Home Blog Page 406

मध्य रेल्वे पुणे विभाग उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवणार

0

पुणे-

उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यामुळे आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे-नागपूर आणि दौंड-कलबुर्गी दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.  
 
१.  पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक सुपरफास्ट एसी स्पेशल (२४ ट्रिप)

गाडी क्रमांक ०१४६९ एसी साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल पुण्याहून १५.५० वाजता, दर मंगळवारी ०८.०४.२०२५ ते २४.०६.२०२५ पर्यंत सुटेल आणि नागपूरला दुसऱ्या दिवशी (१२ फेऱ्या) ०६.३० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१४७० एसी साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल नागपूरहून दर बुधवारी ०९.०४.२०२५ ते २५.०६.२०२५ या कालावधीत ०८.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी (१२ फेऱ्या) पुण्यात २३.३० वाजता पोहोचेल.

रचना: तीन एसी 2 टियर, 15 एसी 3-टायर, 1 जनरल सेकंड क्लास कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर व्हॅन.

२.  पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक सुपरफास्ट विशेष (२४ सहली)

गाडी क्रमांक ०१४६७ साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल पुण्याहून १५.५० वाजता, दर बुधवारी ०९.०४.२०२५ ते २५.०६.२०२५ पर्यंत सुटेल आणि दुसऱ्या दिवशी (१२ फेऱ्या) ०६.३० वाजता नागपूरला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१४६८ साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल प्रत्येक गुरुवारी १०.०४.२०२५ ते २६.०६.२०२५ या कालावधीत नागपूरहून रात्री ८.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी (१२ फेऱ्या) पुण्यात २३.३० वाजता पोहोचेल.

रचना: एक फर्स्ट एसी, एक एसी 2-टायर, दोन एसी 3-टायर, 5 स्लीपर क्लास, 6 जनरल सेकंड क्लास आणि 2 जनरल सेकंड क्लास कम गार्डची ब्रेक व्हॅन.

०१४६९/०१४७० आणि ०१४६७/०१४६८ :- उरुळी, दौंड चोर मार्ग, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा

३) दौंड-कलबुर्गी अनारक्षित स्पेशल – आठवड्याचे ५ दिवस (१२८ फेऱ्या)

गाडी क्रमांक 01421 अनारक्षित स्पेशल दौंड येथून 05.00 वाजता, आठवड्यातून 5 दिवस (गुरुवार आणि रविवार वगळता) 05.04.2025 ते 02.07.2025 पर्यंत सुटेल आणि त्याच दिवशी 11.20 वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल. (६४ सहली)

गाडी क्रमांक 01422 अनारक्षित स्पेशल कलबुर्गी येथून 05.04.2025 ते 02.07.2025 पर्यंत आठवड्यातून 5 दिवस (गुरुवार आणि रविवार वगळता) 16.10 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 22.20 वाजता दौंडला पोहोचेल. (६४ सहली)
 
४) दौंड-कलबुर्गी अनारक्षित स्पेशल – द्वि-साप्ताहिक (५२ ट्रिप)

गाडी क्रमांक ०१४२५ अनारक्षित स्पेशल दौंड येथून दर गुरुवार आणि रविवारी ०३.०४.२०२५ ते २९.०६.२०२५ या कालावधीत ०५.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.२० वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल. (२६ सहली)

गाडी क्रमांक 01426 अनारक्षित स्पेशल कलबुर्गी येथून 03.04.2025 ते 29.06.2025 पर्यंत दर गुरुवार आणि रविवारी 20.30 वाजता सुटेल आणि दौंडला दुसऱ्या दिवशी 02.30 वाजता पोहोचेल. (२६ सहली)

01421/01422 आणि 01425/01426:, 10 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 सामान्य द्वितीय श्रेणी कम गार्ड ब्रेक व्हॅनसाठी रचना

०१४२१/०१४२२ आणि ०१४२५/०१४२६ साठी थांबे: भिगवण, पारेवाडी, जेऊर, केम, कुर्डूवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, टिकेकरवाडी, होटगी, अकलकोट रोड, बोरोटी, दुधनी आणि गणागापूर.

आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक 01421,01422,01425,01426, 01469, 01470, 01467 आणि 01468 साठी विशेष शुल्कावर बुकिंग 24.03.2025 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर उघडेल.   

सुपरफास्ट मेल/एक्स्प्रेस ट्रेनसाठी लागू असलेल्या अनारक्षित निवासासाठी सामान्य शुल्कासह अनारक्षित डब्यांची तिकिटे UTS द्वारे बुक केली जाऊ शकतात.

तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा

महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या नियुक्त्या अवघ्या 8 तासात रद्द ; युवक काँग्रेसलाही गटबाजीचे ग्रहण?

पुणेः युवक काँग्रेसलाही गटबाजीचे ग्रहण लागले आहे. प्रदेश शाखेच्या नव्याने करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या अखिल भारतीय युवक काँग्रेसने अवघ्या ८ तासांमध्ये रद्द केल्या. राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी रात्री १२ वाजता नवीन नियुक्त्यांची यादी अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपवर जाहीर केली. मात्र, भारतीय युवक काँग्रेसच्या दिल्ली मुख्यालयाने सकाळीच या नियुक्त्या रद्द केल्याचे पत्र प्रसिद्ध केले. या पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले की, नियुक्त्या कोणत्याही अधिकृत मंजुरीशिवाय केल्या गेल्याने त्या अवैध ठरविण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच ज्यांनी कोणी या नियुक्त्या केल्या त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही दिला.

