पुणे-मोगलमर्दिनी छत्रपती महाराणी ताराबाई साहेबांच्या समाधी संवर्धन करावे यासाठी मुख्यमंत्री यांना पत्र दिल्याची माहिती युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी समाज माध्यमातून दिली आहे . त्यांनी याअसे म्हटले आहे कि,’
शिवस्नुषा श्री छत्रपती महाराणी ताराबाई साहेब यांच्या समाधी स्थळाची झालेली दुरवस्था अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पराक्रम आणि धैर्याचा अमूल्य ठेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताराबाई महाराणींची स्मृती कायम राखणे, ही आपली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जबाबदारी आहे.
याच भावनेतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. महाराणी ताराराणी साहेबांच्या समाधीचे त्वरित संवर्धन आणि जिर्णोद्धार करण्यात यावा, अशी सर्व शिवभक्तांच्या वतीने मागणी केली आहे.
मला विश्वास आहे की महाराष्ट्र सरकार महाराणी ताराबाई साहेबांच्या गौरवशाली स्मृतीप्रती कृतज्ञता व्यक्त करत, त्यांच्या समाधीस्थळाच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करेल.
पुणे-शिवपुत्र श्री राजाराम छत्रपती महाराजांच्या ३२५ व्या पुण्यतिथी निमित्त आज सिंहगड येथे महाराजांच्या समाधीस युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी अभिवादन केले.आणि त्यांनी यावेळी छत्रपती राजाराम महाराज सृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजनही केले.आमदार भीमराव तापकीर, वारकरी मंडळी, राज्य पुरातत्व विभाग, वन विभाग आदी प्रशासकीय अधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी असे म्हटले कि,’ श्री राजाराम छत्रपती महाराजांनी १६८९ ते १७०० या अकरा वर्षांत अत्यंत निकराने औरंगजेबापासून स्वराज्याचे रक्षण केले. तामिळनाडू येथील जिंजी किल्ल्यावर आठ वर्षे राजधानी हलवून स्वराज्याचे अस्तित्व जिवंत ठेवले व आपल्या राजनीती कौशल्याने मुघल सेनेला दुर्बल बनविले. आपल्या हयातीत दिल्ली जिंकून श्री शिवछत्रपती महाराजांचे स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय श्री राजाराम महाराजांनी बाळगले होते, मात्र १७०० साली वयाच्या केवळ तिसाव्या वर्षी महाराजांचे सिंहगड मुक्कामी अकाली निधन झाले. याचठिकाणी महाराजांची समाधी आहे.
गडावरील या समाधीस्थळी छत्रपती राजाराम महाराज पुण्यतिथी सोहळा समिती, सिंहगड यांच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात सहभागी झालो. भारतीय सैन्य दलाची महार रेजिमेंट पाईप बँड पथक व पुणे ग्रामीण पोलीस बँड पथक यांच्या वतीने श्री राजाराम छत्रपती महाराजांस मानवंदना देण्यात आली. तसेच पुणे पोलिसांच्या वतीने बंदुकांच्या तीन फैरी झाडून महाराजांस मानवंदना देण्यात आली. वारकरी मंडळींनी टाळ मृदंगाच्या गजरात महाराजांस अभिवादन केले.
मुंबई- श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे घोर प्रतारणा असून हे अतिक्रमण ३१ मी पूर्वी हटवावे असे पत्र युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती सोशल मिडिया वरील आपल्या आकाउंट वरून प्रसारित केली आहे .
काय म्हटले आहे नेमके -युवराज संभाजीराजे छत्रपतीयांनी…
हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही.
भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे.
समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे.
कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. ३१ मे २०२५ अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे, याकरिता मुख्यमंत्री महोदयांकडे पत्र लिहून मागणी केली…
भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे.
