Home Blog Page 3656

मोनार्क चा अहवाल अन्यायकारक -उपमहापौर आबा बागुल

0

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील डोंगरउतार व डोंगरकडांवरील बीडीपीच्या (बायोडायव्हर्सिटी पार्क) सीडॅक आणि मोनार्क या दोन्ही अहवालांपैकी प्रशासनाकडून मोनार्क संस्थेचा अहवाल राज्य शासनाला पाठविण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत बारगळळा आहे. मोनार्कचा अहवाल हा चुकीचा असल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी काही काळ गोंधळ घातला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर दत्ता धनकवडे होते. मोनार्कचा अहवाल हा अनेकांवर अन्यायकारक असल्याने असा ठराव करून तो राज्य शासनाकडे पाठविणे चुकीचे असल्याचे उपमहापौर आबा बागूल यांनी म्हटले आहे. बीडीपीचे आरक्षण निश्‍चित करण्यात आले असताना आणि त्यावरील हरकती, सूचनांचीही प्रक्रिया पार पडली आहे. याबाबत राज्य शासनाकडे निर्णय अंतिम टप्प्यात असताना चुकीचा अहवाल पाठविणे कधीही खपवून घेणार नसल्याचा इशाराही बागूल यांनी दिला आहे.
शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या विकास आराखड्यामध्ये जैववैविध्य पार्क(बीडीपी)आरक्षण ठरविण्यासाठी सी डॅक संस्थेने केलेला सर्वेक्षण अहवाल अंतिम ठरविण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती नियुक्त करून अहवाल तयार करण्यात आला होता. सी डॅक या संस्थेचा अहवाल हा उपग्रहाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. बीडीपीचे आरक्षण निश्‍चित करण्यासाठी सुरुवातीला सी डॅक व नंतर मोनार्कने सर्वेक्षण केले होते. हे सर्वेक्षण करण्यात चुकीच्या बाबी घडल्या आहेत, असा आरोप यापूर्वी करण्यात आला आहे. जमिनीवरील बीडीपीचे आरक्षण दाखविण्यात आलेले आहे. समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यात बीडीपी आरक्षणासंदर्भात सीडॅक की मोनार्कच्या अहवालापैकी मोनार्कचा अहवाल ग्राह्य धरण्यात यावा, असा प्रस्ताव सभेसमोर आणण्यात आला होता. याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध दाखविल्याने मोनार्कचा प्रस्ताव बारगळला आहे. सीडॅक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातील बीडीपीचे जे क्षेत्र दर्शविण्यात आले आहे., ते मोनार्क संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात कमी किंवा जास्त झालेले नाही, परंतु क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. त्यामुळे मोनार्क संस्थेने दाखविलेल्या आरक्षणाच्या नव्या क्षेत्रात येणारी बांधकामे, त्या ठिकाणी नव्याने बांधकामासाठी देण्यात आलेली परवानगी यांचे सर्वेक्षण चुकीचे आहे, असा आरोप करताना उपमहापौर बागूल म्हणाले, अशाप्रकारे अंतिम टप्प्यात चुकीचा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे. ते पुढे म्हणाले, महापालिकेच्या निर्णय न घेण्याच्या वृत्तीमुळे समाविष्ट गावांचा विकास आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत राज्य सरकारकडे पडला आहे. अशावेळी चुकीचा अहवाल पाठविणे आम्ही खपवून घेणार नाही.

शेवटच्या एका दिवसात ३८ कोटींचा एलबीटी जमा

0

पुणे-
राज्य शासनाने रहदारी फी अधिसूचनेद्वारे बंद केलेली असल्यामुळे रहदारी शुल्कापासून मिळणारे उत्पन्न हे बंद झालेले असतानाही पुणे महानगरपालिकेच्या एलबीटी विभागाने सप्टेंबर महिन्यात १0४ कोटी रुपयांचा एलबीटी जमा केला आहे., तर शेवटच्या एका दिवसात ३८ कोटी रुपये जमा करण्यात आले असल्याची माहिती एलबीटीप्रमुख विलास कानडे यांनी दिली आहे. मागील वर्षी या महिन्यात ९३ कोटी इतके उत्पन्न जमा झाले होते. रहदारी शुल्क बंद होऊनही मागील वर्षापेक्षा ११ कोटींनी यावेळी एलबीटीचा भरणा अधिकझाला आहे.
एलबीटीच्या महसुलाचा टक्का वाढविण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने विविध स्तरावर प्रय▪करण्यात येत आहेत; प्रशासनाच्या या प्रयत्नांना न्यायालयानेही अपेक्षित कौल दिला आहे. याबाबत सोडेस्को एसव्हीएस कंपनीने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत सात कोटी रुपयांची बँक गॅरंटी महापालिका प्रशासनाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे महापालिका प्रशासनाची महसूल वसुलीची बाजू काहीअंशी भक्कम झाली आहे. त्यानुसार एलबीटी बुडविणार्‍या बड्या कंपन्यांनाही प्रशासनाने जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली आहे. महापालिका हद्दीतील विविध मॉल्स, हॉटेल्स, तसेच कंपन्यांना लागणारी कुपन्स मे. सोडेस्को एसव्हीएस प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून पुरविली जातात, परंतु पूर्वी जकात असताना दराची टक्केवारी मान्य नसल्याचे सांगत या कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय होईपर्यंत संबंधित कंपनीने महापालिकेला दहा लाख आणि त्यापटीत बँक गँरटीद्वारे जकातीची रक्कम जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

