Home Blog Page 516

प्राध्यापकांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फतच व्हावी-माजी आमदार मोहन जोशी

पुणे – प्राध्यापकांची भरती विद्यापीठ स्तरावर करण्याचा विचार महायुती सरकार करत असून, हे धोरण काँग्रेसला मान्य नाही. प्राध्यापकांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फतच व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी मा.राज्यपालांकडे केली आहे. तसेच मा.मुख्य मंत्री देवेंद्रजी फडणवीस, आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांच्याकडेही पत्राद्वारे केली आहे.

प्राध्यापकांची भरती एमपीएससी मार्फत करण्याची प्रक्रिया पारदर्शी असून, या प्रक्रियेत गुणवत्ता, जातीनिहाय आरक्षण आणि याचबरोबर भ्रष्टाचारमुक्त निवड केली जाते. याकरिता महाराष्ट्रातील प्राध्यापकांची भरती एमपीएससी मार्फत करणे गरजेचे आहे, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील विद्यापीठे राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात. त्यांचे प्रमुख राज्यपाल असतात. विद्यापीठात रिक्त जागा तयार झाल्यानंतर त्या राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाला कळवून मुख्य मंत्र्यांच्या संमतीने आयोगाला कळविल्या जातात. त्यानंतर आयोगामार्फत भरतीची प्रक्रिया राबविली जाते. ही पद्धत पारदर्शी आहे. तसेच कायद्यानुसारही ही प्रक्रिया विशिष्ट कालावधीत करणे आयोगाला बंधनकारक आहे, असे निवेदनात म्हटले आहे. विद्यापीठ स्तरावर भरती केल्यास ही प्रक्रिया पारदर्शी न रहाता, त्यात भ्रष्टाचाराला वाव राहील. गुणवत्तेला महत्त्व रहाणार नाही, अशी शक्यता आहे, याकरिता विद्यापीठ स्तरावर भरती करण्याला काँग्रेस पक्षाचा विरोध राहील, असे मोहन जोशी यांनी पत्रात म्हटले आहे.

पहिले रोटरी साहित्य संमेलन रंगणार शनिवार-रविवारी

पुणे : सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या रोटरी क्लबतर्फे शनिवारी (दि. 4) आणि रविवारी (दि. 5) पुण्यात पहिले रोटरी मराठी साहित्य संमेलन होत आहे. प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या संमेलनात साहित्यिक चर्चा घडणार असून विविध विषयांवर परिसंवादात मान्यवरांची मते ऐकावयास मिळणार आहेत. गप्पा, कविसंमेलन, प्रहसने आणि संगीत नाटकाचेही आयोजन करण्यात आले आहे.
कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या धर्तीवर पहिले रोटरी साहित्य संमेलन होणार आहे. दि. 4 रोजी सकाळी 9:15 वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात होणार असून उद्घाटन समारंभ सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध क्रिकेटपटू पद्मभूषण चंदू बोर्डे यांच्या हस्ते होणार आहे. खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, नॅशनल बुक ट्रस्टचे विश्वस्त राजेश पांडे, नगरसेवक जयंत भावे, उपप्रांतपाल मोहन पालेशा, डि. लर्निंग जिल्हा प्रशिक्षक पंकज शहा, संतोष मराठे, नितीन ढमाले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सकाळी 11:30 वाजता संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 2:45 वाजता ‌‘यशस्वी लेखनाची सूत्रे‌’ या विषयावर परिसंवाद, दुपारी 4:15 वाजता ‌‘मन:शांती‌’ हे प्रहसन, सायंकाळी 4:30 वाजता रोटरियन्सचा सहभाग असलेले निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. तर रात्री 8:30 वाजता ‌‘संगीत कट्यार काळजात घुसली‌’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात शिववंदना नृत्याने होणार असून सकाळी 10 वाजता प्रसिद्ध व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्डने सन्मान करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता अशोक नायगावकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार असून दुपारी 2 वाजता ‌‘ऑफिस ऑफिस‌’ हे प्रहसन सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 2:15 वाजता ए. आय.चा साहित्यावर परिणाम होईल का? या विषयावर परिसंवाद आणि दुपारी 3:45 वाजता ‌‘आगलावे वि. पेटवे‌’ हे प्रहसन सादर होणार आहे. ग. दि. माडगूळकर यांच्या गीतांवर आधारित ‌‘अमृतसंचय‌’ हा सांगीतिक कार्यक्रम दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी 5:30 वाजता प्रसिद्ध राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांच्या समवेत गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. या प्रसंगी सहकार आणि नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती असणार आहे. त्यानंतर संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील आणि प्रांतपाल शितल शहा, सूर्यकांत वझे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

पुणे जिल्हाधिकारी पदी जितेंद्र डूडी रुजू

पुणे, दि. २: पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र डूडी यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्याकडे पदभार सोपवला.

जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी यापूर्वी सन २०१९ मध्ये सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा, नंदूरबार, सन २०१९ ते २०२० या कालावधीत सहायक जिल्हाधिकारी मंचर तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव, पुणे तर सांगली जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सातारा जिल्हाधिकारी या पदावर काम केले आहे.

श्री. डूडी यांच्या सेवा कालावधीत पोषण अभियानातंर्गत ५ व्या राष्ट्रीय पोषण महिन्यात अधिकाधिक उपक्रम राबवून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यात तृतीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच राष्ट्रीय मतदान दिन २०२४ च्यावेळी पुणे विभागात उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून प्रथम पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

पुणेकरांसमोर उलगडली सुरेल रचनांची ‘स्वरसाधना’

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि सृजनसभा पुणे यांच्या वतीने होनराज मावळे यांनी संगीतबद्ध केलेल्या रचनांची विशेष मैफिल
पुणे: ख्याल, टप्पा, तराणा, स्वरमालिका याचबरोबर सेवा हैं यज्ञ कुंड समिधा सम हम जले. शिवछत्रपती जय हो. आनंदाचा कंद माझा मधुमिलिंद. जय देव जय देव जय जय शिवराया ही सावरकर लिखित आरती अशा एकाहून एक सरस रचना सादर करीत होनराज मावळे यांनी आपल्या संगीतरचनाकार म्हणून सुरू असलेल्या प्रवासातील स्वरसाधना पुणेकरांसमोर उलगडली. मावळे यांच्या सुरेल संगीत रचनांची पर्वणी श्रोत्यांना या निमित्ताने ऐकायला मिळाली.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि सृजनसभा पुणे यांच्या वतीने होनराज मावळे यांनी संगीतबद्ध केलेल्या रचनांची विशेष मैफिलीचे आयोजन कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहिर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे यावेळी उपस्थित होते. होनराज मावळे, पार्थ कुलकर्णी, अनुजा जोशी, गार्गी काळे (गायन), सई जोशी (संवादिनी), आदेश वाटाडे (कीबोर्ड) केदार टिकेकर, ओंकार तळवणेकर (तबला) अक्षदा इनामदार, सक्षम जाधव (तालवाद्ये) प्रसाद भारदे यांनी निवेदन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला होनराज मावळे यांनी राग श्री मध्ये ‘जय जय एकदंत लंबोदर’ हा ख्याल सादर केला. त्यानंतर राग भीमपलास मध्ये ‘गुनिजन चर्चा करे’ ही रचना सादर केली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात उपशास्त्रीय रचना सादर झाल्या ‘जादूभरी तोरी अखिया रसिली’ हे गार्गी काळे हिने तर  ‘गुरु बिन कौन बताये बाट’ या होनराज मावळे यांनी सादर केलेल्या गीताला श्रोत्यांनी विशेष दाद दिली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सादर झालेल्या ‘हे हिंदू नृसिंहा प्रभो  शिवाजी राजा’, ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम’ या गीतांच्या संगीत रचनांनी रसिकांची विशेष दाद मिळवली. ‘भारतमाता स्तुतीपर तराना’ हा या कार्यक्रमातील विशेष आकर्षक रचना होती.
होनराज मावळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ललितकला केंद्र येथून शास्त्रीय संगीतातून द्विपदवीधर झाल्या निमित्त संगीत पर्वारंभ या विशेष मैफीलीचे आयोजन प्रा.संगीता मावळे व आचार्य शाहीर हेमंतराजे  मावळे यांनी आयोजन केले.या कार्यक्रमात होनराज यांच्या कला मार्गदर्शकांप्रती  कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी डॉ. केशवचैतन्य कुंटे, डॉ. शरद खरे, संजय करंदीकर, यशोधन महाराज साखरे, डॉ. मिलिंद दुगड आदि मान्यवर उपस्थित होते.

“धनुष्यबाण” या चिन्हावर लढविलेल्या सर्व जागा शिवसेनेच्याच राहणार – प्रमोद नाना भानगिरे

पुणे-येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे शहरात शिवसेनेची पक्ष बांधणी मोठ्या प्रमाणावर मजबूत झाली असून मागील काळात पुणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढवलेल्या सर्व जागा शिवसेनाच लढवेल अशी भूमिका शिवसेना पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी मांडली.

