पुणे -मुंढव्याच्या उड्डाणपुलासाठी ठाकरेंची शिवसेना आज रस्त्यावर उतरली . मुंढवा येथील महात्मा फुले चौकामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने उड्डाणपुलाच्या मागणीसाठी शहर प्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी उपशहरप्रमुख आबा निकम, सुनील जगताप, विभाग प्रमुख दिलीप व्यवहारे उपशहरसंघटक सुरज मोराळे, गिरीश गायकवाड , उत्तम भुजबळ, राहुल बायस, राम खोमणे सोमनाथ गायकवाड आत्माराम देशमुख दत्तात्रय घुले अजय परदेशी अनिल परदेशी बाबा कोरे गजानन गोंडसवर बंडू नाना बोडके विजय पालवे राकेश कांबळे बाळासाहेब सणस सोनू पाटील अहिरे अंकित कौशिक रेड्डी आनंद उडेद मनीष सिंग अशोक येवले अरुण उगलमुगले सागर इंदलकर प्रवीण रणदिवे आकाश जगताप योगेश ढेरे अविनाश गायकवाड सचिन गलांडे वैशाली गायकवाड मीना गायकवाड स्वाती आडनावे गौरव मस्के किशोर शिंदे श्रीकांत सूर्यवंशी मंगलसिंह सूर्यवंशी बाळासाहेब मोडक अनिल परदेशी उपस्थित होते. यावेळी संजय मोरे म्हणाले कि,’भाजपचा नाकर्तेपणा व झोपलेलं प्रशासन जागे करण्यासाठी, प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मुंढवा येथील महात्मा फुले चौकामध्ये वाहतूक कोंडीची समस्या वारंवार भेडसावत आहे. या अनुषंगानेमहापालिका आयुक्तांना उड्डाणपूल किती आवश्यक आहे यासाठी चार वेळा भेटून निवेदनं दिली. तेव्हा कुठे आज आंदोलन स्थळी पुणे मनपा प्रकल्प विभागातील अभियंता सौरभ चौधरी यांनी भेट देउन सांगितले कि स्थायी समितीच्या बैठकीमधे मुंढवा येथील चौकात कशा प्रकारचा पूल असावा यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. तसा ठराव संमत झाला. परंतू निर्णय कधी घेणार हे सांगितले नाही. म्हणून शिवसेनेच्या वतीने भरपावसात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण:सासरा राजेंद्र आणि दीर सुशीलला 28 मे पर्यंत पोलिस कोठडी
पुणे-वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे सात दिवसांपासून फरार होते. पोलिसांनी आज सकाळी दोघांना स्वारगेट येथून ताब्यात घेतले. दुपारी त्यांना शिवाजी नगर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोघांनाही 28 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपी पिता-पुत्राला न्यायालयात नेत असताना भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आरोपींच्या गाडीवर टोमॅटो फेकून संताप व्यक्त करण्यात आला.
वैष्णवी हगवणे हिचा हुंड्यासाठी सासरच्यांकडून छळ होत होता. हा जाच असह्य झाल्याने वैष्णवीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. याप्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर वैष्णवीचा पती, नणंद आणि सासू यांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना 21 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार झाले होते. पोलिसांनी आज सकाळी सासरा आणि दीर यांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी 28 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळलेली आहे. पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यातच आज पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांचा संताप व्यक्त करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. आरोपी पिता-पुत्राला न्यायालयात नेत असताना भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर टोमॅटो फेकले.तसेच आरोपींना भाषी झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली होती.