पुणे- :- शिवनेरी, लेण्याद्रीसह शिरूर लोकसभा मतदारसंघातील ४ रोपवे प्रकल्पांना जागा उपलब्धता, आर्थिक सहभाग यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या या रोपवे प्रकल्पांना चालना मिळणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी शिवनेरी, लेण्याद्री, भीमाशंकर आदी ठिकाणी उभारण्याची मागणी रोपवे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी राज्य शासनाकडून प्रस्ताव आल्यास ‘पर्वतमाला योजनेंतर्गत” रोपवे बांधण्यासाठी निधी मंजूर करण्याचे मान्य केले होते. त्यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवनेरीसह विविध रोपवेचे प्रस्ताव केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाकडे पाठवण्याबाबत राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार राज्य शासनाने परिशिष्ट-अ नुसार पुणे जिल्ह्यातील श्री निमगाव खंडोबा, सिंहगड व जेजुरीसह एकूण १६ आणि परिशिष्ट-ब नुसार शिवनेरी किल्ला, अष्टविनायक लेण्याद्री, भीमाशंकर ज्योतिर्लिंग व दाऱ्याघाट यासह एकूण २९ ठिकाणी रोपवे बांधण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाकडे पाठविला होता. राज्यातील विविध ठिकाणी रोपवे बांधण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. आणि राज्य सरकार यांच्यात ३ फेब्रुवारी २०२४ रोजी सामंजस्य करार करण्यात आला होता. या करारानुसार राज्य पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास अर्थकारणाला गती मिळेल, असेही कोल्हे म्हणाले . सरकारने रोपवे बांधण्यासाठी जागा उपलब्धता, आर्थिक सहभाग देणे आवश्यक होते. त्याअनुषंगाने राज्य मंत्रिमंडळाने पर्वतमाला योजनेंतर्गत शिवनेरी, लेण्याद्रीसह शिरूर लोकसभा मतदारसंघातील ४ रोपवे प्रकल्पांना जागा उपलब्धता, आर्थिक सहभागासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे शिवनेरी, लेण्याद्रीसह राज्यातील सर्वच रोपवे बांधण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. रोपवे प्रकल्पांबरोबरच राज्य शासनाने शिवनेरी, अष्टविनायक गणपती देवस्थान, वढु-तुळापूरचे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक यांना जोडणारा ‘शिव-शंभू कॉरिडॉर’ रस्ते प्रकल्पही हाती घ्यावा यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. राज्य सरकारने रोपवे प्रकल्पाला गती देतानाच ‘शिव-शंभू कॉरिडॉर’लाही मंजुरी द्यावी. – डॉ. अमोल कोल्हे, खासदार
पुणे-: शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ग.दि. मांडगूळकर सभागृहात आर्किटेक, इंजिनियर, बांधकाम संघटनांच्या पदाधिकारी आणि सदस्यासाठी चर्चासत्र घेण्यात आले. यात महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी पीएमआरडीएच्या अधिकाधिक सेवा या ऑनलाइन करण्यावर भर देण्यात येत आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांचे पीएमआरडीएची रचना, कार्यप्रणालीचा समावेश असलेली उपयुक्त दिनदर्शिका देत स्वागत करण्यात आले.
प्रशासकीय स्तरावर राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, प्रकल्प आणि सेवाबाबत अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी शासनाकडून शंभर दिवसाच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगानेपीएमआरडीएतर्फे ग.दि. मांडगूळकर सभागृहात इज ऑफ लिविंगच्या अनुषंगाने आर्किटेक, इंजिनियर्स आणि बांधकाम व्यवसायिक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्यांसाठी चर्चासत्र घेण्यात आले. पीएमआरडीएच्या अधिकाधिक सेवा ऑनलाईन देण्याच्या दृष्टीने झालेल्या या चर्चासत्रात संबंधितांकडून सूचना घेत घेत त्याची आवश्यकतेनुसार अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
पीएमआरडीएचा कारभार अधिकाधिक पारदर्शक होण्यासाठी बीपीएमएस प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे. यासंबंधी येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी या चर्चासत्रात आर्किटेक, इंजिनियर्स आणि बांधकाम व्यवसायिकांना बोलावण्यात आले होते. त्यांच्या अडचणींच्या अनुषंगाने बीपीएमएस प्रणालीबाबत सचिन देवरे यांनी संबंधितांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, विकास परवानगी विभागाचे संचालक सुनील मरळे, मुख्य अभियंता रिनाज पठाण, प्रशासन विभागाच्या सह आयुक्त पूनम मेहता, अग्निशमन विभागाचे देवेंद्र पोटफोडे यांच्यासह क्रेडाईचे रणजीत नाईकनवरे, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे अंकुश असबे, नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपर्स कौन्सिलचे भरत अग्रवाल, भारतीय वास्तुविशारद संस्थेचे विकास अचलकर, ऐसाचे मिलींद पांचाळ, मिडीचे मिलिंद पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते.