या मध्ये २० प्रदेश उपाध्यक्ष, ८ कार्याध्यक्ष व अन्य अनेक नियुक्त्या होत्या. या घटनेनंतर प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आता कोणामागे रहायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे विद्यमान प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत व अखिल भारतीय युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यातील मतभेद यातून उघड झाले.

केंद्रीय समितीच्या नियमांप्रमाणे प्रदेशाध्यक्षांसह कोणालाही कसलीही नियुक्ती करायची असेल तर त्यासाठी केंद्रीय समितीची मान्यता लागते. राऊत यांनी अशी कोणताही मान्यता घेतली नव्हती. त्यामुळे केंद्रीय समितीने तातडीने दिल्लीहून पत्रक प्रसिद्ध करून फक्त ८ तासांमध्ये या सर्व नियुक्त्या रद्द करून टाकल्या. केंद्रीय समितीमध्ये राष्ट्रीय सचिव असलेल्या अजय चिंकारा,एहसान खान, कुमार रोहित यांच्या या पत्रकावर स्वाक्षऱ्या आहेत. याच पत्रकात त्यांनी कोणत्याही मान्यतेशिवाय कोणाचीही नियुक्ती करणे ही गंभीर व शिस्तभंग करणारी गोष्ट आहे असे म्हटले आहे. तसेच ज्यांनी कोणी या नियुक्त्या केल्या, त्याचा शोध घेऊन संबधितांवर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला आहे.

पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी आणि महापालिका इंटीग्रेटेड  सॉफ्टवेअरचे काम मे 2025 अखेर पूर्ण होणार  – नगरविकास राज्यमंत्री माधुरी  मिसाळ 

मुंबई : स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार 50 टक्के आणि राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था प्रत्येकी 25 टक्के आपला हिस्सा देतात. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रोजेकटला गतिमान करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिका आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी यांच्यासाठी एकत्रित काम करणारे सॉफ्टवेअर आवश्यक होते. या इंटीग्रेटेड  सॉफ्टवेअरचे काम मे 2025 मध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी  मिसाळ यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.

आमदार अमित गोरखे आणि आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर  देताना राज्यमंत्री मिसाळ बोलत होतया.

आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने  जीआयएसईआरपीच्या दृष्टीने 112 कोटी रुपयांची वेगळी निविदा का काढली ?  काम संथ गतीने होत असल्याने 92 लाख रुपयांचा दंड ठोठावला अशा परिस्थितीत कंपनीकडे असलेला डेटा किती सुरक्षित आहे? असा प्रश्न विचारला होता, त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले की. 2019 साली अटॉस इंडिया ला काम देण्यात आले आहे, स्मार्ट सिटी आणि महापालिकेचे सर्व विभाग यांना एकत्र आणण्याचे ट हे काम आहे, पूर्वी महापालिकेच्या सर्व विभागाचे काम स्वतंत्रपणे चालत असे आता ते सर्व विभाग एकत्रित येतील आणि स्मार्ट सिटी शी सुद्धा कनेक्ट असतील.  पूर्वीच्या सॉफ्टवेअर मध्ये जीआय तंत्रज्ञान नव्हते नवीन मध्ये आहे आणि ते 320 लेयर मध्ये काम करते यामुळे महापालिकेचा डेटा पूर्णपणे सुरक्षित असेल. प्रॉपर्टी टॅक्स साठी या सॉफ्टवेअर मार्फत सर्वे करण्यात आला, यात ई ऑफिस सुविधा आहे. यात प्रत्येकाचे डॅश बोर्ड आणि लोंग इन वेगळे असल्याने सुरक्षा, गोपनीयता अधिक चांगल्या पद्धतीने होणार आहे.

आमदार सत्यजित तांबे यांनी अटॉस इंडिया प्रा. लि. ला गुजराती कंपनी नसेंट टेक्नॉलॉजी सोबत का निविदा भरावी लागली? असा प्रश्न उपस्थित करत यात घोटाला असल्याचा आरोप केला. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, निविदेच्या अटी शर्ती प्रमाणे या दोन कंपन्या एकत्र आलेल्या आहेत. तीन वर्षात काम पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र झाले नाही यामुळे दंड आकाराला असून काम मे 2025 पर्यंत काम पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट केले.

महाराष्ट्रात गुजरातमधून गुटखा येतो,सहज सर्वत्र मिळतो – विजय वडेट्टीवार

मुंबई-राज्यात मोठ्या प्रमाणात गुटखा हा गुजरातमधून येतो. आज गुटख्यामुळे अनेक लोक मरत आहेत. सरकारने एकतर कडक कारवाई करावी किंवा गुटख्यावरील बंदी उठवावी, असे वक्तव्य विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. यामुळे सभागृहात गदारोळ झाल्याचे दिसून आले. तर राज्याचे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी गुटखा व्यापऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही, कडक कारवाई केली जाईल, असे उत्तर दिले.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी आज विधानसभेत गुटख्यावरून लक्षवेधी मांडली. त्यांनी म्हटलं की, साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये महीम नावाचा गुटखा आपल्या शेजारच्या राज्यातून येतो. सकाळी तीन ते पाच या दरम्यान आठवड्यातून दोन वेळेस मोठ्या प्रमाणात गुटखा येतो. हे खरे आहे का आणि असल्यास याच्यावर कारवाई का केली नाही घाटकोपर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बीट चौकीच्या बाजूला दहा मीटरवर गुटखा आणि अंमली पदार्थ विकले जातात, हे पोलिसांना दिसत नाही का? त्याच्या समोरच्या जागेत सात लोकांचं रॅकेट आहे, त्या ठिकाणी काही कारवाई होणार का हिरानंदानी ही उच्च वस्ती आहे. हिरानंदानी कॉलेजच्या परिसरात दहा मीटरवर पान स्टॉल सुरु आहे. या स्टॉलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विकले जातात, यावर कारवाई करणार का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, विलास लांडे यांच्या मतदारसंघात फईम अहमद शेख नावाच्या व्यक्तीचे त्याच्या भावाच्या नावाने दुकान आहे. गुटख्याच्या विक्रीमध्ये या व्यक्तीला अगोदर देखील अटक केलेली आहे. त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केलेला आहे. त्याची तडीपारी देखील करण्यात आली होती. परंतु, हायकोर्टातून तरीपारी रद्द करण्यात आली. कोणीही अनधिकृतपणे व्यवहार करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. तुमच्याकडे जे पण माहिती उपलब्ध आहे ती माहिती मला द्यावी, नक्कीच यावर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी म्हटले.

