Home Blog Page 3279

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेस 22 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ योजनेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांचे आवाहन

0

पुणे, दि. 18 : राज्यातील सततच्या दुष्काळी व नापिकीच्या परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दी निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना -2017 जाहीर केली आहे. या योजनेला 22 सप्टेंबर 2017 पर्यंत शासनाने मुदतवाढ दिली आहे. पुणे जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत, त्यांनी जवळच्या महा ईसेवा केंद्रावर किंवा  आपले सरकारया संकेत स्थळावर आपले अर्ज ऑनलाईन पध्दतीने  भरुन घ्यावेत, असे आवाहन  जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुणे जिल्हास्तरीय अंमलबजावणी व नियंत्रण समितीच्या बैठकी दरम्यान केले.

 योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा, उपविभाग व  तालुकास्तरावर समिती गठीत करण्यात आलेली आहे. पुणे जिल्हा स्तरावरील जिल्हा स्तरीय अंमलबजावणी व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी लाभार्थी शेतकऱ्यांच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रगती व योजनेच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा श्री. राव यांनी घेतला.

या  योजने अंतर्गत लाभार्थ्यांची माहिती, वित्तीय संस्थांनी आपले सरकार पोर्टलवर तात्काळ भरावयाची आहे. राष्ट्रियीकृत बँकेच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले खाते असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेमध्ये व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लाभार्थी अर्जदारांनी संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थामध्ये आपल्या  आधार कार्डाची छायांकित प्रत त्वरीत सादर करावी, असेही आवाहन श्री राव यांनी केले.

‘हॅन्ड्स ऑफ इंडिया’ परत एकदा पुण्यात प्रवेश निशुल्क

0

पुणे – पारंपारिक हस्तकला करणार्या कारागिरांस प्रोत्साहित करण्यासाठी हॅन्ड्स ऑफ इंडिया ने  आपले भव्य वस्त्र प्रदर्शन पुन्हा एकदा टिळक स्मारक मंदिर येथे भरवले आहे. हे प्रदर्शन गुरवार २१ सप्टेंबर ते  ते रविवार २४ सप्टेंबर सकाळी ९.३० ते रात्री ८.३० पर्यंत सुरू राहील.

२०१० पासुन  वायुसेना अधिकारी आणि  सॉफ्टवेअर आर्किटेक्ट अश्या दोन बहीणी ह्यासाठी कार्य करत आहेत. ह्या दोघी संपूर्ण भारतातील घरगुती फर्निचर तयार करणारे आणि विणकाम, हाताने भरतकाम करणार्या गरजू कलाकारांच्या गटांसाठी कार्यरत आहेत. हातमाग, हस्तकला, हस्त-भरतकाम यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच छोट्या-छोट्या खेड्यांतील गरीब व गरजू  मात्र कलेने समृद्ध अशा लोकांच्या हाताला काम मिळवून द्यावे हा ह्या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.

त्याचसोबत बदलत्या काळात लोप पावत चाललेली भारताची ही अद्वितीय कला टिकवून ठेवण्याचे हॅन्ड्स ऑफ इंडियाचे प्रयत्न आहेत. आज यंत्रणेच्या मोठ्या वापरामुळे  हस्तकला हळूहळू लोप पावत चालल्या आहे ह्या कलांना टिकवुन ठेवण्याचे कार्य हॅन्ड्स अॉफ इंडिया करतो.

हॅन्ड्स अॉफ इंडियामध्ये १० प्रकारच्या हाताने केलेले भरतकाम पहावयास मिळते ज्यामध्ये  पंजाबमधील फुलकारी, चिकण, उत्तर प्रदेशातील पत्तीवर्क आणि आरी, पश्चिम बंगालमधील कांथा आणि इंग्लीश कढ़ाई, बिहारमधील सुजनी, कश्मीरची सुझनी व कर्नाटकाची कसुटी आसेल.

 हे प्रदर्शन २१ सप्टेंबर २०१७ पासून सुरू होईल आणि २४ सप्टेंबर २०१७ पर्यंत राहील. हे टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, सदाशिव पेठ पुणे येथे होईल.

आठ तासांची पेनल्टी बसूनही संजय गटात तिसरा- दोन टायर पंक्चर होऊनही सुपर रॅलीत 20 गुणांची कमाई

0

आशिया पॅसिफीक रॅली मालिका होक्कायडो रॅली 2017

पुणे – पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टाकले याने आशिया-पॅसिफीक रॅली मालिकेतील होक्कायडो रॅलीत आठ तासांची पेनल्टी बसूनही आशिया करंडक गटात तिसरा क्रमांक मिळविला. एकुण क्रमवारीत तो पंधरावा आला.
 
