Home Blog Page 390

IPS सुधाकर पठारे यांचा अपघातात मृत्यू

मुंबई : आयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झालं आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून ते नागरकुरलूनकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुधाकर पठारे हे ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची बसला धडक झाली आणि हा अपघात झाला. सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सुधाकर पठारे यांच्या अपघातामुळे महाराष्ट्र पोलिस दलामध्ये शोककळा पसरली आहे.
सुधाकर पठारे सध्या मुंबई पोलिसमध्ये पोर्ट झोनचे डीसीपी म्हणून कार्यरत होते. सुधाकर पठारे हे ट्रेनिंगसाठी हैदराबादमध्ये गेले होते. त्या ठिकाणी त्यांच्या एका नातेवाईकासह ते ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असता हा अपघात झाला. या अपघातात सुधाकर पठारे यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकाचाही मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती तेलंगणा पोलिसांना मुंबई पोलिसांना कळवली आहे.

कोण होते सुधाकर पठारे?
सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ते मूळचे वाळवणे (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील होते. आयपीएस होण्याअगोदर ते शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये अधिकारी म्हणून राहिले आहेत. डॉ. सुधाकर पठारे यांचे शिक्षण एम.एस्सी. अ‍ॅग्री, एलएलबी झाले आहे.
स्पर्धा परीक्षा देत असताना 1995 साली ते जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले. यानंतर 1996 साली विक्रीकर अधिकारी वर्ग 1 म्हणून त्यांची निवड झाली. 1998 साली पोलिस उपअधीक्षक म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर पोलिस खात्यातच ते रमले. आतापर्यंत त्यांनी पोलिस उपअधीक्षक म्हणून पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, राजुरा येथे सेवा बजावली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी सेवा बजावली
अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून चंद्रपूर, वसई तर पोलिस अधीक्षक म्हणून सीआयडी अमरावती येथे सेवा बजावली आहे. पोलिस उपायुक्त म्हणून मुंबई, ठाणे, पुणे, वाशी, नवी मुंबई, ठाणे शहर येथे सेवा बजावली आहे. एसपी डॉ. सुधाकर पठारे यांनी पोलिस खात्यात सेवा बजावताना संघटित गुन्हेगारी (मोक्का), तडीपारी, एमपीडीए अशा प्रतिबंधात्मक कारवाईंचा धडाका केला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच पोलिस दलात अनेक विविध उपक्रम राबवले आहेत.
सुधाकर पठारे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र पोलिस खात्यावर शोककळा पसरली आहे.

पुणे:भारताच्या लष्करी कारकिर्दीला आकार देणाऱ्या अनेक प्रतिष्ठित संस्थांचे माहेरघर

पुणे- लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, PVSM, AVSM, जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ , दक्षिणी कमांड , यांनी नुकतीच सशस्त्र सेना  वैद्यकीय महाविद्यालय (AFMC)ला भेट दिली . त्यावेळी त्यांनी तिथल्या विद्यार्थ्यांच्या संशोधन, नवोन्मेष व वैज्ञानिक कामगिरीचे प्रदर्शन करणाऱ्या अनुसंधान या प्रसिद्धी दालनाचे उदघाटन केले. त्यांनी   लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय(CME) इथे भेट दिली व नवोन्मेष प्रेरित अभियांत्रिकी प्रकल्प व आधुनिक प्रशिक्षण सुविधांचे कौतुक केले. तेथील भू- माहिती विज्ञानातील, सर्वेक्षण सॉफ्टवेअर, ड्रोन प्रशिक्षण यातील  महत्वाच्या सुधारणांचा  त्यांनी आढावा घेतला. नवोन्मेषला प्रोत्साहन देण्याच्या संस्थेच्या धोरणाची त्यांनी प्रशंसा केली.

ते म्हणाले, पुणे दक्षिणी कमांडचे मुख्यालय , भारताच्या लष्करी कारकिर्दीला आकार देणाऱ्या अनेक प्रतिष्ठित संस्थांचे माहेरघर आहे. यात राष्ट्रीय संरक्षण अकादमी ( NDA), लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय(CME), सशस्त्र सेना  वैद्यकीय महाविद्यालय (AFMC), लष्करी गुप्तसूचना प्रशिक्षण केंद्र व डेपो (MINTSD) , लष्करी शारीरिक शिक्षण संस्था (AIPT), व मुंबई अभियांत्रिकी समूह (BEG) इत्यादींचा समावेश आहे. या सर्व संस्था उत्कृष्टतेचे आधारस्तंभ असून नेतृत्वगुणांना, नवोन्मेषाला  व संरक्षण क्षेत्रातील उच्चकोटीच्या संशोधनाला प्रोत्साहन देत असतात. 

परंपरा, बुद्धिचातुर्य आणि देशभक्तीच्या गुणांचा एकमेवाद्वितीय  संगम असलेल्या या  पुणे शहरात या सर्व संस्थांचा यथोचित सन्मान व आदराची भावना आहे. सेवारत व निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा मोठा समुदाय सामावून घेणारे पुणेकर या सर्व संस्थांशी भावनिक व ऐतिहासिक जवळीक बाळगून असतात. या संस्थांनी  देशाच्या संरक्षण व चारित्र्यवर्धनासाठी दिलेले योगदान या शहराला पूर्ण ज्ञात आहे.  पुण्याला बरेचदा ‘लष्करी उत्कृष्टतेचे माहेरघर’ असे संबोधले जाते.      या संस्था केवळ भारतीय सैन्यदलांना व्यावसायिक प्रशिक्षणच देतात असे नाही तर या शहराच्या सामाजिक व सांस्कृतिक महावस्त्राला एक वेगळा साज चढवतात. या शहरात राहणारे अनेक सेवारत व निवृत्त सैन्याधिकारी या संस्थांचे माजी विद्यार्थी असतात आणि तेच या शहरातील तरुण पिढीला स्फूर्ती देतात तसेच पुण्याच्या समाजजीवनात देशभक्तीची मूल्ये बिंबवण्याचे  कार्यही करतात. 

देशहिताचे रक्षण करण्यास  प्राथमिकता देणारी  दक्षिणी कमांड,  धोरणात्मक दूरदृष्टी दर्शवत सतत होणाऱ्या बदलांशी जुळवून घेत युद्धतत्परतेसाठी वचनबद्धता दाखवते.  दक्षिणी कमांड पुण्यातील नागरी जीवनाशी सहकार्य करत आधुनिकतेची  कास धरणारी ,  क्षमतावर्धनासाठी सज्ज व तत्पर असून भविष्यवेधी तसेच कर्तव्यकठोर आहे.

