Home Blog Page 3023

फर्ग्युसनमध्ये रंगणार ‘मुक्तछंद’

0
पुणे: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात तीन ते पाच जानेवारी या कालावधीत ‘मुक्तछंद’ हा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव रंगणार आहे. 
ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस व शकुंतला फडणीस यांच्या ‘हसर्‍या मैफली’चा आस्वाद पहिल्या दिवशी सकाळी घेता येईल. संध्याकाळी निसर्गप्रेमी पूजा भाले यांचा ‘बिनभिंतीच्या उघड्या शाळेतील एक तास’ अनुभवता येणार आहे.
दुसर्‍या दिवशी सकाळी ब्रिगेडीअर अनिल तळवलकर यांच्याकडून परमवीर चक्र विजेत्यांची रोमहर्षक कहाणी ऐकता येणार असून, संध्याकाळी अभिनेत्री शर्वरी जमेनीस व परिमल फडके यांच्या कडून ‘नृत्यानुभूतीतून नृत्यसाधनेकडे’ हा प्रवास समजावून घेता येईल.
लोकेश गुप्ते ‘नट भूमिका जगताना’ या विषयावर पाच जानेवारीला सकाळी संवाद साधणार असून, सायंकाळी ‘कविता अणि बरंच काही’ या संगीतमय काव्यमैफलीने महोत्सवाची सांगता होणार आहे. संपूर्ण महोत्सवाचे आयोजन विद्यार्थ्यांनी केले आहे. सकाळी दहा व सायंकाळी पाच अशा कार्यक्र‘माच्या वेळा आहेत.

मुळशीतील लाचखोर तहसीलदार सचिन डोंगरेसह, पत्रकार बाणेकर अटकेत

0

मुळशी- तालुक्यातील लवळे गावात असलेल्या जमिनीबाबत तक्रारदाराच्या बाजूने निकालपत्र देण्यासाठी एक कोटींची लाच मागितल्या प्रकरणी शनिवारी रात्री तहसीलदार सचिन डोंगरे याच्यासह पत्रकार किसन बाणेकर यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने रविवारी दोघांना २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

तहसीलदार सचिन डोंगरे (वय ४२,रा. लेझी रॉक सोसायटी, बावधन )आणि पत्रकार किसन बाणेकर (वय ४०,रा. लवळे, ता. मुळशी) यांना रविवारी सायंकाळी शिवाजीनगर न्यायालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हजर केले. डोंगरे याच्या वतीने बाणेकर यांनी लाच स्वीकारली. डोंगरे यांनी ज्या कामासाठी लाच स्वीकारली होती, त्याबाबतची कागदपत्रे डोंगरे यांच्या कार्यालयात आहेत. कार्यालय बंद असून या कागदपत्रांच्या प्रती तपासून घ्यायच्या आहेत. डोंगरे याच्या बंगल्याची झडती घ्यायची आहे. त्याच्या बँकेतील लॉकरची तपासणी करायची आहे.  पत्रकार बाणेकर तहसील कार्यालयात दलाल म्हणून वावरत आहे. त्याची चौकशी करायची आहे. त्यामुळे दोघांना  पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकार पक्षाकडून करण्यात आली. बचाव पक्षाकडून अ‍ॅड. हेमंत झंझाड, अ‍ॅड.नंदकुमार शिंदे, अ‍ॅड. विवेक भरगुडे, अ‍ॅड. कुमार पायगुडे  यांनी बाजू मांडली. न्यायालयाने डोंगरे आणि बाणेकर यांना २ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

नेमके प्रकरण काय ?

या प्रकरणातील तक्रारदार ज्येष्ठ नागरिक आहेत. सध्या ते दौंड येथे वास्तव्यास आहेत. तक्रारदाराच्या पूर्वजांना  मुळशी तालुक्यात अनेक ठिकाणी इनामावर जमिनी मिळाल्या आहेत. तक्रारदार वारसदार आहे. त्यांची मुळशी तालुक्यातील लवळे येथे शेत जमीन आहे. नातेसंबंधातील एकाने वडिलोपार्जित जमिनीची फसवणूक करुन परस्पर विक्री केली होती. तक्रारदाराने वारसा नोंदीसाठी मुळशीतील तहसील कार्यालयात संपर्क साधला होता. याबाबतचे प्रकरण मंत्रालयात गेले होते. तेथील सचिवांनी या कागदपत्रांची पुन्हा छाननी करुन अहवाल देण्यासाठी हे प्रकरण तहसील सचिन डोंगरे यांच्याकडे पाठविले होते. तक्रारदाराने वेळोवेळी संपर्क साधून निकालपत्र देण्याची विनंती केली होती. निकालपत्र देण्यासाठी डोंगरे यांनी १ कोटी रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नुकतीच तक्रार केली. शनिवारी सायंकाळी लवासा रस्त्यावर डोंगरे याच्या वतीने पत्रकार बाणेकर यांनी लाच स्वीकारली.

तहसीलदाराची मोठी मालमत्ता

लाचखोर तहसीलदार सचिन डोंगरे याचा सोलापूर जिल्ह्य़ातील मोहोळ तालुक्यात असलेल्या पापडी गावात बंगला आहे. तसेच मोहोळ येथील एका बँकेत लॉकर आहे. करमाळा येथील बँकेत एक लॉकर असून त्याच्या चाव्या डोंगरे याच्याकडे आहेत. सोलापूर येथे एक बंगला आहे. त्याची झडती घेण्याचे काम सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरु आहे.