जपानमधील होक्कायडो बेटावर ही रॅली शनिवारी व रविवारी पार पडली. भारताचा गौरव गील सर्वसाधारण तसेच गटात विजेता ठरला. संजयचा एम्पार्ट संघातील सहकारी रॉबर्ट ब्लाॅमबर्ग गटात दुसरा आला.
तिसऱ्या स्टेजमध्ये तीन तिघाडा
या रॅलीची तिसरी स्टेज स्पर्धकांसाठी जणू काही शापच ठरली. संजयसह तब्बल सहा जणांना वेगवेगळ्या कारणांमुळे माघार घ्यावी लागली. ओले व्हीएबी याची कार तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. संजयचा सहकारी यारी केटोमा याची कार भरकटली. संजयचा पूर्वीच्या कुस्को संघातील सहकारी मायकेल यंग याच्या कारचे इंजिन बिघडले. यासुशी ओयामा याची कार उलटली, तर यानुनोरी हागीवारा याच्या कारचे ब्रेक फेल झाले. संजयच्या कारचे मागील बाजूचे डावे चाक आधी पंक्चर झाले. ते बदलून त्याने रॅली पुढे सुरु केली, पण जेमतेम २००-३०० मीटर अंतर जाताच मागील बाजूचे उजवे चाक पंक्चर झाले. स्टेपनी एकच असल्यामुळे त्याला माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता. पहिल्या लेगमधूनही त्याला माघार घ्यावी लागली. कारचे काही काही नुकसान झाले नव्हते, पण सर्व्हिस पार्कमधून एम्पार्ट संघाचे तांत्रिक पथक वेळेत येऊन त्याला रॅली पुढे वेळेत सुरु करणे शक्य नव्हते.
 
 
सुपर रॅली समाधानकारक
संजयला पहिला लेग पूर्ण करता आला नाही, पण त्याने नव्या उत्साहात रविवारी सुपर रॅली भाग घेतला. स्टेजगणिक त्याने समाधानकारक वेग राखला. ओटोफुके रिव्हर्स एक स्टेजला 17वा, न्यू होनबेत्सूला 13वा, न्यू ओशोरो लाँग एकला 12वा, ओटोफुके रिव्हर्स दोनला 15वा, न्यू होनबेत्सू दोनला 12वा अशी त्याची कामगिरी झाली. सॅमो सात्सुनाई या सुपर स्पेशल स्टेजमध्ये त्याने सातव्या क्रमांकावर झेप घेत टाॅप टेनिस फिनीश नोंदविला.
 
रविवारी दुसरा लेग झाला. त्यात संजय 18 स्पर्धकांत 12वा आला. त्याने 49 मिनीटे 33.4 सेकंद वेळ नोंदविली. संजयने 5 बोनस गुणांसह एकुण 20 गुणांची कमाई केली. आशिया करंडक गुणतक्त्यात तो तिसरा आहे.
 
संजयने सांगितले की, नवी कार वेगवान आहे. तिच्याशी जुळवून घ्यायला थोडा वेळ लागणे स्वाभाविक आहे. त्यासाठी जास्त सराव आणि स्पर्धात्मक सहभागाची गरज आहे. रविवारी दाखविलेली लढाऊ वृत्ती महत्त्वाची होती. माझी नॅव्हीगेटर नोरिको ताकेशिता जपानी आहे. तिची साथ बहुमोल ठरली.
निकाल (आशिया करंडक) : 1) गौरव गील- स्टीफन्स प्रीव्होट (टीम एमाआरएफ, 1 तास 53 मिनीटे 21.8 सेकंद), 2) रॉबर्ट ब्लाॅमबर्ग- लार्स अँडरसन (एम्पार्ट स्पोर्ट, 2:05:03.2), 3) संजय टकले-नोरिको ताकेशिता  (एम्पार्ट स्पोर्ट, 10:22:10.7)

