Home Blog Page 441

श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर महाशिवरात्र महोत्सवात रंगला शिव-पार्वती विवाह सोहळा

पुणे : ढोल ताशांचा गजर…भस्माची उधळण… नंदी,गण आणि देवी देवतांच्या साक्षीने वाजत गाजत काढलेली शिवाची वरात, अशा भक्तीमय वातावरणात शिव पार्वती विवाह सोहळा रंगला. शिवभक्तांनी यावेळी पुष्पवृष्टी करत विवाह सोहळ्यात सहभाग घेतला. हर हर महादेव च्या जयघोषात झालेला, भक्तीने भारलेला हा विवाह सोहळा पुणेकरांसाठी अविस्मरणीय ठरला.  

शिवाजीनगर मधील श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाशिवरात्र महोत्सवात शिव – पार्वती विवाह सोहळा व मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत बहिरट पाटील, सचिव सुधीर दुर्गे, खजिनदार शशिकांत भोसले, विश्वस्त महेश दुर्गे, संजय सातपुते उपस्थित होते.

मिरवणूकीत समर्थ ढोल ताशा पथकाचे वादन झाले. श्री जंगली महाराज मंदिर, शिवाजीनगर गावठाण मार्गे मंदिरात मिरवणूक आली.

हनुमंत बहिरट पाटील म्हणाले,  शिव आणि पार्वती यांच्या विवाह सोहळ्याचा प्रसंग अत्यंत मंगलमय आणि भक्तिपूर्ण मानला जातो. हा विवाह केवळ दैवी प्रेमाचे प्रतीक नसून, भक्तांसाठीही एक महत्त्वाचा आध्यात्मिक संदेश देणारा आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
संजय सातपुते म्हणाले, संगमनेर येथील अघोरी आख्याड्यातील कलाकारांनी शिव पार्वती विवाह सोहळा सादर केला. महाशिवरात्रीनिमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. यामध्ये ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, कार्तिकी गायकवाड आणि कलाकारांनी गायन सेवा दिली.

कसब्यात प्राचीन ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात श्री महाकाल पूजा

 श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे महाशिवरात्रीनिमित्त आयोजन
पुणे : कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त श्री महाकाल पूजा  करण्यात आली होती. श्री महाकाल मुखवटा आणि फुलांची आकर्षक आरास याने मंदिर सुशोभित करण्यात आले. श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. 
श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त श्री महाकाल पूजा आणि सजावट करण्यात आली. मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात. त्यातीलच एक असलेला महाशिवरात्र उत्सव हा अनेक वर्षे साजरा केला जातो. 
कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूर्वीची पुण्यातील वस्ती. याठिकाणी मुल:, मुक्ता आणि नाग या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. अशा कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात आयोजित श्री महाकाल पूजा पाहण्याकरिता भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

स्वारगेटमधील घटना अत्यंत दुर्दैवी अन् संतापजनक:पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले, मुख्यमंत्र्यांचे या प्रकरणात लक्ष – अजित पवार

पालकमंत्री नात्याने या घटनेचा मनस्ताप

स्वारगेट बस स्थानकातील सर्व सुरक्षा रक्षकांचे निलंबन
दुसरीकडे पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. स्वारगेट डेपो मधील 23 सुरक्षा रक्षक यांचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे. उद्यापासून नवीन सुरक्षा रक्षक कामावर रुजू करण्याचे परिवहन मंत्र्यांनी आदेश दिलेत. तर स्वारगेट डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांचे चौकशी करून एका आठवड्यात चौकशी अहवाल सादर केला जाणार आहे. परिवहन आयुक्तांकडे हा अहवाल सादर केल्यानंतर कारवाईचा निर्णय होणार आहे.

पुणे- वर्दळीच्या स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे, अशी प्रतिक्रिया पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आरोपीचा गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही, असेही ते म्हणाले. या प्रकरणी पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतल्याने अजित पवारांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले, पुण्यातील स्वारगेट बसस्थानकार घडलेली घटना अत्यंत दु:खद आणि दुर्दैवी आहे. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. तेथील पोलिस ठाण्यात साडेनऊ वाजता तक्रार मिळाली. पोलिसांचा सर्व बाजुने तपास चालू आहे. या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही. मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात व्यक्तिशः लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. आरोपी हा शिरूर तालुक्यातील आहे. पोलिस शिरूर आणि गावपरिसरात आरोपीचा शोध घेत आहेत.

आपण सगळे काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय, पण अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. पुण्यातील घटनेसंदर्भात पोलिसांना निर्देश दिले आहेत. सीसीटीव्हीच्या सगळ्या बारकाईने पोलिसांना पाहणी करण्यास सांगितले आहे. काही करून तो आरोपी सापडला पाहिजे, अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने या घटनेचा मनस्ताप आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राला आणि पुणेकरांना ही गोष्ट कुणालाच आवडलेली नाही, असेही अजित पवार म्हणाले. पीडित बहिणीला न्याय, मानसिक आधार, सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना महिला व बाल विकासमंत्री तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतला असून पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी राज्य शासन सर्व पावले उचलेल. आरोपी ताब्यात आल्यानंतर ताबडतोब त्याच्यावर कशी आणि काय कारवाई करायची, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला कसा चालवता येईल, याबाबतची सर्व खबरदारी स्वतः मुख्यमंत्री घेत आहेत. या प्रकरणात ज्या काही सूचना द्यायच्या त्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुरलीधर मोहोळ यांसह इतर सहकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगाराला तातडीने अटक केली पाहिजे. त्याबद्दल पोलिस सर्व अँगलने तपास करत आहेत. यासाठी बरीच यंत्रणा कामाला लावण्यात आली आल्याचे अजित पवारांनी सांगितले.

तरुणीवरील अत्याचाराविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक …

स्वारगेट बस्थानक सुरक्षा केबिनची शिवसैनिकांकडून तोडफोड….

