Home Blog Page 513

आंतरराष्ट्रीय परिषदेत एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईनचा रिमोट केंद्र म्हणून सहभाग

पिंपरी, पुणे (दि. ०६ जानेवारी २०२५) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाइनने तीन आणि चार जानेवारीला आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय शाश्वतता उद्दीष्टे चिंतन परिषदेमध्ये रिमोट केंद्र म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. एकुण १५ रिमोट केंद्रांपैकी पुण्यातून एकमेव केंद्र एस. बी. पाटील आर्किटेक्चर कॉलेज येथे होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते करण्यात आले. इंदलकर यांनी १७ शाश्वतता उद्दीष्टे आणि भारतातील त्यांची अंमलबजावणी याविषयी माहिती दिली.
प्रभारी प्राचार्य आर्किटेक्ट शिल्पा पाटील यानी संशोधन टीम आणि विद्यार्थी परिषेदेच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने स्वच्छ उर्जा, शाश्वतता शहरे आणि हवामान कृती यासारख्या महत्वाच्या विषयावर केलेले कार्य याबाबत माहिती दिली.
आर्किटेक्चर आणि अभियांत्रिकी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत या परीषेदेने शाश्वततेच्या दिशेने प्रयत्नशिल पावले उचलण्यावर भर दिला आणि स्थानिक समुदायात जनजागृती केली.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुत्रसंचालन प्रा. अनुजा सिंग यांनी केले.

माझ्यावरील आरोप फेक नरेटीव्ह:अजित पवारांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे यांचा दावा

प्रकरणाची मीडिया ट्रायल सुरू असण्यावर आक्षेप
मुंबई-बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे अडचणीत सापडलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी आज उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी आपल्यावरील विरोधकांचे आरोप फेक नरेटीव्ह असल्याचा दावा केला. तसेच अजित पवारांशी मस्साजोग प्रकरणावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचाही दावा केला. त्यांच्या या दाव्यामुळे संतोष देशमुख हत्याकांडाचा मुद्दा अधिकच तापण्याची शक्यता आहे.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणी संशयाची सूई धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांच्याकडे जात आहे. पर्यायाने बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांसह अनेक नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी सोमवारी अजित पवारांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांत जवळपास तासभर चर्चा झाली. पण त्याचा तपशील बाहेर आला नाही. पण सूत्रांनी या दोन्ही नेत्यांतील चर्चेचा केंद्रबिंदू देशमुख यांची हत्या व विरोधकांनी केलेली राजीनाम्याची मागणी हा असल्याचा दावा केला आहे.

दुसरीकडे, धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संक्षिप्त संवाद साधला. ते म्हणाले, मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवारांची भेट घेतली. मी त्यांना माझ्याची खात्याची माहिती दिली. आमच्यात माझ्या राजीनाम्यावर कोणतीही चर्चा झाली नाही हे मी ईमानदारीने सांगतो. कुणी काय आरोप करावे हे लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहेत. मी कुणाकुणाचे तोंड धरणार? त्यामुळे जे कुणी माझ्यावर आरोप करत आहेत, त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना तुम्ही हा प्रश्न विचारावा. विशेषतः ते महायुतीचे आमदार असतील तर त्यांनीही आपले पक्षप्रमुख व मुख्यमंत्र्यांना विचारले पाहिजे.

हिवाळी अधिवेशनात काही आमदारांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. ती मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केली आहे. या प्रकरणात माझ्यावर संशय आहे. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणे योग्य नाही. या प्रकरणाचा अतिशय व्यवस्थित तपास सुरू आहे. हा तपास पूर्ण झाल्यानंतर मी बोलेन. माझ्यावर होणारे आरोप फेक नरेटिव्ह आहेत. यासंबंधी ट्रायल कोर्टात झाली पाहिजे. तपास यंत्रणांचा तपास सुरू आहे. या प्रकरणी मीडिया ट्रायल करणे सुरू चुकीचे आहे असे माझे मत आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.

मगरपट्टी सिटीत गुंतविला काळा पैसा, 100 बँक खाती, 1 हजार कोटींची मालमत्ता; सुरेश धस यांचे गौप्यस्फोट

बीड
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे व खंडणी प्रकरणात अटक झालेल्या वाल्मीक कराड यांचे अनेक ठिकाणी संयुक्त भूखंड असल्याचा दावा भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. संतोष देशमुख हत्या व खंडणी प्रकरणात आका हे वाल्मीक कराड आहेत, तर आकाचे आका हे धनंजय मुंडे आहेत. य दोघांच्या अनेक ठिकाणी मालमत्ता आहेत. या लोकांनी आपल्या ड्रायव्हरच्या नावाने पुण्यात मगरपट्टी सिटीत एक अख्खा मजलाच बूक केला आहे, असे ते म्हणालेत. त्यांच्या या आरोपामुळे बीडचे राजकारण अधिकच तापले आहे

सुरेश धस सोमवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, सरपंच हत्या प्रकरणातील आका हे वाल्मीक कराड आहेत, तर आकाचे आका हे धनंजय मुंडे आहेत. या दोघांची अनेक ठिकाणी संयुक्त मालमत्ता आहे. कुठेही विचारा, लोक सांगतील वाल्मीक कराडची 45 एकर जमीन आहे. अमूक ठिकाणी 50 एकर, बार्शी तालुक्यात 45 एकर, सोनपेठ तालुक्यात 45 एकर, दुसरीकडे 50 एकर, शिरसी तालुका माजलगाव येथे 45 ते 50 एकर. आमच्याकडे मांजरसुंबा नामक एक गाव आहे. तिथे 45 एकर जमिनी त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या नावाने आहे.

