Home Blog Page 404

आगीमुळे २२० केव्ही टॉवर लाइनला ट्रिपिंग; हिंजवडीमधील उद्योगांसह ९० हजारांवर ग्राहकांचा पाऊणतास वीज खंडित

पुणे, दि. २२ मार्च २०२५: आंबेगाव (ता. मुळशी) येथे लागलेल्या आगीमुळे शनिवारी (दि. २२) दुपारी १२.४४ वाजता महापारेषणच्या पिरंगुट-कांदळगाव २२० केव्ही अतिउच्चदाब टॉवर लाइनमध्ये ट्रिपिंग आले. त्यामुळे हिंजवडीमधील २०० आयटी उद्योगांसह हिंजवडी, वाकड, पिरंगुट, भुकुम, भुगाव, पौड, मुठा खोरे, कोळवण खोरे आदी परिसरातील घरगुती, व्यावसायिक व इतर सुमारे ९० हजार २०० ग्राहकांचा वीजपुरवठा ४३ मिनिटे बंद होता.

याबाबत माहिती अशी की, आंबेगाव (ता. मुळशी) येथील टेकड्यांच्या परिसरात आज लहानमोठ्या झाडाझुडपांना आग लागली होती. या ठिकाणी असलेल्या महापारेषणच्या पिरंगुट-कांदळगाव २२० केव्ही अतिउच्चदाबाच्या टॉवर लाइनखाली ही आग पसरल्यानंतर या लाइनमध्ये ट्रिपिंग आले. परिणामी महावितरणच्या पिंपरी विभागातील १३ व मुळशी विभागातील १८ अशा ३१ उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला व वीजयंत्रणेत १८२ मेगावॅटची तूट निर्माण झाली. यामुळे हिंजवडी फेज १ ते ३ मधील २०० आयटी उद्योग तसेच वाकड परिसर, पिरंगुट, भुगाव, भुकूम, उरावडे, कासारआंबोली, पौड, पळवण खोरे, मुठा खोरे, कोळवण खोरे, लवळे, कोठावडे आदी परिसरातील ९० हजार घरगुती, व्यावसायिक व इतर ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. महापारेषणच्या वरिष्ठ अभियंत्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन दुरुस्तीचे काम पूर्ण केल्यानंतर ४३ मिनिटांनी या सर्व परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत झाला.

पाश्चात्य संगीतापेक्षा शास्त्रीय संगीत आणि नृत्यातून वेगळा आनंद मिळतो

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची भावना

पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

पुणे:आज तरुण पिढी पाश्चात्य संगीताच्या आहारी जात आहे. त्यातून सर्वांना आनंद मिळतो असे नाही. मात्र, शास्त्रीय संगीत आणि नृत्यामधून एक वेगळाच आनंद मिळतो, अशी भावना, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था प्रस्तुत नृत्य गुरु पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे उद्घाटन आज झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, नृत्य गुरु शमा भाटे, नृत्य गुरु मनिषा साठे, सुचेता चापेकर, भाजपा सरचिटणीस तथा‌ कार्यक्रमाचे संयोजक पुनीत जोशी यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवात ५०० पेक्षा जास्त कलाकार आपला कलाविष्कार सादर करत असून, देशातील दोन नामांकित संस्था देखील सहभागी झाल्या आहेत.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, प्रत्येक कलाकारांना संवाई गंधर्व मध्ये आपली कला सादर करण्याची इच्छा असते. आज तरुण पिढी पाश्चात्य संगीताच्या आहारी जात आहे. , पाश्चात्य संगीतातून आनंद मिळतो असे नाही. सध्या डीजे डॉल्बी आणि त्याला जोडीला ड्रग्ज आले आहे. त्यामुळे हे तरुण पिढीला उद्ध्वस्त करत आहे. याला सांस्कृतिक कार्यक्रम उत्तर आहे.

ते पुढे म्हणाले की, प्रत्येकामध्ये एक कलाकार दडलेला आहे. त्यामुळे तो आज आपापल्या परीने कला सादर करत असतो. कोणी आपल्याला आवडणारे गाणं गुणगुणत असतो. तर कोणी बंद खोलीत नृत्य करतो. त्यातून एक सकारात्मक लहरी निर्माण होतात. त्यामुळे आनंद बाहेर शोधण्याऐवजी, स्वतः मध्येच शोधला पाहिजे, अशी भावना व्यक्त केली.‌

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पुणे हे सांस्कृतिक राजधानी असलेले शहर आहे. पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्राच्या वैभवात भर घालत आहे. गेल्या पाच वर्षांत नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून सातत्याने पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घातली आहे. पुढील वर्षी हा महोत्सव अधिकाधिक भव्यदिव्य व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी नृत्य गुरु मनिषा साठे यांनी देखील भावना व्यक्त केली. शास्त्रीय नृत्याच्या सरावासाठी एखादे नृत्य संकुल उभारण्याची नृत्य संवर्धन संस्थेच्या सर्व सदस्यांची इच्छा असल्याची भावना असून, त्यासाठी राजाश्रय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून, नृत्य महोत्सवाच्या माध्यमातून अहिल्यादेवींना अभिवादन करण्यात आले.

सोशल मीडियावर औरंगजेबाचं समर्थन: पुण्यात दोघांवर कारवाई

पुणे-राज्यभरात औरंगजेबच्या कबरवरुन राजकीय वाद सुरु असतानाच त्याचे गंभीर पडसाद नागपूर दंगलीच्या रुपाने समाेर आलेत. साेशल मिडियावर औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर देखील पाेलिसांची नजर असून याबाबत कठाेर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. पुण्यात देखील इन्स्टाग्राम स्टेटसला औरंगजेबचा फाेटाे ठेवत वादग्रस्त व्यक्तव्य केल्याप्रकरणी दाेन तक्रारी पाेलिसांकडे आल्या. त्यानुसार दाेन जणांवर पाेलिसांनी समर्थ आणि विश्रांतवाडी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

विश्रांतवाडी पाेलिस ठाण्यात याबाबत विष्णू मनाेज साळुंके (वय- २४,रा. येरवडा,पुणे) यांनी इन्स्टाग्राम आयडी नंबर लाला २७१० वापरकर्ते विराेधात पाेलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संबंधित इन्स्टाग्राम आयडीधारकाने त्याचे इन्स्टाग्राम स्टेटसला औरंगजेबची कबर व त्याखाली ‘ऊस बादशाह की क्या शान रही हाेगी जिसका नाम लेके आजतक लाेग सियासत करते है’ असा स्टेटस ठेवला. यामुळे संबंध हिंदु समाजाच्या भावना दुखावून हिंदु मुस्लिम समाजात तेढ निर्माण हाेऊन सार्वजनिक शांतता बिघडविण्याचे हेतूने पाेस्ट प्रसारित करण्यात आली आहे. याबाबत घटनेची माहिती मिळाल्यावर, खडकर विभागाचे सहाय्यक पाेलीस आयुक्त विठ्ठल दबडे, विश्रांतवाडी पाेलिस ठाण्याच्या वरिष्ठ पाेलिस निरीक्षक कांचन जाधव, पाेउपनि नितीन राठाेड यांनी तक्रारदार यांचेसह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याबाबत पुढील तपास पाेलिस उपनिरीक्षक शब्बीर शेख करत आहे.

दुसऱ्या घटनेत समर्थ पाेलिस ठाण्यात हेमंत दत्ता गायकवाड (वय- २५,रा.मंगळवार पेठ,पुणे) यांनी पाेलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आराेपी सईद अमजद पठाण (रा.राजेवाडी,पुणे) याचे विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आराेपी याने हिंदु समाजाच्या भावना दुखावुन, हिंदु व मुस्लिम या समाजात तेढ निर्माण करुन कायदा व सुव्यवस्था धाेक्यात येईल अशाप्रकारे वाद निर्माण हाेण्याचे उद्देशाने त्याचे इन्स्टाग्रामवर औंरंगजेबचे स्टेटस ठेवले हाेते. याबाबत पुढील तपास पाेलिस उपनिरीक्षक सुहास पाटील करत आहे.

