Home Blog Page 409

९ वर्षे होऊनही जायका प्रकल्प पुरा होईना!

-माजी आमदार मोहन जोशी यांची टीका

पुणे : मुळा आणि मुठा नद्यांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी जायका प्रकल्प हाती घेऊन नऊ वर्ष झाली तरी अजूनही निम्मेही काम पूर्ण झालेले नाही, निवडणूक प्रचारात मोठमोठी आश्वासने देणारे भाजपचे नेते आता मात्र निवांत आहेत, अशी टीका माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

जायका प्रकल्पाच्या कामाची प्रगती ५० टक्क्यापेक्षा अधिक नाही, असे महापालिका प्रशासनच्या निवेदनातून स्पष्ट होत आहे. स्मार्ट सिटी, नदी सुधार योजना, रिंगरोड, मेट्रोचे शहरभर जाळे अशा मोठमोठया घोषणा भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान केल्या. त्यापैकी जायका प्रकल्प ही सुद्धा त्यातीलच एक घोषणा आहे. या सर्वच घोषणा अर्धवट अवस्थेत असून निवडणुका झालेल्या असल्याने भाजपचे मंत्री, खासदार, आमदार असे सर्वच जण या बाबत सोयीस्कर मौन पाळून आहेत, असे मोहन जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मुठा आणि मुळा नद्यांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा फेर वापर शेतीसाठी करावयाचा असा हा प्रकल्प राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत राबविला जात आहे. केंद्र सरकारमध्ये प्रकाश जावडेकर पर्यावरण राज्यमंत्री असताना तो प्रकल्प मंजूर झाला. या निमित्ताने बालगंधर्व रंगमंदिरात जावडेकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. भाजपने गाजावाजा, प्रसिद्धी खूप केली. निवडणूक प्रचारात आश्वासने दिली. २०१६ साली कामाला सुरुवात झाली. ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. काम सुरू होऊन ९ वर्षे लोटली. मुदतीत ५० टक्क्यांहूनही अधिक काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पालिका प्रशासन मुदतवाढ मागत आहे. तसेच मध्यंतरी जादा पाणी वापराबद्दल राज्य सरकारने महापालिकेला भुर्दंड ठोठावला. त्याही वेळी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास महापालिका अपयशी होत असल्याचा ठपका महायुतीच्या सरकारने ठेवला होता. याप्रकरणी एकंदरच टोलवाटोलवी आणि भाजपचा नाकर्तेपणा दिसून येतो, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

अश्विनी चवरेचं वृत्तपत्र प्रिंट फॅशनचा जलवा

स्टाईल आयकॉनचा नवा अवतार –

हटके आणि ट्रेंडी – अश्विनी चवरेच न्यूजपेपर प्रिंट फॅशन सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्री अश्विनी चवरे ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. अश्विनीच्या ग्लॅमरस फोटोंनी चाहते नेहमीच घायाळ होतात. सध्या अश्विनीची साऊथ, बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये जोरदार चर्चा रंगतेय. साऊथ चित्रपटांमध्ये अश्विनीने स्वत:च्या अभिनयाची एक वेगळीच छाप पाडली आहे. खरंतर अश्विनी ही एक अस्सल मराठमोळी अभिनेत्री आहे पण स्वत:च्याच हॉट आणि बोल्ड लूकमुळे ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंडींगमध्ये असते. या वर्षाच्या सुरुवातीलाच अश्विनीने एक हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटमधून अश्विनीने स्वतःचा असा एक वेगळाच लूक प्रेक्षकांसमोर सादर केला होता.
आता अश्विनीने पुन्हा एकदा एक नवीन फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये अश्विनीने पेपर साडी परिधान केल्याचं आपल्याला दिसत आहे. या पेपर साडीत ‘अश्विनी’चं सौंदर्य खुललेलं आपल्याला दिसत आहे. अश्विनीने हटके स्टाईलमध्येच हे फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमधून अश्विनी एकप्रकारे आता ‘फॅशनवरती आलीय नवीन ब्रेकिंग न्यूज’ असचं काहीसं आपल्याला सुचवू पाहतेय. फार क्वचितच कलाकार अशाप्रकारची फॅशन करत असतात. पण अश्विनीच्या या फोटोशूटची सध्या जोरदार चर्चा रंगू लागलीय.
चालू २०२५ हे वर्ष अश्विनीच्या आयुष्याला कलाटणी देणारं वर्ष ठरलं आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण याच वर्षात अश्विनी ‘जिलबी’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर आली तर आता ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’,मी पाठीशी उभा या प्रसिद्ध मराठी सिनेमांत ती झळकणार आहे. याच वर्षी हे दोन्ही सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.तसेच अश्विनी चवरेने केलेल्या फोटोशूटमध्ये आत्मविश्वास, ग्लॅमरसपणा आणि बोल्ड व्यक्तिरेखा दिसत आहे. अश्विनीने केलेल्या या फोटोशूटमुळे तिच्या चाहत्यांना आता तिच्या आगामी प्रोजक्टची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अश्विनीच्या सोशल मीडियावर मित्रमैत्रिणींचे, चाहत्यांचे आणि नातेवाईकांचे अनेक कमेंट येताना दिसत आहेत. तसं बघायला गेलं तर अश्विनीचं कौतुक करण्यामध्ये इंटस्ट्रीमधील कलाकार देखील मागे राहिलेले नाहीत. त्यामुळे २०२५ वर्षअखेरीपर्यंत मराठी इंडस्ट्रीमध्ये अश्विनी सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री ठरेल यात काहीच शंका नाही. यामध्ये प्रमुख बाब म्हणजे अश्विनीचा हा नवा लूक तिला मराठी इंडस्ट्रीमध्ये हॉट आणि सेन्सेशनल चेहरा मिळवून देईल यात काहीच शंका नाही.

