पुणे —
गीतरामायणाच्या हीरकमहोत्सवी सोहळ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्रीधर फडके यांनी आपल्या सुमधुर स्वरात गीतरामायणातील पुढील दहा गाणी म्हणत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. खचाखच भरलेल्या पटांगणातील रसिकांनी ही गाणी अतिशय तन्मयतेने ऐकताना अनेक गाण्यांना वन्समोर देऊन ती पुन्हा पुन्हा श्रवण केली. आज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते श्रीधर फडके यांचा यावेळी खास पुणेरी पगडी, श्रीराम-सीतेची मूर्ती आणि उपरणे देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ इतिहास तज्द्य निनाद बेडेकर, ज्येष्ठ शिक्षण तज्द्य डॉ. प्र. ल. गावडे, पुण्याचे उपमहापौर आबा बागुल, पुणे आकाशवाणीचे संचालक रवींद्र खासनीस , आशिष भटनागर, शरदकुमार माडगुळकर, ‘ललकार’चे रवींद्र आपटे आदी उपस्थित होते.
‘गदिमा’ आणि बाबूजी उर्फ सुधीर फडके यांच्या गीतरामायणाचा पहिला कार्यक्रम एक एप्रिल १९५५ रोजी पुणे आकाशवाणी केंद्रावरून
प्रसारित करण्यात आला. आणि पहिल्या भागापासूनच तो लोकप्रिय झाला. हे अनोखे गीतरामायण घराघरात लोकप्रिय करण्याचे सारे श्रेय अर्थातच आकाशवाणीला जाते. म्हणून या सोहळ्यात आज पुणे आकाशवाणीचे संचालक रवींद्र खासनीस, आशिष भटनागर आणि पुणे आकाशवाणीचे तत्कालीन ज्येष्ठ कर्मचारी मुकुंदराव गद्रे यांचा खास गौरव करण्यात आला.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या भाषणात श्रीधरजींना मनापासून आशीर्वाद देतांना सांगितले की, गीतरामायण हे चिरंजीव महाकाव्य आहे. तर गीतरामायण गाणारे श्रीधर फडके हे गीतरामायणाची रचना करणारे आणि गाणारे सुधीर फडके यांचे चिरंजीव आहेत त्यामुळे जेंव्हा जेंव्हा गीतरामायणाचे नाव घेतले जाईल तेंव्हा तेंव्हा सुधीर फडके आणि श्रीधर फडके यांचीही नावे आपोआप घेतली जातील. लहानपणी मी श्रीधरना कडेवर घेतले होते मात्र आता मी त्यांना डोक्यावर घेत आहे असे त्यांनी म्हणताच श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
ज्येष्ठ इतिहास तज्द्य निनाद बेडेकर यांनीही आपल्या भाषणात, गीत रामायणामध्ये अचेतन सृष्टीला सचेतन करण्याची ताकद आहे असे सांगितले. शिवाजी महाराजांनीही आपल्या एका मुलाचे राम हे नाव आवर्जून ठेवले होते याचाही त्यांनी उल्लेख केला.
पुण्याचे उपमहापौर आबा बागुल यांनी या हीरकमहोत्सवी सोहळ्यास शुभेच्छा देताना, आजच्या तरुण पिढीला संस्काराची गरज असल्याचे सांगून हे संस्कार केवळ गीतरामायाणामुळेच होतील असे सांगितले. पृथ्वी एडिफीसचे अभय केले यांनी आपल्या प्रास्ताविकात या
सोहळ्यामागची कल्पना विशद केली. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन विनया देसाई यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला इंदूरचे गायक अभय मांडके आणि अमृता मांडके यांनी गीतरामायणातील ‘स्वये श्री… ‘ , दशरथा घे हे पायसदान ….’., ‘राम जन्मला ग सखे, ‘सावळा ग राम …’, आकाशाशी जडले नाते … ही पाच गाणी हिंदीतून सादर केली यावेळी टाळ्यांच्या प्रचंड गजरात श्रोत्यांनी या हिंदी गाण्यांचे स्वागत केले. हिंदी गीतरामायणातील रचना बृह्दत्त मिश्रा यांनी अनुवादित केल्या आहेत.
मुख्य कार्यक्रमात आज श्रीधर फडके यांनी, ‘बोलले इतुके मज श्रीराम …’, ‘ माता न तू वैरिणी …’, ‘ दॆवजात दु:खे भरता ….’, ‘सूड घे त्याचा लंकापती…’, तोडिता फुले…’ , ‘अडविता खलाशी… ‘, ‘सन्मित्र राघवा…’, ‘बाली वध ना…’ ‘असा हा एकच श्री हनुमान…’ हि गाणी सादर करून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी त्यांना तुषार आंग्रे (तबला ), उद्धव कुंभार ( तालवाद्य), किमया काणे व विनय चेउलकर ( सिंथेसायझर ) यांनी साथसंगत केली. गीतरामायणाचे रसाळ निवेदन धनश्री लेले यांनी केले. गीतरामायणाच्या हीरकमहोत्सवी सोहळ्याची शनिवारी रामनवमीच्या दिवशी सांगता होणार आहे.
तीन दिवस चालणाऱ्या गीतरामायणाच्या या खास हीरकमहोत्सवी सोहळ्याचे पृथ्वी एडिफीस, निरामय वेलनेस आणि भारती विद्यापीठ हे प्रायोजक आहेत.
गीतरामायण हे चिरंजीव महाकाव्य — शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
‘वारकरी भूषण’ पुरस्कार सोमनाथ महाराज चौधरी (आळंदी) यांना प्रदान
पुणे :
हिंजवडी – माण या माहिती-तंत्रज्ञान नगरीत असलेल्या भव्य विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा पाचवा वर्धापनदिन गुरुवार, दि. 26 मार्च 2015 रोजी साजरा करण्यात आला. यानिमित्त विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सोमनाथ महाराज चौधरी (आळंदी) यांना ‘वारकरी भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार विणेकरी ह.भ.प.सोपान महाराज पारखी यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी सौ.बाळूमावशी धुमाळ, श्री. सुदाम धुमाळ, गुरूवर्य मृदुंग महर्षी तुकाराम बुवा भूमकर गुरूजी (पुणे, कसबा) उपस्थित होते.
गुरूवार दिनांक 26 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये (माण (गवारेवाडी), बापूजीबुवा मंदिराजवळ, विठ्ठल रुखुमाई मंदिर, ता.मुळशी, जि.पुणे) येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
पुरस्कार प्रदान कार्यक्रमप्रसंगी बोलताना सौ. बाळूमावशी धुमाळ म्हणाल्या ‘वारकरी संप्रदायाच्या योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.’
विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये वर्धापनदिनानिमित्त काकड आरती, होमहवन, दाभाडे महाराज कोळवण यांचा हरिपाठ, महाप्रसाद, संगीत भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
डीएसके गप्पांना २ एप्रिलपासून प्रारंभ
पुण्यात 60 नवे मोबाईल टॉवर्स तर ठाण्यातील रिलायन्स 4G टॉवर्सची एसीबीकडून चौकशी …
पुणे- मोबाईल ग्राहकांना “टू जी‘ आणि “थ्री जी‘ची सेवा वेगाने मिळावी. यासाठी पुणे जिल्ह्यात 60 नवे मोबाईल टॉवर्स बसविण्यात येत आहेत. जूनपर्यंत टॉवर्स बसविण्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती भारत संचार निगम लिमिटेडचे (बीएसएनएल) सरव्यवस्थापक (नेटवर्क ऑपरेशन) अरविंद वडनेरकर यांनी दिली. तर दुसरीकडे ‘रिलायन्स 4G टॉवर्सची एसीबीकडून चौकशी करा असे निर्देश उपसभापती वसंत डावखरे यांनी विधान परिषदेत दिले आहेत
वडनेरकर म्हणाले, “”महाराष्ट्रात सध्या सात हजार मोबाईल टॉवर्स उपलब्ध आहेत. जून अखेरपर्यंत राज्यात एक हजार नवे टॉवर्स बसविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये पाचशे “टू जी‘ आणि पाचशे “थ्री जी बीटीएस‘ (बेस ट्रान्सिव्हर स्टेशन) बसविण्यात येत आहेत. पुणे जिल्हात 760, पुणे शहरात 550 मोबाईल टॉवर्स आजमितीला आहेत. अधिक टॉवर्स बसविल्याने मोबाईल ग्राहकांना “टू जी‘ व “थ्री जी‘चे कव्हरेज चांगले मिळेल. तसेच इंटरनेटची सुविधा वेगाने मिळेल.‘
ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत रिलायन्स कंपनीतर्फे फोर जी टेक्नोलॉजीसाठी ऑप्टिकल केबल टाकण्यासाठी रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले होते. या कामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्यामुळे त्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) चौकशी करण्याचे निर्देश उपसभापती वसंत डावखरे यांनी विधान परिषदेत दिले आहेत.
निरंजन डावखरे यांनी लक्षवेधीद्वारे हा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला होता. फोरजी तंत्रज्ञानासाठी रिलायन्सला खड्डे खोदण्याचे कंत्राट दिले गेले होते. यासाठी प्रत्येक प्रति चौ. मीटर खड्ड्यासाठी ७२ रुपये दर आकारण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला होता. १५ फेब्रुवारी २०१५ रोजी विद्यमान पालिका आयुक्तांनी मूळ ७२ रु. प्रति चौ. मीटर दराचा निर्णय रद्द केला. त्याऐवजी रु. १५०० प्रति चौ. मीटर असा नवीन दर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. वास्तविक फोरजी टॉवरमधून उत्सर्जित होणाऱ्या रेडिएशनमुळे कॅन्सर आणि इतर जीवघेण्या आजारांचा धोका वाढू शकतो, त्यामुळे रिलायन्स कंपनीच्या टॉवरना परवानगी देऊ नये, अशी निवेदने ठाण्यातील लोकप्रतिनिधींनी दिली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करत महापालिकेने वाढीव दराने खड्डे खोदण्याचे काम रिलायन्सला दिले, असा आरोप निरंजन डावखरे यांनी केला.
ठाण्यात एकूण ७६५ मोबाइल टॉवर आहेत. त्यापैकी २८ टॉवरनी परवानगी मागितलेली असून फक्त १८ टॉवर महापालिकेतर्फे अधिकृत करण्यात आलेले आहेत. बाकीच्या टॉवरची अद्याप तपासणीही झालेली नाही. DOT च्या नियमावलीतील बाबींची पूर्तता केली आहे की नाही, याचीही तपासणी झालेली नाही. या सर्व टॉवर आणि रिलायन्सच्या खड्डे खोदण्याच्या प्रकरणाची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी उत्तरात सांगितले
पाकिस्तान शत्रूच आहे हे ठसवण्यासाठी भारतात होते ब्रेन वॉशिंग- नसिरुद्दीन
नवी दिल्ली-भारतात पाकिस्तान हा आपला शत्रूच आहे हे लोकांच्या मनावर ठसवण्यासाठी त्यांचं ब्रेन वॉशिंग केलं जातं,’ असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी केलं आहे. नसीर यांच्या या वक्तव्याला पाकिस्तानी मीडियात सध्या प्रचंड प्रसिद्धी मिळत असून त्यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे.‘पाकिस्तानात आमचं नेहमी खुल्या दिलानं स्वागत केलं जातं. पण भारतात पाकिस्तानी कलाकारांना नेहमीच विरोध केला जातो असेही सांगत त्यांनी भारत -पाक संबधात भारतालाच दोषी ठरवणारे विधान केल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे .
‘अँड देन वन डे: अ मेम्वार’ या आपल्या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी नसीरुद्दीन शाह यांनी नुकताच पाकचा दौरा केला. या दौऱ्यातील स्वागतामुळं भारावलेल्या नसीर यांनी भारतात आल्यानंतर ‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटला सविस्तर मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी पाकिस्तानी लोकांच्या मनात भारताबद्दल असलेल्या प्रेमभावनेचं कौतुक केलं आहे, तर पाकविरुद्ध भारतात सुरू असलेल्या दे्वषपेरणीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
नसिरुद्दीन यांनी काय म्हटले आहे ते पाहू यात ….
भारतात पाकच्या कलाकारांना कार्यक्रम करण्यास विरोध केला जातो, हे खूपच वेदनादायी आहे. अलीकडंच अहमदाबादेत पाकिस्तानी कलाकारांच्या कलाकृती उद्ध्वस्त केल्या गेल्या. याउलट पाकिस्तानात दोन्ही हात पसरून लोक आमचं स्वागत करतात.मी पाकिस्तानला जात-येत असतो. तेथील लोकांशी संपर्क ठेवणं मला महत्त्वाचं वाटतं. तेथील लोकांशी आपलं नातं निर्माण व्हायला हवं. माझ्या या मताशी मी मुस्लिम असण्याचा काहीएक संबंध नाही. पाकिस्तानचा द्वेष करून आपल्याला काय मिळतं? हे म्हणजे दादागिरी करण्यासारखंच आहे. शेवटी तो आपला शेजारी आहे.दोन्ही देशांमध्ये जो दुरावा आहे तो राजकीय आहे. तो मिटायला हवा. आपण जोपर्यंत त्यांच्याशी संवाद साधणार नाही, तोपर्यंत हा दुरावा कमी होणार नाही. भारतानं जे काही मिळवलंय, त्याच्याविषयी पाकिस्तानी लोकांना मोठं कुतूहल आणि आदर आहे. पण इथं पाकिस्तान हा शत्रू आहे, असंच भारतीयांना सांगितलं जातं. भारत-पाकिस्तानची ऐतिहासिक पार्श्वभूमी कधीच सांगितली जात नाही.पाकिस्तानात माझ्यासारख्या कलाकारांना खूप प्रेम मिळतं. ते लोक सलमान, शाहरुखचे वेडे आहेत. ओम पुरी आणि फारुख शेखवरही ते प्रेम करतात. मला तिथं खूपच ‘खास’ असल्यासारखं वाटतं. पाकमध्ये माझ्या पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद मिळेल अशी आशा होती आणि तो मिळालाही. भारताकडून मला ती आशा नव्हती.
गीतरामायणाच्या खास हीरकमहोत्सवी सोहळ्यास हजारो रसिकांचा प्रतिसाद
पुणे —
महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव म्हणून घराघरात लोकप्रिय झालेल्या ‘गीतरामायणा’स यंदाच्या रामनवमीस साठ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त भारतीय शिक्षण मंडळ ( प. महाराष्ट्र ), संतोष पोतदार इव्हेंट्स ( पुणे ), आणि पर्पल इव्हेंट्स (मुंबई ) यांच्यातर्फे गरवारे महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आलेल्या गीतरामायणाचा खास हीरकमहोत्सवी सोहळ्यास आजपासून हजारो रसिकांच्या उपस्थितीत शानदार प्रारंभ झाला. ‘गदिमा’ आणि बाबूजी उर्फ सुधीर फडके यांच्या गीतरामायणाच्या ‘टीम’ मध्ये अगदी प्रथमपासून सहभागी असलेले ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग, पुण्याचे महापौर दत्ता धनकवडे, बाबूजींचे चिरंजीव आणि गायक व संगीतकार श्रीधर फडके, गदिमांचे चिरंजीव श्रीधर माडगुळकर, ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या सोहळ्याचा शुभारंभ झाला. याप्रसंगी पृथ्वी एडिफीसचे अभय केले, निरामय वेलनेसचे योगेश आणि अमृता चांदोरकर संतोष पोतदार, धनंजय कुलकर्णी व भारतीय शिक्षण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. गरवारे महाविद्यालयाचे पटांगण पाच हजार आसन क्षमतेचे होते रसिकांनी खचाखच भरलेल्या व त्याद्वारे गीत रामायणावर मनापासून प्रेम करणाऱ्या सर्व रसिकांचे श्रीधर फडके यांनी आभार मानले. हीरकमहोत्सवी रामायणाचा भाग-२ शुक्रवार दि २७ मार्च रोजी संपन्न होईल यामध्ये हिंदी गीत रामायणाची पाच गीते सादर होतील व श्रीधर फडकर मराठी गीत रामायणातील दहा गीते सादर करतील.
याप्रसंगी श्रीधर माडगुळकर यांनी ‘गीत रामायणाच्या आठवणी जागवताना,गीतरामायणाचा पहिला कार्यक्रम आपल्या व्रतबंधनानिमित्त ‘पंचवटी’ या गदिमांच्या घरी स्वत: गदिमा आणि बाबूजींच्या उपस्थितीत झाला व तो ऐकायला रस्त्यावर शेकडो लोक जमले होते असे सांगितले तसेच गीतरामायणाच्या सुवर्ण महोत्सवीवर्षानिमित्त श्रीधर फडके यांचा गीतरामायणाचा पहिला कार्यक्रम गदिमांच्या ‘माडगुळे’ या गावी झाल्याचा योगायोगही त्यांनी सांगितला. महापौर दत्ता धनकवडे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात गीतरामायणामुळे सर्वसामान्य जनतेवर चांगले संस्कार झाल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन विनया देसाई यांनी केले.
तत्पूर्वी गदिमांचे नातू सुमित्र माडगुळकर आणि प्राजक्ता माडगुळकर यांनी संपादित केलेल्या गदिमांच्या संग्रहित साहित्य असलेल्या ‘गदिमा -मेगा -एम-३’ या डीव्हीडीचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी गदिमांच्या ज्येष्ठ कन्या वर्षाताई पारखे उपस्थित होत्या .
प्रारंभी संस्कृत पंडित सी. भा. दातार यांनी संस्कृतमध्ये अनुवादित केलेली गीतरामायणातील चार गाणी नुपूर देसाई, तन्वी केळकर,
मिताली जोशी आणि रोहित गुळवणी या सांगलीच्या बालकलावंतांनी सादर केली. या कार्यक्रमाचे निवेदन दीपक पाटणकर यांनी केले. यावेळी टाळ्यांच्या प्रचंड गजरात श्रोत्यांनी या बालकलावंतांचे कौतुक केले.
त्यानंतर मुख्य कार्यक्रमात गायक व संगीतकार श्रीधर फडके यांनी, ‘स्वये श्री… ‘ , शरयू तीरावर… ‘, दशरथा घे हे पायसदान ….’., ‘राम जन्मला ग सखे, ‘सावळा ग राम …’, ज्येष्ठ तुझा पुत्र… ‘ ‘चला राघव … ‘, ‘रामा चरण तुझे… ‘ , आकाशाशी जडले नाते …’. ‘निरोप कसला माझा घेता … ‘, ‘थांब सुमंता … ‘, ‘नकोस नौके परत फिरु… ‘ गीतरामायणातील गाणी म्हणून रसिकांना मंत्रमुग्ध केले. ;यावेळी त्यांना तुषार आंग्रे (तबला ), उद्धव कुंभार ( तालवाद्य), किमया काणे व विनय चेउलकर ( सिंथेसायझर ) यांनी साथसंगत केली. गीतरामायणाचे रसाळ निवेदन धनश्री लेले त्यांनी केले.
प्रारंभी भारतीय शिक्षण संस्थेचे श्री प्रकाश दाबक यांच्या हस्ते या सोहळ्याचे मुख्य प्रायोजक पृथ्वी एडिफीसचे अभय केले तसेच निरामय वेलनेसचे योगेश आणि अमृता चांदोरकर यांचा सत्कार करण्यात आला. पुण्याचे महापौर दत्ता धनकवडे व इतर मान्यवरांच्या हस्ते सर्वश्री श्रीधर माडगुळकर, प्रभाकर जोग, ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, श्रीधर फडके आदींचा सत्कार झाल्यानंतर भारतीय शिक्षण संस्थेचे सचिव वामनराव गोगटे यांनी आपल्या प्रास्ताविकात या सोहळ्याची कल्पना विशद केली. तीन दिवस चालणाऱ्या गीतरामायणाच्या या खास हीरकमहोत्सवी सोहळ्याचे पृथ्वी एडिफीस, निरामय वेलनेस आणि भारती विद्यापीठ हे प्रायोजक आहेत.
मनसे नगरसेवक मोरे यांना हवे पोलिस संरक्षण
लोकप्रतिनिधींना काम करत असताना वारंवार गुन्हेगारांचा सामना करावा लागतो. प्रभागात तसेच शहरात विविध कामांसाठी फिरावे लागते. याप्रकरणाची दखल घेत पोलिसांनी शहरात कायदा व्यवस्था राखण्याच्या दृष्टीने गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा. भविष्यात होणाऱ्या हल्ल्याच्या शक्यतेने मनसेच्या नगरसेवकांच्या सहीनिशी दिलेल्या पत्रकात पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी मोरे यांनी केली आहे
वीजबील भरणा शनिवारी व रविवारी सुरु
रक्ताच्या नातेवाईकांसाठी स्टॅम्पड्युटी माफ-खडसे यांच्या निर्णयाचे जोरदार स्वागत
विश्वकरंडक क्रिकेट सामन्यादरम्यान बेटिंग करणा-या 5 सट्टेबाजांना अटक
एकवीरा यात्रेत भाविकांच्या सेवेसाठी 10 रुग्णवाहिका सुसज्ज
पुणे :
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणार्या ‘महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’च्या ‘डायल 108’ च्या 10 सुसज्ज रूग्णवाहिका एकवीरा यात्रेत भाविकांच्या सेवेसाठी दाखल झाल्या आहेत.
लोणावळाजवळील वेहेरगांव कार्ला येथील श्री एकवीरा देवीच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील लाखो भाविक दर्शनासाठी गडावर येतात. दिनांक 26 व 27 मार्च 2015 रोजी ही यात्रा होत असून, येणार्या भाविकांना आपत्कालीन सेवेसाठी आणि तपासणीसाठी रूग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती ‘बी.व्ही.जी. इंडिया’चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. ज्ञानेश्वर शेळके आणि विभागीय अधिकारी डॉ. विनय यादव यांनी दिली.
‘108’ हा दूरध्वनी डायल केल्यानंतर ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस’च्या सुसज्ज रुग्णवाहिका मदतीला येतात. यात्रेदरम्यान वेळेवर तातडीचे वैद्यकिय उपचार देण्यासाठी ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
‘डायल 108’ रूग्णवाहिकांमध्ये व्हेंटीलेटर (कृत्रिम श्वसन) अशी आधुनिक वैद्यकीय उपकरणे आहेत. रुग्णालयात पोहोचेपर्यंत आपत्कालीन उपचार करण्यासाठी या रुग्णवाहिकेत डॉक्टर आणि सहाय्यकही असणार आहेत. ही सेवा विनामूल्य आहे.
‘26 जानेवारी 2014 रोजी सुरू झालेल्या या सेवेत अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा 937 रुग्णवाहिका राज्यभर आहेत. फेबु्वारी 2015 पर्यंतच्या तपशीलानुसार 2 लाख 40 हजार 790 जणांना अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवेचा लाभ मिळाला आहे.
पोरी जरा जपून दांडा धर… दिग्दर्शक जाधवांनी केला कल्ला
झी चित्र गौरवची गगनभरारी
रविवार २९ मार्चला झी मराठीवर
मराठी चित्रपटसृष्टी आशयविषयदृष्ट्या अधिक संपन्न होत आहे, मराठीमध्ये आता कोटीचा गल्ला ही साधारण बाब झाली आहे, मराठी चित्रपट तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम झाला आहे, मराठीचा प्रेक्षकवर्ग वाढला आहे, मराठीत नवनवीन प्रयोग होत आहेत.. थोडक्यात काय तर मराठी चित्रपटसृष्टी कात टाकतेय.. मराठी चित्रपटसृष्टीबद्दलची ही विधाने आपण सतत ऐकत, वाचत आणि बोलत असतो. या सर्व बदलांना जवळून बघणारा आणि त्या बदलांची दखल घेत चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि तंत्रज्ञांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी गौरव पुरस्कार. दरवर्षी अत्यंत दिमाखदारपणे पार पडणा-या या सोहळ्याच्या रंगांमध्ये अवघ्या मराठी चित्रपटसृष्टीचं रंगून जाणे ही आता परंपराच बनली आहे. भव्यतेची हीच परंपरा पाळत झी गौरवचा यावर्षीचा सोहळाही यशस्वीपणे पार पडला. विशेष म्हणजे यावर्षीपासून झी गौरवचे चित्रगौरव आणि नाट्यगौरव असे दोन वेगळे सोहळे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला झी चित्र गौरवचा शानदार सोहळा येत्या रविवारी २९ मार्चला सायंकाळी ७ वा. झी मराठीवर प्रसारीत होणार आहे.
मराठी चित्रपटाची गगनभरारी अशी यावर्षीची संकल्पना असलेल्या या पुरस्कार सोहळ्यासाठी खास विमानाची भव्यदिव्य प्रतिकृती मंचावर उभारण्यात आली होती. ‘चला हवा येऊ द्या’ फेम भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे यांच्यासह संदिप पाठक, हेमांगी कवी यांच्या धम्माल स्किट्स, लोकप्रिय नायिकांच्या नृत्याच्या दिलखेचक अदा आणि डॉ. निलेश साबळे व सई ताम्हनकर यांचं खुमासदार सूत्रसंचालन याने कार्यक्रमात जोरदार रंगत आणली.
यावर्षी चित्रगौरवसाठी एकूण ६१ चित्रपटांची एन्ट्री झाली होती. यात प्रामुख्याने ‘लय भारी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘क्लासमेट्स’, ‘पोश्टर बॉईज’, ‘लोकमान्य – एक युगपुरूष’ या चित्रपटांमध्ये चुरशीची टक्कर होती. आपलं सगळंच लय भारी म्हणत यावर्षी मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री घेणा-या रितेश देशमुखला ‘लय भारी’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तर ‘लोकमान्य-एक युगपुरूष’ या चित्रपटातील प्रभावी अभिनयासाठी सुबोध भावेला विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात आला. ‘तिचा उंबरठा’ चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी तेजस्विनी पंडितने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर ‘किल्ला’ चित्रपटातील संवेदनशिल अभिनयासाठी अमृता सुभाषने विशेष ज्युरी पुरस्कार पटकावला. सर्वोत्कृट चित्रपटासाठी ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘लय भारी’, ‘लोकमान्य – एक युगपुरूष’, ‘पोश्टर बॉईज’ आणि ‘हॅपी जर्नी’ या चित्रपटांमध्ये चुरस होती यात ‘एलिझाबेथ एकादशी’ ने सरशी घेत बाजी मारली.
यावर्षीच्या चित्रगौरव पुरस्कारात जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी ठरल्या ज्येष्ठ गायिका तथा लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, एन. चंद्रा ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक कमलाकार सोनटक्के यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी सुलोचनाताईंनी प्रेक्षकांच्या विनंतीवरून “फड सांभाळ तु-याला गं आला” ही लावणी त्याच सदाबहार अंदाजात गायली आणि ख-या कलाकाराला वयाचं बंधन नसतं हे दाखवून दिलं. त्यांच्या आवाजाने रोमांचित झालेल्या समस्त प्रेक्षकांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात त्यांना अभिवादन केले. तत्पूर्वी सुलोचनाबाईंच्या लोकप्रिय लावण्यांवर सोनाली कुलकर्णी, भार्गवी चिर्मुले, मानसी नाईक, पूजा सावंत आणि स्मिता तांबे यांनी बहारदार नृत्यही सादर केलं.
कार्यक्रमात कलाकारांच्या नियोजीत परफॉर्मन्ससोबतच काही सरप्राइज परफॉर्मन्सही प्रेक्षकांना बघायला मिळतील ज्यात दिग्दर्शक संजय जाधव आणि रवी जाधव यांचं ‘शिट्टी वाजली’ गाण्यावरचं धम्माल नृत्य, महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांनी त्यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकरसोबत खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली या गाण्यावर धरलेला ठेकाही प्रेक्षकांना आवडेल.
एकंदरीत गाणी, नृत्य, धम्माल विनोद आणि पुरस्कार स्वीकारतानाचे काही हळवे क्षण असा मनोरंजनाचा पुरेपूर मसाला असलेला झी चित्र गौरवचा सोहळा येत्या रविवारी सायंकाळी ७ वा. झी मराठीवरून प्रसारीत होणार आहे.
तयार असलेल्या विहीर,बोअरवेलसाठी नवीन वीजजोडणीचा धडक कार्यक्रम
पुणे, : शेतात विहीर किंवा बोअरवेल तयार आहे परंतु वीजजोडणी नाही अशा
शेतकर्यांना कृषीपंपासाठी नवीन वीजजोडणी देण्याचा धडक कार्यक्रम महावितरणकडून
राबविण्यात येत आहे.
पुणे परिमंडलातील ज्यांच्या शेतात विहीर किंवा बोअरवेल उपलब्ध आहे व
कृषीपंपासाठी नवीन वीजजोडणीची मागणी आहे, अशा शेतकर्यांनी नवीन वीजजोडणीचा
ए-1 अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह दि. 20 एप्रिल 2015 पर्यंत संबंधीत उपविभाग
कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
तसेच ज्या शेतकर्यांच्या कृषीपंपासाठी वीजजोडणी उपलब्ध आहे परंतु विहीर किंवा
बोअरवेल खचल्यामुळे, बुजल्यामुळे किंवा निकामी झाल्यामुळे पाण्याचा उपसा होत
नसतानाही वीजदेयक येत आहे, अशा शेतकर्यांनी वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करून
घ्यायचा असल्यास त्यांनी दि. 20 एप्रिल 2015 पर्यंत संबंधीत उपविभाग कार्यालयाशी
कृषीपंपाच्या नवीन वीजजोडणीसाठी किंवा असलेली वीजजोडणी कायमस्वरुपी खंडित
करण्यासाठी कृषीपंपधारकांनी टोल फ्री असलेल्या 180020033435 आणि 18002333435
या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
चेंजमेकर्स चा हा महिला सबलीकरणाचा उपक्रम आगळा वेगळा : खासदार सुप्रिया सुळे
पुणे :
‘स्वत:मध्ये आणि आपल्या सभोवतालामध्ये बदल, परिवर्तन घडवून आणण्याची महिलांची, नागरिकांची शक्ती लक्षात घेवून त्यातून स्थानिक पातळीवर व्यापक बदल घडविण्यासाठी ‘चेंजमेकर्स’ या ‘लोकल एरिया मॅनेजमेंट’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होेते. पुणे महानगरपालिकेचे सहकार्य लाभलेला हा उपक्रम स्पर्धात्मक होता. विजेत्यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली.
हा कार्यक्रम आज दिनांक 25 मार्च रोजी दुपारी बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न झाला.
यावेळी ‘स्माईल’ च्या संस्थापक, खासदार अॅड.वंदना चव्हाण, महापौर दत्ता धनकवडे, स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, रवींद्र माळवदकर, दर्शना परमार, मकरंद टिल्लू, रवी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. ‘ईश्वर परमार ग्रुप’, ‘संजय कुंभारे गु्रप’ यांनी या उपक्रमासाठी सहयोग दिला.
खा.सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या, ‘‘चेंजमेकर्स’ हा वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला महिला सबलीकरणाचा हा उपक्रम आगळा वेगळा आणि स्तुत्य आहे. उपक्रमातील सहभागी महिलांनी केलेल्या कामाच्या चित्रफिती पहाताना त्यांच्या कामाचे कर्तृत्व लक्षात येते. या सर्व चित्रफिती पाहून मलाही या महिलांकडून खूप काही शिकायला मिळाले. महिलांमध्ये कायम सातत्य व चिकाटी असते, त्यामुळे अशा प्रकारचा उपक्रम इथेच न थांबता तो कायम सुरू रहावा व राहील अशी मला खात्री आहे.’
खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘स्माईल संस्थेच्या ‘चेंजमेकर्स’ या ‘लोकल एरिया मॅनेजमेंट’ उपक्रमाला पुण्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दि. 5 जून 2014 रोजी शुभारंभ करण्यात आलेल्या ‘चेंजमेकर्स’ उपक्रमात 125 गटांनी सहभाग घेतला. या उपक्रमामुळे महिलांमध्ये, नागरिकांमध्ये सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढला. स्थानिक पातळीवर व्यापक बदल घडविण्यासाठी महिलांना-नागरिकांना कार्यरत करणार्या ‘चेंजमेकर्स’ या उपक्रमाचा उपयोग होत आहे.’
‘छोटी छोटी पावले मोठे बदल घडवून आणतात, यावर विश्वास असणार्या नागरिकांसाठी ‘चेंजमेकर्स’ हे एक उत्तम व्यासपीठ आहे. आपण बदल घडवू शकतो, याचा अनुभव या उपक्रमात सहभागी झालेला प्रत्येक महिलेने आणि नागरिकांनी अनुभवले. सरकारच्या बरोबरीने प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून स्थानिक पातळीवर पाऊले उचलणे अपरिहार्य झाले आहे. त्यामुळे हा उपक्रम पुण्यात सुरू केला, असेही खा.वंदना चव्हाण यांनी सांगितले.
महापौर दत्ता धनकवडे बोलताना म्हणाले, ‘पुणे महानगरपालिकेचे सहकार्य लाभलेला ‘चेंजमेकर्स’ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. महिलांनी आणि नागरिकांनी एकत्र येऊन अशाप्रकारे गटाद्वारे उपक्रम केल्यास पुणे शहर बदलायला वेळ लागणार नाही.’
शहरातील विविध भागांत नागरिकांचे गट तयार करून निवडलेल्या परिसरातून विकास घडविण्यासाठी पुढाकार घेऊन चांगले उपक्रम परिसरात राबविण्यासाठी ‘चेंज मेकर्स’ च्या या उपक्रमात सहभागी झालेल्या महिला पुण्यातील सिंहगड रस्ता, सहकारनगर, वारजे- कर्वेनगर, पर्वती, बिबवेवाडी, भवानी पेठ, कोंढवा -वानवडी परिसर या विभागातील होत्या. या स्पर्धेचे परिक्षण महाराष्ट्र टाईम्स चे पराग करंदीकर, आणि लोकसत्ताचे मुकुंद संगोराम आणि खा. अॅड. वंदना चव्हाण यांनी केले होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुजाता शेणई यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी विविध महिला गटांनी विविध गुणदर्शनाचे सादरीकरण केले. ‘चेंजमेकर्स’च्या प्रमुख समन्वयक नीला विद्वांस आणि त्यांच्या सहाय्यक संजिवनी जोगळेकर व प्रदीप्ता कुलकर्णी यांनी या चेंजमेकर्स उपक्रमासाठी समन्वयक म्हणून काम पाहिले. पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी समूह संघटीकांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी माजी महापौर चंचला कोद्रे, वैशाली बनकर, रूपाली चाकणकर, शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ, माजी आमदार बापू पठारे, कमल ढोले-पाटील, मनाली भिलारे (संघटक युवती राष्ट्रवादी काँग्रेस), श्वेता होनराव, सुहास पटवर्धन आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :
प्रथम क्रमांक (विभागून) –
1)जनता वसाहत, वैदुवाडी- वैशाली दारवटकर-रोख पन्नास हजार रूपये
2) अंजली लोखंडे -रोख पन्नास हजार रूपये
द्वितीय क्रमांक (विभागून):
1) पद्मा कांबळे -रोख पंचवीस हजार रूपये
2) राणी खत्री- रोख पंचवीस हजार रूपये
तृतीय क्रमांक (विभागून)
1) नीलिमा पारवडे (गॅस दुरूस्ती)-रोख साडे बारा हजार रूपये
2) दांडेकर पूल सुरेखा भोसले- रोख साडे बारा हजार रूपये
उत्तेजनार्थ ः प्राजक्ता कलगुंडे , संध्या शिर्के, सुषमा पाचंगे
विशेष पुरस्कार – शैला साठे (शौर्य ः सुतारदरा), शीतल कुंभार (महिला सक्षमीकरण ), माधुरी कुंभारे (ज्येष्ठ नागरिक)
उल्लेखनीय : नीता तुपारे
——————————
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हिंदी ‘क्वीन’ कंगना राणावत-सर्वोत्कृष्ट
पहा या चित्रपटाचा ट्रेलर











