Home Blog Page 2995

बारा वर्षांच्या पाठपुराव्यामुळे ‘एचसीएमटीआर ‘ रस्ता ‘ट्रॅक ‘वर ; कालमर्यादा निर्धारित करून प्रकल्पाची अंमलबजावणी व्हावी :आबा बागुल

0
पुणे 
पुणे शहराचा  वाहतुकीचा जटील बनलेला प्रश्न आता  ‘हाय कॅपेसिटी मास्ट ट्रांझिस्ट रूटमुळे संपुष्टात येणार असून येत्या जूनमध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे मात्र त्यासाठी कालमर्यादा निर्धारित करून या प्रकल्पाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी  आबा बागुल यांनी केली आहे. तसेच सलग १२ वर्षे या प्रकल्पासाठी काँग्रेस पक्षातर्फे  केलेला पाठपुरावा आता सत्कारणी लागल्याचेही नमूद केले आहे. 
याबाबत माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, १९८७ च्या आराखड्यात काँग्रेसने भविष्यातील वाहुकीचा विचार करून या  नियोजित प्रकल्पासाठी आखणी केली. मात्र प्रशासकीय दिरंगाई आणि दुर्लक्षामुळे हा प्रकल्प रखडला. त्यामुळे २००७ मध्ये पालिकेत विरोधीनेता पदाच्या माध्यमातून  हा उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग  मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तेंव्हापासून सलग १२ वर्षे पुणे महानगरपालिका , राज्यसरकार व केंद्रसरकारकडे शेकडो पत्रे , निवेदने , प्रत्यक्ष भेटीद्वारे पाठपुरावा करीत आलो. या प्रकल्पासाठी वनविभाग व केंद्रसरकारच्या तसेच काही खासगी जमिनींचे भूसंपादन पाहता दिरंगाई निर्माण झाली . त्यामुळे त्या- त्या विभागांकडे पाठपुरावा करीत राहिलो.  गांधीगिरीच्या माध्यमातून रोज एक पत्र आणि गुलाबाचे फुल देऊन या प्रकल्पाला चालना देण्यासाठी कटिबद्ध राहताना या प्रकल्पाचे भूसंपादन, संपूर्ण आराखडा, सल्लागार नियुक्तीसह आर्थिक तरतूदसाठी विविध पर्याय सुचवून हा प्रकल्प मार्गी लावला, असेही आबा बागुल यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्षातर्फे गेले बारा वर्षे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून जीवघेण्या वाहतुकीबरोबरच वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हा उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग [ रिंग रोड ] महत्वपूर्ण ठरणार आहे.  मुख्यमंत्र्यांनी येत्या जूनमध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन निश्चित  केल्याने आता या प्रकल्पाचा मार्ग सुकर झाला आहे ; मात्र केवळ भूमिपूजन नाही तर या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी कालमर्यादा निश्चित करून अंमलबजावणी  झाल्यास पुण्याचा जटिल बनलेला  वाहतूक प्रश्न जलदगतीने सुटेल असा विश्वासही आबा बागुल यांनी व्यक्त केला. 

‘लोक काय म्हणतील’ याचा विचार करू नका -तेजस्वी सातपुतेंचा विद्यार्थिनींना सल्ला

0

पुणे : “कायद्याने मुलींना अधिक संरक्षण दिले आहे. त्याचा चांगला वापर करून अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे. एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्ये बजवावीत. ‘लोक काय म्हणतील’ ही भीती मनातून काढून टाकून स्वतःला घडविण्यासाठी प्रयत्न करावेत,” असा सल्ला पुणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी विद्यार्थिनींना दिला.

येवलेवाडी येथील केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या केजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्चच्या महिला विकास केंद्रातर्फे संस्थेतील विद्यार्थीनींसाठी ‘महिला सक्षमीकरण व वाहतूक जनजागृती’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत तेजस्वी सातपुते बोलत होत्या. यावेळी कोंढवा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सी. एम. निंबाळकर, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, डॉ. व्यासराज काखंडकी, कार्यशाळेचे समन्वयक व प्राचार्य डॉ. सुहास खोत, महिला विकास केंद्राच्या प्रमुख प्रा. अमृता ताकवले, प्रा. रोहिणी आगवणे, प्रा. ऋतुजा मोरे, प्रा. पूजा चौधरी आदी उपस्थित होते.

तेजस्वी सातपुते म्हणाले, “आर्थिक परिस्थिती चांगली म्हणजे महिला सक्षम आहे, असे नाही. चांगले शिक्षण घेऊन, निर्धास्तपणे स्वतःला घडविणे गरजेचे असते. योग्यवेळी योग्य निर्णय घेता आला पाहिजे. त्यासाठी शिक्षण आणि ज्ञानाची गरज आहे. कायद्याविषयी जाणून घेत योग्य ठिकाणी त्याचा वापर करावा. कोणाला त्रास देण्याच्या हेतूने कायद्याकडे बघू नये. मात्र, लैंगिक अत्याचाराला बळी न पडता तात्काळ आवाज उठवण्याची हिम्मत मुलींनी-महिलांनी बाळगावी. त्यासाठी पोलीस काका, विशाखा समिती, बडी कॉपची मदत घ्यावी. वाहतुकीचे नियम पाळण्यासोबतच हेल्मेट, सीटबेल्टचा वापर केला पाहिजे.”

या शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. यावेळी विद्यार्थिनींना हेल्मेट वाटप करण्यात आले. सीएम निंबाळकर, डॉ. हेमंत अभ्यंकर यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. सुहास खोत यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. प्राजक्ता देशमुख यांनी केले. प्रा. अमृता ताकवले यांनी आभार मानले.

