Home Blog Page 3159

पत्रकार स्व. अरुण साधूंच्या प्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर

0

विख्यात लेखक, पत्रकार, अरुण साधू हे मराठी वाङ्मय जगतातील एक प्रमुख नांव आहे. त्यांचे कार्य अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहेत. ‘झिपऱ्या’ ह्या त्यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आता मराठी चित्रपट येत आहे. अश्विनी दरेकर प्रस्तुत ‘झिपऱ्या’ची निर्मिती रणजीत दरेकर यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन केदार वैद्य यांचे आहे.  या चित्रपटाला राज्यशासनाचे संकलन, कलादिग्दर्शन, वेशभूषा हे तीन पुरस्कार जाहीर झाले आहेत तर उत्कृष्ट चित्रपट आणि नृत्यदिग्दर्शन नामांकने जाहीर झालेले आहेत.   ‘झिपऱ्या’ येत्या २२ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

‘झिपऱ्या’ च्या पोस्टरवर रेल्वे स्टेशनच्या फलाटावर बसलेली तीन मुले दिसत आहेत. एक जण जिन्यात बसून कशाची तरी वाट बघतोय असे दिसते आहे, तो नेमका कशाचा शोध घेत आहेत हे कळायला मार्ग नाही, एक आपल्याच मस्तीत उभा ठाकलेला आहे, एका जण आपल्याच गुर्मीत टशन देत आहे, त्याच्या हातात बूट पॉलिशची साधने दिसत आहेत. हे तिघे कोण आहेत? रेल्वे स्थानकावर काय करत आहेत? या प्रश्नांची उकल या चित्रपटातून होणार आहे. ज्यांनी ‘झिपऱ्या’ कादंबरी वाचली आणि ज्यांनी नाही वाचली अशा दोन्ही प्रकारच्या प्रेक्षकांची या पोस्टरमुळे उत्कंठा वाढली आहे.

अरुण साधूंच्या कादंबरीवर आधारीत पटकथा आणि चित्रपटाचे दिग्दर्शन केदार वैद्य यांनी केले असून यामध्ये चिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम कुलकर्णी, अभिनेत्री अमृता सुभाष, अमन अत्तार, देवांश देशमुख, नचिकेत पूर्णपात्रे, प्रवीण तरडे, विमल म्हात्रे, दीपक करंजीकर अशी कलाकारांची तगडी फौज आहे. या चित्रपटाला समित सप्तीसकर, ट्रॉय – अरिफ यांनी संगीत दिले असून अभिषेक खणकर, समीर सामंत यांनी गीते लिहिली आहेत. कला दिग्दर्शक विनायक काटकर, नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव तर डीओपी राजेश नादोने आहेत.

निर्माते रणजीत दरेकर आणि प्रस्तुतकर्त्या अश्विनी दरेकर यांनी यापूर्वी ‘रेगे’ सारखा हृदयस्पर्शी आणि गुन्हेगारीचे वास्तव दाखवणारा चित्रपट सादर करून प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला, आता ‘झिपऱ्या’च्या निमित्ताने एक आशयघन सिनेमा त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.

लीभेर इंडिया पश्चिम भारतात विस्तार करणार

मे 2018 मध्ये नवे रेफ्रिजरेटर्स दाखल केल्यानंतर पश्चिम भारतातून अंदाजे 35% योगदान मिळण्याची या जर्मन रेफ्रिजरेटरची अपेक्षा

मुंबई- जगभरातील रेफ्रिजरेटर बाजारात प्रभुत्व मिळवल्यानंतर, लीभेर ही जर्मनीतील रेफ्रिजरेटर तज्ज्ञ कंपनी भारतात प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे आणि प्रगतीला चालना देण्यासाठी पश्चिम भारतावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे. औरंगाबाद येथे उत्पादन प्रकल्प उभारण्याचे नियोजन करणाऱ्या कंपनीने सध्या एकूण विक्रीपैकी 35% हून अधिक विक्री पश्चिम भागातून करायचे ठरवले आहे आणि आगामी वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती करण्याची योजना आखली आहे. भारतातील रेफ्रिजरेटर बाजारपेठ हस्तगत करण्याची आकांक्षा असलेल्या लीभेर या रेफ्रिजरेटर क्षेत्रातील जर्मन कंपनीने पश्चिम भारतातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, सुरत, राजकोट, बडोदा या शहरांत सिटी डीलरचे जाळे 40ने वाढवण्याचे लक्ष्य निश्चित करून, व्यवसायाच्या विस्ताराचे नियोजन जाहीर केले आहे. कंपनीने पश्चिम भारतातील शहरांतील मुख्य डीलर व रिटेल चेन यांच्याशी भागीदारी करायचे ठरवले आहे आणि महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात प्रीमिअम रेफ्रिजरेटर्सचे उत्पादन करायचे जाहीर केले आहे. तेथे कार्य सुरू करण्यासाठी कंपनीने अगोदरच अंदाजे 500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

विस्तार योजनेविषयी बोलताना, लीभेर अप्लायन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चीफ सेल्स ऑफिसर राधाकृष्ण सोमायजी यांनी सांगितले, “पश्चिम भारतात विस्तार करण्याची घोषणा करत असल्याचे जाहीर करताना आम्हाला अतिशय आंनद होत आहे आणि देशातील शहरी व निम-शहरी भागांत आगामी रेफ्रिजरेटर्सची विक्री करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. एक बाजारपेठ म्हणून आमच्या दृष्टीने पश्चिम भारतात मोठी क्षमता आहे, असे आम्हाला वाटते. तसेच, पश्चिमेकडील राज्यांतील किंमत विचारात घेता, चांगली बाजारपेठ मिळवता येईल, असा विश्वास आहे. ग्राहकांसाठी आमची उत्पादने व सेवा सहज उपलब्ध करण्यास मदत होण्यासाठी आम्ही नव्या डीलरशिप, शाखा व अधिकृत सेवा केंद्रे याद्वारे आमचे जाळे झपाट्याने विस्तारत आहोत. आम्ही रेफ्रिजरेटर उत्पादनांमध्ये विस्तार करून व्यवसायाचा विस्तार व वाढ करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. आमच्या काही प्रकल्पांमध्ये आम्ही विशिष्ट नियोजन केले आहे. त्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचे व आगामी काळात गुंतवणूक करण्याचे आमचे प्रयत्न असणार आहेत. हे नियोजन मूलभूत क्षमतेसाठी आहेत, तसेच नवी उत्पादने दाखल करण्यावरही आम्ही भर देणार आहोत. आम्ही आमचे सक्षम ब्रँड, वैविध्यपूर्ण उत्पादने, उत्तम गुणवत्ता, स्पर्धात्मक किंमत व जागतिक जाळे यांचा वापर विक्रीमध्ये वाढ करण्यासाठी करणार आहोत.“

मेट्रो व अन्य कनेक्टिविटी विकसित होत असल्याने महानगरे व टिअर-I/II शहरांतून जास्तीत जास्त मागणी येईल, असा कंपनीचा अंदाज आहे. मास प्रीमिअम श्रेणीला लक्ष्य करणाऱ्या लीभेर अप्लायन्सेस इंडियाने भारतीय बाजाराच्या गरजा विचारात घेऊन अतिशय दर्जेदार रेफ्रिजरेशन अप्लायन्सेसचे उत्पादन करायचे उद्दिष्ट ठरवले असून, या प्रकल्पात 2018 पासून दर वर्षी अंदाजे 500,000 कूलिंग अप्लायन्सेसची निर्मिती करायची क्षमता आहे.