नाशिक, दि. २३ : देशातील बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर विकासासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातील. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर परिसराच्या धार्मिक, सामाजिक, पर्यावरणीय विकासासाठी तयार केलेल्या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामांना मंजुरी घेऊन सुरूवात करावी. ही सर्व कामे ही गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील याची दक्षता घ्यावी. राज्य शासनातर्फे या विकासकामांसाठी आवश्यक निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शासकीय विश्रामगृह येथे आगामी च्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर विकासासाठी तयार केलेल्या आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिकराव गुरसळ, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, त्र्यंबकेश्वर परिसराची नैसर्गिक रचना सुंदर आहे. या परिसराच्या विकासासठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येईल. उच्चाधिकार समिती आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून आराखड्याला मंजुरी देण्यात येईल. याअंतर्गत त्र्यंबकेश्वर परिसरात विविध विकासकामे केली जातील.
आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 मध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यातील कामे कालबद्धरितीने पूर्ण करावीत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामे करताना नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे अधिकाधिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग होईल, विद्युत वाहने उपयोगात येतील, असे नियोजन करावे. त्यासोबत स्थानिक नागरिकांना अधिक त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतागृहाची उत्तम व्यवस्था करावी, अशा सूचनाही श्री.फडणवीस यांनी दिल्या.
उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरणाचा कायदा लवकरच करण्यात येईल, असे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, यामुळे कुंभामेळ्यासंबंधी कामांना कायदेशीर चौकट प्राप्त होईल आणि गर्दीचे योग्य व्यवस्थापन करता येईल. आयोजनादरम्यान विविध सुविधांचे उत्तम व्यवस्थापन होण्यासाठी हे गरजेचे आहे.
गोदावरी नदी शुद्धीकरणासाठी मलनिस्सारण प्रकल्पांची कामे तातडीने सुरू करावीत. त्यासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. तसेच दीर्घकालावधी लागणाऱ्या कामांना त्वरीत सुरुवात करावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याची सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखडा ११०० कोटी रुपयांचा असून त्या अंतर्गत या स्थानाचे अध्यात्मिक व पर्यटनाच्यादृष्टीने महत्व लक्षात घेवून विकासकामे प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुंबई-सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टनुसार, सुशांतची हत्या झाली नसून आत्महत्याच आहे. त्यामुळे रिया चक्रवर्तीला क्लीन चिट देण्यात आली आहे. सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार हल्ल चढवला आहे. मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे भाजपाचे घाणेरडे राजकारण भाजप वर उलटले, असे ते म्हणाले. रिया सारख्या एका मुलीला भाजपच्या गलिच्छ राजकारणात त्रास दिला गेला. सुशांतसिंगच्या नातेवाईकांना वेठीस धरले गेले. असा आरोप देखील सचिन सावंत यांनी भाजपवर केला.
सचिन सावंत म्हणाले की, सीबीआयने सुशांतसिंग राजपूत च्या मृत्यूची चौकशी बंद केली आहे. मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे भाजपाचे घाणेरडे राजकारण भाजप वर उलटले आहे. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी तसेच बिहार निवडणुकीत यश मिळविण्यासाठी सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूचा भाजपने गैरवापर केला. एवढेच नाही तर सीआरपीसीचे उल्लंघन करुन बिहारमध्ये झीरो एफआयआर नोंदवून सीबीआयकडे केस वर्ग करण्यात आली. यातून कायद्याचेही तीन तेरा वाजले. तीन तीन तपास यंत्रणा लावण्यात आल्या. जागतिक दर्जाच्या मुंबई पोलिसांची बदनामी केली गेली.