यानंतर विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सुरू आहे. गुजरात मार्गे सर्रासपणे महाराष्ट्रात हा गुटखा विकला जातो. इतर राज्यांमध्ये याला बंदी नाही. पोलिसांनी मनात आणलं तर एक सुद्धा गुटख्याची पुडी पण कोणी विकू शकत नाही. अनेक लोक यात मरत आहेत. शासनाने कारवाई करावी नाहीतर ही बंदी उठवावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर गुटखा लॉबीला मदत करण्यासाठी आपण बंदी उठवा, असे म्हणता का? असा सवाल अनिल साटम यांनी उपस्थित केला. यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, गुटख्यावर कारवाई होत नाही असे नाही. मागच्या वर्षात आपण 150 कोटी पेक्षा जास्त गुटखा पकडला आहे. गुटखा व्यापऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही, कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले.

जळगाव:कानसवाडा गावात एकनाथ शिंदे गटाच्या माजी उपसरपंचावर चॉपर-चाकूने हल्ला करून निर्घृण हत्या

जळगाव -जिल्ह्यातील कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांच्या हत्येची घटना आज सकाळी समोर आली. या प्रकरणामुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. युवराज कोळी हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे कार्यकर्ते होते. तसेच ते कानसवाडा या गावचे माजी उपसरपंच देखील होते. त्यांच्या या हत्येमुळे आता जळगाव जिल्हा चांगलाच हादरला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असताच आजा जळगाव जिल्ह्यातील आणखी एक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील कानसवाडा गावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर चॉपर आणि चाकूने हल्ला केला होता. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमागचे कारण अद्याप अस्पष्ट झालेले नाही. जळगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावातीलच रहिवासी असलेल्या तीन आरोपींनी सकाळी आठ वाजता युवराज कोळी यांच्यावर हल्ला केला. यामध्ये चाकू आणि चॉपर यांच्या माध्यमातून कोळी यांच्यावर सपा-सपा वार करण्यात आले. हे वार वर्मी लागल्याने युवराज कोळी जागीच कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या घटनेनंतर गावातील नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. युवराज कोळी यांच्या नातेवाइकांनी आक्रोश व्यक्त करत या प्रकरणातील दोषी व्यक्तींना लवकरात लवकर ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. मात्र युवराज कोळी यांचा नेमका खून कोणत्या कारणामुळे झाला? हे अद्याप समोर आलेले नाही. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून त्यांनी संतप्त नागरिकांना शांत केले आहे. तसेच अधिक तपास सुरू आहे.

नामांकित शिक्षण संस्थाचालकाला अश्लील व्हिडिओ व्हायरल करेल धमकी देऊन २५ लाखांची मागणी-५ तासात आरोपी गजाआड

पुणे- नामांकीत शिक्षण संस्था चालकाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणा-या गुन्हेगारास ०५ तासांचे आत सिंहगड रोड पोलीसां कडून अटक करण्यात आली आहे. या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’सिंहगड रोड पोलीस ठाणे हद्दीमधील नामांकीत शिक्षण संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष यांना त्यांचे मुलाचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची वेळोवेळी धमकी देऊन त्यांचेकडून २५ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणारा त्यांच्याच शिक्षण संस्थेमधील माजी कॅमेरा व संगणक तज्ञ तथा आरोपी सुदर्शन कांबळे याचे विरुद्ध तक्रारदार यांनी दिनांक २०/०३/२०२५ रोजी तक्रार दिल्याने सिंहगड रोड पोलीस ठाणे, पुणे शहर, येथे गुन्हा रजि नं. १५५/२०२५, भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०८ (२) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दाखल गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेवुन ताब्यात घेणे बाबत चौकी अधिकारी तसेच तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे प्रभावी मार्गदर्शनाखाली नमुद आरोपीबाबत केवळ जुजबी माहिती प्राप्त असताना, गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करुन, केवळ ०५ तासांचे आत आरोपीस त्याचे धायरेश्वर मंदीराजवळील घराजवळून ताब्यात घेऊन त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली.
सदरची कामगिरी सहायक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग अजय परमार, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड पो.स्टे.चे दिलीप दाईंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), उत्तम भजनावळे, सपोनिरी समीर चव्हाण, पोउपनिरी सुरेश जायभाय, संतोष भांडवलकर, सागर पवार, पोलीस अंमलदार तारु, केकाण, शिंदे, बांदल, मोहिते, पांडोळे, पाटील, भोरडे यांचे पथकाने केली आहे.