उच्च न्यायालयाने दिलेला हा आदेश मान्य नसल्याने संबंधित कंपनी व्यवस्थापनाने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते; त्यावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने संबंधित कंपनीची याचिका फेटाळून लावली आहे; त्यानुसार या कंपनीला महापालिका प्रशासनाकडे ७ कोटी रुपयांची बँक गॅरंटी जमा करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाचा हा आदेश मान्य करत सोडेस्को कंपनीने ही बँक गॅरंटी महापालिका प्रशासनाकडे जमा केली आहे, अशी माहिती महापालिकेचे एलबीटीप्रमुख विलास कानडे यांनी दिली आहे. शहर आणि परिसरातील बहुतांश व्यावसायिकांनी अद्याप नोंदणीही केलेली नाही. त्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे, त्यानुसार या व्यावसायिकांची यापुढील काळात कडक तपासणी करण्यात येणार आहे

सिंचन घोटाळ्यासह वीज घोटाळ्याचीही चौकशी व्हावी

0

सिंचन घोटाळ्यासह वीज घोटाळ्याचीही चौकशी व्हावी
पुणे
चितळे समितीने सिंचन घोटाळ्याबाबत दिलेल्या अहवालात मुख्य सूत्रधार सोडून सरकारी कर्मचार्‍यांना धारेवर धरले आहे. त्यामुळे सिंचन घोटाळ्याची नव्याने चौकशी व्हावी, तसेच वीजक्षेत्रातही मोठा घोटाळा झाला असून, तो अद्याप बाहेर आलेला नाही.त्यामुळे नव्या सरकारने सिंचन घोटाळ्यासह वीज घोटाळ्याचीही चौकशी करावी, अशी मागणी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा. एच. एम. देसरडा यांनी पत्रकार परिषदेत केली.
आघाडी सरकारच्या काळात अनेक गैरव्यवहार, भ्रष्टाचार झालेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा का दिला, याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. राज्यात २ कोटी नागरिक दारिद्र्यरेषेच्या खाली आहेत. ४७ टक्के मुले कुपोषित, तर गेल्या १४ वर्षांत ५४ हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यात आजपर्यंत बिल्डर, भूमाफिया यांना साथ देणारे सरकार होते.
त्यांनी महाराष्ट्राची अवस्था एक रिअल इस्टेट कंपनीसारखी केली होती. नवीन सरकारने भूमी वापर नियमन आयोग नेमून राज्याच्या जमिनीचे मोजमाप करून बेकायदा सरकारी जमिनी पुन्हा सरकारच्या ताब्यात घ्याव्यात. बेकायदा बांधकामांवर जास्तीत जास्त महसूल आकारून या महसुलातून राज्यासाठी नवनवीन योजना राबवाव्यात.
पावसाच्या पाण्यासाठी पाणलोटक्षेत्र विकास करणे आवश्यक आहे. धरणांची कामे हा कंत्राटदारांचा धंदा बनला आहे, त्यामुळे राज्यातील कोणत्याही धरणांची कामे करू नयेत, असेही देसरडा यांनी सांगितले

ज्योती कुलकर्णी फाऊंडेशनतर्फे कर्तुत्ववान महिलांचा होणार सन्मान

0

पुणे, दि. २१ (प्रतिनिधी) – ज्योती कुलकर्णी रिसर्च फाऊंडेशनतर्फे कृषी, उद्योग, पर्यावरण या क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करणार्‍या महिलांना येत्या २७ ऑक्टोबरला विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती फाऊंडेशनच्या विश्‍वस्त भाग्यश्री कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सामाजिक कार्यकर्त्या रेणूताई गावस्कर, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते नवी पेठ येथील एस. एम. जोशी सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
भाग्यश्री कुलकर्णी म्हणाल्या की, बैदाबाई तांबे यांना ज्योती कृषीकन्या हा पुरस्कार देण्यात येणार आहे. ५१ हजार रोख व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. उद्योग क्षेत्रात अद्वितीय कार्य करणार्‍या मीना बापट, जयश्री वैद्य, सुप्रिया भोसले, कर्मवीर महिला बचत गट यांना ज्योती उद्योगिनी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असून प्रत्येकी २५ हजार व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.
निसर्गाची कास धरून पर्यावरण क्षेत्रात विशेष कार्य करणार्‍या केतकी घाटे व मानसी करंदीकर यांना ज्योती वसुंधरा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अकरा हजार रूपये (विभागून) असे पुरस्काराचे स्वरूप असेल. स्त्रियांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या ज्योती फुलराणी या स्पर्धेतील विजेत्या महिलांनाही यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आश्‍विनी देशपांडे म्हणाल्या की, डीएसके यांना घडविण्याचे श्रेय स्व. ज्योती कुलकर्णी यांना जाते. आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने स्त्री अबला नाही तर सबला आहे, हे त्यांनी दाखवून दिले होते. डीएसके समूहाच्या पायाभरणीत तसेच यशस्वी वाटचालीत त्यांच्या मोलाचा वाटा आहे. पारंपारिक व आधुनिकतेची योग्य सांगड घालून यश कसे साध्य करता येईल याची उत्तम जाण त्यांना होती. सामाजिक कार्यातही त्यांचा विशेष पुढाकार होता. त्यांच्या या व्यक्तिमत्वाचा खर्‍या अर्थाने सन्मान व्हावा, या हेतूने त्यांच्या स्मरणार्थ आम्ही हे पुरस्कार मागील वर्षीपासून देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फाऊंडेशनविषयी माहिती देताना तन्वी कुलकर्णी म्हणाल्या की, स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेली संघटना म्हणजे ज्योती रिसर्च फाऊंडेशन. आज आपल्यात अशा असंख्य स्त्रिया आहेत ज्या आपल्या कार्याने इतरांना आधार देत आहेत. अशा स्त्रियांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या हातांना बळ मिळावे, त्यांच्यामध्ये लढावू वृत्ती निर्माण व्हावी या हेतूने ज्योती कुलकर्णी रिसर्च फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. झुंजणार्‍या, कष्टणार्‍या स्त्रियांच्या पाठिशी उभी राहणारी संघटना अशी ओळख निर्माण व्हावी, असा आमचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्रीमंडळात पुण्याला स्थान मिळावे