सीबीआयने सुशांतसिंग राजपूत च्या मृत्यूची चौकशी बंद केली आहे. मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे भाजपाचे घाणेरडे राजकारण भाजपा वर उलटले आहे. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी तसेच बिहार निवडणुकीत यश मिळविण्यासाठी सुशांतसिंग राजपूत च्या मृत्यूचा भाजपाने गैरवापर केला. एवढेच…
सचिन सावंत पुढे म्हणाले, रातोरात लाखो फेक अकाउंट सोशल मीडियावर तयार करुन त्यामध्ये सुशांत सिंगच्या आत्म्यास बोलावण्याचे थोतांड पसरवून अनेक कथा रचून सुशांतची हत्या झाल्याचे व महाविकास आघाडी सरकारने ते दाबल्याचे चित्र तयार करण्यात आले. हल्ली हल्ली पर्यंत सातत्याने सुशांतसिंगचा सोशल मीडियावर विषय ट्रेंड करण्यात येत होता. एम्सने अहवाल देऊन अनेक महिने होऊन ही सीबीआय साडेचार वर्षे गप्प बसली. मी सातत्याने हा विषय लावून धरत होतो.
सचिन सावंत म्हणाले, रिया सारख्या एका मुलीला भाजपच्या गलिच्छ राजकारणात त्रास दिला गेला. सुशांतसिंगच्या नातेवाईकांना वेठीस धरले गेले. यातून सीबीआय व ईडीसारख्या राष्ट्रीय तपास यंत्रणांचा राजकीय उपयोग होतो हे अधोरेखित झालेच, पण त्यांची विश्वासार्हता ही प्रश्नांकीत झाली आहे. पालघर साधूंचे प्रकरण असो वा दिशा सालीयनच्या मृत्यूची चौकशी असो विरोधी पक्षांची बदनामी करण्याचे भाजपचे हीन राजकारण देशासाठी किती घातक आहे हे स्पष्ट होते. शेवटी सत्याचा विजय होत असतोच! जनतेने ओळखावे! भाजपच्या गलिच्छ राजकारणाचा जाहीर निषेध, असे सचिन सावंत यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
मुंबई-आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्ष संघटनेत अनेक बदल केले आहेत. रविवारी रवींद्र नाट्यमंदिरात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची बैठक पार पडली. राज ठाकरे यांनी मनसेमधील नवीन संघटनात्मक बदल आणि रचना आज जाहीर केले आहेत. मनसेने पहिल्यांदाच मुंबईसाठी अध्यक्षपदाची नेमणूक केली असून संदीप देशपांडे यांच्याकडे ती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर राजपुत्र अमित ठाकरे यांच्यावरही मोठी जबाबदारी दिली असून मनसेच्या सर्व शाखाध्यक्षांची जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे. फक्त विभाग अध्यक्ष असलेल्या मनसेमध्ये आता शहर अध्यक्ष आणि उप-शहर अध्यक्ष या नव्या पदांची निर्मिती करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठे अपयश आले होते. त्यांचा एकही आमदार निवडून आला नाी. या अपयशानंतर पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पक्ष संघटनेत मोठे बदल करण्याचे संकेल दिले होते. त्यासाठी त्यांनी पक्षातील पदांचे पुनर्गठन, पदाधिकाऱ्यांची आचारसंहिता आणि इतर महत्त्वाचे मुद्दे यावर विचार करून आराखडा तयार करण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार आज मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत केंद्रीय समिती स्थापनेसह, मुंबईत महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाला मजबूत कसे करावे, यावर सखोल चर्चा करण्यात आली.