पुण्यातील मगरपट्टी सिटी येथे एक नवीन इमारत आहे. तिथे या लोकांनी आपल्या ड्रायव्हरच्या नावाने अख्खा मजलाच बूक केला आहे. हे पैसे कुणाचे आहेत? हे पैसे धनंजय मुंडे यांचे नव्हेत तर कुणाचे आहेत? आमच्याकडे प्रॉपर्टीच्या प्रकरणात जैन मल्टिस्टेटची चौकशी सुरू आहे. त्यात बहुतांश प्रॉपर्टीत धनंजय मुंडे यांच्या पत्नी व वाल्मीक कराड यांची नावे आहेत. मी या प्रकरणी एसीबी चौकशीची मागणी करणार आहे

सुरेश धस पुढे म्हणाले, वाल्मीक कराड एक-दोन नव्हे तर तब्बल 17 मोबाईल वापरतात. त्यांचे 100 बँक अकाउंट सापडले आहेत. त्या अकाउंटमध्ये 1000 कोटींहून अधिक जमा मुद्दल असण्याची शक्यता आहे. अदानी किंवा अंबानीसुद्धा 17 मोबाईल वापरत नसतील. मी अंबानी विचारणार आहे की, तुम्ही किती मोबाईल वापरता? किंवा नीता अंबानी यांनाही मी हाच प्रश्न करेन. एवढे जास्त मोबाईल कशासाठी लागतात? हे सर्व संशयास्पद आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या पद्धतीने झाली ती अतिशय चुकीची आहे. आपल्या मराठी भाषेच्या शब्दकोशात जितक्या वाईटात वाईट शब्द असेल त्या पद्धतीने ही हत्या झाली. वाल्मीक कराड व धनंजय मुंडे हे दोघे आका व आकाचे आका आहेत. हे दोघेही एकमेकांत एवढे गुंतले आहेत की, त्यांना वेगळे करताच येत नाही. 14 व 29 जून रोजी कुठे बैठक झाली? संतोष देशमुख यांच्या हत्येची सुरुवात जून महिन्यात झाली. त्याच्या प्रमुख बैठकीला धनंजय मुंडे होते. धनंजय मुंडे यांचा सातपुडा हा शासकीय बंगला आहे. मी काल स्टेटमेंट केले की, ही बैठक या शासकीय बंगल्यात झाली. वाल्मीक कराडने उभे केलेले हे साम्राज्य मागील 5 वर्षांतील आहे.

जामीन देण्यासाठी लष्कर न्यायालायात बनावट कागदपत्रे, संतोष तेलंग याच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे-कारागृहात बंदिस्त असलेल्या सराईत गुन्हेगार आरोपीस जामीन देण्यासाठी लष्कर न्यायालायात बनावट कागदपत्रे सादर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार वानवडी पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी बनावट आधारकार्ड, शिधापत्रिका ही बोगस कागदपत्रे जप्त केली आहे.

याप्रकरणी संतोष शंकरराव तेलंग (वय ३२, रा. शेवाळवाडी , हडपसर,पुणे) याच्यासह सात आरोपीांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी सोमनाथ कांबळे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर न्यायालयाचे स्थलांतर वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले आहे. सराईत गुन्हेगार बच्चनसिंग जोगिंदरसिंग भोड याला कोंढवा पोलिसांनी गंभीर चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. भोंडविरुद्ध चार गु्न्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यात भोंडला जामीन मिळवून देण्यासाठी लष्कर न्यायालयातील एका वकिलामार्फत तेलंग आणि साथीदारांनी बनावट कागदपत्रे सादर केली. कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी बनावट आधारकार्ड, शिक्षापत्रिका सापडल्या. चौकशीत बनावट कागदपत्रे सादर करुन जामीन मिळवून देण्याचा प्रकार उघडकीस आला.तेलंग याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत बनावट कागदपत्रे देखील मिळून आले आहे . वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस टोणे पुढील तपास करत आहेत.

नैनीतालमध्ये पार पडला ‘असंभव’ या चित्रपटाचा मुहूर्त

मराठीतील नामंवत कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. ‘असंभव’ ह्या त्यांच्या आगामी चित्रपटाताचा मुहूर्त नुकताच नैनीताल येथे पार पडला. हा चित्रपट येत्या १ मे २०२५ ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रदर्शित होणार असून नितीन प्रकाश वैद्य,  सचित पाटील यांची मुंबई-पुणे एंटरटेनमेंट आणि शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई यांची एरिकॉन टेलिफिल्मस ह्या दोन्ही निर्मिती संस्था पहिल्यांदाच ‘असंभव’ या आगामी सिनेमाच्या निर्मितीसाठी एकत्र आल्या आहेत.

वळू ‘नाळ’, ‘गच्ची’, अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ ते ‘लाईक आणि सबस्क्राईब’ अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांच्या निर्मितीचा अनुभव गाठीशी असलेल्या नितीन प्रकाश वैद्य यांची भक्कम साथ या सिनेमाला लाभणार आहे. ‘क्षणभर विश्रांती’ आणि ‘साडे माडे तीन’ या यशस्वी चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर सचित पाटील निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे.  तसच निर्माते शर्मिष्ठा राऊत  आणि तेजस देसाई यांचा 

‘नाच गं घुमा’ हा सिनेमा महाराष्ट्रभर  गाजला होता त्यामूळे या आगामी सिनेमाकडून देखिल प्रेक्षकांना अपेक्षा आहेत

हाय काय नाय का, ,उबुंटू या सिनेमानंतर आता दिग्दर्शक, अभिनेते पुष्कर श्रोत्री ‘असंभव’ या सिनेमाचं देखिल दिग्दर्शन करत आहेत.