पुणे:- पुणे विद्येचे माहेरघर, पुणे हिरवेगार शांत शहर ही प्रतिमा आता संपुष्टात येऊन पुणे आता गुन्हेगारिचे हब झाले आहे , आज पहाटे स्वारगेट बसस्थानकात एका तरुण युवतीवर शिवशाही बस मधे बलात्कार करून अत्याचार करण्यात आले आणि पुणे शहराचे वातावरण तापले कारण चोवीस तास माणसांची वर्दळ असणारे ह्या बसस्थानकाची सुरक्षा व्यवस्था ढिसाळ झाली आहे हे ह्या घटनेतून दिसून आले, समोरच पोलिस स्टेशन असूनही गुन्हेगारांमध्ये भय नाही हे प्रामुख्याने दिसते .
सदर घटना शिवसैनिकांना कळताच शिवसेना महिला आघाडीच्या वतीने स्वारगेट बसस्थानकात सर्व महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणात जमल्या शिवसेना महिला आघाडी, युवती सेना पदाधिकारी यांच्या वतीने महिला सुरक्षा, पोलिस यंत्रणा, परिवहन मंडळाची सुरक्षा व्यवस्था आणि आरोपी यांच्या विरोधात निदर्शने करून आंदोलन करण्यात आले, तसेच राज्य संघटक वसंत मोरे आणि शिवसैनिकांनी यावेळी स्वारगेट परिवहन मंडळाचे सुरक्षा रक्षक केबिन फोडून टाकले आणि प्रशासनाचा निषेध केला
यावेळी परिवहन मंत्री सरनाईक , गृहमंत्री फडणवीस यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केले गेला.

यावेळी आंदोलनास शिवसेना राज्य संघटक वसंत मोरे, युवती सेनेच्या निकिता मराटकर, संघटिका रेणुका साबळे, मृणमयी लिमये, महिला आघाडीच्या वैशाली दारवटकर, अमृता पठारे, विद्या होडे, जयश्री भणगे, मेधाताई पवार, प्रांजल झगडे, आरती बरीदे, गौरी चव्हाण, पद्मा सोरटे, स्नेहल पाटोळे, दिपाली राऊत, सुलभा तळेकर, ज्योती वीर, प्रज्ञा लोणकर, स्मिता राजणे, मनीषा कुलकर्णी, मनीषा गरुड, मेधा पवार, रुपाली आलमखाने, पूजा भोकरे, सिद्धी गवळी, राणी शिलारखाने, मेघा मुंगले, पद्मा भोकरे, पूनम गंजकर, रुपाली जिंतीकर, रुपाली गावडे, सरोज कर्वेकर, भारती दामजी, सविता गोसावी, अनुपमा मांगडे, रोहिणी मडोळे, गौरी शेलार, शिवसेनेचे पर्वती विभाग प्रमुख सूरज लोखंडे, संघटक पराग थोरात, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, नितीन जगताप, संतोष भुतकर, मुकुंद चव्हाण ,अमर मराटकर, आरोग्य सेनेचे रमेश क्षीरसागर, दिलीप पोमन, राकेश बोराटे, जुबेर शेख, अक्षय हबीब, शाम जांभूळकर, सागर दरवडे, असंख्य शिवसैनिक , नागरिक उपस्थित होते.

वैशाली हॉटेल फसवणूक प्रकरण : बँक अधिकाऱ्यांसह आरोपी पतीचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला

५ कोटी च्या खोट्या कर्ज प्रकरणी उच्च न्यायालयाचा “नो रिलीफ”

पुणे: हॉटेल वैशालीचे मूळ मालक जगन्नाथ शेट्टी यांची मुलगी आणि वैशाली हॉटेलच्या मालक निकिता शेट्टी यांच्या नावे  बनावट सह्या, कोरे धनादेश आणि कागदपत्रांच्या आधारे तब्बल पाच कोटी रुपयांचे कर्ज काढून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी पतीसह बँक अधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मा. उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. मूळ फिर्यादी यांच्यावतीने जेष्ठ विधिज्ञ ॲड. राजू पाटील, ॲड. निरंजन मुंदरगी, ॲड. हर्षद साठे व ॲड. निखिल मालाणी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत या तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायमूर्ती श्री. शीवकुमार दिघे साहेब यांच्या समोर झालेल्या अंतिम सुनावणीमध्ये फेटाळून लावला. त्यामुळे आरोपींच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

मा. उच्च न्यायालयाने मे. सत्र न्यायालयाचा आदेश कायम करत आरोपींचा जामीन अर्ज फेटाळताना निरीक्षण नोंदवले की, या कर्ज प्रकरणामध्ये कोटक महिंद्रा बँकेचे कोणीही अधिकारी अथवा बँकेने नेमलेल्या एजंटनी फिर्यादी निकिता शेट्टी यांची कधीही चौकशी केली नाही, त्यांना प्रत्यक्ष भेटले नाही. या उलट ते आरोपी विश्वजित व निकिता हॉस्पिटॅलिटी एल.एल.पी. याचे कर्मचारी यांनाच भेटले. या कर्जप्रकरणातील कागदपत्रावर निकीटची स्वाक्षरी नव्हती हे हस्ताक्षर तज्ज्ञांच्या अहवालावरून प्रथमदर्शनी सिद्ध झालेले आहे. या कर्ज प्रकरणाच्या अर्जावर ‘निकीता हॉस्पिटॅलिटी एलएलपी’चा बनावट शिक्का मारण्यात आल्याचे निदर्शनास आले. बँक मॅनेजरने व डी.एस.ए. ने त्याच्या अर्जात उल्लेख केलेला आहे की मी निकिता यांना कर्ज प्रकरणावेळी एकदाही भेटलो नाही, त्यांच्याच पतीने सर्व गोष्टींची पूर्तता केली.

