Home Blog Page 2998

वातानुकूलीत शिवशाही बसमध्ये प्रवासासाठी दिव्यांगास ७० टक्के तर साथीदारास मिळणार ४५ टक्के सवलत

0

– परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा

मुंबई : एसटी महामंडळाच्या वातानुकूलीत शिवशाही बसेसमध्ये आता दिव्यांग (अंध, अपंग व्यक्ती) आणि त्यांच्या साथीदारास प्रवासभाडे सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. शिवशाही (आसन व्यवस्था) बसमध्ये आता दिव्यांग व्यक्तीस प्रवास भाड्यात ७० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या साथीदारास प्रवास भाड्यात ४५ टक्के इतकी सवलत देण्यात येणार आहे, असे मंत्री श्री. रावते यांनी सांगितले.

मंत्री श्री. रावते म्हणाले की, एसटी महामंडळाने काही काळापुर्वी सुरु केलेली शिवशाही बस लोकांच्या पसंतीस उतरली आहे. राज्यभरात सर्व ठिकाणी प्रवाशांकडून शिवशाही बसला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीस या बसमध्ये कोणत्याही सामाजिक घटकास सवलत देण्यात येत नव्हती. पण लोकांच्या भावना लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरीक, पत्रकार यांना शिवशाही बसमधून प्रवास करण्यासाठी भाडे सवलत देण्यात आली आहे. अंध, अपंगांनाही अशी सवलत देणे अत्यावश्यक असल्याने तसेच अंध, अपंगांनी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची भेट घेऊन केलेल्या विनंतीस अनुषंगून या विनंतीचा सन्मान म्हणून अंध, अपंगांनाही आता शिवशाही बसमधून प्रवास भाडे सवलत देण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे मंत्री श्री. रावते यांनी सांगितले.

महामंडळामार्फत अंध आणि अपंगांना सध्या साध्या आणि निमआराम बसमधून प्रवासासाठी ७५ टक्के सवलत देण्यात येते. याशिवाय त्यांच्या साथीदारास साध्या व निमआराम बसमधून प्रवासासाठी ५० टक्के सवलत देण्यात येते. आता या प्रवास भाडे सवलत योजनेत वातानुकूलीत शिवशाही (आसन व्यवस्था) बसचाही समावेश करण्यात आला आहे. सध्या एसटी महामंडळाच्या अंध आणि अपंगांसाठी असलेल्या प्रवासभाडे सवलत योजनेचे राज्यभरात अंदाजे २ लाख ८२ हजार इतके लाभार्थी आहेत. आता त्यांना शिवशाही बसमधून प्रवासभाडे सवलत मिळणार असल्याने राज्य शासनावर अतिरिक्त बोजा पडणार आहे, असे मंत्री श्री. रावते यांनी सांगितले.

आशा वर्कर्सच्या मानधनवाढीसाठी शासन सकारात्मक- मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढणार- आरोग्यमंत्री

0

मुंबई: राज्यातील आशा वर्कर्सच्यामानधनात वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक असून या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.
मंत्रालयात आशा वर्कर्सच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक झाली. यावेळी आमदार डॉ.नीलम गोऱ्हे, ज्ञानराज चौगुले, प्रकाश आबिटकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राष्ट्रीय आरोग्य अभियानचे सह आयुक्त डॉ.सतीश पवार, आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ.अर्चना पाटील आदींसह आशा वर्कर्स संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात सध्या 61 हजार आशा वर्कर्सच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्यासाठी मदत होत आहे. आशा वर्कर्सचे काम चांगले असून त्यांच्या माध्यमातून दुर्गम भागात आरोग्य विभागाच्या योजना आणि सेवा पोहोचविण्यासाठी सहकार्य लाभत आहे. आशांच्या कामाला न्याय देण्यासाठी त्यांना मानधन वाढविण्यासाठी सकारात्मक असून त्याबाबत मार्ग काढला जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
आशा ग्रामीण भागात सर्व्हे करण्याचे काम करतात, रुग्णाच्या तपासणीसाठी आशा मदत करतात अशावेळेस त्यांना मास्क सारखे साहित्य देण्यात यावे, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
आशा वर्कर्सना १० हजार मानधन द्यावे, मोबाईल भत्ता द्यावा, दिवाळी भेट द्यावी, प्रसूतीसाठी सहाय्य केल्यास देण्यात येणाऱ्या मानधनात समानता असावी आदी मागण्या आशा वर्कर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.
या मागण्यांबाबत मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, असे आरोग्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
आदिवासी भागातील भरारी पथकात काम करणाऱ्या डॉक्टरांचे मानधन वाढीसाठी बैठक

दरम्यान, दुर्गम आदिवासी भागातील भरारी पथकात काम करणाऱ्या डॉक्टरांचे मानधन आदिवासी विभागाच्या सहमतीने वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. पथकातील या डॉक्टरांना विमाकवच देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
आदिवासी भागात काम करणाऱ्या भरारी पथकातील डॉक्टरांच्या विविध समस्यांबाबत आरोग्यमंत्र्यांनी मंत्रालयात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. सन 1995 पासून नवसंजीवनी योजनेअंतर्गत सुमारे 281 बीएएमएस डॉक्टर्स या पथकात काम करत आहेत. त्यांना आदिवासी विभागाकडून 6000 तर आरोग्य विभागाकडून 18000 असे एकूण 24000 रुपये मानधन दिले जाते. आदिवासी विभागाकडून मिळणाऱ्या मानधनात वाढ करावी अशी या डॉक्टरांची मागणी असून त्यासंदर्भात आज झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. आदिवासी विभागाच्या सहमतीने डॉक्टरांचे मानधन वाढविले जाईल असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पत्रकार पेन्शन योजनेसाठी अधिवेशनात भरीव तरतूद करणार-अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

0

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या विविध मागण्यांचे निवेदन

मुंबई-अधिस्वीकृती पत्रकारां बरोबरच जास्तीत जास्त पत्रकार यांना पेन्शन योजना लागू करण्यासाठी या अधिवेशनात भरीव तरतूद करणार असे मत महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने मंत्रालयात सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार पेन्शन योजना पत्रकार यांचेसाठी लागू केले बद्दल आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे, मंत्रालय वार्ताहर संघटना सदस्य खंडूराज गायकवाड, वृत्तवाहिनी प्रदेशाध्यक्ष रणधीर कांबळे, संस्कृती विभाग प्रमुख संदीप भटेवरा, विभागीय अध्यक्ष स्वामी शिरकुल, वृत्तवाहिनी संपर्क प्रमुख उमेश कुलकर्णी, ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे, नगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, अकोले तालुकाध्यक्ष अशोक उगले, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष शंकर करडे, सरचिटणीस नरेश पाटील आदी उपस्थित होते.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तो मानाने जगला पाहिजे. त्यासाठी त्यांना पेन्शन योजना लागू केली असून दहा कोटींची रुपयेची मागणी या पत्रकार संघाने केलेली असताना पंधरा कोटी मंजूर केले आहे. मात्र ही तरतूद पुरेशी नसून खरे गरजवंत पत्रकार उपेक्षित आहे. त्यांना शहरी ग्रामीण भेद न करता सर्वांना कशी लागू करता येईल. यादृष्टीने पत्रकार संघाने मागणी केलेले दोनशे कोटी रुपयेचा आराखडा तयार करून या अर्थसंकल्पात मंजूर करता येईल असे मुनगंटीवार यांनी सांगितले.तसेच सर्व पत्रकार यांचा समावेश महात्मा फुले जनारोग्य योजनेत समावेश करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले आहे.