नरेंद्र मोदींना नाही,मानवतेला धोका – चंद्रशेखर आझाद (व्हिडीओ)

0

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका नसून मानवतेला , धोका असल्याचे सांगत ,प्रशासनाने कितीही ताकद लावली तरी मी भीमा कोरेगावला जाणारच आहे. आम्हाला तर येथूनच पायी जाण्याची इच्छा आहे. असा निर्धार चंद्रशेखर आझाद यांनी व्यक्त केला. मुंबईवरून पुण्याला आल्यावर आझाद यांनी पुणे स्टेशन येथील आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

आझाद म्हणाले, प्रशासनाला सभेची परवानगी मागितली होती, परंतु काल परवानगी नाकारण्यात आली. आम्ही या बाबतीत कोर्टात गेले आहोत. उद्या कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागला तर आम्ही नक्कीच उद्या सभा घेऊ. 1 तारखेला मी कोरेगाव-भीमाला जाणारच आहे. सरकारने कितीही प्रयत्न केले तरी मी जाणार आहे. मी नाही तर देशातील करोडो लोक तिथे जातील. ज्यांनी मागच्या वर्षी दंगल घडवली त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नाहीत आणि मला तिथे जाण्यापासून रोखण्यात येत आहे. मी तर सर्वांना आव्हान करतो की 1 तारखेला सर्वांनी तेथे यावे. मी बाबासाहेबांना मानतो आणि संविधान हा माझा धर्मग्रंथ आहे. त्यामुळे भीमा-कोरेगावला जाणं हा माझा अधिकार आहे. मोदींच्या हत्येच्या कटाच पत्र मिळालं असं सांगण्यात येतंय हा एक राजकीय स्टंट आहे. एल्गार परिषदेतील ज्या लोकांना अटक केलीये ते निर्दोष लोक आहेत, त्यांना जाणूनबुजून अटक करण्यात आली आहे. मोदींच्या जीवाला नाहीतर इथल्या माणुसकीला धोका निर्माण झाला आहे. इथल्या बुद्ध धर्माला धोका आहे.

मला चैत्यभूमीला जाण्यापासून रोखण्यात आले. एका मुलाला त्याच्या वडिलांच्या समाधीकडे जाण्यापासून रोखण्यात आले. सरकारला लाज वाटली पाहिजे, असं करताना वातावरण यांना खराब करायचं आहे. कारण हे दंगली घडवून राजकारण करतात. या दंगलीच्या राजकारणाचा आम्ही आता अंत करणार आहोत.

युवा कलाकार सुखद मुंडे यांच्या सोलो मृदंग वादनाला चांगला प्रतिसाद

0

पुणे :भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन तर्फे सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत युवा कलाकार सुखद मुंडे यांच्या ‘मृदंग ‘ या सोलो (एकल ) वादनाच्या कार्यक्रमाला शनिवारी सायंकाळी पुणेकर रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला .

अभिनय रवंदे यांनी त्यांना लेहरा साथ दिली. .सरदार नातू सभागृह ,भारतीय विद्या भवन ,सेनापती बापट रस्ता येथे शनिवार २९ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम झाला. भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले . यादवराज फड यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी कुलकर्णी यांनी केले.

सुखद मुंडे यांचे यावेळी पखवाजवादन देखील झाले.यात त्यांनी प्रथम १२ मात्रांचा चौताल वाजवला.पं.सुखद मुंडे यांनी घराणेदार पखावज वादन केले त्यामधे पं.मानिकजी मुंडे यांच्या काही घराणेदार बंदिशी ,रेले ,पंचदेव स्तूती परण, असे सादरीकरण केले .’धीरधीर’ हा रेला पखावजवर वाजून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

बंडातात्या क-हाडकर म्हणाले उपस्थित होते . ते म्हणाले , ‘वारकरी संगीतावर , अभंगावर फिल्मी संगीताचे आक्रमण होते ही चिंतेची गोष्ट आहे.
अभंगांना फिल्मी वा नाट्यपदांच्या चाली लावणे या भ्रष्ट पद्धतिंना अटकाव करण्यासाठी सात्विक आणि शुद्ध प्रयत्न आवश्यक आहे. आजकाल अभंग गाणारे आणि भजन गाणारेही अभ्यासाचा अभाव असल्याने अभंग , भजन गायनात शब्द भलते गातात,चालही भ्रष्ट करतात आणि अर्थ ही बदलतात

भारतीय संस्कृति व वारकरी संगीताची परंपरा जपण्याचे काम भारतीय विद्या भवन नेहमी करत आले आहे मूळ संगीत टिकणे, व संस्कृति जपण्यासाठी भारतीय विद्या भवन नेहमी पुढाकार घेते असे मत नंदकुमार काकिर्डे यांनी व्यक्त केले.

सर्व पक्षीय नगरसेवकांसोबत खासदार काकडे घेणार अर्थमंत्री जेटली यांची भेट

पुणे : कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील समस्या सोडविणे व प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासंदर्भात आता राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे 3 जानेवारीला भेटीची वेळ मागितली आहे. भेटीची वेळ मिळाल्यास पुणे व खडकी कॅन्टोन्मेंटच्या सर्व पक्षीय सदस्यांना सोबत घेऊन खासदार काकडे दिल्लीकडे कूच करणार असून अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेणार आहेत.

खासदार संजय काकडे यांनी आज पुणे कॅन्टोन्मेंटच्या सर्व सदस्यांसोबत येथील प्रलंबित विकासकामे व समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला जीएसटी सुरु होण्यापूर्वी एलबीटीच्या माध्यमातून सुमारे 150 कोटी रुपये मिळायचे. जीएसटी सुरु झाल्यापासून एलबीटीचे 150 कोटी रुपये बंद झाले. आता कॅन्टोन्मेंट बोर्डाला विकास कर व इतर सर्व कर मिळून 97 कोटी रुपये वार्षिक उत्पन्नापोटी मिळतात. तर, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा वार्षिक खर्च 131 कोटी रुपये होत आहे. यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाला 34 कोटींचा तोटा होत आहे. एलबीटीपोटी मिळणारी रक्कम बंद झाल्याने कॅटोन्मेंट बोर्डाची आर्थिक स्थिती बिकट झाली. दोन वर्षांत विकास कामांसाठी बोर्डाच्या 100 कोटीच्या मुदत ठेवीतील सुमारे 70 कोटी रुपये खर्च झाले असून सुमारे 30 कोटी रुपयेच शिल्लक आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डाची आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी व येथील मुलभूत सुविधांच्या विकासासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाला दरवर्षी केंद्राकडून 100 कोटी रुपये मिळायला हवेत. सर्व पक्षीय नगरसेवक व बोर्डाचे चीफ अकाउटंट यांनी आज झालेल्या बैठकीमध्ये ही वस्तुस्थिती मांडली.

