नागपूर: रिपाइं गवई गटाचे संस्थापक रा.सू.गवई यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. आज नागपुरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ८६ वर्षीय गवई यांच्यावर बऱ्याच दिवसांपासून नागपुरच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. राजकारणाबरोबरच दलित चळवळीतही गवई सक्रीय होते.अमरावतीचे माजी खासदार असणाऱ्या गवई यांनी याआधी बिहार आणि केरळचे राज्यपालपदही भूषवलं होतं. तसचं काही काळ गवई हे विधानपरिषदेच्या उपसभापतीपदीही होते. अचानक रक्तदाब वाढल्याने त्यांना अमरावती येथून नागपूरातील एका खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटीलेटरवर देखील ठेवण्यात आले होते. अखेर आज त्यांचे निधन झाले.
पर्यावरण रक्षण व शारीरिक स्वास्थ्यासाठी पुणे-बारामती सायकल स्पर्धा
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अमृत महोत्सवी वर्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचेही अमृतमहोत्सवी वर्ष तसेच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जन्मदिवस या सर्वांच्या एकत्रित योगाने आज सकाळी ‘पुणे बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन यांच्या सहकार्याने ही स्पर्धा संपन्न होत आहे. स्पर्धेचे उद्घाटन ऐतिहासिक शनिवारवाडा येथे आज सकाळी शरद पवार यांच्या हस्ते स्टार्ट फ्लॅग फडकावून झाले. या उद्घाटन प्रसंगी श्री. पवार म्हणाले की, पर्यावरणाचे रक्षण आणि आपले शारीरिक स्वास्थ्य या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देणे अतिशय महत्त्वाचे आहे. आज या स्पर्धेनिमित्त पुणे ते बारामती रस्त्याच्या दुतर्फा उभे राहणाऱ्या लोकांना स्पर्धकांकडून या दोन्ही गोष्टींसाठी महत्त्वाची प्रेरणा मिळणार आहे.
या प्रसंगी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, खासदार वंदना चव्हाण ,अश्विनी कदम ,विशाल तांबे ,अप्पा रेणुसे ,चंचला कोद्रे ,रवींद्र माळवदकर उपस्थित होते यांची प्रमुख उपस्थिती होती.या स्पर्धेला भारताच्या ११ राज्यातून आलेले स्पर्धक तसेच पुणे विद्यापीठात शिकणारे परदेशी विद्यार्थीही सहभागी झाले आहेत.
‘कॅरी ऑन मराठा’ बदलणार मराठीचा ट्रेंड … ?
(सिनेसामिक्षण -सोबत पहा ट्रेलर )
दर्जा -४/५
कलाकार-गश्मिर महाजनी, कश्मिरा कुलकर्णी, देविका दफ्तरदार, अरूण नलावडे
दिग्दर्शक-संजय लोंढे
निर्माते – नंदा चंद्रभान ठाकूर आणि शशिकला क्षीरसागर
एक्शन हिरो – स्मार्ट -देखणा -तगडा मस्त नाचणारा हिरो जसा हिंदीत असतो तसाच नायक यापुढे मराठीत ही हवाच ; जोश -जल्लोषमय -वेगवान गाणी हवीत तडाखेबाज संगीत हवे , दणदणीत डबिंग आणि थोडेसे तरी वास्तवतेला विसरून स्वप्न रंजनी -मनमोहिनी असा सिनेमा हवा, असा नवा नवा ट्रेंड जो ‘लय भारी ‘ ने आणला आता ‘कॅरी ऑन मराठा’ ने आणखी पुढे कॅरी तर केलाच पण गश्मीर सारखा सर्व नायकांना त्यांच्यातील स्पर्धेला आव्हान देणारा नायक ही दिला हे पाहता या पुढे मराठी सिनेमाचा ट्रेंड आता साऊथ आणि हिंदीप्रमाणे बदलू लागेल असे वाटू लागले तर नवल नाही .
नंदा आर्ट्स आणि वॉरीयर ब्रदर्स मोशन पिक्चर्स यांची निर्मिती असलेला ‘कॅरी ऑन मराठा’ हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये रिलीज झालाय. ह्या चित्रपटातून अभिनेते रविंद्र महाजनींचा मुलगा गश्मीर महाजनीचे जोरदार लोन्चिंग निर्माते नंदा चंद्रभान ठाकूर आणि शशिकला क्षीरसागर यांनी केले आहे असे म्हटले तर वावगे होवू नये तर दिग्दर्शक संजय लोंढे यांची सूध्दा ही पहिली मराठी फिल्म आहे.
महाराष्ट्र-कर्नाटकामध्ये सीमावादावरून नेहमीच वादळं उठतं आलीत. अनेकदा दंगेही झालेले आपण गेल्या काही वर्षांत पहिलंय. ह्याच विषयाची पार्श्वभूमी ‘कॅरी ऑन मराठा’ सिनेमाला लाभली आहे. कोल्हापूरातला मार्तंड, कर्नाटकातल्या कुसूमला भेटतो. योगायोगाने झालेली ह्या भेटीचं रूपांतर, प्रेमात होते. आणि मग मराठी विरूध्द कन्नडी हा दोघांच्या घरातला व्देष आपल्यासमोर येतो.
चित्रपटाची कथा अशी, तशी, कधी भरकटली असली तरी मध्यन्तरापर्यन्तच ती प्रेक्षकांच्या हृदयावर स्वार होते . उत्तरार्धात तर चित्रपटात बरेच नाट्य घडते. पण ते सगळे नाट्य दाखवण्याच्या नादात प्रेक्षकांना नाहक बुचकळ्यात टाकल्यासारखे झाले आहे . कथा दमदार नसली -तरी संगीत आणि अन्य बाबी हि सिनेमाला लोकप्रियतेच्या शिखरावर नेवू शकतात हे अलीकडे ‘बाहुबली’ ने दाखविले आहेच .
सिनेमाचं संगीत छानच आहे. शैल-प्रीतेश यांनी सिनेमाचं संगीत दिलंय. मार्तंड मल्हार, सोबाने सोयनिरे, जगळगंत ही गाणी ठेकेबाज , श्रवणीय आहेत. गुरु ठाकूर, अश्विनी शेंडे, मंगेश कांगणे, हृदया शिवा यांनी लिहीलेली गाणी आणि श्रेया घोषाल, आदर्श शिंदे, वैशाली भेसने-माडे, शैल हाडा, उर्मिला धनगर यांनी त्या गाण्यांना आपल्या स्वरांचा साज चढवल्याने बहार आलीय.
