पुणे दि. 25 : जी.डी.सी.अँड ए व सी. एच. एम. परीक्षा, २०२५ साठी https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. 7 मार्च 2025 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच बँकेमध्ये चलनाने भरणा करण्याची मुदत दि. 13 मार्च 2025 पर्यंत (बँकेचे कामकाजाचे वेळेत) वाढविण्यात आली आहे अशी माहिती सचिव, जी.डी.सी.अँड ए. बोर्ड तथा उपनिबंधक (प. व प्र. ), सहकारी संस्था, पुणे यांनी कळविली आहे.
केंद्र सरकारच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा पुण्यातील पीबीसीच्या एरो हब प्रायव्हेट लिमिटेडशी सामंजस्य करार
संरक्षण खात्यातील ड्रोन ट्रेनरला मिळणार प्रशिक्षण
पुणे : केंद्र सरकारच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल ( CAATS) ने पुण्यातील पीबीसी एरो हब रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन सोबत सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार डीजीसीए चे आगामी काळातील ड्रोन उड्डाणावरील प्रमाणपत्र अभ्यास प्रशिक्षण वर्ग पीबीसी मार्फत घेण्यात येणार आहेत. नुकताच कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचे जनरल अभिनय राय व पीबीसी च्या संचालिका अंजली चित्ते यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहते. यावेळी पीबीसी एरो हब चे संचालक प्रणव चित्ते, ब्रिगेडियर शौकीन उपस्थित होते.
याविषयी अधिक माहिती देताना पीबीसी एरो हब चे संचालक प्रणव चित्ते यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही ड्रोन प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत असून अनेक ठिकाणी आम्ही सेवा पुरवत आहोत. आज पर्यंत आम्ही महाराष्ट्र, गुजरात आणि ओडिसा राज्यातील होतकरू महिलांना नमो ड्रोन दीदी उपक्रमा अंतर्गत ड्रोन उडविण्याचे प्रशिक्षण दिलेले आहे. तसेच हजारहून जास्त विद्यार्थ्यांनी आमच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये ड्रोन विषयक धडे घेतले आहेत. नुकतेच आम्ही ड्रोन उड्डाणावरील अभ्यासक्रमांसाठी कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन स्कूल (CAATS) सोबत सामंजस्य करार केला असून आमच्यासाठी ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. त्यानुसार डीजीसीए चे आगामी काळातील ड्रोन उड्डाणावरील अभ्यास प्रशिक्षण वर्ग पीबीसी मार्फत घेण्यात येणार आहेत.
दरम्यान, आगामी काळात सीमा भागात किंवा सरक्षण विभागात टेहाळणी करण्यासाठी वापरले जाणारे ड्रोन, युद्ध किंवा आक्रमनासाठी वापरले जाणारे, डोळ्यांच्या क्षमते पलीकडे म्हणजे साधारणता ३ ते ५ किमी उंचीवरुन उडान करणारे ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचे संचालक प्रणव चित्ते यांनी सांगितले.
PBC AERO HUB PVT LTD संस्थे विषयी : –
PBC AERO HUB PVT LTD ही संस्था ड्रोन ट्रेनिंग क्षेत्रात कार्यरत आहे. क्रेंद्र सरकारच्या DGCA (Director General of civil Aviation) ची मान्यता प्राप्त ही संस्था असून. ड्रोन उडवण्यासाठी आवश्यक असलेले Micro, Small & medium class चे सर्टिफिकेट ही संस्था देते. पुणे शहरात या संस्थेचे मुख्यालय असून ट्रेनिंग सेंटर सासवड येथे आहे.
सात दिवस लोहगडावर श्रमदानातून छत्रपती शिवाजीमहाराज यांना जयंती निमित्त अभिवादन
पुणे : ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर चेअरमन सागर ढोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच लोहगड या ठिकाणी संपन्न झाले. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी श्रमदानातून ऐतिहासिक अशा लोहगड किल्ल्याची साफसफाई केली.गावातील विविध मंदिरे, शिवस्मारक, जिल्हा परिषद शाळा ,सार्वजनिक ठिकाणी श्रमदान केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त लोहगड किल्ल्यावर श्रमदानातून करून अभिवादन करण्यात आले.
जगद्गुरू संत तुकोबाराय यांचे थेट वंशज ह.भ.प शिवाजी महाराज मोरे, लोहगड विसापूर विकास मंचाचे शिव दुर्ग संवर्धक सचिन टेकवडे, प्रा.महादेव वाघमारे (जुनियर मकरंद अनासपुरे), रमन बेडेकर (ऑस्ट्रेलिया), कंपनी 3 इंडिया एच. आर. हेड ब्रह्मानंद मंडल यांची व्याख्याने शिबिरामध्ये झाली विविध विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी संचालक रोनक ढोले पाटील ,प्राचार्य डॉ. ओमप्रकाश राजनकर उपस्थित होते. समारोप समारंभात श्यामसुंदर माडेवार या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या शिबिरासाठी चेअरमन सागर ढोले पाटील सर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजात शेवटच्या घटकांपर्यंत पोहचून सामाजिक काम केले पाहिजे असे मत सागर ढोले पाटील यांनी व्यक्त केले व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सांस्कृतिक कार्यक्रम विविध सामाजिक विषयावर विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केली. शिबिराचे आयोजन चेअरमन सागर ढोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी प्रा.श्रीकांत जगताप व विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.प्रशांत नकाते यांनी केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी अथर्व गवळी, शिवम रुद्र, साहिल राऊत, अपूर्वा चव्हाण, ईश्वरी म्हस्के, वेदांग जाधव, वैष्णवी बांगले यांनी परिश्रम घेतले.
मंत्रालयात घुमला आवाज: इन्कलाब झिंदाबाद अन चौथ्या मजल्यावरून तरुणाने मारली उडी-वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना पोलिसांची धक्काबुक्की
न्यायासाठी आंदोलन -त्याचे वार्तांकन करणारांना हि प्रतिबंध .. देवेन्द्रराज
मुंबई–मंत्रालयात एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे. मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून या तरुणाने उडी मारली. सुदैवाने सुरक्षा जाळीत अडकल्याने मोठा अनर्थ टळला असून या तरुणाचा जीव वाचला आहे. या वेळी पोलिसांनी जाळीवर जात तरुणाला धरून सुखरूप बाहेर काढले असल्याचे दिसते.
