Home Blog Page 399

अबब ,अरेरे ..कचऱ्यात सापडले प्लास्टिकच्या बंद डब्यात 10 ते 11अर्भके.. मानवतेला काळिमा फासणारे वृत्त

पुणे -दौंड शहरात मृत अवस्थेत अर्भके सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये साधारणतः दहा ते अकरा अर्भक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. दौंड शहरातील बोरावके नगर परिसरात नवजात बालकांचे अर्भक मृत अवस्थेत सापडले असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.या घटनेची माहिती पोलिसांना कळताच दौंड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. शहरात अर्भक सापडल्याने याच परिसरात गर्भपात केंद्र असून येथे अवैध गर्भपात होत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हे सर्व अर्भक हे प्लास्टिकच्या डब्यात बंद केलेले असल्याचे आढळून आले आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस, सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलिस उपनिरीक्षक युवराज घोडके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भेट देत घटनेची माहिती घेतली. तसेच उपजिल्हा रुग्णालयांच्या डॉक्टरांना तात्काळ येथे बोलविण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात एक नेपाळी फिरतोय:मीच हिंदू धर्म वाचवतो असे त्याला वाटते, अनिल परबांचा नीतेश राणेंवर घणाघात

मुंबई-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी मंगळवारी विधान परिषदेत भाजप आमदार नीतेश राणे यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. त्यांनी त्यांचा उल्लेख ‘नेपाळी’ असा केला. महाराष्ट्रात एक नेपाळी आहे. मीच हिंदू धर्म वाचवू शकतो असे त्याला वाटते, असे ते म्हणालेत. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परब यांच्या बाजूलाच बसले होते हे विशेष.अनिल परब आज विधानपरिषदेत संविधानावरील चर्चेत बोलताना म्हणाले की, हल्ली काय झाले आहे की मांसाहार करायचा नाही असे कुणीतरी सांगत आहे. त्यांना हा अधिकार कुणी दिला? मटण कोणते खायचे, झटका मटण खायचे की हलाल खायचे हे तुम्ही सांगणार का? एक मंत्री सांगतो की आपण काय खायचे आणि काय खायचे नाही. राज्यात हिंदू – मुस्लिम वाद होतील असे वातावरण आहे.

या देशाविरोधात काम करणारा कोणताही व्यक्ती मग तो हिंदू असो की मुस्लीम तो आपल्या देशाचा शत्रू आहे असे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. दुर्दैवाने त्यावेळी जे काही बॉम्बस्फोट झाले, ज्या काही गोष्टी झाल्या, त्यात मुस्लीम समाजाचे लोकं आढळले. म्हणून बाळासाहेबांनी त्यावेळी ही भूमिका मांडली होती.पण आज काय सुरू आहे? माझ्याकडे एका सोसायटीत एक नेपाळी वॉचमन आहे. तो अख्खी रात्र जागते रहो म्हणून ओरडत असतो. त्याच्यामुळेच आम्ही सुरक्षित आहोत असे त्याला वाटते. तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरत आहे. त्याला वाटते, त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय. त्याचा असा समाज झालाय. हल्ली तो अशी शाल-बिल घेऊन फिरत आहे. अरे त्यांच्या जीवावर नाही, हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत. आमच्यात तेवढी ताकद आहे.अनिल परब यांनी यावेळी नीतेश राणे यांचे नाव घेतले नाही. पण त्यांचे हावभाव पाहता त्यांचा रोख त्यांच्याकडेच होता हे स्पष्ट आहे. यावेळी त्यांच्या बाजूला हसलेले उद्धव ठाकरेही गालातल्या गालात हसत होते.

अनिल परब पुढे म्हणाले, माझ्या धर्माने किंवा मला ज्यांनी शिकवण दिली त्यांनी आम्हाला स्वतःच्या धर्माचे संरक्षण करताना दुसऱ्याच्या धर्मावर जाणिवपूर्वक अन्याय करण्याचे शिकवले नाही. जाती-जातीत तेढ वाढवणे शिकवले नाही. त्यामुळे मागच्या काही दिवसांत ज्या काही घटना घडल्या आहेत, या घटना पाहिल्या तर जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येते.

आज सभागृहात वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा झाली. मी सर्वच गोष्टींवर भाष्य करत नाही. संविधानावर चर्चा करण्यास दोन दिवसही पुरणार नाहीत. पण संविधानाने मला जे अधिकार दिलेत, त्यांची पायमल्ली करण्याचा अधिकार ना मला विरोधक म्हणून आहे ना सत्ताधाऱ्यांना आहे. त्यामुळे मी राहायचे कसे? मी खायचे काय? बोलायचे काय? याचे अधिकार दुसरा कुणी ठरवू शकत नाही. हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी बजावणारच. त्यात दुसऱ्या कुणाचा हस्तक्षेप मला मान्य नाही आणि तो मान्य करू पण देणार नाही, असे अनिल परब म्हणाले.