दिशा सालियान प्रकरणी शिंदें गटात मतभेद:संजय गायकवाड म्हणाले- आदित्य ठाकरेंना क्लीन चीट, तर संजय शिरसाट म्हणाले- दिशाचा प्रथमदर्शनी खून

मुंबई-दिशा सालियान प्रकरणी तिच्या वडीलांनी जी याचिका केली आहे, तो त्यांचा निर्णय आहे. त्या प्रकरणी सीआयडीने सांगितले आहे की यात कुठलाही राजकीय अँगल दिसत नाही. 14 व्या मजल्यावरुन पडल्याने तिचा मृत्यू झाला आहे, असे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.संजय गायकवाड पुढे बोलताना म्हणाले की, शासनाच्या सर्व यंत्रणा जर राजकीय अँगल दिसत नाही असा रिपोर्ट देतात. त्यामुळे कोणावरही चिखल फेक करणे किंवा कोणाला फसवणे मला तरी योग्य वाटत नाही.दिशा सालियान हिची प्रथमदर्शनी खून झाला आहे. तिच्या वडीलांवर दबाव होता आता ते हायकोर्टात गेले आहेत. या प्रकरणात अनेक जण असल्याचे सिद्ध झाले आहे. पोलिसांकडून जलदगतीने तपास केला जाईल आणि आरोपीला शिक्षा होईल, असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

संजय गायकवाड म्हणाले की, ज्या वेळेला पोलिस यंत्रणांनी आदित्य ठाकरेंना सगळ्या प्रकरणातून क्लीन चीट दिली आहे. तर मला वाटते हायकोर्टातील याचिकेतून वेगळे काही बाहेर पडणार नाही. तिच्या कुटुंबियांना पोलिस यंत्रणेवर विश्वास नसावा म्हणून त्यांनी याचिका केली असेल.सीआयडीने तपास केला त्यावर त्यांना विश्वास नसावा. नीतेश राणे आणि नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे छळ केला, त्यामुळे ते संधी मिळाल्यावर ठाकरे कुटुबियांना सोडणार नाही. तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे.

संजय गायकवाड म्हणाले की, औरंगजेबाचे प्रकरण सरकारच्या अंगाशी आले असे कोण म्हणते असे काही अंगाशी आलेले नाही. संजय राऊत बोलतात म्हणजे काही महाराष्ट्र बोलत नाही. त्यांची औकात काय आहे. 4 भितींच्या आत नालायकासारखी बकबक करणारा तो माणूस आहे. त्यांच्या बोलण्याला कोणी महत्त्व देत नाही. औरंगजेब हे प्रकरण एका विषयाचे नाही. हे शिवप्रेमींची देशभक्तांची भावना आहे. तो सरकारचा विषय नाही तो जनतेचा विषय आहे.

इतक्या वर्षानंतर याचिका का?- मिटकरी

अमोल मिटकरी म्हणाले की, दिशा सालियन प्रकरणात इतक्या वर्षानंतर याचिका का दाखल करण्यात आली? 2020 साली मालाडमध्ये घडलेलं हे प्रकरण आहे. याची आता चर्चा होत आहे. इतक्या वर्षांनंतर ही याचिका दखल करण्याचे कारण काय? इतकी दिरंगाई का केली? तिच्या वडिलांनी तेव्हाच याचिका दखल केली असती, तर न्याय मिळाला असता. मग आता का हे प्रश्न काढले? असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. तर दिशा सालियान प्रकरणात जे कोणी असतील त्यांना न्याय मिळाला पाहिजे. परंतु दिशा सालियान प्रकरणामुळे महाराष्ट्राची दिशाभूल होऊ नये. राज्यात औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन वातावरण भरकटवले जात आहे. हे महाराष्ट्र समोरचे प्रश्न नाहीत. राजकीय लोकांनी याला हवा देऊ नये. विरोधक आणि सत्ताधारी यांनी दिशा सालियन प्रकरणात महाराष्ट्राचे मूळ प्रश्नांना बगल देऊ नये.

औरंगजेबाच्या कबरीचे प्रकरण उलटले अन मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच दंगल झाल्याने लक्ष वळविण्यासाठी दिशा सालियन प्रकरण काढले :संजय राऊतांचा दावा

मुंबई- औरंगजेबाची कबरीचे प्रकरण त्यांनी बाहेर काढले. मात्र तेच प्रकरण त्यांच्यावर उलटे शेकले गेले. त्यामुळे दिशा सालियन प्रकरण पुन्हा काही लोकांनी बाहेर काढले असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. औरंगजेब प्रकरणातून मुक्तता मिळवण्यासाठी दिशा सालियन प्रकरण शिजवले गेले असल्याचा आरोप त्यांनी केला. एखाद्या व्यक्तीच्या भविष्यावर असा चिखल उडवणे, ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे देखील राऊत यांनी म्हटले आहे.

ठाकरे कुटुंबाला आणि संपूर्ण शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते पुन्हा एकदा स्पष्ट दिसत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. औरंगजेब प्रकरण सरकारवर उलटले. औरंगजेबाला कबरीतून बाहेर काढून आमच्यावर सोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र तो त्यांच्यावरच उलटला. त्यामुळे औरंगजेबापासून मुक्तता मिळवण्यासाठी हे प्रकरण गेल्या काही दिवसापासून शिजवले असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. यामागे कोणाची प्रेरणा आहे? कोणाची शक्ती आहे? आणि कोण पडद्यामागे हालचाली करत होते? याची सर्व माहिती आमच्याकडे असल्याचा दावा देखील त्यांनी केला.

अशा प्रकारचे राजकारण तुम्ही करणार असाल तर ते तुम्हाला लखलाभ असो. 300 साडेतीनशे ते 400 वर्षानंतर कबरीतून बाहेर काढण्यासाठी ज्या कबरी तुम्ही खोदत आहात, त्या कबरीत तुम्हालाच जावे लागेल. एखाद्या तरुण नेत्याच्या करिअरवर आणि भविष्यावर अशा प्रकारे चिखल उडवणारी महाराष्ट्राची संस्कृती नाही. आमच्यासारख्या अनेक नेत्यांवर हे प्रयोग झाले आहेत. त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. तरी देखील तुमचे आयटी सेल आणि लीगल सेल काम करत आहेत. मात्र कोणत्या थरापर्यंत जायचे हे महाराष्ट्राच्या राजकारण्यांनी ठरवायला हवे. भारतीय जनता पक्षाचे राज्य आल्यापासून आणि भाजपमध्ये काही बाडगे गेल्यापासून तसेच एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडल्यापासून त्यांच्याकडे असलेले अस्वस्थ आत्म्यांच्या हाताला काहीही लागलेले नाही. सत्ता आली तरी देखील ते अस्वस्थ आहे. त्यामुळे त्यांना अशा कारवाया सुचत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