 इतक्या ताकदवर कलाकारांना एकत्र आणणारा ‘असंभव’ हा चित्रपट रहस्यपट आहे की थरारपट? ही पूर्णतः नवीन विषयावरची कलाकृतीं आहे की एखाद्या जुन्याच विषयाशी याचे धागेदोरे जुळतायेत? या सगळया प्रश्नांच्या उत्तरांसह या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

‘सिंधी प्रीमिअर लीग’चे सहावे पर्व १५ फेब्रुवारीपासून

सामाजिक एकोप्याच्या भावनेतून आयोजन; सहाव्या हंगामात १६ पुरुष, आठ महिला संघ खेळणार
पिंपरी (पुणे) : सिंधी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे सहावे पर्व यंदा १५ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२५ या कालावधीत पिंपरी येथे होणार आहे. या स्पर्धेत यंदा १६ पुरुष, तर आठ महिला संघ सहभागी होणार आहेत. पिंपरी येथील एमसीसी, मृणाल क्रिकेट ग्राउंडवर होणाऱ्या या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण सिंधी प्रीमिअर लीग फेसबुक पेजवरून पाहता येणार आहे, अशी माहिती संयोजन समितीचे कन्वल खियानी, हितेश दादलानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
थेरगाव येथील हॉटेल नूरीयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेवेळी उद्योजक डब्बू आसवानी, श्रीचंद आसवानी, सागर तेजवानी यांच्यासह संयोजन समितीतील कमल जेठानी, रोनक पंजाबी, अवि इसरानी, अंकुश मुलचंदानी, नरेश नशा, करण आसवानी, अवि तेजवानी, सोमेश गिडवाणी, कुणाल गुडेला, रितेश आठवानी, मनीष गेरेजा, महिला प्रतिनिधी अवनी तेजवानी, खुशबू पंजाबी, हिना गोगिया, शिखा सेवानी, शीतल पहलानी, रुपाली पंजाबी संघमालक व प्रायोजक उपस्थित होते.
हितेश दादलानी म्हणाले, “देशभरात विखुरलेला सिंधी समाज एकत्रित यावा, त्यांच्यात तंदुरुस्तीविषयी जागरूकता व्हावी, तसेच मोबाईल-इंटरनेटच्या जाळ्यात न अडकता मैदानावर खेळण्याला प्राधान्य द्यावे आणि खेळातून उभारलेल्या निधीचा समाजासाठी उपयोग व्हावा, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली जाते. सिंधी समाजातील उद्योजक तरुणांनी एकत्र येऊन या क्रिकेट लीगचे आयोजन केले आहे. ‘सिंधी प्रीमियर लीग सीजन ६’चे उद्घाटन १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यावेळी माजी क्रिकेटपटू, सिंधी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, तसेच खेळाडू, संघ मालक व कुटुंबीयांची उपस्थिती असणार आहे. स्पर्धेतून मिळालेला निधी सामाजोपयोगी आणि विधायक कामासाठी देण्यात येतो”
कन्वल खियानी म्हणाले, “गेल्या पाचही हंगामात या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यंदा स्पर्धेला अधिक व्यापक स्वरूप आले असून, खेळाडूंची संख्याही वाढली आहे. पुण्यासह परभणी, जळगाव, नांदेड, बंगळुरू, जयपूर येथूनही खेळाडू सहभागी होत आहेत. आयपीएलच्या धर्तीवर या स्पर्धेची रचना करण्यात आली आहे. महिलांनाही खेळासाठी प्रोत्साहन दिले जात असून, यंदा महिलांचे आठ संघ स्पर्धा खेळणार आहेत. पुरुषांचे १६ संघमालक व महिलांचे आठ संघमालक आपल्या २४ संघांसह स्पर्धेत उतरणार आहेत. पुरुष संघांची नवे सिंधी संस्कृतीवर आधारित, तर महिला संघांची नवे नद्यांवर आधारित आहेत.”