ते पुढे म्हणाले, निधीचे समान वाटप हा घटनेने दिलेला अधिकार आहे. पण केंद्र सध्या राज्याच्या बाबत निधी वाटपात दुजाभाव दाखवत आहे. आता राज्यात सुद्धा असाच प्रकार सुरू झाला आहे. माझ्या मतदार संघात 100 कोटी रुपयांच्या वर्क ऑर्डर दिल्या गेल्या. आता त्याठिकाणी निधी दिला जात नाही. आम्ही काम करायचे नाही का? एका वॉर्डात निधी दिला जातो आणि दुसऱ्या वॉर्डात निधी दिला जात नाही.खालच्या सभागृहात आम्हाला अद्याप विरोधी पक्षनेता दिला नाही. का दिला नाही हे आम्हाला लिहून द्या असे आम्ही अध्यक्षांना बोललो. पण ते यावर बोलायला तयार नाहीत. आम्ही काय गुन्हा केला हे त्यांनी सांगावे. आमच्याकडे संख्याबळ नाही म्हणून होत नसेल तर तसे लिहून द्यावे. पण तेही तसे करत नाहीत.

अनिल परब म्हणाले, आम्ही विधानपरिषदेच्या सभापतींवर अविश्वास प्रस्ताव दाखल केला. हा प्रस्ताव नियमानुसार घेण्याची गरज होती. पण तो तुम्ही नाकारला. तो कोणत्या कायद्याने नाकारला हे तरी दाखवा. आमचा अविश्वास प्रस्ताव नाकारला आणि लगेच तुम्ही विश्वासदर्शक प्रस्ताव आणला. केवळ तुम्ही घटनापीठावर बसलेला आहात म्हणून तुम्हाला चॅलेंज करता येत नाही. त्यामुळे आता आम्ही थेट सभापतींवर अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.

” सातारा कारागृहात कैद्यांसाठी फास्ट फूड कोर्सचे आयोजन”

पुणे -मुकुल माधव फाउंडेशन, पुणे आणि मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी आणि सातारा जिल्हा कारागृह यांच्या सहकार्याने तुरुंगातील पुरुष कैद्यांसाठी फास्ट फूड प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.महाराष्ट्र कारागृह पोलीस विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि कारागृह आणि सुधारणा सेवा महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली.

कारागृह विभागाच्या “सुधारणा आणि पुनर्वसन” या ब्रीदवाक्यानुसार कारागृहातील कैद्यांसाठी विविध उपक्रम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, सातारा जिल्हा कारागृहात विविध प्रशिक्षण-केंद्रित उपक्रम राबविले जात आहेत.मार्गदर्शन करताना मुकुल माधव फाउंडेशनचे सदस्य संतोष शेलार म्हणाले की, त्यांची संस्था तुरुंगातील कैद्यांसाठी अनेक प्रशिक्षण उपक्रम राबवत आहे. या तुरुंगात फास्ट फूड कोर्सेस आणि कैद्यांसाठी विविध वैद्यकीय आरोग्य शिबिरे असे अनेक उपक्रमही राबवले जातील.

मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, सातारा यांचे प्रतिनिधी श्री. विनोद जाधव म्हणाले की, तुरुंगातील कैद्यांसाठी असा उपक्रम हा त्यांच्या कॉलेजसाठी पहिला आणि नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. जर तुरुंग प्रशासनाने परवानगी दिली तर आम्ही आमच्या कॉलेजच्या माध्यमातून कैद्यांसाठी आणखी विविध उपक्रम करण्यास उत्सुक आहोत.वरिष्ठ जेलर ज्ञानेश्वर दुबे म्हणाले की, आमचे प्रशासन नेहमीच तुरुंगातील कैद्यांसाठी विविध उपक्रम आणि आरोग्य शिबिरे आयोजित करते. आमचा प्रयत्न असतो की कैद्यांनीही या उपक्रमांचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर ते तुरुंगातून बाहेर पडावेत.

कार्यक्रमाचा समारोप करताना तुरुंग अधीक्षक शामकांत शेडगे म्हणाले की, तुरुंग विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि तुरुंग विभागाच्या “सुधारणा आणि पुनर्वसन” या ब्रीदवाक्यानुसार, तुरुंगात दाखल होणारा प्रत्येक कैदी हा सर्वप्रथम एक माणूस आहे आणि तुरुंग प्रशासन नेहमीच त्या व्यक्तीला सुधारणा करण्याची संधी देण्यासाठी कार्यरत असते. याचाच एक भाग म्हणून, सध्या तुरुंगात असलेल्या बहुतेक तरुणांचा आणि तरुणांचा वेळ वाचवण्यासाठी, मुकुल माधव फाउंडेशन, पुणे आणि मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, सातारा यांच्या माध्यमातून “फास्ट फूड” कोर्स सुरू करण्यात आला आहे. या कोर्सद्वारे, कैद्यांना पाणीपुरी, रगडापुरी, कचोरी, वडापाव, मिसळपाव, समोसा, उपवास पॅटीज, कांदा भाजी, बटाटा भाजी, गोबी मंचुरियन, व्हेज मंचुरियन, हक्का नूडल्स, फ्राइड राईस, व्हेज मोमोज, बर्गर, पास्ता, पिझ्झा असे विविध पदार्थ शिकवले जातील. समाजात असताना गुन्हे केलेल्या आणि तुरुंगात गेलेल्या तरुणांना सुधारणे आणि पुन्हा एकत्र आणणे हे आमचे उद्दिष्ट नेहमीच असते.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मुकुल माधव फाऊंडेशनचे प्रतिनिधी संतोष शेलार, कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे प्रतिनिधी विनोद जाधव, कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी ज्ञानेश्वर दुबे, सुभेदार मानसिंग बागल, हवालदार दारकू पारधी, कॉन्स्टेबल राकेश पवार, बालाजी मुंडे, रविराज शेळके व इतर कर्मचारी उपस्थित होते.