चार कला शिक्षकांचा ‘अखिल भारतीय कला शिक्षक गौरव पुरस्कार’​ देवून सन्मान

0
पुणे :‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्ट्स, डिझाइन अ‍ॅण्ड आर्ट (VEDA), अ‍ॅण्ड स्कूल ऑफ आर्ट’ च्या वतीने अखिल भारतीय कला शिक्षक गौरव पुरस्कार 2017-18 चे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात शिल्पा रानडे (अ‍ॅनिमेशन क्षेत्र, मुंबई), काशिनाथ साळवे (फाईन आर्ट, मुंबई), प्रोसेनजीत गांगुली (अ‍ॅनिमेशन, कलकत्ता), वसंत सोनावणे (फाईन आर्ट, मुंबई) या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम आझम कॅम्पसमध्ये पार पडला. पुरस्काराचे यंदाचे तिसरे वर्ष होते.
डॉ.मनोहर जाधव (मराठी विषय विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे होते. यावेळी एम.सी.ई.सोसायटीचे अध्यक्ष पी.ए.इनामदार, सचिव लतिफ मगदूम, प्रा.इरफान शेख,  कॉलेजचे प्राचार्य ऋषी आचार्य उपस्थित होते. पुरस्कारार्थींना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
‘अखिल भारतीय कला शिक्षक गौरव पुरस्कार’ हा भारतातील सर्व महाविद्यालयातील अ‍ॅनिमेशन, कला, ललित कला आदी क्षेत्रातील शिक्षकांना विलक्षण योगदान आणि उत्तुंग कामगिरीसाठी देण्यात येतो. दरवर्षी चार पुरस्कार कला क्षेत्र, ग्राफीक डिझाईन, अ‍ॅनिमेशन, व्हिजुअल इफेक्ट्स, स्पेशल ईफेक्ट्स, क्रिएटिव्ह फोटोग्राफी, पेंटींग क्राफ्ट, शिल्पकला, ललित कला, साहित्य, चित्रपट या क्षेत्रातील कलाकार आणि शिक्षकांना देण्यात येतात.
पुरस्कार प्रदान कार्यक्रमातंर्गत पुणे विद्यापीठ परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये श्रेया भगत (बी.एस.सी अ‍ॅनिमेशन, प्रथम वर्ष), गणेश चौधरी (बी.एस.सी अ‍ॅनिमेशन, द्वितीय वर्ष), मिताली दांडे (बी.एस.सी अ‍ॅनिमेशन), पूनम नगरकर (जीडी, आर्टस्), श्रद्धा गायकवाड (एटीडी, आर्टस्), सूरज होनावकर (फाऊंडेशन ऑफ आर्टस्) या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

 

अभिनेत्री करिष्मा कपूरच्या हस्ते ‘रायझिंग लीडरशिप ॲवॉर्ड फॉर द बेस्ट इंटेरियर अँड फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र’ पुरस्कार

0

पुणे : ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्ससाठी नुकताच अभिमानाचा आणखी एक क्षण उजाडला. या समूहातीलसूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (पुणे)’ या संस्थेला तिने बजावलेल्या लक्षणीय कामगिरीबद्दल रायझिंग लीडरशिप ॲवॉर्ड फॉर बेस्ट इंटेरियर अँड फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्रपुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हारायझिंग लीडरशिप ॲवॉर्ड्सपुरस्कार वितरणाचा शानदार सोहळा नुकताच गोव्यात झाला. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर ही या समारंभातील प्रमुख सन्माननीय पाहुणी होती. तिच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रमाणपत्र मानचिन्ह देण्यात आले. विजेत्यांमध्ये भारतभरातील व्यवसाय क्षेत्रे सेवा क्षेत्रांचा समावेश होता.

यासंदर्भातसूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “आमच्या कामगिरीसाठी गौरवले जाणे, हा आमच्या संस्थेसाठी खरोखर मोठा सन्मान आहे. ‘सूर्यदत्ता ग्रुपमध्ये आम्ही नेहमीच आमच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता, जागतिक दर्जाचे शिक्षण आणि कल्याणकारी विकास मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतो.” ‘सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनफॅशन डिझाईन, फॅशन ॲडमिनीस्ट्रेशन आदी क्षेत्रांत युजीसी मान्यताप्राप्त डिप्लोमा, डिग्री मास्टर्स डिग्री अभ्यासक्रम देते.

रायझिंग लीडरशिप ॲवॉर्ड्सहे पुरस्कारएपीएस रिसर्च अँड मीडियाकंपनीतर्फे घेतल्या गेलेल्या व्यापक बाजार संशोधन अभ्यासावर, तसेच जनमत सर्वेक्षणांवर आधारित होते. ही मल्टीप्लॅटफॉर्म कंपनी माध्यम संशोधन सेवांत कुशल अनुभवी आहे. समाज उभारणीत महान योगदान देणाऱ्या भारताच्या सर्वोत्तम व्यवसाय सेवा नेत्यांचा सन्मान करण्याच्या हेतूने हे पुरस्कार दिले जातात आणि त्यातून विजेत्यांतील सर्वोत्कृष्टतेला गौरव, प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळते.

पालक मंत्र्यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी केली निदर्शने, चुलीवर स्वयंपाक आणि सायकल रॅली

0
पुणे : भाजपा सरकारच्या वाढत्या महागाईच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कसबा गणपती मंदिर येथील कार्यालयासमोर चूल मांडून कार्यकर्त्यांनी निषेध केला.
या वेळी भाजपा शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  ‘या महागाई चे करायचे काय सामान्य जनतेने खायचे काय ?’, ‘महागाई ने जनता पेटली, अच्छे दिनची हौस फिटली’, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या. युवक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दरवाढ विरोधी घोषणा देत सायकल रॅली काढली.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष खा. वंदना चव्हाण, राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष रुपाली चाकणकर, अशोक राठी, राकेश कामठे, रवींद्र माळवदकर, भोलासिंग अरोरा, शशिकला कुंभार, उर्मिला गायकवाड, रत्नप्रभा जगताप, वैशाली बनकर, मीना पवार, अनिस सुंडके, बाळासाहेब बोडके, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रुपाली चाकणकर म्हणाल्या ‘पालक मंत्री आपले धोरण नीट राबवत नाहीत, ऐन सणासुदीच्या काळात गॅस , भाजी, कडधान्ये अशा प्रकारच्या दैनंदिन वापरातील वस्तू ची दरवाढ करून सरकारने जनतेची पिळवणूक केली आहे. वारंवार या बाबतचे निवेदन देऊनही काही फरक न पडल्याने आम्ही ज्वारीची भाकरी आणि मिरची चा आहेर पालक मंत्र्यांना देत आहोत कारण या भाव वाढीमुळे  सामान्य जनतेला कदाचित हेच खावे लागणार आहे.’