या स्पर्धेतील पुरुष गटामध्ये मस्त कलंदर (गीता बिल्डर्स, मयूर तिलवानी), सुलतान ऑफ सिंध (डब्बू आसवानी फाउंडेशन, हिरानंद आसवानी), मोहेंजोदरो वॉरियर्स (मिलेनियम डेव्हलपर्स, हरीश अभिचंदानी), सिंधफूल रेंजर्स (जीएस असोसिएट्स, जितू पहलानी), एसएसडी फाल्कन (विक्रम रोहेडा फोटोग्राफी, विक्रम रोहेडा), इंडस डायनामॉस (साईबाबा सेल्स, रोहन गेहानी), दादा वासवानीज ब्रिगेड (आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्स, श्रीचंद आसवानी), झुलेलाल सुपरकिंग्ज (द कॉर्नर लाउंज, सनी गोगिया), हेमू कलानी ग्लॅडिएटर्स (ट्रिओ ग्रुप, बिपिन डाखनेजा), गुरुनानक नाइट्स (पीव्हीआर टाईल्स वर्ल्ड, प्रकाश रामनानी), संत कंवरम रॉयल्स (विजयराज असोसिएट्स, क्रिश लाडकानी), आर्यन्स युनायटेड (विशाल प्रॉपर्टीज, विशाल तेजवानी), जय बाबा स्ट्रायकर्स (सुखवानी असोसिएट्स, सागर सुखवानी), सिंधी इंडियन्स (मनसुखवानी असोसिएट्स, मनीष मनसुखवानी), अजराक सुपरजायंट्स (लाइफक्राफ्ट रियल्टी, हितेश दादलानी) व पिंपरी योद्धाज (कुणाल कम्युनिकेशन्स, कुणाल लखानी) अशी या संघांची नावे आहेत.
महिलांच्या संघात गंगा वॉरियर्स (तेजवानी हँडलूम्स अँड फर्निशिंग्स, अन्वी व अविनाश तेजवानी), गोदावरी जायंट्स (काजल ड्रेसेस, हरप्रीत सग्गु व पवन जयसिंघानी), झेलम क्वीन्स (सिटी कार्स, शिखा व रॉकी सेवानी), सिंधू स्टारलेट्स (जीएस असोसिएट्स, शीतल व जितू पहलानी), यमुना स्ट्रायकर्स (टॅलेन ट्रेजर ऍक्टिव्हिटी सेंटर, रिया व पवन कोटवानी), नर्मदा टायटन्स (आरआर सोल्युशन्स, रेशम वाधवानी व सपना मेलवानी), कृष्णा सुपरनोव्हाज (एसएसजीएन, रुपाली व प्रवीण पंजाबी) आणि इंद्रायणी थंडरबोल्ट्स (स्पोर्टिफाय, सई लॉन्स, अनिशा व करण आसवानी) यांचा समावेश आहे. महिलांमध्ये ९०, तर पुरुषांमध्ये २५१ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
सुखवानी लाईफ स्पेसेस (विकी सुखवानी), एएनपी कॉर्प (ऋषी अडवाणी), नुरिया होमेटेल हॉस्पिटॅलिटी (सागर सुखवानी), आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्स (अनिल आसवानी), सिंग स्टील अँड अल्युमिनियम (मनजीत सिंग वालेचा), उत्तम केटरर्स (नवजीत कोचर), जय मोबाईल (गोपी आसवानी), रवी बजाज व रोहित तेजवानी, ग्रोफिन (अभिजित बोनगीरवार), एसएसडी एक्स्पोर्ट हॉंगकॉंग लिमिटेड (वरून वर्यानी), सेवानी इन्शुरन्स (हर्ष सेवानी), साईबाबा सेल्स प्रायव्हेट लिमिटेड (रोहन गेहाने), विशाल प्रॉपर्टीज (विशाल तेजवानी), बालाजी होम्स (आशुतोष चंदीरामानी), क्लासिक कलेक्शन (नीरज चावला), ग्लो वर्ल्ड (महान जेस्वानी), रिशा वॉच स्टोअर (जॅकी दासवानी), आकार कृष्णानी ग्रुप (राहुल कृष्णानी),  सोलार्ज एनर्जी (विनीत व कौशिक धर्मानी), स्टीरलियन (राजकुमार जवारानी, देवेश चंचलानी),  विक्रम रोहिडा फोटोग्राफी, सीजे हब (चिनू जैन), फेरो (कुणाल कुदळे) यांचे या स्पर्धेसाठी सहकार्य लाभले आहे.

