Home Blog Page 424

शेतकरी, महिलांसह सर्वसामान्यांचा विश्वासघात करणारा, कोणतीही दिशा, ध्येय, धोरण नसलेला पोकळ अर्थसंकल्प: हर्षवर्धन सपकाळ

  • लाडक्या बहिणींना कोडग्या सरकारने फसवले!
  • महाराष्ट्र आता थांबणार नाही, भाजपा युती सरकार राज्याला कर्जबाजारी करून देशोधडीला लावणार!
  • शेतकरी कर्जमाफी, शेतमालाच्या हमीभावाबाबत घोषणा नाही, शेतक-यांना मोफत विजेची घोषणा फसवी.
  • राज्यावर आठ लाख कोटींचे कर्ज, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, महाभ्रष्ट महायुतीने राज्याला दिवाळखोर केले.

मुंबई ; आजचा अर्थसंकल्प हा शेतकरी, महिलांसह सर्वसामान्यांचा विश्वासघात करणारा, कोणतीही दिशा, ध्येय, धोरण नसलेला पोकळ अर्थसंकल्प आहे. यातून कोणत्याही घटकाला काहीही फायदा होणार नाही. निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता सरकारने राज्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे. राज्यात आर्थिक बेशिस्तीचा कारभार सुरु असून आठ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज झाले असून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही म्हणणारे भाजपा युती सरकार राज्याला कर्जबाजारी करून देशोधडीला लावणार असेच दिसते आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

राज्याच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की राज्याचा हा अर्थसंकल्प फक्त शहरांसाठी बनवलेला आहे का? अर्थमंत्र्यांच्या भाषणात मेट्रो उड्डाणपूल भुयारी मार्ग, विमानतळं, कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा यांचाच बोलबाला आहे. पण राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला भेडसावणा-या महागाई, बेरोजगारी या मूलभूत समस्या सोडवण्याबाबत सरकारकडे काही ठोस धोरण किंवा उपाययोजना नाही. आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफी बद्दल एक शब्द ही नाही. शेतक-यांना मोफत वीज देण्याची घोषणा सुद्धा पोकळ असून आजही शेतक-यांना वसुलीसाठी वीज बिले पाठवली जात आहेत. शेतकरी सन्मान निधीत वाढ करण्याचे आश्वासन दिले पण अंमलबजावणी नाही. शेतक-यांच्या मेहनतीमुळे कृषीक्षेत्रामुळे विकास दर वाढला पण सरकारने शेतक-यांच्या मालाला भाव दिला नाही त्यामुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

शेतक-यांचा विरोध असतानाही शक्ती पीठ महामार्गाचा अट्टाहास करून भाजपा युती सरकार शेतक-यांना उद्ध्वस्त करू पहात आहे. समृद्धी महामार्गाने कोणाची समृद्धी झाली हे सर्वांना माहित आहे. त्याच लोकांची समृद्धी पुन्हा व्हावी यासाठी सरकार आपली शक्ती वापरत आहे. सरकारने जाहीर केलेले प्रकल्प, गुंतवणूक ही फक्त मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक या भागापुरताच असून राज्याचा मोठा भाग विकासापासून वंचितच आहे. त्याबाबत अर्थसंकल्पात साधा उल्लेखही नाही.

लाडकी बहीण योजनेतून महिन्याला २१०० रुपये देण्याची घोषणा आज अर्थसंकल्पातून होईल अशी अपेक्षा ठेवून बसलेल्या लाडक्या बहिणींची सरकारमध्ये बसलेल्या कोडग्या भावांनी निराशा केली आहे. जवळपास १० लाख भगिनींना योजनेतून वगळण्यात आले आहे. उद्योग धंद्याची वाढ ५.६ टक्क्यांवरून ४.९ टक्क्यांवर घसरली आहे. सेवा क्षेत्र ही घसरले आहे त्यामुळे रोजगार कमी झाले आहेत. परकीय गुंतवणूक वित्तीय क्षेत्रात आली आहे, औद्योगीक क्षेत्रात नाही ही अत्यंत काळजी वाढवणारी बाब आहे त्याबाबत अर्थसंकल्पात काही ठोस धोरण नाही.

आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार फक्त मुंबई पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर , कोल्हापूर या जिल्ह्यांची परिस्थिती चांगली आहे पण बाकी जिल्ह्यांची अवस्था दयनीय आहे. या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न देशाच्या सरासरी उत्पन्नापेक्षा कमी आहे. ५० लाख रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ऐकायला चांगले पण हे आकडे फक्त कागदावरच राहणार आहेत. महाराष्ट्रात बेरोजगारांच्ये फौजा आहेत. त्यांच्या हाताला नोकरी रोजगार नाही राज्यातील बेकारीचे चित्र अत्यंत भयावह आहे. राज्य सरकारची अडाच लाख रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी काहीच धोरण नाही.

अर्थसंकल्पाची सुरुवात करताना अर्थमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांना अभिवादन केले. शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारकाची अद्याप वीट रचली नाही आणि हे सरकार आग्र्यात स्मारक उभे करण्यास निघाले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा केली पण याच महापुरुषांचा अपमान करणा-या कोरटकर, सोलापूरकर व त्यांच्या पिल्लावळीवर कारवाई केली जात नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

विकसित महाराष्ट्राच्या पाऊलखुणा उमटविणारा अर्थसंकल्प! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : ” विकसित महाराष्ट्राच्या पाऊलखुणा राज्याच्या आजच्या अर्थसंकल्पातून राज्यातील जनतेपुढे आल्या. राज्याच्या शाश्वत विकासाची रूपरेषा पुढे आली असून, केंद्र सरकारच्या योजनांचा अधिकाधिक लाभ महाराष्ट्राला कसा मिळेल, हेही या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य आहे,” अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

ते म्हणाले,” शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, तरूण, विद्यार्थी, उद्योजकांना बळ देणारा व राज्याचा प्रादेशिक समतोल साधणारा अर्थसंकल्प असून, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेली महाराष्ट्राची घोडदौड अधिक दमदार होईल. मतदारांनी दाखवलेल्या अभूतपूर्व विश्वासाची जाणीव करून देणारा व महाराष्ट्राची सर्वांगीण आर्थिक प्रगती साधणारा आजचा अर्थसंकल्प अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी सादर केला.

  • राज्याच्या विकासचक्राला गती

शिक्षण, कृषि, मत्स्योद्योग, उद्योग, जलपर्यटन, ग्रामविकास, आदिवासी विकास, महिला सक्षमीकरण, पर्यावरण सुरक्षा, जलसंधारण, विमानतळांचे आधुनिकीकरण, मेट्रो, रेल्वे, रस्ते वाहतुकीतून मोठा रोजगार मिळणार असून राज्याच्या विकासचक्राला गती व चालना मिळेल.

  • 45 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज

मुख्यमंत्री बळीराजा योजनेत 45 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासह 27 जिल्ह्यांसाठी दिवसा वीज देण्याचा संकल्प तसेच पंतप्रधान सूर्यघर योजनेला बळकटी जनमानसावर दूरगामी परिणाम करणारा आहे.

  • लाडकी बहीण योजनेसाठी तरतूद

राज्यात नवीन गृहनिर्माण धोरण, लाडकी बहीण योजनेसाठी 36 हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आल्याने जनतेत संभ्रम निर्माण करणाऱ्या विरोधकांची बोलती बंद झाली.

  • आग्रा, संगमेश्वरात छत्रपतींचे स्मारक

छत्रपतींचे लखलखते शौर्य व प्रेरणादायी इतिहास सांगणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक आग्र्यात तसेच, कोकणातील संगमेश्वर येथे धर्मवीर छ. संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा संकल्प अभिमान वाढविणारा आहे. नाशिक कुंभमेळा लक्षात घेता नमामि गोदावरी अभियान, अभिजात मराठी सप्ताह समाधान देणारे आहे.

देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पसिद्धीला बळ देणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री अजित पवार

  • महाराष्ट्र आता थांबणार नाही..,विकास आता लांबणार नाही…’अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री पवार यांचा निर्धार.
  • शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास  क्षेत्रांसाठी भरीव तरतूद,
  • ‘विकसित भारत-विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा अर्थसंकल्प

मुंबई, दि. १० : ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही…’ असे सांगत शेती, शेतीपूरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असलेला, ‘विकसित भारत-विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा हा अर्थसंकल्प आहे. यातून देशांतर्गत, विदेशी गुंतवणूक, रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील. विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवण्यात अर्थसंकल्प यशस्वी होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा अकरावा अर्थंसंकल्प विधानसभेत सादर करताना व्यक्त केला. तसेच विधापरिषदेमध्ये वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी हा अर्थसंकल्प सादर केला.

उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, छत्रपती राजर्षि शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांचे स्मरण केले. शिखांचे नववे गुरु, श्री गुरु तेगबहादूर यांच्या हौतात्म्याचे हे 350 वे वर्ष आहे. स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई यांचे हे त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीवर्ष आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे. देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या आपल्या संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. याचाही कृतज्ञतापूर्वक उल्लेख त्यांनी केला.