अव्यक्त, अविनाशी, निराकार ज्ञानदेव उलगडले ‌‘नमो ज्ञानेश्वरा‌’तूनडॉ. रामचंद्र देखणे साहित्य-कला प्रतिष्ठानची प्रस्तुती

पुणे : महाराष्ट्राला संतांची महान परंपरा लाभली आहे. संतांनी जनमानसास विवेकाचा मार्ग दाखविला, यात ज्ञान, भक्ती, शांती, प्रिती आणि क्रांती यांच्या समन्वयातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी समतेची पताका हाती घेत भागवत धर्माचा पाया रचला. अशा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा प्रासादिक सांगीतिक जीवनपट ‌‘नमो ज्ञानेश्वरा‌’ या अनोख्या कार्यक्रमातून आज उलगडला.
कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर (750) सुवर्णमहोत्सवी जन्मवर्षानिमित्त डॉ. रामचंद्र देखणे साहित्य-कला प्रतिष्ठानतर्फे आज (दि. 21) भरत नाट्य मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‌‘पुंडलिकवरदा हरि विठ्ठल‌’ या विठ्ठलनामाच्या गजराने कार्यक्रमास सुरुवात झाली तेव्हाच उपस्थितांनी नामघोषात तल्लीन होत एकरूपता साधली. ज्ञानेश्वर महाराज यांनी संपूर्ण विश्वाचे माऊलीपद स्वीकारून समाजातील प्रत्येक व्यक्तीला समतेच्या माध्यमातून विवेकाचा मार्ग कसा दाखविला, त्याची महती काय, समकालीन आणि इतर संतांनी ज्ञानेश्वर माऊलींचे केलेले वर्णन यांचा गोफ विणत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी संतवचने, भगवत्‌‍गीतेतील लोक, ज्ञानेश्वरीतील दाखले, संस्कृत सुभाषिते, काव्य यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींचे श्रेष्ठत्व निरूपणाच्या माध्यमातून उपस्थितांसमोर मांडले.
संत वचनांचे अनुकरण करणाऱ्या आणि त्याचा द्वेष करणाऱ्या दोघांनाही संत-माऊली मायाच देतात, प्रत्येकाच्या मनात भक्तीचा मळा फुलविण्याचा प्रयत्न करतात, जो पर्यंत भक्त आपले सर्वस्व भगवंताला अर्पण करत नाही तो पर्यंत त्याची ओढ लागत नाही, अशा अनेक शिकवणुकीदेखील डॉ. भावार्थ यांनी समर्थपणे मांडल्या.
उपस्थितांमधील प्रत्येकाच्या मनात भावनांचा कल्लोळ उठवत डॉ. पूजा देखणे यांनी ज्ञानेश्वर माऊलींचा समग्र जीवनपट अतिशय ताकदीने-तयारीने सादर केला. माऊली व इतर भावंडांच्या जन्माच्या पूर्वपिठीकेपासून ते माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यापर्यंत केलेले वर्णन ऐकताना सगुण-निर्गुण भक्तीच्या पलिकडेही आत्म्याचा आत्म्याशी संवाद होऊ शकतो अशी अनुभूती प्रत्येकास आली.
अवधूत गांधी यांनी निरूपण व कथानकाच्या अंगाने स्पर्श करीत अनेक अभंगांचे, संत रचनांचे अतिशय समधुर आवाजात सादरीकरण करताना ‌‘ओम नमो ज्ञानेश्वरा‌’, ‌‘अनुपम्य मनोहर कासे शोभे पितांबर‌’, ‌‘पूर्वजन्मी सुकृते‌’, ‌‘अजी सोनियाचा दिनु‌’, ‌‘गुरू हा संतकुळीचा राजा‌’, ‌‘ऐसा योगिराज‌’, ‌‘ओम नमो जी आद्या‌’ अशा ज्ञानेश्वर माऊलींच्या रचना ऐकविल्या. ‌‘परिमळाची धाव भ्रमर वोढी‌’, ‌‘नवल देखिले‌’ यांसह काही रचना प्रियांका ढेरंगे-चौधरी यांनी सादर केल्या.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेल्या ज्ञानेश्वरीतून श्रोतृसंवाद घडतो, अमृतानुभवाच्या माध्यमातून आत्मसंवाद घडतो, हरिपाठाच्या माध्यमातून लोकसंवाद घडतो तर चांगेदव पासष्टीच्या माध्यमातून शिष्यसंवाद घडतो आणि त्यातूनच जनमानस ब्रह्मसाक्षर होतो याची भावानुभूती ‌‘नमो ज्ञानेश्वरा‌’ या प्रासादिक कार्यक्रमात आज उपस्थितांना आली.
कार्यक्रमाचे संहिता लेखन डॉ. पूजा देखणे यांचे होते. केदार दिवेकर यांचे पार्श्वसंगीत होते तर अभय नलगे, राजेंद्र बघे, चैतन्य पवार, प्रसाद भांडवलकर यांनी समर्पक साथसंगत केली. संगीत संयोजन गौरव धावडे तर प्रकाश योजना ओंकार दसनाम यांची होती.
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त निरंजन नाथ, संत तुकाराम महाराज संस्थानचे नितीन महाराज मोरे, भगवान महाराज साळुंखे, डॉ. माधवी वैद्य, विठ्ठल-रुख्मिणी मंदिर पंढरपूरच्या विश्वस्त माधवी निगडे, विश्राम कुलकर्णी, दिग्‌‍पाल लांजेकर, डॉ. मिलिंद भोई, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, प्रसिद्ध साहित्यिक डॉ. संगीता बर्वे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

