Home Blog Page 436

मंत्रालयावर धडकणार हजारोंच्या संख्येने भीमसैनिक आंबेडकरी व संविधान प्रेमी नागरिक

आझाद मैदान मुंबई येथे आंबेडकरी जनतेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन

परभणी – शहीद सोमनाथ सुर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडे यांना न्याय देण्यासाठी ३ मार्च सोमवार रोजी आझाद मैदान मुंबई येथे सकाळी ११ वाजता आंबेडकरी जनतेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यसरकारला जाब विचारण्यासाठी मंत्रालयावर हजारोंच्या संख्येने राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं भीमसैनिक आंबेडकरी समाज व संविधान प्रेमी नागरिक धडकणार असून सर्व आंबेडकरी संघटना सर्व पक्ष संविधान प्रेमी नागरिकाचा सहभाग राहणार आहे.
परभणीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची सोपान निवृत्ती पवार यांनी तोडफोड विटंबना केल्याप्रकरणी ठीकठिकाणी आंबेडकरी व संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलकांना पोलिसांनी प्रचंड मारहाण केली शेकडो निरपराध महिला, अल्पवयीन तरुण वयोवृध्द अटक करून त्यांच्या वर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी शांततेत निषेध आंदोलन करणारे आंबेडकरी लोकनेते विजय वाकोडे यांचा सुद्धा या आंदोलन दडपशाहीमुळे मानसिक धक्याने हृदय विकाराने मृत्यू झाला. या प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी व विविध मागण्याच्या अंमलबजावणीसाठी शांततामय आंदोलन करण्यात येणार आहे.
या राज्यव्यापी आंदोलनास संविधान प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. सिद्धार्थभाऊ हत्तीअंबिरे समस्त आंबेडकरी संघटना संविधान प्रेमी नागरिकाच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

प्रमुख मागण्या

१)परभणीतील संविधान शिल्प प्रतिकृती विटंबना करणाऱ्या सोपान पवार याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.

२)सोमनाथ सुर्यवंर्शीच्या मृत्यूची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीकडून न्यायालयीन चौकशी करा.

३)सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांवर हत्येचा ३०२ कलमान्वये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे

४)सोमनाथ सुर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडेंच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटी रुपये द्या. व कुटूंबातील १ व्यक्तीला शासकाच नाकरी द्यावी.

५)पोलीसांनी केलेल्या कोंबींग ऑपरेशन दरम्यान निरपराध भिमसैनिकांवरील दाखल केलेले गंभीर गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.

६)पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीत जखमी झालेल्या भीमसैनिकांना आर्थिक मदत द्यावी तसेच वत्सलाबाई मानवते या भगिनीला पोलसांनी गंभीर स्वरूपाची मारहाण केली मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करावा व त्यांना आर्थिक मदत द्यावी

७)सोमनाथच्या हत्येस कारणीभुत असलेल्या संबंधीत पोलीसांवर अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करावा.

८)अन्यायग्रस्त नागरीकांनी दोषी पोलिसांवर जिल्हा पोलीस अधीक्षक लय येथे कलेल्या फिर्यादी दाखल करून घ्याव्यात..!

९)राज्य शासनाने फास्टट्रॅक कोर्ट मध्ये हा खटला चालवावा.

कालप्रहराच्या सीमा ओलांडून दिग्गज कलाकारांचे भावपूर्ण सादरीकरण:डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन आयोजित रागप्रभा संगीतोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : राग यमन, हंसध्वनी, पूरिया, दरबारी, अभोगी, हेमंत, चंद्रकंस, नंद असे सायंकाळ ते उत्तररात्र या कालाधवीत गायले जाणारे राग आज सकाळच्या तीन प्रहरात ऐकायला मिळाले. कालप्रहराच्या सीमा ओलांडून दिग्गज कलाकारांनी भावपूर्णतेने केलेल्या सादरीकरणास रसिकांनी तन्मयतेने दिलेली साथ हे रागप्रभा संगीतोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले.
राग प्रहरांच्या कालबाह्य संकल्पनांपासून मुक्त ‌‘रागप्रभा संगीतोत्सवा‌’चे डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनतर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आज (दि. 2) आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या पहिल्या सत्रात पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित उदय भवाळकर, विदुषी पद्मा तळवलकर, पंडित राजा काळे, पंडित राम देशपांडे यांचे सादरीकरण झाले. संगीतोत्सवाचे उद्घाटन पंडित हरिप्रसाद चौरसिया. पंडित उदय भवाळकर, पंडित राजा काळे, पंडित योगेश समसी, पंडित विनायक तोरवी, पंडित राम देशपांडे, रघुवीर कुलकर्णी, अशोक वळसंगकर यांच्या उपस्थितीत झाले.
ज्येष्ठ बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी मैफलीची सुरुवात राग यमनने केली. त्यानंतर हंसध्वनी राग सादर केला. पंडित चौरसिया यांच्या सुमधूर वादनाने रसिकांना मोहित केले. पंडित योगेश समसी (तबला), मृणाल उपाध्याय (पखावज) यांनी साथसंगत केली तर अमर ओक, वैष्णवी जोशी, किरण बिश्त यांनी बासरी सहवादन केले.
त्यानंतर सुप्रसिद्ध ध्रुपद गायक पंडित उदय भवाळकर यांनी आपल्या धीरगंभीर आवाजात राग पूरिया ऐकविला. ‌‘शिव पार्वतीनाथ महाराज‌’ या पारंपरिक बंदिशीत आलाप, चौताल सादर केला. नंतर ‌‘भवानी माता काली‌’ ही रचना अतिशय प्रभावीपणे सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. पंडित भवाळकर यांना प्रताप आव्हाड (पखावज), मेघना सरदार, किरत सिंग यांनी सहगायन व तानपुरा साथ केली.
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका विदुषी पद्मा तळवलकर यांनी आपल्या मैफलीची सुरुवात उत्तर रात्री गायला जाणाऱ्या राग दरबारीने केली. ‌‘मुबारक बात‌’ ही बंदिश विलंबित तालात सादर करून त्याला जोडून ‌‘अनोखा लाडला‌’ ही द्रुत बंदिश ऐकविली. राग अभोगीमधील ‌‘सपनेमे आए श्याम‌’, ‌‘लाज रखो मोरी‌’ या पारंपरिक बंदिशींना रसिकांनी भरभरून दाद दिली. सुयोग कुंडलकर (संवादिनी), ऋषिकेश जगपात (तबला), अंकिता दामले, निर्मला थोरात, रसिका गरूड (तानपुरा, सहगायन) यांनी साथसंगत केली.
कार्यक्रमाच्या पुढील भागात सुप्रसिद्ध गायक पंडित राजा काळे यांनी राग हेमंत व चंद्रकंस सादर केला. ‌‘कहा मन लागों तेरो बालमवा‌’, ‌‘तोरे बिना बरन भयो‌’ या पारंपरिक बंदिशी प्रभावीपणे सादर केल्या. राग चंद्रकंसमधील कृष्णाला उद्देशून रचलेली ‌‘याहु जानी तम की करा‌’ ही रचना ऐकविली. अरविंदकुमार आझाद (तबला), चैतन्य कुंटे (संवादिनी), श्याम जोशी, अमृता काळे (सहगायन, तानपुरा) यांनी समर्पक साथ केली.
पहिल्या सत्राची सांगता ग्वाल्हेर-जयपूर घराण्याची तालीम मिळालेल्या पंडित डॉ. राम देशपांडे यांच्या गायनाने झाली. पंडित देशपांडे यांनी मैफलीची सुरुवात राग नंदने केली. या रागातील ‌‘सैंया तोसे सकल बन ढुंढू‌’ ही पारंपरिक बंदिश ऐकवून नंतर आग्रा घराण्यातील ‌‘रहे रैन पिया सौतन‌’ ही रचना रसिकांची दाद मिळवून गेली. नागपूर येथील तबला वादक सचिन बक्षी यांची रचलेला ‌‘तान ते रे दानी‌’ तराणा ऐकवून रसिकांना आनंदीत केले. प्रशांत पांडव (तबला), मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), गंधार देशपांडे, सिद्धार्थ गोडांबे, मयूर कोळेकर यांनी गायन साथ केली.
रागप्रहरांच्या कालबाह्य संकल्पनातून मुक्त संगीताविषयी डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केलेल्या भावना दृकश्राव्य माध्यमातून पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात आल्या.
कलाकारांचा सत्कार रास्तापेठ एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष संजीव महाजन, विश्वस्त भारत वेदपाठक, संवाद पुणेचे सुनील महाजन, गानवर्धनचे अध्यक्ष दयानंद घोटकर, तात्यासाहेब नातू फाऊंडेशनचे अध्यक्ष शारंग नातू यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन आनंद देशमुख यांनी केले.