राज्यात गुंतवणुकीला पोषक वातावरण असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या संकल्पपूर्तीला बळ देणारा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प आहे. औद्योगिक विकासात  राज्य सदैव अग्रेसर असून थेट विदेशी गुंतवणूकीच्या बाबतीतही देशात अव्वल आहे. जानेवारी, 2025 मध्ये  दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्य शासनाव्दारे एकूण 63 कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. त्‍याव्दारे येत्या काळात 15 लाख 72 हजार 654 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यातून सुमारे 16 लाख रोजगार निर्मिती होईल, असा अंदाज आहे. वस्तू व सेवा कर कायदा लागू होण्यापूर्वी राज्यकर विभागातर्फे राबविण्यात आलेल्या विविध कायद्यांनुसार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडे असलेली थकबाकीची तडजोड करण्याबाबतची अभय योजना उपमुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात जाहीर केली.  अभय योजनेचे नाव “महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क (सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यानी प्रदेय असलेल्या) यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत अधिनियम, 2025” असे असून या अभय योजनेचा कालावधी प्रस्तावित कायदा लागू झाल्याच्या दिनांकापासून दिनांक ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

ठळक वैशिष्ट्ये :

  1. राजकोषीय उत्तरदायित्व व वित्तीय व्यवस्थापन कायद्यानुसार राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3 टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यातही शासन यशस्वी ठरले आहे. तसेच राज्याची महसुली तूट ही सातत्याने स्थूल राज्य उत्पन्नाच्या 1 टक्क्यापेक्षा कमी राहिली आहे. सन 2025-26 ची राजकोषीय तूट 1 लाख 36 हजार ‍235 कोटी रुपये आहे.
  2. आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून, भांडवली खर्चातील वाढीद्वारे विकासचक्रास चालना देऊन राज्याच्या विकासदरात वाढ करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्याचे प्रयत्न आहेत. मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था १४० बिलीयन डॉलर वरुन सन २०३० पर्यंत ३०० बिलीयन डॉलर तर सन २०४७ पर्यंत १.५ ट्रिलीयन डॉलर पर्यंत नेण्याचे उद्दीष्ट आहे. मुंबई महानगर प्रदेशात हाती घेण्यात आलेल्या विविध पायाभूत सुविधांची कामे जसे की वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, बुलेट ट्रेन, मल्टीमोडल कॉरीडॉर, भुयारी मार्ग, मेट्रो प्रकल्प यामुळे हे क्षेत्र विकासाचे केंद्र ठरणार आहे.
  3. विकसित भारत- विकसित महाराष्ट्र ही संकल्पना साध्य करण्याकरीता “मेक इन महाराष्ट्र” व्दारे गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्राचे नवीन औद्योगीक धोरण आखण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षाच्या कालावधीत ४० लाख कोटी रुप यांची गुंतवणुक व ५० लाख रोजगार निर्मिती अपेक्षीत आहे.
  4. कृषी क्षेत्राच्या गेल्या वर्षीच्या निराशाजनक 3.3% विकास दराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना विविध योजना, कार्यक्रमांच्या माध्यमातुन आर्थिक सहाय्य दिल्यामुळे सन 2024-25 मध्ये कृषी क्षेत्राचा विकास दर 8.7% पर्यंत सुधारला. या विकास दरात सातत्याने वाढ करण्याकरीता शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, शेती उत्पादनात मूल्यवर्धन, सिचंन सुविधा, वीजेची गरज भागविण्यासाठी सौर ऊर्जा इत्यादी पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येतील.
  5. केंद्र पुरस्कृत योजनांच्या माध्यमातून राज्यास अधिकाअधिक केंद्रीय निधी प्राप्त व्हावा म्हणून विशेष प्रयत्न करण्यात येतील.
  6. वस्तु व सेवा करातुन राज्यास होणाऱ्या उत्पन्नात दरवर्षी सुमारे १२ ते १४ टक्के एवढी वाढ होत आहे.
  7. महत्वाकांक्षी योजनांना निधीचा सुरळीत पुरवठा होण्याकरीता केंद्रीय सहाय्य, आतंरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून सहाय्य , सार्वजनिक मालमत्तेचे मुद्रीकरण, योजनांचे सुसूत्रीकरण तसेच पायाभूत सुविधा गुंतवणूक न्यास सारखे नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.
  8. राज्यातील महामार्ग, बंदरे, विमानतळे, जलमार्ग, बस वाहतूक, रेल्वे आणि मेट्रो या सर्व दळणवळण क्षेत्रांसाठी पुरेशी अर्थसंकल्पीय तरतुद करण्यात आली आहे.
  9. दर्जेदार ग्रामीण रस्ते तसेच राज्य महामार्ग व जिल्हा रस्त्यांना सर्वाधिक आर्थिक पाठबळ देण्यात येत आहे.
  10. सर्वांसाठी घरे हे उद्दीष्ट येत्या 5 वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. ग्रामीण घरकुलांसाठी 15 हजार कोटी तर शहरी आवास योजनांसाठी 8 हजार 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
  11. नव्याने जाहीर केलेल्या योजनांसाठी पुरेशा तरतुदी केलेल्या आहेत. राज्याच्या वार्षिक योजनेत 62 हजार 560 कोटीची म्हणजेच सुमारे ३३ टक्के इतकी भरीव वाढ करण्यात आली असून अनुसूचीत जाती घटक योजनेच्या तरतुदीत 42 टक्के, आदिवासी घटक योजनेच्या तरतुदीत 40 टक्के वाढ करण्यात आली आहे.
  12. राज्यात सध्या राबविण्यात येत असलेल्या योजनांचे मुल्यमापन करुन त्यांचे सुसूत्रीकरण तसेच साधनसंपत्तीच्या स्त्रोतांचा अभ्यास करुन त्यामध्ये वाढ करण्याचे उपाय सुचविण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या शिफारशी विचारात घेऊन योजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
  13. थेट लाभार्थी हस्तांतरण (डीबीटी) सर्व वैयक्तिक लाभार्थी योजनांची अंमलबजावणी गतिमान, कार्यक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी डीबीटी पध्दत राबविण्यात येत आहे. दिनांक १ एप्रिल २०२५ पासून अशा वैयक्तिक लाभार्थी योजनांचा लाभ केवळ डीबीटी द्वारे देण्यात येईल.
  14. राज्याच्या सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पाठबळ देण्यात येत आहे अर्थसंकल्पात विविध स्मारके, तीर्थक्षेत्र विकास, पर्यटनस्थळ विकसित करण्याच्या विविध प्रकल्पांना भरीव तरतुद करण्यात आली आहे.
  15. राज्यातील जलपर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत.
  16. क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आणि खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी धोरणे आणि अर्थसंकल्पीय तरतुदी करण्यात आल्या आहेत.
  17. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसेच सार्वजनिक वितरण प्रणालीत स्मार्ट पीडीएस आणि ब्लॉक चेन तंत्रज्ञानाद्वारे अधिक पारदर्शकता आणण्यात येणार आहे.
  18. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या पार्श्वभूमीवर सहकार क्षेत्रातील महाराष्ट्राचे नेतृत्व अधोरेखित करण्यासाठी विविध महोत्सव व कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.
  19. राज्याचे सार्वजनिक आरोग्य धोरण आखण्यात येवून प्रत्येक व्यक्तीला 5 किलोमीटरच्या परिघात दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
  20. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अमंलबजावणी करण्यात येणार असून मुलींचा व्यावसायीक शिक्षणात सहभाग वाढविण्या करीता शिक्षण व परिक्षा शुल्काची 100 टक्के प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे.
  21. कायदेशीर खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी राज्यातील न्यायालयांच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे.

‘एमपीएससी’द्वारे विविध विभागातील रिक्त पदभरतीस गती देणार –माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई, दि. १०: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) होणारी भरती प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेळेत पार पडावी, तसेच विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी राज्य शासन ठोस पावले उचलत आहे. शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्यात येतात. ही पदभरती गतीने करण्याबाबत आणि बहुपर्यायी (मल्टीकॅडर) भरती प्रक्रियेत प्रतिक्षा यादी सुरू करण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विनंती करण्यात येईल, असे माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

याबाबत सदस्य अभिमन्यू पवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य जयंत पाटील, रोहित पवार, नाना पटोले यांनीही सहभाग घेतला.