2016 या वर्षात समूहाची एकूण उलाढाल 9.2 अब्ज युरो असलेल्या लीभेर समूहाने 2018 मधील आगामी महिन्यांमध्ये नवी रेफ्रिजरेटर उत्पादने निर्माण करायचे नियोजन केले आहे. कंपनीने भारतीय ग्राहकांना सेवा देण्यासाठी विविध रंग व वैशिष्ट्ये यांची सांगड घातलेली 19 रेफ्रिजरेटर मॉडेल दाखल करायचे ठरवले आहे. 2019 मध्ये कंपनीने अंदाजे 22 मॉडेल दाखल करायची योजना आखली आहे, तसेच टप्प्याटप्प्याने उत्पादनांमध्ये वाढ करण्यासाठी पुढील 3 वर्षांमध्ये प्रगत तंत्रज्ञान असलेली आणखी 11 मॉडेल दाखल केली जाणार आहेत. लीभेर भारतात 2008 पासून कार्यरत आहे. कंपनीने देशांतर्गत रेफ्रिजरेटर व फ्रीझर बाजारात बिल्ट-इन रेफ्रिजरेटर व फ्रीझर, विविध कूलिंग झोन असलेले साइड बाय अप्लायन्सेस, विशेष वाइन कॅबिनेट, अंडर काउंटर फ्रिज व फ्रीझर्स अशी अनेक उत्पादने दाखल केली आहेत, तसेच कंपनीचे असंख्य एचएनआय ग्राहक आहेत.

 

सानिका भोगाडे, करण रावत, राघव अमीन यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

0

पुणे :  महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज बीव्हीजी करंडक अखिल भारतीय मानांकन(12 व 14वर्षाखालील)टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात करण रावत, राघव अमीन यांनी तर, मुलींच्या गटात सानिका भोगाडे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आगेकूच केली.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत 12वर्षाखालील मुलींच्या गटात बिगरमानांकीत  सानिका भोगाडे हिने चौथ्या मानांकित दानिका फर्नांडोचा 6-3, 6-4असा संघर्षपूर्ण पराभव केला.  अव्वल मानांकित  स्वरा काटकरने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत पूर्वा भुजबळचा 6-1, 6-1असा सहज पराभव केला.  उर्वी काटेने संचिता नगरकरचा 6-0, 6-3 असा तर, चिन्मयी बागवेने प्रिशा दासचा 6-1, 6-0असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिसऱ्या मानांकित आस्मि  आडकरने हिर किंगेरचे आव्हान 6-0, 6-0असे मोडीत काढले.

12वर्षाखालील मुलांच्या गटात पहिल्या फेरीत बिगरमानांकीत करण रावतने चौथ्या मानांकित वेद ठाकूरचा 7-5, 4-6, 6-3असा तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. राघव अमीनने कडवी झुंज देत आठव्या मानांकित आदित्य रायचा 3-6, 6-2, 6-4 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.  समर्थ संहिताने गौतम मेहुलचा टायब्रेकमध्ये 6-1, 7-6(7-5)असा पराभव करून आगेकूच केली. अव्वल मानांकित  ऋषिकेश अय्यरने केयूर म्हेत्रेला 6-1, 6-2असे नमविले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: 12 वर्षाखालील मुली:  उप-उपांत्यपूर्व फेरी:

स्वरा काटकर (1)वि.वि.पूर्वा भुजबळ 6-1, 6-1;

उर्वी काटे वि.वि.संचिता नगरकर 6-0, 6-3;

सानिका भोगाडे वि.वि.दानिका फर्नांडो(4)6-3, 6-4;

चिन्मयी बागवे वि.वि.प्रिशा दास 6-1, 6-0;

प्राप्ती पाटील(6) वि.वि.सिया प्रसादे 6-2, 6-0;

आस्मि  आडकर(3) वि.वि.हिर किंगेर 6-0, 6-0;

आदिती लाखे(5) वि.वि.रिहाना रॉड्रीगेज 6-2, 6-1;

आनंदी भुतडा वि.वि.मृण्मयी जोशी 6-4, 6-2;

 

12 वर्षाखालील मुले: पहिली फेरी:

ऋषिकेश अय्यर (1)वि.वि.केयूर म्हेत्रे 6-1, 6-2;

आर्यन सुतार वि.वि.आदित्य सुर्वे 6-3, 6-4;

पार्थ देवरुखकर(7)वि.वि.चिनार देशपांडे 6-1, 6-3;

केवल किर्पेकर(3)वि.वि.आकांश सुब्रमणियन 6-0, 6-1;

आदित्य तलाठी(6)वि.वि.सौमिल चोपडे  6-2, 6-1;

समर्थ संहिता वि.वि.गौतम मेहुल 6-1, 7-6(7-5);

करण रावत वि.वि.वेद ठाकूर(4)7-5, 4-6, 6-3;

राघव अमीन वि.वि.आदित्य राय(8)3-6, 6-2, 6-4;

अर्णव पापरकर वि.वि.अक्षजी  सुब्रमणियन  6-1, 6-0.

