Home Blog Page 439

मेट्रो स्‍टेशन कनेक्‍टीव्‍हिटीसाठी रिक्षा चालकांचा पुढाकार : बाबा कांबळे

  • मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्‍या सोबत सकारात्‍मक चर्चा

पिंपरी ! प्रतिनिधी –
घरापासून मेट्रो स्‍टेशन पर्यंत येण्यासाठी नागरिकांना शेअर रिक्षाद्वारे रिक्षा चालकांकडून सेवा दिली जाईल. त्‍यासाठी रिक्षा चालकांमध्ये जनजागृती करणार आहे. नागरिकांना घरापासून मेट्रो स्‍टेशनपर्यंत कनेक्‍टीव्‍हिटी सुलभ होण्यासाठी रिक्षा चालक पुढाकार घेतील, असा सकारात्‍मक प्रतिसाद महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिला.

पुणे मेट्रोचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्‍या सोबत बाबा कांबळे यांच्‍या नेतृत्‍त्‍वाखाली महाराष्ट्र रिक्षा पंचायत या संघटनेची बैठक पार पडली. पुण्यात पार पडलेल्‍या या बैठकीत मेट्रो स्‍टेशनपर्यंत येण्यासाठी नागरिकांना रिक्षा चालकांनी सेवा देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

या वेळी पुणे शहर कार्याध्यक्ष विलास केमसे, शहराध्यक्ष मोहंम्‍मद शेख, सचिव अविनाश वाडेकर आदी या वेळी उपस्‍थित होते.

या बैठकीत बोलताना मेट्रोचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्‍हणाले की, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये मेट्रोचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. दिवसाकाठी लाखो प्रवाशांची नोंद पिंपरी ते स्‍वारगेट दरम्‍यान प्रवासाची होत आहे. नोकरदार वर्गासोबतच विद्यार्थी, महिला, वयस्‍कर नागरिकांनाही याचा मोठा फायदा होत आहे. मात्र घरापासून मेट्रो स्टेशनपर्यंत येण्यासाठी नागरिकांना स्वतःच्या वाहनाचा वापर करावा लागतो. त्यांना इतर साधने उपलब्ध नाहीत. त्‍यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. स्‍वतःची वाहने आणल्‍याने मेट्रो स्‍थानकाजवळच वाहने उभी करावी लागत आहेत. परिणामी वाहतूक कोंडी होईल, अशी भिती आहे. या प्रवाशांना रिक्षा चालकांनी पारदर्शक, सुलभ मीटर प्रमाणे व शेअर रिक्षा सेवा दिल्यास प्रवाशांची गैरसोय दुर होईल. तसेच रिक्षा चालकांनाही मोठा आर्थिक फायदा होऊन त्यांचे आर्थिक प्रश्न सुटतील, असे श्रावण हर्डिकर म्‍हणाले.

या वेळी बाबा कांबळे म्‍हणाले की, रिक्षा चालकांमध्ये जनजागृती करून शेअर रिक्षासाठी व मेट्रो स्टेशन पासून मीटरने रिक्षा व्यवसाय करण्यात येईल. तसेच मेट्रो स्‍टेशनपर्यंत नागरिकांना येण्यासाठी रिक्षा चालकही योग्य सेवा देतील यासाठी आम्ही लवकरच जनजागृती अभियान राबवून याबद्दल ठोस उपयोजना करणार आहोत. त्‍यासाठी रिक्षा चालकांनीही यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले.

स्वारगेट बस स्थानकात बलात्कार:युवक काँग्रेसचे लष्कर पोलीस चौकीसमोर आंदोलन

पुणे – स्वारगेट बस स्थानकात बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे या आरोपीला शिरुर तालुक्यातील गुणाट गावातून अटक करण्यात आली.या आरोपीला लष्कर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असून काही वेळात आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.यादरम्यान लष्कर पोलीस स्टेशनबाहेर युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहराध्यक्ष सौरभ अमराळे यांनी केले. या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि गृहमंत्री,पालकमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव तारिक बागवान,विरधवल गाडे.मेघश्याम धर्मावत, आनंद दुबे,आजिनाथ केदार,गणेश उबाळे,पुणे जिल्हाध्यक्ष उमेश पवार, हडपसर वि.आ.मतिन शेख, कोथरूड वि.आ.आजीत ढोकळे, सद्दाम शेख, स्वप्निल गायकवाड,विशाल कामेकर, हर्षद हांडे, स्वप्नील शेलार,सौरभ रूपनर, वैभव बुरंगुले, मुरली बुधराम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिवराज मोरे म्हणाले, “नुकताच गृहमंत्र्यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल अभिनंदन पत्र देण्यात आले. हे पत्र कशाच्या आधारावर गृहमंत्र्यना देण्यात आले. आज पुणे गुन्हेगारीच्या दिशीने वळत आहे त्याला जबाबदार कोण. आज हे सरकार महिल्यांच्या सुरक्षा बाबत अपयश ठरलेले आहे. जर या आरोपीला फाशीची शिक्षा नाही झाली तर युवक काँग्रेस कडून संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येईल”.

सौरभ आमराळे म्हणाले, आज पुण्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र सरकार केवळ आश्वासन देण्यात व्यस्त आहे. एवढेच काय तर गृहमंत्र्यांनी चक्क पीडितेवर आरोप केले आहे. एकीकडे तुम्ही लाडकी बहीण म्हणता आणि दुसरी कडे आज त्याच बहिणीवर अत्याचार होतं आहे तर सरकार मूक गिळून बसले आहे. स्वारगेटची घटना फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे”.

