Home Blog Page 515

लाडकी बहिण योजेनेबाबत आम्ही ओरडून सांगत होतो ..

पुणे-लाडकी बहिण योजेनेबाबत आम्ही ओरडून सांगत होतो .निवडणुकीपुरती हि योजना होती, .पण आता अशा लाडक्या बहिणींनी काहीही ठरवून काय उपयोग ?पुण्याचे ५ नाही तर ३ नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत त्यांची आम्ही हकालपट्टी केलेली आहे. काही यु ट्यूब वाल्यांनी आमच्या शिवसेनेला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे. फडणवीस यांचा न्याय केवळ त्यांच्यापुरता आहे कि सिलेब्रिटी पुरता न्याय आहे ते आता त्यांनी दाखवून दिले पाहिजे असे येथे उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुले वाडा येथे शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी त्यांना याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी उत्तरे दिली.यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या की, ‘एखादे चांगल काम केले असेल तर कौतुक करायला काय हरकत आहे. राजकारण म्हणजे हातात भाले तलवारी घेऊनच उभे राहील पाहिजे असे काही नाही. ज्या मुख्यमंत्र्यांचा कौतुक केले जात आहे, त्या मुख्यमंत्र्यांकडून सगळ्यांसाठी सारख्या गोष्टींची अपेक्षा आहे. या निमित्ताने राज्य सरकारकडे अपेक्षा आहेत. ते महिलांच्या प्रश्नांकडे पाहतील, ज्या महिला खऱ्या अर्थाने पीडित आहे अशाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे अंधारे म्हणाल्या.पुण्यातील उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, याबाबत सुषमा अंधारे म्हणाल्या, तीन नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांची शुक्रवारी पक्षातून हकालपट्टी देखील करण्यात आली आहे. काही लोक हे संकट काळात देखील सोबत असतात. पण काही जणांना संघर्षाचा काळ नको असतो, म्हणून ते सत्तेत सहभागी होतात. त्यामुळे आत्ता जे गेले त्यांना शुभेच्छा, असे अंधारे म्हणाल्या.

जर्मन नाटकासाठी ध्रुव ग्लोबलने प्रथम पारितोषिक पटकावले

पुणे, दि.३ जानेवारी : ‘शाश्वत’ या विषयाला अनुसरून ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावले आहे . या नाटकास सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
गोएथे इन्स्टिट्यूट मॅक्स म्यूलर भवन, पुणे आणि एमईएस सिनियर कॉलेज, पुणे यांच्या तर्फे आयोजित आंतरशालेय जर्मन नाट्य स्पर्धेत नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलने ‘शाश्वततेबद्दल टॉक शो’ (पथनाट्या) चे सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटाकावले. पुणे, कोल्हापूर आणि आष्टा येथील ९ शाळांमधील १५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यामध्ये ध्रुव ग्लोबल स्कूल, नांदे येथील ८ वीं ते १० वर्गातील १० विद्यार्थ्यांनी ‘शाश्वततेबद्दल टॉक शो’ चे सादरीकरण केले. या नाटकाचे सादरीकरण सई कुलकर्णी, शांभवी काळे, तनिश कांसारा, इशानवी बरपांडा, अचल गुप्ता, म्रिधीनी गुप्ता, खुशी देशमुख, ओवी सोंज, त्रिषा कोतलवाल आणि महिका पटवर्धन यांनी केले. अहीर यांनी रंगमंचासाठी मदत केली आहे.
जर्मन विभाग प्रमुख धनश्री महाजनी यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या शाश्वततेबद्दल टॉक शो चे विद्यार्थ्यांनी अप्रतिम सादरीकरण केले. या विद्यार्थी कलाकारांना शाळेतील जर्मन विभागाने पाठिंबा दिला.
प्राचार्या संगीता राऊतजी यांनी उल्लेखनीय यशासाठी टीम आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी जर्मन भाषेतील त्यांची प्रावीण्यता सिद्ध करत ध्रुव स्कूलचा गौरव वाढविला आहे.

पुण्याच्या पालकमंत्री पदावरून :केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ म्हणाले …