‘महिला कलाविष्कार‌’बहारदार गायन-वादनाच्या मैफलीस रसिकांची मनमुराद दाद

पुणे : प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशन आयोजित महिला कलाविष्कार मैफलीत रसिकांना शास्त्रीय, उपशास्त्रीय, भक्तीगीत, नाट्यगीत आणि तबला वादनाचा स्वराविष्कार अनुभवायला मिळाला.
महिला दिनानिमित्त प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनच्या संचालिका विदुषी सानिया पाटणकर यांनी या कार्यक्रमाचे एस. एम. जोशी सभागृहात आयोजन केले होते. उद्योजक चंद्रशेखर शेठ आणि विवेक सुरा यांची विशेष उपस्थिती होती.
मैफलीची सुरुवात आश्वासक युवा गायिका शाश्वती चव्हाण-झुरंगे यांनी राग मधुवंतीतील ‌‘मै आऊ तोरे मंदरवा‌’ या छोटा ख्यालने केली. यानंतर ‌‘रूप पाहता लोचनी‌’ हा अभंग सुरेलपणे सादर केला. त्यांना माधव लिमये (संवादिनी), ऋषिकेश जगताप (तबला), दीपक दसवडकर (पखवाज), श्रावणी गुरव (सहगायन) यांनी साथसंगत केली.
बनारस घराण्याच्या सुप्रसिद्ध तबलावादक हेतल मेहता (अहमदाबाद) यांची एकल तबलावादन मैफल रसिकांना विशेष भावली. त्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात मध्यलय तीन तालातील विलंबित धमार सादर करून केली. त्यानंतर बनारास घराण्याचे वैशिष्ट्य असणाऱ्या चलनचारीची झलक दाखविली. बनारस घराण्यातीलच वैशिष्ट्य असणारे बाँठ, सवाई, अडकारी, झुला, अनागत तिहाई, दोहोरे बोलोंकी गत, ‌‘धा‌’चे वैविध्य दाखविणारा तुकडा, कथक नृत्य शैलीत वाजविला जाणारा तुकडा तयारीने सादर केला. विद्वान पंडित मदनमोहन (आझमगड) यांची उपज, पंडित किशनमहाराज यांचा फर्माइशी चक्रदार तसेच पंडित पूरणमहाराज रचित सवाई लय तबल्यावर ऐकवून मेहता यांनी रसिकांना आनंदित केले. मेहता यांना यशवंत थिट्टे यांनी लहेरासाथ केली.
मैफलीच्या अखेरच्या सत्रात ज्ञानेश्वरी घाडगे हिचे बहारदार गायन झाले. तिने ‌‘पद्मनाभा नारायणा‌’ या रचनेने सादरीकरणाची सुरुवात केली. सुरांवरील पकड, आवाजातील फिरत, दमदार ताना ऐकवून रसिकांना संमोहित केले. ‌‘केतकी गुलाब जुही चंपक‌’ ही रचना सादर केल्यानंतर ज्ञानेश्वरी हिने जग्‌‍तगुरू संत तुकाराम महाराज यांनी रचलेला आणि पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांनी आपल्या आवाजाने अजरामर केलेला ‌‘बोलावा विठ्ठल‌’ हा अभंग तसेच संत नामदेव महाराज रचित आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायनातून सर्वोच्चपदी नेऊन ठेवलेला ‌‘तीर्थ विठ्ठल‌’ हा अभंग एकत्रितपणे सादर करून गायनातील तयाराची झलक दर्शविली. ज्ञानेश्वरी हिच्या समर्पित गायनास रसिकांनी विठ्ठल नामाचा जयघोष करत सुरात सूर मिसळून टाळ्यांच्या गजरात साथ केली. ‌‘अलबेला सजन आयो रे‌’, ‌‘जयशंकरा करुणाकरा‌’, ‌‘कुहु कुहु बोले कोयलिया‌’ या रचना ऐकविल्यानंतर कार्यक्रमाची सांगता ‌‘सुरत पिया की छिन‌’ या नाट्यगीताने केली. तिला कार्तिकी घाडगे (संवादिनी), ऋषिकेश जगताप (तबला), दीपक दसवडकर (पखवाज), महेंद्र शेडगे (तालवाद्य) यांनी समर्पक साथ केली.
कलाकारांचा सत्कार विदुषी सानिया पाटणकर, उद्योजक चंद्रशेखर शेठ आणि विवेक सुरा यांनी केला. प्रास्ताविकात संस्थेचे विश्वस्त नितीन महाबळेश्वरकर यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली तसेच सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राने दिलेलं योगदान लागू करण्यात येणाऱ्या सीबीएसई अभ्यासक्रमाद्वारे देशभरात कळले पाहिजे – दीपक मानकर

पुणे-राज्यातील शाळांमध्ये यंदाच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. ह्या सीबीएसई अभ्यासक्रमातील इतिहास विषयात महाराष्ट्राचा इतिहास समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दिले आहे .
दीपक मानकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि , “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाची वाटचाल करीत असताना महायुती सरकारने परिपूर्ण समाज घडविण्यासाठी राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम लागू करण्याचा व इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकवणेही बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व समस्त पुणेकरांकडून आपले मनपूर्वक आभार मानण्यात येत आहे.मंगल देशा,पवित्र देशा,महाराष्ट्र देशा असा आपला महाराष्ट्र ज्याने जगाच्या पाठीवर अनेक इतिहास रचले आहेत. ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमातून आपल्या महाराष्ट्राची यशोगाथा ही संपूर्ण देशासह जगात पसरली पाहिजे. राज्यातील शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे राज्यातील शाळांमध्ये ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम लागू करणे. राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना ‘सीबीएसई’अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम लागू करण्यात येणार असून राज्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीवर राज्य सरकारने भर दिला आहे. ही कौतुकास्पद बाब आहे.
या ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमातील इतिहास विषयात महाराष्ट्राचा इतिहास शिकविला जाणे अत्यंत गरजेचे आहे. इतिहासात मराठा साम्राज्याबद्दल वाचले तर जर कोणाचे नाव प्रथम येते तर ते माँसाहेब जिजाई, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराजाचे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा भिडेवाडा येथे सुरु केली. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे, स्वा. विनायक दामोदर सावरकर यांसारख्या अनेक थोर पुरुषांचे कार्य तसेच ज्या क्रांतिकारकांच्या अथक प्रयत्नांतून व आत्मबलिदानातुन स्वातंत्र्याचा सुखकर दिवस भारतीयांच्या जीवनात उजाडला होता त्या क्रांतिकारकांचे कार्य हे ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमात शिकवले जाणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्र हे निसर्गसंपन्न राज्य असून त्यामध्ये असलेली ऐतिहासिक स्थळे, शिवकालीन मंदिरे, पर्यटनस्थळे यांची माहिती अभ्यासक्रमात घेण्यात यावी.
नुकत्याच नागपूर येथे झालेल्या आंदोलनात आपल्या हिंदू धर्माबाबत अनर्थ गोष्टी घडल्या. आपला इतिहास हा पुसून टाकण्याचा कोणाचा प्रयत्न असेल तर त्याला त्याची जागा दाखवून देणे आवश्यक आहे. शिक्षणाच्या अभ्यासक्रमातच आपल्या महाराष्ट्रातील थोरपुरुष, क्रांतिकारक यांचा इतिहास शिकवला गेला तर भविष्यात आपले अस्तित्व दाखवून देण्याची गरज भासणार नाही.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला ठोठावली २० वर्षाची शिक्षा

पुणे- हडपसर पोलीस ठाणे अंतर्गत अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार केलेल्या गुन्ह्यातील आरोपीस वीस वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले कि,’सदर घटना ही डिसेंबर २०१७ मध्ये वाकवस्ती, झोरेवस्ती, पांडवदंड, फुरसुंगी, पुणे येथे फियादी यांचे राहते घरी घडली आहे. यातील आरोपी भिमराव मुकिंदा कांबळे, वय २७ वर्षे, रा. पुयना समाज मंदिराशेजारी, पाण्याचे हापश्यासमारे पास्ट साडं स, ता. कळमनरु जि. हिंगाली याने यातील अल्पवयीन पिडीत निभर्या ही घरामध्ये एकटी असल्याचा व घरामध्ये अंधार असल्याचा गैरफायदा घेऊन तसेच ती अल्पवयीन असल्याची पूर्ण जाणिव असताना घरामध्ये घुसुन तिचेशी जबरदस्तीने संभोग करुन तिला गर्भवती केले व हाताने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. म्हणून फिर्यादी / अल्पवयीन पिडीत निर्भया हिने दिलेल्या तक्रारीवरुन हडपसर पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक २७६/२०१८ भा.दं.वि. कलम ३७६, ३२३, ५०४, ५०६ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम सन २०१२ चे कलम ६, ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक कल्याणी शिंदे, यांनी केला व यातील आरोपींविरुद्ध न्यायालयामध्ये मुदतीत दोषारोपपत्र सादर केले. सदर केसचा स्पे. (चाईल्ड प्रोट.) केस क्र. ३२९/२०१८ असा आहे.या प्रकरणामध्ये सबळ साक्षीपुराव्याअंती विशेष न्यायाधीश (पोक्सो), जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी दिनांक २१/०३/२०२५ ०२५ रोजी आरोपी भिमराव मुकिंदा कांबळे यास २० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
सरकारी पक्षातर्फे अति. सरकारी वकील विलास घोगरे-पाटील, कोर्ट पैरवी पोलीस अंमलदार संभाजी म्हांगरे व ए.जे. गोसावी यांनी कामकाज पाहिले. सदर कामगिरीकरीता प्रोत्साहन म्हणून पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे यांनी कोर्ट पैरवी पोलीस अंमलदार म्हांगरे, गोसावी व नमूद गुन्हयाचे तपासी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक कल्याणी शिंदे यांना १० हजार रुपये बक्षिस मंजूर केले आहे.