नाना भानगिरे पुढे म्हणाले की, पुणे शहरात प्रभाग निहाय शिवसैनिकांची बैठक आयोजित करून अनुकूल असणाऱ्या प्रभागात शिवसेनेच्या वतीने मतदारांचा सर्व्हे सुद्धा केला जात असून इतर पक्षातील कोणतेही नगरसेवक महायुतीतल्या घटक पक्षात सामील झाले तरीही राज्य पातळीवर महायुतीचा ठरलेला फॉर्म्युलाच संपूर्ण राज्यात राबविल्या जाणार आहे. येत्या काळात शिवसेनेत काही नगरसेवक व विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर प्रवेश करणार आहेत, ते पुढे म्हणाले, संपूर्ण राज्यात महायुती म्हणून तिन्ही पक्ष कार्यरत असून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व शिवसेनेचे वरिष्ठ नेते जे ठरवतील त्याचप्रमाणे पुणे शहरात येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला शिवसेना सामोरे जाणार आहे हेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना पुणे शहरात 40 ते 50 जागांवर पूर्वतयारी आढावा, संघटन बांधणी आणि निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करीत आहे, शिवसेनेच्या प्रत्येक गटप्रमुखाला सक्रिय करत सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो पुणेकरांपर्यंत पोहोचण्यासाठीही शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असून निश्चितच पुणे शहरात शिवसेनेच्या माध्यमातून पुणेकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम तत्पर असू असेही त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेला शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख सुदर्शना त्रिगुनाईत, पुणे जिल्हा महिला आघाडी संपर्कप्रमुख गीतांजली ढोणे, युवा सेना शहरप्रमुख निलेश गिरमे, उपशहर प्रमुख सुधीर कुरूमकर, संजय डोंगरे, सुनील जाधव, शहर संघटक श्रीकांत पुजारी, नवनाथ निवंगुणे, युवासेना कार्यकारणी सदस्य श्रुतीताई नाझिरकर, सुरेखा पाटील, नितीन लगस, गणेश काची, निलेश जगताप, व शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. सुहास दिवसेंना मिळाली पदोन्नती,आता पुण्याच्या जिल्हाधिकारी पदी जितेंद्र डूडी


पुणे–महाराष्ट्रात प्रशासकीय सेवेतील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. राज्याचे सामान्य प्रशासन विभागाचे अपर सचिव व्ही. राधा यांच्या आदेशानुसार या बदल्या करण्यात येत आहेत. यात पूजा खेडकर प्रकरणात चर्चेत आलेले डॉ. सुहास दिवसे यांना पदोन्नती देत त्यांची बदली करण्यात आली आहे. दिवसे यांच्या जागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना पदभार देण्यात आला आहे. तर साताऱ्याच्या जिल्हाधिकारी पदावर पुण्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यातील 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत असून यातील काहींना पदोन्नती देखील देण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना पदोन्नती देत भूमी अभिलेख विभागाच्या जमाबंदी आयुक्तपदावर नियुक्त करण्यात आले आहे. पूजा खेडकरने डॉ. सुहास दिवसे यांच्यावर विनयभंगाचे आरोप केले होते. मात्र दिवसे यांनी हे आरोप फेटाळून लावले आणि अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. पुण्याचे जिल्हा परिषद सीईओ संतोष पाटील यांची सातारा जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

आयएएस अधिकाऱ्यांच्या बादल्यांची यादी:
1) जयश्री भोज, महाआयटी, अन्न आणि नागरी पुरवठा सचिव म्हणून नियुक्त.
2) जितेंद्र दुड्डी, जिल्हाधिकारी, सातारा यांची पुणे येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.
3) विनिता वेद सिंघल, कामगार, प्रधान सचिव, पर्यावरण, म्हणून नियुक्ती
४) आय ए कुंदन, एसीएस स्कूल एज्यु. प्रधान सचिव, कामगार म्हणून नियुक्ती.
5) मिलिंद म्हैसकर, एसीएस पब हेल्थ एसीएस फॉरेस्ट म्हणून नियुक्त.
६) वेणुगोपाल रेड्डी, एसीएस फॉरेस्ट, एसीएस, हायर आणि टेक.एड्यु.
७) निपुण विनायक, रुसा सचिव, पब हेल्थ (१) म्हणून नियुक्ती.
8) संतोष पाटील, सीईओ जि.प. पुणे यांची जिल्हाधिकारी, सातारा म्हणून नियुक्ती.
9) हर्षदीप कांबळे, प्रधान सचिव, सामाजिक न्याय म्हणून नियुक्ती.
10) विकासचंद्र रस्तोगी, प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण. प्रधान सचिव, कृषी म्हणून नियुक्ती.