राज्यातील सर्वच पत्रकार, साप्ताहिकांचे संपादक, यांना देखील पेन्शन योजनेचा लाभ झाला पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करेल. अधिस्विकृतीधारक पत्रकार हे मोठेच असुन या नियमात बदल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मी चर्चा करुन येत्या अर्थसंकल्पात नक्कीच दोनशे कोटींची तरतूद केली जाईल. म.रा.म.प.संघाचे कार्य राज्यात कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. मागील वेळी सहाद्री अतिथीगृहात याच संघाच्या पदाधिकार्‍यांनी मला दहा कोटी रुपये पत्रकार पेन्शन योजनेसाठी तरतूद करण्याची मागणी लावून धरली होती. मात्र मी पंधरा कोटी रुपयांची तरतूद करु असे अश्‍वासन दिले. त्यावेळी अर्थमंत्री बजेटमध्ये पेन्शन योजनेसाठी तरतूद करतील का अशी शंका होती. मात्र नागपूर येथील अधिवेशनाच्या दुसर्‍याच दिवशीच पंधरा कोटी रुपयांची तरतूद कै. बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेसाठी केली. त्यावेळी पत्रकारांना या सरकारमधील मत्र्ंयांचा आत्मविश्‍वास वाढला. तो आत्मविश्‍वास आमचे सरकार राज्यातील सर्व पत्रकारांना देईल असा आशावाद मुनगंटीवार यांनी व्यक्त केला .

समाजातील प्रश्‍न निरपेक्ष भावनेने पत्रकार मांडत त्यांना मदत करण्याची भूमिका या सरकारने घेतली असून पत्रकार हल्ला विधेयक, पेन्शन योजना, आरोग्य योजना असे निर्णय घेतले त्यात महत्वपूर्ण भूमिका राज्याचे अर्थमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी बजावली आहे. असे मत राज्याचे संघटक संजय भोकरे यांनी व्यक्त केले
सरचिटणीस विश्‍वास आरोटे यांनी पत्रकार संघाचे अधिवेशनात मुख्यमंत्री व आपला गौरव व्हावा यासाठी जळगाव येथे अधिवेशनास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले त्यास ही त्यांनी येण्याचे मान्य केले.
पत्रकार संघाचे वतीने यावेळी पगडी, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन व मिठाई वाटून मुनगंटीवार यांना गौरविण्यात आले.

पुणे विभागाच्या 1589.6 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी

0

पुणे – पुणे विभागाच्या 1589.6 कोटी रुपयांच्या 2019-20 च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्यास वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली.
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख,पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, आमदार दत्तात्रय भरणे, भीमराव तापकीर, सुजित मिणजेकर, अनिल बाबर, विजय काळे, कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडीक, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर,सोलापूर जि.प. अध्यक्ष सँजय शिंदे,विभागीय आयुक्त डॉ .दीपक म्हैसेकर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, विभागीय नियोजन उपायुक्त उत्तम चव्हाण आदी उपस्थित होते.
प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्वागत करून पुणे विभागाची माहिती सादर केली. विभागात सन 2019-20 साठी सर्व स्त्रोतातून सुमारे 2452.64 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. त्यामध्ये जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून 1589.60 कोटी रुपये अपेक्षित आहे.
अनुसूचित जाती उपयोजना निधीतून 591.55 कोटी रुपये तर आमदार विकास निधीतून 116 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. याचबरोबर आदिवासी उपयोजना निधीतून 33.07 कोटी, डोंगरी विकास कार्यक्रमातून 31 कोटी आणि खासदार विकास कार्यक्रमातून 50 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे.
विभागाच्या पाचही जिल्ह्यातून 645.57 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातून 223.60 सातारा जिल्ह्यातून 152.68 , सांगली जिल्ह्यातून 60 कोटी सोलापूर जिल्ह्यातून 110 कोटी तर कोल्हापूर जिल्ह्यातून 99.21 कोटी रुपयांची मागणी आहे.पालखी मार्गावरील कांही गावात कायमस्वरूपी शौचालय उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांची मागणी केली.

पुणे जिल्हा-505.76 कोटीस मान्यता
पुणे जिल्ह्याच्या वार्षिक योजनेसाठी 505.76 कोटी रुपयांची आर्थिक मर्यादा आहे. मात्र जिल्ह्यांतून विविध यंत्रणा कडून 223.60 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. या आराखड्यातील 279.52 कोटी रुपये गाभा तर 127.62 कोटी रुपये बिगर गाभा क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत, असे श्री. राम यांनी सांगितले. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी 75.86 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नाविन्यपूर्ण योजनेसाठी 17.70 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.

सातारा: 256.86 कोटींच्या
वार्षिक योजनेस मान्यता
सातारा जिल्ह्यासाठी 256.86 कोटी रुपयांचा आराखडा आहे. त्यापैकी 149.34 कोटी रुपये गाभा तर 59.36 कोटी रुपये बिगर गाभा क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सांगितले. नाविन्यपूर्ण योजनेसाठी सुमारे नऊ कोटी आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी 36.60 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे, असेही श्रीमती सिंघल यांनी सांगितले.
सांगली : 224.17 कोटींच्या आराखड्यास मान्यता

सांगली जिल्ह्यासाठी 224.17 कोटी रुपयांचा आराखडा आहे. त्यापैकी 127.25 कोटी रुपये गाभा तर 53.21 कोटी रुपये बिगर गाभा क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी सांगितले. नाविन्यपूर्ण योजनेसाठी सुमारे आठ कोटी आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी 33.63 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे, असेही श्री. काळम-पाटील यांनी सांगितले.

सोलापूर: 339.77कोटी
जिल्हा वार्षिक योजनेस मान्यता

सोलापूर जिल्ह्यासाठी 339.77 कोटी रुपयांचा आराखडा आहे. त्यापैकी 217.80 कोटी रुपये गाभा तर 54.02 कोटी रुपये बिगर गाभा क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत, असे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सांगितले. नाविन्यपूर्ण योजनेसाठी सुमारे साडे तेरा कोटी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी सुमारे 51 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

कोल्हापूर : 263.04 कोटींची वार्षिक योजना मंजूर

कोल्हापूर जिल्ह्यासाठी 263.04 कोटी रुपयांचा आराखडा आहे. त्यापैकी 142.70 कोटी रुपये गाभा तर 69.04 कोटी रुपये बिगर गाभा क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सांगितले. नाविन्यपूर्ण योजनेसाठी सुमारे नऊ कोटी आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी 39.46 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे, असेही श्री. सुभेदार यांनी सांगितले.