दरम्यान, बावधन पोलिसांनी आज सकाळी यासंबंधी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत या प्रकरणी पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता होती. पण पोलिसांनी 2 मिनिटांतच आपली पीसी गुंडाळल्याने अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले. बावधन पोलिस म्हणाले, बावधन पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी वैष्णवी हगवणे यांच्या कुटुंबातील 3 जण अटकेत होते. उर्वरित 2 आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 6 पथके तैनात करण्यात आली होती. या पथकाने राजेंद्र हगवणे (वैष्णवीचे सासरे) व सुशील हगवणे (वैष्णवीचा दीर) यांना आज पहाटे पुणे स्वारगेट येथून अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार शशांक आणि वैष्णवीच्या लग्नाच्या वेळी तिच्या माहेरच्यांनी 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर कार आणि चांदीची भांडी दिली होती. मात्र जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपये घेऊन ये या मागणीसाठी सासरचे लोकं तिचा छळ करत होते. तर शशांक तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता, या सर्व गोष्टीला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे समजते. याप्रकरणी वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे, सासू, पती, दिर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) मुळशी तालुक्यातील भुकूमची होती. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, वैष्णवीचा सासरच्या कुटुंबाने अमानुष छळ केला. तिच्यावर मानसिक अत्याचार करण्यात आला. ऑगस्ट 2023 मध्ये गरोदर असलेल्या वैष्णवीने पती शशांकला या बाबत माहिती दिली असता, त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन ‘हे बाळ माझे नाही, दुसऱ्या कोणाचे असावे’ असे म्हटले. यावरून पती शशांक आणि सासरचे लोकांनी वैष्णवीला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला, शशांकने तिला मारहाण केली. शिवीगाळ करत घरातून हाकलून देईन असे धमकावत तिला घरातून बाहेर काढले.
या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून, पोलिसांना निःपक्ष आणि तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलिस महासंचालकांना तीन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
पुन्हा एकदा अॅपलला धमकी-अमेरिकेत विकले जाणारे आयफोन भारतातच काय कोणत्याही देशात बनवू नका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात आयफोन बनवण्याबद्दल पुन्हा एकदा अॅपलला धमकी दिली आहे. शुक्रवारी ट्रम्प म्हणाले की अमेरिकेत विकले जाणारे आयफोन भारतात किंवा इतर कोणत्याही देशात नव्हे, तर अमेरिकेतच बनवले पाहिजेत.
ट्रम्प म्हणाले की, त्यांनी यापूर्वी ॲपलचे सीईओ टिम कुक यांना थेट सांगितले होते की जर ॲपलने अमेरिकेत आयफोन तयार केले नाहीत, तर कंपनीला किमान २५% टॅरिफचा सामना करावा लागेल. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर लिहिले,मी ॲपलच्या टिम कुकला खूप आधी कळवले होते की अमेरिकेत विकले जाणारे आयफोन अमेरिकेत बनवले जातील, भारतात किंवा इतर कुठेही नाही. जर असे झाले नाही तर, ॲपलला किमान २५% दराने शुल्क भरावे लागेल.
Donald Trump Truth Social 05.23.25 07:19 AM EST pic.twitter.com/0JwK7KnhUG
— Commentary Donald J. Trump Posts From Truth Social (@TrumpDailyPosts) May 23, 2025
ट्रम्प यांना ॲपलची उत्पादने भारतात बनवायची नाहीत असे वाटते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ॲपलची उत्पादने भारतात तयार होऊ नयेत असे वाटते. गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी कंपनीचे सीईओ टिम कुक यांना सांगितले होते की भारतात कारखाने उभारण्याची गरज नाही. भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो.
गुरुवारी (१५ मे) कतारची राजधानी दोहा येथे व्यावसायिक नेत्यांसोबत झालेल्या कार्यक्रमादरम्यान ट्रम्प यांनी अॅपलच्या सीईओंसोबतच्या या संभाषणाची माहिती दिली. त्यांनी म्हटले होते की, ॲपलला आता अमेरिकेत उत्पादन वाढवावे लागेल.
असे असूनही, ॲपलची सर्वात मोठी कंत्राटी उत्पादक कंपनी फॉक्सकॉनने भारतात १.४९ अब्ज डॉलर्स (सुमारे १२,७०० कोटी रुपये) गुंतवणूक केली आहे. फॉक्सकॉनने त्यांच्या सिंगापूर युनिटद्वारे गेल्या ५ दिवसांत तामिळनाडूच्या युझान टेक्नॉलॉजी (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ही गुंतवणूक केली आहे.