 ‘घुमंतु २५’ प्रवास आणि फोटोंचा अनोखा संगम असलेले प्रदर्शन

ब्बल ३५ फोटोग्राफर्सच्या १०० हून अधिक फोटोंचा समावेश ; प्रदर्शनाला विनामूल्य प्रवेश

पुणे : प्रवासात टिपलेले सुंदर क्षण मोबाईलमध्ये कैद करून त्याचा आस्वाद घेणे आणि इतरांसोबत शेअर करणे हा प्रत्येक भटक्याचा आनंदाचा भाग असतो. अशाच ३५ निवडक फोटोग्राफर्सच्या अप्रतिम फोटोंचा समावेश असलेल्या घुमंतु  २५ – स्वान्तसुखाय छायाचित्रणाय च… या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. २५ ते २७ मार्च दरम्यान बालगंधर्व कलादालन येथे होणार असून सकाळी ११ ते ८ यावेळेत रसिकांना विनामूल्य पाहता येणार आहे, अशी माहिती डॉ. रामदास महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रदर्शनाचे उद्घाटन दि.२५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता प्रदर्शनातील सहभागी फोटोग्राफर्सच्या हस्ते होणार आहे. प्रवास हा अनुभव समृद्ध करणारा असतो. कधी भव्य डोंगररांगा, कधी निळ्याशार समुद्राचे क्षितिज, तर कधी शहराच्या गजबजाटातले रंग प्रत्येक ठिकाण वेगळे दिसतात आणि त्याच्या अनमोल आठवणी. अशाच आठवणींना उजाळा देणारे आणि जगभरातील फोटोग्राफर्सच्या मोबाईलमध्ये टिपलेले अद्वितीय क्षण अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

डॉ. महाजन म्हणाले,  या प्रदर्शनात ३५ निवडक फोटोग्राफर्सनी टिपलेले १०० आकर्षक फोटो प्रदर्शित केले जाणार आहेत. विशेष म्हणजे, हे फोटोग्राफर्स विविध क्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर, इंजिनिअर्स, गृहिणी, आयटी तज्ञ, विद्यार्थी आणि वैमानिक देखील आहेत. वयवर्षे २०  ते ७७  या वयोगटातील या कलाकारांनी अमेरिका ते न्यूझिलंडपर्यंतच्या त्यांच्या प्रवासातील आठवणी मोबाईल मधून टिपल्या आहेत.

घुमंतु मालिकेतील हे तिसरे पुष्प आहे. याआधी सन २०२२ आणि २०२३ मध्येही अशीच प्रदर्शने आयोजित करण्यात आली होती आणि त्यांना पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, नागपूर, बंगळुरू, कोचीन अशा अनेक शहरांमधून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. तरी पुणेकरांनी प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

चुरशीच्या तयारीतचा सुहास घोडके ठरला महाराष्ट्र कुस्ती महा-वीर किताबाचा मानकरी

पुणे , दि.२२ मार्च: पुणे येथील सुहास घोडके आणि कुर्डूवाडी चा प्रमोद सुळ यांच्या चुरशीच्या शैलीत सुहास घोडके ने ५-० अंकाने महाराष्ट्र कुस्ती महा-वीर हा खुल्या गटातल्या किताबांविला. सव्वा लाख रुपये , चांदीची गदा , सुवर्णपदक व प्रशस्ती पत्रक त्याचा सत्कार करण्यात आला.
शांती केंद्र (आळंदी) , माईर्स एमआयटी , पुणे , महाराष्ट्र राज्य यज्ञ रामेश्वर (रुई) ग्रामस्थ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने राष्ट्रधर्म पूजक दादार कराड स्मृती राज्य महाराष्ट्र कुस्ती महा-वीर पाक रामेश्वर (रुई) येथे आयोजित कार्यक्रम. या गेल्या १८ वर्षापासून भरत येत आहेत.
प्रमोद सुने यांनी उपविजेते पदळविले. त्यांना रौप्यपदक व रोख रुपये १ लाखाचे लोकषिक देण्यात आले. जामखेड येथील सागर मोहोळकर या तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. त्याला रुपये ५० हजार व कांस्य पदक देण्यात आले. चतुर्थ क्रमांक सोलापूर येथील कालीचरण सोलन याला २५ हजार रूपयेकर व पदक देण्यात आले. या एकूण २०० पेक्षा अधिक मल्लांनी भाग दाखल केला होता.
हिंद केसरी दीनानाथ सिंग , विश्वशांती केंद्र (आळंदी) , माईर्स एमआयटी , पुणेचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड , रामेश्वरचे सरपंच श्री. तुळशीराम दा.करड , श्री. काशीराम दा. कराड , आमदार श्री. रमेशअप्पा कराड , श्री राजेश कराड , श्री ऋषिकेश कराड , प्रा. विलास कथुरे फायदा विजेत्यां मल्लांना त्यांच्यासाठी देण्यात आले. चौक वस्ताद पै. निखिल वणवे उपस्थित होते.

वजन गटात विजेते पुढीलप्रमाणे

( प्रथम क्रमांक – सुवर्णपदक , द्वितीय क्रमांक – रौप्य पदक , तृतीय क्रमांक – अंक चिन्ह अंक्य पदक)

वजन गट    प्रथम क्रमांक         दुसरा क्रमांक        तृतीय क्रमांक      चतुर्थ क्रमांक

८६ किलो  ( कौतुक डाफळे-क्लिक) , ( सोनबा लवटे , पुणे) , ( फिरोज शेख-पुणे) ,  ( अर्जुन काळे -सोलापूर)

रक्कम     रु. ५०,०००/-               रु. ४०,००० /-     रु. ३० , ०००/- रु.२० , ०००/-

७४ किलो (आदर्श पाटील-कोल्हापूर) (विष्णू तापूरे- लातूर) , ( शुभम सावंत – लातूर ) , ( विकारे – पुणे)
रक्कम     रु.३०,००० /-         रु.२०,००० /-       रु.१५,००० /-   रु.१०,००० /-

७० किलो ( विपुल थोरात-पुणे) , ( भालचंद्र कुंभार -पुणे) ,  ( रविराज निंबाळकर – पुणे) ,  ( सोमनाथ गोरड – पुणे)
रक्कम   रु.२०,००० /-   रु.१५,००० /-     रु.१०,००० /-           रु.८,००० /-

६५ किलो ( बाळासाहेब चौरे-बीड ) , ( सार्थक विकास -धाराशिव ) , ( किरण सत्रे – पुणे ) (सौरभ कडवकर-धाराशिव ) ,
अमुक रु.१५ , ०००/-        रु.१०,००० /-         रु.८,००० /-    रु.५,००० /-

६१ किलो ( अविनाश माने-खुडूस) , ( चिंतामणी भंडारे-सोलापूर) , ( अनिकेत पाटील-कोल्हापूर) , ( निनाद बडे- सांगली)
रक्कम    रु.१०,००० /-       रु.७,००० /-        रु.५ , ०००/- रु.३ , ०००/-

५७ किलो ( विशाल सुरवसे-खुडूस , ( स्वप्निल जाधव – रामेश्वर) , ( आकाश गुट्टे-रामेश्वर) , ( मनोहर मुंडे-खुडूस) ,
रक्कम     रु.१० , ०००/- रु.७ , ०००/-          रु.५ , ०००/- रु.३ , ०००/-


७५ पेक्षा अधिक वर्षे वय असलेले अनेक मल्ल सहभागी होते. यापैकी तात्यात्याराव नलावडे हे विजेते ठरले तर विष्णू हे उपविजेते ठरले. या पैलवानांचा योग महर्षी महिला सेनानी वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ ​​शेलार मामा स्मृती सुवर्ण , रौप्य व कांस्य पदके सत्कार करण्यात आला.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड ,” रामेश्वराच्या मातीतून आज ना उदया राष्ट्रीय व कुस्तीपटू निर्माण करणार होती. भारताच्या कस्तीक्षेत्राला आपले नाव उज्वल करतील. कुस्ती या प्रकारात आपले आणि मनगट मजबूत होते. आज तरुणांनी कुस्तीकडे वळणे आवश्यक आहे.”
यापल्ला जालना येथील मंठा गावातील पैलवान वैष्णवी रामकिस सोळंके हि १५ मिनीटात अद्वितीय योगनाचे प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जायली.