४.७५ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती तसेच सिंगापूरच्या पंगोल येथील आघाडीच्या आणि डिजिटली अत्याधुनिक स्मार्ट कॅम्पसमध्ये शिकण्याची संधी

0

ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलद्वारे त्यांच्या १० व्या ग्लोबल सिटीझनस्कॉलरशीप प्रोग्रॅमसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन

मुंबई- ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल (जीआयआयएस) ही जागतिक शिक्षण क्षेत्रातील आघाडीची,सात देशांमध्ये १९ कॅम्पसचे नेटवर्क तसेच भारतातील विद्यार्थ्यांसाठी ४.७५ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती असणारी संस्था आहे.दहाव्या वर्षात पर्दापण करत असलेल्या ग्लोबल सिटीझन शिष्यवृत्तीने २०१९- २०२१ वर्षांसाठी दबा पात्र भारतीयविद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. भारतातील आघाडीची आंतरराष्ट्रीय स्कूल या नात्याने संस्थादेशातील सहा शहरांमध्ये कार्यरत असून जीआयआयएसने आपल्या शिष्यवृत्ती उपक्रमाअंतर्गत ७.५ मिलियन एसजीडीचीगुंतवणूक केली आहे आणि ८० विद्यार्थ्यांना शिक्षण दिले आहे, जे आता जगभरातील अग्रेसर विद्यापीठांमध्ये आहेत.

या दोन वर्ष कालावधीच्या शिष्यवृत्ती उपक्रमासाठी नोंदणी करण्यासाटी भारतीय विद्यार्थ्यांना www.giisscholarships.orgवर लॉन ऑन करून १७ मार्च २०१९ आधी अर्ज करावा लागेल.

या शिष्यवृत्ती उपक्रमासंदर्भात श्री. अतुल तेमुर्णीकर, सह- संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष, ग्लोबल स्कूल्स फाउंडेशनम्हणाले, ‘भारत आणि येथील गुणवत्तेशी आम्ही कायमच बांधील राहिलो आहोत. जीआयआयएसने कायमच जगभरातीलविद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवत त्यांच्यात जागतिक पातळीची क्षमता निर्माण केली आहे. आमचा ग्लोबलसिटीझन शिष्यवृत्ती उपक्रम बुद्धीमान मनांना जागतिक अनुभव देण्याच्या हेतूने तयार करण्यात आला असून म्हणूनचत्यांना जीआयआयएस स्मार्ट कॅम्पस, पुंगोल, सिंगापूर येथे २१ व्या शतकाचा, आंतरराष्ट३य अभ्यासक्रम उपलब्ध करूनदिला जाणार आहे.’

पुंगोलमधील जीआयआयएस स्मार्ट कॅम्पस नव्या युगातील शिक्षणाचा कळस आहे, जिथे तंत्रज्ञान, सुविधा आणि डिझाइनयांचे विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शैक्षणिक आणि शिक्षणेइतर अनुभव देण्यासाठी योग्य समीकरण साधण्यात आले आहे. नव्यायुगाच्या या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या व्हर्च्युअल क्लासरूम्सच्या मदतीनेजगभरातील शिक्षकांशी जोडत, स्मार्ट उपकरणे व डिजिटल सहकार्याला मध्यवर्ती ठेवणारे शिक्षण देत, रोबोटिक्स व माहितीतंत्रज्ञानासाठी खास प्रयोगशाळा व २१ व्या शतकातील इतर अशा कित्येक लर्निंग टुल्सच्या मदतीने भविष्यासाठी तयार केलेजाणार आहे. अत्याधुनिक स्मार्ट कॅम्पसला डिजिटल वर्ग, खेळावर आधारित माहिती विश्लेषण आणि फेस रेकग्निशन,इनडोअर पोझिशनिंग सिस्टीम अशा स्मार्ट सुरक्षा वैशिष्ट्यांची जोड देत १०० सुरक्षित करण्यात आले आहे. कॅम्पसवर ६००पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे असून ते संपूर्ण परिसरावर आणि एकंदर हालचालींवर अहोरात्र नजर ठेवतात. स्मार्ट कॅम्पसविद्यार्थ्यांचा समग्र विकास घडवण्यासाठी सुरक्षित व पूरक वातावरण निर्माण करण्याच्या हेतूने तयार करण्यात आला आहे.हा शिष्यवृत्ती उपक्रम कोणत्याही बोर्डाअंतर्गत दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपासून सीबीएसई किंवा आयबीडीपीअभ्यासक्रमाअंतर्गत ११ व १२ वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.याच्या निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा व त्यानंतर मुलाखतीच्या दोन फेऱ्यांचा समावेश आहे. या परीक्षांचे केंद्र पुरेशाप्रतिसादानुसार भारतातील प्रमुख शहरांमध्ये असेल.

भारतातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या हेतूने जीआयआयएस उदयोन्मुख विद्यार्थ्यांना त्यांची कौशल्ये विकसितकरण्यासाठी आणि उद्याचे नेते घडवण्यासाठी व्यासपीठ देतच राहाणार आहे.

पत्रकारिता म्हणजे सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे पवित्र कार्य-सेवानिवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ

0

अमळनेर – पत्रकारिता म्हणजे सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे पवित्र कार्य असून उत्तम पत्रकार होण्यासाठी विविध बाबीसंबंधी ज्ञान व कौशल्य आवश्यक आहेअसे प्रतिपादन निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी अमळनेर येथे आयोजित पत्रकारांच्या कार्यशाळेत केले.
अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ,संघटना व मराठी वाड्मय मंडळ,प्रा र का केले सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांच्या कार्यशाळेचे आयोजन म वा मंडळाच्या रावसाहेब नांदेडकर सभागृहात करण्यात आले होते,यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या श्री भुजबळ यांनी पत्रकारांसाठी असलेल्या विविध शासकीय योजना व सवलती याबाबत पत्रकारांना माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर म. वा. मंडळाचे उपाध्यक्ष तथा मसापचे कार्याध्यक्ष रमेश पवार व पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत होते. सुरवातीला दिपप्रज्वलन व आद्य पत्रकार श्री बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,यानंतर प्रमुख वक्ते श्री भुजबळ तसेच महाराष्ट्र राज्याच्या कला व सांस्कृतिक मंडळावर निवड झाल्याबद्दल रमेश पवार यांचा सत्कार करण्यात आला.प्रास्तविक मंडळाच्या विश्वस्थ सौ वसुंधरा लांडगे यांनी केले. यावेळी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना श्री भुजबळ पुढे म्हणाले , की आज पत्रकारिता व्यवसाय म्हणून स्वीकारताना याचा समाज हितासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी कसा उपयोग करता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे .स्वातंत्र्य पूर्व काळातील पत्रकारितेची विशिष्ट उद्दिष्टे होती.नंतर पत्रकारितेची उद्दिष्ट्ये बदलली. पत्रकारांनी सत्य आहे तेच देण्याचा प्रयत्न करावा .काही जण पूर्णपणे पत्रकार नसताना पत्रकार म्हणून मिरवून समाजात वेगळे असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करतात, असे सांगून त्यांनी पत्रकारांसाठी असलेल्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची, त्यासाठी आवश्यक असलेल्या निकषांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी पत्रकारांना दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या समस्या या संदर्भामध्ये ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील, सुभाष पाटील घोडगावकर, जगन्नाथ बडगुजर, मरसाळे, जितेंद्र ठाकूर,मिलिंद पाटील, यांनी प्रश्न विचारले. त्यांच्या समस्यांचं निरसन श्री भुजबळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी तर आभार उमेश काटे यांनी मानले . यावेळी म वा मंडळाचे प्रा डॉ पी जे जोशी,नरेंद्र निकुंभ, जेष्ठ पत्रकार गं.का.सोनवणे,सिनेट सदस्य दिनेश नाईक,माजी अध्यक्ष किरण पाटील तसेच अमळनेर तालुका व शहरातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.अमळनेरात प्रथमच पत्रकारांची कार्यशाळा झाल्याने पत्रकार बांधवांनी समाधान व्यक्त केले.यासाठी म वा मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी व कार्यकारी मंडळ यांनी विशेष सहयोग दिल्याने तसेच लायन्स क्लब अमळनेर यानीही सहकार्य केल्याने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

शेतकऱ्यांसाठी शाश्वत विजेचा पर्याय मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना

0

कृषिपंपांना पारंपरिक पद्घतीने वीजपुरवठा करण्यासाठी 63 केव्हीए/ 100 केव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र उभारण्यात येतात व त्यावरील लघुदाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. परंतु वीजचोरी, इतर तांत्रिक बिघाड, विद्युत अपघात, रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचा धोका यासारख्या अनेक अडचणी निर्माण होतात. दुर्गम किंवा डोंगराळ भागात वीजयंत्रणेचे जाळे नाही तेथे डिझेल इंधनाचा वापर करून कृषिपंप चालविले जातात. या सर्वांसाठी पर्याय म्हणून दिवसा तसेच अखंडित व शाश्वत वीजपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना जाहीर केली आहे.

सौर कृषिपंप – सौर कृषिपंप हा सूर्याच्या किरणांपासून म्हणजेच सौर ऊर्जेपासून चालणारा पंप आहे. सौर पंपामध्ये मुख्यतः सोलर पॅनल, वॉटर पंप संच, पंप नियंत्रण उपकरणे तसेच इतर आवश्यक साहित्याचा समावेश आहे. सौर पंपाद्वारे विहिर, नदी, शेततळे, कालव्यामधून पाण्याचा उपसा करून पाईपद्वारे पिकांना पाणी देता येते. सौर कृषिपंप सौर ऊर्जेवर म्हणजेच सूर्याच्या किरणांपासून काम करतो. जेव्हा सूर्यकिरणे पंपाच्या सोलर पॅनल्सवर पडतात तेव्हा डीसी (डायरेक्ट करंट) शक्ती निर्माण होऊन सौर पंप कार्यान्वित होतो व पाण्याचा उपसा केला जाऊ शकतो. सौर ऊर्जेमुळे शेतकऱ्यांना दिवसा पाण्याचा उपसा करता येतो.

सौर कृषिपंपाची उपयुक्तता – सौर कृषिपंप चालविण्यासाठी कोणत्याही इंधन किंवा पारंपरिक विजेची आवश्यकता नाही. यामुळे वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाब, सिंगल फेज समस्या, पंप जळणे या समस्याही उद्‌भवत नाहीत. दुर्गम डोंगराळ भागात जेथे वीजखांब रोवणे कठीण आहे तेथे हे सौर कृषिपंप लावणे सहजशक्य आहे. डिझेल पंपाच्या तुलनेत दिर्घकाळ म्हणजे 25 वर्ष टिकणाऱ्या सौर कृषिपंपाचा देखभाल खर्च अत्यंत कमी आहे. लुब्रिकेंट किंवा ऑईलची आवश्यकता नसते. त्यामुळे माती व पाणी दूषित होत नाही. सौर कृषिपंप चालविण्यास अतिशय सोपा व फायदेशीर आहे.

सौर कृषिपंपाचे फायदे – शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता येणार आहे. विजेचा किंवा डिझेलचा वापर नसल्यामुळे वीजबिलांचा किंवा डिझेलचा खर्च नाही. कमीतकमी व साध्या देखभालीची गरज आहे. विद्युत अपघात होण्याची शक्यता नाही. पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे. याशिवाय बॅटरी चार्जिंगची सोय असल्याने बॅटरीद्वारे शेतामधील घराला रात्रीच्या वेळी वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना – ज्यांच्याकडे शाश्वत जलस्त्रोत आहे व सिंचनासाठी पारंपरिक पद्घतीने वीजपुरवठा नाही अशा शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत आहे. तसेच महावितरणकडे कोटेशनची रक्कम भरून कृषिपंपाची वीजजोडणी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने सौर कृषिपंप उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

योजनेसाठी अर्ज करण्याची पद्घत – सौर कृषिपंप योजनेसाठी महावितरणतर्फे स्वतंत्र वेब पोर्टल सुरु केले आहे.www.mahadiscom.in या वेबसाईटवर किंवा https://www.mahadiscom.in/solar/ या लिंकवर जाऊन अर्जदार ए-वन अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. हा अर्ज साधा व सोपा असून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करता येतात. ऑनलाईन अर्ज करण्यास अडचण आल्यास शेतकऱ्यांना महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधता येईल व या कार्यालयातून अर्ज दाखल करण्यासाठी विनामूल्य मदत केली जाईल.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे – या योजनेसाठी शेतीचा 7/12 उतारा, जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/जमाती लाभार्थ्यांकरिता) या कागदपत्रांची सत्यप्रत आवश्यक आहे. अर्जदार स्वतः शेतजमिनीचा एकटा मालक नसेल, तर इतर हिस्सेदारांचा / मालकाचा ना हरकत दाखला देणे बंधनकारक आहे. पाण्याचा स्त्रोत डार्कझोनमध्ये असल्यास भूजल सर्वेक्षण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. या व्यतिरिक्त संपर्काकरिता अर्जदारांचा मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता (असल्यास), पाण्याचे स्त्रोत व त्याच्या खोलीची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे. अर्ज केल्यानंतर संबंधीत अर्जदारांना त्यांनी नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे अर्जांची सद्यस्थितीबाबत माहिती कळविण्यात येणार आहे.

योजनेतील लाभार्थी हिस्सा – या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून 3 अश्वशक्ती डीसी पंपाच्या आधारभूत किंमतीच्या 10 टक्के रक्कम आणि अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांना पंपाच्या आधारभूत किंमतीच्या 5 टक्के रक्कम भरावी लागेल. पारंपरिक वीजपुरवठ्यासाठी रकमेचा भरणा करून प्रलंबित यादीत असलेल्या संबंधीत लाभार्थ्यांची रक्कम यामध्ये समायोजित करण्यात येईल व त्यांना उर्वरित फरकाची रक्कम भरावयाची आहे. सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांना 3 अश्वशक्तीसाठी 25,500 रुपये तर 5 अश्वशक्तीसाठी 38,500 रुपये आणि अनुसूचित जाती / जमाती लाभार्थ्यांना 3 अश्वशक्तीसाठी 12,750 रुपये 5 अश्वशक्तीसाठी 19,250 रुपये भरावे लागणार आहे.

पारंपरिक वीजजोडणीपेक्षा लाभार्थी हिस्सा अधिक का? – कृषिपंपाच्या पारंपरिक वीजजोडणीसाठी सुमारे 5500 रुपये भरल्यानंतर शेतकऱ्यांना 3 किंवा 5 अश्वशक्ती क्षमतेचे कृषिपंप व त्यासाठी लागणारे साहित्य उदा. पाईप, फिटींग स्वखर्चाने लावावे लागते. यासह विद्युत वायरिंग, स्टार्टर, ईएलसीबी, कॅपॅसिटर आदींसाठी एकूण सुमारे 25,000 ते 30,000 रुपयांचा खर्च येतो. याउलट सौर कृषिपंप, सौर पॅनल, पंप कंट्रोलर, पाईप इत्यादींचा अंतर्भाव आहे. तसेच 2 एलईडी बल्ब देण्यात येणार आहे. यासह मोबाईल चार्जिंग व बॅटरी चार्जिंगसाठी सॉकेटची सोय उपलब्ध आहे. इतर आणखी फायद्यांमुळे पारंपरिक वीजजोडणीच्या तुलनेत सौर कृषिपंप हा अत्यंत किफायतशीर आहे.

विमा संरक्षण व दुरुस्तीचा हमी कालावधी – सौर कृषिपंप 25 वर्ष सेवा देऊ शकतो. या कृषिपंपाच्या देखभाल व दुरूस्तीसाठी 5 वर्ष तर सौर पॅनलसाठी 10 वर्षांचा हमी कालावधी राहणार आहे. या हमी कालावधीत सौर कृषिपंप किंवा सौर पॅनल नादुरूस्त झाल्यास विनामुल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी एजन्सीची राहणार आहे. सौर कृषिपंप किंवा सौर पॅनल नादुरुस्त झाल्यास संबंधीत शेतकऱ्यांनी महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राला तात्काळ कळविणे आवश्यक आहे. तीन दिवसांमध्ये तक्रारीचे निवारण करण्यात येईल.

सौर कृषिपंपाच्या साहित्याची चोरी झाल्यास त्याची तक्रार नजीकच्या पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवालाद्वारे (एफआयआर) दाखल करावी. त्याची माहिती महावितरण कार्यालयास देण्यात यावी. सौर कृषिपंप आस्थापित करणाऱ्या एजन्सीद्वारे 5 वर्षाच्या कालावधीसाठी पंपाचा विमा काढण्यात येत आहे. त्यामुळे विमा कंपनीकडून संबंधीत लाभार्थ्यांना नुकसान भरपाई मिळेल व सौर पंप आस्थापित करणारी एजन्सी त्यासाठी सहकार्य करेल.

नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षा – सध्या बाजारात उपलब्ध असलेले सोलर पॅनल हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेले आहेत. त्यामुळे वीज, वादळ, गारा या नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचे क्वचितच नुकसान होते. एखाद्या दुर्मिळ वेळी वीज पडल्यामुळे सौर पॅनलचे नुकसान होऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी सौर पंपासोबत वीज संरक्षण यंत्र (Lighting Arrestor ) बसविण्यात येणार आहे.

तक्रार निवारणासाठी 24×7 टोल फ्री सेवा – सौर कृषिपंप नादुरुस्त झाल्यास किंवा त्यासंबंधीची अन्य काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांना महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राशी 24×7 संपर्क साधता येईल. यासाठी 1912 किंवा 18001023435 किंवा 18002333435 हे तीन टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. प्राप्त झालेली तक्रार संबंधित एजन्सीकडे पाठविण्यात येईल व एजन्सीकडून तीन दिवसांत तक्रारीचे निवारण करण्यात येईल.

लेखक – निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, पुणे

पुण्यात काँग्रेस पक्षातर्फे ‘‘जनसंघर्ष’’ सभा.

0

पुणे- येत्या शुक्रवारी ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सभा भवानी पेठेत आयोजित करण्यात आली आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी राज्यात काँग्रेस पक्षानेजनसंघर्ष यात्रा काढली होती.‌ त्याच पाठोपाठ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यात५० ठिकाणी ‘जनसंघर्ष’ सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्याची सुरवात पुण्याहून होणारआहे. गेल्या साडेचार वर्षात केंद्रातील मोदी व राज्यातील फडवणीस सरकारने लोकांच्या अपेक्षा
भंग केल्या. नोटबंदीमुळे संपूर्ण देशात मंदीची लाट पसरली. मोठे कारखानदार, व्‍यापारी, छोटेदुकानदार आणि शेतकरी यांना याचा मोठा फटका बसला. जी.एस.टी. चूकीच्या पध्दतीने लागूकेली, त्यामुळे व्‍यापारी आणि ग्राहकांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहे. राफेल विमानखरेदीमध्ये भ्रष्टाचार करून संयुक्त संसदिय समिती नेमण्यास भाजप सरकार तयार नाही. सन२०१४ च्या निवडणुकीत सत्तेत येण्यासाठी भाजपने आपल्या जाहिरनाम्यात आणि भाषणात
सांगितले की, काळा पैसा देशात परत आणू आणि प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाखरूपये जमा करू. सत्तेत आल्यावर दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ असे सांगितले होते. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने केलेल्या तुरडाळ घोटाळा, चिक्की घोटाळा या सारख्या अनेक घोटळ्यांनी व प्रचंड प्रमाणात झालेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. दिल्लीपासून
गल्लीपर्यंत एक हाती सत्ता असून या भाजप सरकारला देश चालविता येत नाही. सामाजिक सलोखा उध्दस्त करण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. सर्वच स्तरावर हे सरकार अपयशी ठरले आहे.
या सरकारचा खरा चेहरा उघड करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘जनसंघर्ष’ सभेचे आयोजन शुक्रवार दि. ८ फेब्रुवारी २०१९ रोजी छाया टॉकीज येथे, पेस्तंजी दवाखान्याजवळ, भवानीपेठ, पुणे येथे सायं. ५.०० वा., करण्यात आले आहे.
या सभेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकचव्‍हाण,
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्‍हाण, पक्षाचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित राहणारआहेत असे या पत्रकाद्वारे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांशी ६ तासाच्या चर्चेनंतर ,अण्णा हजारेंचे उपोषण अखेर मागे

0
  • ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे गेले सात दिवस सुरू असलेले उपोषण आंदोलन मागे…
  • मुख्यमंत्र्यांशी सुमारे सहा तासांची मॅरेथॉन बैठक…
  • सर्व मागण्या सरकारने केल्या मान्य…
  • लेखी आश्वासनानंतर अण्णांचे आंदोलन मागे…

पुणे-लोकपालची अंमलबजावणी करा आणि लोकायुक्त नेमण्यासंदर्भातला कायदा त्वरित करा या दोन प्रमुख मागण्यांसह शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या अनेक मागण्या अण्णा हजारेंनी केल्या होत्या. या मागण्यांसाठी त्यांनी मागच्या सात दिवसांपासून उपोषण सुरु केलं होतं. जे मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आणि विनंतीनंतर मागे घेण्यात आलं आहे.  राळेगणसिद्धी या ठिकाणी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुभाष भामरे आणि अण्णा हजारे यांची सुमारे सहा तासांपेक्षा जास्त काळ चर्चा झाली. ज्यानंतर लोकपालच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई होईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच लोकायुक्तासंदर्भात १३ फेब्रुवारीला बैठक बोलवण्यात येईल त्यामध्ये चर्चा होईल असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. अण्णांनी केलेल्या मागण्या योग्यच आहेत आणि आम्हाला त्या मान्य आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच त्यानंतर त्यांनी अण्णा हजारेंना उपोषण सोडण्याची विनंती केली.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीनंतर अण्णा हजारेंनी उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली. लोकपालच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि लोकायुक्त नेमण्यासंदर्भातल्या कायद्याची नव्याने पुनर्रचना या दोन प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. तसेच इतर मागण्यांवरही सरकारने सहमती दर्शवली आहे ज्यामुळे मी समाधानी आहे आणि उपोषण मागे घेतो आहे अशी घोषणा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली.

लोकायुक्ताच्या संदर्भात अण्णांचा आग्रह होता की लोकायुक्त कायदा नव्याने करावा, एक समिती स्थापन करण्यात यावी अशीही मागणी केली होती. बजेट अधिवेशनात आम्ही यासंदर्भातला ड्राफ्ट कायद्याच्या स्वरूपात मांडू ही मागणीही आम्ही मान्य केली आहे असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसंच समितीत अण्णा हजारेंनी सुचवलेले सदस्य आणि सरकारचे सदस्य असतील. कृषी मूल्य आयोगाच्या संदर्भात अण्णा हजारेंनी स्वायत्ततेची मागणी केली होती या संदर्भातही जे नियम आम्ही तयार केले आहेत. अण्णा हजारे यांच्यातर्फे सोमपालजीही काम करतील.

अण्णांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांना आम्ही मान्यता दिली आहे. अल्प भूधारक शेतकऱ्यांना सहा हजार वार्षिक निधी जाहीर करण्यात आला आहे. या निधीत वाढ करावी अशीही मागणी अण्णा हजारेंनी केली होती. या मागणीबाबतही आम्ही विचार करतो आहोत. शेतकऱ्यांच्या निधीत वाढ करण्याचा आमचा मानस आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

काय होत्या अण्णांच्या मागण्या –
– भ्रष्टाचार रोखण्यासाठी केंद्रात तत्काळ लोकपाल नियुक्ती करालवी
– लोकपाल लोकायुक्त कायद्यानुसार सर्व राज्यांत सक्षम लोकायुक्ताची स्थापना व्हावी
– स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट जास्त किमान आधारभूत किंमत मिळावी
– फळे, भाजीपाला व दुधासाठी हमीभाव निश्चित करावा
– ज्यांच्या घरात शेतीशिवाय उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही अशा ६० वर्षे वयावरील शेतकरी व शेतमुजुरांना प्रति माह किमान पाच हजार रुपये पेन्शन मिळावी.
– शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी
– राष्ट्रीय कृषीमूल्य आयोगाला संविधानिक दर्जा देऊन संपूर्ण स्वायत्तता द्यावी
– कृषी अवजारे, आधुनिक तंत्रज्ञानातील ठिबक सिंचन व अन्य तांत्रिक वस्तूंना जीएसटीतून पूर्णपणे वगळावे

धक्कादायक, पुण्यात गरीब रुग्णांचे ‘ बुरे दिन’ कमला नेहरू रुग्णालयातील ‘ डायलिसीस यंत्रणा 10 दिवसांपासून बंद

0
पुणे – महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील 6 डायलिसिस मशिन्स 10 दिवसांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या ठिकाणी नियमितपणे डायलिसिस साठी येणाऱ्या रुग्णांची संख्या 63 असून महिन्याला 500 रुग्णांचे याठिकाणी डायलिसिस होते. दहा दिवसणापासून ही यंत्रणा बंद पडल्याने नियमित येणारे गरीब कुटुंबातील 2 रुग्ण अत्यवस्थ असून त्यांच्यावर ससून रुगणालयात उपचार सुरू आहेत. येथील डायलिसिस यंत्रणा तत्काळ सुरू करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्थानिक नगरसेविका पल्लवी जावळे यांनी दिला आहे.
     कमला नेहरू रुग्णालयामध्ये तीन वर्षांपूर्वी गरीब रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सुरू करण्यात आले. सुरवातीला लायन्स क्लब कडून ही यंत्रणा राबविण्यात येत होती. मोफत सुविधेमुळे शहराच्या विविध भागामधील गरीब रुग्णांचा ओघ वाढला आहे. परंतु दहा दिवसांपूर्वी अचानक एकाचवेळी सर्व मशिन्स दुरुस्तीला नेतो असे सांगून नेण्यात आल्या आहेत. डायलिसिस ही अत्यावश्यक सेवा असताना ती अचानक पणे बंद ठेवण्यामागे काही तरी काळेबेरे असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका पल्लवी जावळे यांनी केला आहे. अचानक सेवा बंद केल्याने नियमितपणे डायलिसिससाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत. यापैकी दोन रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे जावळे यांनी सांगितले.
     जावळे म्हणाल्या, की याठिकाणी होणाऱ्या डायलिसिस चा ऑडिट रिपोर्ट करावा अशी मागणी सातत्याने करत आहोत. परंतु प्रशासनाकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही. डायलिसीस चालकाला पालिकेकडून दरमहा 6 ते 8 लाख बिल अदा केले जाते, अशी आमची माहिती आहे. परंतु त्याने अचानक डायलिसीस मशीन नेल्याने यामागील संशय वाढला आहे. या मशीन कशासाठी नेल्या याचाही खुलासा प्रशासनाने करावा. तसेच तातडीने डायलिसीस सुविधा सुरू करावी अशी आमची मागणी आहे.
    आरोग्य प्रमुख रामचंद्र हंकारे म्हणाले, की संबंधित डायलिसिस केंद्र चालकासोबत केलेल्या कराराची तपासणी करून तातडीने त्याला नोटीस बजवावी असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. डायलिसिस यंत्रणा तातडीने सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

महावितरणच्या वाडीया उपविभाग कार्यालयाचे हडपसर येथील प्रस्तावित स्थलांतर रद्द करण्याची कर्तव्य फाउंडेशनची मागणी

0
पुणे-महावितरण कंपनीचे वाडीया काँलेजजवळ असलेले वाडीया उपविभागीय कार्यालय हडपसर औद्योगिक वसाहत येथे स्थलांतरित करण्यात येणार असून यामुळे नागरिकांना दूरवर जाण्याचा त्रास  सहन करावा लागणार असल्याने या कार्यालयाचे प्रस्तावित स्थलांतर रद्द करण्यात यावे अशी मागणी कर्तव्य फाउंडेशनतर्फे महावितरणचे कार्यकारी अभियंता(प्रशासन) बा.भा.हळनोर यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे, माजी. नगरसेवक शैलेंद्र बिडकर, अशोक देशमुख, सचिन कांबळे, गणेश शेलार, सुनील बाथम उपस्थित होते.
  सध्याच्या वाडीया उपविभागात बोट क्लब रोड,कोरेगाव पार्क व जे.जे.गार्डन हे तीन सेक्शन येतात त्याअंतर्गत पुणे स्टेशन, पुणे कँम्प परिसर, ताडीवाला रोड,कोरेगाव पार्क, बोट क्लब रोड, बंडगार्डन, वाडिया काँलेज, जीपीओ, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, ससून रुग्णालय, पुणे पोलीस आयुक्तालय, सेंट्रल बिल्डिंग, क्वीन्स गार्डन, गवळीवाडा, भिमपुरा आदी परिसराचा समावेश होतो त्यात सोसायटी, वस्ती ,झोपडपट्टी सोबतच बहुतांश सरकारी कार्यालये व निवासस्थान आहेत. या भागात महावितरणचे ४० हजार हून अधिक आहेत.या ग्राहकांना नवीन वीजजोड, वीज बील दुरूस्ती, वीज तक्रार, वीज बिल भरणा, मीटर दुरुस्ती आदी कामांसाठी मध्यवर्ती ठीकाणी असलेल्या वाडीया उपविभागीय कार्यालयात यावे लागते.या स्थलांतरामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार असून वेळ व प्रवास खर्चही वाढणार आहे त्यामुळे सदर स्थलांतर रद्द करण्याची मागणी केली असल्याचे विकास भांबुरे यांनी सांगितले तर कार्यकारी अभियंता बा.भा.हळनोर यांनी याबाबतीत नागरि हिताचा निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.

अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ग्राहक सेवांमुळे महावितरण देशात सर्वोत्तम : सीएमडी संजीव कुमार

0

मुंबई : महावितरणकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यात येत आहेत.  त्यामुळे देशात वीज वितरण क्षेत्रात महावितरण सर्वोत्तम कंपनी आहे आणि याच कारणांमुळे महावितरणच्या विविध योजनांची अंमलबजावणी देशातील इतर कंपन्यांकडून केली जाते, असे प्रतिपादन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी केले.

मुंबईस्थित गोरेगाव येथील एक्झीबिशन सेंटरमध्ये इंडियन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्यावतीने (ईमा) आयोजित आंतरराष्ट्रीय प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी श्री. संजीव कुमार बोलत होते.  वितरण कंपन्यांसमोरील ‘आव्हाने आणि संधी’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.

महावितरणने मागील तीन वर्षांत बहुतांश ग्राहकसेवा ऑनलाईन केल्या आहेत.  ग्राहकांना वीजबिलाचा तपशील, खंडित वीजपुरवठ्याबाबतची माहिती, वीजपुरवठा खंडित असल्याबाबतची पूर्वसूचना, इत्यादी माहिती एसएमएसद्वारे दिली जाते. वीजखरेदीचे योग्य नियोजन केल्यामुळे मागील वर्षी महावितरणची मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे.  सौर ऊर्जेवर आधारित सौरकृषी फिडरमुळे कृषीग्राहकांचे वीजदर कमी होऊन अंतिमत: घरगुती ग्राहकांच्या वीजदराचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल. राज्यातील ४१ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे वीज देण्यासाठी महावितरणद्वारे विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. केंद्रीकृत वीजबिलींगमुळे ग्राहकांना वेळेत वीजबील मिळत असून यात ग्राहकांना वीजबील तयार होताच एसएमएस जात असल्यामुळे वीजबील सुधारण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. महावितणमधील सर्वच कंत्राटदारांना ईसीएसच्या माध्यमातून देयक अदा करण्यात येत आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना डॅशबोर्डमुळे माहिती उपलब्ध झाल्याने उपविभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनाही व्यवस्थापन निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येत आहे. प्रभावी ऊर्जा अंकेक्षण व उपकेंद्राचे संनियंत्रण यामुळे महावितरणच्या यंत्रणेवरील खर्चात बचत करणे शक्य होत आहे.  या सर्व विविध उपाययोजनांमुळे महावितरणची वीज वितरण हानी विद्युत नियामक आयोगाने निश्चित केलेल्या प्रमाणापेक्षा कमी आहे, अशी माहिती श्री. संजीव कुमार यांनी दिली.

यावेळी सीईएससी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. देबाशिस बॅनर्जी, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातील संचालक श्री. विशाल कपूर, एमएसएमईचे सहसंचालक श्री. सुधीर गर्ग, केंद्रीय अवजड उद्योग विभागाचे सचिव श्री. ए.आर. सिहाग यांच्यासह ईमाचे श्री. हरिश अग्रवाल, श्री. सुनिल सिंघवी आणि श्री. आर. के. चुग प्रामुख्याने उपस्थितीत होते.

महावितरणच्या स्टॉलला मान्यवरांची भेट

ईमाच्या प्रदर्शनीत महातिरणच्यावतीने स्टॉल उभारण्यात आला आहे. उद्घाटन कार्यक्रमानंतर या स्टॉलला मान्यवरांनी भेट दिली. यावेळी त्यांना महावितरणच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.  महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान व देयक वसुली विभागाचे कार्यकारी संचालक श्री. योगेश गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्टॉल उभारण्यात आला आहे. तसेच या प्रसंगी श्री. संजीव कुमार यांच्या हस्ते विविध स्टॉलचे उद्घाटनही करण्यात आले.

सायंकाळी ५:३० ते ९ वाजेपर्यंत नळ स्टॉप ते पौडफाटा एकेरी वाहतूक – पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते

0
मेट्रो ने दुरुस्तीची कामे त्वरित करावीत – संदीप खर्डेकर.
पुणे-कर्वे रस्त्यावर नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून सध्या रात्री ११ पर्यंत असणाऱ्या वाहतूक कोंडीची वेळ जवळजवळ २ तासाने कमी करण्यात वाहतूक पोलिसांना यश आल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते म्हणाल्या.भाजप चे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी कर्वे रस्त्यावरील वाहतुकीची समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून पाहणी व उपाययोजने साठी या भेटीची आयोजन केले होते.यावेळी सजग नागरिक मंच चे विवेक वेलणकर,स्थानिक नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,प्रभाग समिती अध्यक्ष दीपक पोटे,नगरसेवक जयंत भावे,नगरसेविका छायाताई मारणे,वृषालीताई चौधरी,माधुरीताई सहस्रबुद्धे,मेट्रो चे अतिरिक्त प्रोजेक्ट इन्चार्ज प्रशांत कुलकर्णी,श्री मुलमुळे,पुणे मनपा चे श्री नरेंद्र देवकर,श्री वाघमारे,श्री मुकुंद शिंदे,एन सी सी कंस्ट्रक्शन्सचे नामदेव गव्हाणे,पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी, शिवसेनेचे शिरीष फडतरे,मनसेचे राम बोरकर,संदीप मोकाटे व इतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायंकाळी ५:३० ते ९ वाजेपर्यंत नळ स्टॉप चौक ते पौडफाटा एकेरी वाहतूक राबविण्यात येईल व कोथरूड कडून येणारी वाहतूक एस एन डी टी शेजारील कॅनाल वरून वळविण्यात येईल , या व्यवस्थेमुळे वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळत असल्याचे निरीक्षण पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी नोंदविले तसेच कोंडी च्या वेळेस मी स्वतः,माझा स्टाफ व वार्डन्स याठिकाणी थांबून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत असे ही त्या म्हणाल्या.मात्र मेट्रो कडून सुधारणांची कामे जलदगतीने होत नसल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली.
पाळंदे कुरियरची गल्ली किंवा निसर्ग कडून येणार रस्ता कोणत्याही परिस्थितीत बंद केला जाऊ नये असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या/त्यास मान्यता देण्यात अली व अपवादात्मक परिस्थितीत तेथे वाहतूक वळविण्याचा पर्याय योजला जातो असे निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी स्पष्ट केले.
विवेक वेलणकर यांनी कर्वे रस्त्यावर बॅरिकेड्स लावून (डेडिकेटेड ) फक्त दुचाकींसाठी एक लेन करण्यात यावी अशी सूचना केली,तर नगरसेवक जयंत भावे यांनी नळ स्टॉप कडून वर जाताना मध्ये डिव्हायडर तोडून थेटपुलावर (पौडफाटा फ्लायओव्हर वर ) वाहनांना प्रवेश देण्याबाबत सूचना केली.अभिनव शाळेची गल्ली ही धोकादायक झाली असून गर्दी झाली कि दुचाकीस्वार वेगाने या गल्लीत घुसतात,येथे ३ शाळा असून लहान मुले रस्त्यावरून ये जा करत असतात,यावर उपाययोजना करण्याची मागणी शिरीष फडतरे यांनी केली,तर पोलीस खात्यासाठी बॅरिकेड्स उपलब्ध करून देऊ व कोंडी सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे दीपक पोटे म्हणाले.
पौड रस्त्यावरील पदपथ व रस्त्यावर मोठे पाईप आणून टाकले असून १५ दिवस पाठपुरावा करून ही ते हलविले जात नसल्याबद्दल नगरसेविका छायाताई मारणे यांनी नाराजी व्यक्त केली.
मेट्रो च्या वतीने प्रशांत कुलकर्णी यांनी ” दुभाजकांवर त्वरित रेडियम लावण्यात येईल व दुभाजक रात्रीच्या वेळी सुद्धा दिसावेत यासाठी रंग मारण्याचे काम तसेच पाईप उचलणे व विविध ठिकाणी बोर्ड लावण्याचे काम दोन दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.या रस्त्यावरील जड वाहतुकीस अन्यत्र वळविता येईल किंवा कसे याबाबत ही विचार केला जावा अशी सूचना ही उपस्थितांनी केली.
कॅनाल रस्ता जेथे प्रभात रस्त्याला मिळतो तेथे वरदान नेमावेत तसेच कर्वे रस्त्यावर डिव्हायडर फोडून ये जा करणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच या ठिकाणी भक्कम बॅरिकेड्स उभारावेत अशी सूचना संदीप खर्डेकर यांनी केली.सकाळ संध्याकाळ येथील गोठे मालक गायी म्हशी घेऊन भर गर्दीत ये जा करतात त्याचा त्रास होतो असे पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी म्हणाल्या,यावर गोठ्याच्या स्थलांतरासाठी प्रयत्नशील असल्याचे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,दीपक पोटे व जयंत भावे यांनी सांगितले.
अजून ८ महिने मेट्रो चे काम चालणार असून या दरम्यान वेळोवेळी आढावा घेऊन नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे संदीप खर्डेकर यांनी सांगितले.

तू अशी जवळी राहा चं ‘हटके’ आउटडोअर शूट!!

0

प्रत्येक मालिका किंवा सिनेमा यांच तसं पाहाल तर इनडोअर आणि आउटडोअर शूट होतंच असतं. तर मग काय नवीन आहे या तू अशी जवळी राहा च्या न्युज मध्ये … तर यात एक मजेशीर गोम आहे. हे आऊटडोअर शूट झालंय मुंबई च्या रस्त्यांवरच पण कोणाच्याही नकळत. म्हणजे हे शूट करताना कोणत्याही प्रकारचा गाजावाजा नव्हता की मोठ्मोठायला व्हॅनिटी व्हॅन्स नव्हत्या. भर रस्त्यात गो प्रो कॅमेराच्या मदतीने हे चित्रीकरण केले गेले. कोणालाही त्रास न देता, अतिशय साधेपणाने हे शूट केले गेले. गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, गिरगांव चौपाटी आणि महालक्ष्मी मंदिर अश्या मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांवर हे चित्रीकरण केले गेले . या चित्रीकरणात सिद्धार्थ आणि मनवा दोघांनीही भरपूर मजा केली. नरिमन पॉईंट च्या कट्टयावर उभे राहून चालणे, समुद्र पाहत तिकडच्या फेरीवालयाकडून चहा पिणे, तिथे एकमेकांचं फोटोशूट करणे , महालक्ष्मी च्या देवळात ओटी भरणे , गेटवे ऑफ इंडिया ला एखाद्या नॉर्मल जोडप्या प्रमाणे फिरणे अशी बरीच मजामस्ती या दोघांना या चित्रीकरणात करता आली .  शूट करताना लागणाऱ्या सगळ्या महत्वाच्या गोष्टींची काळजी घेण्यात आली आणि त्याचबरोबर ह्या शूट चा कोणालाही त्रास नाही होणार हे सुद्धा पहिले गेले.

झी युवावर सोमवार ते शनिवार रोज संध्याकाळी ७ वाजता सिद्धार्थ बोडके आणि तितिक्षा तावडे यांच्या अभिनयाने भरलेली आहे.प्रियकराच्या आपल्या प्रियसेवरील वेड्या प्रेमावर आधारित ‘तू अशी जवळी राहा’ही मालिका महाराष्ट्रात खूप पसंत केली जाते . सध्या या मालिकेत राजवीर आणि मनवा यांचे लग्न झाले असून या दोघांच्या एकमेकांवरील प्रेमाचे क्षण त्यांच्या ‘डेट ‘द्वारे या चित्रीकरणात टिपण्यात आले . . झी युवा वाहिनीवरील हा कार्यक्रम बघत राहण्यासाठी ३९ रुपयांचा ‘ झी फैमिली पॅक’   नक्की निवडा…या मध्ये तुमचे मनोरंजन करण्याऱ्या २० झी वाहिन्या आपल्याला पाहायला मिळतील.

आवटे विद्यामंदिरच्या अकरा विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

0
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर येथील अण्णासाहेब  आवटे विद्यामंदिरच्या  अकरा विद्यार्थ्यांनी राष्ट्रीयस्तरावरील  एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती  परीक्षेत घवघवीत यश संपादन केले  असल्याची माहिती मुख्याध्यापीका जे.एस. हेंद्रे यांनी दिली. या परीक्षेत शिष्यवृत्तीस पात्र असणाऱ्या विद्यर्थ्याना सलग चार वर्षे वार्षिक बारा हजार रुपये प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती मिळणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना बाह्य परीक्षा विभाग प्रमुख प्रविण ताजणे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
   शिष्यवृतीस पात्र असणाऱ्या प्रतीक्षा उतळे, आकाश लांडे, आविष्कार साबळे, निखील लांडे, ओम लांडे, ओमकार शेळकंदे, रिकी असवले, साहिल लांघी, सम्यक गायकवाड,सुरज काठे, सुरज दिघे या विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
         संस्थेचे अध्यक्ष डॉ. विलास चव्हाण, उपाध्यक्ष अविनाश पुंडे, देवेंद्र खिलारी, सेक्रेटरी व्ही.डी. पानसरे, सहसेक्रेटरी निलेश गुंजाळ, खजिनदार सुनील ढोबळे, उल्हास नवले, बाजीराव मानकर, ज्ञानेश्वर कबाडी, तसेच सर्व संचालक मंडळ तसेच शिक्षक आणि पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.