तसेच कर्ज हे हॉटेल वैशालीचे सेंट्रलाईज्ड किचन तयार करण्यासाठी घेतले होते मात्र आरोपी विश्वजित याने ते स्वतःच्या आर्थिक लाभासाठी वापरून निकिता हीची मिळकत व पैसे यांचा गैरलाभ घेण्याचे, बळकावून घेण्याचे हेतूनेच हे कर्ज प्रकरण केले. विश्वजितच्या इतर गुन्ह्यातील सह-आरोपी वकील इरफान शेख यांनी मोदिबाग को-ऑप हौसिंग सोसायटीचा ना-हरकत दाखला घेतला. सोसायटीचे व्यवस्थापक व चेयरमन यांचे जबाबानुसार सदर अर्जावर निकिता शेट्टी यांनी सही केलेली नाही. याउपर अक्सिस बँकेकडून निकिता शेट्टी यांच्या सहीचा नमुना पडताळणी घेतलेला अर्ज ही खोटा असल्याचे तपासात आढळून आले आहे. अक्सिस बँकेच्या कर्मचारी यांचेकडे केलेल्या तपासात हे पुढे आले आहे की सदर अर्जावर वापरण्यात आलेला अक्सिस बँकेचा शिक्का देखील खोटा तयार करण्यात आलेला आहे व त्यावर असलेली बँक अधिकाऱ्याची सही देखील बोगस आहे. तसेच सर्व आरोपी हे संगनमताने काम करत असून याचा तपास होणे गरजेचे आहे.

आरोपी विश्वजित याने तो कर्जाचे हप्ते भरण्यास तयार असल्याचे नमूद केले मात्र खोट्या सह्या, खोटे शिक्के वापरून कर्ज घेतलेले आहे, हप्ते भरल्याने गुन्हा झाकोळला जाणार नाही असे स्पष्ट मत मे. न्यायमूर्ती दिघे यांनी नोंदवत गुन्ह्याकामी त्यांचा पोलीस कोठडीत तपास होणे आवश्यक असल्याने सर्व आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केले. सर्व आरोपींच्यावतीने २ आठवड्यांची मुदत मागून सदरचा आदेश स्थगित करण्याची विनंती केली मात्र गुन्ह्याचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन मे. न्यायालयाने ही विनंती धुडकावून लावली.

सदर प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या एपीआय अर्चना गायकवाड, सरकारी वकील रंजना हुमने तर मूळ फिर्यादी यांचे वतीने ॲड. निखिल मालाणी व ॲड. हर्षद साठे यांनी काम पाहिले.

संघ समजावून घेण्यासाठी “आम्ही संघात का आहोत” पुस्तक उपयुक्त : दिलीप क्षीरसागर

पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दीच्या पृष्ठभूमीवर पद्मश्री रमेश पतंगे यांचे “आम्ही संघात का आहोत हे पुस्तक संघ समजावून घेऊन इच्छिणाऱ्या व संघात अनेक वर्ष असलेल्यांना उपयुक्त असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य दिलीप क्षीरसागर यांनी येथे बोलताना केले.

कार्यकर्ता – विचारवंत असलेल्या पतंगे यांच्या या पुस्तकात प्रदीर्घ स्वानुभवाचे मुद्देसूद विश्लेषण असून संघाच्या सामर्थ्य स्थळांची त्यात उचित चर्चा केलेली आहे. संघात जाणे ही संघ स्वयंसेवकांची साधना असून त्याच्या आयुष्याच्या विविध टप्प्यांवर त्याला संघाची व्यापक ओळख उलगडत जाते असे ते म्हणाले.

संघ कार्यपद्धती हि हृदयस्पर्शी असून त्यामुळेच संघाचे “संस्था” हे स्वरूप न राहता ते “जैविक संघटन” म्हणून राहिलेले आहे याची अनेक उदाहरणे पतंगे यांनी पुस्तकात दिलेली आहेत.

भारताच्या संविधानातील “बंधुता” हे वैशिष्ट्य संघकार्यपद्धती पद्धतीत सहजगत्या निर्माण होते हे संघाचे लोकशाहीसाठी मोठे बलस्थान असल्याचे क्षीरसागर म्हणाले.

गो विज्ञान संस्था, सक्षम व एक मे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
ज्येष्ठ स्वयंसेवक बापूराव कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.दीपक बोकील यांनी परिचय करून दिला. प्रांत प्रचार प्रमुख अतुल अग्निहोत्री व संभाजी विभाग संघचालक अनिलजी व्यास यांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले यावेळी “शिल्पकार चरित्रकोश” चे महेश पोहनेरकर हे उपस्थित होते. “साप्ताहिक विवेक”चे धनाजी जाधव यांनी आभार मानले.

स्वारगेट ST स्टँडवर बलात्कार झालाच कसा ? आरोपी निष्पन्न

कुठे चाललीस ताई, सातारची बस तिकडे लागलीये

पुणे-पु्ण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. आरोपीची ओळख पटल्यामुळे त्याच्या कोणत्याही क्षणी मुसक्या आवळल्या जातील असा अंदाज आहे. त्यातच आरोपीने पीडित तरुणीशी ताई म्हणत अत्याचार केल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

आरोपीने प्रथम पीडित तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी पुण्यात नोकरीला आहे. ती स्वारगेट बसस्थानकाहून फलटण या आपल्या गावी जात होती. पहाटे 5.30 च्या सुमारास ती स्वारगेट बसस्थानकावर बसची वाट पाहत थांबली होती. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ गेला. काही वेळ तिच्याभोवती घुटमळळ्यानंतर तो तिच्या बाजूला जाऊन बसला. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे.

पीडितेभोवती काहीवेळ फिरल्यानंतर आरोपी तिच्या शेजारी जाऊन बसला. या दोघांचे बोलणे सुरू असताना तिथे शेजारी बसलेला एक व्यक्ती तेथून उठून जातो. त्यानंतर आरोपीने गोड बोलून पीडितेची ओळख करून घेतली. तिचा विश्वास संपादन केला.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी पीडित तरुणीला म्हणाला ताई कुठे चाललीस? त्यावर मुलीने आपल्याला फलटणला जायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी म्हणाला, सातारची बस इथे लागत नाही, ती तिकडे लागलेली आहे. त्यावर तरुणी म्हणाली, नाही. बस इथेच लागते. म्हणूनच मी इथे बसली आहे. त्यावर आरोपी पुढे म्हणाला, बस तिकडे लागली आहे. चल मी तुला तिकडे घेऊन जातो. त्यानंतर मुलगी त्याच्याबरोबर जाते. तिथे गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता.