तीन अल्पवयीन मुलींचा शोध घेवून सुखरुप दिले पालकांच्या ताब्यात:भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी

पुणे- अपहृत केलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा शोध घेवून त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात भारती विद्यापीठ पोलीसांनी सुखरुप सोपविले आहे
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ अल्पवयीन मुलींना कोणीतरी अज्ञात इसमांनी फुस लावुन पळुन नेले बाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे तीन गुन्हे दाखल होते . पिडीत अपहृत मुलींचा वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सावळाराम साळगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व पो. अंमलदार यांनी शोध घेतला.ती प्रकरणे पुढील प्रमाणे
१. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ६५/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम १३७ (२) या गुन्हयातील पिडीत अपहृत मुलीचा अंमलदार मंगेश ढोमसे, केतन लोखंडे, सागर कोंडे, महीला अंमलदार सोनल कामठे यांनी शोध घेतला असता ती आधोली, आंध्रप्रदेश, येथे सुखरुप मिळुन आली असुन तिस तिचे पालकांचे ताब्यात सुखरुप देण्यात आले आहे.
२. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १०७/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम १३७ (२) या गुन्हयातील अपहृत मुलीचा पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मंगेश पवार, अभिनय चौधरी, बंडु सुतार, सचिन गाडे, महेश बारवकर यांनी शोध घेतला असता ती आळंदी, पुणे, येथे सुखरुप मिळुन आली असुन तीस सुरक्षिततेच्या कारणास्तव महीला सुरक्षागृहात ठेवण्यात आले आहे.
३. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १५३/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम १३७ (२) या गुन्हयातील अपहृत मुलीचा सपोनि कदम, पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण यांनी शोध घेतला असता ती घणसवंगी, जालना येथे सुखरुप मिळुन आली असुन तिस तिचे पालकांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरीअपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग,प्रविणकुमार पाटील,.पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील पोलीस उप आयुक्त, मिलींद मोहीते, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पो. निरीक्षक भारती विदयापीठ पो.स्टे. कडील सावळाराम साळगांवकर, पो. निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, सपोनि समीर कदम, सपोनि समीर शेडे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

‘तरंग’ बंटा गोळयांची विक्री करणाऱ्या राजस्थानी किराणा दुकानदारास पकडले

‘तरंग विजयावटी आयुर्वेदिक औषधी नावाने भांगेच्या गोळ्यांची शहरात विक्री

पुणे- तरंग या नावाने भांगयुक्त बंटा गोळयांची विक्री करणा-यास पुणे पोलिसांनी अटक केली आहे . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’
पुणे शहरामध्ये भांगयुक्त बंटा गोळयांची विक्री होत असले बाबत माहिती मिळाली होती. त्याअनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंलदार असे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना साई सृष्टी रेसिडेन्सी समोर देशमुखवाडी, कॅनोलरोड, शिवणे पुणे या ठिकाणी सार्वजनीक रोड लगत इसम नामे दिनेश मोहनलाल चौधरी वय ३० वर्षे, रा. राधा कृष्ण, अर्पाटमेंन्ट, देशमुखवाडी, शिवणे पुणे याचे ताब्यात १०,८००/-रु किमतीचे पांढ-या नायलॉन पोत्यामध्ये भांगयुक्त बंटयाच्या गोळया असलेले एकुण २४ पॅकेट प्रत्येकी पाकीटाचे वजन २०० ग्रॅम असा एकुण ४ किलो ८०० ग्रॅम वजनाचा प्रोव्हिबीशनचा ऐवज अवैधरित्या विक्री करीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरचा इसम हा मुळचा राजस्थान राज्यातील असुन पुणे शहरामध्ये गेले पाच वर्षा पासुन किराणा मालाचे दुकान चालवित आहे. त्याने सदरच्या भांगयुक्त बंटा गोळया कोठुन आणल्या व कोठे विक्री करीत होता याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
वरील नमुद कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पो आयुक्त, गुन्हे १ श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहा पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उप निरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार, सचिन माळवे, संदिप शिर्के, विपुन गायकवाड, विशाल दळवी, मारुती पारधी, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.

शेजारी राहणाऱ्या कामवाल्या महिलेचे घर फोडले ,सव्वादोन लाखाची चोरी करणारी ३१ वर्षीय तरुणी २४ तासात गजाआड