काल मला टिम कुकमुळे थोडा त्रास झाला. मी त्यांना म्हणालो, टिम, तुम्ही माझे मित्र आहात, तुम्ही ५०० अब्ज डॉलर्स घेऊन येत आहात, पण आता मी ऐकले आहे की तुम्ही संपूर्ण उत्पादन भारतात करत आहात. तुम्ही भारतात उत्पादन करावे असे मला वाटत नाही. जर तुम्हाला भारताची काळजी घ्यायची असेल तर तुम्ही भारतात उत्पादन करू शकता, कारण भारत हा जगातील सर्वात जास्त दर असलेल्या देशांपैकी एक आहे. भारतात विक्री करणे खूप कठीण आहे आणि त्यांनी आम्हाला एक करार दिला आहे, ज्या अंतर्गत ते आमच्याकडून कोणतेही शुल्क आकारण्यास तयार नाहीत. मी टिम यांना म्हणालो, टिम, बघा, आम्ही तुमचे सर्व प्रकल्प चीनमध्ये बनवले जात आहेत हे वर्षानुवर्षे सहन करत आलो आहोत, आता तुम्हाला अमेरिकेत उत्पादन करावे लागेल, तुम्ही भारतात उत्पादन करावे असे आम्हाला वाटत नाही. भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो.
अमेरिकेच्या बाजारपेठेत विकले जाणारे ५०% आयफोन भारतात बनवले जातात.अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अमेरिकेच्या बाजारपेठेत विकल्या जाणारे ५०% आयफोन भारतात तयार केले जात आहेत. एप्रिल-जून तिमाहीत अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आयफोनसाठी भारत हा मूळ देश बनेल, असे कुक म्हणाले. त्यांनी सांगितले की एअरपॉड्स, अॅपल वॉच सारखी इतर उत्पादने देखील बहुतेक व्हिएतनाममध्ये तयार केली जात आहेत.
आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण ट्वीट करून धार्मिक तेढ निर्माण करणा-या भाजप आ. अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा!
काँग्रेस पक्षाचे धनंजय शिंदे यांनी दादर स्थानकात दिली तक्रार
मुंबई, दिनांक: २३ मे २०२५
भाजप आमदार श्री. अतुल भातखळकर यांनी X (पूर्वीचे ट्वीटर) या सोशल प्लॅटफॉर्मवर केलेले ट्विट
(लिंक: https://x.com/bhatkhalkara/status/1925130462118531179?s=46)
मालक चोर असेल तर बाकीचे चालक काय करणार 😆 कब्री वरचे फुल पण सोडत नाही पप्पू 🤣 pic.twitter.com/AwE6YkSgGw
— 🇩 🅴︎🇻 🅰︎ 🇧 🅷︎🇦 🆄︎ 🇲 🆄︎🇲 🅱︎🇦 🅸︎ (@DevaBhauReturn) May 21, 2025
अत्यंत द्वेषपूर्ण, धार्मिक तेढ निर्माण करणारे आणि काँग्रेस पक्षाची व कार्यकर्त्यांची बदनामी करणारे आहे. सदर ट्विटमुळे समाजात वैरभावना आणि अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी लेखी तक्रार काँग्रेस नेते धनंजय शिंदे यांनी दादर पोलीस स्थानकात दिली आहे.
या संदर्भात बोलताना शिंदे म्हणाले की, अतुल भातखळकर हे एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत पण त्यांचे वागणे हे सातत्याने बेजबाबदारपणाचे राहिले आहे. ते आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरून साततत्याने द्वेष पसरवण्याचे व धार्मिक तेढ करणा-या पोस्ट करतात. त्यांच्या या कृत्यामुळे सामाजिक शांतता भंग पावण्याची दाट शक्यताच आहे. वर लिंक दिलेली त्यांची पोस्ट अत्यंत आक्षेपार्ह असल्याने त्यामुळे त्यांच्यावर
- भारतीय न्याय संहिता २०२३, कलम १९६–धार्मिक किंवा सामाजिक गटांमध्ये तेढ निर्माण करणे
- कलम ३५२ – वैरभावना किंवा सार्वजनिक तेढ निर्माण करणारी विधाने.
- कलम ३५१(१) – शांतता भंग करण्याच्या हेतूने अपमान.
- कलम ३५६ – बदनामी करणे.