हा अंधार पाहून तरुणीने आरोपीला विचारले की, बसमध्ये अंधार आहे. त्यावर आरोपी म्हणाला, ही रात्री उशिराची बस आहे. लोक झोपलेले आहेत. त्यामुळे लाईट बंद आहे. तू वरती चढून मोबाईलची टॉर्च लावून चेक करू शकते. त्यानंतर पीडित तरुणीने बसमध्ये चढून टॉर्च लावण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत आरोपीने बसचा पाठीमागून दरवाजा बंद केला होता. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला.

अत्याचार झाल्यानंतर आरोपी बसमधून उतरून निघून गेला. त्यानंतर मुलगीही बसमधून खाली उतरली. ती दुसऱ्या बसमध्ये बसून आपल्या गावी जात होती, तेव्हा तिने एका मित्राला फोन लावला आणि घडलेला प्रसंग सांगितला. मित्राने सांगितल्यावर ही तरुणी पोलfस ठाण्यात आली आणि पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.पीडित तरुणीने तक्रार दिल्यानंतर आम्ही लगेच स्वारगेट एसटी डेपोचे सीसीटीव्ही फुटेज बघितले. यामध्ये आरोपी दत्तात्रय गाडेची ओळख पटली. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील आहे. तो मूळचा शिरुरचा आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपीला शोधण्यासाठी 8 पथके करण्यात आली आहेत. आरोपीचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात आहे. आम्ही आसपासच्या शेतांमध्येही श्वान पथकाच्या मदतीने तपास करत आहोत, असे पोलिसांनी या प्रकरणी सांगितले आहे.

इथे रोज होतात बलात्कार, मग इथे सुरक्षा रक्षकांची केबिन कशाला ? असे सवाल करत,ठाकरेंच्या सैनिकांनी केली स्वारगेट बसस्टँड मध्ये तोडफोड

स्वारगेट बसस्टँडमधील 4 बसचा लॉजिंग म्हणून वापर:कंडोमचा खच; ठाकरे गटाने सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली

इथे रोज बलात्कार होत आहे, शेकडो कंडोमची पाकिटे पडलेली आहेत इथे. इथे वीस लोक नेमलेली आहेत, ही वीस लोक काय करतात? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे. शिवशाही नाव असलेल्या बसमध्ये असले प्रकार करताना लाज वाटत नाही का यांना? आम्हाला जेव्हा याची माहिती मिळाली की एवढ्या मध्येपर्यंत हे प्रकार सुरू असतात. इथे येताना सुरक्षा रक्षकांची केबिन ओलांडून यावे लागते. याचा अर्थ यात एसटीचे कर्मचारी सहभागी असतात, सुरक्षा रक्षक सहभागी आहेत, असे ठाकरेंच्या सैनिकांनी म्हटले आहे.

पुणे-शिवसेना ठाकरे गटाने स्वारगेट बस स्थानकावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांचे कार्यालय फोडले असल्याचे समोर आले आहे. पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या बलात्कार घटनेप्रकरणी वसंत मोरे यांनी ही कारवाई केली आहे. याचा व्हिडिओ देखील वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी स्वारगेट बसस्थानकात घुसून, सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली. सुरक्षा रक्षकांच्या केबिनबाहेर, स्वारगेट बसस्थानक परिसरात शेकडो कंडोम पडलेत, म्हणजे इथे दररोज बलात्कार होतात, मग इथे सुरक्षा रक्षकांची केबिन कशाला आहे? असे सवाल करत, ठाकरे गटाच्या सैनिकांनी येथील सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली.

ठाकरे गटाने यावेळी संपूर्ण स्वारगेट आगार परिसरात अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप केला आहे. तसेच सुरक्षा केबिनच्या समोर बलात्कार होतो याचा अर्थ काय? असा सवालही वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे. या बलात्काराला सुरक्षा रक्षकच जबाबदार आहेत. या ठिकाणी रोज कोणाला तरी आणले जाते आणि इथे हे सगळे धंदे चालतात. तसेच त्यांनी यावेळी काही बस देखील दाखवल्या जिथे अनेक निरोधचे पाकीट पडलेली होती. याचा अर्थ या ठिकाणी सर्रासपणे बसमध्ये लॉजिंगची सुविधा करण्यात आली आहे, असा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे.

वसंत मोरे म्हणाले, या ठिकाणी 20-20 सुरक्षा रक्षक असून झोपा काढतात. या ठिकाणी महिलांच्या साड्या, कंडोमचे पाकीट, दारूच्या बाटल्या आहेत. याचा अर्थ असा होतो की सुरक्षा रक्षकांच्या समोर या सगळ्या गोष्टी घडतात. सुरक्षा रक्षकांची एवढी संख्या असताना, चहूबाजूने बंदिस्त असताना या घटना कशा घडतात? असा प्रश्न वसंत मोरे यांनी विचारला आहे. या घटनेची माहिती आगारप्रमुखाला माहिती नाही म्हटल्यावर काय म्हणायचे? आगारप्रमुख आणि या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई झाली पाहिजे. नाहीतर आम्ही कायदा हातात घेऊ असा इशारा वसंत मोरे यांनी दिला.

डेटानेट इंडियाची IndiaStateQuiz.com च्या आरंभाद्वारे 25 वर्षे पूर्ण

भारत आणि त्याच्या राज्यांवरीलजिल्हे आणि मतदारसंघांवरील सामाजिक-आर्थिक सांख्यिकीय आकडेवारीमधील अग्रगण्य पुरवठादार डेटानेट इंडियाप्रश्नमंजुषा स्पर्धा आणि ऑलिंपियाडसाठी समर्पित व्यासपीठ, IndiastatQuiz.com चा आरंभ करण्याद्वारे आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करून 25 व्या वर्षात प्रवेश करत आहे. या नवीन उपक्रमाचे उद्दिष्ट भारताच्या सामाजिक-आर्थिक आणि निवडणूक परिदृश्याबद्दल सार्वजनिक सहभाग आणि जागरूकता वाढवणे हे आहे.