औरंगजेबाच्या कबरीवर दंगल कुठे झाली? तर नागपुरात झाली. दंगल करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाची निवड का करण्यात आली? ही दंगल नागपूर येथेच का घडवण्यात आली? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. हे देवेंद्र फडणवीस यांना देखील अपेक्षित नसेल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा कमजोर ठरवण्यासाठी किंवा बदनाम करण्यासाठी त्यांच्याच मतदारसंघाची निवड कोणी केली? यामागे कोण आहे? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. हा तपासाचा विषय असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. अशा प्रकारची दंगल महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडवण्याची योजना होती. मात्र त्याची ठिणगी देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात टाकण्यात आली. यामागे नक्की काय आहे? कोण आहे? कोणाचा इंटरेस्ट आहे? हा तपासाचा विषय असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरेंना अटक करून चौकशी करा,दिशा सालियान प्रकरणावरुन नीतेश राणे आक्रमक

मुंबई-दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी नैतिकतेच्या आधारावर आमदारकीचा राजीनामा देत चौकशीला सामोरे जायला हवे. ते आमदार असतील तर राजकीय दबाव निर्माण केल्यासारखे होईल, त्यामुळे आदित्य ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा चौकशी होऊ द्यावी, असे भाजपचे नेते नीतेश राणे यांनी म्हटले आहे.नीतेश राणे म्हणाले की, हे जर आत्महत्या होती तर या प्रकरणी आदित्य ठाकरेंना का वाचवावे लागत आहे. त्यांची एवढी धावपळ का होत आहे. सुप्रीम कोर्टच्या निर्णयानुसार जर बलात्काराचा आरोप असेल तर केस दाखल करावी लागते. म्हणून त्या नियमानुसार आदित्य ठाकरेंना अटक करत त्यांची चौकशी झाली पाहिजे.

नीतेश राणे म्हणाले की, सामान्य माणसांना जो न्याय लागतो तोच आदित्य ठाकरेंना लावला पाहिजे. त्यांची चौकशी करावी. त्यांचे जर ह्यात काही नसेल तर ते चौकशीत समोर येईल आणि आमचे तोंड बंद होतील. आदित्य ठाकरेंना जर विश्वास आहे की ही आत्महत्या होती तर त्यांनी पुरावे द्यावे आणि आम्हाला खोटे ठरवावे. आता दिशाचे वडील सांगत आहे की मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. किशोरी पेडणेकर आमच्यावर दबाव टाकत होत्या. दिशाच्या वडीलांनी त्यांचे नाव घेतले आहे, आम्ही घेतलेले नाही. हे सर्व कोर्टात सुरू आहे.

नीतेश राणे म्हणाले की, गेल्या 5 वर्षांमध्ये संजय राऊत यांचे मालक मुख्यमंत्री होते. त्यांचा मुलगा प्रकरणात असल्याने त्यांनी दिशाच्या वडीलांवर खूप दबाव टाकला होता. ते सांगत आहे की आमच्यावर दबाव होता. एका मुलीची हत्या झाली आहे, तिला न्याय मिळाला पाहिजे.यातून राजकीय नेत्याना बाहेर काढा. फक्त तिला न्याय मिळावा हीच भूमिका ठेवली पाहिजे. संजय राऊत एका मुलीचे वडील आहेत त्यांनी तर भूमिका घेतली पाहिजे की काय खरे आहे ते समोर आले पाहिजे. मी दिशाच्या आई-वडीलांसोबत आहे.

दिशा सालियन आत्महत्या प्रकरण, वडिलांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका:आदित्य ठाकरेंविरुद्ध एफआयआरची मागणी

मुंबई-अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दिशाच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची आणि तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती करण्यात आली आहे. दिशावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.

८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड परिसरातील १४ व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला. पोलिसांनी याला आत्महत्या म्हटले होते. त्यावेळी दिशाच्या वडिलांनी तपास समाधानकारक मानला होता. भाजप नेते नितेश राणे यांनी तीन वर्षांपूर्वी दिशावर सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याचा आरोप केला होता. तथापि, दिशाच्या पालकांनी नितेश राणे यांच्या विरुद्ध खटला दाखल केला होता आणि हा त्यांच्या मुलीची बदनामी करण्याचा कट असल्याचे म्हटले होते.

आता दिशाचे वडील म्हणतात की, त्यांना घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आणि पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांवर विश्वास ठेवण्यास भाग पाडण्यात आले. याचिकेत सूरज पंचोली, दिनो मोरिया आणि मुंबई पोलिसांवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दिशाच्या वडिलांच्या याचिकेनंतर महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. कॅबिनेट मंत्री नितेश राणे म्हणाले, ‘आदित्य ठाकरे यांनी आमदारपदाचा राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरे जावे.’चौदाव्या मजल्यावर पडून दिशा सालियन हिचा मृत्यू झाला असल्याचा दावा आतापर्यंत करण्यात येत होता. मात्र आता दिशाच्या अंत्यविधी वेळेचे फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर एकही व्रण असल्याचे दिसून येत नाही. चौदाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला असला तरी तीच्या चेहऱ्यावर एकही जखम नाही. तिला साधे खरचटले सुद्धा नाही. या फोटोवरूनच आता तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याचे बोलले जात आहे.

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भारत अधोगतीच्या वाटेवर– अतुल लोंढे

भारताच्या निर्यातीत प्रचंड घट, अमेरिकेच्या दबावापुढे मोदी सरकारची शरणागती, ईव्हीवरचा कर ११५ टक्क्यावरून १५ % वर.

उद्योगपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ, शेतकरी बेरोजगारांकडे दुर्लक्ष, सरकारचे अपयश झाकण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा.

मुंबई, दि. १९ मार्च
देशात सध्या औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून वातावरण तापवले जात आहे, यापुढेही इतिहासातील असेच मुद्दे बाहेर काढले जातील, कारण सरकारचे अपयश झाकण्यासाठी व जनतेच्या मुळ मुद्द्यांपासून लक्ष वळवण्यासाठी असे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत. जगात भारताचा डंका वाजतो हा भाजपाचा दावा फोल ठरला असून धार्मिक मुद्द्यांवर ज्या देशात वाद निर्माण केले जातात त्या देशात गुंतवणूक येत नाही, तीच भारताची आज परिस्थिती झाली आहे असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