- माहिती तंत्रज्ञान कायदा २०००, कलम ६७/६९A – ऑनलाइन बदनामीकारक किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारा मजकूर.
या कलमाखाली गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली पाहिजे असे शिंदे म्हणाले.
यापूर्वी काँग्रेस पक्षाने अर्णव गोस्वामी (पालघर प्रकरण, २०२०) आणि अमित मालवीय (https://www.thehindu.com/news/national/other-states/congress-files-complaint-against-amit-malviya-for-defamatory-post/article25678912.ece) यांच्याविरोधात अशाच खोट्या आणि बदनामीकारक मजकुरासाठी तक्रारी दाखल केल्या आहेत, ज्याचा आदर्श येथे लागू होतो. त्यामुळे या प्रकरणी तात्काळ कारवाई करून सामाजिक सलोखा आणि शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंतीही शिंदे यांनी दादर पोलिसांना केली आहे.

MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार:2 विद्यार्थ्यांसह त्याच्या मित्राला अटक
पुणे–
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना सांगलीत घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 2 विद्यार्थ्यांसह त्यांच्या एका मित्राला बेड्या ठोकल्या आहेत. विनय विश्वेष पाटील (22, महिपती निवास, अंतरोळीकरनगर, भाग 1 सोलापूर शहर), सर्वज्ञ संतोष गायकवाड (20, एफ 605, सरगम, नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे) व तन्मय सुकुमार पेडणेकर (21, 303 कासाली व्हिला, अभयनगर, सांगली) अशी अटक केलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. या तिघांनाही पुण्यातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.कोर्टाने या तिघांचीही 27 मेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गत 18 मे रोजी ही घटना घडली. त्या दिवशी पीडित विद्यार्थिनी व आरोपी चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. त्यानंतर आरोपी तिला आपल्या फ्लॅटवर घेऊन गेले. तिथे आरोपी विद्यार्थ्यांनीला थंड पेयाच्या माध्यमातून गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर बेशुद्धावस्थेत तिघांनीही कथितपणे तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. काहीवेळाने पीडिता शुद्धीत आली. तिने झाल्या प्रकाराचा आरोपींना जाब विचारला. त्यानंतर आरोपींनी तिला या प्रकाराची जाहीर वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
पीडित विद्यार्थिनी मूळची कर्नाटकच्या बेळगावची आहे. घटनेनंतर ती परत आपल्या खोलीवर आली. तिने आपल्या आई-वडिलांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी तत्काळ पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर काही तासांतच तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पोलिसांनी सांगितले की, तिन्ही आरोपींचे वय 20 ते 22 वर्षांचे आहे. यापैकी 2 विद्यार्थी एमबीबीएसचे विद्यार्थी असून, ते पीडित विद्यार्थिनीसोबतच शिकतात. सध्या आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या सामूहिक बलात्कारासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा अभियानात महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक कार्यालय प्रथम
पुणे, दि. २३ मे २०२५: प्रशासनातील लोकाभिमुखतेसाठी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केलेल्या १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा अभियानात महावितरणच्या प्रादेशिक विभाग स्तरावर पुणे प्रादेशिक संचालक कार्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा निकाल जाहीर झाला. यात महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयास द्वितीय तर नागपूर प्रादेशिक कार्यालयास तृतीय क्रमांक मिळाला आहे.
महावितरणच्या कार्यालयांतील नागरिकांसाठी सेवा सुलभता, डिजिटल ग्राहक सेवा, कार्यालयीन सोयीसुविधा, तंत्रज्ञानाचा वापर, तक्रार निवारण, कामकाजातील सुधारणा व कार्यालयीन व्यवस्थापन आदी मुद्द्यांवर १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा अभियान राबविण्यात आले. यात महावितरणच्या प्रादेशिक विभागस्तरावर पुणे, कोकण व नागपूर प्रादेशिक विभाग कार्यालये सहभागी झाले होते. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात भारतीय गुणवत्ता परिषदेच्या समितीकडून या कार्यालयांचे नुकतेच मूल्यांकन करण्यात आले. त्यात पुणे प्रादेशिक कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
श्री. भुजंग खंदारे, प्रादेशिक संचालक, पुणे – ‘कार्यालयीन सुधारणा अभियानात प्रथम क्रमांक पटकावला याचे समाधान आहे. सोबतच जबाबदारी देखील वाढली आहे. वीजग्राहक हेच महावितरणच्या कामकाजाचा केंद्रबिंदू आहेत. आता पुढील १५० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा अभियान अंतर्गत विविध ग्राहकाभिमुख सुधारणांना आणखी वेग देण्यात येईल’.
