Home Blog Page 445

गोणीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

पुणे : पुण्यातील पिंपरी – चिंचवडमधील मोशी रोड भागात शुक्रवारी एका महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. महिला तिच्या घरातून १९ फेब्रुवारीपासून बेपत्ता होती. अखेर शुक्रवारी तिचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली, त्यानंतर पोलिसांकडून महिलेच्या हत्येप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.भोसरी येथील चक्रपाणी वसाहतीमध्ये महिला आपल्या पती आणि दोन मुलांसोबत राहत होती. महिलेचा पती आणि महिला मजूर म्हणून काम करत होते. दोघेही आपल्या घराजवळील मजुरांच्या पिक-अप पॉईंटवर जायचे. १९ फेब्रुवारी रोजीही ती नेहमीप्रमाणे पिक-अप पॉईंटवर गेली, पण त्यानंतर मात्र ती बेपत्ता झाली.मृत महिलेची ओळख पटली असून ती मूळची छत्तीसगढ येथील रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. तन्नू देवेंद्र साहू, वय वर्ष ३५ असं मृत महिलेचं नाव आहे. महिला अचानक बेपत्ता होऊन अशाप्रकारे गोणीत तिचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.शुक्रवारी संध्याकाळी एका कंटेनर ड्रायव्हरने जाधववाडी मोशी रोडवर मटेरे हाऊस चौकाजवळ एका खुल्या मैदानात अतिशय दुर्गंधी आल्याची सूचना पोलिसांना दिली. भोसरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास केल्यानंतर एका पिवळ्या रंगाच्या गोणीत त्यांना महिलेचा मृतदेह आढळून आला. खुल्या मैदानात झाडांजवळ गोणी ठेवली होती. गोणीतील मृतदेहाला दुर्गंधी येऊ लागली होती. गोणीजवळ एक मोबाईल फोनदेखील आढळला.पोलिसांकडून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. गोणीजवळ आढलेल्या मोबाईल फोनचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. प्राथमिकरित्या महिलेची हत्या केल्याचं समोर येत आहे. मात्र डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवाल येण्याआधी मृत्यूच्या कारणाबाबत कोणतंही विधान केलं नाही.

वडगाव शिंदे येथील न्यू मॅाडेल हाॅस्पिटल आधुनिक सोईसुविधांयुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – सुरेंद्र पठारे

वडगाव शिंदे येथे न्यू माॅडेल हाॅस्पिटलचे भूमिपूजन दि. २२ फेब्रुवारी रोजी सुरेंद्र बापूसाहेब पठारे व आवाहन फाउंडेशन’ आणि ‘जॉन्सन कंट्रोल्स’चे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले.

पुणे: वडगावशेरी मतदारसंघातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘आवाहन फाउंडेशन’ आणि ‘जॉन्सन कंट्रोल्स’ यांच्या सहकार्याने न्यू मॉडेल हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या हॉस्पिटलच्या भूमिपूजन सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून सुरेंद्र पठारे, ‘आवाहन फाउंडेशन’ आणि ‘जॉन्सन कंट्रोल्स’ यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच वडगाव शिंदे गावचे सरपंच सौ. हेमलता शिंदे, उपसरपंच व नागरिक बांधव उपस्थित होते.

वडगाव शिंदे सारख्या ग्रामीण भागाला आरोग्य सुविधांनी अधिक सक्षम करण्यासाठी सरपंच सौ. हेमलता शिंदे यांनी ‘आवाहन फाउंडेशन’ आणि ‘जॉन्सन कंट्रोल्स’ यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकला. हे न्यू मॉडेल हॉस्पिटल संपूर्ण अत्याधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधांनी सुसज्ज असणार आहे व यामध्ये विविध रोगांवरील उपचार पद्धती तसेच तातडीच्या सेवा उपलब्ध असतील. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात जावे लागणार नसून नागरिकांचा वेळ व खर्च वाचेल तसेच तातडीच्या उपचारांसाठी मदत होईल. आरोग्य सुविधा गावामध्येच मिळणार असल्याने नागरिकांमध्ये आनंद तसेच समाधानाचे वातावरण आहे.

सरपंच सौ. शिंदे म्हणाले, “वडगाव शिंदे ग्रामस्थांसाठी सुसज्य हाॅस्पिटल मिळावे म्हणून मी वारंवार शासकीय स्तरावर पाठपुरावा केला होता. पंरतू काही तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य झाले नाही. ‘आवाहन फाउंडेशन’ आणि ‘जॉन्सन कंट्रोल्स’ यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकला. या न्यू मॉडेल हॉस्पिटलसाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे. तसेच उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय सेवा आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी विनंती केली आहे.”

” वडगावशेरी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मूलभूत सुविधा सक्षम करणे आवश्यक आहे. आरोग्य व्यवस्थेचा विकास हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. न्यू मॉडेल हॉस्पिटलमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळतील, जी आजच्या काळाची गरज आहे. तसेच, वडगाव शिंदे येथील न्यू मॅाडेल हाॅस्पिटल, आधुनिक सोईसुविधांयुक्त करण्यासाठी सर्वेातपरी प्रयत्न करण्याच्या दिशेने व वडगावशेरी मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने आमदार बापूसाहेब पठारे हे सदैव तत्पर आहेतच या सामाजिक प्रकल्पांच्या माध्यमातून वडगावशेरी मतदारसंघ आरोग्य, शिक्षण आणि जीवनमान उंचावण्याच्या दिशेने वेगाने पुढे जाईल.” असे मत सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांनी व्यक्त केले.

भूमिपूजन समारंभाप्रसंगी हवेली तालुका सभापती अशोक बापू खांदवे, वडगाव शिंदे गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ हेमलता विलास शिंदे, उपसरपंच सौ शिवानी शिंदे, युवराज काकडे, सौ उषा काकडे, सौ योगिता शिंदे, सौ दिपाली शिंदे, ग्रा.वि.अधिकारी दयानंद कोळी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. वैशाली मांगले, ग्रा.प.कर्मचारी इंद्रायणी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन कल्याण आबा शिंदे, भरत काकडे, पदा चव्हाण, नितीन शिंदे, राजेंद्र शिंदे, सचिन काकडे, विक्रांत गव्हाणे, जयदीप शिंदे, रामभाऊ काकडे गणेश शिंदे, विलास शिंदे, सुनील काकडे, विजय शिंदे, मच्छिंद्र शिंदे, राजेंद्र शिंदे, वैभव शिंदे, भरत काकडे, खंडू काकडे, विलास काकडे, संभाजी शिंदे, विजय साकोरे, महेंद्र काकडे, बापू काकडे, सदाशिव काकडे, भीमराव शिंदे, अरुण काकडे, धनाजी बारणे, तानाजी शिंदे, विनोद शिंदे, आवाहन फाउंडेशन’ आणि ‘जॉन्सन कंट्रोल्सचे प्रसन्न बारी, तुषार जाधव, वर्तिका जिंदल, विजय नेहरे, अमोल कुंभार, मोहम्मद जाहिद इस्लाम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून राज्यातील बाजार समित्या सक्षम करणार-पणन मंत्री जयकुमार रावल

पुणे, दि. २४:बाजार समित्या या कृषि पणन व्यवस्थेचा महत्वाचा घटक आहे. अगदी कोरोनाच्या काळातही सर्व व्यवहार ठप्प असतांनाही, बाजार समित्यांनी शेतमालाची पुरवठा साखळी कार्यक्षमपणे हाताळून सुरळीत राखली. त्याची सरकारने, जागतिक बँकेने व प्रसार माध्यमांनीही दखल घेतली आहे,त्यामुळे राज्यातील बाजार समितीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. महाराष्ट्र हे मोठे कृषी निर्यातदार राज्य आहे.जागतिक बाजार समितीच्या धर्तीवर राज्याची पणन व्यवस्था स्पर्धात्मक करणे आवश्यक असून शेतकऱ्यांना केंद्र मानून राज्याच्या बाजार समित्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन पणन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी केले. तसेच परिषदेत मांडलेल्या सकारात्मक सूचना च्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेणार आहेत. त्याचप्रमाणे बाजार समित्यांना अर्थसंकल्पात हक्काचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने आयोजित कृषी उत्पन्न बाजार समित्यांची राज्यस्तरीय पणन परिषदेच्यावेळी उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, आमदार चरणसिंह ठाकूर, आ.दिलीप बनकर, आ.अनुराधा चव्हाण, सहकार आयुक्त दीपक तावरे, कृषी पणन संचालक विकास रसाळ, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे तसेच राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक व सचिव आदी उपस्थित होते.

