी सूचना दिल्या आहेत. येणाऱ्या काळात मतदारसंघातील रस्त्यांचा प्रश्न आणि सोबतच वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला असेल, असे यावेळी आमदार बापूसाहेब पठारे यांनी सांगितले.

काल (ता. २४) सकाळच्या वेळी, पुणे महानगरपालिकेचे अधीक्षक अभियंता दांगड साहेब, कार्यकारी अभियंता धारव साहेब तसेच पथविभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांसमवेत पठारे यांनी रस्त्यांची पाहणी केली. यात प्रामुख्याने, यात सातववस्ती येथील निर्मला कॉन्व्हेंट शाळेजवळील अर्धवट रस्ता, चौधरी वस्ती येथील रस्ता, चौधरी वस्तीच्या पाठीमागील गोडाऊन येथील रस्ता व पूल, फॉरेस्ट काउंटी गेट क्र. ०३ येथील रस्ता, फॉरेस्ट काउंटी गेट क्र. ०८ येथील फुटपाथ, सर्व्हे क्र. ५६ नवीन भाजी मार्केट येथील रस्ता इ. रस्त्यांचा समावेश होता.

पाहणीदरम्यान, आमदार बापूसाहेब पठारे यांनी सदर रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंबंधी सूचना केल्या. पालिका अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यातील रस्ते एक ते दीड महिन्यात चालू करतील, असे आश्वासन यावेळी कॉन्ट्रॅक्टर व अधिकाऱ्यांनी दिले. तसे न झाल्यास, कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई केली जाई, असे अधीक्षक अभियंता यांनी यावेळी स्पष्ट केले.


अध्यात्मिक आणि भौतिक जीवनाचा समतोल जीवन सुसह्य करेल-जया किशोरी

पुणे: सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने प्रसिद्ध अध्यात्मिक आणि प्रेरक वक्त्या जया किशोरीजी यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ प्रदान करण्यात आला. अध्यात्म आणि प्रेरणादायी वक्तृत्व क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुण्यात आयोजित सोहळ्यात ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा यांच्या हस्ते जया किशोरी यांना सन्मानचिन्ह, सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थीर्नींनी बनविलेला विशेष स्कार्फ, सुवर्णपदक व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
पुरस्काराचा नम्रपणे स्वीकार करत जया किशोरी म्हणाल्या, “पंचवीस वर्षांचा प्रेरणादायी प्रवास असलेल्या ‘सूर्यदत्त’ संस्थेकडून मिळालेला हा पुरस्कार अभिमानास्पद आहे. विविध ज्ञानशाखांसोबत विद्यार्थ्यांना येथे सर्वांगीण शिक्षण दिले जातेय, हे महत्वाचे आहे. आज युवकांना आध्यत्मिकतेची सर्वात जास्त गरज आहे. भौतिकवादी जगण्याला अध्यात्मिकतेची जोड दिली, तर जीवन अधिक सुसह्य होईल. शिकत राहणे हा परिवर्तनाचा नियम आहे आणि हे मूल्य सूर्यदत्त संस्थेत रुजवले जाते, याचा आनंद वाटतो.”
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “जया किशोरी या एक भारतीय आध्यात्मिक वक्त्या, गायिका, प्रेरक वक्त्या, जीवन प्रशिक्षक आणि सामाजिक सुधारणावादी नेत्या आहेत. त्यांच्या आध्यात्मिक प्रवचनांसाठी आणि भावपूर्ण भजनांसाठी लाखो भक्तगण आसुसलेले असतात. ‘किशोरीजी’ आणि ‘आधुनिक युगातील मीरा’ म्हणून त्यांना ओळखले जाते. अशा या महान व्यक्तीचा सन्मान करताना सूर्यदत्त परिवाराला आनंद होत आहे. त्यांच्या आदर्श कार्यातून ‘सूर्यदत्त’मधील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल.”
आपल्या उत्कृष्ट कार्यातून समाजात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. उत्कृष्टता हे ‘सूर्यदत्त’चे वैशिष्ट्य असून, गेल्या अडीच दशकांच्या प्रवासात ‘सूर्यदत्त’ने २००३ पासून हा पुरस्कार सुरु केला आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, औद्योगिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात परिवर्तनवादी अमूल्य योगदाना देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना आजवर सन्मानित करून विद्यार्थी, पालक आणि समाजाला प्रेरणा देण्याचा प्रयत्न यामागे आहे.
पद्मभूषण पंडित भीमसेन जोशी, पद्मविभूषण शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंजन, योगाचार्य पद्मभूषण डॉ. बीकेएस अय्यंगार, प्रख्यात अभिनेते पद्मभूषण अनुपम खेर, पद्मभूषण शिव नाडर, माजी पोलीस अधिकारी किरण बेदी, पद्मविभूषण मोहन धारिया, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मभूषण डॉ. विजय भटकर, आध्यात्मिक आणि प्रेरक वक्ते गौर गोपाल दास यांच्यासह अनेक मान्यवरांना या पुरस्काराने गौरवान्वित केले आहे, असे स्नेहल नवलखा यांनी नमूद केले.

लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु

0

मुंबई- काही दिवसांपूर्वीच अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लवकरच वर्ग करण्यात येणार, अशी माहिती दिली होती. त्यानंतर योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, या चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहेत. लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कमेत वाढ करुन 2100 रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुतीच्या वतीने देण्यात आले होते. त्यामुळे आता सहावा हप्ता 2100 रुपये येणार की 1500 रुपये येणार, अशी चर्चा महिलांमध्ये सुरू होती. दरम्यान, आता सहावा हप्ता हा 1500 रुपये प्रमाणेच येणार असल्याचे सांगितले जात आहे.

या महिन्यात दोन टप्प्यात महिलांना पैसे मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 35 लाख महिलांच्या खात्यात 1500 रुपयांप्रमाणे पैसे जमा होणार आहेत. तर निवडणुकीआधी आलेल्या 25 लाख नवीन अर्जाची स्क्रुटिनी सुरू आहे, ती पूर्ण झाल्यानंतर या महिलांच्या खात्यात हप्ता जमा होणार असल्याची माहिती आहे. डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. योजनेचा हप्ता 2100 रुपये करण्याबाबत अर्थसंकल्पात निर्णय घेतला जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर सांगितले होते. त्यानुसार राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महिलांना लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयांचा मिळू शकेल, अशी स्थिती आहे. दरम्यान, राज्याचा अर्थसंकल्प हा 3 मार्च 2025 रोजी सादर करणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपयांच्या हप्त्यासाठी मार्च महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

दरम्यान, लाडक्या बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्या जमा करण्यात आली आहे. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणे 7500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीमुळे नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोबर महिन्यातच महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात येणार आहे.

राजगडावर ३५८ वा ‘आग्य्राहून सुटका स्मृतिदिन’ सोहळा साजरा

 श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ पुणे, आणि पुणे महानगरपालिका यांच्या तर्फे आयोजन ; किल्ले राजगड येथे ४४ वा दुर्ग राजगड उत्सव
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज की जय…च्या जयघोषात किल्ले राजगडावर ३५८ वा ‘आग्य्राहून सुटका स्मृतिदिन’ सोहळा थाटात साजरा झाला. श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ पुणे, आणि पुणे महानगरपालिका यांच्या तर्फे किल्ले राजगड येथे ४४ वा दुर्ग राजगड उत्सव आयोजित करण्यात आला होता. 
किल्ले राजगड आणि पाल खु. येथील खंडोबाचा माळ येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. विविध शेत्रातील मान्यवर , वक्ते , इतिहासकार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. खंडोबाचा माळ येथे शिव प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मर्दानी खेळ व ढोल ताश्यांच्या गजरात कार्यक्रमास सुरवात झाली. शिव व्याख्याते प्रा.विनायक खोत यांचे शिव व्याख्यान देखील झाले. 
राजगडावरील पद्मावती मंदिरात जागरण-गोंधळ घालून गड जागरणाचा कार्यक्रम करण्यात आला. किल्ले राजगडावर पद्मावती देवीचे पूजन करून वंश परंपरेने किल्लेदार सुर्यकांत भोसले व १३ मी.४८ सेकंद वेळेत किल्ल्यावर येणारे सुनील जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ढोल ताश्याच्या गजरात पालखीचे आगमन झाले. पाली दरवाजा येथे निवेदीता पायगुडे, शितल पासलकर, दिपाली कारळे, निलम कुंजीर, पुनम पायगुडे, वैशाली कुऱ्हाडे, जया राऊत आदी महिलांनी पालखीचे पूजन केले. 


पारंपारिक पोशाखातील मावळे व महिला सहभागी झाले होते. जय जिजाऊ जय शिवरायांच्या घोषणा देत पालखी सोहळा सदरेवर आला. तेथे पालखी थोडा वेळ आसनस्थ झाली. व या नंतर पद्मावती मातेच्या मंदिरात देवीला साडी चोळी देऊन पूजन करण्यात आले. या प्रसंगी पुणे मनपा उपायुक्त माधव जगताप, रणजीत पठारे, नितीन चव्हाण, राहुल पायगुडे, संजय दापोडीकर, सुनील वालागुडे, अजित काळे, अनिरुद्ध हळंदे, सतीश सोरटे, नरेंद्र मुजुमदार,पांडुरंग दर्डीगे , शिवाजी पोळेकर, नाना शिर्के, करण भोसले, योगेश दर्डीगे , प्रकाश भोसले,अमित दारवटकर, समीर रुपदे, योगेंद्र भालेराव, मंगेश राव, अमोल व्यवहारे, अभिजित पायगुडे, पांडुरंग मोरे, वीरेंद्र ठाकूर, शशी रसाळ, निलेश बारावकर, प्रशांत पायगुडे, निखिलेश ठाकूर, विवेक नाकोड, गुरुदत्त भागवत, संजय शेंडकर, सुनील तोंडे, महेश कदम, राम कदम, गोविंद राऊत  आदी सहभागी झाले होते.  