0

पुणे- कसबा विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले अनुभवी आमदार गिरीश बापट यांना अर्थ , महसूल खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद देण्यात यावे , गिरीश बापट हे लोकलेखा समितीचे अध्यक्ष असून त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत कामाचा अनुभव आहे . तसेच पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार दिलीप कांबळे यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समाजकल्याण खाते देण्यात यावे ,दिलीप कांबळे यांनी युती सरकारमध्ये समाजकल्याण खात्याचे काम पहिले असल्याने त्यांना समाज कल्याण खात्याचा अनुभव आहे . आणि ते राखीव मतदार संघातून निवडून आले आहेत .या दोन्ही मंत्री पदामुळे पुण्याच्या रखडलेल्या विकासाला चालना मिळेल , असे मत , भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सुभाष भांबुरे आणि सुनील मॉरीस यांनी सांगितले . नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेवर येण्यासाठी राजकीय पक्षांची आघाडी होत आहे या आघाडीमध्ये भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठींबा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दिला आहे , राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सहकार क्षेत्रावर मजबूत पकड आहे , विधानसभा निवडणुकीनंतर या सहकार क्षेत्रावर भारतीय जनता पक्षाला सत्ता प्राप्त करायची आहे , त्यामध्ये सत्तेच्या सारीपाटमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावर भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादी कॉंग्रेसची साथ घेऊन आपला गड मजबूत करण्याचा त्यांचा इरादा आहे ,आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला आपला सहकार क्षेत्रावरील गड मजबूत ठेऊन टिकवून ठेवायचा आहे , त्यामुळे सत्तेत राहण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष बिनशर्त पाठींबा देत आहे . , असे मत , भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सुभाष भांबुरे आणि सुनील मॉरीस यांनी सांगितले .

रसिक रमले ‘ स्वर अमृत धारा’ मध्ये

0

रसिक रमले ‘ स्वर अमृत धारा’ मध्ये
पुणे – वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील रसिकांसाठी एशियन मशिन टूल्स कॉर्पोरेशनच्या वतीने भूगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या “स्वर अमृतधाराने रसिक मंत्रमुग्ध झाले.
पुण्यातील कला निकेतनच्या कलाकारांनी सादर मराठी हिंदी गाणी सादर केली. “मेहंदीच्या पानावर मन…”, “शारद सुंदर…”, “लाजून हसणे अन…”, “गालावर खळी डोळ्यात धुंदी…”, “मळ्याच्या मळ्यामंदी कोण गं उभी…”, “मला जावू द्या ना घरी वाजले की बारा…”, “मन उधाण वा-याचे…”, “पिया अब तो आजा…”, “ओ मेरे सोना रे…”, “चुरा लिया है तुमने जो दिल को…”, “गुलाबी आँखे जो तेरी…”, “प्यार दिवाना होता है…”, “सवार लू…”, या गाण्याने कार्यक्रमाला रंगत आली.
श्रीनिवास सरमुकादम, मेधा परांजपे, राजेश्वरी पवार, निसर्ग पाटील यांनी गायन केले. नंदू डेविड (-हीदम), नितीन खंडागळे (सिंथेसायझर) यांनी साथसंगत केली. यावेळी भुगावचे सरपंच विजय सातपुते, पिरंगुटचे माजी सरपंच मोहन गोळे, पिरंगुटचे माजी उपसरपंच महादेव गोळे,जीवन ज्योत फौंडेशनचे सतिश आंग्रे, सरोवर लेकचे संचालक माऊली सातपुते, आभाळमाया आश्रमाचे संचालक अशोक बिळगी, सुनील पवार, भाऊसाहेब केदारी, एशियन कंपनीचे संचालक राहुल नरुटे, चिरंजीव पिंजारी आदि उपस्थित होते.
यावेळी संचालक पिंजारी म्हणाले की, दोन वर्षापूर्वी गेजेसे आणि मार्किंग मशीनचे वितरण करणा-या एशियन कंपनीची सुरुवात झाली. केवळ उत्पादने विकणे यापेक्षा एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही पिरंगुट, भुगाव, भूकंम या ग्रामीण भागातील रसिकांसाठी एक दिवाळी पहाटचे आयोजन केले असल्याचे यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रफुल्लचंद्र तावडे यांनी केले. तर राहुल नरुटे यांनी आभार मानले.

ऐन दिवाळीत एकाच कुटुंबातील तिघांची निघृण हत्या

0

अहमदनगर-ऐन दिवाळीत पाथर्डी तालुक्यात एका दलित कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आई, वडील आणि तरुण मुलगा यांचे तुकडे करून मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आले आहेत. खुनाचे कारण तसेच आरोपींबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. जामखेड तालुक्यातील खर्डा येथे काही महिन्यांपूर्वीच अशी घटना घडली होती. या दोन्हींमध्ये काहीअंशी साम्य असल्याचे सांगण्यात येत आहे.
पाथर्डी तालुक्यातील जवखडे खालसा या गावातील जाधव वस्तीत ही घटना घडली. तेथे संजय जगन्नाथ जाधव (वय ४२), जयश्री संजय जाधव (वय ३८) व सुनील संजय जाधव (वय १९) हे तिघे राहतात. त्यांचे तिघांचेच कुटूंब आहे. जाधव यांच्या मालकीची एक एकर शेती आहे. त्यांचा मुलगा सुनील हा मुंबईत एका दूध डेअरित नोकरी करतो. आठ दिवसांपूर्वी तो गावी आला होता. त्यांचे घर गावापासून पाच किलोमीटरवर शेतात आहे. आज सकाळी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्यावर शेतात काम करणाऱ्यांनी जाधव यांच्या नातेवाईकांना कळविले. त्यांनी येऊन पाहिले असता घरात कोणीही नव्हते. घराच्या ओट्यावर थोडेसे रक्त सांडलेले होते. त्यामुळे नातवाईक आणि ग्रामस्थांनी जाधव कुटुंबियांचा शोध सुरू केला.
सायंकाळी जाधव यांच्या वस्तीपासून पाचशे फुटावर असलेल्या एका जुनाट, पडीक विहिरीत मृतदेहांचे तुकडे आढळून आले. गोणापटावर टाकून मृतदेह विहिरीजवळ फरपटत आणल्याचे आढळून आले. याची माहिती मिळाल्यावर पाथर्डीचे पोलिस तेथे गेले. तोपर्यंत ग्रामस्थ संतप्त झाले होते. वरिष्ठ पोलिस अधिकारी नगरहून सायंकाळी आले खुनाचे कारण, यातील आरोपी यांच्याबद्दल आद्याप माहिती मिळालेली नाही. रात्री या तिघांची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचा संशय आहे.

हिरे व्यापाऱ्यांनी सुरू केली खासगी विमानसेवा

0

सुरतः गुजरातमधील शहरांना जोडण्यासाठी शहरातील उद्योगपतींनी एक नवी हवाई सेवा सुरू केली आहे. यामध्ये ‘प्रथम’नावाचे विमान आज धनत्रयोदशीदिवशी सकाळी १० वाजून १० मिनिटे झाली असता सुरतच्या एअरपोर्टवर लँड झाले.तेव्हा त्याच्या स्वागतासाठी स्वामी धर्मवल्लभदास यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हे विमान९ सीटांची व्यवस्था असलेले सेसेना केरवान कंपनीचे असून याचे मॉडेल नंबर सी-२०८८ आहे. हे९सीटर विमान अहमदाबाद, राजकोट, भावनगर, जामनगर, भूज, अमरेली, बरोडा, मुंबई आणि शिर्डी यांच्या दरम्यान सेवा देणार आहे .
ही हवाई सेवा१ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. मात्र जर कोणाला चार्टर करायचे असेल तर हे विमान २३ऑक्टोबरपासून उपलब्ध करून देण्यात आले आहे. सुरत डायमंड आणि टेक्सटाईलच्या व्यापारासाठी जगभरात प्रसिध्द असूनही कनेक्टीव्हीटी नसल्याने सुरतला तोटा होत आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन सुरतमधील तीन मोठे हिरा उद्योगपती सावजीभाई घोलकीया, लालजीभाई पटेल, गोविंदभाई घोलकीया आणि रिअल इस्टेटशी संबंधीत असलेले लवजीभाई बादशाह यांनी एकत्र येऊन ही खासगी विमानकंपनी सुरू केली आहे.

ग्राहकांना सावधानतेचा इशारा ; भेसळीच्या संशयाने गुजरातची ५ हजार किलो बर्फी जप्त

0

दूध पावडर, खाद्यतेल मिश्रित भेसळयुक्त असणारी ‘स्पेशल बर्फी’ नावाने ओळखली जाणारी गुजरातची बर्फी जप्त करण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सोमवारी दुपारी केली. सुमारे सात लाख ८६ हजार ५६० रुपये किमतीची पाच हजार किलोची बर्फी जप्त करण्यात आली आहे. एफडीएचे पुणे विभागाचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त दिलीप संगत, अन्न सुरक्षा अधिकारी धनश्री निकम, योगेश डहाणे, बाळासाहेब कोतकर यांच्या पथकाने दोन वेगवेगळ्या कारवाई केल्या.दरम्यान दिवाळीच्या तोंडावर बाजारातील तेल, रवा, बेसन, मैदा, खवा, वनस्पती तूप या पदार्थांमध्ये भेसळ वाढल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. शेंगदाण्याला हिरवा रंग लावून पिस्ता म्हणून सोनपापडीवर लावणे आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मिठाईमध्ये प्रमाणापेक्षा जास्त रंग वापरल्याच्या घटनाही उघड होत आहेत.
‘दिवाळीसाठी पुण्यात मिठाईची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्यासाठी गुजरातहून दरवर्षीप्रमाणे यंदाही खवा अथवा बर्फी विक्रीसाठी पुण्यात आणण्यात येतो. गुजरातची ‘स्पेशल बर्फी’ ट्रॅव्हल्समधून कल्याणमार्गे शनिवारी पुण्यात विक्रीसाठी आणली होती. सहा लाख ७१ हजार ५२० रुपये किमतीची ४ हजार १९७ किलो बर्फी भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आली. संबंधितांकडे चौकशी केली असता ही बर्फी दूध पावडर आणि खाद्यतेलाच्या मिश्रणातून तयार करण्यात आली आहे. त्यामुळे बर्फीचा साठा जप्त करण्यात आला. पुण्यात ही स्पेशल बर्फी ८० रुपये किलो दराने विकण्यात येणार होती. कारवाईमुळे तो प्रयत्न हाणून पाडण्यात आला,’ अशी माहिती सहायक आयुक्त दिलीप संगत यांनी दिली.
शनिवारनंतर सोमवारीही गुजरातहून पुन्हा ७१९ किलोची बर्फी बुधवार पेठेतील एका मोबाइल विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा घालून कारवाई केली. तेथून एक लाख १५ हजार ४० रुपये किमतीचा स्पेशल बर्फीचा साठा जप्त करण्यात आला, असेही त्यांनी सांगितले.
‘स्पेशल बर्फी’ म्हणून पुण्यात आलेल्या बर्फीचा उत्पादक कोण आहे याचा तपास गुजरातमधील एफडीएच्या सहायाने करण्यात येईल. बर्फीचे आठ नमुने आरोग्य प्रयोगशाळेकडे तपासण्यास पाठविण्यात आले आहेत. त्यानंतर उत्पादकांना नोटीस पाठविण्याची कारवाई करण्यात येईल.अशी माहिती शशिकांत केकरे, सहआयुक्त एफडीए, पुणे विभाग यांनी दिली
देशातील सर्वांत मोठा सण असलेल्या दिवाळीमध्ये मागणी असणाऱ्या पदार्थांची कसून तपासणीची मोहीम अन्न व औषध द्रव्य प्रशासनाने (एफडीए) १०ते १९ ऑक्‍टोबर या दरम्यान शहरात राबविली. या मोहिमेतून धक्कादायक प्रकार उघड होत आहेत. यात ३७३ प्रकारचे नमुने घेतले असून, १७लाख ४०हजार ४०० रुपयांचा माल जप्त केला आहे, अशी माहिती “एफडीए‘चे (अन्न) सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली.
काजू, स्ट्रॉबेरी आणि केशर पेढ्याच्या नमुन्यांमध्ये खाण्याच्या रंगाचा अतिवापर केल्याचे राज्य आरोग्य प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. १००”पार्टस पर मिलियन‘ (पीपीएम) खाद्यरंग पदार्थांमध्ये वापरण्यास परवानगी आहे. पण या पदार्थांमध्ये ५००”पीपीएम‘पर्यंत रंग घातला होता. त्यामुळे संबंधित अन्नपदार्थ असुरक्षित असल्याचे नमूद केले आहे. तसेच, सोनपापडीकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शेंगदाण्याला हिरवा रंग लावून त्यावर ठेवल्याचे पिंपरीतील एका दुकानात आढळले, अशी माहितीही त्यांनी दिली.
केकरे म्हणाले, “”वापरलेल्या डब्यात पुन्हा तेल ओतून विक्री करत असल्याचे काही ठिकाणी आढळून आले. त्यातून ७ लाख ३१ हजार ३६१रुपयांचे तेल जप्त केले आहे. तसेच ३८ हजार २००रुपयांचे वनस्पती तूपही जप्त केले. दिवाळीसाठी मागणी वाढत असलेले रवा, मैदा, खवा या पदार्थांचे नमुने घेतले. त्यात मध्य प्रदेश येथून आलेल्या बेसनामध्ये लाख डाळीची भेसळ केल्याचे सिद्ध झाले आहे. असे८२ हजार ३४२ रुपयांचे बेसन आणि दोन लाख१७ हजार रुपयांचा मैदा जप्त केला आहे.‘‘
बर्फी चांगली राहण्यासाठी सॉर्बिक ऍसिड (१००० पीपीएम) वापरण्यास कायद्याने परवानगी आहे. मात्र, “स्पेशल बर्फी‘त हे प्रमाण ६७०० पीपीएमपर्यंत आढळल्याचे प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकारच्या बर्फीचे नमुने घेण्याचे आदेश अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

आली दिवाळी …

0

दिवाळी निमित्त पुण्यातील चैतन्य योग हास्य क्लब ने शनिवार वाड्याच्या प्रांगणात असा दीपोत्सव साजरा केला

शिवसेना +काँग्रेस +राष्ट्रवादी मिळून ठेवा भाजपला दूर ;प्रस्ताव फेटाळला – अजित पवार

0

मुंबई –
प्रादेशिक पक्षांना संपविण्यास निघालेल्या भाजपला महाराष्ट्रात सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठींबा देवून नवा अध्याय रचावा अशा अस्वरुपाचा प्रस्ताव हि राजकीय वर्तुळात चर्चिल ग्लेअ आज त्यास अजित पवार यांनी दुजोरो हि दिला मात्र आपण हा प्रस्ताव फेटाळून लावल्याचे त्यांनी स्पष्ट केले . भाजपला अडचणीत आणण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देऊया असा एक प्रस्ताव काँग्रेसच्या नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसला दिला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रस्ताव तत्काळ फेटाळून लावला, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज केला. अजित पवार यांच्या या विधानामुळे आता पुन्हा एका नवीन समीकरणाची चर्चा होऊ लागली आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर सत्तेसाठी साठमारी सुरू झाली आहे. प्रत्येक पक्षातून नेते वेगवेगळी विधानं करून राज्यात संभ्रम निर्माण करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार राजकीय समीकरणांबाबत वक्तव्य करून नवा संभ्रम निर्माण केला आहे. काँग्रेसच्या नेत्याचे नाव न घेता त्यांनी पत्रकारांना सांगितले की, काल निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात कोणत्याच पक्षाला बहूमत मिळालेले नाही. तसेच भाजपला सगळ्यात जास्ती जागा मिळालेल्या असल्यातरी सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना २०-२२ जांगाची गरज आहे. त्यामुळे भाजपला अडचणीत आणण्याची ही नामी संधी असून या संधीचा फायदा घेत जर आपण शिवसेनेला पाठिंबा दिला आणि शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असे मिळून सत्ता स्थापन करता येईल, असे या काँग्रेस नेत्याने सांगितले. मात्र राष्ट्रवादीने हा प्रस्ताव फेटाळला. अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

दरम्यान, आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी हा गौप्यस्फोट केला.

मुंबईत मराठी टक्का कमी पडला … एमआयएमचा प्रवेश धक्कादायी

0

मराठी मतांना गुजराती भाषिकांच्या प्राबल्याविरोधात चेतवून भावनिक आवाहन करणाऱ्या शिवसेना उमेदवारांच्या पाठीशी मराठी मतदार एकवटले, तरी भाजप केवळ गुजराती मतांवर विसंबून न राहता भाजपने उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, सिंधी, पंजाबी अशा सर्व स्तरातून मते मिळवल्याने मुंबईत भाजप हाच शिवसेनेपेक्षा काकणभर सरसच ठरला म्हणजेच मुंबईत शिवसेनेच्या वाट्याला आलेला मराठी टक्का कमी पडला हे स्पष्ट झाले आहे त्यामुळेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची तुलना कुतुबशाह आणि निजामशाह यांच्याबरोबर करणाऱ्या शिवसेनेला मुंबईत म्हणावे तितके यश मिळू शकले नाही.मुंबई, ठाणे या परिसरात समाजवादी पार्टी साफ होणे , राष्ट्रवादीचा सुपडा साफ होणे , रिपाइंलाही मतदारांनी मुंबईतून हद्दपार करणे , या गोष्टींचा अभ्यास होणे जरुरीचे आहे
मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यांमध्ये शिवसेनेला मोठा फायदा होईल, असे मतदानाला झुंडीच्या झुंडींनी उतरलेल्या मराठी मतदारांकडे पाहून वाटत होते. मात्र प्रत्यक्षात या मराठी मतांमधील मोठा वाटा शिवसेनेकडे गेला असला तरी त्यातही मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादी या तीन पक्षांनीही थोडा का असेना त्यावर डल्ला मारल्याचे चित्र निकालांती स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच शिवसेनेला दहिसरसारख्या अनेक मराठीबहुल जागांवर पाणी सोडावे लागले. दुसरीकडे भाजप, शिवसेना व मनसे अशा तीन पक्षांमध्ये काँग्रेसविरोधी मतांचे विभाजन होत असल्यामुळे त्याचा फायदा काँग्रेसला मिळेल, असा अनेकांचा कयास असताना काँग्रेसच्या हक्काच्या मुस्लिम व्होट बँकेवरच एमआयएमसारख्या पक्षाने डल्ला मारल्याने काँग्रेसची मुंबई शहरात दारूण अवस्था झाली. काँग्रेसच्या निवडून आलेल्या पाच जागांपैकी तीन मुस्लिम व एक दलित उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईतील जनाधार हा मर्यादित असल्याचे अनेकदा स्पष्ट झालेच होते. मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून न आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा या निवडणुकीत पार साफ झाल्याचेच चित्र समोर आले आहे.
मनसेचा शिवसेनेप्रमाणेच मुंबईत जोर असल्याचे त्या पक्षाच्या जन्मापासूनच स्पष्ट झाले होते. मात्र या निवडणुकीत गुजराती भाषिकांच्या विरोधात पेटून उठलेली मराठी मते पूर्णपणे शिवसेनेच्या पाठीशी उभी राहिल्याने मनसेचा मुंबईत सुपडा साफ झाला असून राज ठाकरेंसाठी ही मोठीच धोक्याची घंटा आहे. मुंबईतील सर्वात धक्कादायक मिकाल हा भायखळा मतदारसंघात एमआयएमचा विजय हा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अतिरेकी मुस्लिम धर्मांधतेची भूमिका घेणाऱ्या ओवेसी बंधूंना मुंबई शहरात कधीही थारा मिळणार नाही, असे अनेकांना वाटत होते. मात्र लोकसभेत मुंबईतील सहाच्या सहा जागांवर सेना-भाजपच्या दणदणीत विजयाने हिंदू मते एकवटल्याची प्रतिक्रिया मुस्लिम वस्त्यांमधील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात उमटली होती. त्यामुळे भायखळा, मुंबादेवी, गोवंडी, कुर्ला आदी मुस्लिमबहुल वस्त्यांमधील मुस्लिम तरुणांमध्ये असदउद्दीन ओवेसी व अकबरउद्दीन ओवेसी यांच्या भाषणांच्या क्लिप्स व्हॉट्सअॅपवरून मोठ्या प्रमाणावर फिरत होत्या. स्वातंत्र्यानंतर भारतात काँग्रेसने मुस्लिम नेतृत्व जाणीवपूर्वक उभे राहू दिले नाही, असा तर्क देणाऱ्या या ओवेसी बंधुंवर मुस्लिम तरुण मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत होता. मात्र त्याकडे काँग्रेसने बेफिकीरातून दुर्लक्ष केले. त्यामुळेच भायखळा मतदारसंघात एमआयएमचे वारीस पठाण निवडून आले. शेजारच्याच मुंबादेवी मतदारसंघामध्ये अमिन पटेल यांना काँग्रेसची हक्काची हिंदू मते मिळाल्यानेच त्यांच्या पारड्यात विजयाचे दान पडले, अन्यथा अमिन पटेल यांचाही पराजय होऊ शकला असता.
समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांना विजय मिळाला असला तरी मुंबई, ठाणे या परिसरात समाजवादी पार्टी साफ झाली असून एकेकाळी त्यांच्या मागे फिरणारा मुस्लिम तरुण मोठ्या प्रमाणावर आता एमआयएमकडे गेल्याने त्यांनाही भविष्याच्या दृष्टीने रणनीती ठरवावी लागेल. रिपाइंचा मुंबईतील एकमेव उमेदवार दीपक निकाळजे यांना भाजपचा पाठिंबा असून व मोदींच्या स्टेजवर उपस्थित राहूनही मतदारांनी नाकारल्याने रिपाइंलाही मतदारांनी मुंबईतून हद्दपार केल्याचेच चित्र पुढे आले आहे.
‘एमआयएम’चा प्रवास
* हैदराबादचे नबाब मीर उस्मान अली खान यांच्या सूचनेवरून नबाब महमूद नवाझ खान किलेदार यांच्याकडून १९२७ मध्ये पक्षाची स्थापना.
* हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन होऊ नये यासाठी दीड लाख रजाकार.
* १९४८ मध्ये एमआयएमवर बंदी आणि त्यांचे नेते कासीम रिझवी १९४८ ते १९५७ पर्यंत अटकेत.
* सुटकेनंतर अब्दुल वाहिद ओवैसी यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपवून रिझवी यांचे पाकिस्तानात स्थलांतर.
अब्दुल वाहिद ओवैसी यांच्याकडून पक्षाची पुनर्बाधणी.
* १९६२ मध्ये पाथरघट्टी विधानसभा मतदारसंघात सुलतान सलाहुद्दीन ओवैसी यांच्या विजयाद्वारे एमआयएमचा आंध्र प्रदेशच्या राजकारणात प्रवेश.
* १९८४ मध्ये हैदराबाद लोकसभा मतदारसंघात सुलतान ओवैसी यांची सरशी.
* यानंतर आजपर्यंत हा मतदारसंघ एमआयएमच्याच ताब्यात.
* एप्रिल २०१४ मध्ये तेलंगणा विधानसभेच्या ९ जागांवर एमआयएमचा विजय.
एमआयएमला निवडणूक आयोगाची मान्यता.
* २००७ मध्ये बांगलादेशची लेखिका तस्लिमा नसरीन यांच्यावर एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा हैदराबादमध्ये हल्ला.

महाराष्ट्र पुन्हा अस्थिरता -अराजकतेच्या झोक्यावर ; उद्धव ठाकरे निकालाबाबत दु:खी

0

पुणे-
आमचा महाराष्ट्र पुन: पुन्हा अस्थिरता व अराजकाच्या झोक्यावर गटांगळ्या खात आहे. दु:ख याचेच आहे.;महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दु:खी झाले आहेत. महाराष्ट्राची जनता यावेळेस शिवसेनेला निर्विवाद कौल देईल असे वाटले होते. पण मतविभागणीचा फायदा भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या निकालाचे विश्लेषण केले आहे. अखंड महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर निवडणूक लढूनही शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिल्याची सल उद्धव यांनी बोलून दाखवली आहे. उद्धव म्हणतात…
महाराष्ट्राने लाचार होऊ नये, दिल्लीपुढे ऊठसूट लोटांगण घालू नये, महाराष्ट्र अभेद्य आणि अखंड राहावा, मुंबईचे महत्त्व कायम राहावे यासाठीच आम्ही एकाकी झुंज दिली. लढाई विषम होती. दोन्ही बाजूला बलाढ्य सत्ताधीश. भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जवळजवळ सर्व सत्ता आमच्या विरोधात उतरली. भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार महाराष्ट्रात तळ ठोकून बसले. दुसर्याप बाजूला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ हे महाराष्ट्राचे मदमस्त सत्ताधारी आमच्या विरोधात उतरले होते. दोन मदमस्त सत्ताधार्यांतशी झुंज देत शिवसेनेच्या ढाण्या वाघाने जो पल्ला गाठला तो मोलाचा आहे.
प्रचारात आम्हाला जी एक लाट उसळलेली दिसली त्या लाटेचे पाणी किनार्याीवर येण्याआधीच विरले. काही ठिकाणी लाटेत पाणी कमी व फेस जास्त असेच दिसले, पण चौरंगी-पंचरंगी लढतीत जी मत विभागणी झाली त्याचा फायदा जसा भाजपला झाला तसा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला.
राजकारणात कधी कुणाचे नशीब फळफळेल सांगता येत नाही. आता नक्कीच प्रश्ना विचारले जातील की, शिवसेना या निकालाकडे कशी पाहत आहे? आम्ही यावर आजच भाष्य करणार नाही, पण ज्यांनी हे अधांतरी मतदान केले ती सर्वशक्तिमान जनता या निकालाकडे कोणत्या नजरेने पाहते? महाराष्ट्राच्या वाट्यास निकालांचा जो लटकता बुलबुल आला आहे त्यामुळे शेवटी हे राज्य टिकेल काय? ही शंका जोर धरू लागली आहे.
अखंड महाराष्ट्राचे स्वप्न विजयी झाले नसेल तर असले विजय निदान महाराष्ट्राच्या भल्याच्या दृष्टीने तरी कुचकामी ठरतात. ज्यांच्यासाठी आम्ही हा वडवानल पेटवून महाराष्ट्रात विचारांचे रान उठवले त्या जनताजनार्दनास आम्ही कोणताही दोष न देता एकच विचारीत आहोत की, मायबाप जनहो, जो निकाल तुम्ही दिलाय त्यामुळे तुम्ही तरी खूश आहात का? समाधानी आहात का? आमचा महाराष्ट्र पुन: पुन्हा अस्थिरता व अराजकाच्या झोक्यावर गटांगळ्या खात आहे. दु:ख याचेच आहे.

सुरत मध्ये दिवाळीचे गिफ्ट म्हणून महागड्या कार, फ्लॅट अथवा हिर्‍यांचे दागिने

0

हरेकृष्ण एक्स्पोर्ट्स कंपनीच्या १२०० कामगारांना ५० कोटीचा बोनस
सुरत – येथील हरेकृष्ण एक्स्पोर्ट्स कंपनीचे मालक आणि हीरा व्यापारी साबुभाई ढोलकिया यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना या दिवाळीत बोनस – बक्षिशी म्हणून कार, फ्लॅट आणि हिरे जडीत दागिने दिले आहेत. दिवाळीच्या बोनससाठी एकूण 1200 कर्मचार्‍यांची यादी बनवण्यात आली आहे. यामधील 491 कर्मचार्‍यांना महागड्या कार देण्यात आल्या. तर या व्यतिरिक्त 525 कर्मचार्‍यांना हिरेजडीत दागिने आणि 200 कर्मचार्‍यांना फ्लॅट देण्यात आले आहेत.
दिवाळीला सर्वच कर्मचार्‍यांना सर्वात जास्त उत्सूकता असते ती म्हणजे कंपनीकडून मिळणार्‍या दिवाळी गिफ्टची. सर्वच कंपन्या दिवाळीला कर्मचार्‍यांना खुष करण्यासाठी काहीना काही गिफ्ट देत असतात. यामध्ये मग ड्रायफ्रूट पॅक पासून एखाद्या होम अप्लायन्सेसपर्यंतचे हे गिफ्ट असतात. मात्र दिवाळीचे गिफ्ट म्हणून महागड्या कार, फ्लॅट अथवा हिर्‍यांची दागिने यांचे आहे मात्र सुरतच्या या हिर्‍याच्या कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना यंदाच्या दिवाळीत काहीसे असेच गिफ्ट दिले आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांची यंदा दिवाळी जोरातच आहे.
ज्या कर्मचार्‍यांना हे महागडे गिफ्ट देण्यात आले आहेत, ते या हिरा कंपनीमधील कारागिर आहेत. ढोलकीया यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारागिरांच्या कामाच्या दर्जामुळे कंपनीला मोठा फायदा झाला आहे. तसेच त्यांच्या नफ्यातही मोठी वाढ झाली आहे. यामुळेच कंपनीने त्यांच्या कामगिरीवर खुष होऊन 50 कोटींचे बजेट बनवले होते.

आकर्षक पुष्परचना पाहण्यास पुणेकरांची गर्दी

0

2

ज्योती कुलकर्णी रिसर्च फाउंडेशनतर्फे महिलांसाठी स्पर्धा व प्रदर्शन

पुणे 20 ऑक्टो : फुले, पाने, छोट्या डहाळ्या, फळे आदींच्या साहाय्याने केलेली आकर्षक मांडणी. ग्लॅडिओली, गुलाब , आर्किड, जरबेरा, कार्नेश, ऍन्थुरियम, लास्पर, शेवंती आदी फुलांचा तसेच अरेका पाम, अम्ब्रेला पाम, शोभेची अळूची पाने, लीलीची पाने, ऍस्परॅगस, सायकस, केवडा यांसारख्या पानांचा नेमका वापर. फुले व पानांची त्यांच्या रंग व आकारमानानुसार अचूक सांगड घालून केलेली आकर्षक व मनमोहन कलाकृती पाहण्यास पुणेकरांनी एकच गर्दी केली होती.

निमित्त होते ज्योती कुलकर्णी रिसर्च फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या पुप्षरचना स्पर्धेचे. महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव ही स्पर्धा घेण्यात आली. पुष्परचनेच्या या स्पर्धेमध्ये ३२ महिलांनी सहभाग घेऊन पुष्परचना सादर केल्या. यावेळी इकेनोबो इकेबाना सोसायटीच्या अध्यक्षा शैलजा दिवेकर व त्यांच्या शिष्या अरुंधती देशपांडे यांनी या स्पर्धेचे परिक्षक केले. स्पर्धेतील पुष्परचना पाहण्याची सर्वांना संधी मिळावी, यासाठी स्पर्धेंनंतर लगेचच प्रदर्शनही भरविण्यात आले. डीएसके स्कूलच्या उपमुख्याध्यापिका उमा पानसे, यावेळी ज्योती कुलकर्णी फाउंडेशनच्या विश्वस्त अश्विनी देशपांडे, हेमंती कुलकर्णी, भाग्यश्री कुलकर्णी, तन्वी कुलकर्णी यादेखील उपस्थित होत्या.

यावेळी दिवेकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, पुष्परचना ही कला दिसायला सोपी वाटते परंतु, यात अनेक बारकावे असतात. ज्यांना हा छंद उपजत आहे त्यांनी जरूर यास वेळ द्यावा. छंद म्हणून ही कला जोपासण्याबरोबरच सध्या व्यावसायिक महत्वही यास प्राप्त झाले आहे. आकर्षक कलाकुसर व पुष्पमांडणी करणार्‍यांची येत्या काळात मागणी असणार आहे. हे लक्षात घेऊन, पुष्परचनेत रस असणार्‍यांसाठी आम्ही कार्यशाळा घेत असतो. महिलांचाही यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे परंतु, त्यांना या कलेविषयी तळमळ आहे अशांसाठी आम्ही कमी खर्चात किंवा त्यांच्या सोयीनुसारही प्रशिक्षण देतो. महिलांचा उत्साह पाहून आम्हालाही नवीन उर्मी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनंदिन जीवनातून स्वत: साठी वेळ काढून जोपासलेल्या छंदाना एक व्यासपीठ मिळावे, या हेतूने खास महिलांसाठी फाउंडेशनने हा आगळावेगळा उपक्रम राबविला होता. स्पर्धा आणि प्रदर्शनाबरोबरच येत्या काळात पुष्परचनेविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा सुरु करणार असल्याचा मानस आश्विनी देशपांडे यांनी यावेळी व्यक्त केला. या निर्णयाचे स्वागत करत या कार्यशाळेदरम्यान महिलांना मोफत मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिवेकर यांनी दिले.