सारसबाग ते शनिवारवाडा भुयारी मार्गांच्या कामाला गती मिळणार -आमदार हेमंत रासने

पुणे (ता २९): सारसबाग ते शनिवारवाडा भुयारी मार्गांच्या कामाला गती मिळणार असा विश्वास आमदार हेमंत रासने यांनी व्यक्त केला आहे. राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात कसबा विधानसभा मतदारसंघातील विकास प्रकल्प, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या समस्या या संदर्भात आपण प्रभावीपणे आवाज उठवत लक्षवेधी सूचना आणि प्रश्न मांडले. विशेषतः कसबा मतदारसंघासह पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेला चालना देणाऱ्या दोन महत्त्वाकांक्षी भुयारी मार्गांच्या प्रस्तावाला गती देण्यासाठी त्यांनी लक्षवेधी सूचना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर भुयारी मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याची सूचना प्रशासनाला देण्यात आली आहे.छत्रपती शिवाजी रस्त्यावर शनिवारवाडा ते स्वारगेट आणि बाजीराव रस्त्यावर सारसबाग ते शनिवारवाडा असे दोन भुयारी मार्ग प्रस्तावित आहेत. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर भुयारी मार्गांच्या कामाला गती मिळणार असल्याची माहिती आमदार हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर लक्षवेधी सूचना
ऐतिहासिक वास्तू असणाऱ्या शनिवारवाडा परिसरात पुरातत्त्व विभागाच्या नियमावलीमुळे निर्माण झालेला जुन्यावाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे पाठपुरावा करणे. खडकमाळ आळी येथील संतगतीने सुरू असणारे नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण करणे. राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी ‘आपला दवाखाना’ योजना कसबा मतदारसंघासह पुणे शहरामध्ये राबवणे. खडक येथील ब्रिटिशकालीन पोलीस वसाहतीचे पुनर्निर्माण. महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीची दुरावस्था झाल्याने त्यांना अडचणींचा सामना करत राहावे लागत आहे, त्यामुळे वसाहतींची डागडुजी करण्यासोबतच नवीन इमारतींच्या बांधकामासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्याची लक्षवेधी सूचना आपण केल्याचे आमदार रासने यांनी सांगितले.

पुणे शहर आणि विशेषत गावठाण भाग असणाऱ्या कसबा मतदारसंघातील जुन्यावाड्यांचा पुनर्विकास तांत्रिक अडथळ्यांमुळे रखडला आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना जीव मुठीत घेऊन रहावे लागत असल्याने ठाणे व मुंबईच्या धरतीवर पुणे शहरासाठी स्वतंत्र सुधारित धोरण तातडीने राबवण्याची गरज आहे. स्वतंत्र गृहनिर्माण धोरण राबवण्यासाठी तज्ञ समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील याबद्दलचे सविस्तर निवेदन देण्यात आले असून मुख्यमंत्री कार्यालयाकडून गृहनिर्माण खात्याच्या अवर मुख्य सचिवांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती रासने यांनी दिली आहे.

कसबा पेठ १२७८ येथील एसआरए प्रकल्पाच्या जागेवर वक्फ बोर्डाकडून करण्यात आलेल्या दाव्यामुळे रखडलेले बांधकाम तसेच स्थानिकांना गेली ५० महिन्यांपासून भाडे दिले जात नसल्याची लक्षवेधी सूचना सभागृहात चर्चेला आली, यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी शासनातर्फे पूर्ण दखल घेऊन स्थानिक रहिवाशांवर कोणताही अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले आहे.

पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन
बेकायदेशीरपणे पुणेकरांना वेठीस धरत मेट्रो स्टेशनवर करण्यात आलेले आंदोलन, तसेच हिंजवडी येथे मिनी बसला आग लागून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विधानसभेत मांडत शासनाकडून तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली.

सभागृहातील चर्चेत सहभाग
ससून रुग्णालयामध्ये यंत्रणेच्या कमतरतेमुळे ओपीडी केस पेपर काढण्यासाठी होणाऱ्या विलंबामुळे अनेक रुग्णांना उपचाराविना परत जावं लागते. तसेच, काही महागडी औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांना ती बाहेरून विकत घ्यावी लागतात हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. तसेच पुणे शहरातील रस्त्यांवर होणाऱ्या अतिक्रमणांचा मुद्दा मांडतानाच कसबा मतदारसंघातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून महापालिकेला आदेश देण्याची सूचना आपण मांडली असे रासने म्हणाले .

अर्थमंत्री मा.अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर घेण्यात आलेल्या चर्चेत सहभाग नोंदवत मतदारसंघातील विकास कामांना निधी देण्याची मागणी केली, तसेच राज्याच्या उत्पन्नामध्ये कशा पद्धतीने वाढ करता येऊ शकते? याबद्दलची भूमिका सभागृहात मांडली.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस करण्याचा ऐतिहासिक ठराव महाराष्ट्र विधानसभेत एकमुखाने संमत झाला, याचा मला अत्यंत आनंद आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील भिडेवाडा येथे फुले दांपत्याने देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि त्यांचे वास्तव्य असलेला समाजसुधारणेचे प्रतीक असणारा फुले वाडा येथेच असल्याने या भूमीचा लोकप्रतिनिधी म्हणून, या शिफारशीचे मनःपूर्वक स्वागत करतो, असं हेमंत रासने यावेळी म्हणाले.

सभागृहातील कामगिरी
सभागृहातील उपस्थिती: 100%
लक्षवेधी सूचना: 8
पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन: 2
चर्चेतील सहभाग: 4

आकाशवाणीच्या आराधना वाहिनीवर नवरात्रीसाठी विशेष कार्यक्रमांचे होणार प्रसारण

नवी दिल्‍ली-

नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त, आकाशवाणीच्या आराधना युट्युब चॅनेलवर 30 मार्च ते 6 एप्रिल 2025 या कालावधीत विशेष कार्यक्रम प्रसारित केले जाणार आहेत. या कार्यक्रमांद्वारे श्रोत्यांना संपूर्ण उत्सवकाळात एक भक्तिमय आणि आध्यात्मिक अनुभव मिळणार आहे.

नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन, चॅनेलवर दररोज सकाळी 8:00 ते रात्री 8:00 या वेळेत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शक्ती आराधना हा संगीतमय भक्तिपूर्ण कार्यक्रम दररोज सकाळी 8:30 ते 8:40 या वेळेत प्रसारित केला जाईल, ज्यात दिव्य स्तोत्रे आणि भक्तिगीते सादर केली जातील.

