Home Blog Page 3053

सांगा ‘सु’ करायची कुठं….? पुण्यात ‘बोंब ‘

0

पुणे-तंबाखू, गुटखा, पानमसाला खाऊन जागोजागी  पिचकाऱ्या उडविणाऱ्यांना काय शासन करायचे ते करा …. पण…  पुण्यात ‘सु’ आणि ‘थू’ करायची तरी कुठे ? हे जरा  तुम्हीच सांगा, साहेब, कि ‘सु’ आणि ‘थू’ पोटातच जिरवून ‘हाक ना बोंब ‘ मारायची तेही तुम्हीच सांगा … अशी मुश्कीलीची स्थिती  आता पुण्यात ओढवणार आहे कि काय ?असा प्रश्न उपस्थित करणारी  परिस्थिती निर्माण होते आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे १५० रुपये,रस्ते, मार्गांवर घाण करणे १८० रुपये,

उघड्यावर लघुशंका करणे २०० रुपये, उघड्यावर शौच करणे २०० रुपये,

अशा पद्धतीने महापालिकेने दंड आकारणी सुरु केली आहे आणि १६० जणांवर कारवाई देखील केली आहे अशी माहिती महापालिकेचे घनकचरा प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी माध्यमांना दिली आहे .या कारवाईच्या पार्श्वभूमीवर  आता पुण्यात ही बोंब उठल्यास नवल वाटणार नाही .

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, घाण केल्यास, लघुशंका अथवा शौच केल्यास जागेवरच दंड आकारण्याचे अधिकार कायद्याने महापालिकेसह पोलिसांना देखील दिलेले आहेच . हि नवी बाब नाही .पण या दोन्ही पातळीवरून आज पर्यंत यावर विशेष दाखल घेण्यात आली नाही त्याला कारण हि तसेच आहे .एवढ्या मोठ्या ..वेगाने भरभर वाढणाऱ्या पुण्यात .. महापालिकेने ना ‘सु ‘ करायची सुव्यवस्था ठेवली आहे ना ‘थू ‘ ला पिंक दानी ठेवली आहे .
आठ लाखाची गाडी आणि चार लाखाचा टॅक्स घेणाऱ्यांनी, ना रस्ते दिले ,ना वाहनतळे उपलब्ध करून दिली .केंद्राचा जीएसटी, राज्याचा जीएसटी,आरटीओ ची फी ,सर्विस चार्ज अशा विविध नावाने वाहन घेताना हिसकावला जाणारा कर पाहिला तर तो ४० टक्केच्या घरात जातो .पण एवढे सारे पैसे हिसकावून सरकार करते काय ? पार्किंगला ना जागा देते ,ना सुव्यवस्थित रस्ते देते ..केले तर ,रस्ते,वाहनतळे बीओटी वर..त्यामुळे टोळधाड आलीच . ती वेगळीच .आता महापालिका पर्यावरण कर ,सफाई कर ,शिक्षण कर,विकास कर  … अशा विविध मार्गाने दरवर्षी वाढ होणारी ‘करवसुली ‘ करतेच .पण … पुण्यात ‘सु ‘ करायला सुद्धा कुठे व्यवस्था करवून ठेवली नाही .आणि थू करायला सुद्धा करवून ठेवली नाही .
कायदा वर्षानु वर्षांचा जुना आहे. मग आताच का हो..अंमल करावासा वाटला .काय इलेक्शन फंडाला पैसा हवाय ? असा प्रश्न एखादा विरोधक उपस्थित करणार नाही असे समजू नका .
प्लास्टिक ला पर्याय दिला नाही आणि आणली प्लास्टिक बंदी , पार्किंग ची व्यवस्था केली नाही आणि सुरु केली पे आणि पार्क योजना ,’पुणे’ म्हणजे काय छळ करवून घेणारे ‘अभागी शहर ‘तुम्ही समजलात काय ?
कायदा राबविन्यासाठीच असतो …राबवा जरूर ..पण तो लोकांनी  मोडू नये , म्हणून प्रथम तशी  व्यवस्था करणे .हे पहिले कर्तव्य ते राबवू पाहणाऱ्याचे ठरते ..हे तुम्ही विसरू शकत नाही …थोडक्यात गुन्हेगाराला  शिक्षा करणे हे  कायद्याचे कर्तव्य आहेच . पण सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याला साथ देणे हे त्याही अगोदर चे प्रथम कर्तव्य कायद्याचे आहे .
…तुम्हाला लाखो पुणेकर ..प्रश्न करतील ..’मी सध्या इथे आहे.. पोट तुंबलेय ..कुठे करू ‘सु ‘  ?…. आहे उत्तर तुमच्याकडे देण्यासाठी … नसेल तर त्याचा ‘आडोसा’ त्याला शोधण्याचा मानवधिकार हि त्याच्याकडे आहे, हे विसरू नका ..
तुमच्याकडे कचरा कुठे टाकायचा ..याही जागा निश्चित नाही ..आणि पुरेश्या नाहीत, पिंकदाण्या सोडाच स्वच्छतागृहांची व्यवस्था तुम्ही केलेली नाही .आणि मग कुठल्या आधारावर तुम्ही या कारवाया सुरु केल्यात . निव्वळ सरकारी हुकुमांची गुलामगिरी तुमच्यासारख्यांनी पत्करने कोणी मान्य करणार नाही मग हा अट्टाहास आताच का सुरु केला ?
या कारवाईसाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दोन नोव्हेंबरपासून विभागस्तरावर एक आणि प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एक अशी एकूण सोळा पथके तैनात केली आहेत. या पथकांनी दोन नोव्हेंबरपासून दंडात्मक कारवाईस सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये वचक निर्माण होत आहे. या कारवाईची माहिती देण्यासाठी पालिका प्रशासनाने शुक्रवारी नोटीसही जाहीर केली न, त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांवर आकारल्या जाणाऱ्या दंडाची रक्कमही नमूद करण्यात आली आहे. नागरिकांनी या नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.आणि  आठ दिवसांत १६० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांना शिस्तीचे धडे द्यावे आणि स्वच्छतेविषयक जागृती व्हावी, हा या मोहिमेचा उद्देश असल्याचेतुम्ही सांगत आहात … पण हेच धडे महापालिकेने स्वतः गिरविले आहेत काय? बघाल का जरा ? महापालिकेच्या नव्या इमारतीत मुख्य सभा सुरु होऊन ३ महिने होतील आता .. तेथील स्वच्छतागृहांची अवस्था कधी बघितली काय आपण ?असाही सवाल घनकचरा विभागाला करता येणार आहे.
एकूण लोकसंख्येला दरडोई किती पाणी पुरवठा करावा ..हे ठरविणाऱ्या तुमच्या शासनाने ..लोकसंख्येनुसार, वाहतुकीच्या वर्दळी नुसार  किती परिघाच्या ,किती क्षेत्रफळाच्या जागेत ..किती मुताऱ्या हव्यात ,किती पिंकदाण्या हव्यात ,किती वाहनतळे हवीत याचा विचार कधी केलाय काहो .. आणि जी काही स्वच्छता गृहे आहेत ..ती खरोखर वापरण्याजोगी ठेवलीत काहो …?
दंड जरूर करा .. पण कधी अगोदर या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर .. नाही तर अशा कारवाया ..म्हणजे अधिकाऱ्यांनी केलेली गुलामगिरीच ठरेल असे म्हटल्यास वावगे ठरेल काय ?