पुणे -पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून सत्ताधारी महायुतीत कोणताही वाद नसल्याची स्पष्टोक्ती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी दिली.पुण्याच्या पालकमंत्री पदावरुन महायुतीत काेणताही वाद नाही. आम्ही निवडणुक एकत्रित लढलाे असून महायुतीच्या नेत्यात चांगल्याप्रकारे समन्वय आहे. कार्यकर्त्यांत समज देखील आहे. त्यामुळे ते पक्ष नेतृत्व जाे निर्णय घेताे त्याची अंमलबजावणी करतात. पक्ष नेतृत्व जे सांगताे ते ऐकणे ही आमच्या पक्षात शिस्त आहे. मनपा निवडणुकीच्या जागांबाबत त्यावेळी निर्णय घेतला जाईल. मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वात देश विकासाच्या वाटेवर जात अाहे. जगात देखील देशाची पत वाढली आहे. माेदी यांच्यावर विश्वास ठेऊन अनेक नेते भाजपात येत आहेत. पुण्यात देखील शिवसेनेचे काही माजी नगरसेवक भाजपात येत आहेत. आम्ही काेणाला त्रास देत नाही किंवा या म्हणून सांगत नाही, आमचे चांगले काम सुरु असल्याने लाेक साेबत येत आहेत. जागा लढणे व जागा जिंकणे यात फरक असताे, असे मुरलीधर माेहाेळ म्हणाले.पुण्यातील भिडेवाडा येथे फुले दाम्पत्यास अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते. यावेळी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, फुले दाम्पत्याचे नाव देशभर प्रवास करताना सर्वत्र घेत असल्याचे जाणवते. सातत्याने आम्ही महापुरुषांना पूजन करण्यासाठी तसेच कर्तृत्वाची जाणीव ठेवण्याकरिता येत असताे. अनेक सामाजिक बांधलिकी उपक्रम देखील आम्ही करताे.माेहाेळ म्हणाले, देशातून दरवर्षी सव्वादाेन काेटी भाविक शिर्डीला येतात. परंतु त्याठिकाणी विमानसेवा २४ तास तिथे सुरु नाही. नाईट लँडिंगचे काही प्रश्न हाेते, सीआयएसएफ, एटीसी मनुष्यबळचा विषय हाेता, त्यामुळे त्याबाबत मी बैठक घेऊन दाेन ते तीन महिन्यात सर्व प्रश्न मार्गी लागतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा देखील शिर्डी विमानतळासाठी पाठपुरावा हाेता. तीन महिन्यानंतर शिर्डीचे विमानतळ २४ तास सुरु राहिल असे नियाेजन करण्यात आले आहे. पुरंदर विमानतळबाबत जागा निश्चित झाली आहे. रविवारी राज्यातील सर्व विमानतळ संर्दभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साेबत मुंबईत बैठक पार पडणार आहे. केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील बैठक मुंबईत हाेणार असून त्यात पुण्यातील पुरंदर विमानतळाचा प्रश्न असणार आहे.मुंब्र्यात मराठी अस्मितेचा विषय ऐरणीवर आला आहे. याबाबत माेहाेळ म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे, अशाप्रकारे काेणता प्रकार राज्यात चालू देणार नाही. संबंधितांवर कारवाई देखील झाली आहे. मागीलवेळी देखील असाच एक प्रकार घडला हाेता. राज्यात कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री चांगल्याप्रकारे प्रश्न हाताळत आहे. राज्यात कुठेही मराठी भाषेच्या अस्मितेला धक्का लागणार नाही ही जबाबदारी मुख्यमंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली आहे.

लाडकी बहिण योजना निवडणुकीपुरती हे आता स्पष्ट होईल -खासदार सुप्रिया सुळे

सरकारमध्ये ॲक्शन फक्त फडणवीसांची ..अन्य कोणाची नाही

पुणे-लाडकी बहीण याेजना केवळ निवडणुकीपुरती हाेती. आरबीआयचा एक रिपाेर्ट माझ्याकडे आला आहे त्यानुसार राज्यात येणारे पैसे व खर्च हाेणारी रक्कम यात माेठी तफावत आढळून आली आहे. चालू वर्षात मी मागील वर्षात बाेलले त्या अनेक गाेष्टी पाहवयास मिळतील.असेराष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.सरकारला भरभरुन मते मिळूनही सरकार ॲक्शन माेडवर दिसून नसून केवळ मुख्यमंत्री एकटेच ॲक्शन माेडवर दिसतात. एकच माणूस मिशन माेडवर दिसून येत आहे. सरकार येऊनही दीड महिन्यानंतर मंत्री पदे स्वीकारत नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला .सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवगंत नेते आर.आर. पाटील हे प्रथम नेते हाेते ते उपमुख्यमंत्री असताना गडचिराेली जिल्हा दत्तक घेऊन काम करत हाेते. त्याचनुसार देवेंद्र फडणवीस गडचिराेली काम करत आहे ही चांगली गाेष्ट आहे. नक्षलवाद, दहशतवाद विराेधात सर्व पक्ष एकत्रित आहे असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी शुकवारी व्यक्त केले. भिडेवाडा येथे सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या पुतळयाला अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधलासुप्रिया सुळे म्हणाल्या की, आज महिला आम्ही तुमच्यासमाेर उभे आहे त्यामागे माेठी ताकद फुले दाम्पत्य व इतर समाज सुधारक यांचे याेगदानाची आहे. बारामती मध्ये पवार कुटुंबात ज्याप्रकारे दुरावा निर्माण झाला त्यावर अजित पवार यांचे माताेश्री यांनी शरद पवार व अजित पवार यांनी एकत्रित यावे भावना व्यक्त केली.याबाबत सुळे म्हणाल्या, मी लाेकप्रतिनिधी व राजकारणात असून माझे कुटुंब कधी वेगळे आहेत. माझे व्यैक्तिक आयुष्य व राजकीय आयुष्य मी कधीच एकत्र करत नाही. लाेकसभा निवडणूक पार पडल्यावर मी प्रथम अजित पवार यांच्या माताेश्री यांना भेटण्यास गेले.बीड प्रकरणाबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सरकारने याबाबत एसआयटी लावली आहे.अशाप्रकरणात गुन्हया मागील आर्थिक कारण समजून घेणे गरजेचे आहे. माणुसकी विरुद्ध विकृती मानसिकता अशी घटना बीडची असून ती केवळ बीड पुरती मर्यादित नाही. ज्यावर अन्याय झाला त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे.परभणी, बीडचा विषय राजकीय नाही त्याविराेधात सर्वांनी एकत्रित यावे. प्रशासनाने ही घटना का व कशी घडली याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे. शरद पवार यांचे काळात ज्या मंत्र्यावर आराेप झाले त्यांनी राजीनामे दिले. परंतू ती नितिमत्ता आता ठेवयाची की नाही हे संवेदनशील सरकारने ठरवावे. नैतिकता सरकार मध्ये असावी सारखे विराेधकांनी सांगणे याेग्य नाही. राजीनाम्याचा निर्णय नैतिक पातळीवर व्हावा. गुन्हे वाढण्यासाठी आर्थिक कारणे देखील आहे. काही सामाजिक प्रश्नाबाबत सत्तेमधील लाेकांनी पुढाकार घेऊन सर्वपक्षीय बैठक घेतली पाहिजे ती महाराष्ट्राला करण्याची गरज आहे.