बर्मा येथे मुस्लिम बांधवांना केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता

0

 

 पुणे-  ईदगाह ट्रस्टच्यावतीने शीख बांधवानी माणुसकीच्या नात्याने बर्मा येथे मुस्लिम बांधवांना केलेल्या मदतीबद्दल ज्ञानी अमरजितसिंग , हरभजन सिंग , मनजितसिंग  विरदी , नेपालसिंग  कल्याणी , अमरजितसिंग परिहार , देवेंद्रर सिंग , इंद्रजितसिंग ऑबेराय याना शाल व पुष्पगुछ देउन आभार मानण्यात आले .

  पुणे कॅम्पभागातील गोळीबार मैदानावर ईदगाह मैदानावर ईदगाह ट्रस्टच्यावतीने या प्रार्थनेचे  आयोजन केले होते .त्यावेळी हा कार्यक्रम झाला . म्यानमार मधील बर्मा येथे येथे मुस्लिम बांधवांवर होणाऱ्या हल्ले होत असताना शीख बांधवानी त्याठिकाणी अन्नदान करून मोठी मदत केली . त्यामुळे मुस्लिम बांधवानी शीख बांधवांचे आभार मानले .  यावेळी जामा मस्जिदचे मौलाना अय्युब अश्ररफी यांच्या मार्गदर्शनाखाली हि सामूहिक प्रार्थना झाली . यावेळी मौलाना कलिमुद्दीन यांनी देखील प्रार्थना केली .

  यावेळी ईदगाह ट्रस्टचे विश्वस्त झैनुल काझी ,  मुस्ताक अलबुशरा , अमीन शेख , अहमद सय्यद , मोहम्मद हुसेन शेख , सरफराज शरीफ , मोइननुद्दीन शेख , वाहिद बियाबानी , अझीम गुडाकूवाला , इसाक चावीवाले , मुस्ताक पटेल , साजिद सय्यद , मुनावर खान , जावेद खान , सादिक लूकडे , ऍड. अयाज शेख व मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इकबाल अन्सारी यांनी केले .

रामदास फुटाणे यांच्‍या हस्‍ते राजेंद्र सरग यांना सर्वोत्‍कृष्‍ट व्‍यंगचित्रकार पुरस्‍कार प्रदान

0

पुणे- येथील जिल्‍हा माहिती अधिकारी तथा व्‍यंगचित्रकार राजेंद्र सरग यांना ‘दिवा प्रतिष्‍ठान’ चा सर्वोत्‍कृष्‍ट व्‍यंगचित्रकाराचा पुरस्‍कार ज्‍येष्‍ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांच्‍या हस्‍ते प्रदान करण्‍यात आला. महाराष्‍ट्र साहित्‍य परिषदेत आयोजित कार्यक्रमास ज्‍येष्‍ठ साहित्यिक ल.म. कडू, उद्योजक भारत देसडला, प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष विजय पाध्‍ये, कार्यवाह शिवाजी धुरी, चंद्रकांत शेवाळे, अरुण जाखडे, मसापचे कार्याध्‍यक्ष प्रा. मिलींद जोशी, भारतभूषण पाटकर, महेंद्र देशपांडे, ह.ल. निपुणगे, ज्ञानेश्‍वर जराड, सुनील गायकवाड, सुभाष खुटवड,  स्‍नेहसुधा कुलकर्णी, अंजली पोतदार, नसीर शेख, डॉ. अरविंद संगमनेरकर, डॉ. सतीश देसाई, ज्‍येष्‍ठ व्‍यंगचित्रकार प्रभाकर झळके, विश्‍वास सूर्यवंशी, सन्‍ना मोरे आदींसह इतर मान्‍यवर उपस्थित होते. याच कार्यक्रमात सर्वोत्‍कृष्‍ट  वाचकाचा प्रथम पुरस्‍कार रागिनी पुंडलिक (पुणे), द्वितीय पुरस्‍कार कल्‍पना चिंतामणराव मार्कंडेय (औरंगाबाद) आणि तृतीय पुरस्‍कार सौरभ साबळे (मलकापूर कराड) यांना प्रदान करण्‍यात आला.  ‘दिवा प्रतिष्‍ठान’ ही  दिवाळी अंकांच्‍या संपादकांची संघटना आहे. या संघटनेच्‍यावतीने दरवर्षी वाचक स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात येते.       

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जैव वैद्यकीय कचरा संकलन मोहिमेचा शुभारंभ

0
सेवा उपलब्ध केल्यास नागरिकांचा कचरा वर्गीकरणास सकारात्मक प्रतिसाद – आमदार मेधा कुलकर्णी.
सेवा व स्वच्छता फक्त “एक दिवस सेवा वा एक दिवस स्वच्छता” असे नसुन त्यात सातत्य राखण्याची आवश्यकता- नगरसेविका मंजुश्री खर्डेकर.
जैव वैद्यकीय कचरा संकलन मोहिमेस प्रारंभ…. 
पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी प्रभाग क्रमांक १३ मध्ये जैव वैद्यकीय कचरा संकलन मोहिमेचा शुभारंभ केला.या उपक्रमात ज्या घरात जैव वैद्यकीय कचरा उत्पन्न होतो अश्या घरोघरी वेगळ्या प्रकारचे डबे भेट देण्याचा व त्यात वैद्यकीय कचरा साठवून तो स्वतंत्रपणे संकलित करण्याच्या या उपक्रमाचा शुभारंभ आ मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.पुणे मनपा कमींस इंडिया आणि क्रीएटिव्ह फौंडेशन च्या सहकार्याने हा उपक्रम कायमस्वरूपी राबविण्यात येणार असल्याचे मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.तसेच मा मोदींचा सेवा व स्वच्छता हा संदेश एक दिवसासाठीचा उपक्रम नसुन नागरिकांनी कायमस्वरूपी आपला परीसर कसा स्वच्छ राहील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे किंबहुना याची जाणीव ठेवणे हे प्रत्येक जागरूक नागरीकांचे कर्तव्य आहे असे ही त्या म्हणाल्या.त्यासाठीच आपण जैव वैद्यकीय कचरा,ई कचरा,प्लॉस्टिक कचरा संकलनासाठी कायमस्वरूपी व्यवस्था केली असल्याचे मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवादिन म्हणुन साजरा करताना “आपण रोजच्या कचऱ्याचे वर्गीकरण केले पाहिजे असे नागरिकांना सांगतो पण तशी सेवा उपलब्ध करुन देत नाही.ती सोय उपलब्ध करुन दिली तर नागरिक कचरा निर्मितीच्या ठिकाणीच त्याचे वर्गीकरण करतील असे मत आ मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. आपण जैव वैद्यकीय कचरा रोजच्या कचऱ्यात टाकतो तेव्हा ते गोळा करणाऱ्या स्वच्छता सेवकांना काय वाटत असेल याचा संवेदनशीलतेने विचार करणे गरजेचे असुन,असा उपक्रम सर्वप्रथम माझ्या मतदारसंघात नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी सुरु केला हे कौतुकास्पद असल्याचे सांगून त्यांनी सर्व संबंधित संस्थांचे अभिनंदन केले
यासंदर्भात प्रभागात सर्वे केला असुन आत्तापर्यंत २०० कुटुंबानी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली असुन त्यांनी दरमहा साठवलेला जैव वैद्यकीय कचरा कैलास स्मशानभूमीतील पास्को एनव्हायरोन्मेंट कंपनी मार्फत या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणार असल्याचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दीपक ढेलवान यांनी सांगितले.
यावेळी हॅपी कॉलोनीतील ऋतिका टेरेसेस पासून या वेगळ्या प्रकारच्या पिवळ्या,पांढऱ्या व लाल  रंगाच्या डब्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी मा मिलिंद फडके,अविनाश देशपांडे,श्रीमती सुधा मराठे यांनी या जागरूक नागरिकांनी या मोहिमेत भाग घेण्यास सहमती दर्शविली.यांना आ मेधा कुलकर्णी व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते जैव वैद्यकीय कचरा संकलनासाठीचे डबे भेट देण्यात आले.ही मोहिम अत्यंत उपयुक्त असुन यात अधिकाधिक नागरिकानी सहभागी व्हावे असे आवाहन मिलिंद फडके यांनी केले व याद्वारे जैव वैद्यकीय कचऱ्याचे वर्गीकरण घरातच करता येइल असे ही ते म्हणाले.
Segregation at Source महत्त्वाचे (स्रोतापाशी विलगीकरण ) असुन सर्व प्रकारच्या कचऱ्याचे निर्मितीच्या स्रोतापाशीच विलगीकरणासाठी क्रीएटिव्ह फौंडेशन प्रयत्नशील आहे असे संस्थेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.
यावेळी या उपक्रमाच्या संयोजिका नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,क्रीएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दीपक ढेलवान, आरोग्य निरीक्षक किरण गुरव,राहुल शेळके,कमींस इंडिया चे संपत खैरे,भाजप चे गणेश चव्हाण,विशाल शिंदे,अजय भोइटे,अमीर वाघमारे,आदित्य राउत इ उपस्थित होते.