या तरुणाचे मंत्रालयातील महसूल विभागात काम होते. जागेच्या संदर्भात आपल्याला न्याय मिळत नसल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. मात्र आपले काम होत नसल्याचे लक्षात आल्यावर इंकलाब जिंदाबादच्या घोषणा देत मंत्रालयातील चौथ्या मजल्यावरून त्याने थेट उडी मारली. मात्र जाळीवर अडकल्याने त्याचा जीव वाचला असून त्याला पोलिसांनी तातडीने मदत करत सुखरूप बाहेर काढले. या तरुणाचे अद्याप नाव समजू शकले नाही.
दरम्यान, पोलिसांनी पत्रकारांना या तरुणाशी संवाद साधण्यापासून देखील रोखल्याचे समोर आले आहे. यावर संतप्त पत्रकारांनी मंत्रालय पोलिस उपायुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले आहे. जनतेचे प्रश्न आम्ही मांडत असतो मात्र आम्हाला धक्काबुक्की केली जाते, असा आरोप यावेळी संतप्त पत्रकारांनी केला आहे. तसेच पोलिस माफी मागत नाहीत तोपर्यंत आंदोलन करणार. यावेळी पत्रकारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपली व्यथा सांगीतली.
देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री अंकिता राऊत दिसणार ‘दर्याचं पाणी’ या कोकणी गाण्यात
देवमाणूस मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री अंकिता राऊत हे लवकरच साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘दर्याचं पाणी’ या कोकणी गीतात एकत्र दिसणार आहेत. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर दर्याचं पाणी या गाण्याचा प्रोमो शेअर केला आहे. अलिबागच्या नयनरम्य समुद्र किनारी या गाण्याचं चित्रीकरण झालं आहे. या गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर हे आहेत. गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनवणे यांनी हे गाणं गायलं असून श्रद्धा दळवी हिने या गाण्याचे बोल लिहिले आहेत. विजय बुटे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला अमेय मुळे यांनी संगीत दिलं आहे.
कोकणचा जावई म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड दर्याचं पाणी या गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतो, “माझी खूप आधीपासून इच्छा होती की एकदा तरी कोकणी गीतात काम करायचं. दिग्दर्शक विजय बुटे यांनी जेव्हा या गाण्याची संकल्पना माझ्याजवळ व्यक्त केली. तेव्हा मी फारच उत्सुक होतो. कोळी गेटअप मध्ये नाचताना खूप मज्जा आली. आणि समुद्र म्हणजे माझा आवडता विषय असल्या कारणाने, दिवसभर समुद्र किनारी बागडायला आणि शूटिंग करायला धम्माल आली. विशेष म्हणजे माझ्या कोळी लूकवर सोशल मीडियाद्वारे माझे फॅन्स छान छान कमेंट्स करून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. हे पाहून खूपच आनंद झाला.”
पंडित कुमार गंधर्व यांचा जन्मशताब्दी वर्षानिमित्त पंडित कुमार गंधर्व महोत्सव आयोजन
मुंबई , दि. २३: पंडित कुमार गंधर्व यांच्यावर आधारित सांस्कृतिक कार्य विभागाने सांगितिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या पंडित कुमार गंधर्व शास्त्रीय संगीत महोत्सवाचे बाल शिक्षण मंदिराजवळ एम.ई.एस. सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे येथे २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात येणार आहे.
पंडित कुमार गंधर्व शास्त्रीय संगीत महोत्सवाची संकल्पना ॲड. आशिष शेलार मा. मंत्री सांस्कृतिक कार्य यांची असून श्री विकास खारगे मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनातून कार्यक्रमाची निर्मिती झाली आहे. या कार्यक्रमात ख्यातनाम कलावंत सहभाग घेणार आहेत. विख्यात गायिका सानिया पाटणकर ,तर पंडित कुमार गंधर्व जी यांचे ज्येष्ठ शिष्य व लेकीन चित्रपटांमध्ये फेम पंडित सत्यशील देशपांडे ,कुमार गंधर्व निर्गुणी भजन पुष्कर लेले यांचे गायन असून अरुंधती पटवर्धन आणि कलावर्धिनी ग्रुप यांची नृत्य संध्या माध्यमातून पंडित कुमार गंधर्व यांच्या स्मृतीला उजाळा देण्यात येईल. महाशिवरात्रनिमित्त रसिक प्रेक्षकांनी व नागरीकांनी या सांगितिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री विभीषण चवरे संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.
रांजणगाव ग्रामपंचायतीसाठी घोड धरणावरूननवी पाणी पुरवठा योजना तातडीने मार्गी लावा-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
मुंबई, दि. 25 :- पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीचे आध्यात्मिक, तीर्थपर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्व तसेच ग्रामपंचायत हद्दीत ‘एमआयडीसी’ असल्यामुळे या क्षेत्रात स्थलांतरीत लोकसंख्येचे प्रमाण अधिक असून भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन जलजीवन मिशनअंतर्गत घोड धरणावरून नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना दिल्या. रांजणगावची भविष्यातील गरज ओळखून ग्रामपंचायत परिसरात मोठ्या क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, स्वच्छ भारत मिशनमधून निधी देण्यात येईल, त्यासोबत ग्रामपंचायतीच्या वाट्यासह ‘सीएसआर’ निधी उभारण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या.
रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत (दूरदृश्य प्रणालीद्वारे), माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील (दूरदृश्य प्रणालीद्वारे), वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी (दूरदृश्य प्रणालीद्वारे), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक कुणाल खेमनार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील (दूरदृश्य प्रणालीद्वारे), महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता वैशाली आवटे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जनरल मॅनेजर (भूसंपादन) बप्पासाहेब थोरात यांच्यासह संबंधित विभाग व यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीत मार्गदर्शन करताना म्हणाले की, अष्टविनायकांपैकी असलेले रांजणगाव गणपती हे ठिकाण राज्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला आले आहे. या परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेक उद्योग-व्यवसाय उभे राहिले आहेत. त्यामुळे रांजणगाव गणपती ग्रामपंचायत हद्दीत स्थलांतरीत लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे. त्याचा ताण ग्रामपंचायतीच्या पायाभूत सुविधांवर पडत आहे. यासह भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन जलजीवन मिशनअंतर्गत घोड धरणावरून नवीन पाणी पुरवठा योजना तातडीने मार्गी लावावी. रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येला आवश्यक नागरी सुविधा देण्यासाठी पुरेशा क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन समिती, स्वच्छ भारत मिशनमधून देण्यात येईल, त्याचसोबत ग्रामपंचायतीच्या हिश्श्यासह उद्योजकांकडून सामाजिक दायित्व (सीएसआर) निधी उभारण्यात यावा. रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसावंगी या ग्रामपंचायतीकडून सूचविण्यात आलेली विकासकामे ‘एमआयडीसी’ मार्फत करण्याच्या सूचना त्यांनी ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांना दिल्या.