काय करायचे, कसे करायचे त्याची आखणी 2 एप्रिल पर्यंत सर्वांना मिळेल. शहर रचनेत कामांची रचना आहे काय करायचे आणि काय नाही करायचे, हे सांगितले जाईल, असे राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ज्याला जे काम दिले त्यांनी तेच करायचे. त्यामुळे भांडणे कमी होतील, अशा सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. अनेक गोष्टी साचल्या आहेत. ते सर्व गुढीपाडवा मेळाव्यात बोलेन, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
मनसेने आतापर्यंत मुंबईसाठी कधीही अध्यक्षांची नेमणूक केली नव्हती. आता मात्र थेट पहिल्यांदाच मुंबई अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली असून संदीप देशपांडे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दक्षिण मुंबईच्या उपशहर अध्यक्षपदी यशवंत किल्लेदार तर मुंबई पश्चिम उपनगरपदी कुणाल माईणकर आणि मुंबई पूर्व उपनगरपदी योगेश सावंत यांची निवड करण्यात आली आहे. अमित ठाकरे यांच्याकडे मनसेच्या सर्व शाखाध्यक्षांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर यांच्यासह आणखी काही नेत्यांना मनसेच्या केंद्रीय समितीत स्थान देण्यात आले आहे. ही केंद्रीय समिती मनसेतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर देखरेख ठेवेल, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
ठाण्यातही अशीच एक केंद्रीय समिती असेल, त्यात अविनाश जाधव, राजू पाटील, अभिजीत पानसे, गजानन काळे असतील. यामुळे दोन्ही बाजूने पक्ष बांधला जाईल, अशी रचना केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही रचना लावण्यात येईल. सध्या मुंबई आणि ठाण्यात केलेला हा बदल आहे. एप्रिल-मे महिन्यात महाराष्ट्रात ही रचना होईल” अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली
पुणे, दि. २३ : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली २२ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व १ लाख २५५ व तडजोडचे ३८ हजार ५७० असे एकूण १ लाख ३८ हजार ८२५ दावे निकाली काढण्यात आले आहेत.
लोक अदालतीमध्ये बँकेचे कर्जवसूली ८ हजार ८१९, तडजोड पात्र फौजदारी ३१ हजार ५३७, वीज देयक ३२९, कामगार विवाद खटले १८, भुसंपादन १११, मोटार अपघात दावे न्यायाधिकरण १६३, वैवाहिक विवाद ७४, निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट ॲक्ट १ हजार ९९४, इतर दिवाणी ५१४, इतर २ हजार ६७३, महसूल ७ हजार ७३१, पाणी कर ८४ हजार ८६०, ग्राहक वादविवाद २ अशी एकूण १ लाख ३८ हजार ८२५ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.
तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या ९७ हजार ६४४ प्रलंबित प्रकरणांमधून ३८ हजार ५७० प्रकरणे निकाली काढण्यात आली आणि यात ३२० कोटी ६८ लक्ष १२ हजार ४०७ तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. वादपूर्व २ लाख ४२ हजार ९८७ दाव्यापैकी १ लाख २५५ दावे निकाली काढण्यात येऊन २५६ कोटी ७० लाख ९८ हजार ७४९ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. एकूण १ लाख ३८ हजार ८२५ प्रलंबित दावे निकाली काढण्यात येऊन ५७७ कोटी ३९ लाख ११ हजार १५६ रुपये तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आले.
पुणे जिल्ह्याने राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनादरम्यान दावे निकाली काढण्यात अग्रेसर राहण्याची परंपरा कायम राखली आहे. या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्याच्या सर्व न्यायालयातील अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभाग, महानगरपालिका, विविध शासकीय विभाग आणि नागरिकांचे चांगले सहकार्य मिळाले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती सोनल पाटील यांनी दिली आहे.
पुणे- परारज्यातुन येवुन गांज्याची विक्री करणाऱ्या तरुणाला पकडून त्याच्या कडून बारा लाखाचा गांजा पुणे पोलिसांनी हस्तगत केला,कर्नाटकातून आणून स्विफ्ट डिझायर गाडीत फिरत हा तरुण गांजाची विक्री पुण्यात करत होता .