या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे नवरात्री भजन, ज्यामध्ये प्रसिद्ध भजनगायक अनुप जलोटा, नरिंदर चंचल, जगजीत सिंग, हरी ओम शरण, महेंद्र कपूर आणि अनुराधा पौडवाल यांच्या सुमधुर आवाजातील भक्तिगीते ऐकता येतील. हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 6:00 ते 7:00 या वेळेत प्रसारित केला जाणार आहे.

श्रोत्यांच्या भक्तिभावाला अधिक समृद्ध करण्यासाठी, ‘देवी माँ के अनेक स्वरूप’ ही विशेष कथा मालिका सादर केली जाणार आहे, जी नवरात्रीच्या विविध प्रेरणादायी कथा उलगडणार आहे. हा कार्यक्रम दररोज सकाळी 9:00 ते 9:30 या वेळेत प्रसारित केला जाईल. तसेच, भारतभरातील शक्तीपीठांची वैशिष्ट्ये सादर केली जातील.  ज्यामुळे देवी दुर्गेला समर्पित या पवित्र स्थळांची ऐतिहासिक आणि आध्यात्मिक माहिती श्रोत्यांना मिळेल.

नवरात्री उत्सवाचा समारोप  भव्य राम जन्मोत्सव कार्यक्रमाने होईल, जो थेट श्रीराम जन्मभूमी मंदिर, अयोध्या येथून प्रसारित केला जाईल. हे विशेष प्रसारण 6 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11:45 ते 12:15 या वेळेत होईल, ज्यामुळे संपूर्ण देशभरातील श्रोते या पवित्र सोहळ्याचा लाभ घेऊ शकतील.

श्रोते आकाशवाणीच्या आराधना युट्युब चॅनेलला ट्यून इन करून नवरात्रीच्या भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेऊ शकतात आणि श्रद्धेने हा पवित्र सण साजरा करू शकतात.

यशदाच्या ‘जमीन व्यवस्थापन उत्कृष्टता केंद्रा’चा तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

पुणे, २९: यशदाच्या ‘जमीन व्यवस्थापन उत्कृष्टता केंद्रा’मार्फत दि. २६ ते २८ मार्च या कालावधीमध्ये प्रथमतःच आयोजित केलेल्या जमीन व्यवस्थापनाशी संबंधित विशेष प्रशिक्षण वर्गास भरघोस प्रतिसाद दिसून आला.

महाराष्ट्र शासनाच्या ‘यशदा’ या सर्वोच्च प्रशिक्षण संस्थेमध्ये ‘जमीन व्यवस्थापन उत्कृष्टता केंद्र’ गत वर्षी स्थापन करण्यात आले आहे.

सदर प्रशिक्षण वर्ग शासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह खाजगी व्यक्तींना देखील खुला ठेवण्यात आला होता. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जमिनींचे अभिलेख, जमीन मोजणी, रिमोट सेंसिंग तंत्रज्ञान, जमिनीचे अभिलेख डिजिटल स्वरूपात जतन करण्याचे प्रकल्प, नोंदणी प्रक्रिया व स्टॅम्प ड्युटीबाबत तरतुदी, जमिनीशी संबंधित विविध समस्या तसेच वाद सोडविण्याचे विविध संस्थात्मक मार्ग यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

प्रथमतःच आयोजित केलेल्या या प्रशिक्षण वर्गास खाजगी क्षेत्रातील कंपन्यांचे विशेषतः रियल इस्टेट कंपन्यांचे प्रतिनिधी, भारत सरकारच्या माझगाव डॉक शिपयार्ड लिमिटेड, भारत कोकिंग कोल लिमिटेड, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, शासनाच्या सार्वजनिक उपक्रमांचे प्रतिनिधी, शासनाचे अधिकारी व कर्मचारी, विधी व्यावसायिक, व्हॅल्यूयर्स व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना यशदाचे महासंचालक निरंजन सुधान्शु यांनी राष्ट्रीय व राज्य पातळीवरील जमिनींशी संबंधित डिजिटायजेशच्या सर्व उपक्रमांची माहिती दिली. कृत्रिम बुद्धिमत्ता व विविध डेटाबेसचे इंटिग्रेशन हे जमीन व्यवस्थापनाचे भविष्य असल्याचे सांगितले.

प्रशिक्षण कार्यक्रमाचे सत्र संचालक शेखर गायकवाड यांनी जमिनींचा हजारो वर्षांचा इतिहास, विविध जमिनींच्या वादातील खटले व कारणे, त्याबाबत सामान्य लोकांनी कोणती अचूक माहिती घेतली पाहिजे याबाबत चर्चासत्रात माहिती दिली.

या प्रशिक्षण चर्चासत्रात श्री निरंजन सुधान्शु, श्री चोक्कलिंगम, श्री शेखर गायकवाड,श्रीमती सरिता नरके, श्री शाम खामकर, श्री सुहास मापारी, श्री श्रीकांत कुरुलकर, श्री अविनाश पाटील, श्री महेश सिंघल, श्री प्रल्हाद कचरे, श्री बाळासाहेब काळे यांनी विविध विषयांबाबत माहिती दिली.

‘जमीन व्यवस्थापन उत्कृष्टता केंद्र’ हे केंद्र शासनाच्या भूमी संसाधने विभागामार्फत स्थापन करण्यात आले असून त्याचा उद्देश पश्चिम भारतातील राज्यांना जमीन विषयक प्रश्नांबाबत मार्गदर्शन करणे हे आहे.

हृदय, यकृत तसेच अवयव प्रत्यारोपणाकरीता अत्याधुनिक उपचाराची आवश्यकता -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

एम्स नागपूरचा पहिला दीक्षांत समारंभ संपन्न

नागपूर 29 मार्च 2025

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था – एम्स नागपूर येथून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी जनुकीय आजार तसेच स्टेम सेल आणि वृद्धत्वा संबंधातील आजारांवर अधिक संशोधन करून आपल्या उपचारात्मक पद्धती त्या दिशेने आखल्या पाहिजेत असे आवाहन राज्यपाल सी .पी . राधाकृष्णन यांनी आज नागपूर येथे केले.

2018 मध्ये नागपूरच्या जीएमसी (शासकीय वैदकीय महाविद्यालय) येथून सुरू झालेल्या एम्स नागपूरच्या वर्धा रोडवरील मिहान येथील कॅम्पसमध्ये आयोजित या संस्थेच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना ते बोलत होते . याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ,एम्स नागपूरचे अध्यक्ष डॉ . अनंत पंढरे , कार्यकारी संचालक डॉ . प्रशांत जोशी उपस्थित होते.