मंत्री रावल पुढे म्हणाले की, शेतमालाच्या उत्पादनाच्या बाबतीत आपण जरी आघाडीवर असलो तरी त्याची सक्षम पणन व्यवस्था निर्माण करण्याच्या अनुषंगाने काम करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला किफायतशीर भाव मिळण्यासाठी पणन व्यवस्थेला अधिक स्पर्धात्मक करणे आवश्यक आहे. सुयोग्य पणन सुविधांच्या अभावामुळे शेतमालाची काही प्रमाणावर सुगी पश्चात हानी होते. प्रत्यक्षात अवकाळी पाऊस, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्ती, व शेतमालाची अशास्त्रीय वाहतूक व हाताळणीमुळे होणारे नुकसान टाळण्याकरीता प्रयत्न करावे.

राज्यातील बहुतांश बाजार समित्यांच्या मालकीच्या जमीनी गावातील किंवा शहरातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असून, त्यांचा विकास करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी स्थानिक गरजा लक्षात घेवून व्यवसाय विकास आराखडे तयार करावे. कालबध्द कार्यक्रम राबवून ते अंमलात आणले पाहिजे, राज्यामध्ये एकूण 305 कृषि उत्पन्न बाजार समित्या व त्यांचे 625 उपबाजार आवार कार्यरत आहेत. राज्यातील काही आदिवासी भागात व राज्यातील 69 तालुक्यांमध्ये नव्याने बाजार समिती नव्याने निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीने अधिकाधिक शेतमाल बाजार समिती आवारात विक्रीसाठी येण्याकरीता शेतकऱ्यांना विविध सोई-सुविधा, शेतकऱ्यांचे संपर्क व प्रबोधन, शेतकऱ्यास शेतमालाचे पैसे देण्याबाबत संरक्षण, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतमाल संकलन व माफक दरात वाहतूक, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेती विषयक व प्रक्रिया विषयक तंत्रज्ञान याची उपलब्धता व माहिती देणे, अधिनस्त बाजार घटकांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे, बाजार समितीची व्यावसायीक उत्पन्न वाढीसाठी गोदाम व शीतगृह उभारणी, निर्यातीसाठी मुलभूत सुविधा निर्माण करणे, ग्रेडींग, स्टोअरेज, पॅकींग इत्यादींनी प्रोत्साहन देणे स्वत:चा व्यवसाय विकास आराखडा तयार करुन त्याची कालबध्द अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

जागतीक पातळीवर अनेक राष्ट्रांनी त्यांच्या अन्नधान्य साठ्यात मध्ये वाढ केल्यामुळे कृषि पणन क्षेत्राचे महत्त्व अधोरेखीत झाले आहे. कृषि पणन क्षेत्र हे शाश्वत विकासाचे क्षेत्र असल्याने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येऊ लागली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती तंत्रज्ञानाचा वापर, कमोडीटी मार्केटस्, फ्युचर व फॉरवर्ड मार्केटींग, ऑनलाईन मार्केटींग, विविध प्रमाणीकरण, पॅकेजींग इत्यादी तरतुदींमुळे आव्हाने निर्माण झालेमुळे उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच कृषि पणन व्यवस्थेला आधुनिकतेची कास धरणे आवश्यक झालेले आहे. शेतीमालाची विक्री व्यवस्था निर्माण करणे हे बाजार समित्यांच्या स्थापनेच्या वेळचे उद्दीष्ट होते. तथापि सध्याच्या बदलत्या जागतिकीकरण व उदारीकरणाच्या वातावरणात बाजार समित्यांनी त्यांच्या कामकाजात आवश्यक बदल करणे गरजेचे आहे.

कृषि उत्पन्न बाजार समित्यांनी भविष्यात अधिकाधिक पारदर्शकता ठेवून व शेतकऱ्यांना आधुनिक सुविधा पुरवून आकर्षित केले पाहीजे. अजूनही बऱ्याच बाजार समित्यांच्या बाजार आवारांत पारदर्शक विक्री व्यवहार होत नाहीत.बाजार आवारात विक्रीसाठी आलेल्या शेतमालाचे योग्य वजन, शेतमालाला वाजवी भाव व शेतमाल खरेदीचे चुकारे वेळेत करणे याची सुनियोजित व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. बाजार समितीने बाजार आवारात जास्तीत जास्त शेतमाल विक्रीसाठी येईल यासाठी शेतकऱ्यांशी संपर्क वाढवून त्यांचेसोबत उत्तम समन्वय ठेवणे आवश्यक आहे.

अमेस्टरडॅम व पॅरिस बाजारपेठांच्या धर्तीवर राज्यात ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्केट उभारणार-पणन मंत्री जयकुमार रावल

मोबाईल ॲप, बाजार आवारांतील आधुनिक डिस्प्ले सिस्टीम यांचा वापर करुन राज्यातील व देशातील शेतमालाची आवक, बाजारभाव, तसेच इतर आवश्यक माहितीचा रिअल टाईम डेटा सर्व बाजार घटकांना सार्वजनिक रित्या उपलब्ध करुन दिला पाहिजे. कृषि पणन व्यवस्थेतील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत वेगाने काम झाले पाहिजे . त्यादृष्टीने पहिले पाऊल म्हणून राज्याचे मुख्यमंत्री यांचे कडुन मंजुर पणन विभागाच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात “राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजार समिती उभारणे या विषयाचा समावेश करणेत आलेला आहे. या अंतर्गत अल्समीर, अमेस्टरडॅम, रुगींश, पॅरिस बाजार पेठ या आधुनिक बाजारपेठांच्या धर्तीवर राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्केट उभारणेचा राज्य शासनाचा विचार आहे. त्यासाठी आवश्यक सविस्तर प्रकल्प अहवाल महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून तयार करणेत येत आहेत, असेही मंत्री श्री. रावल म्हणाले.

शेतकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने काम करावे-कृषीमंत्री ॲड माणिकराव कोकाटे

शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासोबतच त्यांच्या शेतमालाला संरक्षण देण्याकरीता विविध सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीने काम करावे, असे प्रतिपादन कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.

शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री केल्यानंतर त्यांना शाश्वती वाटली पाहिजे. शेतकरी विश्वासाने माल विक्री करतात ते पूर्णतः विक्री व्यवस्थेवर अवलंबून असतो. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. याकरीता व्यापाऱ्यांची कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी करणे, त्यांच्याकडून आवश्यकतेनुसार काही रक्कम अनामत रक्कम म्हणून जमा करुन घेणे, खरेदी-विक्री व्यवहाराची माहिती, कर्जफेडीची क्षमता आदीबाबत पणन विभागाने विचार करावा.

