Home Blog Page 428

मांजरीखुर्दमधील भेसळयुक्त पनीर बनवनाऱ्या फॅक्टरीवर छापा 1400 किलो भेसळीच्या पनीरसह, ७१८ कि. पामतेल४०० कि.GMS पावडर पकडली

अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस निरीक्षक वाहिद पठाणची महत्वपूर्ण कारवाई

पुणे-मानवी जीवनाची कोणतीही परवा न करता नफेखोरी आणि प्रचंड पैसा कमविण्याच्या मागे लागलेल्या हैवानांनी मांजरी खुर्द येथून सुरु ठेवलेल्या भेसळयुक्त पनीर बनवनाऱ्या फॅक्टरीवर छापा टाकून 1400 किलो भेसळीच्या पनीरसह, ७१८ कि. पामतेल४०० कि.GMS पावडर अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत पकडून नष्ट केली

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.०७/०३/२०२५ रोजी युनिट ६ कडील प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी पोलीस अंमलदार सचिन पवार व रमेश मेमाणे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून अन्न व औषध प्रशासन पुणे यांना पत्रव्यवहार करून माणीकनगर, मांजरीखुर्द येथे एका शेतामध्ये असलेल्या गोडावुन मध्ये भेसळयुक्त पनीर बनवण्याचे काम चालु असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी युनिट ६ कडील पथक व अन्न व औषध प्रशासना मार्फत धाड टाकली असता सदर ठिकाणी एकुण १४०० किलो भेसळयुक्त पनीर, ४०० किलो जी एम एस पावडर, १८०० किलो एस एम पी पावडर, ७१८ लिटर पामतेल असा एकुण ११,५६,६९०/- रू.चा मुद्देमाल मिळुन आला आहे. पंचांसमक्ष भेसळयुक्त पनीरचे नमुणे तपासणीसाठी घेवुन उर्वरीत भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आले आहे व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई अन्न व औषध प्रशासन हे करीत आहेत. अन्न व औषध प्रशासन, पुणे यांचेकडुन नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारचे अन्नपदार्थ खरेदी करताना सावधानता बाळगावी तसेच असा प्रकार आढळुन आल्यास त्याबाबत अन्न व औषध प्रशासन यांचेकडे तक्रार करावी.
सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे २) श्री. राजेद्र मुळीक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, सचिन पवार, गणेश डोगरे, बाळासाहेब तनपुरे, सुहास तांबेकर, तसेच अन्न व औषध प्रशासन कार्यालया कडील सह आयुक्त (दक्षता) डॉ. राहूल खाडे यांचे मार्गदर्शनाखाली नारायण सरकटे, सहाय्यक आयुक्त (अन्न) पुणे बालाजी शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता), पुणे श्रीमती अस्मिता गायकवाड, अन्न सुरक्षा अधिकारी, पुणे, श्रीमती सुप्रिया जगताप, अन्न सुरक्षा अधिकारी, पुणे एल डब्ल्यु साळवे, नमुना सहायक, पुणे यांनी केली आहे.