मी धनकवडीचा भाई … कोयते उगारुन टोळक्याने केली चार मोटारी, तसेच दुचाकींची तोडफोड

पुणे : धनकवडीत कोयते उगारुन टोळक्याने चार मोटारी, तसेच दुचाकींची तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.तोडफोड प्रकरणात साहिल दुधाणे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पियुष मोहन चव्हाण (वय २०, रा. ओम शिवशंभो हाईट्स, मोहननगर, धनकवडी) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दुधाणे याच्याशी चव्हाण याचा वाद झाला होता. बुधवारी रात्री आरोपी दुधाणे आणि साथीदारांनी चव्हाणला धनकवडी परिसरात अडवले. चव्हाण आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना कोयत्याचा धाक दाखविला. मला धनकवडीचा भाई म्हणतात, असे सांगून त्याने त्यांच्यावर कोयते उगारले. त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.आरोपींनी धनकवडीतील बसथांब्याजवळ रस्त्यावर लावलेल्या चार मोटारींच्या काचा फोडल्या, तसेच दोन दुचाकींची तोडफोड केली. चव्हाण याला धमकावून आरोपी मोटारीतून पसार झाले. या घटनेची माहिती मिळतात वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांनी घटनास्थळी भेट दिली. हवालदार चव्हाण तपास करत आहेत.

वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना हेल्मेट पुरविण्याच्या वितरकांना सूचना

पुणे, दि. 3: केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम १९८ अन्वये नवीन दुचाकी वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना खरेदीच्यावेळी वाहन वितरकाने दोन हेल्मेट पुरविण्याबाबत दुचाकी वाहन वितरकांना सुचना देण्यात आल्या आहेत; ग्राहकांनी नवीन दुचाकी वाहन खरेदी करतांना वितरकांकडून हेल्मेट घ्यावेत, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

दुचाकीस्वारांनी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर केल्यास अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे वाहनचालक आणि सोबत बसलेल्या व्यक्तीनेही रस्ता सुरक्षा मानकांची पूर्तता करणाऱ्या हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक आहे, अशी माहिती श्री. भोसले यांनी दिली आहे.

14 वर्षीय मुलाचा कुस्ती सरावानंतर हार्ट अटॅकनं मृत्यू

पुणे-माण तालुक्यातील मलवडी गावच्या 14 वर्षीय मुलाचा कुस्ती सरावानंतर हार्ट अटॅकनं मृत्यू झाला आहे. जय दीपक कुंभार, असं दुर्दैवी मुलाचं नाव असून तो पुण्यातील जाणता राजा कुस्ती संकुलात कुस्तीचा सराव करत होता. या घटनेनं त्याच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. तसेच कुस्ती क्षेत्रावरही शोककळा पसरली आहे.मलवडी (ता. माण) गावातील दीपक कुंभार यांनी जय या आपल्या एकुलत्या एका मुलाला नामवंत मल्ल बनविण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्या ध्येयानेच त्यांनी मुलाला सरावासाठी पुण्यातील जाणता राजा कुस्ती संकुलात दाखल केलं होतं. 7 ऑगस्ट 2010 रोजी जन्मलेल्या जय याने मलवडी, आंधळी येथे सराव करताना कुस्तीत चुणूक दाखवली होती. स्थानिक कुस्ती मैदानात तो नावलौकीक मिळवत होता. मात्र, लहान वयातच हार्ट अटॅकनं त्याचा मृत्यू झाल्यानं मुलाला नामांकित मल्ल बनविण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं.

शालेय कुस्ती स्पर्धेत सलग दोन वर्षे जयने 14 वर्षे वयोगटात राज्यपातळीवर तिसरा क्रमांक तर, यावर्षी 17 वर्षे वयोगटातील 62 किलो वजनी गटात विभागीय पातळीवर तिसरा क्रमांक पटकावला होता. नुकत्याच खंडोबा यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानातही जयने नेत्रदीपक कुस्ती करत वाहवा मिळवली होती.

मुलगा जयला महाराष्ट्र केसरी झाल्याचं वडीलांना पाहायचं होतं. तसंच जयने देशासाठी कुस्तीचं ऑलिम्पिक पदक मिळवावं, हे ध्येय ठेउन वडील दीपक कुंभार यांनी मुलाला पुण्यातील कुस्ती संकुलात दाखल केलं होतं. मात्र, जयच्या आकस्मिक निधनानं त्यांचं स्वप्न अधुरं राहिल.

