Home Blog Page 3258

राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना १३,५०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर

0

नागपूर, दि. १३ ऑक्टोबर २०१७ : दिवाळीनिमित्त महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण व सुत्रधारी कंपन्यांतील सुमारे ७७ हजार कर्मचार्‍यांना १३,५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान राज्याचे ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले. तसेच कंत्राटी कामगारांना ७,५०० रुपये सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.

नागपूर येथील बिजली नगर येथे ऊर्जामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सानुग्रह अनुदानाबाबत बैठक झाली. बैठकीला तिनही कंपन्यांचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सर्वश्री सचिन ढोले, विनोद बोंन्द्रे आणि सुरज वाघमारे यांचेसह वरिष्ठ अधिकारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ऊर्जामंत्र्यांनी सानुग्रह अनुदानाबाबतची घोषणा केली. ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळें वीज कर्मचा-यामध्ये समाधानाचे वातावरण आहे

सवलतीत 12 हजार डायलिसिस पूर्ण झाल्याबद्दल कृतज्ञता सोहळा

0
पालिका आणि लायन्स संचालित ‘सौ. अरूणा नाईक डायलिसिस सेंटर’चा उपक्रम
पुणे :
गरीब, गरजू रुग्णांना केवळ 400 रुपयांत डायलिसिस करून देणार्‍या ‘सौ. अरूणा नाईक डायलिसिस सेंटर’ने विक्रमी 12 हजारावे डायलिसिस पूर्ण केल्याच्या निमित्ताने गुरुवारी 12 ऑक्टोबर रोजी कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. हे डायलिसिस सेंटर पुणे पालिकेचे ‘कमला नेहरू हॉस्पिटल’ आणि ‘लायन्स क्लब पुना मुकुंदनगर’चा संयुक्त उपक्रम आहे.
या कृतज्ञता सोहळ्याला महापौर मुक्ता टिळक, महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, माजी आमदार मोहन जोशी प्रमुखपाहुणे म्हणून उपस्थित होते.
या सेंटरमध्ये 15 अद्ययावत डायलिसिस यंत्रे आहेत. सर्वसामान्य रुग्णांना येथे अल्पदरात डायलिसिस उपचार केले जातात. त्यातील वार्षिक 1 लाख रुपयांचे प्रति रुग्ण शुल्क महापालिकेतर्फे शहरी गरीब योजनेतून दिले जाते. या डायलिसिस केंद्राची उभारणी प्रकल्पप्रमुख नितीन नाईक यांनी केली आहे.
कार्यक्रमाला लायन्स क्लब इंटरनॅशनलचे उपप्रांतपाल रमेश शहा, ओमप्रकाश पेठे, नगरसेवक योगेश समेळ, अजय खेडेकर, सौ. संगीता शेट्टी हे उपस्थित होते.
या कृतज्ञता सोहळ्यात रुग्णांना दिवाळी फराळ भेट देण्यात आला. प्रकल्पप्रमुख नितीन नाईक यांनी आभार मानले.
यावेळी बोलताना महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘या अद्ययावत डायलिसिस केंद्रामुळे नागरिकांना अल्पदरात सेवा उपलब्ध होत आहे. पालिकेतर्फे या केंद्राला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
शेखर चरेगावकर म्हणाले, ‘डायलिसिसचे उपचार आवश्यक असणार्‍या रुग्णांना हे उपचार परवडतातच असे नाही, त्यासाठी सहकार क्षेत्रातून सामाजिक निधी अशा उपक्रमांना देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या केंद्रामध्ये 98 टक्के रुग्ण शहरी गरीब योजनेतून उपचार घेतात. त्यानुसार वर्षभरासाठी एक लाख रुपयांची तरतूद एका रुग्णासाठी आहे.’

मान्यवर वृध्द साहित्यिक, वृध्द कलाकार मानधन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

 

पुणे दि.13: मान्यवर वृध्द साहित्यिक व वृध्द कलाकार मानधन योजनेसाठी इच्छूकांनी विहीत नमुन्यात अर्ज दहा दिवसात संबंधित गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावेत, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार यांनी दिली.

मान्यवर वृध्द साहित्यिक व वृध्द कलाकार मानधन देण्याची योजना 1954-55 पासून राज्यात राबविली जाते. शासन निर्णय दि. 22 ऑगस्ट 2014 नुसार सुधारित अटी व शर्ती निश्चित केल्या आहेत. ज्यांनी सांस्कृतिक, कला वाड:मय क्षेत्रात किमान 15 ते 20 वर्षे इतक्या प्रदिर्घ काळासाठी मोलाची भर घातली आहे व महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. ज्या स्त्र्ी व पुरुष कलावंताचे व साहित्यिकाचे वय 50 वर्षापेक्षा जास्त आहे. साहित्यिक व कलावंताचे सर्व मार्गाने मिळून वार्षिक उत्पन्न 48 हजार पेक्षा जास्त नाही. असे कलावंत अर्ज करु शकतात. जिल्हयातून प्राप्त प्रस्तावांची जिल्हा परिषद स्तरावर जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत प्रत्येक वर्षी शासनाने निश्चित केलेल्या इष्टांकानुसार 60 पात्र वृध्द साहित्यिक व कलावंतांची निवड केली जाते.

इच्छूक वृध्द साहित्यिक व वृध्द कलाकार यांनी विहीत नमुन्यात अर्ज करावेत. योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती, अर्जाचा नमुना व अटी/ शर्ती संबंधित तालुक्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडून विनामुल्य उपलब्ध करुन घ्यावेत. परिपुर्ण अर्ज दोन प्रतीमध्ये कागदपत्रासह बातमी प्रसिध्द झाल्यापासून दहा दिवसात संबंधित गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावेत असेही श्री.कोरगंटीवार यांनी कळविले आहे.

 

महिंद्र बाहा एसएईइंडिया २०१८ च्या अकराव्या आवृत्तीस प्रारंभ

0

 

  •   पहिल्यांदाच दोन बाहा कार्यक्रम – पितमपूर आणि रोपर
  • ३३८ प्रवेशिकांमधील २२१ महाविद्यालयांना मिळणार अंतिम फेरीत प्रवेश

पुणे  – महिंद्र अँड महिंद्र लि. ने एसएईइंडिया या ऑटोमोटिव्ह इंजिनियर्ससाठी असलेल्या व्यावसायिक संघटनेच्या सहकार्याने आज बहुप्रतिक्षित बाहा मालिकेच्या अकराव्या आवृत्तीचा प्रारंभ होत असल्याचे जाहीर केले. या आवृत्तीची अंतिमफेरी इंदौरजवळील पितमपूर येथील नॅट्रिप सुविधा केंद्रात २४ ते २८ जानेवारी २०१८ दरम्यान होणार असून त्यानंतर आयआयटी रोपार येथे ८ ते ११ मार्च २०१८ दरम्यान पार पडणार आहे.

बाहा एसएईइंडिया २०१७ साठी एकूण ३८८ प्रवेशिका आल्या होत्या, ज्यामधील १८० संघांची पारंपरिक बाजासाठी निवड करण्यात आली, तर ४१ संघ ईबाजासाठी व्हर्च्युअल फेरीतून निवडण्यात आले.