एसबीआयचा तांत्रिक बिघाड- सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात डबल पगार जमा :

0

नवी दिल्ली – देशाची सर्वात मोठी बँक SBI ने 31 ऑक्टोबर रोजी आपल्या एटीएम मशीनमधून कॅश काढण्याची सीमा दुप्पट केली. यापूर्वी 20 हजार रुपयांची दैनंदिन मर्यादा 40 हजार रुपये करण्यात आली. परंतु, हे करत असताना एसबीआयकडून अशी एक चूक घडली की पंजाबच्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा आनंद काही क्षणांसाठी का होत नाही दुपटीने वाढला. अर्थात अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यांमध्ये महिन्याचा पगार दुप्पट जमा झाला. बँकेने आपले सर्व्हर खराब झाल्याने ही तांत्रिक चूक घडल्याचे म्हटले आहे. सोबतच ज्या-ज्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात दुप्पट पगार पडला, त्या सर्वांची खाती आता बँक सील करत आहे. इतर काही राज्यांमध्येही सुद्धा या चुकीचा परिणाम दिसून आला आहे.

सॉफ्टवेअरच्या गोंधळामुळे झाली चूक

बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब सरकारने सर्वच विभागांना निर्देश दिले आहेत की त्यांनी आप-आपल्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक चुकीची माहिती द्यावी. या तांत्रिक बिघाडामुळे आपल्या खात्यांत चुकून डबल पगार जमा झाला असे त्यांना सांगावे. यानंतर सरकारने एक आदेश जारी करून कर्मचाऱ्यांना आपल्या खात्यातून रक्कम काढू नये असे सांगितले. डबल वेतन जमा झालेल्या सर्वच कर्मचाऱ्यांच्या खात्यातून अतिरिक्त पैसे काढून नोंद करण्यात आली. परंतु, अजुनही अनेक कर्मचाऱ्यांना बँकेत रिपोर्ट केलेले नाही. त्यापैकी काहींना एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न देखील केला. काही लोक त्यामध्ये यशस्वी ठरले. तर काहींना ते पैसे काढताच आले नाहीत. ज्यांनी आपल्या वेतनापेक्षा अधिकची रक्कम काढली त्यांच्याकडून बँक पैसे वसूल करणार आहे

कमल हासनची कन्या अक्षराचे बाथरूम सेल्फी इंटरनेटवर लीक.. मुंबईत सायबर सेलमध्ये तक्रार दाखल

0

मुंबई- बॉलिवूड अभिनेता कमल हसनची कन्या आणि अभिनेत्री अक्षराचे बाथरूम सेल्फी इंटरनेटवर लीक झाल्याप्रकरणी गुरुवारी रात्री मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्‍यात आली.

अक्षराने सांगितले की, तिने खुद्द हे फोटो शेअर केलेले नाहीत. ती सायबर क्राइमची बळी ठरली आहे. फोटो अॅक्ट्रेस दीवाना नावाच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आले आहेत. हे फोटोज रिअल आहेत की फोटोशॉपच्या मदतीने तयार करण्यात आले आहेत, हे सांगणे कठीण आहे.

बिग बींसोबत अक्षराने केले होते पदार्पण…
27 वर्षीय अक्षराने 2015 मध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन स्टारर ‘शमिताभ’मधून बॉलीवूड डेब्यू केला होता. चित्रपटात ती धनुषची प्रेयसी होती. ‘शमिताभ’नंतर ती नसिरुद्दीन शहा यांचा मुलगा विवान शहाच्या अपोझिट ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’मध्ये दिसलेली आहे. सुपरस्टार अजीत कुमार स्टारर तमिळ मूव्ही ‘विवेगम’मध्येही तिने स्पेशल रोल केलेला आहे. अक्षरा सध्या आपल्या वडिलांचा तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपट ‘सुभाष नायडू’मध्ये असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम पाहत आहे.

2017 मध्ये धर्म परिवर्तनामुळे चर्चेत आली होती अक्षरा
अक्षरा 2017 मध्ये चर्चेत आली होती. तिने तेव्हा बौद्ध धर्मात रूची दाखवली होती. एकीकडे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते, दुसरीकडे तिचे वडील कमल हासन यांनी तिला सपोर्ट केला होता. कमल म्हणाले होते की, मी माझ्या मुलीसेाबत आहे आणि इतर कशाहीपेक्षा मला मुलीचे प्रेम महत्त्वाचे आहे.

देशाची जनताच मोदींना फासावर लटकावेल

0

मुंबई -नोटाबंदीचा निर्णय चुकीचा ठरल्यास मला फासावर लटकवा, असे मोदींनी म्हटले होते. आता दोन वर्षानंतर नोटाबंदीचा निर्णय चुकीचाच होता हे सिद्ध झाले आहे. खुद्द मोदीही भाषणांमध्ये आता नोटाबंदीवर बोलत नाहीत, असे नमूद करतानाच देशातील जनताच २०१९ मध्ये मोदीना फासावर लटकवेल, ही शारीरिक हत्या नसेल तर राजकीय हत्या असेल, असे विधान काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केले आहे.

नोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. ‘नोटाबंदीला दोन वर्ष पूण झाल्यानिमित्त मी मोदींना त्यांच्याच शब्दांची आठवण करुन देतो. त्यांनी फासावर लटकवा, असे म्हटले होते. आता तुम्हालाच फासावर जायचंय. आम्ही तुमच्यासारखे क्रूर नाहीत. आम्ही तुम्हाला फासावर लटकवणार नाही. देशातील जनताच तुम्हाला फासावर लटकवेल. ही शारीरिक हत्या नसेल. तर ही एक राजकीय हत्या असेल’, असे त्यांनी सांगितले. २०१९ मधील निवडणुकीत जनता मोदींचा पराभव करणार, या उद्देशाने हे विधान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोदींनी गरीबांना त्रास देण्यासाठी नोटा बदलल्या. आता जनतेने जशा नोटा बदलल्या तसेच पंतप्रधानांनाही बदलावे. मोदी पुन्हा सत्तेत आले तर लोकांचं जगणं कठीण होईल. देशातील संविधानाला धोका निर्माण होईल. सध्या तसंही लिहिण्यावर- बोलण्यावर निर्बंध आहेत, दोन पक्षांनी एकत्र येण्यावरही निर्बंध आहेत. शकुनी मामासारखं त्रास देण्याचे काम मोदी आणि तडीपार अमित शाह करत असून त्यांच्याविरोधात विद्रोह करण्याची वेळ आली आहे. पाच राज्यांमधील निवडणुकीत आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतही मोदी व भाजपाचा पराभव करावा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

नोटाबंदीचा निर्णय चुकीचाच होता आणि याचा सर्वात मोठा पुरावा खुद्द मोदीच आहेत. आता नोटाबंदीबाबत मोदीही भाष्य करत नाही. फक्त अरुण जेटलीच नोटाबंदीचे समर्थन करत आहेत. नोटाबंदीमुळे जीडीपी दीड ते दोन टक्क्यांनी घसरला, १५ ते २० लाख लोकांनी रोजगार गमावला, संपूर्ण देश उद्ध्वस्त झाला. अशा परिस्थितीत मी मोदींना त्यांच्या विधानाची आठवण करुन देतो. आता कोणत्या चौकात फासावर लटकायचंय हे मोदींनीच सांगावे, असेही निरुपम यांनी म्हटले आहे.

बळीराजा गौरव मिरवणूक संपन्न

0
पुणे-सालाबादप्रमाने बळीराजा गौरव मिरवणूकीचे आयोजन सत्यशोधक प्रबोधन महासभा, विश्वसम्राट बळीराजा गौरव समिती व शेतकरी सभा यांच्या वतीने करण्यात आले होते. महात्मा फुलेवाडा ते लाल महाल अशी मिरवणूक अतिशय उत्सवाच्या वातावरणात पार पडली. गेली पंधरा वर्षे बळीराजा मिरवणूकीचा हा उपक्रम सातत्याने चालू आहे. कष्टकर्यांचे जेष्ठ नेते डाॅ. बाबा आढाव, प्रा. प्रतिमा परदेशी,अंकल सोनवणे, रमेश राक्षे,सचिन बगाडे , लोंढे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बळीराजा मिरवणूकीला महात्मा फुलेवाड्यावरून सुरूवात होऊन लालमहालाकडे मार्गस्थ झाली. मिरवणूकीच्या मार्गावर विविध ठिकाणी अनेक संस्था, संघटनांनी बळीराजाचं स्वागत व गौरव करण्यात आला.यावेळी बळीराजाच्यावतीने कृषीधनाचे वाटप करण्यात आले व असे सुगीचे दिवस येणार आहेत असा विश्वास लोकांच्यामध्ये या मिरवणूकीच्या निमित्ताने निर्माण करण्यात आला. यावेळी बळीराजाच्या  वेषात समता परिषदेचे प्रा. रघुनाथ ढोक होते. या मिरवणुकीचे वैशिष्टय म्हणजे विविध राजकीय, सामाजिक संस्था,संघटनांचे कार्यकर्त्यांचा सहभाग सहभाग या मिरवणुकीत होता. यांत प्रामुख्याने भारिप बहुजन महासंघांचे पुणे शहर अध्यक्ष अतुल बहुले, भारिप पुणे जिल्हा(पश्चिम) चे उत्तम वनशिव, शहर व जिल्हा कार्यकारणीचे सदस्य राॅबिन सॅमुअल,अजित पानसरे, नवनीत अहिरे, संदिप चौधरी , संजय गायकवाड, माजी अध्यक्ष ॲड. किरण कदम .राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.प्रल्हाद वडगांवकर,संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, वारसा फाउंडेशनच्या प्राची दुधाने,   भारतीय बौध्द महासभेच्या अानिताताई चव्हाण, रामलिंग टेकाळे ,
प्रबुध्द भारत पाक्षिकाचे विलास टेकाळे , आनिता टेकाळे , संजय धावारे.सुनीता भगत
बळीराजा गौरव समितीचे रोहिदास तोडकर, प्रतिक परदेशी, आकाश ढोक,वामन वळवी,आप्पाराव चव्हाण, महेश बनकर,अर्चना झेंडे, रवि झेंडे.इ. अनेक मान्यवर कार्यकर्ते या मिरवणुकीत सामील झाले होते. ही मिरवणुक लाल महाल येथे आल्यानंतर राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला हार अर्पण करून ॲड मोहन वाडेकर व प्रा. प्रतिमा परदेशी यांच्या मार्गदर्शनपर भाषणांनंतर संपली.

हुतात्मा राजगुरु यांचा जन्मवाडा दिव्यांनी उजळला

0

पुणे-दिपावलीनिमित्त आपल्या घरापासून ते शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणी विविध रंगांच्या प्रकाशात, पणत्या लावून दिपोत्सव साजरा केला जातो. त्याच उत्साहात दिपावलीनिमित्त क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या जन्म वाड्यावर राजगुरुनगर येथील  तरुणांनी एकत्र येऊन जाणीव ग्रुप, आम्ही राजगुरुनगरकर यांच्या माध्यमातून हुतात्मा राजगुरुवाडा दिपोमय केला. आपल्या गावातील एक तरुण देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा लढा देऊन हसत हसत फासावर गेले. त्याच हुतात्म्याच्या जन्मभूमीत दिपावलीच्यानिमित्त पाडव्याच्या मुहूर्तावर संपूर्ण राजगुरु वाडा पणत्या लावून लखलखीत करण्यात आला होता. देशाच्या नकाशाची तिरंग्यात रांगोळी कडून दिव्यांनी सजवण्यात आली होती.