विकासकामांसाठी सध्या पुरेसा निधी नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबित राहतात व नागरिकांना मुलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागते. केंद्राने दुर्लक्ष केल्यास कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे दैनंदिन खर्चासाठी व कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीही पैसे राहणार नाहीत. त्यामुळे खासदार काकडे यांनी याकामी पुढाकार घेऊन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी नगरसेवकांनी या बैठकीत खासदार काकडे यांच्याकडे केली. त्यानंतर खासदार काकडे यांनी अर्थमंत्री जेटली यांच्याकडे याकामी भेटण्यासंदर्भात वेळ मागितली आहे.

कॅन्टोन्मेंट मधील समस्यांप्रकरणी झालेल्या बैठकीस पुणे कॅन्टोन्मेंटच्या उपाध्यक्षा प्रियांका शिरगिरी, नगरसेवक अतुल गायकवाड, दिलीप गिरमकर, शैलेश बिडकर, मथुरावाला, किरण कांबळे, मनोहर कुरेशी, देविदास सोनटक्के, डॉ. भारत वैरागे, मनीष साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.

करापोटी केंद्राकडे जमा होणाऱ्या महसुलातून महापालिकेप्रमाणे कॅन्टोन्मेंट बोर्डालाही योग्य प्रमाणात विकासनिधी मिळावा ही तेथील नगरसेवकांची मागणी योग्य आहे. कॅन्टोन्मेंट परिसरातील समस्या, प्रलंबित विकासकामे आणि मिळणारा निधी याची विसंगत असलेली वास्तव परिस्थिती अर्थमंत्री जेटली यांच्यासमोर मांडण्यासाठी खासदार संजय काकडे यांनी अर्थमंत्री जेटली यांच्याकडे वेळ मागितली. त्यांच्या भेटीची वेळ मिळाल्यास सर्व पक्षीय नगरसेवकांना घेऊन खासदार काकडे दिल्लीला जाणार आहेत.

‘चला हवा येवू द्या ‘ कार्यक्रमाची हवा आता गेली-ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाचा रिपोर्ट –

0

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार यंदाच्या आठवड्यात ‘चला हवा येवू द्या ‘ कार्यक्रमाची हवा आता गेली असून चला हवा येऊ द्याला पहिल्या पाचमध्ये जागा बनवता आलेली नाही

छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणाऱ्या घडमोडी दाखवल्या जातात. त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं. मालिकेत घडणाऱ्या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरू आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार यंदाच्या आठवड्यात झी मराठीवर झालेला उत्सव आनंदाचा हा कार्यक्रम पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या कित्येक आठवड्यापासून चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम पहिल्या पाचमध्ये होता. पण या आठवड्यात चला हवा येऊ द्याला पहिल्या पाचमध्ये जागा बनवता आलेली नाहीये.

माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. अभिजीत खांडकेकर, इशा केसकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. गेल्या कित्येक आठवड्यापासून या रिपोर्टमध्ये माझ्या नवऱ्याची बायको हीच मालिका अव्वल स्थानावर आहे.

राणा दा आणि अंजली यांची तुझ्यात जीव रंगला ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या कित्येक आठवड्यापासून दुसऱ्या क्रमांकावर तुला पाहाते रे ही मालिका होती. एवढेच नव्हे तर गेल्या महिन्यात ही मालिका पहिल्या क्रमांकावर आली होती. पण ही मालिका या आठवड्यात तिसऱ्या क्रमांकावर घसरली आहे. या मालिकेतील सुबोध आणि गायत्रीच्या केमिस्ट्रीची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा आहे. ही जोडी आणि त्यांच्यातील प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. त्या दोघांचे लग्न कधी होणार याची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. पण तरीही या कार्यक्रमाची लोकप्रियता कमी झालेली दिसून येत आहे. चौथ्या क्रमांकावर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आहे.

विशेष म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टमध्ये अव्वल स्थानावर असणाऱ्या सगळ्याच मालिका या झी मराठी या वाहिनीवरील आहेत. गेल्या अनेक आठवड्यांपासून ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या पहिल्या पाच भागात झी वाहिनीवरीलच या मालिकांनी आपले वर्चस्व निर्माण केले आहे.

ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन विश्वासार्ह -जिल्हाधिकारी यांची मोहीम सुरु …