हिवरे पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाण्याची उपलब्धता, लोकसंख्या आणि नागरिकांची वाढीव पाण्याची गरज लक्षात घेऊन यंत्रणांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देत यासाठीचा आवश्यक तो निधी राज्य शासनामार्फत उपलब्ध करुन दिला जाईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
दिल्ली विधानसभेतून AAPचे 21 आमदार निलंबित
विरोधी पक्षनेत्या आतिशी म्हणाल्या की, जेव्हा आप आमदारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विधानसभेत घोषणाबाजी केली तेव्हा त्यांना निलंबित करण्यात आले. पण जेव्हा भाजप आमदारांनी पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या तेव्हा काहीही बोलले गेले नाही. याचा अर्थ भाजप डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करते.
#WATCH | Delhi: After being suspended from the Legislative Assembly for the whole day, former CM and Delhi LoP Atishi says, "BJP has replaced the portrait of Dr Babasaheb Bhimrao Ambedkar with that of PM Modi in the CM office, cabinet ministers office…Is PM Modi bigger than Dr… pic.twitter.com/06yEnlWgOr
— ANI (@ANI) February 25, 2025
नवी दिल्ली- मंगळवारी दिल्ली विधानसभेच्या दुसऱ्या दिवशी, दारू धोरणावरील कॅगचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी हा अहवाल सभागृहात सादर केला. एलजी व्हीके सक्सेना म्हणाले की, मागील सरकारने हा अहवाल होल्डवर ठेवला होता. ते सभागृहात मांडण्यात आले नाही. त्यांनी उघडपणे संविधानाचे उल्लंघन केले.
या अहवालात असे म्हटले आहे की नवीन दारू धोरणामुळे दिल्ली सरकारला २००० कोटींचे नुकसान झाले आहे. धोरण कमकुवत होते आणि परवाना प्रक्रिया सदोष होती. तज्ञांच्या समितीने धोरणात काही बदल सुचवले होते, परंतु तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
मुख्यमंत्री भवनात भगतसिंग आणि आंबेडकरांच्या छायाचित्रांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष ‘आप’ने सभागृहात गोंधळ घातला. नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना भाषण देत असताना आपच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. यानंतर, विरोधी पक्षनेत्या आतिशींसह 13 आप आमदारांना संपूर्ण दिवसासाठी निलंबित करण्यात आले.
सभागृहाबाहेर पडल्यानंतर आतिशी म्हणाल्या की, मुख्यमंत्री भवनातून भगतसिंग आणि आंबेडकरांचे फोटो का काढून टाकण्यात आले. पंतप्रधान मोदी हे बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठे आहेत का? त्या म्हणाल्या की, आप सरकारच्या काळात प्रत्येक सरकारी कार्यालयात भगतसिंग आणि आंबेडकरांचे फोटो लावण्यात आले होते.
संभाजी महाराजांशी ,केवळ ब्राह्मण, मराठा सरदार, मुस्लिमच नव्हे तर सर्व जातीधर्माच्या लोकांनी दगाफटका केला- विश्वास पाटील
पुणे-छावा चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांशी झालेला दगाफटक्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. या प्रकरणी काहीजण ब्राह्मण कारभाऱ्यांना दोष देतात, तर काहीजण शिर्के घराण्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. पण लेखक विश्वास पाटील यांनी या प्रकरणी केवळ ब्राह्मण किंवा मराठा सरदारांना दोष देऊन उपयोग नसल्याचे नमूद करत संभाजी महाराजांशी सर्वच जातीधर्माच्या लोकांनी दगाफटका केल्याचा दावा केला आहे.
विश्वास पाटील म्हणाले, अलीकडे छत्रपती संभाजी महाराज यांच्या घातपातास कोण जबाबदार आहे? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. काहीजण मार्टिन नामक फिरंगी साहेबाची दैनंदिनी दाखवतात. पण मित्रहो माफ करा. हा मार्टिन एवढा मूर्ख आणि गैरजबाबदार होता की, त्याची डायरी पाहिली तर त्याने संभाजी महाराजांविषयी एवढे निंदक उद्गार काढले आहेत, एवढे अकलेचे तारे तोडलेले आहेत की, ते तुम्हाला वाचताही येणार नाही. या निमित्ताने मला महाराष्ट्राला सांगायचे आहे की, छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांच्या नशिबात जे काही घातापाताचे प्रसंग आले, त्यात सर्व जातीधर्माची माणसे सामील आहेत.
फक्त एकटे ब्राह्मण कारभारी किंवा एकटे मराठा सरदार अथवा फक्त मुस्लीम न्यायाधीश नाहीत. सर्व जातीधर्माच्या लोकांनी मोठ्या व छोट्या महाराजांशी दगाफटका केला होता. संभाजी महाराजांनी काही कारभाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली घातले होते. हा प्रसंग सर्वांना माहिती आहे. पण नंतर जी मोठी गद्दारी झाली ती ऑक्टोबर 1684 मध्ये झाली. हा फंद फितुरीचा दुसरा प्रकार होता. ही फितुरी संभाजीराजांच्या लक्षात येताच त्यांनी मानाजी मोरे, गंगाधर पंडीत व वासुदेव पंडित, शाहूजी सोमनाथ आदींना अटक केली होती. म्हणजे यात मराठे व ब्राह्मणही आहेत.
या लोकांना 1684 ला कैद करण्यात आले. नंतर त्यांची सुटका संभाजीराजांचा अंत झाल्यानंतर झाली. तोपर्यंत हे गद्दार तुरुंगातच होते. पुढे संभाजी महाराजांची 3 फेब्रुवारीची दुर्दैवी घटना होण्यापूर्वी 15-20 दिवस अगोदर प्रल्हाद निराजी नामक आपले न्यायाधीश औरंगजेबाला जाऊन मिळाले होते. संभाजी महाराज रायगडाच्या गादीवर येऊ नये म्हणून कारभाऱ्यांनी जो कट रचला होता. त्यात प्रल्हाद निराजी होते. संभाजीराजेंनी त्यांना माफ केले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा न्यायाधीश पद भूषवले, पण नंतर पुन्हा त्यांनी दगाफटका केला.
काजी हैदर औरंगजेबाला जाऊन मिळाला
शिवरायांनी रायगडच्या मुख्य न्यायाधीशपदी काजी हैदर नामक मुस्लीम व्यक्तीची नियुक्ती केली होती. ते शिवरायांची एकनिष्ठ राहिले. पण संभाजीराजांच्या काळात ते मोगलांना जाऊन मिळाले. याचा अर्थ असा की, संभाजीराजांच्या मार्गात सर्व जातीधर्माच्या लोकांनी दगाफटका केला आहे. तो वतन, जहागिरी व पैशांसाठी केला. सर्व जातीची माणसे यात सामील होती. हा मानवी खेळ आहे. आजही वर्षानुवर्षे चुलते-पुतणे एकत्र असतात, पण सत्तेचा प्रश्न आला की त्यांच्यात भेदभाव निर्माण होतो. हा मानवी धर्म आहे.