उत्तरात माहिती व तंत्रज्ञान मंत्री शेलार म्हणाले, आयोगाच्या सदस्यांची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  राज्यातील भरती प्रक्रियेत होणारा विलंब टाळण्यासाठी, प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी अन्य राज्यांतील भरती पद्धतींचा अभ्यास करण्यासंदर्भात एक अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. या अभ्यासातून राज्यातील भरती प्रक्रियेत सुधारणा करून ती कालबद्ध आणि पारदर्शक करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या या धोरणात्मक निर्णयामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार असून, भरती प्रक्रियेमधील न्यायप्रविष्ट प्रकरणे कमी होतील. यादृष्टीने शासन प्रयत्न करीत आहे. २२ संवर्गासाठी राज्यसेवा परीक्षा २०२२ घेवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ६१४ उमेदवारांची शासनास शिफारस केली. शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी ५५९ उमेदवार कागदपत्र पडताळणीस हजर राहिले व ५५ उमेदवार कागदपत्र पडताळणीस गैरहजर राहिले. गैरहजर उमेदवारांना शासन नियुक्तीमध्ये स्वारस्य नसल्याचे दिसून येत असल्याने कारणे दाखवा ज्ञापन देण्यात आल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही भारतीय संविधानानुसार स्वायत्त संस्था असल्यामुळे आयोगाच्या स्तरावरुन परीक्षेची कार्यपध्दती व परीक्षेसाठी प्रतिक्षायादी ठेवण्याच्या अनुषंगाने सर्व निर्णय घेण्यात येतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन २०१४ च्या कार्यनियमावलीनुसार परीक्षेसाठीची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. संवर्गनिहाय स्वतंत्र परीक्षा घेण्यात आली, तर त्यासाठी प्रतिक्षायादी ठेवण्यात येते. बहुसंवर्गासाठी मिळून एकच सामायिक स्पर्धा परीक्षा घेण्यात आली, तर त्यासाठी प्रतिक्षायादी ठेवण्यात येत नाही.आयोगामार्फत बहुसंवर्गासाठी मिळून एकच सामायिक स्पर्धा परीक्षा घेतल्यानंतर, त्याचा सर्वसाधारण निकाल घोषित करुन उमेदवारांकडून संवर्गनिहाय पसंतीक्रम मागविण्यात येतो. उमेदवारांचा गुणवत्ता क्रम, पसंतीक्रम, तसेच प्रत्येक संवर्गासाठीचे सामाजिक व समांतर आरक्षण या सर्व बाबी विचारात घेवून त्यानुसार अंतिम निकाल घोषित केला जातो व शासनास शिफारस यादी पाठविण्यात येते. यानुसार राज्यसेवा परीक्षेकरीता आयोगाच्या कार्यनियमावलीतील क्र.१० मधील ८ (अ) नुसार प्रतिक्षायादी ठेवण्यात येत नाही.

विकसित महाराष्ट्र साकारणारा, लोकाभिमुख अर्थसंकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार, सामाजिक विकासाची पंचसूत्री

मुंबई, दि. १०: विकसित भारतासोबतच, विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करणारा, लोकाभिमुख असा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात शेती, उद्योग, पायाभूत सुविधांबरोबरच रोजगार आणि सामाजिक विकास अशी पंचसूत्री आहे. संतुलित अशा या अर्थसंकल्पाला अनुसरून आमची पुढील वाटचाल, असेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधान सभेत सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. पत्रकार परिषदेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित होते.

महाराष्ट्राचा विकासदर सर्वाधिक

राज्याचा हा अर्थसंकल्प संतुलित स्वरुपाचा आहे. यात राजकोषीय तूट २.७ टक्क्यांपर्यंत राखण्यात यश आले आहे. सरत्या वर्षात ही तूट २.९ टक्क्यांपर्यंत होती. महसूली जमा आणि खर्च यांचा उत्तम ताळमेळ राखला गेला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पाचे आकारमान आता सात लाख कोटींवर पोहचले आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे आता लोकसंख्येच्य तुलनेत उत्तर प्रदेशचा अपवाद केल्यास, सर्वात मोठा अर्थसंकल्प असणारे राज्य ठरले आहे. महाराष्ट्राची जीएसडीपी (सकल राज्य घरेलू उत्पादन) वाढ चांगली आहे. गेल्या दहा वर्षात हे प्रमाण ७.५ टक्क्यांवर पोहचले आहे. हे उत्पादन पाच ते दहा लाख कोटींनी वाढले आहे. त्यामुळे या प्रमाणात आपली कर्ज घेण्याची मर्यादाही वाढली आहे. त्यामुळे आपण विहीत कर्ज मर्यादेचे उल्लंघन केलेले नाही, हे देखील उल्लेखनीय आहे.

उद्योग क्षेत्राची भरारी

आपल्या उद्योग क्षेत्रानेही भरारी घेतली आहे. कोविड काळाचा अपवाद वगळल्यास हा वाढीचा दर चांगला आहे. आपले राज्य स्टार्टअपमध्ये क्रमांक एकवर आहे. जीसएसटी कर संकलनातही महाराष्ट्र पुढे आहे. राष्ट्रीय कर संकलनाच्या तुलनेत आपण सात टक्क्यांहून अधिक म्हणजे दिड लाख कोटींच्या पुढे आहोत. इतर राज्ये आपल्या मागे आहेत. औद्योगिक वाढ, विदेशी गुंतवणूक आणि स्टार्टअप आणि जीएसटीमुळे महाराष्ट्र यापुढेही अग्रेसर राहील, हा विश्वास आहे.

पायाभूत सुविधांचे प्रभावी नियोजन

राज्यातील पायाभूत सुविधांमध्ये रस्ते विकास हा महत्त्वाचा विषय आहे. आपल्या अर्थसंकल्पात रस्त्यांचा विकास हा पुढील वीस वर्षांचा विचार करून, नियोजनबद्धरित्या करण्यावर भर दिला गेला आहे. यामुळे रस्त्यांचा आराखडा गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत एक समान पद्धतीने होणार आहे. या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी आपण बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून निधी उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. वर्ल्ड बँक, एशियन बँक, न्यु डेव्हलपमेंट बँक आणि नाबार्डच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे उभरले जात आहे. यामुळे आपल्या राज्यात बंदरे, विमानतळांच्या विकासासाठीही मोठी गुंतवणूक येणार आहे.

घर बांधणीत महाराष्ट्रच अग्रेसर..

महाराष्ट्राने घर बांधणीच्या क्षेत्रात मोठी मजल गाठली आहे. या क्षेत्रातही मोठी गुंतवणूक आली आहे. विशेषतः प्रधानमंत्री आवास योजनेतून आपण आता वीस लाख घरांचा टप्पा गाठत आहोत. यातही केंद्र आणि राज्य यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधीचा ओघ राहणार आहे. यातील घरांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून वीजेसाठी स्वयंपूर्ण केले जाणार आहे. याशिवाय ज्या घरांचा वीज वापर तीनशे युनीटहून कमी असेल, त्यांनाही या योजनेतून वीज देण्याचे सुतोवाच आजच्या अर्थसंकल्पात केली गेली आहे.

शेती, सिंचन क्षेत्रालाही प्राधान्य

या अर्थसंकल्पात कृत्रिम बृद्धिमता- एआय आणि बायोटेक, ड्रोन टेक्नॉलॉजी सारख्या उत्पादन खर्च कमी करणाऱ्या आणि शेतीतील नफा वाढवणाऱ्या गोष्टींवर भर देण्यात आला आहे. एआयद्वारे माती परिक्षण ते फुल-फलधारणा यापर्यंतच्या टप्प्यांचे नियोजन करता येणारे शक्य आहे. त्याबाबतचे नियोजनही केले गेले आहे. जलयुक्त शिवार टप्पा दोन आणि नदिजोड प्रकल्पासाठी भरीव तरतूद केली गेली आहे.

लाडक्या बहिणी ते लखपती दिदी…

लाडक्या बहिणींसाठी निधी कमी पडणार नाही, असे नियोजन केले गेले आहे. याशिवाय या योजनेतून बहिणी आर्थिक स्वावलंबी व्हावेत असे नियोजन आहे. काही बहिणींनी या पंधराशे रुपयांतून सोसायटी स्थापन केल्या. या सोसायट्यांचे जाळे निर्माण करून, राज्यस्तरीय अपेक्स अशी सोसायटी स्थापन केली जाईल. याशिवाय आपल्याला लखपती दीदी या महिलांच्या स्वयंरोजगाराच्या संकल्पनेलाही पुढे न्यायचे आहे. आतापर्यंत आपण २३ लाख लखपती दीदींचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे. आणखी २४ लाखांचे उद्दीष्ट्य साध्य करून एक कोटी लखपती दीदींचे लक्ष्य गाठायचे आहे.

सामाजिक न्याय, आदिवासींचाही विकास

सामाजिक न्याय, आदिवासी विभागांच्या तरतुदीत भरीव वाढ करण्यात आली असून ती प्रत्येकी 43 व 40 टक्के एवढी आहे. सामाजिक न्यायाच्या धोरणाला बळ मिळेल. यात वैयक्तीक लाभाच्या योजना राबवल्या जाणार असल्यामुळे अनेक कुटुंबांना शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यासंदर्भातील लाभ निश्चितच होतील.

विकासाकडे जाताना रोजगार संधीवर भर देणारा अर्थसंकल्प आहे. यापुर्वी अर्थमंत्री म्हणून १३ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम दिवंगत शेषराव वानखेडे यांच्या नावावर होता. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री पवार यांनी अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. यापुढील वाटचालीत ते देखील हा विक्रम पूर्ण करून, अर्थसंकल्प सादर करतील, असा विश्वास आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद करून उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री पवार आणि वित्त राज्यमंत्री जयस्वाल यांचे अभिनंदन केले.