पुणे-शेजारी भाड्याने राहणाऱ्या एका कामवाल्या महिलेचे घर फोडून तिच्या घरातील सोने आणि रोख रक्कम असा सुमारे सवादोन लाखाच्या ऐवजाची चोरी करणारी ३१ वर्षीय तरुणी पुणे पोलिसांनी २४ तासात गजाआड केली .
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ फिर्यादी ह्या आपले घर सोसायटी, खराडी, पुणे येथे भाड्याचे राहण्यास असून त्या एका खाजगी कंपनीमध्ये हाऊस किपींगचे काम करून आपला उदनिर्वाह करतात फिर्यादी यांनी कष्ट करून थोडे थोडे करून घेतलेले सुमारे आडीच तोळे सोने व ३० हजार रु. रोख रक्कम ही त्यांनी त्यांचे घरातील लोखंडी कपाटामध्ये ठेवलेली होती.
फिर्यादी ह्या दि.१७/०३/२०२५ रोजी नेहमी प्रमाणे सकाळी १०:१५ वा.चे सुमारास त्यांचे हाऊस किपींगचे कामा करीता घरातील लोखंडी कपाट व घराचे दरवाजास कुलुप लावून कामावर निघुन गेल्या. त्यानंतर त्या रात्री ८:०० वा. चे सुमारास घरी परत आल्या असता त्यांना घराचे दरवाजाचे कुलुप तुटलेले व घरातील लोखंडी कपाट कशाचे तरी सहाय्याने उचकटल्याचे दिसल्याने त्यांनी कपाटातील सोन्याचे दागीणे व रोख रक्कम पाहिली असता त्यांचा ऐवज तेथे नसल्याचे दिसल्याने कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घरामध्ये चोरी केल्याचे त्यांचे लक्षात आल्याने त्याबाबत खराडी पो.स्टे. येथे गुन्हा भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (अ),३३१ (३),३३१ (४) नोंद आहे.
दाखल गुन्हया बाबत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पो.स्टे. संजय चव्हाण यांनी खराडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे प्रमुख पो.उप.निरी . राहुल कोळपे. व डि.बी. स्टाफला तपासा बाबत सुचना दिल्या त्या अनुषंगाने खराडी पो.स्टे.चे तपास पथकातील पोलीस हवालदार सुरेंद्र साबळे यांना त्यांचे खास बातमीदाराने बातमी दिली कि एक महिला खराडी परिसरामध्ये सोने विकण्याच्या प्रयत्नात आहे. त्यानुसार सुरेंद्र साबळे यांनी सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय चव्हाण, यांना दिली असता त्यांनी डि.बी.स्टाफ मधील पोलीस आधिकारी व पो. अमंलदार व पो. महिला अमंलदार यांची एक टिम तयार करून त्यांना रवाना करुन सदर महिलेस शिताफीने ताब्यात घेतले. तिला तिचे नाव विचारले असता तिने आपले नाव अनिता शषीराव नवसागर, वय ३१ वर्षे, रा. आपले घर सोसा. खराडी, पुणे. असे असल्याचे सांगीतले. तिचेकडे असलेल्या सोन्याबाबत विश्वासात घेऊन अधिक तपास केला असता तिने सांगीतले की, ती फिर्यादी राहत असलेल्या बिल्डींगमध्ये राहण्यास असून फिर्यादी यांचे कामाची वेळ तिला माहित असल्याने फिर्यादी बाहेर जाताच तिने कुलुप तोडून व कपाट उचकटुन कपाटातील सुमारे आडीच तोळ्याचे सोन्याचे दागीने व रोख ३० हजार रु. चोरल्याची कबुली देऊन तो ऐवज पोलीसांना काढुन दिल्याने तो पोलीसांनी गुन्ह्याचे पुरावे कामी जप्त केला आहे.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४, हिंम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्रीमती प्रांजली सोनवणे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पो.स्टे संजय चव्हाण, पो.उप.निरी श्री. राहुल कोळपे. तपास पोलीस अमंलदार सुरेद्र साबळे, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे अमित जाधव, सचिन रणदिवे, सचिन पाटील, मुकेश पानपाटील, सुरज जाधव, श्रीकांत कोद्रे, म.पो. अंमलदार थोरात, वाघमारे, मालवडे यांचे पथकाने केली आहे.

विधानसभा अध्यक्ष मुंबईतील रस्त्यांवर नाराज,सोमवारी दुपारी मुंबईतील आमदारांची लावली बैठक

मुंबईमुंबईतील रस्त्यांच्या मुद्यावर शुक्रवारी विधानसभेत चर्चा झाली. त्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या मतदारसंघातील रस्त्यांच्या कामाचे उदाहरण देत मुख्यंमत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला गालबोट लागेल अशी आजची स्थिती असल्याचे परखड मत व्यक्त केले. विधानसभेत आज सत्ताधारी व विरोधी पक्षांतील आमदारांनी मुंबईतील रस्त्यांच्या कामावर प्रचंड नाराजी व्यक्त केली. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबईतील सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांच्या कामावरून प्रश्न उपस्थित केला होता. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. पण या कामामध्ये अनेक ठिकाणी निकृष्ठ दर्जाचे काम झाले. काम रेंगाळले. यंत्रणा काहीच काम करत नव्हती, असे भातखळकर म्हणाले.

त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. मुंबईकरांना दर्जेदार रस्ते देण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार त्याला कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे ते म्हणाले. सामंत यांच्या या उत्तरानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नाराजीचा सूरात आपली भूमिका मांडली. मला या विषयात बोलायचे नव्हते, पण मला बोलावे लागेल, असे ते म्हणाले.माझ्या मतदारसंघात दोन-अडीच वर्षांपूर्वी पहिले टेंडर निघाले. पण कंत्राटदाराने कोणतेही काम केले नाही. त्यानंतर 6 महिन्यांपूर्वी पुन्हा टेंडर काढले. पण अजूनही काम सुरू झाले नाही. सदर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून काढले. त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. केवळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. दंड आकारण्यात आला. पण महापालिकेने दंड वसूल करण्यासाठी कोणतीही कारवाई केलेली नाही, अशी बाब नार्वेकरांनी निदर्शनास आणून दिली.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची संकल्पना अत्यंत चांगली आहे. मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी हे रस्ते बांधण्यात येत होते. पंरतु, प्रशासनाकडून ज्या प्रकारची कारवाई होत आहे, ती पाहता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला निश्चितपणे गालबोट लागेल अशी परिस्थिती आज आहे, अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली.