पैसे वसुलीसाठी हडपसर मधून अपहरण-सहा तासात पोलिसांनी केली सुटका अन आरोपींना अटक

पुणे- हडपसर परिसरातुन आर्थिक व्यवहारातील पैसे वसुल करण्याचे उद्देशाने अपहरण केलेल्या एका व्यक्तीची ६ तासात सुटका करून पोलिसांनी आरोपी जेरबंद केले आहेत.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ दिनांक ०७/०३/२०२५ रोजी फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात येवून कळवीले की, दि.०६/०३/२०२५ रोजी फिर्यादी यांच्या राहते घरी अज्ञात ४ ते ५ इसम आले व त्यांनी त्याचे वडीलाकडे फर्निचरचे काम करण्याचे सांगुन त्यांना राहते घरातुन घेवुन गेले. त्यानंतर रात्रौ ०१.०० वा सुमारास फिर्यादी यांचे वडीलांनी कॉल करुन घाबरत बोलत उदया सकाळ पर्यंत घरी येतो असे सांगुन फोन बंद केला. तेव्हा फिर्यादी यांनी सदरचा प्रकार नियंत्रण कक्ष व हडपसर पोलीस स्टेशन येथे समक्ष येवुन घडलेला प्रकार सांगुन तक्रार दिल्याने हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं २७६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १४० (३), ३(५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-०५ डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर संजय मोगले, यांच्या सुचनांप्रमाणे तपासपथक अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, व तपास पथक अंमलदार श्रीकांत पांडुळे, अजित मदने, चंद्रकांत रेजितवाड, तुकाराम झुंजार, अमित साखरे, महेश चव्हाण, महाविर लोंढे यांचे पथक तयार केले.
अपहृत इसम यांचे मोबाईल वर आलेल्या कॉलची माहीती घेतली असता, नमुदचा क्रमांक हा बंद मिळून आला. दाखल गुन्ह्याचे केले तांत्रिक तपासात संशयीत इसम हे वेळोवेळी आपले ठिकाण बदलत असल्याचे दिसून आले. तसेच संशयीत इसम हे खेड शिवापूर, शिंदेवाडी, जांभूळवाडी, नऱ्हे भागात फिरत असल्याची माहीती प्राप्त झाली होती. संशयीत इमसांचे बाबत गोपनिय बातमी मिळवून आरोपी हे पिडीतास घेवून कात्रज घाटाच्या पायथ्यास येणार आहेत अशी खात्रीशीर माहीती प्राप्त झाल्याने तपास पथकाने सापळा रचून अपहृत इसम तसेच आरोपी १) प्राजस दिपक पंडित वय २५ वर्ष रा. स्वामी सदन, त्रिमुर्ती चौक, भारती विदयापीठ पुणे यांना ताब्यात घेतले.
ताब्यात असलेल्या आरोपी कडे अधिक तपास करता त्याने त्याचे साथीदार व त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने मांजरी येथून अपहरण करून आणल्याचे सांगितले. अपहृत व्यक्ती व आरोपी यांच्यात आर्थिक व्यवहार होता आर्थिक व्यवहारातील पैसे वसुल करण्याचे उद्देशाने अपहरण केल्याची कबुली दिली आहे.
सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे, यांचे मागदर्शनाखाली मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्रीमती अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. निलेश जगदाळे, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेड, पो. अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, श्रीकांत पांडुळे, दिपक कांबळे, चंद्रकांत रेजितवाड, अजित मदने, अमोल दणके, कुंडलीक केसकर, अमित साखरे, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महाविर लोढे, महेश चव्हाण, बापु लोणकर, अमोल जाधव यांचे पथकाने केली आहे.

डॉ. संगीता गोडबोले लिखित ‌‘माझ्या काल-शराचा प्रवास‌’ मनाची पकड घेणारा : डॉ. प्रमोद काळे

पुणे : डॉ. पी. व्ही. कुलकर्णी यांनी अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी येथे भारतातील पहिल्या अवरक्त किरण खगोलशास्त्र या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. माऊंटअबूवरील गुरूशिखरावर वेधशाळा बांधून टेलिस्कोपचीही निर्मिती केली आहे. डॉ. कुलकर्णी आपल्या कामाप्रति शिस्तप्रिय आणि जिद्दी शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या ‌‘ॲरो ऑफ (माय) टाईम‌’ या इंग्रजी आत्मचरित्राचा डॉ. संगीता गोडबोले यांनी केलेला भावानुवाद मनाची पकड घेणारा असून डॉ. कुलकर्णी यांचे व्यक्तिचित्रण आणि कार्य या पुस्तकातून आपल्या समोर येते, असे प्रतिपादन अहमदाबाद येथील स्पेस ॲप्लिकेशन सेंटर आणि तिरुवनंतपूरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे माजी संचालक पद्मश्री डॉ. प्रमोद काळे यांनी केले.

खगोलभौतिकशास्रज्ञ डॉ. पी. व्ही. कुलकर्णी लिखित ‌‘ॲरो ऑफ (माय) टाईम‌’ या मूळ इंग्रजी आत्मचरित्राचा ‌‘माझ्या काल-शराचा प्रवास‌’ या डॉ. संगीता गोडबोले यांनी भावानुवाद केलेल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आज (दि. 7) आयोजित करण्यात आला होता. पुस्तकाचे प्रकाशन पद्मश्री डॉ. काळे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. भांडारकर ओरिअन्टल रिसर्च इन्स्टिट्यूट, श्री नवलमल फिरोदिया ऑडिटोरिअम, लॉ कॉलेज रोड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ललिता कुलकर्णी, पी. आर. एल. अहमदाबाद मधील निवृत्त वैज्ञानिक डॉ. एन. एम. अशोक, आयुकातील डॉ. रंजन गुप्ता, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूकर प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
माऊंटअबू येथील टेलिस्कोपच्या बांधणीच्या काळात डॉ. पी. व्ही. कुलकर्णी यांच्याशी अनेकदा संवाद घडल्याचे डॉ. प्रमोद काळे यांनी सांगितले.
डॉ. संगीता गोडबोले पुस्तकाविषयी बोलताना म्हणाल्या, डॉ. पी. व्ही. कुलकर्णी यांचे इंग्रजीतील आत्मचरित्राचे हस्तलिखित माझ्या वाचनात आल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा जीवनप्रवास कशापद्धतीने मार्गदर्शक ठरू शकतो याची जाणीव झाली. डॉ. कुलकर्णी यांच्यातील संशोधकवृत्ती, ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेले कष्ट, अथक परिश्रम आणि ध्यास हे माझ्या मनाला भिडले. यातून पुढील पिढीला संशोधन क्षेत्रात येण्याची जिद्द निर्माण व्हावी या विचाराने या पुस्तकाचा मराठी भाषेत भावानुवाद केला आहे. या पुस्तकाच्या निर्मितीत अनेक दिग्गज शास्त्रज्ञ-संशोधकांची मोलाची मदत झाली आहे.
ललिता कुलकर्णी म्हणाल्या, हे पुस्तक एका असाधारण बुद्धिमान व्यक्तीचे आत्मचरित्र आहे. डॉ. पी. व्ही. कुलकर्णी यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे दर्शन या पुस्तकातून घडते. डॉ. संगीता गोडबोले यांनी स्वत:चा व्यवसाय, संसार, छंद सांभाळून अथक प्रयत्नातून उत्तम भावानुवाद केला आहे.
डॉ. एन. एम. अशोक म्हणाले, डॉ. पी. व्ही. कुलकर्णी हे माझे गुरू होते. नाईट एअर ग्लो या क्षेत्रातील संशोधनात त्यांचे योगदान मोठे आहे. एक गुरू म्हणून त्यांना आपल्या शिष्याने गुरूपेक्षाही मोठे व्हावे अशी इच्छा होती.
डॉ. रंजन गुप्ता म्हणाले, डॉ. पी. व्ही. कुलकर्णी यांनी आम्ही गुरूजी या नावे संबोधत असू. त्यांच्याकडून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या हा प्रवास आनंददायी होता. सुरेश हिंगलासपूरकर यांनी मनोगत व्यक्त केले.
डॉ. व्ही. बी. शेवरे (निवृत्त वैज्ञानिक, पी. आर. एल. अहमदाबाद), डॉ. सुरेश नाईक (निवृत्त गटसंचालक, इस्रो), अरविंद कोलगे (निवृत्त अभियंता, एएसएसी, अहमदाबाद) यांची विशेष उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. संयुक्ता कुलकर्णी यांनी केले तर आभार मधुवंती कुलकर्णी यांनी मानले.