हे तर चॅम्पियन बजेट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या लोकाभिमुख योजना आणि पायाभूत सुविधा यांचा योग्य तो संतुलन राखणार हे चॅम्पियन बजेट उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी मांडले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या अर्थसंकल्पाविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

गेल्या अडीच वर्षांपासून विकासाची घोडदौड सुरू असून महाराष्ट्र आता थांबणार नाही हा निर्धार आजच्या अर्थसंकल्पातून व्यक्त होतो असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दिवंगत शेषराव वानखेडेंनंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळेस देखील हा अर्थसंकल्प मांडतांना समतोल राखत सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

अमेरिकेसारख्या प्रगत देशाचा विकास हा रस्त्यांमुळे झाला आहे. आजच्या अर्थसंकल्पात रस्ते, पूल, बंदरे अशा पायाभूत सुविधांच्या विकासासाठी चांगली तरतूद केली आहे असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले की, आजच्या अर्थसंकल्पात एकही क्षेत्र सोडलेले नाही. औद्योगिक विकासात महाराष्ट्र आघाडीवर असून तो आणखीही पुढे राहील त्याचप्रमाणे गुंतवणुकी मोठ्या प्रमाणावर येईल अशा तऱ्हेने या अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करण्यात आल्या आहेत.

मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्राची क्षमता दीड ट्रिलियन डॉलर्स योगदानाची आहे. समृद्धी, अटलसेतू सारखे गेम चेंजर प्रकल्प गेल्या अडीच वर्षांत पूर्ण झाले आहेत.

शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना आणखी लाभ होईल. अडीच वर्षांपासून आपण सिंचनाच्या प्रकल्पांना वेग दिला असून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी उचललेली पावलं अतिशय महत्त्वाची आहेत. गरीब, दुर्बल महिलांना केवळ लाडकी बहीण योजनेतून पैसे देऊन आम्ही थांबलेलो नाहीत तर त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी या बजेटमध्ये आम्ही तरतूद केलेली आहे. लाडकी बहीण योजना बंद करण्यात येणार असा अपप्रचार विरोधकांनी सुरू केला होता मात्र आम्ही या योजनेसाठी बजेटमध्ये 36 हजार कोटींची तरतूद करून बहिणींना मदत करण्याचा आमचा निर्धार कायम ठेवला आहे असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कुठल्याही प्रकारे या अर्थसंकल्पात योजनांना कात्री लावलेली नाही, उलट पायाभूत सुविधांच्या विकासांना या बजेटमध्ये वेग देण्यात आलेला आहे असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विकास हाच आमचा अजेंडा असून लोकांचे कल्याण हेच आमचे ध्येय आहे. विकसित भारत घडवण्यामध्ये विकसित महाराष्ट्राचं योगदान अधोरेखित करणारा हा अर्थसंकल्प आहे असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

महासमाधानी राष्ट्र निर्माण होण्याची गरज माजी सहाय्यक पोलीस आयुक्त भानूप्रताप बर्गे.

  • अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य वाटप.

पुणे : जे काम आपण करतो ते मनापासून करा. जी जबाबदारी आपल्याला दिली आहे, ती यथायोग्य पार पडायला हवी. तर महान राष्ट्र निर्माण होण्यासोबतच महासमाधानी राष्ट्र देखील निर्माण होईल. काम करुन समाधान मिळवणे यासारखे दुसरे कोणतेही कर्तव्य नाही. महासमाधानी राष्ट्र निर्माण होण्याची आज गरज आहे, असे मत माजी सहाय्यक पोलीस आयुक्त भानूप्रताप बर्गे यांनी व्यक्त केले.

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या वतीने माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाशशेठ धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त सदाशिव पेठेतील गोपाळ हायस्कूल मधील गरजू विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी नृत्यांगना वैष्णवी पाटील, कसबा गणपतीच्या दीपा तावरे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, गुरुजी तालीमचे प्रवीण परदेशी, तुळशीबाग गणपती मंडळाचे विकास पवार, केसरीवाडा गणपतीचे शैलेश टिळक, भाऊ रंगारी गणपतीचे  संदीप जावळे, विष्णू आप्पा हरिहर, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, अक्षय गोडसे, सतीश देसाई, गोपाळ हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक विजय पाटील, निलेश भिंताडे, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, उपाध्यक्ष निवृत्ती जाधव उपस्थित होते.

निवृत्ती जाधव म्हणाले, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणी येतात. अनेकांना शैक्षणिक साहित्य देखील मिळत नाही. शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत हक्क आहे, आणि कोणत्याही अडचणीमुळे त्याला अडथळा ठरु नये, यासाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

शैक्षणिक साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करुन विद्यार्थ्यांना देण्यात आले. तसेच २५० विद्यार्थी व पालकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन देखील करण्यात आले होते. कार्यक्रमात भारतीय खोखो संघाचे कर्णधार प्रतीक वायकर, सुयश गरगटे, आदित्य गणपुले, प्रशिक्षक शिरीन गोडबोले, प्राची वाईकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

सर्व क्षेत्रातील महिलांचे वाढते योगदान विकसित भारताचे स्वप्न साकार करेल प्रा.डॉ.संजय बी.चोरडिया यांचे प्रतिपादन

  • जागतिक महिला दिनानिमित्त ‘सूर्यदत्त’तर्फे ‘सूर्यदत्त स्त्रीशक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२५’

पुणे: जागतिक महिला दिनानिमित्त सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला, चित्रपटसृष्टीतील कलावंतांना सन्मानित करण्यात आले. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या हस्ते महिलांना ‘सूर्यदत्त स्त्रीशक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ देऊन गौरविण्यात आले. सर्व क्षेत्रातील महिलांचे वाढते योगदान विकसित भारताचे स्वप्न साकार करेल, असा विश्वास प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केला.

नक्षत्रा बोत्रे (ब्युटी अँड वेलनेस), पियुषा दगडे पाटील (महिला सक्षमीकरण व लोकसेवा), पल्लवी जगताप (शिक्षण सेवा), उज्वला मारणे (सामाजिक कार्य), लीना खंडेलवाल (उद्योजिका व प्रेरक वक्त्या), पौर्णिमा लुनावत (सामाजिक कार्य), साक्षी दगडे पाटील (युवा उद्योजिका), डॉ. रश्मी बापट (आरोग्यसेवा व महिला सक्षमीकरण), दुर्गा भोर (सामाजिक कार्य), अश्विनी धायगुडे-कोळेकर (पत्रकारिता व निवेदन), सीए श्रुति काबरा-मुंदडा यांना सन्मानित करण्यात आले.

‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमधील बन्सीरत्न सभागृहात या सोहळ्याचे आयोजन केले होते. प्रसंगी अभिनेता-दिग्दर्शक गणेश आचार्य, ‘सूर्यदत्त’चे मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, भारती विद्यापीठाच्या फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवीण जावळे, सागर पायगुडे, अभिनेता सुशांत थमके, अभिनेत्री विधी यादव, जाण्या जोशी आदी उपस्थित होते.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “महिलांना योग्य सन्मान देणे हे प्रत्येक पुरुषाचे कर्तव्य आहे. आपल्या आयुष्यात आई, बहीण, पत्नी, मैत्रीण अशा विविध रूपात महिलेचे योगदान मौल्यवान असते. त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. कुटुंबाला सांभाळून करिअर घडवण्याची क्षमता महिलांमध्ये असते. त्यांना योग्य सन्मान, संधी आणि व्यासपीठ मिळाले, तर महिला समाजाच्या व राष्ट्राच्या विकासात मोलाची भूमिका निभावतील. ‘सूर्यदत्त’ संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये स्त्री-पुरुष समानतेची बीजे रोवली जातात. भारतीय मूल्ये, संस्कृती आणि परंपरेचे ज्ञान येथील विद्यार्थ्यांना मिळत असल्याने त्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो.”

पल्लवी जगताप यांनी कवितेतून महिलांचे भावविश्व उलगडताना सांगितले की, शिक्षिका म्हणून मला माणूस, समाज घडविण्याची संधी मिळते याचा आनंद वाटत असल्याचे सांगितले. प्रत्येक मुलीला, महिलेला सन्मान देण्याचा संस्कार आम्ही देत आहोत. किशोरवयीन मुलांचे जीवन घडवण्यात शिक्षक मोलाची भूमिका बजावतात, असे त्यांनी सांगितले.

डॉ. रश्मी बापट म्हणाल्या, “आयुष्य साधे-सरळ जगता आले पाहिजे. जीवनात अडचणी येतील, पण त्यावर मात करून चांगले जगावे. जिजाऊ बनून शिवराय घडवण्याचे काम आपण केले पाहिजे. शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यावर आपण भर दिला पाहिजे. त्यासाठी योग्य व्यायाम, आहार याचा समतोल राखा.”

लीना खंडेलवाल म्हणाल्या, “महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज आहे. आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवून जिद्दीने स्वप्नपूर्तीया दिशेने काम करत राहिलो, तर येणाऱ्या आव्हानांवर मात करून यशाच्या मार्गावर जाता येते. त्यामुळे अपयशाने खचून न जाता सक्षमपणे उभे राहिले पाहिजे.”