महा-ध्यानशिबिर १२ जानेवारीला

पुणे : स्वामी विवेकानंद आणि विश्वशांतिदूत महर्षी विनोद यांची जयंती तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आत्मयोग-गुरू डॉ. संप्रसाद विनोद यांच्या सुवर्णसाधनेच्या अमृतयोग वर्षानिमित्त येत्या १२ जानेवारीला ‘महा-ध्यान शिबिर’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे सकाळी नऊ ते एक या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. या महाध्यान शिबिरात ध्यानाचे स्वरूप, त्याचा दैनंदिन जीवनाशी संबंध, मानसिक ताणाचे नियोजन, अशा विविध विषयांची ओळख करून देण्यात येणार आहे.
या वेळी खासदार मेधा कुलकर्णी, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, माजी मंत्री दिवाकर रावते, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. येथे सर्वांना मुक्त प्रवेश आहे. https://forms.gle/iZ6qNQ 552dN CuS1z7. या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

मराठी अभिनेत्री अश्विनी चवरे बोल्ड फोटोशूटमूळे आली चर्चेत

सध्या साउथचे सिनेमे जगभर गाजताना दिसत आहेत. यामध्ये आता एक मराठमोळ्या चेहरा देखिल सध्या सोशल मिडियावर आपल्या हॉट, बोल्ड लूकमूळे चर्चेत आला आहे. साउथमध्ये आपली छाप टाकलेली मरठमोळी अभिनेत्री अश्विनी चवरे आता चर्चेत आली आहे तिच्या एका ग्लॅमरस फोटोशूटमुळे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अश्विनीने एका हॉट आणि सेन्सेशनल फोटोशूटमधून स्वतःचा असा एक वेगळा लूक प्रेक्षकांसमोर सादर केला आहे, जो यापूर्वी कधीही पाहिला गेला नव्हता. २०२५च्या पहिल्याच महिन्यात अश्विनीचा हा नवा लूक चाहत्यांसाठी एक सरप्राईज ठरला आहे. तिच्या या बोल्ड लूकने तिचे चाहते थक्क झाले आहेत सोशल मीडियावर तिच्या या फोटोशूटचे फोटो व्हायरल होत आहेत आणि तिच्या या धाडसी निर्णयाचं जोरदार कौतुक केलं जात आहे. नवीन वर्षाची सुरुवात ग्लॅमरस फोटोशूटने झाल्यावर, अश्विनी याच वर्षात मराठी आणि साऊथचं दमदार कोलॅबोरेशन ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ आणि ‘जिलबी’ या सिनेमांत  झळकणार आहे. हे दोन्ही सिनेमे याच वर्षी प्रदर्शित होणार आहेत. अश्विनी चवरेने या फोटोशूटसाठी एक आधुनिक आणि आकर्षक स्टाइल निवडली असून, तिच्या लूकमध्ये आत्मविश्वास, ग्लॅमर, आणि एक हटके व्यक्तिमत्व झळकत आहे. हे फोटो तिच्या चाहत्यांना तिच्या व्यक्तिमत्वाचा नवीन पैलू दाखवतात, जो आतापर्यंत फार कमी लोकांनी पाहिला होता. अश्विनीच्या या बोल्ड फोटोशूटमुळे तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. तिच्या चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील खास मित्र परिवाराने तिच्या या नवीन फोटोशूटसाठी दाखवलेल्या आत्मविश्वासाचे कौतुक केले आहे. अश्विनीच्या या फोटोशूटमुळे २०२५ मध्ये ती मराठी इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री ठरणार आहे .

आत्मनिर्भरतेमुळे महिलाशक्तीचे अस्तित्व प्रकाशमान

महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांचे गौरवोद्गार

पुणे, दि. ०६ जानेवारी २०२५क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाचा पाया रचला व शिक्षणाद्वारे महिलांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू झाली. एकेकाळी पुरुषांचे क्षेत्र समजल्या जाणाऱ्या वीजक्षेत्रात देखील स्वकर्तृत्वाने भरारी घेणाऱ्या महिला शक्तीचे अस्तित्व खऱ्या अर्थाने प्रकाशमान झाले आहे, असे गौरवोद्गार मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी काढले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या पुणे परिमंडलातील महिला अभियंत्यांसाठी रास्तापेठ येथील ‘प्रकाशदूत’ सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून श्री. पवार बोलत होते. ते म्हणाले की, वीजक्षेत्र अत्यंत धकाधकीचे असले तरी महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रभावीपणे व आत्मविश्वासाने महावितरणच्या प्रगतीला हातभार लावला आहे. महावितरणने तंत्रज्ञ व विद्युत सहायक म्हणून महिलांना देशात सर्वप्रथम संधी दिली आहे. वीज यंत्रणेतील तांत्रिक कामे, ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण, नवीन वीजजोडण्या आदी तांत्रिक कामे महिला अभियंता व कर्मचारी समर्थपणे करीत आहे. ही आत्मनिर्भरता देखील अभिमानास्पद आहे.

या कार्यशाळेत सहायक महाव्यवस्थापक (वित्त) सौ. माधुरी राऊत, कार्यकारी अभियंता श्री. धनराज बिक्कड, उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी विविध योजना व कामांच्या इम्प्रुव्हमेंट ऑफ पॅरॉमीटर्ससह पीएम सूर्यघर वीज योजना, वीजहानी कमी करणे तसेच महसूलवाढ व वसूली आदींबाबत माहिती दिली. या कार्यशाळेला उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भुपेंद्र वाघमारे यांची तसेच ३० महिला अभियंत्यांची उपस्थिती होती.

चंद्रकांतदादा संतापले, टेकड्यावरील विकृतींना चाप बसवा!

झाडांच्या सुरक्षेसाठी १३ जानेवारी रोजी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून म्हातोबा टेकडीची पाहाणी

पुणे-कोथरुड मधील म्हातोबा टेकडीवरील आगीच्या घटनेमुळे चंद्रकांतदादा पाटील संतप्त झाले असून; अशा विकृतींना चाप बसविण्याचे निर्देश आज पुन्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच, झाडांच्या सुरक्षेसाठी उपाय योजनांसंदर्भात १३ जानेवारी रोजी वन विभागाच्या मुख्यालयात बैठक घेऊन सविस्तर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त कोथरुडमधील म्हातोबा, पाषाण, महात्मा टेकडीवर औषधी वनस्पतींसह पर्यावरण संवर्धनात अतिशय महत्वाचे ठरणारे वृक्षांची लागवड केली. गेल्या आठवड्यात तीन वेळा म्हातोबा टेकडीवर येणाऱ्या काही टवाळखोरांनी आग लावून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्या पार्श्वभूमीवर आज नामदार पाटील यांनी घटनास्थळाची पाहाणी करुन आढावा घेतला.

यावेळी वन विभागाचे अधिकारी मुख्य वन संरक्षक मनोज बारबोले, सहाय्यक उप वन संरक्षक दिपक पवार, भाजपा कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, सरचिटणीस दिपक पवार, दिलीप उंबरकर, सचिन मोकाटे, म्हातोबा टेकडी ग्रुपचे दामोदर कुंबरे, रोहिदास सुतार, दंडवते मारुती टेकडी ग्रुपचे संजीव उपळेकर, गणेश आंग्रे, जयंतराव पेशवे, राजू इनामदार, तात्यासाहेब निकम, विश्वास कुलकर्णी, निसर्गप्रेमी रमेश दांडेकर यांच्या सह अनेक पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.