यासंदर्भात सविस्तर माहिती देताना अतुल लोंढे म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांवर ११ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे असे सांगितले जाते व ते माफ करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत पण आरबीआयच्या अहवालानुसार मागील १० वर्षात उद्योगपती मित्रांचे १६.३५ लाख कोटी रुपयांचे कर्ज याच भाजपा सरकारने माफ केले आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जापेक्षा तब्बल ५.३५ लाख कोटी जास्ती रुपये कर्ज माफ केले. प्रत्यक्षात हे कर्ज २९ लाख कोटी रुपयांचे असल्याचे समजते व तेही हळूहळू माफ केले जाईल. शेतकरी, बेरोजगारांनी या सरकारचे काय बिघडवले आहे की भाजपा सरकार त्यांच्या मुळावर उठले आहे, असा प्रश्न विचारून भारताच्या आयात निर्यातीवर त्यांनी भाष्य केले. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार या तिमाहीत मागील तीन वर्षांच्या तुलनेत निर्यात १०.९ टक्क्यांनी घटली आहे तसेच आयातही घटली आहे, ही प्रचंड मोठी घट आहे. भारत ८७ टक्के कच्चे तेल आयात करतो व ते आता स्वस्त झाले आहे पण आपल्याकडील पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर मात्र कमी केलेले नाहीत. भाजपा सरकारने इंधनावर एक्साईज ड्युटीसह विविध प्रकारचे सेस, कृषी सेस, रोड टॅक्स लावून तब्बल ३६ लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम जनतेच्या खिशातून काढून घेतली आहे.

युपीए सरकार असताना एक्साईज ड्युटी ९ रुपये होती ती भाजपा सरकारने ३२ रुपयांपर्यंत वाढवली तर रोड टॅक्स १ रुपयावरुन १८ रुपये केला. ज्यावेळी कच्च्या तेलाची किंमत ११२ डॉलर होती त्यावेळी हा भाजपा पेट्रोल ३५ रुपयांना मिळाले पाहिजे अशी मागणी करत होता. आता लोकांच्या खिशातून पैसे काढले जात आहेत, शालेय वस्तू, स्मशानातील लाकूड यांवरही जीएसटी लावून लुट सुरु आहे. जनतेकडून कर वसूल करून देश चालवला जात आहे. भाजपा सरकारने आरबीआयलाही बरबाद केले आहे. आयातही कमी झाली, त्याचा फायदा सामान्य जनतेला व्हायला पाहिजे होता पण सरकार कर वसुली करुन मित्रांचे खिसे भरत आहे, असे लोंढे म्हणाले..

रशिया भारताला ५० डॉलरने कच्चे तेल देत होते पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला कच्चे तेल अमेरिकेकडून घ्यावे लागेल असे बजावले आहे. ऍलन मस्क यांनी ज्याला खटारा म्हटले ते एफ-१६ विमान घेण्यास भारताला भाग पाडले जात आहे. भारताने कर लावला तर दुप्पट कर लावण्याची धमकीही ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकेला भारताची बाजारपेठ काबीज करायची आहे, यासाठीच ईलेक्ट्रिक वाहनांवरील ११५ टक्के कर कमी करून मोदी सरकारने तो १५ टक्क्यांवर आणला आहे. भारताचे लोखंड, अल्युमिनियम निर्यात होत नाही. चायनाने मार्केट काबिज केले आहे, व्हिएतनाम, चीन, बांग्लादेश भारताच्या पुढे आहेत. ज्या देशात कायदा सुव्यवस्था चांगली असते, वैज्ञानिक विचारसरणी असते, शोध, रिसर्च आणि डेव्हलपमेंट वर भर असेल, देशात खरेदी शक्ती असेल त्यांचाच जगात डंका वाजतो, धर्माच्या नावाखाली भांडणे करणाऱ्या देशात गुतंवणूक येत नसते असेही अतुल लोंढे यांनी सांगितले.

आगामी काळात मतदार याद्यांमध्ये सुधारणा करून मतदार याद्या परिपूर्ण करणार-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी


पुणे दि. १९ जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील मतदार यादी मध्ये असलेली दुबार नावे, मयत झालेल्या व्यक्तींची नावे, कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे या संदर्भात माहिती घेऊन मतदार याद्यांमध्ये सुधारणा करून त्या परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने आगामी काळात प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात, मतदार याद्या तयार करण्याच्या अनुषंगाने मान्यता प्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षांच्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत श्री डूडी बोलत होते. या बैठकीला उपजिल्हाधिकारी निवडणूक श्रीमती मीनल कळसकर, विविध राजकीय पक्षांचे जिल्हा प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डूडी पुढे म्हणाले, मतदार यादीत दोन ठिकाणी नाव असलेल्या मतदारांची नावे वगळण्यात येऊन एकाच मतदार यादीत नाव असेल याची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार्फत खात्री केली जाईल. मतदार याद्यांमधील मयत मतदारांची नावे वगळण्यात येतील, यासाठी ग्रामपंचायत,नगरपरिषद, महानगरपालिका या कार्यालया कडुन मयत झालेल्या व्यक्तींच्या अभिलेख नोंदीच्या याद्या घेऊन त्याप्रमाणे मतदार यादी मध्ये मयत झालेल्या व्यक्तींची नांवे कमी करण्यात येतील. तसेच कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या मतदारांच्या बाबतही बीएलओ मार्फत सर्वेक्षण करण्यात येऊन याद्यांमध्ये सुधारणा करण्यात येईल. या कामांसाठी प्रशासनातर्फे बीएलओंना प्रशिक्षण देण्यात येईल मतदार यादीमध्ये चुकीच्या पद्धतीने नाव समावेश केले असेल तर प्रशासनातर्फे त्यात सुधारणा करण्यात येईल. या सर्व कामामध्ये पारदर्शकता ठेवली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहनही श्री डूडी त्यांनी केले.
बैठकीत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी, मतदार यादी मध्ये सुधारणा करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना मांडल्यात. बैठकीच्या सुरुवातीला या संदर्भातील माहितीचे निवडणूक शाखेतर्फे सादरीकरण करण्यात आले.