पोलिसांनी सांगितले कि,’काल दिनांक २२/०३/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना हॅण्डल्युम हाऊस शॉपच्या समोर, शंकरशेठ रोड, स्वारगेट पुणे सार्वजनीक रोडवर नदिम मोईज शेख वय २८ वर्षे, रा. जुना मायलोर, हनुमान मंदिरा जवळ, बिदर, कर्नाटक, हा इसम त्याचे जवळील स्विफ्ट डिझायर गाडी मध्ये संशयस्पदरित्या बसलेला मिळुन आल्याने सदर ठिकाणी झडती घेतली असता त्याचे गाडीच्या डिक्की मध्ये १२,००,७४०/- कि.चा चार नायलॉनच्या पोत्यामध्ये भरलेला ३० पॅकेट असा एकुण ६० किलो ०६७ ग्रॅम वजनाचा गांजा मिळुन आल्याने, सदर मालासह स्विफ्ट डिझायर गाडी व मोबाईल असा एकुण १७,१०,४४०/- रु किं मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर इमसा विरुध्द स्वारगेट पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा इसम हा मुळचा कर्नाटक राज्यातील असुन त्याने सदरचा गांजा कोठुन आणला व कोठे विक्री करणार होता याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन शर्मा,अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे,पोलीस उप आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पो. आयुक्त, गुन्हे २ राजेन्द्र मुळीक यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहा पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उप निरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार, विशाल दळवी, सचिन माळवे, संदिप शिर्के, सुजीत वाडेकर, मारुती पारधी, प्रविण उत्तेकर संदेश काकडे, दत्ताराम जाधव, यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे, डॉ. नीलम गोऱ्हे यांची ठाम भूमिका
मुंबई, : वाशी येथील एका महाविद्यालयात परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक प्राध्यापकाने १६ वर्षीय विद्यार्थिनीशी केलेल्या आक्षेपार्ह वर्तनाच्या घटनेबाबत तातडीने चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना केली आहे.
या संदर्भात डॉ. गोऱ्हे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी या प्रकरणातील आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करून अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणाचा तातडीने आणि निष्पक्षपणे तपास होण्यासाठी तज्ज्ञ व अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, तसेच आरोपीला कोणतेही पाठबळ मिळणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, आरोपीने यापूर्वी अशा प्रकारचे कृत्य केले असल्यास त्याचा तपास करून पुरावे गोळा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
विद्यार्थिनींवरील कोणत्याही प्रकारच्या लैंगिक अत्याचारासंदर्भात कठोर पावले उचलली जातील आणि दोषींना कडक शिक्षा होईल, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जावी असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई : सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. रानडे यांच्या निधनाने आयुर्वेद क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही दुःखद बातमी समजताच विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शोक व्यक्त केले.
“डॉ. रानडे सरांच्या दुःखद निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. त्यांनी आपल्या अद्वितीय कार्यातून आयुर्वेदिक उपचार पद्धती समृद्ध केली. १६८ पुस्तके, असंख्य व्याख्याने आणि लेखांमधून त्यांनी दिलेले सखोल मार्गदर्शन हे आम्हा सर्वांसाठी दीपस्तंभासारखे आहे,” असे डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले. त्यांच्यावतीने त्यांच्या स्त्री आधार केंद्र, पुणे संस्थेच्या प्रतिनिधी यांनी अंत्यसंस्काराला उपस्थित राहून पुष्पहार अर्पण केला.
या कठीण प्रसंगी संपूर्ण कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशी भावना व्यक्त करत, “परमेश्वर आपल्याला व कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची ताकद देवो,” अशी प्रार्थनाही डॉ. गोऱ्हे यांनी केली.