बाहा एसएईइंडियाने विद्यार्थ्यांना तीन दिवस चालणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या मालिकेत सहभागी होण्यासाठी एकच सीट असलेल्या चार चाकी ऑल- टेरेन व्हेइकलची (एटीव्ही) संकल्पना, बांधणी, चाचणी आणि अधिकृतता इत्यादी तयार करायला सांगितले होते. या तीन दिवसीय कार्यक्रमात तांत्रित तपासणी, स्टॅटिक विश्लेषण उदा. डिझाइन, खर्च आणि विक्री साजरीकरण तसेच डायनॅमिक इव्हेंट्स उदा. अक्सलरेशन, स्लेज पुल, सस्पेंशन- ट्रॅक्शन आणि गतीशीलता यांचा समावेश असेल.

बाहा एसएईइंडियाचे उल्लेखनीय, अभिनव वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये दरवर्षी नव्या संकल्पनेचा अवलंब केला जातो. यावर्षी बाहा २०१८ ची संकल्पना ग्राउंड टु ग्लोरी ही असून ती शून्यापासून सुरुवात करत वर्षभर संघर्ष आपले स्वप्न पूर्णत्वाला नेणाऱ्या उदयोन्मुख इंजिनियर्सची तळमळ, मेहनत, चिकाटी साजरी करणारी आहे. ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या आव्हानावर मात करून यश मिळवण्याच्या वृत्तीला सलाम करणारी आहे. ही संकल्पना विद्यार्थ्यांचा प्रवास आणि त्यांच्याकडून प्रत्येक सीमेला दिले जाणारे आव्हान यांचे प्रतीक असून त्यामुळे बाहा हा कार्यक्रम त्याच्याशी संबंधित असलेल्या सर्व लोकांना यश प्रदान करणारी आहे.

बाहा एसएईइंडियाने २०१५ मध्ये भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी ईबाहा मालिका सुरू केली. एमबाहा गाड्या १० एचपी आणि बी अँड एस गॅसोलिन इंजिन जे सर्व १८० संघांसाठी सारखेच असते त्यावर चालते, तर ईबाहा गाड्या इलेक्ट्रिक मोटर आणि चार्ज करण्यायोग्य लिथियम- इयॉन बॅटरीद्वारे विजेवर चालतात.

बाहा २०१८ मध्ये पुण्यातील २५ महाविद्यालयांनी सहभाग घेतला असून त्यातील महाराष्ट्रातील ६४ प्रवेशिका अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या आहेत. बाहा मालिकेच्या गेल्या काही आवृत्त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रवेशिक पुणे शहरातील होत्या. पुण्यातील महाविद्यालयांनी गेल्या काही वर्षांत अंतिम फेरीत सर्वाधिक बक्षिसेही मिळवली आहेत. बाहा २०१७ मध्ये प्रतिष्ठित बक्षिस कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणेने व त्याखालोखाल पुण्यातीलच अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनियरिंगने बक्षिस मिळवले होते. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणेला ‘बेस्ट ईबाहा टीम’ पुरस्काराचे विजेते घोषित करण्यात आले होते.

बाहा पुरस्कारासाठी देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे जुलै २०१७ मध्ये चित्कारा विद्यापीठ, चंडीगढ येथे झालेल्या व्हर्च्युअल फेरीत चाचणीत परीक्षण करण्यात आले. इथे त्यांनी अंतिम फेरीसाठी बाहा बगी गाडीचे त्यांना इच्छित असलेले डिझाइन दाखल केले.

कॅड डिझाइन, सीएई विश्लेषण, रोल केजचे डिझाइन, सस्पेंशन, स्टिअरिंग आणि ब्रेक्स तसेच रूल बुक व्हायवा सत्र आणि त्यांना आयत्या वेळेस देण्यात आलेल्या विषयाच्या विश्लेषणावरून या संघांची निवड करण्यात आली. व्हर्च्युअल बाहादरम्यान सादर करण्यात आलेल्या प्रवेशिका दिलेल्या सूचना व तपशीलांनुसार बनवण्यात आलेले नमुने होते. अंतिम फेरीतील संघांना त्यांची स्वतःची बगी रेस कार तयार करत आपले वाहन क्षेत्रातील आपले कौशल्य, आकलन आणि तळमळ दाखवून द्यायची होती.

याप्रसंगी श्री. पवन गोएंका, व्यवस्थापकीय संचालक, महिंद्र अँड महिंद्र लि. म्हणाले, ‘बाहा एसएईइंडिया २०१८ शी नाते जोडताना महिंद्रला आनंद होत आहे. बाजासोबत आम्ही महिंद्रची सतत प्रगती करण्याची विचारसरणी पुढे नेत आहेत. यंदा पितमपूर आणि आयआयटी रोपार या ठिकाणी मिळून दोन बाहा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, ही बाहा एसएईइंडियाची वाढती लोकप्रियता आणि राष्ट्रीय महत्त्व यांची पावती देणारी आहे. यंदा ग्राउंड टु ग्लोरी ही संकल्पना साजरी करत असताना मला आनंद वाटतो, की बाजा एसएईइंडिया हे एक असे व्यासपीठ आहे, जे तरुण इंजिनियरींग गुणवत्तेला वर्गात मिळवलेल्या ज्ञानाच्या जोरावर मशिनरी तयार करत विजय मिळवण्यासाठी संधी देते.’

श्री. मुकेश के. तिवारी, आयोजक, बाहा एसएईइंडिया २०१८ आणि उप व्यवस्थापक महिंद्र टु व्हीलर्स लि. म्हणाले, या वर्षी एकंदर सहभाग २०१७ मध्ये १८ टक्क्यांनी वाढला आहे, तर एम- बाहा विभागातील सहभागात ३३ टक्क्यांची वाढ आहे. एम- बाहासाठी आमच्याकडे १२० संघ, तर पितमपूर आणि आयआयटी- रोपार येथील ई- बाहासाठी ३७ संघ आहेत.

बाहा एसएईइंडिया बद्दल

बाहा एसएईइंडिया हा इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांसाठीचा शैक्षणिक उपक्रम असला, तरी तो वर्गाच्या चौकटीबाहेरचे व्यवहारिक ज्ञान मिळवून देण्यास मदत करतो. देशभरातील इंजिनीअरिंगचे विद्यार्थी इथे एक टीम म्हणून सहभागी होऊ शकतात तसेच त्यांना इंडस्ट्रीत वावरताना येणाऱ्या आव्हानांचा प्रत्यक्ष अनुभवही घेता येतो. एसएई इंटरनॅशनलने सर्वात आधी अमेरिकेत सुरू केलेली मिनी बाहा एसएई स्पर्धा आज विविध देशांमध्ये आयोजित केली जाते. भारतात बाहा एसएईइंडिया नावाने तिचे आयोजन केले जाते. आंतरराष्ट्रीय पातळीच्या या स्पर्धेत जगभरातील विद्यापीठे सर्व प्रदेशांत चालू शकणारी कार डिझाइन, फॅब्रिकेट करून तिची तपासणी घेऊ शकतात. त्यानंतर स्टॅटिक, डायनॅमिक आणि टिकाऊपणासाठी असलेल्या डिझाइन, किंमतीची मीमांसा, सादरीकरण, अक्सलरेशन, चढ चढणी आणि सहनशीलता अशा पातळ्यांवर तिची चाचणी घेतली जाते.