शेतकऱ्यांनी रासायनिक शेती ऐवजी सेंद्रीय शेती करण्यावर भर दिला पाहिजे. कृषी क्षेत्रात विविध उपक्रमशील प्रयोग करण्यात येत होत असून त्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल यादृष्टीने काम केले पाहिजे. शेतकरी चांगल्या प्रतीच्या शेतमालाचे उत्पादन करीत असतात, त्यांची जनजागृती केली पाहिजे. कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्यात शेतकरी विक्री केंद्रे निर्माण केले पाहिजे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर्शनी भागात मोठ्या आकाराचा एलईडी पडदा लावून त्यावर शेतमालाचे भाव, कृषी विषयक योजनांची माहिती, पर्जन्यमान, हवामान अंदाज आदींबाबत माहिती प्रकाशित केली पाहिजे.

राज्यात विविध ठिकाणी कृषी विभागाच्या जागेबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने करण्यात येणाऱ्या मागणीबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. शेतकरी प्रगतशील असून त्यांच्या शेतमालाला भाव मिळवून देण्यासोबतच त्यांच्या मनातील अस्थिरता कमी करण्याकरीता कृषी व पणन विभागाच्या समन्वयाने येत्या काळात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येईल, असेही ॲड. कोकाटे म्हणाले.

श्री. कदम म्हणाले, राज्यातील बाजार समित्यांच्या विविध विषयांसंदर्भात संवाद साधण्यासाठी येथे बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादित मालाला भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, असेही श्री. कदम म्हणाले.

श्री. रावल यांच्या हस्ते २० वर्षापासून अधिक कार्यकाळ पूर्ण केलेल्या सभापतींचा सन्मान करण्यात आले. यावेळी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची वाटचाल आणि कामकाजाबाबत चित्रफीत दाखविण्यात आली.

महिला दिनानिमित्त महिला आरोग्य विषयक जनजागृती विषयावर फॅशन शो चे आयोजन

पुणे : अलीकडे फॅशन शोचे पर्व फुटलेले आहे. पाच – सहा वर्षांच्या बालकांपासून पन्नाशी गाठलेल्या महिला – पुरुषांचेही फॅशन शो होत असतात. या सर्व फॅशन शो पेक्षा एक आगळा – वेगळा, सामाजिक बांधिलकी आणि महिला आरोग्य जनजागृती घडवणारा फॅशन शो कशिश सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने कशिश प्रॉडक्शन्स घेणार आहे. रांका मिस / मिसेस / मिस्टर ग्लोबल इंडिया या फॅशन शो मधून महिला आरोग्य विषयक जनजागृती करण्यात येणार आहे अशी माहिती कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष, पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पवार यांच्यासह रांका ज्वेलर्स चे शिवम अरोरा, काशिश प्रॉडक्शन्स च्या ब्रँड ॲम्बेसेडर स्नेहल नार्वेकर,केतकी शिरबावीकर,निलाक्षी जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.

फॅशन शो विषयी माहिती देताना योगेश पवार म्हणाले, आपल्या सामाजिक कर्तव्याच्या जाणिवेतून कशिश सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने कशिश प्रॉडक्शन्स च्या वत्तीने यंदाच्या महिला दिना निमित्त हा फॅशन शो आयोजित केला आहे. यामध्ये महिलां मध्ये स्वच्छता, मासिक पाळी आदीं बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. हा फॅशन शो ३ मार्च रोजी एलप्रो मॉल चिंचवड येथे पार पडणार आहे.

या सामाजिक उपक्रमांबद्दल शिवम अरोरा म्हणाले,महिला आरोग्य जनजागृती करण्यासाठी योगेश पवार यांनी या फॅशन शो ची संकल्पना मांडली ती तेजपाल रांका यांना अतिशय महत्वाची वाटली, आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून आम्ही या फॅशन शो चा भाग होत आहोत.या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला रांका ज्वेलर्स तर्फे फोटोशूट तसेच चांदीचे नाणे देण्यात येणार आहे.

पाणी प्रकृतीचा अमूल्य उपहार, त्याचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी – निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज

प्रकृतीची शुद्धता व मानवतेच्या उत्थानाच्या दिशेने निरंकारी मिशनचे एक स्वर्णिम पाऊल

ओंकारेश्वर नदीच्या घाटाची स्वच्छता संपन्न

पुण्यात एकाच वेळी ४२ ठिकाणी ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियान संपन्न

पुणे:-परम वंदनीय सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व सत्कारयोग्य आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन आशीर्वादाने २३ फेब्रुवारी २०२५ची स्वर्णिम प्रभात एक नवीन जागृती व सेवेच्या दिव्य प्रकाशाचा संदेश घेऊन आली ज्यामध्ये ‘अमृत प्रोजेक्ट’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याचे आयोजन विश्वभरात केले गेले.

या अभियाना अंतर्गत पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी, मुळा, मुठा, भीमा, भामा, घोडनदी, पवना, वेळू, कुकरी, मिना, कऱ्हा, मांडवी, आनंदी या नद्यांसह शहरातील विविध तलाव अशा ४२ ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली. ज्यामध्ये ओंकारेश्वर नदी घाट, कात्रज तलाव,आळंदी-देहू-चऱ्होली येथील इंद्रायणी नदी घाट,मोरया गोसावी मंदिराचा पवना नदी घाट आदी प्रमुख जलस्रोतांची स्वच्छता करण्यात आली ज्यामध्ये हजारो निरंकारी सेवादल स्वयंसेवक व भाविक भक्तगणांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला अशी माहिती मिशनचे पुणे जिल्हा प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी दिली.

संत निरंकारी मंडळाचे सचिव व समाज कल्याण प्रभारी श्री.जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले, की देशभरात राबविलेल्या ‘अमृत प्रोजेक्ट’ परियोजनेच्या दरम्यान सर्व सुरक्षा नियमांचे पूर्णपणे पालन करण्यात आले. युवावर्गाचा विशेष सहभाग हा अभियानाचा मुख्य आधार होता. त्यांनी हेही सूचित केले, की ही मोहीम केवळ एका दिवसापुरती सीमित नाही तर दरमहा विविध घाट व जलस्रोतांची स्वच्छता निरंतर चालू राहील. संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने, पूज्य बाबा हरदेवसिंहजी यांच्या असंख्य दिव्य शिकवणूकींतून प्रेरणा घेत या पावन अभियानाचे आयोजन करण्यात आले.

२७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील १६५० पेक्षा अधिक ठिकाणी १० लाखांहून अधिक संख्येने सेवाभावनेने ओतप्रोत स्वयंसेवक भक्तगणांनी संपूर्ण देशामध्ये एकाच वेळी हे महान अभियान साकारले. हे दृश्य केवळ प्राकृतिक स्वच्छतेपर्यंत सीमित न राहता, अंतर्मनाला निर्मळ आणि पवित्र करण्याऱ्या एका आध्यात्मिक यात्रेचे सुंदर प्रतीक बनले. प्रत्येक श्रद्धाळु भक्ताची समर्पित उपस्थिती या गोष्टीचे प्रमाण होते, की जेव्हा प्रेम, सेवा आणि समरसतेचा दिव्य संगम होतो तेव्हा प्रकृतीही नवजीवनाचा अनुभव घेते.

सतगुरु माताजींनी पाण्याचे महत्व अधोरेखित करताना समजावले, की पाणी अमृतासमान आहे जे प्रकृतीने आपल्याला सर्वोत्तम उपहाराच्या रुपात प्रदान केले आहे. त्याची स्वच्छता आणि संरक्षण ही केवळ एक जबाबदारीच नव्हे तर आमची स्वाभाविक सवय बनून गेली पाहिजे. बऱ्याचदा आपण अजाणतेपणे आपण वापरा व फेकून द्या अशा वस्तू व घाण जलस्रोतांमध्ये टाकून प्रदूषणात भर घालत असतो ज्यामुळे पर्यावरणाची हानी होते. याच चिंतनातून प्रेरित होऊन ‘प्रोजेक्ट अमृत’ सारख्या सामाजिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे जी जल संरक्षण आणि स्वच्छतेच्या प्रति जागरुकता पसरविण्याचा एक महत्वपूर्ण प्रयास आहे.