डॉ. प्रभा अत्रे यांचे विचार काळाशी सुसंगत : पंडित हरिप्रसाद चौरसिया

राग-रागिणी सादरीकरणावर काळाचे बंधन नको, या प्रभा अत्रे यांच्या संकल्पनेविषयी मी सहमत आहे, असे सांगून पंडित हरिप्रसाद चौरसिया म्हणाले, डॉ. प्रभा अत्रे यांची संगीत क्षेत्रातील साधना मोठी असून त्यांनी याविषयीचा सखोल अभ्यास केला आहे. राग सादरीकरण आणि समय यांचा एकमेकांशी संबंध नको, आजच्या काळात या संकल्पनेला महत्त्व नाही हा त्यांचा विचार सुसंगत आहे.
पंडित योगेश समसी म्हणाले, कालबाह्य रागसंगीत या विषयी विचारमंथन होणे आवश्यक आहे. जोड रागाचे सादरीकरण, कर्नाटकी संगीत पाहता प्रभा अत्रे यांचे विचार सुसंगत वाटतात. संगीताची गुरुमुखी परंपरा जपण्यासाठी ही संकल्पना योग्य आहे.

पंडित राजा काळे म्हणाले, कालबाह्य राग सादरीकरणाची संकल्पना सादर करताना कलाकाराची मानसिकता महत्त्वाची असते. कलाकाराने रागामागील शास्त्र सादर न करता तो सिद्ध करून रसिकांसमोर आणणे आवश्यक आहे. रागाचे शास्त्र नव्हे तर धून प्रकट करणे हे कलाकाराचे मोठेपण आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला दोन राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई, दि. 2 मार्च 2025 – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या अंमलबजावणीत माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्याबद्दल महावितरणला शुक्रवारी गव्हर्नन्स नाऊ या प्रकाशनातर्फे नवी दिल्ली येथे आयोजित अकराव्या सार्वजनिक उद्योग पुरस्कार सोहळ्यात दोन राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी या यशाबद्दल कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. महावितरणला ‘एक्सलन्स इन प्रोसेस इनोव्हेशन’ आणि ‘बेस्ट यूज ऑफ ऑटोमेशन अँड डिजिटल टेक्नॉलॉजीज’ या दोन गटात सर्वोत्कृष्ट कामगिरीचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. महावितरणचे अधीक्षक अभियंता (नवीकरणीय ऊर्जा) निखिल मेश्राम यांनी कंपनीच्या वतीने हे पुरस्कार स्वीकारले.

अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांच्या मार्गदर्शनात राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये महावितरणची प्रमुख भूमिका आहे. विकेंद्रित स्वरुपात ठिकठिकाणी सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारून त्याद्वारे कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्याची ही योजना आहे. 

सौर ऊर्जानिर्मिती पार्क उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमिनीची आवश्यकता असते. महावितरणच्या वीजनिर्मिती केंद्रांपासून पाच व दहा किलोमीटर अंतरावरील जमिनी निश्चित करणे, सौर ऊर्जानिर्मीतीसाठी त्या भाड्याने मिळविणे, सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पांसाठी माहितीसाठा तयार करणे, प्रकल्पांची मंजुरी, योजनेची अंमलबजावणी करणे अशा सर्व कामांसाठी महावितरणने एक स्वतंत्र पोर्टल विकसित केले. त्यामुळे योजनेची अंमलबजावणी गतीने आणि पारदर्शक पद्धतीने करता आली. या कामगिरीमुळे महावितरणला ‘एक्सलन्स इन प्रोसेस इनोव्हेशन’, या गटात सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार मिळाला.

महावितरणने वीज उपकेंद्रांची देखभाल करण्यासाठी आणि अत्याधुनिक कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारणीमध्ये माहिती तंज्ञानाचा प्रभावी वापर केल्याबद्दल कंपनीला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. राज्यातील ३,५६३ वीज उपकेंद्रांच्या देखरेखीसाठी ‘सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टिम’ बसविण्यात येत आहे. यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठीच्या सौर ऊर्जीकरण होणाऱ्या २,७७३ उपकेंद्रांचा समावेश आहे. ‘सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टिम’मुळे प्रत्येक वीज केंद्रातील विविध उपकरणांची स्थिती, बिघाड, विजेची मागणी व पुरवठा इत्यादींची माहिती तातडीने उपलब्ध होऊन निर्णय प्रक्रिया गतीमान होत आहे. महावितरणने मुख्यालयात विकसित केलेल्या कमांड अँड कंट्रोल सेंटरमुळे राज्यभरातील वीज पुरवठ्यावर देखरेख ठेवणे आणि महत्त्वाच्या बाबीत तातडीने निर्णय करणे शक्य झाले आहे. या उपक्रमात आर्टिफिशिअल इंटिलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज व मशिन लर्निंग या अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