या निमित्ताने आपल्याला मान्य करावे लागेल की, संभाजीराजे हे केवळ वीर, पराक्रमीच नव्हते तर उत्तम शासक होते. शाहू महाराजांच्या काळात राधानगरीचे धरण झाले. परंतु संभाजी महाराजांच्या काळात विशाळगडाजवळ शेतकऱ्यांसाठी पहिला बांध घातला. धरण बांधण्याचा हा पहिला प्रयोग होता. संभाजी महाराजांनी कुडाळ व कोकणातील एक-दोन ठिकाणी तोफांचे कारखाने काढले होते. काही नाटककारांनी संभाजीमहाराजांना बायाबापड्यांच्या नावाने बदनाम केले. परंतु, ‘श्री सखी राज्ञी जयती’ नावाचा किताब आपल्या पत्नीला देणारे व स्त्री जातीला राजकारभाराची वरची पायरी देणारे ते तत्कालीन पहिले राजे होते, असे विश्वास पाटील यांनी म्हटले आहे.
शिर्क्यांच्या मुलूखातून संभाजी महाराजांना ओढून नेत असताना कुणीच अडवले नाही
एखादा वटवृक्ष मोडून पडावा असा अंत संभाजीमहाराजांचा झाला. त्यांना शिर्क्यांच्या मुलूखातून 12 तास ओढत नेण्यात आले. जे लोक म्हणतात की, शिर्क्यांनी दगाफटका केला नाही, नसेल केला, त्याला डायरेक्ट पुरावा नाही. पण शिर्क्यांच्या मुलूखातून त्यांना एवढे 10-12 तास ओढून नेत असताना मोगलांना कुणीही अडवले नाही. म्हणूनच महाराष्ट्रातील सर्वच जातीधर्मांनी महाराजांशी बेईमानी केली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या विषयावर चर्चा करताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, 3 फेब्रुवारीला घातपाताने संभाजीराजांना कैद झाली. त्यावेळी संभाजीराजे व कवी कलश यांच्या अश्वानींसुद्धा तीव्र प्रतिकार केला होता.
मराठ्यांनी म्हणावा तसा प्रतिकार केला का?
कैद झाल्यानंतर राजांना संगमेश्वर येथून प्रचितगडावर नेण्यात आले. नंतर कराड, श्यामगावची खिंड, वडूज, मसवड, दहिवडे, अकलूज, बहादुर गड (अहिल्यानगर) येथे भीमेच्या काठी आणण्यात आली. तिथे त्यांची घृणास्पद वागणूक देण्यात आली. 11 मार्च रोजी औरंगजेबाने त्यांना भीमेच्या काठी त्यांची हत्या केली. या सर्व 300-400 किलोमीटरच्या प्रवासात मराठ्यांनी म्हणावा तसा प्रतिकार केला का? मी काही लोककथा व गाण्यांचा शोध घेतला. मोगल सैनिक संभाजीमहाराजांना कैद करून घेऊन जात होते, तेव्हा कराड जवळ काही धनगर मुलांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. हे इतिहासात नाही. हा प्रसंग मला लोककथेमध्ये मिळाला.
रायप्पा महाराने वाचवण्याचा प्रयत्न केला
बहादुर गडावर रायप्पा महार नामक व्यक्ती संभाजी महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न करतो. हा प्रसंगसुद्धा लोककथेतला आहे. इतिहासातील नाही. पण रायप्पा महारांसारखे अनेक महार, अनेक कुंभार, अनेक कोळी आदी अठरापगड जातीचे लोक स्वराज्यासाठी झटत होते हे आपण विसरता कामा नये. महाराज ज्या पालखीत बसत होते, त्या पालखीला भोई खांदा देत होते. ते भोई कुठल्या जातीचे? हिंदवी स्वराज्य हे केवळ ब्राह्मण किंवा मराठ्यांनी सांभाळले नाही तर सर्वच जातीधर्माच्या लोकांनी सांभाळले व मोठे केले हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि ती धिंड.
विदुषकी टोपी घालून मिरवणूक काढण्यात आली
बहादुर गडावर ज्यावेळी संभाजी महाराजांना आणण्यात आले त्यावेळी विदुषकासारखा पेहराव त्यांना घालण्यात आला. त्यापूर्वी रस्त्यात त्यांना मोठी मारहाण झाली होती. एका मरतुकड्या उंटीणीच्या पाठीवर त्यांना उलटे बसवण्यात आले. त्यानंतर 15 फेब्रुवारीला डोक्यावर घुंगराची विदुषकी टोपी घालून संभाजी महाराज व कवी कलश यांची मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांसोबत मृत्यूच्या महामंदिराबरोबर चालत गेलेला महापुरुष कोण? असा मला प्रश्न कुणी विचारला तर मी कवी कलश यांचे नाव घेईन, असेही विश्वास पाटील आपल्या यूट्यूब चॅनेलवर संवाद साधताना म्हणाले.
संभाजीमहाराज संगमेश्वरला का गेले होते?
विश्वास पाटील म्हणाले, संभाजी महाराजांचा अंत एवढ्या दूर ठिकाणी होण्याचे कारण काय? याविषयी अनेक प्रश्न विचारले जातात. संभाजीमहाराजांचा जीवनांत झाला ते ठिकाणी म्हणजे कोकणातील रत्नागिरीलगतचे संगमेश्वर. इथे महाराज कशासाठी गेले होते? 1988 च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये संभाजीराजांना अचानक संगमेश्वरला म्हणजे शिर्क्यांच्या मुलुखात जावे लागले. शिवचरित्र प्रदीपमध्ये जेधे शकावली छापण्यात आली आहे. ही जेधे शकावली 100 वर्षांपूर्वी जेधेंच्या पूर्वजांनी लोकमान्य टिळकांना देण्यात आली. लोकमान्य टिळकांनी ती भारत इतिहास संशोधक मंडळाकडे गेली. त्यात असा उल्लेख आहे की, शके 1660 म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर 1688 कवी कलश यांजवरी शिर्के पारखे झाले. कलश पलून खिलियावरी म्हणजे आजच्या विशाळगडावर गेले. तेच माशी म्हणजे त्याच महिन्यात संभाजी राजे रायगडावरून कलशाच्या मदतीला आले. दोघांनी मिळून शिर्क्यांचा पराभव केला.