कल्याण-डोंबिवलीतील ६५ इमारतींमधीलएकाही रहिवाश्याला बेघर होऊ देणार नाही-भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई, दि. १९ मार्च- कल्याण-डोंबिवलीतील ६५ इमारतीमधील एकाही रहिवाश्याला बेघर होऊ देणार नाही व सर्व रहिवाश्यांना शासन दरबारी नक्कीच न्याय मिळवून देण्यात येईल अशी ठाम भूमिका भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण यांनी आज घेतली. या महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली येत्या चार दिवसात चारही विभागांच्या संबंधित अधिका-यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात येईल व या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ६५ इमारतीसंदर्भातील एक महत्त्वाची बैठक आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला रविंद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आदी यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेच आय़ुक्त, ठाणे,रायगड, पालघऱ व मुंबई शहरचे जिल्हाधिकारी व्हीसी द्वारे उपस्थित होते.
यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, या ६५ इमारतीमधील एकही रहिवासी बेघर होऊ देणार नाही. हा विषय गंभीर आहे, त्यामुळे कल्याण डोंबिवली आयुक्त, नगरविकास विभाग, जिल्हाधिकारी व महारेरा या चारही विभागांशी संबधित अधिका-यांशी बैठक घेऊन या विषयासंदर्भात सविस्तर माहिती सादर करावी. या विषयावर तोडगा काढताना एक विशेष प्रकरण म्हणून तोडगा काढण्यात यावा. तसेच या हजारो रहिवाश्यांना न्याय मिळण्याच्यादृष्टीने शासन स्तरावर सकारात्मक मार्ग काढण्याची मागणी रविंद्र चव्हाण यांनी केली.
६५ इमारतीमधील रहिवाश्यांची घरे ही त्यांची हक्काची घरे आहेत. त्या कुटुंबियांनी काहींनी आर्थिक जमावाजमव करुन तर कोणी बॅंकेचे गृहकर्ज घेऊन ही घरे खरेदी केली आहेत, त्यामुळे या हजारो रहिवाश्यांच्या डोक्यावरील छप्पर हे कायम राहिले पाहिजे असे स्पष्ट करताना रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, उल्हासनगरमध्ये सुध्दा असाच प्रश्न उपस्थित झाला होता, पण त्यावेळी शासन दरबारी कायदेशीर मार्ग काढण्यात आला होता. त्यामुळे या विषयातही उल्हासनगर पॅटर्नप्रमाणे सकारात्मक तोडगा काढावा. तसेच या ६५ इमारती व्यतिरिक्त कल्याण डोंबिवलीमधील अन्य काही इमारतींच्या विषयासंदर्भात अग्यार समितीचा जो अहवाल सादर करण्यात आला आहे, त्यावरही सकारात्मक दृष्टीकोन बाळगून त्या रहिवाश्यांनाही न्याय मिळवून द्यावा असेही रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांसदर्भात स्पष्ट केले की, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या विषयाच्या अनुषंगाने चारही विभागाच्या अधिका-यांची बैठक येत्या चार दिवसांत आयोजित करण्यात येईल. या बैठकीत विभागाच्या अधिका-यांनी ६५ इमारतींच्या प्रश्नावर सकारात्मक मार्ग काढण्याच्या दृष्टीने सविस्तर अहवाल सादर करावा व त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्यात यावा. हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येईल, असे आश्वासनही महसूल मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिले.

पीएमआरडीएच्या तीन टप्यातील कारवाईत तब्बल साडेतीन हजार अतिक्रमणांवर हातोडा

वाहतूक सुरळीत करण्यासाठी शासकीय यंत्रणेची संयुक्तपणे व‍िशेष मोहीम

पुणे : शहराभोवती असणाऱ्या राष्ट्रीय व राज्यमार्गावर अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकामांमुळे वाहनधारकांना सातत्याने वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी याची दखल घेत इतर शासकीय यंत्रणांच्या मदतीने गत काही द‍िवसात तीन टप्यात राबवलेल्या व‍िशेष मोह‍िमेत साडेतीन हजार अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

वाहतूक कोंडीचा प्रश्न न‍िकाली काढण्यासाठी पीएमआरडीएसह राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमसी, पीसीएमसी यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी संयुक्तरित्या विशेष मोहीम हाती घेतली आहे. यात पह‍िल्या टप्यात नगर वाघोली रोडवर २९ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान राबवलेल्या ८२२ कारवाई ८२ हजार २०० चौरस फुटावरील अनधिकृत बांधकामांचे न‍िष्कासन करण्यात आले. दुसऱ्या टप्यात पुणे नाशिक रोड, पुणे सोलापूर रस्ता आण‍ि चांदणी चौक पौड रस्त्यादरम्यानची अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. ३ ते १३ मार्चदरम्यान राबवलेल्या या कारवाईत २ हजार ४७८ कारवाई करत २ लाख ४७ हजार ८०० चौरस फुटावरील अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडला.

पीएमआरडीएकडून त‍िसऱ्या टप्याच्या मोह‍िमेची आखणी करण्यात आली असून त्याची सुरुवात १७ मार्चपासून करत ती ३० मार्चपर्यंत चालणार आहे. यात १७ आण‍ि १८ मार्च रोजी हडपसर ते द‍िवे घाट आण‍ि पुणे – सातारा रोड २१० अनधिकृत बांधकामे काढण्यात आल्याने ३४ हजार ५०० चौरस फुटांपर्यंतचा रस्ता मोकळा झाला. साधारण गत दोन मह‍िण्यात तीन टप्यात राबवलेल्या अनधिकृत बांधकामांविरुद्धच्या मोह‍िमेत एकूण ३ हजार ५१० अनधिकृत बांधकामे पाडण्यात आल्याने ३ लाख ४७ हजार ३०० चौरस फुटावरील अतिक्रमण काढण्यात आले आहे.

तीन टप्यात व‍िशेष मोहीम
१ ) पह‍िल्या टप्यात नगर वाघोली रोडवर केलेल्या ८२२ कारवाई ८२ हजार २०० चौरस फुटावरील अनधिकृत बांधकामांचे न‍िष्कासन
२ ) दुसऱ्या टप्यात पुणे नाशिक रोड, पुणे सोलापूर रस्ता आण‍ि चांदणी चौक पौड रस्त्यावर २ हजार ४७८ कारवाईत २४७८०० चौरस फुटावरील अनधिकृत बांधकामांवर हातोडा
३ ) त‍िसऱ्या टप्यात हडपसर ते द‍िवे घाट, पुणे – सातारा रोड एकूण २१० अनधिकृत बांधकामे काढल्याने ३४५०० चौरस फुटांपर्यंतचा रस्ता मोकळा झाला

संत मुक्ताईच्या भूमिकेसाठी नेहाने घेतले वाणी प्रशिक्षण

भूमिकांच्या जवळ जाताना या कलाकारांना खूप मेहनत घ्यावी लागते. त्यातही ती भूमिका आव्हानात्मक असेल तर जबाबदारी अधिक वाढते. दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातून अभिनेत्री नेहा नाईक हा युवा चेहरा भेटीला येणार आहे. या चित्रपटातील संत मुक्ताईची भूमिका ती साकारणार आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट १८ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे. 

