Home Blog Page 3211

‘अपसाऊथ’ पुण्यातील पाचवे आऊटलेट पुणे एअरपोर्ट येथे सुरु

0

पुणे : पुणेकरांच्या आनंदात भर घालण्यासाठी अपसाऊथ या दक्षिण भारतीय क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट (क्यूएसआर) ब्रँडने पुण्यातील आपले पाचवे आऊटलेट लोहगावमधील पुणे एअरपोर्ट येथे सुरु केले आहे. आठवड्यातील सर्व दिवस चोवीस तास सुरु राहणाऱ्या या आऊटलेटचे उद्घाटन एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया’(एएआय)चे (पुणे) संचालक अशोक कुमार यांच्या हस्ते, एएआयचे कमर्शियल विभागाचे सह सरव्यवस्थापक के. श्रीनिवास यांच्यासमवेत व अनेक प्रतिष्ठित पाहुण्यांच्या उपस्थितीत आज येथे झाले.

 अपसाऊथ रेस्टॉरंटमध्ये अस्सल, चविष्ट खाद्यपदार्थ वेगवान सेवेसह आरोग्यपूर्ण वातावरणात दिले जातात आणि ते तयार होताना आपण बघूही शकतो. हे रेस्टॉरंट पदार्थ स्वतः घेण्याच्या (सेल्फ-सर्व्हिस) व ते बसून खाता येईल (सीट डाऊन) या प्रकारातील आहे. हे असे आदर्श ठिकाण आहे, जेथे विद्यार्थ्यांना पदार्थांचा आस्वाद झटपट घेता येईल, कुटूंबांना तोच आस्वाद शांतपणे बसून अनुभवता येईल आणि आपल्या गंतव्य स्थळी जाण्याची गडबड असणारे नोकरदार, विमानतळावर ये-जा करणारे लोक व प्रवाशांना येथे अगदी वेगाने सेवा मिळेल. अपसाऊथ रेस्टॉरंट वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार पदार्थ अगदी किफायती दरांत पुरवते. त्यांच्या मेनूमध्ये अत्यंत लोकप्रिय व जगभरात प्रसिद्ध झालेले अनेक पर्याय समाविष्ट आहेत. इडली व डोशांचे विविध प्रकार, मेदूवडा, उत्थप्पा, चटण्या व सांबार, फिल्टर कॉफी, पड्डू, मलबारी परोठा, दक्षिण भारतीय पदार्थांचे एकत्रीकरण (कॉम्बो), भोजन असे प्रकार येथे मिळतातच, शिवाय उथली, मलबारी परोठा सँडविच व साबुदाणा चीज वडा असे खास पदार्थ आणि उथली, अपसाऊथ बर्स्ट, मार्गारिटा, टोमॅटिनो असे अभिनव पदार्थ याबरोबरच काही लोकप्रिय उत्तर भारतीय पदार्थही येथे उपलब्ध आहेत. या पदार्थांच्या किंमती स्पर्धात्मक असून प्रतिव्यक्ती सरासरी खर्च केवळ ८० ते ९० रुपयांच्या घरात जातो. येथील पदार्थ पैशाचे पुरेपूर मूल्य देणारे आणि सर्वोत्तम दर्जाचे आहेत.

 अपसाऊथ हा क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट (क्यूएसआर) हा भारतातील एक आघाडीची दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ, आतिथ्य साखळी असलेल्या बिलियनस्माईल्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडचा असून अपसाऊथखेरीज बॉनसाऊथ, साऊथइंडीज, अपसाऊथ एक्स्प्रेस हेही नामांकित ब्रँड्स त्यांच्या मालकीचे आहेत.

 दक्षिण भारतीय शाकाहारी खाद्यपदार्थ आधुनिक व तत्पर फॉरमॅटमध्ये, तसेच उत्पादन व सेवेचा अत्यंत उच्च दर्जा राखून कमीतकमी वाजवी किंमतीत व सर्वाधिक आरोग्यपूर्ण वातावरणात देण्यासाठी अपसाऊथ कटिबद्ध आहे. बड्या इंटरनॅशनल रेस्टॉरंट साखळींमध्ये जसे उच्च प्रक्रियाकृत पदार्थ औद्योगिक स्तरावर तयार केले जातात, तसे अपसाऊथमध्ये नसते. येथील पदार्थ ताज्या घटकांपासून बनवले जातात.

 पाश्चिमात्य देशांत प्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या खाण्यातून पुढे स्थूलतेची प्रचंड मोठी समस्या आढळून येत आहे. या समस्येवर ताज्या घटकांपासून बनवलेले भारतीय पारंपरिक खाद्यपदार्थ उत्तम उपाय ठरतो. चविष्ट, परिपूर्ण असे दक्षिण भारतीय शाकाहारी खाणे पोटाला पचायलाही हलके असते.

 यासंदर्भात अपसाऊथचे कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह शेफ मनू नायर म्हणाले, की काळाशी सुसंगती राखून अपसाऊथने दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांच्या अनुभवाची नवी व्याख्या केली असून त्याला उत्साही आणि समकालीन रुप मिळवून दिले आहे. आम्ही आरोग्यपूर्ण, चविष्ट, ताजे आणि पोटभरीचे दक्षिण भारतीय शाकाहारी खाद्यपदार्थ आधुनिक अशा फॉरमॅटमध्ये सादर केले आहेत.

 अपसाऊथने विस्ताराची आकर्षक योजना आखली असून त्याअंतर्गत पुणे शहरात चालू वर्षअखेरपर्यंत आणखी अनेक आऊटलेट्स उघडली जाणार आहेत.

 अपसाऊथमध्ये आम्ही नेहमीच ग्राहकांसाठी उच्च पातळीच्या वातावरणासह सोय, किफायत व दर्जा निर्माण करण्यासाठी परिश्रम घेतो. दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ हे सर्वाधिक लोकप्रिय भारतीय खाद्यपदार्थांपैकी असून दिवसभरात कोणत्याही वेळी खाण्यासाठी सुयोग्य उत्पादन ठरतात. न्याहारीपासून ते माध्यान्ह भोजन, सायंकालीन स्नॅक्स व रात्रीभोजनापर्यंत प्रत्येक खाण्यात त्याचा वापर होतो. त्यामुळेच अपसाऊथला एक यशस्वी क्यूएसआर फॉरमॅट देशभर उभारण्याची मोठी संधी आहे, अशी प्रतिक्रिया बिलियनस्माईल्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष कुमार गौरव यांनी व्यक्त केली आहे.

अभ्यासक्रमाच्या माध्यमातून समुपदेशकांची उणीव भरून काढण्याचे काम: डॉ भारत देसाई

0

कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन अभ्यासक्रमाचा पदवीदान समारंभ संपन्न

 

पुणे-मानसिक आरोग्याबाबत समाजाची मानसिकता बदलणे जरी अवघड असले तरी बदलत्या युगात मानसिक आरोगयाची व्याख्या व व्याप्ती मात्र बदलत चालली असून कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन अभ्यासक्रमाच्या माध्यमातून समुपदेशकांची उणीव भरून काढण्याचे काम सुरु असल्याचे सांगत सध्य परिस्थितीत विविध समस्यांवर उपाययोजना म्हणून विविध क्षेत्रांमध्ये समुपदेशकांच्या नेमणुकांची आवश्यकता असल्याचे मत गरवारे महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाचे माजी प्रमुख व ज्येष्ठ मानसशात्रज्ञ डॉ भरत देसाई यांनी व्यक्त केले.

कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन अभ्यासक्रमाचा पदवीदान समारंभ व येरवडा मनोरुग्नालयाचे अधीक्षक डॉ भालचंद्र डोंगलीकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित विशेष समारंभामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी संस्थेचे चेअरमन सदानंद देशपांडे, संशोधन विभाग प्रमुख डॉ महेश ठाकूर व समुपदेशन विभागाचे समन्वयक प्रा चेतन दिवाण यांची प्रमुख उपस्थिती होती तर संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर हे अध्यक्षस्थानी होते.

चेअरमन सदानंद देशपांडे यांनी संस्थेच्या माध्यमातून समुपदेशन क्षेत्रामध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्याना शुभेच्छा देत डॉ डोंगलीकर यांच्या मानसिक आरोग्य क्षेत्रामधीलकार्याचा गौरव केला व त्यांनी निवृत्तीनंतर मानसिक आरोग्य क्षेत्राशी निगडीत समस्यांवर काम चालू ठेऊन नवीन पिढीला मार्गदर्शन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

डॉ डोंगलीकर यांनी आपण शासनाचे प्रतिनिधी म्हनून काम करीत असताना आलेल्या मर्यादांचा उल्लेख करीत सेवानिवृत्तीनंतरच्या इथून पुढील काळात आपण चाकोरीपलीकडे जाऊन काम करण्यासाठी स्वतंत्र झालो असल्याची भावना व्यक्त केली.

डॉ महेश ठाकूर व प्रा चेतन दिवाण यांनी कर्वे संस्थेच्या माध्यमातून ज्ञान घेऊन बाहेर पडत असलेल्या विद्यार्थ्यांनी समाजास्ठी भरीव काम करण्यास हातभार लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

डॉ वलोकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी समुपदेशन अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विकसित झालेली आपली गुण-कौशल्ये हि विद्यार्थ्यांनी पूर्ण ताकतीने वापरून स्वत:च्या तसेच समाजाच्या विकासासाठी त्याचा पुरेपूर वापर करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

दरम्यान, येरवडा मनोरुग्नालयाचे अधीक्षक डॉ भालचंद्र डोंगलीकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त तसेच डॉ महेश ठाकूर यांचा पी.एच डी पदवी प्राप्त केल्यानिमित्त कर्वे समाज सेवा संस्थेचे चेअरमन सदानंद देशपांडे व मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिला सईद व रमण दळवी यांनी केले तर आभार स्नेहल आहेर यांनी मानले.

एकविसाव्या शतकात वैश्‍विक एकतेची भावना प्रबळ व्हावी – दलाई लामा

0
पुणे
: “धर्म हा आपला खासगी विषय आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांशी माणुस या नात्याने समान पातळीवर संवाद साधून सलोखा निर्माण केला पाहिजे. एकविसाव्या शतकात चांगल्या समाजाची निर्मिती करायची असेल, तर जगभर मानवतावाद रुजवला पाहिजे,” असे प्रतिपादन अध्यात्मिक गुरु दलाई लामा यांनी केले.
एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय दुसर्‍या नॅशनल टीचर्स काँग्रेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. चंद्रकांत पांडव,एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. नंदकुमार निकम, महासचिव डॉ. सुधाकर जाधवर, एमआयटी आर्ट, डिझाईन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. मंगेश तु. कराड, डॉ. जय गोरे, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलसचिव प्रा. दीपक आपटे, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे अधिष्ठाता प्रा. डॉ. रविकुमार चिटणीस, राज्याचे शिक्षण संचालक धनराज माने, प्रा. शरदचंद्र दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू), भारतीय छात्र संसद फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघ, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), युनेस्को अध्यासन आणि असोसिएशन ऑफ इंडियन कॉलेज प्रिन्सिपॉल्स फेडरेशन या संस्थांच्या सहकार्याने ही नॅशनल टीचर्स काँग्रेस आयोजित करण्यात आली आहेे.
 आयआयटी थिन फिल्म लॅबोरेटरीचे संस्थापक समन्वयक प्रा. कस्तुरीलाल चोप्रा, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर, आयआयटी मुंबईचे माजी सहसंचालक प्रा. एस. सी. सहस्त्रबुद्धे व आयआयटी कानपूरचे माजी संचालक डॉ. संजय धांडे यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, शाल, स्मृती चिन्ह व ज्ञानेश्‍वर माऊलीची प्रतिमा असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
दलाई लामा म्हणाले, “आपापसांतील संवादातून विचारांची देवाण घेवाण होते. समाजात शांतता प्रस्थापित होते. पुरातन काळातील भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये नैतिक मूल्यांची शिकवण आहे. आजची शिक्षणपद्धती फक्त तंत्रज्ञानावर आधारित असली, परंतू यामध्ये संवाद फार महत्वाचा आहे. शिक्षण पद्धतीत भावनिक प्रश्‍नांतून मार्ग कसा काढायचा, याचा समावेश व्हायला हवा. आधुनिक शिक्षण, तंत्रज्ञान, पुरातन शिक्षण आणि भावना यांची सांगड घालण्याची क्षमता केवळ भारताकडे आहे. गुरुकुल शिक्षणपद्धतीत शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील संवाद आणि शिकण्या-शिकविण्याची प्रथा अधिक चांगली होती. टीचर्स काँग्रेसच्या माध्यमातून शिक्षकांच्या दृष्टीकोनाचे आदान प्रदान होईल. त्यातून शिक्षणव्यवस्थेचे सक्षमीकरण तर होईलच; शिवाय, शासनालासुद्धा एक प्रकारची दिशा मिळेल.”
“धर्म वेगवेगळे असले, तरी प्रत्येक धर्माची शिकवण एकच आहे. प्रेम, सहिष्णुता आणि दयाभाव याची शिकवण प्रत्येक धर्माने दिली आहे. परंतु, धार्माबद्दलच्या चुकीच्या समजुतीमुळे आज द्वेष आणि तिरस्काराची भावना नागरिकांमध्ये रुजली आहे. जगभरातील विविध देशांत धार्मिकतेवरुन वाद उद्भवत आहेत. अशावेळी शिक्षकांची भूमिका महत्वाची असून, त्यांनी शिक्षणातून मानवतावाद आणि आपण सर्व मानव एक आहोत, ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवायला हवी. सहिष्णुता, प्रेम याचा प्रसार जनमानसात करायला हवा. पैसा आणि प्रसिद्धी यापलिकडे जाऊन आजच्या शिक्षणपद्धतीने नैतिक मूल्ये, प्रामाणिकपणा, सत्य आणि सद्भाव शिकविला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण केला पाहिजे. आपली शिक्षणपद्धती सक्षम करण्यासाठी प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात करुन योगदान दिले पाहिजे.”
डॉ. अनिल काकोडकर म्हणाले,“ आपण आज ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आहोत. त्यामुळे पारंपरिक शिक्षणपद्धतीमध्ये बदल व्हायला हवेत. संशोधनात्मक शिक्षण देण्यावर भर द्यायला हवा. टेक्नोसॅव्ही पिढी ज्या वेगावे धावते आहे, त्या वेगाने त्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी नवे तंत्र अंगिकारले पाहिजे. जागतिक स्तरावर शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या बदलांची देवाणघेवाण झाली आणि शिक्षण व औद्योगिक क्षेत्र एकत्रित आले, तर राष्ट्रउभारणीचा वेगही वाढेल. त्यासाठी संशोधनात्मक शिक्षणपद्धतीचे वातावरण तयार केले पाहिजे.”
मुक्ता टिळक म्हणाल्या,“देशाच्या विकासाचा आधारस्तंभ तरुण पिढीला घडविणार्‍या शिक्षकांसाठी हे अतिशय महत्वाचे व्यासपीठ आहे. प्राथमिक व उच्च शिक्षणात येणार्‍या विविध अडचणी या व्यासपीठावर मांडता येतील. त्यातून त्या सोडविण्यासाठी शासकीय पातळीवरसुद्धा प्रयत्न होतील. टीचर्स काँग्रेसमध्ये मार्गदर्शन करणार्‍या तज्ज्ञ मान्यवरांकडून नव्या गोष्टी आत्मसात करून आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंद कराव्यात.”
प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड म्हणाले, “ज्ञानदानाचे काम करीत असलेल्या देशभरातील शिक्षकांना एकत्रित आणून त्यांच्यामध्ये विचारमंथन घडविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम चालू केला आहे. शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा होऊन भावी पिढी घडविणार्‍या या शिक्षकांना नवी दिशा मिळेल. शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या गुरुजनांचा सन्मान करुन तरुण शिक्षकांसमोर आदर्श निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “मूल्याधिष्ठित वैश्‍विक शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्याची आज वेळ आली आहे. त्यातूनच सर्व जगात शांतता निर्माण होण्यास मदत होईल. आता संपूर्ण जगभरातले विचारवंत याच निष्कर्षाला येऊ लागले आहेत. ”
डॉ. अरुण निगवेकर म्हणाले, प्रत्येक बालकाचा शिक्षण हा मूलभूत हक्क आहे. डॉ. संजय धांडे,  डॉ. कस्तुरीलाल चोप्रा, प्रा. एस. सी. सहस्त्रबुद्धे यांनी आधुनिक शिक्षण पद्धति बरोबरच भारतीय पारंपारिक शिक्षण पद्धतिचाही अंगीकार करावा असे विचार प्रकट केले.  प्रा. डॉ. रविकुमार चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. नंदकुमार निकम यांनी आभार मानले.