संभाजीराजांच्या वर्तनाचा विचार केला तर मराठ्यांचा हा युवराज किती जागृत होता हे लक्षात येईल. त्यादरम्यान विशाळगडावरील एक कडा कोसळला होता. त्यावेळी आजूबाजूच्या गावातील हजारो लोक कामाला लावून संभाजीराजांनी 4 दिवसांच्या आत कडा बांधून काढला. शिर्क्यांचे भांडण हे वतनासाठी होते याचे अनेक पुरावे आहेत. गणोजी शिर्के व संभाजी महाराज यांच्यातील संघर्ष आपल्याला डोळ्याआड करता येणार नाही. कारण, इतिहासच बोलतो. या प्रकरणी त्रयस्थांनी बोलण्याचे कारण नाही. शिर्के यांचा प्रभावली प्रांतातील बराच मुलुख भोसल्यांनी लुटून खराब केला.
विठ्ठल नारायण नामक मौजे पाडली तर्फ देवाळे जमीनदार हा शिर्क्यांना जावून मिळाला. त्यामुळे कवी कलश यांनी त्याची खोती काढून घेतली. म्हणजे जे जे माणूस शिर्क्यांना जाऊन मिळाले त्यांना कैद करण्याचे व त्यांची वतने काढून घेण्याचे काम संभाजीराजांनी केले आहे. एवढा या दोघांमध्ये टोकाचा संघर्ष होता. याचा अर्थ असा की, संभाजीराजांनी शिर्क्यांच्या मुलुखावर कोणा कारभाऱ्याला, कुणा मामलेदाराला किंवा सेवकाला पाठवले नव्हते, तर ते स्वतः तिथे चालून गेले होते. त्यांनी शिर्क्यांच्या अनेक पागा जाळल्या, मोकासे रद्द केले. त्यामुळे संभाजीराजांनी घेतलेले असे अनेक निर्णय आपल्याला विसरुन चालणार नाही, असे विश्वास पाटील म्हणाले.
संभाजीराजांना कैद झाली त्यावेळी त्यांच्यासोबत महाराणी येसूबाई, धर्मगुरू रंगनाथ स्वामी, धनाजी संताजी, मालोजीबाबा घोरपडे हे सेनापती होते. त्यामुळे काही लोक जी टीका करतात की, ते दारुच्या धुंदीत होते किंवा ते कुणाची तरी छेड काढत होते असे काहीही नव्हते. आपल्यासोबत फितुरी होईल याची पूर्ण जाणीव त्यांना होती, असे विश्वास पाटील म्हणाले.
जयंत पाटील – बावनकुळेंत मध्यरात्री भेट:दोन्ही नेत्यांत तासभर चर्चा, भाजपच्या बड्या नेत्याने भेट घडवून आणली
मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी मध्यरात्री भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या भेटीमुळे जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
‘टीव्ही 9 मराठी’च्या वृत्तानुसार, जयंत पाटील यांनी सोमवारी मध्यरात्री चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या मुंबई स्थित बंगल्यावर भेट घेतली. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने या दोघांची भेट घडवून आणली. या तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या चर्चेचा तपशील पुढे आला नाही, पण ही भेट जयंत पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाभोवती फिरती असल्याचा दावा केला जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी या भेटीवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, आम्हाला टीव्हीच्या माध्यमातून जयंत पाटील व चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यरात्री भेट झाल्याची माहिती मिळाली आहे. भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नुकतेच इस्लामपूरच्या दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांची जयंत पाटलांशी चर्चा झाली होती. तेव्हाची त्यांची देहबोली बदलल्याची दिसून आली. शरद पवार गटातील नेत्यांकडून होणारा अवमान तथा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या कारकिर्दीवर उपस्थित केले जाणारे प्रश्नचिन्ह पाहता त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असेल. काल ते भेटले असतील तर ही भेट निश्चितच राजकीय दृष्टिकोनातून झाली असेल. अशी कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. आमची या घटनाक्रमावर करडी नजर आहे.
जयंत पाटील एक मोठे नेते आहेत. त्यांना राजकारणाचाही दांडगा अनुभव आहे. त्यांच्या सारखा मोठा नेता आमच्या पक्षात असेल, तर आनंदच आहे. ते महायुतीमध्ये येणार असतील तर एक घटकपक्ष म्हणून आम्ही त्यांचे स्वागतच करू
दुसरीकडे, शरद पवार गटाचे नेते महबूब शेख यांनी जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा धुडकावून लावली आहे. जयंत पाटील व चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाली किंवा नाही याविषयी माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. ते भेटले असले तरी त्यांनी बावनकुळेंची भेट एक मंत्री म्हणून घेतली असेल. जयंत पाटलांविषयी वावड्या उठवण्याचे काम सुरू असते. पण ते शरद पवारांसोबतच आहेत ही वस्तुस्थिती आहे, असे ते म्हणाले.
महबूब शेख यांनी यावेळी जयंत पाटील गत काही दिवसांपासून पक्षात सक्रिय नसल्याचा आरोपही फेटाळून लावला. जयंत पाटील पक्षात सक्रिय आहेत. आजच त्यांना शरद पवारांसोबत नांदेड व हिंगोली येथे कार्यक्रम होता. पण शरद पवारांना काही कारणांमुळे त्या कार्यक्रमाला जाता आले नाही. पण जयंत पाटील स्वतः त्या कार्यक्रमाला हजर राहिले. काल ते पक्ष कार्यालयात हजर होते. तिथे त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यामुळे ते पक्षात सक्रिय नसल्याच्या बातमीत कोणतेही तथ्य नाही. जयंत पाटील हे पवारांसोबत आहेत. ते शेवटपर्यंत त्यांच्यासोबतच राहतील याविषयी कोणतीही शंका नाही, असे शेख म्हणाले.
‘सॅमसंग सी अँड टी इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन’ च्या कर्मचाऱ्यांचे ‘हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया’ समवेत पालघरमधील वारली कुटुंबांच्या घरबांधणीसाठी श्रमदान
मुंबई/पुणे -: सॅमसंग सी अँड टी कंपनीच्या ५० कर्मचाऱ्यांनी हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने पालघर जिल्ह्यातील वारली आदिवासी कुटुंबांसाठी घरे बांधण्यासाठी स्वेच्छेने पुढाकार घेतला. या उपक्रमात कर्मचारी दोन टप्प्यांत सहभागी झाले — १ फेब्रुवारी रोजी २५ कर्मचाऱ्यांच्या पहिल्या गटाने, तर १५ फेब्रुवारी रोजी उर्वरित २५ कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या गटाने श्रमदान केले. या ५० कर्मचाऱ्यांनी स्वयंसेवक म्हणून तीन वारली आदिवासी कुटुंबांसोबत मिळून सुरक्षित आणि मजबूत घरे बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
श्रमदानाचा हा उपक्रम ‘हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया’ आणि ‘सॅमसंग सी अँड टी’ यांच्यात डिसेंबर २०२४ मध्ये जाहीर झालेल्या प्रकल्पाचा भाग आहे. या प्रकल्पाचा उद्देश १५ कुटुंबांसाठी नवीन घरे बांधणे आणि ३ जिल्हा परिषद शाळांमध्ये सुधारित स्वच्छतागृहे निर्माण करून सुमारे ८५० विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देणे हा आहे.