पौर्णिमा लुनावत म्हणाल्या, “प्रत्येक महिलेमध्ये अफाट शक्ती असते. त्यांच्यातील कलागुणांना, क्षमतांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले, तर त्या सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करतात. मुलांसाठी आई हा आदर्श असते. त्यामुळे आपण मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी कार्यमग्न राहावे.”

दुर्गा भोर म्हणाल्या की, “स्वसंरक्षणासाठी महिलांनी सज्ज व्हायला हवे. कायद्याचे ज्ञान आत्मसात करून योग्य तिथे त्याचा वापर केला पाहिजे. प्रत्येकाने घरातील महिलेचा सन्मान करावा. महिलांनीही स्वतःला सर्वच बाजूनी सक्षम करण्यावर भर द्यायला हवा.”

उज्ज्वला मारणे यांनी स्त्री-पुरुष समानता अधिक महत्वाची असून, माझ्या प्रवासात पतीच्या खंबीर पाठिंब्यामुळेच मला सामाजिक कार्यात चांगले योगदान देता येत असल्याचे नमूद केले. 

अंतर्मनाची आणि बाह्यरूपाची सुंदरता अधिक महत्वाची आहे. महिलांनी या दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्यावे, असे नक्षत्रा बोत्रे यांनी सांगितले. प्रा. डॉ. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले.

ऊस तोडणी मशीन मालकांचे ठिय्या आंदोलन,मागण्या पूर्ण न झाल्यास साखर संकुल व मंत्रालयाला १३०० मशीन सहित घेरावा देण्याचा इशारा

पुणे : ऊस तोडणी मशीनचा तोडणीदर ५० टक्यांनी वाढवून देणे, बँकेचे हप्ते आहेत त्या परिस्थितीत ३ वर्ष मुदत वाढ मिळावी आणि पाचट कपात १.५ टक्के असावी. या सारख्या अनेक महत्वपूर्ण मागण्या पूर्ण करण्यासाठी सोमवारपासून शिवाजीनगर येथील साखर आयुक्त कार्यालायासमोर सकाळी ११. वाजल्या पासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील १३०० मशीन मालक आपल्या मशीन घेऊन साखर संकुल व मुंबई येथे मंत्रालयाला घेराव घालतील असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला. ‘दरवाढ आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची’ या घोषणांनी संपूर्ण साखर संकुल दणानून सोडणारे महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशिन मालक संघटनेचे आज शेकडो सदस्य ठिय्या आंदोलनाला बसले होते. या आंदोलनापूर्वी गेल्या बुधवारी साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले होते. मार्च महिन्यामध्ये मागण्या पूर्ण झाल्या नाही तर १० एप्रिल पासून साखर संकुलला घेराव देण्यात येईल. येवढे करूनही मागणी पूर्ण झाली नाही तर संपूर्ण राज्यातील मशीन मालक आपल्या मशीन घेऊन मुंबई येथे मंत्रालयाला घेरण्याचा इशारा दिला आहे. असे झाल्यास सर्व गोष्टीसाठी शासन जबाबदार राहिल. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय साळुंके यांनी सांगितले की, अनुदान संदर्भात मागणी सुरू करण्यापूर्वी आम्ही माजी साखरआयुक्त शेखर गायकवाड यांना निवेदन दिले होते. त्यांनी केवळ आश्वासन दिल्यामुळे आमच्यावर ही वेळ आली आहे. संघटनेचे सचिव अमोल राजे जाधव यांनी सांगितले, गेल्या पाच वर्षापासून आमच्या मागणीसाठी लढा देत आहोत. परंतू शासन केवळ अश्वासनच देत आहे. यावेळेस जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलनाचे स्वरूप उग्र करू.

महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेच्या वतीने ऊस मशीनचे तोडणीदर /वाहातूकदर वाढविणेबाबतची मागणी सुद्धा केली आहे. कृषी क्षेत्रातील प्रोत्साहन पर योजनेमुळे कृषी यांत्रिकीकरणात गतीने वाढ झाली आहे. यामुळे राज्यात ऊस तोडणी मशीन जवळपास १३०० मशीन कार्यरत असून यातील काहींना अनुदान मिळाले आहे. त्यातच २०१९ पासून जवळपास ९०० माशीनला अनुदान मिळालेले नाही. यासाठी वेळोवेळी आंदोलन करण्यात आले पण त्यांना न्याय मिळाला नाही. डिझेल वृद्धिमुळे एक टन ऊस तोडणीसाठी मशीनला जवळपास ३ लीटर डिझेल लागत असून २६० ते २८० रू. खर्च येतो. मशीन चालविण्यासाठी ऑपरेटर/इनफिल्डर ड्रायव्हर यांचे पगार, टना नूसार ऑपरेटिंग खर्च ८० रूपये येतो. दुरूस्ती, ग्रीस व स्पेअर पार्टससाठी प्रति टना नूसार १०० रूपये खर्च येतो. म्हणजेच एक टन ऊस तोडणीसाठी ४६० रूपये खर्च येतो. इकडे कारखाने आम्हाला ४५० ते ५०० रूपये देताता. आम्हाला आवक कमी असून बँकेचे हप्ते भरणे ही अवघड झाले आहे. आयुक्तांच्या जी.आर नुसार ४.५ टक्के पाचट कपात ही शेतकर्‍यांकडून ऊस तोडणीदार आणि वाहतूकदार यांच्याकडून एकूण १३.५ टक्के केली जात आहे. त्यामुळेच राज्यातील सर्व मशीन मालकांची ही समस्या लवकर सोडवावी अशी मागणी संघटनेने केली आहे.
आंदोलनात महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेचे सचिव अमोलराजे वसंतराव जाधव यांच्या सहित आंदोलनात संजय साळुंके( सातारा), सागर पाटील (सांगली), गणेश यादव (पुणे), जगन्नाथ सपकाळ (लातूर), अभय कोल्हे व धनंजय काळे (धाराशिव), जयदीप पाटील (सांगली) तुषार पवार (सांगली) सहित राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मशीन मालक सहभागी झाले होते.

दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांची इंडस्ट्री होणे गरजेचे – ध्यानमूर्ती रघुनाथ गुरुजी

  • दिव्यांगांच्या आंतरशालेय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

णे, प्रतिनिधी – दिव्यांग मुलांच्या कलेला वाव देण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत दिव्यांग आणि इतर विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. दिव्यांग मुलांसाठी आयोजित आंतरशालेय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 350 हून अधिक विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. तर 1500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सहभाग नोंदवला. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे या भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेतून प्रत्येक गटातील सर्वोत्तम पाच बालचित्रकारांच्या चित्रांची निवड करण्यात आली. तिन्ही गटांतील पंधरा सर्वोत्कृष्ट बालचित्रकारांना न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या सभागृहात आयोजित पारितोषिक वितरण कार्यक्रमात पंधराशे रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी डिकाईचे संस्थापक ध्यानमूर्ती रघुनाथ येमुल गुरुजी, बिव्हिजी ग्रुपचे संचालक हनुमंत गायकवाड, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दिलीप कोटीभास्कर, सक्षम पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष ॲड. मुरलीधर कचरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ध्यानमूर्ती रघुनाथ येमुल गुरुजी म्हणाले की, दिव्यांगांना आत्मसन्मानाने जगण्यासाठी सरकारने इंडस्ट्री सुरू करावी. सहज पद्धतीने तयार करता येणारे प्रॉडक्ट जसे की फिनेल निर्मिती अथवा सोप्यापद्धतीने बनविण्यात येणाऱ्या गोष्टी शासनाने दिव्यांगांकडून खरेदी कराव्यात त्यासाठी त्यांना विशेष तज्ञांकडून प्रशिक्षण देऊन त्यांचे जगणे सुलभ करावे. सार्वजनिक शौचालये अथवा शासकीय कार्यालयात स्वच्छतेसाठी लागणाऱ्या फिनेलची निर्मिती ‘डिकाई’तर्फे करून या माध्यमातून त्यांची आर्थिक उन्नती करणार आहे. दिव्यांगांना टाटा, अंबानी सारखे उद्योजक बनवायचे असतील तर शासनाबरोबर समाजातील चांगल्या लोकांनी एकत्र येत त्यांना पाठिंबा दिला पाहिजे.

येमुल गुरुजी यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेली ‘डिकाई’ ही संस्था असून, रघुनाथ गुरुजी यांच्या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग मुलांच्या शैक्षणिक, आत्मिक व सामाजिक उन्नतीसाठी कार्यरत आहेत. 