खेलरत्न, अर्जून, द्रोणाचार्य क्रीडा पुरस्कार जाहीर झालेल्याखेळाडूंचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मनु भाकर, डी गुकेश, हरमनप्रितसिंह आणि प्रवीणकुमार यांचे
खेलरत्न पुरस्काराबद्दल अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई, दि. 2 :- केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी यंदा ऑलिंपिक पदकविजेती नेमबाज मनु भाकर, विश्वविजेता बुद्धीबळपटू डी गुकेश, हॉकीपटू हरमनप्रित सिंह, पॅराअॅथलिट प्रवीणकुमार यांची निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. उल्लेखनीय क्रीडा कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला, नेमबाज स्वप्नील कुसाळे, पॅराअॅथलिट सचिन खिलारे यांच्यासह सर्व खेळाडूंचे तसेच द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड झालेल्या दिपालीताई देशपांडे यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार आपल्या अभिननंदपर संदेशात म्हणतात की, या पुरस्कारविजेत्या खेळाडूंना जाहीर झालेला पुरस्कार हा या खेळाडूंनी भारतीय क्रीडाक्षेत्राचे नाव जागतिक पातळीवर उंचावण्यासाठी केलेल्या परिश्रमांचा गौरव आहे. नेमबाज मनु भाकर हिने पॅरिस ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकून भारतवासियांना दिलेल्या आनंदाची, अभिमानस्पद क्षणांची तुलना होऊ शकत नाही. डी गुकेश यांने नुकतंच बुद्धीबळातल्या विश्वविजेतापदावर आपलं नाव कोरलं. विश्वविजेता होताना त्याने केलेला खेळ संस्मरणीय होताच, त्याचबरोबरीनं विश्वविजेता जाहीर झाल्यानंतरचं शांत, संयमी, सभ्य वर्तनानं केवळ भारताचीच नव्हे तर जागतिक क्रीडाक्षेत्राची मान उंचावली. भारतीय हॉकी संघासाठी सलग दोन ऑलिंपिक पदके जिंकून देणारा हरमनप्रित सिंह आणि पॅराअॅथलिट प्रवीणकुमार यांचीही कामगिरी खेलरत्न पुरस्काराचा गौरव वाढवणारी आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

खेलरत्न, अर्जून, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी पुरस्कारांसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडू, संस्था, संघटनांचे उपमुख्यमंत्रांनी विशेष अभिनंदन केले असून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

झिरवाळ,प्रफुल्ल पटेल यांच्यानंतर रोहित पवार म्हणाले,’पवार कुटुंब एकत्रित राहावे, माझी व्यक्तिगत इच्छा,पण ….

राजकीय भूमिका घेणे माझ्या अधिकारात नाही, वरिष्ठांचा निर्णय मान्य
पुणे- माझी छाती फाडली तर साहेबच दिसतील असे वक्तव्य झिरवाळ यांनी केल्यावर,शरद पवार आमचे दैवत असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. आता , पवार कुटुंब एकत्रित रहावे, ही माझी व्यक्तिगत इच्छा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. मात्र, राजकीय भूमिका घेणे माझ्या अधिकारात नाही, असेही ते म्हणालेत. आशा पवार वडिलधाऱ्या आहेत, त्यांनी देवाच्या दारात भावना मांडली, असेही ते म्हणाले.

जुलै 2023 मध्ये अजित पवार काही आमदारांना सोबत राष्ट्रवादीतून बाहेर पडले आणि भाजप-शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले. शरद पवारांच्या वाढदिवसादिवशी अजित पवार हे शरद पवारांच्या घरी पोहोचले होते. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली होती. तेव्हापासून हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा वाढल्या आहेत. अजित पवारांच्या आई आशा पवार यांनी पंढरपूरात बुधवारी पवार कुटुंब एकत्र येण्याचे साकडे पांडुरंगाला घातले होते, त्यावर रोहित पवार यांनी आज प्रतिक्रिया दिली.

आशा आजींनी पंढरपूर सारख्या पवित्र ठिकाणी कुटुंब एकत्र राहावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची हीच इच्छा आहे. पण शेवटी राजकारण हे राजकारण असते. कुटुंब एक असले, तरी पक्ष दोन आहेत. एका पक्षाचे नेते शरद पवार आहेत, तर दुसऱ्या पक्षाचे अजित पवार आहेत. या दोन प्रमुख नेत्यांना राजकीय भूमिका घ्यावी लागेल. ते काय भूमिका घेतात ते बघावे लागेल, असे रोहित पवार म्हणाले. पवार कुटुंब एकत्रित रहावे, ही माझाी व्यक्तिगत इच्छा आहे. पण आमचे नेते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी बुधवारी नवीन वर्षानिमित्त पांडुरंगाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कुटुंबातील सर्व वाद मिटून पुन्हा पवार कुटुंब एकत्रित गुणा गोविंदाने नांदू दे, असे साकडे आपण पांडुरंगाला घातले असल्याचे आशा पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या आईने देखील काही दिवसांपूर्वी पवार कुटुंबातील वाद मिटण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. कुटुंबातील मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र राहणे ही काळाची गरज असल्याचे रोहित पवार यांच्या आईने म्हटले होते.