बाबा हरदेवसिंहजी यांच्या जन्मदिवसाला समर्पित असलेल्या या पवित्र सेवा अभियानात प्रत्येक भक्ताला जल संरक्षणाच्या दिशेने योगदान देण्याची संधी मिळाली. हा पुढाकार केवळ घाट आणि जलस्रोतांच्या स्वच्छतेवर केंद्रीत नसून घरांमध्येही लहान-सहान सवयीतून जल बचतीला प्रोत्साहित करत आहे ज्यायोगे पाण्याचा आदर व्हावा आणि हे अमूल्य संसाधन भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित राहू शकेल.

पर्यावरण सुरक्षा अंतर्गत जल संरक्षणामध्ये आपली सकारात्मक सक्रिय भूमिका निभावत ग्लोबल एनर्जी ॲन्ड एन्व्हायरनमेंट फाउंडेशन (GEEF) ने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनला (SNCF) प्रतिष्ठित ‘वाटर कंजर्वेशन इनिशिएटिव्ह एनजीओ ऑफ द ईयर २०२५’ पुरस्कार देऊन गौरविले आहे. हा गौरवपूर्ण सन्मान SNCFच्या प्रोजेक्ट अमृत – स्वच्छ जल, स्वच्छ मन आणि त्यातील विविध जल संरक्षण व स्वच्छतेसाठी घेतलेल्या पुढाकाराच्या प्रति अथक समर्पणाचे प्रतीक आहे. नि:संशय जल संसाधनांची शुद्धता आणि सतत संरक्षण करण्यामध्ये SNCF द्वारे केले जाणारे प्रयास समाजाला स्वच्छ, स्वस्थ आणि समृद्ध भविष्याकडे अग्रेसर होण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावत आहेत.

अभय योजना म्हणजे प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांचा अवमान आणि करबुडव्यांचा सन्मान-माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर

महापालिकेचे “भय” हवे “अभय” नको…

पुणे -अभय योजना आणून महापालिका प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांना अवमानित करत असून कर बुडव्यांचा सन्मान करत असल्याचा आरोप करत असल्या अभय योजना आणू नका असे जाहीर आवाहन माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर, आणि सुहास कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना केले आहे.

केसकर यांनी असे म्हटले आहे कि,’महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा कर आकारणी कर संकलन विभागात कर बुडव्यांसाठी ‘अभय योजना ‘ आणण्याचे नियोजन केले जात आहे.१ मार्च ते ३१ मार्च या कालावधीमध्ये ही अभय योजना राबवण्याचे निश्चित झाले आहे असे कळते. त्यामुळे पुणे शहरातीलप्रामाणिक “करदाता” जो आहे त्याच्यावर अन्याय होतो आहे. कर बुडवणारी माणसं ही तीच तीच आहेत कर बुडवणाऱ्या लोकांना सन्मान मिळतो, एक नवीन प्रवृत्तीला आपण जन्म देतो कर भरायचा नाही वर्षा दोन वर्षांनी “अभय” योजना आणायची ही एक छोटीशी प्रथा आणि पायंडा पुणे महानगरपालिकेमध्ये पडत आहे.
राज्य शासनाने कायद्यामध्ये सुधारणा करून दंडाची रक्कम कमी करावी.गतवर्षी १२०० प्रॉपर्टी सील केल्या होत्या, यावर्षी २५० देखील नाही.प्रामाणिक पुणेकर “कर” भरणाऱ्याला असे आवाहन करावे लागेल की तुम्ही सुद्धा “कर” भरू नका दंड लागणार नाही, अभय योजना येणार आहे.आपण प्रामाणिकपणे बिल आले नाही तरी “ऑनलाइन” बिल काढून एक महिन्याच्या आत भरून टाकतो तरी आपला सन्मान केला जातच नाही पण कर बुडवणाऱ्या लोकांचा सन्मान केला जातो.
आमची महापालिका आयुक्त यांना विनंती आहे कृपया आपण चला ओके हि अभय योजना आणू नका महानगरपालिकेचे “भय” निर्माण होईल अशा पद्धतीची कृती करा.

नीलम गोऱ्हेंवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार: सुषमा अंधारे आक्रमक, ‘कर्तृत्वशून्य’ म्हणत केला हल्लाबोल

मुंबई-उद्धवसेनेत 2 मर्सिडीझ दिल्या की 1 पद मिळते, असा खळबळजनक आरोप शिंदे गटाच्या नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केला होता. यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला असून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. ठाकरेंच्या शिवसेना पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने नीलम गोऱ्हे यांनी जाणीवपूर्वक बेताल वक्तव्य केल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

नीलम गोऱ्हे यांनी जाणीवपूर्वक एक उदात्त आणि भव्यदिव्य परंपरा असणाऱ्या पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने काल अत्यंत बेताल वक्तव्य केले. सत्ताधारी पक्षांना खुश करून राज्यसभा किंवा मंत्रीपद पदरात पाडून घ्यायचे असतील तर त्यांनी ती खुशाल पाडून घ्यावीत. मात्र त्यासाठी सत्ताधाऱ्यांचे लांगूलचालन करताना त्यांनी पक्ष आणि पक्षप्रमुखांवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला आहे तो अत्यंत अश्लाघ्य असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या. त्यांचे हे बेताल वक्तव्य वंदनीय बाळासाहेब यांनी जोपासलेल्या परंपरेच्या मुळावरचा घाव आहे, अशी टीकाही अंधारे यांनी केली.

महाराष्ट्रातल्या लाखो शिवसैनिकांनी जीवाचे रान करून जो पक्ष उभा केला त्या पक्षाच्या जीवावर तब्बल चार वेळा आमदारकी भोगली. मोबदल्यात एक नगरसेवकच काय साधी पक्षाची एक शाखा आपल्या राहत्या भागात उभी करू न शकणाऱ्या कर्तृत्वशून्य महिलेकडून झालेली चिखलफेक महाराष्ट्र तथा मराठी मनाला दुखावणारी आहेत. पक्षाची प्रवक्ता आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून नीलम गोऱ्हे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
नीलम गोऱ्हे 25 वर्षांपासून पक्षात होत्या. त्यांच्या काळात असे काही झाले असेल, तर निश्चितच त्या त्याच्या लाभार्थी असतील. कलेक्शनचे काम एकनाथ शिंदेंकडे होते असेही काल त्या म्हणाल्या. त्यामुळे नेमके किती कलेक्शन झाले याबाबत दोघांनाही माहिती असेल. नीलम गोऱ्हेंनी सांगितलेले कलेक्शन किती आहे, काय काय आहे, त्याची टिपणे जाहीर करण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेंची आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
नीलम गोऱ्हे यांना त्यांचे म्हणणे कोर्टात सिद्ध करावे लागेल. अन्यथा नाक घासून माफी मागावी लागेल, असा इशारा सुषमा अंधारे यांनी केला. माझी लिगल टीम सर्व गोष्टींवर काम करत आहे. लिगल टीमचे फायनल ड्राफ्टींग माझ्या हातात आल्यानंतर किती रुपयांचा दावा ठोकायचा याबाबतची माहिती पोहोचवेल, असे सुषमा अंधारेंनी सांगितले.