गेल्या 25 वर्षांपासून, डेटानेट इंडिया आपले मुख्य पोर्टल Indiastat.com द्वारे प्रामाणिक आणि उच्च-गुणवत्तेच्या डेटासाठी वेबसाइट म्हणून आपली विश्वासार्हता स्थापित करत आहे. या महत्त्वपूर्ण प्रसंगी, कंपनी समाजाला ज्ञान मिळविण्यास, विश्लेषणात्मक विचार करण्यास आणि राष्ट्रीय विकासाचा भाग बनण्यास मदत करण्यासाठी परस्परसंवादी प्रश्नमंजुषा-आधारित शिक्षण सुरू करत आहे.

त्याच्या आरंभाचा एक भाग म्हणून, IndiastatQuiz.com भारतीय अर्थव्यवस्था: आर्थिक सर्वेक्षण 20242025 आणि केंद्रीय अर्थसंकल्प 20252026 या विषयावर ऑनलाइन प्रश्नमंजुषा आयोजित करत आहे. ही स्पर्धा भारतातील पदवीपूर्व आणि त्यावरील विद्यार्थ्यांसाठी खुली आहे आणि त्यांना भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी एक मनोरंजक व्यासपीठ प्रदान करते. या प्रश्नमंजुषेमध्ये सहभाग मोफत आहे. ही प्रश्नमंजुषा, त्याचे नियम आणि बक्षिसे याबद्दल https://indianeconomy2025.indiastatquiz.com/ वर माहिती मिळू शकेलः

यापूर्वी, डेटानेट इंडियाने झारखंड, पंजाब आणि दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या सहकार्याने मतदार जागरूकता आणि शिक्षण वाढवण्यासाठी यशस्वी प्रश्नमंजुषा आयोजित केल्या आहेत. IndiastatQuiz.com च्या आरंभाद्वारे, कंपनी सार्वजनिक हिताच्या इतर क्षेत्रांमध्येही हे यश पुनरुत्पादित करण्याचा प्रयत्न करते.

कंपनीच्या इतिहासावर नजर टाकताना, डेटानेट इंडियाचे सह-संस्थापक आणि संचालक डॉ. आर. च्या. ठुकराल म्हणाले, गेली 25 वर्षे शिकण्याचावाढीचा आणि चिकाटीचा प्रवास होता. आम्ही आव्हानांमधून प्रगती केली आहे आणि संशोधकधोरणकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञांना विश्वसनीय डेटा विश्लेषण प्रदान करत राहिलो आहोत. IndiastatQuiz.com द्वारेआम्ही लोकांमध्ये रस निर्माण करू इच्छितो आणि त्यांना देशाच्या सामाजिक-आर्थिक तथ्यांवर चर्चा करण्यास प्रोत्साहित करू इच्छितो.”


डेटानेट इंडियाबद्दल

भारताच्या सामाजिक-आर्थिक विकासाच्या सर्व पैलूंवर सांख्यिकीय माहिती प्रदान करण्याचे आव्हान पेलण्यासाठी 2000 मध्ये डेटानेट इंडियाची स्थापना करण्यात आली. त्याचे प्लॅटफॉर्म भारत आणि परदेशातील संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, धोरणकर्ते आणि व्यावसायिक समुदायांसह विस्तृत वापरकर्त्यांद्वारे वापरले जातात. डेटानेट इंडियाच्या काही प्रमुख पोर्टल्समध्ये इंडियास्टॅट (https://www.indiastat.com/) समाविष्ट आहे, जो भारतावरील सामाजिक-आर्थिक सांख्यिकीय डेटाचा सर्वात मोठा ऑनलाइन स्रोत आहे; इंडियास्टॅट डिस्ट्रिक्ट्स (https://www.indiastatdistricts.com/), अधिक विशिष्ट विश्लेषणासाठी जिल्हा पातळीवर सांख्यिकीय माहिती प्रदान करणारी साइट; इंडियास्टेट इलेक्शन्स (https://www.indiastatelections.com/), निवडणुकीशी संबंधित डेटा आणि माहितीसाठी एक समर्पित पोर्टल; आणि इंडियास्टॅट पब्लिकेशन्स (https://www.indiastatpublications.com/), 5000 हून अधिक डेटा-आधारित पुस्तकांचा समावेश असलेल्या प्रकाशनांची लायब्ररी आहे. इंडियास्टॅटने प्रामाणिकपणा, विश्वासार्हता आणि नावीन्यपूर्णतेसाठी आपली प्रतिष्ठा कायम ठेवली आहे आणि जगभरातील आघाडीच्या शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट संस्था आणि संशोधन संस्थांद्वारे त्याचा वापर सुरूच आहे.

डेटानेट इंडिया आपल्या सदस्यांचे मनापासून आभार मानतो, ज्यांचा विश्वास आणि सततच्या पाठबळाने या वाढीच्या आणि यशाच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

स्वारगेट ST स्टँड: 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार

पुणे-फलटण येथे गावी जाणार्‍या महिलेला शिवशाही बसमध्ये जाण्यास सांगून तिच्यावर बसमध्येच बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना स्वारगेट बसस्थानकातील एका शिवशाही बसमध्ये बुधवारी पहाटे साडेपाच वाजता घडली. पोलिसांनी आरोपीचे नाव निष्पन्न केले असून त्याचा शोध घेण्यास पोलिसांची ८ पथके रवाना झाली आहेत.

दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५, अंदाजे, रा. शिक्रापूर) असे या नराधमाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत.

याबाबत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले की, एका २६ वर्षाची तरुणी आपल्या गावी फलटणला जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकावर आली. तिला एकाने फलटणला जाणारी गाडी इकडे लागत नाही़ तिकडे लागते, असे सांगितले.