गेल्या आठ दिवसांपासून सोशल मीडियावर जाणीव ग्रुपच्या माध्यमातून राजगुरु वाड्यावर होणाऱ्या दिपोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत गावागावातील तसेच राजगुरुनगर शहरातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दिपोत्सवात “आम्ही राजगुरुनगरकर” हा ग्रुपही सहभागी झाला होता. क्रांतीकारक हुतात्मा राजगुरुंच्या जन्म वाड्याच्या प्रवेश द्वारापासून ते जन्मखोली आणि समोरील गार्डन ध्वजस्तंभ या सर्व परिसरात दिवे लावण्यात आले होते.पवित्र अशा भीमानदीच्या तिरावर असणाऱ्या या क्रांतीकारकाच्या वाड्याचे दिपोत्सवामुळे रुप पालटले. डोळे दिपवून टाकणार हा दिपोत्सव पहाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

सांगवीत उत्साहात दीपोत्सव

0
पिंपरी-
 जुनी सांगवीतील श्री गजानन महाराज मंदिर, वेताळ महाराज मंदिर, मारूती मंदिर, तुळजाभवानी मंदिर, महानुभव मठ, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आदि ठिकाणी आमदार लक्ष्मण जगताप मित्र परिवारातर्फे पाडव्यानिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला.
              आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन मंदीर परिसरामध्ये दीपोत्सवास सूरुवात करण्यात आली. यावेळी पाच हजार पणत्या प्रज्वलीत करण्यात आल्या. मंदीर परिसर प्रकाशाने उजळला होता. यावेळी नगरसेविका माई ढोरे, शारदा सोनवणे, नगरसेवक हर्षल ढोरे, शशिकांत कदम, संतोष कांबळे आदींसह नितीन खोडदे, दत्तात्रय येनपुरे, संतोष ढोरे, अरूण ढोरे, भजनी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी ढोरे, हभप मनोहर पवार, राजाराम कड, अशोक ढोरे, सतपाल ढोरे, संयोजक जवाहर ढोरे, शरद ढोरे व गजानन महाराज सर्वन्यास मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

बागुल मित्र परिवारातर्फे ‘एक पणती शहिदांसाठी ‘उपक्रम

0
पुणे –
ज्यांच्या प्राणांच्या आहुतीमुळे आज आपल्या सर्वांचे जीवन प्रकाशमय आहे, अशा शहीद जवानांचे स्मरण आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिवाळी पाडवा दिनी  शहिद वरिष्ठ पोलीस अधिकारी  अशोक कामटे यांच्या निवासस्थानी शेकडो पणत्या प्रज्वलित करून दिवाळीनिमित्त शहिदांचे  स्मरण करण्यात आले . 
 पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल आणि मित्रपरिवाराने या उपक्रमाचे आयोजन केले होते.   शहीद अशोक कामटे यांचे पुत्र राहुल अशोक कामटे यांच्या प्रमुख उपस्थितीत  उपस्थितीत  पिंपळे निलख येथील कामटे यांच्या निवासस्थान परिसराची स्वच्छता करून रांगोळी साकारण्यात आली.  शेकडो पणत्या प्रज्वलित करून शहीद जवानांचे स्मरण करण्यात आले. यावेळी पुणे नवरात्र महोत्सवाचे पदाधिकारी घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, सागर बागुल, हेमंत बागुल, अभिषेक बागुल,  धनंजय कांबळे, ,इम्तियाज तांबोळी, पप्पू देवकर, गणेश पवार, गणेश खांडरे, गोरख मरळ, सोमनाथ कोंडे ,महेश ढवळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.  संयोजक अमित बागुल म्हणाले अभूतपूर्व साहस, जाज्ज्वल्य देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, नि:सीम धैर्य आणि कठोर निर्धार यांच्या बळावर प्रतिकूल निसर्ग आणि  अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असताना त्यांवर मात करत, आपल्या जिवाची तमा न बाळगता ‘छोडो मत उनको!’ असं म्हणत शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणारे भारतीय सैन्याचे वीर जवान, पोलीस अधिकारी ! …पण शहीद झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांचे काय ?त्यांची दिवाळी कशी यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये. दिवाळीनिमित्त या कुटुंबियांसमवेत काही क्षण व्यतीत करावे आणि शहिदांचे  स्मरण करून त्यांना अभिवादन करावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. या अगोदर शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या सातारा जिल्ह्यातील  ,  चंदू चव्हाण यांच्या धुळे जिल्ह्यातील निवासस्थानी शौर्य गुढी उभारण्यात आलेली आहे ,असेही अमित बागुल म्हणाले. 

ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे निधन

0

पुणे-ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे शुक्रवारी पहाटे पुण्यात वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. अनेक गाजलेल्या नाटकांमधून त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारल्या.जंगली कबुतर,लग्नाची बेडी ,सखाराम बाइंडर ,संभूसांच्या चाळीत,गिधाडे  अशी त्यांच्या गाजलेल्या नाटकांची नावे आहेत .

लालन सारंग यांचा २६ डिसेंबर १९४१ रोजी गोव्यात जन्म झाला होता. लालन सारंग या माहेरच्या पैंगणकर. एक भाऊ, सहा बहिणी आणि आई व वडील असे त्यांचे मध्यमवर्गीय कुटुंब होते. घरातील कोणीही अभिनय क्षेत्रात नव्हते. त्या गिरगावातील ‘राममोहन’ शाळेच्या विद्यार्थिनी होत्या. सिद्धार्थ महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच दुसरीकडे त्या खासगी कंपनीत नोकरी देखील करत होत्या. त्यांनी काही काळ मुंबईत कामगार आयुक्त कार्यालयातही नोकरी केली होती. ‘आयएनटी’च्या स्पर्धेत महाविद्यालयाने सादर केलेल्या एका नाटकात त्यांनी काम केले आणि तिथूनच त्या नाट्यक्षेत्राकडे वळल्या.महाविद्यालयात नाटकात काम करताना त्यांची कमलाकर सारंग यांच्याशी ओळख झाली. पुढे जाऊन त्यांनी कमलाकर सारंग यांच्याशी प्रेमविवाह केला.

सारंग यांच्या गाजलेल्या कलाकृती
*आक्रोश (वनिता)
*आरोप (मोहिनी)
*उद्याचा संसार
*उंबरठ्यावर माप ठेविले
* कमला (सरिता)
*कालचक्र (दिग्दर्शन आणि अभिनय)
*खोल खोल पाणी (चंद्राक्का)
*गिधाडे (माणिक)
* घरकुल
*घरटे अमुचे छान (विमल)
*चमकला ध्रुवाचा तारा
*जंगली कबुतर (गुल)
*जोडीदार (शरयू)
* तो मी नव्हेच
* धंदेवाईक (चंदा)
* बिबी करी सलाम
*बेबी (अचला)
*मी मंत्री झालो
*रथचक्र ( ती)
*राणीचा बाग
*लग्नाची बेडी
 *सखाराम बाइंडर (चंपा)
*संभूसांच्या चाळीत
*सहज जिंकी मना (मुक्ता)
*सूर्यास्त (जनाई)
*स्टील फ्रेम (हिंदी)

पुरस्कार आणि सन्मान
*लालन सारंग यांना ग.दि. माडगूळकर प्रतिष्ठानचा विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव या पुरस्काराने सन्मानित
*पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार (२२-१-२०१५)
२००६ साली कणकवली येथे झालेल्या ८७व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.
* अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे जीवनगौरव पुरस्कार (२४ जानेवारी, २०१७)

अग्नीशमनदलाने अथक प्रयत्नांनी विझविली भवानी पेठेतील आग

0

पुणे-भवानी पेठेतील प्लॉस्टिकच्या कारखान्याला काल  सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कारखान्यातील साहित्य जळून खाक झाले. कारखान्यात रबर आणि प्लॉस्टिकचे साहित्य असल्याने आगीने वेगाने अक्राळविक्राळ रूप धारण केले. त्याच्या ज्वाळा लांबवरुन दिसून येत असल्याने या परिसरात एकच गोंधळ उडाला होता. सुमारे दीड तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाला यश आले़ 

भवानी पेठेतील भवानी माता मंदिराजवळ हा रबर आणि प्लॉस्टिक मोडिंगचा छोटा कारखाना आहे़. या कारखान्याला आग लागल्याची खबर अग्निशामक दलाला सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी मिळाली़ मध्य वस्तीतील गजबजलेला परिसर लक्षात घेऊन अग्निशामक दलाने  तातडीने १० अग्निशमन दलाच्या गाड्या आणि ३ पाण्याचे टँकर घटनास्थळी पोचले होते. अग्नीशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांच्यासह प्रमुख अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी कर्मचाऱ्यांनी सहकार्याने ही आग दीड तासाच्या प्रयत्नांनंतर विझविण्यात यश मिळविले. या आगीत कोणतीही जिवित हानी झाली नाही़. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीच्या ज्वाळा लांबवरुन दिसत होत्या़. आग आपल्या घरापर्यंत येईल, या भीतीने जवळ राहणाऱ्या नागरिकांची आपल्या घरातील हाताला लागेल ते साहित्य बाहेर काढून लांबवर ठेवण्यासाठी एकच धावपळ सुरु होती़.

‘ठ्ग्ज ऑफ हिंदोस्ता ‘ ने प्रेक्षकांना ठगवले ….

0

यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खानचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच आमिर आणि अमिताभ बच्चन एकत्र आले. अर्थातच जेव्हा बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आणि बॉलिवूडचा महानायक एकत्र येतात, तेव्हा प्रेक्षकांना चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा होत्या.. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चा पोस्टर, टीझर, ट्रेलर आणि गाणी पाहता चित्रपटांमध्ये खूप उत्सुकता होती. व्हीएफएक्स, मोठमोठ्या कलाकारांची वर्णी, तगडी स्टारकास्ट, भरपूर खर्च असं  एवढं सगळं पॅकेज असताना चित्रपट प्रेक्षकांना वैसा वसूल मनोरंजन देईल अशी अपेक्षा होती. पण चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केली आहे. .केवळ अमिताभ बच्चन च्या प्रेमापोटीच प्रेक्षक हा सिनेमा पावणेतीन तास बसून पाहत असावेत असे वाटल्याशिवाय राहत नाही .निव्वळ अमिताभ बच्चन हेच या चित्रपटाचे आकर्षण ठरले आहे , यातील अमीर खान हि प्रेक्षकांना भावेल असे वाटत नाही .एकूणच  ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ने प्रेक्षकांनाच ठगवले आहे.मोठा खर्च ताकझाक असूनही कथा सातत्याने भरकटत राहिल्याने नको तेवढा सिनेमा विनाकारण लांबविल्याने प्रेक्षक बोअर झाले .एकतरप्रेक्षक हल्ली सिनेमागृहात येत नाही आणि  उत्सुकतेने आला आणि असे सिनेमे नशिबी  आले तर  यापेक्षा मोबाईलवर रमलेलो बरे असे म्हटल्यास   नवल वाटणार नाही .

पाडव्याच्या मुहुर्तावर मराठा समाजाकडून नव्या राजकीय पक्षाची स्थापना; ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ निवडणूक लढवणार

पुणे- दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर मराठा समाजाच्या वतीने नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ असे या नव्या पक्षाचे नाव आहे. रायरेश्वर या ठिकाणी शपथ घेऊन पक्षाच्या बांधणीला सुरुवात करण्यात आल्याचे समन्वयक सुरेश पाटील यांनी सांगितले. पक्ष स्थापनेच्या या कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

बॅनर्सवर उदयनराजे भोसले..

मराठा समाजाच्या राजकीय पक्षाच्या बॅनर्सवर सातार्‍याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे छायाचित्र आहे. पक्षाला उदयनराजे यांनी पाठिंबा दिला आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीला उदयनराजे हे आमचे उमेदवार असू शकतात, असेही सुरेश पाटील यांनी यावेळी सांगितले.

लोकसभा, विधानसभा निवडणूक लढणार..

महाराष्ट्र क्रांती सेना आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक लढणार आहे. या माध्यमा्तून मराठा समाजाच्या विविध मागण्या मांडण्याचा प्रयत्न करण्‍यात येणार आहे. रघुनाथदादा पाटील यांच्या नऊ संघटनाही आमच्या पाठीशी आहेत. भविष्यात महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या सर्व संघटनांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही सुरेश पाटील यांनी सांगितले.

नोटाबंदी क्रूर षड्यंत्र-मित्रांचा काळा पैसा पांढरा करण्याची योजना : राहुल गांधी

0

नोटाबंदी हे विचारपूर्वक केलेले एक क्रूर षड्यंत्र होते. हा एक गंभीर घोटाळा असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुटा-बुटातील मित्रांसाठी काळा पैसा पांढरा करण्याची ही स्कीम आहे, अशी खोचक टीका ट्विटच्या माध्यमातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

नोटाबंदी हे मोदींच्या बड्या मित्रांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी घेतलेला निर्णय होता. संपूर्ण विचारपूर्वक केलेले हे एक कांड असून त्यामध्ये काहीही देशहित नव्हते. नोटाबंदीचे समर्थन करताना केलेली ही कृती म्हणजे देशाच्या भल्याचा विचार असल्याचे सांगणे हा देशाचा अपमान असल्याचेही राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संध्याकाळी ८ वाजण्याच्या सुमारास अचानक नोटाबंदी जाहीर केली होती. यामध्ये देशभरात चलनात असलेल्या एकूण नोटांपैकी ८५ टक्के नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. नोटाबंदी केलेल्या या नोटा ५०० आणि १००० रुपये मुल्याच्या चलनी नोटा होत्या. देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हा फायनान्शिअल स्ट्राइक असल्याचे त्यावेळी मोदी सरकारकडून सांगण्यात आले होते. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठ्या त्रासाला समोरे जावे लागले होते. अनेक छोट्या रोजगारांवर तसेच छोट्या व्यावसायांवर त्याचा विपरित परिणाम पहायला मिळाला होता. दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वीच जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली होती की, जितक्या एकूण मुल्याच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या त्याच्या ९९ टक्के मुल्याची रक्कम बँकेत परत आली आहे.

दरम्यान, नोटाबंदीवरुन काँग्रेसह अनेक विरोधी पक्षांनी सरकारच्या या निर्णयावर कठोर टीका केली आहे. नोटाबंदीचा ८ नोव्हेंबर हा दिवस गेल्या दोन वर्षांपासून काँग्रेस काळा दिवस म्हणून पाळत आहे.

भाजप सरकारचा स्वतःच नेमलेल्या आरबीआयच्या गव्हर्नरशी छुपा संघर्ष-अशोक चव्हाण

0

लेखक –खा. अशोक चव्हाण
अध्यक्ष,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

नोटाबंदीची दोन वर्ष
दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक निर्णय जाहीर केला. जो अगदी अनपेक्षित होता. त्यांनी असे जाहीर केले की ५०० आणि १००० रूपयांच्या चलनी नोटा रद्द करण्यात येत आहेत. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर उद्यापासून ते ‘एक कागज का तुकडा’ होणार आहेत. लक्ष्मीपूजन होणाऱ्या ह्या देशात ही भाषा कितपत योग्य आहे हा तर मुद्दा आहेच, मात्र दोन वर्षांनंतर ह्या धमकी देणाऱ्या भाषेमुळे खरंच काही साध्य झाले आहे का ? हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. खासकरून आज सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न त्यांनी (न) केलेल्या विकासकामांवरून लक्ष वळवून ते कोणत्यातरी भावनिक विषयाकडे न्यायचं हा असताना, गेल्या चार वर्षातल्या या सर्वात मोठ्या घोडचुकीची चिकित्सा व्हायलाच हवी.

पण हा निर्णय मूळात ‘सरकारी’ होता का इथून प्रश्न निर्माण होतात. ह्याचे कारण असे की आपल्या देशात कोणताही निर्णय जाहीर होतो तेव्हा त्यात अनेक घटकांचा समावेश असतो. प्राथमिक अभ्यास होतो, अहवाल तयार केला जातो, चर्चा होते, अहवालात फेरबदल होतो आणि मुख्य म्हणजे विरोधी पक्षाला सांगितलं जातं. हा संविधानिक शिष्टाचार आहे. ह्या निर्णया संदर्भात अजून आपल्यासमोर काहीही आलेले नाही. हा निर्णय घेण्याआधी कोणता अहवाल सरकार समोर आला? मुख्य आर्थिक सल्लागार, मंत्रिमंडळ, किमान एखादा मंत्रिगट, यापैकी कोणाला विश्वासात घेतलं होतं का? त्यावर यांनी प्रतिक्रिया दिली? यापैकी कोणाबरोबर झालेल्या मिटिंगचे मिनिट्स आहेत का? आणि मुख्य म्हणजे, रिजर्व बँकेच्या अधिकार-क्षेत्रात असलेला हा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर का केला? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या सरकारला द्यावीशी वाटत नाहीत, ज्या जनतेच्या जीवाशी आणि पैशाशी खेळ केला गेला, त्यांना स्पष्टीकरण द्यावंसं वाटत नाही, याला हुकुमशाही मनोवृत्ती म्हणू नये, तर दुसरं काय?
आता आपण ह्या निर्णयाचं चमकदार शब्दात सांगितलेलं उद्दिष्ट काय होतं आणि घडलं काय, याच्याकडे पाहू….
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ह्या निर्णयाची तीन उद्दिष्टे सुरुवातीला सांगितली गेली होती. एक, म्हणजे ‘काळा पैसा’ निर्मूलन; दुसरं, बाजारात असलेल्या खोट्या नोटांचे निर्मूलन आणि तिसरं, अतिरेकी/नक्षल कारवाया संपुष्टात आणणे. दोन वर्षांनंतर ह्या निर्णयाकडे पाहिले की लक्षात येते की ह्या चारपैकी कोणतीही उद्दिष्टे सफल झाली नाहीत.
आता आपण ‘काळा पैसा’ हे उद्दिष्ट तपासूया. आपल्या देशात अनेक व्यवहार कॅश ने चालतात. बहुतेक व्यवहार असे असतात की ते झाले की गिऱ्हाईकाला पावती मिळत नाही. पावती न मिळणे म्हणजेच व्यवहार गैर होणे (आणि म्हणजेच काळा पैसा जमा झाला) असे मानणे, हा शुद्ध वेडेपणा आहे. कारण म्हणजेच रिक्षावाले, भाजीवाले, छोटे दुकानदार, गावचे बाजार, इस्त्रीवाला ह्यांनी केलेले अनेक व्यवहार चक्क ‘काळे व्यवहार’ ठरतील. म्हणूनच हे समजून घ्यायला हवं की All Cash is Not Black. या देशातला प्रचंड बहुसंख्य कष्टकरी वर्ग जे व्यवहार करतो ते रोख असले, तरी काळे नाहीत. अर्थात त्याचबरोबर भ्रष्ट व्यक्ती काळ्या पैश्यात व्यवहार करतात, हे खरंच आहे आणि त्यावर युपीए च्या दोन्ही सरकारांनी वारंवार उपाययोजना केलेली होती. मात्र अश्या लोकांच्या घरात कॅश च्या गठ्ठेच्या गठ्ठे दडवून ठेवलेले असतात व असा एखादा निर्णय घेतला की ते सारे बाहेर पडले असे मानणे चूक आहे, कारण All Black is not Cash. भ्रष्टाचाऱ्यांचा मोठा पैसा हा स्थावर मालमत्ता, विदेशी कंपनी किंवा इतर अनेक गोष्टीत दडवलेला असतो. मात्र या सर्वाचा सारासार विचार करण्याऐवजी ५०० आणि १००० रुपयाच्या नोटा रद्द केल्यामुळे एकूण बाजारातली मागणी प्रचंड प्रमाणात कमी झाली. मागणी कमी होणे म्हणजेच लोकांचे खर्च करण्याचे प्रमाण कमी होणे आणि बाजाराची मंदीच्या दिशेने वाटचाल होणे. ह्याचा परिणाम असा की जे छोटे उद्योग-धंदे आहेत त्यांचे ग्राहक कमी झाले आणि अनेक छोटी दुकानं, छोटे उद्योग बंद देखील झाले. ह्याचा परिणाम तिथे काम करणाऱ्या लोकांच्या नोकरीवर देखील झाला. डॉ. मनमोहन सिंह ह्यांनी अनुमान केल्याप्रमाणे देशाचाGDP जवळ जवळ २% ने कमी झाला तो ह्याच कारणांमुळे. पण जाहिरातबाजीच्या चकाचौंध, झगमगाटात मश्गुल सरकारला हे अजून कळलेलंच नाही!
आणि हे सारे होत असतानाच बाजारात २००० रुपयाची नोट आणली गेली. आश्चर्य ह्या गोष्टीचं आहे की ज्या सरकारी निर्णयाचे ‘नोटाबंदी’ हे नाव आहे आणि ते मोठ्या अभिमानाने घेतलं जातंय, त्याच निर्णयाचा एक भाग म्हणून ५०० ची नोट पुन्हा बाजारात आणली जाते,आणि त्याच बरोबर अधिक मोठ्या मूल्याची, म्हणजेच २००० ची नोट पण बाजारात येते. हे निर्णय कोण घेत होतं आणि आर्थिक निर्णयांच्या कोणत्या साखळीत हे बसत होतं हे आपल्याला माहिती नाही. ह्याचा खुलासा देखील कुणीही करत नाही.
आता आपण दुसरे उद्दिष्ट तपासूया. ह्या निर्णयामुळे बनावट नोटांचे निर्मूलन होईल असं वारंवार सांगितलं गेलं. हे उद्दिष्ट फसल्याचे तर अतिशय उघडच आहे. कारण नव्या नोटा बनावट होत असल्याच्या बातम्या नोटबंदीचा हा अचाट उद्योग सुरु असतानाच येत होत्या. कोणत्याही सरकारी आकडेवारीनुसार सापडलेल्या बनावट नोटा ४०० कोटींच्या पुढे नाहीत. म्हणजेच एक लाख रुपयात जास्तीत जास्त २५ रुपयाच्या नोटा खोट्या सापडलेल्या आहेत. पण खरा काळजीचा विषय हा आहे कि ज्या प्रचंड बेजबाबदार घिसाडघाईने हा निर्णय राबवला गेला, त्यामुळे असा संशय घ्यायला वाव आहे कि कदाचित काही रकमेच्या बनावट नोटा सरकारने खऱ्या म्हणून स्वीकारल्या का काय? अर्थात, कसलीच उत्तरं जनतेला न देणाऱ्या सरकारने या प्रश्नाचही धड उत्तरं दिलेलं नाहीच!
तिसरे उद्दिष्ट आहे अतिरेकी किंवा नक्षलवादी कार्यवाही करणाऱ्यांचा कणा मोडायचे. देशाच्या सुरक्षेचे प्रश्न अशा थिल्लर पद्धतीने हाताळण्याचा सरकारचा प्रयोग तर सर्वात संतापजनक आहे. देशभक्तीच्या खोटारड्या गप्पा मारणारं सरकार आज हे मान्य करेल काय कि नोटबंदीने दहशतवाद किंवा नक्षलवाद जराही कमी झालेला नाही? किंबहुना आता आपले लष्करप्रमुख पंजाबमध्ये दहशतवाद डोकं वर काढेल अश्या शक्यता वर्तवत आहेत, जो इंदिराजींपासून अनेकांनी आपल्या रक्ताचं अर्घ्य अर्पण करून थांबवलेला होता. नक्षलवादाचा जर बिमोड झालेला असेल, तर का बरं सरकार आज ‘अर्बन नक्षल’ म्हणून शहरातल्या विचारवंताना पकडत आहे? पुन्हा एकदा, या विषयावर ‘मन कि बात’ करायला पंतप्रधान तयारच नाहीत!
अर्थात, ही उद्दिष्ट फसत आहेत, हे सरकारला पहिल्या काही दिवसात दिसायला लागलं आणि मग कांगावा सुरु केला तो म्हणजे डिजिटल व्यवहार वाढवून अर्थव्यवस्था ‘कॅशलेस’करणे. मात्र यात सरकारचा, विशेषतः पंतप्रधानांचा सामान्य लोकांच्या जीवनाशी संबंध कसा तुटला आहे हेच समोर येतं. जर देशाला ‘कॅशलेस’ होणे असेल तर ‘कॅशलेस’ व्यवहार होण्यासाठी ज्या पायाभूत सुविधा लागतात त्याचा कोणताही अभ्यास सरकार ने आपल्या समोर ठेवलेला नाही. जर व्यवहार क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड ने करायचा असेल, तर तशी यंत्र देशात किती आहेत? मोबाईल ऍप ने पैसे ट्रान्स्फर होतात हे खरं आहे, पण त्याला स्मार्टफोन लागतो आणि त्याची संख्या देशात किती आहे? तिचे जाळे किती मोठे आहे? यंत्र चालू ठेवायला अप्रतिहत वीज किती उपलब्ध होते? आणि मुख्य म्हणजे, हे सारं सुरळीत होण्यासाठी देशात इंटरनेटचे जाळे केवढे मोठे आहे? हे सामान्यांच्या व्यथांचे प्रश्न या ‘सुट्बूट कि सरकार’ला काय कळणार? दुसरा मुद्दा आहे कमी किमतीच्या व्यवहाराचा. जेव्हा एखादा विक्रेता कार्ड मशीन वापरतो तेव्हा त्याला ती सुविधा पुरविणाऱ्या बँकेला पैसे द्यावे लागतात.
देशाती अनेक ठिकाणी अशी गावं आहेत जी एटीएम केंद्र सोडा परंतु बँकांपेक्षा सुद्धा अनेक किलोमीटर दूर आहेत. ह्या लोकांना जर बँकेत जायचे असेल तर त्यांना आठवड्यातील एक दिवस निवडावा लागतो, कारण सकाळी वाहतुकीचे मिळेल ते साधन वापरून काही तासांचा प्रवास करून त्यांना बँक गाठायची असते. बँकेचे काम झाले की मग तोच प्रवास करून पुन्हा संध्याकाळी किंवा रात्री घरी यायचे. हा एक दिवस म्हणजे रोजच्या मजूरीतून सुट्टी,अर्थात त्या दिवशीचे मजूरीचे पैसे त्यांना मिळत नाहीत. नोटबंदीची घोषणा जेव्हा झाली तेव्हा अशा लोकांना जमवलेले पैसे घेऊन बँक गाठावी लागली. तोच तो काही तासांचा प्रवास करून जेव्हा ही मंडळी बँकेत पोहोचली तेव्हा त्यांना मोठ्ठ्याला रांगा दिसल्या. त्या रांगेत उभं राहून, अन्न-पाणी ह्याचा विचार न करून अनेक लोकं जेव्हा खिडकीपर्यंत पोहोचले तेव्हा बँक बंद झाली असायची. त्यामुळे पुन्हा ह्या सर्वांना हाच प्रवास करायला लागला आणि काहींना स्वतःचे पैसे बँकेत जमा करण्यासाठी अनेक दिवस लागले. त्यामुळे त्यांची रोजची मजूरी हुकली. अनेकांना उपाशी राहावं लागलं. आणि मुख्य म्हणजे १०० पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. आणि हे कुणासाठी? तर स्वतःचे पैसे बँकेत सुरक्षित ठेवण्यासाठी!
नोटबंदीने काय घडलं? रोजगार घटला. उद्योगात नवी गुंतवणूक मंदावली. निर्यात रोडावली. सरकारी तिजोरीत पुरेसे कर न आल्यामुळे पेट्रोल/डीजेल आणि स्वयंपाकाच्या गॅसमधून सामान्यांच्या तिजोरीवर डल्ला मारायची गरज सरकारला वाटायला लागली. लोकांचा सरकार या यंत्रणेच्या प्रामाणिकपणावरचा विश्वास उडाला. शुभंकर असं काहीच घडलं नाही. घडला तो फक्त एका माणसाच्या आणि त्याच्या आंधळ्या भक्तांच्या अहंकाराला खुश करण्याचा एक सुलतानी प्रयत्न!
दुर्दैवाने एवढे होऊनही सरकारचं डोकं ताळ्यावर येत नाही. महत्त्वाचे निर्णय घेताना तज्ञांशी सल्लामसलत करणं ही एक लोकहिताची गोष्ट आहे. पण नोटबंदीला दोन वर्ष पूर्ण होत असताना या सरकारने स्वतःच नेमलेले विशेष आर्थिक सल्लागार, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशी विद्वान मंडळी सोडून गेलेली आहेत. सरकारने स्वतःच नेमलेल्या आरबीआयच्या गव्हर्नरशी छुपा संघर्ष सुरु आहे आणि देशाची घसरलेली आर्थिक गाडी रुळावर यायला काही तयार नाही, हाच सगळ्यात काळजीचा विषय आहे!

 

‘कलानिधी’ तर्फे श्रुती विश्वकर्मा यांची सुश्राव्य मैफल

0

 पुणे-    कलेचा अमूल्य ठेवा जपणाऱ्या ‘कलानिधी’ संस्थेतर्फे ‘दिवाळी पहाट’ अंतर्गत  सकाळी उदयोन्मुख गायिका श्रुती विश्वकर्मा यांची सुश्राव्य मैफल चांगलीच रंगली. पं. केदार बोडस यांची शिष्या असलेल्या श्रुती विश्वकर्मा हिने आपल्या गानमैफिलीची सुरुवात भटियार रागाने केली आणि बिलासखानी तोडीने मैफिलीची सांगता केली. कोथरूड येथील काजल सोसायटीमध्ये झालेल्या या मैफिलीने रसिक मंत्रमुग्ध झाले. यावेळी श्रुती विश्वकर्माला प्रणव गुरव (तबला), लीलाधर चक्रदेव (संवादिनी) आणि नीरजा गोडसे व श्रुती गुरव (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
               उत्तरार्धात पं. शेखर बोरकर यांचे शिष्य अभिषेक बोरकर यांचे बहारदार सरोदवादन झाले. त्यांना प्रणव गुरव (तबला) आणि गिरीश चरवड (तानपुरा) यांची साथसंगत लाभली. प्रारंभी ‘कलानिधी’ संस्थेच्या संचालिका अपर्णा गुरव यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांच्यासह अनेक मान्यवर या गानमैफिलीस उपस्थित होते.