अवघ्या 14 व्या वर्षी उदयोन्मुख मुलाचा मृत्यू झाल्यानं माण तालुक्यावर शोककळा पसरली. पुणे आणि माण तालुक्यातील मल्लांनी मलवडीकडे धाव घेतली. जयचे पार्थिव गावात आणल्यानंतर कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. यावेळी उपस्थितांचे काळीज पिळवटून गेले. त्याच्या अंत्ययात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते.

फोर्स मोटर्स लिमिटेडने उत्तर प्रदेश ला 2429 रुग्णवाहिका पुरवण्यासाठी करार केला

पुणे, भारत, 03 जानेवारी 2025 – व्यावसायिक आणि विशेष वाहनांची भारतातील आघाडीची उत्पादक कंपनी, फोर्स मोटर्स लिमिटेडने यूपी – सरकारी आरोग्य विभागाशी करार केल्याचे अभिमानाने जाहीर केले. या अंतर्गत कंपनी उत्तर प्रदेश सरकारला 2429 रुग्णवाहिका पुरवेल. या निमित्ताने आणीबाणीच्या वैद्यकीय वाहतुकीसाठी भारतीयांची पसंतीची निवड म्हणून तिचे स्थान अधिक मजबूत करत आहे.

ऑटोमोबाईल उद्योगातील अग्रगण्य फोर्स मोटर्स ही सुरुवातीपासूनच विश्वासार्हता, नावीन्य आणि उत्कृष्टतेचा समानार्थी शब्द आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, सरकारी आणि खासगी आरोग्य सेवा या दोन्ही क्षेत्रांसाठी कंपनी एक विश्वासू भागीदार म्हणून उदयास आली आहे, जी भारतातील वैविध्यपूर्ण आणि आव्हानात्मक भूभाग तसेच पायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

द फोर्स ट्रॅव्हलर रुग्णवाहिका, अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे वैशिष्ट्य, भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि पसंतीची रुग्णवाहिका म्हणून मोठ्या प्रमाणावर ओळखली जाते. त्याची अतुलनीय विश्वासार्हता, आतील प्रशस्त भाग आणि मजबूत गुणवत्तेसाठी ओळखली जाणारी, ट्रॅव्हलर रुग्णवाहिका याशिवायही अनेक गोष्टी ऑफर करते:

  • अपवादात्मक सुरक्षा आणि आराम: संक्रमणादरम्यान रुग्णाची सुरक्षितता आणि सोयी सुनिश्चित करण्यासाठी डिझाइन केलेले, हे प्रगत निलंबन प्रणाली, अर्गोनॉमिक आसन व्यवस्था आणि वैद्यकीय उपकरणांसाठी अनुकूल जागा यांनी सुसज्ज आहे.
  • सगळ्या परिस्थितींसाठी उपयोगी: रुग्ण वाहतूक, बेसिक लाइफ सपोर्ट (BLS), ॲडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट (ALS) आणि मोबाइल मेडिकल युनिट (MMU) यासह अनेक कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध, आरोग्यसेवा पुरवणाऱ्यांच्या विविध गरजांची पूर्तता
  • अतुलनीय टिकाऊपणा: भारतातील आव्हानात्मक रस्त्यांच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार केलेले, अत्यंत कठीण परिस्थितीसाठी उत्तम कामगिरीची खात्री

फोर्स मोटर्सच्या रुग्णवाहिका शक्तिशाली ड्राईव्हलाइन्स आणि इतर सुविधांनी सुसज्ज आहेत जे गोल्डन अवरला महत्त्व देऊन किमान संभाव्य वेळेत रुग्ण वाहतूक करण्यास मदत करतात.

भारतीय रुग्णवाहिका विभागातील प्रमुख बाजारपेठेतील हिस्सा आणि वाढत्या जागतिक उपस्थितीसह, फोर्स मोटर्सने गुणवत्ता आणि कामगिरीत सातत्याने बेंचमार्क सेट केले आहेत. राज्य सरकारे, रुग्णालये, खासगी आरोग्य सेवा पुरवठादार आणि स्वयंसेवी संस्था यांच्यावर विश्वास ठेवलेल्या, ट्रॅव्हलर ॲम्ब्युलन्सने आपत्कालीन वैद्यकीय वाहतुकीसाठी उत्तम पर्याय म्हणून लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. त्याची अनुकूलता, कमी देखभाल खर्च आणि विश्वासार्हता याला भागधारकांसाठी एक पसंतीचा पर्याय बनवते.

फोर्स मोटर्सकडून 2429 रुग्णवाहिका खरेदी करण्याचा यूपी-सरकारच्या आरोग्य विभागाचा निर्णय राज्याच्या आरोग्यसेवा पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करतो. ही वाहने आपत्कालीन प्रतिसाद क्षमता वाढविण्यात तसेच शहरी आणि ग्रामीण भागातील लाखो रहिवाशांना वेळेवर वैद्यकीय सहाय्य सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

या यशाबद्दल बोलताना, फोर्स मोटर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रसन फिरोदिया म्हणाले, “उत्तर प्रदेश सरकारच्या आरोग्य विभागाने या महत्त्वाच्या आरोग्य सेवा उपक्रमासाठी आमची निवड केल्याचा आम्हाला अभिमान आहे. हा टप्पा फोर्स मोटर्सच्या भारताच्या अनन्य आरोग्यसेवा गरजा पूर्ण करणारी भरोसेमंद, उच्च-गुणवत्तेची समाधाने प्रदान करण्याच्या वचनबद्धतेला बळकटी देतो. ग्राहकांना नवनवीन गोष्टी तसेच दर्जेदार उत्पादने देण्यासाठी आम्ही समर्पित आहोत.

दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या सरकार्यवाहपदाची जबाबदारी मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वीकारली

संमेलनाबाबत पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करेन : मुरलीधर मोहोळ

संमेलनाच्या साहित्य परिषदेतील संपर्क कार्यालयाचे मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : पुण्याने देशामध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पुणे विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि साहित्याची भूमी समजली जाते. विचारांची-इतिहासाची वारसा असलेली ही भूमी आहे. संमेलनाच्या सरकार्यवाहपदाची जबाबदारी सांभाळताना मी कुणी साहित्यिक अथवा अभ्यासक या भूमिकेतून कार्य करणार नसून मी एक कार्यकर्ता या भूमिकेतून जबाबदारीच्या जाणीवेने, आत्मियता जपत पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करेन, अशी ग्वाही केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

सरहद, पुणेतर्फे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पुण्यातील संपर्क कार्यालय साहित्य परिषदेत सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन आज (दि. 2) मोहोळ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. संमेलनाच्या सरकार्यवाहपदी नेमणूक केल्याबद्दलचे पत्र मंत्री मोहोळ यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, सरहद पुणेचे अध्यक्ष संजय नहार, डॉ. सतिश देसाई, शैलेश पगारिया, सचिन ईटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. पुणे शहरातील सांस्कृतिक घडामोडींचे नियमित वृत्तांकन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचा, साहित्य सेवकांचा सत्कार या प्रसंगी मंत्री मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ असे सन्मानाचे स्वरूप होते.

साहित्य क्षेत्रातील वृत्तांकन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींच्या कार्याचा गौरव करून मंत्री मोहोळ पुढे म्हणाले, दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाचे महत्त्व मोठे असून प्रत्येकाच्या मनात असलेली कार्यकर्त्याची भूमिका माझ्याही मनात आहे. यातूनच आत्मविश्वासपूर्णतेने साहित्य संमेलनाच्या यशस्वीततेसाठी मी बांधील आहे. पुण्याचा प्रतिनिधी आणि पुण्याविषयी आदरभाव जपत प्रामाणिकपणे चांगले काम करून माझ्या शहराचे नाव जपेन.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, साहित्य संमेलन हा भाषिक उत्सव, भाषेची जत्र असते. हा उत्सव अधिक देखणा करण्यासाठी प्रत्येकाच्या मनात आदरभाव असून त्या दृष्टीने आम्ही कार्यरत आहोत. दिल्ली येथे होणारे साहित्य संमेलन प्रयोगशीलता आणि नाविन्यतेचा वापर करून संयोजक संजय नहार आणि त्यांचे सहकारी अधिक देखणे करतील.

प्रास्ताविकात संजय नहार म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे असे व्यासपीठ आहे जेथे महाराष्ट्राची व्यापक भूमिका मांडली जाते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर दिल्लीत होणारे हे पहिले संमेलन आहे. दिल्लीत संमेलन आयोजित करण्याची संधी सरहद पुणेला मिळाली आहे, याचा आनंद आहे. दिल्लीत होणाऱ्या संमेलनामागे मराठी माणूस एक होत आहे ही संकल्पना जपली जात आहे.

शफी पठाण आणि प्रशांत गौमत यांनी माध्यम प्रतिनिधींच्या वतीने मनोगत व्यक्त केले. सुरुवातीस मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा सत्कार प्रा. मिलिंद जोशी यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर आभार लेशपाल जवळगे यांनी मानले.

भक्तांच्या साक्षीने सामूहिक शंकरगीता पारायण सोहळा संपन्न

सहस्त्र शंकर गीता पारायण समितीच्या  वतीने सोहळ्याचे आयोजन 
पुणे: सद्गुरू शंकरबाबा महाराज की जय… च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. शंकर महाराजांची महाआरती, महिमा, लिला, कथा, भजन आणि भक्तांना आलेली प्रचिती अशा विविधांगी अनुभूतीने एक दिवसीय सहस्त्र शंकरगीता पारायण सोहळा पुण्यात संपन्न झाला.  
सातारा रस्त्यावरील शिवछत्रपती शिवाजी मंगल कार्यालय धनकवडी येथे श्री स्वामी भक्त मठाधिपती गुरुवर्य दादा ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सद्गुरू शंकर बाबांच्या एक दिवसीय सहस्त्र शंकरगीता पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. अनिल हगवणे, कमलेश दुबे, संतोष सपकाळ, तेजस मर्चंट, श्रीधर साळुंखे,  निरंजन जाधव, प्रदीप बधे यांनी सोहळ्यासाठी विशेष सहकार्य केले.
सहस्त्र शंकर गीता पारायण समितीच्या माध्यमातून शंकर बाबांच्या भक्त परिवारात हा पारायण सोहळा संपूर्ण वर्षभर कोणतेही मानधन न घेता साजरा केला जातो. आज पर्यंत हजारो भक्तांच्या घरी हा पारायण सोहळा संपन्न झालेला आहे. त्यातूनच नवीन वर्षाची सुरुवात स्वामीच्या बाबाच्या सेवेने होवो, हा उद्देश आहे.    

उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. महाराष्ट्रातील हा पहिला सहस्त्र शंकरगीता पारायण सोहळा असून सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून हजारो भक्तांनी उपस्थिती लावली. सोहळ्यात सकाळी इष्टदैवत पीठ पूजन झाल्यानंतर शंकर गीता पारायणाला सुरुवात झाली. सायंकाळी महाआरती नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर विविध भजनी मंडळांची भजन सेवा सादर झाली.

‘भीमरूग्ण सेवा’आरोग्य शिबिर एक उत्तम उपक्रम – शहर अभियंता वाघमारे


पुणे: कोरेगाव भीमा येथे २०७ व्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी आलेल्या लाखो भीमसैनिकांना आरोग्यसेवा पुरविण्यात आली. सिम्बायोसिस अभिमत विद्यापीठ व ‘सौ. शीला राज साळवे मेमोरिअल ट्रस्ट’ यांच्यातर्फे कोरेगाव भीमा येथे ‘भीमरुग्ण सेवा’ आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.या आरोग्य शिबिराचे उद्घाटन पुण्याचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या हस्ते झाले. प्रसंगी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सुरेश साखरे, सुशील मोहिते, ऍड. अतुल राज साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. आरोग्य तपासणी, गोळ्या-औषधांचे वाटप, वेदनाशामक औषधे वाटप करण्यात आली.
प्रशांत वाघमारे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. देशभरातून आलेल्या भीमसैनिकांना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आरोग्य सेवा पुरविण्याचे कार्य कौतुकास्पद आहे. सिम्बायोसिस विद्यापीठ आणि साळवे मेमोरियल ट्रस्टने नेहमीच अशा उपक्रमांमध्ये पुढाकार घेतेलेला आहे. या उपक्रमामुळे हजारो लोकांची सेवा झाली आहे. विजयस्तंभाला अनोख्या पद्धतीने केलेले अभिवादनच आहे, असे वाघमारे म्हणाले.
ऍड. अविनाश राज साळवे म्हणाले, “शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी खेड्यापाड्यातून कोरेगाव भीमा येथे लाखो भीमसैनिक येतात. अनेकजण पायी चालत येत असतात. अशा सर्वांना अभिवादन स्थळी आरोग्य सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने या ‘भीमरूग्ण सेवा’ आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. हजारो लोकांवर उपचार केल्याचे समाधान मिळते.”सिम्बायोसिस’चे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार व साळवे मेमोरियल ट्रस्टचे प्रमुख ऍड. अविनाश राज साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या आरोग्य शिबिरात हजारो भीमसैनिकांनी औषधोपचाराचा लाभ घेतला. गेल्या सहा वर्षांपासून आरोग्यसेवेतून विजयस्तंभास मानवंदना देण्याचा उपक्रम या दोन्ही संस्थांकडून राबविण्यात येत आहे.

महाराष्ट्र पोलीस दलाचे शौर्य अतुलनीय – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा

मुंबई, दि. 2 : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन’ साजरा करण्यात आला. पोलीस दलाचे शौर्य अतुलनीय असून हे देशातील आदर्श पोलीस दल असल्याचे प्रतिपादन राज्यपाल राधाकृष्णन यांनी केले. गोरेगाव येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी, पोलीस जवान व निमंत्रित उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले की, मागील काही वर्षांमध्ये पोलीस दलातील आव्हाने वाढली आहेत. सागरी सुरक्षा, नक्षलवाद यांसारखे धोके आहेतच. त्याशिवाय सायबर सुरक्षा, युवकांमध्ये वाढती नशाखोरी आदी नव्या आव्हानांमुळे पोलिसांना अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. राज्य शासन पोलीस दलाचे आधुनिकीकरण करीत आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती देखील होत आहे. यामध्ये महिलांची वाढती संख्या ही उल्लेखनीय बाब आहे. महाराष्ट्र पोलीस हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्यांच्या अद्वितीय समर्पण, शौर्य आणि उत्कृष्टतेसाठी ओळखले जातात. या जबरदस्त दलाने दहशतवादी हल्ले, संघटित गुन्हे, टोळी युद्धे आणि बॉम्बस्फोट अशा असंख्य आव्हानांना सामोरे जात त्यांचा यशस्वी सामना केला असल्याचे राज्यपालांनी यावेळी नमूद केले.

मुंबईवरील 26 नोव्हेंबर 2008 च्या हल्ल्यात दहशतवाद्यांना पकडून देण्यासाठी गोळ्या झेललेल्या तुकाराम ओंबळे यांच्या शौर्याचे राज्यपालांनी विशेष कौतुक केले. अशा शौर्यांच्या माध्यमातून भारत कोणत्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेणार नसल्याचा संदेश दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. एक गुन्हेगार पुढे टोळीचे रूप धारण करू शकतो, त्यामुळे अनधिकृत शस्त्रे, अमली पदार्थ यांना पायबंद घालून महाराष्ट्र पोलीस गुन्हेगारी नष्ट करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