श्री. बाबा निम्हण यांनी सूत्रसंचालन व धावते वर्णन केले. डॉ. महेश थोरवे यांनी आभार मानले.

वाघोलीतील एका घरावर छापा चार पिस्टल व आठ काडतुसांसह चौघांना पकडले

पुणे- वाघोलीतील एका घरावर छापा मारून गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना चार पिस्टल व आठ काडतुसांसह पुणे पोलिसांनी चतुर्भुज केले आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’खंडणी विरोधी पथकास नेमणुकीस असलेले पोलीस उप-निरीक्षक गौरव देव व पोलीस अंमलदार अनिल कुसाळकर यांना मिळालेल्या गोपनिय बातमीचे आधारे व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे राजेश्वरी नगरी, आलोवेरी सोसायटी, वाघोली पुणे, येथे एकाच घरात तडीपार आरोपी अगन दस्तगीर पटेल, रा. बाकोरी फाटा, वाघोली पुणे, इशाप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी, रा. गोकुळ पार्क, बकोरी फाटा, वाघोली, पुणे गोपाळ संजय यादव, राहत असुन ते दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशाने त्याचेकडे पिस्टल जवळ बाळगुन आहेत. सदर बातमीची खात्री करुन सापळा रचुन ते रहात असलेल्या फ्लॅट मध्ये छापा टाकुन चौकशी करुन घराची झडती घेवुन आरोपीतांकडुन ४ पिस्टल व ८ काडतुसे असा एकुण १,६४,०००/-रू. चा जप्त केला आहे.
यातील आरोपी गोपाळ संजय यादव वय २४ वर्षे रा. वाघोली पुणे याचेवर दरोडा, खुनाचा प्रयत्न राईट असे एकुण २ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अमन उर्फ मुन्ना दस्तगीर पटेल वय २३ वर्षे रा. वाघोली पुणे यांचेवर अहमदनगर येथे तसेच लोणीकंद पोलीस स्टेशन येथे आर्म अॅक्ट व तडीपार याप्रमाणे ३ गुन्हे दाखल आहेत. इशाप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी, वय २४ वर्षे रा. वाघोली पुणे यांचेवर मोक्का, दरोडा, आर्म अॅक्ट, तडीपार, असे एकुण गंभीर स्वरुपाचे ५ गुन्हे दाखल आहेत या सह देवानंद शिवाजी चव्हाण वय २३ वर्षे रा मारुती आळी शिरुर पुणे.यास हि अटक करण्यात आली
सदरची उल्लेखनिय कामगीरी पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार मा. पोलीस सह आयुक्त, पुणे श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-२. श्री. राजेंद्र मुळीक, खंडणी विरोधी पथक -२ पोलीस निरीक्षक छगन कापसे (अति. कार्यभार) पोलीस उप-निरीक्षक गौरव देव. स.पो. फौज. सुनिल पवार, पोलीस अंमलदार अनिल कुसाळकर, चेतन आपटे, अजिनाथ येडे, अमोल घावटे, अमोल राउत, सैदोबा भोजराव, सुरेंद्र जगदाळे, चेतन चव्हाण, दिलीप गोरे, पवन भोसले, प्रशांत शिंदे, आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांनी केली.

‘जय श्रीराम’, उद्या तुझ्या घरी येतो आणि दाखवतो:संभाजी भिडेंच्या धारकऱ्याची पवार गटाच्या प्रवक्त्याला धमकी

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, पोलिसात तक्रार पण कारवाई शून्य …

मुंबई-श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी उर्फ मनोहर भिडे यांच्या धारकऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना धमकी देण्यात आल्याची बाब समोर आली आहे. धमकी देणाऱ्यांनी थांब, उद्या तुझ्या घरी येतो असे म्हणत त्यांना दिवसातून एक-दोनदा नव्हे तर तब्बल 100 वेळा फोन केला आहे. कहर म्हणजे या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पण त्यावरही शून्य कारवाई करण्यात आली. खासदार सुप्रिया सुळे यांनी हा आरोप केला आहे.राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पोलीस आयुक्त यांनी कृपया याची गांभीर्याने नोंद घ्यावी. सामाजिक कार्यकर्त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा आणून अशा पद्धतीने झुंडशाहीने दहशत माजवू पाहणाऱ्या व बेकायदा कृत्य करणाऱ्या लोकांचा तात्काळ बंदोबस्त होणे आवश्यक आहे. सोबत विकास लवांडे यांचा 3 मार्च 2025 रोजीचा लोणीकंद पोलिसांनी घेतलेला जबाब; पण दोषींवर अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे या प्रकाराची माहिती देताना म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना संभाजी भिडे गुरुजींचे धारकरी म्हणवनाऱ्यांकडून शेकडोच्या संख्येने फोनवरून व सोशल माध्यमातून जाहीरपणे जीवे मारण्याच्या व घात अपघात करू अशा अनेक धमक्या आलेल्या आहेत. याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि पुणे शहर पोलिसांना सविस्तर पुराव्यासह तक्रार देऊनही अद्याप पर्यंत कुणावरही काहीही कारवाई केलेली नाही.

1 मार्च 2025 रोजी सायंकाळी विकास लवांडे यांच्या हवेली तालुक्यातील शिंदेवाडी गावात 250 ते 300 बाहेरील तरुणांचा बेकायदा जमाव त्यांच्या घरावर दहशत माजवण्याच्या हेतूने गेलेला होता. त्यावेळी स्थानिक पोलिसांना कळवले व गावात पोलिस बंदोबस्त मिळाला म्हणून पुढील मोठा अनर्थ टळला. मात्र तक्रार देऊनही पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही. त्यानंतरही धमक्या सुरूच आहेत. कालही ७६६६२३७९०९ या मोबाईल नंबरहून अज्ञात व्यक्तीने ” जय श्रीराम ” म्हणत उद्या तुझ्या घरी येतो आणि दाखवतो अशी धमकी विकास लवांडे यांना दिली आहे.

गडचिरोलीतील वाघांचे मानवी हल्ले रोखण्यासाठी ३ महिन्यात आराखडा तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘मित्रा’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि. २२ : गडचिरोली जिल्ह्यात व्याघ्र हल्ल्यातील मनुष्यहानी टाळण्यासाठी परिस्थितीचा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून तातडीने विशेष उपाय योजना राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यामध्ये गेल्या पाच वर्षात वाघांच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना विशेष नुकसान भरपाई देणे, अतिरिक्त वाघांचे स्थलांतर आदींचा समावेश असून त्याचा अहवाल ३ महिन्यात देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाघांच्या हल्ल्यातील नागरिकांच्या जिवीतहानीची गंभीर दखल घेतली आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून त्यांनी तेथील नागरिकांच्या मागणीची तत्काळ दखल घेऊन यावर उपाय योजना सुचविण्याचे निर्देश दिले. तसेच यासाठी ‘मित्रा’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार परदेशी यांनी नागपुरात वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजनांवर चर्चा केली व त्यावर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस राज्याच्या प्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुख) शोमिता बिस्वास, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक विवेक खांडेकर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. रामचंद्र रामगावकर, गडचिरोली वन वृत्ताचे मुख्य वन संरक्षक एस. रमेशकुमार आदी उपस्थित होते.