या पाहाणी वेळी मुख्य वन संरक्षक मनोज बारबोले यांनी घटनेची माहिती नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना दिली. त्यावर घटना घडू नये; यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, अशी विचारणा केली. त्यावर मनुष्यबळ अभावामुळे अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यात मर्यादा येत असल्याचे अधिकाऱ्यांनी नामदार पाटील यांच्यासमोर स्पष्ट केले. त्यावर लोकसहभागातून मनुष्यबळ उपलब्ध करुन देऊ; अशी ग्वाही यावेळी ना. पाटील यांनी दिली.

झाडांच्या सुरक्षेसाठी टेहळणी बुरुज उभारणे, रात्रीच्या सुमारास अशा घटना टाळण्यासाठी म्हातोबा मंदिर परिसरात सौर ऊर्जेद्वारे पथदिवे कार्यान्वित करणे, झाडांची निगा राखण्यासह वाळलेले तण काढण्यासाठी मनुष्यबळ वाढविणे, पर्यावरण संवर्धनासाठी कॅम्प उपक्रम राबविणे, टेकडींवर गुरांना चराईवर नियंत्रण आणणे, यांसह दुपार आणि संध्याकाळच्या सत्रात संपूर्ण भागात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची गस्त वाढविणे आदी सूचना करण्यात आल्या.

त्यावर लोकसहभागातून मनुष्यबळ वाढविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी ना. पाटील यांनी दिली. तसेच, गस्त वाढविण्यासाठी होमगार्डची मदत घ्यावी अशी सूचना त्यांनी केली. त्यासोबतच झाडांच्या सुरक्षेसाठी प्रशासनासमोरच्या इतर अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यासाठी १३ जानेवारी रोजी बैठक घेणार असल्याचेही स्पष्ट केले. यामध्ये प्रशासन आणि पर्यावरण प्रेमींसोबत संवाद प्रस्थापित करुन; वृक्ष संवर्धनामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध

पुणे, दि. ६: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी कळविले आहे.

परीक्षा परिषदेमार्फत १० नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर क्रमांक १ व २ च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी, आक्षेप असल्यास परीक्षा परिषदेकडे १६ डिसेंबर २०२४ पर्यंत पाठविण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन ही अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन, आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या अंतिम उत्तरसूचीनुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ (एमएएचएटीईटी) परीक्षेचा निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असेही श्री. राठोड यांनी कळविले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात साधलाविधी शाखेच्या विद्यार्थी व भावी वकिलांशी संवाद…

पुण्यातील श्री शिवाजी मराठा सोसायटी विधी महाविद्यालयाच्या
विद्यार्थ्यांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मंत्रालयात संवाद

संविधान व कायद्यांबाबत जागरुकतेसाठी
विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा
 उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 6 :- लोकशाहीचे बळकटीकरण, सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी भारतीय संविधान आणि देशाच्या नियम-कायद्यांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता असणे आवश्यक आहे. ही जागरुकता निर्माण करण्यासह समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित पिडीत बांधवांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, न्यायप्रिय वकिल म्हणून भविष्यात महत्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत मंत्रालयात आयोजित संवादभेटी दरम्यान केले.

पुणे येथील श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या विधी महाविद्यालयाच्या पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी, प्राचार्या सिद्धकला भावसार, सहयोगी प्राध्यापक भानुदास गर्जे आदींसह आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली. मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती सभागृहात झालेल्या संवादावेळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, विधी आदी अनेक मुद्यांवर विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, विद्यार्थी हा जीवनभर विद्यार्थी राहिला पाहिजे. वयाच्या पन्नाशीनंतरही शिकत राहण्याची वृत्ती कायम राहिली पाहिजे. शिकत असताना त्यात्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींसोबत काम केले पाहिजे. त्यांच्याकडून व्यवसायातील बारकावे समजून घेतले पाहिजेत. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे. आज विधी शाखेचे विद्यार्थी असलेले तुम्ही सर्वजण उद्या यशस्वी वकील बनाल, परंतु वकिल बनण्याआधी आजचे आदर्श विद्यार्थी, उद्याचे आदर्श नागरिक बना, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना केलं.

राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कला, क्रीडा, साहित्य अगदी वकिलीच्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी स्वत:ला सातत्याने सिद्ध करत रहावे लागते. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रचंड अभ्यास, अथक परिश्रम आणि चिकाटी आवश्यक असते. त्याची तयारी ठेवा. देशाचं संविधान तसेच कायद्यांनी सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे, निर्भयपणे, निष्पक्षपणे, निष्ठेने पार पाडण्याचा प्रयत्न करा, असे मार्गदर्शनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध विषयांवरच्या प्रश्नांना उपमुख्यमंत्र्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच्या संवादातून राज्याचा लोकनेता, कुटुंबातील ज्येष्ठ मार्गदर्शक, एका दिलखुलास मित्राचे दर्शन घडले, अशी भावना संवादात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. सागर खुरवड, महादेव पाटील, अनुज बसाळे, अमित काकडे, शंतनु दाते, हरिष मिनेकर आदी विद्यार्थी, प्रतिनिधींसोबत पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी या संवादात सहभाग घेतला.