त्यावर या तरुणीने इकडेच फलाटावर लागते, असे सांगितले. त्यावर त्याने तिच्याशी गोड बोलून तिला मी १० वर्षे इथे आहे. तिकडे लागणारी बसच फलटणला जाते, असे सांगून तिला आडबाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेले. बसमध्ये अंधार होता. तेव्हा त्याने तुम्ही दरवाजा उघडून आत जा, असे सांगितले. तेव्हा ही तरुणी बसमध्ये गेली. तेव्हा तिच्या मागोमाग तो आत आला. त्याने दरवाजा लावून घेत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर ही तरुणी फलटणला जाण्यास निघाली. अर्ध्या वाटेवरुन ती परत आली व तिने स्वारगेट पोलीस ठाण्यात आप बिती सांगितली. या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी तातडीने तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. त्यामध्ये आरोपी निष्पन्न झाला आहे. त्याच्यावर पुणे ग्रामीण पोलिसांमध्ये जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांची ८ पथके आरोपीचा शोध घेत आहेत, असे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले.

फडणवीसांचे म्हणजे हे पेशव्याचे राज्य नाही:इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना मिळालेल्या धमकीवर ‘उपराकार’ लक्ष्मण माने संतप्त

सातारा -महाराष्ट्रात पेशवाई किंवा मोगलाई आहे का? असा संतप्त सवाल ‘उपराकार’ लक्ष्मण माने यांनी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याच्या धमकीवर उपस्थित केला आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा पुरोहित वर्गातला आहे. जिवे मारणे एवढे सोपे असेल तर तू, राहूल सोलापूरकर आणि ब्राह्मण संघाचे कुणी असतील, तर त्यांनी फक्त सावंतांच्या केसाला धक्का लावून दाखवावा. मग तुम्हाला कळेल आम्ही काय आहोत.​ फडणवीसांचे म्हणजे हे पेशव्याचे राज्य नाही, असे ते म्हणालेत.

छावा चित्रपटाविरोधात भाष्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर नामक एका व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. सावंत यांनी स्वतः या प्रकरणी एक ऑडिओ क्लिप सार्वजनिक केली आहे. मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशूरामी ब्राह्मण धमक्या देत आहे. मला अशा धमक्या नवीन नाहीत. पण या लोकांच्या मनात शिवाजी महाराजांविषयी किती विष भरलेले आहे हे झोपलेल्या मराठा बहुजनांना समजावे म्हणून मी ही रेकॉर्डिंग व्हायरल करत आहे, असे सावंत यासंबंधी म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर माजी आमदार लक्ष्मण सावंत यांनी उपरोक्त संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

लक्ष्मण माने म्हणाले, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांना धमकी देणारा पुरोहित वर्गातला आहे. जीवे मारणे एवढे सोपे असेल तर तू, राहूल सोलापूरकर आणि ब्राह्मण संघाचे कुणी असतील तर त्यांनी फक्त सावंतांच्या केसाला धक्का लावून दाखवावा. मग तुम्हाला कळेल आम्ही काय आहोत. मुख्यमंत्र्यांच्या जिवावर जिवे मारण्याच्या धमक्या देत असाल तर महाराष्ट्रात पेशवाई, मोगलाई आहे का? असे म्हणत लक्ष्मण माने यांनी थेट यासंबंधी मुख्यमंत्री फडणवीस यांनाच लक्ष्य केले आहे.

एससी, एसटी, व्हीजेएनटी, ओबीसी महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी 20 मार्च रोजी महाड येथून चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या राज्यव्यापी परिषदेची सुरुवात करण्यात येणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उपराकार लक्ष्मण माने यांनी इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणावर भाष्य केले. ते पुढे म्हणाले की, तोंड फुकटचे आहे म्हणून काहीही बोलू नका. आम्हालाही बोलता येते, पण आम्ही बोलतो का? फडणवीस ब्राह्मण आहेत, हे तुम्ही कशाला सांगायला पाहिजे.

महाराष्ट्रात बहुमत फडणवीसांकडे आहे. आम्ही लोकशाही मानतो. त्यांना आम्ही मुख्यमंत्री मानलेच आहे. परंतु, त्यांचा आधार घेऊन कुणी जीवे मारण्याच्या धमक्या देत असेल, तर महाराष्ट्रात पेशवाई, मोगलाई लागून गेलीय का? असा सवाल ‘उपराकार’ लक्ष्मण माने यांनी केला. फडणवीसांचे म्हणजे हे पेशव्याचे राज्य नाही. हे संविधानाने निर्माण झालेले राज्य आहे. फडणवीसांना आम्ही भविष्यात बहुमताच्या जोरावर हटवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.ॲट्रॉसिटीचे खरे गुन्हे 5 टक्के देखील नाहीत. 95 टक्के गुन्हे हे बोगस असल्याचे सांगून ‘उपराकार’ माने पुढे म्हणाले की, दोन पाटलांची भांडणे हेच ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होण्याचे खरे कारण आहे. एका पाटलाने एकाला आणि दुसऱ्याने दुसऱ्याला हाताशी धरून एकमेकांवर गुन्हा दाखल करायला लावायचा. अशाने कोर्टात काहीही सिध्द होत नाही. त्यामुळे ॲट्रॉसिटीचा पूर्वीचा कायदा जसाच्या तसाच राहिला पाहिजे. तरच त्या कायद्याचा धाक निर्माण होईल आणि अस्पृश्यता कमी होईल.

कोरटकर कडे महेश मोतेवारच्या गाड्या पैसा अन..भाजपच्या बड्या नेत्यांबरोबर करतो उठबस

रोहित पवारांचा हल्लाबोल

पुणे-छावा चित्रपटाविरोधात भाष्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर नामक एका व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. सावंत यांनी स्वतः या प्रकरणी एक ऑडिओ क्लिप सार्वजनिक केली आहे. मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशूरामी ब्राह्मण धमक्या देत आहे. मला अशा धमक्या नवीन नाहीत. पण या लोकांच्या मनात शिवाजी महाराजांविषयी किती विष भरलेले आहे हे झोपलेल्या मराठा बहुजनांना समजावे म्हणून मी ही रेकॉर्डिंग व्हायरल करत आहे, असे सावंत यासंबंधी म्हणाले होते. मात्र कोरटकर यांनी हा आरोप फेटाळून लावला आणि आपल्या नावाने इतर कोणीतरी हा प्रकार केला असल्याचे स्पष्टीकरण दिल्यावर कोरटकर यांना सत्ताधारी भाजपने संरक्षण पुरविले आहे. या पार्श्वभूमीवर आज रोहित पवार यांनी २ पोस्ट करत हल्लाबोल केला आहे