नेहा नाईक ही अभिनेत्री पुण्यामध्ये रंगभूमीवर अतिशय उत्तमरीत्या कार्यरत आहे. आता ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या एका वेगळ्या विषयावर तितक्याच ताकदीची भूमिका साकारताना नेहाने आपल्या देहबोली सोबत वाणी संस्काराचे खास प्रशिक्षण पुण्यातील ज्येष्ठ नाट्यगुरू प्रा. श्यामराव जोशी यांच्याकडे तब्बल तीन महिने घेतले. मुक्ताई यांनी आपल्या अल्पकालीन आयुष्यात जे अनुभवले आणि त्यायोगे जे भोगले त्या सर्वांचे प्रतिबिंब त्यांच्या अभंगातून आणि काव्यातून उमटले आहे. या चित्रपटाची भाषा ही १३व्या शतकातील मराठी भाषेचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे उच्चारांमध्ये सहजता यावी यासाठी अनेक अवघड आणि कष्टप्रद अभ्यासाचे प्रकार नेहाला अभ्यासावे लागले. संत मुक्ताईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून उलगडणार आहे. त्यामुळे भाषेचा हा अभ्यास अत्यंत अनिवार्य होता.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना नेहा सांगते, “या चित्रपटात काम करायचं म्हणजे आधी या चित्रपटाच्या संहितेवर प्रभुत्व मिळवायला हवं. म्हणून मी त्यातल्या भाषेच्या अभ्यासावर भर दिला. प्रा. श्यामराव जोशींची शिकवण्याची पद्धत अत्यंत शिस्तशीर आणि प्रभावी असल्याने हळूहळू ती भाषा मला आत्मसात व्हायला लागली. यातील संवादांच्या अनेक दिवस तालमी चालू होत्या. भाषेबरोबरच ते शब्द उच्चारताना स्वाभाविकपणे होणारी देहबोली कशी असेल याचे दिग्पाल दादाने धडे दिले. त्याकरता माझ्या गावी जाऊन तिथल्या महिलांच्या देहबोलीचे निरीक्षण मी केले. वयाच्या आणि कारकिर्दीच्या सुरुवातीलाच इतकी कस लावणारी तरीही सुंदर प्रक्रिया मला अनुभवायला मिळाली हा मी मुक्ताईचा आशीर्वादच समजते. चित्रपटात मृणाल कुलकर्णींसारख्या अनुभवी कलाकारांना काम करताना पाहताना माझे एक वेगळेच प्रशिक्षण झाले. अभिनय या बाबतीत या सिनेमाने मला नवा दृष्टिकोन दिला. म्हणून ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’हा चित्रपट माझ्यासाठी कायम हृदयाच्या जवळ असणार आहे.”

कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह किंवा प्रतिमा या भावंडांच्या भूमिका करणाऱ्या कलाकारांसोबत येऊ नयेत यासाठी ऑडिशन घेऊन सुमारे दिडशे तरुणींमधून नेहाची निवड केल्याचं दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, “नेहा जरी नवखी असली तरी तिने खूप मेहनत घेऊन आपली व्यक्तिरेखा चित्रपटात आत्मविश्वासाने साकारली आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटामध्ये नेहाने साकारलेल्या ‘संत मुक्ताई’ द्वारे आजच्या पिढीला भाऊ-बहिणीच्या नात्याची नव्याने ओळख व्हायला मदत होईल अशी मला खात्री आहे.”

सायबर सेलने फसविल्या गेलेल्या कंपनीला सुमारे ४१ लाख रुपये परत मिळवून दिले


पुणे- येथील नामांकित कंपनीला गंडा घालण्याच्या उद्देशाने फसवणुक केलेली रक्कम ४०,९०,६०५/-रूपये सायबर पोलीसांच्या सतर्कतेने कंपनीस परत मिळवुन देण्यात यश आले आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर कडील तक्रार अर्ज क्रमांक १७९/२०२५ यामध्ये “नामांकीत कंपनीच्या अकाऊंट यांना सायबर गुन्हेगाराने अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हॉटसअॅप मेसेज करून सदर कंपनीचे एम.डी. असल्याचे भासवुन ते एका मीटींग मध्ये असल्याचे व हा माझा पर्सनल मोबाईल क्रमांक असल्याचे सांगुन दुस-या कंपनीचे पेमेंट तात्काळ करावयाचे आहे असे बतावणी करून कंपनीचे बैंक खात्यामधुन त्यांनी व्हॉटसअॅप मेसेज द्वारे पाठविलेल्या बैंक खात्यामध्ये रक्कम ४०,९०,६०५/-रूपये पाठविण्यास सांगुन आर्थिक फसवणुक केली आहे.” म्हणुन तक्रार नोंद आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सायबर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून सदर तक्रारीची गंभीर दखल घेऊन परराज्यातील बँक खात्याबाबत पत्रव्यवहार करून तसेच सदरचे बँक खाते हे परराज्यातील असल्याने तेथील नोडल अधिकारी यांचे संपर्क साधुन वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांचे मदतीने फसवणुक झालेली रक्कम गोठविण्यात येवुन ती तक्रारदार यांना परत मिळवुन देण्यात सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर यांना यश आले आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस उपआयुक्त विवेक मासाळ , सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे,वरीष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे , यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तथा तपासी अधिकारी तुषार भोसले व पोलीस अंमलदार नवनाथ कोडे, किरण जमदाडे, अश्विनी भोसले, ज्योती दिवाणे, माधुरी कराळे व सोनाली चव्हाण यांचे पथकाने केलेली आहे.
अशा प्रकारची सायबर फसवणुक टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी –
१. अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मेसेज करून तुमचा बॉस किंवा जवळची व्यक्ती असल्याचे भासवुन पैशाची मागणी केल्यास, त्या व्यक्तीशी संपर्क साधल्याशिवाय पैसे पाठवु नये.
२. अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कॉल करून तुमच्या जवळच्या व्यक्तीचा आवाज काढुन पैशाची मागणी केल्यास, त्या व्यक्तीशी संपर्क साधल्याशिवाय पैसे पाठवु नये.
(स्वप्नाली शिंदे) वरीष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर

IIHL चा 2030 पर्यंत 50 अब्ज अमेरिकन डॉलर मूल्यांकनाचे लक्ष्य साध्य करण्याचा निर्धार: अध्यक्ष अशोक हिंदुजा