नीलम गोऱ्हे आमचे देणे लागतात. कर्तृत्व नसताना त्यांनी अनेक लोकांची संधी अडवून अनेक पदे उपभोगली. भारीप बहुजन महासंघापासून ते आतापर्यंत त्यांनी काय केले आणि काय नाही, या सगळ्या गोष्टी बाहेर काढाव्या लागतील. नीलम गोऱ्हेंनी तशी वेळ येऊ देऊ नये, असा इशाराही सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना दिला.

नीलम गोऱ्हे यांचे वक्तव्य मूर्खपणाचे:संजय राऊत जे बोलले ते शंभर टक्के बरोबर- शरद पवार

मुंबई-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम वेगळ्या ठिकाणी होता. तर संमेलनातील इतर कार्यक्रम हे तालकोट मैदानावर झाले. साहित्य संमेलन यशस्वी झाले असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच संजय राऊत यांनी केलेल्या विधानाचे शरद पवार यांनी समर्थन केले आहे. संजय राऊत जे बोलले ते शंभर टक्के बरोबर, असे शरद पवार म्हणाले आहेत.नीलम गोऱ्हे यांच्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, नीलम गोऱ्हे यांना चार टर्म कशी मिळाली हे सर्वांना माहीत आहे. तसेच नीलम गोऱ्हे यांना असे भाष्य करण्याची गरज नव्हती. नीलम गोऱ्हे यांचे वक्तव्य मूर्खपणाचे होते. तसेच त्यांनी ते भाष्य केले नसते तर बरे झाले असते. संजय राऊत जे म्हणतात ते योग्य आहे.

संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्या वादग्रस्त विधानानंतर नाराजी व्यक्त करत अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाला पत्र पाठवले होते. संजय राऊत यांनी आयोजकांवर जाहीर नापसंती व्यक्त केली होती. त्यानंतर साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी माफी मागितली असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

पुढे बोलताना शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, नैतिकता आणि या लोकांचा काही संबंध असेल असे मला वाटत नाही. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले मी त्या गावात जाऊन आलो आहे. त्या गावातील लोकांच्या भावना मी समजू शकतो. कोणालाही स्वाभिमान असेल अशी व्यक्ती त्या पदावर अजिबात राहणार नाही. पण संबंध राज्यातून लोकांचा हल्ला होत आहे तरी सुद्धा सत्तेवर आपण बसून राहायचे ही जी भूमिका घेऊन हे लोक वागत आहेत.

‘स्वच्छ, सुंदर, विकसित कसबा’सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्स लावणार नाही,लाऊ देणारही नाही- आमदार हेमंत रासने यांचा निर्णय

पुणे-सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे फ्लेक्स लावणार नसल्याची घोषणा कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

रासने यांचे निवेदन

स्वच्छ, सुंदर, विकसित कसबा अभियानाअंतर्गत स्वच्छ भारत स्पर्धेत सातत्याने सात वर्षे पहिला क्रमांक मिळणाऱ्या इंदूर शहराचा काही दिवसांपूर्वी स्वच्छता कर्मचाऱ्यांसह अभ्यास दौरा केला.

माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुनियोजित, गतिमान प्रशासकीय उपाययोजना, प्रबळ राजकीय इच्छाशक्ती, लोकसहभाग आणि फ्लेक्समुक्त शहर ही इंदोरच्या यशाची चतु:सूत्री असल्याचे निदर्शनास आले.

लोकसहभागाची सुरुवात मी स्वतः पासून करण्याचे ठरविले आहे. या अभियानात खारीचा वाटा म्हणून सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे फ्लेक्स लावणार नसल्याचा निर्णय मी घेतला आहे. स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण आणि वाहतुकीची कोंडी टाळण्याबरोबर परिसराच्या सौंदर्यात भर पडण्यास या निर्णयामुळे मदत होईल असा विश्वास मला वाटतो.

या अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. गेल्या तीन महिन्यात मतदारसंघातील कचऱ्याची साठवणूक होणारे 26 क्रॉनिकल स्पॉट सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर बंद करण्यात यश मिळाले आहे.

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त येत्या बुधवारी (26 फेब्रुवारी) सायंकाळी 5 ते 7 या वेळेत या 26 ठिकाणी ‘स्वच्छता नारायणा’च्या महापूजा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्वच्छतेसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे पूजन या वेळी केले जाणार आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ सकाळी 11 वाजता न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेजवळ विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

अभियानात अधिकाधिक लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने या अभिनव स्वच्छता नारायण महापूजा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी त्यात मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन मी करतो.

जे क्रॉनिकल स्पॉट बंद केले आहेत, त्या ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकू नये यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. तसेच आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांची संख्या वाढविली असून काही भागात दोन वेळा कचरा संकलित करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रक्रियेला पुढील काळात माहिती तंत्रज्ञानाची जोड दिली जाणार आहे. कचरा मुक्त झालेल्या परिसराचे लवकरच सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

स्वच्छ, सुंदर कसबा अभियान गती घेत असताना विकसित कसबा साकारण्याच्या उद्देशाने गेली तीन महिने मतदार संघातील विविध स्तरांवरील नागरिकांशी सतत संपर्क साधला. त्यानुसार पुढील पाच वर्षांसाठी विकसित कसब्यासाठीचे प्राधान्यक्रम निश्चित केले असून, त्या संदर्भात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. आगामी काळात या विकास कामांचा पाठपुरावा करणार आहे.

१) स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियान

२) मराठा साम्राज्याच्या जाज्वल्य इतिहासाचे प्रतीक असणाऱ्या शनिवारवाड्याचे पुनरुज्जीवन

३) वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी सारसबाग ते शनिवारवाडा (बाजीराव रस्ता) आणि शनिवारवाडा ते स्वारगेट (छत्रपती शिवाजी महाराज रस्ता) भुयारी मार्ग

४) सारसबाग आणि पेशवे उद्यानाचा एकात्मिक विकास

५) ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरातील जुन्यावाड्यांचा प्रश्न

६) नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधेसाठी डॉ.कोटणीस आरोग्य केंद्राचा पुनर्विकास

७) खडक पोलीस वसाहतीतील धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी

८) मामलेदार कचेरी येथील रखडलेले शासकीय इमारतींचे बांधकाम

९ ) दुरावस्था झालेल्या पुणे महानगरपालिका वसाहतींचा पुनर्विकास

१०) नेहरू स्टेडियमचा खेळासाठी विकास

११) लोकमान्यनगर भागातील म्हाडा प्रकल्पाचा एकात्मिक विकास

१२) श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर विस्तारासाठी शासकीय जागा हस्तांतरित करण्याची विनंती

१३) श्री कसबा गणपती मंदिर, श्री ओमकारेश्वर मंदिर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर यांना ब वर्ग दर्जा मिळणे बाबत

अनेकांना घडवणाऱ्या पुण्याला वैभवशाली वारसा-डॉ. शां. ब. मुजुमदार

सुनील देशमुख लिखित ‘विदेशमुखी’ यशोगाथाचे प्रकाशन
पुणे, ता. २४: “विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेले पुणे आता औद्योगिक नगरी म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे. इथली हवा, माती ही वेगळीच असून, पुणे शहराला एक वैभवशाली वारसा आहे. या पुण्याने अनेकांना घडवले असून, यशाच्या उत्तुंग शिखरावर नेले आहे,” असे प्रतिपादन सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजूमदार यांनी व्यक्त केले. जर मी पुण्यात आलो नसतो, तर सिम्बायोसिस संस्था सुरू करू शकलो नसतो, असेही डॉ. मुजुमदार म्हणाले.