कश्मिरा कुलकर्णी, देविका दफ्तरदार, उषा नाईक, शंतनू मोघे, समीर खाडेकर, ओमकार कुलकर्णी, अरुण नलावडे, अमेय कुंभार आणि सचिन देशपांडे यांच्यासोबतच अमीन हाजी, करीम हाजी, किशोरी बल्लाळ असे कलाकार या चित्रपटात आहेत. अमेय कुंभार हा बालकलाकार बराच भाव खाऊन गेला आहे . गश्मीर तर नव्या जमान्याचा हिरो आहेच पण कश्मीराने आपला अभिनय फारच छान खुलविला आहे . मराठीला वेगळ्या वाटेवर या सिनेमाने नेवून ठेवले तर नवल नाही वाटणार …. त्यामुळे आता तरी एकदा तरी प्रत्येकाने हा सिनेमा पाहायलाच हवा .
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची माहिती आता एका क्लिकवर ! जिल्हा बँकेच्या ‘ मोबाईल एप ‘ चे अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन
पुणे :
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची सर्व माहिती एका क्लिक वर उपलब्ध करून देणाऱ्या आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष अर्चना घारे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या ‘पी डी सी सी बँक ‘ या मोबाईल एप्लिकेशन चे लॉचिंग माजी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अजित पवार यांच्या हस्ते झाले.
शनिवारी सकाळी पुण्यात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा ) येथे हा कार्यक्रम झाला . हे अॅप प्लेस्टोर वर मोफत उपलब्ध असून ‘पी डी सी सी बँक ‘ (pdcc bank )नावाने शोधल्यास सहज डाउनलोड करता येईल. तसेच मराठी आणि इंग्रजी या दोन्हीही भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, “पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नेहमीच आपल्या खातेदारांना अद्ययावत सेवा देण्याबाबत आग्रही आहे. आजच्या मोबाइल फोनच्या काळात सर्व माहिती पटकन मिळते. म्हणूनच आपल्या फोन मध्ये एका क्लिक वर बँकेची माहिती आणि विविध योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत सहजरित्या पोहचावी म्हणूनच हे अॅप उपयुक्त ठरणार आहे.”
माहिती -तंत्रज्ञानाच्या आणि सोशल मिडियाच्या या युगामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकही नवनवीन बदल घडवत आहे. ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सुविधा देण्याबरोबरच अधिक अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अद्ययावत योजना व सुविधाबरोबरच अद्ययावत तंत्रज्ञान द्वारे लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न या अॅप द्वारे केला जाणार आहे. या अॅप द्वारे ग्राहकांना घरबसल्या सर्व योजना त्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि संबंधित विभागाचे संपर्क उपलब्ध होणार असून यासाठी वारंवार बँकेत जाण्याची गरज पडणार नाही. याद्वारे “बैंक आपल्या दारी” पोहचण्यास मदत होणार आहे.,असे यावेळी सांगण्यात आले
या कार्यक्रमावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश आप्पा थोरात, उपाध्यक्ष सौ अर्चना घारे, संचालक दिलीप वळसे -पाटिल, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भोसले तसेच बँकेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
कॉम्रेड गोंविदराव पानसरे यांचे मारेकरी सरकारच दडवीत आहे -आमदार हसन मुश्रीफ
कोल्हापूर
‘एसआयटी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कॉम्रेड गोंविदराव पानसरे यांचे मारेकरी सापडले आहेत, पण राज्य सरकार त्यांची नावे जाहीर करू देत नाही,’ असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. अधिवेशनात या प्रश्नावरून राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक भूमिका घेतील. खुन्यांची नावे जाहीर करण्यासाठी सरकारला भाग पाडू,’ असा इशाराही त्यांनी दिला.
कोल्हापूर महापालिकेतर्फे कॉम्रेड गोविंदराव पानसरे स्मारकाचा भूमिपूजन समारंभ शुक्रवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. महापौर वैशाली डकरे, उपमहापौर ज्योस्त्ना मेढे, माजी आमदार बाबूराव धारवाडे, डी. बी.पाटील, भाकप राज्य सरचिटणीस भालचंद्र कानगो यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. एका पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार पानसरेंचे मारेकरी सापडले आहेत, पण सरकारच नावे जाहीर करू देत नाही. हा प्रकार अतिशय गंभीर आहे, असेही मुश्रीफ म्हणाले. भालचंद्र कानगो म्हणाले, ‘कॉम्रेड पानसरे यांच्या स्मारक उभारणीत महापालिकेने घेतलेला पुढाकार स्पृहणीय आहे. पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागेपर्यंत आंदोलन थांबणार नाही. सरकारने, मारेकऱ्यांचा खरा चेहरा समाजासमोर आणावा.’ यावेळी कॉम्रेड मेघा पानसरे, चंद्रकांत यादव यांनी कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या स्मृती जागविल्या. स्थायी सभापती आदिल फरास यांनी स्मारक उभारणीमागील भूमिका विशद केली.
प्रादेशिक सेनेत 1 ते 5 सप्टेंबरला भरती
सातारा, दि. 24 (जिमाका) : प्रादेशिक सेनेत शिपाई (जनरल ड्यूटी), लिपिक पदासाठी भरती मेळावा दि.1 ते 5 सप्टेंबर 2015 या कालावधीत सकाळी 7 वाजता कोल्हापूर येथील मिलिटरी प्रशिक्षण मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.
मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या 109 इन्फन्ट्री बटालियन (टी.ए.), कोल्हापूरमार्फत आयोजित या भरती मेळाव्यामध्ये 18 वर्षा पासून ते 42 वर्षापर्यंतचे उमेदवार भाग घेऊ शकतात. शिपाई (जनरल ड्यूटी) 28 पदे, लिपीक 1 पद भरण्यात येणार आहेत. शिपाई (जनरल ड्यूटी) या पदाकरिता इयत्ता 10 वी उत्तीर्ण (45 टक्के गुण आवश्यक), संगणकाचे ज्ञान आवश्यक, राज्य, जिल्हा पातळीवरील खेळाडू उमेदवारांना पा्रधान्य दिले जाईल. लिपिक या पदाकरिता 12 वी उत्तीर्ण, टंकलेखन व संगणकाचे ज्ञान आवश्यक. खेळाडू उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. उमेदवारांनी आपली शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मूळ प्रती (एसएससी व एच.एस.सी. प्रमाणपत्र, गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा किंवा शिकत असल्याचा दाखला), खेळ, रहिवाशी आणि इतर आवश्यक प्रमाणपत्र सहित व स्वत:च्या फोटोच्या आठ प्रतीसह सकाळी 7 वाजण्यापूर्वी चाचणीकरीता उपस्थित रहावे. त्यानंतर येणाऱ्या उमेदवारांचा चाचणीकरता विचार केला जाणार नाही. उमेदवार कमावता असल्याचे प्रमाणपत्र/नोकरी करीत असल्याचे प्रमाणपत्र किंवा व्यवसाय करीत असल्याचे प्रमाणपत्र त्याच्या संस्थेने अगर सरपंच व त्यावर राजपत्रीत अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळांमध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंना अतिरिक्त बोनस गुण दिले जातील. सर्व कागदपत्रांची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांना पात्र मानले जाईल. उमेदवारांची उंची कमीत कमी 160 सें.मी., वजन 50 किलो, छाती 77 सेमी व फुगवून 82 से.मी. असणे आवश्यक आहे.