जीवीताला धोका असल्याच्या तक्रारीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे झालेल्या हत्येची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून स्वत:हून दखल

पीडित व्यक्ती परिसरातील वक्फ जमिनीच्या विरोधात कायदेशीर खटल्यांमध्ये सक्रियपणे सहभागी होता

या संदर्भात आयोगाने राज्याचे पोलिस महासंचालक आणि तिरुनेलवेलीचे जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावून चार आठवड्यांत तपशीलवार अहवाल मागवला

नवी दिल्ली, 25 मार्च 2025

तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यात एका सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाची चार जणांच्या गटाने दिवसाढवळ्या हत्या केल्याच्या माध्यमातून प्रसारित झालेल्या वृत्ताची राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC),स्वतःहून दखल घेतली आहे. वृत्तानुसार,पीडित व्यक्ती परिसरातील वक्फ जमिनीच्या अतिक्रमणाविरुद्ध कायदेशीर खटले लढणारा कार्यकर्ता होता आणि त्यांना  काही लोकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या.या बाबतच्या तक्ररीवर पोलिस त्यांच्यावर योग्य कारवाई करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

प्रसारित झालेल्या बातम्या सत्य असल्यास पीडिताच्या मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचे निरीक्षण आयोगाने नोंदविले आहे. त्यामुळे तामिळनाडूचे पोलीस महासंचालक आणि तिरुनेलवेलीचे जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावून चार आठवड्यांत या प्रकरणाचा तपशीलवार अहवाल आयोगाने मागवला आहे.

इंदूर – पुणे – इंदूर विशेष गाडीच्या प्रवासाचा कालावधी वाढवण्यात आला

पुणे, 25 मार्च 2025

प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने पुणे आणि इंदूर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीच्या प्रवासाचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील पुढीलप्रमाणे आहे:

1. इंदूर – पुणे साप्ताहिक विशेष (14 फेऱ्या)

गाडी क्रमांक 09324 इंदूर – पुणे साप्ताहिक विशेष, जी पूर्वी 19.03.2025 पर्यंत चालविण्यात येणार होती, ती आता 26.03.2025 ते 25.06.2025 या कालावधीसाठी वाढविण्यात आली आहे.

2. पुणे – इंदूर साप्ताहिक विशेष (14 फेऱ्या)

गाडी क्रमांक 09323 पुणे – इंदूर साप्ताहिक विशेष, जी पूर्वी 20.03.2025 पर्यंत चालविण्यात येणार होती, ती आता 27.03.2025 ते 26.06.2025 या कालावधीसाठी वाढविण्यात आली आहे.

गाडीच्या प्रवासनाच्या दिवशी, वेळ, डब्यांची रचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल नाही.

आरक्षण:

विशेष गाडी 09323/09324 च्या विस्तारित फेऱ्यांसाठी 26.03.2025 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर तिकिट आरक्षण सुरू होईल.

गाडीच्या थांबे व वेळेत विस्तृत माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा.

अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष:एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड

मंत्रिपदाची इच्छा, पण उपाध्यक्षपदावर बोळवण

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा करतील.विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या राजकुमार बडोले, संजय बनसोडे व अण्णा बनसोडे या 3 नेत्यांची नावे चर्चेत होती. अखेर या अण्णा बनसोडे यांनी बाजी मारली. या पदासाठी महायुतीकडून अण्णा बनसोडे यांचा एकमेव अर्ज आला होता. तो सोमवारी दुपारी झालेल्या पडताळणीत वैध ठरला. त्यामुळे त्याची या पदावर बिनविरोध निवड झाली आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी दुपारी सभागृहात करतील.

अण्णा बनसोडे यांनी महापालिकेत 3 टर्म नगरसेवक म्हणून काम केले आहे. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. ते पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विधानसभेत नेतृत्व करतात. ते 2009 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2014 ला त्यांना पराभवाची चव चाखावी लागली. पण 2019 मध्ये ते पुन्हा विधानसभेत पोहोचले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर त्यांनी अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला आणि 2024 मध्ये ते पुन्हा विधानसभेवर पोहोचले. अजितदादांच्या बालेकिल्ल्यातील पिंपरीचे शिलेदार म्हणून त्यांना ओळखले जाते.

औद्योगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील आमदाराला आत्तापर्यंत एकदाही कॅबिनेट अथवा राज्यमंत्रिपद मिळाले नाही. आत्तापर्यंत शहरातील 5 नेत्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले महामंडळ मिळाले. मात्र शहराच्या 40 वर्षाच्या इतिहासात एकदाही कॅबिनेट किंवा राज्यमंत्रिपद मिळाले नाही. मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात असलेले आणि तीनवेळा निवडून आलेले भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे आणि पिंपरीचे राष्ट्रवादी (अजित पवार) अण्णा बनसोडे मंत्रिपदासाठी तीव्र इच्छुक होते. परंतु, मंत्रिपदाऐवजी आमदार बनसोडे यांना मंत्रिपदाचा दर्जा असलेले विधानसभेचे उपाध्यक्षपद मिळाले आहे.