यासंदर्भात ‘हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया’चे राष्ट्रीय संचालक श्री. आनंद कुमार बोलिमेरा म्हणाले, “स्वयंसेवकांद्वारे श्रमदान उर्फ व्हॉलंटीयर बिल्ड (Volunteer Build) हा अभिनव उपक्रम ‘हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी’च्या घरे, समुदाय व आशा यांची निर्मिती करण्याच्या उद्दिष्टाच्या केंद्रस्थानी आहे. ‘सॅमसंग सी अँड टी’च्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली समर्पितता आणि उत्साह म्हणजे सामाजिक परिवर्तनासाठीच्या सहकार्याचे एक उत्तम उदाहरण आहे. गरजू कुटुंबांसोबत काम करुन गृहनिर्माण कार्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे व त्याबरोबरच या कुटुंबांसाठी एक सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठीच्या आशेची पायाभरणी देखील केली आहे. ही भागीदारी स्वयंसेवेच्या माध्यमातून अर्थपूर्ण सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात कॉर्पोरेट संस्था आणि व्यावसायिक किती खोल प्रभाव निर्माण करू शकतात हे अधोरेखित करते.”
‘सॅमसंग सी अँड टी इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन ग्रुप’च्या कर्मचाऱ्यांनी घरबांधणीच्या विविध टप्प्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि उपेक्षित समुदायांसमवेत घरबांधणीतील आव्हाने पेलण्याचे व त्यावर मात करण्याचे अनुभवात्मक शिक्षण घेतले. त्यांच्या प्रयत्नांनी शाश्वत सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी कॉर्पोरेट भागीदारी आणि स्वयंसेवकांची भूमिका अधोरेखित केली आणि सक्षमीकरण आणि प्रगतीसाठी आधारस्तंभ म्हणून सुधारित घरांचे महत्त्व दर्शविले.
या उपक्रमामुळे सामाजिक विकासात कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांना प्रत्यक्ष सहभागी करून घेण्याच्या ‘हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया’ च्या कटिबद्धतेची प्रचिती येते. अनेक कंपन्या आज त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) तसेच पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय (ईएसजी) धोरणांतर्गत सकारात्मक उपक्रम राबवत आहेत. अशा वेळी ‘हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया’देखील अल्प-उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी घरे उभारून त्यांना दीर्घकालीन समाधान उपलब्ध करून देण्यासाठी सामूहिक कृती आणि परिणामकारक उपाययोजनांवर भर देत आहे.
१,५१८ वाहनांवर कारवाई, एकुण १३,६५,१००/-रू. दंड वसुल:एकूण ३७१ वाहने घेतली ताब्यात

“पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडुन संपुर्ण शहरात प्रभावी नाकाबंदीचे आयोजन”
पुणे-दि.२४/०२/२०२५ रोजी पुणे शहर पोलीस दलाकडुन संपुर्ण पुणे शहरातील सर्व पोलीस स्टेशन कडील महत्वाचे रस्ते, चौक, रहदारीचे ठिकाणे इ. ठिकाणी १६.०० ते १८.०० वाजेपर्यत नाकाबंदी राबविण्यात आली होती.
सदर नाकाबंदीकरीता पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील ४ अपर पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी, ०५ परिमंडळीय पोलीस उपायुक्त १० विभागीय सहायक पोलीस आयुक्त, ३९ पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक गुन्हे, तपास पथकातील अधिकारी, चौकी अधिकारी, वाहतुक शाखा, गुन्हे शाखा असे संयुक्तपणे मिळुन एकुण ९७ पोलीस अधिकारी व १८७२ पोलीस अमंलदार यांनी सहभाग घेतला.
सदर नाकाबंदी दरम्यान पुणे शहरातील एकुण ७८ महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी राबवुन एकूण ४,१८७ वाहने तपासुन राँग साईड ड्रायव्हिंग, ट्रिपल शीट, सीट बेल्ट परिधान न केलेल्या प्रकरणी वाहतुक नियमांचे उल्लघंन करणा-या १,५१८ वाहनांवर कारवाई करून एकुण १३,६५,१००/-रू. दंड वसुल करण्यात आला आहे. नाकाबंदी दरम्यान एकूण ३७१ वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर, पोलीस सह आयुक्त पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अपर पोलीस आयुक्त, सर्व परिमंडळीय पोलीस उपायुक्त, सर्व विभागीय सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस स्टेशन कडील अधिकारी अमंलदार तसेच वाहतुक शाखा व गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे कारवाई केलेली आहे.
पुणे शहरातील सर्व नागरिकांना पुणे पोलीस दलातर्फ आवाहन करण्यात येते कि, सर्वानी वाहतुक नियमांचे पालन करुन, वाहतुक शिस्त पाळावी.
जावातर्फे आयकॉनिक जावा ३५० लेगसी एडिशन लाँच, वर्षपूर्ती साजरी करणार
पुणे, फेब्रुवारी 24, 2025 – वर्षभरापूर्वी जावा ३५० ने भारतात कालातीत अभिजातपणा आणि आधुनिक इंजिनियरिंगचा मेळ घालणाऱ्या क्लासिक मोटरसायकलिंगचा ट्रेंड नव्याने प्रस्थापित केला. भारतीय बाजारपेठेत वर्ष पूर्ण करत असतानाच जावा येझ्दी मोटरसायकलने हा खास टप्पा जावा ३५० लेगसी एडिशनसह साजरा करण्याचे ठरवले आहे. ही एक्सक्लुसिव्ह एडिशन पहिल्या ५०० ग्राहकांसाठी राखीव ठेवली जाणार आहे.