 स्पर्धेच्या संयोजनासाठी डिकाईचे सेक्रेटरी शेखर यादव आणि रमणबाग प्रशालेचे उपमुख्याध्यापक जयंत टोले यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर कोष्टी यांनी केले त्याचबरोबर कार्यक्रमाचे संयोजन नाट्यकर्मी रवींद्र सातपुते व रमण बाग प्रशालेतील चित्रकला शिक्षिका श्रीमती अंजली मालुसरे यांनी केले. या सर्व कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका चारुशीला प्रभूदेसाई व शाळा समिती अध्यक्ष डॉ. शरद आगर खेडकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

टीम इंडियाने 12 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली:न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव, रोहितच्या नेतृत्वाखाली 9 महिन्यांत दुसरे ICC जेतेपद

दुबई : टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ४ विकेट्सने हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने ४९ व्या षटकात २५२ धावांचे लक्ष्य गाठले.रोहित शर्माने कर्णधारपदाची खेळी करत ७६ धावा केल्या. श्रेयस (४८ धावा), केएल राहुल (नाबाद ३४ धावा) आणि अक्षर पटेल (२९ धावा) यांनी धावांचा पाठलाग करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.गोलंदाजीत कुलदीप यादवने सर्वात मोठी भूमिका बजावली, कारण त्याने दोन षटकांत दोन बळी घेत सामना भारताच्या बाजूने आणला. त्याने रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल (६३ धावा) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

भारताने अखेर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत पाकिस्तानसह सर्व टीकाकारांची तोंडं बंद केली. रोहित शर्माने कर्णधाराला साजेशी खेळी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये साकारली आणि संघाला विजेतेपद मिळवून दिले. रोहित शर्माच्या चाणाक्ष नेतृत्वामुळे भारताने न्यूझीलंडला २५१ धावांत रोखले. भारतीय संघ विजयासाठी २५२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आणि त्याानंतर रो’हिट’ शो सर्वांना पाहायला मिळाला. कारण रोहित शर्माने एकहाती तुफानी फटकेबाजी केली आणि भारताला सामना जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. श्रेयस अय्यरनेही यावेळी ४८धावा केल्या खऱ्या, पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. पण तरीही भारताने हा सामना जिंकला. भारताचे हे तिसरे चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद आहे. त्याचबरोबर भारताने न्यूझीलंडचा २५ वर्षांपूर्वीचा बदला या विजयासह घेतला आहे. कारण २००० साली न्यूझीलंडने भारताला नमवत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. भारताने यावेळी चार विकेट्स राखून न्यूझीलंडला पराभूत केले आणि विजेतेपद आपल्या नावावर केले.

भारत-न्यूझीलंड सामन्याचा स्कोअरबोर्ड

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.

न्यूझीलंड: मिशेल सँटनर (कर्णधार), विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, नॅथन स्मिथ, काइल जेमिसन आणि विल्यम ओरूर्क.

न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताचा संघ मैदानात उतरला खरा, पण पहिल्याच षटकापासून रोहित शर्माने आपले इरादे स्पष्ट केले होते. यावेळी शुभमन गिल हा फक्त रोहित शर्माची फटकेबाजी पाहण्याचे काम करत होता. कारण रोहित शर्मा आपल्या पोतडीतून एकामागून एक फटके काढत होता. रोहित शर्माने आपले अर्धशतक झळकावले आणि तो शतकाच्या दिशेने कूच करायला लागला होता. रोहितला श्रेयस अय्यर चांगली साथ देत होता. पण यावेळी फिरकीपटूंनी या दोघांवर दडपण आणले आणि रोहित शर्मा मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. रोहितने यावेळी सात चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ७६ धावांची दमदार खेळी साकारली.

औरंगजेबाचा कारभार आणि फडणवीसांचा कारभार सारखाच, राजीनामा फडणविसांनीच दिला पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ.

बीडकरांचा एकच नारा, ‘जातीपातीला नाही थारा’, घोषणा देत हजारोंचा समुदाय सामाजिक सद्भावनेसाठी एकवटला.

सद्भावना पदयात्रेने, राहुल गांधींचा ‘नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान’, संदेश पोहचवण्याचे काम झाले: बाळासाहेब थोरात

सद्भावना यात्रेच्या दुसऱ्या दिवशीही कार्यकर्ते व जनतेचा प्रचंड उत्साह, जागोजागी पदयात्रेचे स्वागत.

राज्यात सामाजिक सौहार्द वृद्धींगत करण्यासाठी काँग्रेस परभणीमध्ये शिव- भीम यात्रा काढणार.

बीड/मुंबई, दि. ९ मार्च २०२५
औरंगजेबाने वडिलाला कैद करून, भावाचा खून करून राज्य मिळवले. देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाला आणि कायदा सुव्यवस्थेला कैद करून ठेवले आहे. औरंगजेबाचा कारभार आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार सारखाच आहे. असा ह्ल्लाबोल करत संतोष देशमुख भाजपाचा कार्यकर्ता होता, त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली पण भाजपाचे प्रांताध्यक्ष देशमुख यांच्या घरी गेले नाहीत. पण विरोधी पक्षाचा प्रांताध्यक्ष जाऊन भेटतो हा भाजपा व काँग्रेसच्या विचारातील फरक आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

मस्साजोमधून निघालेली सद्भावना पदयात्रा दोन दिवस व ५१ किलोमीटरचा प्रवास करून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सद्भावना मेळाव्याने सांगता झाली. यावेळी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, हिमाचल प्रदेशच्या प्रभारी खा. रजनीताई पाटील, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल बाबा पाटील, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, रविंद्र दळवी, खा. डॉ. कल्याणराव काळे. खा. डॉ. शिवाजी काळगे, ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेश वरपुडकर, माजी मंत्री वसंत पुरके, आ. राजेश राठोड, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, इंटकचे अध्यक्ष कैलास कदम, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश सरचिटणीस आबा दळवी, अमर खानापूरे, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनावणे, जालना काँग्रेसचे कार्याध्यक्ष भगवानगडाचे विश्वस्त राजेंद्र राख, एस. सी. विभागाचे सिद्धार्थ हत्तिअंबिरे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, बीड जिल्हा आज सुरक्षित नाही तर उद्या शेजारचे जिल्हेही सुरक्षित राहू शकणार नाहीत याची काळजी घ्यावी लागणार आहे. भाजपाने राज्यात द्वेष पसरवण्याचे काम केले त्याला सद्भवानेने उत्तर द्यावे लागणार आहे. आधी ‘पन्नास खोके, एकमद ओके’ असे होते, पुन्हा ‘बोल मेरे आका’, आले आणि आता ‘खोक्या’ समोर आला आहे. फडणवीस गृहमंत्री आहेत पण ते बीड प्रकरणावर बोलत नाहीत, दुसऱ्याला पुढे करतात. राजीनामा हा धनंजय मुंडे यांचा घेतला पण खरे पाहता संतोष देशमुख हत्येप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचाच राजीनामा झाला पाहिजे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची वाईट अवस्था पाहिली असता घाशीराम कोतवाल हाच महाराष्ट्राचा कारभार चालवत आहे, असे सपकाळ म्हणाले.
बीड जिल्ह्यातील सद्भावना यात्रा संपली असली तरी हा आगाज सुरुच राहणार आहे. लवकरच परभणीमध्ये शिव- भीम यात्रा काढली जाणार आहे. राज्यात सामाजिक तेढ वाढत आहे. त्याला छेद देण्यासाठी सद्भावना वाढीसाठी प्रयत्न केला जाणार आहे आणि आज महाराष्ट्राचे जे चित्र आहे बदलायचे आहे, असे काँग्रेस प्रांताध्यक्ष म्हणाले.

सद्भावना पदयात्रेचा संदेश हा जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे हा होता. हा संदेश सर्वापर्यंत पोहोचवून आपल्याला सद्भावना वाढवायची आहे. पांडुरंगाच्या वारीच्या निमित्ताने सर्व बहुजन एकत्र आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून अत्याचा-यांविरोधात लढले. आताही सर्वांना मिळून अत्याचा-यांविरोधात लढायचे आहे. महात्मा गांधीचा काँग्रेसचा विचार पुढे घेऊन जायचा आहे. मी सद्भावना यात्रा सुरु केल्यावर माझ्यावर टीका सुरु झाली. सामाजिक विभाजनाच्या विरोधात उभे राहिल्यामुळे माझ्यावर टीका सुरु केली जात आहे. ट्रोल केले जाईल, धमक्याही दिल्या जातील, खरेदी करण्याचा प्रयत्नही केला जाईल, अडथळे आणले जातील पण या सर्वांवर मात करून आम्ही सामाजिक एकोपा जपू, सद्भावना वाढवू आणि राजकीय फायद्यासाठी तणाव निर्माण करणा-यांविरोधात लढू, हा काँग्रेसचा विचार आहे, आम्ही तो जपू असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, सद्भावना पदयात्रेने, ‘नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान’ हा राहुल गांधी यांचा संदेश हर्षवर्धन सपकाळ यांनी पोहचवला आहे. बीड जिल्हा हा सद्भावना जोपसणारा आहे. बीड जिल्ह्याची आजची जी परिस्थिती आहे ती कधीच अशी नव्हती. सर्वांना सोबत घेऊन जाणारा हा जिल्हा आहे. विठ्ठलाच्या वारीत जसा वारकरी एका ऊर्जेने चालतो तीच ऊर्चा या पदयात्रेत दिसली. संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूरपद्धताने करण्यात आली. राज्यघटना हे आपले तत्वज्ञान असेल तर तिथे समाजात भेदभावाला स्थान नाही. मानव धर्म हा खरा धर्म व विठ्ठल हा त्यांचा देव आहे. राज्यात पुरोगामी विचार संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकशाहीला व संविधानाला धोका हा तो वेळीच ओळखा असे आवाहन करून संतोष देशमुखांच्या गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी थोरात यांनी केली.