एमआयटीतर्फे जगातील सर्वात मोठ्या घुमटात धार्मिक वातावरणात श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची स्थापना

0

पुणे- एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठ व विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी आणि एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठातर्फे अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर विद्येची व ज्ञानाची देवता श्री सरस्वतीच्या मूर्तीचे विधीवत पूजन राजबाग, लोणी काळभोर येथे करण्यात आले. एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड व सौ. उषा विश्‍वनाथ कराड यांच्या शुभहस्ते श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची स्थापना केली गेली. थोर साधक व तपस्वी परमपूज्य मा. श्रीकृष्ण कर्वे – कर्वेगुरुजी यांच्या शुभाशीर्वादाने हे मंगल कार्य पार पडले.
तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली विश्‍व शांती ग्रंथालय आणि विश्‍वशांती प्रार्थना सभागृहाच्या शिखरावरील सुमारे 190 फूट उंचीवरील मंदिरात ही मूर्ती विराजमान केली गेली. भजन, कीर्तन, होम-हवन अशा धार्मिक वातावरणात मूर्तीची स्थापना झाली.
यावेळी पं.वसंतराव गाडगीळ, डॉ. एडिसन सामराज, डॉ. बुधाजीराव मुळीक, काशीराम दादाराव कराड, प्रा. डॉ. मंगेश कराड, डॉ. सुचित्रा कराड- नागरे, प्रा. स्वाती कराड-चाटे, डॉ.एस.एन.पठाण, प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, आदिनाथ मंगेशकर, के.के.झा, प्रा. रतनलाल सोनग्रा, डॉ.सुभाष आवळे, डॉ.सुनील राय हे उपस्थित होते. तसेच, विविध क्षेत्रातील नामवंत शिक्षणतज्ञ, तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, धर्मपंडित, विद्वान व इतर मान्यवरही उपस्थित होते.
यावेळी प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, या वास्तूच्या माध्यमातून धर्म, विज्ञान, तत्त्वज्ञान, संगीत कला यासारख्या विषयांचे सखोल चिंतन करून आपण जगात शांती कशी स्थापन करु शकतो, हे मांडले जाईल. स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्यानुसार 21 व्या शतकात भारत विश्‍वगुरु म्हणून उदयास येईल. त्याचीच ही प्रचीती आहे. 62 हजार 500 चौरस फुटाच्या घुमटाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम यांच्यासारख्या संतांचे विचार संपूर्ण जगात पोहचविले जाईल. भारतात अंतिम सत्याचा शोध घेतला जातो आणि ज्ञानाची पूजा केली जातेे. ही आपली संस्कृती आहे. त्यामुळेच ज्ञानमयो विज्ञानमयोची प्रचीती या वास्तूच्या माध्यमातून येत आहे. येथे संतश्री ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या नावाच्या ग्रंथालयात जागातील सर्व धर्मांच्या, संस्कृतींच्या, तत्त्वज्ञानांच्या , अध्यात्म आणि विज्ञानासारख्या विषयांवरील ग्रंथांचा समावेश असेल.
सरस्वती ही हिंदू धर्माची एक प्रमुख देवता आहे. तिला विद्या आणि ज्ञानाची देवी म्हणून ओळखले जातेे. सरस्वतीला साहित्य, संगीत, कला यांचीसुद्धा देवता मानले जाते. ही देवी नदी, वाणी आणि विद्येची सुद्धा अधिष्ठात्री देवता आहे. असेही ते म्हणाले.

पैसे भरून प्रलंबित कृषीपंपांना आता एचव्हीडीएस योजनेतून कनेक्शन

0
पैसे भरून प्रलंबित कृषीपंपांना
आता एचव्हीडीएस योजनेतून कनेक्शन
• 2 लाख 24 हजार शेतकऱ्यांना तूर्तास लाभ
• 5048.13 कोटी रूपये खर्च
• 2 शेतकऱ्यांना एक रोहित्र
• वीज चोरीला आळा बसणार
• शाश्वत व अखंडित वीज पुरवठा
मुंबई-
पैसे भरून प्रलंबित असलेल्या सुमारे 2 लाख 24 हजार कृषीपंप ग्राहकांना आता उच्चदाब वितरण प्रणालीतून वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. यामुळे 2 शेतकऱ्यांना एक रोहित्र या एचव्हीडीएस प्रणालीला आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीपंपधारक ग्राहकांना उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) मार्फत वीज कनेक्शन देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पैसे भरले पण वीज कनेक्शन मिळाले नाही अश्या शेतकऱ्यांना आता या योजनेतून वीज कनेक्शन. देण्यात येणार आहेत.
सध्याच्या पध्दतीनुसार शेतकऱ्यांना 65 व 100 केव्हीए क्षमतेच्या रोहित्रातून 15 ते20 कृषी ग्राहकांना विद्युत पुरवठा करण्यात येतो. यामुळे लघुदाब वाहिनीची लांबी वाढते व वीज हानी मोठ्या प्रमाणात होते. शिवाय शेतकऱ्यांना कमी दाबाने वीज पुरवठा होतो. वीज पुरवठ्यात वारंवार बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होणे, तांत्रिक वीज हानी, रोहित्र बिघाड, विद्युत अपघात आदींना म‍हावितरणला सामोरे जावे लागते. या सर्व अडचणींवर एचव्हीडीएस योजनेद्वारे मात करता येणे शक्य होणार आहे.
उच्चदाब प्रणालीत उच्चदाब वाहिन्यांवरील विद्युत प्रवाह मोठया प्रमाणात कमी होईल. या प्रणालीमुळे वाहिन्यांवर आकडे टाकून वीज चोरी करता येणार नाही. या योजनेवर 4496.69 कोटी व नवीन उपकेंद्रासाठी लागणारा अंदाजे खर्च 551.44 कोटी अश्या एकूण 5048.13 कोटी रूपये इतक्या खर्चाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. तसेच विदर्भ व मराठवाडा विभागातील कृषीपंपांना वीज जोडणी देणे या योजनेअंतर्गत सन 2018-19 व 2019-20 साठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल.
गेल्या तीन वर्षात 4 लाखावर कृषीपंपांना वीज कनेक्शन देण्यात आले असून महावितरणद्वारे प्रति कनेक्शन 1.5 लाख इतका निधी खर्च करण्यात आला. एचव्हीडीएस योजनेअंतर्गत प्रति कृषीपंप 2 लाख खर्च अपेक्षित आहे.सध्याच्या लघुदाब प्रणालीपेक्षा उच्चदाब वितरण प्रणालीचे फायदे अधिक आहेत. गेल्या मार्च 2018 पर्यंत 2 हजार 487 कृषी पंपांचे ऊर्जीकरण होणे अपेक्षित आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कामाचे कार्यादेशही देण्यात आले आहेत. या वर्षात नोव्हेंबर 2017 अखेर पर्यंत 48 हजार 437 कृषीपंपांचे ऊर्जीकरण करण्यात आले असून 30 हजारावर कृषीपंपांचे वीज कनेक्शनचे काम प्रगतीपथावर आहे.
हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण होण्यासाठी महावितरणच्या मुख्यालयात एक स्वतंत्र कक्ष स्थापण्यात येणार आहे. एचव्हीडीएस योजना लागू झाल्यानंतर लघुदाब व उच्चदाब वितरण प्रणाली या दोन्ही प्रणाली कार्यरत राहतील, असेही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी पुणे शहराध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार दादा आणि साहेबांना देणार