भाजपने माझा वापर केला, भावासारख्या मुख्यमंत्र्याने लाथ मारली – खा. संजय काकडे

0

पुणे: भाजपने माझा केवळ वापर केला, मी मुख्यमंत्र्यांना भावासारख मानतो पण त्यांनीच लाथ मारल्याचे म्हणत भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाना साधला आहे. आज संजय काकडे यांनी राष्ट्रवादी नेते अजित पवार यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपला रामराम करण्याचे संकेत देखील दिले आहेत.खा संजय काकडे आणि भाजपमध्ये निर्माण झालेला दुरावा आणखीन वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून काकडे यांचे भाजप नेत्यांसोबत आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. मध्यंतरी त्यांनी शिवसेनेशी युती न झाल्यास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे देखील पराभूत होतील, अशी टीका केली होती. काकडे यांनी थेट दानवे यांनाच टार्गेट केल्याने भाजप नेते त्यांच्यावर नाराज असल्याचं बोलल गेल.आज भाजपकडून करण्यात आलेला एक सर्व्हे समोर आला आहे, यामध्ये लोकसभेसाठी युवा चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हि सर्व परिस्थिती पाहता काकडे यांनी इतर पक्षातून उमेदवारी मिळवण्यासाठीच्या हालचालींना वेग दिला आहे.दरम्यान, आपल्याला उमेदवारी मिळू नये म्हणून गिरीश बापट आणि रावसाहेब दानवे कुरघोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप संजय काकडे यांनी केला आहे. तसेच मी मुख्यमंत्र्यांना भावासारख मानतो पण त्यांनीच लाथ मारली आहे. आता भावानेच लाथ मारल्याने दुसरे घर शोधावे लागणार असल्याचं काकडे म्हणाले.

गांधीवाद्यांची ठोकशाही ..महापौरांसामोरच गंगाजल ..(व्हिडीओ)

0

पुणे : महात्मा गांधींचे अनुयायी म्हणविणाऱ्या कॉंग्रेस राष्ट्रवादीने भ्रष्टाचाराच्या विरोधात महापौर दालनात आंदोलन सुरु केले खरे ,..पण गांधीवाद ,अहिंसा ,कायदेशीर मार्ग विसरले ..खुलासा करू पाहणाऱ्या, अतिरिक्त आयुक्तांना ‘चोर’ म्हणत वादाला तोंड फोडत महापौरांसामोरच त्यांना मारहाण करण्याची मजल गाठली .या प्रकारामुळे अतिरिक्त आयुक्तांची महापौरांसमोर हि अवस्था तर अन्य अधिकाऱ्यांची काय अवस्था असेल, काय सुरक्षा असेल / असा प्रश्न उपस्थित होणार आहे .  हा प्रकार घडल्याने पुणे महापालिकेत खळबळ उडाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, नदीमधील जलपर्णी काढण्याच्या निविदेचा विषय गेले  काही दिवस चर्चेत आहे.या विषयावरून महापौरांच्या दालनासमोर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. या आंदोलनानंतर सुरु असलेल्या चर्चेत स्पष्टीकरण देण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडून अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर दालनात बोलविण्यात आले. मात्र ज्यांचा निविदा प्रक्रियेत समावेश होता त्यांनी स्पष्टीकरण देऊ नये अशी आंदोलक नगरसेवकांची मागणी होती.त्यावेळी सुरु असलेल्या चर्चेत ‘अधिकारी चोर आहेत’, असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना निंबाळकर यांनी ‘असे ऐकून घ्यायला आम्ही आलेलो नाही, तुमची काय लायकी आहे’, असे सुनावले.असे त्यांनी सुनावताच काही नगरसेवक निंबाळकर यांच्या अंगावर धावून गेले , आमची लायकी काढता काय ? असा सवाल केला . तर मागून एका नगरसेवकाने चप्पल भिरकावून मारली आणि शिवीगाळ हि केली .यावेळी येथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्याने निंबाळकर यांच्या श्रीमुखात भडकवली. अचानक हा प्रकार घडल्याने ;गोंधळ उडाला असून सुरक्षा रक्षकांनी निंबाळकर यांना दालनाबाहेर काढले. सध्या महापालिकेत गोंधळाचे वातावरण असून पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे.  यावेळी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह दोन्ही पक्षाचे नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 दरम्यान गेल्या 2 वर्षात महापालिकेतील आधिकाऱ्यांना मारहाण आणि दमबाजी होण्याच्या काही घटना या पूर्वी घडल्या आहेत .एकूणच महापालिकेतील अधिकारी राजकीय दबावाखाली ,मानसिक तणावाखाली असल्याचे वारंवार दिसले आहे.

.आता मुलांनाही सायकली द्या …. पवारांची सूचना

0

पुणे-‘आतापर्यंत शंभर टक्के म्हणजे 25 हजार शालेय मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या. हा उपक्रम महत्त्वाचा आहे. मात्र, माझी एक सूचना आहे, वर्षापासून मुलींसोबत आता गरीब मुलांनाही सायकल द्यावी,’ अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संयोजकांना केली.
टाटा ट्रस्ट, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट तसेच मेंटर्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी, हवेली आणि खडकवासला मतदार संघातील शालेय विद्यार्थिनी आणि आशा वर्कर्स यांना शरद पवार यांच्या हस्ते मोफत सायकल वाटप करण्यात आले. या वेळी पवार बोलत होते. व्यासपीठावर पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या व्यवस्थापकीय विश्वस्त खासदार सुप्रिया सुळे, टाटा ट्रस्टचे भूर्जीस तारापूरवाला, नीरज चंद्रा, आशिष देशपांडे, संयोजक नगरसेवक प्रकाश कदम,सुभाष जगताप ,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष चेतन तुपे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर , नगरसेवक विशाल तांबे आदी उपस्थित होते. या वेळी सहा हजार सायकलींचे वाटप करण्यात आले.