मानसिक सुदृढतेसाठी खेळांची आवड जोपासावी – हर्षवर्धन पाटील

‘युवोत्सव २०२५’ मध्ये पीसीसीओईआर, गरवारे, मॉडर्न महाविद्यालयांचा विजय

पिंपरी, पुणे (दि. ०२ मार्च २०२५) – जग झपाट्याने बदलत असून सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. विद्यार्थी दशेत शिक्षणाला महत्त्व आहे. परंतु अभ्यासाचे दडपण असेल तर त्याचा शरीरावर परिणाम होतो. मानसिक सुदृढतेसाठी शिक्षणाबरोबरच खेळांची आवड जोपासली पाहिजे. तरच तंदुरुस्त, खंबीर समाज निर्माण होईल. पालकांनीही याकडे जागरूकपणे पाहण्याची आवश्यकता आहे. सर्वांगीण विकास साधत देशाची भावी पिढी सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी पालक, विद्यार्थी, शिक्षक यांची जबाबदारी आहे, असे मत पीसीईटीचे विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित निगडी येथील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने ‘युवोत्सव २०२५’ या तीन दिवसांच्या क्रीडा स्पर्धेचा समारोप शनिवारी (दि. १ मार्च) पारितोषिक वितरण समारंभाने झाला. यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, एस. बी. पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर उपस्थित होत्या.
दरम्यान स्पर्धेचे उद्घाटन गुरूवारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पिंपरी चिंचवड मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, आरजे अक्षय यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत फुटबॉल, बॉक्स क्रिकेट, बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉल या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. पुणे जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील एकूण १४५ संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल खालील प्रमाणे –
फुटबॉल – प्रथम क्रमांक – गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, उपविजेते – श्री बालाजी विद्यापीठ, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, आकुर्डी;
बॉक्स क्रिकेट (पुरुष) – प्रथम – डी. वाय. पाटील आयएमएस, आकुर्डी, उपविजेते – पीसीसीओई, निगडी, डी. वाय. पाटील कॉलेज, तळेगाव;
बॉक्स क्रिकेट (महिला) – प्रथम – पीसीसीओईआर, रावेत, उपविजेते – झील कॉलेज, इंदिरा कॉलेज;
बॅडमिंटन (पुरुष) – प्रथम – आनंद बोरा (एमआयटी स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशन), उपविजेते – रितेश निम्हाळ (पीसीसीओई, निगडी);
बॅडमिंटन (महिला) – प्रथम परिनीत मगदूम (बाबुरावजी घोलप कॉलेज, सांगवी), उपविजेते – अमृता गाडेकर (एमआयटी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय);
व्हॉलीबॉल – प्रथम मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर; उपविजेते – पीसीसीओई निगडी, के. बी. पी. सातारा
वैयक्तिक विजेते – बॅडमिंटन (पुरुष) – सर्वोत्तम स्मॅशर – आनंद बोरा (एमआयटी स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशन),; बॅडमिंटन (महिला) – सर्वोत्तम स्मॅशर मिहिका ठाकूर (एमआयटी स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशन);
बॉक्स क्रिकेट (पुरुष) – सर्वोत्तम फलंदाज – आदर्श पवार (डीवायपी आयएमएस); सर्वोत्तम गोलंदाज – प्रथमेश नाथे (पीसीसीओई), सर्वोत्तम क्षेत्ररक्षक – अभिषेक कोठावदे (डीवायपी आयएमएस);
बॉक्स क्रिकेट (महिला) – सर्वोत्तम फलंदाज – श्रेया टाकळकर (पीसीसीओईआर); सर्वोतम गोलंदाज – आदिती बिरादर (इंदिरा कॉलेज);
सर्वोत्तम क्षेत्ररक्षक – कल्याणी कोळपे (पीसीसीओईआर); व्हॉलीबॉल – सर्वोत्तम सेंटरर – विकास भामरे,
सर्वोत्तम ब्लॉकर – संस्कार पावरे, सर्वोत्तम स्मॅशर – विनीत शिंदे;
फुटबॉल – सर्वोत्तम गोलकीपर – ललित डोगरा (श्री बालाजी), टॉप गोल स्कोरर – यश गटकळ (डीवायपी सीओई), सर्वोत्तम खेळाडू – प्रेम भयार (गरवारे).

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्या संघांचे आणि खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या युवोत्सवात समन्वयक म्हणून प्रा. डॉ. काजल माहेश्वरी, डॉ. अनिषकुमार कारिया, डॉ. अमरीश प‌द्मा यांनी काम केले. माजी वि‌द्यार्थी समन्वयक नंदलाल पारीक, विशाल निकम आणि अभिजीत नायडू यांचे सहाय्य लाभले. तसेच, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी परिषद सदस्य, विद्यार्थी स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले.

पुण्याच्या रस्त्यावर चार हजार बेवारस वाहने, वाहतूक शाखा आणि महापालिकेची संयुक्त कारवाई सुरू

  • कसबा मतदारसंघातून धुळखात पडलेली वाहने उचलण्याच्या मोहिमेला सुरुवात

पुणे (दि २ मार्च): शहरातील रस्त्यांवर धूळखात पडलेल्या बेवारस वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा, अस्वच्छता आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. अशा काही वाहनांची चोरी झालेली असते, तर काहींना मालकच नसतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन पुणे पोलीस आणि महापालिका प्रशासनाने व्यापक मोहीम हाती घेतली असून याची सुरुवात कसबा मतदारसंघातून करण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांमध्ये येथील सर्व बेवारस वाहने हटवली जाणार आल्याची माहिती अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे.

आमदार हेमंत रासने यांच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियानाच्या माध्यमातून गणेश पेठतील दूधभट्टी चौकामध्ये या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी, झोन १ पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे यांच्यासह कसबा मतदारसंघातील सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील म्हणाले, “पुणे शहरात जवळपास चार हजारांच्यावर धुळखात पडलेली बेवारस वाहने आहेत. यामुळे पार्किंगची समस्या वाढत असून आरोग्यावरही परिणाम होतो. यातील काही वाहने चोरीची असतात तर काहींचे मालक सापडत नाहीत. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार अशा वाहनांच्या मालकांना प्रथम नोटीस दिली जाईल, मात्र कोणी मालक नसल्यास वाहतूक पोलीस गाड्या जप्त करतील आणि पुढे कायदेशीर प्रक्रिया करून लिलाव केला जाईल. कसबा मतदारसंघात पहिल्या दिवशी १३९ वाहने उचलण्यात आली असून येत्या १५ दिवसांमध्ये सर्व बेवारस वाहने हटवण्यात येतील. यासाठी आमदार हेमंत रासने यांची घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे”.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी म्हणाले, “महापालिकेच्या माध्यमातून रस्त्यावर धुळखात पडलेली 45 वाहने गेल्या महिन्यात उचलण्यात आली आहेत. महापालिका आणि पुणे पोलिस यांच्यामध्ये समन्वय साधून ही कारवाई केली जात आहे. दोन्ही विभागांकडून रस्त्यावर अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. वाहने जप्त केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पडण्यासाठी काही महिने लागत असल्याने ती ठेवण्यासाठी बाणेर येथे महापालिकेची जागा असून कोंढव्यात नवीन जागा उपलब्ध करून देण्यात येईल. खराब झालेल्या महापालिकेच्या वाहनांचा देखील लवकरच लिलाव केला जाणार आहे.