0

पुणे-आगामी वर्षातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या पुर्वतयारीचा भाग म्हणून भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार जनतेमध्ये , मतदारांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन आणि निवडणूक प्रक्रियेबाबत विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी जनजागृती करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम ,यांनी आज दि. 29/12/2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे सर्व  खासदार ,. आमदार व मान्यता प्राप्त राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीमध्ये आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन बाबत माहिती देऊन त्याचे प्रात्यक्षिक बैठकीमध्ये दाखविण्यात आले. यावेळी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन द्वारे होत असलेली निवडणूक प्रक्रिया विश्वासार्ह असून आता मतदाराला आपण केलेले मतदान त्याच उमेदवाराला झाले असल्याबाबत व्हीव्हीपॅट मशीनमध्ये सात सेंकदासाठी संबंधीत उमेदवाराचे नाव व चिन्ह स्लिपद्वारे दिसून येणार असून सदरची स्लिप व्हीव्हीपॅट मशीनमध्ये पडणार असल्यामुळे यात अधिक पारदर्शकता आलेली आहे. याबाबतची सविस्तर माहिती व शंकांचे निरसन बैठकीमध्ये करण्यात आले. यावेळी उपस्थित राजकीय प्रतिनिधी यांनी याबाबत माहिती प्राप्त करुन घेऊन व त्यांना असलेल्या शंका विचारुन शंकांचे निरसन करुन घेतले तसेच प्रत्यक्ष मशीन वर मतदान करुन पाहिले.
पुणे जिल्हयात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनबाबतची जनजागरुकता मोहिमेचा प्रारंभ जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. दि.29/12/2018 पासून 211 खडकवासला मतदार संघ व दि.04/01/2019 पासून इतर विधानसभा मतदार संघामध्ये या जनजागरुकता मोहिमेस सुरुवात करण्यात येत आहे. सदरची मोहिम 1 महिना ते 45 दिवसांच्या कालावधीपर्यंत सुरु राहणार आहे. यावेळी सदरची मशीन मतदान केंद्रस्थळावर व इतर मोक्याच्या ठिकाणी मोबाईल व्हॅन द्वारे प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहे. या प्रात्यक्षिकाचा मतदारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन ही मतदाराला त्याने केलेल्या मतदानाची पडताळणी दाखविणारे, मतदानाबद्दल विश्वासार्हता निर्माण करणारी यंत्रणा आहे. या बाबतची जनजागृती मोहीम अत्यंत सूक्ष्मपणे व काटेकोरपणे राबविण्यात यावी. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनबाबत मतदारामध्ये कोणत्याही प्रकारची साशंकता आणि संभ्रम राहणार नाही यासाठी मोहिम कालावधी मध्ये योग्य प्रकारे प्रात्यक्षिक दाखवून त्यांच्या शंकाचे निरसन करण्याच्या सूचना उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना मा. जिल्हाधिकारी यांनी दिल्या. तसेच, या जनजागरुकता मोहिमेची माहिती जास्तीत जास्त ग्रामस्थांपर्यत पोहचविण्यासाठी याची योग्य प्रकारे प्रसार व प्रसिध्दी करण्याचे तसेच, ग्रामीण भागामध्ये या कार्यक्रमाची दवंडी देऊन पुर्व प्रसिध्दी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत. तसेच, याची सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक व अन्य लोकप्रतिनिधी यांना याबाबतची पुर्वकल्पना द्यावी. व त्यांना या प्रात्याक्षिकाच्या वेळी उपस्थित राहण्याची विनंती करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या. सदर बैठकीस आमदार श्री. बाबूराव पाचर्णे, राष्ट्रवादी कॉग्रेस सरचिटणीस मोहनसिंग राजपाल, आमदार आढळराव पाटील यांचे प्रतिनिधी  प्रकाश मरकळे, आमदार लांडगे यांचे प्रतिनिधी सचिन फोडके, , खासदार  श्रीरंग बारणे यांचे प्रतिनिधी अविनाश सकपाळ, श्री.अरुण गायकवाड, सचिव पुणे शहर कॉग्रेस , कु.कांदबरी साळवी, भा.ज.पा. कसबा अध्यक्ष युवती आघाडी, प्रवीण करपे, कॉग्रेस कसबा अध्यक्ष , श्री. दिलीप वाल्हेकर, हवेली ता. राष्ट्रवादी कॉग्रेस, व इतर प्रतिनिधी उपस्थित होते.
पुणे जिल्हयात एकुण 7666 मतदान केंद्र असून या जनजागृती मोहिमेमध्ये मतदार संघामध्ये वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचे क्रमांक कोणते आहेत याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. यासाठी प्रत्येक मतदार संघामध्ये दोन मोबाईल व्हॅनद्वारे याची प्रात्याक्षिके दाखविण्यात येणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणूकीची पुर्वतयारी म्हणून लोकसभा निवडणूकीसाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आलेली असून या समित्यांच्या समन्वय/ नोडल अधिकारी यांची बैठक मा. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीमध्ये निवडणूकीच्या अनुषंगाने आवश्यकती पुर्वतयारी करण्याच्या सूचना सर्व संबंधीत नोडल अधिकारी यांना देण्यात आल्या. याबैठकीसाठी श्रीमती. नयना गुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल , पुणे , . सुभाष डूंबरे, अतिरिक्त आयुक्त,  महेश आव्हाड, अप्पर जिल्हाधिकारी , श्.प्रवीण देवरे, अप्पर जिल्हाधिकारी, श्रीमती. नयना गुरव, अप्पर जिल्हाधिकारी नोंदणी व मुद्रांक विभाग, पुणे , व इतर अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणूक 2019 च्या पुर्वतयारीबाबत उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती. मोनिका सिंह यांनी माहिती दिली.

रेनॉ इंडियाकडून ५ लाख वाहनांच्या विक्रीचा टप्पा पार

0

रेनॉ इंडिया ही कंपनी नुकताच ,००,००० वाहनांच्या विक्रीचा टप्पा पार करून, हे यश सर्वाधिक वेगाने साध्य करणाऱ्या ऑटोमोटिव ब्रॅण्ड्सच्या गटात जाऊन बसली आहे. भारत ही रेनॉसाठी महत्त्वाची बाजारपेठ असून कंपनीकडे एक स्पष्ट असे दीर्घकालीन ‘भारत धोरण’ आहे.

अगदी थोड्या कालावधीत रेनॉने भारतात लक्षणीय प्रगती केली आहे. यामध्ये अत्याधुनिक उत्पादन कारखाना, जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान केंद्र यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे भारतात दोन डिझाइन सेंटर्स असलेला हा एकमेव जागतिक ब्रॅण्ड आहे. या भक्कम पायाला जोड लाभली आहे ती अनोख्या उत्पादन धोरणाची आणि ग्राहकांच्या समाधानासाठी घेण्यात आलेल्या अभिनव उपक्रमांची. रेनॉने साध्य केलेल्या यशात या सर्व घटकांचा निर्णायक वाटा आहे..