इतक्या वर्षांत बाहाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्यामुळे तो राष्ट्रीय पातळीवरचा मोठा कार्यक्रम ठरला आहे. बाहा एसएईइंडिया मालिका तरुण, उत्साही, गुणवान इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांना वाहनउत्पादन क्षेत्राबद्दल असलेली आवड दाखवण्यासाठी संधी देते, शिवाय त्यांना सर्व प्रदेशांत चालू शकणारी चारचाकी, एक आसन असलेली गाडीची संकल्पना मांडण्यापासून तिचे डिझाइन बनवण्यापासून आणि फॅब्रिकेट करण्यापर्यंत पूर्णपणे तयार करण्यासाठी प्रोत्साहन देते.

बाहा स्टिअरिंग समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. पवन गोएंका यांच्या कुशल नेतृत्वाखाली स्थापना झाल्यापासूनच महिंद्र या कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या पाच वर्षांपासून महिंद्र या कार्यक्रमाचा शीर्षक प्रायोजक असून यावर्षीसुद्धा ही परंपरा सुरू ठेवताना त्यांना अभिमान वाटत आहे. त्याशिवाय एआरएआय, अल्टेर, आनंद ऑटोमोटिव्हज, अनेसिस, एएसडीसी, एव्हीएल, भारत पेट्रोलियम, बीकेटी, बॉश, ब्रिग्ज अँड स्ट्राटॉन, चित्कारा विद्यापीठ, काँटिनेंटल, कमिन्स, डेल्फी, एलिएशन, एंड्युरन्स, जीएम, आयएसी, आयसीएटी, आयटीडब्ल्यू केमिन, जॉन डिअरे, लिअर, एल अँड टी, मॅथ वर्क्स, मेदांता हॉस्पिटल, मेंटॉर ग्राफिक्स, एम पी. कन्सलटिंग, नॅटिप, ओयो रूम्स, पद्मिनी इंजिनियरिंग, पोलारिस, प्रिया इव्हेंट्स, रॅडिसन हॉटेल्स, व्हॅरॉक, व्होल्वो, वुर्थ आणि झिटाडेल हे ही अभिमानाने आपला पाठिंबा या कार्यक्रमासाठी देत आहेत. त्याशिवाय एसआयएएम आणि एसीएमए यांचाही या कार्यक्रमाला पाठिंबा लाभलेला आहे.

ईबाहा बद्दल

ईबाहा हा बाहा एसएईइंडियाच्या एससी आणि ओसी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम आहे, ज्यात दरवर्षी १००० इंजिनियरिंग विद्यार्थी भाग घेतात. भारतातील उदयोन्मुख इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्राचा लाभ घेण्यासाठी २०१५ मध्ये श्री. सुबोध मोर्ये यांच्या आयोजनाखाली आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात केली. या व्यासपीठावर इंजिनियरिंग विद्यार्थ्यांना बाहा रूलबुकनुसार इलेक्ट्रिक गाडी तयार करण्याची आणि ही गाडी इलेक्ट्रिक ताकदीच्या सहाय्याने काय कमाल करते हे अनुभवण्याची संधी मिळते. यातील एका सत्रादरम्यान हिज एक्सलन्सी स्वर्गीय डॉ. एपीजे अब्दुल कलाम, माजी राष्ट्रपती, भारत यांनी आयोजक समितीला या व्यासपीठाचा देशाच्या समृद्धीसाठी वापर करण्याची सूचना दिली होती. त्यांच्या विचारांनी भारावलेल्या आयोजक समितीने आठव्या सत्रात ई- बाहा हा एक उप- कार्यक्रम समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. नेहमीचा बाहा कार्यक्रम पेट्रोलवर चालणाऱ्या एटीव्हीवर आधारित असून ईबाहा गाड्या रिचार्ज होऊ शकणाऱ्या लिथियम इयॉन बॅटरी पॅकची जोड लाभलेल्या इलेक्ट्रिक मटोरवर चालतात.

ईबाहा ही इलेक्ट्रिक बाहा एटीव्हीवर आधारित संकल्पना असून ती इलेक्ट्रिक मोबिलिटीवर भर देते. जीवाश्म इंधन बनण्यासाठी सौर उर्जेची कित्येक वर्ष खर्च होतात आणि अतिश दुर्मीळ भौगोलिक परिस्थितीत ती तयार होतात व निसर्गासाठी धोकादायक असतात. म्हणूनच आपल्याला उर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी आणि मानवनिर्मित हवामानबदल स्थिर करण्यासाठी शाश्वत तसेच स्वच्छ तंत्रज्ञानाकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याशिवाय इंधनाचे हे स्त्रोत चिरकाल टिकणारे नसल्यामुळे भविष्यात इंधनाचा तुटवडा जाणवू शकतो. त्याआधीच आपल्याला वाहतुकीसाठी पर्यायी उर्जा स्त्रोत तयार करणे व शाश्वत विकास साधणे आवश्यक आहे. म्हणूनच इलेक्ट्रिक मोबिलिटीला चांगले भविष्य असेल आणि ते देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल असे आम्हाला वाटते.

देशातील सर्व कलाप्रकारांना एकत्र आणावेेः पद्मभूषण सेठी

0

एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे पद्मभूषण राजीव सेठी यांना जीवन गौरव पुरस्कार

पुणे, दि.13 ऑक्टोबर: “संगीत, हस्तकला, वास्तुशिल्प, वस्त्रप्रावरणे इ. त्याचप्रमाणे सर्व राज्यातील कलाप्रकारांना एकत्र आणणे गरजेचे आहे. त्यामुळे कलाकारांची कला जगासमोर आणल्यामुळे त्यांना उत्तम प्रकारच्या आर्थिक मदती बरोबरच प्रसिद्धी सुद्धा मिळत जाईल.” असे उद्गार एशियन हेरिटेज फाऊंडेशनचे संस्थापक पद्मभूषण राजीव सेठी यांनी काढले.

डॉ.विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांच्या हस्ते त्यांना‘ जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि ज्ञानेश्‍वर माऊलीची प्रतिमा हे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी प्रसिद्ध व्हायोलिनवादक पं.अतुल कुमार उपाध्ये, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, एशियन हेरिटेज फाऊंडेशनचे अंकुश सेठी, डब्ल्यूएचओचे सल्लागार डॉ.चंद्रकांत पांडव, सल्लागार डॉ. जय गोरे, अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, प्रा.डी.पी. आपटे, प्रा.डॉ.एल.के. क्षीरसागर, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एम.पठाण आणि माजी कुलगुरू डॉ. सुभाष आवळे हे उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देतांना पद्मविभूषण राजीव सेठी म्हणाले,“ भारताच्या प्रत्येक विभागात सृजनात्मक कला दिसते. या देशात विशेषकरून लोककला आणि हस्तशिल्प या सर्वेत्कृष्ठ कला दिसतात. मुंबई विमानतळावर प्रथमच कला क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात खर्च केला गेला. त्यामुळे देशातील सर्व कलाप्रकारांना एक नवीन ओळख प्राप्त झाली. तेथे 7 हजार कलाकृती पहावयास मिळतात.”