पूर्वी फक्त दिल्लीमध्येच एम्स होते परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून एम्स आता तामिळनाडू , झारखंड यासारख्या राज्यासह नागपूर आणि अनेक शहरात स्थापन झाले असून दिल्लीच्या एम्स मध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना तसेच सहाय्यकांना निवासाची सोय मिळावी म्हणून शेल्टर हॉल सुद्धा निर्माण करण्यात आले आहे अशी माहिती राज्यपालांनी यावेळी दिली .एम्स नागपूरच्या स्थापनेपासून सर्वात आधी पदवी घेऊन बाहेर पडलेली तुकडी म्हणून तुमच्या तुकडीच वर्णन हे एक इतिहास निर्माण करणारी तुकडी म्हणून या संस्थेच्या इतिहासात नोंद केली जाईल असं सांगून राज्यपालांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण कधीच थांबवू नये त्यांनी या क्षेत्रातील नियतकालिकांचा अभ्यास करून यातील नव नवे संशोधन समजवून आपले ज्ञान अद्यावत करावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एम्समध्ये हृदय ,यकृत तसेच अवयव प्रत्यारोपणाबाबत आणि पूर्व विदर्भात प्रामुख्याने असणाऱ्या थॅलसेमिया आणि सिकलसेल ऍनिमिया यावर अत्याधुनिक उपचार एम्स नागपूमध्ये उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले .बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन सारख्या शस्त्रक्रियांना देखील महाराष्ट्र शासनाच्या योजनेतून एम्समध्ये सवलत मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच वैद्यकीय क्षेत्रामध्ये खाजगी सार्वजनिक भागीदारीने गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येऊ शकते असे देखील त्यांनी नमूद केले.

एम्स नागपूरच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले . त्यांनी सांगितले की 2018 मध्ये एम्स नागपूरला मिहान येथे 200 एकर जमीन महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिली होती .गेल्या 6 वर्षात एम्स नागपूरने भारताच्या आरोग्य क्षेत्रामध्ये एक महत्वाची भूमिका बजावली आहे .

एम्स नागपूरच्या दीक्षांत समारंभाची सुरुवात शैक्षणिक संचालनाने झाली . यानंतर एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी संस्थेचा अहवाल मांडला. गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये संस्थेने बराच मोठा पल्ला गाठला असून आतापर्यंत एम्स नागपूरने केवळ मध्य भारतातूनच नव्हे तर देशाच्या विविध भागातून आलेल्या 21 लाख रुग्णांना बाह्य रुग्ण विभागाद्वारे उपचार उपलब्ध करून दिले आहेत एम्स मध्ये 81 अतिदक्षता कक्ष असून आतापर्यंत 23 हजार मोठ्या शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. एम्सच्या शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. मृणाल फाटक यांनी दीक्षांत समारंभाचे संचालन केले . दीक्षांत समारंभात 2018 च्या तुकडीच्या विद्यार्थीनी डॉ . जिज्ञासा जिंदाल यांना अंतिम व्यावसायिक परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तसेच कम्युनिटी मेडिसिन आणि बालरोग शास्त्र विषयात सर्वात जास्त गुण मिळवल्याबद्दल डॉ. संजय पैठणकर सुवर्णपदक देण्यात आले. डॉ. अभिजित यांना द्वितीय तर डॉ . हिमांशू गजभिये यांना तृतीय क्रमांक प्राप्त केल्याप्रसंगी तसेच वेगवेगळ्या विषयात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सुवर्णपदक आणि रोख पारितोषिक दिले गेले . यासोबतच 121 एमबीबीएस पदवीधारकांना आणि 24 पदव्युत्तर पदवीधारकांना डॉ . अनंत पंढरे यांनी पदवीदान केले .

या कार्यक्रमाला एम्सचे शिक्षक ,अधिकारी त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते .

पंतप्रधानांनी म्यानमारचे सिनियर जनरल महामहिम मिन ओंग ह्लाइंग यांच्याशी संवाद साधला

नवी दिल्ली-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंप आपत्तीच्या पार्श्वभूमीवर म्यानमारचे सिनियर जनरल महामहिम मिन ओंग ह्लाइंग यांच्याशी आज संवाद साधला. या कसोटीच्या काळात म्यानमारबरोबर भारत एक जवळचा  मित्र व शेजारधर्माच्या भावनेने उभा असून मदतीसाठी वचनबद्ध असल्याचे पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले. या आपत्तीच्या निवारणासाठी भारताने ‘ऑपरेशन ब्रह्म’ सुरु केले असून त्यातून म्यानमारमधील भूकंपाने प्रभावित क्षेत्रांमध्ये त्वरित मदत पोचवण्याचे काम सुरु झाले आहे.

‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे,

“म्यानमारचे सिनियर जनरल महामहिम मिन ओंग ह्लाइंग यांच्याशी मी संवाद साधला. विनाशकारी भूकंपात झालेल्या जीवितहानीबद्दल मी संवेदना व्यक्त केली आहे. या कठीण काळात भारत म्यानमारच्या जनतेसोबत एक जवळचा मित्र आणि शेजारी या नात्याने बंधुभावाने उभा आहे. ‘ऑपरेशन ब्रह्म’  #OperationBrahma अंतर्गत भूकंप प्रभावित क्षेत्रात आपत्ती निवारण सामुग्री, मानवतापूर्ण मदत, तसेच शोध व बचाव पथके तातडीने पाठवली जात आहेत.”

केंद्र लोकसेवा आयोगाने संयुक्त भूवैज्ञानिक (प्राथमिक) परीक्षा- 2025 चे निकाल जाहीर केले

मुंबई-

केंद्र लोकसेवा आयोगाने (UPSC) ने 09 फेब्रुवारी, 2025 रोजी  घेतलेल्या संयुक्त भूवैज्ञानिक (प्राथमिक) परीक्षा- 2025 च्या निकालांच्या आधारे खाली उल्लेख केलेल्या अनुक्रमांकांचे उमेदवार संयुक्त भूवैज्ञानिक (मुख्य) परीक्षा-2025 साठी पात्र ठरले आहेत. हा निकाल केंद्र लोकसेवा आयोगाच्या सन्केतस्थळावर  https://www.upsc.gov.in उपलब्ध आहे.

परीक्षेच्या सर्व टप्प्यांमध्ये या उमेदवारांची उमेदवारी पूर्णत: तात्पुरती असून आयोगाने नमूद केलेल्या अर्हतेच्या सर्व अटी त्यांनी  सर्व काळी पूर्ण करणे गरजेचे आहे. पात्र घोषित केलेल्या सर्व उमेदवारांनी संयुक्त भूवैज्ञानिक (मुख्य) परीक्षा 2025 च्या टप्पा -II साठी 21 व 22 जून 2025 रोजी हजर असणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी कृपया खनिकर्म मंत्रालयाने भारतीय राजपत्राच्या एक्स्ट्राऑर्डिनरी भाग 1, प्रभाग 1 मध्ये 4 सप्टेंबर 2024 रोजी दिलेले संयुक्त भूवैज्ञानिक परीक्षा 2025 बद्दलचे सर्व नियम व दिनांक 04 सप्टेंबर 2024 रोजी आयोगाने जारी केलेली परीक्षा सूचना क्रमांक  01/2025‐GEOL नीट वाचावेत असे सूचित केले जात आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर ते उपलब्ध आहेत. उमेदवारांनी संयुक्त भूवैज्ञानिक (मुख्य) परीक्षा 2025 टप्पा -II साठीची त्यांची ई-प्रवेश पत्रे आयोगाच्या संकेतस्थळावरून संयुक्त भूवैज्ञानिक (मुख्य) परीक्षा 2025 सुरु होण्याच्या 1 आठवडा आधी डाउनलोड करावीत. संयुक्त भूवैज्ञानिक (प्राथमिक) परीक्षा- 2025 साठीचे गुण व कट ऑफ गुण आयोगाच्या संकेतस्थळावर  https://www.upsc.gov.in  परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया संपल्यावर अर्थात संयुक्त भूवैज्ञानिक परीक्षा 2025 चे अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर अपलोड केले जातील. संयुक्त भूवैज्ञानिक (मुख्य) परीक्षा 2025 साठी परीक्षा केंद्र किंवा विषय बदलून देण्याच्या विनंत्या कोणत्याही परिस्थितीत मान्य  केल्या जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. 

3. केंद्र लोकसेवा आयोगाने त्याच्या परिसरात एक सुविधा केंद्र उघडले आहे. उमेदवारांना त्यांच्या परीक्षा अथवा निकालांबद्दल कोणतीही माहिती / स्पष्टीकरण सर्व कामकाजाच्या दिवसात सकाळी 10.00  ते  संध्याकाळी 5.00 या दरम्यान स्वतः भेट देऊन अथवा 23388088, (011)‐23385271/23381125/23098543 या दूरध्वनी क्रमांकांवर मिळवता येईल.  उमेदवारांना त्यांच्या प्रश्नांसाठी  usgeol-upsc[at]nic[dot]in या ईमेल पत्त्यावर मेल करता येईल.

करुणा शर्माशी अधिकृत लग्न केले नाही:धनंजय मुंडे यांचा कोर्टात युक्तिवाद; मग करुणाच्या मुलांचे आई – वडील कोण? कोर्टाचा सवाल

मुंबई-वांद्रे सत्र न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिलेत. मुंडे यांनी या आदेशांना माझगाव सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणी शनिवारी झालेल्या सुनावणीत धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्या वकिलांत जोरदार युक्तिवाद झाला. त्यात मुंडे यांच्या वकिलांनी आपल्या अशिलाचे करुणा शर्मा यांच्याशी अधिकृत लग्न झाले नसल्याचा दावा केला. त्यावर कोर्टाने त्यांना धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी अधिकृत लग्न केले नाही, तर मुंडे व शर्मा यांच्या दोन मुलांचे आई – वडील कोण? असा उलटप्रश्न केला. त्यामुळे हे प्रकरण आता एका वेगळ्या वळणावर पोहोचले आहे.

माझगाव कोर्टाने या प्रकरणी करुणा शर्मा यांच्या वकिलांना धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्या लग्नाचे पुरावे सादर करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार त्यांनी हे पुरावे सादर करण्यासाठी आपल्याला वाढीव वेळ हवी असल्याचे कोर्टाला सांगितले. त्यानुसार, कोर्टाने त्यांना हे पुरावे पुढील तारखेपर्यंत सादर करण्याचे आदेश देत प्रकरणाची सुनावणी 5 एप्रिलपर्यंत स्थगित केली.

आजच्या सुनावणीत धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्या वकिलांनी एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही पक्षांनी वेळोवेळी उलटप्रश्न विचारून स्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः कोर्टानेही दोन्ही पक्षकारांना वेगवेगळे प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसण करण्याचा प्रयत्न केला.

त्यावर मुंडे यांच्या वकिलांनी आपल्या अशिलाने मुलांचा स्वीकार केल्याचे नमूद केले. तसेच त्यांच्या आईशी लग्न केले नसल्याचे पुन्हा एकवार सांगितले. त्यानंतर पुन्हा कोर्टाने मुले तुमची आहेत म्हणता, मग करुणा शर्मा त्यांच्या आई नाहीत असे कसे म्हणता? असा सवाल केला. त्यावर मुंडेंचे वकील म्हणाले, धनंजय मुंडे यांनी दोन्ही मुलांना स्वीकारले आहे. त्यांना आपले नाव दिले आहे. त्यांनी करुणा शर्मा यांच्यासोबत काही काळ घालवला याचा अर्थ त्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी होत नाहीत. त्यांचे संबंध पती-पत्नीसारखे नव्हते. त्यांचे अधिकृत लग्नही झाले नव्हते.

धनंजय मुंडे यांचे एक लग्न झाले आहे. त्यामुळे त्यांनी दुसरे लग्न केले नाही. धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्यात परस्पर संमतीने संबंध प्रस्थापित झाले होते. हे त्यांनी कुठेही लपवून ठेवले नाही. केवळ या दोघांचे लग्न झाले नाही. मुंडे यांच्या वकिलांनी यावेळी करुणा शर्मा या आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याची बाबही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. करुणा शर्मा यांचे वार्षिक उत्पन्न 15 लाखांच्या आसपास आहे. त्या प्राप्तिकरही भरतात. त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यांनी निवडणूकही लढवली. त्यानंतरही त्यांनी पोटगीसाठी अर्ज केला, असे ते म्हणाले.

या युक्तिवादानंतर करुणा शर्मा यांच्या वकिलांनी धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांचे 1998 साली लग्न झाल्याचा दावा केला. मुंडे व करुणा शर्मा यांचे 1998 साली लग्न झाले. या लग्नानंतर त्यांना अपत्यप्राप्ती झाले. त्यांचे एकत्र फोटोही आहेत, असे ते म्हणाले. त्यावर कोर्टाने त्यांना या प्रकरणी तुमच्याकडे कोणते पुरावे आहेत? असा सवाल केला. त्यावर आम्ही हे सगळे पुरावे सादर करू, पण आम्हाला वेळ हवा आहे, असे ते म्हणाले. त्यानंतर कोर्टाने त्यांना पुढील तारखेपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश देत सुनावणी 5 एप्रिलपर्यंत स्थगित केली.

सद््गुरु श्री जंगली महाराज १३५ वा पुण्यतिथी उत्सव  

श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने आयोजन ; व्याख्याने, संगीतसभा, भजने आणि विविध धार्मिक कार्यक्रम
पुणे : श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने ‘सद््गुरु श्री जंगली महाराज १३५ वा पुण्यतिथी उत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. रविवार, दि. ३० मार्च ते शनिवार, दि. १२ एप्रिल २०२५ दरम्यान जंगली महाराज मंदिरात उत्सव होणार आहे. उत्सवात धार्मिक कार्यक्रम, भजने, व्याख्याने आणि संगीत सभा होणार आहेत.

ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिरोळे, सेक्रेटरी शिरीष लोखंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन केले आहे. रविवार, दिनांक ३० मार्च रोजी सकाळी ६ वाजता आढाव बंधू यांचे सनईवादन होणार आहे. त्यानंतर सकाळी ७ वाजता समाधीस अभ्यंगस्नान, पूजा, श्री सद््गुरु जंगली महाराज भजनी मंडळाचे भजन  आणि आरती होणार आहे.

दिनांक ३० मार्च ते ११ एप्रिल दरम्यान दररोज सकाळी ८ ते १० यावेळेत श्री ज्ञानेश्वरी पारायण आणि सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ पर्यंत विविध महिला भजनी मंडळांचे भजनाचे कार्यक्रम होणार आहेत. तसेच दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २ पर्यंत श्री गजानन महाराज परिवार संघ, पुणे तर्फे श्री गजानन विजय ग्रंथ अखंड पारायण आयोजित करण्यात आले आहे.
दररोज सायंकाळी ६ वाजता विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. दिलीप महाजन, डॉ. राजेंद्र राऊत, डॉ. वर्षा तोडमल, काशिनाथ देवधर, उमेश झिरपे, विनिता तेलंग, डॉ. उदय निरगुडकर, डॉ. सुनील साठे, ह.भ.प.किसन चौधरी, सुनील तांबे, योगी निरंजननाथ, डॉ. अजित आपटे, ह.भ.प.डॉ. चेतनानंद उर्फ पंकज महाराज गावडे आदी मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत.

तसेच, दररोज रात्री ८ वाजता संगीत सभा अंतर्गत प्रसिद्ध गायक कलाकारांची भक्तीगीते आणि संगीताचे कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये पं. कल्याण अपार, अवंतिका-निकिता बहिरट, विदुषी मंजुषा पाटील, पं. शौनक अभिषेकी, उमेश साळुंके, विदुषी कलापिनी कोमकली, पं. रघुनाथ खंडाळकर, शमिका भिडे, शाश्वती चव्हाण, नितीन मोरे, श्रीधर फडके, पद्मश्री पं. विजय घाटे आदी कलाकार सादरीकरण करणार आहेत. शुक्रवार, दि. ११ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता सद््गुरु श्री जंगली महाराजांच्या पादुकांचा पालखी सोहळा होणार आहे. त्यानंतर शनिवार, दि.१२ एप्रिल रोजी दुपारी १ नंतर मंदिरात महाप्रसाद देण्यात येईल. उत्सवात भाविकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

देशभरातील 5 लाखांहून अधिक खादी ग्रामोद्योग कारागीर आणि उद्योजकांना सक्षम करण्यासाठी ‘केव्हीआयसी’ चा मेगा वितरण कार्यक्रम

मुंबई,

भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाच्या अंतर्गत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्यावतीने (केव्हीआयसी) 28  मार्च,  2025 रोजी मुंबईतील मुख्यालयातून आतापर्यंतचा सर्वात मोठा ‘मेगा वितरण’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या  कार्यक्रमाचे आयोजन  आभासी पद्धतीने करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे  स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि भारतातील कारागीर, उद्योजक आणि लाभार्थ्यांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल होते.

या कार्यक्रमात बोलताना केव्हीआयसीचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी माहिती दिली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’  संकल्पाला बळकटी देण्यासाठी आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने,  ग्रामोद्योग विकास योजनेअंतर्गत ‘साहित्यसंच वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले. खादी आयोगाच्या  इतिहासातील हाँ सर्वात व्यापक आणि मोठ्या प्रमाणात साहित्यसंच वितरण कार्यक्रम झाला. केव्हीआयसीचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘मेक फॉर वर्ल्ड’ या मंत्रांचे महत्त्व भाषणामध्‍ये अधोरेखित केले आणि पुन्हा सांगितले की, ही मार्गदर्शक तत्त्वे जागतिक बाजारपेठेत खादी उत्पादनांची मागणी वाढविण्‍यासाठी मदत करतील.

या कार्यक्रमात पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) अंतर्गत 14,456  नवीन युनिट्सना 469  कोटी रुपयांच्या ‘मार्जिन मनी सबसिडी’ चे वितरण करण्यात आले. यामुळे देशभरात 159,016 नवीन नोकऱ्या निर्माण होतील, अशी  अपेक्षा आहे. खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रात रोजगाराला लक्षणीय चालना मिळत आहे, ज्यामुळे तरुण आणि कारागिरांसाठी हजारो नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास हातभार लागत आहे. याव्यतिरिक्त, केव्हीआयसीने देशभरात 5000 नवीन ‘पीएमईजीपी युनिट्स’  आणि 44 नूतनीकरण केलेल्या खादी भवनांचे तसेच 750 नवीन खादी कार्यशाळांचे उद्घाटन केले, ज्यामुळे हजारो कारागिरांना थेट फायदा झाला.

या व्यापक उपक्रमाचा पाच लाखांहून अधिक खादी कारागीर आणि उद्योजकांना थेट लाभ झाला, ज्यामध्ये ग्रामोद्योग विकास योजना आणि खादी विकास योजनेंतर्गत देशभरात 16,377 उपकरणे, मशीन आणि टूलकिटचे वाटप करण्यात आले. आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये, केव्हीआयसीने सुधारित बाजार विकास सहाय्य (एमएमडीए) योजनेअंतर्गत 215 कोटी रुपये जारी करून खादी संस्थांना सहाय्य सुरू ठेवले, ज्याचा लाभ 1,110 खादी संस्था आणि 1,46,246 कारागिरांना मिळाला. याशिवाय, आयएसईसी कार्यक्रमाद्वारे 1,153 खादी संस्थांना 40 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे खादी क्षेत्राला व्यापक पाठबळ मिळाले. यावेळी एमएमडीए अंतर्गत, 3817 खादी कारागिरांना व्यवसाय बळकट करण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी अतिरिक्त 32.73 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले.

