Home Blog Page 3585

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र कोल्हे, डॉ.स्मिता कोल्हे यांचा आंतरराष्ट्रीय पालकदिनी होणार सन्मान

0

पुणे :
‘सर फाऊंडेशन’ आणि ‘डीपर’ या स्वसंसेवी संस्थांच्या वतीने पालक दिनी पुण्यात महापालक सन्मान सोहळा आयोजित केला आहे. पालकदिनाचे महत्त्व रुजविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या सोहळ्यात यावर्षी मेळघाटातील आदीवासींसाठी कार्य करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दांपत्य डॉ. रवींद्र कोल्हे, डॉ. स्मिता कोल्हे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. ‘सर फाऊंडेशन’तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत हरीश बुटले यांनी ही माहिती दिली.

जुलै महिन्याचा चौथा रविवार हा आंतरराष्ट्रीय पालकदिन म्हणून साजरा होतो यानिमित्ताने हा सन्मान सोहळा रविवार दि. 26 जुलै 2015 रोजी पुण्यात यशवंतराव चव्हाण सभागृह (कोथरूड) येथे सकाळी 9 वाजता होणार आहे. इतिहास संशोधक डॉ. भा.ल. ठाणगे आणि सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ इंगोले यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. एक लाख रुपये रोख, सन्मानपत्र, शाल-श्रीफळ असे या सन्मानाचे स्वरूप आहे. या सन्मान सोहळ्याचे हे तिसरे वर्ष आहे.

आधीच्या वर्षीचे पुरस्कार विजेते पुढील वर्षीच्या पुरस्कार्थींची निवड करतात. 2013 चे पुरस्कार्थी डॉ. प्रकाश आमटे, व डॉ. मंदाकिनी आमटे आणि 2014 चे पुरस्कारार्थी डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. उर्मिला सप्तर्षी यांनी कोल्हे दांपत्याची निवड केली आहे.

या सन्मान सोहळ्यात पालकत्त्वाला वाहिलेल्या ‘तुम्ही आम्ही पालक’ या मासिकाचा दुसरा वर्धापन दिन आणि तृतीय वर्षाच्या पहिल्या अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.

‘डीपर’चे 10 व्या वर्षात पदार्पण होत असून, वैद्यकीय व इंजिनिअरींगच्या सीईटीमध्ये प्रथम येणार्‍या डीपरच्या विद्यार्थ्यांचा सत्कार व गरजू विद्यर्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी साहाय्य प्रदान करण्यात येणार आहे. तसेच यावेळी स्कॉलरशिप सराव परीक्षा महाएक्झामध्ये प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

‘साद माणुसकीची-संपत्ती सहयोग ते संपत्ती दान’ या चर्चासत्राचे आयोजन
दिनांक 26 जुलै रोजी दुपारच्या सत्रात ‘साद माणुसकीची-संपत्ती सहयोग ते संपत्ती दान’ या चर्चासत्राचे आयोजन दुपारी 2 ते 6 या वेळेत करण्यात आले आहे. हे चर्चासत्र‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन’ जे.पी.नाईक सेंटर, कुंबरे पार्क शेजारी, ‘एकलव्य पॉलिटेक्निक’च्या मागे, कोथरूड येथे होईल. चर्चासत्रा विषयीच्या संकल्पनेचे सादरीकरण हरीश बुटले (संस्थापक डिपर व सर फाऊंडेशन) करतील तसेच अरूण कुंभार संकल्पनेच्या तांत्रिक बाबी सांगतील. यामध्ये प्रदीप लोखंडे (संस्थापक रूरल रिलेशन्स, पुणे), नरेश झुरमुरे (उपव्यवस्थापकीय संचालक, यशदा), डॉ. गिरीश कुलकर्णी (स्नेहालय अहमदनगर), विवेक वेलणकर (अध्यक्ष सजग नागरिक मंच), अ‍ॅड.असीम सरोदे, डॉ. अविनाश सावजी (संस्थापक प्रयास व सेवांकुर, अमरावती), अनिल धनेश्‍वर हे मान्यवर सहभागी होणार आहेत. डॉ. श्रीराम गीत, बाबासाहेब माने चर्चासत्राचे सूत्रसंचालन करतील. समाजसेवी संस्था व सामाजिक कार्य करू इच्छिणार्‍या सुजाण नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. अधिक माहितीसाठी 8605009232 / 9823099663 या क्रमांकांवर संपर्क साधावा

मराठा आरक्षणाबाबत 15 दिवसात सामान्य प्रशासन विभागाकडून सुधारित आदेश काढणार- राजकुमार बडोले

0
विधानपरिषदेतील लक्षवेधी:मुंबई :

मराठा आरक्षणासंदर्भात 7 एप्रिल 2015 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार येत्या 15 दिवसात सामान्य प्रशासन विभागाकडून सुधारित आदेश काढण्यात येतील, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी विधानपरिषदेत दिली.सदस्य विनायक मेटे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री. बडोले यांनी ही माहिती दिली.

अन्नधान्य खरेदीच्या निविदेतील अटी शिथिल करण्यात येतील- विष्णू सवरा
आदिवासी विकास विभागांतर्गत अन्नधान्य खरेदीसाठी आयुक्त स्तरावर काढण्यात येणाऱ्या निविदांमध्ये पारदर्शकपणे व्यवहार होतील याकडे लक्ष दिले जाईल. या निविदेमधील काही अटी शिथिल करण्यात येतील, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली.सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री. सवरा म्हणाले, यासंदर्भातील निविदा आयुक्त स्तरावर काढण्यात येत असे. आता मात्र अपर आयुक्त स्तरावर काढल्या जातात. या निविदा प्रकल्प अधिकारी स्तरावर काढण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. पूर्वी ही निविदा एकाच ठिकाणी काढण्यात येत होती. ती आता चार ठिकाणाहून काढण्यात येते. निविदेत पारदर्शकता असली पाहिजे. त्यातील काही अटी शिथिल करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री जयंत पाटील, हेमंत टकले यांनी भाग घेतला.

वाढवण बंदर करताना स्थानिक मच्छिमारांवर अन्याय होणार नाही- रामदास कदम 

वाढवण बंदर करताना स्थानिक मच्छिमारांवर अन्याय होणार नाही. नागरिकांना विश्वासात घेऊन काम केले जाईल, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानपरिषदेत दिली.यासंदर्भात सदस्य कपिल पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री. कदम म्हणाले, वाढवण समुद्र किनाऱ्यापासून 8 ते 10 नॉटिकल मैल अंतरावर हे बंदर केंद्र शासन व राज्य शासन यांच्यामार्फत करण्यात येत आहे. स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेण्यात येईल. तसेच यासंदर्भात आज सभागृहात झालेल्या चर्चेबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करु असेही त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री आनंद ठाकूर, निरंजन डावखरे यांनी भाग घेतला.

काळबादेवी येथील आगीत मृत्युमुखी पडलेल्या अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांना शौर्यपदक देण्याची शिफारस- डॉ. रणजित पाटील

काळबादेवी येथील इमारतीला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या मुंबई अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांना शौर्यपदक देण्यासंदर्भात राष्ट्रपतींकडे राज्य शासनामार्फत पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. या अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील मुलांना त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी देण्यात येईल, अशी माहिती नगर विकास विभागाचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली.सदस्य नीलम गोऱ्हे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना डॉ. पाटील बोलत होते. ते म्हणाले, काळबादेवी येथील इमारतीला लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या अधिकारी व जवानांच्या कुटुंबियांना महापालिकेच्या प्रचलित तरतुदीप्रमाणे आर्थिक मदत करण्यात आली आहे. या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च मुंबई महापालिका करणार आहे. तसेच त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे
डॉ. पाटील यांनी सांगितले.

माहूल येथे मुंबई महापालिकेतील कर्मचारी तसेच अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून सदनिका देण्यात आल्या आहेत. त्या राहण्यायोग्य नाहीत याबाबतचा केंद्रीय पर्यावरण विभागाचा अहवाल असल्यास त्याबाबत विचार करण्यात येईल, असेही डॉ. पाटील यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री कपिल पाटील, जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.

अंबरनाथ येथील वसतिगृह महिनाभरात सुरु करणार- रविंद्र वायकर
अंबरनाथ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेले वसतिगृह महिनाभरात सुरु करण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधानपरिषदेत दिली.सदस्य रामनाथ मोते यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री. वायकर म्हणाले, 300 विद्यार्थी क्षमतेचे हे वसतिगृह असून महिनाभरात वापर परवाना मिळवून वसतिगृहामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. याठिकाणी काही जागा शिल्लक राहिल्यास तेथे अन्य शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील प्रवेश दिला जाईल. तसेच स्थानिक बचत गटाच्या माध्यमातून तातडीने खानावळ सुरु करुन वसतिगृह सुरु करण्यात येईल.

विधान परिषद इतर कामकाज :

चंद्रभागेच्या पात्रात राहुट्या, तंबू उभारण्यास उच्च न्यायालयाची परवानगी
आषाढी, चैत्री, माघी आणि कार्तिकी अशा चार प्रमुख यात्रांसाठी चंद्रभागा नदीच्या पात्रात प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घेऊन धार्मिक प्रयोजनार्थ भजन, कीर्तन, जागर, प्रवचन यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी निश्चित करतील अशा वर्षातील प्रमुख 20 दिवसांकरिता राहुट्या व तंबू उभारण्यासाठी सवलत देण्यात आली असल्याची माहिती गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधान परिषदेत एका निवेदनाद्वारे दिली.नदीच्या पात्रात प्रदूषण होऊ नये म्हणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर शासनाने केलेल्या विनंतीनुसार न्यायालयाने ही सवलत दिली आहे. यामुळे वारकरी संप्रदायाची परंपरा जतन केली जाणार असल्याचेही श्री.पाटील यांनी सांगितले.

 

आता सोशल मीडियातील लेखनासाठीही पत्रकारिता पुरस्कार

0

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2014 साठी
31 जुलैपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
व्यक्ती, संस्था, संघटनेकडून येणा-या शिफारसींचाही विचार होणार

सातारा : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार याबरोबरचआता सोशल मीडियातील लेखनासाठीहीीपुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी 2014 ते 31 डिसेंबर 2014पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै2015असा आहे.
या स्पर्धेत आता कुठल्याही व्यक्ती, संस्था किंवा संघटनेला पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-या व्यक्तीच्या नावांची शिफारस करता येणार आहे. पत्रकारितेत काम करणा-या व्यक्तीने अर्ज केला नसेल, मात्र तिची शिफारस कुठल्याही व्यक्ती किंवा संस्था, संघटनेने केली असेल तर त्याचा पुरस्कारासाठी विचार होऊ शकतो. तथापि, अशी शिफारस करताना प्रवेशिका सादर करण्याबाबतच्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे.
2014या कॅलेंडर वर्षात प्रसिद्ध झालेले विकासविषयक लेख, विशेष वृत्त व वृत्त मालिका, वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या तसेच सोशल मिडियासंदर्भात त्यांची संबंधित वर्षात प्रसिध्द झालेली विकासविषयक छायाचित्रे यांचा विचार करण्यात येईल. स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in, www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in येथेही उपलब्ध आहेत.

पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे :
राज्यस्तर (मराठी) आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार-51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; राज्यस्तर (इंग्रजी) अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; राज्यस्तर (हिंदी) बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, राज्यस्तर (उर्दू) मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; शासकीय गट (मराठी) यशवंतराव चव्हाण पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पु.ल.देशपांडे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार- 41 हजार रुपये, मानचिन्ह वप्रशस्तीपत्र आणि केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व.ज.) 41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र.र

विभागीय पुरस्कार :
नाशिक विभाग : दादासाहेब पोतनीस पुरस्कार-51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र (यापैकी रुपये 10 हजार, दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत);औरंगाबाद विभाग (लातूरसह) : अनंतराव भालेराव पुरस्कार-41 हजार रुपये,मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;मुंबई विभाग: आचार्य अत्रे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;

पुणे विभाग:नानासाहेब परुळेकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;
कोकण विभाग:शि.म.परांजपे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;रकोल्हापूर विभाग : ग.गो.जाधव पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;अमरावती विभाग : लोकनायक बापूजी अणे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;नागपूर विभाग: ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र.
नियम व अटी
पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक कामाच्या प्रसिद्धीसाठी, जनतेमधील विकास विषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचाही विचार केला जाईल. मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य/ विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची निवड याच पद्धतीने केली जाईल. या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी राज्य व विभागीय स्तर आहेत. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार केवळ राज्यस्तरीय आहेत. पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमतीपत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ लिखाणाचे कात्रण त्याच्या 2 प्रतीसह पाठवावे लागेल. मूळ लिखाणाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या 2 प्रती नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लिखाणावर लेखकाचे नाव नसल्यास, ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिद्ध झाला असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला जोडलेल्या प्रवेशिकांचाच विचार केला जाईल.
पत्रकारांच्या, तसेच वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
अर्जदारांनी राज्य व विभागीय पातळीवरील प्रवेशिका नागपूर आणि औरंगाबाद येथील संचालक (माहिती), अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, कोकण विभाग येथील विभागीय उपसंचालक (माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात. प्रवेशिकेसोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही.
मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चारही भाषेतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी तसेच राज्य पातळीवरील शासकीय गट व विभागीय पातळीवरील मराठी भाषेतील पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल. समितीची रचना, स्पर्धा व स्पर्धेतील पुरस्कारासंबंधी शासनाचे निर्णय अंतिम राहतील.
ज्या नियतकालिकांचा खप व जनमानसावरील प्रभाव चांगला आहे, अशाच नियतकालिकांतील मजकूर स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी पात्र ठरेल.
जे पत्रकार बृहन्मुंबई, नवी मुंबई (कोकण), कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या विभागात वास्तव्य करीत असतील, त्यांना त्या विभागासाठी असलेल्या विभागीय स्पर्धेतच भाग घेता येईल. मात्र त्यांचे लेखन अन्य कोणत्याही विभागातील वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले असले तरी ते ग्राह्य मानण्यात येतील.
गोवा व बेळगाव येथील पत्रकारांना कोल्हापूर विभागीय स्पर्धेत (सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्यांसह) सहभाग घेता येईल. दिल्ली येथील पत्रकारांनाही आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात पाठविता येतील.
शासकीय गटातील स्पर्धेसाठी एकच प्रवेशिका पाठविण्याची मुभा राहील. प्रवेशिका संबंधित विभागाच्या संचालक किंवा उपसंचालकांना व बृहन्मुंबईच्या प्रवेशिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वेगवेगळ्या पाठवाव्या लागतील.
2014या वर्षात दैनिक वृत्तपत्रात, नियतकालिकात प्रसिध्द झालेल्या लेखांची कात्रणे प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
प्रवेशिका राज्यस्तरासाठी किंवा विभागीयस्तरासाठी आहे तसेच कोणत्या भाषेकरिता आहे, याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका, त्यासोबत जोडलेली लेखांची कात्रणे नीटनेटकी असणे अत्यावश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत अशी प्रवेशिका रद्द करण्यात येईल. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झालेला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.

प्रत्येक गटासाठी व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास, त्याचा विचार केला जाणार नाही.

इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांसाठी स्पर्धा

इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांसाठी उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पु. ल. देशपांडे पुरस्कार देण्यात येतो. ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खासगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय उपक्रम यांना यामध्ये सहभाग घेता येईल.
पुरस्काराचे स्वरुप 41,000 रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे आहे. वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली असावीत.
वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीची माहिती तसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली, याबाबतचे संबंधित संस्था प्रमुख/ संपादक यांचे प्रमाणपत्र असावे. स्थानिक केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे.े
प्रवेशिकेसोबत संबंधित वृत्तकथेची सीडी/ कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक/ जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तर मुंबईकरिता उपसंचालक (वृत्त), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळ मजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 यांच्याकडे पाठविण्यात यावी. मराठी वृत्तकथाचित्र राज्यस्तरीय पुरस्कारासाठी थेट प्राप्त झालेल्या नावांमधून पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स मिडियातील तज्ज्ञ व्यक्तींची परिक्षण समितीवर नियुक्ती करण्यात येईल. तसेच याशिवाय अटी नियम पुस्तिकेतील क्रमांक 6 आणि अन्य संबंधित अटी या गटासाठीही लागू राहतील.

सोशल मीडिया पुरस्कार, रु. 41 हजार मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
ही स्पर्धा संकेतस्थळे व ब्लॅाग या सोशल मीडियातील प्रसारित मराठी भाषेतील वृत्त/पत्रकारिता विषयक मजकुरासाठी आहे. या स्पर्धेत संकेतस्थळे व ब्लॉग सोशल मीडियाचा वृत्त/ पत्रकारिता विषयक प्रभावी वापर करणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींना सहभाग घेता येईल. पत्रकारिता ही स्पर्धेच्या संबधित वर्षातील असावी. स्वतंत्र ब्लॉगव्दारे लेखन केलेले असल्यास ब्लॉगला किमान एक वर्ष झालेले असावे. त्याचप्रमाणे, वृत्त/ पत्रकारिताविषयक संकेतस्थळ हे अधिकृत असावे व त्यावर सोशल मीडियाचा वापर करताना केंद्र शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केलेला असावा. प्रवेशिका या विकास पत्रकारिताविषयक लेखनाच्या असाव्यात व त्यात शासनाच्या विविध योजनांना पूरक अभिव्यक्ती असावी. प्रवेशिका पाठविताना अर्जदाराने वा त्यांचे नामनिर्देशन ज्या व्यक्ती/संस्था/संघटना करतील त्यांनी सोशल मीडियाव्दारे करण्यात आलेल्या पत्रकारितेची उदाहरणे व ती कोणत्या तारखेस प्रसारित झाली त्यांच्या मुद्रित प्रती (प्रिंट आऊट ) सादर कराव्यात. नियमातील संबंधित अटी या गटासाठीही लागू राहतील.

छायाचित्रकार पुरस्कार
राज्यस्तर : तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार 41 हजार रुपये, उत्कृष्ट छायाचित्रकार स्पर्धा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रातील पूर्णवेळ छायाचित्रकारांसाठी आहे.
केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, शासकीय गट (मावज)41 हजार रुपये, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.
उत्कृष्ट छायाचित्रकार स्पर्धा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांकरिता आहे.
2014च्या पुरस्कारासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2014या कालावधीत प्रसिद्ध झालेले महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवरील छायाचित्र ग्राह्य मानण्यात येईल. मात्र हे छायाचित्र मूळ स्वरुपातील असावे. फोटो प्रत नसावी.
पुरस्कारासाठी छायाचित्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक कामाच्या प्रसिद्धीसाठी जनतेमधील जाणिव जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल.

एकाच छायाचित्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झालेला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.
पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ छायाचित्रे पाठविण्यात यावीत. ज्या नियतकालिकात छायाचित्र प्रसिद्ध झाले असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला, तारीख नियतकालिकाचे नाव प्रवेशिकेसोबत जोडलेले असावे. अन्यथा त्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.
या स्पर्धेविषयींची माहिती आणि अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in, www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in येथे उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा माहिती अधिकारी, उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालय, संचालक, नागपूर-अमरावती व संचालक, औरंगाबाद, महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी-गोवा तसेच नवी दिल्ली आणि वृत्त शाखा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथे उपलब्ध आहेत.
या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे.

लोकमान्य टिळक यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आदरांजली

0

सातारा (जिमाका) :- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, उपजिल्हाधिकारी (महसूल) भारत वाघमारे, तहसीलदार चंद्रशेखर सानप, रंजना ढोकळे, सविता लष्करे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी के.के. मार्गमवार, आदींनीही गुलाब पुष्प अर्पण करुन लोकमान्य टिळक यांना आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व शाखेतील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 11013481_1592311831030099_835147014422189733_n

वाटाणा लागवडीतून साधली आर्थिक प्रगती

0

लेखक – राहूल पवार
जिल्हा माहिती कार्यालय, सातारा

महाबळेश्वर तालुका हा सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील टोकावरती निसर्गसौंदर्याने नटलेला तालुका आहे. येथील हवामनातील वैविधतेमुळे व जास्त पावसामुळे शेतकऱ्यांना विविध पिके घेण्यास खूप मर्यादा आहेत. अशी परिस्थिती असतानाही महाबळेश्वर तालुक्यात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माचे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे यांनी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षणे देऊन वातावरणाशी जुळवून घेऊन कोणती पिकपद्धती अवलंबता येईल याबाबत जागृती करण्याचे काम केले आहे.
अशाच प्रकारचा एक वैशिष्ट्यपूर्ण व नाविन्यपूर्ण प्रकल्प महाबळेश्वर तालुक्यातील मौजे गोडवली गावामध्ये आत्माच्या मार्गदर्शनाखाली व तालुका कृषी अधिकारी, महाबळेश्वर यांच्या मदतीने अधुनिक पद्धतीने वाटाणा लागवड प्रकल्प सध्या कार्यान्वित आहे. गोडवली या गावामधील शेतकरी पारंपारिक पद्धतीने स्थानिक (आरकेल) उपलब्ध असणाऱ्या वाटाणा वाणीची लागवड करत होते. या वाणातून शेतकऱ्यांना 3 ते 4 तोडे मिळत असे, वाटाण्याच्या शेंगेमध्ये 3-4 दाणेच यायचे पर्यायाने उत्पादन कमी होऊन त्यास जेमतेम दर मिळत होते. यातून शेतकारी आपली कशीबशी उपजीविका करत होते. ही शेतकऱ्यांची परिस्थिती ओळखून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) मार्फत शेतकऱ्यांसाठी एक नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार करुन या प्रकल्पामार्फत प्रथमत: शेतकऱ्यांना वाटणा लागवडीच अधुनिक तंत्रज्ञानाबाबत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील शास्त्रज्ञांच्या मार्फत गोडवली या गावी दिले. त्यातून शेतकऱ्यांना वाटणा लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान समजले.
या प्रशिक्षणानंतर गावातील 100 शेतकऱ्यांनी प्रकल्प भाग घेण्यासाठी विनंती केली. त्यानुसार 100 शेतकऱ्यांच्या शेतावरील 50 एकर क्षेत्रावरती वाटाण्याच्या गोल्डन (जीएस-10) या वाणाची 100 प्रात्यक्षिके घेण्याचे ठरविले व त्यानुसार शेतकऱ्यांना आत्मा कार्यालामार्फत 10 किलो वाटाणा बियाणे प्रत्येकी 20 गुंठे क्षेत्रासाठी पिक प्रात्यक्षिक देण्यात आले व त्याची पेरणीही अधुनिक तंत्रज्ञानानुसारच करण्यात आली. त्यामुळे पहिल्यांदाच शेतकऱ्यांची प्रतिएकरी 10 किलो बियाण्यांची बचत झाली.
या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना एक नाविन्यपूर्ण सहल म्हणून सासवड परिसरातील प्रगतशिल शेतकऱ्यांच्या शेतावरती अभ्यास दौरा काढला. गोल्डन (जीएस-10) या वाणाची निवड करण्याचा उद्देश म्हणजे या वाणामुळे शेतकऱ्यांना 8 ते 9 तोड मिळतात. एका शेंगेमध्ये 10 वाटाणे तयार होत अल्याने पर्यायाने हिरव्या वाटाण्यास बाजारामध्ये मागणी असल्याने व गोल्डन ही जात चवीला गोड असल्याने दर जास्त मिळत आहे. यातून शेतकऱ्यांची आर्थिक परस्थिती सुधारण्यास मदत झाली. या प्रकल्पात 100 शेतकरी सहभागी झाले असून 50 एकर क्षेत्रावर वाटाणा लागवड करण्यात आला. या प्रकल्पावर 2 लाख 89 हजार 414 रुपये खर्च करण्यात आला असून अंदाजीत 150 टन उत्पादन मिळाले आहे.
अधुनिक पद्धतीने वाटाणा लागवड प्रकल्पांतर्गत उत्पादित झालेला सर्व शेतकऱ्यांचा वाटाणा हा प्रकल्पात सहभागी झालेले शेतकरी स्वत: थेट भाजीपाला विक्री या आत्माच्या योजनेतून विक्री करतात.
अशा प्रकारे या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांमध्ये व्यवसायीकतेची भावना निर्माण झाली असून सध्या तेथील शेतकरी शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहत आहेत.

परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प असण्याची गरज – नितीन गडकरी

0
घरे  परवडण्यासाठी करात सवलत देण्याची क्रेडाई ची मागणी  

नागपूर  : सर्वसामान्य जनतेसाठी बांधकाम व्यावसायिकांनी परवडणाऱ्या घरांचे  प्रकल्प हाती घ्यावेत. त्यासाठी व्यावसायिकांनी बांधकामातील दर्जा ढळू न देता नवनवीन आणि सशक्त प्रयोगांचा तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा जेणेकरून बांधकाम खर्च कमी होईल असे आवाहन केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ‘क्रेडाई- महाराष्ट्र’च्या नागपूर येथील त्रैमासिक बैठकीमध्ये  व्यावसायिकांना केले. तसेच त्यासाठी लागणाऱ्या शासकीय परवानग्या लवकर मिळविण्यासाठी सहाय्य करण्याचे आश्वासनही त्यावेळी त्यांनी दिले. 
 
क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रशांत सरोदे यांच्या नेतृत्वाखाली क्रेडाईची त्रैमासिक बैठक नुकतीच नागपुरमध्ये पार पडली. मुल्यवर्धित आणि मुद्रांक शुल्क व इतर कर हे साधारणतः घराच्या किमतीच्या ११.५% पर्यंत होतात. जर सरकारने अशा करांमधून परवडणाऱ्या घरांना सूट दिल्या तर घरांच्या किमती कमी होतील, तसेच गृहकर्जावरील व्याजदर कमी केल्यास ते गरजूं लोकांच्या आवाक्यात येईल या मुद्द्यांवर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.    
 
क्रेडाई महाराष्ट्राचे एकूण ३९ शहर संघटनांपैकी ३३ शहर संघटनांचे २५० हून अधिक सभासद या बैठकीत उपस्थित होते. क्रेडाई महाराष्ट्र चे अध्यक्ष प्रशांत सरोदे, वरिष्ठ उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया (पुणे), महेश साधवानी मानद सचिव यांनी उपस्थित सभासदांशी संवाद साधला व त्यांच्या बांधकाम विषयीच्या समस्यांवर चर्चा करून मार्गदर्शन केले. 

डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो २६ जुलैला सायंकाळी ७.०० वा.

0

 

गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा हा अतिदुर्गम जंगलातील भाग. जिथे शहरातील माणूसच काय पण सूर्यकिरणंही पोहचणं अवघड होतं. जगाची गोष्ट तर दूरच पण महाराष्ट्राच्या नकाशावरही अशा गावाचे पुरावे मिळणं कधी काळी अशक्य होतं. अशा ठिकाणी जाऊन शहराचे सुखवस्तू जीवन नाकारून आयुष्याची एक नवी सुरुवात करणं ही कल्पनाही अशक्यच. पण ही कल्पनाच नव्हे तर ते स्वप्न उराशी बाळगून एक अवलिया आपल्या पत्नी आणि सहका-यांसह तिथे जातो…. आपल्या निस्सीम, निःस्वार्थ सेवेने आदिवासींच्या जीवनात नंदनवन फुलवतो आणि हेमलकसाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवतो. हा अवलिया म्हणजे ज्येष्ठ समाजसेवी डॉ. प्रकाश बाबा आमटे. समर्पण या शब्दाला जागणारे नव्हे तर जगणा-या डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटेंची ही कथा “डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो”  या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर आली आणि तिने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अनेक मानाच्या पुरस्कारांवर मोहोर उमटवलीच शिवाय प्रेक्षकांचेही भरभरून प्रेम मिळवले. नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्या सहजसुंदर अभिनयाने सजलेला हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीस येतोय झी मराठीवरून. येत्या रविवारी, २६ जुलैला सायंकाळी ७.०० वा. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमियर झी मराठीवरून प्रसारित होणार आहे.

भारतामध्ये समाजसेवकांची एक मोठी परंपरा आहे. स्वतःच्या सुखवस्तू आय़ुष्याचा त्याग करत दिवसरात्र समाजासाठी काम करणारे अनेक थोर समाजसुधारक महाराष्ट्रात होऊन गेले. ती परंपरा तो वारसा आजही अनेकजण निस्वार्थीपणे चालवत आहेत. यात एक महत्त्वाचं नाव आहे ते आमटे कुटुंबियांचं. बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करून त्यांच्या आयुष्यात आनंदवन फुलवलं तर त्यांचा मुलगा डॉ. प्रकाश आणि सून डॉ. मंदाकिनी आमटे यांनी हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवांसींच्या आयुष्यात आरोग्य आणि शिक्षणाचं नंदनवन फुलविलं. या व्रतस्थ दाम्पत्याची, त्यांच्या संघर्षाची, त्यांच्या जिद्दीची कथा यापूर्वी अनेक पुस्तके, लेख, आणि लघुपटांच्या माध्यमातून जगासमोर आली होती. रेमन मॅगससे सारख्या अतिशय मानाच्या पुरस्काराने गौरविल्या गेलेल्या या दाम्पत्यांच्या कार्याची दखल जगभरातून अनेकांनी घेतली. त्यांच्या याच यशाची गाथा “डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो” या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि त्यांचं ‘लार्जर दॅन लाईफ’ कार्य आणि व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी पद्धतीने प्रेक्षकांसमोर आलं. समृद्धी पोरे यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात चतुरस्र अभिनेता नाना पाटेकर यांनी डॉ. प्रकाश आमटे यांची भूमिका साकारली होती तर मंदाताईंच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी ही बहुगुणी अभिनेत्री होती. या दोघांच्या संयत आणि प्रभावी अभिनयाने आणि आमटे दाम्पत्याच्या कथेने प्रेक्षकांना हेलावून सोडले. शहराच्या चकचकीत वातावरणात जगणा-या आणि सर्व सोयी सुविधा मिळत असूनही सतत तक्रार करणा-या अनेकांना या कथेने अंतर्मुखही केले. प्रबळ इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास, माणुसकी आणि प्रेम यांच्या जोरावर केवळ आदिवासीच नाही तर हिंस्त्र प्राण्यांनाही कसं आपलंसं करता येतं हे डॉ. आमटेंच्या जीवनप्रवासातून उमगलं. हाच अनुभव प्रेक्षकांना पुन्हा एकदा देण्यासाठी “डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो” हा चित्रपट त्यांच्या भेटीस येतोय येत्या रविवारी २६ जुलैला सायंकाळी ७.०० वा. झी मराठीच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर मधून.

कृषिपंपाचा प्रत्यक्ष वीजवापर व वितरण हानीचा – अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित

0

पुणे-

वीजहानीचे योग्यरितीने निर्धारण आणि कृषिपंपाच्या वीजवापराचे मूल्यांकन करण्यासाठी म.रा.वि.म. सूत्रधारी कंपनीने

त्रिसदस्यीय समिती गठित केली असून या समितीने कामकाजास सुरुंवात केली आहे.  ही समिती दि. 31 डिसेंबर 2015

पर्यन्त आपला अहवाल सादर करणार आहे.

राज्य शासन कृषिपंपधारक ग्राहकांना परवडेल अशा दराने वीजपुरवठा करण्यासाठी वीज देयकात लक्षणीय

अनुदान देते.  कृषिपंपाचा जोडभार व वीजवापर जास्तीचा दाखवून त्याद्वारे वीज वितरण हानी नियंत्रित करण्यात येत

असून कृषिपंपाचा एकूण वीजवापर वाढविण्यात आला आहे.  वीज चोरीच्या माध्यमातून वीजहानीची भरपाई केली जात

आहे.  अशा प्रकारचे आरोप गेल्या काही दिवसांपासून होत आहेत.  या बाबींचा अभ्यास करूंन त्यावर उपाययोजना

सूचविण्यासाठी सूत्रधारी कंपनीने तज्ञांची त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे.

या समितीचे अध्यक्ष श्री. विश्वास पाठक असून या समितीत वीज ग्राहक संघटनेचे श्री. प्रताप होगाडे व आशिष चंदाराणा

यांचा समावेश आहे.  या समितीद्वारे महावितरणकडून कृषिपंपांना दिला जाणारा वीजजोडभार व वीजबील पध्दतीचा

अभ्यास केला जाणार आहे. तसेच नमुना म्हणून निर्धारित करण्यात येणार्‍या 100 कृषिवाहिन्यांची प्रत्यक्ष पाहणी

करण्यासाठी त्रयस्थ संस्थेच्या नियुक्तीची शिफारस करण्यात येणार आहे. या त्रयस्थ संस्थेच्या कामकाजावरही ही

त्रिसदस्यीय समिती देखरेख ठेवणार आहे.

आकाशवाणी नाबाद 88 ; आज विविध कार्यक्रम

0

 

सातारा -(जि.मा.का): “This is all india radio… यह आकाशवाणी है..! हे आकाशवाणी आहे…” भारतातील सर्व भाषा व बोली भाषेतून श्रोत्यांशी संवाद साधणाऱ्या आणि खास करुन ग्रामीण भागातील श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या आपल्या आकाशवाणीला 88 वर्षे उद्या पूर्ण होत आहेत. याच वर्धापन दिनानिमित्त उद्या गुरुवार दिनांक 23 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता श्री. छ. शाहू कला मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये संगीत, लोकसंगीत, समुहगीत यांच्यासह ‘काचेपलीकडील वास्तव’ हा आकाशवाणी उद्घोषकांतर्फे सादर केला जाणारा कार्यक्रम खास आकर्षण असेल, अशी माहिती आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी गोविंद मोकाशी यांनी दिली.
23 जुलै 1927 ला मुंबई आणि कलकत्ता येथे प्रसारण सेवेला सुरुवात झाली. 1936 मध्ये भारतीय प्रसारण सेवेचे ऑल इंडिया रेडिओ असे नामकरण झाले आणि 1957 मध्ये आकाशवाणी असे नाव करण्यात आले. 23 नोव्हेंबर 1991 ला सातारा केंद्रची सुरुवात करण्यात आली. आकाशवाणीच्या 88 व्या वर्धापनदिनानिमित्त पश्चिम क्षेत्राचे अतिरिक्त महासंचालक एम.एस. थॉमस यांनी उद्या गुरुवारी राज्यातील सर्वच आकाशवाणी केंद्रातर्फे विविध कार्यक्रमांची मेजवानी श्रोत्यांसाठी ठेवली आहे.
गेल्या 88 वर्षांपासून आकाशवाणी बहुजन हिताय बहुजन सुखाय या घोषवाक्याप्रमाणे सर्वांच्या जीवनाशी निगडीत झालेली आहे. चारशे हून अधिक केंद्रातून अगदी कारगीलपासून कन्याकुमारीपर्यंत आणि भूजपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत 99 टक्के भारतीय भूभागातील जनसामान्यांचे ज्ञानरंजनातून मनोरंजन करीत आहे. आपत्तकालीन काळात मदत कार्यालयात अग्रभागी असणारी आकाशवाणी जागातील मोठी सर्वात मोठी प्रसारण संस्था आहे. भारतातील सर्व भाषा आणि बोली भाषेतून श्रोत्यांशी संवाद साधणाऱ्या आकाशवाणीला 88 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आकाशवाणीतर्फे विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
यामध्ये सूरवर्धिनी संगीत विद्यालयातर्फे सूरमयी सांज, विजयकुमार गायकवाड आणि सहकारी प्रस्तुत लोकसंगीत, कन्या शाळेतर्फे समुहगीत आणि काचेपलीकडील वास्तव हा कार्यक्रम आकाशवाणीचे उद्घोषक सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या हस्ते सायंकाळी 6 वाजता श्री. छ. शाहू कला मंदिर येथे होणार आहे. हा कार्यक्रम विनामुल्य असून जास्तीत जास्त सातारकरांनी याचा लाभ घ्यावा, असेही आवाहन श्री. मोकाशी यांनी केले आहे.

दिल्ली पोलिसांनी मला बसखाली मारण्याचा प्रयत्न केला ‘आप’ प्रवक्त्याचा आरोप

0

नवी दिल्ली : पंतप्रधानांच्या अखत्यारीत असल्याने दिल्ली पोलीस हे दिल्ली त सत्तेवर असलेल्या आप च्या सरकारमधील नेत्यांना , कार्यकर्त्यांना छळत असल्याच्या तक्रारी आहेत . दिल्ली पोलिसांविरोधात आंदोलने झाली -पंतप्रधानांना पत्रे दिली गेली पण अद्याप काही होईना … दिल्ली ची कायदा सुव्यवस्था अर्थात पोलिसांच्याच हाती आहे ‘आप’चे प्रवक्ते दिलीप पांडे यांनी आता थेट दिल्ली पोलिसांवरच आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. दिल्ली पोलिसांच्या बसने मला चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.यामुळे आता दिल्ली पोलीस आणि आप मधला संघर्ष तीव्र होत चालला आहे असे दिसते दिल्ली पोलिसांनी त्यांच्या बसखाली चिरडून माझे प्राण घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीतरी मला धक्का देऊन माझा जीव वाचवला, असं दिलीप पांडे यांनी म्हटलं आहे. मंगळवारी रात्री मीडियाला इंटरव्ह्यू देताना ही घटना घडल्याची तक्रार दिलीप पांडे यांनी दिल्ली पोलिसांत नोंदवली आहे. पोलिसांनी संबंधित बस चालकासह पोबारा केल्याचंही पांडे यांनी तक्रारीत म्हटलं आहे.’आप’ सत्तेत येऊन आता सहा महिने उलटले आहेत. गेल्या सहा महिन्यांत दिल्लीत केंद्र सरकार विरुद्ध दिल्ली सरकार असं चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर दिलीप पांडे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी कशी होणार हा हि प्रश्नच आहे .

 

गजेंद्र चौहान विरोधात आता दिल्ली त ही आंदोलन सुरु करण्याचा निर्धार

0

पुणे :आर एस एस चा स्पष्ट पाठींबा मिळालेले एफटीआयआय चे अध्यक्ष  गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात सुरू केलेले आंदोलन आता पुण्याबरोबर  थेट दिल्ली दरबारीदेखील सुरु करण्याचे भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी ठरविले आहे. हे आंदोलन अधिक परिणामकारक करण्यासाठी आंदोलक विद्यार्थी आता संसदेसमोर ठाण मांडून बसणार आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असल्यामुळे त्यानिमित्त राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळविण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय, या आंदोलनामध्ये ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा‘ आणि ‘आयआयटी-दिल्ली‘च्या विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले जाईल,‘‘ असे विद्यार्थ्यांतर्फे सांगण्यात आले
‘‘एफटीआयआय सोसायटी‘ विसर्जित करण्याची प्रमुख मागणी मागे घेतल्याशिवाय सरकार कोणत्याही संवादासाठी पुढाकार घेणार नाही,‘ असे संचालक प्रशांत पाठराबे यांच्यामार्फत सरकारने विद्यार्थ्यांना कळविले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ‘एफटीआयआय‘च्या विद्यार्थ्यांची पत्रकार परिषद आज (बुधवार) झाली. “येत्या 3 ऑगस्ट रोजी दिल्लीत आंदोलन होणार असले, तरीही पुण्यातले आंदोलनही सुरूच राहणार आहे. केंद्र सरकारवर अधिक दडपण आणण्यासाठी दिल्लीत आंदोलन करण्याचा विचार आम्ही केला. दिल्लीत जाऊन आमचा आवाज अधिक ‘व्यापक‘ होईल. विविध पक्षांच्या खासदारांना आम्ही पाठिंब्यासाठी पत्र पाठविले आहे. त्यांच्याकडूनही मदतीची अपेक्षा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तान कडून ईद निमित्त आंब्याची पेटी भेट

0

नवी दिल्ली- एकीकडे भारतीय लष्कराने ईद निमित्त दिलेली मिठाई यंदा पाकिस्तानी लष्कराने नाकारण्याची घटना घडली असताना ईदनिमित्त पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंब्याची पेटी पाठविली आहे, अशी बातमी येथे आली आहे गेल्या वर्षी देखील शरीफ यांनी पंतप्रधान मोदी व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आंबे पाठवले होते.
भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर तणावाचे वातावरण आहे.आणि दोन्ही देशांमधील मैत्री बाबत मोदी आणि शरीफ यांच्यामध्ये सकारात्मक हालचाली दिसत असल्या तरी प्रत्यक्षात पाकिस्तान कडून होणारी आगळीक वाढतेच आहे असे दिसत आले आहे ईद ला दोन्ही देशांदरम्यान मिठाई देण्याची परंपरा आहे. मात्र, गेल्या आठवड्यात भारतीय लष्कराने भेट म्हणून दिलेली मिठाई पाकिस्तानी लष्कराने नाकारली होती.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे.

कारची दोन दुचाकींना धडक-तीन विद्यार्थी ठार तर दोघे जण गंभीररीत्या जखमी

0

पुणे

मुंबई-पुणे मार्गावरील निगडी नाक्याजवळ भरधाव कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात  देहूरोड येथील आयआयटी एमआर या शैक्षणिक संस्थेतील तीन विद्यार्थी ठार तर दोघे जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. काल रात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला. कारचालकाणे  दारूच्या नशेत कार चालवून हा अपघात केल्याची प्राथमिक माहिती आहे कारचा चालक मयूर घुमटकर याला अटक करण्यात आली असून त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.
किरण दिलीप दहाने (सातारा), संकेत कमलाकर समेळ (खोपोली), शुभम संभाजी भालेकर (पारनेर-अहमदनगर) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही देहूरोड येथील आयआयटी एमआर या शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी होते. अपघातात जखमी झालेल्या अविनाश बबन माने आणि शिनो जॉन विद्यायती या दोघांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे पाचही जण दोन दुचाकींवरून चहा पिण्यासाठी निगडी नाक्याजवळ आले होते. चहा घेतल्यानंतर घरी परतत असतानाच मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या कारने दोन्ही दुचाकींना मागून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही दुचाकी बरेच अंतर फरफटत गेल्या. अपघातानंतर तातडीने स्थानिक लोकांनी मदतकार्य केले मात्र तिघांचा जागीच मृत्यू झाला.

1 (1) 1 (2) 1 (3) 1 (4) 1 (5)

अजित (दादा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांना फळे व खाऊ वाटप

0

 

पुणे:
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पक्ष कार्यालयामध्ये सकाळी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष अश्‍विनी कदम, अंकुश काकडे, रविंद्र माळवदकर, नगरसेवक फारूक इनामदार, अप्पा रेणूसे, विशाल तांबे, कमल ढोले-पाटील, अशोक राठी, नितीन उर्फ बबलू जाधव, राजलक्ष्मी भोसले, रूपाली चाकणकर, गोविंद थरकूडे, शालिनी जगताप आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष आनंद रिठे यांच्या वतीने गुरूवार पेठेतील सेंट मायकेल हॉस्टेल मधील अनाथ मुलांना खाऊ व फळांचे वाटप करण्यात आले.

‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’ आणि ‘व्यंकटेश्‍वरा हाऊसिंग ग्रुप’च्या वतीने ‘शुभांगण फॅमिली फेस्टिव्हल 2015’ चे आयोजन

0
पुणे:
     ‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’ आणि ‘व्यंकटेश्‍वरा हाऊसिंग ग्रुप’ या संस्थांच्या वतीने पिरंगुट येथे ‘शुभांगण फॅमिली फेस्टिव्हल-2015’ या दोन दिवसीय सांस्कृतिक, कला व चित्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार 25 जुलै व रविवार 26 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पावसाळ्याच्या आल्हाददायक वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर पिरंगुटच्या निसर्गरम्य परिसरात सांस्कृतिक, कला व चित्र तसेच रॅपलिंग, झिपलाईन सारख्या विविध साहसी खेळांचे या उत्सवात आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहेत, अशी माह्तिी ‘गंगोत्री-ग्रीनबिल्ड’चे संचालक गणेश जाधव, मकरंद केळकर आणि ‘व्यंकटेश्‍वरा हाऊसिंग ग्रुप’चे संचालक वसंत बसाळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
‘शुभांगण फॅमिली फेस्टिव्हल-2015’  यामध्ये शनिवार 25 जुलै रोजी सकाळी 11.30 ते 12.30 या वेळेत आषाढी वारीनिमित्त भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 4 ते 5 या वेळेत चारुहास पंडीत ‘चिंटू गँग’ ची स्केचेस रेखाटणार आहेत.
रविवार 26 जुलै रोजी सकाळी 11.30 ते 12.30 या वेळात सेलेब्रिटी गप्पा या कार्यक्रमात लेखक व अभिनेता गिरीश कुलकर्णी यांच्याशी बातचीत करण्यात येईल. दुपारी 4 ते 5 या वेळेत गायिका सायली पानसे आणि अपर्णा केळकर यांचा ‘अमृतघन’ हा वर्षाऋतु वरील संगीताचा कार्यक्रम होणार आहे. ‘शुभांगण फॅमिली फेस्टिव्हल-2015’ या उत्सवात लहान मुलांपासून वृध्दांपर्यंत सर्वांना सहभागी होता येईल.
या कार्यक्रमांबरोबरच शनिवार 25 जुलै व रविवार 26 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत रॅपलिंग, झिपलाईन, टॅटू, ‘चित्रांगण’- चित्रकला कट्टा, मेंदी, भुट्टा ऑन रुफ टॉप, तसेच व्हिंटेज कार सोबत फोटो काढण्याची संधी यावेळी  मिळणार आहे.
सकाळी 9.30 पासून ‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’योगेश्‍वरी सोसायटी,मेहंदळे गॅरेज रोड, एरंडवणे, पुणे येथून शटल बससेवा उपलब्ध आहे.
संपर्क: 88888 70222 , 88888 36564