पोलीस यंत्रणांनी दोषसिध्दीचे प्रमाण वाढविण्याबरोबरच महिलांच्या गुन्ह्यांमागील कारणांचा शोध घ्यावा- उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे

“महिलांची फसवणूक करणाऱ्यांची साखळी तोडून काढा, पॉक्सो अंतर्गत गुन्ह्यांचा तपास करताना पीडितांची ओळख गुप्त राहील याची दक्षता घ्यावी” डॉ नीलम गोऱ्हे यांच्या सूचना

कोल्हापूर, दि. ६ जानेवारी २०२५ : कोल्हापूर दौऱ्यांतर्गत, कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमधील महिला अत्याचार विषयक गुन्ह्यांचे प्रतिबंध करण्याबाबत केलेली कार्यवाही व उपाययोजना संदर्भात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी आज (सोमवार, ६ जानेवारी २०२५) बैठकीचे आयोजन केले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

मागील वर्षभरात महिला अत्याचार विषयक घटनांमध्ये दाखल गुन्हे व त्यामध्ये झालेल्या कार्यवाहीतील प्रगती, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार यासंदर्भात केलेल्या कार्यवाही, सदर गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्याच्या अनुषंगाने उपाय योजना, अंधश्रद्धा निर्मूलन, जातपंचायत, जेष्ठ नागरिक सुरक्षा अशा विविध मुद्द्यांवर प्रामुख्याने या बैठकीत आढावा घेण्यात आला.

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे गुन्हे निकाली काढण्यासाठी आरोपींचा तातडीने शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करा, महिालांची फसवणूक करणाऱ्यांची साखळी तोडून काढा, पोलीस यंत्रणांनी महिला अत्याचारासंदर्भातील गुन्ह्यांच्या दोषसिध्दीचे प्रमाण वाढविण्याबरोबरच गुन्ह्यांमागील कारणांचा शोध घ्यावा, अशा सूचना त्यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी दिल्या.

कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील सभागृहात कोल्हापूर परिक्षेत्र यांच्या समवेत प्रत्यक्ष व परिक्षेत्रातील इतर क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी यांच्या समवेत महिला विषयक प्रश्नांसदर्भात ऑनलाईन बैठक उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली होती. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, कोल्हापूर परिक्षेत्राचे प्र. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई, शौमिका महाडिक प्रत्यक्ष तर सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, साताराचे पोलीस अक्षीक्षक समीर शेख, पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी ऑनलाईन उपस्थित होते.

कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर,सांगली,सातारा पुणे व सोलापूर ग्रामीणमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या गुन्ह्यांचा शोध लावण्याबरोबर घडलेल्या गुन्ह्यांच्या मूळ कारणांपर्यत जाण्याचा प्रयत्न करावा अशा सूचना देवून उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे पुढे म्हणाल्या, “पॉक्सोअंतर्गत लहान मुलींच्यावर होणाऱ्या अत्याचारा संदर्भात गुन्ह्याचा तपास करताना पिढीतेची ओळख गुप्त राहील तसेच पिडीतांनी व त्यांच्या कुटुंबियांना कोणताही त्रास होवू नये याची दक्षता घ्यावी. शाळा, महाविद्यालयामध्ये भरोसा सेलच्या माध्यमातून मार्गदर्शनपर कार्यशाळांचे आयोजन करावे. ऑनलाईन प्रशिक्षणासंदर्भात कार्यवाही करावी. चर्चासत्रांचे आयोजन करावे.प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्यांसंदर्भातील अद्ययावत माहिती फलकांवर लावण्यात यावी.

लहान मुलींवर होणारे अत्याचार टाळण्यासाठी शाळामध्ये “गुड टच बॅड टच ” या संदर्भात प्रशिक्षण द्यावे, प्रशिक्षीत मुलींचे गट तयार करुन या संदर्भां जनजागृती करावी, अशा सूचना देवून उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे म्हणाल्या, “अत्याचारग्रस्त पीडितांची वैद्यकीय तपासणी अथवा उपचार करताना योग्य दक्षता घ्यावी. त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्षाची सोय करण्याबाबत कार्यवाही करावी. साक्षीदार संरक्षण कायद्याचे तंतोतंत पालन करुन त्यांची योग्य अंमलबजवाणी करावी. पिडीतांना कोर्टात घेवून जातानाही याबाबत योग्य दक्षता घेण्यात यावी. चार्ज शिट दाखल करताना कायद्याचे पालन करावे. दंड संहितेनुसार बी समरीचे पुर्नरिक्षण करणाच्या सूचनाही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी शेवटी दिल्या.

यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी तपास यंत्रणा अधिक गतिमान करण्याचे आदेश देवून कायद्यासंदर्भातील सर्वसाधारण सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना दिल्या. कोल्हापूर परिक्षेत्रात सीसीटीव्हीचे प्रमाण वाढविण्यात यावे असे निदेश देवून महिला अत्याचार तपास यंत्रणेसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याबाबत सूचीत केले.

उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी यावेळी परिक्षेत्रातील जिल्हानिहाय कामकाज व गुन्हांच्या तपाससंदर्भांत आढावा यावेळी घेतला.बैठकीला महिला कक्षामध्ये कार्यरत असणारे अधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार:चेक इन करताना धक्कादायक प्रकार उजेडात