पडद्यावर घडणार ‘बारायण’

0

निखळ कौटुंबिक मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देणारा बारायणहा मराठी चित्रपट येत्या शुक्रवारी (१२ जानेवारी)  प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दैवता पाटील यांच्या ‘ओंजळ आर्टस् प्रॉडक्शन्सची निर्मिती आणि दीपक पाटील यांचे दिग्दर्शन असलेल्या बारायणची प्रस्तुति शायना एन.सी. यांनी केली आहे. दिग्दर्शक दीपक पाटील यांचा हा पहिला मराठी चित्रपट असून त्यांनी यापूर्वी विविध हिंदी, मराठी दुरचित्रवाहिन्यासाठी प्रोमो हेड म्हणून काम केलेले आहे.

 अलीकडे मुलांच्या शिक्षणाबाबत पालक अधिक सजग झाले आहेत. गुणांच्या टक्केवारीच्या स्पर्धेत आपला पाल्य कुठेही मागे राहता कामा नये अशी त्यांची भूमिका असते, मग विद्यार्थी इयत्ता आठवी मध्ये गेले की त्यांना तुझं आता 12 वी वर्ष जवळ आलं आहे याची सतत जाणीव करून दिली जाते, मग विद्यार्थी 12 वी मध्ये गेले की घराघरात बारायणसूरू होते. यावर अतिशय खुमासदार शैलीत दिग्दर्शक दीपक पाटील यांनी भाष्य केले आहे.

 ‘बारायणया  चित्रपटात अभिनेता अनुराग वरळीकर मुख्य भूमिकेत आहे. तर बाबांच्या भूमिकेत अभिनेते नंदू माधव, आईच्या भूमिकेत अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, आत्याच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते दिसणार आहेत. याशिवाय अभिनेते संजय मोने, ओम भुतकर, रोहन गुजर, उदय सबनीस, प्रसाद पंडित, समीर चौगुले, श्रीकांत यादव, कुशल बद्रिके, प्रभाकर मोरे तसेच अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि निपुण धर्माधिकारी या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. अतिशय हटके पध्दतीने मनोरंजन करणाऱ्याबारायणची कथा, दिग्दर्शक दिपक पाटील यांची असून पटकथासंवाद निलेश उपाध्ये यांचे आहेत. सिनेमाचे छायाचित्रण मर्ज़ी पगडीवाला यांनी केले आहेगीतकार वलय, गुरु ठाकूर, क्षितिज पटवर्धन यांच्या गीतांना संगीतकार पंकज पडघन यांचे संगीत लाभले आहे. तर आशिष झा यांनी चित्रपटाला पार्श्वसंगीत दिले आहे.

महावितरणच्या प्रादेशिक नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडलाचे ‘मेकअप’ अव्वल

0

पुणे : महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडळाचे ‘मेकअप 1986’ हे नाटक सर्वोत्कृष्ट ठरले. तर कोल्हापूर परिमंडलाचे ‘ओय लेले’ या नाटकला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

येथील भरत नाट्यमंदिरात रविवारी (दि. 7) दोन दिवसीय नाट्यस्पर्धेचा समारोप झाला. महावितरणचे मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे (पुणे), श्री. नागनाथ इरवाडकर (बारामती) व श्री. किशोर परदेशी (कोल्हापूर) यांच्याहस्ते नाट्यस्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर परिक्षक सौ. मेधा गोखले, श्री. भालचंद्र पानसे, श्री. दिलीप जोगळेकर तसेच अधीक्षक अभियंता श्री. महेंद्र दिवाकर व श्री. राजेंद्र पवार, श्री. हेमंत नगरकर यांची उपस्थिती होती.

पुणे परिमंडलाने श्रीरंग गोडबोले लिखित ‘मेकअप 1986’ हे नाटक सादर केले. मानवी नात्यांचा उत्कंठावर्धक नाट्यातून वेध घेणार्‍या सादरीकरणाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. श्री. हेमंत नगरकर दिग्दर्शित या नाटकामध्ये सौ. अपर्णा मानकीकर, श्री. संतोष गहेरवार, श्री. विवेक शेळके, श्री. सचिन निकम, श्री. उदय लाड, श्री. प्रदीप मुजुमदार आदी प्रमुख भूमिकेत होते. बारामती परिमंडलाने श्री. रामचंद्ग खाटमोडे व श्री. विनोद वणवे लिखित ‘गाभारा’ हे नाटक सादर केले. अतिशय ह्रदयस्पर्शी नाटकाने सरोगेट मदर विषयावरील वास्तव समोर ठेवले व त्यास नाट्यरसिकांनीही दाद दिली. श्री. श्रीकृष्ण वायदंडे दिग्दर्शित या नाटकात श्री. दत्तात्रय चव्हाण, श्री. विलास काळे, श्री. राम चव्हाण, श्री. बाबासाहेब झगडे, कु. शुभांगी बारसे, कु. रेश्मा इंगोले, सौ. सारिका जाधव, कु. मोनिका पितळे, कु. प्राजक्ता घाडगे आदी कलावंतांनी भूमिका केल्या.