पुणे- इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्जचे अध्यक्ष अशोक हिंदुजा यांनी मंगळवारी घोषणा केली की रिलायन्स कॅपिटल चे अधिग्रहण पूर्ण झाल्यानंतर इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेड (IIHL) ने 2030 पर्यंत 50 अब्ज अमेरिकन डॉलर मूल्यांकन साध्य करण्याचे लक्ष्य ठरवले आहे. हे अधिग्रहण पूर्ण करून कर्जबाजारी कंपनीच्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रिझोल्यूशन प्रक्रियेला पूर्णविराम दिला असल्याचे त्यांनी सांगितले.इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेड (IIHL) ने बोली रक्कम वित्तपुरवठादारांच्या एस्क्रो खात्यात हस्तांतरित केली आहे आणि प्रशासकांकडून व्यवस्थापनाचा ताबा बुधवारी स्वीकारला जाणार आहे.मॉरिशसस्थित IIHL ने रिलायन्स कॅपिटल (RCAP) साठी 9,650 कोटी रु. च्या बोलीसह यशस्वी इच्छुक म्हणून स्थान मिळवले. त्यानंतर, कंपनीने रिलायन्स जनरल इनश्युरन्स (RGIC) ची सॉल्व्हन्सी बळकटीसाठी अतिरिक्त 200 कोटी रु. चे योगदान दिले. हे बोली रकमेपेक्षा जास्त होते.“आमच्या बाजूने व्यवहार पूर्ण झाला आहे. आपण बोलत असताना एका एस्क्रो खात्यातून दुसऱ्या एस्क्रो खात्यात पैसे हस्तांतरित होत आहेत,” असे हिंदुजा म्हणाले.आता मूल्य निर्मितीचा प्रवास सुरू होत असून रिलायन्स कॅपिटल व्यवसायाचे मूल्य अंदाजे 20,000 कोटी रू. असेल असे ते म्हणाले. IIHL संपूर्ण RCAP व्यवसायाचे पुनरावलोकन पूर्ण करून आवश्यक निधी गुंतवणुकीबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.जोपर्यंत व्यवसाय मूल्यनिर्मितीच्या आवश्यकतांची पूर्तता करत आहे तोपर्यंत भांडवल गुंतवणूक समस्या ठरणार नाही असे ते म्हणाले. उपकंपन्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, रिलायन्स कॅपिटलच्या सुमारे 39-40 उपकंपन्या आहेत आणि नव्या व्यवस्थापनाकडून त्यापैकी अनेक कंपन्यांची विक्री होईल. याचे कारण त्यातील बहुतांश उपकंपन्या प्रामुख्याने लहान शेल कंपन्या असून त्यांचे व्यवसाय देखील लहान आहेत. ब्रोकिंग आणि मालमत्ता पुनर्रचना व्यवसाय नव्या व्यवस्थापनाकडे कायम ठेवला जाईल. आरबीआयकडे मुख्य गुंतवणूकदार कंपनी म्हणून नोंदणीकृत असलेल्या RCAP मध्ये रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स, रिलायन्स जनरल इन्शुरन्स, रिलायन्स मनी, रिलायन्स सिक्युरिटीज,रिलायन्स अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स यांसारख्या अनेक उपकंपन्या आहेत.

विमा कंपन्यांच्या लिस्टिंगबाबत विचारले असता, हिंदुजा म्हणाले की, ते मूल्यनिर्मितीच्या दोन वर्षांनंतर होऊ शकते. या आर्थिक सेवा कंपनीत 1.28 लाख कर्मचारी आहेत आणि नव्या व्यवस्थापनाकडून शक्य तेवढ्या कर्मचाऱ्यांच्या हितांचे रक्षण केले जाईल असे त्यांनी आश्वासन दिले.ब्रँडिंग संदर्भात ते म्हणाले, “NCLTच्या मंजुरीनुसार आम्ही तीन वर्षे त्याच नावाने काम करू शकतो, पण आम्हाला इंडसइंड ब्रँडचा प्रसार करायचा आहे आणि अधिग्रहणानंतरच्या मोहिमेसाठी ब्रँड एकत्रीकरणावर व्यावसायिक एजन्सीज काम करत आहेत.”नवीन NCLT निर्देशांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, सर्व पक्षांनी मार्च 20 पर्यंत IIHL कडे मालकी हस्तांतरणासाठीची प्रक्रियात्मक कामे पूर्ण करावीत असा सल्ला देण्यात आला आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने आपल्या शेवटच्या सुनावणीत सर्व पक्षांनी मार्च 20 पर्यंत अंमलबजावणी प्रक्रिया पूर्ण करावी याची खात्री करावी, असे सांगत पुढील सुनावणीसाठी 25 मार्च 2025 ही तारीख निश्चित केली होती.एप्रिल 2023 मध्ये, IIHL ने रिलायन्स कॅपिटलसाठी कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी रिझोल्यूशन प्रोसेस (CIRP) अंतर्गत झालेल्या निविदा प्रक्रियेत यशस्वी ठरून 9,650 कोटी रु. च्या प्रस्तावासह यशस्वी रिझोल्यूशन अर्जदार म्हणून स्थान मिळवले होते. गेल्या वर्षी IIHL ला भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (Irdai) तसेच संबंधित शेअर बाजार आणि कमोडिटी एक्स्चेंजमधून सर्व आवश्यक नियामक मंजुरी प्राप्त झाली होती.सेंट्रल बँकेने नागेस्वरा राव वाय यांना प्रशासक म्हणून नेमले होते. त्यानी नंतर डिसेंबर 2021  मध्ये कंपनीच्या अधिग्रहणासाठी निविदा मागवल्या होत्या.

…त्यांना कबरीतूनही खोदून काढू, सोडणार नाही”, देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा विधानसभेत दिला इशारा!

मुंबई-आता नागपूरमधील परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली असून पोलिसांकडून दोषींना शोधून काढण्याचं काम चालू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा विधानसभेत निवेदन दिलं आहे.“नागपूरच्या सीपींनी सांगितलं की हे पूर्वनियोजित होतं की नाही याची आम्ही चौकशी करत आहोत. अजून अंतिम निष्कर्षापर्यंत आलेलो नाही. त्यामुळे ते वेगळं बोलले आणि मी वेगळं बोललो असं काहीही नाही,पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना अद्दल घडवणारच, या भूमिकेचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केला. मी पुन्हा सांगतो, नागपूर प्रकरणात ज्यांनी पोलिसांवर हल्ले केले असतील, त्यांना कबरीतूनही खोदून काढू. सोडणार नाही. बाकी सगळ्या गोष्टी क्षम्य आहेत. पण पोलिसांवर हल्ला क्षम्य नाही. त्यामुळे त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई नियोजित वेळेत केली जाईल”, असं फडणवीस म्हणाले.१९९२ नंतर नागपुरात कधीही दंगल झालेली नाही. परवाची झालेली घटना काही लोकांनी जाणीवपूर्वक घडवून आणला हे लक्षात येतं. तिथे औरंगजेबाची कबर जाळली गेली. त्यावर कुठलीही आयात लिहिलेली नव्हती. आम्ही या गोष्टीचा सखोल तपास केला आहे. पण जाणीवपूर्वक आयाती जाळल्या अशा प्रकारचे संदेश पसरवण्यात आले आणि त्यातून ही पुढची घटना घडली”, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली.