पुणे- पुणे मॅनेजमेंट असोसिएशन व एसएमजे कंन्सलटंन्स यांच्या संयुक्त विद्यमाने मार्केटिंग आणि सेल्स या क्षेत्रात उत्तुंग कार्य करण्याऱ्या महिलांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. आयएमडीआर सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमात वेदवती राजे(लीडर फ्लीटगार्ड फिल्टर्स),शितल ब्रम्हे(सीईओ एनी टाईम बार्टल),अंजली पाटील (फाउंडर डायरेक्टर इल्यूमीना कन्सल्टिंग) यांची मुलाखत मृणालिनी सचान यांनी घेतली. या कार्यक्रम प्रसंगी पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप तुपे, एसएमजे कंन्सलटंन्सचे राहुल जोशी आदी मान्यवरांच्या बरोबरच मार्केटिंग व सेल्स विभागात कार्य करणारे अधिकारी वर्ग उपस्थित होते. या वेळी मुलाखतीत यशस्वी महिलांनी मार्केटिंग व सेल्स याची सखोल माहिती, काय करू नये व काय करावे याविषयी माहिती देत असतांनाच भावी काळातील आव्हाने व त्याचे निराकरण याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे वर्षा कुलकर्णी यांचा काव्य जीवनगौरव पुरस्कार
पुणे : मुक्तछंद म्हणजे स्वातंत्र्य आहे; स्वैराचार नाही. ज्या कविंना आपले विचार कोणत्याही छंदात, वृत्तात मावत नाहीत, छंदांचे बंधन वाटते त्यांनीच मुक्तछंदात काव्य लिहावे. कविता प्रकार अत्यंत सोपा आहे, असे आजच्या काळातील कवींना वाटते. त्यामुळेच कुणीही उठतो आणि कवी होतो. यातूनच कवींची बहुतेकवेळा अवहेलना, टिंगल, चेष्टा होते आणि कविता या साहित्यप्रकाराला तसेच कवीला गांभीर्याने घेतले जात नाही, अशी स्पष्टोक्ती महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी केली.
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे काव्य जीवनगौरव पुरस्काराने ‘वृत्तबद्ध कविता : कला आणि शास्त्र’ या ग्रंथाच्या लेखिका आणि ज्येष्ठ कवयित्री वर्षा कुलकर्णी यांचा आज (दि. 23) सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोतल होते. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, कार्याध्यक्ष मैथिली आडकर मंचावर होते. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आजच्या कवींना ओवीबद्ध, छंदबद्ध लिखाणाचे तंत्र, शास्त्र अवलंबावे असे वाटत नाही, असे नमूद करून डॉ. सदानंद मोरे पुढे म्हणाले, अशा परिस्थितीत वृत्तबद्ध कविता : कला आणि शास्त्र या पुस्तकातून कविता या साहित्य प्रकाराविषयी मोलाची माहिती लोकांसमोर आणण्याचे कार्य वर्षा कुलकर्णी यांनी केले आहे. काव्य लिखाण करताना आजच्या कवींनी व्याकरणाला सुटी देणे, छंदबद्धता नाकारणे योग्य नाही.
सत्काराला उत्तर देताना वर्षा कुलकर्णी म्हणाल्या, काही वर्षांपूर्वीपर्यंत कविता लिखाणाचे शास्त्र असते याविषयी मलाही कल्पना नव्हती. परंतु हे जाणल्यानंतर साहित्य क्षेत्रातील दिग्गजांशी चर्चा, साहित्यप्रेमींचे अभिप्राय अनेक कवितांचे रसग्रहण, चर्चा यातून मी हे तंत्र समजावून घेत या विषयी सोप्या मराठी भाषेत छोटे छोटे लेख लिहिले. वडिलांनी पाठपुरावा केल्यामुळे या लेखांचे पुस्तकरूपात प्रकाशन झाले. त्या पुढे म्हणाल्या, काव्य लेखन करताना कवितेचा आशय, आत्मा, कला आणि शास्त्र यांचा संगम करत काव्याचे बीज पुरेसे रुजल्यानंतर बहरू द्यावे. आयुष्यभर विद्यार्थी राहून संपूर्णत्वाचा अट्टाहास न धरता कला व्रत म्हणून जोपासली जावी.
प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी पुरस्कार वितरण सोहळ्याविषयी माहिती सांगितली. परिचय आणि सन्मानपत्राचे वाचन प्राजक्ता वेदपाठक यांनी केले तर सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केल.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित कविसंमेलनात प्रभा सोनवणे, स्वप्नील पोरे, तनुजा चव्हाण, वैजयंती आपटे, नचिकेत जोशी, मिलिंद छत्रे, डॉ. मृदुला कुलकर्णी-खैरनार, डॉ. मंदार खरे, डॉ. ज्योती रहाळकर, ज्योती उटगीकर-देशपांडे, सुजाता पवार यांचा समावेश होता. सूत्रसंचालन निरुपमा महाजन यांनी केले.