प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अध्यात्म हा महत्वपूर्ण घटक आहे. तोच धागा पकडून आम्ही विज्ञान आणि अध्यात्माच्या आधारे शिक्षण देण्याचे कार्य करीत आहोत. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे 21वे शतक हे भारताचे शतक असेल. तसेच, भारत देश संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देईल.”

पं.अतुल कुमार उपाध्ये म्हणाले,“ संगीत ही सर्व जगाची भाषा आहे. संगीत ही कला देश व संपूर्ण मानवजात यांना जोडण्यासाठी महत्वपूर्ण कार्य करते. मी व्हायोलिनवादक असल्यामुळे प्रत्येक वेळेस माझे व्हायोलिन सर्वांशी बोलत असते.”

प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांनी एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्थापनेबरोबरच विश्‍वशांतीसाठी केल्या जाणार्‍या कार्याची सविस्तर माहिती दिली.

डॉ. चंद्रकांत पांडव यांनी स्वागत पर भाषण केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

‘Thank U विठ्ठला’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा

0

मराठी चित्रपटांच्या विषयात आणि आशयात अलीकडच्या काळात खूप विविधता दिसून येत आहे. असाच वेगळ्या आशय आणि विषयाच्या Thank U विठ्ठला या मराठी चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा अभिनेता–दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या हस्ते उत्साहात नुकताच संपन्न झाला. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रंगलेल्या या संगीत अनावरण सोहळ्यात चित्रपटातील गाण्याची झलक या निमित्ताने सगळ्यांनी अनुभवली. एम.जी.के प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती गोवर्धन काळे, गौरव काळे व अंजली सिंग यांनी केली असून कथा व दिग्दर्शन देवेंद्र जाधव यांचे आहे. येत्या ३ नोव्हेंबरला ‘Thank U विठ्ठला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मनोरंजनाच्या माध्यमातून चांगला संदेश देणारा ‘Thank U विठ्ठला हा चित्रपट माझ्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचं अभिनेता महेश मांजरेकर यांनी याप्रसंगी सांगितलं. मी आणि मकरंद अनासपुरेनी ‘Thank U विठ्ठला च्या निमित्ताने बऱ्याच दिवसाने एकत्र काम केलं असून आम्ही जितका हा चित्रपट एन्जॉय केला तितकाच तो प्रेक्षकही एन्जॉय करतील असा विश्वास या दोघांनी याप्रसंगी व्यक्त केला.

प्रत्येकाला नेहमीच दुसऱ्याच्या आयुष्याचा हेवा वाटत असतो. इतरांसारखं आयुष्य आपल्या वाट्याला नाही, याबद्दल तक्रार करत आपल्या हाती असलेलं सहज सुंदर जगणंही हल्ली प्रत्येकजण विसरून गेलं आहे. ‘Thank U विठ्ठला या चित्रपटातही आयुष्याला कंटाळलेल्या एका व्यक्तीचा प्रवास असून या प्रवासात त्याला मिळालेल्या विठ्ठलाच्या साथीमुळे काय बदल घडतो? याची रंजक कथा या चित्रपटात पहाता येईल.

महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, दीपक शिर्के, कमलेश सावंत, स्मिता शेवाळे, सुनील गोडबोले, प्रदीप पटवर्धन, किशोर चौघुले, जयवंत वाडकर, योगेश शिरसाट, अभिजीत चव्हाण, मौसमी तोंडवळकर, पूर्वी भावे, तेजा देवकर, याकुब सय्यद, अरुण घाडीगावकर, अरुण टकले, संतोष केवडे, मिलिंद साफई, सतीश सलागरे, संग्राम सरदेशमुख, राजेंद्र जाधव, शैलेश पितांबरे, अंतून घोडके, आनंद जोशी, अमीर शेख, मनीषा राऊत, शिवा व बालकलाकार वरद यांच्या भूमिका आहेत.

सादरीकरण आणि मांडणीत वैविध्य असलेल्या या सिनेमाचे संगीत देखील रिफ्रेशिंग झालंय. विजय शिंदे, दीपक कांबळी मच्छींद्र मोरे यांच्या लेखणीतून साकारलेल्या यातील गीतांना रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केलं आहे. ‘मोबाईल’, ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला’ आणि ‘लोणचं’ अशी वेगवेगळ्या जॉंनरची तीन गाणी या चित्रपटात आहेत. उत्तम स्टारकास्ट, दमदार संगीत असलेल्या ‘Thank U विठ्ठला या चित्रपटातील सुमधूर गीतांचा हा नजराणा प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील. झी म्युझिक कंपनीने ‘Thank U विठ्ठला चित्रपटातील गाणी प्रकाशित केली आहेत.

चित्रपटाचे सहनिर्माते एम.सलीम असून पटकथा ही त्यांचीच आहे. संवाद एम.सलीम व योगेश शिरसाट यांचे आहेत. छायांकन दिनेश सिंग तर संकलन अजय नाईक यांचं आहे. कलादिग्दर्शन अनिल गुंजाळ यांनी केलं असून वेशभूषा लक्ष्मण गोल्लार यांची आहे. ग्राफिक्स अरविंद हतनुरकर यांचं तर साऊंड इंजिनिअर विजय भोपे आहेत. नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते जितेंद्र कुलकर्णी आहेत.

३ नोव्हेंबरला ‘Thank U विठ्ठला प्रदर्शित होणार आहे.

अधिकारी व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गिरीश बापट

0

पुणे,दि. 12: जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून ओळखला जातो. या तालुक्याचा विकास करणे हे आवश्यक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त निधी कशा पद्धतीने मिळवता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न करू. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी दोघांनी समन्वयाने काम केल्यास हे सहज शक्य आहे,असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे केले.शासकीय विश्रामगृह  पुणे येथे आयोजित जुन्न्नर तालुक्यातील विविध विषयासंदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे,जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) सुवेज हक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत त्यांनी विविध विभागांच्या कामाचा आढावा घेतला तसेच अधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.सकारात्मकतेने जनतेसाठी विकासाची कामे करत राहावीत, अशा सूचना त्यांनी केल्या.

जागतिक संधीवात दिना निमित्त ‘वॉकथॉन’ संपन्न

0

पुणे-साई श्री हॉस्पिटल तर्फे जागतिक संधीवात दिना निमित्त ‘वॉकथॉन’ चे आयोजन करण्यात आले होते.हे वॉकथॉन हॉटेल सीझन,औंध ते साई श्री हॉस्पिटल औंध पर्यंत घेण्यात आले.

संधीवाताचे दिवसोनदिवस वाढणारे प्रमाण पाहता संधिवाता विषयी जनाजृतीसाठी व्हावी यासाठी याचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी साई श्री हॉस्पिटल व्यवस्थापकीय संचालक डॉ. नीरज आडकर असे म्हणाले की “बदलत्या जीवनशैलीमुळे, संधिवात हा तरुणपणातही होऊ शाकतो यासाठी लहान पणापासूनच व्यायामाची सवय जोपासणे आवश्यक आहे मात्र या व्यायामाचा अतिरेक करणेही चुकीचे आहे .“ त्या बरोबर ते असेही म्हणाले की ज्येष्ठ नागरिकांनी दररोज सकाळ व संध्याकाळ चालणे आवश्यक आहे मगच या संधिवाता पासून लांब राहता येईल.

या वॉकथॉन मध्ये १८० ते २०० स्त्री पुरुषांचा सहभाग होता व ज्येष्ठ नागरिक हि मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.हे वॉकथॉन साई श्री हॉस्पिटल यांच्या बरोबर ज्येष्ठ नागरिक संघटना, बाणेर तसेच ज्येष्ठ नागरिक संघ औंध व पुणे यांचाही यात सहभाग होता.

कॉंग्रेस भवनात नाचले …नेते ..अन कार्यकर्ते ..(व्हिडीओ)

0

पुणे-पुण्याच्या कॉंग्रेस भवनातला आनंदोत्सव ..पहावा असा ..आणि अनुभवावा असाच ठरला . नांदेड महापालिकेत कॉंग्रेसला मिळालेल्या  यशाची बातमी येथे धडकताच कॉंग्रेस भवनाचे आवार गर्दीने फुलून गेले. शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे दुपारी येथे येताच कार्यकर्त्यांनी एकाच जल्लोष केला  .  पेढे वाटले, नाचले … फटाके फोडले .. आणि ‘नांदेड तो झाकी है ..गुजरात अभी बाकी है ..’ च्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या .माजी आमदार  मोहन जोशी , रोहित टिळक,नगरसेवक अविनाश बागवे, अजित दरेकर, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगीता तिवारी, तसेच सोनाली मारणे, विठ्ठल थोरात ,पीएमटी चे माजी अध्यक्ष चंद्रशेखर कपोते तसेच  लतेंद्र भिंगारे,राजू साठे ,आयुब पठाण ,संदीप मोकाटे , विकी खन्ना ,आदी असंख्य कार्यकर्ते या आनंदोत्सवात सहभागी झाले होते .
यावेळी माध्यमांशी बोलताना अध्यक्ष रमेश बागवे यांनी , नांदेड पासून भाजपला संपवायला कॉंग्रेसने सुरुवात केली असल्याचे सांगितले . अशोक चव्हाण आणि सर्वच कॉंग्रेस नेत्यांनी केलेले प्रयत्न ,राहुल गांधींच्या बाबत वाढलेल्या जन आशा .. आणि भाजप सरकारने केलेली जनतेची फसवणूक यामुळे हा विजय मिळाल्याचे बागवे यांनी सांगितले . या विजयाचे वारे राज्यभर आणि देशभर पसरेल असेही ते म्हणाले .
पहा कॉंग्रेस भवनातील बहार … (व्हिडीओ)

खासदार काकडे यांचा पुन्हा अचूक अंदाज!

0

कांबळे व कार्यकर्त्यांचे खासदार काकडेंकडून अभिनंदन
पुणे, दि. 12 ऑक्टोबर : पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीत भाजप-आरपीआयच्या उमेदवार हिमाली नवनाथ कांबळे यांचा साडे चार हजार ते पाच हजार मताधिक्याने आज दणदणीत विजय झाला आणि भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी वर्तविलेला अंदाज खरा ठरला. त्यामुळे पुन्हा एकदा खासदार काकडे आणि त्यांच्या राजकीय अभ्यासाचे गणित समोर आले.

सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यातर्फे नुकत्याच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डात आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार काकडे यांनी हा अंदाज वर्तविला होता. यावेळी खासदार अनिल शिरोळे व शहराध्यक्ष योगेश गोगावले आदींची उपस्थिती होती.

पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी खासदार काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांना विनंती केली होती. परंतु, त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. निवडणूक कमळ चिन्हावर होत असल्याचे कारण देत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार उभा करण्यात आला. खासदार काकडे यांनी सुरुवातीपासूनच हिमाली कांबळे यांच्या विजयासाठी नियोजन केले होते. त्यास चांगलेच यश आले.

जीएसटीमुळे व्यापार व उद्योग क्षेत्र त्रस्त असल्याचा व पेट्रोलच्या भावामुळे महागाई वाढल्याचा विरोधकांनी प्रचार केला. परंतु, मतदारांनी या मुद्द्यांना बगल देत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदान केले. हेच यातून स्पष्ट होते, असे खासदार संजय काकडे यांनी सांगितले. तसेच, विजयी उमेदवार हिमाली कांबळे व त्यांच्या विजयासाठी काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेसाठी ही निवडणूक झाली. राष्ट्रवादीच्या धनंजय गायकवाड यांच्यावर हिमाली कांबळे यांनी 4 हजार 583 मतांनी मात केली. हिमाली कांबळे यांना 7 हजार 899 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय गायकवाड यांना 3 हजार 316 मतं मिळाली.

या प्रभागात बुधवारी फक्त 20.78 टक्के इतके नीचांकी मतदान झाले होते. भाजप-रिपाइंकडून कांबळे यांची कन्या हिमाली कांबळे तर राष्ट्रवादीकडून धनंजय गायकवाड यांच्यासह अन्य पाच अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. बुधवारी पावसामुळे केवळ 20.78 टक्के इतकेच मतदान झाले होते.

दिवाळी : भेटला तू मला ज्या क्षणाला..(कविता )

0

सवे दीप घेऊन आली दिवाळी!
जणू रोषणाईत न्हाली दिवाळी!

सख्या भेटला तू मला ज्या क्षणाला
क्षणालाच त्या काल झाली दिवाळी!

किती वेगळी वाटते या इथे अन
किती वेगळाली महाली दिवाळी!

कुठे कालचा सांग आनंद गेला
उदासी जणू आज ल्याली दिवाळी!

दिवस सारखे सर्व गरिबास वाटे
कधी सांग त्याला कळाली दिवाळी!

अनिता बोडके
नाशिक

दीपावलीचे लक्ष्मीपूजन दि.१९ ऑक्टोबर रोजी सायं.६.११ ते ८.४० पर्यंत

0
पुणे, दि.१२ ऑक्टोबर २०१७ -“दीपावलीचे लक्ष्मीपूजन यावर्षी दि.१९ ऑक्टोबर, गुरुवारी सायं. प्रदोषकाळी ६.११ ते रात्री ८.४० या अडीच तासात करावे. निदान ८.४० पूर्वी पूजा प्रारंभ होईल असे पहावे. ” असे आवाहन पं.वसन्तराव गाडगीळ यांनी केले आहे.
“लक्ष्मीपूजन हा केवळ व्यापारीपेढ्या, दुकानदार यांनीच करायचा कार्यक्रम नसून अवदसा (दारिद्र्य, गरीबीचा) नाश व्हावा यासाठी ‘अलक्ष्मीं नाशय्।’ अशी प्रार्थना आणि केरसुणीच्या पूजनाने अवदसा – गरीबी झटकूनच लक्ष्मी या संपदेचे, संपन्नतेचे पूजन हा लक्ष्मीपूजनाचा उद्देश असतो. ” असे सांगून ते पुढे म्हणतात
केवळ व्यापार धंद्यातून नव्हे घरी गृहस्थाश्रम धर्मात सुध्दा रोजच्या रोज हिशोब वहीत लिहून व्यावहारिक स्वच्छता-शुचिता हा एक आवश्यक कर्तव्य धर्मच आहे. या हिशोबवही पुस्तकावर ॐकाराचे मंगल स्वस्तिकासह शुभ-लाभ असे लिहून यांचे पूजन-वहीपूजन हेच सरस्वतीपूजन दीपावलीचा भाग म्हणून पाडवा-बलिप्रतिपदा २१-१०-२०१७, शनिवारी पहाटे अभ्यंगस्नानानंतर सूर्योदयापूर्वीच पहाटे करायचे असते. पाडवा पहाटे अभ्यंग स्नानानंतर दिनचर्येचा हा पहिला कार्यक्रम कोणीहि चुकवू नये” असेहि त्यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र आंतरजिल्हा अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत आझम कॅम्पसच्या विद्यार्थिनींना सुवर्णपदक

0
पुणे :
महाराष्ट्र आंतरजिल्हा अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेमध्ये वरिष्ठ व कनिष्ठ गटात अनुक्रमे अलमास शेख (एम सी ई सोसायटीच्या अ‍ॅग्लो उर्दू बॉर्इज हायस्कुल व कनिष्ठ  महाविद्यालय) व उमरा शेख (एम. सी. एस. इंग्रजी माध्यम प्रशाला) या विजेतेपद मिळवून सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या आहेत.
अलमास शेख ने महिलांच्या 64 ते 69 किलोग्रॅम वरिष्ठ गटामध्ये सुवर्णपदक मिळवले. तर उमेरा शेख ने कनिष्ठ गटाच्या 69 ते 75 किलोग्रॅम गटामध्ये सुवर्णपदक मिळवले.
अलमास शेख एम सी ई सोसायटीच्या अ‍ॅग्लो उर्दू बॉर्इज हायस्कुल व कनिष्ठ  महाविद्यालयात इ. 12 वी मध्ये शिकत आहे. उमेरा शेख एम. सी. एस. इंग्रजी माध्यम प्रशालेत इ 10 मध्ये शिकत आहे.
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॅा. पी. ए. इनामदार, उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतीफ मगदूम, मुख्याध्यापिका परवीन शेख व रब्बाब खान, आझम क्रीडा अकादमीचे संचालक गुलजार शेख, व्यवस्थापकीय मंडळाचे सर्व सदस्य, सर्व शिक्षकवर्ग यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
ही स्पर्धा नुकतीच नागपुरमध्ये झाली. अंतिम सामन्यामध्ये अलमास शेख ने मुंबर्इ शहर संघाच्या सिमरन चा पराभव केला. तसेच अंतिम सामन्यामध्ये उमेरा शेख ने अहमदनगर संघाच्या नेहा चा पराभव केला.

दिवाळी म्हणजे नेमके काय ? आहे ठाऊक ?

0

दीपावली हा सण मुळचा कृषिवल/पशुपालक संस्कृतीचा “यक्षरात्री” उत्सव आहे. कुबेर हा शिवाचा खजीनदार मानला जातो. बुद्धपुर्व काळापासून भारतात देशभर “यक्ष” संस्कृतीचा मोठा प्रभाव होता हे आपल्याला सर्व धर्मीय म्हणजे जैन, बौद्ध, हिंदू लेणी-मंदिरांतील यक्ष प्रतिमांवरुन व यक्षाच्या नांवाने असलेली गांवे/जमीनी/तलाव यावरून लक्षात येते. दीपावलीचे मुळचे नांवही यक्षरात्रीच होते हे हेमचंद्राने तर नोंदवलेच आहे, वात्स्यायनाच्या कामसूत्रातही नोंदलेले आहे.

यक्ष या शब्दाचा अर्थ प्रकाशमान असाही आहे. महाभारतात यक्ष हे ज्वाला अथवा सुर्यासारखे तेजस्वी असतात असे म्हटले आहे. या श्रद्धेतुनच दिपोत्सव यक्षांसाठी सुरु झाला व त्यांनाच यक्षरात्री असे म्हटले जावू लागले असे जी. बी कानुगा म्हणतात. (Immortal love of Rama, तळटीप. पृष्ठ-२७-२८) धनसंपत्ती देणारे, रक्षक असलेल्या यक्षांना दिपोत्सव करुन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा उत्सव.

असूर संस्कृती भारतात मुख्य असली तरी प्रत्येक संस्कृतीच्या प्रभावक्षेत्रात उपसंस्कृत्याही सहास्तित्वात असतात. यक्ष संस्कृतीचा उदय हा गंगेच्या घन अरण्याच्या क्षेत्रात झाल्याचे मानले जाते. गुढत्व, भय, अद्भुतता या मिश्र भावनांतून यक्षकल्पना अरण्यमय प्रदेशांत जन्माला आली असावी. आज यक्ष हा जल, अन्न-धान्य-पशु व संपत्तीचा संरक्षक मानला गेला आहे. अगदी पुरातन काळी यक्ष हे वृक्ष व अरण्याचे रक्षक मानले जात. पुढे कृषी संस्कृतीच्या उदयानंतर ते ग्रामरक्षक या स्वरुपातही विराजमान झाले. यक्ष पुजा ही इतकी पुरातन आहे कि यक्ष म्हणजेच पुजा असे दक्षीणेत आजही मानले जाते. यक्षपुजा ही आजही शैवजन करत असतात…पण सांस्कृतिक लाटांत विस्मरणामुळे ते यक्ष आहेत हेच माहीत नसते. उदाहरणार्थ वीर मारुती, वीरभद्र, खंडोबा, भैरवनाथ इ. दैवता या यक्षश्रेणीतीलच आहेत. ते संरक्षक आहेत ही जनमानसाची श्रद्धा आहे…आणि म्हणुनच त्यांचे स्थान हे शक्यतो शिवेबाहेर असते…कारण ते ग्रामरक्षक असतात ही श्रद्धा. त्यांना शिवाचेच अवतार अथवा अंश मानले जाते.

उपनिषदांची रचना करणारे हे यक्ष संस्कृतीचेच प्रतिनिधी होते असे ठामपणे म्हणायला पुष्कळ वाव आहे. यक्ष हा शब्द अद्भूत, विश्वनिर्मितीचे गुढ कारण या अर्थाने उपनिषदांत वापरला जात होता. ब्रम्ह हाही एक यक्षच. (ऋग्वेदात ब्रम्ह ही देवता नसून त्याती ब्रम्हचा अर्थ मंत्र असा आहे.) पण मुळची उपनिषदे ही वैदिक नसून आगमिक असूर/यक्ष संस्कृतीच्या लोकांनी परिणत तत्वज्ञानाच्या आधारे वैदिक संस्कृतीला केलेला प्रतिवाद आहे हे लक्षात घ्यायला हवे.

गौतम बुद्धाच्या शाक्यकुलाचा कुलदेव शाक्यवर्धन नांवाचा यक्षच होताच तर खुद्द बुद्धालाही यक्ष म्हटले गेलेले आहे. जैन धर्मातही यक्ष-यक्षिणी तीर्थकरांचे सेवक मानले गेले आहेत. मातृपुजा अथवा सुफलनविधी यक्षिणींनाही केंद्रस्थानी ठेवून होत असावेत कारण त्या शिल्पांत नेहमीच नग्न दाखवलेल्या असून त्यांचे नितंब व स्तन प्रमाणापेक्षा मोठे दाखवले जातात. सर्वात जुनी यक्षमुर्ती ही सनपूर्व चवथ्या शतकातील असून ती परखम येथे मिळाली. आता ती मथुरा संग्रहालयात ठेवलेली आहे. पुढे महायान संप्रदायातही यक्षपुजा सुरु राहिली. यक्ष मुर्ती देशात सर्वत्र आढळल्या असून यक्षगानाच्या स्वरुपात दक्षीणेत कलादृष्ट्याही यक्षमाहात्म्य जपले गेलेले आहे.