पाल खु. राजगड परिसर सर्व ग्रामपंचायत व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन संचालक पुरातत्व व वस्तूसंग्रहालये संचालनालय, महाराष्ट्र राज्य व सहाय्यक संचालक (पुरातत्व) पुणे विभाग यांचे विशेष सहकार्यातून हा उत्सव पार पडला.   

लहान वयातील संस्कारांतून मुलांचे उज्ज्वल भविष्य घडते- लेखक आनंद माडगूळकर

ग्रंथ पारायण दिंडी, पुणेच्या वतीने तेरा लक्ष रामरक्षा स्तोत्र पठण संकल्प पूर्ती कृतज्ञता सोहळा
पुणे : लहानपणी लागलेल्या चांगल्या सवयी नेटाने पुढे चालवल्या तर त्याचे परिणाम भविष्यात नक्कीच फायदेशीर ठरतात. मुलांमध्ये चांगल्या सवयी रुजवण्यासाठी पालकांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. शाळेत शिकवलेल्या गोष्टींचा प्रभाव मोठे झाल्यानंतरही जाणवतो. लहान वयात झालेल्या संस्कारांवर मुलांचे भविष्य अवलंबून असते, असे मत ज्येष्ठ लेखक आनंद माडगूळकर यांनी व्यक्त केले.

ग्रंथ पारायण दिंडी, पुणेच्या वतीने तेरा लक्ष रामरक्षा स्तोत्र पठण संकल्प पूर्ती कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी साताऱ्यातील समर्थ सेवा सज्जनगडचे कार्यवाह योगेश बुवा रामदासी, जनता सहकारी बँकेचे संचालक अभय माटे, ग्रंथ पारायण दिंडीचे वीरेंद्र कुंटे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात आशिष केसकर यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरात झालेल्या गीतरामायणाच्या सादरीकरणाचा अनुभव कथन केला.

योगेशबुवा रामदासी म्हणाले, कोणतेही कार्य आपण स्वतः करत नाही; भगवंत ते आपल्याकडून करवून घेतो. इतक्या लहान वयात अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या चरणी गीतरामायणाचे सादरीकरण करण्याची संधी या चिमुकल्यांना परमेश्वराने दिली आहे. आज अनेक मुलांना रामरक्षा स्तोत्र काय आहे हेही माहिती नाही. काळाच्या ओघात हे मागे पडत आहे. मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल.

वीरेंद्र कुंटे यांनी सांगितले की, पुण्यातील बालचमूंनी भव्य रामरक्षा पठण व गीतरामायणाचे सादरीकरण अयोध्या राम मंदिरात केले. तब्बल तेरा लक्ष रामरक्षा स्तोत्र पठणाचा संकल्प पूर्ण झाला. या संकल्प पूर्तीनंतर जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान मिळाले.

हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 अंतर्गत 

दोन सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पांचे लोकार्पण

मुंबई, दिनांक २४  डिसेंबर २०२४: राज्यभरात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या अंतर्गत ठिकठिकाणी १६ हजार मेगावॅट क्षमतेचे वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील उंबर्डा आणि धाराशिव जिल्ह्यातील नारंगवाडी येथील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. 

यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर – सिंह, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी आणि महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीज उपलब्ध होईल. राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी 16 हजार मेगावॅट इतकी वीज देतो. पंपांना वीज पुरवठा करणारे सर्व कृषी फीडर सौरऊर्जेवर चालविण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० अंतर्गत काम सुरू केले आहे. टप्प्याटप्प्याने हे सर्व फिडर सौर उर्जेवर चालविण्यात येतील.