आदर्श आई पुरस्कार हा समस्त मातृवर्गाचा सन्मान : ललिता सबनीस

पुणे : आदर्श आई हा पुरस्कार माझ्या एकटीचा नसून समस्त मातृवर्गाचा आहे. मुलगा-मुलगी असा भेद न करता मी मुलांना समान वागणूक दिली. त्यांच्याशी मैत्रीचे नाते जपले. स्त्रीचा सन्मान करावा, असे संस्कार प्रत्येक आईने मुलांवर केल्यास समाजातील अपप्रवृत्तींना आळा बसेल, असे विचार प्रसिद्ध लेखिका, कवयित्री ललिता श्रीपाल सबनीय यांनी व्यक्त केले.
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे आदर्श आई पुरस्काराने आज (दि. 7) ललिता सबनीस यांचा गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. पुरस्काराचे वितरण रंगत-संगत प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष मैथिली आडकर यांच्या हस्ते झाले. पत्रकार भवन येथे आयोजित कार्यक्रमात रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची प्रमुख उपस्थिती होती. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप होते.
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ललिता सबनीस यांचा आदर्श आई पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्याची संधी मिळाल्याने पुरस्काराची उंची वाढली असल्याचे मैथिली आडकर यांनी सुरुवातीस सांगितले.
महात्मा फुले यांना पाहता आले नाही पण महात्मा फुले यांचे समग्र साहित्य वाचले आहे. श्रीपाल सबनीस हे आपल्या आयुष्यातील महात्मा फुले आहेत, असे आवर्जून नमूद करून ललिता सबनीस म्हणाल्या, आयुष्याच्या वाटचालीत पती श्रीपाल सबनीस तसेच सासूबाई यांनी कायम प्रोत्साहन दिले. त्यांच्या सहकार्यामुळेच यश कमावता आले.
पत्नीचा आदर्श आई पुरस्काराने गौरव केला जात असताना एका मंचावर बसता आले हा आनंदाचा क्षण आहे, असे सांगून डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, प्रत्येक स्त्री कर्तव्याच्या जाणीवेने वाटचाल करीत असते. मातेला वंदन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. महिलांबाबत समाजात चुकीच्या घटना घडत असताना मातृसंस्कृती पराभूत झाली का याविषयी विचारमंथन व्हायला हवे. मुलगा चुकला म्हणून आईला दोष देण्यात अर्थ नाही.
सुरुवातीस ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली. परिचय आणि मानपत्राचे वाचन वैजयंती आपटे यांनी तर सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त आई विषयावर आयोजित कविसंमेलनात भारती पांडे, प्रभा सोनवणे, वेदस्मृति कृती, मीना सातपुते, मीनाक्षी नवले, तनुजा चव्हाण, हेमंत केतकर, मिलिंद शेंडे, मिलिंद जोशी, सीताराम नरके, स्वप्नील पोरे, डॉ. ज्योती रहाळकर यांचा समावेश होता.