एक लाखाची बक्षिशी देणार आणि गावाच्या विकासासाठी प्रयत्नही करणार -पोलीस आयुक्त अमितेश कुमार

स्वारगेट बस स्टँडवरील बस मध्ये बलात्कार करणारा आरोपी पकडून दिल्याबद्दल आयुक्तांनी मनाले अनेकांचे आभार

पुणे-स्वारगेट एसटी स्थानक परिसरात 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला पुणे पोलिसांनी शिरूर परिसरात गुनाट गावच्या हद्दीतून शुक्रवारी रात्री अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 500 पोलिस कर्मचारी मागील तीन दिवस काम करत होते . त्यासोबत गावातील 400 ग्रामस्थ यांचे सहकार्य मिळाले. श्वान पथकाने ऊस शेतातील जागा दाखवल्या होत्या तसेच ड्रोन मदत घेण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील तपास करण्यात येईल. या प्रकरणात विशेष सरकारी वकील यांची नियुक्ती करून फास्ट ट्रॅक न्यायालयात केस चालवण्यात येईल अशी माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अमितेश कुमार म्हणाले की, शहरातही महिला सुरक्षा आढावा घेण्यात आला आहे. शहरातील विविध भागातील सेफ्टी ऑडिट घेतले जात आहे. मनपा सोबत एकदा पुन्हा डार्क स्पॉट जागी लाईट खांब लावून गस्त वाढविण्यात येईल. महिला सुरक्षा बाबत सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात येईल. तपास उशिरा लागला असला तरी तक्रार आल्यावर याबाबत तपास तातडीने सुरू करण्यात आला. आरोपी बाबत सीसीटीव्ही तपासणी करून त्याची ओळख पटविण्यात आली. ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणात पोलिसांना सहकार्य केले आहे त्यामुळे स्वतः मी गावात जाऊन त्यांचा सन्मान करणार आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहे आणि या गुन्ह्यात आरोपीला कडक शिक्षा करण्याबाबत पोलिस प्रयत्नशील राहतील.अमितेश कुमार म्हणाले की, प्रकरणात आरोपी शोधण्यावरुन पोलिसांमध्ये कोणताही श्रेयवाद नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. तर सर्व पोलिस तपास कार्यात सहभागी होते असे त्यांनी स्पष्ट केले. रात्र दिवस पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र काम केले. आरोपीचे नाव तक्रार दाखल होताच निष्पन्न करण्यात आले होते. ग्रामस्थ आणि पोलिस एकत्रित काम करत होते. गावातील सार्वजनिक वाहने ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. त्यामुळे आरोपीला गावा बाहेर पडणे शक्य झाले नाहीं. ज्या ग्रामस्थाने आरोपी बाबत माहिती दिली त्यांना एक लाखाचे बक्षीस देण्यात येईल. गावासाठी देखील काही देता येईल का याबाबत आम्ही विचार करू.

आरोपी दत्तात्रय गाडे याला गुरुवारी मध्यरात्री शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली आहे. त्याला लवकरच कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत त्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे.
पत्रकारांनी याविषयी येथे आयोजित पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, प्राथमिक वैद्यकीय चाचणीनुसार आरोपीच्या गळ्यावर दोरीचे व्रण आहेत. या व्रणानुसार आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीने तशी कबुली दिली. मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दोरी तुटल्यामुळे व वेळीच इतर लोक धावून मदतीस आल्यामुळे आपला जीव वाचला असे त्याने सांगितले आहे. आता आरोपीने खरेच आत्महत्येचा प्रयत्न केला होता का? याची शहानिशा करण्यासाठी घटनास्थळी तपास पथक पाठवण्यात येणार आहे. पण प्राथमिक वैद्यकीय चाचणीनुसार त्याच्या गळ्यावर दोरीचे वळ होते.
अमितेश कुमार पुढे म्हणाले, स्वारगेट बसस्थानकातील 23 सीसीटीव्ही कॅमेरे व स्थानकाबाहेरील 48 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर अवघ्या दीड-दोन तासांतच पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. मागील 2 दिवसांपासून आम्ही आरोपीच्या गावात शोधमोहिम राबवत होतो. काही पोलिस कर्मचारी तिथे तळ ठोकून होते. ते झोपलेही नाही. पण आरोपी तेव्हा सापडला नाही. अखेर आज त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आले. याकामी मदत करणाऱ्या गावकऱ्यांचे मी अभिनंदन करतो. आम्ही गावाला भेट देऊन तेथील नागरिकांचा सत्कार करणार आहोत. विशेषतः गावासाठी काही करता येईल का? याचाही आमच्या पातळीवर विचार सुरू आहे.
पोलिसांनी या प्रकरणी एकदम शेवटी मिळालेल्या खबरीनुसार आरोपीला अटक केली. त्यात आरोपी कुठेतरी पाणी पिण्यासाठी आल्याचे सांगण्यात आले होते. आरोपी पाणी पिण्यासाठी आला असता तो एका व्यक्तीला दिसला. त्याने ती खबर पोलिसांनी दिली. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला. त्यानंतर ड्रोनच्या मदतीने दिसलेल्या त्याच्या दिशेतून त्याला अटक करण्यात आली. त्यामुळे ही खबर देणाऱ्या व्यक्तीला 1 लाखाचे बक्षीस दिले जाईल.

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0

पुणे – पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधमाला आज रात्री दीडच्या सुमारास अटक पुण्यातील शिरूर तालुक्यातील एका गावातून पुणे पोलिसांनी बेड्या घालून पुण्यात आणले आहे.100 पोलिस, श्वान पथक आणि ड्रोन कॅमेराची नजर, तरीही नराधम दत्ता गाडे पोलिसांना सापडत नव्हता,पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला आणि अवघा महाराष्ट्र हादरला. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची टीम कामाला लागली.गुनाट गावात 100 पोलिसांचं विशेष पथकाने शोध सुरू केला. श्वान पथकाकडूनही शोध सुरू झाला. पाच ड्रोन्सच्या सहाय्याने… क्राईम ब्रँचचे पोलिसही कामाला लागले. बलात्कार करून पळून जाणारा गाडे एका घरात पाणी पिण्यासाठी थांबला होता ही माहितीसुद्धा समोर आली होती .पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या 10 मित्र-मैत्रिणींची चौकशी केली. गाडेची माहिती देणाऱ्यांना एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं.असे असूनही आणि एवढा आटापिटा करूनही दत्ता गाडे मात्र पोलिसांच्या हाती लागत नसल्याने टीकेचा भडीमार होत होता तर पोलिसांचा बचाव करताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद पेटण्याची शक्यता दिसत होती . दुसरीकडे आता या घटनेनंतर परिवहन खातं खडबडून जागं झाल्याचं दिसलं .शिरुरच्या गुनाट गावात 140 पोलिसांचा ताफा तैनात असून आरोपीचा शोध घेतला गेला . ऊसाच्या शेतात आरोपीचा शोध घेतला . तर ड्रोनच्या नजरेतूनही आरोपीला शोधलं गेल . पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची आठ ते दहा पथके आरोपीच्या मागावर राहिली . दरम्यान व्हिडीओत दिसणाऱ्या या घरात आरोपीने पाणी प्यायलं होतं. इथे तो काही वेळ थांबला होता. त्यानंतर तो बेपत्ता झालाय. दरम्यान या परिसरात पोलिसांनी शोधमोहिम केली मात्र अंधार पडल्याने आणि बिबट्याच्या वावरामुळे पोलिसांना शोधमोहीम थांबवावी लागली . आणि रिकाम्या हाती परतावं लागेल असे वाटत असताना तो हाती लागला .कसा ते आता पोलीस आयुक्त आज पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहेत .

कात्रज -कोंढवा रस्त्यावर सुरु होणार ८ वर्षे रखडलेली ई-लर्निंग शाळा:प्रशासकीय काळातील झेप

पुणे- राजकीय हस्तक्षेपांमुळे २७ वर्षे कात्रज कोंढवा रस्त्यावरील मुख्य चौकातील ४० गुंठे जमीन महापालिका संपादित करू शकली नव्हती ती प्रशासकीय काळात नुकतीच संपादित केल्यावर आता कात्रज -कोंढवा रस्त्यावर ८ वर्षे रखडलेली ई-लर्निंग शाळा प्रशासकीय काळात सुरु होण्याच्या मार्गावर आहे. येत्या जून मध्ये हि शाळा सुरु करण्याकरिता प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील सर्वे नंवर १९ पार्ट येथील अॅमेनिटी स्पेसवर ई-लर्निंग शाळेचे काम मागील आठ वर्षांपासून सुरु आहे. मात्र, आता प्रशासकीय काळात नागरिकांची प्रतिक्षा संपली असून ही शाळा जूनमध्ये सुरु होणार असल्याचे महापालिकेकडून संकेत देण्यात आले आहे. तशा पद्धतीने तयारीचे आदेश महापालिका आयुक्तांकडून विद्युत विभाग आणि शिक्षण विभागाला देण्यात आलेले आहेत.संबंधित शाळेच्या इमारतीला २०१५ मध्ये तळ मजल्याव्यतिरिक्त ५ मजले अशी परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर २०१६मध्ये सदर कामाचे भूमीपूजन करण्यात आले आणि प्रत्यक्ष कामास सुरवात झाली. सद्यस्थितीत याठिकाणी लोअर ग्राउंड, लोअर पार्किंग, अप्पर ग्राउंड व पहिला मजला पूर्ण झाला आहे.दुस-या मजल्याचे काम सुरु आहे. २०१६ ते २०२४ पर्यंत टप्प्याटप्प्यांत निधी उपलव्ध झाल्याने हे काम रेंगाळले होते. आता एकुण १८ वर्गखोल्या व स्वच्छतागृहाचे कामे पुर्ण करण्यात येणार आहे.एप्रिल २०२५पूर्वी महापालिका आयुक्तांनी भवन रचना विभागाला काम पूर्ण करुन दोन मजल्यांसह शाळेची इमारत हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर भवन रचना विभागाकडून कामाला गती देण्यात आली आहे. इमारतीचे दोन मजले वापरायोग्य पुर्ण करण्याच्या दृष्टीने काम सुरु आहे.एप्रिल २०२५ पुर्वी काम पूर्ण होईल या उद्देशाने दोन मजल्यांवर शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याची कार्यवाही करावी’ असेही आदेश शिक्षण विभागालाही दिले आहेत. त्याचबरोबर, या इमारतीची विद्युतविषयक कामे करण्यासाठी शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने विद्युतविषयक कामांचे पुर्वगणनपत्रक व निविदा प्रक्रिया राबविण्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात जूनमध्ये किमान दोन मजल्यांवर शाळा सुरु होणार हे निश्चित झाले आहे.

पोलीसाच्या खुनाची शिक्षा भोगत असलेला कैदी पळाल्यावर तब्बल ११ वर्षानंतर शिताफीने जेरबंद

पुणे-पोलीसाच्या खुनाची शिक्षा भोगत असलेला कैदी पोलिसांच्या तावडीतून पळाल्यावर तब्बल ११ वर्षानंतर पुन्हा त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