एवढी व्यापक देशव्यापी असलेली यक्षपुजा पुराणांनी केलेल्या वैदिक कलमांत हळू हळू विस्मरणात गेली. कुबेर व रावणाचे बाप बदलले गेले. पुराणांनी यक्षांना अतिमानवी, माणसांना मारून खाणारे, जलाशयांजवळ निवास करणारे कुरूप-भिषण, लोकांना झपाटणारे वगैरे असे चित्रित केले. तरीही यक्ष ही संरक्षक देवता आहे व तिचा निवास जल-वृक्ष यात असते ही लोकस्मृती लोप पावली नाही. महाकवी कालिदासाने मेघदुतात यक्षालाच आपले दूत बनवले. यक्षपुजा आजही आपण करीत असतो पण त्यातील अनेक देवता मुळस्वरुपातील यक्षच आहेत याचे भान मात्र हरपलेले आहे. दिपावलीही खरे तर यक्षरात्रीच असली तरी तेही आपले भान सुटले आहे.

कुबेर हा शिवाचाच प्रतिनीधी…यक्षांचा अधिपती…धनसंपत्तीचा रखवाला…खजीनदार. एक कृषि-हंगाम जावुन दुसरा येण्याच्या मद्धे जो अवकाश मिळतो…त्या काळात या कुबेराचे अभिवादन करत समस्त कृषिवल असूर संस्कृतीचा जो महानायक बळी त्याच्या स्मरणाने नवीन वर्ष सुरु करण्याची ही पद्धत. त्यालाच आपण बळी प्रतिपदा म्हणतो…नववर्षाची सुरुवातच सर्वश्रेष्ठ, शैव संस्कृतीचा आजही जनमानसावर राज्य करीत असलेल्या महात्मा बळीच्या नांवाने सुरु होणे स्वाभाविकच आहे.

या दिवशी विष्णुचा अवतार वामनाने बळीस पाताळात गाडले अशी एक भाकड पुराणकथा आपल्या मनावर आजकाल बिंबलेली आहे. खरे तर ही दंतकथा कशी जन्माला आली हे आपण पाहुयात. मुळात ही कथा ऋग्वेदात अत्यंत वेगळ्या प्रतीकरुपात येते. विष्णु तीन पावलात विश्व व्यापतो अशी ही मुळची कथा. तिचा बळीशी काही संबंध नाही. परंतू गुप्तकाळात दिपावलीचेही सांस्कृतीक अपहरण करण्याच्या प्रयत्नांत वामन अवतार घुसवत त्याने बळीला पाताळात गाडल्याची कथा बनवली गेली. मुळात ते सत्य नाही. बळी वेदपुर्व काळातला. अवतर संकल्पना आली तीच मुळात गुप्तकाळात. त्यामुळे ही एक “वैदिक” भाकडकथा आहे हे सहज लक्षात येईल असे तिचे एकुणातील स्वरुप आहे. अर्थात ही कथा निर्माण केली म्हणून बळीराजाचे महत्व कमी झालेले नाही. झाले असते तर ती “वामनप्रतिपदा” झाली असती…बळीप्रतिपदा नव्हे. पण तसे झाले नाही…थोडक्यात हिंदुंनी आपल्या सांस्कृतीक श्रद्धा जपल्या, पण वैदिक धर्मियांनी बनवलेल्या कथाही सातत्यपुर्ण प्रचारामुळे कालौघात डोक्यात घुसवुन घेतल्या. बळीला पाताळात गाडुन वैदिक टेंभा मिरवणा-या वामनसमर्थकांच्या हे लक्षात येत नाही कि नववर्षारंभ बळीच्या नावाने का? कारण ते बळीमाहात्म्य संपवुच शकत नव्हते…एवढेच…म्हणुन भारतात या वामन-अवताराची पुजा कोणी करत नाही…त्याचे भारतात बहुदा एकच मंदिर आहे. पण बळीचे तसे नाही…तो आजही कृषिवल संस्क्रुतीचा श्वास आणि ध्यास आहे. बळीप्रतिपदेला आपण बळीचीच पूजा करतो…वामनाची नाही.

अश्वीन अमावस्येला आपण आज जे लक्ष्मीपुजन करतो त्याचाही असाच सांस्कृतीक अनर्थ झालेला आहे. मुळात ही यक्षरात्री असल्याने या रात्री लक्ष्मीपुजन नव्हे तर कुबेरपूजन करण्याची पुरातन रीत. कुबेर हा शिवाचा खजीनदार. धनसंपत्तीचा स्वामी. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करुन पुजणे हा मुळचा सांस्कृतीक कार्यक्रम. परंतू गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पुजा होऊ लागली. नंतर कालौघात मात्र कुबेराला गायबच करण्यात आले.

खरे तर विष्णू आणि लक्ष्मी हा संबंध जोडण्यात आला तोही उत्तरकाळात. गुप्तकाळात. ऋग्वेदात विष्णुला मुळात पत्नीच नाही. श्रीसूक्त हे प्रक्षिप्त असून ते उत्तरकाळात जोडले गेले आहे (गणपती अथर्वशिर्षाप्रमाणे) पण यातही विष्णु व लक्ष्मी यांचा पती-पत्नी संबंध, विष्णुचे शेषशायी समुद्रतळीचे ध्यान वगैरे वर्णित नाही. तो उपेंद्र आहे यापलीकडे त्याला महत्व नाही. त्याचे महत्व वाढवले गेले ते गुप्तकाळात. गुप्तांनी वैदिक धर्माला राजाश्रय दिला त्यामुळे गुप्तकाळ सुवर्णकाळ मानायची प्रथा पडली. पण सांस्कृतिक गोंधळाचा काळ म्हणजे गुप्तकाळ हे लक्षात घ्यायला हवे.

हा उत्सव मुळचा अवैदिक (आगमिक व म्हणजेच हिंदुंचा, वैदिकांचा नव्हे) असल्याचे अनेक पुरावे जनस्मृतींनी आजही संस्कृतीत जपलेले आहे. मुळच्या यक्षरात्रीचे अनेक अवशेष आजही जनस्मृतीतून गेले नाहीत असे जी. एन. कानुगा (तत्रैव) म्हणतात. बंगालमद्ध्ये लक्ष्मीऐवजी कालीची पुजा करंण्यात येते. अनेक समाज यक्षरात्रीला गोवर्धन पर्वताची कृष्णासहित पूजा करतात. कृष्ण हा मुळचा इंद्रविरोधी (म्हणजेच वैदिक विरोधी) ही जनस्मृती आजही कायम आहे. काही लोक आजही लक्ष्मीबरोबरच कुबेराचीही पुजा करतात. म्हणजेच मुळचे अवशेष वैदिकांना समूळ पुसटता आलेले नाहीत.

वसुबारस, धनतेरस (धनतेरस हा शब्द “धान्यतेरस” असा वाचावा…कारण धन हा शब्द धान्य शब्दाचा पर्यायवाची आहे.) हे सण कृषिवल शैव संस्कृतीचीच निर्मिती आहे. कृषीसंस्कृतीत गाय-बैलाचे स्थान केंद्रवर्ती होते व आजही बव्हंशी आहे. वैदिकांनी त्यावर अतिक्रमण करुन त्यांना वैदिक रुप बहाल करण्याचा प्रयत्न केला आहे एवढेच. कारण या सणाचा राम वनवासातून परत आला या भाकडकथेशीही काहीएक संबंध नाही.