एकेकाळी पिंपरी-चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला होता. पण भाजपने 2017 म्ध्ये त्यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. सध्या भाजपचे विधानसभेचे दोन आणि विधानपरिषदेत दोन असे चार आमदार या शहरात आहेत. राष्ट्रवादीचा एकमेव आमदार आहे. महायुतीमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या अजित पवार यांनी आमदार बनसोडे यांना उपाध्यक्षपद देऊन या शहराला महत्त्व दिले आहे. उपाध्यक्ष पदावर बसण्याची संधी मिळाल्याने बनसोडे यांना राज्याच्या विधिमंडळात महत्त्वाची भूमिका बजावता येईल. बनसोडे यांना ताकद देऊन महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी अजित पवार हे प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.

‘घुमंतु २५’ प्रदर्शनात फोटोंच्या माध्यमातून भटकंतीचा उत्सव

तब्बल ३५ फोटोग्राफर्सच्या १०४ फोटोंचा समावेश ; प्रदर्शनाला विनामूल्य प्रवेश

पुणे : जयपूरपासून ते तंजावर पर्यंत आणि महाराष्ट्रातील वानखेडे स्टेडियमसह विविध मंदिरे, प्रेक्षणिय स्थळे व ऐतिहासिक इमारतींसह निसर्गाचे प्रवासादरम्यान मोबाईलमध्ये टिपलेले सुंदर क्षण फोटोंच्या माध्यमातून पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली. घुमंतु  २५ – स्वान्तस्सुखाय छायाचित्रणाय च… या प्रदर्शनांतर्गत ३५ निवडक फोटोग्राफर्सच्या १०४ अप्रतिम फोटो कलारसिकांना पहायला मिळत असून भटकंतीचा उत्सव साजरा होत आहे.

बालगंधर्व कलादालन येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी विवेक नारळकर, प्रसिद्ध फोटोग्राफर सतिश पाकणीकर, डॉ. रामदास महाजन यांसह फोटोग्राफर्स देखील यावेळी उपस्थित होते. एम्बी हॅली, वेरुळ, हंपी, जोधपूर, लखनऊ, पुण्यासह श्रीलंका, मॉरिशस, न्यूझिलंड, सिंगापूर येथे काढण्यात आलेले फोटो प्रदर्शनात आहेत.

प्रत्येकाचा प्रवास हा अनुभव समृद्ध करणारा असतो. कधी भव्य डोंगररांगा, कधी निळ्याशार समुद्राचे क्षितिज, तर कधी शहराच्या गजबजाटातले रंग प्रत्येक ठिकाण वेगळे दिसतात आणि त्याच्या अनमोल आठवणी. अशाच आठवणींना उजाळा देणारे आणि जगभरातील फोटोग्राफर्सच्या मोबाईलमध्ये टिपलेले अद्वितीय क्षण अनुभवण्याची संधी पुणेकरांना यानिमित्ताने मिळत आहे. विशेष म्हणजे, हे फोटोग्राफर्स विविध क्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर, इंजिनिअर्स, गृहिणी, आयटी तज्ञ, विद्यार्थी आणि वैमानिक देखील आहेत. वयवर्षे २०  ते ७७  या वयोगटातील आहेत.

घुमंतु मालिकेतील हे तिसरे पुष्प आहे. याआधी सन २०२२ आणि २०२३ मध्येही अशीच प्रदर्शने आयोजित करण्यात आली होती आणि त्यांना पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, नागपूर, बंगळुरू, कोचीन अशा अनेक शहरांमधून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. हे प्रदर्शन दि. २७ मार्च पर्यंत बालगंधर्व कलादालन येथे सुरु असून सकाळी ११ ते ८ यावेळेत रसिकांना विनामूल्य पाहता येणार आहे. तरी पुणेकरांनी प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आयोग निर्माण होईपर्यंत मागे हटणार नाही : बाबा कांबळे

– दिल्ली जंतर मंतर येथे देशभरातील संघटनेचे आंदोलन

राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील संघटनांचा सहभाग

पिंपरी ! प्रतिनिधी

देशभरातील लाखो ऑटो, टॅक्सी, बस ट्रक चालकांच्या मागण्यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी अनेक वर्ष लढा दिला जात आहे. राष्ट्रीय चालक आयोग निर्माण झाले पाहिजे. देशभरातील चालकांसाठी कल्याणकारी बोर्ड निर्माण करून त्या माध्यमातून त्यांना सामाजिक सुरक्षा म्हातारपणी पेन्शन व इतर योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, ओला उबेर या भांडवलदार कंपन्यांवरती बंदी आणली पाहिजे टू व्हीलर टॅक्सीला देशभरामध्ये बंद केली पाहिजे, इलेक्ट्रिक वाहनांचे धोरण ठरवताना पूर्वीचे वाहन वरती कोणतीही बाधा येणार नाही यासाठी सर्व संघटनांना विश्वासात घेण्यात यावे, यासह इतर विविध मागण्यांसाठी नुकतेच दिल्ली येथील जंतर मंतर वरती देशपापी आंदोलन करण्यात आले या आंदोलनातील मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी व्यक्त केला.

दिल्ली जंतर मंतर येथे देश वापी आंदोलन आयोजित करण्यात आले या वेळी मार्गदर्शन करताना बाबा कांबळे बोलत होते.

कष्टकरी, श्रमिक नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली 21 मार्च 2025 रोजी जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यात आले,23 तारखेला राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते यासाठी देशभरातील सर्व 28 राज्यातून प्रतिनिधी उपस्थित होते.
यात मिर मोहम्मद शफी,(कश्मीर) अज्जू प्रसाद मंडोली (ओडिसा) सुरेंद्र प्रसाद (पंजाब) मनोज कुमार साहू , वासू एलडी(आंध्र प्रदेश) के.डी.गिल (राजस्थान) रवी रेड्डी (कर्नाटका) आनंद तांबे, राकेश शिंदे (महाराष्ट्र) शिन्तल कुमार (तामिळनाडू) प्रीतम सिंग (छत्तीसगड) गुलजार सिंग (उत्तराखंड) नरेंद्र ठाकूर (हिमाचल प्रदेश ) निजामुद्दीन भाई, विनोद तिवारी (आसाम) भूपेंद्र यादव (बिहार) धर्मेंद्र यादव (दिल्ली एनसीआर) डॉ राजीव मिश्रा (उत्तर प्रदेश)

बाबा कांबळे म्हणाले केंद्र सरकार देशभरातील 25 करोड चालकांकडे सहानुभूतीने बघत नाही. त्यामुळे वारंवार निवेदने, आंदोलन करूनही मागण्या सोडविण्याबाबत सरकार उदासीन आहे. देशातील 25 कोटी चालकांसाठी राष्ट्रीय चालक आयोग निर्माण झाले पाहिजे. तसेच चालकांसाठी कल्याणकारी योजना स्थापन झाले पाहिजे. त्यामधून चालकांचे कल्याण होणार आहे. म्हातारपणी पेन्शन मिळाल्यास त्यांना आधार होणार आहे. यासह सामाजिक सुरक्षा योजना मिळावे, यासाठी वेलफेअर बोर्ड म्हणजे कल्याणकारी मंडळ स्थापन झाले पाहिजे. केंद्रीय पातळीवर हे कल्याणकारी महामंडळ स्थापन व्हावा. अन्यथा न थकता आंदोलन सुरूच राहील, असे बाबा कांबळे म्हणाले.

“OTT प्लॅटफॉर्म, स्टँडअप कॉमेडी शोजमधील आक्षेपार्ह मजकुराबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा व योग्य ती आचारसंहिता लागू करावी”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई, : ओटीटी प्लॅटफॉर्म आणि स्टँडअप कॉमेडी शोजमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह, अयोग्य आणि संवेदनशील टिप्पण्या करण्यात येतात. त्यामुळे संबंधित व्यक्ती आणि समाजघटकांविषयी अनादराची भावना निर्माण होते. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठोस धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “भारतीय घटनेने प्रत्येक नागरिकाला भाषण स्वातंत्र्य दिले आहे, मात्र त्याचा गैरवापर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी किंवा अन्य व्यक्ती अथवा समाजघटकाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी होऊ नये.”

सध्या रंगभूमीवरील प्रयोगांसाठी रंगभूमी परीक्षण मंडळ आहे, तर चित्रपटांसाठी सेन्सॉर बोर्ड कार्यरत आहे. मात्र, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि स्टँडअप कॉमेडी शोजवर कोणतेही प्रभावी नियमन नाही. त्यामुळे त्यावर प्रदर्शित होणाऱ्या सामग्रीवर कोणतेही बंधन नाही. “या माध्यमांवर होणाऱ्या वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते, त्यामुळे योग्य ती आचारसंहिता तयार करणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

लोकसभेतही शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी यासंदर्भात चिंता व्यक्त केली होती. ओटीटी आणि स्टँडअप कॉमेडी शोजवर नियंत्रण आणण्यासाठी कायदेशीर चौकट ठरवावी, अशी मागणी त्यांनी संसदेत केली होती.

डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, राज्य शासनाने या विषयावर गांभीर्याने विचार करावा आणि योग्य ती आचारसंहिता लवकरात लवकर लागू करावी.

प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी

कोल्हापूर -इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याला काल तेलंगणामधून ताब्यात घेतले आहे.
आज त्याला कोल्हापूर जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाकडून तीन दिवसांची म्हणजे 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी प्रशांत कोरटकर याला 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली होती.परंतु जिल्हा न्यायालयाने प्रशांत कोरटकर याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत वकील असीम सरोदे (Asim Sarode) यांनी माहिती दिली आहे. “आरोपी प्रशांत कोरटकर याला किमान सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी आम्ही न्यायालयासमोर केली. आवाजाचे नमुने शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून घ्यायचे असतात. आवजामधील स्वर आणि व्यंजन महत्त्वाचे असून आवाजात बदल केला जाऊ शकतो, असे सरोदे म्हणाले.“मागील एक महिन्यांपासून आरोपी प्रशांत कोरटकर फरार होता. आता तो पोलिसांवर खापर फोडत आहे आम्ही त्याची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली,” असे देखील असीम सरोदे यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, कोरटकरला केवळ तीन दिवसांची कोठडी मिळाली आहे.

दिशा सालियन प्रकरण:आदित्य ड्रग्जच्या व्यापारात, उद्धव ठाकरेही आरोपी, CM असताना पदाचा गैरवापर; वकील ओझांचा आरोप

मुंबई-दिशा सालियनच्या वडिलांनी आज मुंबईच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांची भेट घेऊन आपल्या मुलीच्या हत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करत या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनाही सहआरोपी केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला, असा आरोप त्यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांचा ड्रगजच्या व्यापारात हात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या आरोपांमुळे राज्याचे राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.

दिशा सालियनचा 8 जून 2020 रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. पण ही आत्महत्या होती की हत्या? यावरून बरेच राजकारण रंगले आहे. पण आता दिशाचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल करून आपल्या मुलीची सामूहिक अत्याचारानंतर हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी मंगळवारी मुंबईच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांशी बोलताना त्यांच्या वकिलांनी या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनाही सहआरोपी करण्यात आल्याचे सांगितले.

सतीश सालियन यांचे वकील नीलेश ओझा म्हणाले की, आम्ही आमची तक्रार मुंबईच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांकडे (गुन्हे) दिली आहे. त्यांनी सीपींशी चर्चा करून आमची तक्रार दाखल करून घेतली आहे. आता आरोपींना केव्हा अटक करणार? याची जबाबदारी पोलिसांवर आहे. आरोपींमध्ये आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सुरज पंचोली, त्यांचे अंगरक्षक, परमबीर सिंह, सचिन वाझे, रिया चक्रवर्ती यांचा समावेश आहे.

परमबीर सिंह यांनी हे प्रकरण दाबण्याच्या प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड आहेत. परमबीर यांनी या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव आल्यानंतर कव्हरअप करण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनास्थळी कोणताही राजकारणी आला नसल्याचा दावा केला. पण मोबाईल टॉवरच्या लोकेशनपासून प्रत्यक्षदर्शींच्या जबाबापर्यंत सर्वच गोष्टी त्यांचा हा दावा खोटा असल्याचे सिद्ध करतात. इतरही अनेक गोष्टी आमच्या तक्रारीत नमूद आहेत. या गोष्टी संपूर्ण देशासाठी धक्कादायक आहेत.

आदित्य ठाकरे यांचा ड्रग्जच्या व्यापारात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याची माहिती आम्ही यात दिली आहे. आदित्य ठाकरे व डिनो मोरिया यांच्या फोनवरील रेकॉर्डिंगचाही यात समावेश आहेत. या सर्वांचा नार्कोटिक्स ब्युरोने ड्रग्ज प्रकरणात आरोपी बनवलेल्या समीर खानशी संबंध आहे. हा एक मोठा विषय आहे. त्यावर सरकारने उत्तर द्यावे. आदित्य ठाकरे यांचा ड्रग्ज प्रकरणात समावेश असताना त्यांना अटक करण्यापासून कुणी रोखले व त्यात किती कोटींची डील झाली होती हे त्यांनी सांगावे, असे नीलेश ओझा म्हणाले. दिशा सालियनचा मित्र स्टिव्ह पिंटो अद्याप बेपत्ता असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

पत्रकारांनी यावेळी नीलेश ओझा यांना या प्रकरणात तुम्ही उद्धव ठाकरे यांना आरोपी केले काय? असा प्रश्न केला. त्यावर त्यांनी हो असे सकारात्मक उत्तर दिले. ते म्हणाले, या प्रकरणात उद्धव ठाकरेही आरोपी आहेत. तेव्हा ते मुख्यमंत्री होते. त्यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेला गुन्हा लपवण्यासाठी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचा गैरवापर केला. सचिन वाझे हे त्यांच्याच गँगचे सदस्य होते. हायकोर्टाने ख्वाजा युनूस हत्या प्रकरणात सचिन वाझे यांना तुरुंगात पाठवले होते. ते 16 वर्षे निलंबित होते. पण उद्धव ठाकरे यांनी आपल्या काळात त्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना पुन्हा सेवेत घेतले. त्यांची थेट क्राईम इन्टेलिजन्स यूनिटमध्ये नियुक्त केली.

त्यानंतर त्यांनी वाझे यांच्या मदतीने याचे खून कर, त्याचा खून लपव, त्याच्याकडून खंडणी उकळ, मनसूख हिरेनला आदी अनेक प्रकारची कामे केली. उद्धव ठाकरे स्वतः सचिन वाझेचा बचाव करण्यासाठी पुढे आले. या प्रकरणात परमबीर सिंहांविरोधात थेट पुरावे आहेत. या सर्व आधारावर या लोकांना आरोपी करण्यात आले आहे, असे ओझा म्हणाले.

आचार्य श्री नित्यानंदसुरीश्वरजी यांना राष्ट्रसंत पदवी प्रदान 

पुणे : पूज्य आचार्य श्री विजय नित्यानंदसुरीश्वरजी म. सा. यांना श्री गोडवाड जैन श्वेतांबर मूर्तीक पूजक संघाच्यावतीने ‘राष्ट्रसंत पदवी’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर प्रथमच पुण्यात आलेले आचार्य श्री नित्यानंदसुरीश्वरजी म. सा. यांचे ढाेल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. जयराज भवन येथे आयोजित विशेष कार्यक्रमात पंजाब केसरी पू. आ. श्री विजय वल्लभसुरीश्वरजी यांचे पट्टधर व नुकतेच भारत सरकार द्वारे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले व महाराष्ट्र सरकारचे विशेष राजकीय अतिथी शांतीदूत पू. गच्छाधीपती आ. श्री विजय नित्यानंदसूरीश्वरजी म. सा. यांना अध्यक्ष फतेचंद रांका, सचिव गणपतराज मेहता व सर्व ट्रस्ट मंडळाच्यावतीने राष्ट्रसंत ही पदवी आणि सन्मानपत्र देवून सन्मानित केले. गुरुपूजनाचे लाभार्थी फतेचंद रांका परिवाराला गुरुदेव श्री यांच्यावर चादर अर्पण करण्याचा मान मिळाला.

विमलचंद संघवी यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. फतेचंद रांका यांनी सांगितले, की आपल्या गुरूंच्या उपकारांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. त्यांना राष्ट्रसंत ही पदवी देऊन सन्मानित करताना आम्हाला अभिमान वाटतो. गुरूंच्या गुणांचे वर्णन करताना मुनिराज श्री मोक्षानंदविजयजी म. सा. म्हणाले, की गुरूंच्या आशीर्वादानेच संसारातील कठीण कामही सहज पूर्ण करता येतात. पू. आ. श्री नित्यानंदसूरीश्वरजी म. सा. यांनी काेणत्याही पदव्यापेक्षा लोकांचे प्रेम हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. समाजाच्या कल्याणासाठीच्या कामांमध्ये गोडवाड जैन श्वेताम्बर संघाचा सहभाग अधिक महत्त्वाचा आहे. 

या प्रसंगी विमलचंद संघवी यांनी ‘गोडवाड ९९’ हा ग्रंथ आचार्य श्री यांना समर्पित केला. या कार्यक्रमाचे संचालन विश्वस्त संपत जैन यांनी केले. आभार व्यक्त करताना संपत जैन यांनी गुरुदेव श्रींची विनम्रता व मधुर अमृतवाणीचा विशेष उल्लेख केला. या कार्यक्रमात विश्वस्त प्रकाश छाजेड, संपत जैन, भद्रेश बाफना, सुरेश कुंकुलोल, अशोक लोढा, ललित लालवाणी, रोहित बाफना, किरण बलदोटा, पारस बोराणा, विजय नहार व समाजाचे मान्यवर उपस्थित हाेते, अशी माहिती संपत जैन यांनी दिली. 

जयकुमार गोरे प्रकरणात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा हात? CM फडणवीसांनी दिली धक्कादायक माहिती

मुंबई- मंत्री जयकुमार गोरे यांना अडकवण्याच्या प्रकरणात शरद पवार यांच्या पक्षाचा मोठा हात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केला आहे. या प्रकरणात सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे आरोपी तुषार खरात याच्या संपर्कात होते. या प्रकरणाचे विरोधात जे व्हिडिओ तयार केले गेले, ते आधी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांना पाठवण्यात आले असल्याचा मोठा आरोप देखील फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून राज्यभरात चांगलाच गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधकांच्या वतीने विधिमंडळात मांडण्यात आलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे फडणवीसांनी आज दिली. या वेळी त्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांना अडकवण्याचा कट कशा पद्धतीने आखला गेला, याची माहिती दिली. तसेच या प्रकरणावरून त्यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तुषार खरात आणि इतरांनी जयकुमार गोरे प्रकरणात विरोधात व्हिडिओ तयार केल्यानंतर, ते व्हिडिओ खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांना पाठवण्यात आले आहेत. आता या प्रकरणाची चौकशी होईल. मात्र, त्यांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. आपण राजकीय शत्रू नाही तर राजकीय विरोधक आहोत. मात्र, अशा प्रकारे कोणाला जीवनातून उठवून टाकायचे, अशा प्रकारचे राजकारण होत असेल तर हे चुकीचे असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी आम्ही तिघे एकमेकांच्या पायात पाय घालणार नाही. तर एकमेकांच्या हातात हात घेऊन काम करणारे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दादा एकदम दरडावून बोलतात, त्यामुळे त्यांच्याविषयी कोणी बोलत नाही. मात्री आम्ही दोघे, शांततेत बोलत असतो. मात्र तुम्ही कितीही काड्या घालण्याचा प्रयत्न केला, तरीही आमच्यात एकी कायम राहणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड ज्यावेळी राज्यातील घटना घडामोडींबद्दल बोलत होते. त्यावेळी ते बांगलादेश विषय बोलता की काय? असा मला प्रश्न पडत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दंगेखोर आणि बलात्कार करणाऱ्यांचा एवढा पुळका का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. अक्षय शिंदे याचा एनकाऊंटर झाला नसता तर चांगले झाले असते. मात्र तो स्वातंत्र्य सेनानी असल्यासारखी छाती बडवली जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. दंगेखोर आणि बलात्कार यांना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे. मात्र त्यांच्या विषयी कोणाच्या मनात संवेदना निर्माण झाली असेल तर ते योग्य नाही. त्या संदर्भात त्यांची मने तपासूनच पहावी लागतील, असे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे. आप इतना भी गरज गरज के ना बरसों, की मैं आंधी तूफान या सैलाब बन जाऊं। खैर मुश्किल मुझ में तो अभी साख बाकी है, आप खुद अपनी फितरत के बारे में सच बोलो, आप में वह पहले वाली बात कहा बाकी है। सीबीआयने अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास केला आहे. त्यामुळे सीबीआयच्या अधिकाऱ्यांचे फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. या प्रकरणात आधी फोन शोधून काढला आणि नंतर फोन मधून डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवण्यात तपास यंत्रणेला यश आले आहे. या प्रकरणातले जे गुन्हेगार आहेत त्यांनी अतिशय निर्घृणपणे संतोष देशमुख यांची हत्या केली आहे. या गुन्हेगारांना जी सर्वोच्च शिक्षा आहे, ती शिक्षा दिली जाईल. यासाठी सर्व प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने केले जातील, असे आश्वासन फडणवीस यांनी सभागृहात दिले आहे.