दरम्यान, बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ आण प्रफुल्ल पटेल यांनीही पवार कुटुंब एकत्र येण्याबाबत भाष्य केले होते. शरद पवार हे आमचे दैवत आहेत. काही राजकीय कारणांवरून आम्ही वेगळे जरी झालो असलो, तरी मात्र त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये आजही आस्था आहे. भविष्यात पवार कुटुंबीय एकत्रच आले, तर यात काही गैर नाही. कारण मी सुद्धा स्वतःलाच पवार कुटुंबाचा एक सदस्य समजतो आणि पवार कुटुंब एकत्र यावे, अशी माझी सुद्धा इच्छा आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले होते.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी देखील शरद पवारांबाबत मोठे विधान केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते व मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पुन्हा एकदा त्यांची शरद पवार यांच्यावर असलेली निष्ठा व्यक्त करून दाखवली आहे. बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसतील. तर माझ्या छातीत तुम्हाला शरद पवार साहेबच दिसतील, असे झिरवाळ म्हणाले. आता शरद पवार यांच्यासमोर जाऊन लोटांगण घालून पाया पडणार, असेही ते म्हणाले. मी पाडुंरंगाच्या शेजारी पवारसाहेबांना पाहतो. साहेब निश्चित विचार करतील, असा विश्वासही झिरवाळ यांनी व्यक्त केला.

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे दिव्यांगांना सायकल वाटप

पुणे : दिव्यांग बांधवाना मदतीचा हात देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या वतीने त्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. बुरुड आळी येथे दिव्यांगांसाठी विशेष सायकल वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गरजू दिव्यांग बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर, ज्येष्ठ उद्योजक रमणशेठ लुंकड, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, उद्योजक विजय कुमार मर्लेचा, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, उपाध्यक्ष निवृत्ती जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. 
पुणे आणि परिसरातील पाच गरजवंत दिव्यांग बांधवांना या सायकली देण्यात येणार आहेत. तसेच त्यांना आत्मनिर्भर होण्याकरिता ही भेट उपयुक्त ठरणार आहे.  ज्येष्ठ उद्योजक रमणशेठ लुंकड यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

ज्येष्ठ उद्योजक रमण लुंकड म्हणाले, दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम खूप महत्त्वाचे आहेत. या सायकलींमुळे त्यांना दैनंदिन जीवनातील अडचणींवर मात करता येईल. समाजातील प्रत्येक घटकाने अशा उपक्रमांसाठी हातभार लावला पाहिजे.

कमरेला पिस्टल लावून खुलेआम फिरणारा अल्पवयीन मुलगा के के मार्केट च्या पार्किंगमध्ये पोलिसांनी पकडला

पुणे : हौसेखातर कमरेला पिस्टल लावून फिरणार्‍या अल्पवयीन मुलाला सहकारनगर पोलिसांनी के के मार्केट च्या पार्किंगच्या जागेत पकडले. त्याच्याकडून गावठी पिस्टल जप्त केले आहे.

सहकारनगर पोलीस ठाण्यातीलपोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे नव वर्षाच्या आगमनानिमित्त बंदोबस्तासाठी पेट्रोलिंग करीत होते. ते तीन हत्ती चौकात आले असताना पोलीस अंमलदार अमोल पवार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक जण के के मार्केट च्या पार्किंगच्या जागेतील टीव्हीएस शोरुमचे पाठीमागील गल्लीत कोणाची तरी वाट पहात असून त्याच्या कमरेला पिस्टल सारखे हत्यार लावलेले दिसत आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांनी तातडीने कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी बालाजीनगरला जाऊन या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्या पॅन्टमध्ये खोचलेले ६० हजार रुपयांचे गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह जप्त केले.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, बापू खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, महेश मंडलिक, अमित पदमाळे, सागर सुतकर, योगेश ढोले, महेश भगत,खंडु शिंदे यांनी केली आहे.

सावित्री-ज्योतिबांच्या काव्यरचनांनी चार दिवसीय पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे उद्घाटन

पुणे: महात्मा फुलें, ज्ञानज्योती सावित्रीबाई व फातिमाबी शेख यांच्या वेशभूषेतील कवी-कवयित्रीनी सादर केलेल्या काव्यरचना, फुले दाम्पत्याचा गौरवपूर्ण उल्लेख, विचारांचा जागर, सावित्री-ज्योति यांच्यासह आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करीत पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे उद्घाटन गुरुवारी झाले.

अंगावर हिरवे इरकल, कपाळी आडवा गंध, हाती पुस्तक, ओठी सावित्री-ज्योतिचा जागर अशा स्वरूपात शेकडो महिला सावित्रीबाईंच्या पेहरावात अवतरल्या! डोक्यावर फुले फेटा, अंगात कोट घालून आयोजक महात्मा फुलेंच्या पेहरावात आल्याने सभागृहात जणू सावित्रीबाई, ज्योतिराव आल्याची भावना उपस्थितांच्या मनात होती.

भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव यांच्या संकल्पनेतून देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत पहिला आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २ ते ५ जानेवारी या कालावधीत होत आहे. नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात महाराष्ट्रासह देशविदेशातून ६०० कवी, साहित्यिक, विचारवंत, कलाकार यामध्ये सहभागी झाले आहेत.

क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात सुरु केलेल्या देशातील पहिल्या मुलींच्या शाळेचा इतिहास जतन व्हावा, फुले दाम्पत्याच्या कार्यकर्तृत्वाचा प्रचार व प्रसार व्हावा आणि हा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या फेस्टिवलचे आयोजन केले आहे. देश-विदेशातील सहाशे कवींचा काव्य महोत्सव, भिडेवाडा या विषयावर मराठी गझल मुशायरा, एकपात्री प्रयोग, शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा, एकांकिका, सांगितिक पोवाडे, महिला सक्षमीकरणासाठी लाठीकाठी, दांडपट्टा प्रात्यक्षिक असे विविध कार्यक्रम फेस्टिव्हलमध्ये होणार आहेत. लंडन, ऑस्ट्रेलिया, अबुधाबी आदी देशांतून, तसेच केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली, तेलंगणा, उत्तरप्रदेश आदी राज्यातून कवी-कवयित्री सहभागी झाले आहेत.

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा त्याग, समर्पण आणि देशाच्या जडणघडणीतील योगदान अमूल्य आहे. फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळायला हवा. ही एक चळवळ असून, फुले विचार पुढच्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जिल्हास्तरावर, राज्यस्तरावर फुले दाम्पत्याचा कार्यजागर करणारे कार्यक्रम वर्षभर घेतले जातात. ज्यांनी कर्मठ व्यवस्थेच्या विरोधात जाऊन स्त्री शिक्षणाचा पाया रोवला, लोकांचा शिव्याशाप, चिखलफेक, शेणाचे गोळे अंगावर झेलले, त्याग व समर्पण भावनेने कार्य केले, त्या फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी अभियान राबवणार आहोत, असे वडवेराव म्हणाले.

वाल्मीक कराडच्या भोवती चौकशीचा फास आवळला:’नार्को टेस्ट’ची मागणी; SIT चे प्रमुख बीडमध्ये

बीड- मस्साजोग हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराडभोवतीचा चौकशीचा फास आता चांगलाच आवळला जात आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाचे प्रमुख डॉक्टर बसवराज तेली आज बीडमध्ये पोहोचलेत. यामुळे या प्रकरणाच्या तपासाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणातील सर्वच लागेबांधे स्पष्ट होण्यासाठी वाल्मीक कराडच्या नार्को टेस्टचीही मागणी केली जात आहे.
वाल्मीक कराडने मंगळवारी पुणे स्थित सीबीआयच्या कार्यालयात आत्मसमर्पण केले होते. तेव्हापासून त्याची कसून चौकशी केली जात आहे. सध्या त्याला बीड शहर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. तिथे त्याची एका बंद खोलीत चौकशी सुरू आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची नियुक्ती केली आहे. बुधवारी या 10 सदस्यीय एसआयटीचा जीआर निघाला. पुणे सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉक्टर बसवराज तेली हे या विशेष तपास पथकाचे नेतृत्व करतील.

त्यानुसार बसवराज तेली लवकरच बीडमध्ये येऊन संतोष देशमुख हत्याकांडाच्या चौकशीचा पदभार स्वीकारणार आहेत. ते देशमुख यांची हत्या झालेल्या केज परिसरातील घटनास्थळी भेट देण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील 3 मारेकरी अद्याप फरार आहेत. त्यामुळे त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान एसआयटीपुढे आहे. विशेषतः वाल्मीक कराडवर सध्या केवळ खंडणीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी खूनाचा म्हणजे कलम 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे खंडणी व संतोष देशमुख हत्या प्रकरण यांचा परस्पर संबंध जोडण्याचे आव्हानही तपास यंत्रणेपुढे आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बुधवारी रात्री एका ट्विटद्वारे वाल्मीक कराडला ठेवण्यात आलेल्या बीड शहर पोलिस ठाण्यात 5 पलंग आणण्यात आल्याचा दावा केला आहे. यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. बीड पोलिस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत.

नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलिस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी. शिवाय गादी-उशी, पंखा, AC देखील बसवता येतील का, याचाही विचार करायला हवा, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, रिपाइंच्या सचिन खरात गटाचे प्रमुख सचिन खरात यांनी या प्रकरणातील लागेबांधे स्पष्ट होण्यासाठी वाल्मीक कराडच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे. ते म्हणालेत की, बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाला. या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. यामुळे राज्याच्या प्रत्येक घरात एकच चर्चा आहे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. बीड मधील नेते म्हणत आहेत बीडची परिस्थिती बिहार सारखी झालेली आहे. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो बीडची परिस्थिती गुंडांनी अफगाणिस्तानसारखी केलेली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर वाल्मीक कराड यांच्यावर दोन तीन दिवसांनी खंडणीचा गुन्हा दाखल झाला. यानंतर वाल्मीक कराड हा फरार झाला, मग खरेच वाल्मीक कराड निर्दोष होता, तर तो फरार का झाला? त्यानंतर हाच वाल्मीक कराड स्वतः सरेंडर सीआयडी ऑफिसला पुण्यात झाला. या सगळ्या बाबी संशयास्पद आहेत. त्यामुळे या वाल्मीक कराडची तात्काळ नार्को टेस्ट करा, मग सगळेच बाहेर येईल.