या कार्यक्रमाला उंबर्डा आणि नारंगवाडी गावातील शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) तालुक्यातील उंबर्डा येतील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची क्षमता ४ मेगावॅट आहे. या प्रकल्पामुळे १७११ शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार आहे. धाराशीव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथील प्रकल्प २ मेगावॅट क्षमतेचा आहे. एकूण ८४५ शेतकरी या प्रकल्पाचे लाभार्थी आहेत. वाशिम आणि धाराशीव जिल्ह्यातील एक – एक सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प यापूर्वीच सुरू झाले आहेत.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेतील पहिल्या पाच प्रकल्पांचे लोकार्पण मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑक्टोबर महिन्यात करण्यात आले होते. या योजनेअंतर्गत राज्यात नोव्हेंबर अखेर १५,७०८ मेगावॅट क्षमतेचे सौर वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यापैकी ६६९ मेगावॅट क्षमता कार्यान्वित झाली आहे. त्यामधून १,३०,४८६ शेतकऱ्यांना दिवसा आठ तास थ्री फेज वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

राज्यात शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा आणि रात्री अशा दोन पाळ्यांमध्ये वीज पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांना केवळ दिवसा भरवशाचा वीज पुरवठा करावा अशी अनेक दशकांची मागणी आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही योजना मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एप्रिल २०२३ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेत राज्यभरात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारून विकेंद्रीत स्वरुपात कृषी फीडर्सना विजेचा पुरवठा करण्यात येईल. त्यातून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होईल तसेच या योजनेत किफायतशीर दरात वीज मिळाल्यामुळे राज्य सरकारचे अनुदान आणि उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी होईल.

ओढे-नाले व कालव्यांवरील पुलांचे होणार ‘स्ट्रक्‍चरल ऑडीट’

पुणे : शहराच्या विविध भागातील ओढे-नाले, कालव्यांवर महापालिकेने पुल बांधलेले आहेत. मात्र पुलांची संख्या किती आहे, याची कोणतीही माहिती अद्याप महापालिकेकडे नाही. त्यामुळे आता यापुलांची माहिती घेतली जाणार असून ‘स्ट्रक्चरल ऑडीट’ केले जाणार आहे.महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख म्हणाले, “ओढे-नाले व कालव्यांवरील पुल सध्या सुरु आहेत. मात्र, या पुलांचे नेमकी काय स्थिती आहे, हे जाणुन घेणे गरजेचे आहे. त्यातुन पुलाची डागडुजी करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात होणारे धोके टाळणे शक्‍य होईल. त्यादृष्टीने या पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडीट करण्याचे काम केले जाणार आहे.’

शहरात आंबील ओढा, भैरोबा नाल्यासह अनेक मोठे नाले-ओढे आहेत. यावर पुल बांधण्यात आले आहेत. मात्र त्याकडे प्रशासनाचे सध्या तरी कोणतेही लक्ष नाही. ओढ्यांवर स्लॅब टाकून पूल तयार करण्यात आलेले आहेत. हे पुल आता जुने आणि धोकादायक झाले आहेत. शहरात वाहतूक कोंडीची समस्येने नागरिक त्रासले आहेत. त्यामुळे गल्लीबोलातील रस्त्यावरही वाहनांची वर्दळ वाढली आहे. या छोट्या पुलांवरुन वाहतूक होत असल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी पुलांची पाहणी केली जाणार असून स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेतला जाणार आहे.

याबरोबरच मुठा डावा कालवा देखील शहरातुन ग्रामीण भागामध्ये जातो. संबंधित नाले, ओढे, कालव्यावर महापालिका प्रशासनाकडुन अनेक वर्षांपुर्वी छोटे-मोठे पुल बांधण्यात आले. या पुलांवरुन मोठ्या प्रमाणात वाहतुक होते. त्यापैकी काही पुल जुने झाले असल्याने ते धोकादायक झाले आहेत का ? संबंधित पुलांची सद्यःस्थिती नेमकी कशी आहे ? याबाबतची पाहणी महापालिकेकडुन केली जाणार आहे. या पुलांचे महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाकडुन स्ट्रक्‍चरल ऑडीट केले जाणार आहे, त्यातुन पुलांच्या सद्यःस्थितीची माहिती महापालिकेस मिळणार आहे. त्यानंतर पुलांच्या कामांसंदर्भात पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.

नदीवरील ३८ पैकी ११ पुलांचे काम पुर्ण…
महापालिकेने दोन वर्षांपुर्वी नदीवरील ३८ पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडीट केले होते. पुलांची कामे करण्यासाठी महापालिकेने ३५ कोटी रुपयांची तरतुद केली होती. परंतु महापालिकेने १५ कोटी रुपयेच मंजूर केले होते. त्यामुळे प्राधान्याने विशेष प्रकल्प विभागाने ११ पुलांची कामे केली. तर आता उर्वरीत २७ पुलांच्या कामासाठी अंदाजपत्रकात तरतुद केली जाणार आहे. त्यानुसार, दुसऱ्या टप्प्यात ही कामे केली जाणार आहे. त्यासाठीच्या निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.