वाघोली व लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू भट्ट्यांवर कारवाई

पुणे-पुन्हा वाघोली व लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू भट्ट्यांवर कारवाई करून पोलिसांनी सुमारे दहा लाखाचे दारू चे साहित्य जप्त करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.०६/०३/२०२५ रोजी युनिट ६ कडील प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण व पथक असे युनिट हद्दीत अवैध धंद्यांच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत रामदरा डोगराचे पायथ्याशी मुकेश करमावत, वय ५० वर्षे, रा. गणेशनगर, नवरत्न गोडवून जवळ, मंतरवाडी, फुरसुंगी, पुणे हा हातभट्टीची गावठी दारू तयार करीत असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदर माहितीच्या अनुषंगाने छापा कारवाई केली असता एकुण रु. ८,३५,०००/- रू कि.चा मुद्देमाल मिळुन आला त्यामध्ये गावठी हातभट्टीची सुमारे ७५० लिटर तयार दारु १५,००० लीटर कच्चे रसायण व इतर साहित्य असा मुद्देमाल मिळुन आल्याने मुकेश करमावत याचे विरुद्ध लोणी काळभोर पो.स्टे येथे गु.र.नं.१२०/२०२५ महाराष्ट्र प्रोव्हिबिशन अॅक्ट कलम ६५ (ई) (फ) (ब) (क) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास लोणी काळभोर पो.स्टे. यांचे कडुन करण्यात येत आहे.
तसेच दि.०५/०३/२०२५ रोजी युनिट ६ कडील पथक युनिट हद्दीत अवैध धंद्यांच्या अनुषंगाणे पेट्रोलिंग करत असताना बोरकर वस्ती भावडी, वाघोली पुणे येथील मोकळ्या जागेत महिला नामे रीना पवन राजपूत ही हातभट्टीची गावठी दारू तयार करीत असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदर माहितीच्या अनुषंगाने छापा कारवाई केली असता एकूण १,५७,०००/- रू कि.चा मुद्देमाल त्यामध्ये ७० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू, ४००० लिटर कच्चे रसायण व इतर साहित्य असा मुद्देमाल मिळुन आल्याने महिला नामे रीना पवन राजपूत हिचे विरुद्ध वाघोली पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र प्रोव्हिबिशन अॅक्ट कलम ६५ (ई) (फ) (ब) (क) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास वाघोली पो.स्टे. यांचे कडुन करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, सुहास तांबेकर, महिला पोलीस अंमलदार प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.

दिनदर्शिकेच्या माध्यमातून पीएमआरडीए पोहोचणार गावागावात

महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांचा नाव‍िण्यपुर्ण उपक्रम

पुणे (दि.७) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे कार्यक्षेत्र व्यापक प्रमाणात असल्याने ग्रामस्तरावर कार्यालयाच्या कामकाजाच्या स्वरुपाची माहिती पोहोचावी, या उद्देशाने प्रथमच दिनदर्शिकेच्या माध्यमातून पीएमआरडीची यंत्रणा ग्रामस्तरावर पोहोचणार आहे. या दिनदर्शिकेतून पीएमआरडीएची रचना, कार्यप्रणाली, याबाबत माहिती दिल्याने स्थानिक पातळीवर नागरिकांना ती उपयुक्त ठरणार आहे. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या या माहितीयुक्त दिनदर्शिकेचे पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयांसह यंत्रणेस वितरण करण्यात येत आहे. प्रशासकीय कामकाज गतिमान होण्यासाठी मुख्यमंत्री यांनी सप्तसुत्री कार्यप्रणाली निश्चित केली असून त्यानुसार प्राधिकरणात कार्यवाही सुरू आहे.

पीएमआरडीएचे कामकाज गतिमान, पारदर्शक आणि नागरिकांची अधिकाधिक कामे ऑनलाइन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहे. पीएमआरडीएच्या कामकाजाबद्दल व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून प्रथमच सार्वजनिकरित्या पीएमआरडीएच्या या दिनदर्शिकेचे अनावरण नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले होते. या दिनदर्शिकेत पीएमआरडीएच्या कामकाजाची रचना, स्वरूप, विभागनिहाय अपेक्षित माहिती द‍िलेली आहे. सोबत ईमेल आयडीसह संबंधित विभागाचा भ्रमणध्वनी क्रमांक देखील द‍िलेला आहे.

पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात ६९७ गावांचा समावेश असून संबंध‍ित ग्रामपंचायतींना दिनदर्शिका पाठव‍िण्यात येत आहे. ग्रामपंचायतींच्या हद्दीत पीएमआरडीएची कार्यप्रणाली पोहोचावी, या उद्देशाने महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या संकल्पनेतून ही उत्कृष्ट दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे. या दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर विभागनिहाय कामकाजाची माहिती द‍िलेली आहे. संबंधित दिनदर्शिका ग्रामस्तरावर पोहोचावी, यासाठी ती पाठवण्यात येत आहे. यात प्रामुख्याने गाव स्तरावर ग्रामपंचायत कार्यालय, सोसायटी कार्यालय, ग्राम महसूल अध‍िकारी (तलाठी), सरपंच, पोलीस पाटील यांना दिनदर्शिकेच्या प्रती पाठविण्यात येत आहे.

सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न
पीएमआरडीएचे कार्यक्षेत्र ग्रामपातळीपर्यंत असल्याने या भागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी या दिनदर्शिकेची मदत होणार आहे. आजही काही दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा नसल्याने त्यांच्यापर्यंत वेबसाईट, ऑनलाइन सुविधा पोहोचवणे अडचणीचे ठरते. त्यामुळे हा घटक विकास प्रक्रियेपासून लांब राहू नये, म्हणून त्यांना पीएमआरडीएची कार्यप्रणाली समजावी या उद्देशाने संबंध‍ित दिनदर्शिकेचे वाटप त्यांच्यापर्यंत करण्यात येत आहे.

दरमहा एका विभागाची माहिती
या दिनदर्शिकेत पीएमआरडीएने प्रत्येक विभागासंबंधी असलेली आवश्यक माहिती दिली आहे. यात १२ महिन्यांच्या या वार्षिक कॅलेंडरमध्ये तपशीलवार महिनानिहाय एका-एका विभागाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या माहितीयुक्त दिनदर्शिकेच्या प्रती लोकप्रत‍िन‍िधी यांच्यासह शासकीय कार्यालयांना पण पाठव‍िण्यात येत आहे. संबंध‍ित दिनदर्शिकेच्या प्रती लोकप्रत‍िन‍िधी, महत्वाच्या शासकीय कार्यालयांसह अध‍िकारी, कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी त्या पाठव‍िण्यात येत आहे.

बाणेर-बालेवाडीतील पदपथावरील अतिक्रमणे काढा:अमोल बालवडकर

पुणे- बाणेर आणि बालेवाडीतील पदपथ अतिक्रमण मुक्त करून पादचाऱ्यांना सुरळीत पणे चालू द्या अशी मागणी आज येथे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केली .

ते म्हणाले,’ आज बाणेर-बालेवाडी परिसरातील पदपथांवर वाढत चालेले अतिक्रमण व त्यामुळे नागरीकांना होणारा त्रास लक्षात घेवुन औंध-बाणेर वॅार्ड ॲाफिसचे क्षेत्रिय अधिकारी श्री.गिरीष दापकेकर यांना प्रत्यक्ष भेटुन बाणेर-बालेवाडी अतिक्रमण मुक्त पदपथ करण्यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी बाणेर-बालेवाडी परिसरातील सर्व पदपथांवर अतिक्रमण करणारे पथारीवाले, छोटे व्यावसायिक, खाद्य विक्रेते व टॅम्पोस्टॅाल, भाजीवाले यांच्यावर तातडीने कारवाई करुन हे सर्व पदपथ अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी केली.
यावेळी हे अतिक्रमण हटविण्यासाठी तातडीने “विशेष भरारी पथकाद्वारे” कारवाईला सुरुवात करुन सर्व अनधिकृत पथारीवाले, खाद्य विक्रेते व टेम्पो स्टॅाल, भाजीवाले यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन क्षेत्रीय अधिकारी श्री.दापकेकर यांनी दिले. पुढील एक आठवडा भरारी पथकाच्या सहाय्याने हि कारवाई सातत्याने बाणेर-बालेवाडी परिसरात करण्यात येईल असे देखिल त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील लाखो नागरिक होणार वीज बिलमुक्त:शेतकऱ्यांना 365 दिवस वीज उपलब्ध होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी योजना जाहीर करण्यात आली असून, यातून लाखो वीज ग्राहकांना वीज बिलमुक्ती मिळणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. प्रधानमंत्री सौरघर योजनेच्या धर्तीवर राज्यात नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना 365 दिवस वीज उपलब्ध होणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नवीन वीज धोरणांतर्गत स्मार्ट मीटर बसवणाऱ्या ग्राहकांना व जे दिवसा वीज वापरतील त्यांना 10 टक्के वीज दरात सवलत दिली जाणार आहे. हे ग्राहक आपल्या विजेच्या वापरावर अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेऊ शकतील आणि यामुळे राज्याच्या ऊर्जा बचतीला हातभार लागेल. जी वीज आपल्याला 8 रुपयांना पडत होती ती आता केवळ 3 रुपयांना पडणार आहे, म्हणजे यूनिटमागे 5 रुपये आपण वाचवत आहोत. याचा जवळपास 70 टक्के ग्राहकांना थेट फायदा होणार असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील 70 टक्के ग्राहक हे 0 ते 100 युनिट वीज वापरणारे आहेत. सरकारच्या नव्या योजनेनुसार, या ग्राहकांना सौरऊर्जा प्रकल्पांतर्गत वीज मोफत मिळणार आहे. सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे, ज्यामुळे दीड कोटी ग्राहकांना विजेबिलाचा भार सहन करावा लागणार नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या बळीराजा मोफत वीज योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, बळीराजा मोफत वीज योजना लागू करण्यात आली असून, याचा फायदा तब्बल 45 लाख कृषी पंपधारकांना होणार आहे. या योजनेसाठी सरकारने 14 हजार कोटी रुपये तरतूद केली आहे. यामध्ये शासनाच्या सबसिडीची 5,500 कोटींची बचत होणार आहे आणि एकूण वीज खरेदी खर्चात 10 हजार कोटी रुपयांची बचत या माध्यमातून होणार आहे.या योजनेमुळे कार्बन उत्सर्जनात 25 टक्क्यांची कपात होणार आहे. मुख्यमंत्री कृषी वाहिनी प्रकल्पाअंतर्गत, 2026 पर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण सौरऊर्जेवर आधारित वीजपुरवठा केला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना 365 दिवस वीज उपलब्ध होणार असून, विजेच्या किमतीत मोठी कपात होईल.