सकल हिंदू सामुदायिक व्रतबंध सोहळ्यात होणार ५५ बटूंची मुंज
स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजन : समाजातील विविध घटकातील मुलांची विनामूल्य मुंज
पुणे : स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सकल हिंदू समाजातील ५५ पेक्षा अधिक बटूंच्या सामुदायिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील विविध घटकातील तसेच अनाथ मुलांचे संगोपन करणाऱ्या संस्थांमधील मुला-मुलींची मुंज यावेळी होणार आहे. बुधवार दिनांक २८ मे रोजी सकाळी ९ वाजता कर्वे रस्त्यावरील अश्वमेध मंगल कार्यालयात हा सकल हिंदू सामुदायिक व्रतबंध सोहळा पार पडणार आहे.
या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक बटूसाठी वस्त्रे, पूजा साहित्य, भोजन व अन्य आवश्यक सामग्री ट्रस्टच्या वतीने विनामूल्य पुरवण्यात येणार आहे. बदलत्या काळात शिक्षण आणि जीवनशैलीत अनेक बदल झाले असले, तरी भारतीय हिंदू संस्कृतीतील मूलभूत संस्कारांची गरज अजूनही तितकीच महत्त्वाची आहे. त्यापैकीच एक म्हणजे व्रतबंध संस्कार ज्ञानार्जनाच्या प्रवासाची सुरुवात करणारा एक पवित्र टप्पा आहे. या संस्काराचे समाजव्यापी महत्त्व ओळखून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत आपल्या कार्यकाळात सर्व हिंदू समाजासाठी सामुदायिक व्रतबंध सोहळ्याची संकल्पना मांडली होती. सावरकरांनी मालवणला तथाकथित १५० अस्पृश्यांच्या मुंजी लावल्या होत्या आणि त्यांना स्वतः जानवं घातली होती. त्यांच्या या विचारातून प्रेरणा घेऊन स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट मागील चार वर्षे हा उपक्रम सातत्याने राबवत आहे. एकूण १५ हून अधिक समाजातील मुले आणि मुलींनी स्वेच्छेने या संस्कारासाठी नाव नोंदणी केली आहे.
व्रतबंधाचा कार्यक्रम संपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने साग्रसंगीत करण्यात येणार आहे. सोहळ्याची सुरुवात गणेश पूजनाने होईल. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने चौलकर्म, मातृभोजन, व्रतबंधन हे विधी पार पडणार आहेत. यानंतर भिक्षावळ मिरवणूक देखील काढण्यात येणार आहे.
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री क्षेत्र चांदवड येथे रेणुका देवीचे घेतले दर्शन
राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी केली विशेष प्रार्थना
नाशिक, दि. २३ मे २०२५ : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ श्री क्षेत्र रेणुका देवी संस्थान, चांदवड येथे जाऊन देवीचे दर्शन घेतले. या भक्तिपूर्ण प्रसंगी त्यांच्या सोबत त्यांची भगिनी जेहलम जोशी देखील उपस्थित होत्या.
डॉ. गोऱ्हे यांनी रेणुका मातेच्या चरणी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. मंदिर परिसराची पाहणी करत त्यांनी भाविकांशी संवाद साधला. संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी दोघींचे स्वागत करत देवीच्या प्रसादाने त्यांचा सत्कार केला. डॉ. गोऱ्हे यांनीही श्रद्धेने देवीला साडी व हार अर्पण करून ओटी भरली आणि देवीच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली.
यावेळी परिसरातील नागरिक, महिला कार्यकर्त्या आणि भक्तगण उपस्थित होते.