राहुल नार्वेकर यांच्या या विधानानंतर भाजप आमदार अमित साटम यांनीही मुंबईतील रस्त्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू झालेल्या रस्त्याचे काम अजूनही सुरू आहे. या कामामु्ळे आमच्या नाकीनऊ आलेत. अख्खी मुंबई खोदून ठेवली आहे. मुंबईकरांची क्वालिटी ऑफ लाईफ काय? असा सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला. त्यानंतर अमित देशमुख, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांनीही रस्त्यांच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केले. अखेरीस अध्यक्षांनी सोमवारी दुपारी 3 वाजता त्यांच्या दालनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील आमदारांची बैठक घेण्याचे जाहीर केले.

पूनावाला फिनकॉर्पने भारतासाठी व्यावसायिक वाहन कर्ज व्यवसाय सुरू केला

मुंबई : सायरस पूनावाला समूहप्रवर्तित एनबीएफसी Poonawalla Fincorp Limited (PFL), या ग्राहक आणि
एमएसएमई कर्जावर लक्ष केंद्रित करणाऱ्या एनबीएफसीने आपला व्यावसायिक वाहन (सीव्ही) सुरक्षित कर्ज व्यवसाय
सुरू करून आपल्या उत्पादन समूहाचा विस्तार केला आहे. सीव्ही ऑपरेटर्ससाठी वाहतूक क्षमता वाढवून आवश्यक
लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी क्षेत्रांना चालना देणे हे या नवीन ऑफरचे उद्दिष्ट आहे. या कर्जात सर्व प्रमुख
उत्पादकांकडून लहान, हलक्या आणि मध्यम तसेच अवजड व्यावसायिक वाहनांचा समावेश आहे, जे नवीन आणि
वापरलेल्या वाहनांच्या खरेदीस समर्थन देते. ग्राहकांना लवचिक, संरचित पेमेंट आणि परतफेडीच्या पर्यायांचा ही फायदा
होईल.
या लाँचचा एक भाग म्हणून, पीएफएलने त्यांच्या जोखीम-प्रथम दृष्टिकोनाशी सुसंगत तंत्रज्ञान उपाय सादर केला आहे.
हा उपाय ग्राहकांसाठी दस्तऐवजीकरण प्रक्रिया कमी करण्यावर लक्ष केंद्रित करते, यामुळे जलद टर्नअराउंड वेळ आणि
एक सलग ऑनबोर्डिंग अनुभव प्रदान करते. विविध तंत्रज्ञान भागीदारांशी जुळवून घेत, कंपनीने सत्यापित स्त्रोतांकडून
प्रमाणीकरणासह मूल्यांकन फ्रेमवर्क विकसित केले आहे.
भारताच्या टियर 2 आणि टियर 3 बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करून पीएफएलने सुरुवातीला 12 राज्यांमधील 68
ठिकाणी आपले काम करण्याची योजना आखली आहे. तर पुढील टप्प्यात हब-अँड-स्पोक मॉडेलद्वारे 20 राज्यांमधील
400 ठिकाणी विस्तार करण्याचे ठरवले आहे. डायरेक्ट-टू-कस्टमर, डीलर्स आणि चॅनेल पार्टनर्सद्वारे सीव्ही कर्ज दिले
जाईल. अनुकूल आर्थिक सोल्यूशन्स प्रदान करण्यासाठी आणि ग्राहकांचा अनुभव वाढविण्यासाठी कंपनीने उद्योग
व्यावसायिकांना यात सहभागी केले आहे.
या लाँचबद्दल पूनावाला फिनकॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. अरविंद कपिल म्हणाले, “व्यावसायिक
वाहतूक क्षेत्र हे आपल्या वाढत्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. सुलभ प्रक्रिया आणि त्रासमुक्त कागदपत्रांसह वाहतूकदारांच्या
आर्थिक गरजा आमचे नवीन व्यावसायिक वाहन कर्ज थेट पूर्ण करते. यामुळे आमच्या सुरक्षित व्यवसायाच्या भेटीतील ही
महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.”
भारतातील भरभराटीचे ई-कॉमर्स क्षेत्र, जलद औद्योगिक वाढ आणि महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधांच्या विकासामुळे
देशभरात नवीन आणि वापरलेल्या व्यावसायिक वाहनांची मागणी वाढते आहे. पीएफएलच्या व्यावसायिक वाहन कर्ज
पोर्टफोलिओचा एक महत्त्वाचा भाग बनण्याचा अंदाज असलेला वापरलेल्या व्यावसायिक वाहनांचा विभाग या
उपक्रमाचा आधारस्तंभ आहे, जो वाहतूक आणि लॉजिस्टिक्स इकोसिस्टममध्ये योग्य असलेली क्षमता आणि संधी निर्माण
करतो.
धोरणात्मक, जोखीम-प्रथम दृष्टिकोन स्वीकारून, पीएफएल केवळ जलद कर्ज वितरण सुलभ करत नाही तर फ्लीट मालक
आणि वाहतूकदारांना त्यांचे कामकाज आत्मविश्वासाने आणि स्थिरतेने विस्तारत येईल याची खात्री देखील देते.
कर्जाची प्रक्रिया सुलभ सोपी करणे, ग्राहकांना आनंद देणे आणि त्यांना उत्तम अनुभव देणे यावर कंपनी लक्ष केंद्रित करत
असून हेच तिचे प्राधान्य आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित सणसवाडीच्या लावणी प्रशिक्षण शिबिराला मान्यवरांचे मार्गदर्शन.