चेतन दिवाण हे शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सनराईज पुरस्काराने सन्मानित

पुणे: शैक्षणिक व संशोधन क्षेत्रामधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कर्वे समाज सेवा संस्थेच्या सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डीसएबिलीटीज चे अध्यक्ष सहा प्राध्यापक चेतन दिवाण यांचा राज्याचे माजी मंत्री श्री बबनरावजी पाचपुते यांच्या हस्ते तसेच सनराईज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष सतीश शिंदे तसेच सनराईज प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ राजश्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावर्षीचा शैक्षणिक योगदानाबद्दल सनराईज शैक्षणिक पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.

यावेळी सनराइज् ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या वतीने माजी मंत्री बबनरावजी पाचपुते यांना जीवनगौरव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्राध्यापक संदीप सांगळे यांना शैक्षणिक, ग्रामीण विकास केंद्र जामखेड चे ॲड डॉ अरुण जाधव यांना सामाजिक, नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांना प्रशासकीय सेवा, आमदार संग्राम जगताप यांचे बंधू तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप यांना कृषी, रुक्मिणी सहकारी बँक श्रीगोंदा चे चेअरमन सीए वसंतराव गुंड यांना बँकिंग, सुरज इंजीनियरिंग चे नानासाहेब शिंदे यांना उद्योजकता तसेच दैनिक प्रभात श्रीगोंदा चे तालुका प्रतिनिधी योगेश चंदन यांना पत्रकारिता या क्षेत्रातील कार्याबद्दल सनराईज पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.सहा. प्रा चेतन दिवाण यांच्या या पुरस्काराबद्दल कर्वे समाज सेवा संस्थेच्या वतीने संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री मधुकर पाठक, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक करळे, संचालक डॉ महेश ठाकूर, विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहेश्रीगोंदा येथे पार पडलेल्या या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक , पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

पाणी दूषित करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई होणार काय ?आ. पठारे यांचा सवाल

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात (ता. ७) आमदार बापूसाहेब पठारे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून मुळा-मुठा नदीच्या वाढत्या प्रदूषणाबाबत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना प्रश्न उपस्थित करत उपाययोजना करण्याची मागणी केली. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातून थेट नदीपात्रात सांडपाणी सोडले जात आहे. औद्योगिक वसाहतीतून निघणाऱ्या रसायनयुक्त पाण्यामुळे नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नदीतील हे पाणी शेतीसाठी अयोग्य आहे व त्यामुळे शेती नापिक होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच, या पाण्यामुळे येणारी पिके मानवी आरोग्यास धोका निर्माण करणारी आहेत.

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून सोडले जाणारे सांडपाणी महापालिकेच्या शुद्धीकरण प्रकल्पातून प्रक्रिया करूनच नदीत सोडणे, औद्योगिक वसाहतीतून नदीत सोडले जाणारे पाणीही शुद्ध करूनच सोडणे फार महत्त्वाचे आहे. महापालिकेने उभारलेले सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू राहिले पाहिजेत. मात्र, हे प्रकल्प दिवसा सुरू ठेवून रात्रीच्या वेळी बंद करून थेट नदीत प्रदूषित पाणी सोडण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत. संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, अशी मागणी पठारे यांनी केली.

पठारे यांच्या मागणीवर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सकारात्मक भूमिका दाखवली. तसेच, संबधित ठेकेदारांवर कारवाई करण्याबाबत आश्वासन दिले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात वीजबिलांपोटी ३११ कोटींची थकबाकी-महिन्यात ५१ हजारांवर थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

खंडित केलेल्या वीजजोडण्यांची स्वतंत्र पथकांद्वारे तपासणी सुरु

पुणे, दि७ मार्च २०२५: महावितरणच्या महसूलाचा आर्थिक स्त्रोत प्रामुख्याने वीजबिलांची वसूली हाच आहे. मात्र वारंवार आवाहन करून देखील वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने पुणे प्रादेशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडे ३१० कोटी ८४ लाख रुपयांची थकबाकी आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई सुरू असून गेल्या ३५ दिवसांच्या कालावधीत ५१ हजार ७३५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

यासोबतच थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांच्या तपासणीचे काम स्वतंत्र पथकांद्वारे सुरु आहे. यामध्ये शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून थकबाकीदार विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५/१३८ नुसार कारवाई करण्यात येत आहे.