‘एका वर्षापूर्वी हजारो सायकलींचे वाटप केले. त्याचा आम्ही अभ्यास केला. सायकल मिळाल्याने मुलींची शाळेतील उपस्थिती वाढली. शिक्षणाची गुणवत्ताही वाढली. नापासाचे प्रमाण घटले. हा सुप्रिया सुळे यांचा उपक्रम महत्त्वाचा वाटतो. परंतु, आतापर्यंत मुलींनाच सायकली देण्यात आल्या. आपण एका मुलीचे बाप आहोत. त्यामुळे मुलींना सायकल दिल्याचे समाधान आहे. पण मुलांना सायकल द्यायची नाही या धोरणात आता बदल केला पाहिजे. पुढील वर्षापासून गरीब मुलांना देखील सायकल दिल्या पाहिजे. त्यामुळे मुले-मुली शाळेत जातील,’ अशी सूचना शरद पवार यांनी केली. या वेळी ‘खूप शिका. मोठे व्हा. यशस्वी व्हा,’ असा मोलाचा सल्लाही पवार मुलींना द्यायला विसरले नाहीत. नगरसेवक प्रकाश कदम यांनी प्रास्ताविक केले.

‘सुप्रियाताईंची शाळा ….अन , मुळशीचे फिक्सिंग ..?(पहा खा. सुळे यांनी मुलींशी साधलेला संवाद )

0

पुणे :खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार आणि टाटा ट्रस्टच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या,उपस्थितीत निमंत्रक प्रकाश कदमांच्या संयोजना खाली झालेल्या समारंभात  सहा हजार मुलींना सायकल वाटप करताना,स्वतः मुलींसमवेत सायकल चालविली,

आणि व्यासपीठावरून  थेट मुलींशी संवाद साधला …कोणाला काय व्हायचे ? या प्रश्नावर मोठा गमतीदार संवाद यावेळी घडून आला …बहुतेक मुलींना पुण्याचे कलेक्टर व्हावेसे वाटते ,काहींना पोलीस व्हायचेय मात्र राजकारणात कोणी यायला तयार नाहीत असे चित्र दिसले ,अवघ्या एका मुलीने खासदार व्हायचंय .. असे म्हटले ..ती मुळशीतील ..पिरंगुट ची प्रज्ञा …

मुळशीच्या मुलींशी झालेला संवाद ..पाहता ..आपल्या मागे असलेल्या मुळशीच्या बाबा कंधारे ..यांना तत्क्षणी गमतीने सुप्रिया ताईंनी विचारले .. काय मुळशी फिक्सिंग आहे काय ? … तर या संवादाची पहा हि व्हिडीओ झलक ….

 

 

तर …दुसऱ्या ‘खिलाडी’ शिवाय पर्याय नाही – कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा सूर