जैन समाजाची पुन्हा जनगणना करावी- -राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य सुनिल सिंघी

0

पुणे– भारतात जैन समाजाची लोकसंख्या कमी असून, त्यामुळे केंद्रसरकारतर्फे यापूर्वी करण्यात आलेली जनगणना पुन्हा करण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य आणि अखिल भारतीय श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक युवक महासंघाचे आंतरराष्ट्रीय चेअरमन श्री सुनील सिघी यांनी आज रविवारी आपल्या भाषणात सांगितले.
अखिल भारतीय श्री जैन श्वेतांबर युवक महासंघाची आज रविवारी नेहरू स्टेडियम जवळील दादावादी जैन मंदिराच्या अहिंसा भवन मध्ये राष्ट्रीय पातळीवरील बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस देशभरातील जैन समाजातील विविध मंदिरे, व अन्य संस्थाचे पदाधिकारी, विश्वस्त , पुणे शहरातील जैन मंदिरे व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीपूर्वी युवक महासंघाच्या पुणे शाखेचे अध्यक्ष श्री सतीश शहा व पुन्हा हॉस्पिटलचे संचालक श्री देविचंद जैन यांच्या हस्ते श्री सिनघी यांचा पुणेरी पगडी, माळ, मानपत्र देऊन खास सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रसिद्ध वकील एस . के . जैन, ओमप्रकाश रांका , अचल जैन, राष्ट्रीय अध्यक्ष हरिशभाई सहा, संपत जैन, सुनील जैन , विनोद बलदोटा , आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. सुनील सीनघी यावेळी म्हणाले कि, केंद्रसरकारतर्फे यापूर्वी २०१४ मध्ये जनगणना करण्यात आली. त्यावेळी जैन समाजाची लोकसंख्या कमी असल्याचे आढळले. त्यामागे काही कारणे आहेत. आता आपल्याला पुन्हा जनगणना करावी लागणार आहे. जैन समाज एक पुढारलेला समाज आहे. परंतु याही समाजात अनेक गरीब लोक आहेत. त्यांच्याही अनेक समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी आपण लवकरच देशभर केंद्र सरकार व अल्पसंख्याक आयोगातर्फे अनेक गावे व शहरामध्ये जनसुनवाई घेणार आहे या जनसुनवाईत अतिक्रमणे, वाहतूक, शिक्षण सामाजिक आदी समस्या दूर करण्याविषयी प्रयत्न केले जाणार आहेत. पुण्यात हि घेतली जाणार आहे. .
अल्पसंख्याक आयोगातर्फे विविध योजना राबविल्या जात आहेत. त्याचा प्रसार करून लाभार्थीना लाभ कसा घेता येईल याची माहिती त्यांनी आपल्या भाषणात दिली.
श्री सतीश शाह यांनी प्रास्ताविक केले. संपत जैन यांनी सूत्रसंचालन केले. सचिव ललित गुंदेचा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

‘जागतिक वाहन चालक दिना’ निमित्त ‘आदर्श वाहन चालक’ पुरस्कारांचे वितरण

0

पुणे-१७ सप्टेंबर रोजी ‘जागतिक वाहन चालक दिना’ निमित्त सामाजिक बांधिलकीतुन काम करणाऱ्या सारथी सेवा संघा तर्फे कोथरूड, पुणे येथे ‘आदर्श वाहन चालक’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्ष स्थानी पोलीस निरिक्षक, वाहतूक शाखा सौ. प्रतिभा जोशी तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायविंग स्कूल असोसिएशन चे अध्यक्ष श्री. राजू घाटोळे, चित्रपट निर्माते श्री. सुमित पोफळे, प्रोफे. सौ. गीता रायबागकर, सारथी सेवा संघ चे अध्यक्ष श्री. रमेश सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. अनिकेत निकम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्री. राजेश्वर चन्ने यांनी आभार मानले.

मोदींच्या वाढदिवसानिमित्त खा. शिरोळे यांचे स्वच्छता अभियान

0

पुणे– पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी ह्यांच्या ६७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून बेटी बचावो बेटी पढावो च्या पुणे शहर अध्यक्षा उषा वाचपे ह्यांच्या वतीने जंगली महाराज रस्ता येथे राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात खासदार अनिल शिरोळे सहभागी झाले होते. ह्या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपूरे, श्याम सातपुते आदि उपस्थित होते. मार्केट यार्ड येथील शिवाजी पुतळा येथे शहर भा ज प झोपडपट्टी आघाडी च्या मार्फत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ह्या अभियानात पालिका गटनेते श्रीनाथ भीमाले, किरण वैष्णव, संग्रामसिंह टाक , जीवन माने, सागर टाक आदि सहभागी झाले होते.