कर्नाटक पोलीस अंमलदार हे ड्युटी वरती असताना अमरीश काशीनाथ कोळी, रा. कर्नाटक याने त्यांचा खुन केला होता. सदर बाबत कर्नाटक, गुलबर्गा पोलीस स्टेशन गु.र.नं. ५७/२००९ भा.द.वि.कलम ३०२,३५३,३३२,५०४ अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर दाखल गुन्हयात न्यायालयाने आरोपीस ३० वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे.
सदर आरोपी अमरीश कोळी, हा शिक्षा भोगत असताना आजारी पडल्याचा बहाणा करुन उपचारा कामी विजापुर शासकीय रुग्णालय, विजापुर, कर्नाटक येथे उपचार घेत असताना दिनांक १४/०८/२०१४ रोजी पोलीसांच्या रखवालीतुन पळुन गेला होता. त्याबाबत कर्नाटक, विजापुर येथील गांधी चौक पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर २५९/२०१४ भा.द.वि.कलम २२४ अन्वये गुन्हा नोंद आहे.
फुरसुंगी पोलीस स्टेशन कडील पोलीस अमंलदार सुनिल कांबळे व वैभव भोसले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, इसम नामे अमरीश काशीनाथ कोळी, हा सद्या रा. गंगानगर, फुरसुंगी, पुणे याने १४ वर्षापुर्वी एका पोलीसाचा खुन केला असुन तो शिक्षा भोगत असताना ११ वर्षापुर्वी शासकीय रुग्णालयातुन पोलीसांच्या कस्टडी मधुन पळुन आला आहे. सद्या तो राहुल कांबळे व राजु काळे असे बनावट नाव धारण करुन ओळख लपवुन राहत आहे.
सदर आरोपी अमरीश कोळी, सद्या रा. गंगानगर, फुरसुंगी, पुणे याचे हालचालीवर नजर ठेवुन त्याचेबाबत माहीती घेतली असता तो कधी पुणे तर कधी सोलापुर येथे वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहे. तसेच त्याने बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड काढलेले असुन तीन लग्न केलेले आहेत. कर्नाटक येथील गुलबर्गा पोलीस स्टेशनची संपर्क करुन इसम नामे अमरीश काशीनाथ कोळी, याची माहीती व फोटो मागुन घेतला. सदरबाबत खात्री झाल्यानंतर गुलबर्गा ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क करुन कर्नाटक येथुन पो. अमंलदार भिमानायक व शशीकुमार हुगार हे दि.२६/०२/२०२५ रोजी पोलीस ठाणेस आल्यानंतर पोहवा. महेश उबाळे, पो. अंम सुनिल कांबळे व वैभव भोसले यांनी आरोपी नामे अमरीश काशीनाथ कोळी, वय ४५ वर्ष मुळ पत्ता-घाटगे लेआऊट, कलबुर्गी, कर्नाटक सद्या रा. गंगानगर, फुरसुंगी, पुणे यास शिताफीने पकडुन पुढील कार्यवाहीसाठी कर्नाटक पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परी-५, पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर श्रीमती अनुराधा उदमले, त्यांचे मार्गर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फुरसुंगी पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री. मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. राजेश खांडे, पोलीस हवा. महेश उबाळे, पो. अंमलदार सुनिल कांबळे वैभव भोसले सर्व फुरसुंगी पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी केली आहे.

पुणे:पोलीस ठाण्यातच पोलिसाने पेट्रोल अंगावर ओतून केला आत्महत्येचा प्रयत्न

पुणे-एका पाेलिस कर्मचाऱ्याने विश्रांतवाडी पाेलिस ठाण्याचे आवारात स्वत:चे बुलेट गाडीतील पेट्राेल एका कॅन मध्ये काढून आणत, स्वत:चे अंगावर ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडल्याने गाेंधळ उडाल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पाेलिस शिपाई विजय लक्ष्मण जाधव याच्यावर वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केल्याबद्दलचा ठपका ठेवत त्याचेवर निलंबन कारवाई केली आहे.

याप्रकरणी विश्रांतवाडी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाेलिसांचा नियंत्रण कक्ष असलेल्या डायल ११२वर धानाेरी परिसरात सहयाद्री काॅलनी येथे भांडणे झाल्याचा फाेन आला हाेता. त्यानुसार विश्रांतवाडी पाेलिस ठाण्याचे पाेलिस उपनिरीक्षक एस माने हे घटनास्थळी गेले हाेते. त्यावेळी सदर ठिकाणी पाेलिस मुख्यालयात नेमणुकीस असलेले पाेलिस शिपाई विजय जाधव व त्यांचा भाऊ विकी लक्ष्मण जाधव व इतर असे सर्वजण ओंकार गुलचंद सिंग हे राहते घराचे परिसरात व्यवसाय करत असलेल्या डुकरे पाळण्याच्या हद्दीवरुन त्यांच्यात वाद सुरु हाेते. त्यावरुन सदर दाेन्ही बाजूच्या लाेकांना विश्रांतवाडी पाेलीस स्टेशन येथे आणण्यात आले. त्यावेळी पाेलिस स्टेशन मध्ये याबाबत चाैकशी केली जात असताना पाेलिस कर्मचारी विजय जाधव याने पाेलिस स्टेशनचे बाहेर जाऊन स्वत:चे बुलेट गाडीतील पेट्राेल एका कॅन मध्ये आणले व स्वत:चे अंगावर ते टाकून अारडाअाेरड सुरु केल्याने गडबड उडाली. यावेळी पाेलीस स्टेशन मध्ये हजर असलेल्या अधिकारी व पाेलीस अंमलदार यांनी तात्काळ त्यास ताब्यात घेत यासंर्दभातील माहिती वरिष्ठ पाेलीस अधिकाऱ्यांना दिली. चाैकशी दरम्यान पाेलीस शिपाई विजय जाधव याने गैरवर्तन केल्याचे सिध्द झाल्याने त्याचेवर निलंबन कारवाई करण्यात अाल्याची माहिती पाेलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली अाहे. याबाबत पुढील तपास विश्रांतवाडी पाेलीस करत अाहे.