2 जानेवारी 1961 रोजी भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान केला होता. त्यामुळे 2 जानेवारी हा दिवस पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो, अशी माहिती पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी प्रास्ताविकाद्वारे दिली. भयमुक्त वातावरण ठेवून सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरुवातीला राज्यपालांनी वर्धापन दिन संचलनाचे निरीक्षण केले व शिस्तबद्ध संचलनाकडून मानवंदना स्वीकारली.  संचलनामध्ये राज्य राखीव पोलीस बल पथक, मुंबई पोलीस सशस्त्र दल पथक, मुंबई पोलीस महिला पथक, ठाणे शहर- लोहमार्ग पोलीस पथक, मुंबई पोलीस दंगल नियत्रंण पथक तसेच निशान टोळी सहभागी झाले होते. यावेळी विशेष संचलन आणि हर्ष परेड सादर करण्यात आली. तसेच पाईप बँड आणि सायलेंट आर्म ड्रिल ची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.  यावेळी महासंचालकांनी राज्यपालांना स्मृतिचिन्ह प्रदान केले.

००००

‘कृत्रिम बुद्धीमत्तेचा’ उपयोग करून मंत्रालयातील सुरक्षा भक्कम करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 2 : राज्याच्या काना- कोपऱ्यातून आपल्या कामाच्या पुर्ततेसाठी नागरीक मंत्रालयात येत असतात. त्यामुळे मंत्रालयामध्ये भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असते. परिणामी, मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेवर ताण पडतो. मंत्रालयात येणारे नागरिक, येथील अधिकारी व कर्मचारीवृंद यांना विनासायास, सुलभ प्रवेश मिळावा आणि सुरक्षा पण भक्कम रहावी, यासाठी कृत्रिम बुद्धमतेचा उपयोग करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

मंत्रालयात आज आयोजित बैठकीत मंत्रालय सुरक्षा व्यवस्थेचा आढावा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी घेतला. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. इक्बालसिंग चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या सारख्या आधुनिक तंत्रज्ञानातून मंत्रालय प्रवेश ते बाहेर पडेपर्यंतची व्यवस्था कार्यरत करण्याच्या सूचना देत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मंत्रालयातून विधान भवनात कार्यालयीन कामकाजासाठी अधिकारी व कर्मचारी जात असतात. अधिवेशनादरम्यान तर विधान भवन ते मंत्रालय वर्दळ वाढलेली असते. विधान भवनात नियमित कार्यालयीन कामासाठी जात असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना सर्व ठिकाणी प्रवेश असलेल्या सुरक्षा पासेस देण्यात याव्यात. मंत्रालय ते विधान भवन भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. या भुयारी मार्गामध्ये विधान भवनात जाणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रवेश मार्ग उपलब्ध करून द्यावा.

मंत्रालयात प्रत्येक मजल्यावर सुरक्षा जाळीचे काम पूर्ण करावे. काम पूर्ण झाल्यास मध्ये लावलेली सुरक्षा जाळे काढून टाकावे. मंत्रालय प्रवेशद्वारावर सामानाची चोख तपासणी करण्यात यावी. कुठलीही आक्षेपार्ह वस्तू मंत्रालयात येणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

भाजपात गेलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या जागांवरून भाजपा -शिंदेंच्या सेनेत रस्सीखेच सुरु

पुणे-जिथे जिथे ठाकरे गटाचे नगरसेवक आहेत आणि आता जे ५ भाजपात गेलेत अशा ५ हि जागा आमच्या असल्याचा दावा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने केल्याने भाजपात जाऊन तिथे उमेदवारी मागणाऱ्यांचा संघर्ष आता टप्प्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरेंना माननाऱ्या आणि ठाकरेंचे वारस उद्धव ठाकरेच असे मानणारे कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या , आदित्य ठाकरेंच्या शिवसेनेत अजूनही आहेत . यातील कट्टर म्हणून ओळखले जाणारे विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल,पल्लवी जावळे आणि अन्य २ असे ५ नगरसेवक भाजपा नेते फडणवीस यांना भेटले आणि त्यांनी भाजपचा प्रवास सुरु केला आहे. यात आता शंका घेण्याचे कोणतेही कारण उरलेले नाही. मात्र भाजपात गेल्यावर कसा संघर्ष करावा लागतो हे कॉंग्रेस मधून गेल्या ७/८ वर्षापूर्वी भाजपात गेलेल्यांना चांगले ठाऊक आहे त्याची चिन्हे आताच या ५ नगरसेवकांच्या भाळी देखील असल्याचे दिसून येत आहे. कारण त्या ५ जागा भाजपने घेऊ नये त्या आमच्या शिवसेनेच्या आहेत असा दावा आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सुरु केला आहे. ज्यामुळे ठाकरे गटातून भाजपात गेलेल्यांना संघर्ष करावा लागणार आहे.

राज्यात महायुतीनं सरकार स्थापन केलं असलं तरी अनेक वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहेत. खातेवाटपावरुन शिंदे गट आणि भाजपमधील सुरु झालेला वाद आता महापालिका निवडणुकीतही पाहायला मिळणार आहे. भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांच्या जागा ह्या आमच्याच असल्याचा दावा शिंदे गटाच्या शिवसेनेनं केला आहे. यासंदर्भात शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरुन आणि निकालानंतर खातेवाटपावरुन शिंदे गट आणि भाजप यांच्यात नाराजी नाट्य पाहायला मिळाले. पक्षातील बड्या नेत्यांनी हे चित्र लपवण्याचा प्रयत्न केला. पण आता या वादाची ठिणगी पुण्यात पडली आहे.