पुणे-सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित प्रयोगात्मक कला प्रकारापैकी एक असलेली पारंपारिक लावणी ह्या कला प्रकाराचे प्रशिक्षण शिबीर दिनांक 15 मार्च ते 25 मार्च 2025 या दरम्यान सुरू झाले आहे.पुणे सोलापूर रस्त्यावरील सणसवाडीच्या कलाकेंद्रात हे शिबीर सुरु आहे.
या पारंपरिक लावणी प्रशिक्षण शिबिराला जेष्ठ लावणी सम्राज्ञी शंकुतला नगरकर यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना पारंपारिक लावणीचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यामध्ये बैठकीची लावणी, छक्कड, शृंगारीक लावणी, आदी कला प्रकार प्रशिक्षणार्थी विद्यार्थीना शिकविले.तर सावित्रीबाई फुले विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्रातील विभाग प्रमुख श्रीमती अनघा तांबे यांनी या शिबीराला हजेरी लावून पारंपारिक लावणीचे काय महत्व आहे. याबद्दल मार्गदर्शन केले . लावणी का जोपासली पाहिजे, तसेच एक स्री कलावंत म्हणुन शिक्षणही कसे महत्वाचे आहे. याबद्दल त्यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले. समाजामध्ये आपली स्त्री म्हणुन नाही, तर कलाकार म्हणुन ओळख तयार करा. लावणी विषयाची निवड काळजी पूर्वक करा असा सल्ला ही श्रीमती तांबे यांनी दिला.या शिबिराचे संचालक म्हणून रेश्मा परितेकर यांनी जबाबदारी घेतली आहे.

औरंगजेबाने जेवढे लोक त्याच्या काळात मारले, त्यापेक्षा अधिक लोक आज राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाने मरताहेत

  • माजी आमदार बच्चू कडू यांचा घणाघात; दिव्यांग, शेतकऱ्यांसाठी रायगडाच्या पायथ्याला अन्नत्याग आंदोलन सुरू

रायगड : प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून (२१ मार्च) दिव्यांग मंत्रालयाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात तीन दिवस अन्नत्याग आंदोलन रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारी सुरू करण्यात आले आहे. यावेळी आंदोलनाचे संयोजक व प्रहार जनशक्ती पार्टीचे सचिन साळुंखे, ओंकार साळुंखे, प्रहार अपंग क्रांती संस्थेचे महाराष्ट्र सचिव सुरेश मोकळ, राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव, रायगड जिल्हा अध्यक्ष सुनील गणबोडे, महाराष्ट्र संपर्कप्रमुख रामदास खोत, अभियान प्रमुख महेश बडे आदी उपस्थित होते. राज्यभरातील दिव्यांग मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत.

यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले, “आज देशात आणि राज्यात धर्म आणि जातीपातीचे घाणेरडे राजकारण केले जात आहे. सरकारला नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक धर्माच्या लोकांना पोट असते आणि त्याकरिता सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. औरंगजेबाने त्याच्या काळात जेवढे लोक मारले नसतील, त्यापेक्षा अधिक लाखो शेतकऱ्यांनी राज्यात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या केल्या आहेत. परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. औरंगजेबाने तलवारीच्या टोकावर लोकांना मारले. मात्र, सध्याचे राज्यकर्ते हे त्यांच्या विविध धोरण, कलमाने मारत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने धर्म, जात यावर राजकारण करण्यापेक्षा नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत.”

कडू पुढे म्हणाले, “सर्वत्र महागाई वाढलेली असून दिव्यांगांना मागील चार महिन्यापासून कोणतेही मानधन मिळत नाही. त्यांचे जीवन असह्य झाले आहे. याबाबत सरकार कोणतीही दखल घेताना दिसत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा शेतीच्या शेतमालास योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झालेला आहे. लाडकी बहीण नाममात्र असून, राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी, मजूर, दिव्यांग, कामगार यांच्यासाठी कोणतीही विशेष तरतूद न करता केवळ अनुदान कपातीचे धोरण आखले जात आहे. दिव्यांग मंत्रालय निर्माण करण्यात येऊन १४०० कोटींची तरतूद करण्यात आली. मात्र, त्यापैकी १२०० कोटी रुपये केवळ पगारावर खर्च केले जात आहे. मुबलक निधी नसेल, तर दिव्यांग मंत्रालय कशाप्रकारे काम करणार हे सरकारने स्पष्ट करावे. श्रम, मूल्य आधारित मोबदला लोकांना मिळत नसून, केवळ राजकीय लाभासाठीच्या योजना सध्या सुरू आहे. औरंगजेबाची कबर, दिशा सॅलियन प्रकरणातून नेमका कोणाचा फायदा होणार आहे. त्यामुळे निरर्थक गोष्टी दाखवण्यापेक्षा योग्य गोष्टी दाखवल्या तर लोकांना समाधान मिळेल. औरंगजेबाच्या कबरीबाबत राजकारण प्रसारमाध्यमातून दाखवले जाते, पण सामन्यांचे हाल कोणाला दिसत नाही. याचे प्रसारमाध्यमांनीदेखील भान ठेवावे. राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात दंगल होते. याबाबत त्यांना खरेतर शरम वाटली पाहिजे. परंतु त्याबाबत कोणतीही खंत व्यक्त न करता ते याबाबतचेच राजकारण करत असल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे किमान थोडी लाज वाटून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे.”

सचिन साळुंखे म्हणाले, “स्वराज्याच्या राजधानीवरून राज्याच्या राजधानीला इशारा देण्यासाठी हे प्रतीकात्मक आंदोलन आहे. दिव्यांगांना, कर्जमाफी, त्यांना दरमहा ६००० रुपये मानधन, स्वतःचे घर व स्वाभिमानाने जीवन जगण्याची संधी, स्वयंरोजगारासाठी दिव्यांगांना स्टॉल, दिव्यांगांसाठी राष्ट्रीय बँक निधी, दिव्यांग उद्योजकांसाठी धोरण, प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन, अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी द्यावा, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे. तसेच २३ मार्च रोजी शहीद दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर देखील आयोजित करण्यात आले आहे.”