आमदार हेमंत रासने म्हणाले, “बेवारस वाहनांमुळे अस्वच्छता, आरोग्यविषयक समस्या आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. रस्त्यावर कचरा तसेच बेवारस साहित्य असू नये, हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे अशी वाहने उचलण्यासाठी पुणे पोलीस, वाहतूक विभाग आणि महापालिकेच्या संयुक्तिक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. वाहने जप्त केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांच्या कालावधी लागत असल्याने तो कमी करण्यासाठी तसेच संपूर्ण प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. कसबा अनधिकृत फ्लेक्समुक्त करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भारतीय कॉर्पोरेट्सना विशेष शैक्षणिक संस्थांमध्ये गुंतवणूक करण्याचा आग्रह केला

हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक हिंदुजा यांनी हिंदुजा कॉलेजला डीम्ड युनिव्हर्सिटी बनवण्याच्या योजनेची घोषणा केली

हिंदुजा फाउंडेशनचे उद्दिष्ट २०३० पर्यंत १ मिलियन विद्यार्थ्यांना सशक्त बनवायचे आहे

मुंबई, २ मार्च २०२५:  शिक्षण क्षेत्रातील कारकिर्दीला ७५ वर्षे पूर्ण केल्याचे औचित्य साधून हिंदुजा समूहाने आपली प्रमुख संस्था हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्समार्फत भारताच्या भविष्याला आकार देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्सची सुरुवात शरणार्थींच्या मुलांसाठी सुरु करण्यात आलेले एक सामान्य प्राथमिक विद्यालय म्हणून झाली होती. आज ६००० पेक्षा जास्त विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्स आता एक डीम्ड युनिव्हर्सिटी बनण्याच्या दिशेने पुढे जात आहे.

आज हा समूह हिंदुजा फाउंडेशनच्या माध्यमातून ‘रोड टू स्कूल’ आणि ‘रोड टू लाईवलीहूड’ या उपक्रमांमध्ये भारतभर ७,००,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण प्रदान करत आहे. २०३० सालापर्यंत १ मिलियन विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याच्या योजनेसह हिंदुजा फाउंडेशन शिक्षणामध्ये परिवर्तनाचा मुख्य स्रोत बनून सातत्याने प्रोत्साहन देत आहे आणि २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या भारताच्या दृष्टिकोनामध्ये प्रमुख योगदान देत आहे.

या समारोहाचे प्रमुख अतिथी म्हणून भारताचे उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखड आणि त्यांच्यासह अनेक इतर मान्यवर देखील उपस्थित होते. महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन देखील विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. माननीय उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखड यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या लक्षणीय शैक्षणिक आणि अभ्यासक्रमबाह्य यशासाठी सन्मानित केले.

हिंदुजा कॉलेजची ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभामध्ये विद्यार्थी आणि मान्यवरांना संबोधित करताना, उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले, “सनातन हा देशाच्या संस्कृतीचा व शिक्षणाचा भाग असला पाहिजे कारण हे समावेशकतेचे प्रतीक आहे आणि यामध्ये आपली मुळे घट्ट रुजलेली असावीत यावर भर दिला. त्यांनी कॉर्पोरेट इंडियाला आग्रह केला की त्यांनी विशेष संस्था निर्माण करण्यासाठी शिक्षणामध्ये गुंतवणूक करावी. परोपकारी प्रयत्न हे कमॉडिफिकेशन आणि व्यावसायीकरणाच्या सिद्धांतांनी प्रेरित नसावेत. आपल्या आरोग्य सेवा आणि शिक्षण प्रणाली याने ग्रस्त आहे. त्यांनी शिक्षण हे सर्वात प्रभावी परिवर्तनकारी तंत्र देखील आहे, जे समानता घडवून आणते.” त्यांनी असा विश्वास व्यक्त केला की, हिंदुजा कॉलेज डीम्ड युनिव्हर्सिटी बनण्यापुरते मर्यादित राहणार नाही तर जागतिक प्रतिष्ठेची संस्था बनेल. 

हा टप्पा पार केल्याबद्दल हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक हिंदुजा म्हणाले, “संस्था एक कौशल्य विकास केंद्र स्थापित करण्यासाठी सज्ज आहे, जे उद्योग आणि शिक्षणादरम्यानचे अंतर कमी करण्यासाठीची वचनबद्धता मजबूत करेल, त्यासोबतच डीम्ड युनिव्हर्सिटी बनण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या क्षमता अनेक पटींनी वाढवण्याच्या दीर्घकालीन योजना देखील आहेत. हे कॉलेज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स आणि वेल्थ मॅनेजमेंटमध्ये नवीन कार्यक्रम सुरु करण्याची योजना तयार करत आहे, त्यासोबतच क्लायमेट फायनान्स आणि निर्यात आयात व्यवस्थापनामध्ये विशेष अभ्यासक्रम देखील सुरु करेल.”

श्री अशोक हिंदुजा यांनी सरकारकडून शिक्षणामध्ये सनातन सिद्धांतांचा समावेश करण्यावर विचार करण्याचा देखील आग्रह केला. या सूचनेशी सहमती दर्शविताना माननीय उपराष्ट्रपती म्हणाले, “सनातन समावेशकतेला प्रोत्साहन देते.”

हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष पॉल अब्राहम म्हणाले, “हिंदुजा कॉलेजमध्ये पुनर्विकास केला जात आहे, अत्याधुनिक पायाभूत संरचना आणि आधुनिक सुविधांनी सज्ज असलेली अत्याधुनिक, अनेक मजल्यांची सुविधा तयार केली आहे. आशा आहे की, ही महत्त्वाकांक्षी योजना २०२८ पर्यंत पूर्ण होईल. आम्हाला आशा आहे की, नवीन सुविधा कॉलेजच्या भौतिक क्षमता तीन पटींनी वाढवेल जेणेकरून संधींच्या एका स्पेक्ट्रममध्ये डिजिटल आउटरीच आणि प्रोग्रामिंगच्या क्षमता वाढवल्या जाऊ शकतील.”

हिंदुजा कॉलेजमध्ये ३० पेक्षा जास्त शैक्षणिक कार्यक्रम आहेत आणि त्यांना २०२३-२४ मध्ये NAAC A+ मान्यता मिळाली आहे. २०२२ मध्ये स्वायत्त दर्जा देण्यात आलेल्या या कॉलेजने विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार कौशल्यांनी सज्ज करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ला अनुरूप पावले उचलली आहेत.

कॉलेजचे व्हिजन स्पष्ट आहे: “आमच्या विद्यार्थ्यांना फक्त उत्कृष्टतेसाठी नाही तर इतरांपेक्षा पुढे जाण्यासाठी सशक्त बनवणे.” विद्यार्थ्यांना सशक्त बनवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा हा एक भाग आहे.

मुलींची छेड काढणा-यांना अटक करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्र्यांना पोलीस स्टेशनात जावे लागते ही सरकारसाठी शरमेची बाब

0

राज्यात जंगलराज, महिला मुली सुरक्षित नाहीत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा: हर्षवर्धन सपकाळ

गुंडांना राजाश्रय असल्याने माता भगिणी असुरक्षित राज्याला पुर्णवेळ सक्षम गृहमंत्र्यांची गरज

मुंबई दि. २ मार्च २५
राज्याच्या विविध भागातील महिला अत्याचारांच्या घटनांमुळे महाराष्ट्र आता महिला मुलींसाठी सुरक्षित राहिला नाही हे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलींची टवाळखोरांनी छेड काढली, त्यांच्या सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केली. आरोपींना अटक होत नाही म्हणून खडसे यांना पोलीस स्टेशनला जाऊन ठिय्या द्यावा लागतो, हे महाराष्ट्रात जंगलराज आल्याचे निदर्शक आहे. राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांमुळे राज्याची मान शरमेने खाली गेली असून महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यांनी तात्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

यासंदर्भात तीव्र संताप व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, गुंडांना राजाश्रय असल्याने राज्यात महिला मुलींवरील अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाहीत तिथे सर्वसामान्यांच्या लेकरांची काय अवस्था असेल याचा विचार न केलेला बरा. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहखात्यावर आणि गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. सुरक्षारक्षक सोबत असतानाही मंत्र्यांच्या मुलींची छेड काढली जाते हे कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे निघाल्याचे निदर्शक आहे. त्यानंतर टवाळखोरांना अटक करावी या मागणीसाठी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या द्यावा लागतो यावरून राज्यात पोलिसांचे नाही तर गुंडांचे राज्य आले आहे, हे स्पष्ट होते.