पुणे- येत्या २९ एप्रिल रोजी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक होते आहे , तत्पूर्वी २२ एप्रिल रोजी पुणे शहर राष्ट्रवादी पक्षाची नव्या अध्यक्षपदा च्या निवडीकरिता बैठक बोलाविण्यात आली असून या बैठकीत सर्वानुमते ‘पुणे शहराध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार अजितदादा आणि खुद्द शरद पवार यांना देण्यात यावेत ‘ असा ठराव संमत करून तो पाठविण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे . राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर शहराचा अध्यक्ष घोषित होईल असे ही स्पष्ट चित्र आहे .
दरम्यान शहर अध्यक्ष पदासाठी माजी उपमहापौर दीपक मानकर ,प्रशांत जगताप ,सुभाष जगताप ,रुपाली चाकणकर, रवींद्र माळवदकर यांच्यासह माजी महापौर अंकुश काकडे यांचेही नाव  चर्चेत आहे .
शहराध्यक्ष आणि आगामी लोकसभा , विधानसभा निवडणूक यांची सांगड घालण्याचा देखील काही जण प्रयत्न करीत आहेत . शहराला कार्यकर्त्यांची फौज सांभाळणाऱ्या , खमक्या नेतृत्वाची गरज आहे असे म्हणताना मानकर यांचे नाव आघाडीवर घेतले जाते . पण हीच ताकद अजित दादा लोकसभेसाठी वापरतील कि अध्यक्ष पदासाठी असा हि प्रश्न या पार्श्वभूमीवर विचारला जातो आहे . सुभाष जगताप यांचे नाव ही आघाडीवर आहे मात्र नुकत्याच एका वैयक्तिक कारणात ते ग्रस्त झाल्याने त्यांचे नाव पिछाडीवर जाण्याची शक्यता अनेकजण व्यक्त करीत आहेत .
अजित पवार यांनी राष्ट्रवादीच लोकसभा लढवेल असा पवित्रा घेतल्यानंतर अनेकांच्या नजरा मानकर यांच्याकडे वळल्या आहेत .तर सूत्रांच्या म्हणण्यानुसार अजित दादा धक्का तंत्र वापरण्याची जास्त शक्यता आहे ते अचानकपणे नवा चेहरा लोकसभेच्या लढाईसाठी पुढे करतील असे सांगितले जाते .

… तर दिलीप वळसे पाटील होऊ शकतील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष

0


पुणे- येत्या २९ एप्रिल रोजी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची निअव्द्नुक होत असून या निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप वळसे पाटील हे सुद्धा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होवू शकतील असे राजकीय समीक्षकांचे मत आहे.
प्रदेशाध्यक्ष पद साठी विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह शशिकांत शिंदे आणि राजेश टोपे हे देखील या पद साठी इच्छुक आहेत . येत्या २९ एप्रिल रोजी मार्केट यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात हि निवडणूक होणार आहे. याच दिवशी इच्छुकांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत . हि निवडणूक होताना मागील एका निवडणुकीचा दाखला आता देण्यात येतो आहे , तो म्हणजे मधुकर पिचड हे निवडणूक निर्णय अधिकारी असताना खुद्द शरद पवार यांनी त्यांचीच प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक केली होती. यावेळी एक हि उमेदवारी अर्ज आला नव्हता आणि हि निवड बिनविरोध करण्यात आली होती .यावेळी देखील अशा पद्धतीने  वळसे पाटील यांची निवड होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे .

विशाल तांबे विरोधी पक्षनेता होण्याची शक्यता …

पुणे- महापालिकेतील संभाव्य महापौर बदलानंतर म्हणजे साधारणतः २ महिन्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ने विरोधीपक्षनेता बदलासाठी तयारी केली असून धनकवडीचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांची या पदावर वर्णी लागण्याची चिन्हे आहेत .
सध्या चेतन तुपे पाटील हे पालिकेतील विरोधीपक्षनेते आहेत.त्यांच्या आक्रमक पद्धतीने विरोधकांवर हल्ला करण्याच्या कामाबाबत  पक्ष समाधानी असला तरी सभागृहातील एकंदरीत त्यांच्या ‘कार्यपद्धती ‘वर  पूर्व भागातील काही नगरसेवक नाराज आहेत . आणि आगामी २०१९ च्या निवडणुकांच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेता बदलावा असाही विचार पुढे येतो आहे .यादृष्टीने माजी उपमहापौर दिलीप बराटे पाटील यांचेही नाव या पदासाठी पुढे येत आहे . पण एक वर्ष एक पद या तत्वाने बराटे यांना विरोधीपक्षनेता पद मिळणे मुश्कील मानले जाते आहे . कारण ते सध्या स्थायी समितीचे सदस्य आहेत . आणखी एक माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांचे नाव देखील या पदासाठी चर्चेत आहे . पण नुकतेच ते एका अडचणीत सापडले होते त्याचा फटका त्यांना बसेल असे सांगितले जाते . आणि खा. सुप्रिया सुळे या विशेषतः विशाल तांबे यांच्या नावासाठी आग्रही असतील असे दिसते आहे . या अनुषंगाने विशाल तांबे यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेता पदाची माळ पडण्याची चिन्हे आहेत.

चार्ज तर घेतला…आता बोगस कामगारांचे काय करणार ते सांगा , साहेब ..

0
महापालिका आयुक्त पदाचा पदभार सौरभ राव यांनी आज प्रभारी मनपा आयुक्त शीतल तेली – उगले यांच्याकडून सकाळी ११ वाजता  स्विकारला.
सौरभ राव .. पुणे महापालिकेचे नवे आयुक्त … ज्यांच्या भूमिकेकडे बेरोजगारांचे आणि विविध प्रश्नांच्या माध्यमातून तमाम पुणेकरांचे लक्ष लागून राहणार आहे

पुणे-जिल्हाधिकारी पदावरून आज महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार तर आज सौरभ राव यांनी स्वीकारला…आता बेरोजगारांचे आणि विविध प्रश्नांच्या माध्यमातून तमाम पुणेकरांचे लक्ष याच आयुक्तांच्या भूमिकेकडे लागून राहणार आहे .