व्याघ्र हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना विशेष नुकसान भरपाई

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत व्याघ्र हल्ल्यात सुमारे 50 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. विशेषतः गडचिरोली, चार्मोशी, आरमोरी, वडसा आणि धानोरा क्षेत्रात वाघांच्या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोलीतील परिस्थितीचा अभ्यास करून गडचिरोलीतील अतिरिक्त वाघांचे स्थलांतर तीन महिन्यात करण्यात यावे. तसेच गेल्या पाच वर्षांत व्याघ्र हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची माहिती गोळा करून त्यांच्या वारसांना विशेष नुकसान भरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते.

यासंदर्भात परिस्थितीचे अवलोकन करून आराखडा तयार करण्यासंदर्भात मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. या बैठकीत विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील चपराळा व प्राणहिता अभयारण्यात सागवान झाडांचे विरळीकरण करणे व कुरणाचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय झाला. जेणेकरून तृणभक्षी प्राण्याची संख्या वाढून मांस भक्षी प्राण्यांना खाद्य मिळेल. प्रत्येक गावात पोलिस पाटलाच्या धर्तीवर वन पाटील नेमण्याचेही यावेळी ठरविण्यात आले. स्थानिकांना जंगलात लाकूड, सरपण गोळा करण्यासाठी जंगलात जावे लागू नये यासाठी गावामध्ये पाइपलाईनद्वारे CBG गॅस पुरवठा करण्यासाठी ग्रामस्थांच्या शेतात गवत उत्पादन करून त्याचा उपयोग सीबीजीसाठी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यासाठी सीबीजी गॅस प्लांट उभारण्याचेही ठरविण्यात आले. वन्य प्राण्यामुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई लवकर देण्यासाठी ई पंचनामा करणे, वाघांची वाढती संख्या लक्षात घेऊन चपराळा अभयारण्यातील 6 गावांच्या स्थलांतरासाठी तेथील स्थानिकांचे सामाजिक, आर्थिक मूल्यांकन करणे, पुनर्वसनासाठी नव्या जागेचा शोध घेणे आदी उपाय योजना राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

तसेच यासंबंधीच्या उपाय योजना करण्याबाबत या विषयावर काम करणाऱ्या वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट सारख्या संस्थांच्या तज्ञांची नेमणूक करण्यात येणार आहे. धोकादायक व संवेदनशील क्षेत्राचे सौम्यीकरण (मिटीगेशन) आराखडा तयार करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. मानव आणि वन्यजीव संघर्षात आढळणारे वाघ हे वयस्कर असल्याचे दिसून येते. अशा वाघाच्या स्थलांतरासंदर्भातही धोरणात्मक निर्णय घेण्याचे आवश्यक असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले.

‘गुलाबी कर’ नष्ट करण्यासाठी संवेदनशीलता, जागरूकता आवश्यक !

भारतासह जगभरात दि. 8 मार्च रोजी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा करण्यात आला. सर्वत्र विविध कार्यक्रम, सत्कार, व्याख्याने यांची रेलचेल आढळली. महिलांना सन्मानाची, समानतेची वागणूक देण्याबद्दलच्या आणाभाका,शपथा, निर्धार जाहीर करण्यात आले. मात्र त्याचवेळी महिलांवर आर्थिक अन्याय करणाऱ्या ‘गुलाबी करा’ बद्दल मात्र कोणी चकार शब्द काढलेला दिसला नाही. हा गुलाबी कर नष्ट करण्यासाठी सर्व पातळ्यांवर जागरूकता, संवेदनशीलता निर्माण होण्याची नितांत गरज आहे. या वेगळ्या पण महत्वाच्या विषयाचा घेतलेला वेध.

भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये ‘ गुलाबी कर’ अस्तित्वात आहे. हा कर ‘पिंक टॅक्स’ म्हणून जगभर ओळखला जातो. अगदी थोडक्या शब्दात सांगावयाचे झाले तर पुरुष व महिला या दोघांसाठी अनेक उत्पादने,वस्तू किंवा सेवा समान वापरल्या जातात. मात्र बाजारामध्ये अशा उत्पादनांच्या किंमती किंवा सेवांचे शुल्क पुरुषांसाठी जेवढ्या असतात त्यापेक्षा काही टक्के जास्त किंमती, शुल्क महिलांकडून वसूल केल्या जातात. पुरुष व महिला या दोघांकडून वापरल्या जाणाऱ्या सारख्या उत्पादनांच्या किंमतीमध्ये लिंगभेद केला जातो. समानतेच्या दृष्टिकोनातून महिला वर्गाच्या बाबतीत हा कर अन्यायकारक ठरतो. महिला वर्गाला त्यासाठी द्यावी लागणारी जादा किंमत किंवा शुल्क म्हणजे एक प्रकारचा ‘गुलाबी कर’ आहे असे मानले जाते. आपली लोकसंख्या 146 कोटींच्या घरात आहे व त्यापैकी 70 कोटी महिला आहेत, हे लक्षात घेता हा ‘गुलाबी कर’ अर्थकारणावर परिणाम करणारा आहे.

‘इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली ‘या अर्थविषयक साप्ताहिकामध्ये दोहा – कतार येथील श्री साईबाल घोष यांनी याबाबतचा संशोधनात्मक प्रबंध प्रसिद्ध केला असून हा गुलाबी कर नष्ट व्हावा अशी मांडणी केली आहे. यासाठी त्यांनी विविध देशातील कुटुंबांचा व त्यांनी केलेल्या खर्चाबाबत संशोधन केले. २०१५ ते २०२२ या सात वर्षाच्या काळात त्यांनी कुटुंब स्तरावरील खर्चाचा अभ्यास केला. या अभ्यासावरून जगात सर्वत्र हा ‘पिंक टॅक्स’ अस्तित्वात असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.

‘गुलाबी करा’च्या संदर्भात भारताचा विचार करता ही कर पद्धती किंवा अशी यंत्रणा आपल्याला नवीन किंवा अद्वितीय नाही. आपल्याकडील सर्वसाधारण सामाजिक नियम व बाजारातील गतिशीलता यामुळे आपल्या देशात गेली अनेक वर्षे गुलाबी कर अस्तित्वात आहे. या ‘ गुलाबी करा’ मध्ये कोणती उत्पादने व सेवा यांचा समावेश केला जातो याचा अभ्यास केला असता विविध प्रकारची सौंदर्य प्रसाधने, दुर्गंधीनाशक उत्पादने व वस्तरे (रेझर, डिओडोरंट्स), किंवा शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी वापरले जाणारे साबण, बॉडी वॉश यांसारखी वैयक्तिक काळजी उत्पादने, टी-शर्ट, जीन्स आणि जॅकेट यांसारख्या कपड्यांच्या वस्तू, हेअर कट आणि केस रंगवण्यासारख्या सारख्या सलून सेवा, खेळणी व महिला स्वच्छता उत्पादने यांचा प्रामुख्याने समावेश होतो.

पुरुष व महिलांना सर्वत्र समान दर्जा व वागणूक दिली जावी ही संकल्पना सर्व प्रगतिशील देशांमध्ये अस्तित्वात आहे. या पार्श्वभूमीवर पुरुष व महिलांमध्ये लिंगभेद केला जाऊ नये एवढेच नाही तर लिंग समानतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचा ‘कर’ वसूल केला जाऊ नये हा महत्त्वाचा मुद्दा प्रकर्षाने निर्माण होतो. अशा प्रकारचा गुलाबी कर काढून टाकला तर महिलांवरील आर्थिक भार निश्चितपणे कमी होईल अशी यामागे अपेक्षा आहे. त्याचबरोबर लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून भारताचे एक पाऊल पुढे जाऊ शकते. एवढेच नाही तर त्यामुळे बाजारातील पारदर्शकता निश्चितपणे वाढणार असून सर्व उत्पादने व सेवांच्या किमती जास्तीत जास्त पारदर्शक राहून ग्राहकांना चांगल्या किमती व सेवांचा फायदा होऊ शकतो. बाजारातील उचित स्पर्धा प्रथांना यामुळे प्रोत्साहन दिले जाऊन भेदभावपूर्ण किंमती पूर्णपणे नष्ट होतील अशी अपेक्षा आहे. कोणत्याही व्यवसायात निष्पक्ष स्पर्धा असणे व ग्राहकांना चांगल्या किमती व सेवांचा लाभ होणे हे समाजाच्या दृष्टिकोनातून निश्चितच हितकारक आहे.