नाना भानगिरे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. शिवसेनेने यापूर्वी लढलेल्या जागांवर शिवसेनेचा हक्का असल्यामुळं त्या जागांवर शिवसेनेचेच उमेदवार निवडणूक लढवतील अशी भूमिका नाना भानगिरे यांनी मांडली आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेने जितक्या जागांवर निवडणूक लढवली आहे. तेवढ्या जागांवर आता आम्ही निवडणूक लढवणार आहे अस भानगिरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.तसेच, शहरातील सर्व प्रभागांमध्ये निवडणुक लढविण्याच्यादृष्टीने आमच्या पक्षाच्या बैठका सुरु आहेत. मतदार नोंदणी, संपर्क अभियान राबविलं आङे. 35 ते 40 जागांवर आम्ही निवडणूक लढवणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडकीवेळी आम्ही युतीतील घटक पक्षांच ऐकलं आहे. आता वरिष्ठ जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असही यावेळी भानगिरे म्हणाले.तसेच, यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीची माहितीदेखील दिली. यावेळी पक्षाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अजय भोसले यांच्यासह महिला पदाधिकारीदेखील उपस्थित होत्या.

वीजबिलांच्या शून्य थकबाकीला प्राधान्य देत ग्राहकसेवा गतिमान करा,महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांचे निर्देश

पुणे, दि. ०२ जानेवारी २०२५पुणे परिमंडलामध्ये दरमहा वीजविक्रीचा महसूल आता १९०० कोटींवर गेला आहे. या महसूलाची वसूली करताना शून्य थकबाकीला प्राधान्य द्यावे व कोणत्याही परिस्थितीत चालू वीजबिलांची १०० टक्के वसूली करावी. तसेच नवीन वीजजोडणी, ‘सौर’शी संबंधित विविध योजना, अचूक बिलिंग आदींच्या माध्यमातून ग्राहकसेवा आणखी गतिमान करावी असे निर्देश महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिले.

रास्तापेठ येथील ‘प्रकाशदूत’ सभागृहात बुधवारी (दि. २) पुणे परिमंडलातील विविध कामांचा मुख्य अभियंता श्री. पवार यांनी आढावा घेतला. पुणे परिमंडलातील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीत तत्पर ग्राहक सेवा देण्यासाठी अधिक सजग व सज्ज राहावे तसेच ज्या शाखा कार्यालयांचे ग्राहकसंख्येनुसार विभाजन करणे आवश्यक आहे तसे प्रस्ताव त्वरित सादर करावेत अशी सूचना यावेळी त्यांनी केली.

मुख्य अभियंता श्री. पवार यांनी सांगितले, की सद्यस्थितीत पुणे परिमंडलामध्ये २४३ कोटी रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. या थकबाकीसोबतच चालू वीजबिलांची १०० टक्के वसूली करणे क्रमप्राप्त आहे. ग्राहकसेवेच्या बाबतीत पुणे परिमंडलाची कामगिरी उंचावत आहे. नवीन वीजजोडण्या देण्याचा मासिक वेग १६ हजारांवरून २० हजारांवर गेला आहे. नवीन वीजमीटर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी इन्फ्राची गरज नाही तेथे कोटेशनचा भरणा केल्यानंतर तात्काळ वीजजोडणी देण्यात यावी. अचूक बिलिंगमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे त्याचे प्रमाण वाढून ९५.५२ टक्क्यांवर गेले आहे. वीजग्राहकांची डिजिटल ग्राहकसेवेला पसंती वाढत असून दरमहा राज्यात सर्वाधिक सरासरी ८३ टक्के लघुदाब वीजबिलांचा भरणा ऑनलाइनद्वारे होत आहे. तसेच गो-ग्रीन योजनेला पुण्यातील वीजग्राहकांनी राज्यात सर्वाधिक पसंती दिली आहे.  

पुणे परिमंडलामध्ये भविष्यातील वीजसेवेसाठी प्रस्तावित अतिउच्चदाबाच्या २१ पैकी ८ उपकेंद्रांना महावितरणकडून मंजूरी मिळाली आहे. तत्पर ग्राहकसेवेसाठी भोसरी, चाकण उपविभागांचे विभाजन करून नवीन उपविभाग व शाखा कार्यालये तसेच नगररोड विभागात नवीन लोहगाव व चंदननगर शाखा कार्यालयांना मंजूरी मिळाली आहे, अशी माहिती मुख्य अभियंता श्री. पवार यांनी दिली.

‘सौर’च्या माध्यमातून पारंपरिककडून अपारंपरिक ऊर्जानिर्मितीकडे नव्या परिवर्तनाचा वेगवान प्रवास सुरू झाला आहे. यातील पीएम सूर्यघर मोफत वीज योजना व इतर ‘सौर’ योजनांच्या अंमलबजावणीमध्ये आणखी वेग द्यावा असे निर्देश मुख्य अभियंता श्री. पवार यांनी दिले. यावेळी सहायक महाव्यवस्थापक (वित्त) सौ. माधुरी राऊत, कार्यकारी अभियंता श्री. धनराज बिक्कड (प्रशासन) तसेच सर्व विभागांचे कार्यकारी अभियंता, अधिकारी उपस्थित होते.