म्यानमारमध्ये मुस्लिमांच्या हत्या पार्श्वभूमीवर ; शांततेसाठी मुस्लीम बांधवांची सामुहिक प्रार्थना

0

पुणे- म्यानमार मधील बर्मा येथे येथे मुस्लिम बांधवांवर होणाऱ्या हल्ल्यामध्ये अनेक मुस्लिम बांधव मारले गेलेया पार्श्वभूमीवर शांततेसाठी येथे  मुस्लिम बांधवानी सामूहिक प्रार्थना  केली . पुणे कॅम्पभागातील गोळीबार मैदानावर ईदगाह मैदानावर ईदगाह ट्रस्टच्यावतीने या प्रार्थनेचे  आयोजन केले होते . यावेळी जामा मस्जिदचे मौलाना अय्युब अश्ररफी यांच्या मार्गदर्शनाखाली हि सामूहिक प्रार्थना   झाली . यावेळी मौलाना कलिमुद्दीन यांनी देखील  प्रार्थना केली . यावेळी मुस्लिम बांधवानी अश्रू वाहिले .

म्यानमार मध्ये मुस्लिम बांधवाना मारले जात आहे . हि माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे हे हल्ले थांबले पाहिजेत. म्यानमार सरकार चुकीच्या पद्धतीने वागत आहेत . तिथे चालणारी हिंसा हि थांबली गेली पाहिजे . तेथील मुस्लिम बांधवाना शीख बांधवानी मदतीचा हात दिला आहे . तसेच मुस्लिम धर्मगुरू देखील त्यांना मदतीसाठी प्रयत्न करत आहे . त्यासाठी आपण अल्लाकडे  सुख आणि शांती नांदावी म्हणून त्यांच्यासाठी दुवामागू या , असे आवाहन  जामा मस्जिदचे मौलाना अय्युब अश्ररफी यांनी केले .

यावेळी ईदगाह ट्रस्टच्यावतीने शीख बांधवानी माणुसकीच्या नात्याने तिथे केलेल्या मदतीबद्दल ज्ञानी अमरजितसिंग , हरभजन सिंग , मंजितसिंग विरदी , नेपालसिंग  कल्याणी , अमरजितसिंग परिहार , देवेंद्रर सिंग याना शाल व पुष्पगुछ देउन आभार मानण्यात आले .

यावेळी मुस्लिम बांधवानी आर्थिक मदतीचे आवाहन केले , त्यावेळी मुस्लिम बांधवानी  आर्थिक मदत जमा केली . यावेळी ईदगाह ट्रस्टचे विश्वस्त झैनुल काझी ,  मुस्ताक अलबुशरा , अमीन शेख , अहमद सय्यद , मोहम्मद हुसेन शेख , सरफराज शरीफ , मोइननुद्दीन शेख , वाहिद बियाबानी , अझीम गुडाकूवाला , इसाक चावीवाले , मुस्ताक पटेल , साजिद सय्यद , मुनावर खान , जावेद खान , सादिक लूकडे , ऍड. अयाज शेख व मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इकबाल अन्सारी यांनी केले .

पीएमपीएमएल ने खासगी ठेकेदारांना मालामाल करू नये -आबा बागुल

0
खासगी ठेकेदारांच्या  बसेसमुळेच पीएमपीएल तोट्यात 
ऑडिट रिपोर्टमध्ये धक्कादायक नोंद ;
पाच वर्षात पुणे महापालिकेकडून १ हजार ७६ कोटी अदा 
खासगी बसेसचे कंत्राट रद्द करा:माजी उपमहापौर आबा बागुल यांची मुख्यामंत्र्यांकडे मागणी 
पुणे –शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीएलच्या दुरवस्थेसह आर्थिक तोट्याला खासगी ठेकेदारांच्या  बसेस कारणीभूत ठरत असल्याच्या धक्कादायक  वस्तुस्थितीकडे  ऑडिट रिपोर्टमधून लक्ष वेधण्यात आल्याने एक तर पीएमपीएलने स्वतःच्या बसेस घेऊन सक्षम व्हावे  अन्यथा पीएमपी बससेवा  महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करावी ;पण कुठल्याही परिस्थितीत करदात्या पुणेकरांच्या रकमेतून बसेसचे ठेकेदार ‘मालामाल ‘करण्याचा प्रकार होऊ नये  अशी मागणी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस  यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.  
एलबीटी व अन्य माध्यमातून मिळणारे उत्पन्न बंद झाल्याने महानगरपालिकेला आता विकासकामांसाठी निधी अपुरा पडत आहे . त्यात  कर्जरोख्यातून २०० कोटींचे कर्ज उचलण्याची वेळ ओढवली आहे यापार्श्वभूमीवर  यापुढे पीएमपीएलला अनुदान देणे शक्य होणार नाही. याची जाणीव पीएमपीएलच्या प्रशासनाला करून देण्याची गरज यानिमित्ताने उदभवली आहे.गेल्या पाच वर्षात फक्त पुणे महानगरपालिकेकडून पीएमपीएलला सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करण्यासाठी एक हजार ७६  कोटी रुपये अदा करण्यात आलेले आहे. त्यात पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेची रक्कम वेगळी आहे  असे असतानाही पीएमपीच्या बससेवेबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत आहे. ज्येष्ठ नागरिकांची  पासमधील  सवलतही काढून घेण्यात आली आहे,असा अनागोंदी कारभार सुरु आहे.  तत्कालीन पीएमटी असताना महानगरपालिकेला एक रुपयाही अनुदान द्यावे लागत नव्हते. मात्र आता पीएमपीएलला कोट्यवधींचे अनुदान देऊनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे, आर्थिक तोट्याला सामोरी जात आहे ;पण ज्या खासगी ठेकेदारांच्या बसेस पीएमपीएलच्या ताफ्यात आहेत,ते मात्र नफ्यात असल्याची वस्तुस्थिती आहे. उलट त्यांच्या बसेससाठीचे पैसे मनपाच्या पर्यायाने करदात्यांच्या रकमेतून बँकांना हप्त्यापोटी अदा होत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. ठेकेदारांच्या बसेसमुळेच पीएमपीएलची दुरावस्था ,आर्थिक तोटा होत असल्याची गंभीर बाब ऑडिट रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे खासगी ठेकेदारांच्या घेतलेल्या बसेसचे कंत्राट रद्द करून पीएमपीएलने स्वतःच्या बसेस कर्ज काढून हप्त्याने घ्याव्यात ;पण कुठल्याही परिस्थितीत  खासगी बसचे ठेकेदार मालामाल करू नये आणि त्यासाठी करदात्या पुणेकरांच्या रकमेवर पर्यायाने महापालिकेवर आर्थिक भार यापुढे लादू नये असेही आबा बागुल यांनी म्हटले आहे.  