मागच्या आयुक्तांनी दुर्लक्षित केलेल्या आणि वाऱ्यावर सोडून दिलेल्या महापालिकेतील बोगस कामगारांचे… आता नवे आयुक्त  सौरभ राव ..काय करणार ? या कडे  लक्ष लागून रहाणार आहे .  थेट पालिकेच्या मुख्य सभागृहापर्यंत  वावरणाऱ्या बोगस कामगारांचा प्रश्न आणि त्यामागे लपलेले राजकीय; प्रशासकीय मुखवटे नवे आयुक्त खेचून काढतिला काय ? कि पुन्हा जुन्या अधिकाऱ्यांप्रमाणे ;दुर्लक्ष’ करत रहातील ? .. या साऱ्या प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देणार  आहे .
महापालिकेत सत्ताबदल झाल्यावर तब्बल ७२ बोगस कामगार महापालिकेच्या मुख्य भवनात काम करत असल्याचे ‘मायमराठी ‘ ने वारंवार जाहीरपणे निदर्शनास आणून दिले . एवढेच नव्हे तर मिळकत कर खात्यात ‘सुराणा’ नामक एकाला रंगेहाथ पकडून दिले.तेव्हा तत्कालीन अधिकारी सुहास  मापारी यांनी आदेश देऊन त्याचेवर गुन्हा दाखल केला . पण त्यानंतर ७२ कर्मचाऱ्यांची नावे प्रसिद्ध करूनही आणि त्यातील एकाला भूमी जिंदगी विभागात रंगेहाथ पकडून देवूनही संबधित जुन्या अधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई न करता ‘मौनी बाबा’ होणे पसंत करत कारभाराला पाठीशी घालण्याचा प्रकार राबविला . आता नवे आयुक्त आले आहेत . त्यांच्यापुढे महापालिका भवनातील ७२ बोगस कामगारांचा प्रश्न आहेच . या सर्वांना  एक तर अधिकृत म्हणून रीतसर पद्धतीने कामावर तरी घ्या .. अन्यथा त्यांच्या शिवाय कारभार चालवा … असे सांगूनही प्रश्न सुटलेला नाही . अवघ्या 6 ते 9 हजार रुपये पगारावर तरुणाईला राबवून घेवून ,कामगार कायदे धाब्यावर बसविणाऱ्या ‘महाभागांचा ‘ पर्दाफाश करणार कोण ? हा प्रश्न अजूनही कायम  आहे .सौरभ राव हे पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावरून महापालिकेच्या आयुक्तपदावर आले आहेत . त्यांना पुण्याच्या वाहतूक समस्येसह सर्व समस्या आणि राजकारणी तसेच अधिकारी ही परिचित आहेतच .
पण प्रामुख्याने  चांदणी चौकातील शिवसृष्टी,शहरातील सायकल ट्रेक , पे अँड पार्किंग, २४ तास पाणीपुरवठा , नळाला मीटर जोडणे , कचरा समस्या,कात्रज कोंढवा रस्त्याचे भूसंपादन  अशा अनेक प्रश्नांवर देखील  नव्या आयुक्तांना ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे.येत्या काळात ते या सर्व प्रश्नांना कसे सामोरे जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .

 

शहर आणि परिसरात वादळी वा-यासह अवकाळी पावसाची हजेरी

0

पुणे- शहरातील पाषाण, धायरी, कोथरूड, वारजे माळवाडी,कात्रज, धनकवडी, शिवाजीनगर, खडकी, औंध या परिसरात आज सायंकाळी साडेचार वाजता वादळी वा-यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काही दिलासा मिळाला. तर चिमुरड्यांनी या पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंदही लुटला.

संभाजी भिडेंना वाचवण्यासाठीच कबीर कला मंच कार्यकर्त्यांच्या घरावर छापे

0
एल्गार परिषदेचे मुख्य संयोजक आकाश साबळे यांचा आरोप
 पुणे– एल्गार परिषदेशी संबंधित कबीर कला मंच कार्यकर्त्यावर पोलिसांनी टाकलेले छापे हे दहशत पसरवण्यासाठी टाकण्यात आले असून ही मुस्कटदाबी आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणातील संभाजी भिडे यांच्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच सरकार कबीर कलामंचच्या कार्यकर्त्यांच्या घरावर छापे टाकत असल्याचा आरोप एल्गार परिषदेचे मुख्य संयोजक आकाश साबळे यांनी केला.
 पुणे पोलिसांनी आज (17 एप्रिल) भल्या पहाटे एल्गार परिषदेशी संबंधित कबीर कला मंचच्या पुण्यातील कार्यकर्त्यांच्या घरावर छापे टाकले. त्याचा निषेध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी फुले आंबेडकर विद्वत सभेचे प्राचार्य म ना कांबळे, दलित आदिवाशी संघटनेचे अॅड.केशव वाघमारे, भिमशाही युवा संघाचे नितीन गायकवाड, अखिल महाराष्ट्र कर्मचारी संघाचे किशोर कांबळे, स्वराज अभियानाचे इब्राहिम खान आदी उपस्थित होते.
 साबळे म्हणाले, पोलिसांनी कबीर कलामंचचे कार्यकर्ते रमेश गायचोर, सागर गोरखे यांच्या घरावर भल्या पहाटे छापे टाकले. त्यांचे मोबाईल हिसकावून घेत त्यांना मदतीसाठी संपर्कही करू न देता त्यांच्या घराची झडती घेतली. अशाप्रकारची दहशतपुर्ण कारवाई करून पोलिसांना काय संदेश द्यायचा आह. कोरेगाव-भिमा प्रकरणातील संभाजी भिडे यांच्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच एल्गार परिषदेला नक्षलवादाचे लेबल लावले जात असल्याचा आरोप त्यांनी केली.
 म ना कांबळे म्हणाले, डॉ.दाभोलकरांच्या खुन्यांचे, पानसरेंच्या खुन्यांचे सनातनी संघटना आणि हिंदू अतिरेकी संघटनांशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. परंतू त्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरावर पोलिसांनी आजवर छापे टाकले नाहीत. यातून सरकार उघडपणे भेदभाव करत असल्याचे दिसत असल्याचे सांगून सरकार हुकूमशाहीने वागत असल्याचे ते म्हणाले.

टोमॅटोच्या हमीभावासाठी रस्त्यावर उतरणार : बाबा आढाव

0

पुणे : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे या पिकाचा झालेला खर्च निघणे देखील कठीण झाले असून, शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने स्वामिनाथ आयोगाने सुचविलेल्या तुरतुदीप्रमाणे उत्पादन खर्चावर आधारित टोमॅटोला किमान ५० टक्के हमीभाव द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी पत्रकार परिषदेत केली.
शेतक-यांचे प्रश्न मांडण्यासाठी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी बाबा आढाव यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी कामगार युनियनचे अध्यक्ष अमोल चव्हाण आणि सचिव संतोष नांगरे, माजी अध्यक्ष संजय साष्टे, फलटण तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी जितेंद्र जाधव, जयराम थोरात उपस्थित होते. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या सोमवारी दि. २३ रोजी मार्केट यार्डातील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनात शेतकऱ्यांसह हमाल, मापाडी, कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
डॉ. आढाव म्हणाले, शेतीमालास भाव मिळत नाही. परिणामी कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे थांबवण्यासाठी शेतीमालाला हमीभाव देणे आवश्यक आहे. टोमॅटो, कोथिंबिर आणि कांद्याच्या बाबतीत ही परिस्थिती नेहमी उद्भवते . किमान या तीन शेतीमालांना हमीभाव देणे अपेक्षित आहे. सुरूवात टोमॅटो पासून करावी, अशी आमची मागणी आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना पाठविण्यात आले आहे. या शेतमालाच्या हमीभावासाठी राज्यातील ३०० हून अधिक बाजार समित्यांनी हमीफंड उभारावा. यास राज्य सरकारने मदत करावी. जेणेकरून हा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल़.
टोमॅटोपासून सॉस बनविला जातो. सॉसची किमान १०० रुपये किलो भावाने विक्री होते. हा बनविण्यासाठी फक्त २० रुपये खर्च येतो. हा बनविणाऱ्यांना इतका नफा मिळतो. मात्र, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नाही. यात हस्तक्षेप करून सरकारने टोमॅटोल त्वरित हमीभाव द्यावा असे नागरे यांनी सांगितले. तर शेतकरी जयराम थोरात यांनी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याऐवजी हमीभाव देण्याची मागणी यावेळी केली.

बैसाखी उत्सव शीख जनसेवा संघाच्यावतीने उत्साहात साजरा

0

पुणे-बैसाखी उत्सवानिमित्त शीख जनसेवा संघाच्यावतीने पुणे लष्कर भागातील न्यू क्लबमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी पंजाबी गाण्यावर भांगडा नृत्य करण्यात आली . या कार्यक्रमाचे आयोजन अजितसिंग राजपाल , जगजितसिंग खालसा व  शीख जनसेवा संघाने केले होते .

या कार्यक्रमात चरणजितसिंग सहानी , संतसिंग मोखा , अजितसिंग राजपाल , भोलासिंग अरोरा , काश्मिरीलाल नागपाल , अमरजितसिंग टूटेजा , हरदीपसिंग राजपाल , दिलीप शिंदे , विनोद संघवी आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी शीख बांधवानी पंजाबी गाण्याच्या तालावर ठेका धरला . यावेळी मनोरंजनाचा आनंद शीख बांधवानी लुटला .

बैसाखी उत्सव हा पंजाब मध्ये नवीन धान्य शेतामध्ये आल्याने शीख बांधव त्यांचा आनंदोत्सव साजरा करतात . खालसा पंथाची स्थापना बैसाखीला झाली आहे  . घरामध्ये वाढलेली धनधान्य वृद्धी अशीच राहो सर्व जण आनंदित राहो . अशा पध्दतीने एकत्रित येऊन एकमेकांना बैसाखी उत्सवाच्या शुभेच्छा देण्यात येतात . अशी माहिती अजितसिंग राजपाल यांनी दिली .

पॅरिस करारानुसार धोरणे आखण्यासाठी अंदाजे 100 जागतिक कंपन्या निश्चित करत आहेत सायन्स-बेस्ड टार्गेट्स

  • उत्सर्जनामध्ये घट करण्यासाठी पॅरिस कराराच्या अनुषंगाने लक्ष्य निश्चित करणाऱ्या नव्या मुख्य कंपन्यांमध्ये इलेक्ट्रोलक्स व लॉरिअल यांचा समावेश, एकूण संख्या झाली 103;
  • सायन्स-बेस्ड टार्गेट्स ठरवणारी महिंद्रा सॅन्यो स्पेशल स्टील ठरली भारतातील पहिली कंपनी;
  • अमेरिका, जपान व यूके यासह 23 देशांतील कंपन्या आघाडीवर;
  • अंदाजे 270 कंपन्यांनी सायन्स बेस्ड टार्गेट्स इनिशिएटिव्हसाठी जाहीर बांधिलकी दर्शवली असून, यामध्ये शेकडो कंपन्या समाविष्ट होण्याची अपेक्षा

घातक ग्लोबल वॉर्मिंग टाळण्यासाठी हवामान विज्ञानाने सांगितलेले उपाय करण्याच्या अनुषंगाने उत्सर्जन घटवण्याचे लक्ष्य राबवण्यासाठी शंभरहून अधिक मुख्य जागतिक कंपन्या आता कार्यरत आहेत.

हवामानाविषयी नवी उद्दिष्ट्ये आज जाहीर करत असताना, सीडीपी, युनायटेड नेशन्स ग्लोबल कॉम्पॅक्ट, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (डब्लूआरआय) व वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर (डब्लूडब्लूएफ) यांच्यातील सहयोग असलेल्या सायन्स बेस्ड टार्गेट्स इनिशिएटिव्हने (SBTi) ज्या नव्या कंपन्यांच्या एमिशन रिडक्शन टार्गेट्सला  मान्यता दिली आहे त्यामध्ये इलेक्ट्रोलक्स, लॉरिअल व महिंद्रा सॅन्यो स्पेशल स्टील यांचा समावेश आहे. ग्लोबल वॉर्मिंग प्री-इंडस्ट्रीअल लेव्हलच्या वर 2 अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवण्याच्या पॅरिस कराराच्या उद्देशानुसार उत्सर्जनामध्ये घट करण्याच्या दृष्टीने मार्ग निश्चित करण्यासाठी SBTiमुळे कंपन्यांना मदत होते.

जगभरातील 23 देशांतील 103 कंपन्या यामध्ये सहभागी असून त्यातील बहुतांश कंपन्यांचे मुख्यालय अमेरिका (24 कंपन्या), त्यानंतर जपान (15) व यूके (11) येथे आहे. युरोपीय कंपन्याही सायन्स-बेस्ड टार्गेट ठरवण्याच्या बाबतीत आघाडीवर असून 103 पैकी अंदाजे निम्म्या (57) कंपन्या युरोपातील आहेत.

तसेच, स्वतःच्या कार्यपद्धतीमध्ये हवामानविषयक सायन्स-बेस्ड कृती करण्यामध्ये, 103 कंपन्यांतील दहापैकी नऊ कंपन्यांकडे (88%) मान्यताप्राप्त लक्ष्य असून त्यामध्ये त्यांच्या मूल्यसाखळीतील उत्सर्जनाचा समावेश केला जातो – त्यांचे ‘स्कोप 3’ उत्सर्जन.

आज, सायन्स-बेस्ड टार्गेट्स मान्य करून घेणारी महिंद्रा सॅन्यो स्पेशल स्टील ही पहिली भारतीय व पहिली स्टील कंपनी ठरली आहे. 2016 पायाभूत वर्षाच्या तुलनेत, 2030 पर्यंत उत्पादन केल्या जाणाऱ्या प्रति टन स्टीलच्या स्कोप 1 व स्कोप 2 एमिशनमध्ये 35% घट करण्याचे उद्दिष्ट आहे. महिंद्रा सॅन्योने 2030 पर्यंत उत्पादन केल्या जाणाऱ्या प्रति टन स्टीलच्या स्कोप 3 एमिशनमध्ये 35% घट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

 महिंद्रा सॅन्यो स्पेशल स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक उदय गुप्ता म्हणाले: “हवामानातील बदलांचा सामना करणे, हे आज जगापुढील सर्वात गंभीर व तातडीचे आव्हान आहे आणि एक सर्वात मोठी आर्थिक संधीही आहे.

“सायन्स-बेस्ड टार्गेट्स आपल्या उद्योगाचे धोरण पॅरिस करारातील धोरणांना अनुसरून ठेवते. हवामानातील घातक बदलांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणे ही आपली जबाबदारी असतानाच, आपण अन्य भागीदारांच्या मदतीने हवामानविषयक कृती करून उद्योगाची भविष्यातील प्रगती व नफा यांची काळजी घेणे आवश्यक आहे. हा कृती आराखडा तयार करण्यासाठी सायन्स-बेस्ड टार्गेट्स मोठी मदत करतात.”

लॉरिअलने स्कोप 1, 2 व 3 ग्रीनहाउस गॅस उत्सर्जन 2016 या पायाभूत रेषेच्या तुलनेत 2030 पर्यंत 25% कमी करायचे उद्दिष्ट ठरवले आहे. या उद्दिष्टाला पाठबळ देण्याच्या हेतूने, लॉरिअल आपल्या साइटवरील स्कोप 1 व 2 उत्सर्जन 2016 या पायाभूत रेषेच्या तुलनेत 2025 पर्यंत 100% कमी करणार आहे.

लॉरिअलच्या चीफ कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफिसर अलेक्झांड्रा पाल्ट यांनी सांगितले: “लॉरिअल गेली अनेक वर्षे दोन्ही बाबतीत हवामानातील बदलांशी सामना करण्यासाठी प्रयत्नशील आहे – आमच्या कंपनीमध्ये – 2005 ते 2017 या दरम्यान आम्ही आमच्या उत्पादनातील CO2 उत्सर्जन 73% कमी केले आणि आमच्या मूल्य साखळीमध्ये. सायन्स बेस्ड टार्गेट्स इनिशिएटिव्हमुळे, जागतिक परिणामांतील आमचे योगदान व पॅरिस कराराने ठरवलेल्या 2 अंश सेल्सिअस या उद्देशामध्ये हातभार लावण्याच्या दृष्टीने, लो-कार्बन बिझनेस मॉडेल हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्बनमध्ये 2030 पर्यंत घट करण्याच्या आमच्या नव्या दीर्घकालीन बांधिलकीच्या दिशेने वाटचाल करत असताना आणखी एक पाऊल टाकता येणार आहे.”

आज सायन्स-बेस्ड टार्गेट्स जाहीर करणाऱ्या अन्य कंपन्यांमध्ये समाविष्ट आहेत – ऑस्ट्रेलियातील एज एन्व्हॉयर्नन्मेंट, स्वित्झर्लंडमधील एसजीएस एसए व अमेरिकेतील टेन्नंट कंपनी.

SBTiने मान्यता दिलेले अधिकृत सायन्स-बेस्ट एमिशन्स रिडक्शन टार्गेट मिळवण्यासाठी या कंपन्या मॅकडॉनल्ड्स, सोनी व टेस्को अशा मुख्य ब्रँडचा आदर्श ठेवतात. या 103 कंपन्या 28 क्षेत्रांतील असून त्यामध्ये फूड व बेव्हरेज, कन्झ्युमर प्रॉडक्ट्स व तंत्रज्ञान यांचे प्रमाण सर्वाधिक आहे (अनुक्रमे 14, 10 व 9 कंपन्या). सायन्स-बेस्ड टार्गेट्स निश्चित केलेल्या अन्य कंपन्या इलेक्ट्रिक युटिलिटीज, खाणकाम, बांधकाम व टेलिकम्युनिकेशन्स या क्षेत्रांतील आहेत.

कंपन्यांचे एकत्रित वार्षिक ग्रीनहाउस उत्सर्जन CO2 इक्विव्हॅलंटच्या एकूण 404 मेगाटन आहे व ते 100 कोल-फायर्ड वीज प्रकल्पांच्या वार्षिक CO2 उत्सर्जनाइतके आहे. त्यांचे बाजारमूल्य 3.4 लाख कोटी डॉलर असून, लंडन स्टॉक एक्स्चेंजच्या तोडीचे आहे.

सायन्स बेस्ड टार्गेट्स इनिशिएटिव्हच्या भागीदारांपैकी एक असलेल्या युनायटेड नेशन्स ग्लोबल कॉम्पॅक्टच्या प्रोग्रॅम्सच्या प्रमुख लिला कार्बास्सी यांनी सांगितले: “लो-कार्बन अर्थव्यवस्था असे परिवर्तन साधण्यासाठी आघाडी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या उद्योगांमध्ये सायन्स-बेस्ड टार्गेट्स वेगाने स्थान मिळवत असल्याचे आजच्या घडामोडींवरून दिसून येते. पॅरिस करारातील उद्दिष्टे राबवण्यासाठी जगभरातील वैविध्यपूर्ण क्षेत्रांतील कंपन्या उत्सुक असल्याचे त्यातून अधोरेखित होते व ते त्यांच्या उद्योगासाठीही महत्त्वाचे असल्याचे आढळते.

“सायन्स-बेस्ड टार्गेट्स निश्चित करण्याची तयारी दाखवणाऱ्या कंपन्या 2 अंश सेल्सिअसचे उद्दिष्ट पाळण्यासाठी बांधिलकी दर्शवत आहेत. आपली महत्त्वाकांक्षा उंचावण्याचा विश्वास बाळगू शकता, असा संदेश त्यांच्या कृतीतून जगभरातील सरकारांना दिला जात आहे.”