जिद्द आणि उमेदीने संघर्षाशी दोन हात करून आयुष्याला प्रेरणादायी यशोगाथा बनवलेल्या लेखक सुनील देशमुख लिखित ‘विदेशमुखी’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मुजुमदार यांच्या हस्ते झाले. सेनापती बापट रस्त्यावरील सुमंत मुळगावकर सभागृहात झालेल्या या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, लेखक सुनील देशमुख, प्रकाशक अमलताश बुक्सचे सुश्रुत कुलकर्णी उपस्थित होते.

डॉ. शां. ब. मुजूमदार म्हणाले, “तुमच्यात किती जिद्द, चिकाटी आहे, यावरच तुमचे यश अवलंबून असते. प्रत्येकाने हार न मानता चिकाटीने आपल्या क्षेत्रामध्ये कार्य करत राहिले पाहिजे. मात्र, असे करत असताना इतरांशी संवाद साधताना नम्रता बाळगलीच पाहिजे. काणतेही क्षेत्र असो हतोटी, सचोटी, कसोटी आणि दुरदृष्टी या चार गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. या चार गोष्टींचा अवलंब करून कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त करता येऊ शकते. प्रत्येकाने आपले मुल्य वाढवण्यासाठी झटले पाहिजे. स्वतःचे मुल्य वाढवल्यास आपण नक्कीच प्रगती करू शकतो.”

डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, “लेखनाला तंत्रज्ञानाची जोड द्यायला हवी. सध्याचा काळ डिजिटल तंत्रज्ञानाचा आहे. युवापिढी वाचनासाठी पुस्तकांबरोबरच तंत्रज्ञानाचाही उपयोग करते. त्यामुळे अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी पॉडकास्ट, ऑडिओ बुक अशा विविध माध्यमांचा उपयोग केला पाहिजे. संघर्षातूनच आयुष्य घडत असते. त्यामुळे आयुष्यात आलेल्या आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जात प्रगतीच्या दिशेने जात राहावे. सुनील देशमुख यांनी असाच जिद्दीने केलेला हा प्रवास इतरांसाठी प्रेरक राहील, अशी खात्री वाटते.”

सुनील देशमुख यांनी पुस्तकाचा प्रवास उलगडून सांगितला. सिम्बायोसिस संस्थेचा माजी विद्यार्थी म्हणून मुजुमदार सरांकडून प्रेरणा घेतली. जिद्दीने काम करत राहिलो. आयुष्यात अनेक संघर्षाचे क्षण आले, पण त्यात खचून न जाता धैर्याने उभा राहिलो. या प्रवासात अनेकांनी चांगली साथ दिली. त्यामुळे हा प्रवास अधिक सुखद होत गेला, असे देशमुख यांनी नमूद केले. प्रियांका जोशी यांनी सूत्रसंचालन केले. माधुरी देशमुख यांनी आभार मानले.

…तर 18 मर्सिडीजचा हिशोब महाराष्ट्रासमोर मांडाच; ठाकरेंच्या सेनेचे नीलमताईनां Open Challeng

मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असं खळबळजनक वक्तव्य शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात ठाकरे सेनेमध्ये संतापाची लाट उसळली आहे.नीलम गोऱ्हेंनी 9 पदं भोगली, मग 18 मर्सिडीजचा हिशोब महाराष्ट्रासमोर मांडावा असं ओपन चॅलेंज ठाकरेंच्या नेत्याने दिलं आहे.शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी ट्विट करत गोऱ्हे यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी हे ट्विट त्यांना टॅगदेखील केलं आहे.

https://x.com/akhil1485/status/1893588607891653077?t=sbmZWz7PvbZSQQ50BJa1Sg&s=19

आजपर्यंत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ९ पदांसाठी १८ मर्सिडीज दिल्या… म्हणजे @neelamgorhe ह्या गाड्या देऊन पदं मिळवत होत्या असं मानावं का? असा सवाल अखिल चित्रे यांनी उपस्थित केला आहे.
आजपर्यंत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ९ पदांसाठी १८ मर्सिडीज दिल्या… म्हणजे @neelamgorhe ह्या गाड्या देऊन पदं मिळवत होत्या असं मानावं का? म्हणजे हि पदं त्यांनी स्व-कर्तृत्वावर मिळवली नव्हती ! कृपया महाराष्ट्राने दखल घ्यावी.कारण
२००२ : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून निवड (पहिला कार्यकाल)
२००८ : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून पुनर्निवड (दुसरा कार्यकाल)
२०१० : शिवसेना पक्षाचे प्रवक्ते
२०११ पासून: शिवसेना उपनेते
२०१४ : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून पुनर्निवड (तिसरा कार्यकाल)
२०१५: विशेष हक्क समिती (विशेष हक्क समिती) अध्यक्ष, महाराष्ट्र विधान मंडळ
२०१९: महाराष्ट्र विधान परिषदचे उपसभापती म्हणून निवड
२०२०: महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून पुनर्निवड (चौथा कार्यकाल)
२०२०: महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती म्हणून पुनर्निवड ते आजतागायत
नीलम ताई तुम्ही म्हणता १ पदासाठी शिवसेनेत २ मर्सिडीज द्यावी लागतात मग वरील ९ पदांसाठी तुम्ही दिलेल्या १८ मर्सिडीजची माहिती महाराष्ट्रासमोर मांडू शकलात तर बरं होईल. २२ फेब्रुवारी १९९८ रोजी म्हणजे बरोबर २७ वर्षांपूर्वी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धवजींच्या कार्यकाळात इतकं मिळूनही अन्याय म्हणत असाल तर तुम्हाला साहित्याची पार्श्वभूमी आहे म्हणून सांगतो ‘हा शुद्ध कृतघ्नपणा आहे’ !

भारताने पाकला लोळविले – 45 चेंडू शिल्लक असताना, 6 गडी राखून केला पाकचा पराभव

0

दुबई-चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला. यासह, संघाने 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 180 धावांनी पराभवाचा बदला घेतला. रविवारी दुबईमध्ये पाकिस्तानने 241 धावा केल्या. भारताने 42.3 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठले.

भारताकडून विराट कोहलीने नाबाद 100, श्रेयस अय्यरने 56 आणि शुभमन गिलने 46 धावा केल्या. कुलदीप यादवने 3 आणि हार्दिक पंड्याने 2 विकेट घेतल्या. पाकिस्तानकडून सौद शकीलने 62 आणि मोहम्मद रिझवानने 46 धावा केल्या. शाहीन शाह आफ्रिदीने 2 विकेट घेतल्या. अबरार अहमद आणि खुशदिल शाह यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

158 झेल घेऊन विराट एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू ठरला. त्याने डावात 15 वी धाव काढताच सर्वात जलद 14,000 एकदिवसीय धावा पूर्ण केल्या. कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाजही ठरला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगला मागे टाकले, ज्याच्या नावावर 27,483 धावा आहेत.