सिंहगड किल्ला विकास आराखडा बैठक पंधरा दिवसात होणार

विधीमंडळाच्या अधिवेशनात आमदार भीमराव तापकीर यांची लक्षवेधीवर मंत्र्यांचे उत्तर

पुणे : सिंहगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि पर्यटकांच्या सोयी सुविधांसाठी सिंहगड किल्ल्याच्या विकास आराखड बैठक येत्या पंधरा दिवसात घेण्यात येईल अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधीमंडळात दिली.

सिंहगड किल्ल्याची सध्या दूरवस्था आहे, तेथे हजारो पर्यटक दररोज येतात मात्र त्यांच्यासाठी चालण्यासाठी रस्ता सुध्दा नाही. त्यामुळे या किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि पर्यटकांच्या सोयीसाठी विकास आराखडा कधी होणार आहे?

किल्ल्यावर एकत्रित मालकी असलेल्या पुरातत्व विभाग, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम खाते आणि जिल्हाधिकारी यांची एकत्रित बैठक कधी होईल असा प्रश्न खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी लक्षवेधीमध्ये मांडला.

आमदार तापकीर यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार म्हणाले की, तापकीर यांनी मांडलेला प्रश्न अतिशय महत्वाचा आहेच. सिंहगड किल्ल्याच्या विकास आराखड्यासंदर्भात पुरातत्व, वन, सा‌र्वजनिक बांधकाम आणि जिल्हाधिकारी या चार विभागाची एकत्रती मालकी आहे आणि त्यांच्यी त्या चारही विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली होणे गरजेचे आहे. त्याबाबत येत्या पंधरा दिवसांमध्ये ही बैठीक होईल असे नियोजन केले जाईल.


आमदार तापकीर यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री शेलार यांनी सहा कोटींची वर्क ऑर्डर निघाली असल्याची माहिती दिली. या सहा कोटींमधून राजाराम महाराज समाधी परिसर, वाडा संवर्धन, कंत्राटीपध्दतीवर स्वच्छतागृह बांधकाम व देखरेख, कल्याण दरवाजा दुरुस्ती या सर्व कामांचा समावेश आहे.यातील काही कामे सुरु झाली आहे तर काही लवकरच सुरु होतील असेही मंत्री शेलार यांनी सांगितले.

राजसंन्यास’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’वर बंदी घाला:अमोल मिटकरी यांची मागणी; थोरातांची कमळा, प्रणयी युवराजचेही घेतले नाव


मुंबई:’राजसंन्यास’ ही राम गणेश गडकरी यांची कादंबरी, तसेच ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘थोरातांची कमळा’, ‘बेबंदशाही’, ‘प्रणयी युवराज’, ‘स्वप्न भंगले रायगडाचे’ आणि ‘इथे ओशाळला मृत्यू’ यासारख्या नाटक अन् चित्रपटांवर बंदी घाला, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी सभागृहात केली आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, राज्यात आपण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे आपण नेहमी नाव घेतो. एवढी मोठी संत परंपरा, महापुरुष लाभले असताना करही समाजद्रोही लोकांकडून जाणीवपूर्वक महापुरुषांचा अपमान केला जातो. अलीकडेच नागपूरचं उदा. प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करत ज्या प्रकारे धमकी दिली, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला त्याला एका महिन्यानंतर अटक झाली. तर दुसरीकडे राहुल सोलापूरकर नावाच्या व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. त्यावर एफआयआरदेखील झाला नाही. यावर आपण काही कडक कायदा करणार का नाही.

अमोल मिटकरी पुढे बोलताना म्हणाले की, एखाद्याच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या तर आपण तात्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल करतो. नेत्यावर कुणी बोलले तर आक्रमक रित्या पुढाकार घेत कारवाई करा म्हणतो. पण महाराष्ट्राचे वैभव असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा एखादा चिल्लर माणूस अवमान करत असेल आणि त्याला अटक होण्यासाठी महिनाभर लागत असेल तर हे महाराष्ट्राच्या दृष्ठीने चांगले नाही.

थोरातांची कमळामधून दाखवला अत्यंत वाईट प्रसंग

अमोल मिटकरी म्हणाले की, महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्याची एक परंपरा आता सुरू झाली आहे. म्हणजे आक्षेपार्ह वक्तव्य करा आणि पोलिस सुरक्षा घेत सुरक्षित स्थळी जा हे राज्याला न शोभणारे आहे. एका चित्रपटानंतर तरुण पिढीने संभाजी महाराज यांच्याबद्दल माहिती घेण्यास सुरूवात केली. संभाजी महाराजांवर 20 नाटकं आणि 35 ते 40 चित्रपट आहेत जी युट्युबवर उपस्थित आहेत. उदाहरण द्यायचे असेल तर थोरातांची कमळा हा चित्रपट तुम्ही पाहिला तर त्यामध्ये संभाजी महाराज ते थोरात्याच्या कमळेला थेट बोहल्यावरुन उचलून नेतानाचा अत्यंत वाईट प्रसंग दाखवलेला आहे. इतकंच नाही सरकारकडून एक पुस्तक विकले जाते, त्यामध्ये संपूर्ण गडकरी असे एक नाटक आहे. म्हणजे रामगणेश गडकरी यांचे ते पुस्तक आहे त्या नाटकाचे नाव आहे राजसंन्यास आणि त्यामध्ये असे लिहले आहे की, संभाजी महाराज आणि तुळसा यांच्या नात्यामधील ते नाटक आहे, अशी पुस्तकांवर बंदी घालण्यात यावी.