मुसळधार पावसाची शक्यता; महावितरण ‘हाय अलर्ट’वर
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी युद्धपातळीवर सज्ज राहा- सीएमडी श्री. लोकेश चंद्र
मुंबई, दि. २३ मे २०२५: अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यभरात पुढील तीन ते चार दिवस वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने यंत्रणेसाठी हाय अलर्ट जाहीर केला आहे. या कालावधीसह पावसाळ्यातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी आपत्कालिन नियोजन करण्यात आले आहे.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी शुक्रवारी (दि. २३) राज्यातील वीजपुरवठ्याचा आढावा घेतला. नैसर्गिक आपत्तीमुळे खंडित झालेला वीजपुरवठा तातडीने सुरू करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, मुख्यालय व परिमंडलस्तरावर २४x७ आपत्कालिन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाची लगेचच स्थापना करावी. कोणीही मुख्यालय सोडू नये असे निर्देश श्री. लोकेश चंद्र यांनी दिले. व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या या बैठकीमध्ये संचालक (संचालन) श्री. सचिन तालेवार यांच्यासह राज्यातील मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते उपस्थित होते.
यंदा मान्सूनच्या आगमनापूर्वीच राज्यात वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची दररोज हजेरी सुरू आहे. अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र सध्या स्थिर असले तरी त्याच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या परिस्थितीमध्ये सुरळीत वीजपुरवठ्याच्या उपाययोजनांसाठी ही बैठक झाली. दरम्यान, शुक्रवार (दि. २३) पासून मुख्यालय व राज्यातील आपत्कालिन व्यवस्थापन नियंत्रण कक्षांचे कामकाज सुरू झाले आहे.
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र म्हणाले की, वीजपुरवठा खंडित झाल्यास तो तातडीने व वेळेत सुरू करण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात. काम करताना वीजसुरक्षेसाठी काळजी घ्यावी. सुरक्षा साधनांचा प्रत्येकवेळी वापर करावा. एखाद्या ठिकाणी दुरुस्ती कामाला वेळ लागणार असेल तर त्याबाबत संबंधित ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे, व्हॉटस् अॅप ग्रुप्स, ट्वीटर व सोशल मिडिया, प्रसिद्धी माध्यमांद्वारे ताबडतोब कळविण्यात यावे. खंडित वीजपुरवठ्याच्या कालावधीबाबत मुख्यालयाकडून पर्यवेक्षण करण्यात येत आहे. शक्य असूनही वीजपुरवठा वेळेत सुरू झाला नाही, तर त्याची गंभीर दखल घेण्यात येईल. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही. त्यासाठी क्षेत्रीय वरिष्ठ अभियंत्यांनी मोठ्या व गंभीर बिघाडाच्या ठिकाणी स्वतः जाऊन दुरूस्ती कामांना वेग द्यावा. तसेच महावितरणच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये असे स्पष्ट निर्देश श्री. लोकेश चंद्र यांनी दिले.
वादळवारा व मुसळधार पावसामुळे वीजयंत्रणेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक परिमंडल स्तरावर विजेचे खांब, रोहित्र, वीजतारा, ऑईलसह इतर यंत्रसामग्री उपलब्ध ठेवावी. पावसामुळे नादुरुस्त झालेल्या वीज यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी संबंधित अभियंते, कर्मचाऱ्यांना तसेच सर्व एजन्सींना मनुष्यबळ, सामग्री व वाहनांसह युद्धपातळीवर तयार राहण्याची सूचना श्री. लोकेश चंद्र यांनी केली. या पद्धतीने मान्सूनच्या आगमनानंतर पावसाळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महावितरणच्या यंत्रणेने सज्ज राहावे असेही त्यांनी स्पष्ट केले.
मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
पुणे, दि. २३: गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच आगामी मान्सूनमधील पावसाचा अंदाज पाहता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसोबत सर्वच संबंधित विभागांनी समन्वय ठेऊन आपत्तीवर मात करण्यासाठी काम करावे. आपत्तीबाधित नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करावे, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.
पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेत आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त बापू बांगर, उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर आदी यावेळी उपस्थित होते.