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रोहित पवार यांनी दुसऱ्या पोस्ट मध्ये म्हटले आहे कि,’

ज्या महेश मोतेवारने लाखो लोकांना हजारो कोटींचा गंडा घातला त्याच्या गाड्या आणि पैसे कोरटकरकडे असून महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या माजी राज्यपाल कोशारी साहेबांपासून तर केंद्र तसेच राज्य सरकारमधील मोठ्या नेत्यांसोबत कोरटकरची उठबस असल्याची माहिती समोर येत आहे, शिवाय गुवाहाटीत देखील कोरटकर हजर होता, अशी चर्चा आहे.कदाचित सत्तेतील नेत्यांशी उठबस असल्याने आपल्याला कोणीही काही करू शकत नाही याचा विश्वास कोरटकरला आहे, म्हणूनच कोरटकर सारख्या विकृत प्रवृत्तींची हिम्मत वाढत असावी. महान व्यक्तींच्या नावाने राजकारण करणारे हे सरकार महान व्यक्तींचा अपमान करणाऱ्या कोरटकरसारख्या प्रवृत्तींना खाक्या दाखवणार की त्याची सेवा करण्यातच धन्यता मानणार हे पहावं लागेल..नेत्यांवर टीका केली म्हणून धरपकड करणारे सरकार महान व्यक्तींबद्दल अभद्र भाषा वापरणाऱ्या विकृतांवर कारवाई करत नाही, हे मात्र दुर्दैव आहे!

तत्पूर्वीच्या आजच्या पहिल्या एका पोस्ट मध्ये रोहित पवार यांनी असेही म्हटले आहे कि,’पुण्यात एका अत्यंत मोठ्या गुंडाला मंत्र्याच्या एका फोनवर मकोका लावून अर्ध्या तासात पकडले जाते, परंतु मस्साजोग प्रकरणात अडीच महिने उलटूनही आरोपी सापडत नाही, परभणी प्रकरणाचा तपास पुढे सरकत नाही, याचा अर्थ काय घ्यावा? पोलीस यंत्रणा फक्त राजकीय आदेशावरच चालणार का? की राजकीय हस्तक्षेप कारवाईच्या आड येतो?

जीवे मारण्याची धमकी आली इंद्रजीत सावंतांना आणि पोलीस सुरक्षा देताय धमकी देणाऱ्याला! छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभू राजे यांच्याबद्दल बदनामीकारक शब्द वापरणाऱ्या नतद्रष्टावर कारवाई करण्याऐवजी त्याला सुरक्षेचं कवच?

पुणे वाहतूक पोलिसांसाठी विशेष प्रशिक्षण मोहीम:पहिल्या तुकडीतील 65 कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र; तीन महिन्यात सर्व पोलिसांना प्रशिक्षण

पुणे-पुणे पोलीस दलाने मुंबई पोलिसांच्या धर्तीवर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश रस्त्यावरील वाद टाळणे आणि अपघातग्रस्तांना त्वरित मदत करणे हा आहे.

पहिल्या तुकडीतील ५ अधिकारी आणि ६० कर्मचाऱ्यांना यशस्वी प्रशिक्षण देण्यात आले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्रे प्रदान केली. येत्या तीन महिन्यांत वाहतूक शाखेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

प्रशिक्षण कार्यक्रमात सॉफ्ट स्किल्स, वाहन कायदा, तंत्रज्ञान, इ-चलन यंत्राचा वापर, नागरिकांशी संवाद कौशल्य आणि अपघातग्रस्तांवरील तातडीचे उपचार यांचा समावेश आहे. या प्रशिक्षणासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये सॉफ्ट स्किल संचालक, आरटीओ अधिकारी, निवृत्त पोलीस अधिकारी आणि जहाँगीर रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश होता.

मुंबईप्रमाणे पुण्यातही वाहतूक पोलिसांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याची योजना आहे. सध्या या संस्थेसाठी जागेचा शोध सुरू आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मते, हे प्रशिक्षण वाहतूक नियमन अधिक प्रभावीपणे करण्यास मदत करेल.

तुरुंगात खितपत पडलेल्या कैद्यांची सुटका;- BAIL SCHEME FOR POOR PRISONERS दिड वर्षानंतर अंमलबजावणी सुरु,पुण्यातून १० कैदी आले बाहेर

राज्यातील तुरुंगात क्षमतेहून अधिक म्हणजे तिप्पट कैद्यांची संख्या -जामीन कोर्टाने मंजूर केलाय पण जामीनदार नाही किंवा जामिनाचे पैसे किंवा दंड भरायला पैसे नाही म्हणून खितपत पडलेल्या कैद्यांसाठी BAIL SCHEME FOR POOR PRISONERS

-जामिन मिळूनही जामीनदार अथवा जामिनाचे,दंडाचे पैसे नसल्यानं तुरुगांत अडकलेल्या कैद्यांची होणार सुटका
-केंद्र सरकारच्या योजनेनुसार कैद्यांची रक्कम सरकार भरणार
-योजनेत पुण्यातील १० कैद्यांची झाली सुटका
-फक्त गंभीर गुन्हे नसलेल्या आणि गरीब कैद्यांची होणार सुटका


पुणे- पुण्यातील येरवडा कारागृहासह राज्यातील विविध कारागृहात कारागृहाच्या क्षमतेपेक्षा अधिक कैदी कारागृहात आहे. तसेच यातील अनेक कैदी गरिबीमुळे दंडाची किंवा जामिनाची रक्कम भरता येत नसल्यानं कारागृहात अनेक वर्षापासून अडकून पडले आहेत. गरिबीमुळे दंडाची किंवा जामिनाची रक्कम भरता येत नसलेल्या कैद्यांचे हाल थांबणार आहेत. अशा कैद्यांच्या दंडाची आणि जामिनाची रक्कम केंद्र सरकार भरणार आहे.