प्रादेशिक सेनेमध्ये भरती झालेल्या जवानांना वर्षातून दोन महिने प्रशिक्षणासाठी बोलविले जाते व त्याच कालावधीचा मोबदला दिला जातो. त्यानंतर जेंव्हा आवश्यकता असेल तेंव्हा त्यांना बोलावून देशाच्या कोणत्याही ठिकाणी देश रक्षणासाठी पाठविले जाते. सेवारत असलेल्या कालावधीकरिताच फक्त लागू असलेले वेतन व इतर भत्ते देण्यात येतात. सेवारत नसलेल्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे वेतन किंवा भत्ते दिले जात नाहीत. अधिक माहिती साठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.
ग्रामपंचायत मतदानाच्या दिवशी कामगारांना सुट्टी
ग्रामपंचायत मतदानाच्या दिवशी कामगारांना सुट्टी
सातारा, (जिमाका): ग्रामपंचायत निवडणुकीत कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळावी यासाठी सर्व कामगार आस्थापनांना 4 ऑगस्ट 2015 रोजी सुट्टी द्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले.
कामगारांना ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क प्राप्त करुन देण्याच्या उद्देशाने मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत क्रमांक व्हीपीएस-1164/28613 ई, दि.3 फेब्रुवारी 1965शासन निर्णयानुसारि दि.4 ऑगस्ट रोजी सर्व दुकाने, आस्थापना, हॉटेल खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना पगारी सुट्टी द्यावी.
तसेच मतदानाच्या दिवशी अनुपस्थितीमुळे धोका अथवा मोठ्या प्रमाणात नुकसान होईल अशा निवडणूक क्षेत्रातील उद्योगातील कामगार, मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची विशेष सवलत द्यावी, असे जिल्हाधिकारी श्री. मुद्गल यांनी कळविले आहे.
दारूबंदी जिल्ह्याकरिता विशेष मोहीम राबविणार- मुख्यमंत्री
मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यात नुकतीच दारूबंदी करण्यात आली असून गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात यापूर्वीच दारूबंदी करण्यात आली आहे. या दारूबंदी जिल्ह्यात लगतच्या जिल्ह्यातून रात्रीच्या वेळी अवैधरित्या दारूचा व्यवसाय होत असल्याने या जिल्ह्यात दारूबंदीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी विधानपरिषदेत दिली.
यवतमाळ जिल्ह्यातील यावली येथे दारूबंदीसाठी आग्रह धरणाऱ्या पोलीस पाटील यांच्या हत्येप्रकरणी विधानपरिषद सदस्य संदीप बाजोरिया, डॉ. नीलम गोऱ्हे, प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील पोलीस पाटलांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य शासनाची आहे. त्यामुळे पोलीस पाटील विरेंद्र राठोड यांच्या हत्येप्रकरणी संशयितांना अटक करण्यात आली आहे. राज्याचे दारूबंदीबाबतचे धोरण हे प्रतिबंधात्मक असून त्याचे नियमन होण्यासाठी अन्य जिल्ह्यात परवाने देण्यात आले आहेत. तथापि, संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करावयाची असल्यास त्याबाबत आढावा घेणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी एका उपप्रश्नाला उत्तर देताना उत्पादन शुल्क मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले, दारूबंदीसंदर्भात गावकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. ग्रामसभेत ठराव केल्यानंतर दारू विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याचा शासन प्रयत्न करणार आहे. मात्र त्या भागातील मागणी करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण किमान 50 टक्के असणे आवश्यक असून त्या स्त्रियांची नावे त्या मतदारयादीत समाविष्ट असणे गरजेचे आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेस बारवी धरणातून लवकरच अतिरिक्त पाणी देणार- मुख्यमंत्री
बारवी धरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील सांडव्याकडील भागाची उंची वाढविण्याचे व त्यावर स्वयंचलित दरवाजे बसविण्याचे काम प्रगतीपथावर असून या धरणाच्या सांडव्याचे काम 68.60 मीटर तलांकापर्यंत वाढविल्यास पाणी फुगवठ्यामुळे काचकोली पाड्यातील तसेच मौजे तोंडली येथील घरे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गावांचे लवकरात लवकर पुनर्वसन करून कल्याण-डोंबिवली महापालिकेस अतिरिक्त पाणी देण्याचा प्रश्न तपासून पाहू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
बारवी धरणातून अतिरिक्त पाणी मिळण्यासंदर्भात सदस्य सर्वश्री संजय दत्त, निरंजन डावखरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, मौजे तोंडली येथील पुनर्वसन गावठाणाची विकासकामे 50 टक्के पूर्ण झाली आहेत. तथापि तोंडली ग्रामस्थांनी उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका दाखल केल्याने एप्रिल 2014 पासून सदरची कामे ग्रामस्थांनी बंद पाडली आहेत. मात्र त्यावर सामोपचाराने तोडगा निघू शकतो. सध्या पावसाळा सुरू झाला असल्याने धरणाचे काम करता येत नाही. पावसाळा संपल्यानंतर बारवी धरणाची उर्वरित कामे तत्काळ करण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना वाजवी दरात दर्जेदार बी-बियाणे मिळणार- प्रा. राम शिंदे
शेतकऱ्यांना वाजवी दराने चांगल्या प्रतीची खते, बी बियाणे, किटकनाशके इत्यादी प्रकारच्या कृषी निविष्ठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध आहे. महाराष्ट्र कापूस बी-बियाणे पुरवठा, वितरण, विक्री व विक्रीच्या किंमतीचे निश्चितीकरण विनियमन अधिनियम 2009 अन्वये कापूस बियाण्यांच्या कमाल विक्री किंमती राज्य शासन नियंत्रित करत असून दि. 8 जून 2015 च्या अधिसूचनेद्वारे बीटी-कॉटन बियाण्यांच्या किंमती रू. 100 ने कमी केल्या असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री प्रा.राम शिंदे यांनी आज विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे विचारलेल्या प्रश्नासंदर्भात सांगितली.
विधानपरिषद सदस्य श्रीमती शोभाताई फडणवीस, सर्वश्री जयंत पाटील, महादेव जानकर यांनी बियाणांच्या काळ्याबाजारासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता, त्यावेळी प्रा. शिंदे बोलत होते. ते म्हणाले, महाबीज व राष्ट्रीय बीज निगम या शासनाच्या अधिपत्याखाली येत असून बीटी-कॉटन हे बियाणे 8 जून 2015 च्या अधिसूचनेअन्वये ज्या विक्रेत्यांनी दिनांक 8 जूननंतर अधिक किंमतीने बियाण्यांची विक्री केली असेल, त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही, यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही प्रा. शिंदे यांनी सांगितले.
औरंगाबाद येथील समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या तक्रारीची सचिव स्तरीय चौकशी- डॉ.रणजित पाटील
औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या निविदेतील अटी व शर्तीनुसार डी.आय. पाईपऐवजी एच.डी.पी.ई व डी.आय. पाईप वापरण्यास परवानगी देण्यात आली असून याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर झाला नसल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.
औरंगाबाद येथे समांतर जलवाहिनीचे कामासंदर्भात विधानपरिषद सदस्य सर्वश्री सुभाष झांबड, संदीप बाजोरिया, जयंत पाटील या सदस्यांनी लक्षवेधी मांडली होती, त्यावेळी डॉ. पाटील बोलत होते.
केंद्र शासन पुरस्कृत जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानाच्या (जेएनएनयुआरएम) अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्मॉल ॲन्ड मिडीयम टाऊन (युआयडीएसएसएमटी) या उपअभियांतर्गत औरंगाबाद शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या रूपये 359.67 कोटी किंमतीच्या प्रस्तावास केंद्र शासनाने 2009 साली मान्यता दिली होती. तथापि, औरंगाबाद महानगरपालिकेच्या 2 मार्च 2015 च्या ठरावाच्या अनुषंगाने झालेली तक्रार लक्षात घेता सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत सविस्तर चौकशी करण्यात येणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
ईगल फायर वर्क्स या कारखान्यातील स्फोटप्रकरणी दंडाधिकारीय चौकशीचे आदेश- विजय देशमुख
कवठेएकंद येथील ईगल फायर वर्क्स या शोभेच्या दारू बनविणाऱ्या कारखान्यात झालेल्या स्फोटातील मृतांना नुकसान भरपाई देण्याच्या अनुषंगाने कामगार न्यायालयाकडे प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती कामगार राज्यमंत्री विजय देशमुख यांनी विधानपरिषदेत दिली.
कवठेएकंद (ता.तासगाव, जि. सांगली) येथे झालेल्या शोभेच्या दारू स्फोटसंदर्भातील लक्षवेधी सदस्य हेमंत टकले, महादेव जानकर यांनी मांडली होती, त्यावेळी श्री. देशमुख बोलत होते. ते म्हणाले, याप्रकरणी कारखाने अधिनियम 1948, महाराष्ट्र कारखाने नियम 1963, स्फोटके अधिनियम 1884, स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 तसेच भारतीय दंडविधानअंतर्गत भोगवटादाराविरूद्ध कार्यवाही करण्यात आली आहे. या घटनेच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी वसतीगृहाचे काम 20 जिल्ह्यात प्रगतीपथावर- एकनाथराव खडसे
मुंबई : राज्यातील अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी वसतीगृह बांधण्याचे काम 20 जिल्ह्यात प्रगतीपथावर असून नऊ जिल्ह्यात वसतीगृहे सुरू करण्यात आली आहेत. या वसतीगृहांच्या बांधकामासाठी निधीची कमतरता नाही, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथराव खडसे यांनी गुरूवारी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
सदस्य ख्वाजा बेग यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. खडसे म्हणाले, अल्पसंख्याक समाजातील मुला-मुलींसाठी वसतीगृहे बांधण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. राज्यातील अल्पसंख्याक बहूल भागात अथवा तालुक्यातील अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या 25 टक्के आहे, तेथे वसतीगृह बांधण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे.
सध्या अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या वसतीगृहासाठी 20 जिल्ह्यात जागा उपलब्ध असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये जागा उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरू आहेत. वसतीगृहासाठी जागा शहरात असावी अथवा शहरालगत असावी, असे सांगून श्री. खडसे म्हणाले, अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी असलेल्या वसतीगृहामध्ये प्रवेश देताना 70 टक्के प्रवेश अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी तर 30 टक्के प्रवेश उर्वरित समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिला जाईल.
यवतमाळ येथे वसतीगृहासाठी जागा उपलब्ध झाली असून तेथे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी पॉलिटेक्निक महाविद्यालय सुरू करण्यात येईल. तसेच रत्नागिरी येथील मुलींसाठीच्या वसतीगृहात याच वर्षीपासून प्रवेश देण्यात येईल, असेही श्री. खडसे यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य श्रीमती डॉ. नीलम गोऱ्हे, हुस्नबानू खलिफे यांनी भाग घेतला.
आणेवारी पद्धतीत बदल करण्याबाबत सहा महिन्यात सकारात्मक निर्णय- एकनाथराव खडसे
आणेवारी पद्धतीत बदल करण्याबाबत सहा महिन्यात राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी माहिती कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
राज्यात गत हंगामातील कापूस व धान पिकांच्या नुकसानीची शेतकऱ्यांना मदत मिळण्याबाबतचा प्रश्न सदस्य संदीप बाजोरीया यांनी उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेतील उपप्रश्नाला उत्तर देताना श्री. खडसे बोलत होते. ते म्हणाले, ब्रिटीश काळापासून सुरू असलेली आणेवारी पद्धत बदलण्यासाठी राज्य शासनाने कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने आणेवारी पद्धत, पीक पद्धत, जमिनीचा पोत, भौगोलिक परिस्थिती आदीबाबतचा अभ्यास केला असून या समितीच्या शिफारसी मंत्रीमंडळासमोर मांडण्यात येतील. त्यानंतर येत्या सहा महिन्यात आणेवारी पद्धत बदलण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
गतवर्षीच्या खरीप हंगामातील बाधीत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले आहे. यासाठी यवतमाळ जिल्ह्यातून 254 कोटी रुपयांची मागणी होती, त्यानुसार रक्कम वितरीत करण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांचे बॅंक खाते आणि वारशाबाबत वाद असल्याने त्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा होऊ शकली नाही. हा निधी शासनाकडे परत आला नसून तो बॅंकेत जमा आहे. शेतकऱ्यांचे बॅंक खाते उघडल्यानंतर तो त्यांच्या खात्यात जमा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या 10 वर्षात धान खरेदी ज्या पद्धतीने होत होती त्याच पद्धतीने यावर्षी धान खरेदी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य माणिकराव ठाकरे, जयंत पाटील, अनिल तटकरे, हुस्नबानू खलिफे यांनी भाग घेतला.