पुणे- आम्ही जुने आहोत ,आमचा हक्क आहे, आम्ही निष्ठावंत आहोत असे सांगणारे अनेक घोडे लोकसभेच्या रणांगणात इच्छुक आहेत ,पण हे बहुतेक सारे आपमतलबी ,संधिसाधू आहेत , गांधी घराण्याच्याच नावावर स्वतःची वाटचाल करणारे आहेत . स्वतः काही योगदान देणारे नाहीत ,ना पक्षासाठी ,ना कार्यकर्त्यांसाठी ते योगदान देतील, अशा  इच्छुकांना उमेदवारी दिली तर, कॉंग्रेसला अनुकूल वातावरण असूनही ,पराभव अटळ आहे.. असा आमचा सूर कोणी कॉंग्रेसचे राहुल गांधी ,प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचविला पाहिजे असे मत कॉंग्रेसचे कार्यकर्ते आता माध्यमांपुढे खाजगीत व्यक्त करू लागले आहेत .पुण्यात ना आमच्याकडे म्हणजे कॉंग्रेस कडे सक्षम उमेदवार आहे ,ना भाजपकडे … या दोन्ही पक्षांना सध्या तरी दुसरा कलमाडी बनण्यास निघालेल्या संजय काकडे सारख्याच उमेदवाराशिवाय पर्याय नाही, अन्यथा कोणीही उभे राहील आणि कोणीही निवडूनही येईल, पण असा निवडून येणारा तथाकथित खासदार ना पक्षाचे भले करेल ,ना कार्यकर्त्यांचे भले करेल… जनतेचे तर दूरच राहिले …असा प्रवाद होताना दिसतो आहे .
लोकसभेच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी कॉंग्रेस,भाजप .राष्ट्रावादी कॉंग्रेस या तीनही पक्षांच्या पातळीवर रण सुरु झाले आहे .उमेदवारीबाबत सर्वच पक्षात संभ्रम आहे . भाजप मध्ये विद्यमान खासदाराबाबत त्यांच्याच पक्षातील कार्यकर्ते अनुकूल नाहीत पण नेत्यांमध्ये या मात्र ‘ते ‘ उपद्रवी नाहीत ना यालाच महत्व दिले जाते आहे. मुख्यमंत्र्यांनी पुण्यात  आम्ही सर्व जुन्याच योजना आणीत आहोत हे कबूल केलेलं आहे .पूर्वी या योजनांबाबत  राजकारण झाले आणि आता होत नाही, असे त्यांनी म्हटलेले असले तरी हे पूर्ण सत्य नाही, असे कार्यकर्त्यांचे  म्हणणे आहे .पण मुख्यमंत्र्यांना देखील पुण्यातून कोणी स्वतंत्र मोठा नेता होऊ द्यायचा नसावा ,म्हणून त्यांनी स्वतः चीच पकड पुण्याच्या कारभारावर ठेवली आहे .त्यात जुने -नवे , निष्ठावंत अशा वादाची त्यांच्या या भूमिकेला साथ मिळत गेली आहे . या साऱ्या राजकारणातून दुसरा कलमाडी होण्याच्याच्या मार्गावर असलेल्या संजय काकडे सारख्या राजकारणी नसलेल्या उद्योजकाला निव्वळ वापरून ..वेळेवर दूर ठेवण्याचे षड्यंत्र ,भाजपमध्ये आपल्या प्रचलित धोरणानुसार व्यवस्थित राबविले गेले याकडे लक्ष वेधले जाते आहे . आणि याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे कार्यकर्ते काकडें कडे मोठ्या आशेने पाहत गेले . नुसतीच्या नावाचीच चर्चा झाली नाही, तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सह विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचे समूह काकडे यांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या संपर्कात राहिले आहेत . यात कॉंग्रेसच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांचा मोठा सहभाग आहे .एकीकडे असे चित्र तर दुसरीकडे नेहमीच निवडणुकीत इच्छुक असलेले ,  पक्षातील कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्या म्हणून मागण्या करत आहेत. पण हीच मंडळी सुरुवातीला कलमाडींच्या विरोधात मोहीम उघडून बसली होती आणि नंतर त्यांचेच नजीकचे  सूत्रधार म्हणून मिरवू लागली होती .
एकंदरीत आता इथे या इतिहासाची उजळणी करणे गरजेचे नसले तरी , इच्छुकांच्या यादीत झळकत असलेली मंडळी  उद्या 
 काकडे यांचे नाव जाहीर झाले तर,  आपापली बोथट आयुधे त्यांच्या दावणीला बांधून प्रचारमोहिमेत सहभागी होतील, हे भविष्य कोणी वर्तविण्याची गरज नाही .इच्छुकांच्या यादीत झळकणारे चेहरे आणि त्यांच्याकडे असलेले कार्यकर्ते याचा आढावा नेत्यांनी घ्यावा . हे जेव्हा  जेव्हा पक्षाच्या कार्यालयात येतात , कार्यक्रम वा सभेला येतात तेव्हा तेव्हा पाहुण्यासारखे एकटे दुकटे येतात . ना सभेला ,बैठकीला येताना यांच्या बरोबर कार्यकर्ते असतात ना एरवी असतात . कार्यकर्त्यांचा समूह सांभाळणे यांना जमत नाही ते एकटे दुकटे वावरणारे इच्छुक निव्वळ कॉंग्रेसला अनुकूल वातावरणाचा ,गांधी घराण्याच्या नावाचाच उपयोग करवून घेत पक्षात ठाण मांडून आहेत . अशा कार्यकर्त्यांमुळे च कॉंग्रेसचे सर्वाधिक  नुकसान झाले आहे हा इतिहास आहे .धम्मक असलेला , कार्यकर्त्यांचा मोठा समूह स्वबळावर सांभाळू शकणारा आणि स्वबळावर देखील काही करू शकणारा असा खमक्या कार्यकर्ता असेल तर नेत्यांनी अशा कार्यकर्त्याला पक्षाचे आणि गांधी घराण्याच्या नावाचे बळ दिले तर पुण्यात कॉंग्रेसचा खासदार होणे कठीण नाही . आणि अशी व्यक्ती सध्या इच्छुकांच्या यादीत नाहीच असा दावा हि कार्यकर्ते करीत आहेत . मात्र काकडे यांच्याकडे कॉंग्रेसचे कार्यकर्ते त्याच दृष्टीने पाहत आहेत .आणि गर्दीही करीत आहेत .पण काकडे लाऊन बसले होते भाजपची आस …खुद्द काकडे यांनी आपल्याला भाजप उमेदवारी देईल असा दावा केला होता . पण आता त्यांचा भाजपकडून भ्रम निरास होत आहे आणि याचा फायदा कॉंग्रेसचे कार्यकर्ते घ्यायला उत्सुक आहेत .काकडे हे भाजपच्या ९७ नगरसेवकांपैकी ५० नगरसेवक फोडून कॉंग्रेस मध्ये त्यांना आणू शकतात ,त्या बळावर महापालिका भाजपच्या हातातून जाईल आणि लोकसभेची जागा  देखील येथील सहजगत्या कॉंग्रसकडे पुन्हा येईल. लोकसभेला असलेल्या इच्छुकांसारखे नेते लाभल्याने  शहरात सध्या कॉंग्रेस पेक्षा  राष्ट्रवादीचे मोठे प्राबल्य आहे. इथे अजित पवारांचे स्वतःचे लक्ष आहे .अजित पवार आणि सुरेश कलमाडी असा नेतृत्वाचा वाद पुण्याने पाहिला आहे. अंकुश काकडे आणि राष्ट्रवादी समर्थकांनी कलमाडी हाऊस समोर घातलेला गोंधळ आणि त्याचा  कलमाडी समर्थकांनी केलेला सामना राजकीय समीक्षकांनी आणि पुण्यान पाहिला आहे. त्यानंतर अजित पवारांनी सपत्नीक कलमाडी हाऊस वर घेतलेले स्नेहभोजन देखील अनेकांच्या स्मरणात असेल . आता कॉंग्रेस कडे असा प्रबळ नाहीच तर सारे लोकसभेला असलेल्या इच्छुकांसारखे नेतेच उरल्याने शहरात राष्ट्रवादीचेच मोठे प्राबल्य आहे . राष्ट्रवादीच्या सभांना होणारी गर्दी आणि कॉंग्रेसच्या सभांना होणारी गर्दी सारे काही चित्र स्पष्ट करणारी आहे. कॉंग्रेस मध्ये सर्वच नेते झाले आणि एकमेकांचे पाय खेचू लागल्याने कॉंग्रेसची अवस्था मोठी दयनीय झाली आहे . कॉंग्रेसच्या शर अध्यक्षाला देखील न जुमानता स्वतः च नेते असल्याच्या अविर्भावात एकटे दुकटे फिरणारे कॉंग्रेसचे भवितव्य उज्वल करू शकणार नाहीत तर कलमाडी नसल्याने आता काकडेंच्या रूपातच दुसरा कलमाडी घडविण्याची वेळ आली आहे याचा राहुल गांधी आणि अशोक चव्हाण यांच्या सारख्या नेत्यांनी विचार करण्याची गरज आहे असा मोठा प्रवाह कॉंग्रेस मध्ये आहे.