येरवडा तुरुंगात ३ हजार कैद्यांची क्षमता आहे. प्रत्यक्षात ७ हजारांहून अधिक कैदी येरवडा तुरुंगात आहेत. देशभरातील तुरुगांतील कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा अधिक आहे. तुरुंगातील कैद्यांची संख्या कमी करण्याकरिता केंद्र सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. तसेच केंद्र सरकारनं पैशाअभावी जामिन न घेता येणाऱ्या कैद्यांसाठी सुरू केलेल्या योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पोलीस, कारागृह प्रशासन आणि न्यायपालिकेचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात १० कैद्यांची रक्कम भरून त्यांना सोडण्यात आलं आहे. राज्यात पुणे शहर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडूनच या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली.
तुरुगांतील कैद्यांनाही होतोय त्रास- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव सोनल पाटील यांनी योजनेची माहिती दिली. जामिन मिळूनही गरिबीमुळे अनेक कैद्यांनी रक्कम भरलेली नाही. या कारणामुळे ते तुरुगांमध्ये आहेत. तुरुंगामध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. त्यामुळे अशा कैद्यांनादेखील त्रास होत आहे. तुरुंगातील कैद्यांची संख्या कमी करणं आणि अशा लोकांना आर्थिक मदत करणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत अशा गरीब कैद्यांना तुरुगांतून बाहेर काढण्यात येत आहे.

ही योजना ऑक्टोबर २०२३ साली जाहीर झाली असून सध्या अंमलबजावणी करण्यात येत आहे.
जामीन मंजूर झाल्यानंतरही ७ दिवसांत कैद्याची सुटला झाली नाही तर कारागृह प्रशासनाकडून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला कळविले जाते. त्यासोबत समितीला माहिती दिली जाते. मग अशा कैद्यांना आमच्या माध्यमातून मदत केली जाते.
या योजनेचा लाभ कोणताही कैदी घेऊ शकतो.

मात्र बलात्कार किंवा खून, विनयभंग, हत्याकांड, आर्थिक फसवणूक, अमली पदार्थांची विक्री, लाचखोरी, देशविघातक कारवाई, नक्षलवादी कारवाई आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
संबंधित कैदी हा खरचं गरीब आहे का, याबाबतदेखील खात्री केली जाते.
आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कैद्याला योजनेचा लाभ देता येणार नाही.
जामिनची रक्कम ४० हजार पेक्षा कमी असते, अशा जामिन मिळालेल्या कैद्यांना मदत केली जाते.

४५ कैद्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू- शिक्षा झालेल्या कैद्यांसाठी दंड भरण्यासाठीची रक्कम २५ हजारांपर्यंत भरली जाते. जवळपास ४५ हून अधिक कैद्यांची जामिनाची रक्कम भरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून कैद्यांच्या आर्थिक स्थितीची सखोल चौकशी सुरू आहे. आर्थिक परिस्थितीमुळे असमर्थ दंडाची रक्कम भरण्यास किंवा जामीन रक्कम भरण्यास असमर्थ असलेल्या कैद्यांना मदत करण्यासाठी योजना असल्याचं सोनल पाटील यांनी सांगितलं.

दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते ‘एप्रिल मे ९९’च्या पोस्टरचे अनावरण

१६ मे रोजी चित्रपट होणार प्रदर्शित

मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक-निर्माते राजेश मापुस्कर आणि कास्टिंगच्या दुनियेत बादशाह म्हणून ओळखले जाणारे रोहन मापुस्कर हे दोघे भाऊ एकत्र येऊन प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन आले आहेत.
मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स , थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणजे, १६ मे २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्गज दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते करण्यात आले ह्या प्रसंगी निर्माते जोगेश भूटानी ह्यांनी शाल आणि श्रीफळ देऊन राजदत्त ह्यांचा सत्कार करून आशीर्वाद घेतले.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये चार तरुण त्यांच्या सायकलींसोबत उभे असल्याचे दिसते. या तरुणांच्या वर निळेशार आकाश आणि समोर समुद्र पाहायला मिळत आहे. पोस्टरवरून असे दिसते की, हा चित्रपट प्रेक्षकांना मैत्री, स्वप्नं, आणि तारुण्याच्या भावविश्वात घेऊन जाणारा असेल. ‘एप्रिल मे ९९’ असे नाव असल्याने हा चित्रपट उन्हाळ्याच्या सुट्टीतील कुटुंबातील लहान मोठ्या सर्वांच्या सुट्टीतील रम्य आठवणींशी जोडला जाणार आहे. चित्रपटात कलाकार कोण असतील? हे अजून गुलदस्त्यातच आहे.

निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात,” श्रीवर्धनमध्ये आमचा मापुस्कर कुटुंबाचा एक सिनेमा हॉल होता. तो सिनेमा हॉल आम्हा दोन भावांसाठी जणू एक चित्रपट शाळाच ठरला. तिथे राजदत्त जींचे चित्रपट पाहत आम्ही मोठे झालो आणि इतकेच नाही तर आम्ही त्यांच्या प्रत्येक चित्रपटाचे पोस्टर श्रीवर्धन आणि आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन चिकटवायचो. आज आम्ही राजदत्त जींच्या हस्ते रोहनच्या पहिल्या चित्रपटाचे ‘एप्रिल मे ९९’ चे पोस्टर रिलीज करत आहोत. यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणता असू शकतो? त्यांच्या शुभेच्छांमुळे आमच्या प्रवासाला एक वेगळे बळ मिळाले असून त्यांचे हे आशीर्वाद आम्हाला कायम प्रेरित करतील.”

लेखक, दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात,” आज मी दिग्दर्शक म्हणून माझ्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर माननीय राजदत्तजी यांच्या हस्ते प्रदर्शित करतोय ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या प्रवासात आम्ही अनुभवलेले क्षण, चित्रपटांची जादू आणि कलेची आस हे सर्व एकत्र होऊन या नव्या प्रकल्पाला आकार देत आहेत. नेहमी प्रमाणे प्रेक्षकांच्या प्रेमाने या चित्रपटाला पुन्हा पाठिंबा मिळेल, अशी खात्री आहे. राजदत्त सरांचे आशीर्वाद आम्हाला पुढील प्रवासासाठी उर्जा देतील याची मला पूर्ण खात्री आहे.”

मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स , थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत.