Home Blog Page 3062

शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा ऑगस्ट/सप्टेंबर- 2018 निकाल जाहीर

0

पुणे:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा ऑगस्ट/सप्टेंबर 2018 मध्ये इंग्रजी 30 व 40 श.प्र.मि या विषयाची परीक्षा 18 ते 24 ऑगस्ट 2018 या कालावधीत तसेच मराठी व हिंदी 30 व 40 श.प्र.मि या विषयाची परीक्षा 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2018 या कालावधीत राज्यातील एकूण 304 केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल 23 ऑक्टोबर 2018 रोजी ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा निकाल परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रकांची ऑनलाईन प्रिंट घेता येईल.

विद्यार्थ्यांची मूळ प्रमाणपत्रे/गुणपत्रके व निकालाच्या प्रती सर्व जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी, (माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व) व मुंबईसाठी विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग, बालभवन, चर्नी रोड, मुंबई यांचे कार्यालयामार्फत संबंधित संगणक टंकलेखन संस्थामधून कार्यालयीन वेळेत मिळतील.

निकाल जाहीर झालेल्या दिनांकापासून 10 दिवसांत परीक्षार्थीने गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी संस्थेतून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. गुणपडताळणीसाठी प्रति विषय रु 100/- व उत्तरपत्रिका छायाप्रती मिळण्यासाठी प्रति विषय रु. 400/- ऑनलाईन पध्दतीने बँक ऑफ इंडियाच्या (BOI) खाते क्र. 050010210000035 IFSC code- BKID0000500 वर संस्था  Login 1 नोव्हेंबर 2018 पर्यंत सादर करावेत. याबाबतच्या सविस्तर सूचना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत, असे आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी कळविले आहे.

सम्मेद शिखर जी चे पावित्र्य कायम राखणार : मुख्यमंत्री रघुवर दास

0
ऑल इंडिया जैन अल्पसंख्याक फेडरेशनच्या शिष्टमंडळाला आश्वासन
 
शिष्टमंडळात पुण्यातील दोघांचा समावेश
 
पुणे / प्रतिनिधी : 
‘सम्मेद शिखर जी’ हे जैन धर्मियांचे एक पवित्र तीर्थस्थळ आहे. या पवित्र स्थळाची पवित्रता सरकार कायम राखेल. तीर्थस्थळाच्या यात्रे दरम्यान जैन धर्मियांना कुठल्याही प्रकारची समस्या येऊ नये, म्हणून सरकार मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध आहे, असे आश्वासन झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी दिले.
          ऑल इंडिया जैन अल्पसंख्याक फेडरेशन तर्फे आयोजित ‘पधारो शिखर जी’ अभियानाच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री दास यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले. केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडिया जैन अल्पसंख्यांक फेडरेशनचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री दास यांना प्रोजेक्ट भवन येथे भेटले. त्यांनी जैन धर्मियांच्या भावना दास यांच्यापर्यंत पोहोवून त्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली. यावेळी ऑल इंडिया जैन अल्पसंख्यांक फेडरेशनचे अध्यक्ष ललित गांधी, फेडरेशनचे सरचिटणीस संदीप भंडारी, जीनेंद्र कावेडीया, जैन समाजाचे अग्रणी कैवन झवेरी, हिमांशु राजा, प्रितेश शाह, हितेश मोता, तसेच फेडरेशनचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या शिष्टमंडळात पुण्यातील संदीप भंडारी व जीनेंद्र कावेडीया यांचा समावेश होता.
           फेडरेशनचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, की  सम्मेद शिखर जी ची अखंडता अबाधित राखणे, ही सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. तसेच तीर्थस्थळाजवळ कुठलेही बांधकाम वाढू नये की ज्यामुळे जैन धर्मियांच्या आस्थेला बाधा येईल. तीर्थस्थळाच्या आसपासच्या लोकांसाठी आरोग्य व शिक्षणांबाबत सरकारकडून योजना राबवली जात असेल, तर जैन समुदायाकडून त्याला मदत केली जाईल. जैन धर्मप्रेमी लोक या यात्रेसाठी वर्षातून एकदा यायला हवेत. लोकांच्या नियमित ये-जा करण्याने इथल्या क्षेत्रांचा विकास आपोआप होईल.
            मुख्यमंत्री दास यांनी आश्वासन दिले, की सरकारकडून सम्मेद शिखर जी ची पवित्रता कायम राखली जाईल. सम्मेद शिखर जी ची यात्रा सुखमय बनण्यासाठी सरकार आसपासच्या परिसराच्या विकासाचे काम हाती घेणार आहे.

सूर-तालाच्या मिलाफात रंगली कोजागिरी संध्या

0
‘श्रद्धा सुमन’ मैफलीतून पं किशन महाराज यांना आदरांजली
पुणे :  टिपूर चांदण्याच्या प्रकाशाने आसमंत उजळला असताना अभिजात स्वरांचा व श्रवणीय तालाचा सुरेख मिलाफ स्वर मंचावर झाला. सप्तसूर चंद्राच्या शुभ्रतेत जणू एकरूप व्हावे, अशा सुरेल वातावरणात रंगलेली कोजागिरीची संध्या काल रसिक पुणेकरांनी अनुभवली. निमित्त होते ‘ श्रद्धा सुमन’ मैफलीचे.
तालायन म्युझिक सर्कलचे सर्वेसर्वा प्रसिद्ध तबलावादक पं. अरविंदकुमार आजाद आणि संस्थापिका सौ. अनुपमा आजाद यांनी तबलासम्राट पद्मविभूषण पं. किशन महाराज यांच्या दहाव्या पुण्यस्मरणार्थ या मैफलीचे आयोजन केले होते. यावेळी प्रसिद्ध तबलावादक पं. नयन घोष, उस्ताद फैयाज हुसेन खान, पं. सुहास व्यास, मुख्य आयुक्त, पुणे आयकर विभाग श्री. आशू जैन तसेच
आयकर विभागाचे आयुक्त श्री.आदर्श मोदी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
 पं. नयन घोष यांचे सुपूत्र, युवा कलाकार ईशान घोष यांच्या एकल प्रस्तुतीने मैफलीस प्रारंभ झाला. पारंपारिक क्रमाने तीनतालातील परण, पेशकार, कायदे, रेले आणि बंदिशीच सादरीकरण करत त्यांनी विविध तालांचे पैलू  उलगडले. दाया आणि बाया यांचा सुंदर समतोल, स्पष्ट आणि दमदार निकास, नृत्यास पोषक असलेल्या काही बंदिशी, फर्माईशीच लयदार सादरीकरण आणि उत्कृष्ट पढंत याद्वारे ईशान घोष यांनी मैफलीत अनोखे रंग भरले. मिलींद कुलकर्णी (संवादिनी) यांनी समर्पक साथ दिली.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचा ‘भारतीय संगीताचा आश्वासक आवाज’ या शब्दांत आशीर्वाद लाभलेले पद्मश्री उस्ताद राशिद खान यांच गायन म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच ठरली. त्यांनी राग ‘पुरीया’ विलंब ख्याल लयीतून सादर केला. दादरामधील त्यांनी पेश केलेल्या ‘बात बात मै बित गयी रात’ या ठुमरीने रसिकांची मने जिंकली. प्रत्येक शब्दाचे भाव आपल्या गायकीतून उलगडून मांडण्याचा राशिद खान यांचा सुरेल अंदाजामुळे मैफलीची रंगत वाढली. पं. अरविंदकुमार आजाद(तबला) यांच्यासह मुराद अली (सारंगी), मिलींद कुलकर्णी (संवादिनी), नागेश आडगावकर, निखील जोशी, ओम गोंगाणी (तानपुरा), यांनी त्यांना पूरक साथ दिली.
 कलाकार कितीही श्रेष्ठ असला तरी त्याच्यामधील विनम्रता त्याला प्रतिभावंत बनवते, याचीच अनुभूती मोहनविणा जनक पद्मभूषण पं. विश्र्वमोहन भट्ट यांच्या सादरीकरणातून रसिकांना आली. राग ‘बिहाग’ अत्यंत शृंगारिक लयीत सादर करत पं. विश्र्वमोहन भट यांनी रसिकांवर मोहिनी टाकली. सितार आणि विणेच्या संगमातून तयार झालेल्या मोहनविणेचा श्रवणीय स्वराविष्काराने रसिक मंत्रमुग्ध झाले. कोकिळेचे मंजूळ स्वर भट यांच्या मोहनवीणेतून अधिकच सुश्राव्य वाटले. पं. अरविंदकुमार आजाद यांचीही भक्कम साथ त्यांना लाभली. बहारदार तबलावादन, श्रवणीय शास्त्रीय गायन आणि सुमधूर मोहनविणा वादनाच्या स्वरात ‘श्रद्धा सुमन’ मैफलीची सुरेल सांगता झाली.
“बनारसी वादन शैलीला पुण्यात वेगळं स्थान प्राप्त करून देण्यात पं अरविंदकुमार आजाद यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांची जादुई बोटे तबल्यावर थिरकतात, तेव्हा पं. किशन महाराज यांचा त्यांना भरभरून आशीर्वाद लाभला असल्याचा प्रत्यय येतो,” असे गौरवोद्गार काढत पं. विश्र्वमोहन भट यांनी आजाद यांच्या वादनशैलीला दाद दिली.

मागेल त्यांना स्वस्त व सौर ऊर्जा उपलब्ध करणे हेच धोरण-ऊर्जामंत्री

0

–    2030 पर्यंत राज्य ऊर्जाक्षेत्रात स्वयंपूर्ण

–    2022 पर्यंत सर्व कृषीपंपांना सौर ऊर्जा

–    महाऊर्जाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

पुणेदि. 24 आॅक्टोबर 2018  सौरवीज प्रकल्पामुळे राज्याचा कायापालट होणार असून 2022 पर्यंत संपूर्ण कृषीपंपांना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यायोगे शेतकऱ्यांना दिवसा, स्वस्त व शाश्वत वीज मिळणार असून क्राॅससबसीडीचा भार कमी होणार असल्याने औद्योगिक व वाणिज्यिक स्वस्त होणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा,नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मुख्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. श्री. गिरीश बापट होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, आमदार मेधा कुलकर्णी, महाऊर्जाचे महासंचालक आनंद लिमये,अतिरिक्त महासंचालक पुरुषोत्तम जाधव उपस्थित होते.

ऊर्जामंत्री  बावनकुळे म्हणाले की, राज्य भारनियमनमुक्त झाल्यानंतर आता भविष्याच्या दृष्टीने अपारंपारिक ऊर्जेचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी सौरऊर्जा अतिशय महत्वाची आहे. सौरऊर्जेच्या बाबतीत महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. सौरऊर्जेच्या माध्यमातून राज्यात मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना सुरु झालेली आहे.येत्या वर्षभरात सुमारे 7 लाख 50 हजार कृषीपंपांना या योजनेद्वारे वीजरपुरवठा सुरु होणार आहे. त्याच प्रमाणे राज्यातील 1500 नळपाणी पुरवठा योजना सौरऊर्जेवर सुरु असून यंदा आणखी 2000 योजना लवकरच सौर ऊर्जेवर आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. सौर ऊर्जेमुळे शाश्वत आणि स्वस्त वीज उपलब्ध होणार आहे. सौर ऊर्जेचे दर कृषीपंपांसाठी 2 रुपये72 पैसे असे आले आहेत. ते येत्या वर्षभरात एक रुपयाने स्वस्त होतील. त्यामुळे कृषीपंपांचे वीजदर तीन रुपयांनी कमी होणार असल्याने क्राॅस सबसीडीचा औद्योगिक ग्राहकांवरील भारही कमी होणार आहे. त्यामुळे औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांचे वीज दर थेट 3 रुपयांनी कमी होणार आहेत. या शासनाच्या कार्यकाळात कृषीपंपांना साडेसात लाख नवीन वीजजोडण्या देण्यात येत असून त्यातील 5 लाख 18 हजार कृषीपंपांचे प्रलंबित वीजजोडण्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे तर उर्वरित वीजजोडण्यासांठी उच्च दाब वितरण प्रणाली(एचव्हीडीएस) योजना सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले.

विजेप्रमाणेच  चपळ  कार्यक्षममंत्री

ऊर्जा खात्यात उत्कृष्ट टीमवर्क आणि योग्य नेतृत्वामुळे या खात्याची विलक्षण घौडदौड सुरु असल्याचा सुरवातीलाच उल्लेख करून अन्न व नागरी पुरवठामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री  गिरीश बापट यांनी ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे यांचा विजेप्रमाणे चपळ व कार्यक्षम मंत्री म्हणून गौरव केला. गेल्या 4 वर्षात हे राज्य भारनियमनमुक्त करून विजेच्या संकटावर कधी मात करायची आणि मार्ग काढण्याचे कसब फक्त ऊर्जामंत्री . बावनकुळे यांच्यातच असून पवनऊर्जा, सौरऊर्जेकडे त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. कार्यक्षम मंत्र्यांमध्ये  बावनकुळे हे अग्रक्रमावर असल्याचे . गिरीश बापट म्हणाले.

भाजप-सेनेच्या काळात खऱ्या अर्थाने राज्य भारनियमनमुक्त करण्याचे काम ऊर्जावान मंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याचे जलसंपदा राज्यमंत्री ना. श्री. विजय शिवतारे म्हणाले. महाऊर्जाची ही हरीत इमारत देशातील पहिली इमारत असून ती भविष्यात मैलाची दगड ठरणार आहे. सौरऊर्जेची अधिक निर्मिती करून पारंपरिक ऊर्जा बचत करावीव मोठ्या प्रकल्पांना, उद्योगांना कमी दरात वीज देण्यात यावी यासाठी त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचेही ना. श्री. शिवतारे म्हणाले. सौरऊर्जेमुळे रोजगार वाढेल, वीज बचत होईलव राज्याचे उत्पन्न वाढेल अशी महत्वपूर्ण भूमिका ना. श्री. बावनकुळे यांची असल्याने देश बदल रहा है या वाक्याला साजेसे त्यांचे काम असल्याचे  शिवतारे म्हणाले.

महाऊर्जाचे महासंचालक  आनंद लिमये म्हणाले, की गेल्या 4 वर्षात ऊर्जामंत्र्यांच्या नेतृत्वात महाऊर्जाचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. फक्त योजनांपर्यंत महाऊर्जाची व्याप्ती नाहीतर योजना तयार करणे, त्या राबवणे व धोरणांची अंमलबजावणी करणे हेही महाऊर्जाचे काम आहे. महाऊर्जाला खऱ्याअर्थाने आकार देण्याचे काम ऊर्जामंत्र्याच्या काळात आणि त्यांच्याच नेतृत्वात झाल्याचे श्री. लिमये म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नवीन इमारतीबद्दल सविस्तर माहिती अतिरिक्त महासंचालक श्री. पुरुषोत्तम जाधव यांनी सांगितले. या इमारतीची रचना कशी असेल याबद्दल एक चित्रफित याप्रसंगी दाखविण्यात आली. कार्यक्रमाला महाऊर्जाचे प्रादेशिक संचालक श्. महेश आव्हाड, महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे इतर वरिष्ठ अधिकारी वनागरिक उपस्थित होते.

वीजदरात सवलत दिल्याने लाँड्री व्यावसायिकांकडून उर्जामंत्र्यांचा सत्कार

0

पुणे-लौंड्री व्यावसायिकांना वीजदरात सवलत जाहीर केल्याबद्दल पुणे जिल्हा लौंड्री व्यावसायिकांच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट व लौंड्री  संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी उपमहापौर सुरेश नाशिककर यांच्याहस्ते शाल , श्रीफळ , पुणेरी पगडी घालून स्मृतिचिन्ह देउन भव्य सत्कार करण्यात आला . बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्य्रक्रमास महापौर मुक्ता टिळक , महापालिका सभागृह नेते श्रीनाथ भिमाले , स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक महाराष्ट्र परिट धोबी महासंघाचे अध्यक्ष देवराज सोनटक्के , परिट आरक्षण समितीचे सचिव अनिल शिंदे , पुणे शहर लौंड्री व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश अभ्यंकर , कार्याध्यक्ष सारंग मसुरकर , महासचिव अमित जाधव , उपाध्यक्ष प्रितम चौधरी , खजिनदार राहुल राक्षे , सहसचिव अनिल मडीवाल आदी मान्यवर व लौंड्री व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

यावेळी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले कि , लौंड्री व्यावसायिकांना वीजदरात सवलत देण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती . त्यामध्ये लौंड्री व्यावसायिकांना व्यावसायिक वीज दर भरावा लागत असल्यामुळे कमवायचे किती ? खर्च करायचे किती ? या समस्येना सामोरे जावे लागत होते . त्यासाठी शासनाने ४० टक्के वीज दरात कपात करून सुमारे ४०००० लौंड्री व्यावसायिकांच्या हिताचा ऐतिहासिक निर्णय घेतला . तसेच शासनाने पारंपरिक ऊर्जा स्त्रोत महत्व देण्यासाठी प्रयत्न करीत आहे . कोळशापासून तयार होणाऱ्या ऊर्जेपेक्षा पारंपारिक ऊर्जा स्त्रोताला महत्व दिले आहे . त्यासाठी लौंड्री व्यावसायिकांनी आपल्या व्यावसायिकाच्या ठिकाणी सौर पॅनेल लावून वीज निर्मिती करावी, त्यासाठी शासन सर्व सहकार्य केले . असे सौर ऊर्जा प्रकल्प राबविणाऱ्या लौंड्री व्यावसायिकांना २५ टक्के सवलत देण्याचा शासन लवकरच शासकीय अध्यादेश काढणार असल्याचे त्यांनी सांगितले . याचा फायदा देखील सुमारे ४०००० लौंड्री व्यावसायिकांना होणार आहे . समाजाला आरक्षण मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालू आहेत . असे त्यांनी सांगितले .

यावेळी महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले कि , लोकप्रतिनिधी म्हणू काम करताना समाजाचे प्रश्न सोडविता आले पाहिजे . त्या दृष्टीकोनातून आज हा लौंड्री व्यावसायिकांना वीजदरात सवलत देण्याचा शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला. सरकारने जनतेची कामे केली पाहिजेत . लोकप्रतिनिधींनी देखील जनतेचे प्रश्न सोडविले पाहिजेत . आमचे सरकार काम करत असल्यामुळे पुढचे सरकार देखील आमचेच येणार असल्याचे त्यांनी सांगितले .

या कार्यक्रमाचे प्रास्तविक  पुणे शहर लौंड्री व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश अभ्यंकर यांनी केले तर सूत्रसंचालन अमित जाधव यांनी केले तर आभार सुनिल पवार यांनी मानले . 

मोबाईलच्या जमान्यात मैदानी खेळांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज – संदीप खर्डेकर.

0

होतकरू व गुणी खेळाडू विवेक जामदार ला क्रिकेट साहित्य भेट… कोथरूड नवरात्र  संपन्न.

पुणे-रोझरी शाळेत आठवीत शिकणारा व कोथरूडच्या आझादनगर भागात राहणारा विवेक जामदार हा अत्यंत गुणी खेळाडू असून क्रिकेट आणि फुटबॉल ह्या दोन्ही खेळात त्याने मिळविलेले प्रावीण्य व बक्षीसे कौतुकास्पद आहेत,त्याला क्रिकेट ह्या खेळात प्रगती करता यावी यासाठी त्याला क्रिएटिव्ह फौंडेशन आणि चॅंपियन स्पोर्ट्स चे अमित मदान यांच्या सहकार्याने संपूर्ण कीट भेट देण्यात येत आहे असे क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.क्रिएटिव्ह फौंडेशन आणि कै विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान आयोजित कोथरूड नवरात्र उत्सवाचा समारोप कोजागिरी पौर्णिमा निमित्त दांडिया,दुग्धपान आणि गरजूंना मदत अश्या प्रकारच्या कार्यक्रमानी करण्यात आला.यावेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,विशाल भेलके,उमेश भेलके,सुरेश जपे इ मान्यवर उपस्थित होते.मोबाईलच्या जमान्यात मुले सोशल मीडियात गुंतले असताना विवेक मैदानी खेळात उत्तम करियर करत आहे याचा सर्वांनी आदर्श घ्यावा आणि अश्या गुणी खेळाडूना सर्वतोपरी प्रोत्साहन द्यावे व आवश्यक मदत करावी असे ही संदीप खर्डेकर म्हणाले.
या कार्यक्रमाने नवरात्र महोत्सवाचा समारोप झाला.

आशियाई टेनिस अजिंक्यपद 2018 स्पर्धेत भारताच्या देव जावीया, उझबेकीस्तानच्या यास्मीन करीमजानोवा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

0
  • मुलींच्या गटातील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात      

पुणे, दि.24ऑक्टोबर 2018: एचसीएल पुरस्कृत व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या तर्फे आयोजित आणि आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना(आयटीएफ), आशियाई टेनिस संघटना(एटीएफ) व अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दुसऱ्या एचसीएल आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत  मुलांच्या  गटात भारताच्या देव जावीयाने तर मुलींच्या गटात उझबेकीस्तानच्या  यास्मीन करीमजानोवा या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश  केला. तर एकेरीत मुलींच्या गटातील सर्व भारतीय खेळाडूंचे आव्हान आज उप-उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत  उप-उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात देव जावीयाने थायलंडच्या आठव्या मानांकित सुकसुमराम टीचा टायब्रेकमध्ये 7-6(4), 6-4असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. भारताच्या चौथ्या मानांकित सिध्दांत बांठीयाने जपानच्या तायो हिरानोचे आव्हान 6-1, 6-2असे सहज मोडीत काढले.  पाचव्या मानांकित मेघ भार्गव पटेलने कडवी झुंज देत हाँगकाँगच्या की लुंग एनजीचा 6-2, 3-6, 6-1असा तीन सेटमध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. भारताच्या सातव्या मानांकित मन शाहने दिग्विजय प्रताप सिंगचा टायब्रेकमध्ये 7-6(5) 6-4असा पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. अव्वल मानांकित कझाकस्तानच्या डॉस्टनबीके ताशबुलतावने क्वालिफायर भारताच्या क्रिश पटेलचा 6-2, 6-2असा पराभव करून आगेकूच केली.

मुलींच्या गटात एकेरीत उझबेकीस्तान यास्मीन करीमजानोवाने जपानच्या दुसऱ्या मानांकित हिमरी सातोचा 6-3 6-4असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. थायलंडच्या आठव्या मानांकित थायलंडच्या मई नपात निरुदोर्न हिने भारताच्या मल्लिका मराठेवर 3-6 6-0 6-3असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. तिसऱ्या मानांकित थायलंडच्या मनचया सवांगकिइने चीनच्या जियाकी हुंगला 6-0 6-4असे नमविले. अव्वल मानांकित हाँग काँगच्या वांग हाँग यी कोडीने कडवा प्रतिकार करत थायलंडच्या पुनिन कोवापीतुकतेडचा 6-3 3-6 6-1असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीगाठली.

 

दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत ,मुलांच्या गटात सिध्दांत बांठीयाने मेघ भार्गव पटेलच्या साथीत नथ्यूत एन व सेबॅस्टियन नोटाफ्ट यांचा 7-5 7-6(7)असा पराभव केला. देव जावीया व मन शहा या जोडीने केविन पटेल व आर्यन झवेरीयांचा टायब्रेकमध्ये 6-4 7-6(2)असा पराभव केला.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल- उप-उपांत्यपूर्व फेरी: मुले: 

डॉस्टनबीके ताशबुलताव(कझाकस्तान)(1)वि.वि क्रिश पटेल(भारत)6-2, 6-2

सिध्दांत बांठीया(भारत)(4) वि.वि.तायो हिरानो(जपान)6-1, 6-2

सेर्गेय फोमीन(उझबेकिस्तान)(2)वि.वि.नथ्यूत एन(थायलंड)6-3, 6-2

मेघ भार्गव पटेल(भारत)(5)वि.वि. की लुंग एनजी(हाँगकाँग)6-2, 3-6, 6-1

सच्चीत शर्मा(भारत)वि.वि साई कार्तिक रेड्डी गंटा(भारत) 6-0, 6-4

देव जावीया(भारत)वि.वि. सुकसुमराम टी(थायलंड)(8)7-6(4), 6-4

मन शाह(भारत)(7)वि.वि दिग्विजय प्रताप सिंग(भारत)7-6(5) 6-4

सीओन याँग हन(कोरिया)(3)वि.वि.अथर्व निमा(भारत)6-4 6-1

 

मुली:

वांग हाँग यी कोडी(हाँग काँग)(1)वि.वि.पुनिन कोवापीतुकतेड(थायलंड) 6-3 3-6 6-1

प्रिस्का मॅडेलिन नुगरो(इंडोनेशिया)(4)वि.वि साकी इमामुरा(जपान) 6-3 6-3

जियाकी वांग(चीन)(7) वि.वि प्रियांशी भंडारी(भारत) 6-0 6-1

मई नपात निरुदोर्न(थायलंड)(8) वि.वि मल्लिका मराठे(भारत) 3-6 6-0 6-3

मनचया सवांगकिइ(थायलंड)(3)वि.वि जियाकी हुंग( चीन) 6-0 6-4

यास्मीन करीमजानोवा(उझबेकीस्तान)वि.वि हिमरी सातो(जपान)(2)6-3 6-4

मना कावामुरा(जपान)(5)वि.वि सेव्हील युलदाशिव(उझबेकिस्तान)7-6(6) 6-2

फुना कोझाकी(जपान)(6) वि.वि. याकतेरिना दिमित्रीचेंको(कझाकस्तान) 4-6 6-3 6-2

 

 

दुहेरी गट-उपांत्यपूर्व फेरी: मुले

सिध्दांत बांठीया(भारत)/मेघ भार्गव पटेल(भारत)(1) वि.वि नथ्यूत एन(थायलंड/ सेबॅस्टियन नोटाफ्ट(हाँगकाँग)7-5 7-6(7)

क्रिस्टीन डीडीयर चिन(मलेशीया)/ सेर्गेय फोमीन(उझबेकिस्तान)(3) वि.वि. ओ डेडा मुहम्मद ए रझ्झा(इंडोनेशिया)/कबिर हंस(भारत) 6-1 6-1

देव जावीया(भारत)/मन शहा(भारत) वि.वि केविन पटेल(भारत)/आर्यन झवेरी(भारत) 6-4 7-6(2)

सीओन याँग हन(कोरिया)/ सुकसुमराम टी(थायलंड)(2)वि.वि साई कार्तिक रेड्डी गंटा(भारत)/माधवीन कामत(भारत)  4-6 6-2 [12-10]

 

दुहेरी गट मुली-

हिमारी सातो(जपान)/मनचया सवांगकिइ(थायलंड)वि.वि. याकतेरिना दिमित्रीचेंको(कझाकस्तान)/ यास्मीन करीमजानोवा(उझबेकीस्तान) 6-2, 6-4;

प्रिस्का मॅडेलिन नुगरो(इंडोनेशिया)/ जियाकी वांग(चीन)(4) वि.वि जियाकी हुंग(चीन)/ वांग होई की जेनी  6-2, 6-2;

मना कावामुरा(जपान)/फुना कोझाकी(जपान)वि.वि.काव्या सेव्हेनी(भारत)/सेव्हील युलदाशिव(उझबेकिस्तान)6-3, 6-4;

साकी इमामुरा(जपान)/पुन्नीन कोवापिटुकटेड(थायलंड)वि.वि. मई नपात निरुदोर्न(थायलंड)/ वांग हाँग यी कोडी(हाँग काँग)(2)6-2, 6-1.

आर्थिक सक्षम महिलेला समाजात सन्मान मिळतो- विजया रहाटकर

0

पुणे- स्वस्त, दर्जेदार स्वदेशी उत्पादनांसाठी देशातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. राज्य महिला आयोगाच्या वतीने महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, सन्मान आणि सुरक्षितता यावर विशेष भर देत आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलेला समाजात सन्मान मिळतो, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले.
‘नवभारत निर्मिती संकल्प सिध्दी’ आणि ‘अनव सेवा ङ्गाउंडेशन’ यांच्या वतीने सिध्दी गार्डन येथे आयोजित केलेल्या ‘आपली दिवाळी, स्वदेशी दिवाळी‘ या गृहोपयोगी स्वदेशी उत्पादनांची विक‘ी व प्रदर्शनाचे उद्घाटन करताना रहाटकर बोलत होत्या. ङ्गाउंडेशनचे अध्यक्ष योगेश गोगावले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, शशिकला मेंगडे, विनिता काळे, आशा बिबवे, उषा वाजपेयी यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वदेशी वस्तूंचा प्रचार व प्रसार, महिला उद्योजकांना प्रोत्साहन, दिवाळीनिमित्त पुणेकरांना स्वस्त व दर्जेदार गृहोपयोगी उत्पादने उपलब्ध करून देणे या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन केल्याची माहिती गोगावले यांनी प्रास्ताविक भाषणात दिली. शशिकला मेंगडे यांनी स्वागत, पुनीत जोशी यांनी सूत्रसंचालन आणि आशा बिबवे यांनी आभार मानले.

इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस, आकाश कंदील, एलईडी बल्बच्या माळा, पणत्या, उटणे, अत्तरे, साबण, रांगोळी, छाप, पूजा साहित्य, ड्रेस मटेरियल, साड्या, कुर्ता, लहान मुलांचे कपडे, ङ्गराळाचे पदार्थ, सर्व प्रकारची पिठ व भाजण्या, लोणची, पापड, मसाले, चटण्या, ज्यूटच्या बॅगा, खणाच्या बॅगा, लेदर पर्सेस, चप्पल, कुंड्या, रोप, किल्ले, चित्रे आणि विविध राज्यातील खाद्यपदार्थ प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. स्वामिनी साडीच्या वतीने दररोज लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले असून, दररोज पाच भाग्यवंत महिलांना स्वामिनी साड्या देण्यात येणार आहेत. २८ ऑक्टोबरपर्यंत सकाळी १० ते ९ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

सौरऊर्जेच्या माध्यमातून शासकीय कार्यालयांचा कायापालट-ऊर्जामंत्री

0

पुणे-– महाऊर्जा मुख्यालयाची अत्याधुनिक इमारत ही देशातील एक आदर्श कार्यालयाची इमारत म्हणून निर्माण केली जाणार आहे, या इमारतीत सौरऊर्जेचा सुयोग्य असा वापर करून ही पर्यावरणपूरक वास्तू निर्माण करण्यात येत आहे. येत्या काळात राज्यातील सर्वच शासकीय इमारतींची रचना पर्यावरणपूरक तत्त्वावर करून सौरऊर्जेच्या माध्यमातून शासकीय कार्यालयांचा कायापालट करण्यात येईल, असे प्रतिपादन ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा तसेच राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले.

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या (महाऊर्जा) मुख्यालय इमारतीची पायाभरणी श्री. बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट होते. यावेळी  जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, आमदार मेधा कुलकर्णी, महाऊर्जा महासंचालक आनंद लिमये, अतिरिक्त महासंचालक पुरुषोत्तम जाधव, प्रदेश संचालक महेश आव्हाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, राज्य शासन सर्वांसाठी शाश्वत आणि स्वस्त वीज निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामध्ये महाऊर्जा संस्थेची महत्त्वाची भूमिका आहे. या संस्थेच्या कार्यालयाची निर्मिती अत्याधुनिक व पर्यावरणपूरक पद्धतीने निर्माण करून या प्रयत्नांची सकारात्मक सुरूवात झाली आहे. सर्वत्र 100 टक्के सौरऊर्जेवर आधारित वीजेचा वापर होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनीही त्यांच्या शेतात सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करावा.

पालकमंत्री श्री. बापट म्हणाले, महाऊर्जा कार्यालयाची इमारत ही एक आदर्श शासकीय इमारत म्हणून ओळखली जाईल. सौरऊर्जेच्या वापरामुळे मानवी जीवनात मोठ्या प्रमाणात बदल घडत आहे. शेतकऱ्यांनी याचा वापर केल्यास महावितरणच्या वीजेवर अवलंबून न राहता शेतकरी स्वयंपूर्ण बनण्यास मदत होईल.

याप्रसंगी जलसंपदामंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, महासंचालक आनंद लिमये, अतिरिक्त महासंचालक पुरुषोत्तम जाधव यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच प्रस्तावित इमारतीबाबत माहितीपर लघुपट दाखवण्यात आला. कार्यक्रमास महाऊर्जा विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच सामान्य नागरिक उपस्थित होते.

महाऊर्जा इमारतीची वैशिष्ट्ये

–           नेट झिरो एनर्जी, ५ स्टार ग्रीहा मानांकन या पर्यावरणपूरक तत्वावर बांधकाम

–           सुपर कन्झर्व्हेशन बिल्डिंग कोड (सुपर ईसीबीसी) मानांकन

–           नैसर्गिक प्रकाश योजनेचा अधिकाधिक वापर

–           एव्हॅपोरेटिव्ह कुलिंग तंत्रज्ञानाचा वापर जो ए.सी. पेक्षा 60 टक्के कमी वीज वापरतो

–           भूमिगत एअर टनेलद्वारे नैसर्गिकरित्या आरामदायक तापमान राखले जाते

–           नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांद्वारे इमारतीची 100 टक्के विजेची गरज भागविली जाईल.

–           आधुनिक सौर डिझाईन संकल्पनेच्या मदतीने वातानुकूलन यंत्रणेचा कमीत कमी वापर

–           इमारतीमध्ये अभिनव इंटिग्रेटेट फोटोव्होल्टाईक सिस्टीम

–           अभिनव रेडियन्ट कुलिंग तंत्रज्ञानाचा वापर

–           फ्री कुलिंगकरिता व्हेंचुरी इफेक्ट

–           उत्सर्जित ऊर्जेपासून ताजी हवा व उष्णतेचे पुनरुज्जीवन

या चोरांना किती कामे देणार ? (कचरा प्रकल्पांचा भांडाफोड -मुख्य सभेतील बाळा ओसवाल यांचे भाषण-व्हिडीओ)

0

पुणे – देवाची उरुळी येथील कचरा डेपोमधील बायोमायनिंग प्रकल्पाला काल महापालिकेच्या मुख्य सभेत उशिरा मान्यता देण्यात आली .  कलम 72 “ब’ नुसार मांडलेला हाप्रस्ताव दप्तरी दाखल करा. ही कंपनी करारानुसार काम करते की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी नगरसेवकांची समिती नेमा आणि पारदर्शकता आणा, या विरोधकांच्या मागण्या अमान्य करत सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर या कंपनीसाठी पुढील चार वर्षे आर्थिक तरतूद करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.देवाची उरुळी येथील कचरा डेपोमधील सुमारे 9 लाख मेट्रीक टन कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करून तेथील 20 एकर जागा रिक्त करण्याचे काम भुमी ग्रीन एनर्जी या कंपनीला देण्याचा प्रस्ताव यापुर्वीच स्थायी समितीने मान्य केला आहे. हे काम पुढील चार वर्षे सुरू राहणार असून त्यासाठी अंदाजपत्रकात तरतुद करण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीमार्फत मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला होता.
यावेळी शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल म्हणाले ,’  घनकचरा विभाग हा पोरासोरांचा कारभार झाला आहे. मुळात एक हजार चौ.फुटांपेक्षा अधिकची जागा आणि एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी ती द्यायची असेल तर, सर्वसाधारण सभेची परवानगी घ्यावी लागते. परंतु तसे न करता शेकडो चौ.फूट जागा चार वर्षांसाठी ठेकेदाराला नाममात्र एक रुपये चौ.फूट भाडेदराने देण्यात आली आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा काढण्यात यावी. यापुर्वीचा अनुभव लक्षात घेता ही कंपनी पारदर्शकपणे काम करते की नाही, हे पाहाण्यासाठी सर्व पक्षीय नगरसेवक आणि कचरा डेपोप्रश्‍नी एनजीटीमध्ये दावा दाखल केलेल्या स्थानिक नागरिकांचा समावेश असलेली समिती स्थापन करावी. त्यांनी दर महिन्याला स्थायी समितीला अहवाल द्यावा. या कामाची फेरनिविदा काढावी व हा प्रस्ताव दप्तरी दाखल करावा,

कचरा प्रकल्पांचा भांडाफोड -मुख्य सभेतील सुभाष जगताप यांचे भाषण (व्हिडीओ)

0

पुणे – देवाची उरुळी येथील कचरा डेपोमधील बायोमायनिंग प्रकल्पाला काल महापालिकेच्या मुख्य सभेत उशिरा मान्यता देण्यात आली . परंतु संबंधित ठेकेदार कंपनीचा एक वर्षाचा अनुभव लक्षात घेऊनच त्यांना पुढील काम द्यावे. त्यासाठी मुख्यसभेमध्ये या कामासाठी संबंधित कंपनीसाठी आर्थिक तरतुद करण्याकरीता कलम 72 “ब’ नुसार मांडलेला प्रस्ताव दप्तरी दाखल करा. ही कंपनी करारानुसार काम करते की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी नगरसेवकांची समिती नेमा आणि पारदर्शकता आणा, या विरोधकांच्या मागण्या अमान्य करत सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर या कंपनीसाठी पुढील चार वर्षे आर्थिक तरतूद करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.देवाची उरुळी येथील कचरा डेपोमधील सुमारे 9 लाख मेट्रीक टन कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करून तेथील 20 एकर जागा रिक्त करण्याचे काम भुमी ग्रीन एनर्जी या कंपनीला देण्याचा प्रस्ताव यापुर्वीच स्थायी समितीने मान्य केला आहे. हे काम पुढील चार वर्षे सुरू राहणार असून त्यासाठी अंदाजपत्रकात तरतुद करण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीमार्फत मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला होता.
यावेळी सुभाष जगताप म्हणाले, महापालिका प्रशासन पुर्वीपासून नवीन प्रकल्प आला की, त्याचे गोडवे गावून नगरसेवकांची फसवणूक करून प्रस्ताव मंजूर करून घेत आले आहे. यामागे चोरांची मोठी टोळी आहे. परंतु कालांतराने हे सर्व प्रकल्प एकतर बंद पडले आहेत, किंवा त्यातून पूर्ण क्षमतेने प्रक्रिया केली जात नाही. प्रशासन प्रकल्पांबाबत सातत्याने खोटे बोलत असल्याने एनजीटीने महापालिकेला दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याची वेळ आली आहे.

सोमवार पासून रोज तमाम पुणेकरांना 5 तासाचा समान पाणीपुरवठा (व्हिडीओ)

0

पुणे-‘पाणी वाचवा ,कपात टाळा’चा संदेश महापालिका प्रशासनाला देत ,सोमवार पासून रोज तमाम पुणेकरांना .. पुण्यातील सर्व भागांना 5 तासाचा समान पाणीपुरवठा करणारे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे असे आज येथे महापौर मुक्ता टिळक आणि आयुक्त सौरव राव यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.
पाटबंधारे खात्याने १३५० एम एल डी पाण्याऐवजी पुणे महापालिकेला ११५० पाणी प्रतिदिनी देण्याचे निश्चित केले आहे . त्यानुसार महापालिकेने पाटबंधारे ला दिवाळी होऊ देत नंतर पाण्यात कपात करा असे सांगितले असले तरी त्यामागे पुणेकरांचे पाणी कपात करण्याचा कोणताही मनसुबा नाही , पुणेकरांना आज जेवढे पाणी मिळते तेवढेच पाणी पाटबंधारे ने कपात केल्यावरही मिळाले पाहिजे या साठी महापालिका प्रशासनाने मार्ग शोधला आहे. पर्वती ते लष्कर जलकेंद्र पाणी कालव्यातून जाते इथे आणि अन्य काही ठिकाणी पाण्याची गळती होते आहे . हि गळती रोखली तर पुणेकरांपर्यंत १३५० एम एल डी म्हणजे पुरेसे पाणी पोहोचू शकते असा सत्ताधारी आणि प्रशासनाचा दावा आहे. पर्वती ते लष्कर जलकेंद्र पाणी कालव्यातूनदेण्या ऐवजी ते बंद पाईपलाईन मधून दिले तर  १५० एम एल डी पाण्याची गळती रोखली जाईल असाही त्यांचा दावा आहे . आणि हि गळती रोखल्याने १५० एम एल डी पाणी अतिरिक्त उपलब्ध होईल . १५ नोव्हेंबर पर्यंत हि पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण होईल आणि या प्रमाणे आपण आज हि काही ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून पाण्याच्या गळतीचा मागोवा घेवून उपाययोजना करीत आहोत असे यावेळी आयुक्तांनी सांगितले .
काही भागात २ तास काही भागात ८ तास असा विषम स्वरूपात पाणी पुरवठा सध्या होतो आहे . तो टाळून सर्वत्र 5 तास पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले जात आहे असेही महापौर आणि आयुक्तांनी सांगितले.कोणत्याही परिस्थितीत पाटबंधारे ने जरी कपात केली तरी अशा मार्गाने पुणेकरांच्या पाण्यात कपात होऊ न देण्याचा निर्धार सत्ताधारी भाजप चे पदाधिकारी आणि प्रशासनाने केला आहे .

‘गुळ, बेदाणा व काजू महोत्सवास ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद’

0

पुणे,दि.23:- महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत‘गुळ, बेदाणा व काजूमहोत्सव 2018’चे आयोजन श्री गणेश कला क्रिडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे दि. 17 ते 21 ऑक्टोबर 2018 करण्यात आलेले होते. कोल्हापूर,सांगली,कोकण विभाग तसेच राज्यातील अन्य भागातून शेतकरी,शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कंपन्या,सहकारी संस्था या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले होते. सुमारे 50 स्टॉलच्या माध्यमातून खास दसरा-दिवाळी सणा निमित्त पुणेकरांना उपलब्ध करून देण्यात आले.

महोत्सवामध्ये काजु,गुळ,बेदाणा,हळद,काकवी,गुळ पोळी,गुळ वडी,आवळ्यापासून केलेले प्रक्रिया पदार्थ, आजरा घणसाळ तांदूळ, काजू गर, आमसूल/कोकम इ. उपपदार्थही पुणेकरांना उपलब्ध करून देण्यात आले होते. त्याबरोबरच यामधील बरीच उत्पादने हे सेंद्रिय असल्याने महोत्सवास पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.काही उत्पादकांना पुनश्च पुरवठा करण्यासाठी येथील ऑडर्स तसेच काही उत्पादक गट/कंपनी यांना निर्यातीसाठी नमुना पाठविण्याबाबत सांगण्यात आले.

या महोत्सवात साधारणपणे 3600 किलो गुळ,1100 किलो बेदाणा,1020 किलो काजु विक्री झालेली असुन हळद व इतर उपपदार्थांचीही मोठ्या प्रमाणत विक्री झाली. महोत्सवाद्वारेसुमारे रु.22 लाखापेक्षा जास्त उलाढाल झाली, एकुणच महोत्सवास ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला.सुमारे 15 हजार पुणेकरांनी भेट दिली, अशी माहिती कार्यकारी संचालक, श्री. सुनिल पवार यांनी दिली.

एहसानच्या साथीनं विद्यार्थ्यांचं ‘रॉक ऑन’

0
ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कुलमध्ये घेतला ‘मास्टरक्लास’; सेल्फी, ऍटोग्राफसाठी झुंबड
पुणे : ‘तू धूप है, तू छाव है’ गुणगुणताना ‘तारे जमीन पर’ अवतरले, तर ‘कल हो ना हो’ म्हणत ‘दिल चाहता है’ चा अनुभव दिला. ‘जिंदा है तो’ गात एहसानच्या साथीनं विद्यार्थ्याचं ‘रॉक ऑन’ मंगळवारी पाहायला मिळालं! आपल्या आवडत्या संगीतकारांबरोबर ‘सेल्फी फोटोग्राफ आणि आटोग्राफ घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली.
निमित्त होतं, केजे एज्युकेशनल इंस्टीट्युटच्या ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कुलमधील संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रसिद्ध संगीतकार एहसान नूरानी यांनी घेतलेल्या ‘मास्टरक्लास’चं. ‘टॉरन्स अकॅडमी’च्या वतीने ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कुलमधील विद्यार्थ्यांना संगीताचे प्रशिक्षण दिले जात आहे. या ‘मास्टरक्लास’नंतर रंगलेल्या ‘जामसेशन’मुळे विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
यावेळी केजे एज्युकेशनल इन्स्टिटयूटचे खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा देशमुख-जाधव, विभावरी जाधव, ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कुलच्या प्राचार्या प्रीती सांगवान, टॉरन्स अकॅडमीचे सुनील सुंदरन आणि शिक्षक-शिक्षकेतर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एहसान नूरानी म्हणाले, “संगीत मला आवडते आणि मी ते जगतो. सतत नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न संगीतकाराने केला पाहिजे. मनातील भीती दूर करून वाजवत राहणे महत्वाचे असते. संगीतामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तित्वाला आकार येतो. त्यामुळे एखादे तरी वाद्य वाजवण्यास आपण शिकावे. शाळा-महाविद्यालयांनी संगीत शिकण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. ट्रिनीटीचा पुढाकार कौतुकास्पद आहे. जुन्या काळातील हेमंतकुमार, आर. डी. बर्मन, ए. आर. रहमान हे माझे आवडते संगीतकार आहेत.”
हर्षदा देशमुख-जाधव म्हणाल्या, “माणसाला जीवनात आनंदी ठेवण्यासाठी संगीत अतिशय महत्वाचे आहे. आपण जे संगीत वाजवतो ते स्मरणीय होते. एहसान यांची अनेक गाणे स्मरणात राहणारी आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करावा.”

बेरोजगारांना फुले सजावटीतून रोजगाराची संधी

0
बुके सजावट कार्यशाळेचे २ व ३ नोव्हेंबर रोजी आयोजन  
पिंपरी / प्रतिनिधी :
संत तुकारामनगर येथील ओम फ्लॉवर इन्स्टिट्यूटच्यावतीने येत्या 2 आणि 3 नोव्हेंबर रोजी फुले सजावट प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा संत तुकारामनगर पिंपरी येथील ऍटलास कॉलनी हॉल येथे सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत पार पडणार आहे, अशी माहिती इन्स्टिटयूटचे संस्थापक केशव त्रिभुवन यांनी दिली.
      पिंपरी चिंचवडच नव्हे, तर राज्यात अन्यत्र कुठेही अशा प्रकारचे प्रशिक्षण मिळत नाही. आज पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरात अनेक छोटे मोठे फुल व्यावसायिक आहेत. मात्र, यातील निम्म्यापेक्षा अधिक व्यावसायिक केवळ हाराचाच व्यवसाय करतात. त्यांना फुल सजावटीचे ज्ञान नसल्यामुळे ते याकडे वळत नाहीत. आज सजावटीला खूप महत्व येत चालले आहे. त्यामुळे या व्यवसाययिकांची अडचण लक्षात घेऊन या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
      या कार्यशाळेत सर्व प्रकारचे बुके बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. टेबल डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, गाडी सजावटीचे सर्व प्रकार, गणपती डेकोरेशन अशा अनेक प्रकारच्या फुलांच्या सजावटीचे प्रकार शिकविण्यात येणार आहेत. या कार्यशाळेत बेरोजगार तरुण- तरुणी, तसेच छोटे फुल व्यावसायिक आणि ज्यांना फुल सजावटीची आवड आहे, असे कुणीही यामध्ये सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी  केशव त्रिभुवन यांच्याशी 9822108069 / ९३७२१०८०६९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.