सद्भावना यात्रेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात नेकनूर येथील संत श्री बंकटस्वामी महाराजांना वंदन व ध्वजारोहण करून झाली, त्यानंतर मांजरसुंभा येथे कॅार्नर बैठक घेण्यात आली, दुपारच्या विश्रातांनीनंतर पदयात्रा पुन्हा सुरु झाली व सायंकाळी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सद्भावना मेळाव्याने या पदयात्रेची सांगता झाली. दोन दिवसाच्या या पदयात्रेत सेवालदाच्या शेकडो कार्यकर्त्यांचे पथक झेंडा घेऊन पदयात्रेत सहभागी झाले होते. बीड शहरात पदयात्रेदरम्यान प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभिवादन केले. यावेळी बीडकरांचा एकच नारा, ‘जातीपातीला नाही थारा’, अशा घोषणा देत हजारोंचा समुदाय सामाजिक सद्भावनेसाठी एकवटला होता.
जालन्याचे खा. डॉ. कल्याणराव काळे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, राजेंद्र राख सामाजिक कार्यकर्त्या सुशिलाताई मोराळे यांनीही सद्भावना मेळाव्याला संबोधित केले. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनावणे यांनी सूत्रसंचालन केले.

गांधीजींचा फोटो वापरला जातो पण विचार नाही त्यामुळे अधोगती:पर्यावरणतज्ज्ञ आणि वैज्ञानिक सोनम वांगचुक

पुणे : देशातील सगळे राजकीय पक्ष आणि नेते महात्मा गांधी यांचा गौरव करतात. मात्र, त्यांचे विचार कोणी आचरणात आणत नाही. स्वच्छ भारत अभियानात गांधीजींचा फोटो वापरला जातो. हे चांगले आहे. मात्र, त्यांच्या विचारांना अनुसरून काम केले जात नाही. सर्व राजकीय पक्षांनी सोयीने गांधींचे विचार घेतले आहेत. राजकीय पक्षांनी गांधींकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, अशी अपेक्षा लेह-लडाख येथील पर्यावरणतज्ज्ञ आणि वैज्ञानिक सोनम वांगचुक यांनी रविवारी व्यक्त केली.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे कोथरूड येथील गांधी भवन येथे आयोजित तीन दिवसीय गांधी विचार साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. पॉप्युलर प्रकाशनाचे संस्थापक, लेखक आणि गांधीवादी विचारवंत रामदास भटकळ यांचा संमेलनाध्यक्ष सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, स्वागताध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, संस्थेचे विश्वस्त डॉ. शिवाजीराव कदम, सचिव अन्वर राजन, एम. एस. जाधव, सुनील पाटील, रवींद्र धनक, रमेश आढाव उपस्थित होते. समारोप सत्राला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
वांगचुक म्हणाले, लडाखमध्ये निसर्गाच्या विरोधात खोदकाम सुरू आहे. त्यामुळे तेथील नैसर्गिक संपत्ती धोक्यात आली आहे. याविरोधात आम्ही आंदोलन करताना आम्हाला पुण्यातून समर्थन मिळाले. लेह-लडाखमधील लोक, जंगल, नदी, निसर्ग, प्राणी या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देण्यासाठी मी आलो आहे. आम्ही अडचणीत होतो तेव्हा तुम्ही आमचा आवाज झालात. मी गांधींच्या विचारांचा अभ्यासक किंवा गांधीवादी नव्हतो. पण, या आंदोलनामुळे मी अपघाताने गांधीवादी झालो. शंभर वर्षांपूर्वी महात्मा गांधींनी हेच काम केले. त्यांच्याशी मिळतेजुळते काम करता येणे हाच गांधीवाद आहे. दरम्यान, मुख्य मांडवाबाहेर थांबूनही अनेक नागरिकांनी वांगचुक यांच्या भाषणाचा आनंद घेतला. वांगचुक यांच्या भाषणाला टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत त्यांना अभिवादन करण्यात आले. या भाषणासाठी पुणेकरांची तुडुंब गर्दी झाली होती.
भटकळ म्हणाले, गांधी साहित्य संमेलनात माझा सत्कार झाला याचा खूप आनंद झाला आहे. तीन दिवस मी सगळी सत्रे ऐकली. यातील विचार ऐकून येथे येण्याचे सार्थक झाले. गांधी विचारांइतकेच गांधी विचारांचा आचार जास्त महत्त्वाचा आहे. गांधी अखेरपर्यंत विद्यार्थी राहिले. त्याप्रमाणे आपणही सतत त्यांचे विचार समजून घेतले पाहिजे. गांधी किंवा कोणत्याही थोर नेत्याचे तत्त्वज्ञान समजून न घेता लोक बोलतात. ते चुकीचे आहे.
सप्तर्षी यांनी मनोगत व्यक्त करताना या संमेलनाची भूमिका मांडली. संमेलनाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करताना या संमेलनाचे सार सांगितले. द्वादशीवार म्हणाले, सर्व जाती, धर्म, भाषा या भिंती बाजूला पडतील तेव्हा आपण गांधीवादी होऊ.
अन्वर राजन यांनी प्रास्ताविक केले. स्वाती महाळंक यांनी सूत्रसंचालन केले. लक्ष्मीकांत देशमुख यांनी आभार मानले.
पर्यावरणाचे संतुलन बिघडले
महात्मा गांधींना अभिप्रेत शिक्षण व्यवस्था आम्ही उभी केली आहे. प्रशिक्षण आणि कार्यानुभवातून मिळणारे शिक्षण गांधींना अपेक्षित होते. आज शिक्षण केवळ पैसे कमावण्यासाठी झाले आहे. संपत्ती निर्माण करून आपण पर्यावरणाचे संतुलन बिघडवत चाललो आहोत. पर्यावरणाबद्दल जग आत्ता जागे झाले पण गांधीजी शंभर वर्षांपूर्वी पर्यावरणाचा विचार करत होते. वीज निर्माण करण्यासाठी कोळश्याऐवजी सौरऊर्जा, पाणी, वारा हे उपाय शोधले जात आहेत पण मूळ आपण आपली ऊर्जेची गरज कमी केली पाहिजे. निर्मिती वाढवण्यापेक्षा गरज कमी केली तरच पर्यावरणाचे संतुलन राहील. तसे केले नाही तर सौरऊर्जा, पाणी, वारा हे सुद्धा कमी पडेल, असे सोनम वांगचुक यांनी सांगितले.

चित्रपटांप्रमाणे मराठी मुक्त संगीतालाही अनुदान मिळावे; कलाकारांची मागणी

पहिला मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स सोहळा पुण्यात संपन्न

चित्रपटेतर (नॉन फिल्म) संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा ‘संगीतरत्न’ या जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

पुणे, दि. ९ मार्च, २०२५: स्वतंत्र संगीताला चित्रपटांचा आधार नसतो, येथे कलाकार आपण कसे व्यक्त व्हायचे हे स्वत: ठरवतो. त्यामुळे मराठी मुक्त संगीताला स्टार्ट अप असल्यासारखे समजून त्याची सरकार दरबारी नोंद व्हावी आणि मराठी चित्रपटांना जसे अनुदान मिळते तसे अनुदान मराठी मुक्त संगीताला मिळावे अशी अपेक्षा सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांनी व्यक्त केली. संगीतकार अजय नाईक आणि कौस्तुभ दबडगे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र कलामंच व जस्ट कोलॅब यांच्या वतीने आयोजित पहिल्या मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स सोहळ्यात त्या बोलत होत्या.

एरंडवणे येथील शकुंतला शेट्टी सभागृहात संपन्न झालेल्या मराठी इंडी म्युझिक अवॉर्डस् (मिमा) सोहळ्यात चित्रपटेतर (नॉन फिल्म) संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल यावेळी ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांच्या हस्ते ‘संगीतरत्न’ या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मुक्त संगीतातील प्रयत्नांना सरकारी अनुदान मिळाले तर त्यांचा प्रसार जगभर होईल असा विश्वास व्यक्त करीत वैशाली सामंत म्हणाल्या, “आम्ही संगीतातील वेडे मुशाफिर आहोत. या पुरस्काराने आम्हा सर्वांनाच आज एक छोटासा किनारा मिळाला याचे समाधान आहे. आम्ही केलेल्या श्रमाला व्यासपीठ मिळतंय ही आश्वासक गोष्ट आहे.”

पुढचा मिमाचा सोहळा आपण मुंबईत करू आणि त्याला मुख्यमंत्र्यांना घेऊन यायची जबाबदारी माझी असे आश्वासन यावेळी प्रसाद लाड यांनी दिले. ते पुढे म्हणाले की, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर सर्वदूर मराठीचे वातावरण आहे, या पार्श्वभूमीवर अशोक पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी मुक्त संगीताला अनुदान मिळावे यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे येत्या २० तारखेआधी आम्ही निवेदन देऊ.”