खादी कारागिरांच्या वेतनात 1 एप्रिल 2025 पासून 20 टक्के वाढ करण्यात येणार असल्याच्या महत्त्वाच्या घोषणेची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली. खादी कारागिरांची उपजीविका सुधारण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या व्यापक उपक्रमाचा हा एक भाग असून, गेल्या 11 वर्षांच्या काळात त्यांच्या वेतनात 275% वाढ झाली आहे. या कार्यक्रमात भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्यात असलेल्या खादी कारागीरांच्या महत्वाच्या भूमिकेवर भर देत, त्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार वचनबद्ध असल्याचे अधोरेखित करण्यात आले.  

या कार्यक्रमाला नागेंद्र रघुवंशी (उत्तर विभाग सदस्य, केव्हीआयसी), मनोज कुमार सिंह (पूर्व विभाग सदस्य, केव्हीआयसी), विपुल गोयल (संयुक्त सचिव, एमएसएमई), सिमी चौधरी (आर्थिक सल्लागार, एमएसएमई), आणि केव्हीआयसीचे वरिष्ठ अधिकारी, यांच्यासह इतर मान्यवर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. खादी आणि ग्रामोद्योगाच्या समर्थनासाठी आयोजित करण्यात आलेला हा मेळावा, सर्वात मोठ्या ऑनलाइन मेळाव्यांपैकी एक होता.

156 लढाऊ ‘प्रचंड’ हेलिकॉप्टर (एलसीएच) पुरवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एचएएलबरोबर 62,700 कोटी रुपयांचे केले दोन करार

नवी दिल्‍ली-

संरक्षण मंत्रालयाने आज (28;03;2025) 156 हलक्या वजनाचे लढाऊ ‘प्रचंड’ हेलिकॉप्टर (एलसीएच) पुरवण्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) सोबत दोन करार केले. यावेळी कर वगळता 62,700 कोटी रुपयांचा व्यवहार करण्‍याचा करार केला. तसेच  प्रशिक्षण आणि इतर संबंधित उपकरणे या करारानुसार देण्‍यात येणार आहेत. पहिला करार भारतीय हवाई दलाला (आयएएफ) 66 एलसीएच पुरवण्यासाठी आहे आणि दुसरा करार भारतीय लष्कराला 90 एलसीएच पुरवण्यासाठी करण्‍यात आला आहे.

या हेलिकॉप्टरचा पुरवठा तिसऱ्या वर्षापासून सुरू होईल आणि पुढील पाच वर्षांत मागणी पूर्ण केली जाईल. या करारांमुळे जास्त  उंचीवर सशस्त्र दलांची लढाऊ क्षमता वाढेल. एलसीएच हे भारतातील पहिले स्वदेशी डिझाइन केलेले आणि विकसित केलेले लढाऊ हेलिकॉप्टर आहे. या हेलिकॉप्टरमध्‍ये   5000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर काम करण्याची क्षमता आहे. 

संरक्षण मंत्रालयाने आयएएफ आणि भारतीय नौदलाच्या वैमानिकांना हवेतून हवेत इंधन भरण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी एका फ्लाइट रिफ्युएलिंग एअरक्राफ्ट (एफआरए) च्या ‘वेट लीजिंगसाठी मेट्रिया मॅनेजमेंट’ बरोबर  करार केला आहे. मेट्रिया सहा महिन्यांत एफआरए (केसी135 एअरक्राफ्ट) प्रदान करणार आहे. अशा प्रकारे  आयएएफने वेट   भाडेतत्वावर घेतलेले हे पहिले एफआरए  आहे. 

या तीन करारांवर स्वाक्षरी केल्यानंतर  2024-25 दरम्यान संरक्षण मंत्रालयाने स्वाक्षरी केलेल्या एकूण करारांची संख्या 193  झाली आहे. त्यांचे एकूण करार मूल्य 2,09,050  कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आतापर्यंतचे हे मूल्य सर्वाधिक आहे. इतकेच नाही तर, मागील सर्वोच्च आकड्याच्या जवळजवळ दुप्पट आहे. यापैकी, देशांतर्गत उद्योगांबरोबर  केलेले करार 177 (92%) आहेत ज्यांचे करार मूल्य 1,68,922 कोटी रुपये (81%) आहे.

कुणाल हा अतिरेकी,देशद्राही आहे का? शिंदे गट त्याचा खून करणार का? महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न राबवता ? संजय राऊतांचे सवाल

मुंबई-महाराष्ट्रात एकप्रकारे गुजरात किंवा उत्तर प्रदेश पॅटर्न राबवला जात आहे. महाराष्ट्र थोडासा वेगळा आहे असे आम्हाला वाटले होते पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे त्याच मार्गाने नेत आहेत. अजित पवार यांचा मार्ग मला वेगळा दिसत आहे, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, अजित पवारांना हे सर्व माहिती असल्याने त्यांची भूमिका आणि भाषा वेगळी आहे. पण ते कैचीमध्ये अडकलेले दिसून येत आहे. कुणाल कामरा आणि माझे कालच बोलणं झाले. मी त्याला सांगितले की आपण कायद्याला सामोरे गेले पाहिजे. कुणाल कामरा हा अतिरेकी, देशद्राही कोण आहे तो? ता काय अल कायदाचा मेंबर आहे का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.संजय राऊत म्हणाले की, प्रताप सरनाईक यांनी लक्षात घेतले पाहिजे की तुम्ही फार किरकोळ लोकं आहात. बाळासाहेब ठाकरे नाही, त्यांच्यासोबत स्वत:ची तुलना करू नका. तुम्ही चिल्लर लोकं आहात, हे लक्षात ठेवा. कुणालने कुठे यावे कुठे नाही हे ठरवणारे तुम्ही कोण आहात. तुम्ही त्याचा मर्डर करणार आहात का? तसे जाहीर करा की तुम्ही त्यांचा खून करणार आहात. ह्या सर्व गल्लीतील टोळ्या आहेत. दाऊदने जसे शुटर नेमले होते तसे यांनी राजकारणात नेमले आहे. त्यांच्याकडे असलेले गुंड हे भाडोत्री गुंड आहेत, सत्ता गेली तर ते सोबत राहणार नाही.