थकीत वीजबिलांपोटी वीजपुरवठा खंडित करणे व खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यासाठी महावितरणचे सर्व अभियंता, अधिकारी, कर्मचारी सध्या ‘ऑन फिल्ड’ आहेत. पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे, मुख्य अभियंते सर्वश्री राजेंद्र पवार (पुणे), स्वप्निल काटकर (कोल्हापूर) व धर्मराज पेठकर (बारामती) उपविभाग व शाखा कार्यालयांना भेटी देऊन थकबाकी वसूलीचा आढावा घेत आहेत. वीजबिल थकीत असेल तर नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. त्यामुळे थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

पुणे प्रादेशिक विभागात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे सद्यस्थितीत पुणे जिल्हा- १९९ कोटी ९९ लाख रुपये, सातारा- २० कोटी ४० लाख रुपये, सोलापूर- ४४ कोटी ७ लाख रुपये, कोल्हापूर- २० कोटी ८० लाख रुपये आणि सांगली जिल्ह्यात २४ कोटी ९५ लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे गेल्या ३५ दिवसांमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ५१ हजार ७३५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये पुणे जिल्हा- ४२ हजार ७३, सातारा- १९२०, सोलापूर- ४२७९, कोल्हापूर- १४९० आणि सांगली जिल्ह्यातील १९७३ थकबाकीदारांचा समावेश आहे.

वीजग्राहकांना केव्हाही व कुठूनही ऑनलाइनद्वारे थकीत व चालू वीजबिल भरण्याची सोय www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध आहे. सोबतच ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवण्यासाठी शासकीय धोरणात सुधारणा गरजेची, आमदार रासनेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

  • मुख्यमंत्र्यांचे गृहनिर्माण आयुक्तांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश

पुणे (दि ७ मार्च): पुणे शहरातील विशेषत गावठाण भाग असणाऱ्या पेठांमधील जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी आमदार हेमंत रासने यांनी आग्रही भूमिका घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शासकीय धोरणामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे. ठाणे तसेच मुंबईमध्ये करण्यात आलेल्या सुधारित धोरणांच्या धर्तीवर पुणे शहरासाठी स्वतंत्र सुधारित धोरण राबवावे. सोबतच कसबा मतदारसंघाला संपूर्ण झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी प्रक्रिया देखील सुलभ करण्याची मागणी रासने यांनी केली आहे.

शहरातील अनेक वाड्यांचे बांधकाम अतिशय जिर्ण अवस्थेत असून नागरिकांना धोकादायक परिस्थितीत राहावं लागत आहे. विद्यमान नियमांमधील तांत्रिक अडथळ्यांमुळे वाड्यांच्या पुनर्विकास रखडलेला आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाणे शहरात राबवण्यात आलेल्या धोरणानुसार पुण्यासाठी स्वतंत्र धोरण राबवण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात यावी. यासाठी संबंधित विभागाची उच्चस्तरीय बैठक आयोजित करून हजारो नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय सोडवण्याला गती देण्याची मागणी रासने यांनी केली आहे. या मागणीवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून गृहनिर्माण आयुक्तांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याबद्दल बोलताना हेमंत रासने म्हणाले “पुणे शहर आणि कसबा मतदारसंघातील जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. नागरिकांना सुरक्षित आणि चांगल्या सुविधा मिळाव्यात तसेच पुण्यासाठी स्वतंत्र धोरण राबवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच योग्य कार्यवाही होईल”.

वडगावशेरी मतदारसंघातील बीआरटी मार्ग हटवण्याची आमदार बापूसाहेब पठारे यांची अधिवेशनात मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबई या ठिकाणी सुरू आहे. अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी, पुरवणी मागण्यांवरील चर्चेत वडगावशेरी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आमदार बापूसाहेब पठारे यांनी शासन दरबारी विविध मागण्या सादर केल्या.