‘राधा ही बावरी’ या गाण्याच्या आठवणी सांगताना अशोक पत्की म्हणाले, “गाणे जन्माला आले तेव्हा त्याचे शब्द वेगळे होते. हे शब्द मला पटत नाहीयेत आणि तुम्ही गाणे लिहा असा मला स्वप्नील बांदोडकर यांचा फोन आला लागोलाग तो भेटायलाही आला. मी संगीतकार आहे गीतकार नाही हे मी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने हट्टच धरला होता. शेवटी त्याच रात्री धून सुचली आणि गाणे लिहिले.” ‘राधा ही बावरी’ या गाण्याने मी गाणे लिहू शकतो असा मोठा धीर मला दिला असे अशोक पत्की मिश्कीलपणे म्हणाले.

आजकालच्या जमान्यात शिक्षण हे सगळीकडून सतत मिळत असते. पण संस्कार काही मिळत नाहित. आम्ही सर्वच दिग्गज कलाकारांनकडून संगीताचे शिक्षण घेतले. पण पत्की काकांनी आमच्यावर शिक्षणापेक्षा जास्त संस्कार केले. आज हेच संस्कार आमच्या सोबत आहेत. जे शिकलात ते पुढच्या पिढीला द्या हा यातलाच एक महत्त्वाचा संस्कार आहे, असे पुरस्काराला उत्तर देताना अवधूत गुप्ते म्हणाले.

आम्ही या क्षेत्रात २५ हून अधिक वर्षे आहोत मात्र मुक्त संगीतासाठी असा पुरस्कार नव्हता. चित्रपटेतर संगीतासाठी या निमित्ताने एक नवीन प्रवास सुरु होणार असून नव्या पिढीच्या संगीतकार व गीतकारांना याद्वारे नवी उमेद मिळेल, असे स्वप्नील बांदोडकर म्हणाले.

कार्यक्रमात प्रसिद्ध गायक-संगीतकार अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर यांना ‘मराठी इंडी म्युझिक आयकॉन’ पुरस्काराने गौरविले गेले. याबरोबरच पं रघुनंदन पणशीकर, आनंद भाटे आणि पं. संजीव अभ्यंकर यांना शास्त्रीय संगीत विभागात सर्वोत्कृष्ट गायक पुरस्काराने तर जीवन धर्माधिकारी आणि विवेक काजवेकर यांना संगीत संयोजन विभागासाठीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याशिवाय पहिले आयकॉनिक मराठी इंडी सॉंग म्हणून ‘गारवा’ या गाण्यासाठी कवी सौमित्र आणि संगीतकार मिलिंद इंगळे यांचा तर पहिला आयकॉनिक इंडी मराठी शो म्हणून ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमासाठी संगीतकार-गायक जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संदीप खरे व सलील कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले.

खान्देशी, अहिराणी, आगरी, कोळी, कोकणी, मालवणी या सर्व भाषांतील गाण्यांसोबतच मराठी मधील ‘पॉप’ संगीत भावगीते, भक्तिगीते, लोकगीते, शास्त्रीय, उपशास्त्रीय अशा अनेक शैलींमध्ये गाण्यांना देखील विविध विभागांमध्ये मराठी इंडी म्युझिक अवॉर्डस् (मिमा) सोहळ्यामध्ये गौरविण्यात आले. आर जे राहुल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

बेरोजगारीविरोधात मेट्रोलाईनवर आंदोलन: आंदोलकांनी पोलिसांच्या अंगावर पेट्रोल फेकल्याचा आरोप,आंदोलक नेत्याची पक्षातून हकालपट्टी

 पुणे -महापालिका कार्यालयासमोर असणाऱ्या मेट्रो स्थानकावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला. स्त्रियांवर होणारे अत्याचार या विरोधात आणि मेट्रोमध्ये तरुणांना रोजगार मिळावा या मागणीसाठी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. आंदोलक गपचूप मेट्रो स्थानकात पोहोचले. यानंतर ते थेट मेट्रो रुळावर उतरले. त्यांनी जवळपास एक तास निदर्शने देत मेट्रो वाहतूक रोखून धरली. रविवारचा दिवस असल्याने हजारो पुणेकर मेट्रोने प्रवास करतात. या पुणेकरांना जवळपास तासभर एकाच ठिकाणी स्थानबद्ध व्हावं लागलं.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नरेंद्र पावटेकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. या आंदोलनासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. आंदोलकांनी मेट्रो रुळावर उतरुन आंदोलन केल्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा मेट्रो स्थानकात दाखल झाला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलक समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. विशेष म्हणजे तुम्ही आम्हाला रुळावरुन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर आम्ही खाली उड्या मारु, असा इशारा आंदोलकांनी दिला. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांच्या सुरक्षेसाठी मेट्रो रुळाच्या खाली संरक्षण जाळ्या धरुण पोलीस जवानांना उभं केलं.

कोणताही परवानगी न घेता आंदोलकांनी थेट मेट्रो सेवा ठप्प केली. पोलिसांच्या अंगावर पेट्रोल टाकणे, प्रशासनाला धमकावणे, सार्वजनिक वाहतूक बंद करणे असे प्रकार कोणत्याही स्तरावर खपवून घेतले जाणार नाहीत. गरज पडल्यास बळाचा वापर केला जाईल. अशा आंदोलकांवर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. -संदीपसिंग गिल, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १

वाढती बेरोजगारी, शासकीय रुग्णालयातील भ्रष्टाचार, मोफत शिक्षण मागणी, राजकारणातील घराणेशाही बंद करणे,शिक्षणातील व्यावहारिक बाजार थांबवणे अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर शरद चंद्र पवार पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी मनपा मेट्रो स्थानकावर मेट्रो लाईन वर बसून आंदोलन केल्याचा प्रकार घडला.आत्मदहनाचा इशारा देत करण्यात आलेल्या या आंदोलनात पालकमंत्री येऊन येथे सांगू द्यात अशी भूमिका घेण्यात आली. यावेळी झालेल्या पोलीस आणि आंदोलक यांच्यातील बाचाबाचीतून आंदोलकांनी पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्यासह उपनिरीक्षक, कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल फेकल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला .याप्रकरणी पोलिसांनी नरेंद्र पावटेकर याच्यासह ५ ते ६ पुरुष आणि १० महिलांवर विविध कलमांन्वये शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी अचानक कोणतीही परवानगी न घेता मेट्रो सेवा ठप्प केली. दोन तासापेक्षा अधिक वेळ मेट्रो सेवा यामुळे विस्कळीत झाली. पोलिसांना या आंदोलनाबाबत माहिती मिळताच पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांनी मेट्रोच्या रूळावरच आंदोलन सुरू केल्याने, मेट्रो सेवा विस्कळीत झाली. कसबा विधानसभा मतदारसंघाचे कार्यकर्ते आणि शहर उपाध्यक्ष नरेंद्र पावटेकर यांच्या नेतृत्वाखाली शहरात प्रथमच मेट्रोच्या लाईनवर हे आंदोलन करण्यात आले पण पावटेकर यांनी आंदोलन पक्षाची परवानगी न घेता केले आणि पोलिसांशी हुज्जत घालत त्यांना शिवीगाळ केली असा त्यांच्यावर आरोप करत पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष माजी महापौर प्रशांत जगताप यांनी दिली आहे.

जगताप म्हणाले, नरेंद्र पावटेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आहेत, त्यांनी मागील तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी पक्षाच्या कुठल्याच आंदोलनात व कार्यक्रमात सहभाग घेतलेला नाही.अशा परिस्थितीमध्ये आज त्यांनी पुणे मेट्रोच्या विरोधामध्ये आंदोलन केले आणि आंदोलन केल्यानंतर पोलिसांशी हुज्जत घालणे त्याचबरोबर एकूणच पुणेकरांची अडवणूक करणे या गोष्टी केल्या आहे. निश्चितच या सर्व गोष्टी निषेधार्ह आहेत .आजचे त्यांचे आंदोलन ही वैयक्तिक असून त्याचा पक्षाशी काही संबंध नाही, आणि एकूणच पुणेकरांची अडवणूक करणे आणि पोलीस अधिकाऱ्यांबरोबर हुज्जत घालणे या सर्व प्रकाराबाबत पक्षाचा काहीही संबंध नाही.त्यांच्या या सर्व गोष्टी विचारात घेता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे.

दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी आक्रमक पवित्र घेत आपल्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री अगर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना जागेवर आणल्याशिवाय आपण उठणार नाही असा पवित्रा घेत, दीड तास मेट्रो सेवा ठप्प ठेवली. मेट्रो पुलावरून उडी मारण्याची धमकी दिल्याने अग्निशामक दलाच्या पथकाने यावेळी पुलाखाली जाळी धरत बचाव कार्यासाठी तयारी देखील केली. पोलिसांची या प्रकारामुळे धावपळ उडाली तसेच त्यांनी वारंवार विनंती करूनही आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आंदोलक यांनी पोलिस आणि माध्यमे यांच्यावर हात उचलण्याचा प्रकार घडला.अखेर पोलिसांनी सदर ठिकाणी शिरून आंदोलकांची धरपकड करत सदर आंदोलन मोडीत काढले.