कोल्हापूर परिमंडलाने श्री. दिपेश सावंत लिखित ‘ओय लेले’ ही नाट्यकृती सादर केली. श्री. राजेंद्ग जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकातील प्रसंगांनी नाट्यरसिकांना हेलावून सोडले. ‘ऑनलाईन खरेदी व विक्री’च्या वेडातून थेट नातेसंबंधांचा व्यवहार अन्‌ त्यातील अगतिकता या विषयाला श्री. राजेंद्ग जाधव, सौ. माधुरी गोसावी, श्री. सचिन माने, श्री. सोनाली बेंद्रे, श्री. संदीप मुळे आदी कलावंतांनी अभिनयाद्वारे कथानकाला योग्य न्याय दिला.

नाट्यस्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून पुणे परिमंडलाच्या ‘मेकअप 1986’ या नाटकाला परीक्षकांनी कौल दिला तर कोल्हापूर परिमंडलाच्या ‘ओय लेले’ या नाट्यकृतीला द्वितीय क्रमांक मिळाला. यासोबतच दिग्दर्शन – श्री. हेमंत नगरकर (पुणे), अभिनय (स्त्री) – सौ. अपर्णा माणकीकर (पुणे), अभिनय (पुरुष) – श्री. विवेक शेळके (पुणे), नेपथ्य – श्री. राजीव पुणेकर (पुणे), प्रकाशयोजना – श्री. सुनील शिंदे (कोल्हापूर), पार्श्वसंगीत – श्री. स्वप्नील काटकर (कोल्हापूर), वेषभुषा – सौ. सुप्रिया पुंडले, रंगभुषा- सौ. शैलजा सानप यांना प्रथम क्रमाकांचे पारितोषिक मिळाले. तर अभिनयाच्या उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी श्री. संतोष गहेरवार (पुणे), श्री. राम चव्हाण (बारामती), कु. प्राजक्ता घाडगे (बारामती) व कु. रेश्मा इंगोले (बारामती) यांची निवड करण्यात आली. बारामती येथे फेब्रुवारीमध्ये होणार्‍या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुण्याचे ‘मेकअप 1986’ हे नाटक पुणे प्रादेशिक विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

समारोपीय कार्यक्रमापूर्वी महावितरणच्याच कलावंतांनी संगीत रजनीचा कार्यक्रम सादर केला. यावेळी मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे, श्री. विकास निकम, श्री. अजित पानसे, सौ. अपर्णा माणकीकर, श्री. विवेक शेळके, श्री. संतोष गहेरवार यांनी मराठी व हिंदी गीत सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विकास निकम यांनी केले तर श्री. हेमंत नगरकर यांनी आभार मानले.

यूसीमास, पुणे तर्फे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन – १५२० हून अधिक विद्यार्थींचा सहभाग

0
पुणे- विभागातील युनिव्हर्सल कन्सेप्ट मेंटल अरथमॅटिक सिस्टम (यूसीमास) तर्फे राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, अंकगणिताची ही स्पर्धा बालेवाडी येथे नुकतीच संप्पन झाली. ह्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रतील ८२ केंद्रामधील १५२० विद्यार्थी ह्यामध्ये सहभागी झाले होते. ह्यामध्ये लहान मुले गणितातील  कठीण अश्या २००  समस्या (सम्स) आठ मिनटांत सोडवू शकतात, जी ते कॅल्क्युलेटरपेक्षा जास्त वेगाने करतात.
ह्यावेळी पुण्यातील जवळपास १००० लहान मुले आपल्या पालकांबरोबर या स्पर्धेसाठी उपस्थित होती. ज्यामध्ये बिशप्स, सेंट विंन्सट्स, व्ही.के.पाटील, दस्तूर, पोतदार इंटरनॅशनल आदि शाळांचा समावेश होता.
या प्रतियोगीतेचा उद्देश फक्त अंकगणितच नाही तर हा एक संपूर्ण-मस्तिष्क विकास  कार्यक्रम आहे.यूसीमासच्या संचालक रश्मी इंदुलकर म्हणाल्या कि, येथे शाळा, अभ्यासक्रम आणि शिकवण पूरक  मुलांमध्ये स्पर्धात्मक भावना विकसित केली जाते आणि त्यांना उत्कृष्ट कामगिरी करण्यास प्रवृत्त कले जाते.यावर्षीच्या कार्यक्रमात अद्भुत ‘फ्लॅश कॉम्पिटिटिशन’ होती. ज्यामध्ये मुले संख्या पाहून जलद उत्तरे, गणना  करत होती आणि त्यांना कागदावर लिहत होती.
विमान नगर केंद्राचे प्रमुख बिन्सी थॉमस म्हणाले की केंद्रामध्ये स्पर्धेची तयारी एक महिना अगोदरच सुरू होती आणि विद्यार्थी ह्यामध्ये नित्य-नियमापेक्षा जास्त वेळ देत होते. पुढे ते म्हणाले कि, दैनिक अभ्यास केला तर मुले उच्च कौशल्य पातळी गाठतात, त्यांची गती आणि अचूकता वाढते आणि शालेय शिक्षणात मुलांची कामगिरी देखील तीव्रपणे सुधरते.
शालेय गटांतील प्रथम तीन विजेते होते वि.खे पाटील, हचिंग्स, सेंट.मेरिअर्स. पीएमसी आयुक्त कुणाल कुमार ह्यावेळी पालकांच्या रूपात उपस्थित होते ह्यावेळी त्यांनी मुले आणि पालकांंना संबोधित केले होते. इतर मान्यवरांमध्ये  के.व्ही देहू रोडचे प्रिन्सिपल मिश्रा, चॅलेंजर्स स्कूलचे प्राचार्य गडकरी, पी.के इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक काटे उपस्थित होते.

 

‘ओढ’ चित्रपटगृहात

0

आपल्या जिवलग मित्रासाठी काहीही करायला तयार असणा-या मित्रांना आपण चित्रपटांमध्ये पाहिले आहे. मैत्रीच्या नात्याचे अनेक पैलू आहेत. मैत्रीचे पैलू उलगडून दाखवताना त्याचे वेगळे रूप दर्शवणारा ओढ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोनाली एन्टरटेन्मेंट हाऊसची प्रस्तुती तसेच एस. आर. तोवर यांची निर्मिती असलेल्या ओढ’  चे दिग्दर्शन नागेश दरक व एस. आर. तोवर यांनी केले आहे. १९ जानेवारीला हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होणार आहे.

गणेश व दिव्या यांच्यातील निखळ मैत्रीची कथा ओढ चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या दोघांच्या मैत्रीचं भावविश्व  त्यातली त्यांची ओढाताण दाखवताना एका घटनेनंतर गणेश व दिव्याची मैत्री कोणतं वळण घेते याची रंजक कथा म्हणजे ओढ’ मैत्रीतील अव्यक्त भावना हा चित्रपट. मोहन जोशीभाऊ कदमभारत गणेशपुरेशशिकांत केरकर,  जयवंत भालेकरराहुल चिटनाळेआदित्य आळणे,  सचिन चौबे,  शीतल गायकवाडतेजस्विनी खताळ,मृणाल कुलकर्णी आदि कलाकारांसोबत  गणेश तोवर आणि उल्का गुप्ता ही नवी जोडी या चित्रपटातून आपल्या समोर येणार आहे. मालिकेत राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारणारी उल्का ओढ’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटांकडे वळली आहे.

संजाली रोडे कौतुक शिरोडकरअभय इनामदारकुकू प्रभास यांनी यातील चार वेगवेगळ्या जॅानरची गाणी लिहिली आहेत. आदर्श शिंदेवैशाली माडेस्वप्नील बांदोडकरनेहा राजपाल,रोहित राऊतआनंदी जोशी व जावेद अली या गायकांनी ही गाणी गायली आहेत. संगीतकार प्रवीण कुवर यांचा संगीतसाज या गीतांना लाभला आहे. कथा व पटकथा दिनेश सिंग ठाकूर यांनी लिहिली असूनत्यांनीच गणेश कदम आणि दर्शन सराग यांच्यासोबत संवादलेखन केले आहे. या चित्रपटाचे  छायांकन रविकांत रेड्डी व संकलन समीर शेख यांनी केलेआहे. वेशभूषा सुनिता घोरावत तर रंगभूषा प्रदीप दादा, बंधु धुळप यांची आहे. कलादिग्दर्शक आरिफ खान आहेत.

१९ जानेवारीला ‘ओढ’ प्रदर्शित होणार आहे. 

‘इको क्विझ’मध्ये फर्ग्युसन, तर पथनाट्य स्पर्धेत एच. व्ही. देसाई महाविद्यालय विजयी

0
पुणे: किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या इको क्विझ आणि पथनाट्य स्पर्धेचे निकाल आज बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या सांगता समारंभात जाहीर करण्यात आले. इको क्विझ स्पर्धेत फर्ग्युसन महाविद्यालय तर पथनाट्य स्पर्धेत एच. व्ही. देसाई महाविद्यालयाला सांगता समारंभाचे अध्यक्ष आर. आर. देशपांडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
इको क्विझ स्पर्धेत सिम्बायोसिस सेंटर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पर्यावरण विभागाला अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाने गौरविण्यात आले.
डी ई एस लॉ कॉलेज मध्ये पार पडलेल्या पथनाट्य स्पर्धेत १० संघ सहभागी झाले होते. यात फर्ग्युसन महाविद्यालयाचा समाजशास्त्र विभाग आणि एस. पी. महाविद्यालय यांना अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाने गौरविण्यात आले.
कार्यक्रमात पुष्पक गोस्वामी आणि अनुज देवधर यांना छायाचित्र स्पर्धेतील ‘व्ह्यूअर्स चॉईस’ या गटातील पारितोषिक मिळाल्याचे जाहीर करण्यात आले.

एमबीबीएस परीक्षेत १४ सुवर्णपदके मिळवणाऱ्या डॉ. सुलतान शौकतअली यांचा सत्कार

0
पुणे :’भारत सरकारच्या केंद्रीय शिखर संस्थांमध्ये, विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकूण शिक्षणाच्या ९० टक्के खर्च होतो, मात्र तेथून शिकून बाहेर पडणारे विद्यार्थी देशाबाहेर कार्यरत राहण्यास पसंती देतात, त्याऐवजी त्यांनी देशात कार्यरत राहिले पाहिजे, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी देशात कार्यरत राहावे,’ असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ . वासुदेव गाडे यांनी आज केले .
महाराष्ट्र आयुर्विज्ञान विद्यापीठ (नासिक) ने २०१७ मध्ये घेतलेल्या एमबीबीएस परीक्षेत विविध विषयात १४ सुवर्णपदके मिळवणाऱ्या डॉ . सुलतान शौकतअली यांचा सत्कार आज पुण्यात झाला. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आझम कॅम्पस येथे मंगळवारी झालेल्या शानदार कार्यक्रमात सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . वासुदेव गाडे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार हे होते .
डॉ. सुलतान शौकतअली हे आझम कॅम्पसच्या एम ए रंगूनवाला टॅलेन्ट स्कीमचे माजी विद्यार्थी आहेत. आजच्या कार्य्रक्रमात त्यांना मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे म्हणाले, ‘देशाच्या विद्यार्थ्यांपैकी फक्त पाच टक्के विद्यार्थी केंद्राच्या शैक्षणिक शिखर संस्था आणि केंद्रीय विद्यापीठांमध्ये शिकतात, मात्र त्यांच्यावर शिक्षणाच्या एकूण निधीपैकी ९० टक्के निधी खर्च होतो. येथून शिकून बाहेर देशी जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. हे उच्च शिक्षित विद्यार्थी देशातच कार्यरत राहिले तर  हा खर्च सत्कारणी लागेल. अजूनही देशाच्या समस्या पूर्ण सुटलेल्या नाहीत, त्यामुळे उच्च शिक्षित विद्यार्थ्यांच्या योगदानाची देशाला गरज आहे. फक्त व्यावसायिक तज्ज्ञ (प्रोफेशनल्स) होण्यापेक्षा जबाबदार नागरिक होऊन योगदान देण्याची आजही गरज आहे. समाजाची सेवा करण्याचे उद्दिष्ट काही विद्यार्थ्यांनी ठरवून स्वतःसमोर ठेवायला हवे ‘
डॉ सुलतान शौकतअली  यांचा गौरव करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी फक्त स्वप्न पाहू नये, तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी. दिनचर्येला महत्व द्यावे आणि पालकांना समाधान वाटेल अशी कामगिरी करावी.’
डॉ पी ए इनामदार म्हणाले, ‘आझम कॅम्पसमध्ये गुणवान विद्यार्थ्यांना प्रगतीच्या सर्व संधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्याचा लाभ त्यांनी घेतला पाहिजे. खडतर परिश्रम करून यश मिळविण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांनी सुलतानच्या यशातून घेतली पाहिजे. परमेश्वराने सर्वांना कष्ट करायला समान वेळ दिला आहे, त्याचा उपयोग करून मोठे व्हावे आणि समाजऋण फेडावे ‘
सत्काराला उत्तर देताना डॉ शौकतअली म्हणाले ,’आझम कॅम्पस च्या टॅलेंट बॅच मधील विशेष मेहनत आणि प्रशिक्षणामुळे मला हे यश मिळू शकले . असाधारण यश मिळविण्यासाठी ,तितकीच असाधारण मेहनत करावी लागते, हे डॉ पी ए इनामदार यांचे वाक्य मी डोळ्यासमोर ठेवले होते. ‘
आबेदा इनामदार यांनी प्रास्ताविक केले . गफार शेख यांनी आभार मानले .
कार्यक्रमाला  डॉ शौकतअली यांचे पालक साबिया शौकतअली, मोईनुद्दीन शौकतअली, संस्थेचे पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक आयेशा शेख, परवीन शेख, कल्पना पाटील, तसनीम शेरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

नॅशनल टीचर्स काँग्रेसचे उद्घाटन आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांच्या हस्ते

0

पुणे : एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग), पुणे आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे आयोजित दुसर्‍या नॅशनल टीचर्स काँग्रेसचे उद्घाटन आध्यात्मिक गुरू श्री. दलाई लामा यांच्या हस्ते बुधवार, दि. १० जानेवारी २०१८ रोजी, सकाळी १०.०० वाजता होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.श्री. विनोद तावडे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दि.१० ते १२ जानेवारी २०१८ या दरम्यान एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठ, कोथरुड येथे ही दुसरी नॅशनल टीचर्स काँग्रेस होत आहे. ‘शिक्षकांना प्रेरित करुन सक्षम पिढी घडविणे’ हा या परिषदेच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.
उद्घाटन समारंभाचे वेळी शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल आयआयटीच्या थिन फिल्म लॅबोरेटरीचे संस्थापक समन्वयक आणि सल्लागार, पद्मश्री प्रा. कस्तुरीलाल चोप्रा, युजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. अरूण निगवेकर, मुंबईच्या आयआयटीचे माजी सहसंचालक प्रा.एस.सी.सहस्त्रबुध्दे व कानपूरच्या आयआयटीचे माजी संचालक व सुप्रसिध्द शिक्षणतज्ञ पद्मश्री डॉ.संजय धांडे यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू), भारतीय छात्र संसद फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघ व विश्‍वशांती केंद्र (आळंदी), पुणे, युनेस्को अध्यासन व असोसिएशन ऑफ इंडियन कॉलेज प्रिन्सिपॉल्स फेडरेशन या संस्थांच्या सहकार्यातून ही अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय परिषद प्रथमच होत आहे. देशभरातून व विदेशातून पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे ८,००० शिक्षक यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत.
उद्घाटन समारंभासाठी महापौर सौ. मुक्ता टिळक, प्रख्यात अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, एआयसीटीईचे चेअरमन डॉ. अनिल डी.सहस्त्रबुध्दे, तिबेट येथील सेंट्रल तिबेटियन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे अध्यक्ष डॉ. लोबसांग सांगे व एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेचा समारोप समारंभ दि. १२ जानेवारी २०१८ रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे. भारत सरकारच्या मानव संसाधन विकास खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.श्री. राजेश टोपे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, एशियन हेरिटेज फाऊंडेशनचे संस्थापक पद्मभूषण श्री. राजीव सेठी, एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, हार्वर्ड बिझनेस स्कूलचे डॉ. व्ही.जी.नारायणन, सुप्रसिध्द नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने हे या समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत.
भारत सरकारच्या यूपीएससीचे माजी चेअरमन श्री. डी.पी.अग्रवाल यांना यावेळी ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे.
उद्घाटन व समारोप यासह विविध विषयांवरील चर्चेसाठी सहा सत्रे ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये पहिले सत्र बुधवार, दि. १० जानेवारी २०१८ रोजी दुपारी २.३० वाजता ‘भारतातील उच्च शिक्षण : आढावा आणि भावी दिशा’ या विषयावर होणार आहे. यामध्ये डॉ. जय गोरे, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. रघुनाथ शेवगावकर, युनायटेड स्टेट इंडिया एज्युकेशनल फाउंडेशनचे प्रदेश प्रमुख श्री. रायन परेरा, प्रा.डॉ. मकरंद हस्तक, उटाह विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ माइन्स अ‍ॅण्ड अर्थ सायन्सेसचे अधिष्ठाता प्रा.डेरियल भट, डॉ.सय्यद कल्बे रशीद रिजवी हे सहभागी होणार आहेत.
दुसरे सत्र गुरूवार, दि. ११ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ९.३० वाजता होणार आहे. या सत्राचा विषय ‘ वैश्‍विक मूल्याधिष्ठित शिक्षण- विश्‍व शांतीचा पाया’ असा असेल. यामध्ये उत्तराखंड राज्याचे उच्च शिक्षण मंत्री डॉ. धन सिंग रावत, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. वरूण सहानी, प्रा.अनिरुध्द देशपांडे, डॉ. स्कॉट हॅरियट, निवृत्त न्या.एन.संतोष हेगडे, डॉ. के.ई. सीताराम, डॉ.लक्ष्मी सीताराम, जैन संत आचार्य लोकेश मुनी आदी सहभागी होणार आहेत.
तिसरे सत्र गुरुवार, दि. ११ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ११.१५ वाजता होणार आहे. ‘उच्च शिक्षणातील गुणवत्ता- सत्य आणि सामोपचार’ हा या सत्राचा विषय असेल. यामध्ये स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, बंगलोरच्या आयआयएमचे संचालक प्रा.जी. रघुराम, डॉ. जगन्नाथ पाटील, टीआयएसएसचे संचालक प्रा. एस.परशुरामन व हायर एज्युकेशन फोरमचे संस्थापक डॉ.ए.के.सेनगुप्ता मार्गदर्शन करणार आहेत.
चौथे सत्र गुरूवार, दि.११ जानेवारी २०१८ रोजी दुपारी २.००वाजता ‘उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाचा उपयोग-फायदे विरूद्ध अडथळे’ या विषयावर होणार आहे. या सत्रात कानपूर येथील आयआयटीचे माजी संचालक डॉ. संजय धांडे, नालंदा विश्‍वविद्यालयाचे कुलपति पद्मभूषण डॉ. विजय भटकर,
प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर, युएसच्या महर्षी युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंटचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अनिल माहेश्‍वरी व यूएस येथील बॉलस्टेट युनिव्हर्सिटीच्या मिलर कॉलेज ऑफ बिझनेसचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुशील शर्मा हे मार्गदर्शन करणार आहेत.
पाचवे सत्र शुक्रवार, दि. १२ जानेवारी २०१८ सकाळी ९.०० वाजता ‘शिक्षकांचे प्रशिक्षण’ या विषयावर होणार्‍या या सत्रात भारतरत्न डॉ.सी. एन. आर. राव, अ‍ॅमिटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पी.बी.शर्मा, प्रा. मायकेल जेन्सन, श्री. मनिष कुमार, प्रा. कृष्णा वेदुला, डॉ. आर.चॅडविक, व डॉ. नंदकिशोर कोंडप हे मार्गदर्शन करणार आहेत.
सहावे सत्र शुक्रवार, दि. १२ जानेवारी २०१८ रोजी सकाळी १०.४५ वाजता ‘शिक्षणाचे अर्थशास्त्र’ या विषयावर होणार आहे. डॉ. रोशनलाल रैना, यूजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश, डॉ. अनिल के. गुप्ता, प्रा. देवीसिंग, प्रा. जी.एस.मूर्ती व अतुल कोईराला हे या सत्रात मार्गदर्शन करणार आहेत.
या सहा विषयांवरील सत्रांसह ‘टीचर टू टीचर कनेक्ट’ ही दोन विशेष सत्रेही आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये शिक्षकांना आपल्या विचारांचे आदान-प्रदान करता येणार आहे.
आपल्या देशाला अनेक चांगल्या शिक्षकांची परंपरा आहे. त्यांनी आपल्या शिकविण्यातून प्रेम आणि आदर मिळविला. ध्येय, आदर्शवाद आणि निःस्वार्थी सेवा हीच त्यांची ओळख आहे. त्यातील अनेकांनी केवळ ज्ञान दिले नाही, तर मूल्ये आणि आदर्शांच्या सहाय्याने समाजाला एक दिशा दिली. अशाच राष्ट्रउभारणीच्या भावनेने भारलेल्या आणि केवळ शिक्षक म्हणून नाही, तर उत्तम संशोधक, संवेदनशील, समाजाभिमुख, प्रगतीशील, दिशादर्शक, प्रेरणादायी आणि तत्त्वनिष्ठ शिक्षकांची फळी निर्माण करण्याचे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.
अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष नॅशनल टीचर्स काँग्रेसचे प्रमुख निमंत्रक व एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. नंदकुमार निकम, महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे महासचिव डॉ. सुधाकरराव जाधवर, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा.डी.पी.आपटे व एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे अधिष्ठाता प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुण्यात तिसरे विश्‍व वेद विज्ञान संमेलन

0

पुणे – महाराष्ट्र सरकार, विज्ञान भारती, डेक्कन कॉलेज अभिममत विद्यापीठ आणि गोवा सरकारच्या वतीने तिसरे विश्‍व वेद विज्ञान संमेलन १० ते १३ जानेवारी या कालावधीत डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आले आहे.
वेद विज्ञान सृष्टी या प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवार, ता. १० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता करण्यात येणार आहे. शिक्षणविषयक सभेची सुरुवात दुपारी ११ वाजता करण्यात येणार असून शाखानिहाय चर्चा होणार आहेत. दुपारी ४ वाजता वेदिक विज्ञान व आधुनिक विज्ञान या कार्यक‘मात डॉ. विजय भटकर मार्गदर्शन करणार असून डॉ. विश्‍वनाथ कराड अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. संध्याकाळी ७ वाजता आनंदमुर्ती गुरू मा यांचे प्रवचन होणार आहे.
दुसर्‍या दिवशीच्या सत्रांचे उद्घाटन गुरुवारी सकाळी १० वाजता प्रा. वसंत शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी व स्वामी तेजोमनयानंद मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. विजय भटकर, जयंत सहस्त्रबुध्दे, सुरेश सोनी, प्रा. ए. पी. जामखेडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दुपारच्या सत्रांमध्ये शास्त्र व तत्वज्ञान, योगा, पुरातत्व, वेदा व इलेक्टॉनिक्स, कृषी व गोविज्ञान, मानव आणि समाज शास्त्र, कला व विज्ञान या विषयांची स्वतंत्र चर्चासत्रे होणार आहेत. वेद आणि शाश्‍वत विकास या विषयावर परिसंवाद होणार आहे.
शुक‘वारी ता. १२ जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता सूर्यनमस्कार सहपरिवार हा कार्यक‘म होणार असून, सकाळी साडेनऊ वाजता विज्ञानावर मनोराज्य करणारे विवेकानंद हे जयंत सहस्त्रबुध्दे यांचे व्या‘यान होणार आहे. दुपारच्या सत्रात योगा, वेदिक व्यवस्थापन, विज्ञान व तंत्रज्ञान, शारीरिक विज्ञान, सानाजिक शास्त्र आदी विषयांवरील चर्चासत्रे होणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता डॉ. सुभाष पालेकर यांचे नैसर्गिक शेतीचा शून्य अर्थसंकल्प हे व्या‘यान होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता शमा भाटे यांचा सांस्कृतिक कार्यक‘म होणार आहे.
शनिवारी १३ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता प्रा. एम. के. ढवळीकर यांचे पुरातत्वविज्ञान या विषयावरील व्या‘यान होणार असून साडेदहा वाजता योगा आणि त्याचा आज व उद्याशी संबंध या विषयावर कविंद्र ऋषी यांचे मार्गदर्शन होणार आहे. मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंग अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. दुपारच्या सत्रात अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कला व क‘ीडा, सौंदर्यशास्त्र आदी विषयांवरील चर्चासत्रे होणार आहेत. केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी साडेतीन वाजता समारोप करण्यात येणार आहे. ए. जयकुमार, डॉ. विजय भटकर, वसंत शिंदे, डॉ. प्रसाद जोशी, संतोष कुमार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

जबडयावरील दुर्मिळ शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला 38 वर्षांनी मिळाले जेवण !

0
रंगूनवाला दंत रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
पुणे :
एक वर्ष वयाच्या बालकाला अपघातात जबड्याला दुखापत झाल्यावर त्याचे तोंड उघडणे दुरापास्त होते, तब्बल 38 वर्षांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया होते आणि स्वतःहून जेवणे त्याला शक्य होते !
पुण्यातील राजेंद्र पांचाळ यांची ही सत्यकथा आहे. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए. रंगूनवाला दंत महाविद्यालयात ही शस्त्रक्रिया डॉ.जे.बी. गार्डे, डॉ. गौरव खुटवड यांनी केली.
महाविद्यालयाच्या वतीने ओरल, मॅाक्सिलोफेशियल विभागाच्या प्रमुख डॉ. अरुणा तंबूवाला यांनी या दुर्मिळ शस्त्रक्रियेची माहिती दिली.  ‘इनामदार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’चे व्यवस्थापकीय संचालक आणि अस्थिरोगतज्ञ् डॉ परवेझ इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली. पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी ही या शस्त्रक्रियेत मदत केली.
राजेंद्र पांचाळ ( वय 39) यांना ते १ वर्षाचे असताना अपघात झाला होता. तोंड आणि जबडयाच्या हाडांची गुंतागुंत या अपघातात झाल्याने त्यांना तोंड उघडणे अवघड होऊ लागले. त्यांना काहीही चावता येत नव्हते. 38 वर्ष त्यांनी द्रव आणि बारीक केलेल्या अन्नाचा पातळ  आहार घेतला. घरची गरीब परिस्थिती आणि अनेक रुग्णालये फिरूनही उपाय न निघाल्याने त्यांना तसेच दिवस ढकलणे भाग पडले.
वैद्यकीय परिभाषेत त्यांना टेम्पोरोमँडीब्युलर जॉईंट अॅंकीलॉसेस ही समस्या उद्भवली होती.पूर्ण जबडयाच्या सांध्याचे प्रत्यारोपण हा एकच उपाय या समस्येवर असतो. आणि ही शस्त्रक्रिया अगदी दुर्मिळ असून क्वचितच करावी लागते.
एम. ए. रंगूनवाला दंत महाविद्यालयाने हे आव्हान पेलायचे ठरले. त्यासाठी एम. सी. ई. संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार यांनी लागेल तो सर्व खर्च करण्याची मुभा दिली आणि शस्त्रक्रियेचा मार्ग खुला झाला.
या कामगिरीबद्दल डॉ. गार्डे व त्यांच्या टीमचे एम. सी. ई. संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, संस्थेचे सचिव लतिफ मगदूम, सहसचिव प्रा. इरफान शेख, डॉ. रमणदीप दुग्गल, रजिस्ट्रार आर.ए. शेख, सर्व विभाग प्रमुख यांनी अभिनंदन केले.
 पांचाळ यांचा रक्तगट देखील ओ- निगेटिव असा दुर्मिळ होता. महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी अल्पावधीत हे दुर्मिळ रक्त मिळवले, असे महाविद्यालयाचे रजिस्ट्रार आर.ए. शेख यांनी सांगितले.
जबडा उघडत नसल्याने पांचाळ यांना पारंपारिक पद्धतीने भूल देणे अवघड होते. त्यासाठी फायब्रो ऑप्टिक इंट्यूबेशन पध्दती वापरण्यात आली. त्यानंतर ४ तास शस्त्रक्रिया चालली. ४ जानेवारी रोजी ही शस्त्रक्रिया झाली आणि ५ जानेवारी रोजी रुग्णाला तोंड उघडता येऊ लागले.
राजेंद्र पांचाळ म्हणाले, ‘मी तोंड उघडू शकतो, खाऊ शकतो यावर माझाच विश्वास बसत नाही. अशा पध्दतीने दुर्मिळ शस्त्रक्रिया विनामूल्य होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते.
डॉ.पी. ए. इनामदार म्हणाले, ‘ आमच्या संस्थेचे दंत महाविद्यालय गरजू रुग्णांची वर्षानुवर्ष सेवा करीत आले आहे. पांचाळ यांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करण्याचा निर्णय आम्ही लगेच घेतला.
रुग्ण पांचाळ यांचे नातेवाईक यांनी डॉ. गार्डे यांचे अभिनंदन केले.