नरकासूराच्या दुष्टपणाच्या व सोळा हजार राजकन्यांना बंदिवासात ठेवण्याच्या कथेत तथ्यांश असता तर नरकासुराच्या नांवाने एक दिवस लोकांनी अर्पण केला नसता. मुळ रुपाला धक्का न लावता त्याचा बनावट कथा प्रसवत त्याचा अर्थच बदलून टाकायची वैदिकांची कला मात्र अचाट आहे. देव-असूर सांस्कृतीक (कथात्मक) संघर्षात असूर महामानवांना बदनाम करण्यासाठी अशा भाकडकथा रचण्यात आल्या हे उघड आहे. भारतात सोळा हजार राजकन्या कैदेत ठेवायच्या तर तेवढे उपवर मुली असणारे राजे तरी हवेत कि नकोत? या कथेने नरकासुराला तर बदनाम केलेच पण कृष्णालाही बदनाम केले गेले. कांचा इलय्या नामक बहुजन विचारवंत (?) कृष्णाला “रंडीबाज” म्हणतो ते या कथेच्या आधारावर. मुळात ही कथा का निर्माण झाली हे समजावून घ्यायला हवे. कृष्ण वैदिक नव्हता, असुही शकत नव्हता कारण त्याचा काळ वेदपुर्व असल्याचे संकेत खुद्द महाभारतात मिळतात. हे वास्तव समजावून घेतले कि अशा भाकडकथांचा उलगडा होतो. जनसामान्यांत नरकासूर अप्रिय नव्हता हे त्याच्या नांवाचाच सण आहे हे वास्तव लक्षात घेतले कि सांस्कृतीक पेच पडत नाहीत.

थोडक्यात मित्रांनो, हा यक्षरात्री उत्सव आहे…त्यांच्या स्वागतासाठीचा, वैभवप्राप्तीच्या प्रार्थनांचा दीपोत्सव आहे. मी तरी लक्ष्मीपूजन न करता कुबेरपुजनच करत असतो. कारण तोच खरा सांस्कृतीक मुलाधार आहे. असूर संस्कृती व त्याचीच उपसंस्कृती म्हणजे यक्ष संस्कृती हे लक्षात घेतले पाहिजे. वैदिक सांस्कृतीक आक्रमणाला थारा देण्यात अर्थ नाही. खरे तर बळीप्रतिपदेस महात्मा बळीची भव्य मिरवणुक काढावी… (आजकाल ती प्रथा अनेकांनी सुरू केली आहे, त्यांचे अभिनंदन!) तेच खरे आपल्या एका महान पुर्वजाला अभिवादन!

यक्षरात्रीच्या सर्वांना मन:पुर्वक शुभेच्छा!

लेखक – संजय सोनवणी

पुणे

‘झी युवा वरील अंजली मालिकेचा धम्माल शतकोत्सव!!

0

‘नवे पर्व युवा सर्व’ म्हणत तरुणांच्या मनात राज्य करायला आलेली युथफूल वाहिनी “झी युवा” ही महाराष्ट्रातील तरुण मुलं मुली आणि त्यांची आवड लक्षात घेऊनच झी नेटवर्क ने लाँच केली होती. झी युवा या वाहिनीला हल्लीच १ वर्ष पूर्ण झाले आहे आणि या वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘अंजली ‘ चे १०० एपिसोड नुकतेच पूर्ण झाले. हॉस्पिटलच्या भावविश्वावर प्रकाशझोत टाकणाऱ्या “अंजली “या मालिकेच्या प्रेमात अख्खी तरुणाई पडली आहे. या मालिकेतील कलाकार सुरुची अडारकर, पियुष रानडे , हर्षद अतकरी , राजन भिसे , रेशम श्रीवर्धनकर , अभिषेक गावकर , भक्ती देसाई , उमा सरदेशमुख , योगेश सोमण , मीना सोनावणे , उमेश ठाकूर , संकेत देव , अर्चना दाणी या सर्वांनाच प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलंय .

 

एखादी मालिका जेव्हा तिचे १०० भाग यशस्वी रित्या पूर्ण करते याचाच अर्थ प्रेक्षकांनी या मालिकेला पसंतीची पावती दिलेली असते . सुरुची अडारकर म्हणजेच अंजली क्षीरसागर ही नाशिक  जवळच्या एका लहान गावातून आलेली एक स्वाभिमानी तरुण मुलगी .अतिशय साधी , हुशार आणि  प्रेमळ असलेली अंजली सर्वांची अतिशय लाडकी  आहे .  तिला कोणालाही दुखवायला आवडत नाही. डॉक्टर बनण्यामागे तिची दोन मुख्य कारणे आहेत ती म्हणजे वडिलांचे स्वप्न पूर्ण करणे आणि ज्या ठिकाणी रुग्णालये बांधली जाऊ शकत नाहीत  तिथल्या लोकांवर उपचार करण्यासाठी “मोबाईल रुग्णालय” सुरु करणे . ही स्वप्ने उराशी बाळगून घेऊन ती शहरात शिकायला  येते . अतिशय नावाजलेले असे डॉ. जनार्दन खानापुरकर (राजन भिसे) यांच्या हॉस्पिटल मध्ये ती  इंटर्नशिप करायला सुरुवात करते .  तिच्याबरोबर अनुराधा आणि ओंकार हे दोघे सुद्धा इंटर्न म्हणून रुजू होतात. याच हॉस्पिटल मध्ये  जनार्दन खानापूरकर यांचा हुशार आणि निष्णात सर्जन असेलेला मुलगा  डॉ. यशस्वी खानापूरकर म्हणजेच हर्षद अतकरी अमेरिकेतून उच्च शिक्षण घेऊन हॉस्पिटलचा कार्यभार हाताळत असतो. अतिशय हुशार डॉक्टर असूनही त्याची वृत्ती ही रुग्णांच्या काळजीपेक्षा व्यवहारी जास्त असते. त्याला भारतातील अतिशय प्रगत आणि तंत्रज्ञानाने समृद्ध असे हॉस्पिटल बनवायचे असते. आणि अगदी बरोबर उलट डॉ. असिम म्हणजेच पियुष रानडे हा गावोगावी फिरून गरीब रुग्णाची सेवा करत आहे. सध्या अंजली आणि पियुष यांच्या एकमेकांवरील अव्यक्त प्रेमाचा प्लॉट मालिकेत सुरु असून त्यालाही प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. अंजलीची तत्वे आणि यशस्वी ची स्वप्न यात नेमका कोणाचा विजय होईल हे सांगणारी ही मालिका आहे. हॉस्पिटलच्या भावविश्वावर प्रकाशझोत टाकणारी अंजली ही मराठीतील पहिलीच मालिका आहे. अंजली कश्या प्रकारे या हॉस्पिटल मध्ये तिची इंटर्नशिप ते डॉक्टर बनण्याचा  प्रवास करते आणि त्यात काय काय गोष्टी घडतात हे पाहणे एक वेगळाच अनुभव देईल . झी युवावर  सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता ही मालिका पहायला मिळेल .