पुणे : समाजकार्यात महिला शक्ती किती सक्षम असू शकते हे ‘स्नेहाधार गौरव पुरस्कारा’तून समाजापुढे येत आहे. सामाजिक कार्यातून समाजाला दिशा व प्रेरणा मिळते. सामाजिक क्षेत्रात समाजकंटक मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरतात. परंतु विरोधाला न डगमगता, दृढ निश्चयाने कार्यरत असणाऱ्या वासंती देव आणि मनिषा पवार यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन निष्णात गिर्यारोहक, गिरीप्रेमी संस्थेचे संस्थापक उमेश झिरपे यांनी केले.
स्नेहालय, अहिल्यानगर संचलित स्नेहाधार पुणे परिवारातर्फे ‘स्नेहाधार गौरव पुरस्कारां’चे वितरण झिरपे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. निवारा सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात पेण येथील ‘अहिल्या महिला मंडळ’च्या संस्थापिका वासंती श्रीकांत देव आणि कळसंबर (ता. बीड) येथे ‘आपला परिवार’ वृद्धाश्रमाची स्थापना करणाऱ्या मनीषा भाऊराव पवार यांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी होते. प्रसिद्ध व्यावसायिक कृष्णा राजाराम अष्टेकर यांची विशेष उपस्थिती होती. स्नेहाधार परिवार, पुणेच्या सहसंचालिका गौरी पाळंदे मंचावर होत्या. शाल, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. उमेश झिरपे पुढे म्हणाले, संस्थात्मक पातळीवर मोठ्या प्रमाणात समाजकार्य करणे वाटते तितके सोपे नाही, या करिता पुरस्कारप्राप्त महिलांनी त्याग आणि धाडस केलेले आहे. समाजाने त्यांच्या कार्याला भरभरून मदत करावी आणि सशक्त पिढी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. अध्यक्षपदावरून बोलताना सुहास मापारी म्हणाले, स्नेहालय ही फक्त संस्था नसून हे चालते, बोलते, फिरते विद्यापीठच आहे. दु:खी, पिडित, वंचित घटकांसाठी असलेल्या योजना माहिती अभावी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. अशा वेळी समाजकार्य करणाऱ्या संस्था लाभार्थी आणि शासनामधील दुवा ठराव्यात. विपरित परिस्थितीत जिद्दीने सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था खऱ्या अर्थाने समाजाच्या नायक आहेत. गो-सेवेच्या क्षेत्रात कार्यरत असताना स्नेहालय या संस्थेशी संपर्क आला, असे सांगून कृष्णा अष्टेकर म्हणाले, या संस्थेचे कार्यकर्ते जीवाला जीव देऊन अखंडितपणे कार्यरत आहेत. या पुरस्काराच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या इतर संस्थांनाही नेटाने काम करण्याची स्फूर्ती-जिद्द देत आहेत. हे कार्य म्हणजे परमेश्वराची खरी पूजा आहे. वासंती देव यांच्यावतीने मनोगत व्यक्त करताना अश्विनी गाडगीळ म्हणाल्या, सामाजिक दायित्व ओळखून अहिल्या महिला मंडळाच्या माध्यमातून आदिवासी पाड्यातील स्त्रियांसाठी मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करण्यात येत आहे. महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी कार्यकर्ते अविरतपणे प्रयत्नशील आहेत. प्रामाणिकपणे काम केल्यास समाज कायम पाठीशी उभा राहतो, असा अनुभव आहे. पुरस्काराने फक्त आत्मविश्वासच वाढला नाही तर पुढील कार्य करण्यास प्रेरणा मिळाली असल्याचे सांगून मनिषा पवार म्हणाल्या, समाजातील दु:ख पाहून ज्येष्ठांसाठी कार्य करावे, या संकल्पनेतून वृद्धाश्रमाची स्थापना केली. आमच्या संस्थेचे कार्य पाहून पुण्यातील अनेक सामाजिक संस्था व व्यक्तींनी आमच्या कार्याला मदत केली आहे. प्रास्ताविकात शुभांगी कोपरकर यांनी संस्थांच्या उपक्रमांची माहिती सांगितली. मान्यवरांचे स्वागत गौरी पाळंदे, सुहास मापारी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख विवेक नारळकर यांनी करून दिली. मानसी चंदगडकर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.