जावा ३५० लेगसी एडिशनसहमध्ये रायडिंगचा अनुभव आणखी उंचावण्यासाठी खास वैशिष्ट्ये देण्यात आली असून त्यात सहजपणे वारा कापत पुढे जाण्यासाठी मदत करणारा टुरिंग व्हायसर, दोघांच्या राइडवेळेस पिलियनला आरामदायी ठरणारे पिलियन बॅकरेस्ट, अतिरिक्त सुरक्षा व स्टाइलसाठी प्रीमियम क्रॅश गार्ड यांचा त्यात समावेश आहे. या एडिशनमध्ये प्रीमियम लेदर कीचेन आणि कलेक्टर्स एडिशन जावा मिनिएचर यांचाही समावेश करण्यात आला आहे.
क्लासिक लेजंड्सचे चीफ बिझनेस ऑफिसर शरद अगरवाल म्हणाले, ‘गेल्या वर्षी जावा ३५० लाँच केल्यापासून या मोटरसायकलला ग्राहक आणि रायडिंग कम्युनिटीकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. जावा ३५० मध्ये कालातीत डिझाइन आणि आधुनिक कामगिरी यांचा मेळ घालण्यात आला असून ती जावाच्या आतापर्यंतच्या वारशाला साजेशी आहे. या मोटरसायकलचे लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे त्यात गोल्डन ट्रायो आवर्जून जपण्यात आला आहे व तो म्हणजे – प्रसिद्ध जुन्या जावाप्रमाणे रायडिंग आणि सौंदर्य अशा दोन्ही बाबी जपणारे स्वरूप. लेगसी एडिशनमधून आम्ही जास्त आरामदायीपणा, अतिरिक्त सुरक्षा, ग्लॅमर यासह रायडर्सना खास अनुभव देणार असून त्यामुळे हा टप्पा खऱ्या अर्थाने खास ठरणार आहे.’
डिझाइन हेरिटेज
जावाच्या श्रीमंत वारशापासून प्रेरणा घेत जावा ३५० क्रांती घडवून आणणाऱ्या टाइप ३५३ ला सलाम करणारी आहे. या मोटरसायकलचे डिझाइन जावाच्या क्लासिक मोटरसायकलिंग वारशाला साजेसे आणि तरीही आधुनिकता जपणारे आहे. याचं खरं आकर्षण तपशीलांमध्ये दडलेले आहे. पॉलिश्ड क्रोम फिनिशपासून दिमाखदार सोनेरी पिनस्ट्रिप्सपर्यंत प्रत्येक गोष्ट लक्षवेधी आहे. या मोटरसायकलची बांधणी प्रमाणबद्ध असून कालातीत वारसा आणि आधुनिक अभिजातता यांचा त्यात मेळ घालण्यात आला आहे.
तांत्रिक गुणवत्ता
जावा ३५० केवळ मोटरसायकल नाही, तर ती भावना आहे! जबरदस्त क्राफ्ट्समनशीप आणि रायडिंगचे पॅशन यांचा वारसा जपणारी आहे. या मोटरसायकलमधील नाविन्यपूर्ण तांत्रिक बाबी नवा मापदंड प्रस्थापित करणाऱ्या असून त्यात प्रसिद्ध 350 Alpha2-t, 22.5PS कामगिरी करणारे सर्वोत्तम लिक्विड कुल्ड इंजिन आणि निवांत, प्रतिसादात्मक रायडिंगचा अनुभव देणारे 28.1Nm यांचा त्यात समावेश आहे. पर्यायाने ही मोटरसायकल शहरातील प्रवास आणि ट्रॅफिकमधून वाट काढण्यासाठी योग्य आहे.
या मोटरसायकलमध्ये या श्रेणीतील विविध वैशिष्ट्ये पहिल्यांदाच देण्यात आली आहेत – असिस्ट आणि स्लिपर क्लचमुळे गियर सफाईदारपणे बदलता येतात, अचूक इंजिनियरिंग असलेल्या ६ स्पीड गियरबॉक्समुळे दमदार पॉवर डिलिव्हरी मिळते आणि ड्युएल चॅनेल एबीएसमुळए दर्जेदार नियंत्रण व ब्रेकिंगची खात्री मिळते.
या मोटरसायकलमध्ये नवी चासिस आणि इंजिन, या श्रेणीतील सर्वाधिक १७८ एमएम ग्राउंड क्लियरन्स, लांब व्हीलबेस आणि रूंद टायर्स यांचा समावेश करण्यात आला आहे. बारकाईने इंजिनियर करण्यात आलेले फिट- फिनिश, सर्वोत्तम राइड डायनॅमिक्स, दर्जेदार सुरक्षा यामुळे ही आज भारतीय रस्त्यांवर धावणारी सर्वात उठावदार क्लासिक मोटरसायकल ठरली आहे. प्रत्येक तांत्रिक बाब काळजीपूर्वक तयार करून रायडिंगचा अनुभव उंचावेल व प्रत्येक प्रवास अविस्मरणीय होईल याची काळजी घेण्यात आली आहे.

रंग आणि व्हेरिएंट्स
जावा ३५० मध्ये वैविध्यपूर्ण आवडींसाठी आकर्षक रंग उपलब्ध करण्यात आले आहे. क्रोम व्हेरिएंट्समध्ये – टाइमलेस मरून, कमांडिग ब्लॅक आणि व्हायब्रंट मिस्टिक ऑरेंज आणि ऑलिड व्हेरिएंट्समध्ये – स्टनिंग डीप फॉरेस्ट, ग्रे, ऑबस्डियन ब्लॅक उपलब्ध करण्यात आली आले आहेत. प्रत्येक व्हेरिएंटमध्ये जावा तपशीलांवर असलेला भर आणि प्रीमियम फिनिश दिसून येते. प्रत्येक रंग मोटरसायकलच्या क्लासिक लाइन्सना साजेसा असेल व वैयक्तिक अभिव्यक्तीची संधी देणारा असेल याचा विचार करून काळजीपूर्वक निवडण्यात आला आहे.
जावा ३५० लेगसी एडिशन जगभरातील जावा वितरकांकडे उपलब्ध करण्यात आली आहे. तुमच्या जवळच्या शोरूमला भेट द्या आणि या लेजंडचा स्वतःच अनुभव घ्या. अभिजाततेचं कौतुक असणाऱ्यांसाठी आणि रायडिंगची पॅशन असणाऱ्यांसाठी ही मोटरसायकल खास तयार करण्यात आली आहे.