‘युडीआयएन’मुळे बनावट प्रमाणपत्रांना बसणार आळा

0
सीए एस. बी. झावरे यांची माहिती; ‘आयसीएआय’कडून ‘युडीआयएन‘ प्रणाली विकसित
पुणे : सनदी लेखापालांकडून दिली जाणारी प्रमाणपत्रे अधिकृत आहेत, याची खात्री करण्यासाठी या प्रमाणपत्रांवर ‘युनिक डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर’ (युडीआयएन)
सक्तीचा केला जाणार आहे. त्यामुळे येत्या आर्थिक गैरप्रकार रोखण्यासाठी, तसेच सीएचे बनावट प्रमाणपत्र तयार करण्याला आळा बसेल,” अशी माहिती द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) केंद्रीय समितीचे सदस्य सीए एस. बी झावरे यांनी दिली.
द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्याच्या (आयसीएआय) पुणे शाखेच्या प्रोफेशनल डेव्हलपमेंट कमिटीच्या वतीने ‘युडीआयएन – प्रमाणपत्र सुरक्षेचा मार्ग’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यानंतर सीए झावरे पत्रकारांशी बोलत होते. प्रसंगी दिल्ली येथील प्रोफेशनल डेव्हलपमेंट कमिटीचे चेअरमन रणजितकुमार अगरवाल, सीए चंद्रशेखर चितळे, पुणे शाखेच्या उपाध्यक्षा ऋता चितळे, खजिनदार अभिषेक धामणे, सीए शशिकांत बर्वे, सीए समीर लड्ढा, अमृता कुलकर्णी आदी उपस्थित होते.
सीए एस. बी. झावरे म्हणाले, “गेल्या काही वर्षात सनदी लेखापालांची बनावट प्रमाणपत्रे तयार केल्याचे आढळले आहे. हे रोखण्यासाठी ‘युडीआयएन’ प्रणाली विकसित केली आहे. प्रमाणपत्र देताना संकेतस्थळावर जाऊन माहिती भरल्यानंतर हा क्रमांक मिळेल. तो क्रमांक प्रत्येक प्रमाणपत्रावर टाकणे अत्यावश्यक आहे. हा क्रमांक नसल्यास सदरचे प्रमाणपत्र अधिकृत धरले जाणार नाही. तसेच संबंधित सीएवर कारवाईही होऊ शकते. सीएने दिलेले प्रमाणपत्र अधिकृत आहे की नाही, ग्राहक अथवा संबंधित पक्ष तपासू शकतो. युडीआयएन क्रमांक टाकून पडताळणी करता येईल. ‘सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस’ (सीओपी) असलेल्या सीएनाच या संकेतस्थळावर जाऊन प्रमाणपत्र देण्यासाठी नोंदणी करता येणार आहे. ‘युडीआयएन’साठी कोणतीही नोंदणी शुल्क नाही. युडीआयएन क्रमांक घेणे १ फेब्रुवारीपासून अनिवार्य करण्यात आले. तसेच जीएसटी ऑडिट आणि टॅक्स ऑडिट प्रमाणपत्रांसाठी हे कालांतराने लागू होणार आहे. त्यामुळे यापुढे सर्व सीओपी सीएना युडीआयएन घेणे बंधनकारक आहे. सध्या देशात केवळ तीन लाख सीए असून, त्यातील अवघ्या १ लाख १० हजार लोकांनाच ‘सीओपी’ आहे.”
सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “सीएच्या नावाने बनावट प्रमाणपत्र तयार करण्याचे प्रकार रोखण्यासाठी ‘युडीआयएन’ हे क्रांतिकारी पाऊल आहे. प्रमाणपत्रांची सत्यता बँक, प्राप्तिकर विभाग, सेबी व तत्सम नियंत्रण संस्था पडताळू शकणार आहेत. ही प्रणाली पुण्यातील सीए एस. बी. झावरे यांच्या कल्पनेतून झाली आहे, याचा आनंद वाटतो.” सीए अभिषेक धामणे यांनी या कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. सीए समीर लड्ढा यांनी सूत्रसंचालन केले. अमृता कुलकर्णी यांनी आभार मानले.

पूर्वी योजना राजकारणासाठी आता प्रत्यक्षात जनतेसाठी -मुख्यमंत्री

0

पुणे -आम्ही राबवीत असलेल्या योजना जुन्याच आहेत पण पूर्वी त्यांचे निव्वळ राजकारण केले गेले . आता आम्ही त्याच योजना प्रत्यक्षात जनतेसाठी साकार करतो आहे असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर आम्ही वेळीच लक्ष दिले नाहीतर  भविष्यामध्ये पुण्याची ओळख प्रदूषित शहर म्हणून होईल, अशी शक्यता व्यक्त केली.

स्मार्ट सिटीअंतर्गत स्मार्ट इलेक्ट्रिक बस, स्मार्ट सिटी आॅपरेशन्स सेंटर, आॅफिस राइड, बाणेर येथील स्मार्ट रस्ते पुनर्रचना, प्लेसमेकिंग साइट, स्मार्ट स्कूल्स आणि सायन्स पार्क अशा तब्बल सात प्रकल्पाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले , शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. या विस्तारीकरणामुळेच मोठ्या प्रमाणावर वाहनांची संख्याही वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये पुण्यात वाहनांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सहाजिकच येथे प्रदुषणाची समस्या निर्माण होऊ लागली आहे. परिणामीशहरातील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी आणि भविष्यात प्रदूषित शहर ही ओळख मिळण्यापूर्वीच प्रदूषण टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासोबतच वाहतूक व्यवस्था सुधारण्याची गरज असून नागरिकांना चांगल्या सुविधा द्यावी. अशा सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या.

मुख्यमंत्री पुढे  म्हणाले की, पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने महापालिकेच्या माध्यमातून बस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यातून सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होईल आणि नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होईल.

तसेच ते पुढे म्हणाले की, केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या माध्यमातून पुण्यात मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाला गती असून दिलेल्या वेळेपूर्वी नागरिकांच्या सेवेत असणार असल्याचे त्यांनी सांगितले

पीएमपीच्या ताफ्यात आता 25 ई- बस दाखल झाल्या असून या बसेसचा लाेकार्पण साेहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या या बसेस असून यामुळे प्रदूषणात घट हाेणार आहे. तसेच या सर्व बसेस एसी असल्याने नागरिकांचा प्रवास सुखकर हाेणार आहे. 

पर्यावरण पूरक सार्वजनिक वाहतूकीसाठी पीएमपीकडून ई- बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत 150 बसेस खरेदी करण्यात येणार असून त्यापैकी 25 बसेस पहिल्या टप्प्यात खरेदी करण्यात आल्या आहेत. संपूर्ण एसी असणाऱ्या या बसेसमध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. या बसेसमध्ये पॅनिक बटण असून आपत्कालिन वेळी नागरिकांना त्याचा वापर करता येणार आहे. बसेसला जीपीएस यंत्रणा असून स्वयंचलित दरवाजे आहेत. त्याचबराेबर या बसमध्ये सीसीटिव्ही कॅमेरा सुद्धा लावण्यात आले आहेत. तीन तास बस चार्ज केल्यानंतर ती 200 किलाेमीटर धावू शकणार आहे. सध्या निकडी आणि भेकराईनगर येथे चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आले आहेत. 

उच्च शिक्षणासाठी राज्य शासनाकडून परदेशातील शिक्षणासाठी आर्थिक मदत करणार

0

पुणे-परदेशातील शिक्षणासाठी आर्थिक  मदत करणार  असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केले . वानवडीमधील महात्मा फुले सांस्कृतिक भवनमध्ये  परफेकट शिक्षण संस्थेच्यावतीने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच , पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला .

या कार्य्रक्रमास परफ़ेक्ट शिक्षण संस्थेचे संस्थापक इरफान सय्यद , पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले , नगरसेविका कालिंदा पुंडे , महेश पुंडे , नगरसेवक ऍड हाजी गफूर पठाण , नगरसेविका हमीदा अनिस सुंडके , हसीना इनामदार , तब्बसूम शेख , माजी नगरसेवक रईस सुंडके , अदनान शेख आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले कि , विद्यार्थ्यांनी दहावी बारावी परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवून यश मिळवावे . विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी राज्य शासनाकडून आपण स्कॉलरशिप मिळवून देउ . आपली परीक्षा जवळ येऊन ठेपली आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वेळेचा सदोपयोग करून अभ्यास करावा . परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी मोबाइलपासून दूर राहावे .

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परफ़ेक्ट शिक्षण संस्थेचे संस्थापक इरफान सय्यद , मोईज खान , सानिया दलाल, मोहमदअली शेख , उमर शेख व सिद्रा शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले .

लक्ष साधायचे … तर बारामती जिंकावीच लागेल: : अमित शहा

0

पुणे-महाराष्ट्रात ४५ जागा तुम्ही मला जिंकून द्या ,हे लक्ष साधण्यासाठी बारामती तुम्हाला जिंकावीच लागेल ,उत्तर प्रदेशात आम्ही ७३ ऐवजी ७४ जागा जिंकू पण ७२ होऊ देणार नाही. तुम्ही मला महाराष्ट्रातून ४५ जागा निवडून दिल्यास जे घुसखोर आहेत. त्यांना पळून लावू आणि ४५ वी जागा बारामतीची असेल अशा शब्दात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महाआघाडीला लक्ष्य केले.

पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुणे, शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शक्ति केंद्र प्रमुखांना लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे,पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, शहर अध्यक्ष योगेश गोगावले,सभागृह नेते श्रीनाथ भिमाले  तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अमित शहा म्हणाले की, देशभरात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडी केली जात आहे. त्याकडे पाहून हे कसले गठबंधन, हे तर सगळे राज्यातले नेते आहे. जर महाराष्ट्रात ममतांची सभा कोल्हापूरला लावली. अखिलेशला धुळ्ताय बोलावले. तर कोणी ऐकायला जाणार आहे का? अशा शब्दात महाआघाडी मधील नेत्यावर सडकून टीका केली.

तसेच ते पुढे म्हणाले की, जर लोकसभा निवडणुकीत विरोधक सत्तेवर आल्यास आपण कित्येक वर्ष मागे जाऊ आणि हे काँग्रेसवाले जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम करतील. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने भाजपला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. तर ज्या महाआघाडीचे नेतृत्व शरद पवार करीत आहे. ते या राज्यातील असून त्यांचे १५ वर्ष सरकार महाराष्ट्रात होते. या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. पण आमच्या सरकारने पारदर्शक कारभार करीत भ्रष्ट्राचार नष्ट केल्याचे सांगत शरद पवार यांच्यावर टीका केली.

ते पुढे म्हणाले की, अयोध्येत राम मंदिर बनवणार असून भाजपा त्यासाठी कटिबद्ध, वचनबद्ध आहे. पण या प्रश्नावर शरद पवार आणि काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी मंदिरा बाबत भूमिका स्पष्ट करावी. तुम्हाला मंदीर करायचे आहे की नाही. यावर त्यांनी भूमिका स्पष्ट करावी.
राहुलबाबा आग्र्यामध्ये जाऊन म्हणाले की, शेती करू. त्यांना आलू कारखान्यातून येतो असे वाटले. जमीनीवर येतो की जमीनीखाली हेच माहिती नाही. तर ते त्यांनी अगोदर समजून घ्यावे आणि त्यावर बोलावे. त्याच बरोबर आम्ही शेतकर्‍यांना दरवर्षी सहा हजार रूपये देणार, त्यावर टिका करतात, मग ५५ वर्षात तूम्ही काय दिले ते देखील राहुल बाबांनी सांगावे. आम्ही सैनिकांसाठी वन र्ँक वन पेन्शनचा नारा दिला आणि काँग्रेसचा एकच नारा ओन्ली राहूल ओन्ली प्रियंका अशा शब्दात गांधी परिवारावर निशाणा साधला.

जीतो महाराष्ट्र झोनच्या अध्यक्षपदी राजेश सांकला

0

पुणे, दि. 9 : जीतो महाराष्ट्र झोनच्या अध्यक्षपदी राजेश सांकला व मुख्य सचिवपदी अरुण शिंगवी यांची निवड करण्यात आली आहे. 2019 व 2020 या कालावधीकरीता ही निवड झाली आहे.

जीतो च्या नुकत्याच झालेल्या पदग्रहण समारंभात जीतोचे अध्यक्ष गणपतराज चौधरी व उपाध्यक्ष विजय भंडारी यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड करण्यात आली.

जीतो महाराष्ट्र झोनच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र बाठिया, बाळासाहेब धोका, चकोर गांधी, अशोक हिंगड व इंदर जैन तर, खजिनदारपदी राजेश जैन, सहखजिनदार तुषार लुणावत, सचिव दिनेश छाजेड, सहसचिव पंकज कर्नावट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अध्यक्षपदी राजेश सांकला
मुख्य सचिवपदी अरुण शिंगवी

अमित शहा यांना दाखवले काळे झेंडे..बेरोजगारी च्या प्रश्नावर (व्हिडीओ)

0

पुणे- घरोघरी भाजपचे झेंडे लावा , बाईक रॅली काढा असे वार्डा वार्डातल्या बूथ चालकाला सांगायला टिळक रोडने गणेश कला क्रीडा मंचाला निघालेल्या भाजपच्या अध्यक्षांना टिळक रस्त्यावरच तरुणांच्या रोषाचे दर्शन झाले . बेरोजगारीच्या प्रश्नावर तरुणांनी येथे शहा यांच्या मोटारीचा ताफा येताच काळे झेंडे दाखविले आणि नौकरी आमच्या हक्काची नाही ….बापाची ..अशा घोषणा देत मोटारींना आडवे जाण्याचा यत्न केला. मात्र मोटारी वेगाने पुढे गेल्या आणि मागे तरुणांचा घोळका आला ..तोवर पोलीस पुढे येताच पुढे निघून गेलेल्या मोटारी पाहून काही तरूण पाळले ..पण तातडीने पुन्हा माघारी येत पोलिसांच्या स्वाधीन झाले. या सर्वांना पोलिसांनी तूर्तास तरी ताब्यात घेतले आहे .

बँक ऑफ महाराष्ट्रचा 84 व व्यवसाय वर्धापन दिन देशभर उत्साहात साजरा

0

पुणे: महाबँकेच्या द्रष्ट्या संस्थापकांनी लावलेल्या बीजाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून बँकिंग सेवेच्या सर्व अद्ययावत सुविधा सन्माननीय ग्राहकांना आपुलकीच्या सेवेसह करत असल्याने अडीच कोटीपेक्षा अधिक ग्राहकांचा विश्वास या बँकेने संपादन केला आहे आणि हीच या बँकेची खरी शक्ति असल्याचे प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए. एस. राजीव यांनी केले. बँक ऑफ महाराष्ट्रचा 84 वा व्यवसाय वर्धापन दिन पुणे येथील मुख्य कार्यालयासह बँकेच्या सर्व अंचल कार्यालयात साजरा करण्यात आला. हा दिवस ‘कर्मचार्‍यांचा प्रतिबद्धता दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी राजीव बोलत होते.

श्री ए. सी. राउत, कार्यकारी संचालक बँक ऑफ महाराष्ट्र यांनी कालानुरूप घडणारे बदल स्वीकारताना बँकेने कर्तव्यास ‘सेवा’ म्हणून स्वीकारल्याने कठीण काळातही बँक स्वत:चे अस्तित्व टिकवू शकली आणि या सेवाभावामुळेच बँकेच्या प्रगतीसह ग्राहकांचे हित जपू शकली असे म्हणाले.

बँकेचे कार्यकारी संचालक श्री हेमन्त टम्टा म्हणाले की, खडतर काळात अधिक परिश्रमांची आवश्यकता असून पुढील प्रत्येक दिवस कठोर स्पर्धेचा आहे आणि या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येकाने सजग राहून जिव्हाळ्याची सेवा ग्राहकांना देण्यानेच बँक अधिक सक्षम होईल. सर्व कर्मचारी ग्राहकांना अपेक्षित अशी आपुलकीची सेवा भविष्यातही देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बँकेच्या पुणे मुख्यालयी आयोजित कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला. यावेळी आयोजित विविध गुणदर्शन कार्यक्रमात कर्मचार्‍यांनी गायन, एकपात्री, नकला कार्यक्रमांचे सादरीकरण करून उपस्थितांचे मनोरंजन केले. यावेळी पुणे शहर आणि पुणे पश्चिम अंचल कार्यालयातील कर्मचार्‍यांसह सर्व उच्च पदस्थ अधिकारी आणि कर्मचार्‍यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या वेळी बारामतीमध्येही भाजपाचं कमळ फुलणार – देवेंद्र फडणवीस

0

पुणे-आगामी लोकसभा निवडणुकीत ४८ जागा लढवणार आहोत. मागच्यावेळी ४२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी ४३ जागा जिंकू. ही ४३ वी जागा बारामती असेल. बारामतीमध्ये कमळ फुलवू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह पुणे, शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रमुखांना लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत.

त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे,पालकमंत्री गिरीश बापट, पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे, शहर अध्यक्ष योगेश गोगावले तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले की, मागील निवडणुकीत थोड्या मताने बारामतीमधील जागा गेली. मात्र यंदाच्या निवडणुकीत बारामती मध्ये भाजपची जागा निवडून येणार. शिरुर आणि मावळ मधील जागा भाजप जिंकणार असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, देशात काही जण मुलाचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी नाव न घेता सोनिया गांधी यांच्यावर टीका केली

मागील मनमोहन सिंग यांचे सरकार फक्त येणारे दिवस काढत होते. कोणतेच काम करत नव्हते. कोणतेही निर्णय घेत नव्हते. मात्र पंतप्रधान मोदी एकही दिवस न शांत बसता अविरत काम करत आहेत. एकविसाव्या शतकातील भारताची मुहुर्तमेढ अटलबिहारी वाजपेयी यांनी रोवली. मात्र दहा वर्ष आलेल्या काँग्रेसच्या राजवटीने देशाचा विकास रोखला. आज मोदी यांनी पुन्हा देशाला विकासाच्या मार्गावर आणून ठेवले आहे. जगातील प्रत्येक देश आज भारताची एकविसाव्या शतकाकडे यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे म्हणत आहेत. नुकतेच सादर झालेला केंद्राचा अर्थसंकल्प अनेक वर्ष भारतावर प्रभाव पाडणारा आहे. भविष्यातील भारताचे चित्र दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आमचा बुथप्रमुख छत्रपतींच्या मावळ्यासारखा आहे. याच मावळ्याच्या जिवावर आम्ही लढाई जिंकणार आहोत. अफजल खान जरी आज जिवंत नसला तरी अफजल खानाच्या प्रवृत्तीचे लोक आज आहेत. त्यामुळे आज आपणास या अफजल खानांचा पराभव करून निवडणूकरुपी लढाई जिंकायची आहे. त्यामुळे बुथप्रमुखांनी मावळ्यांसारखे काम करून आपापले बुथ संभाळले पाहिजेत.

आम्ही कुणाला आमदार, खासदार करण्यासाठी लढत नाही तर देश आणि देशातील नागरिकांसाठी लढणार आहोत. पुणे शहरही बदलण्याचे काम आम्ही केले आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र अग्रेसर राहिल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

पंतप्रधानांची जागा रिक्त नाही : दानवे

लोकसभा निवडणूकीत २०१४ पेक्षा जास्त कष्ट करून २०१९ च्या पुन्ही मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करायचे आहे. या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या बळावर मागच्यावेळी जिंकलेल्या ४२ जागांपेक्षा एक जागा जास्तच जिंकू. देशातील गरीबांसाठी मोदींनी गेली पाच वर्षात काम केले आहे. कॉग्रेसचेच सरकार शेतकरी विरोधी होते.  पाच वर्षात आम्ही सर्व सत्ताकेंद्रे काबीज केल्याने सर्व विरोधक एकत्र येत आहेत. मात्र, प्रधानमंत्रिपदाची जागाच खाली नाही. त्यामुळे  विरोधकांचे घोडे मध्येच थांबणार आहे. विकासाकडील लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी आम्ही राज्यघटना बदलणार असल्याचे सांगितले जाते. त्यांना आज बाबासाहेबांबद्दल प्रेम येत आहे. त्यांना लोकसभेत जाण्यापासून रोखताना आणि निवडणुकीत बाबासाहेबांचा पराभव करताना हे प्रेम कोठे गेले होते, असाही सवाल दानवे यांनी यावेळी केला.