या गुलाबी कराचे काही निश्चित तोटे आहेत. त्यांचा अभ्यास केला असता महिलांवरील आर्थिक ताणामध्ये गुलाबी कराची भर पडत आहे. एका पाहणीनुसार महिला व पुरुषांची कमाई व वेतन लक्षात घेतले तर भारतामध्ये महिलांची कमाई पुरुषांपेक्षा सुमारे 30 ते 35 टक्के कमी आहे. महिलांच्या गरजा आणि त्यांना दिले जाणारे प्राधान्य हे पुरुषांपेक्षा जास्त असते व त्यासाठी होणारा खर्च पुरुषांपेक्षा जास्त होत असतो अशी धारणा समाजामध्ये निर्माण होताना दिसत आहे. गुलाबी करामुळे किंमती स्वाभाविकपणे वाढतात. त्यामुळे अनेक उत्पादनांच्या बाबतीत खरेदी करणाऱ्या महिलांचा प्रवेश आपोआप मर्यादित होतो. साहजिकच अशी अत्यावश्यक उत्पादने व सेवा वापरण्याच्या बाबतीत महिला वर्गाला प्रतिबंध होऊ शकतो अशी बाजारातील परिस्थिती आहे.

याबाबत देशातील विविध राज्यांमधील उत्पादने व सेवांचा अभ्यास केला असता साधारणपणे असे लक्षात आले आहे की महिलांसाठी असलेल्या उत्पादनांच्या किमती या दोन ते सहा पट जास्त आहेत. त्यामुळे दरवर्षी साधारणपणे 300 डॉलर किंवा वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च जास्त केला जातो असे लक्षात आले आहे. बायोकॉन कंपनीच्या अध्यक्ष श्रीमती किरण मुजुमदार शॉ यांनी गुलाबी करामुळे निर्माण झालेल्या लिंग असमानतेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. महिला व पुरुष वर्ग जी उत्पादने, सेवा समानरित्या वापरतात त्याबाबत समान किंमत असण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली होती.

जागतिक पातळीवर केलेल्या अभ्यासामध्ये महिला-पुरुषांच्या वस्त्र प्रावरणाच्या बाबतीत महिलांच्या वस्त्रांच्या सरासरी किमती ०.७ टक्के जास्त आहेत असे आढळले होते. अमेरिकेत याबाबत शंभर ब्रँड्सचा अभ्यास करण्यात आला होता. त्यात महिलांच्या उत्पादनांसाठी असलेल्या किमती 12 ते 13 टक्के जास्त असल्याचे आढळले होते. इंग्लंडमध्ये अशा प्रकारची पाहणी केली तेव्हा महिलांना अशा उत्पादनांसाठी दहा टक्के किंमत जास्त द्यावी लागत असल्याचे आढळले होते. भारतामध्ये अशा प्रकारच्या गुलाबी करायच्या बाबत संशोधन करण्यात आले. त्यामध्ये व्यक्तिगत पातळीवरील खर्चाचा अभ्यास न करता कौटुंबिक पातळीवर त्याचा अभ्यास करण्यात आला. त्यामुळे एक प्रकारे दुय्यम प्रकारची माहिती यामध्ये संकलित करण्यात आलेली आहे. विविध राज्यातील एक लाखांपेक्षा जास्त कुटुंबांमध्ये ही पाहणी या कालावधीत करण्यात आली होती. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनोमी ( सीएमआयई) संस्थेने याबाबतचे संशोधन केलेले होते. त्यामध्ये महिला ग्राहकांकडून अनेक वेळा जास्त किमती किंवा शुल्क वसूल केल्याचे सकृत दर्शनी आढळलेले आहे.

जागतिक पातळीवर या गुलाबी कराच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलने व मोहीम राबवण्यात आली. २०१५ मध्ये कॅनडाने महिलांच्या सर्व उत्पादनावरील कर पूर्णपणे रद्द केलेला होता. त्यानंतर २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाने याबाबतचे पाऊल पुढे टाकून महिलांच्या उत्पादनांवरील कर रद्द केला. जर्मनीमध्ये महिलांसाठी वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅडवर चैनीची वस्तू म्हणून 19 टक्के कर लावण्यात आला होता. २०२० मध्ये तो कमी करून केवळ 6 टक्के करण्यात आला. इटली व स्पेन या दोन्ही देशांमध्ये अगदी अलीकडे हा कर कमी करण्यात आलेला आहे. स्कॉटलंडमध्येही कमी उत्पन्न गटातील महिलांसाठी ही सर्व उत्पादने मोफत देण्याबाबतचा कायदा संमत करण्यात आलेला आहे. काही विकसनशील देशांचा अभ्यास केला असता केनयासारख्या देशाने 2004 मध्ये या उत्पादनावरील कर लक्षणीय रित्या कमी केला. त्याचप्रमाणे कोलंबियांमध्ये अशा प्रकारचा लिंगभेद करणारा कर हा घटनाबाह्य ठरवण्यात येऊन २०१८ मध्ये तो नष्ट करण्यात आला. नामीबिया मेक्सिको, इक्वाडोर व श्रीलंका या देशातही याबाबत काही सवलती देण्यात आल्या आहेत.

वास्तविक पाहता भारतामध्ये गुलाबी करावर बंधने घालणारा किंवा प्रतिबंध करणारा कोणताही अधिकृत कायदा अस्तित्वात नाही. परंतु लिंगभेद टाळण्याच्या दृष्टिकोनातून व महिला व पुरुष यांच्यात आर्थिक समानता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून या गोष्टी करणे आवश्यक आहे. किमान सध्याच्या प्रगतिशील समाजामध्ये त्याबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. देशाच्या पहिल्या नागरिक म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महिला आहेत. तसेच गेली अनेक वर्षे देशाच्या अर्थमंत्री पदावर निर्मला सीतारामन यांच्यासारखी महिला अत्यंत निष्ठेने काम करीत आहे. असे असूनही आर्थिक पातळीवर काहीशी असमानता निर्माण करणाऱ्या या ‘गुलाबी कराचे ‘अस्तित्व नष्ट व्हावे अशी अपेक्षा केली तर ती गैर ठरणार नाही. अर्थमंत्र्यांनी काही वर्षांपूर्वी म्हणजे २०१८ मध्ये मासिक पाळीच्या संबंधित उत्पादनावरील 12 टक्के जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स मधून पूर्णपणे सवलत दिलेली होती. एक प्रकारे याबाबतच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून विद्यमान सरकारने एक पाऊल टाकलेले होते. परंतु वास्तवामध्ये आजही अशा प्रकारचा लिंगभेद करणारा गुलाबी कर व्यापक प्रमाणात आढळत आहे. विविध कंपन्यांनी याबाबतची सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन अशा उत्पादनाच्या किमती कमी करण्याची गरज आहे. भारतातील महिला संघटनांनी याबाबत एकत्र येऊन नजीकच्या भविष्यकाळात नष्ट होण्यासाठी सकारात्मक मोहिमेद्वारे संवेदनशीलता व जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.

लेखक :प्रा. नंदकुमार काकिर्डे (लेखक पुणे स्थित अर्थविषयक जेष्ठ पत्रकार असून माजी बँक संचालक आहेत)

क्षय रोग निर्मूलनासाठी नव्या आशेचा किरण

२४ मार्च २०२५ जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विशेष लेख….