जावा ३५० लेगसी एडिशनची प्रारंभिक किंमत १,९८,९५० रुपये (एक्स शोरूम – नवी दिल्ली) असून ती पहिल्या ५०० ग्राहकांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
आता PMRDA ऑनलाईन प्रणालीद्वारे बांधकाम परवाने देणार
ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून चालणार विकास परवानगी विभागाचे कामकाज
पारदर्शक, गतिमान कारभारासाठी पीएमआरडीएच्या महानगर आयुक्तांनी घेतला निर्णय
पुणे (दि.२४) : शासनाच्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमानतेसह विहित कालमर्यादेत देण्याच्या अनुषंगाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात तातडीने पाऊले उचलली जात आहे. त्यानुसार पीएमआरडीएच्या हद्दीत एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) लागू असलेले क्षेत्रासह या व्यतिरिक्त सद्यस्थितीत प्राधिकरणाची २०१८ ची नियमावली लागू असलेले उर्वरित क्षेत्रात विकास परवानगी / जोते / भोगवटा व इतर परवाने निर्गत करण्याची प्रक्रिया दि. २६/०२ /२०२५ पासून ऑनलाईन प्रणालीद्वारे राबविण्याचा निर्णय महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी घेतला आहे.
बांधकाम परवानगी प्रक्रियेचे एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली UDCPR नुसार प्रमाणन करण्याच्या दृष्टिने बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणाली (BUILDING PLAN MANAGEMENT SYSTEM -BPMS) हे पोर्टल महाराष्ट्र राज्यात लागू केले आहे. शासनाच्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान आणि विहित कालमर्यादित देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अमलात असून या अंतर्गत नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन शासकीय सेवा देण्याच्या दृष्टीने शासनाचे निर्देश असून त्यांची अंमलबजावणी पीएमआरडीएमध्ये करण्यात येत आहे.
अर्जदारांनी या ऑनलाईन प्रणालीत विकास परवानगीचा आवश्यक कागदपत्रांसह आपला प्रस्ताव ऑनलाईन दाखल करायचा आहे. दाखल प्रस्तावाची सदर प्रणालीमार्फत नियमावलीनुसार ऑनलाईन छाननी होऊन प्राधिकरणाकडील विविध टप्प्यांवरील मान्यतेची कार्यवाही पूर्ण झाल्यावर चलन निर्गत करणे तथा अर्जदार यांनी चलनाचा भरणा केल्यानंतर विकास परवानगी / जोते / भोगवटा आदी प्रमाणपत्र ऑनलाईन निर्गत केले जाईल. यामुळे नागरिकांना कार्यालयात येण्याची गरज राहणार नाही. संबंधितांना आपली फाईल कुठल्या मान्यतेच्या टप्प्यावर कार्यवाहीसाठी आहे, याची माहिती अर्जासोबत नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून कळणार आहे. सदर सेवा https://mahavastu.maharashtra.gov.in/ या संकेत स्थळावर नागरिकांसाठी दि. २६/०२/२०२५ पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यास अडचणी आल्यास प्राधिकरणाच्या विकास परवानगी विभागाला भेट द्यावी. त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याकरिता नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी कळवले आहे.
‘फ्रीमेसनरी’ समुदायासंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘ओपन हाऊस’चे आयोजन
पुणे : ‘फ्रीमेसनरी’ या समुदायाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची संधी पुणेकर नागरिकांना मिळणार आहे. येत्या रविवार दि. ०२ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान कॅम्प परिसरात पुणे रेस कोर्स जवळील ६ ए एक्झिबिशन रस्ता येथे फ्रीमेसनरी हॉल या ठिकाणी हे ओपन हाऊस होणार असून यासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे.
इंग्लंडच्या युनायटेड ग्रँड लॉजच्या अंतर्गत दी लेस्ली विल्सन लॉज नं ४४८० यांच्या वतीने सदर ओपन हाऊसचे आयोजन करण्यात आले असून फ्रीमेसनरी समुदायासंदर्भात सकाळी १०.३०, आणि दुपारी १२:३० या वेळांमध्ये “ओपन हाऊस” दरम्यान उपस्थितांना प्रास्ताविकपर माहिती देखील देण्यात येणार आहे.
या विषयी अधिक माहिती देताना डिस्ट्रीक्ट डेप्युटी ग्रँड मास्टर असलेले देवेश हिंगोरानी म्हणाले, “फ्रीमेसनरी समुदायाबद्दल जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने आम्ही या ओपन हाऊसचे आयोजन केले असून या वेळी सामान्य नागरिक लॉजच्या परिसरात प्रत्यक्ष फेरफटका मारू शकतात. इतकेच नाही तर फ्रीमेसनरी, त्यांचे प्रतीकवाद (सिंम्बॉलिझम) व आजच्या काळातील संदर्भ या बद्दलही यावेळी माहिती देण्यात येईल.”
याबरोबरच त्याच स्थळी व वेळी, नयन आरोग्य शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले असून यामध्ये डोळ्यांची विनाशुल्क तपासणी करुन घेता येईल असेही हिंगोरानी यांनी सांगितले.
पुणे विभागासंदर्भात अधिक माहिती –
बॉम्बे प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर एच. ई. सर लेस्ली ओर्मे विल्सन यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावे पुण्यातील लेस्ली विल्सन लॉजची उभारणी ही ३ नोव्हेंबर १९२६ रोजी करण्यात आली. अनेक मोठे उद्योजक, व्यवसायिक, व्यवस्थापकीय संचालक, चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, डॉक्टर, वकील आणि उच्च दर्जावर कार्यरत अधिकारी, व्यावसायिक यांचा या समुदायामध्ये समावेश आहे. काही प्रसिद्ध भारतीय फ्रीमेसन्समध्ये स्वामी विवेकानंद, फिरोजशाह मेहता, पंडित मोतीलाल नेहरू, सर दोराबजी जमशेदजी टाटा, डॉ. सी. राजगोपालाचारी, सर सुलतान मोहम्मद शाह आगा खान, महाराजा दुलीप सिंग, महाराजा जिवाजी राव सिंदिया, अभिनेते डेव्हिड अब्राहाम, क्रिकेटपटु मन्सुर अली खान पतौडी यांचा समावेश होतो.
फ्रीमेसनरी या समुदायाबद्दल –
चरित्रसंपन्न पुरुषांची जगातील सर्वांत जुनी संस्था म्हणून फ्रीमेसनरी हा समुदाय ओळखला जातो. इंग्लंड, वेल्स, अनेक द्वीपसमूह यांबरोबरच जगभरातील आयल ऑफ मॅन आणि भारतासह परदेशातील जिल्ह्यांमध्ये फ्रीमेसनरीची प्रशासकीय संस्था म्हणून युनायटेड ग्रँड लॉज ऑफ इंग्लंड (UGLE) काम पाहते. इ. स. १७१७ मध्ये याची स्थापना झाली असून जगातील सर्वात जुने ग्रँड लॉज म्हणून ते ओळखले जाते. आज या लॉजच्या अंतर्गत जगभरातील तब्बल १० हजार लॉज कार्यरत असून जगभरात समुदायाचे ४ लाख सदस्य आहेत.