मोठ्या प्रमाणावर कोल ब्लॉक मिळाल्याने वीज निर्मितीला चालना- चंद्रशेखर बावनकुळे
केंद्र शासनाकडून राज्याला यावर्षी मोठ्या प्रमाणावर कोल ब्लॉक मिळाला असून त्यामुळे वीज निर्मितीला चालना मिळेल, अशी माहिती ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
सदस्य ॲड. जयदेव गायकवाड यांनी राज्यातील वीज निर्मितीकरिता कोळसा खाणी महाराष्ट्रात राहण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाण आधीपासूनच कर्नाटक राज्याला मिळाली आहे. यावर्षी केंद्रीय कोळसा मंत्रालयाकडून गारे पाल्मा सेक्टर 2 ही कोळसा खाण आवंटीत करण्यात आली आहे. वेस्टर्न कोलफिल्ड इंडियाकडून नियमित कोळसा उपलब्ध होत आहे.
राज्यातील ए,बी, सी आणि डी प्रकारच्या फिडरवर भारनियमन केले जात नाही, असेही श्री. बावनकुळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य शरद रणपिसे, जयंत पाटील, श्रीमती शोभाताई फडणवीस यांनी भाग घेतला.
पत्रकारांना संरक्षण देण्याबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री
मुंबई : पत्रकारांना त्यांच्या कार्यापासून परावृत्त करणाऱ्या असामाजिक घटकांवर वचक बसविण्यासाठी पत्रकार हल्लाविरोधी कायद्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन येथे पत्रकारांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत सांगितले.
पत्रकार हे जनतेपर्यंत माहिती पोहोचविण्याचे कार्य करीत असताना त्यांना त्यांच्या कर्तव्यापासून परावृत्त करणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी शासन ठोस पाऊले उचलेल. तसेच पत्रकारांना वैद्यकीय सुविधा व निवृत्तीवेतनासाठी शासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, महासंचालक चंद्रशेखर ओक, संचालक शिवाजी मानकर, पत्रकार शिष्टमंडळामध्ये पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, मुंबईचे निमंत्रक एस.एम. देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक, मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष चंदन शिरवाळे, टी.व्ही.जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विलास आठवले, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष मृत्यूंजय बोस, बॉम्बे न्यूज फोटोग्राफर असोसिएशनचे सदस्य दत्ता खेडेकर, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष यदू जोशी, पत्रकार प्रफुल्ल मारपकवार, सुरेंद्र गांगण, प्रसाद धावे, कमलेश सुतार, चंद्रकांत शिंदे, विनोद जगदाळे, सुरेंद्र मिश्रा, संतोष शिरलेकर, विशाल सिंग तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र कोल्हे, डॉ.स्मिता कोल्हे यांचा आंतरराष्ट्रीय पालकदिनी होणार सन्मान
पुणे :
‘सर फाऊंडेशन’ आणि ‘डीपर’ या स्वसंसेवी संस्थांच्या वतीने पालक दिनी पुण्यात महापालक सन्मान सोहळा आयोजित केला आहे. पालकदिनाचे महत्त्व रुजविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या सोहळ्यात यावर्षी मेळघाटातील आदीवासींसाठी कार्य करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दांपत्य डॉ. रवींद्र कोल्हे, डॉ. स्मिता कोल्हे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. ‘सर फाऊंडेशन’तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत हरीश बुटले यांनी ही माहिती दिली.
जुलै महिन्याचा चौथा रविवार हा आंतरराष्ट्रीय पालकदिन म्हणून साजरा होतो यानिमित्ताने हा सन्मान सोहळा रविवार दि. 26 जुलै 2015 रोजी पुण्यात यशवंतराव चव्हाण सभागृह (कोथरूड) येथे सकाळी 9 वाजता होणार आहे. इतिहास संशोधक डॉ. भा.ल. ठाणगे आणि सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ इंगोले यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. एक लाख रुपये रोख, सन्मानपत्र, शाल-श्रीफळ असे या सन्मानाचे स्वरूप आहे. या सन्मान सोहळ्याचे हे तिसरे वर्ष आहे.
आधीच्या वर्षीचे पुरस्कार विजेते पुढील वर्षीच्या पुरस्कार्थींची निवड करतात. 2013 चे पुरस्कार्थी डॉ. प्रकाश आमटे, व डॉ. मंदाकिनी आमटे आणि 2014 चे पुरस्कारार्थी डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. उर्मिला सप्तर्षी यांनी कोल्हे दांपत्याची निवड केली आहे.
या सन्मान सोहळ्यात पालकत्त्वाला वाहिलेल्या ‘तुम्ही आम्ही पालक’ या मासिकाचा दुसरा वर्धापन दिन आणि तृतीय वर्षाच्या पहिल्या अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.
‘डीपर’चे 10 व्या वर्षात पदार्पण होत असून, वैद्यकीय व इंजिनिअरींगच्या सीईटीमध्ये प्रथम येणार्या डीपरच्या विद्यार्थ्यांचा सत्कार व गरजू विद्यर्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी साहाय्य प्रदान करण्यात येणार आहे. तसेच यावेळी स्कॉलरशिप सराव परीक्षा महाएक्झामध्ये प्रथम येणार्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
‘साद माणुसकीची-संपत्ती सहयोग ते संपत्ती दान’ या चर्चासत्राचे आयोजन
दिनांक 26 जुलै रोजी दुपारच्या सत्रात ‘साद माणुसकीची-संपत्ती सहयोग ते संपत्ती दान’ या चर्चासत्राचे आयोजन दुपारी 2 ते 6 या वेळेत करण्यात आले आहे. हे चर्चासत्र‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन’ जे.पी.नाईक सेंटर, कुंबरे पार्क शेजारी, ‘एकलव्य पॉलिटेक्निक’च्या मागे, कोथरूड येथे होईल. चर्चासत्रा विषयीच्या संकल्पनेचे सादरीकरण हरीश बुटले (संस्थापक डिपर व सर फाऊंडेशन) करतील तसेच अरूण कुंभार संकल्पनेच्या तांत्रिक बाबी सांगतील. यामध्ये प्रदीप लोखंडे (संस्थापक रूरल रिलेशन्स, पुणे), नरेश झुरमुरे (उपव्यवस्थापकीय संचालक, यशदा), डॉ. गिरीश कुलकर्णी (स्नेहालय अहमदनगर), विवेक वेलणकर (अध्यक्ष सजग नागरिक मंच), अॅड.असीम सरोदे, डॉ. अविनाश सावजी (संस्थापक प्रयास व सेवांकुर, अमरावती), अनिल धनेश्वर हे मान्यवर सहभागी होणार आहेत. डॉ. श्रीराम गीत, बाबासाहेब माने चर्चासत्राचे सूत्रसंचालन करतील. समाजसेवी संस्था व सामाजिक कार्य करू इच्छिणार्या सुजाण नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. अधिक माहितीसाठी 8605009232 / 9823099663 या क्रमांकांवर संपर्क साधावा
मराठा आरक्षणाबाबत 15 दिवसात सामान्य प्रशासन विभागाकडून सुधारित आदेश काढणार- राजकुमार बडोले
विधानपरिषदेतील लक्षवेधी:मुंबई :
मराठा आरक्षणासंदर्भात 7 एप्रिल 2015 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार येत्या 15 दिवसात सामान्य प्रशासन विभागाकडून सुधारित आदेश काढण्यात येतील, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी विधानपरिषदेत दिली.सदस्य विनायक मेटे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री. बडोले यांनी ही माहिती दिली.