महायुती सरकारने मोठ्या हट्टाने निवृत्त झालेल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ दिली आहे. पण शुक्ला आणि गृहमंत्री फडणवीस यांची पोलीस प्रशासनावर वचक आणि पकड राहिली नाही, त्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. राज्याला सक्षम पोलीस महासंचालक आणि पूर्ण वेळ गृहमंत्र्यांची आवश्यकता आहे. त्याशिवाय राज्यातील गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचार नियंत्रणात येऊ शकणार नाहीत. त्यामुळे रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी करावी आणि फडणवीसांनी राजीनामा देऊन राज्याला सक्षम व पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

सुरक्षा रक्षक सोबत असतानाही रक्षा खडसेंच्या मुलीची छेड:यात्रेत व्हिडिओही काढला; केंद्रीय मंत्र्यांच्या तक्रारीनंतर चौघांविरोधात गुन्हा

मुक्ताईनगर-केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील एका जत्रेत शुक्रवारी हा प्रकार घडला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे रक्षा खडसे आक्रमक झाल्या असून छेडछाड करणाऱ्या तरुणांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे महाशिवरात्री निमित्त मोठी जत्रा भरते. रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणी सुरक्षारक्षकांसोबत या जत्रेमध्ये गेली होती. यावेळी काही टवाळखोर तरुण त्यांचे परिवाराचे चित्रण करत असल्याचा संशय आला. या संशयावरून त्यांनी या तरुणाच्या हातामधील मोबाईल हस्तगत करून त्याची पडताळणी केली. या घटनेचा राग येऊन चारही टवाळखोरांनी सुरक्षा रक्षकासोबत झटापट केली.

हा प्रकार समजल्यानंतर रक्षा खडसे यांनी याबद्दल महिला आणि मुली घेऊन पोलिस स्टेशनमध्ये आक्रमक पावित्रा घेतला आहे. छेडखानी करणाऱ्या टवाळखोरांना अटक करावी, अशी मागणी रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे केली आहे. इतक्या सुरक्षेतही जर अशा पद्धतीने छेडछाड केली जाते तर सर्वसामान्य मुलींचा काय होणार? असा सवालही रक्षा खडसे यांनी पोलिसांना केला. एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यामध्ये नागरिकांसह कार्यकर्त्यांचा मोठा जमाव जमला होता.
शुक्रवार रोजी हा घडलेला हा प्रकार गंभीर आहे. परवा रात्री मी येथे नव्हते. गुजरातला होते, आज सकाळी आले. माझ्या मुलीला यात्रेत जायचे होते, त्यासाठी तिने शुक्रवारी रात्री मला फोन केला होता. तेव्हा मी तिला सुरक्षा रक्षक आणि ऑफिसमधील स्टाफ सोबत घेऊन जाण्यास सांगितले. यावेळी तिच्या मैत्रिणीही सोबत होत्या. तिथे गेल्यानंतर काही टवाळखोरांनी त्यांचा पाठलाग केला. मुली बसतील, त्या पाळण्यात जाऊन मुलींच्या शेजारी बसले. आमच्या लोकांनी मुलींना उतरवून दुसऱ्या पाळण्यात बसवले. परंतु, त्या टवाळखोरांनी तिथेही तोच प्रकार केला. तिथे सुद्धा ते जाऊन बसले. पाळण्यात बसल्यानंतर तरुणांनी व्हिडिओ काढले. माझ्या सुरक्षारक्षकांनी त्यांचा मोबाईल घेतला. काय व्हिडिओ काढले हे बघितले असता, टवाळखोरांनी कुणाला तरी व्हिडिओ कॉल केल्याचे लक्षात आले. टवाळखोरांनी सुरक्षारक्षकांसोबतही धक्काबुक्की केली. मुलींसोबत छेडछाड देखील केली, असे रक्षा खडसे यांनी सांगितले.
सत्ता कुणाचीही असो, प्रशासनाकडे जेव्हा अशा तक्रारी येतात. त्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे. एक पोलिस कर्मचारी ड्रेसवर मुलींसोबत असताना असा प्रकार घडत असेल, तर ही खूप गंभीर बाब आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी दोनवेळा बोलले आहे. त्यांनी सुद्धा एसपींना याबाबत सुचना दिलेल्या आहेत, असे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी सांगितले.

रंगत-संगत प्रतिष्ठानचा आदर्श आई पुरस्कार ललिता सबनीस यांना जाहीर

पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे आदर्श आई पुरस्कार वितरण समारंभ व आई विषयावरील कविसंमेलनाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा आदर्श आई पुरस्कार प्रसिद्ध लेखिका ललिता श्रीपाल सबनीस यांना प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार, दि. 7 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण रंगत-संगत प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष मैथिली आडकर यांच्या हस्ते होणार असून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सन्मानपत्र, शाळ, श्रीफळ आणि भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त आई विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनात भारती पांडे, प्रभा सोनवणे, वेदस्मृति कृती, मीना सातपुते, मीनाक्षी नवले, तनुजा चव्हाण, हेमंत केतकर, मिलिंद शेंडे, मिलिंद जोशी, सीताराम नरके, स्वप्नील पोरे, डॉ. ज्योती रहाळकर यांचा समावेश आहे.

प्रशांत जगताप यांना आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही-महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांची खरमरीत टीका

  • राजकारण करून तसेच सूडबुद्धीने गृहमंत्र्यांना राजीनामा मागणे देखील योग्य नाही असे बाबा कांबळे म्हणाले

पिंपरी : प्रतिनिधी

पुण्यातील स्‍वारगेट बसस्‍थानकात युवतीवर घडलेल्‍या अत्‍याचाराच्‍या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आंदोलन केले. मात्र त्‍यांना या विषयावर आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नसल्‍याची खरमरीत टीका महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली. प्रशांत जगताप यांच्‍या नेतृत्‍त्‍वाखाली पक्ष संघटनेत महिलांवर अत्‍याचार करणाऱ्या परप्रांतीय पदाधिकाऱ्यांचा भरणा असल्‍याचा आरोप बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला. तसेच या संवेदनशील प्रश्नांमध्ये राजकारण करणे चुकीचे आहे. या प्रश्नांमध्ये राजकारण करून गृहमंत्र्याचा राजीनामा मागणे अत्यंत चुकीचे असल्याचेही बाबा कांबळे म्हणाले.

बाबा कांबळे यांनी दिलेल्‍या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, प्रशांत जगताप यांचे हे आंदोलन बेगडीपणाचे आहे. प्रशांत जगताप यांचा महिलांवर अत्‍याचार करणाऱ्या परप्रांतीयांवर अधिक विश्‍वास आहे. अशा आरोपींना पक्ष संघटनेत सामील करून पाठिंबा दिला जात आहे. त्‍यामुळे अन्‍याय करण्याचे बळ या परप्रांतीय गुन्‍हेगारांना मिळत आहे. असे असताना दुसरीकडे स्‍वारगेटच्‍या अत्‍याचार प्रकरणावर प्रशांत जगताप यांनी आंदोलन करून दिखावा केला आहे. त्‍यामुळे अगोदर आपल्या पक्षातील महिलांवर अन्याय करणाऱ्या परप्रांतीयांना धडा शिकवावा. त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी. त्‍यांच्‍या विरोधात कठोर कारवाई करावी. नंतर इतर महिला अत्‍याचार प्रकरणी बोलावे, असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले. जोपर्यंत स्वतःच्या पक्षातील अपराधी असणाऱ्या कार्यकर्त्यांवर पायबंद घालत नाही. तोपर्यंत त्यांना दुसरा घटनेबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार राहत नाही, अशी टीका महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले आहे.

पुणे शहरात काही दिवसांपूर्वी परप्रांतीय व्यक्तीच्या जाचाला कंटाळून एका महिलेने अंगावरती रॉकेल ओतून घेतले होते. या महिलेला ६० टक्के पेक्षा अधिक अपंगत्व आले. ज्‍या परप्रांतीय व्यक्तीमुळे या महिलेवर आत्महत्या करण्याची वेळ आली. तो परप्रांतीय व्यक्ती प्रशांत जगताप यांच्या पक्षाचा वाहतूक विभागाचा पदाधिकारी आहे. महाराष्ट्रीयन महिलांवर अन्याय करणाऱ्या अशा परप्रांतीय गुंडांना प्रशांत जगताप पाठीशी घालत आहेत, असा आरोप बाबा कांबळे यांनी केला आहे.

या विषयात राजकारण करून वेगळे वळण देणे योग्य नाही. त्यामुळे त्या विषयाचे गांभीर्य राहत नाही. तसेच सूडबुद्धीने गृहमंत्र्यांना व मुख्यमंत्र्यांना राजीनामा मागणे देखील योग्य नाही असे बाबा कांबळे म्हणाले

मंत्री माधुरी मिसाळांनी स्वारगेट एसटी स्थानकाच्या सुरक्षेचा घेतला आढावा,म्हणाल्या,’आयपीएस दर्जाचा सुरक्षा अधिकारी नेमणार’


पुणे : स्वारगेट एसटी स्थानकात घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. स्वारगेट डेपो घडलेल्या घटनेच्या निमित्ताने महिलांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. ह्या अनुषंगाने आजच्या बैठकीत त्याचा विस्तृत आढावा घेण्यात आला असून येथील सुरक्षा कर्मचारी वाढविणे सोबतच एसटी महामंडळात एक सुरक्षा रक्षक कमिटी नेमून त्यात आयपीएस दर्जाचा सुरक्षा अधिकारी नेमणार असल्याचे परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.
स्वारगेट येथे घडलेल्या महिला अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री यांनी एसटी महामंडळ आणि पोलिस अधिकाऱ्यांची शनिवारी आढावा बैठक घेतली. यावेळी डीसीपी अमोल झेंडे, एसीपी वाहतूक अश्विनी राख, प्रादेशिक व्यवस्थापक अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल यांच्यासह एसटी, पोलिस आणि आरटीओ विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीबद्दल माहिती देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, पूर्वी सारखे सुरक्षा दक्षता अधिकारी नव्याने नेमण्यात येतील. पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार आहे. स्वारगेट स्थानकात यापूर्वी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत त्यांची संख्या देखील आता वाढविण्यात येईल. महिला सुरक्षेच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना करण्याची गरज आहे त्या तत्काळ करणार असल्याचे सांगताना या प्रकरणाच्या ऑडिट मध्ये जे कोणी अधिकारी किंवा ठेकेदार दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.
एसटी बसस्थानाकाच्या आवारात तक्रार निवारण कक्ष, तक्रार नोंदवण्यासाठी एक टोल फ्री क्रमांक राज्यात दिला जाईल, तसेच खासगी बस चालकांची एसटी स्थानकात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी देखील उपाययोजना आखण्याचे निर्देश दिल्याचे राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्र सरकारने आणलेल्या स्क्रॅप पॉलिसी नुसार ज्या बसेस स्क्रॅप करण्याची गरज आहे, त्या राज्यातील सर्व आगारातील बसेस येत्या 15 एप्रिल पर्यंत स्क्रॅप करणार असल्याचेही मिसाळ यांनी सांगितले.

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी १५ जुलै पर्यंतच्या पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करावे -अजित पवार

पुणे, दि. १: जिल्ह्यातील विविध धरण प्रकल्पांच्या कालवे सल्लागार समित्यांच्या बैठका उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात संपन्न झाली. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी १५ जुलै २०२५ पर्यंतच्या पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सिद्धार्थ शिरोळे,भीमराव तापकीर रामराजे नाईक निंबाळकर, विजय शिवतारे, राहूल कुल,, हेमंत रासने, बापूसाहेब पठारे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके,चेतन तुपे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, जिल्ह्यातील हवेली, इंदापूर, दौंड, बारामती तालुक्यातील शेती सणसर जोड कालव्यावर अवलंबून आहे. त्यासाठीच्या पाण्याचे योग्य नियोजन करा. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवून तारतम्याने कामे पूर्ण करा, पाणी गळती शोधून त्याची दुरुस्ती करा. नवीन मुठा उजवा कालवा पहिले आवर्तन कालावधी ६० ऐवजी ५५ दिवस व दुसरे आवर्तन दौंड नगरपालिका व इतर पिण्याच्या पाण्यासाठी ३८ दिवसांऐवजी ४५ दिवस करावे, जनाई- शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कामाची निविदा मंजूर करण्यात आली असून चांगल्या प्रतीची पाईपलाईन करा, कंत्राटदारांनी कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई केल्यास त्यांना काळ्या यादीमध्ये टाकण्यात येईल. जनाई शिरसाई योजनेच्या कामासाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येईल, असे ते म्हणाले.

प्रकल्प आराखड्यानुसार मंजूर पाण्याचे वितरण करा- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

प्रकल्प आराखड्यानुसार मंजूर करण्यात आलेले पाणी सर्व प्रकल्पांना वितरीत करावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यावेळी दिल्या. उपसा सिंचन पाणीपट्टी वाढीला स्थगिती देण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, सर्व गावांतील शेतकऱ्यांना समान पाणी देण्यात यावे, पंढरपूर व सांगोला येथे आवर्तन सुरळीत करण्याची कार्यवाही तातडीने करावी, सणसर जोड कालव्याला मंजूर पाणी देण्यात यावे. कालव्यांची दुरुस्ती आवश्यक असल्यास एका आठवड्यात पूर्ण करावी, पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावा, पाण्याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी मीटर बसवावेत असेही ते म्हणाले.

मंत्री भरणे म्हणाले, सणसर जोड कालव्यासाठी ३.९ टीएमसी पाणी मंजूर आहे. या कालव्याला सिंचन आराखड्यात पाणी देण्यात आले नाही. मंजूर पाणीसाठ्याप्रमाणे पाणी मिळाल्यास इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागणार नाही.

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, शहरातील कालव्यांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. भिलारेवाडी बंधाऱ्याबाबत शहरातील पाणी गळतीबाबत महानगरपालिकेने तातडीने कार्यवाही पूर्ण करावी.

खासदार सुळे म्हणाल्या, पुरंदर उपसा सिंचन योजना सुरळीत करावी, भेकराईनगरच्या बोगद्याला अर्थसंकल्पात निधी देण्यात यावा, खडकवासला परिसरातील वाढते प्रदूषण लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात.

खडकवासला प्रकल्पात १८.३६. टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्यावर्षी १६.५६ टीएमसी पाणीसाठा होता. सिंचन व बिगर सिंचनासाठी १७.२६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. तर मुंढवा जॅकवेलद्वारे पुणे महानगरपालिकेने सांडपाण्याद्वारे १.२५ टीएमसी पाणीसाठा बेबी कालव्याद्वारे उपलब्ध करुन दिला आहे.

यावेळी खडकवासला, पवना, चासकमान, भामा आसखेड, नीरा उजवा कालव्यातील पाणी नियोजन, पाणी वापर व उपलब्ध पाणीसाठा याबाबत आढावा घेण्यात आला. नीरा उजव्या कालव्याचे पुनर्विलोकन करणे आवश्यक आहे, पाण्याचा फेरविचार करून कृष्णा, धोम व गुंजवणी कालव्याच्या अडचणी सोडवाव्यात व समन्यायी तत्वाने पाणी वाटप व्हावे, अशी मागणी रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.

सोलापूर जिल्ह्याला १२ महिने पाणी मिळावे यासाठी आवर्तन वाढवावे, पाणी वाटपाचे योग्य नियोजन करावे अशी मागणी माजी आमदार राम सातपुते यांनी केली.

बैठकीला पुणे, सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

समाजासाठीचे प्रत्येक कामसमाजानेच करणे आवश्यक-डॉ. कृष्णगोपालजी

पुणे १ मार्च
सर्व काही सरकार करेल ही पाश्चात्य आणि चुकीची धारणा आहे. सुरक्षा, न्याय अशा काही व्यवस्था आणि छोटी, मोठी कामे सरकार निश्चितपणे करेल. परंतु, समाजासाठी आवश्यक प्रत्येक काम करणे हे समाजाचेच दायित्व आहे. हा विश्वास समाजात पुनर्स्थापित करूया. यासाठीच ‘जनकल्याण समिती’सारख्या संस्थांचे कार्य अधिक गतीने पुढे जाणे आवश्यक आहे. त्यातूनच समाज प्रगती करेल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपालजी यांनी शनिवारी व्यक्त केला.

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’तर्फे आयोजित ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान समारंभात डॉ. कृष्णगोपालजी बोलत होते. राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील ‘गोयल ग्रामीण विकास संस्थान’ आणि भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पी. आर. श्रीजेश यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री संकेश्वर पीठाचे श्री स्वामी शंकराचार्य कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाल, श्रीफल, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती.

संघाचे कार्यकर्ता निर्माणाचे कार्य प्रारंभीची अनेक वर्षे समाजाच्या लक्षातच आले नाही. संघ युवकांची शक्ती वाया घालवत आहे, अशीही टीका त्या काळात झाली. परंतु नंतर समाजाविषयीची तळमळ आणि समाजाचे दुःख हे आपले दुःख मानून संघ स्वयंसेवकांनी हजारो सेवाकार्ये सुरू केली. त्याचा लाखो जणांना लाभ झाला. असे डॉ. कृष्णगोपालजी यांनी सांगितले. समाजात जाऊन आवश्यक सेवाकार्य करण्याची ही संघाची कार्यशैली अद्भुत ठरली, असेही ते म्हणाले.

भक्तीभावाचे नाव आध्यात्म आहे आणि संवेदना, करुणा, हे आध्यात्माचे मूळ आहे. नुकताच प्रयागराज येथे झालेला महाकुंभ हेही आध्यात्मभावाचेच प्रगटीकरण आहे. करुणा, प्रेम, समर्पण हा भाव कुंभामध्ये दिसला. कुंभ हा ऐक्य भावाचे प्रतीक आहे, असेही ते म्हणाले.

‘गोयल ग्रामीण विकास संस्थान’तर्फे सेंद्रिय शेती आणि त्या विषयातील संशोधनाचे महत्त्वपूर्ण तसेच सफल कार्य सुरू आहे. त्याचे मॉडेल देशात ठीकठिकाणी दाखवण्याचे प्रयत्न झाले तर शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष ताराचंद गोयल यांनी व्यक्त केला.

हॉकीमध्ये मी जी कामगिरी करू शकलो त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करणारा खेळाडू तयार करणे आणि देशासाठी असा खेळाडू शोधणे हे माझे लक्ष्य आहे. हॉकीमध्ये ब्राँझ पदकाकडून सुवर्णपदकाकडे आपल्या देशाची कामगिरी करण्याचे आमचे ध्येय आहे, असे मनोगत पी. आर. श्रीजेश यांनी व्यक्त केले.

जगात भारताला विश्वगुरू हा सन्मान निश्चितपणे प्राप्त होईल, असा विश्वास श्री स्वामी शंकराचार्य यांनी व्यक्त केला.

‘जनकल्याण समिती’चे अध्यक्ष डॉ. अजित मराठे यांनी प्रास्ताविकामध्ये समितीच्या सेवा प्रकल्पांची माहिती दिली. समितीचे सह कोषाध्यक्ष चंदन कटारिया यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. ‘सेवा भारती’ संस्थेचे सचिव प्रदीप सबनीस यांनी आभार प्रदर्शन आणि डॉ. प्रांजली देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

वारसा जपणाऱ्या शिक्षक, विद्यार्थ्यांविषयी अभिमान : आरती पाठक

वास्तुविधान स्मरणिकेचे प्रकाशन : विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनीचे उद्घाटन