पोलिसांनी दोन्ही गाड्या घेतल्या ताब्यात

मुंबई-येथील जगप्रसिद्ध ताज हॉटेलच्या परिसरात एकाच नंबरच्या दोन कार आढळल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. हॉटेलमध्ये चेक इन केले जात असताना हा धक्कादायक प्रकार उजेडात आला. पोलिसांनी या दोन्ही गाड्या ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. ताज हॉटेल व त्या भोवतीचा परिसर अत्यंत संवेदनशील समजला जातो. 2008 मध्ये अजमल कसाब व त्याच्या सहकाऱ्यांनी या हॉटेलवर हल्ला केला होता. तेव्हापासून याठिकाणी कडेकोट सुरक्षा ठेवण्यात येते. या पार्श्वभूमीवर उपरोक्त घटना घडली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, ताज हॉटेलच्या परिसरात पांढऱ्या रंगाच्या 2 कार आढळल्या. चेक इनच्या वेळी या दोन्ही कारवर MH 01 EE 2388 असा एकच नंबर असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे या दोन्ही कार एकाच मॉडेलच्या होत्या. यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले होते. त्यामुळे ताजच्या सुरक्षा यंत्रणेने तत्काळ त्याची खबर कुलाबा पोलिसांना दिला.त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गाड्या ताब्यात घेतल्यात. पांढऱ्या रंगाच्या या कारवर पिवळ्या रंगाची नंबरप्लेट होती. त्यामुळे या कार्सचा वापर प्रवाशी वाहतुकीसाठी केला जात असावा असा संशय आहे.

विशेष म्हणजे ताज हॉटेलमध्ये एक समिटीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वीच या कार आढळल्यामुळे काळजी व्यक्त केली जात आहे.

पोलिस सध्या दोन्ही कारसाठी एकाच नंबरचा वापर का करण्यात आला? यामागे काही काळेबेरे होते का? आदी बाबींचा तपास करत आहेत. यासाठी दोन्ही गाड्यांच्या चालकांची कसून चौकशी केल जात आहे. पण तूर्त तरी या प्रकरणात घातपात किंवा दहशतवादाचा कोणताही धागा सापडला नाही.

या प्रकरणी असेही सांगितले जात आहे की, एका कार चालकाने दंडापासून वाचण्यासाठी गाडीची नंबर प्लेट बदलली. पण दुर्दैवाने ती गाडी व खरी गाडी एकाचवेळी ताज हॉटेलमध्ये पोहोचली. यामुळे हा प्रकार उजेडात आला. खऱ्या नंबरच्या गाडी मालकाने स्वतःहून बोगस नंबरप्लेटवाल्या गाडीची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस तिथे पोहोचले. पण याची पुष्टी अद्याप झाली नाही

आयसीएमआर ला नियमित देखरेखीत कर्नाटकात आढळले ह्युमन मेटाप्न्युमो व्हायरस (HMPV) संसर्गाचे दोन रुग्ण

संसर्ग स्थितीवर पाळत ठेवण्याची मजबूत प्रणाली कार्यरत, देशात ILI किंवा SARI प्रकरणांमध्ये कोणतीही असामान्य वाढ नाही

नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025

कर्नाटकात ह्युमन मेटाप्न्यूमोव्हायरस (HMPV) संसर्गाचे काही रुग्ण आढळल्याचे प्रसार माध्यमांनी म्हटले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) कर्नाटकात ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) संसर्गाचे दोन रुग्ण शोधले आहेत. देशभरातील श्वसनाच्या आजारांवर लक्ष ठेवण्याच्या आयसीएमआर च्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून विविध विषाणूजन्य श्वसन रोगजनकांच्या नियमित देखरेखीद्वारे हे दोन्ही रुग्ण शोधण्यात आले आहेत.

भारतासह जागतिक स्तरावर एचएमपीव्ही आधीपासूनच प्रसारित आहे आणि विविध देशांमध्ये एचएमपीव्हीशी संबंधित श्वसन आजारांचे रुग्ण सापडल्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. शिवाय, आयसीएमआर आणि इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हिलन्स प्रोग्राम (IDSP) नेटवर्कच्या सध्याच्या डेटाच्या आधारे, देशात इन्फ्लूएंझा-सारखे आजार (ILI) किंवा गंभीर तीव्र श्वसन आजाराच्या (SARI) रुग्ण संख्येमध्ये असामान्य वाढ झालेली नाही.

आढळलेल्या एचएमपीव्ही रुग्णांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

ब्रॉन्कोप्न्यूमोनियाचा इतिहास असलेले एक 3 महिन्यांचे स्त्री अर्भक, बेंगळुरूमधील बॅप्टिस्ट रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला एचएमपीव्ही ची लागण झाल्याचे निदान झाले. त्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ब्रॉन्कोप्न्यूमोनियाचा इतिहास असलेले 8 महिन्यांचे पुरुष अर्भक बेंगळुरूमधील बॅप्टिस्ट रुग्णालयात दाखल केल्यानंतर 3 जानेवारी 2025 रोजी त्याला एचएमपीव्ही ची लागण झाल्याचे निदान झाले. या बालकाची तब्येत आता सुधारत आहे.

प्रभावित रूग्णांपैकी एकानेही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय सर्व उपलब्ध निगराणी प्रणालीमार्फत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.आयसीएमआर वर्षभर एचएमपीव्ही अभिसरणातील कलाचा मागोवा घेणे सुरू ठेवणार आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) या संसर्गासंदर्भात आधीच सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी चीनमधील परिस्थितीबाबत वेळोवेळी अद्यतनित माहिती पुरवत आहे.

श्वासोच्छवासाच्या आजारांमध्ये होणारी संभाव्य वाढ हाताळण्यासाठी भारत सुसज्ज आहे आणि गरज भासल्यास सार्वजनिक आरोग्य उपाय त्वरित तैनात केला जाऊ शकतो, हे देशभरात या संसर्गाला तोंड देण्याची पूर्वतयारी म्हणून नुकत्याच करण्यात आलेल्या कवायतीने हे दाखवून दिले आहे