अन्नधान्य खरेदीच्या निविदेतील अटी शिथिल करण्यात येतील- विष्णू सवरा
आदिवासी विकास विभागांतर्गत अन्नधान्य खरेदीसाठी आयुक्त स्तरावर काढण्यात येणाऱ्या निविदांमध्ये पारदर्शकपणे व्यवहार होतील याकडे लक्ष दिले जाईल. या निविदेमधील काही अटी शिथिल करण्यात येतील, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली.सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री. सवरा म्हणाले, यासंदर्भातील निविदा आयुक्त स्तरावर काढण्यात येत असे. आता मात्र अपर आयुक्त स्तरावर काढल्या जातात. या निविदा प्रकल्प अधिकारी स्तरावर काढण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. पूर्वी ही निविदा एकाच ठिकाणी काढण्यात येत होती. ती आता चार ठिकाणाहून काढण्यात येते. निविदेत पारदर्शकता असली पाहिजे. त्यातील काही अटी शिथिल करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री जयंत पाटील, हेमंत टकले यांनी भाग घेतला.
वाढवण बंदर करताना स्थानिक मच्छिमारांवर अन्याय होणार नाही- रामदास कदम
वाढवण बंदर करताना स्थानिक मच्छिमारांवर अन्याय होणार नाही. नागरिकांना विश्वासात घेऊन काम केले जाईल, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानपरिषदेत दिली.यासंदर्भात सदस्य कपिल पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री. कदम म्हणाले, वाढवण समुद्र किनाऱ्यापासून 8 ते 10 नॉटिकल मैल अंतरावर हे बंदर केंद्र शासन व राज्य शासन यांच्यामार्फत करण्यात येत आहे. स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेण्यात येईल. तसेच यासंदर्भात आज सभागृहात झालेल्या चर्चेबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करु असेही त्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री आनंद ठाकूर, निरंजन डावखरे यांनी भाग घेतला.
काळबादेवी येथील आगीत मृत्युमुखी पडलेल्या अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांना शौर्यपदक देण्याची शिफारस- डॉ. रणजित पाटील
काळबादेवी येथील इमारतीला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या मुंबई अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांना शौर्यपदक देण्यासंदर्भात राष्ट्रपतींकडे राज्य शासनामार्फत पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. या अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील मुलांना त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी देण्यात येईल, अशी माहिती नगर विकास विभागाचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली.सदस्य नीलम गोऱ्हे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना डॉ. पाटील बोलत होते. ते म्हणाले, काळबादेवी येथील इमारतीला लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या अधिकारी व जवानांच्या कुटुंबियांना महापालिकेच्या प्रचलित तरतुदीप्रमाणे आर्थिक मदत करण्यात आली आहे. या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च मुंबई महापालिका करणार आहे. तसेच त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे
डॉ. पाटील यांनी सांगितले.
डॉ. पाटील यांनी सांगितले.
माहूल येथे मुंबई महापालिकेतील कर्मचारी तसेच अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून सदनिका देण्यात आल्या आहेत. त्या राहण्यायोग्य नाहीत याबाबतचा केंद्रीय पर्यावरण विभागाचा अहवाल असल्यास त्याबाबत विचार करण्यात येईल, असेही डॉ. पाटील यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री कपिल पाटील, जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.
अंबरनाथ येथील वसतिगृह महिनाभरात सुरु करणार- रविंद्र वायकर
अंबरनाथ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेले वसतिगृह महिनाभरात सुरु करण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधानपरिषदेत दिली.सदस्य रामनाथ मोते यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री. वायकर म्हणाले, 300 विद्यार्थी क्षमतेचे हे वसतिगृह असून महिनाभरात वापर परवाना मिळवून वसतिगृहामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. याठिकाणी काही जागा शिल्लक राहिल्यास तेथे अन्य शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील प्रवेश दिला जाईल. तसेच स्थानिक बचत गटाच्या माध्यमातून तातडीने खानावळ सुरु करुन वसतिगृह सुरु करण्यात येईल.
विधान परिषद इतर कामकाज :
चंद्रभागेच्या पात्रात राहुट्या, तंबू उभारण्यास उच्च न्यायालयाची परवानगी
आषाढी, चैत्री, माघी आणि कार्तिकी अशा चार प्रमुख यात्रांसाठी चंद्रभागा नदीच्या पात्रात प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घेऊन धार्मिक प्रयोजनार्थ भजन, कीर्तन, जागर, प्रवचन यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी निश्चित करतील अशा वर्षातील प्रमुख 20 दिवसांकरिता राहुट्या व तंबू उभारण्यासाठी सवलत देण्यात आली असल्याची माहिती गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधान परिषदेत एका निवेदनाद्वारे दिली.नदीच्या पात्रात प्रदूषण होऊ नये म्हणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर शासनाने केलेल्या विनंतीनुसार न्यायालयाने ही सवलत दिली आहे. यामुळे वारकरी संप्रदायाची परंपरा जतन केली जाणार असल्याचेही श्री.पाटील यांनी सांगितले.
आता सोशल मीडियातील लेखनासाठीही पत्रकारिता पुरस्कार
राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2014 साठी
31 जुलैपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
व्यक्ती, संस्था, संघटनेकडून येणा-या शिफारसींचाही विचार होणार
सातारा : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार याबरोबरचआता सोशल मीडियातील लेखनासाठीहीीपुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी 2014 ते 31 डिसेंबर 2014पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै2015असा आहे.
या स्पर्धेत आता कुठल्याही व्यक्ती, संस्था किंवा संघटनेला पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-या व्यक्तीच्या नावांची शिफारस करता येणार आहे. पत्रकारितेत काम करणा-या व्यक्तीने अर्ज केला नसेल, मात्र तिची शिफारस कुठल्याही व्यक्ती किंवा संस्था, संघटनेने केली असेल तर त्याचा पुरस्कारासाठी विचार होऊ शकतो. तथापि, अशी शिफारस करताना प्रवेशिका सादर करण्याबाबतच्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे.
2014या कॅलेंडर वर्षात प्रसिद्ध झालेले विकासविषयक लेख, विशेष वृत्त व वृत्त मालिका, वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या तसेच सोशल मिडियासंदर्भात त्यांची संबंधित वर्षात प्रसिध्द झालेली विकासविषयक छायाचित्रे यांचा विचार करण्यात येईल. स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in, www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in येथेही उपलब्ध आहेत.
पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे :
राज्यस्तर (मराठी) आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार-51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; राज्यस्तर (इंग्रजी) अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; राज्यस्तर (हिंदी) बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, राज्यस्तर (उर्दू) मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; शासकीय गट (मराठी) यशवंतराव चव्हाण पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पु.ल.देशपांडे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार- 41 हजार रुपये, मानचिन्ह वप्रशस्तीपत्र आणि केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व.ज.) 41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र.र
विभागीय पुरस्कार :
नाशिक विभाग : दादासाहेब पोतनीस पुरस्कार-51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र (यापैकी रुपये 10 हजार, दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत);औरंगाबाद विभाग (लातूरसह) : अनंतराव भालेराव पुरस्कार-41 हजार रुपये,मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;मुंबई विभाग: आचार्य अत्रे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;
पुणे विभाग:नानासाहेब परुळेकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;
कोकण विभाग:शि.म.परांजपे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;रकोल्हापूर विभाग : ग.गो.जाधव पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;अमरावती विभाग : लोकनायक बापूजी अणे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;नागपूर विभाग: ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र.
नियम व अटी
पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक कामाच्या प्रसिद्धीसाठी, जनतेमधील विकास विषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचाही विचार केला जाईल. मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य/ विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची निवड याच पद्धतीने केली जाईल. या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी राज्य व विभागीय स्तर आहेत. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार केवळ राज्यस्तरीय आहेत. पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमतीपत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ लिखाणाचे कात्रण त्याच्या 2 प्रतीसह पाठवावे लागेल. मूळ लिखाणाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या 2 प्रती नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लिखाणावर लेखकाचे नाव नसल्यास, ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिद्ध झाला असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला जोडलेल्या प्रवेशिकांचाच विचार केला जाईल.
पत्रकारांच्या, तसेच वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
अर्जदारांनी राज्य व विभागीय पातळीवरील प्रवेशिका नागपूर आणि औरंगाबाद येथील संचालक (माहिती), अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, कोकण विभाग येथील विभागीय उपसंचालक (माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात. प्रवेशिकेसोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही.
मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चारही भाषेतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी तसेच राज्य पातळीवरील शासकीय गट व विभागीय पातळीवरील मराठी भाषेतील पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल. समितीची रचना, स्पर्धा व स्पर्धेतील पुरस्कारासंबंधी शासनाचे निर्णय अंतिम राहतील.
ज्या नियतकालिकांचा खप व जनमानसावरील प्रभाव चांगला आहे, अशाच नियतकालिकांतील मजकूर स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी पात्र ठरेल.
जे पत्रकार बृहन्मुंबई, नवी मुंबई (कोकण), कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या विभागात वास्तव्य करीत असतील, त्यांना त्या विभागासाठी असलेल्या विभागीय स्पर्धेतच भाग घेता येईल. मात्र त्यांचे लेखन अन्य कोणत्याही विभागातील वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले असले तरी ते ग्राह्य मानण्यात येतील.
गोवा व बेळगाव येथील पत्रकारांना कोल्हापूर विभागीय स्पर्धेत (सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्यांसह) सहभाग घेता येईल. दिल्ली येथील पत्रकारांनाही आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात पाठविता येतील.
शासकीय गटातील स्पर्धेसाठी एकच प्रवेशिका पाठविण्याची मुभा राहील. प्रवेशिका संबंधित विभागाच्या संचालक किंवा उपसंचालकांना व बृहन्मुंबईच्या प्रवेशिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वेगवेगळ्या पाठवाव्या लागतील.
2014या वर्षात दैनिक वृत्तपत्रात, नियतकालिकात प्रसिध्द झालेल्या लेखांची कात्रणे प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
प्रवेशिका राज्यस्तरासाठी किंवा विभागीयस्तरासाठी आहे तसेच कोणत्या भाषेकरिता आहे, याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका, त्यासोबत जोडलेली लेखांची कात्रणे नीटनेटकी असणे अत्यावश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत अशी प्रवेशिका रद्द करण्यात येईल. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झालेला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.
प्रत्येक गटासाठी व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास, त्याचा विचार केला जाणार नाही.
इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांसाठी स्पर्धा
इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांसाठी उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पु. ल. देशपांडे पुरस्कार देण्यात येतो. ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खासगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय उपक्रम यांना यामध्ये सहभाग घेता येईल.
पुरस्काराचे स्वरुप 41,000 रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे आहे. वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली असावीत.
वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीची माहिती तसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली, याबाबतचे संबंधित संस्था प्रमुख/ संपादक यांचे प्रमाणपत्र असावे. स्थानिक केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे.े
प्रवेशिकेसोबत संबंधित वृत्तकथेची सीडी/ कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक/ जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तर मुंबईकरिता उपसंचालक (वृत्त), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळ मजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 यांच्याकडे पाठविण्यात यावी. मराठी वृत्तकथाचित्र राज्यस्तरीय पुरस्कारासाठी थेट प्राप्त झालेल्या नावांमधून पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स मिडियातील तज्ज्ञ व्यक्तींची परिक्षण समितीवर नियुक्ती करण्यात येईल. तसेच याशिवाय अटी नियम पुस्तिकेतील क्रमांक 6 आणि अन्य संबंधित अटी या गटासाठीही लागू राहतील.
सोशल मीडिया पुरस्कार, रु. 41 हजार मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
ही स्पर्धा संकेतस्थळे व ब्लॅाग या सोशल मीडियातील प्रसारित मराठी भाषेतील वृत्त/पत्रकारिता विषयक मजकुरासाठी आहे. या स्पर्धेत संकेतस्थळे व ब्लॉग सोशल मीडियाचा वृत्त/ पत्रकारिता विषयक प्रभावी वापर करणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींना सहभाग घेता येईल. पत्रकारिता ही स्पर्धेच्या संबधित वर्षातील असावी. स्वतंत्र ब्लॉगव्दारे लेखन केलेले असल्यास ब्लॉगला किमान एक वर्ष झालेले असावे. त्याचप्रमाणे, वृत्त/ पत्रकारिताविषयक संकेतस्थळ हे अधिकृत असावे व त्यावर सोशल मीडियाचा वापर करताना केंद्र शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केलेला असावा. प्रवेशिका या विकास पत्रकारिताविषयक लेखनाच्या असाव्यात व त्यात शासनाच्या विविध योजनांना पूरक अभिव्यक्ती असावी. प्रवेशिका पाठविताना अर्जदाराने वा त्यांचे नामनिर्देशन ज्या व्यक्ती/संस्था/संघटना करतील त्यांनी सोशल मीडियाव्दारे करण्यात आलेल्या पत्रकारितेची उदाहरणे व ती कोणत्या तारखेस प्रसारित झाली त्यांच्या मुद्रित प्रती (प्रिंट आऊट ) सादर कराव्यात. नियमातील संबंधित अटी या गटासाठीही लागू राहतील.
छायाचित्रकार पुरस्कार
राज्यस्तर : तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार 41 हजार रुपये, उत्कृष्ट छायाचित्रकार स्पर्धा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रातील पूर्णवेळ छायाचित्रकारांसाठी आहे.
केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, शासकीय गट (मावज)41 हजार रुपये, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.
उत्कृष्ट छायाचित्रकार स्पर्धा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांकरिता आहे.
2014च्या पुरस्कारासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2014या कालावधीत प्रसिद्ध झालेले महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवरील छायाचित्र ग्राह्य मानण्यात येईल. मात्र हे छायाचित्र मूळ स्वरुपातील असावे. फोटो प्रत नसावी.
पुरस्कारासाठी छायाचित्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक कामाच्या प्रसिद्धीसाठी जनतेमधील जाणिव जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल.
एकाच छायाचित्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झालेला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.
पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ छायाचित्रे पाठविण्यात यावीत. ज्या नियतकालिकात छायाचित्र प्रसिद्ध झाले असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला, तारीख नियतकालिकाचे नाव प्रवेशिकेसोबत जोडलेले असावे. अन्यथा त्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.
या स्पर्धेविषयींची माहिती आणि अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in, www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in येथे उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा माहिती अधिकारी, उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालय, संचालक, नागपूर-अमरावती व संचालक, औरंगाबाद, महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी-गोवा तसेच नवी दिल्ली आणि वृत्त शाखा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथे उपलब्ध आहेत.
या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे.
लोकमान्य टिळक यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आदरांजली
सातारा (जिमाका) :- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, उपजिल्हाधिकारी (महसूल) भारत वाघमारे, तहसीलदार चंद्रशेखर सानप, रंजना ढोकळे, सविता लष्करे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी के.के. मार्गमवार, आदींनीही गुलाब पुष्प अर्पण करुन लोकमान्य टिळक यांना आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व शाखेतील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
वाटाणा लागवडीतून साधली आर्थिक प्रगती
लेखक – राहूल पवार
जिल्हा माहिती कार्यालय, सातारा
महाबळेश्वर तालुका हा सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील टोकावरती निसर्गसौंदर्याने नटलेला तालुका आहे. येथील हवामनातील वैविधतेमुळे व जास्त पावसामुळे शेतकऱ्यांना विविध पिके घेण्यास खूप मर्यादा आहेत. अशी परिस्थिती असतानाही महाबळेश्वर तालुक्यात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माचे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे यांनी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षणे देऊन वातावरणाशी जुळवून घेऊन कोणती पिकपद्धती अवलंबता येईल याबाबत जागृती करण्याचे काम केले आहे.
अशाच प्रकारचा एक वैशिष्ट्यपूर्ण व नाविन्यपूर्ण प्रकल्प महाबळेश्वर तालुक्यातील मौजे गोडवली गावामध्ये आत्माच्या मार्गदर्शनाखाली व तालुका कृषी अधिकारी, महाबळेश्वर यांच्या मदतीने अधुनिक पद्धतीने वाटाणा लागवड प्रकल्प सध्या कार्यान्वित आहे. गोडवली या गावामधील शेतकरी पारंपारिक पद्धतीने स्थानिक (आरकेल) उपलब्ध असणाऱ्या वाटाणा वाणीची लागवड करत होते. या वाणातून शेतकऱ्यांना 3 ते 4 तोडे मिळत असे, वाटाण्याच्या शेंगेमध्ये 3-4 दाणेच यायचे पर्यायाने उत्पादन कमी होऊन त्यास जेमतेम दर मिळत होते. यातून शेतकारी आपली कशीबशी उपजीविका करत होते. ही शेतकऱ्यांची परिस्थिती ओळखून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) मार्फत शेतकऱ्यांसाठी एक नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार करुन या प्रकल्पामार्फत प्रथमत: शेतकऱ्यांना वाटणा लागवडीच अधुनिक तंत्रज्ञानाबाबत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील शास्त्रज्ञांच्या मार्फत गोडवली या गावी दिले. त्यातून शेतकऱ्यांना वाटणा लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान समजले.
या प्रशिक्षणानंतर गावातील 100 शेतकऱ्यांनी प्रकल्प भाग घेण्यासाठी विनंती केली. त्यानुसार 100 शेतकऱ्यांच्या शेतावरील 50 एकर क्षेत्रावरती वाटाण्याच्या गोल्डन (जीएस-10) या वाणाची 100 प्रात्यक्षिके घेण्याचे ठरविले व त्यानुसार शेतकऱ्यांना आत्मा कार्यालामार्फत 10 किलो वाटाणा बियाणे प्रत्येकी 20 गुंठे क्षेत्रासाठी पिक प्रात्यक्षिक देण्यात आले व त्याची पेरणीही अधुनिक तंत्रज्ञानानुसारच करण्यात आली. त्यामुळे पहिल्यांदाच शेतकऱ्यांची प्रतिएकरी 10 किलो बियाण्यांची बचत झाली.
या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना एक नाविन्यपूर्ण सहल म्हणून सासवड परिसरातील प्रगतशिल शेतकऱ्यांच्या शेतावरती अभ्यास दौरा काढला. गोल्डन (जीएस-10) या वाणाची निवड करण्याचा उद्देश म्हणजे या वाणामुळे शेतकऱ्यांना 8 ते 9 तोड मिळतात. एका शेंगेमध्ये 10 वाटाणे तयार होत अल्याने पर्यायाने हिरव्या वाटाण्यास बाजारामध्ये मागणी असल्याने व गोल्डन ही जात चवीला गोड असल्याने दर जास्त मिळत आहे. यातून शेतकऱ्यांची आर्थिक परस्थिती सुधारण्यास मदत झाली. या प्रकल्पात 100 शेतकरी सहभागी झाले असून 50 एकर क्षेत्रावर वाटाणा लागवड करण्यात आला. या प्रकल्पावर 2 लाख 89 हजार 414 रुपये खर्च करण्यात आला असून अंदाजीत 150 टन उत्पादन मिळाले आहे.
अधुनिक पद्धतीने वाटाणा लागवड प्रकल्पांतर्गत उत्पादित झालेला सर्व शेतकऱ्यांचा वाटाणा हा प्रकल्पात सहभागी झालेले शेतकरी स्वत: थेट भाजीपाला विक्री या आत्माच्या योजनेतून विक्री करतात.
अशा प्रकारे या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांमध्ये व्यवसायीकतेची भावना निर्माण झाली असून सध्या तेथील शेतकरी शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहत आहेत.