लाल महाल, शनिवार वाडा परिसरात दुमदुमला मराठीचा जयघोष

साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि नवीन मराठी शाळेचा उपक्रम
पुणे : संत, राष्ट्रपुरुष, क्रांतिकारक, समाजसुधारक यांची वेषभूषा परिधान करून असंख्य शालेय विद्यार्थ्यांनी मराठीचा जयघोष करीत मराठीत बोलण्याची शपथ घेतली. पुण्यातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या लाल महाल आणि शनिवार वाडा येथे मराठी अभिमान गीत व महाराष्ट्र गीत सादर केले. ‌‘छत्रपती शिवाजी महाराज की जय‌’, ‌‘माय मराठीचा जयजयकार असो‌’ अशा जोशपूर्ण घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
निमित्त होते मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून साईनाथ मंडळ ट्रस्ट व शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळा आयोजित विशेष कार्यक्रमाचे. सुरुवातीस शनिवार वाडा आणि त्यानंतर लाल महाल येथे या कार्यक्रमाचे आज (दि. 27) आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वेषभूषेत तसेच संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पुण्यलोक अहिल्याबाई होळकर, बाजीराव पेशवे, राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, क्रांतीसूर्य ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह वारकरी, मावळ्यांच्या वेशभूषेत मुले-मुली सहभागी झाले होते.
‌‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी‌’, ‌‘मराठी माणसाने मराठी माणसासोबत मराठीतच बोलावे‌’, ‌‘मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा‌’ असे मराठी भाषेची अस्मिता दर्शविणारे फलक तसेच कवी कुसुमाग्रज यांचे छायाचित्र असलेले फलकही विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते. मराठी भाषेची धुरा जणू हा बालचमू आनंदाने स्वीकारत आहे आणि मराठी भाषा प्रवाहित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे, असे आश्वासक चित्र या निमित्ताने पहावयास मिळाले.
कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी माहिती देताना पियूष शहा यांनी मराठी राजभाषा दिनाचे आणि केंद्र सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. मुलांमध्ये मराठी भाषेविषयी अस्मिता जागृत व्हावी, मराठी बोलण्याचे संस्कार मुलांवर व्हावेत यातूनच मराठी भाषेचे संवर्धन व्हावे आणि मराठी भाषा प्रवाहित रहावी हा कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाची संकल्पना व आयोजन पियूष शहा व मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांची होती. शिक्षक प्रतिनिधी योगिता भावकर, सांस्कृतिक मंडळाच्या प्रमुख मिनल कचरे, प्रतिभा पारखे, वैशाली पाटील, धनंजय तळपे, साईनाथ ट्रस्ट मंडळाचे विक्रम गोगावले, नंदू ओव्हाळ, गंधाली शहा, समीक्षा सोनवणे, संकेत निंबाळकर, प्रणिता सरदेसाई, तन्वी ओव्हाळ उपस्थित होते.
पियूष शहा यांनी प्रास्ताविक केले व उपस्थित विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञा म्हणून घेतली तर आभार कल्पना वाघ यांन मानले.

पंडित कुमार गंधर्व महोत्सवातून अनाहत नादाची अनुभूती:गायन, नृत्याविष्काराने रसिक मंत्रमुग्ध

विदुषी सानिया पाटणकर, पंडित सत्यशील देशपांडे, डॉ. पुष्कर लेले, अरुंधती पटवर्धन यांचा सहभाग

पुणे : अनाहत नादाची अनुभूती देणाऱ्या शतकातील महान गायक पंडित कुमार गंधर्व यांची गायकी सांगीतिक महोत्सवातून उलगडली. महोत्सवाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आज (दि. 26) पंडित कुमार गंधर्व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बालशिक्षण मंदिराजवळील एमईएस सभागृहात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात विदुषी सानिया पाटणकर यांचे बहारदार गायन झाले तर डॉ. पुष्कर लेले यांनी पंडित कुमार गंधर्व यांच्या निर्गुणी भजनाची वैशिष्ट्ये उलगडली. पंडित सत्यशील देशपांडे यांनी पंडित कुमार गंधर्वांच्या सांगीतिक विचारांवर भाष्य करत सादरीकरणही केले.
महोत्सवातील पहिले पुष्प जयपूर-अत्रौली घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका विदुषी सानिया पाटणकर यांनी गुंफले. त्यांनी आपल्या मैफलीची सुरुवात राग श्रीमधील मध्यलय झपतालातील ‌‘हरि के चरण कमल‌’ या बंदिशीने केली. अनवट रागातील ही बंदिश सहजतेने फुलवत नेत पाटणकर यांनी आपल्या गायकीवरील प्रभुत्व दर्शविले. गुरू अरविंद थत्ते यांनी याच रागात बांधलेली अनोखी सरगम सादर करून त्यांनी रसिकांची मने जिंकली. अंशुलप्रताप सिंग (तबला), माधव लिमये (संवादिनी) तर वेदवती परांजपे, आदिती नगरकर, रुची शिरसे यांनी स्वरसाथ केली.
दुसरे पुष्प गुंफताना डॉ. पुष्कर लेले यांनी कल्याण रागातील पंडित कुमार गंधर्व रचित शिवाचा जपस्वरूप असणारी ‌‘शिव शिव कल्याण करे‌’ ही बंदिश ताकदीने सादर केली. पंडित कुमार गंधर्व यांच्या निर्गुणी भजन गायकीचे अनोखे दर्शन घडविताना डॉ. लेले यांनी ‌‘माया महा ठगनी हम जानी‌’ हे संत कबिर यांचे भजन अतिशय भावपूर्ण स्वरात सादर केले. गौतम टेंबेकर (तबला), माधव लिमये (संवादिनी) आणि रोहन पोळ यांनी स्वरसाथ केली.
पंडित कुमार गंधर्व यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित सत्यशील देशपांडे यांनी पंडित कुमार गंधर्व यांच्या सांगीतिक विचारांवर भाष्य करताना कुमारजींच्या नजरेतून विविध रागांचे चलन, रागरूप यांचे अनोखे दर्शन घडविले. कुमारजींना पारंपरिक संगीत अमान्य नव्हते तर कुमारजींचे वेगळेपण म्हणजे या संगीतात ते अजून काहीतरी नाविन्य शोधत परंपरेचे परिशीलन करीत असत, असे सांगून राग दरबारीची झलक तसेच केहन ऐकविली. पंडित बबनराव हळदणकर यांनी रचलेला ‌‘दिम दिम तन न दे रे ना‌’ हा तराणाही ऐकविला. जयपूर आणि ग्वाल्हेर घराण्याचे गायन वैशिष्ट्य दाखवून कुमारजींच्या मोरपंखी अलवार गायनाचे पदर उलगडले. प्रत्येक रागात अष्टांगाचे दर्शन घडविणे अपेक्षित नसते तर बंदिशीला पूरक अंग वापरणे महत्त्वाचे असते, ज्यातून गायन या हृदयीचे त्या हृदयीला भिडते असे सांगून नंद रागातील ‌‘ढुंढा बारी सैय्या‌’ या बंदिशीची झलक ऐकविली. कुमारजींचे गायनातील सखोल विचार ऐकून आणि पंडित सत्यशील देशपांडे यांच्या सादरीकरणातून नवकलाकारांना रागाकडे पाहण्याची अभ्यासक दृष्टी मिळाली.
कार्यक्रमाचे शेवटचे पुष्प ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना अरुधंती पटवर्धन आणि त्यांच्या शिष्यांनी गुंफले. त्यांनी सादरीकरणाची सुरुवात गणेशवंदनेने केली. हिंदुस्तानी संगीतावर आधारित रचना सादर करताना कालिमातेची स्तुती, ‌‘शिव शिव महादेव‌’ हे शिवध्रुपद ताकदीने सादर केले. कार्यक्रमाची सांगता पंडित कुमार गंधर्व यांनी अजरामर केलेल्या ‌‘गुरुजी मै तो एक निरंजन‌’ या निर्गुणी भजनावर नृत्याविष्कार सादर करून कलाकारांनी रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमास लेखाअधिकारी नरेंद्र तावडे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात माधुरी सहस्रबुद्धे, उज्ज्वल केसकर, ॲड. मिताली साळवेकर, सिद्धार्थ काक, सानिया पाटणकर, नितीन महाबळेश्वकर, पंडित सत्यशील देशपांडे, पुष्कर लेले आणि अरुंधती पटर्वधन यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. मान्यवर व कलाकारांचे स्वागत सानिया पाटणकर, नितीन महाबळेश्वरकर, संजय पायगुडे, क्रांतीशिला ठोंबरे यांनी केले.