हडपसरमध्ये थांबलेल्या बसमधून 34 लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला

पुणे-डोंबिवली येथून कर्नाटकातील विजापूर येथे विक्रीसाठी ३४ लाख ६३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन जात असलेल्या व्यापाऱ्याचे दागिने मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास चोरीस गेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात बेहराराम कपुराराम कुमावत (वय- ४४,रा. डोंबिवली) यांनी अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बेहराराम कुमावत हे मुळ राजस्थान मधील जालोर जिल्ह्यातील रहिवासी असून कामानिमित्त डोंबिवली येथे वास्तव्यास आहे. नऊ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता त्यांनी वे. व्ही.आर. ट्रॅव्हल्सची बस (एमएच १२ वीएफ ८२४३) ही कर्नाटकला जाण्याकरिता पकडली होती. सीट क्रमांक ३१ वर ते बसलेले असताना १० मार्च रोजी मध्यरात्री साडेतीन वाजताच्या सुमारास हडपसर येथील टोलनाक्याजवळ एका छोट्या मंदिराजवळ बस प्रवाशांना वॉशरुमला जाण्यासाठी थांबली होती. त्यावेळी सदर व्यापाऱ्याचे बाजूला सीट क्रमांक ३२ व ३३ वर बसलेले दोन संशयित प्रवासी सुद्धा गाडीच्या खाली उतरले होते.व्यापारी गाडीतून खाली उतरुन थोड्या वेळाने पुन्हा गाडीत आल्यावर त्यांचे दोन बँगा कोणीतरी लंपास केल्याचे दिसून आले. सदर व्यापारी हा मागील दीड वर्षापासून सोने खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असून त्याने वेगवेगळया ज्वेर्लसकडून सुमारे ३४ लाख ६३ हजार रुपयांचे ४५७ ग्रॅम सोने खरेदी केलेले संबंधित बँगेत होते.सोने चोरीस गेल्याने व्यापाऱ्याने बस चालकास त्याची माहिती दिली. त्यानुसार प्रवाशांची तपासणी केली असता व्यापाऱ्याचे बँग सापडल्या नाहीत. दरम्यान, गाडीत एक आकाश नावाचा संशयित प्रवासी होता ताे दिसला नाही. मग त्याचा मोबाईल नंबर बंद आला. हडपसर पोलिसांकडे याबाबत उशिराने तक्रार दाखल झाल्यानंतर, त्यांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरु केली आहे. नियोजनबध्द सदर गुन्हा केल्याचा पोलिसांना संशय असून त्याबाबत अधिक तपास हडपसर पोलिस करत आहे.

सरसंघचालकांना उचला अन् मुंबईत आणा:परमबीर सिंग यांनी दिले होते आदेश, मालेगाव बॉम्बस्फोटाच्या सुनावणीत खळबळजनक बाब उजेडात

मुंबई-मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अटकेचे आदेश दिले होते, अशी खळबळजनक बाब मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या सुनावणीत समोर आली आहे. औरंगजेबाची कबर व दिशा सालियन आत्महत्येवरून अवघ्या महाराष्ट्राचे वातावरण तापले आहे. त्यातच ही नवी बाब समोर आली आहे.

यासंबंधीच्या मीडिया रिपोर्टनुसार, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची विशेष NIA न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू आहे. या प्रकरणातील याचिकेच्या सुनावणीवेळी संशयित सुधारक द्विवेदी यांच्या वतीने वकील रणजित सांगळे यांनी युक्तिवाद करताना उपरोक्त दावा केला आहे. ते म्हणाले, परमबीर सिंग यांनी एटीएसचे तत्कालीन अधिकारी महबूब मुजावर यांना बोलावले होते. त्यानंतर त्यांनी त्यांना नागपूरला जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांना उचलण्याचे व मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते.पण हे आदेश तोंडी असल्याने त्यांनी त्याचे पालन केले नाही. परिणामी, मुजावर यांना सोलापुरातील एका खोट्या प्रकरणात गोवण्यात आले. मुजावर यांनी सोलापूर कोर्टात दिलेल्या जबाबात ही माहिती उजेडात आली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास खोटा व हिंदू दहशतवादाचे खोटे कथानक पसरवण्यासाठीच होता, असा दावाही वकील सांगळे यांनी यावेळी आपल्या युक्तिवादात केला.माजी एटीएस अधिकारी मुजावर यांनी आधीच मीडियाला माहिती देताना सांगितले की, संदीप डांगे व रामचंद्र कलसांग्रा एटीएसच्या कोठडीत मृत्यू पावले होते. परंतु विशेष एनआयए न्यायालयात दाखल केलेल्या एटीएसच्या आरोपपत्रात त्या दोघांना जिवंत दाखवण्यात आले. आता एटीएसला ते हवे आहेत, असे वकील सांगळे यावेळी म्हणाल्याची माहिती आहे. या खुलाशामुळे परमबीर सिंग यांचे मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासाशी असणारा संबंध उजेडात आला आहे.

दरम्यान, मालेगाव येथील एका मशिदीजवळ 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. हा बॉम्ब एका दुचाकीवर पेरण्यात आला होता. त्यात 6 जण ठार, तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते. आता या प्रकरणात नवनवीन खुलासे होत असून, राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.