दरम्यान, आणखी 270 कंपन्यांनी सायन्स-बेस्ड टार्गेट्स ठरवण्यासाठी औपचारिक, जाहीर बांधिलकी व्यक्त केली आहे आणि SBTiकडे सादर करण्यासाठी टार्गेट्सची तयारी करत आहेत. पॅरिस क्लायमेट चेंज परिषदेच्या पार्श्वभूमीवर, 2015 च्या मध्यात घोषणा केल्यापासून दर आठवड्याला दोन कंपन्या याप्रमाणे एकूण 370 हून अधिक कंपन्या आता SBTi मध्ये सहभागी झाल्या आहेत.

2018 मध्ये सायन्स-बेस्ड टार्गेट निश्चित करण्याला अधिक गती येण्याची अपेक्षा आहे. सीडीपीकडील आकडेवारीच्या मते, येत्या दोन वर्षांत सायन्स-बेस्ड टार्गेट ठरवण्याची महत्त्वाकांक्षा 850 कंपन्यांनी 2017 मधील हवामानविषयक जाहीरनाम्यात नमूद केली आहे.

महिंद्रा सॅन्यो स्पेशल स्टीलच्या लक्ष्याला मान्यता मिळण्यापूर्वी, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा जानेवारी 2018 मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी झाले होते. महिंद्रा यांनी सप्टेंबर 2018 मध्ये कॅलिफोर्निया येथे आयोजित होणाऱ्या ग्लोबल क्लायमेंट अक्शन समिटच्या निमित्ताने सायन्स बेस्ड टार्गेट्स इनिशिटिव्ह निश्चित करण्याचे आव्हान जगभरातील कंपन्यांना दिले होते. महिंद्रा समूहाचे चीफ सस्टेनेबिलिटी ऑफिसर अनिर्बन घोष यांनी वर्ल्ड बिझनेस काउन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या माँट्रेक्स येथील लायजन डेलिगेट बैठकीत आज पुन्हा हे आव्हान दिले. बैठकीला जगभरातील प्रमुख कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.

सायन्स बेस्ड टार्गेट्स इनिशिएटिव्हविषयी

सायन्स बेस्ड टार्गेट्स इनिशिएटिव्ह कंपन्यांना सायन्स-बेस्ड टार्गेट्स ठरवण्यासाठी व लो-कार्बन अर्थव्यवस्था असे परिवर्तन घडवण्याच्या दृष्टीने आघाडी घेण्यासाठी चालना देते. हा उपक्रम म्हणजे, सीडीपी, युनायटेड नेशन्स ग्लोबल कॉम्पॅक्ट, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (डब्लूआरआय) व वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर (डब्लूडब्लूएफ) यांच्यातील सहयोग आहे आणि वुई मीन बिझनेस कोअलिएशनची एक बांधिलकी आहे. हा उपक्रम सायन्स-बेस्ड टार्गेट सेटिंगमधील उत्तम पद्धती निश्चित करतो व त्यास चालना देतो, स्वीकार करण्यातील अडथळे दूर करण्यासाठी संसाधने उपलब्ध करतो, तसेच कंपनीच्या लक्ष्यांचे स्वतंत्रपणे मूल्यमापन करतो व त्यास मान्यता देतो.

मौजे कल्याण महाराष्ट्रात आदर्श बनवणार : पालकमंत्री गिरीश बापट

0

पुणे: शहराच्या जवळ असून ही या पूर्वीच्या लोकप्रतिनिधींच्या  दुर्लक्षामुळे विकासापासून वंचित राहिलेल्या मौजे कल्याण (ता.हवेली) या गावाला महाराष्ट्रातील आदर्श गाव बनवणार, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. शिवगंगा खोऱ्यातील कल्याण गावातील नियोजित पुलाचे भूमिपूजन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.

यावेळी खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर, पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध यादव, माजी पंचायत समिती सभापती चांदाशेठ डिंबळे, सरपंच कुंदा डिंबळे, उपसरपंच अभिजित डिंबळे, शिवगंगा खोरेचे अध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ सुभाष डिंबळे, मारुती डिंबळे, सुनील डिंबळे यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, या पूर्वी सत्तेत असणाऱ्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जिल्ह्यातील अनेक खेड्यांचा विकास झाला नाही. पण आम्ही सत्तेत आल्यानंतर पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शहराच्या विकासासोबत खेड्यांचा विकास करण्यावर मी लक्ष केंद्रित केले आहे. कल्याण हे गाव सिंहगडाच्या पायथ्याला येते तरीही या गावाचा म्हणावा तसा विकास झाला नाही. या गावातील मुख्य रस्त्यावरील पूल खूप जुना झाला असल्याने खचला होता. पावसाळ्यापूर्वी हा रस्ता पूल दुरुस्त करणे गरजेचे होते. म्हणूनच या रस्त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून   ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सत्तेत आल्यानंतर जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही अनेक महत्वपूर्ण योजना राबवत आहोत. शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आम्ही रिंग रोडची निर्मिती करण्यात येणार आहे. हा रिंग रोड कल्याण जवळून प्रस्तावित असल्याने भविष्यात गावातील लोकांना रोजगार मिळेल. येणाऱ्या काळात या गावातील रस्ते आणखी रुंद आणि चांगले करू. खडकवासल्यावरून सिंहगडला जाणारी वाहतूक काही प्रमाणात जरी या मार्गावरून गेली तरीही खडकवासला भागातील वाहतुकीची कोंडी सुटेल तसेच या गावातील लोकांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असणारा शेती उद्योग सुधारावा यातून शेतकऱ्याला अर्थार्जन व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेतीला पाणी देणे गरजेचे आहे. पाण्यासाठी आपल्याला पावसावर अवलंबून रहावे लागते त्यामुळे या पाण्याची साठवण व वितरण व्यवस्थित होणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही तलावातील गाळ काढत आहोत तसेच नवीन बंधाऱ्यांची निर्मिती करत आहोत. ग्रामस्थांनी प्रस्ताव दिल्यास यासाठी निधीची उणीव भासू देणार नाही.

यावेळी बोलताना आमदार तापकीर यांनी माझ्या विजयात या गावाचा मोठा वाटा असून हे गाव नेहमी विकास करणाऱ्याच्या पाठीमागे उभा राहतो अशा भावना व्यक्त केल्या. तसेच या गावाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे अभिवचनही त्यांनी दिले.