अध्यापकांच्या भरती प्रकियेस मान्यता: नवीन कार्यपद्धतीचा होणार अवलंब

0

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची माहिती

अध्यापक निवड प्रक्रिया पारदर्शक,निःपक्ष राबविण्यासाठी गुणवत्ताधारित नवीन कार्यपद्धती जाहीर

मुंबई,दि. २७ : राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात येत आहे. निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता येण्यासाठी यापुढे राज्यात अध्यापक पदांची भरती प्रक्रियेसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले , मा.राज्यपाल तथा कुलपती यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील विद्यापीठांमध्ये सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या निवड प्रक्रियेसाठी गुणांकन पद्धती निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये शैक्षणिक क्रेडेन्शियल आणि त्यांची मुलाखतीमधील कामगिरी गृहीत धरण्यात येणार आहे. या दोन्ही बाबी एकत्रित करून अधिक पारदर्शक, निष्पक्ष निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि अध्यापनाला ८० टक्के गुण (वेटेज) तर मुलाखतीसाठी २०टक्के गुण (वेटेज) देण्यात येणार आहे. एकत्रित १०० गुणांपैकी किमान ५० टक्के गुण मिळवलेल्या उमेदवारांनाच अंतिम निवडीसाठी पात्र असतील.
अध्यापन क्षमता अथवा संशोधन प्राविण्य (aptitude) यांचे मुल्यमापन परिसंवाद (seminar) अथवा व्याख्यान प्रात्यक्षिक (lecture in a classroom situation) अथवा अध्यापन आणि संशोधन यामधील नवीनतम तंत्रज्ञान वापरण्याच्या क्षमतेवरील चर्चा या बाबी मुलाखतीच्या टप्प्यावर विचारात घेण्यात येतील. निवड समितीच्या बैठकांचे दृक-श्राव्य चित्रिकरण करण्यात येणार आहे. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दृक-श्राव्य चित्रिकरण,बैठकीला उपस्थित असलेल्या निवड समितीच्या सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीने सीलबंद करण्यात येईल.
मुलाखती पूर्ण होताच त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर करण्यात येईल. ही सर्व निवड प्रकिया सहायक प्राध्यापक पदासह सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या निवड प्रक्रियेसाठी लागू राहील. नवीन निवडप्रक्रियेच्या अधीन राहून विद्यापीठांमधील सध्या सुरू असलेली अध्यापकांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच भविष्यात होणाऱ्या विद्यापीठांमधील अध्यापकांच्या निवड प्रक्रियेकरिता याच कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात येणार आहे. यामुळे विद्यापीठांमध्ये पारदर्शक आणि जलद निवड प्रक्रिया राबविणे शक्य होणार आहे. या सुधारित कार्यपद्धतीमुळे गुणवत्ताधिष्ठित अध्यपकांची निवड होईल. तसेच उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

गृह विभागाचा कारभार घाशीराम कोतवालाच्या हातात-हर्षवर्धन सपकाळ

रायगड/ मुंबई, दि. २७ फेब्रुवारी
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, त्यांच्याबद्दल अपप्रचार करणाऱ्या विचारांची मंडळी आज केंद्र आणि राज्यात सत्तेत आहेत. शिवाजी महाराजांना छळले तो विचार आजही जिवंत आहे. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या मंडळींच्या मागे राजाश्रय आहे म्हणूनच महाराजांचा अवमान करणाऱ्यांना संरक्षण व पुरस्कार दिले जात आहेत ही अत्यंत खेदाची बाब असून शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या विचारांचा टकमक टोकावरून कडेलोट करु, असा संकल्प असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

काँग्रेस प्रदेशाध्क्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले आणि त्यानंतर महाडच्या चवदार तळ्याला भेट देऊन महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ अदिलशाही, निजामशाहीच नाहीतर भेदाभेद, अस्पृषता व असमाजवादी विचार घेऊन काम करणाऱ्यांच्या विरोधातही लढले. अदिलशाही, निजामशाही, औरंगजेब गेला पण जातीयवादाचा विचार मात्र गेला नाही तो आजही कायम आहे. एका अभिनेत्याने शिवाजी महाराजांचा अपमान केला पण त्याच्यावर कारवाई न करता त्याच्या घरासमोर पोलीस पहारा देत बसले आहेत. इतिहास तज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांनी फोनवरून धमकी दिली जाते व त्याचवेळी महाराजांच्याबद्दल अपशब्द वापरले जातात. शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सावरकरांना सरकार पुरस्कार देऊन सन्मानित करते हे दुर्दैवी आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

स्वातंत्र्य चळवळीतही केवळ सत्तेचे हस्तांतर नव्हे तर व्यवस्था परिवर्तनाचे स्वप्नही होते आणि स्वातंत्र्यानंतर देशाला दिलेल्या संविधानातही हिंदवी स्वराज्याची संकल्पना आहे.काँग्रेसची ध्येय धोरणही हिंदवी स्वराज्यावर आधारीत आहेत. महाराजांना अपेक्षित असणारे रयतेचे राज्य स्वराज्य स्थापन करण्याकरता काँग्रेस पक्ष बांधिल असल्याचे सांगताना ही प्रतिज्ञा करण्यासाठी रायगडावर आलो आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

पुण्यातील बलात्कार प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ म्हणाले की, महिलांवरील बलात्कार हे सरकारचे अपयश आहे. घाशीराम कोतवालाच्या हातात गृह विभागाचा कारभार आहे याचे हे द्योतक आहे. छत्रपतींनी पेशव्यांना गादीवर बसवले आणि पेशव्यांनी स्वराज्याची वाट लावली, आज तसेच होत आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

महाड येथे विंचू दंशावर संशोधन करून औषध शोधणारे प्रख्यात डॉक्टर पद्मश्री हिंमतराव बावस्कर यांच्या निवासस्थानी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सदिच्छा भेट दिली व बावस्कर कुटुंबियांशी संवाद साधला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमवेत प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व रायगड जिल्हा प्रभारी श्रीरंग बर्गे महिला काँग्रेसच्या ॲड. श्रद्धा ठाकूर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे,ज्येष्ठ नेते आर. सी. घरत, दिलीप पाडगावकर, यांच्यासह तालुका काँग्रेसचे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

परराष्ट्र व्यवहार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दलकोब्बी शोषाणी यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२५’

पुणे: इस्राईल आणि भारत यांच्यातील परस्पर संबंध अधिक सक्षम होण्यात, परराष्ट्र क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल इस्राईलचे भारतातील कॉन्सुल जनरल कोब्बी शोषानी यांना सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. पुण्यातील जेडब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये आयोजित एका शानदार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद व ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते शोषानी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष व सचिव सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, कार्यकारी विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, महाव्यवस्थापक रोहित संचेती, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक सागर चोरडिया आदी उपस्थित होते.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांना प्रेरक आणि विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्वांचा सन्मान करून त्यांच्या सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा असतो. आपल्यासारख्या महान व्यक्तींचे कार्य विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभासारखे असते. त्यातून विद्यार्थ्यांना त्यांची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यास प्रोत्साहन मिळते. समाजातील दिग्गजांच्या गौरवाचा हा सोहळा सूर्यदत परिवारासाठी अविस्मरणीय क्षण असतो. कोब्बी शोषानी यांनी परराष्ट्र क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या धोरणी आणि मुत्सद्दी कार्यामुळे भारत आणि इस्राईल या दोन्ही देशांतील परस्पर सबंध अधिक मजबूत होत आहेत.”

हा पुरस्कार स्वीकारताना आनंद होत असल्याचे सांगून कोब्बी शोषानी म्हणाले, “काटेकोर शिस्त आणि समर्पित वृत्ती ही इस्राईलची ओळख असून, त्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळतेय, याचा मला अभिमान वाटतो. मला भारताविषयी अतीव प्रेम आहे. वर्षागणिक या सुंदर अशा देशाची संस्कृती आणि येथील लोकांविषयी माझ्या मनात आदर, प्रेम व आस्था वाढत आहे. विद्यार्थ्यांना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सूर्यदत्त मोलाचे योगदान देत आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी संस्थेत राबविण्यात येत असलेले उपक्रम महत्वपूर्ण आहेत. ज्ञानाचा मार्ग सहकार्याचा असतो, आणि या ज्ञानमार्गात सहभागी होण्यास मी उत्सुक आहे, असे त्यांनी नमूद केले.

रझा मुराद यांनी कोब्बी शोषाणी यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. इस्रायल आणि भारत यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी त्यांचे अमूल्य योगदान आहे. अशा व्यक्तीला सन्मानित करताना मला उपस्थित राहता आल्याचा आनंद आहे. शोषाणी यांचा सन्मान म्हणजे दोन महान राष्ट्रांमधील दृढ संबंध साजरे करण्यासारखे आहे. २०१४ पासून सूर्यदत्त संस्थेशी संबंधित असल्याचा मला खूप अभिमान आहे, आणि मी या नात्याला अजूनही मोठा मान देतो आणि भविष्यात अनेक वर्षे या अद्भुत परंपरेचा भाग होण्याची मला इच्छा आहे, असे रझा मुराद यांनी नमूद केले.

सागर चोरडिया यांनी सांगितले, ‘माननीय कोब्बी शोषाणी यांचे इस्राईलचे कॉन्सुल जनरल म्हणून कार्य अत्यंत आदर्शवत आहे. त्यांची समर्पण आणि राजनैतिक कौशल्ये दीर्घकालिक प्रभाव निर्माण करणारी आहेत, आणि मला विश्वास आहे की हे पुरस्कार त्यांच्याशी संबंधित त्यांच्या प्रयत्नांचे योग्य मान्यता आहे. सर्वांना उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील होण्याची प्रेरणा देणाऱ्या अशा प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केल्याबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे अभिनंदन करतो.”

स्नेहल नवलखा यांनी शोषानी यांना सूर्यदत्त संस्थेमध्ये येण्याचे, तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे निमंत्रण दिले. शोषानी यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आपल्याला संस्थेत येऊन विद्यार्थ्यांशी बोलायला आणि माझे अनुभव शेअर करायला आवडेल, असे आश्वस्त केले.

दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी ठाकरेंची शिवसेना पुन्हा आक्रमक …..

पुणे- मराठी भाषेसाठी, मराठी पाट्यांसाठी महाराष्ट्रात अनेक आंदोलने झाली, तरी आजही पुण्यात टिळक रोड व इतर भागात अनेक दुकानदारांच्या नावाच्या पाट्या इंग्रजीत आहेत.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुणे शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने यावर आंदोलन करण्यात आले.
यावेळी दुकानदरांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देऊन पुढील पंधरा दिवसांत सर्व दुकानांच्या पाट्या मराठी भाषेतून करण्याचे तसेच सुप्रिम कोर्टाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन घेण्यात आले अन्यथा मराठी भाषेच्या सन्मानार्थ, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी शिवसेना पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असे कळविण्यात आले .

यावेळी आंदोलनाचे आयोजक शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी बोलताना सांगितले की शिवसेनेचा जन्मच मुळात मराठी भाषा ,मराठी माणूस यांच्यासाठी झाला आहे, त्यामुळे मराठीचा अवमान महाराष्ट्रात आम्ही कदापी सहन करणार नाही, दुकानांवर मराठी पाटी विषयात माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारने तसेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार पाट्या लागल्याच पाहिजे अन्यथा शिवसेना आक्रमकपणे सदर विषयात रस्त्यावर उतरेल..
यावेळी आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण, सूरज लोखंडे, राजेश मोरे, नितीन परदेशी, युवासेना शहर संघटक राम थरकुडे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, किशोर राजपूत, संदीप गायकवाड, पराग थोरात, मकरंद पेठकर, महिला आघाडीच्या निकिता मारतकर, वैशाली दारवटकर, अमृता पठारे, दिपाली राऊत, राणी इनामदार, शिवसेना पदाधिकारी संतोष भुतकर, राकेश बोराटे, दिलीप पोमण, अमर मारतकर, जुबेर तांबोळी, गणेश घोलप, रमेश लडकत, प्रतीक गालिंदे, नागेश खडके, संजय साळवी, नितीन दलभंजन, मुकेश दळवे, निलेश वाघमारे, गणेश वायाळ, जुबेर शेख, किरण शिंदे, जगदीश परदेशी, तुषार भोकरे, शिवाजी मेनकरी, अमित बाबर व शिवसैनिक उपस्थित होते.

प्रवेश मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांनी तात्काळ वसतिगृहामध्ये हजर होण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

पुणे, दि. 27 : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर २५० मुलांचे शासकीय वसतिगृह, युनिट क्र.३ विश्रांतवाडी येरवडा, पुणे हे वसतिगृह नुकतेच सुरू करण्यात आलेले आहे. गुणवत्तेनुसार १४० पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश देण्यात आलेला असून त्यांनी तात्काळ वसतिगृहात हजर व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या वसतिगृहात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी वर्तमान पत्रात जाहिरात देण्यात आलेली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने प्राप्त झालेले अर्ज व सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नव्हता अशा सर्व अर्जांची एकत्रित गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली असून गुणवत्तेनुसार वसतिगृह प्रवेश मंजूर केलेली विद्यार्थ्यांची यादी वसतिगृहाच्या गृहप्रमुखांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या वसतिगृहाची मंजूर विद्यार्थी संख्या २५० इतकी असून सद्यस्थितीत गुणवत्तेनुसार १४० पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे. उर्वरीत ११० जागा कनिष्ठ महाविद्यालय व बिगर व्यावसायिक विभागाच्या वर्गवारीनुसार प्रवेश अर्ज प्राप्त न झाल्याने रिक्त आहेत.

वसतिगृहाच्या गृहप्रमुखांकडून प्रवेश मंजूर झालेल्या १४० विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश घेण्याबाबत भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात आले आहे, अशीही माहिती सहायक आयुक्त, समाज कल्याण विशाल लोंढे यांनी दिली आहे.

क्षेत्र कोणतेही असो व्यवस्थापन महत्त्वाचे – सोनाली कुलकर्णी

उपक्रम यशस्वी होण्यासाठी लोक सहभाग आवश्यक – प्रदिप जांभळे पाटील

एस. बी. पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या ‘युवोत्सव – २०२५’चे उद्घाटन

पिंपरी, पुणे (दि. २७ फेब्रुवारी २०२५) तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असाल; पण यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापन हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपल्या कार्याचे व्यवस्थापन कसे केले पाहिजे; याची माहिती असली पाहिजे. जबाबदारीने व्यवस्थापन केले तर आपण आपल्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी होऊ शकतो, असे मत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित निगडी येथील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने आयोजित ‘युवोत्सव २०२५’ या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन गुरूवारी (दि.२७ फेब्रुवारी) सोनाली कुलकर्णी आणि पिंपरी चिंचवड मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आर. जे. अक्षय, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, एसबीपीएमच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर आदी उपस्थित होते. युवोत्सव स्पर्धेचे हे दहावे वर्ष असून यामध्ये फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, बॉक्स क्रिकेट या स्पर्धा होणार आहेत. युवोत्सव क्रीडा स्पर्धेमध्ये पुणे परिसरातील पदवी आणि पदव्युत्तर महाविद्यालयामधील संघ सहभागी झाले आहेत. विजयी संघांना आकर्षक बक्षिसे व रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत, असे डॉ. किर्ती धारवाडकर यांनी सांगितले.
शासकीय, सामाजिक, शैक्षणिक अथवा युवोत्सव सारखे उपक्रम लोक सहभागातूनच यशस्वी होतात. त्यांना मान्यता प्राप्त होते. हे युवोत्सव स्पर्धेच्या निमित्ताने दिसून येते. पिंपरी चिंचवड शहराला औद्योगिक नगरी बरोबरच सांस्कृतिक, क्रीडा नगरी अशीही ओळख निर्माण झाली आहे. महापालिकेने अनेक क्रीडांगणे विकसित केली आहेत. यामध्ये विविध क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रयत्न करत आहे, असे उपक्रम यशस्वी होण्यासाठी लोक सहभाग आवश्यक आहे असे प्रदिप जांभळे पाटील म्हणाले.
युवोत्सवाच्या माध्यमातून शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा गुणांना वाव देऊन भारताचे जबाबदार नागरिक घडविण्याचे कार्य पीसीईटी करीत आहे. युवोत्सवाचा समारोप शनिवारी (दि. १ मार्च) होणार असून मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण समारंभ होणार आहे, असे डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सहभागी संघ आणि खेळाडूंचे स्वागत करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेच्या आयोजनात डॉ. अनिषकुमार कारिया, डॉ. काजल माहेश्वरी, डॉ. अमरीश पद्मा यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी खेळाडू, विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार पायल झोरे, सुरज पाटील यांनी मानले.