संजय राऊत म्हणाले की, कुणाल कामरा हे देशातील एक कलाकार, कवी, लेखक आहेत. शिंदेंचे कुणाबरोबर फोटो आहे ते आम्ही बाहेर काढू का? कुणाल हा फुटीरतावादी आहे का? त्याने मला विचारल्यावर मी सांगितले आपण कायद्याला समोर गेले पाहिजे. हा देश संविधानावर चालतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईत हे असे हल्ले आपल्याला सहन करावे लागतात. आम्हीही सुद्धा सहन केले आहे. कुणी जर कायदेशीर कारवाई केली असेल तर त्याला सामोरे गेले पाहिजे.

संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या गटातील लोकांना कुणाल कामरा जर क्षत्रू वाटत असेल तर आम्ही त्याच्याशी बोलायचे नाही का? आम्हालाही वाटते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्राचे क्षत्रू आहेत, पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोकं त्यांच्या पायाशी जाऊन बसतात. आम्ही आमच्या भूमिका मांडत राहू.

संजय राऊत म्हणाले की, कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्यावर आणलेला हक्कभंग मान्य करण्यात असेल तात्यावर आमचे काही म्हणणे नाही. आमदारांचा हक्कभंग आणायचा अधिकार असून आमचे लोकं त्यांना उत्तर देतील. महाराष्ट्रात परिवहन खात्याचे अनेक प्रश्न आहेत, प्रताप सरनाईक यांनी त्याचा अभ्यास करावा, त्यावर त्यांनी बोलले पाहिजे. तुमच्यावर टीका केली म्हणून कुणी राष्ट्राचे शत्रू होत नाही. तुम्हाला उत्तर देण्याचा अधिकार आहे ते तुम्ही देऊ शकतात, पण त्यांची एक पद्धत असते.

२०२५ चे पहिले सूर्यग्रहण आज …

नासाच्या मते, जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जातो तेव्हा सूर्यग्रहण होते, ज्यामुळे पृथ्वीवर एक सावली पडते जी काही भागात सूर्याचा प्रकाश पूर्णपणे किंवा अंशतः रोखते.

२०२५ चे पहिले सूर्यग्रहण आता काही तासांवर येऊन ठेपले आहे, ते शनिवारी होणार आहे. जगभरातील लोक या वर्षीच्या पहिल्या सूर्यग्रहणाची उत्सुकतेने तयारी करत असताना, या घटनेबद्दल उत्सुकता आधीच वाढत आहे. २०२५ चे पहिले सूर्यग्रहण हे आंशिक सूर्यग्रहण असेल नासाच्या मते, २९ मार्च रोजी होणारे आंशिक सूर्यग्रहण युरोप, वायव्य आफ्रिका, ग्रीनलँड, आइसलँड, ईशान्य अमेरिकेचे काही भाग आणि पूर्व कॅनडामध्ये दिसेल. दुर्दैवाने, चंद्राची सावली देशावरून जात नसल्याने हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. भारतीय प्रमाण वेळेनुसार (IST), आंशिक सूर्यग्रहण दुपारी २:२१ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ६:१४ वाजता संपेल, ज्याचा शिखर ४:१७ वाजता असेल. जागतिक स्तरावर हे ग्रहण ३ तास ​​५३ मिनिटे चालेल. दरम्यान, अमेरिकेत, हे ग्रहण सकाळी ४:५० वाजता सुरू होईल, सकाळी ६:४७ वाजता त्याची शिखर गाठेल आणि सकाळी ८:४३ वाजता संपेल.

वैदिक ज्योतिषशास्त्रात, सूर्यग्रहणाचा काळ (सूर्यग्रहण) अशुभ मानला जातो आणि लोकांना सामान्यतः या काळात खाणे-पिणे,खरेदी टाळण्याचा सल्ला दिला जातो. ग्रहणाच्या दरम्यान ध्यानधारणा ही एक सकारात्मक क्रिया म्हणून शिफारस केली जाते. २०२५ चे आंशिक सूर्यग्रहण आशिया, आफ्रिका, युरोप, अटलांटिक महासागर, आर्क्टिक महासागर, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये दिसेल.
तथापि, वेळेतील फरक आणि घटनेच्या संरेखनामुळे, आंशिक सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार याचा परिणाम मात्र एकूण ३ दिवस जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

DD India ने आजच्या सूर्य ग्रहणाबाबत दिलेली माहिती …

म्यानमार भूकंप – 10 हजार लोकांच्या मृत्यूची भीती:बँकॉकमध्ये 30 मजली इमारत कोसळली, 704 लोकांच्या मृत्यूची पुष्टी; 110 लोक ढिगाऱ्याखाली

नायपिडॉ-म्यानमारमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या 10 हजारांपेक्षा जास्त असू शकते. हा अंदाज युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने मांडला आहे. भूकंपाचे धक्के थायलंड, बांगलादेश, चीन आणि भारतापर्यंत जाणवले.

म्यानमारच्या लष्करी सरकारने किमान 694 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे, तर 1,670 लोक जखमी झाले आहेत. दुसरीकडे, थायलंडमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे, या आपत्तीत आतापर्यंत 700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.शुक्रवारी सकाळी 11:50 वाजता म्यानमारमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप झाला. म्यानमार आणि थायलंडमध्ये गेल्या 200 वर्षांतील हा सर्वात मोठा भूकंप आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या विध्वंसामुळे म्यानमारच्या 6 राज्यांमध्ये आणि संपूर्ण थायलंडमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे.म्यानमार, थायलंड, बांगलादेश, भारत आणि नैऋत्य चीनसह ५ देशांमध्ये याचा परिणाम दिसून आला. येथील अनेक भागात जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, भारतातील कोलकाता, इंफाळ, मेघालय आणि ईस्ट कार्गो हिलमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. ढाका, चितगावसह बांगलादेशातील अनेक भागांना ७.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. बारा मिनिटांनंतर, म्यानमारमध्ये ६.४ तीव्रतेचा आणखी एक भूकंपाचा धक्का बसला.

शुक्रवारी झालेल्या ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर म्यानमारमध्ये किमान १४ भूकंपाचे धक्के बसले आहेत, असे युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार. बहुतेक भूकंपाची तीव्रता ५ पेक्षा कमी होती. सर्वात शक्तिशाली भूकंपाचा धक्का ६.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता जो मोठ्या भूकंपानंतर सुमारे १० मिनिटांनी बसला.

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भूकंपानंतर बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. यापैकी आतापर्यंत १० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बँकॉकच्या डेप्युटी गव्हर्नरने सांगितले की, बांधकाम सुरू असलेल्या तीन इमारतींमधून १०१ लोक बेपत्ता आहेत.