सलग दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने पाकिस्तान स्पर्धेतून जवळजवळ बाहेर पडला आहे. भारताच्या विजयात सर्वात मोठे योगदान विराट कोहलीने दिले, ज्याने नाबाद १०० धावांची शतकी खेळी केली. याआधी भारताकडून कुलदीप यादवने ३ विकेट घेतल्या होत्या.
भारताने २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात (8 वर्षापूर्वी) पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २४१ धावा केल्या. २४२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने ४५ चेंडू शिल्लक असताना हे लक्ष्य गाठले. विराटने केवळ चौकार मारून आपले शतक पूर्ण केले नाही तर भारताचा ६ विकेट्सनी विजयही निश्चित केला. शानदार खेळीसाठी कोहलीला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील त्याचे ५१ वे शतक झळकावले आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत विराटने आधीच आघाडी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे त्याचे ८२ वे शतक आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटने १११ चेंडूत १०० धावांची नाबाद खेळी केली. विराटने किती संयमाने खेळला याचा अंदाज त्याने त्याच्या डावात फक्त ७ चौकार मारले यावरून येतो. या सामन्यात विराटने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील १४,००० धावाही पूर्ण केल्या

दिल्लीत मराठीजनांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू उभारण्यात येणार – अजित पवार

0

संस्कृतीची वाहक असलेल्या भाषेची निगा राखणे सर्वांचे कर्तव्य – डॉ. भवाळकर

नवी दिल्ली, दि.23 : भाषा ही आपली ओळख, अस्मिता, आणि अभिमान असून भाषा हेच आपले अस्तित्व आहे. भाषा संपली तर आपले अस्तित्वही संपेल हे लक्षात घेऊन तिच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटीबद्ध व्हावे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी केले. मराठीला अभिजात वैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही देताना नवी दिल्लीत मराठीजनांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू उभारण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केली.

राजधानीतील तालकटोरा स्टेडिअममध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत गेले तीन दिवस सुरू असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप आज सायंकाळी झाला. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषामंत्री उदय सामंत, संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, लोकमत वृत्तपत्रसमूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी डी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासह अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, कार्यवाह डॉ.उज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, निमंत्रक संजय नहार, शैलेश पगारिया, युवराज शहा यांच्यासह साहित्य महामंडळाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

जे जे मराठी, ते ते जोपासण्याची भूमिका सर्वांनी घ्यावी – श्री.शिंदे
मराठीला वैश्विक पातळीवर नेण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून यासाठी साहित्यिक, विचारवंत आणि शासनाकडून संयुक्तपणे प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त करून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्याच्या कारभारात मराठीचा वाढता वापर होत आहे. सर्वसामान्यांच्या व्यवहार व शिक्षणात मराठीचा वापर वाढण्याची गरज आहे. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज यांच्या नावे मराठी अध्यासन केंद्र सुरु करण्यासाठी राज्य शासनाने दहा कोटी रुपये दिले असून लवकरच हे केंद्र कार्यान्वित होणार आहे. राज्य सरकारने राज्यातल्या ग्रंथालयांना अनुदान वाढवून दिले आहे. नवलेखकांकडून कथा, कादंबरी, कवित या सर्वच क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. यामधून वर्तमानाचा वेध घेवून आजच्या पिढीचे प्रश्न मांडण्याचे धाडस केले जात आहे. या लेखकांच्या साहित्याची दखल घेण्याची जबाबदारी मराठी भाषिकांची आहे. मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ग्रंथ प्रदर्शनांचे आयोजन केले जावे, अशी सूचना करतानाच रिद्धपूर मराठी भाषा विद्यापीठासाठी पुरेसे मनुष्यबळ व निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही श्री. शिंदे म्हणाले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठीतील विविध साहित्यप्रवाहांचा संगम आहे. महाराष्ट्राच्या भूमीत संतांनी भक्ती संप्रदाय निर्माण केला, तर, वीरांनी शक्ती संप्रदाय निर्माण केला. विविध लोककलांनी मराठी भाषा समृद्ध होत गेली. आता मराठी भाषेच्या अभिजातपणाचा सूर्य उगवलेला आहे, त्याचा प्रकाश सर्वत्र पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. मराठीचा वेलू गगनावरी नेण्यासाठी जे जे मराठी, ते ते जोपासण्याची भूमिका सर्वांनी घ्यावी, असे आवाहन करून श्री. शिंदे म्हणाले, मराठी संस्कृती जपण्यासाठी आपण टोकाचे आग्रही असले पाहिजे. विविध घटकांच्या एकत्रिकरणातून मराठी संस्कृती आणि समाज तयार होतो. तो टिकविण्यासोबतच वाढविला पाहिजे. दोन वर्षांनी 100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. येत्या दोन वर्षात मराठीने भाषेने गरुड झेप घ्यावी, मराठी ही आई, ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, बहिणाबाई, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर अशी सर्वांचीच भाषा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीत झालेले हे संमेलन दीर्घकाळ स्मरणात राहील, असे सांगून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

नवी दिल्लीत मराठीजनांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू – उपमुख्यमंत्री पवार
मराठीला अभिजात वैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही देताना नवी दिल्लीत मराठीजनांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू उभारण्यात येईल, अशी घोषणा करून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या भव्य संस्कृतीला साजेशा अशा या वास्तूसाठी आगामी अर्थसंकल्पात शासन पुरेसा निधी उपलब्ध करून देईल. राज्य शासन अतिशय चांगल्या भावनेने सांस्कृतिक उपक्रमांसाठी मदत करत असते ही बाब लक्षात ठेऊन साहित्यिकांनी स्वाभिमानाने साहित्यनिर्मिती करावी. महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे सक्तीचे करण्यात आले आहे. याबाबत काही उणीवा असतील तर त्याचा पुन्हा आढावा घेतला जाईल. मराठी ज्ञानभाषा व्हावी, मराठीची उपयुक्तता वाढावी, ती बहुजात आणि बहुज्ञात व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. मराठी भाषेला अभिजात वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, प्रसारासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही, तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या मराठी भाषिकांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहील, असेही श्री पवार यांनी सांगितले.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणाऱ्या पहिल्याच अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे आभार मानले. विठ्ठल भक्तांचा मेळा दरवर्षी पंढरीत जमतो. त्याचप्रमाणे, संमेलनाच्या निमित्ताने दरवर्षी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी साहित्यिकांचा मेळा साहित्य पंढरी निर्माण करतो. भक्तिभाव, समाधान आणि नवीन ऊर्जा या दोन्ही पंढरीचे विशेष गुणधर्म असून साहित्य संमेलनातून मिळणाऱ्या उर्जेतून नवे साहित्य निर्माण व्हावे. साहित्यिकांच्या लेखणीत समाजाला जागृत करण्याची, योग्य दिशा देण्याची क्षमता असते. तिचा वापर सकारात्मक बदलासाठी व्हावा. नवोदित लेखकांना गुणवत्तेनुसार संधी देण्याची भूमिका प्रथितयश साहित्यिकांनी घ्यावी. तसेच साहित्य संमेलनात विविध क्षेत्रातील मराठी भाषिक तरुणांचा सहभाग वाढायला हवा, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केली.
सध्या छावा चित्रपटाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास युवा पिढी समोर आला आहे. छत्रपती संभाजी महाराज साहित्यिकही होते. तुळापुर, वडूला त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज अध्यासन लवकरच सुरू होत असल्याची माहिती देऊन मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले, साहित्याचा खरा संस्कार या संमेलनाच्या माध्यमातून होत आहे. या संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले चाकावरचे साहित्य संमेलन हा अनोखा उपक्रम असून यापुढे होणाऱ्या साहित्य संमेलनानिमित्त अशा यात्री संमेलनाचे नियमित आयोजन व्हावे. त्यास शासनाकडून मदत केली जाईल. मराठी भाषेचा मंत्री म्हणून या विभागाचा कार्यभार सांभाळताना आपण विविध उपक्रमांच्या माध्यमातून मराठीच्या विकासासाठी निष्ठेने प्रयत्न केल्याचे त्यांनी यावेळी आर्वजून सांगितले. देशाच्या राजधानीत मराठीचा जल्लोष होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून श्री दर्डा म्हणाले, मराठी वाचन संस्कृती जगवण्यासाठी व्यापक प्रयत्न करावे. लोकांची वाचनाची आवड भागविण्यासाठी ग्रंथ विक्रीस प्रोत्साहन द्यावे. नव्या पिढीकडून मातृभाषेचा वापर वाढवण्यासाठी शिक्षणात मराठीचा आग्रहाने अंर्तभाव करणे आवश्यक आहे.
मराठी शाळांच्या सुधारणांसाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करून संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, भाषा ही संस्कृतीची वाहक असते. तिची निगा राखणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. चांगले ठराव झाले. ते प्रत्यक्ष आले पाहिजेत. सीमा भागात त्या त्या भाषिकांची संख्या लक्षात घेऊन द्वैभाषिक शाळा सुरू झाल्या पाहिजेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत दुय्यम स्तरावरची मराठी शिकवली जाते. त्यात सुधारणा व्हावी. परदेशी भाषांप्रमाणेच भारतातील इतर भाषा शिकण्याची सोय हवी. शासनाने त्यासाठी कृतिशील पावले उचलावीत. मराठी भाषा वाढण्यासाठी घराघरातील मुले मराठीत शिकली पाहिजेत याची सर्वांनी काळजी घ्यावी. ज्ञान क्षेत्र जर समृद्ध करायचे असेल तर ज्ञानाप्रती तळमळ, आस पाहिजे. तसा समाज ज्ञानसंपन्न होतो. सीमा प्रदेशात संस्कृतीचे अभिसरण घडत असते. ‘भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे’ ही संत ज्ञानेश्वरांची उक्ती आत्मसात करत आपण स्नेह, प्रेम वाढवूया, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावपूर्ण भाषणाचा समारोप केला.
रिद्धपूर येथे स्थापित मराठी विद्यापीठात नियमित कामकाज तातडीने सुरू व्हावे, त्यासाठी मनुष्यबळ व आर्थिक तरतूद व्हावी, बृहनमहाराष्ट्रातील संस्थांना आर्थिक पाठबळ द्यावे, बोलीभाषांच्या संवर्धनासाठी बोलीभाषा विकास अकादमी स्थापन करावी आदी बारा ठराव यावेळी करण्यात आले