ग्रॅन्डमास्टर अभिजित कुंटे आणि एव्हरेस्टवीर किशोर धनकुडे यांना ‘अभिनव-रत्न’ पुरस्कार प्रदान

0

पुणे-” शालेय वयात घडलेल्या चांगल्या संस्कारामुळेच आम्हाला आमच्या जीवनाचे ध्येय यशस्वी गाठता आले त्यामुळे ‘अभिनव प्रशाळेतील शिक्षक, त्यावेळचे विद्यार्थी यांचे आम्ही कायमचे ऋणी आहोत” अशा शब्दात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू ग्रॅन्डमास्टर अभिजित कुंटे आणि एव्हरेस्ट शिखर दोन वेळा सर करणारे किशोर धनकुडे यांनी आपल्या भावना शनिवारी (१६ सप्टेंबर) येथे पार पडलेल्या ‘आम्ही अभिनवकर’ च्या वार्षिक स्नेहमेळाव्यात बोलताना व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध निवेदक आणि अभिनव प्रशालेचे माजी पालक श्री आनंद देशमुख यांच्या हस्ते ‘आम्ही अभिनवकर’ संघटनेतर्फे दिला जाणारा ‘अभिनव-रत्न’ पुरस्कार यंदा अभिजित कुंटे आणि किशोर धनकुडे यांना प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी अभिनव प्रशाळेबाबत कृतज्ञता व्यक्त करताना कुंटे आणि धनकुडे बोलत होते.  ग्रॅन्डमास्टर अभिजित कुंटे यांनी बुद्धिबळ स्पर्धेतील यश मिळविताना तसेच किशोर धनकुडे यांनी एव्हरेस्ट शिखर दोन वेळा सर करताना आपले जे प्रेरणादायी अनुभव सांगितले त्याला या मेळाव्यास जमलेल्या ‘अभिनव’च्या माजी विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या प्रचंड गजरात उत्फुर्त प्रतिसाद दिला.
                     याप्रसंगी आनंद देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, ”अभिनव ही केवळ शाळा नाही तर एक सुंदर कुटुंब आहे आणि या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्याच्या मदतीला येते त्यामुळेच प्रगतीमधील अडसर सहज दूर होतात असे सांगितले. अभिनव प्रशाळेतील शिक्षक हे संस्काराचे स्तंभ आहेत त्यामुळेच अभिनवचे विद्यार्थी आज सर्व क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवीत आहेत असे त्यांनी अभिमानाने सांगितले. याच कार्यक्रमात आनंद देशमुख यांच्या हस्ते, ‘अभिनव’च्या माजी शिक्षिका स्मिता देशपांडे आणि सुलोचना भोई यांना ‘कृतज्ञता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.  तसेच ‘अभिनव’च्या माजी विद्यार्थिनी नगरसेविका श्रद्धा प्रभुणे-पाठक, अभिनव प्रशालेचे गुणवंत विद्यार्थी आणि एकांकिका स्पर्धेत ‘जय-विजय करंडक’ पटकावणाऱ्या अभिनवच्या माजी विद्यार्थी संघाचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
           प्रारंभी ‘आम्ही अभिनवकर’ संघटनेचे अध्यक्ष पितांबर पाटील यांनी प्रास्ताविक केले. शिरीष पुराणिक यांनी आभार मानले. श्री अभिजित देशपांडे आणि ईश्वरी तांबे यांनी सूत्रसंचालन केले. या स्नेहमेळाव्यास तुषार हळबे, मृणाल खर्चे आदी पदाधिकाऱ्यांसह संघटनेचे सुमारे अडीचशे प्रतिनिधी उपस्थित होते.