विक्रीतील हा महत्त्वाचा टप्पा साजरा करण्यासाठी रेनॉने अनेक आकर्षक ऑफर्स आणल्या आहेत. क्विडवर रेनॉने इतर लाभांव्‍यतिरिक्‍त एक विशेष वित्तसहाय्याची ऑफर ० टक्के व्याजदराने देऊ केली आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी असेल. ९८ टक्के स्थानिकीकरणातून उत्पादित होणारी क्विड म्हणजे ‘मेक इन इंडिया’ची आजपर्यंतची सर्वांत यशस्वी गाथा आहे. भारतातील छोट्या कार्सच्या विभागात क्विडने क्रांती घडवून आणली आहे. ही आकर्षक, कल्पक आणि परवडण्याजोगी कार रेनॉ इंडियासाठी खऱ्या अर्थाने पट बदलून टाकणारी तसेच वाढीला चालना देणारी ठरली. या गाडीची ,७५,००० युनिट्स आतापर्यंत विकली गेली आहेत. क्विडचे यश आणखी पुढे नेत रेनॉ इंडियाने अलीकडेच नवीन क्वीड २०१८ फीचर लोडेड रेंज आणली आहे. ही रेंज मॅन्युअल आणि ऑटोमेटेड अशा दोन्ही ट्रान्समिशन पर्यायांत उपलब्ध आहे.

‘शुभं भवतु’ चित्रपटाचा शानदार मुहूर्त

0

सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग म्हणून ओळखलं जातं. २४ तास आपण या तंत्रज्ञानाच्या गराड्यात अडकलेले असतो. आज प्रत्येक क्षेत्र तंत्रज्ञानाने काबीज केलं आहे आणि या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल तर या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणं आवश्यक आहे. एकविसाव्या शतकात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना रूढी, परंपरा, संस्कृती आणि संस्कार यांचा अभिजात वारसा आपण विसरत चाललो आहोत. या तंत्रज्ञानाशी नातं जुळताना आपल्या संस्कृतीशी असलेली नाळ आपण तोडत तर नाही ना? तंत्रज्ञानाच्या प्रवाहात वाहत जाताना आपल्याला आपल्या संस्कारांचा विसर तर पडत नाही ना? अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘ओम श्री चित्र प्रायव्हेट लि.’ प्रस्तुत ‘शुभं भवतु’ या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. मेघराज भोसले यांच्या हस्ते पुण्यात संपन्न झाला. या चित्रपटात सौरभ गोखले नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. कुणाल निंबाळकर हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत

‘शुभं भवतु’ हा चित्रपट आत्ताच्या पिढीला विचार करण्यास प्रवृत्त करेल आणि तंत्रज्ञानासोबत संस्कृतीची सांगड घालताना आपल्या प्राचीन आणि उदात्त संस्कृतीचे महात्म्य अधोरेखित करेल अशी अपेक्षा आहे. सौरभ गोखलेसोबत सुखदा खांडकेकर, समीर धर्माधिकारी, कांचन गुप्ते, योगेश सोहोनी हे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे निर्माते आणि गीतकार डॉ. शरद नयमपल्ली आणि साधना नयमपल्ली असून प्रसिद्ध दिग्दर्शक निरंजन पत्की  चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. कथा, पटकथा, संवाद आणि छायांकन सुनील खरे यांचे असेल तर ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचे संगीत चित्रपटाला लाभणार आहे. नरेंद्र भिडे हे चित्रपटाला पार्श्वसंगीत देणार आहेत..

फक्त बोलू नका ,सकारात्मक बदलाचे दूत व्हा ! :डॉ . लक्ष्मीकांत देशमुख

0

पुणे :”भोवताली बोलणारी माणसे जास्त आहेत ,आणि कृतिशीलतेची कमतरता आहे ,अशा वातावरणात कृतिशील होऊन सकारात्मक बदलासाठी प्रत्येकाने काम करून ‘सकारात्मक बदलाचे दूत ‘ व्हावे ” ,असा संदेश अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ . लक्ष्मीकांत देशमुख यांनी विद्यार्थ्यांना  आणि सामाजिक कार्यकर्त्याना दिला .

‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘प्रबोधन माध्यम’ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे ‘डॉ.पी.ए.इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०१८’  आज डॉ . लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील  मान्यवरांना  संस्थेच्या असेम्ब्ली हॉल मध्ये झालेल्या शानदार कार्यक्रमात देण्यात आले . त्यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने डॉ . देशमुख बोलत होते . गतीमान प्रशासनाचे प्रयोग करणारे शिवकुमार डिगे (माजी धर्मादाय आयुक्त, मुंबई उच्च न्यायालयाचे  निबंधक -रजिस्ट्रार ,मुंबई  ),अन्वर राजन (सचिव ,महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ,सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते ,पुणे ),  डॉ . सुमंत पांडे (कार्यकारी संचालक ,जलसाक्षरता केंद्र ,यशदा ,पुणे ), ,संजय यादवराव (संस्थापक ,कोकण भूमी प्रतिष्ठान,मुंबई  ), डॉ. जे . बी . गारडे  ( दंत शल्य चिकित्सक,पुणे ) यांना  ‘डॉ.पी.ए.इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०१८’ ने गौरविण्यात आले . शिवकुमार डिगे या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत .

किशोर धारिया (पश्चिम घाटातील पर्यावरणस्नेही पर्यटन ),राजेंद्र आवटे (ग्रामीण भागातील उद्योग संधी निर्माण ),संजय भंडारी (इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकलिंग )  यांना त्यांच्या योगदानाबद्दल  ‘डॉ. पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता  दशकपूर्ती सन्मान’ गौरवाने सन्मानित करण्यात आले .
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’  च्या गुणवंत सहकाऱ्यांसाठी असलेल्या  ‘डॉ. पी. ए. इनामदार कार्यक्षमता व गुणवत्ता सन्मान’ ने  डॉ . शैला बूटवाला (प्राचार्य,आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय )आणि  जुलेखा शेख (ऑफिस सुप्रीटेंडेंट ,आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय ) यांना गौरविण्यात आले .   ‘डॉ.पी.ए.इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०१८’ चे वितरण अ . भा . मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ . लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले . ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस)च्या असेंब्ली हॉलमध्ये दिनांक २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम झाला . संयोजन समितीचे अध्यक्ष दीपक बीडकर यांनी  प्रास्ताविक केले .रुमाना शेख यांनी सूत्रसंचालन केले .  लतीफ मगदूम यांनी आभार मानले .

‘महाराष्ट्र कॉस्मापॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांच्या वाढदिवसादिवशी  हा सन्मान सोहळा आयोजित केला जातो .  यावर्षी डॉ . पी.ए.इनामदार यांचा ७४ वा वाढदिवस होता . सन्मानाचे  दशकपूर्ती वर्ष होते .  सन्मानचिन्ह ,शाल ,पुष्पगुच्छ ,रोख रक्कम  असे या सन्मानाचे स्वरूप होते .डॉ . लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले ,” महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचा परिसर हा व्यवस्थेने नाकारलेल्याना उत्तम शिक्षण देणारा कॅम्पस आहे . भारत कसा असावा याचे हे प्रारूप आहे . डॉ . पी . ए . इनामदार हे सर सय्यद खान यांची शिक्षण परंपरा चालवत आहेत .ते शिक्षणाचा वसा घेतलेले द्रष्टे व्यक्तिमत्व आहे .  भोवताली बोलणारी माणसे जास्त आहेत ,आणि कृतिशीलतेची कमतरता आहे ,अशा वातावरणात कृतिशील होऊन सकारात्मक बदलासाठी प्रत्येकाने काम करून ‘सकारात्मक बदलाचे दूत ‘ व्हावे . मुस्लिम मागासांसाठी अजून शिक्षण संस्था आणि  डॉ . पी . ए . इनामदार यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे ‘ . महाराष्ट्र हा कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे ,आणि अशा कृतिशील कार्यकर्त्यांचा गौरव करणारे आहेत ,याची खात्री या कार्यक्रमाने पटली,असेही त्यांनी सांगितले  .

नृत्यामध्ये स्वप्नीलची यशस्वी भरारी

0

पुणे येथे सुरू होणाऱ्या प्रवासाची सुरुवात स्वप्निलच्या छंदाप्रमाणे २०१० पासून झाली. इतर कोणत्याही नृत्य उत्साहींप्रमाणे स्वप्निल पुणे येथील शामक डान्स अकादमीमध्ये सामील झाला. त्याची मेहनत आणि प्रतिभेमुळे, त्याला विशेष संभाव्य बॅचमध्ये निवडले गेले. प्रशिक्षण पोस्ट केल्यानंतर त्याने शामकच्या वन इयर डान्स सर्टिफिकेशन प्रोग्रामसह पुढे शिकण्याचे ठरविले. या बॅचचा पदवी कार्यक्रम, सेल्कोउथला देशातील सर्वोत्कृष्ट आधुनिक नृत्य प्रस्तुतींपैकी एक म्हणून ओळखले गेले आहे आणि प्रेक्षकांना भुरळ पडण्यास २५ पट अधिक चालते.

स्वप्नील त्यानंतर शामक दावर डान्स कंपनीचा एक भाग म्हणून त्याची निवड करण्यात आली. शो, इव्हेंट्स, पुरस्कार आणि प्रॉडक्शनमध्ये भारत आणि परदेशात काम करण्यास गेला. तो ह्या शाखेचा भाग म्हणून देशभर भ्रमंती केली आहे. त्याने अर्धवार्षिक कार्यक्रमास सहकार्य केले आणि सध्या तो ओवायपीचा सहाय्यक व्यवस्थापक आहेत. स्वप्निलच्या व्यवस्थापकीय कौशल्य आणि जबाबदारीची चांगल्या प्रकारे मिळवली आणि यातून त्याला शिकायला आणि कमविण्यास फायदा झाला आहे.

ओवायपीने त्याला भरारी घेण्यासाठी त्याच्या पंखांना बळ दिले. स्वप्नील म्हणतो कि, “मला या कार्यक्रमाद्वारे मी कोण आहे याचे उत्तर मला मिळाले आहे, हे मला माझ्या जवळ घेऊन आले. मी माझ्या  आयुष्याकडे बघितल्यास लक्षात येते कि, यामुळे मला अधिक शिस्तबद्ध जीवनशैली प्राप्त करण्यास मदत केली. शामक आरोग्यापासून ते प्रवास पर्यंत सर्वांची काळजी घेतो. आणि बरच काही. हेच एकमात्र ठिकाण आहे जिथे आपण ह्या शाखेच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट नृत्य शिकू शकता. याच कार्यक्रमासाठी एक विद्यार्थी ते सहाय्यक व्यवस्थापक ही भूमिका मिळवण्यापर्यंतचा प्रवास सुंदर आहे आणि मला खात्री आहे की या पुढे हि अधिक सुंदर होईल.

विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – आ मेधा कुलकर्णी.