संपूर्ण जगातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्र क्षयरोगाच्या (TB) विरोधातील संघर्षात झालेल्या प्रगतीचा आढावा घेत आहे. क्षयरोग हा केवळ एक संसर्गजन्य आजार नसून तो सामाजिक विषमता देखील दर्शवतो. गरीब आणि वंचित समुदाय, स्थलांतरित, निर्वासित आणि आदिवासी लोकसंख्या यांच्यात हा आजार अधिक प्रमाणात आढळतो. दरवर्षी जवळपास १२.५ लाख लोकांचा बळी घेणारा हा आजार, योग्य निदान आणि उपचारांमुळे पूर्णपणे बरा होऊ शकतो.
क्षयरोग (TB) हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस (Mycobacterium tuberculosis) नावाच्या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. मुख्यतः फुफ्फुसांवर परिणाम करणारा हा आजार शरीरातील इतर अवयवांमध्येही पसरू शकतो. भारतात हा आजार मोठ्या प्रमाणावर आढळतो आणि त्यामुळे देशाच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येतो आहे.
भारत हा जगातील सर्वाधिक क्षयरोगग्रस्त लोकसंख्या असलेला देश आहे. जागतिक क्षयरोग अहवाल २०२३ नुसार, जगातील एकूण TB रुग्णांपैकी २५-२८% रुग्ण भारतात आढळतात. भारतात दरवर्षी सुमारे २६-२७ लाख नवीन क्षयरोग रुग्णांची नोंद होते. देशात दरवर्षी सुमारे ५ लाखांहून अधिक लोक TB मुळे मृत्यू पावतात.
भारतात क्षयरोग नियंत्रणासाठी १९६२ मध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (NTCP) सुरू करण्यात आला. २०१९ मध्ये या कार्यक्रमाचे नाव बदलून राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP – National TB Elimination Programme) करण्यात आले.केंद्र सरकारने २०१८ मध्ये घोषित केलेल्या योजनेनुसार, भारताने जागतिक उद्दिष्टाच्या (२०३०) आधीच २०२५ पर्यंत TB निर्मूलनाचा संकल्प केला आहे.
मोफत TB निदान आणि उपचार: सरकारी आरोग्य केंद्रांवर सर्व TB रुग्णांना मोफत उपचार आणि औषधे पुरविली जातात.
प्रगत निदान आणि उपचार पद्धती: TB निदानासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान जसे की Xpert MTB/RIF, TrueNat, आणि Line Probe Assay यांसारख्या प्रयोगशाळा चाचण्या उपलब्ध आहेत.
प्रभावी औषधोपचार:
संवेदनशील TB साठी ६ महिन्यांचा पूर्ण उपचारक्रम (HRZE – Isoniazid, Rifampicin, Pyrazinamide, आणि Ethambutol)
औषध-प्रतिरोधक TB (MDR-TB/XDR-TB) साठी ९-१२ महिन्यांचे अद्ययावत उपचार
निक्षय पोषण योजना: TB रुग्णांसाठी दरमहा ₹५०० पोषण भत्ता देण्यात येतो, जेणेकरून त्यांच्या आहारात सुधारणा होईल आणि उपचाराचा परिणाम चांगला मिळेल.
समुदाय आधारित TB रुग्णांसाठी उपक्रम:
“निक्षय मित्र” योजना: समाजातील व्यक्ती आणि संस्था TB रुग्णांना पोषण आहार, औषधे, आणि भावनिक आधार देऊ शकतात.
खाजगी डॉक्टर आणि रुग्णालयांचे सहकार्य: खाजगी आरोग्य क्षेत्रातील डॉक्टरांना सरकारी TB कार्यक्रमात सामील करून सर्वांना उपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.भारतातील खाजगी आरोग्य सेवा क्षेत्रात आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, सिद्ध आणि योग (AYUSH) यांसारख्या पारंपरिक वैद्यकीय प्रणाली मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहेत. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात AYUSH वैद्यक तज्ज्ञांचा सहभाग वाढविल्यास, क्षयरोगाच्या उपचारांमध्ये सुधारणा होण्यास मदत होईल.
क्षयरोगाच्या वेगवेगळ्या प्रकारांसाठी विशेष धोरणे
औषध-प्रतिरोधक क्षयरोग (MDR-TB, XDR-TB):
औषध-प्रतिरोधक क्षयरोग (MDR-TB) हा TB चा एक प्रकार आहे, ज्यावर सामान्य TB औषधांचा परिणाम होत नाही.
या साठी सरकारने Bedaquiline आणि Delamanid ही आधुनिक औषधे विनामूल्य उपलब्ध करून दिली आहेत.
बालक आणि गर्भवती महिलांसाठी विशेष उपाययोजना:
बालरुग्णांसाठी अनुकूलित औषधे
गर्भवती महिलांना सुरक्षित उपचार पद्धती
TB निर्मूलनासाठी पुढील दिशा
TB प्रतिबंधासाठी लसीकरण: BCG लस ही बालकांसाठी TB प्रतिबंधक म्हणून दिली जाते. याशिवाय, क्षयरोगाच्या बाबतीत प्रौढ बीसीजी लसीकरणाचा परिणाम पाहण्यासाठी भारत सरकारने विविध भागात प्रौढ बीसीजी लसीकरण हा पायलट अभ्यास सुरू केला आहे.
नवीन M72/AS01E आणि VPM1002 यांसारख्या संशोधित लसींवर संशोधन सुरू आहे.
जनजागृती आणि शिक्षण: TB संदर्भात समाजामध्ये गैरसमज कमी करण्यासाठी विविध प्रचार मोहिमा राबवल्या जात आहेत.
पोषण आणि आरोग्य सुधारणा: TB रुग्णांच्या आहारावर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी निक्षय पोषण योजना आणि इतर सरकारी मदतीच्या योजनांचा प्रभाव वाढविला जात आहे
निष्कर्ष
TB हा पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार असून, वेळेत निदान आणि योग्य उपचार घेतल्यास तो नियंत्रित करता येतो. २०२५ पर्यंत TB निर्मूलनाचे भारताचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी होणे गरजेचे आहे.
“होय! आपण क्षयरोग संपवू शकतो!”
डॉ. मृदुला होळकर
M.Sc. (Public Health),
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक,
राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे जिल्हा

उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवारी मूल्यमापन चाचणी

पुणे : केंद्र शासन पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत असाक्षरांच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून नोंदणी झालेल्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवार २३ मार्च २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहे.

राज्यात ६ लाख ६६ हजार १२८ इतक्या असाक्षरांची चाचणी घेण्याबाबत जिल्ह्यांना सूचित करण्यात आले आहे. या परीक्षेतील प्रश्नपत्रिका ही पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याच्याशी संबंधित असून तीन भागांमध्ये विभागलेली एकूण १५० गुणांची असणार आहे. यामध्ये अनुक्रमे वाचन ५० गुण, लेखन ५० गुण, संख्याज्ञान ५० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी ३३ टक्के (१७ गुण) अनिवार्य आहेत व एकूण १५० गुणांपैकी ३३ टक्के (५१ गुण) अनिवार्य असतील. कोणत्याही एका भागाचे ३३ टक्के गुण होण्यासाठी कमी पडलेले जास्तीत जास्त ५ वाढीव गुण देता येतील. परंतु तीनही भागाचे मिळून ५ पेक्षा जास्त ग्रेस गुण देता येणार नाहीत. परीक्षेस जाताना एक आयकार्ड आकाराचे छायाचित्र, जन्मतारखेचा पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक आदींपैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

ही चाचणी परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, कन्नड, तेलगू, तामीळ, बंगाली इत्यादी माध्यमातून होणार आहे. उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी काळ्या अथवा निळ्या शाईचा पेन वापरावा. असाक्षर व्यक्तींनी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर २३ मार्च रोजी ओळखपत्रासह उपस्थित रहावे. नोंदणीकृत असाक्षर व्यक्तींना परीक्षा केंद्रावर उपस्थित ठेवण्यासाठी शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, स्वयंसेवक यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत, असे आवाहन शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) तथा राज्य साक्षरता अभियान प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.