उमेश कामत आणि तेजश्री प्रधानची अशी ही मकरसंक्रांत !

0
आगामी ‘असेही एकदा व्हावे’या चित्रपटातून प्रथमच एकत्र

छोट्या पडद्यावरील जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान आणि मराठी चित्रपटश्रुष्टीतील गुणी अभिनेता उमेश कामत यांनी नुकताच मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. झेलू एंटरटेनमेन्टस निर्मित ‘असेही एकदा व्हावे’ या सिनेमाच्या निमित्ताने हि जोडी प्रथमच मोठ्या पडद्यावर एकत्र येत असून, दादर येथील प्लाझा सिनेमागृहात नुकतीच या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली. दरम्यान या सिनेमाचा टीझर मोशन पोस्टरदेखील प्रदर्शित करण्यात आला. मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर पार पडलेल्या या कार्यक्रमात उमेश आणि तेजश्रीने उपस्थितांना तिळगुळ देत शुभेच्छा दिल्या. शिवाय पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंददेखील लुटला. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या सिनेमाची श्री मधुकर रहाणे यांनी निर्मिती केली आहे. त्यांना याकरिता त्यांचे मित्र श्री रविंद्र शिंगणें यांचें बहुमूल्य सहकार्य लाभले .नुकताच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या टीझर मोशन पोस्टरवरून हा एक रोमँटिक चित्रपट असल्याचा अंदाज येतो, तूर्तास सिनेमाबाबतची एवढीच माहिती बाहेर आली असून, अभिनेत्री शर्वाणी पिल्लईचीदेखील यात महत्वाची भूमिका आहे. प्रेमाची नवी परिभाषा मांडणारा हा सिनेमा येत्या ६ एप्रिल 2018 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

दुसरी राज्यस्तरीय तायची कुंगफू स्पर्धा संपन्न

0

पुणे-राष्ट्रीय तायची कुंगफू फेडेरेशन ऑफ इंडियातर्फे दुसरी राज्यस्तरीय  तायची कुंगफू स्पर्धा येरवडाजवळील फुलेनगर येथे अतुर भवन मंगल कार्यालयामध्ये संपन्न झाल्या . या स्पर्धेमध्ये १५ जिल्ह्यातील वय  ७ ते वय १५ या वयोगटातील २५०  स्पर्धकांनी भाग घेतला .या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पुणे जिल्ह्यातील सम्राट कांबळे , प्रदीप शिवपुंजे , व्दितीय क्रमांक ऑल इंडिया कुंगफू संघाचे संदीप कुंजीर व सुनील खंडागळे यांनी पटकाविला . तर तृतीय क्रमांक कांगलेचा मार्शल आर्ट संघाचे समीर शेख व प्रदीप माने यांनी पटकाविला .

स्पर्धेमधील विजेत्या संघाना राष्ट्रीय तायची कुंगफू फेडेरेशन ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अमित भारवासी व सरचिटणीस करण अस्वरे यांच्याहस्ते स्मृतीचषक , पदक व प्रमाणपत्रे देण्यात आली . यावेळी प्रमुख पाहुणे नगरसेविका शीतल सावंत , नगरसेविका राजश्री काळे , मीनल पंजवानी , इलियास शेख , गोपाळ सोळंकी , ऑल इंडिया कुंगफू संघाचे अध्यक्ष सी. एल. लामा , नविन वाघिले , अंजियानंद कांबळे , अँड्रो गजभिव , सचिन भिसे , स्वाती पटेकर , नितीन जाधव व पलाश साठे आदी मान्यवर उपस्थित होते .

शहरातील स्वच्छतागृहांची दुरावस्था ही शोकांतिका – राष्ट्रवादी युवती काँग्रेस

0

पुणे :स्वच्छतागृहा अभावी पुण्यात कात्रज परिसरात एका महिलेचा मृत्यू झाला. या अत्यंत दुर्दैवी घटनेचा निषेध करण्यासाठी आणि महिला स्वच्छतागृह प्रश्नाबाबत कार्यवाही होण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या वतीने आज पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त कार्यालय येथे शीतल तेली -उगले यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या अध्यक्ष मनाली भिलारे, युवती पदाधिकारी तेजवंती कपले, स्नेहल शिंगारे, शिवानी माळवदकर, आबोली घुले, अश्विनी परेरा, गितांजली सारगे, अक्षता राजगुरू, श्रध्दा ठाकूर उपस्थित होत्या.

महापालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे एका महिलेचा बळी गेला आहे ही वस्तुस्थिती पाहता पालिकेच्या संबंधित प्रशासन खाते आणि अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

‘पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस सातत्याने महिला स्वच्छतागृहांची दुरावस्था यासंदर्भात पालिकेकडे पाठपुरावा करीत आहोत. स्वछतागृहांचा अहवाल आम्ही यापूर्वी अनेकदा महानगरपालिकेला सचित्र सादर केला आहे. तरी त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही ही शोकांतिका आहे. एका बाजूला स्मार्ट सिटीच्या वल्गना करण्यात रमलेले प्रशासन मात्र मूलभूत व प्राथमिक गरजांकडे दुर्लक्ष करीत आहे. महानगरपालिकेकडून न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे कात्रजच्या घटनेने पुन्हा सिद्ध झाले आहे’, असे पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या अध्यक्ष मनाली भिलारे म्हणाल्या.

या निवेदनात म्हणल्याप्रमाणे, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट १९४९ (chapter VI) नुसार महापालिका, अधिकाऱ्यांचे अधिकार आणि कर्तव्ये निश्चित करण्यात आली आहेत. तर कलम ६३ नुसार त्यांच्या अनिवार्य जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. या अधिनियमानुसार स्वछतागृह बाबत महापालिकेने त्यांची कर्तव्ये पूर्ण करावीत. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित कराव्यात हे अपेक्षित आहे. परंतु पुणे महानगरपालिका आयुक्त व प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेले आहे.