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी मांडली. गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आठव्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश ही प्रमुख राज्ये महाराष्ट्राच्या पुढे असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच दोन दिवसांपासून चर्चेत आलेल्या नागपूर शहराचा सातवा क्रमांक लागत असल्याचे ते म्हणाले. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये गुन्ह्यांच्या संख्येत 2 हजार 586 ने घट झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही गोष्ट खरी आहे की देशामध्ये महाराष्ट्र एक अतिशय महत्त्वाचे राज्य आहे. देशामध्ये जर आपण तुलना केली तर आपला क्रमांक गुन्हेगारीमध्ये आठवा आहे. दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश ही जी काही महत्त्वाची राज्य आहेत, ती क्राइम रेटमध्ये आपल्या पुढे आहेत. आपण जर शहरांचा विचार केला तर पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्रातील एकही शहर नाही. पहिल्या दहामध्ये सातव्या क्रमांकावर आपल्याला नागपूर दिसते. पण ते यासाठी दिसते की नागपूरमध्ये आपण नागपूर ग्रामीणचा जवळपास 25 टक्के भाग हा सामील केला.
एनसीआरबीच्या डेटामध्ये ते सध्याची लोकसंख्या पकडत नाही. त्यांचे म्हणणे असते की, आम्ही फक्त जनगनणेचीच लोकसंख्या पकडून, त्यामुळे गुन्ह्याचे प्रमाण वाढलेले दिसते. मात्र लोकसंख्या 2011 चीच आहे. जर आपण आताची लोकसंख्या पकडली तर नागपूर हे 22 व्या 23 व्या क्रमांकावर जाते. त्यामुळे विचार केला तर पहिल्या दहामध्ये आपले कोणतेही शहर नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. मुंबई सारखे शहर हे पंधराव्या क्रमांकावर आहे. पुणे 18 व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर दिल्ली आहे, दुसऱ्या क्रमांकावर जयपूर आहे. तिसऱ्या क्रमांकावर इंदूर आहे. चौथ्या क्रमांकावर कोची आहे. पाचव्या क्रमांकावर पाटणा आहे. गाझियाबाद, कोझीकोड आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

त्यामुळे तुलनेने महाराष्ट्रात जी शहरे आहेत, शहरीकरण आणि विकास इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर देखील इथे कायदा आणि सुव्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. हे होत असताना आपण जर पाहिले तर एकूण गुन्ह्याची संख्या आपण पाहिली तर आकडेवारी ही महत्त्वाची नसतेच, आकडेवारी ही मिसलिडींग असते. वस्तुस्थिती काय आहे हे महत्त्वाचे असते. तरी देखील काही गोष्टी या आकडेवारीतूनच सांगाव्या लागतात. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये गुन्ह्यांच्या संख्येत 2 हजार 586 ने घट झाली, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.

पुण्यात महिला पोलीस भरती दरम्यान गर्दीमुळे गोंधळ,चेंगरा चेंगरीचे वृत्त पोलिसांनी फेटाळले

पुणे- महिला कारागृह पोलीस भरतीदरम्यान गोंधळ उडाला आहे. यावेळी लोखंडी गेटचा दरवाजा मोडून मुली आत घुसल्या. या गोंधळात अनेक मुली जखमी झाल्याची माहिती आहे.त्यांच्या पायाला दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेची तयारी व्यवस्थित नसल्याने हा गोंधळ उडाल्याचं दिसून आलं आहे.दरम्यान दीड महिन्यांपासून म्हणजेच 29 जानेवारीपासून पोलिस भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सुरुवातीला 500-1000 उमेदवारांना बोलावले होते. त्यानंतर 1500 उमेदवारांना बोलावण्यात आले. आता 1500 विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणी सुरू आहे. अत्यंत शांतपणे येथे प्रक्रिया सुरू आहे. आजपासून महिला उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे पालक आले होते. त्यामुळे साडेचार वाजता गर्दी जमली होती. पण चेंगराचेंगरी झालेली नाही. साडेचार वाजता उमेदवारांना आत घेण्यात आले आणि शिस्तीत भरती प्रक्रिया सुरू झाली, अशी माहिती पोलिस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी दिली.

आजपासून पुण्यात महिला कारागृह पोलीस भरती सुरू झाली आहे. त्यासाठी अनेक तरूणी पुण्यात दाखल झाल्या आहेत. ५३१ कारागृह महिला पोलीस जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडते आहे. मात्र यासाठी तीन हजारांपेक्षा जास्त मुलींनी गर्दी केली. मात्र, यावेळी अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे गोंधळ उडाला.पोलीस प्रशासनाकडून भरतीसाठी आलेल्या मुलींच्या रांगेतील नियोजनात गोंधळ उडाला. गेटवर झालेल्या गर्दीमुळे लोखंडी गेट तुटून पडले आणि त्यावरून मुली आतमध्ये पळत सुटल्या. यावेळी चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे अनेक मुलींच्या पायाला गंभीर दुखापती झाली.

या घटनेनंतर मुलींच्या पालकांकडून संतप्त प्रतिक्रिया आल्या आहेत. शिवाजी नगर पोलीस मुख्यालयात जो प्रकार घडला यावर पालकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी या पालकांची काही स्थानिक पोलिसांशी बाचाबाचीदेखील झाली.दरम्यान, ही भरती प्रक्रिया २०२२-२३ पासून रखडलेली आहे. ५१३ जागेसाठी ही रखडलेली भरती प्रक्रिया आता कुठे पार पडते आहे. असं असताना नियोजन नसल्याने या भरती प्रक्रियेला गालबोट लागल्याचं दिसून आलं आहे. या पोलिसांच्या अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे मैदानी चाचणीमध्ये आपली मेहनत तर व्यर्थ जाणार नाही ना अशी भावना विद्यार्थी आणि पालकांमध्ये दिसत आहे.