पुणे : भारतीय कला प्रसारिणी सभेच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या नावलौकिकाचा वारसा महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यानी गेली 70 वर्षे जपला आहे आणि तो दर्जा आजचे विद्यार्थी अधिक उंचीवर नेत आहेत याचा मला अभिमान आहे, असे गौरवोद्गार भारतीय कला प्रसारिणी सभेच्या विश्वस्त, प्रसिद्ध चित्रकार आरती भालचंद्र पाठक यांनी काढले.
भारतीय कला प्रसारिणी सभेच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्यावतीने विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींच्या वास्तुरेखा 2025 ुया प्रदर्शनीचे आयोजन बालगंधर्व कलादालनात करण्यात आले असून यांचे उद्घाटन आज (दि. 1) आर्किटेक्टस्‌‍, इंजिनिअर्स ॲण्ड सर्व्हेअर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजीव राजे यांच्या हस्ते झाले. या वेळी ‌‘वास्तुविधान 25‌’ या स्मरणिकेचे प्रकाशन तसेच बी. एम. पाठक पारितोषिकांचे वितरण आरती पाठक यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी त्या बोलत होत्या. प्राचार्य डॉ. अभिजित नातू, प्रा. सुषमा पराशर, प्रदर्शन समन्वयक प्रा. उमेश सूर्यवंशी, आस्था भागवतकर मंचावर होते.
विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृती, छायाचित्रे वास्तुरेखा 2025 या प्रदर्शनात मांडण्यात आल्या असून हे प्रदर्शन सोमवार, दि. 3 मार्च रोजी सायंकाळी 5 पर्यंत सर्वांसाठी खुले आहे.
आरती भालचंद्र पाठक पुढे म्हणाल्या, विद्या नेहमी विनम्रता प्रदान करते आणि ती विनम्र व्यक्तीलाच शोभते हे महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडे पाहून जाणवते. महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेला प्रत्येक विद्यार्थी आत्मविश्वासाने जागतिक स्पर्धेला सामोरा जाईल याची खात्री आहे. नवनवीन गोष्टी शिकत रहा, असा सल्लाही त्यांनी दिला. वास्तुरचना शास्त्र आणि वास्तुविशारद यांचे समाजातील महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
प्रदर्शनाविषयी राजीव राजे म्हणाले, मी या महाविद्यालयाचाच विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे. महाविद्यालयातील पाच वर्षांच्या शिक्षण कलावधीत विद्यार्थी फक्त पदवीच संपादन करीत नाहीत तर उत्तम मित्रही जोडतात. व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही कितीही यशस्वी झालात तरी तुम्ही शिकलेल्या महाविद्यालयाकडून आदर मिळाल्याने आत्मिक समाधान मिळते. भविष्यातील वाटचालीसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे सचिव स्व. बी. एम. पाठक यांच्यानावे दिल्या जाणाऱ्या बेस्ट डिझाईन अवॉर्डस्‌‍ने इरफान मुल्ला, आदित्य डागा, संकेत बारसे, आदित्य चव्हाण या विद्यार्थ्यांचा आरती पाठक, राजीव राजे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
प्रा. सुषमा पराशर यांनी ‌‘वास्तुविधान 25‌’ या स्मरणिकेविषयी माहिती सांगितली. प्रास्ताविकपर स्वागत प्राचार्य डॉ. अभिजित नातू यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आस्था भागवतकर, प्रांजल लोखंडे यांनी केले. प्रदर्शनासाठी क्षितिजा पाठक, विधी धनवलकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

गृहराज्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांचे वक्तव्य चर्चेत

पुणे-

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी स्वारगेट बलात्कार प्रकरण ‘फोर्सफुली’ घडले नसल्याचा दावा केला होता. एका अर्थाने त्यांनी पिदितेने विरोध केलाच नाही असे म्हटल्याने गोंधळ उडाला होता आणि फिर्यादी महिलेची नाहक बदनामी सुरु केली गेली कि काय ? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला एवढेच नव्हे तर संतापही व्यक्त होऊ लागला होता.आरोपीच्या वकिलाचे तर कामच आही , फिर्यादीचे म्हणणे खोटे ठरवून आरोपीला वाचविणे, आरोपीच्या वकिलांच्या मिडिया बाईट नंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वकील असलेल्या महिला नेत्या रुपाली पाटील यांनीही’पुणे नाहकच बदनाम झालेअशी एक पोस्ट सोशल मिडियावर केली असल्याने स्वारगेट प्रकरण नेमके सत्याच्या /असत्याच्या कि राजकीय मार्गावर चाललेय हे अनेकांना कळेनासे झाले असल्याचा दावा केला जातोय . त्यात सारे काही झाल्यावर परिवहन राज्य मंत्री माधुरी मिसाळ यांनी आजतागायत स्वारगेट स्थानकाच्या दुर्दशेची आणि अशा अंधाऱ्या गुन्ह्यांना पूरक ठरणाऱ्या जागांची दखल घेतली नव्हती वा पाहणी केली नव्हती त्यांनी देखील बैठक घेऊन परिवहन खात्यात आयपीस अधिकारी नियुक्तीचे आदेश काढल्याचे वृत्त आहे. एकूणच या प्रकारात आता राजकारण घुसल्याने सत्ताधारी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून स्वतःचा बचाव तर करू पाहत नाही ना? असाही प्रश्न कोणी उपस्थित केला तर नवल वाटणार नाही.

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी स्वारगेट बलात्कार प्रकरण ‘फोर्सफुली’ घडले नसल्याचा दावा केला होता. स्वारगेट एसटी स्टँडवर घडलेली घटना स्ट्रगल किंवा फोर्सफुली घडलेली कृती नाही. ही घटना घडली तेव्हा शिवशाही बसच्या आजुबाजूला 10 ते 15 जण होते. पण तरुणीने प्रतिकार न केल्याने कुणालाही शंका आली नाही. परिणामी, आरोपीला गुन्हा करता आला, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत. परिणामी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुढे येत स्थितीवर स्पष्टीकरण द्यावे लागले होते. त्यानंतर योगेश कदम यांनी आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला होता.
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला गुरुवारी मध्यरात्री शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली आहे. आरोपीच्या वकिलांनी हे प्रकरण संमतीच्या शारीरिक संबंधांचे असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही त्यांच्या या दाव्याची अप्रत्यक्षपणे पुष्टी करणारे विधान केले आहे.पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात मंगळवारी पहाटे (25 फेब्रुवारी) एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. हे प्रकरण दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी उजेडात आले आणि एकच खळबळ माजली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपासाची वेगवान चक्रे फिरवून आरोपीला अटक केली. या प्रकरणी कोर्टाने आरोपी दत्तात्रय गाडे याला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यावेळी झालेल्या सुनावणीत आरोपीच्या वकिलांनी हे प्रकरण बलात्काराचे नव्हे तर संमतीच्या शारीरीक संबंधांचे असल्याचा दावा केला. त्यांचा हा दावा सरकारी पक्षाचे खोडून काढला.पण आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही अप्रत्यक्षपणे असाच दावा केला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे तसे संकेत दिलेत.रुपाली पाटील ठोंबरे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, पुणे शिवाजी कोर्टात बसस्टँड मधील आरोपीला आणायच्या वेळी dcp गिल साहेब यांनी माझीच चौकशी केली.
मॅडम तुम्ही आंदोलन करणार असेल,आरोपीला काळे फसणार करणार असेल तर प्लीज करू नका. त्याचवेळी साहेबांना सांगितले, घटनेची खरी माहिती घेऊन त्याची प्राथमिक माहिती खरी असल्याची खात्री केल्याशिवाय मी बोलतही नाही आणि कोणतेच आंदोलन मी करणार नाही. तुम्हाला विश्वास नसेल तर तुमच्या सोबत थांबते. मला कोर्टात रिमांड रिपोर्ट पहायचा आहे. केसची माहिती घेणे केसचा स्टडी करणे गरजेचे आहे.पण बस स्टँड घटनेत, पुणे नाहकच बदनाम झाले ऐका संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून याचे प्रचंड खेद वाटतो. दुसरे बसस्टँड आगराची व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार बाहेर आला. आता त्यांना सुट्टी नाही. नोकरीवर काम चोख करा नाहीतर घरी बसा कायमचे. तूर्तास एवढेच, असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.