यात प्रामुख्याने, पुणे-नगर रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण करणारा उर्वरित २५ टक्के बीआरटी मार्ग हटवण्याची ठोस मागणी पठारे यांनी केली. बीआरटी मार्गामुळे या भागातील अपघातांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांना वाहतुकीच्या मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बीआरटीमधील नियोजनाच्या त्रुटींमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन ज्याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होताना पाहायला मिळत आहे. या समस्येचा कायमस्वरूपी उपाय म्हणून बीआरटी मार्ग त्वरित हटवावा, अशी ठाम भूमिका आमदार पठारे यांनी विधानसभेत मांडली. सोबतच, शासनाकडे यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

या व्यतिरिक्त पठारे यांनी महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील आरोग्य केंद्रे, उपकेंद्रेही पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात द्यावी , ससुनच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या लोहगाव येथील उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू व्हावे. त्यात आणखी दोन मजले वाढवण्यात यावे, जेणेकरून १५० बेड्सची संख्या वाढेल व यासाठीही निधी उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील महिला भगिनींसाठी चर्चेसाठी अस्मिता भवनसारखे हॉल तसेच सांस्कृतिक भवन बांधण्यात यावेत, ताथवडे येथे असलेल्या १०० एकर सरकारी जागेवर मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहाच्या धर्तीवर विश्राम गृह सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभारण्यात यावे, ‘खराडी-मांजरी-कोलवडी खुर्द-श्री क्षेत्र थेऊर’ या नवीन मार्गासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच श्री क्षेत्र लोहगाव – निरगुडी येथून श्री क्षेत्र आळंदीला जोडणारा रस्ता करावा. इ. मागण्या मांडल्या.

कोरटकर, सोलापूरकर कुणालाही सोडणार नाही-

शाबासकी नको, पण बदनामी करू नका:एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला
मुंबई-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलेच तोंडसूख घेतले. विरोधकांनी आम्हाला शाबासकी देऊ नये, तसेच बदनामही करू नये. फितरत हमारी सहन करने की न होती, तो हिंमत आपकी बोलने की ना होती, असा शेर ते यासंबंधी आपल्या अंदाजात म्हणाले. कोरटकर असो किंवा सोलापूरकर सरकार महापुरुषांचा अवमान करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना म्हणाले की, राज्यपालांनी महाराष्ट्राचे सुस्पष्ट चित्र राज्यापुढे मांडले. आम्ही विक्रमी बहुमताने निवडून आलो. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आमची दमदार वाटचाल सुरू आहे. पण विरोधकांची कॅसेट उद्योग बाहेर गेल्यावरच अडकली आहे. विरोध भय्याजी जोशी यांच्या विधानाचे राजकारण करत आहेत. त्यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरणही दिले आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मीच केली होती. आमचे सरकार छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आदी महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना सोडणार नाही. अबू आझमी असो, प्रशांत कोरटकर असो किंवा राहुल सोलापूरकर यांनाही सोडणार नाही. शिंदे यांच्या या विधानाचे सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले.

बीडमध्ये झालेले कौर्य आपण सर्वांनी पाहिले. ही विकृती वेळीच ठेचून काढण्याची गरज आहे. अशा लोकांना जेरबंद केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. बदलापूर, स्वारगेट घटना घडल्या. नराधम लाडक्या बहिणींवर अन्याय अत्याचार करत आहेत. सरकार त्यांनाही सोडणार नाही. बदलापूरला झालेली कारवाई सर्वांनी पाहिली, असा सूचक इशाराही शिंदे यांनी यावेळी दिला.

एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला हाणला. ते म्हणाले, 2019 मध्ये सत्तेसाठी कुणी काय केले हे सर्वश्रूत आहे. वडिलांची छत्रछाया सोडून शत्रूंशी हातमिळवणी केली. काही नेते टूरिस्ट म्हणून येतात व जातात. पायऱ्यांवर चॅनेलचे बूम पाहून धूम ठोकतात. पण फितरत हमारी सहन करने की न होती, तो हिंमत आपकी बोलने की ना होती… अडीच वर्षांत आम्ही केलेली कामे लक्षात घ्या व पुढील 5 वर्षांचा अंदाज बांधा. आम्हाला तुमची शाबासकी नको, पण आमची बदनामी करू नका.

काँग्रेसने अंबादास दानवेंच्या खुर्चीखाली बॉम्ब ठेवल्याची कोपरखळीही शिंदे यांनी यावेळी ठाकरे गटाला मारली. ते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना उद्देशून म्हणाले, तुम्ही इतके मुद्दे मांडलेत, हे तुमचे शेवटचे अधिवेशन आहे का? तुमच्या मित्रपक्षाने तुमच्या खुर्चीखाली बॉम्ब ठेवला असला तरी आम्ही आहोत ना तुमचे मित्र, असे ते दानवेंना आपल्या गोटात येण्याचे सूचक संकेत देताना म्हणाले. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, विरोधक उद्योगांबद्दल बोलेले, पण हे करार कागदावर राहणारे नाहीत. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात परतीय गुंतवणूक देखील वाढली आहे. माझ्या काळात दोवासमध्ये साडे सात लाख कोटींचे करार झाले. आताही 15 लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात करण्यात आली आहे. सब्र का फल मिठा होता है. दीड ट्रिलियन गुंतवणूक फक्त एमएमआर रिजनमध्ये होत आहे. आमच्या सरकारने सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. आम्ही शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहिलो.