Home Blog Page 3610

‘वाल्या टू वाल्मिकी’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

1

  मराठी रुपेरी पडद्यावरच्या वैविध्यपूर्ण चित्रपटांच्या प्रभावी निर्मितीला प्रेक्षकवर्गाने नेहमीच मनापासून दाद दिली आहे. वाल्या टू वाल्मिकी हा असाच एक वेगळा आशयघन चित्रपट निर्माते श्रीकांत शेणॅाय व कार्यकारी निर्मात्या शुभांगी शेणॅाय घेऊन येत आहेत.

 

श्रीकांत शेणॅाय निर्मित संजय कसबेकर व पंकज भिवाजी दिग्दर्शित वाल्या टू वाल्मिकी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच कर्जतच्या निसर्गरम्य परिसरात संपन्न झाला. विचित्र परिस्थितीत अडकलेल्या माऊली या मुलाची ही कथा आहे. माऊलीच्या प्रवासात त्याला अनेकजण भेटतात. या सगळ्यांमुळे माऊलीच्या आयुष्याला कलाटणी मिळते. या कलाटणीमुळे माऊलीच्या आयुष्याला दिशा मिळणार की तो दिशाहीन होऊन भरकटत जाणार? याची भावस्पर्शी कथा आपल्याला

‘वाल्या टू वाल्मिकी  या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

 

चित्रपटाची कथा व संवाद मनिष कदम यांचे आहे. गीते प्रवीण दामले यांची असून अश्विन भंडारे यांनी संगीत दिले आहे. गायक आदर्श शिंदे व अश्विन भंडारे यांनी या चित्रपटातील गीते गायली आहेत.या चित्रपटाचे छायाचित्रण राज रेवणकर यांनी केलं आहे. वर्णन पिक्चर्स बॅनरखाली तयार होणाऱ्या वाल्या टू वाल्मिकी  या चित्रपटात मिलिंद शिंदे, संजय खापरे पंकज विष्णू, मौसमी तोंडवळकर,  संजय कसबेकर, मास्टर वरुण दामोदर बाळीगा यांच्या भूमिका आहेत.

जॅकी श्रॉफ यांनी धरला कव्वालीवर ठेका…

1 2 3 4 6

आजमितीला महाराष्ट्रात गजानन महाराजांचे असंख्य भक्तगण आहेत. या भक्तगणांसाठी निर्माते दीपक गोरे व दिग्दर्शक पितांबर काळे ‘शेगावीचा योगी गजानन’ हा भक्तीमय चित्रपट घेऊन येत आहेत.

गजानन महाराजांच्या माहात्म्यावर आधारलेल्या या चित्रपटातील एका कव्वालीचे चित्रीकरण नुकतेच पार पडले. यात प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ  यांनी एका कव्वालीवर ठेका धरला. ‘तू ही ताज तू ही साई’ असे बोल असलेल्या कव्वालीवर जॅकी श्रॉफ तल्लीन होऊन नाचले. या कव्वालीचं नृत्यदिग्दर्शन भूपी दास यांनी केलं आहे. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते अनुप गोरे आहेत. बऱ्याच कालावधीनंतर मराठी चित्रपटात चक्क एका कव्वालीवर परफॉर्म करायला मिळाल्याचा आनंद यावेळी जॅकी श्रॉफ यांनी व्यक्त केला.

प्रवीण दवणे यांनी लिहिलेल्या या कव्वालीला संगीतकार नंदू होनप यांचं सुमधुर संगीत लाभलं आहे. गजानन महाराजांच्या जीवन चरित्रावर  आधारलेल्या या चित्रपटातून जीवनाचा सकारात्मक पैलू समाजासमोर आणण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

जॅकी श्रॉफ, मिलिंद गुणाजी, संजय खापरे, भारत गणेशपुरे, दिपाली सय्यद, प्रेमा किरण, पूनम विणेकर यांच्या लक्षवेधी भूमिका या चित्रपटात आहेत.

‘मला वेड लागले संतांचे’ रंगभूमीवर….

महाराष्ट्र भूमी ही वारकऱ्यांची, संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. ज्ञानेश्वर महाराजांपासून ते तुकाराम महाराजांपर्यंत आणि स्वामी समर्थांपासून साईबाबांपर्यंत अशी महान संतांची थोर परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. आजच्या धावपळीच्या युगात या संतांच्या विचारांचा कुठेतरी विसर पडला आहे, म्हणूनच मानवाची मन:शांती हरवत चालली आहे. संतांच्या याच विचाराची आठवण करून देण्यासाठी गायक-संगीतकार-अभिनेता त्यागराज खाडिलकर ‘मला वेड लागले संतांचे’ हे नाटक रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. या नाटकात त्यागराज खाडिलकर यांनी ३३ पात्र साकारली आहेत.

‘मोक्ष आर्ट्स’च्या बॅनरखाली वीणा खाडिलकर यांनी या नाटकाची निर्मिती केली असून या नाटकाचे लेखन आणि संगीत त्यागराज खाडिलकर यांचेच आहे. या नाटकाचे नेपथ्य आणि दिग्दर्शन ज्ञानेश्वर मर्गज यांनी केले आहे. अनेक पुरस्कार प्राप्त युवा किर्तनकार वीणा खाडिलकर यांनी या नाटकाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. वारकरी संप्रदाय आणि नारदीय संप्रदायाच्या वारसा लाभलेल्या वीणा खाडिलकर यांना तीन पिढ्यांची किर्तनाची परंपराही लाभली आहे. ‘मला वेड लागले संतांचे’ या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला आ. डॉ. नीलमताई गोऱ्हे आणि विठ्ठल कामत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

मला वेड लागले संतांचे’ हे नाटक म्हणजे संतविचारांचं भांडार आहे. महाराष्ट्रावर थोर संतांच्या विचारांचा पगडा आहे. पण आज धकाधकीच्या जीवनात, इंटरनेटच्या युगात संताचे साहित्या वाचायला कोणाला वेळच मिळत नाही. त्यामुळे तरुण पिढी या अध्यात्मिक साहित्यापासून दूर गेली आहे. त्यांना संतांच्या विचारांचाही विसर पडला आहे. त्यांची आत्मतत्व, जगण्याची दिशा आणि मन:शांती हरवली आहे. आजच्या युगात मन:शांती लाभाण्यासाठी संतविचारांची खरी गरज समाजाला आहे. याचं विचारातून ‘मला वेड लागले संतांचे’ ही संकल्पना निर्माण झाली.

किर्तन प्रवाचनाद्वारे संतांचे विचार मांडण्यापेक्षा नाट्यरूपात ते समोर आले, तर आजच्या पिढीला पटकन पटतील आणि रुजतीलही या जाणीवेतून हे नाटक उभं राहिलं आहे. ‘मला वेड लागले संतांचे’ हे नाटक संगीतप्रधान आहे. संत ज्ञानेश्वर, नामदेव, चोखामेळा, जनाबाई, एकनाथ, रामदास, तुकाराम, गजानन महाराज, स्वामी समर्थ, साईबाबा या सर्व संतांच्या रचना गायन आणि नाट्याच्या माध्यमातून साकारल्या आहेत. संतांच्या रचनेबरोबरचं हृषिकेश परांजपे यांनी गजानन महाराज, स्वामी समर्थ, साईबाबा या संतांवर स्व: गीत रचनाही केल्या आहेत.

संतांची तत्त्वं कालातीत आहेत. ती एकनाथांच्या क्रोधावरील ताबा ते साईबाबांनी दिलेला श्रद्धा-सबुरीचा मंत्र कोणत्याही काळात उपयोगी पडणारा आहे. हाच महत्त्वाचा संदेश त्यागराज खाडीलकर यांनी या नाटकातून प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी सज्ज आहेत.

सूर्या सिरॅमीक दालनाला जॅकी श्रॉफ ची भेट

पुणे-येथील मार्केट यार्ड -गंगाधाम मागीलसूर्या सिरॅमीक दालनाचे उद्घाटनसमयी  प्रख्यात अभिनेताजॅकी श्रॉफ यांनी भेट दिली.

नव्या कल्पना लोकांपर्यंत पोहचविण्यास नेहमीच वेळ लागतो तरीही  समाजाच्या बदलत्या काळानुसार व्यवसायातही नव्या कल्पना आणणे,जुन्यात बदल करणे आज गरजेचे आहे,कोणत्याही  व्यवसाय चिकाटी आणि मेहनतीशिवाय सफलता मिळत नाही असे मत सूर्या सिरॅमीक दालनाचे उद्घाटन करताना पालक मंत्री गिरीश बापट यांनी यक्त केले.

सूर्या सिरॅमीक आणि डिस्ट्रीब्युटर्स, रॅक सिरॅमीक यांनी मिळून सुरु केलेल्या स्पेसेस या जागतिक दालनाच्या उद्घाटन
    प्रसंगी सूर्याचे संचालन राहुल भंडारी,मनोज भंडारी,बांधकाम व्यवसायातील सुभाष सणस निर्माता अ दिग्दर्शक सुनील दर्शन,सिने अभिनेते जॅकी श्रॉफ,  शेखर सुमन,शिवसेनेचे शहर संघटक अजय भोसले, रॅक सिरॅमीक  चे सी ओ ओ .पी पी सिंग ,संतोष निमा सेल्स मार्केटिंग चे राजीव सिंग जनरल मॅनेजर अनुप श्रीकुमार सेल्स मॅनेजर  पी  सर्वोत्तम राव आणि चे प्रेसिडेन्ट स्टीफन शेमिड आदि उपस्थित होते
2 3

चला महापालिकेला जागे करा फेसबुक वरून …

पुणे–

हेल्पलाइन, टोल फ्री क्रमांकानंतर आता  फेसबुक वर येत आहे — अर्थात महापालिकेला आता नागरिकांच्या माऱ्याला सामोरे जाण्याची हौस आल्याचे स्पष्ट झाले आहे . एकीकडे पिवळ्या -काळ्या पट्ट्यांच्या रबरी स्पीडब्रेकर ने हैराण झालेल्या दुचाकीस्वारांचा संताप व्यक्त होत असताना त्याचे समर्थन करू पाहणाऱ्या महापालिकेला आता यावरून शिव्यांची लाखोली हि सहन करावी लागण्याची शक्यता
नाकारता येणार नाही
महापालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती व्यापक पद्धतीने नाग‌रिकांपर्यंत पोहचविण्यासाठी महापालिका प्रशासनाने सोशल मीडियाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने स्वतंत्र फेसबुक खाते उघडले असून, त्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणींचे निवारण करण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. याबरोबरच पालिकेकडून ‘ई-न्यूज लेटर’ देखील प्रकाशित केले जाणार आहे.
गेल्या काही वर्षात प्रत्येक गोष्टीमध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषत: फेसबुक आणि व्हॉटस्अप चा वापर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचा फायदा घेत महापालिकेने एक पाऊल पुढे टाकून फेसबुक खाते काढण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाशी कनेक्ट असलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी पालिका प्रशासनाने ‘पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन’ या नावाने खाते सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून महापालिकेचे नवीन प्रकल्प, नवीन उपक्रम, योजना तसेच प्रस्तावित धोरणांची माहिती दिली जाणार आहे. महापालिकेच्या विविध विभागांमार्फत शहरात सुरू असलेल्या कामांची, उपक्रमांची माहिती देखील फेसबुकच्या माध्यमातून प्रसिद्ध केली जाणार आहे. पालिकेच्या कम्प्युटर आणि सांख्यिकी विभागाच्या वतीने हे काम पाहिले जाणार आहे.
पालिकेच्या कामाबद्दलच्या तक्रारी तसेच पालिकेबाबतचे आपले मत नागरिकांना या खात्याच्या माध्यमातून थेट नोंदविता येणार आहे. यामुळे पालिकेशी संपर्क साधण्यासाठी शहरातील नागरिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. फेसबुकवर करण्यात आलेल्या तक्रारी संबधित विभागांना पाठविण्यात येणार असल्याने तातडीने त्याची दखल घेतली जाणार आहे. पालिकेशी संबधित बातम्या आणि महत्त्वाचे निर्णय न्यूज लेटरच्या माध्यमातून नागरिकांना वाचता येणार आहे.

हिंदू जनजागृती समिती कडून सनी लिओनला देशाबाहेर काढण्याची मागणी …सनीने देशात अश्लीलता पसरवली, मोदी यांच्याहून अधिक लोकप्रिय झाली … प्रवक्ते प्रमोद धुरी यांचा दावा …

0
मुंबई- हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते प्रमोद धुरी यांनी म्हटले आहे की सनी लिओनच्या नग्न व भडकाऊ फोटोमुळे अश्लीलता वाढीला लागली आहे. देशातील युवक बिगडू लागले आहेत व महिलांचा अपमान होऊ लागला आहे.गुगलचा हवाला देऊन त्यांनी सांगितले की, सनी लिओनची एवढी लोकप्रियता वाढीस लागली आहे तिने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मागे टाकले आहे. हा ट्रेंड देशासाठी घातक आहे. म्हणून तिच्याविरूद्ध कडक पावले उचलली पाहिजेत.
सनी लिओनीविरोधात डोंबिवलीतील रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सनी लिओनने आपल्या वेबसाईटवर तसेच सोशल नेटवर्किंग साईट्सवर अश्लिल व्हिडिओ व फोटो अपलोड करून समाजात अश्लीलता पसरवल्याचा आरोप लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा गुन्हा हिंदू जनजागृती समितीच्या प्रतिनधी असलेल्या महिलेच्या तक्रारीनंतरच पोलिसांनी नोंदवला आहे. त्यामुळे सनीविरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा (IT ACT) अंतर्गत कलम 67 आणि कलम 67 (अ) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, ही महिला हिंदू जनजागृती समितीशी संबंधित आहे. हिंदू जनजागृती समिनीने सनी लिओनला देशातून हाकलून देण्याबरोबरच भविष्यात तिला भारतात प्रवेश देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.
हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते प्रमोद धुरी यांनी म्हटले आहे की, सनी लिओनने आपल्या वेबसाईटमार्फत महिलांच्या दर्जाला ठेच पोहचवली आहे. त्यामुळे आमची स्थानिक प्रतिनिधी अंजली पालन यांनी तिच्याविरोधात प्राथमिक तक्रार दाखल केली आहे. याशिवाय मागील आठवडाभर महाराष्ट्र आणि गोव्यात विविध ठिकाणी डझनभरापेक्षा जास्त तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र पोलिसांनी अद्याप कोणतेही कारवाई केली नाही.

प्रमोद धुरी पुढे म्हणाले, आम्ही वेबसाईट बंद करण्याचा इशारा दिला आहे. मात्र ते प्रयत्न वायफळ ठरले आहेत. ही वेबसाईट छोटी छोटी मुलेही पाहू लागली आहेत. मागील आठवड्यात याबाबत आम्ही जेव्हा नवी मुंबईत एक तक्रार केली तेव्हा पोलिस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी सांगितले की, सनी त्याच्या फोटोंचा प्रचार करीत आहे. त्यांनी आम्हाला महिलांच्या इतर प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. शहरात महिलांना शौचालये नाहीत यावर काम करण्याचा सल्ला दिला आता यावर काय बोलायचे?

तीन महिन्यात पेट्रोल डीझेल दहा रुपयांनी महागले ;पुण्यापेक्षा दिल्लीत सुमारे १० रुपयांनी पेट्रोल डीझेल स्वस्त…

0

नवी दिल्ली – तीन महिन्यात पेट्रोल डीझेल दहा रुपयांनी महागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचे कारण देऊन केंद्र सरकारने एका पंधरवड्यात पेट्रोल व डिझेलच्या दरांत दुसऱ्यांदा मोठी वाढ केली आहे. नव्या दरांप्रमाणे पेट्रोल लिटरमागे 3 रुपये 13 पैशांनी, तर डिझेल 2.17 रुपयांनी कडाडले आहे. यामुळे दिल्लीत पेट्रोल लिटरमागे 63.16 वरून 66.29 रुपये लिटरवर झेपावेल, तर डिझेल 49.57 रुपयांवरून सुमारे 53 रुपयांपर्यंत जाईल. दिल्ली आणि पुण्यातील दारात चक्क १० रुपयांची तफावत असणार आहे म्हणजे पुण्यापेक्षा दिल्लीत सुमारे १० रुपयांनी पेट्रोल डीझेल स्वस्त  असणार आहे…  वर्षभरात खरोखर किती महागाई कमी झाली ? किती देश मोदी फिरले ?मोबाईल आणि इंटरनेट सेवेत खर्च कसा वाढला? याबाबत आता जनतेनेच आत्मचिंतन केलेले बरे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा येत्या 26 मे रोजी पहिला वर्धापन दिन सोहळा होईल त्या गाजावाजात पेट्रोलियम पदार्थांच्या किमती एखाद-दीड रुपयाने कमी करून देशवासीयांना जणू गोड भेट दिल्याची जाहिरात करण्याचे सरकारचे नियोजन असल्याने आजची दरवाढ लादण्यात आल्याचे समजते. गेल्या एक मे रोजी पेट्रोलचे दर 3.96 रुपयांनी व डिझेल 2.37 रुपयांनी कडाडले होते. देशांतर्गत पेट्रोल दरप्रक्रिया निर्बंधमुक्त केल्यावर “इंडियन ऑइल‘ व “भारत पेट्रोलियम‘सह चारही पेट्रोलियम उद्योगांतर्फे साधारणतः दर पंधरवड्याने दरांचा आढावा घेतला जातो. मात्र सरकारने एक दिवसापासून 12 ते 14 दिवसांतच पेट्रोलियमच्या दरांत चढ-उतार करण्याचे धोरण ठेवल्याचे गेल्या वर्षभराच्या वाटचालीवरून दिसत आहे. यापूर्वी सरकारने ऑगस्ट 2014 ते फेब्रुवारी 15 या काळात दहा वेळा केलेल्या एकूण पेट्रोल दरकपातीत लिटरमागे 17 रुपयांनी भाव घटले होते. मात्र तेलकंपन्यांनी गेल्या दोन महिन्यांत यातील सुमारे निम्मी तफावत दोन-तीन झटक्‍यांत भरून काढल्याचे दिसते. एक मार्चपासून पेट्रोल दरवाढीचे दणक्‍यावर दणके बसण्यास सुरवात झाली. 

 

 

 

झरी चित्रपटासाठी मराठी नायिकांचा खेडयात मुक्काम

2

एकीकडे मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी मजल मारतोय तर दुसरीकडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्येही मराठी चित्रपटाची सरशी पहायला मिळते आहे. मराठी फिल्ममेकर्स सिनेमासाठी सखोल अभ्यास आणि प्रचंड मेहनत घेतांना दिसताय, खैरलांजीच्या माथ्यावर हा ज्वलंत विषयावरचा चित्रपट बनवणारे दिग्दर्शक राजू मेश्राम यांनी त्यांच्या आगामी टी.एच.फिल्म्स व सिध्हीविनायक इन्फोमीडिया निर्मित (तुकाराम बिडकर, राधा बिडकर, कुंदन ढाके) आणि अनिल गावंडे प्रस्तुत झरी या मराठी चित्रपटासाठी चित्रपटातील नायिकांना भन्नाट अट घातली ती म्हणजे, त्यांनी भूमीकेसाठी तीन ते चार दिवस खेडयात जाऊन रहायचं ते देखील चित्रपटातील नायिका म्हणुन नाही तर सामान्य व्यक्ती म्हणुन आणि त्याप्रकारे दोन्ही नायिका नम्रता गायकवाड आणि निशा परुळेकर यांनी खेडयात मुक्कम केला.

गावात वीज नाही, दळणवळणाची कोणतीही साधनं नाही, मोबाइलला रेंज नाही, साध्या जगण्याच्या सोयी सुविधा नसलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील सुकरी गावात सलग तीन दिवस दोघींनी काढले, याबाबत नम्रता सांगते की, झरी चित्रपटातील भूमिका समजावी म्हणुन खेडयातील भाषेचा लहेजा शिकण गरजेचं होतं म्हणुन आम्ही सुकरी गावांत जाऊन रहावं अशी योजना लेखक दिग्दर्शक राजू मेश्राम यांनी आखली होती, हा अनुभव अविस्मरणीय होता, आपल्याला शहरात सर्व सुखसोयींची सवय असते, पण भारतातील ग्रामीण भाग अजूनही किती मागासलेला आहे ते यामुळे आम्हाला समजलं, त्यांच जीवनमान पाहुन अंगावर शहारे आले, अन्याय म्हणजे काय हे देखील त्यांना माहीत नाही, आपलं शोषण होतंय हे त्यांना माहीतच नाही, अशा खेडयात जाऊन वास्तव्य करतांना आम्ही अभिनेत्री असल्याचं त्यांच्यापासून लपवलं होतं, त्यामुळे त्यांची जीवनशैली जवळून पहाता आली, झरीची भूमिका सजीव करण्यासाठी या गोष्टीचा खुप फ़ायदा झाला.

निशा परुळेकर सांगते की, त्या गावातील चित्र खुप विदारक वाटलं कारण आज आपण जे जीवन जगत आहोत ते त्यांच्यापर्यंत पोहोचायला अजुन किती वर्ष लागतील त्याचा अंदाज बांधता येणार नाही, आपण सर्व प्रकारच्या भौतिक सुखसोयींमध्ये जगतोय पण त्यांच्या मुलभुत गरजा देखील पूर्ण होत नाहीत, तिथले कायदेही त्यांचेच आहेत म्हणुन प्रचंड भीती वाटत होती, पावलोपावली अंधश्रद्धेचे दर्शन घडत होते, अशा परिस्थीतीत तीन दिवस मुक्काम करणे जरी जिकिरीचं काम असलं तरी समाजातील एक घटक आजही अशा प्रकारचं जीवन जगत असल्याचं दु:ख मनात होतं, त्यांना माणूस म्हणुन जगन्याची संधी कधी मिळणार हा प्रश्न डोक्यात ठेऊन आम्ही तिकडचा निरोप घेतला.

लेखक दिग्दर्शक राजू मेश्राम याबाबत सांगतात की,  नम्रता आणि निशा यांना सुकरी गावांत रहायला पाठवणे ही चित्रपटाची गरज होती, शहरात राहिलेल्या कलाकारांच्या अंगी ग्रामीण भागातील आयुष्य भिनलं जावं आणि पडदयावर त्याचं अचूक चित्र उमटावं हा त्यामागचा मूळ हेतु होता, त्यांनी दुर्गम भागातीत संस्कुती जवळून अनुभवावी, त्यांच चालनं, बोलनं, वागनं अंगीकारावं आणि त्याचा भूमिकेसाठी त्यांना फ़ायदा व्हावा यासाठी नम्रता आणि निशा यांना सुकरी गावांत वास्तव्य करायला सांगितले.

चित्रपटाला प्रवीण कुवर यांचे संगीत असून चित्रपटात तुकाराम बिडकर, मिलिंद शिंदे, अनिकेत केळकर, नागेश भोसले, अनंत जोग, कमलेश सावंत, डॉ. संदीप पाटील, विजय दिवे, अशोक शिरोळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

विद्यार्थ्याची गळफास घेउन आत्महत्या….

पुणे – पुणे विद्यापीठामध्ये आज (मंगळवार) अर्थशास्त्र विभागाच्या एका विद्यार्थ्याने गळफास घेउन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली.

बालाजी मुंढे असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा नांदेड येथील आहे. मुंढे हा विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये राहत होता. या आत्महत्येमागील नेमके कारण अद्यापी कळू शकलेले नाही. या आत्महत्येमुळे विद्यापीठामधील सुरक्षेचा गंभीर प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी सविस्तर माहिती मिळविण्यात येत आहे.

जयललिता निर्दोष………..

चेन्नई – अण्णा द्रमुक पक्षाच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांना  कर्नाटक उच्च न्यायालयाने बेहिशेबी मालबत्ता गोळा केल्या प्रकरणात निर्दोष ठरविल्याने त्यांच्या अडचणीत सापडलेल्या राजकीय कारकिर्दीला नवजीवन मिळाले असून, त्या लवकरच पुन्हा मुख्यमंत्रिपदावर आरूढ होण्याची शक्‍यता आहे. 

जयललिता यांच्यावर 18 वर्षांपूर्वीच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी बंगळूर येथील विशेष न्यायालयाने त्यांना आणि शशिकला, सुधाकरन आणि इलावरसी या त्यांच्या तीन सहकाऱ्यांना चार वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. गेले सात महिने सक्रिय राजकारणापासूनही दूर होत त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे पिंजऱ्यातून सुटल्यानंतर गर्जना करणाऱ्या सिंहासारख्या त्या दमदारपणे परत आल्या आहेत. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातून सुटण्याची जयललिता यांना फारच कमी संधी असल्याचा अनेकांचा अंदाज होता. मात्र, कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कुमारसामी यांनी सर्वांना आश्‍चर्याचा धक्का देत विशेष न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवत या प्रकरणातील जयललितांसह सर्व चार जणांची निर्दोष मुक्‍तता केली. न्यायालयाच्या या निर्णयाला द्रमुक पक्ष आणि मूळ तक्रारदार सुब्रमण्यम स्वामी हे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्‍यता आहे; पण सध्या तरी जयललिता या भक्कम स्थानावर आहेत.
प्रदीर्घ न्यायालयीन लढतीमध्ये जयललितांना मिळालेला हा दुसरा मोठा विजय आहे. 2001 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने त्यांना एका प्रकरणात मुक्त केले होते, आज कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना सोडून दिले. तान्सी जमीन गैरव्यवहारप्रकरणी त्यांना तीन वर्षांची शिक्षा ठोठावत विधानसभा निवडणूक लढविण्यासही बंदी घालण्यात आली होती, तरीही निवडणुकीत त्यांच्या पक्षाला विजय मिळविल्यावर त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर त्यांना पायउतार व्हावे लागले होते. न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात अपील केले आणि त्यांना न्यायालयाने मुक्त केले. सध्या राज्यातील लोकांच्या भावनिक लाटेवर त्या स्वार असल्याने पुढील वर्षी असलेल्या निवडणुका लवकर घेण्याची शक्‍यता आहे. न्यायालयाच्या आजच्या निर्णयाने जयललिता यांना राजकीयदृष्ट्या भक्कमस्थितीत तर आणलेच; पण विरोधकांना फार मोठा फटका बसला आहे

डीएसके चैत्रबन आणि पुष्पबन गृहप्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा उत्साहात

 

unnamed

पुणे  : डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स यांच्या पिरंगुट येथे साकारण्यात येणाऱ्या  डीएसके चैत्रबन आणि पुष्पबन गृहप्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा काल मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात पार पडला. यावेळी डीएसके परिवाराच्या प्रथेनुसार चैत्रबन आणि पुष्पबन  या गृहप्रकल्पात नोंदणी केलेल्या सदनिकाधारकांच्याच हस्ते भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजन पार पडल्यावर समाधानाची भावना प्रत्येक कुटुंबाच्या चेहेऱ्यावर दिसून येत होती. यावेळी समूहाचे अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी,हेमंती कुलकर्णी यांच्यासह डीएसके समूहाचे पदाधिकारी व कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.

 

यावेळी कुलकर्णी म्हणाले की, बांधकाम साहित्याच्या सातत्याने वाढणाऱ्या किंमती , सरकारतर्फे आकारण्यात येणारे विविध कर यामुळे शहरातील जमिनीचे भाव कडाडले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन मध्यमवर्गीय ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून योग्य दरात दर्जेदार सदनिका  देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. कम्युनिटी हॉल, जिम्नैशियम, क्लब हाऊस, पार्टी लॉंन्स, चिल्ड्रन प्ले एरिया, सुशोभित लैन्डस्केपिंग आदी सोयींनी युक्त असे हे दोन गृहप्रकल्प आहेत.

 

सदनिकाधारकांच्या हस्ते भूमिपूजन करण्याच्या प्रथेबाबत ते म्हणाले की, स्वत: च्या घराचे भूमिपूजन करण्याची संधी सदनिकाधारकांनाच मिळाल्याचा आनंद नेहमीच आम्हाला लाभत आला आहे. भूमिपूजन झाल्यावर लगेचच कामाला सुरुवात करणे आणि त्याच दिवशी ग्राहकांना घराचा ताबा देण्याची तारीख सांगणे हे आमचे वैशिष्टय आहे. यानुसार मे २०१८ ला पुष्पबन आणि चैत्रबनच्या ग्राहकांना घर सुपूर्त करण्यात येणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.

 

निसर्गाचा भरभरून वरदहस्त लाभलेला, हिरवाईने नटलेलला शांत व रम्य परिसर हे या प्रकल्पांचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. चैत्रबन आणि पुष्पबन मध्ये १२ मजली २ इमारती आहेत  त्यात प्रशस्त  १ व २ बीएचके फ्लॅटची रचना करण्यात आली आहे. याच्याच जोडीला मयुरबन आणि नंदनवन या प्रकल्पांचे कामही प्रगतीपथावर आहे.

 

मागच्या महिन्यात फ्लॅट बुकिंगला सुरुवात झाली आणि अल्पावधीत त्याला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभला. केवळ पुण्यातूनच नव्हे तर मुंबई, सातारा, ठाणे,सोलापूर यांसह राज्यातील इतर शहरातील ग्राहकांनी येथे नोंदणी केली. आगामी काळात येणाऱ्या आमच्या गृहप्रकल्पांनाही नागरिकांचा असाच भरभरून प्रतिसाद लाभेल असा विश्वासही  हेमंती कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रविण अर्जुन खुर्पे यांचे निधन

unnamed

पुणे लष्कर भागातील सामाजिक कार्यकर्ते प्रविण अर्जुन खुर्पे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . ते ४२ वर्षाचे होते . त्यांच्यामागे आई , वडील , पत्नी , एक मुलगा , एक मुलगी असा परिवार आहे .

  पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्ष अड. अर्जुन खुर्पे यांचे ते चिरंजीव होते . तर  पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे विधी सल्लागार अड. सुर्यकांत खुर्पे यांचे पुतणे होते . त्यांच्यावर वानवडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यावेळी   पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक , सामाजिक , राजकीय पदाधिकारी , लष्कर न्यायालयातील वकील बांधव आणि कार्यकर्ते आणि वानवडी ग्रामस्थ उपस्थित होते , 

‘अग्रसेन समाज मार्केटयार्ड महिला मंडळा’ची स्थापना करण्यात येणार -आर.एल.अगरवाल

unnamed

पुणे:

‘अग्रसेन समाज मार्केटयार्ड’च्या वतीने आयोजित 27 व्या ‘अगरवाल परिवार परिचय संमेलन’ला चांगला प्रतिसाद मिळाला. हे संमेलन रविवार, दिनांक 10 मे रोजी ‘एस. एस. अगरवाल इंग्लिश मीडियम स्कूल’ (दत्तवाडी), पुणे येथे पार पडले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आर.एल.अगरवाल होते. अगरवाल समाजातील उपवर युवक युवतींना विवाह विषयक चर्चेसाठी तसेच कुटुंबियांच्या भेटीसाठी संधी मिळावी म्हणून ‘अगरवाल परिवार परिचय संमेलनाचे’ विनामूल्य आयोजन करण्यात येते.

अध्यक्षस्थानावरून बोलताना आर.एल.अगरवाल म्हणाले, ‘अगरवाल परिवार परिचय संमेलनाच्या कार्याची व्याप्ती वाढविण्यासाठी येत्या दोन महिन्यामध्ये ‘अग्रसेन समाज महिला मंडळा’ची स्थापना करण्यात येणार आहे. अगरवाल समाजातील लग्नांचा खर्च कमी व्हावा यासाठीही आम्ही प्रबोधन करीत आहोत. जास्तीत जास्त अगरवाल समाजातील कुटुंबांनी दर रविवारी या परिवार परिचय संमेलनात सहभागी व्हावे, या हेतूने या संमेलनाचे आयोजन करण्यात येते. परिचय संमेलनामध्ये आलेल्या परिवारांची ओळख होणे त्यांच्यात नाते निर्माण होणे या संमेलनामुळे शक्य झाले आहे’

यावेळी आर. एल. अगरवाल, शामलाल जिंदल, अनिल गोयल, दिनेश अगरवाल, एम. आर. अगरवाल आदी उपस्थित होते.

आत्तापर्यंत या संमेलनाद्वारे आजपर्यंत 84 विवाह जमले असून, संमेलनास राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. विनामुल्य नावनोंदणीसाठी 9561220000 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शालेय अभ्यासक्रम शिकविणार्‍या ई – टॅब्लेट निर्मितीत महाराष्ट्राचे पाऊल पुढे !

पुणे :

केजीपासून 12 वी पर्यंत शालेय अभ्यासक्रम अ‍ॅनिमेटेड स्वरूपात शिकविणार्‍या ‘महाविद्या  ‘ या ई -टॅब्लेट चे  आणि www.mahavidya.co.in वेबसाईट चे उद्घाटन महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एजुकेशन सोसायटी चे अध्यक्ष पी ए इनामदार यांच्या हस्ते झाले . हा कार्यक्रम महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र कोस्मोपोलीटन एज्युकेशन सोसायटी च्या मुख्यालयात झाला .

‘डिजिटल क्रांती समाजात होत असताना प्रगत आणि अप्रगत समाज घटकात  ‘ डिजिटल डिव्हाईड ‘
-एक दरी तयार होत आहे . त्यामुळे संगणक आणि टॅब्लेट क्रांती शेवटच्या घटका पर्यंत पोहोचावी यासाठी  ‘मिशन ‘ म्हणून काम करावे. भारतासारख्या देशात त्याची जास्त आवश्यकता आहे  ‘ असे आवाहन पी ए इनामदार यांनी यावेळी केले .
बाबा कॉम्प्युटर्स ‘ चे मुख्य कार्यकारी अधिकारी नाम मोरयानी ,स्वप्नील गांधी ,मुस्लिम सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष मुमताज सय्यद ,प्रा . ऋषी  आचार्य (‘पै इंटरनॅशनल लर्निंग सोल्युशन्स’चे विभागप्रमुख) उपस्थित होते.
  ई  टॅब्लेट निर्मितीत महाराष्ट्राचे पाऊल पुढे पडले असून, ‘महाविद्या ई-टॅब’ 1 मे महाराष्ट्र दिनापासून उपलब्ध झाला आहे.
30 वर्षांपासून संगणक विक्री क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या पुण्याच्या ‘बाबा कॉम्प्युटर्स’ या कंपनीने हा ई-टॅब्लेट (खास एज्युकेशनल टॅब) तयार केला आहे.
महाविद्या ई-टॅब बाबत अधिक माहिती देताना मोर्यानी  म्हणाले, ‘महाराष्ट्रातील शहरी-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच छोटा संगणक, ‘टॅब्लेट’ स्वरूपात वापरता यावा आणि शाळेतील अभ्यासक्रम घरातही अ‍ॅनिमेटेड स्वरूपात शिकता यावा, यासाठी ‘बाबा कॉम्प्युटर्स’ने या ‘ई-टॅब’ची निर्मिती केली आहे.

महाविद्या शैक्षणिक टॅब्लेट पि.सी.मध्ये प्रत्येक इयत्तेचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक अणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये इयत्ता पहिली ते दहावीसाठी इंग्रजी, मराठी, विज्ञान, इतिहास, भूगोल, गणित, तर इयत्ता 11 वी व 12 वी साठी गणित आणि विज्ञान या विषयांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. इंग्रजी आणि मराठी या दोन भाषांत हा टॅब उपलब्ध असणार आहे. यामधील अ‍ॅनिमेशनचा उपयोग अभ्यासक्रम समजावून सांगण्यासाठी केला आहे. बहुपर्यायी प्रश्‍नांच्या माध्यमातून मूल्यांकन करण्याची सुविधा आहे. निकालाचे मूल्यमापन रिपोर्ट उपलब्ध आहे. चाचणी परीक्षांचे मूल्यमापन करता येणार आहे.’

तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सरस निर्मिती ‘बाबा कॉम्प्युटर्स’ ने केली असून, 7 इंच टच स्क्रीन, 1.2 जीबी प्रोसेसर, अँड्रॉईड 4.2.2 ऑपरेटिंग सिस्टिम, 512 एमबी रॅम, 4 जीबी स्टोरेज, 32 जीबी एक्स्पांडेबल, कॅमेरा 0.3 एमपी, स्पिकर, 3 ते 4 तासांचा बॅटरी बॅकअप इतक्या सुविधा या ‘टॅब’मध्ये असणार आहेत.

नाम मोर्यानी म्हणाले, ‘शिक्षकांना शिकविण्यासाठी, विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी तसेच पालकांना अभ्यास घेण्यासाठी या टॅब्लेटचा उपयोग होणार आहे. केजीसाठी महाविद्या शैक्षणिक सॉफ्टवेअरसह 7,999/- असून, अकरावी व बारावीसाठी रुपये 11,999/- अशी या टॅबच्या किंमतीची रेंज आहे. एक वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे.’
‘बाबा कॉम्प्युटर्स’ ही संगणक, लॅपटॉप, नोटबुक व टॅबलेटसाठी विक्री व देखभाल सेवा क्षेत्रामध्ये 30 वर्षांपासून अग्रगण्य कंपनी असून, शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्रात तंत्रज्ञानाचा घरोघरी प्रसार करण्याचे ‘मिशन’ घेऊन दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनापासून टॅबनिर्मिती विक्रीची सुरुवात केली  आहे. ‘बा-स्लेट’ ही टॅब्लेटची श्रेणी ‘बाबा कॉम्प्युटसर्’ने निर्माण केली असून, ‘महाविद्या टॅब’ त्याचाच भाग आहे.

महाराष्ट्र दिनापासून ‘महाविद्या’ची हेल्पलाइन देखील सुरू झाली  असून, 1800 233 2266 आणि 9371107057 वर विद्यार्थी-पालकांना संपर्क साधता येणार आहे.Web- www.babacomputers.com / mahavidya आणि www.mahavidya.co.in. येथेही संपर्क साधता येईल.
————————————————————

डॉ. श्रीराम लागू यांचे ‘नागरिक’ चित्रपटाच्या ‘टीम’ ला शुभाशीर्वाद

पुणे-
” तुमच्या पहिल्याच प्रयत्नांना खूप चांगले यश मिळाले आहे. तुमचे हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे त्यामुळे हे यश तुम्ही जरूर टिकवून ठेवा” या शब्दात सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी ‘नागरिक’ चित्रपटाच्या ‘टीम’ ला आशीर्वाद दिले. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या राज्य शासनाच्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘नागरिक’ चित्रपटाने तब्बल पाच पुरस्कार मिळवून बाजी मारली आहे. ‘नागरिक’ चित्रपटात डॉ. श्रीराम लागू यांचीही महत्वाची भूमिका आहे. त्यानिमित्त ‘नागरिक’ चे निर्माते सचिन चव्हाण, दिग्दर्शक जयप्रद देसाई, प्रमुख कलाकार सचिन खेडेकर, माधव अभ्यंकर आणि  मिलिंद सोमण यांनी हे पुरस्कार डॉ. श्रीराम लागू यांना त्यांच्या नवसह्याद्री सोसायटीतील घरी जाऊन दाखविले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. तसेच यानिमित्ताने या चित्रपटाच्या प्रमोशनचा शुभारंभही केला.
हे पुरस्कार पाहून डॉ. श्रीराम लागू अतिशय खुश झाले. कितीतरी वेळ हातात पुरस्काराची बाहुली घेवून तिच्याकडे पाहत या यशाबद्दल त्यांनी ‘नागरिक’ चित्रपटाच्या ‘टीम’ चे कौतुक केले. आणि पहिल्याच चित्रपटाला एवढे पुरस्कार मिळाल्यामुळे सर्वांचीच जबाबदारी खूप वाढली आहे याची जाणीवही त्यांनी करून दिली.  ”नवीन पिढीतील कलाकारांबरोबर काम करताना कसे वाटते?” या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. लागू म्हणाले, त्यांच्याबरोबर काम करताना मला नेहमीच माझ्याबद्दल ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ याची प्रचिती येते. घरी मी सहसा चित्रपट पाहत नाही कारण त्यासाठी आवश्यक असलेली अद्यावत यंत्रणा माझ्याकडे नाही मात्र मला सगळेच चित्रपट आवडतात असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दिग्दर्शक जयप्रद देसाई, तसेच चित्रपटातील प्रमुख कलाकार सचिन खेडेकर आणि  मिलिंद सोमण यांनी यावेळी त्यांना चित्रीकरणाच्या काही प्रसंगाची आठवण करून दिली आणि तुमच्याबरोबरचे काही ‘सीन’ खूपच चांगले झाल्याचे सांगितले. त्यावर तातडीने आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. श्रीराम लागू  मिश्किलपणे म्हणाले, ”का नाही होणार? अहो. मी खूप चांगला अभिनेता आहे” त्यांच्या या प्रतिक्रियेवर साहजिकच हास्याची खसखस पिकली. त्यानंतरही बोलताना डॉ. श्रीराम लागू  यांनी अनेकवेळा आपल्या नर्मविनोदी स्वभावाचे दर्शन घडविले. थोड्या वेळाने डॉ. श्रीराम लागू  यांच्या पत्नी दीपा श्रीराम याही या कौतुक सोहळ्यात सहभागी झाल्या. त्यांनी उपस्थितांना आणि खास करून ‘नागरिक’ चित्रपटाच्या ‘टीम’ ला बर्फीचे वाटप करून पुरस्काराबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले.
सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन,  सर्वोत्कृष्ट संवाद,  सर्वोत्कृष्ट गीते आणि  सर्वोत्कृष्ट  छायांकन असे महत्वाचे पाच पुरस्कार मिळवून ‘नागरिक’ चित्रपटाने राज्य शासनाच्या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली आहे.