अजित पवारांच्या ताफ्यात वाल्मीक कराडची गाडी:त्याच गाडीतून पुण्यात सरेंडर केले, खासदार बजरंग सोनवणेंचा दावा

15 तारखेला मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यासाठी आरोपी वाल्मिक कराड नागपूरमध्ये हजर

मुंबई–बीड सरपंच हत्याप्रकरणाशी निगडीत खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड सध्या सीआयडीच्या ताब्यात असून त्याची चौकशी केली जात आहे. बीड खासदार बजरंग सोनवणे यांनी वाल्मीक कराड आणि अजित पवारांबाबत मोठा दावा केला आहे. अजित पवार मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेले असता, त्यांच्या ताफ्यात वाल्मीक कराडची देखील गाडी होती, असे सोनवणे म्हणालेत. त्याच गाडीतून त्याने पुण्यात सरेंडर केले, असा दावाही बजरंग सोनवणे यांनी केला.

संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. वाल्मीक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यात आता खासदार बजरंग सोनवणे यांनी वाल्मिक कराड सरेंडर झालेल्या गाडीविषयी मोठा गौप्यस्फोट केल्याने एकच खळबळ उडाली आहे.वाल्मिक कराडचा हा परळीतून पुण्याला जातो, मग गोवा आणि पुन्हा पुण्याला येतो. त्याचा हा प्रवास सुरु असताना पोलिस काय करत होते? असा सवाल बजरंग सोनावणे यांनी विचारला आहे.अजित पवार 16 तारेखला मस्साजोगला आले, तेव्हा त्यांच्या ताफ्यात जी गाडी होती, त्याच गाडीतून जाऊन आरोपी पुण्यात सरेंडर केले. गाडी कोणाच्या नावावर आहे? असा सवाल करत पुण्यात आरोपी ज्या घरात थांबला त्याचा तपास व्हायला पाहिजे, अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली.

12 तारखेला वाल्मीक कराड आणि पोलिस यंत्रणेची नेत्याच्या कार्यालयात भेट झाली. तसेच 15 तारखेला मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यासाठी आरोपी वाल्मिक कराड नागपूरमध्ये हजर होता, असा दावा खासदार बजरंग सोनावणे यांनी केला आहे. ज्या दिवशी हत्या झाली तेव्हा हा आरोपी परळीत होता. हत्या झाल्यानंतर आरोपी आणि पोलिसांची भेट झाली. त्यानंतर हा आरोपी एका नेत्याच्या फार्म हाऊसवर भेटला. त्यानंतर आरोपी शपथविधीला पोहोचतो, तेव्हा अटक का झाली नाही?
संतोष देशमुख यांना खंडणीच्या प्रकरणामुळे मारले आहे. आमच्या खंडणी गोळा करण्याच्या कामात जर अडथळा निर्माण केला तर काय होतं, हे दाखवण्यासाठी असे मारले आहे. मागच्या मे महिन्यात जो गुन्हा दाखल होता, तेव्हा जर कारवाई झाली असती तर हे सगळे घडले नसते. पोलिसांनी वेळीच गुन्हा दाखल केला असता तर हे झाले नसते, असा दावा बजरंग सोनावणे यांनी केला.

ठाकरेंच्या शिवसेनेचे पुण्यातील कट्टर पाच माजी नगरसेवक भाजपात

पुणे:
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव करत महायुतीने बहुमतांनी निवडून येत राज्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच पार पडतील अशी अपेक्षा आहे. यादृष्टीने राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून महायुतीकडे सत्तेचा कल दिसून येत असल्याने राजकीय चलबिचल सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवसेना उबाठा गटातील पाच माजी नगरसेवक पाच जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पक्षातील नेत्यांना भेटत नसून विकासकामे पूर्ण करण्यासाठी मदत करत नसल्याचा आरोप संबंधित माजी नगरसेवकांनी केला आहे.
शिवसेनेमधील (उबाठा) पाच माजी नगरसेवक पक्षाला जय महाराष्ट्र करून भाजपात लवकरच प्रवेश करणार असल्याने शिवसेनेला (उबाठा) शहरात खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरेंना राजकीय धक्का देण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यावर्षी महानगरपालिका निवडणुका होण्याची अपेक्षा असल्याने सत्ताधारी पक्षाच्या बाजूने जाण्यात माजी नगरसेवक अधिक उत्सुक आहे.
५ जानेवारी रोजी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या माजी नगरसेवकांचा प्रवेश होणार आहे. बाळासाहेब ओसवाल, विशाल धनवडे , प्राची आल्हाट, संगीता ठोसर, पल्लवी जावळे हे नगरसेवक भाजपात प्रवेश करणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका मध्ये देखील मोठ्या प्रमाणात यश मिळवण्याच्या दृष्टीने महायुती मधील पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे .

विशाल धनवडे यांची पोस्ट वाचा जशीच्या तशी

सप्रेम जय महाराष्ट्र, आजच्या या पत्रास कारण की या नवीन वर्षात मी एक निर्णय घेतला आहे आणि या निर्णयात आपली भूमिका महत्वाची आहे. काही निर्णय घेताना त्रास होतो तसा मला ही झाला आहे मागील एक महिन्यापासून झोप नाही, प्रेशर मुळे BP ची गोळी चालू झाली. परंतु आता निर्णय झाला आहे त्यामुळे बाळासाहेब ठाकरे म्हणतात तसे एकदा निर्णय घेतला की, घेतला परत मागे नाही फिरायचे तसे झाले आहे. मी कधी माझ्या स्वप्नात ही विचार केला नाही की माझी शिवसेना मला सोडावी लागेल, ज्या शिवसेनेवर मी एवढं प्रेम केले, ती वाढवण्यासाठी एवढे कष्ट घेतले, ज्या शिवसेनेने मला एवढे प्रेम दिले, नाव दिले, मोठे केले ती शिवसेना सोडताना खूप त्रास होतो आहे परंतु शिवसेना का सोडतोय ? याला खूप कारणे आहेत परंतु जाताना कोणाला ही नाव ठेवून जायचे नाही यामध्ये माझी शिवसेना, माझे उद्धव साहेब, आदित्य साहेब यांच्या बद्दल मला खूप आदर आणि प्रेम आहे त्यांच्या बद्दल कोणतीही तक्रार नाही. परंतु पुण्यातील शिवसेनेला कोणीही वाली नाही इथे जिल्ह्यात पक्षालाच शिवसेना नकोय असे वाटायला लागले आणि यातूनच घुसमट चालू झाली. ना पुण्यात लोकसभेला जागा, ना ही विधानसभेला. आणि जागा मिळाली तरीही त्या उमेदवाराच्या मागे कोणतीही ताकत द्यायची नाही कोणतीही रसद पुरवायची नाही. ना कोणत्या शिवसैनिकाला कसलीही मदत करायची नाही ना कोणत्या शिवसैनिकांच्या सुख दुःखात सहभागी व्हायचे नाही . पुण्यात शिवसेनेला कोणीही वाली नाही. ज्यांच्यात शिवसेना वाढवण्यासाठी काम करण्याची भूक आहे त्याला काम करू न देणे हे मागील 5 वर्षे झाले चालू आहे, पक्षातील जे नगरसेवक आहे ते वाढवायचे सोडून जे आहेत त्यांच्याच पायात पाय घालण्याचे काम चालू आहे. संपर्क प्रमुखांच्या कानावर यासर्व गोष्टी असून सुद्धा ते काहीही करू शकले नाहीत असे म्हण्यापेक्षा त्यांच्या हातात काहीही न्हवते असे आहे.
जे काहीही करू शकत नाही असे लोक संघटना चालवतं आहेत, ज्यांचे खरे काम back ऑफिस सांभाळणे आहे त्यांना पक्ष सांभाळायला दिला आहे. पक्षात मागील 5 वर्षात पक्ष वाढवण्यासाठी एकही बैठक झाली नाही की त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही.
असो अशी बरीच कारणे आहे परंतु आता कोणतीही कारणे न देता मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो आहे पुढील काळात प्रभागासाठी आणि शहरासाठी खूप काही करायचे आहे नक्कीच जे करू ते चांगले करू असा विश्वास आहे यामध्ये तुमची साथ मोलाची आणि महत्वाची आहे. आपणास नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. आपला नम्र : विशाल धनवडे

वर्षाच्या शेवटच्या दिवशी २६३३ वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई

पुणे- कालच्या ३१ डिसेंबर २०२४ या अंतिम दिवशी १ जानेवारी पर्यंत पुण्याच्या वाहतूक शाखेच्या पोलिसांनी एकूण २६३३ वाहन चालकांच्या वर कारवाई केली आहे. यात ट्रिपल सीट च्या १७६ तर सिग्नला मोडणाऱ्यां ११८ आणि नो एन्ट्री त एन्ट्री करणाऱ्या ६३२ वाहनचालकांचा समावेश आहे .ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी ८५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

या सर्वांवर १९ लाख ८१ हजार ४५० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली .