Home Blog Page 437

वाहन चोरीचे एकुण १० गुन्हे: एका अल्पवयीन मुलासह तिघांना पकडले

पुणे- शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या दराेडा आणि वाहन चोरी प्रतिबंधक पथकाने तसेच फरासखाना पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी चोरट्यांकडून १४ दुचाकीसह एक सायकल जप्त केली असल्याची माहिती दिली.दि.२८/०२/२०२५ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ मधील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत गस्त करीत असताना, पोलीस अंमलदार अमित गद्रे व बाळु गायकवाड यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे त्यांनी इसम नामे १) डाड्या ऊर्फ रियाज शार्दुल्ला शेख, वय २१ वर्षे, रा.आमराई कोकाटे चाळ जवळ, पाषाण, पुणे २) अनिल लिंगया भंडारी, वय ३४ वर्षे, रा. सुतारवाडी, पाषाण, पुणे व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांचे कब्जात मिळुन आलेली दुचाकी ही चोरीची असल्याचे संशय आल्याने त्यांना ताब्यात घेवुन, त्यांचेकडे अधिक तपास केला असता, त्यांनी पुणे शहर व इतर कार्यक्षेत्रातुन दुचाकी वाहने विक्री करण्याचे उद्देशाने चोरी केलेली होती. नमुद आरोपी यांचेकडुन किंमत ५,६०,०००/-रु.च्या एकुण १० दुचाकी वाहने असा मुद्देमाल हस्तगत करुन

आरोपींनी मुंढवा, हडपसर, बाणेर, कोथरूड, पिंपरी-चिंचवडमधील सांगवी, शिरगाव परंदवाडी, तसेच पुणे ग्रामीण पोलीस दलातील राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे..ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे १ गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे पोलीस अंमलदार, अमित गद्रे, बाळु गायकवाड, अजित शिदे, प्रदीप राठोड, गणेश ढगे, इरफान पठाण, मनिषा पुकाळे, दत्तात्रय पवार, रविंद्र लोखंडे, महेश पाटील, साईकुमार कारके, श्रीकांत दगडे, नारायण बनकर यांनी केली आहे.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर.
वाहन चोरीचे एकुण १० गुन्हे खालील प्रमाणेउघडकीस आणलेले आहेत.
१) मुंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १३/२०२५ बी. एन. एस कलम ३०३ (२)
२) मुंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १५/२०२५ बी. एन. एस. सन कलम ३०३ (२)
३) सांगवी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ४१/२०२५ बी. एन. एस कलम ३०३ (२)
४) सांगवी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ५९/२०२५ बी. एन. एस कलम ३०३ (२)
५) हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. २२६/२०२५ बी. एन. एस कलम ३०३ (२)
६) बंडगार्डन पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. २४२/२०२४ बी. एन. एस कलम ३०३ (२)
७) कोथरुड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ५८/२०२५ बी. एन. एस कलम ३०३ (२)
८) बाणेर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. २०/२०२५ बी. एन. एस कलम ३०३ (२)
९) राजगड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण गुन्हा रजि. नं. २६/२०२५ बी.एन.एस कलम ३०३ (२)
१०) शिरगाव-परंदवडी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय, गुन्हा रजि. नं. १९६/२०२४ बी.एन.एस कलम ३०३(२)

पुण्यात तीन दिवसीय गांधी विचार साहित्य संमेलन:सुरेश द्वादशीवार, तुषार गांधी, मेधा पाटकरसह दिग्गजांची असणार उपस्थिती

पुणे-गांधी विचार साहित्य संमेलनाचे आयोजन दि. ७, ८ व ९ मार्च २०२५ या कालावधीत महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन शुक्रवार, दि. ७ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता होत असून संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ संपादक व विचारवंत सुरेश द्वादशीवार आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते व राज्यसभेचे खासदार मनोजकुमार झा यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन संपन्न होणार आहे, अशी माहिती संयोजक व गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी आणि स्वागताध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिली. याप्रसंगी विश्वस्त सचिव अन्वर राजन, युवक क्रांती दल राज्य संघटक अप्पा अनारसे आणि स्वागत समिती सदस्य प्रसन्न पाटील उपस्थित होते.

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख हे या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ संपादक व विचारवंत सुरेश द्वादशीवार, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत तुषार गांधी, ज्येष्ठ पर्यावरणवादी नेत्या मेधा पाटकर, ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ सोनम वांगचुक, ‘राजीव गांधी पुरस्कारा’चे मानकरी राम पुनियानी, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, नई तालीम संस्थेच्या संचालिका सुषमा शर्मा, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी प्राध्यापक आनंद कुमार, धम्मसंगिनी रमा, उद्योगपती अरुण फिरोदिया आदी विशेष मान्यवरांचा सहभाग हे विशेष आकर्षण असणार आहे. उद्घाटन सोहळा, परिसंवाद व चर्चासत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम अशा तीन दिवसांचे भरगच्च कार्यक्रम असणाऱ्या या गांधी विचार साहित्य संमेलनात पुस्तक प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले असून, महात्मा गांधींवर लिहिलेली हजारो पुस्तके येथे विक्रीसाठी उपलब्ध असतील.

या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रथम सर्वधर्म प्रार्थना संपन्न होईल. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ संपादक व विचारवंत सुरेश द्वादशीवार या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवतील. राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते व राज्यसभेचे खासदार मनोजकुमार झा यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न होईल. यानंतर रात्री ८ वाजता ‘भारतीय संविधान का संगीतमय सफर’ हा संविधानिक मूल्यांचा उद्घोष करणाऱ्या हिंदी चित्रपट गीतांचा विशेष कार्यक्रम सादर होईल. याची संहिता लक्ष्मीकांत देशमुख यांची असून, प्रदीप निफाडकर, धनंजय पवार आणि साथीदार हा कार्यक्रम सादर करणार आहेत. एकूण आठ सत्रांत विविध परिसंवाद व चर्चा होणार आहेत.

सेवा आयोगाच्या पाठीशी शासन खंबीर पणे उभे- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अधिवक्ता कार्यशाळेचे आयोजन

पुणे दि. 1 मार्च – महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे गोसंवर्धन व गोसंरक्षणाचे कार्य उत्तम असुन गोसेवा आयोगामार्फत गोसंवर्धन व पशुंच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. या उपक्रमांसाठी शासनातर्फे सहकार्य करण्यात येईल. गोसेवा आयोगाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. असे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय अधिवक्ता कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी निवृत्त न्यायमुर्ती अंबादास जोशी, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. प्रविण देवरे, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल अध्यक्ष पारिजात पांडे, आयोगाचे अशासकीय सदस्य सनात गुप्ता, डॉ. नितीन मार्कंडेय, उध्दव नेरकर, संजय भोसले, सुनिल सुर्यवंशी, आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीमती मुंडे पुढे म्हणाल्या, देशामध्ये गायींच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी सर्वात जास्त निधी महाराष्ट्रात खर्च केला जातो. गोसेवेतून गायी वाचविण्याबरोबरच गोवंशसुध्दा वाचविला पाहिजे. गाय आपल्या देशात केवळ एक पाळीव प्राणी नाही तर ती आपल्या संस्कृतीचा, धार्मिकतेचा आणि जीवनशैलीचा एक महत्वाचा भाग आहे.

हिंदु धर्मात गायीला माता म्हणून मान्यता दिली आहे. हिंदू धर्मात गायीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. गायीचा सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. प्राण्यांविषयी संवेदनशिलता बाळगली पाहिजे. प्राण्यांची हिंसा टाळण्यासाठी प्रत्येक प्राण्याला देवाचे वाहन केले आहे. गायीच्या गोबरचा जैविक खत म्हणून वापर केला जातो. गायीच्या दुधापासून व गोबर पासून लाखो लोकांचे जीवनमान चालत असते. गोवंशाच्या हत्येमुळे ग्रामीण अर्थ व्यवस्थेला मोठा धोका बसतो त्याच बरोबर छोट्या शेतकऱ्यांचा आधारही कमी होतो. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होते. असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गोसेवा आयोगाचे अध्यक्षा शेखर मुंदडा म्हणाले, महाराष्ट्रात 1 हजार 67 गोशाळा आहेत. बऱ्याच गोशाळा नोंदणीकृत असून काही गोशाळांनी अजुन नोंदणी केलेली नाही. गोशाळांनी नोंदणी करणे अनिवार्य असून, गोवंश गोशाळेत न जाता तो शेतकऱ्यांनी सांभाळला पाहिजे, गोशाळा स्वावलंबित झाल्या पाहिजेत. यासाठी आम्ही काम करित आहोत. पशुसंवर्धन खात्याने सर्व प्राण्यांचे टॅगींग केले असून याचा फायदा आम्हाला काम करतांना होत आहे. आयोगाची स्वतंत्र गोरक्षक समिती स्थापन करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. आयोगातर्फे सुरु असलेल्या कामाकाजाची माहिती देऊन त्यांनी कार्यशाळेचा उद्देश विषद केला.

कार्यक्रमात पशुसंवर्धन विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या 1962 महापशुधन संजीवणी तात्काळ प्रतिसाद केंद्राचे उद्घाटन पशुसंवर्धन मंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर सुपर स्पेशालिटी व्हेटर्नरी हॉस्पिटलच्या नवीन इमारतीची पाहणी करुन प्रयोगशाळेस भेट दिली.

या कार्यशाळेत राज्यातील गोवंश हत्याबंदी कायद्याचे केसेस लढविणारे सुमारे 100 अनुभवी वकील, पशुसंवर्धन विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

अडचणींना सामोरे जात तरुणांना विविध उद्योग करता येणे गरजेचे-पद्मश्री अ‍ॅड. उज्ज्वल निकम

मराठा आंत्रप्रिन्युअर्स असोसिएशन तर्फे ‘एमईए एक्झिबिशन २०२५’ चे उद्घाटन
पुणे : मराठयांना दूरदृष्टी नाही, अशी काही लोकांनी समजूत करुन दिली आहे. मात्र, मराठा आंत्रप्रिन्युअर्स असोसिएशनने अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. उद्योग करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्याला तोंड देत तरुणांना विविध उद्योग करता येणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला एकत्र करण्याची शिकवण दिली, ती आपण पुढे अंमलात आणूया, असे मत पद्मश्री अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

व्यावसायिकांमध्ये उद्योजकता व कल्पकता यांचा विकास व्हावा, या उद्देशाने मराठा आंत्रप्रिन्युअर्स असोसिएशन तर्फे ‘एमईए एक्झिबिशन २०२५’ चे आयोजन महालक्ष्मी लॉन्स, डीपी रस्ता, कर्वेनगर येथे करण्यात आले. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले, सारथी चे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकर, असोसिएशनचे अध्यक्ष अरुण निम्हण, सचिव राजेश कुराडे, उपाध्यक्ष नितीन भोसले, कमिटी मेंबर सायली काळे, महेश घोरपडे, अभिजित जाधव, सागर तुपे, तेजस चरवड, संतोष मते, विक्रम गायकवाड, किशोर जगताप, भारती मुरकुटे, सई बहीरट आदी उपस्थित होते.

राजेंद्र भोसले म्हणाले, मराठी माणूस मागे का पडतो? याची अनेक पुस्तके वाचली आहेत. इतरांचे अनुकरण आणि लांबवरचा प्रवास हे आपण करीत नाही. या परिस्थितीत आता बदल होत असून मराठी तरुण उद्योजक आता देशभर पहायला मिळतात. अतिराजकारणामुळे देखील मराठी माणूस मागे रहात असल्याचे दिसून येते. मात्र, मराठा आंत्रप्रिन्युअर्स असोसिएशनने आयोजित केलेल्या प्रदर्शनांमुळे उद्योजक एकत्र येत सुसंवाद साधत असल्याचे चित्र आशादायी आहे.

अरुण निम्हण म्हणाले, बांधकाम, वित्त, कंपनी सेक्रेटरी, डॉक्टर्स, हॉस्पिटॅलिटी, इंडस्ट्रियल, आॅटोमोबाईल, एफएमसीजी, अ‍ॅर्व्हटायझिंग, ऊर्जा, सौंदर्य, फॅशन, गुंतवणूक, आयटी, हॉटेल इंडस्ट्री, हेल्थकेअर, फायनान्स यांसह गृहसजावटीपासून प्रवासापर्यंत आणि सौंदयार्पासून वित्तव्यवस्थेपर्यंत सर्व क्षेत्रातील सेवा व उत्पादने एकाच छताखाली पुणेकरांना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात उद्योजक यामध्ये सहभागी झाले आहेत.

नवीन व्यवसायाच्या संधी, उत्पादने व सेवांचे स्टार्टअप्स, व्यवसायवृद्धीचे नवे पर्याय, दर्जेदार उत्पादनांची खरेदी व माहिती अशी अनेक उद्दिष्टे येथे साध्य होत आहे. रविवार, दिनांक २ मार्च पर्यंत दिवसभर सुरु असलेले हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिका-यांच्या नियुक्त्या जाहीर

विधानसभा उप नेते पदी आ. अमिन पटेल, मुख्य प्रतोदपदी आ. अमित देशमुख तर सचिवपदी आ. डॉ. विश्वजित कदम.

विधानपरिषदेत गट नेतेपदी आ. सतेज पाटील, मुख्य प्रतोदपदी आ. अभिजीत वंजारी व प्रतोदपदी आ. राजेश राठोड यांची नियुक्ती.

मुंबई, दि. १ मार्च २००२५
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
विधानसभेताल काँग्रेसच्या उपनेतेपदी आ. अमीन पटेल यांची, मुख्य प्रतोदपदी माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची, सचिव पदी आ. डॉ. विश्वजीत कदम यांची आणि प्रतोदपदी शिरीषकुमार नाईक व संजय मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विधानपरिषदेत गटनेतेपदी आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, मुख्य प्रतोदपदी आ. अभिजीत वंजारी आणि प्रतोदपदी राजेश राठोड यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.
“विधिमंडळात काँग्रेस पक्षाच्या आमदारांची संख्या कमी झाली असली तरी उत्साह व ऊर्जा कायम असून जनतेच्या हिताचे प्रश्न सभागृहात मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करेल. सत्ताधारी पक्षाला जाब विचारण्यासाठी पक्षाचे नवे शिलेदार महत्वाची भूमिका बजावतील” असे सांगून प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

भोर येथील विक्रम दादासाहेब गायकवाड या तरुणाच्या हत्येची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडून गंभीर दखल – आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम

पुणे दि. १: भोर तालुक्यातील उत्रोली येथील विक्रम दादासाहेब गायकवाड या अनुसूचित जातीमधील उच्चशिक्षित तरुणाची झालेली निर्घृण हत्या ही अत्यंत निंदनीय व मनाला क्लेश देणारी निघृण घटना असून महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेतली असल्याचे आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले. शांतता सलोखा टिकवणे ही शासन, प्रशासन व संपूर्ण जनतेची देखील जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

बारामती येथे माध्यम प्रतिनिधींशी शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) संवाद साधताना ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, विक्रम गायकवाड या तरुणाची दि. ८ फेब्रुवारी रोजी हत्या झाल्याची घटना घडली. त्या अनुषंगाने भोर येथे त्याचे आई, बहीण, भाऊ, काका आणि परिसरातील लोकांशी भेट घेऊन चर्चा केली. तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त गणेश बिरादर, भोर प्रांताधिकारी विकास खरात, जिल्ह्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे आणि तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक तानाजी बर्डे यांच्यासोबत बैठक घेऊन या प्रकरणाबाबत चर्चा केली.

विक्रम याच्या परिवारावर झालेला अन्याय आयोग खपवून घेणार नाही असे सांगून त्यांनी पुढे सांगितले, या प्रकरणात विक्रमच्या परिवाराने संपूर्ण पोलीस तपासावर शंका व्यक्त केली आहे. विक्रमचा नोंदणीकृत पद्धतीने विवाह झाला होता त्या मुलीच्या संपूर्ण परिवारावर विक्रमच्या कुटुंबीयांचा आक्षेप आहे. या हत्येच्या अनुषंगाने अनुज उर्फ बाबू मल्हारी चव्हाण (वय २४ वर्षे) हा आरोपी स्वतः पोलीसांसमोर हजर झाला असून पोलिसांनी त्याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले असून हाच आरोपी असल्याच्या प्राथमिक निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचलेले आहेत. तथापि, हा ‘ऑनर किलिंग’चा प्रकार असावा अशा पद्धतीची शंका घेत मृतक विक्रम गायकवाड यांच्या कुटुंबीयांनी मुलीच्या परिवारावर आक्षेप घेतला आहे.

या प्रकरणाच्या अनुषंगाने तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भरत नारायण शिवतारे यांच्याशी देखील चर्चा केली असून त्यांनी ४ ते ८ फेब्रुवारीपर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम कथन केला. यामध्ये तपासामध्ये अक्षम्य कुचराई झाल्याचे आपले निरीक्षण असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणाचा तपास स्वतः पोलीस अधीक्षक यांनी धुरा सांभाळत करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ७ तारखेपर्यंत या प्रकरणाचा सखोल तपास करून तपशीलवार अहवाल आयोगासमोर सादर करावा, भोर उपविभागीय अधिकारी, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त तसेच जिल्ह्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनीही आपला स्वतंत्र अहवाल सादर करावा असेही निर्देश दिल्याचे ॲड. मेश्राम यांनी सांगितले.

सामाजिक न्याय विभागाला नियमानुसार ४ लाख १२ हजार २५० रुपयांची रक्कम विक्रमच्या आईच्या खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आले असून चार्जशीट दाखल केल्यानंतर पुढची उर्वरित तेव्हढीच रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. तसेच परिवारातील एका व्यक्तीस राज्य शासनाच्यावतीने नोकरी देण्यात येईल. त्या अनुषंगानेही निर्देश आजच्या आढावा बैठकीत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तलावांच्या सुशोभीकरणासाठी दोन कोटी रुपये खर्च करणार

तलावालगत असलेल्या उद्यानामध्ये लाकडाची बाके बसविणार
पाण्याचे कारंजे उभारणार
भिंतींचे रंगकाम केले जाणार
पदपथ तयार केले जाणार
तलावाला सीमाभिंत बांधणार
तलावात कचरा टाकण्यास बंदी

पुणे : पुणे शहरातील कात्रज, पाषाण, पेशवे तसेच मॉडेल कॉलनी येथील तलावांचे सुशोभीकरण केले जाणार असून यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.

पाषाण तलावासाठी ४१ लाख ८८ हजार रुपये, कात्रज तलावासाठी ४१ लाख ८८ हजार रुपये आणि मॉडेल कॉलनी तलावासाठी ४९ लाख ४२ हजार लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच, पेशवे तलावासाठी ४९ लाख रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. त्याला मान्यता देण्याचे प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीसमोर सादर करण्यात आले होते. त्याला स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.या प्रकल्पात तलावाच्या परिसरात झाडे लावणे, काँक्रीटचे रस्ते तयार करणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि तलावाभोवती जॉगिंग ट्रॅक बांधणे असे प्रस्तावित आहे. तलावांजवळ कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ही कामे केली जाणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या निविदांना मान्यता देण्यात आली.महापालिकेच्या वतीने दर वर्षी शहरातील जलपर्णी काढण्यासाठी खर्च केला जातो. तसेच, तलावांच्या स्वच्छतेसाठीदेखील खर्च होतो. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत महापालिकेला दोन कोटी रुपयांचा निधी तलावांच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेला मिळाला होता. त्यामधून शहरातील चार तलावांच्या सुशोभीकरणाचे काम केले जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाने याच्या निविदा काढल्या होत्या.

ड्रेनेजमुळे पाणी दूषित होत असल्याने, तलाव स्वच्छ करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. २०१७ मध्ये, महापालिकेने कात्रज तलावात येणाऱ्या प्रक्रिया न केलेल्या पाण्यासाठी ड्रेनेज यंत्रणा तयार केली. शिवाय, महापालिकेकडून सध्या दररोज दोन दशलक्ष लिटर क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधला जात आहे. पुणे शहर राहण्यासाठी सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हवेची गुणवत्ता ढासळत असताना या प्रकल्पांमुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होणार आहे, असे या प्रस्तावांमध्ये म्हटले आहे.

वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर हे पुनवडी ते पुण्यनगरी या समृद्ध प्रवासाचे साक्षीदार-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे: श्री वृद्धेश्वर सिद्वेश्वर मंदिर हे पुणेकरांचे श्रद्धास्थान असलेले देवस्थान आहे. राजमाता जिजाऊंनी बालशिवबा यांना सोबत घेऊन सोन्याचा नांगर फिरवून पुण्याची स्थापना केली. त्यावेळचे पुनवडी ते आताचे पुणे या समृद्ध प्रवासाचे साक्षीदार हे श्री  वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.

शिवाजीनगर मधील श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे मंदिर परिसरातील दुमजली अभ्यासिका बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले, माजी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत बहिरट पाटील, सचिव सुधीर दुर्गे, खजिनदार शशिकांत भोसले, विश्वस्त महेश दुर्गे, संजय सातपुते आदी उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी महादेवाचे दर्शन देखील घेतले.

अजित पवार म्हणाले, वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिराला ऐतिहासिक व पौराणिक महत्व असून शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. धार्मिक कार्यासोबत सामाजिक सेवेचे सातत्य या ट्रस्टने कायम ठेवले आहे. पुणे हे जागतिक पटलावर महत्वाचे शहर म्हणून ओळखले जावे, असे काम करूया. पुरातन वास्तूंशी आपण भावनिकपणे जोडले गेले आहोत. त्यामुळे त्या पुढच्या पिढीपर्यंत टाकाव्या हा प्रयत्न करायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

हनुमंत बहिरट पाटील म्हणाले, विश्वस्त मंडळाने मंदिराच्या परिसराचा विकास करण्यावर भर दिला आहे. समाजातील अनेक व्यक्तींना एकत्र आणून देवस्थानचे विकास करण्याचे उद्दिष्ट भविष्यातही साध्य करण्यात येणार आहे. त्यातील एक भाग म्हणून अभ्यासिका उभारण्यात येत असून पुढील वर्षभरात अभ्यासिकेच्या उभारणीचे काम पूर्ण होणार आहे. पुरातनपणा जपत नवीन सुद्धा देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

आज समाजाला शुद्ध प्रबोधनाची गरज:प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस

प्राचार्य रमणलाल शहा लिखित ‘छत्रपती शिवाजी महाराज एक युग प्रवर्तक सेनानी’ या ग्रंथाचे प्रकाशन

पुणे : जातीच्या जाणीवेने लिहिलेला इतिहास बाधित होतो. जातीयवाद समर्थनीय नाही. जितका ब्राह्मणांमध्ये जातिवाद आहे तितकाच मराठा आणि इतर जातीत देखील जातीयवाद पहायला मिळतो. त्यामुळे इतिहास अभ्यासून विवेकाने शिकवावा लागतो. आज संस्कृती बिघडली आहे. राजकारण रसातळाला गेले आहे. आजच्या काळात समाजाला शुद्ध प्रबोधनाची गरज आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

प्राचार्य रमणलाल शहा लिखित छत्रपती शिवाजी महाराज एक युग प्रवर्तक सेनानी या ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झाले. दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, अर्थतज्ञ अभय टिळक, लेखक प्राचार्य रमणलाल शहा, उत्कर्ष प्रकाशनचे सुधाकर जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाहक सुनिताराजे पवार, कार्यवाह शिरीष चिटणीस यावेळी उपस्थित होते.

प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ब्राह्मण किंवा अभिजनांनी इतिहास चुकीचा लिहिला असे नाही. बहुजनांनी देखील चुकीचा इतिहास लिहिलेला आहे. अभिजन, बहुजन हा वेडेपणा आहे. गुण आणि दोष दोन्हीकडे आहेत. सर्व देशातील महापुरुष, सर्व धर्मातील संत, सर्व देशातील ज्ञान विज्ञान अध्यात्म या सर्वांच्या बेरजेवरच मानवधर्माचे भले होणार आहे. विष पेरणीच्या कालखंडात दुभंग वातावरणात रमणलाल शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरील पुस्तक लिहून आदर्श निर्माण केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

स्वारगेट येथे तरुणीवर बसमध्ये अत्याचार झाला. अशा घटना घडत असतील तर हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कसा? छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे का ? असा विचार करायला हवा. राजकारणांचे रयतेवर प्रेम नाही. राजकारण्यांवर रयतेचे प्रेम नाही तरीही लोकशाही चालू आहे याला लोकशाही म्हणायची का? असा प्रश्न श्रीपाल सबनीस उपस्थित केला.

डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, समाजाचे चारित्र्य घडविण्यासाठी पुस्तके आवश्यक आहेत. शिवाजी महाराज हे समाजासाठी दीपस्तंभासारखे आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील पुस्तके सातत्याने यायला हवीत. लोक पुस्तके वाचतात आणि त्याचा फायदाही समाजाला होतो.  प्रा. शहा यांना लेखन करण्याकरिता घरामध्ये पोषक वातावरण करावे, त्यामुळे त्यांना आगामी काळात साहित्य निर्मिती करता येईल, असेही त्यांनी सांगितले. 

रमणलाल शहा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्राध्यापक आणि शिक्षक यांना तो आधी समजावून देण्याचा प्रयत्न मी आयुष्याच्या शेवटच्या काळापर्यंत करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा या शब्दाला ओळख दिली. खेडूत तरुणांमधून त्यांनी मावळे उभे केले. ते चारित्र्यवान निष्कलंक राजे होते, असेही त्यांनी सांगितले. सुनीता राजे पवार, सुधाकर जोशी, अभय टिळक यांनी मनोगत  व्यक्त केले. सुजित शेख यांनी सूत्रसंचालन केले. नेहा शहा – दावडा यांनी आभार मानले. 

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विशेष तपासणी मोहिमेचा शुभारंभ

पुणे-राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विशेष तपासणी मोहिमेचा शुभारंभ व राज्यस्तरीय मेळाव्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते औंध येथे करण्यात आले. शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे (ऑनलाईन), सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते.प्रत्येक बालकाचे आरोग्य व उज्ज्वल भविष्याची जबाबदारी शासन पूर्ण निष्ठेने पार पाडत आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांना सशक्त व निरोगी जीवनाची हमी देण्याचे कार्य हे या मोहिमेतून सर्वांनी मिळून यशस्वी करुया,असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत राज्यातील ० ते १८ वर्षापर्यंतची बालके, किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगीण आरोग्यतपासणी करण्यात येणार आहे. जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेले पोस्टर,बोधचिन्ह, ॲनेमियामुक्त भारत मोहीम पोस्टर्स व फ्लिप बुकचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.‘निरोगी बालपण आणि सुरक्षित भविष्य’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत विशेष तपासणी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील ० ते १८ वर्षापर्यंतची बालकांची आरोग्य विषयक तपासणी करण्यात येणार आहे. बालकांमधील आजाराचे वेळेत निदान करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येणार असून त्यांना आगामी काळात निरोगी व सुरक्षित आरोग्य जगता येणार आहे. त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक तसेच आरोग्य विभागाच्या पथकांनी मिळून काटेकोरपणे नियोजन करावे. अतिशय नीटनिटके, पारदर्शक आणि लोकांप्रती उपयुक्त अशाप्रकाची कामे करुन ही मोहीम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी प्रयत्न करावे, यामाध्यमातून आगामी काळात आरोग्यसंपन्न पिढी निर्माण करण्याचे काम करुया, असेही सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विशेष तपासणी मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी पुणे महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, शहरी आरोग्य सेवा संचालक डॉ. स्वप्नील लाळे, अतिरिक्त संचालक डॉ. बबिता कमलापूरकर आदी उपस्थित होते.

भारतातील विद्यार्थ्यांसाठी असलेली सर्वात मोठी रोबोटिक्स स्पर्धा; ६० संघांचा सहभाग

पुणे : शाळा आणि ज्युनियर कॉलेज विद्यार्थ्यांसाठी आयोजित भारतातील सर्वात मोठी रोबोटिक्स स्पर्धा ‘फर्स्ट टेक चॅलेंज इंडिया चॅम्पियनशिप २०२४-२५’ चे उद्घाटन आज विश्‍वकर्मा विद्यापीठच्या वतीने श्री शिव छत्रपती क्रीडांगण, बॉक्सिंग स्टेडियम, म्हाळुंगे, पुणे येथे अत्यंत उत्साहात पार पडले. या ऐतिहासिक स्पर्धेत देशभरातून ६० संघ आणि कझाकस्तान, श्रीलंका, युएई येथून ६ आंतरराष्ट्रीय संघ सहभागी झाले आहेत.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विश्‍वकर्मा विद्यापीठचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ जाबडे, पद्मश्री प्रमोद कळे (पूर्व डायरेक्टर, इस्रो), Circanaचे विश्वनाथ शास्त्री आणि प्रगती चौहान, RTXचे अमित सावर्कर, बजाज ऑटोचे विकस साव्हनी, जॉन डिअरचे महेश मसूरकर, TMFचे सजीत चाकिंगल यांच्यासह विविध शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

डॉ. सिद्धार्थ जाबडे यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले, “फर्स्ट टेक चॅलेंज इंडिया चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणारे विद्यार्थी केवळ रोबोटिक्सच नाही, तर शालेय जीवनातही उत्कृष्टता साधतात. ही स्पर्धा त्यांना आत्मविश्वास, तांत्रिक ज्ञान आणि जीवन कौशल्ये मिळविण्याची संधी देतो. यावर्षीपासून विश्‍वकर्मा विद्यापीठ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देण्याचा निर्णय घेतला आहे.”

Circanaचे विश्वनाथ शास्त्री म्हणाले, “तंत्रज्ञान, डेटा आणि अ‍ॅनालिटिक्समधील जागतिक नेत्याच्या रूपात, Circana ही स्पर्धा पुढे नेण्यासाठी तत्पर आहे. या स्पर्धेने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव दिला आहे आणि आम्ही भविष्यातील तंत्रज्ञान विशेषज्ञांना गती देण्यासाठी तसेच सहकार्य, नवकल्पना आणि शाश्वत उपायांचा विचार वाढवण्यासाठी यामध्ये सहभागी होऊ इच्छितो.”

या वर्षीच्या स्पर्धेची थीम ‘Dive’ Powered by Qualcomm असून, खेळाचे आव्हान ‘Into the Deep’ Powered by RTX आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या STEM (साइन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनियरिंग आणि मॅथमॅटिक्स) कौशल्यांचा वापर करून समुद्राच्या गाभ्यातील जीवन अन्वेषण करण्यासाठी अत्याधुनिक रोबोट तयार केले आहेत.

स्पर्धेतील प्रत्येक सामना २ मिनिट ३० सेकंदांचा असतो, आणि संघ संलग्नतेच्या प्रारूपावर आधारित असतो. उच्च-प्रदर्शन करणारे संघ पात्रता सामन्यानंतर एकमेकांचे संयोजन करणारे संघ निवडतात आणि पुढे एलिमिनेशन राऊंडमध्ये उतरतात. अंतिम सामना २ मार्च २०२५ रोजी होईल, आणि विजेत्या संघाला ह्यूस्टन, USA येथील FIRST वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल, जी १५ ते १९ एप्रिल २०२५ दरम्यान होईल.

ही स्पर्धा विविध पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक खुला मंच बनली आहे. ग्रामीण भागातील शाळा, राज्यशासन चालवलेल्या शाळा, तसेच आंतरराष्ट्रीय शाळांमधून सहभागी झालेल्या संघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, श्रवण अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळेतील संघ आणि मुंबईतील सिग्नल स्कूलचे संघ देखील या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यामुळे ही स्पर्धा समावेशक, प्रवेशयोग्य आणि सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणारी ठरली आहे.

प्रत्येक सहभागी संघाला आयोजकांकडून अत्याधुनिक रोबोटिक्स किट प्रदान करण्यात आले आहेत. स्पर्धेतील यांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्सचे ज्ञान आवश्यक असले तरी, प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांची किट योग्यरीत्या वापरण्याबाबत मार्गदर्शन केले आहे.

सामाजिकदृष्ट्या अधिक समावेशक होण्यासाठी, Qualcomm, John Deere, Dow, RTX, Bajaj Auto Ltd आणि InfinityX STEM Foundation या नफा न कमावणाऱ्या संस्थांनी २० रोबोटिक्स किट गरीब विद्यार्थ्यांसाठी प्रायोजित केली आहेत. यामुळे रोबोटिक्स क्षेत्रात अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग वाढण्यास मदत होईल.

फर्स्ट टेक चॅलेंज इंडिया चॅम्पियनशिप २०२४-२५ विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर साधण्याच्या दिशेने प्रोत्साहित करणारी एक महत्त्वपूर्ण पायरी आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये टीमवर्क, समस्या सोडवण्याची क्षमता आणि तांत्रिक कौशल्यांचे महत्त्व अधिक स्पष्टपणे समजते. तसेच, ही स्पर्धा विद्यार्थ्यांना नव्या विचारधारांची दारे उघडून देत असताना, त्यांना भविष्यातील तंत्रज्ञ, अभियंते आणि नवप्रवर्तनकर्ते बनण्याची प्रेरणा देत आहे.

एमपीएससी लिपिक आणि कर सहाय्यक भरतीसाठी निवड यादी जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा

निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सत्कार करत मानले आमदार हेमंत रासने यांचे आभार

पुणे (दि १): महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) जानेवारी 2023 मध्ये संयुक्त गट ब आणि गट क भरतीसाठी 8169 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. या भरती अंतर्गत लिपिक/टंकलेखक 7007 आणि कर सहाय्यक 468 पदे भरण्यात येणार होती. मात्र, सर्व परीक्षा पूर्ण होऊनही तब्बल ६ महिने निवड यादी जाहीर झाली नव्हती. भरती प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे ७००० विद्यार्थ्यांचे भविष्य संकटात सापडले होते. मॅट कोर्टात दाखल याचिकेमुळे भरती रखडल्याने उमेदवारांमध्ये चिंता निर्माण झाली होती. हा प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आमदार हेमंत रासने यांची भेट घेत आपली व्यथा मांडली होती.

विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन आमदार हेमंत रासने यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन सादर करून या प्रक्रियेस गती देण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आवश्यक निर्देश दिल्याने न्यायालयीन प्रक्रियेत गती आल्याने अखेर निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. आज निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी हेमंत रासने यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला तसेच राज्य सरकारचे आभार मानले.

आमदार हेमंत रासने यांची प्रतिक्रिया
“स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. परंतु संपूर्ण परीक्षा पार पडून देखील भरती रखडल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंता होती. हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवून त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. अखेर न्यायालयीन प्रक्रिया संपल्यानंतर निवड यादी जाहीर झाली आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळाला. यापुढेही विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी मी कायम आग्रही राहीन”.

निवड झालेला विद्यार्थी ज्ञानेश्वर गोरे यांची प्रतिक्रिया
“या निर्णयामुळे आम्हा विद्यार्थांना दिलासा मिळाला असून भरती प्रक्रियेतील अत्यंत विलंबामुळे आमची मेहनत वाया जाण्याची भीती होती, परंतु आमदार हेमंत रासने यांची तत्परता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तातडीचे आदेश देऊन न्याय मिळवण्यात मदत केल्याने आमचा विश्वास पुन्हा जागृत झाला आहे. भविष्यात अशा प्रकारच्या विलंबांमुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, याची काळजी सरकारने घ्यावी.

बहुजनांनो, छत्रपतींचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात एकत्रित व्हा!

बसप प्रदेश महासचिव डॉ.हुलगेश चलवादींचे आवाहन 
दिनांक १ मार्च २०२५, पुणे:-

बहुजनांचे कैवारी, शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानाचे प्रतिक, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तींना पळवून लावण्यासाठी एकत्रित येण्याची गरज आहे. छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढण्याची हिंमत कुणाची होतेच कशी? असा सवाल बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी शनिवारी (ता.१) उपस्थित केला.समाजविघातक विचारांना मंत्र्यांकडून मिळणारे ‘राजाश्रय’ याला कारणीभूत आहे का?, याचे विश्लेषण करण्याची वेळ आता राज्य सरकारवर आली आहे. महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा तथाकथित प्रशांत कोरटकर नावाचा इसम अद्याप ही फरार आहे, हे गृहखात्याचे अपयश आहे.राज्यातील बड्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेल्या संबंधांचा कोरटकरला फायदा होतोय का?, हे तपासण्याची आवश्यकता असल्याचे देखील डॉ.चलवादी म्हणाले.

वैचारिक लढा हा विचारांनी लढला जातो, धमक्या देवून, मारहाण करून नाही. प्रत्येकाला योग्य शब्दांमध्ये आपले मत समाजात ठेवण्याचा घटनादत्त अधिकार आहे. परंतु, कुणीही उठसूठ या अधिकाराचा दुरुपयोग करत सामाजिक वातावरण कलुषित करेल, असा त्याचा अर्थ होत नाही. महाराजांना आणि त्यांच्या बहुजन हितकारक विचारांना विरोध करणाऱ्या प्रवृत्ती, मानसिकतेवर वेळीच वेसण घालण्याची गरज आहे. बहुजन एकतेनेच हे शक्य आहे. एकत्रित येवून अशा ‘ राजकीय व्यावसायिक तथाकथितांना’ अद्दल घडवण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारने देखील अशांना तत्काळ बेड्या ठोकल्या पाहिजे, असे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.

राज्यात सांस्कृतिक राजधानीत गुंडगिरीचा ‘हैदोस’मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्टॅन्ड मध्ये युवतीवर बलात्कार, कोयत्या गॅंगची दहशत, चैन स्नेचिंग, असुरक्षित महिला, मारहाण, चोऱ्यामाऱ्या, हत्या अशा नित्यदिनक्रमाने राज्याची सांस्कृतिक राजधानी हादरली आहे. पुण्यात गुंडगिरीने अक्षरश: हैदोस मांडला आहे. गृह खाते मात्र गप्प आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या या शहराची ही स्थिती बदलण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष घालण्याचे आवाहन डॉ.चलवादी यांनी केले आहे. सुसंस्कृत शहर अशी ओळख असलेल्या शहराला प्रशासकीय दुर्लक्षाच्या झळा बसत आहेत. गावगुंडांसह असामाजिक तत्वांना वेळीच ओळखून पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकाव्यात आणि शहर गुन्हेगारीमुक्त करण्याच्या दिशेने पावले उचलण्याची गरज असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले

रिव्होल्ट मोटर्सने नव्या RV BLAZEXचे अनावरण केले

●        सशक्त 4KW मोटरसह वेग आणि टॉर्कमध्ये अधिक सुधारणा!

●        मोबाइल कनेक्टिव्हिटी आणि IoT-सक्षम स्मार्ट फीचर्स – जिओ-फेन्सिंग, ओव्हर-द-एअर (OTA) अपडेट्स आणि बरेच काही

●        रिमूव्हेबल बॅटरी – अधिक कार्यक्षमतेसाठी आणि सोयीसाठी काढता येण्याजोगी बॅटरी

●        LED हेडलाइट्स आणि टेललाइट्स – CBS ब्रेकिंग सीस्टमसह उत्तम सुरक्षा

●        6-इंच LCD क्लस्टर – 4G टेलीमॅटिक्स आणि इनबिल्ट GPS सह

●        बुकिंग आजपासून सुरू; वितरण मार्च 2025 च्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार

नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2025 : भारताच्या इलेक्ट्रिक दुचाकी बाजारातील आपले नेतृत्व अधिक बळकट करत, रिव्होल्ट मोटर्स, भारतातील क्रमांक 1 इलेक्ट्रिक मोटारसायकल ब्रँडने RV BLAZEX ही उच्च-कार्यक्षमता, स्मार्ट आणि किफायतशीर इलेक्ट्रिक मोटारसायकल ₹1,14,990 (एक्स-शोरूम, संपूर्ण भारत) किमतीत लॉन्च केली आहे.

आधुनिक प्रवाशांसाठी खास डिझाइन केलेली RV BLAZEX ही मोटारसायकल 4KW पीक पॉवर मोटर, 150 किमीची विस्तारित रेंज आणि स्मार्ट IoT कनेक्टिव्हिटी यांसह सुसज्ज आहे. हरियाणाच्या मानेसर येथील रिव्होल्टच्या अत्याधुनिक उत्पादन केंद्रात तयार करण्यात आलेली ही नवीन मोटारसायकल भारतातील EV क्रांतीत ब्रँडचे नेतृत्व आणखी मजबूत करते.

लॉन्चप्रसंगी रत्तनइंडिया एंटरप्रायझेस लिमिटेडच्या अध्यक्षा, श्रीमती अंजली रत्तन म्हणाल्या, “रिव्होल्ट मोटर्समध्ये आम्ही नवकल्पना आणि शाश्वततेसाठी वचनबद्ध आहोत. RV BLAZEX ही शहरी आणि ग्रामीण प्रवाशांसाठी किफायतशीर  उच्च-कार्यक्षमता असलेली इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्युशन आहे. प्रगत कनेक्टिव्हिटी, उत्कृष्ट रेंज आणि अत्याधुनिक डिझाइनसह, ही लॉन्चिंग सर्वांसाठी शाश्वत गतिशीलता सुलभ करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.”

RV BLAZEX आता स्टर्लिंग सिल्व्हर ब्लॅक आणि इक्लिप्स रेड ब्लॅक या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. ही मोटारसायकल स्टाईल आणि उपयुक्ततेचा परिपूर्ण संगम आहे. फ्रंट स्टोरेज बॉक्स आणि अंडर-सीट चार्जर कंपार्टमेंट यांसारखी वैशिष्ट्ये सोयीसाठी डिझाइन करण्यात आली असून, देखणेपणावर कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही.

RV BLAZEX हा 3.24 kWh लिथियम-आयन बॅटरीने (IP67 रेटेड) सुसज्ज असून, 85 kmph च्या टॉप स्पीडपर्यंत पोहोचतो. यामध्ये तीन रायडिंग मोड्स आणि रिव्हर्स मोड आहेत, जे सहज हाताळणीसाठी मदत करतात. सुरक्षितता आणि आराम सुनिश्चित करण्यासाठी – LED लायटिंग, CBS ब्रेकिंग, टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ट्विन शॉक अॅब्झॉर्बर्स दिले आहेत. 6-इंच LCD डिजिटल क्लस्टरमध्ये 4G टेलीमॅटिक्स, GPS आणि IoT जसे की, मोबाइल कनेक्टिव्हिटी, जिओ-फेन्सिंग व OTA अपडेट्स फिचर्स आहेत.

RV BLAZEX चे खास वैशिष्ट्य म्हणजे, त्याची ड्युअल चार्जिंग क्षमता – फास्ट आणि स्टँडर्ड दोन्ही प्रकारचे चार्जिंग पारंपरिक 3-पिन सॉकेटद्वारे सहज करता येते. फास्ट चार्जिंगद्वारे केवळ 80 मिनिटांत 80% चार्जिंग पूर्ण होते, तर स्टँडर्ड होम चार्जिंगने हेच 3 तास 30 मिनिटांत साध्य होते. बाह्य चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरची गरज नसल्याने, प्रत्येक रायडरसाठी हे रीचार्जिंग अधिक सोईस्कर आणि अडथळामुक्त ठरते.

RV BLAZEX ला 3 वर्षांची वॉरंटी (किंवा 45,000 किमी, यापैकी जे आधी येईल) मिळते. देशभरातील वाढत्या डिलरशिप नेटवर्कच्या समर्थनासह, Revolt उत्कृष्ट आफ्टर-सेल्स सेवा प्रदान करते, ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहन स्वीकारणे अधिक सुलभ आणि विश्वासार्ह ठरते.

RV BLAZEX ची बुकिंग आजपासून सुरू होत आहे www.revoltmotors.com/book आणि अधिकृत डिलरशिप्सवर उपलब्ध असेल. डिलिव्हरी मार्च 2025 च्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार!

उत्तराखंडमध्ये हिमस्खलनात 55 जण दबले(पहा फोटो, व्हिडीओ)


उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात बद्रीनाथपासून सुमारे ३ किमीवर माणा गावाजवळ शुक्रवारी सकाळी ६.५५ वाजता हिमस्खलन झाले. त्यामुळे बाॅर्डर रोड ऑर्गनायझेशनचे (बीआरओ) ५५ मजूर बर्फात अडकले. घटनेच्या वेळी ते कंटेनरमध्ये झोपलेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असलेल्या बचाव मोहिमेनंतर ३३ मजुरांना बाहेर काढण्यात यश मिळाले. परंतु उशिरा पुन्हा बर्फवृष्टीमुळे बचाव पथकाला मोहीम राबवणे कठीण झाले. काळोख झाल्याने शोधमोहीम जवळपास थांबवावी लागली. बहुतांश मजूर उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीरमधील असल्याचे सांगण्यात आले.

हिमस्खलनाच्या घटनेची माहिती मिळताच माणा येथील लष्करी तळावरील क्विक रिस्पॉन्स टीमचे १०० हून जास्त जवान बचावकार्यात सहभागी झाले. त्यात डॉक्टर, रुग्णवाहिकेतील कर्मचारी व बचाव दलाचे सदस्य आहेत. सकाळी साडेअकरा वाजता बचाव दलाने पाच कंटेनरचा शोध घेऊन १७ मजुरांना सुरक्षित बाहेर काढले. त्यापैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यावर लष्करी डॉक्टरांची निगराणी आहे. २२ मजुरांचा शोध सुरू आहे. लष्कराव्यतिरिक्त एनडीआरएफ, एसडीआरएफ, आयटीबीपीच्या पथकांना घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. परंतु दोन दिवसांपासून सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे जोशीमठापासून पुढील मार्ग बंद आहे. त्यामुळे बचाव पथकांना पुढे जाणे कठीण झाले आहे. चमोलीचे जिल्हाधिकारी संदीप तिवारी म्हणाले, संततधार पाऊस व बर्फवृष्टीमुळे हेलिकॉप्टर पाठवण्यात अडचण आहे. बचाव टीम पायी मार्गक्रमण करत आहे. एसडीआरएफ आयजी रिधिमा अग्रवाल म्हणाल्या, एक टीम जोशीमठापासून रवाना झाली. लामबगड मार्ग ठप्प आहे.

सकाळचे सहा वाजलेले हाेते. बाहेर बर्फ काेसळत हाेता. छावणीत आम्ही सगळे मजूर आपापल्या कंटेनरमध्ये हाेताे. अचानक वेगळ्या प्रकारचा गडगडाट ऐकू आला. जणू एखादी विशाल गाेष्टी काेसळत हाेती. आधी पाण्याचा प्रवाह वाटला. परंतु काही क्षणांतच आवाज वाढला आणि हृदयाचे ठाेके वाढले. कुणीही बाहेर जाण्याची िहंमत करत नव्हता. आवाज वाढत हाेता. हादरे आणि भयंकर आवाज. मग लाेक ते पाहण्यासाठी बाहेर पडले. लगेच पळा-पळा असे ओरडू लागले. मी दार उघडले आणि पाहिले ताे डाेंगराच्या उंचावरून बर्फाचे विशाल थर आमच्या दिशेने वाहत येत हाेते. सर्वत्र गाेंधळ उडाळा. मजूर जमेल तिकडे पळाले. परंतु ताेपर्यंत बर्फाचा प्रवाह आमच्यावर काेसळला हाेता. मला वाटले मी हवेत उसळी घेतली. नंतरचे काही आठवत नाही. पुढे जवानांनी बर्फातून काढले.

चमोलीमध्ये माणा खिंड आहे. हे ठिकाण माणा गावापासून ५० किमीवर पुढे आहे. माणा ते तिबेटपर्यंत थेट रस्ता आहे. हा मार्ग सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. या खिंडीजवळ तिबेटमधील थोलिंग हे गाव आहे. अनेक शतकांपासून उत्तराखंड व तिबेटमधील ही एक मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. दोन वर्षांपासून माणा गावातून माणा खिंडीपर्यंत महामार्ग रुंदीकरणाचे काम चालू आहे. त्यासाठी देशभरातून बीआरओचे मजूर येऊन काम करतात. ते दिवसभर महामार्ग रुंदीकरणाच्या कामानंतर रात्री माणातील प्रवेशद्वाराजवळील कंटेनरमध्ये विश्रांतीसाठी निघून जातात.