भारत फक्त 42 धावांनी दूर..

0

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या विजयापासून भारत फक्त 42 धावांनी दूर आहे. 242 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघाने 35 षटकांत दोन गडी गमावून 189 धावा केल्या आहेत. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर क्रीजवर आहेत. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली आहे.

विराटने त्याचे अर्धशतक पूर्ण केले आहे. आयसीसी एकदिवसीय स्पर्धेत हे त्याचे 23 वे अर्धशतक आहे. तो एकदिवसीय सामन्यात (287 डावांमध्ये) 14,000 धावा करणारा सर्वात जलद फलंदाज बनला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा 350 डावांचा विक्रम मोडला. रोहितने सलामीवीर म्हणून 9 हजार धावाही पूर्ण केल्या आहेत.

त्याआधी, पाकिस्तान 49.4 षटकांत 241 धावांवर ऑलआउट झाला. सौद शकीलने एकमेव अर्धशतक झळकावले. त्याने 62 धावा केल्या आणि कर्णधार मोहम्मद रिझवान (46) सोबत 104 धावांची भागीदारी केली.

37 व्या षटकात….

  • कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने 37 व्या षटकात रिकी पॉन्टिंगचा 27483 धावांचा विक्रम मोडला.
  • भारतानेही 200 धावा पूर्ण केल्या. संघ विजयापासून 42 धावा दूर आहे.
  • कोहली आणि अय्यर यांनी शतकी भागीदारी पूर्ण केली. भारताने 100 धावांवर आपली दुसरी विकेट गमावली.

राजकारणाच्या सोयीसाठी देशभर धार्मिक उन्माद

0

छत्रपती संभाजीनगर-आज देशभर धार्मिक उन्माद सुरू आहे. राजकारणाचा सोयीसाठी बेधुंद वापर केला जात आहे. याची परिणती धार्मिक संघर्षात होऊ शकते. त्यामुळे भारताच्या ‘गंगा-जमुना’ संस्कृतीला तडा जाऊ शकतो. यासाठी आपला उठाव संविधानाच्या चौकटीत राहून शांततामय मार्गानेच व्यक्त केला तरच भारतात लोकशाहीची पुनर्प्रतिष्ठा होऊ शकते, असे प्रतिपादन १९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अशोक राणा यांनी केले.

छत्रपती संभाजीनगरातील आमखास मैदानावर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मलिक अंबर साहित्यनगरीच्या व्यासपीठावरून डॉ. राणा बोलत होते. या वेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अशोक राणा, मावळते अध्यक्ष डॉ. वासुदेव मुलाटे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्य अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी, स्वागताध्यक्ष सतीश चकोर, मुख्य निमंत्रक ॲड. धनंजय बोरडे उपस्थित होते.

डॉ. राणा म्हणाले, ‘मराठी भाषेला अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आनंदाची बाब आहे. पण हा दर्जा सदाशिवपेठेतील ब्राह्मणांच्या बोलीपुरता सीमित आहे की महाराष्ट्रातील सर्व विभागातील बोलीभाषांनाही लागू आहे, हे स्पष्ट झाले नाही. वऱ्हाडी, मराठवाडी, खान्देशी, अहिराणी, कोकणी, सातारी आणि कोल्हापुरी या बोलींनाही अभिजात मराठीमध्ये कोणते स्थान आहे हे स्पष्ट झाले नाही. मराठीचे व्याकरण हे सदाशिवपेठेतून लादलेले आहे.’

प्रा. प्रल्हाद लुलेकर, उर्दू साहित्यिक नुरूल हसनैन, सूर्यकांता गाडे, राज्य संघटक किशोर ढमालेही या वेळी उपस्थित होते. शीतल गावित यांचे अखंड गायन, अमृत भिल यांचे पावरीवादन, नरेंद्र राठोड यांचे कबीराचे अभंग आणि डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या छक्कडचे सादरीकरण झाले. डॉ. किशोर शिरसाटांनी सूत्रसंचालन केले. डॉ. वैशाली डोळस यांनी आभार मानले.

अ. भा. साहित्य संमेलन दिल्लीत घेण्यात आले. चुकून त्यांनी तारा भवाळकर यांची निवड अचूक केली. मात्र, ते साहित्य संमेलन नसून भाजपचे अधिवेशन झाले.. इथे चिमुकल्या मुलींवर बलात्कार होत आहेत अन् मुख्यमंत्री मात्र कार्यक्रमांत व्यग्र आहेत. माणसाच्या हृदयातील राम यांना दिसत नाही. रामाचे नाव घेत फिरणारे हे मुख्यमंत्री, गृहमंत्री आहेत. विद्रोहच समानतेचे बीज रुजवू शकतो, असे वासुदेव मुलाटे म्हणाले.

महात्मा फुलेंना ग्रंथसभेने जेव्हा पहिल्यांदा आमंत्रित केले तेव्हा ते म्हणाले होते की, ‘तुमचे संमेलन दुहीचे बीज रोवणारे आहे. अखिल मानवाला एकत्र धरणारे संमेलन हवे तेव्हाच मी येईन.’ एका विशिष्ट जातीच्या लोकांना आमचा विरोध नाही, तर त्यांच्या विचारधारेला आमचा विरोध आहे. ‘विषमतेला नकार, समतेला होकार’ हे आमचे ब्रीद आहे. असे सांस्कृतिक चळवळ अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी सांगितले.

सामाजिक विषमता समानतेमध्ये रूपांतरित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न गरजेचे आहेत. अलीकडे बेमालूमपणे पाठ्यपुस्तकातून मनुस्मृती रुजवण्याचे काम सुरू झाले आहे. याकडे सर्वांनी जाणीवपूर्वक लक्ष देणे अन् विरोध करणे गरजेचे असल्याकडे स्वागताध्यक्ष चकोर यांनी लक्ष वेधले.