0
पुणे-मी तीन वेळा ह्या प्रभागाची नगरसेविका म्हणून निवडून आले व या भागाचे मनपा मधे प्रतिनिधीत्व केले,तेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो आणि अनेक कामे करताना अडचणी यायच्या,मात्र आता आम्ही सत्तेत आहोत आणि त्यामुळे कामे करणे अधिक सोपे झाले आहे असे सांगतानाच विकास कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या.नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व नगरसेवक जयंत भावे यांच्या विकासनिधीतून प्रभाग १३ मधील मोरेश्वर सभागृह रस्ता व परिसरातील गल्ल्यांच्या डांबरीकरणाच्या कामाच्या भूमीपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या.आता आमदार म्हणून काम करताना अधिक विकासकामे करता येतात व शहरातील आणि विशेषतः कोथरूड मधील नागरी समस्या समजून घेउन त्या सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील असते असेही त्यांनी सांगितले.यावेळी लायन्स क्लबचे उपप्रांतपाल अभय शास्त्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आम्ही सर्व नगरसेवक एकत्र बसून प्रभागातील समस्यांवर चर्चा करतो आणि मग नागरिकांनी सुचविलेल्या व लोकोपयोगी  कामांसाठी निधीचा विनियोग करतो असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या,तसेच नागरिकांनी त्यांच्या परिसरातील आवश्यक कामांची माहिती वेळेत दिली तर त्याचा समावेश बजेट मधे करता येतो व त्याद्वारे नियोजनबद्ध विकास शक्य होतो असे ही मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
प्रभागातील नागरिकांना केंद्रबिंदू मानून आम्ही विकास कामांची आखणी करतो,नागरिकांनी ही लोकप्रतिनिधींशी संपर्कात राहिल्यास प्रभागाचा विकास अधिक सुकर होइल असे सांगतानाच ” आम्ही नागरिकांसाठी २४ तास उपलब्ध आहोत असे नगरसेवक जयंत भावे म्हणाले.
यावेळी भाजप शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,कोथरूड मंडल अध्यक्ष प्रकाश बालवडकर,प्रशांत हरसुले,सुधीरजी नाईक,बाळासाहेब धनवे,राजेंद्र येडे,संगीताताई आदवडे,संगीता शेवडे,नीलेश घोडके,सुवर्णाताई काकडे,सुलभाताई जगताप,जयेश सरनौबत,चंद्रकांत पवार,हेमंत भावे,प्रफुल्ल सुभेदार,अमोल डांगे,जगदीश डिंगरे,सुनील भोसले,विठ्ठल मानकर,नारायण वायदंडे,नचिकेत कुलकर्णी इ उपस्थित होते.
यावेळी लायन्सचे उपप्रांतपाल अभय शास्त्री व परिसरातील नागरिक नित्यानंद मेहेंदळे,श्रीकृष्ण इंडस्ट्रीजचे श्री गणेशवाडे,कीट्रोनिक्स चे श्री कुलकर्णी,श्री गद्रे,श्री काळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक केले तर राज तांबोळी यांनी सूत्रसंचालन व राजेंद्र येडे यांनी आभार प्रदर्शन केले.

बहादुरशहा जफर ही मूर्तिमंत शोकांतिका :शमीम तारिक

0

पुणे  :” न किसी की ऒख का नूर हूं,न किसी के दिल का करार हूं,जो किसी के काम न आ सके,मै वो एक मुश्ते-गुबार हूं  ‘  अशा वैफल्याच्या ओळी लिहिणारे ,मोगल साम्राज्याचा शेवटचे बादशहा  ठरलेले बहादुरशहा जफर यांचे जीवन म्हणजे मूर्तिमंत शोकांतिका आहे ‘ अशी खंत ज्येष्ठ उर्दू पत्रकार शमीम तारिक यांनी शुक्रवारी सायंकाळी व्यक्त केली . 

‘रसिक मित्र मंडळ ‘ यांच्यातर्फे शमीम तारिक ( मुंबई ) यांचे मुघल बादशाह बहादूरशहा जफर यांच्या शायरीवर आणि जीवनावर   २८ डिसेंबर रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते .पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानाला उर्दू ,मराठी काव्य प्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला . 
रसिक मित्र मंडळ ‘च्या ‘एक कवी -एक भाषा ‘ उपक्रमातील हे  ६० वे व्याख्यान होते . ‘ रसिक मित्र मंडळ चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमात डॉ . मुमताज मुनव्वर पीरभॉय यांच्या ‘अंदाज -ए -बयाँ और . . ‘ या पुस्तकाचे प्रकाशन शमीम तारिक यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी प्रदीप निफाडकर ,मुनव्वर पीरभॉय ,रफिक काझी  उपस्थित होते . 

शमीम तारिक यांनी प्रतिकूल ,विपरीत परिस्थितीत जगलेल्या ,मोगल साम्राज्याचा शेवटचा बादशहा ठरलेल्या बहादुरशहा जफर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला . अनेक प्रसंग जिवंत केले . 

 इंग्रजांनी बहादुरशहाला ‘पातशाह’ असा किताब देऊन त्याला नामधारी बादशहा बनवले. १८५७ च्या स्वातंत्र्य समरामध्ये बहादूरशहा सामील झाला. क्रांतिकारकांनी इंग्रजांकडून दिल्ली काबीज केली व बहादूरशहास बादशहा म्हणून जाहीर केले.१३३ दिवसांनंतर दिल्ली पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात गेली. दिल्ली ताब्यात घेतल्यानंतर इंग्रजांनी बादशहाला कैदेत टाकले. त्याच्या दोन मुलांची शिरे कापून ती त्याच्या समोर पेश करण्यात आली. त्यावेळी इंग्रजांचा एक हुजर्‍या बादशहाला म्हणतो,”दमदमाये में दम नही अब खैर मानो जान की ! ऐ जफर, ठंडी हुई अब तेग हिंदुस्थान की !!”

त्यावर उसळून डोळ्याचा अंगार फेकीत बादशहाने दिलेला जवाब पुढील ९० वर्षांचा क्रांतिकारकांचा इतिहास सांगणारा मंत्र ठरला. “गाजीयों में बू रहेगी जब तलक ईमान की ! तख्ते लंदन तक चलेगी तेग हिंदुस्थान की !!” (जो पर्यंत धर्मवीरांच्या हृदयात राष्ट्रनिष्टेचा सुगंध दरवळत राहील, तो पर्यंत हिंदुस्थानच्या समशेरीचे पाते लंडनच्या तख्ताचा रोख घेतच राहील.)

बादशहावर खटला भरून त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. बहादुरशहाला ब्रह्मदेशातील रंगून येथे कैदेत ठेवण्यात आले. तेथील तुरूंगातच ७ नोव्हेंबर १८६२ साली त्यांचे निधन झाले.

 आणि एक जिवंत शोकांतिका संपली . 

 
शमीम तारिक यांनी जफर यांच्या  ‘मेरा रंग रूप बिगड गया ‘  या प्रसिद्ध ओळींमागचा इतिहासही सांगितलं . जेंव्हा इंग्रजानी दिल्लीवर कब्जा केला व बहादूरशहाला पदच्युत करून दिल्ली सोडुन जायला सांगितले .या परिस्थितीत बहादुरशहाने ही गझल लिहिली. ‘मेरा रंग रूप बिगड गया,मेरा यार मुझसे बिछड गया ‘ . या गझलेतील  ‘मेरा यार ‘ हा उल्लेख जफर  हे  लाल किल्ल्याला उद्देशुन करतात . आपले राज्य गमावलेल्या, आपल्या प्रिय दिल्ली व लालकिल्ला सोडुन जायला लागलेल्या पराभुत बादशहाची प्रतिमा डोळ्यासमोर आणली की जफर यांचे जीवन ही मूर्तिमंत शोकांतिका होती ,असे वाटून जाते . जफर यांच्या नावे प्रसिद्ध असलेल्या अनेक गझला या आपल्या आहेत असे दावे केले जातात ,तेव्हा जफर यांची शोकांतिका अधिक गहिरी होते ,असेही शमीम तारिक म्हणाले .
‘लालकिला ‘चित्रपटात  महमद रफी यांनी ही गझल गायली आहे, कुठलेही तालवाद्य नसताना रफीच्या आवाजाची जादु या गझलेचा दर्द बरोबर आपल्यापर्यंत पोचवते ,अशी माहितीही या वेळी देण्यात आली 

आंतर महाविद्यालयीन स्पर्धा घडवतात ‘कलाकार’

0
पुणे : “शालेय-महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या स्पर्धांमधून आपल्यातील कलाकार बहरत जातो. या स्पर्धांतूनच माझ्यातील ‘कलाकार’ घडला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुण विकसित करण्यासाठी या व्यासपीठाचा उपयोग करून घेतला पाहिजे. रियाज, सराव या गोष्टींना जास्तीत जास्त वेळ देऊन आणि आपल्यातील क्षमता ओळखून मेहनत केली, तर शास्त्रीय संगीत क्षेत्रात यशस्वी होऊ शकता,” असे कानमंत्र अभिनेत्री व नृत्यांगना नुपूर दैठणकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटतर्फे (अंडरग्रॅज्युएट) संगीतभारती व नृत्यभारती या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एमआयटी कोथरूडच्या प्रांगणात झालेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होत्या. याप्रसंगी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, प्रसन्न हॉलीडेजचे मझहर शेख, सचिन राजोपाध्ये, भक्ती सुर्वे, स्पर्धेच्या संयोजिका कल्याणी बेलसरे, ललित आफळे, प्रा. दीक्षा बेडेकर, प्रा. शलाका घोडके आदी उपस्थित होते.
राज्यभरातुन संगीतभारती स्पर्धेत ३४, तर नृत्यभारती स्पर्धेत एकूण ३७ स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. शास्त्रीय गटात सौरभ पांढरे याने प्रथम, शीतल गद्रे हिने द्वितीय, तर मीता दांडेकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. उपशास्त्रीय गटात शीतल गद्रे हिने प्रथम, मीता दांडेकर हिने द्वितीय तर श्रिया शिंदे हिने तृतीय क्रमांक पटकाविला. नृत्यभारती स्पर्धेत गौरी बराटे हिने प्रथम, श्रेया शिंदे हिने द्वितीय, तर इशा कुलकर्णी हिने तृतीय क्रमांक पटकावला. अनुक्रमे पाच हजार, तीन हजार व दीड हजार रोख पारितोषिक सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप होते.
मझहर शेख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. आर. एम. चिटणीस यांनी प्रास्ताविकात संगीतभारती, नृत्यभारती या स्पर्धांच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. प्रा. कल्याणी बेलसरे यांनी आभार मानले.

भिडे, एकबोटेंसह 58 जणांना कोरेगाव-भीमा, वढू परिसरात बंदी

0

पुणे – पुणे ग्रामीण पोलिसांनी कोरेगाव भिमा याठिकाणी एक जानेवारी रोजी होणाऱ्या जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे अनुषंगाने शिवप्रतिष्ठानचे संभाजी ऊर्फ मनोहर भिडे, समस्त हिंदु आघाडीचे मिलिंद एकबोटे, कबीर कला मंच कार्यकर्त्यांसह एकूण 58 जणांना 31 डिसेंबर व एक जानेवारी रोजी कोरेगाव-भिमा, वढू, पेरणेफाटा व सणसवाडी परिसरात येण्यास प्रवेशबंदी केली आहे. मागील वर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांनी पावले उचलली आहेत.

पोलिसांनी सीआरपीसी कलम 144 नुसार विविध संघटनेशी संबंधित असलेल्या 58 जणांना नोटिसा बजावल्या असून सीआरपीसी 177 नुसार 188 जणांना दुसरीकडे हलविले आहे. तसेच सराईत 29 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी नेमके कोणाकोणाला नोटिसा जारी केल्या आहेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी संबंधित भागात इंटरनेट सेवा ठप्प ठेवण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ परिसरातील जमीन दोन दिवसांसाठी प्रशासनाच्या ताब्यात देण्यास मान्यता दिली आहे.