आगामी काळातही सरासरीइतका किंवा त्यापेक्षा जास्त राहण्याची हवामान विभागाची माहिती पाहता महानगरपालिकेने कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्यासाठी पूर्वतयारी करावी. नालेसफाईची उर्वरित कामे गतीने पूर्ण करावीत. पावसादरम्यान ज्या ठिकाणी पाणी साचते असे नागरी भाग व झोपडपट्ट्यांची माहिती महानगरपालिकेकडे असते. आपत्तीकाळात व पूरस्थितीमध्ये बाधितांना सुरक्षित जागी हलविण्यासाठी निवारा केंद्रांची व्यवस्था करावी.
निवारा केंद्रात नागरिकांना हलवण्याबाबतचे योग्य नियोजन करावे. त्या ठिकाणी हलविण्यात येणाऱ्या नागरिकांना अन्न, निवास व्यवस्थेसह अंथरून पांघरून आदी सोई- सुविधा व्यवस्थितपणे मिळाल्या पाहिजेत. भविष्यात या नागरिकांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून सर्व ती दक्षता घेण्यात यावी. नागरिकांची घरे, इतर मालमत्ता आदींचे नुकसान झाल्यास महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करावेत तसेच बाधितांना १०० टक्के मदत मिळेल याची दक्षता घ्यावी.
धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत जलसंपदा विभागाने पुरेशी आधीच माहिती द्यावी. आपत्ती काळात पावसाचे, पूरस्थितीच्या इशाऱ्यांवर लक्ष ठेऊन ते नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे काम करावे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांची तयारी करावी. वाहतूक कोंडी होणार नाही आणि रहदारी सुरळीत राहील यासाठी पोलीस प्रशासनाने काम करावे. मनपा हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू राहतील याची काळजी घ्यावी. बचाव कार्यासाठी एनडीआरएफ पथकाच्या सतत संपर्कात रहावे. तसेच बोटी, मदत साठा आदी तयार ठेवावे, असेही ते म्हणाले.
शहरातून पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्या वाहतात. या नद्यांच्या लगतच्या झोपडपट्ट्यात पुराचे पाणी येऊ नये म्हणून नदी सुधार प्रकल्पांना गती देणे आवश्यक असून भविष्यात सीमाभिंतींचे काम हाती घेणे गरजेचे आहे, आदी सूचनाही त्यांनी दिल्या.
आयुक्त श्री. सिंह यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. महानगरपालिकेचा पूर नियंत्रण कक्ष, जलसंपदा विभागाचा कक्ष, आपत्ती व्यवस्थापन कक्ष १ जूनपासून २४ तास ७ तास तत्त्वावर कार्यान्वित करण्यात येणार आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग, अग्निशमन बाबत फायर क्रू अशी नवीन संकल्पना सुरू केली आहे. हवामान विभागाचा इशारा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली आहे. तात्पुरते निवारा केंद्र निश्चित केली असून असून तेथे आवश्यक त्या सुविधा, अन्न, निवास व्यवस्थेसाठी अंथरूण, पांघरूण पुरविण्याचे नियोजन केले आहे. पूरपरिस्थिती असलेल्या काळात तेथील रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतींनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त श्री. सिंह यांनी केले.
आपत्ती व्यवस्थापनासाठी १ हजार कोटी रुपयांची मागणी केली असून त्यापैकी राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून ५७० कोटी रुपये पवना नदी पूर शमन उपाययोजनांसाठी मिळावे म्हणून प्रस्ताव पाठविला आहे. यातून नैसर्गिक नाल्यांचे पुनुरूज्जीवन, पुराच्या धोका कमी करणे, नागरिकांच्या जीविताचे, मालमत्ता तसेच पायाभूत सुविधांचे संरक्षण, पर्जन्यजल वाहिन्या, सांडपाणी वाहिन्यांची सुधारणा करणे तसेच आदी समग्र पूरनियंत्रण उपाययोजना राबविण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.
यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री. आव्हाड, उपायुक्त श्री. बांगर यांनी पोलीस विभागाच्यावतीने वाहतुकीच्या अनुषंगाने, पर्यायी मार्ग तसेच अन्य नियोजनाची माहिती दिली.
जलसंपदा विभागाने त्यांचेकडील पूरनियंत्रण कक्ष, पाणी सोडण्याबाबतचे नियोजन कसे करण्यात येते याची माहिती दिली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने नागरिकांच्या जीविताचे रक्षणाच्या अनुषंगाने करण्यात येणारी कार्यवाही व नियोजन आदींची माहिती दिली.
महानगरपालिकेतील उपायुक्तांनी त्यांच्या हद्दीतील नियोजनाची माहिती दिली. त्याचबरोबर विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले.
सगळ्या प्रकरणातले आरोपी अजित दादांच्या पक्षातले कसे?:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा थेट हल्ला एकनाथ शिंदेंवर टीका
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पुण्यात घडणाऱ्या अनेक प्रकरणातील आरोपी हे अजित पवार यांच्या पक्षातले कसे? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. या माध्यमातून त्यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर थेट टीका केली आहे.पुण्यातील राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याच्या वर गुन्हा दाखल करण्यात एकनाथ शिन्देंच्या गटात आलेल्या एका माजी आमदाराचा हाथ असल्याच्या चर्चांना उधाण आले असताना सपकाळ यांच्या या टीकेला महत्व प्राप्त होते आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भातील दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्ये एका पोस्टमध्ये त्यांनी अजित पवार यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून दुसऱ्या पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या सर्व आमदारांची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
पुण्याच्या पौर्शे कार ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपी, कोयता गॅंग, शेल्टर होमच्या नावाखाली तरुणींच्या लैंगिक करणारा शंतनू कुकडे, बोगस कागदपत्रे बाबत राष्ट्रवादीचे दीपक मानकर आणि नंतर वैष्णवी हगवणे या भगिणीचा हुंड्यासाठी छळ करून तिचा जीव घेणारे राजेंद्र हगवणे हे सर्व आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. या सगळ्या प्रकरणातले आरोपी अजित दादांच्या पक्षातलेच कसे?
शिंदेच्या सर्व आमदारांची चौकशी करा
हर्षवर्धन सपकाळ यांनी आणखी एका पोस्टच्या माध्यमातून उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे. या माध्यमातून त्यांनी शिंदेंच्या सर्व आमदारांची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. यामध्ये ते म्हणाले की, ‘राज्यातले भाजप शिंदे व अजित पवार गट महायुतीचे सरकार हे भ्रष्टाराच्या पायावर उभे असून या सरकारमधील सहभागी मंत्री आमदारांकडून फक्त लूट सुरु आहे. धुळ्याच्या दौ-यावर असलेल्या विधिमंडळाच्या अंदाजपत्रकीय समितीचे प्रमुख आ. अर्जुन खोतकर यांच्या पीए च्या खोलीतून जवळपास दोन कोटी रुपयांची रक्कम सापडली. ही या सरकारच्या लुटीचा भक्कम पुरावा आहे. धुळे भागातील कंत्राटदारांकडून ही रक्कम उकळल्याची चर्चा आहे. आमदाराच्या पीए कडे एवढी मोठी रक्कम सापडली आहे तर आमदाराकडे किती रक्कम असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या भ्रष्टाचाराला पाठिंबा नसेल तर त्यांनी खोतकर व त्यांच्या पीएवर गुन्ह दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी. तसेच शिंदेच्या सर्व आमदारांची लाचलुचपत विभाग, ईडी व इन्कमटॅक्स कडून चौकशी करावी.’
झुडपी जंगलाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पूर्व विदर्भातील अनेक कुटुंबे बेघर आणि भूमिहीन होण्याचा धोका!
सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडले, पुनर्विचार याचिका दाखल करावी
काँग्रेस नेते नाना पटोले यांची मागणी
मुंबई दि. २३ मे २०२५
विदर्भातील सहा जिल्ह्यातील झुडपी जंगलाला वनक्षेत्र घोषित करून ८६ हजार हेक्टर क्षेत्र महसूल विभागाने वनविभागाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. यामुळे या जमिनीला डिनोटीफाय करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मोठा धक्का बसला आहे. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयामुळे पूर्व विदर्भातील लाखो कुटुंबे बेघर आणि भूमिहीन होण्याचा धोका असून या भागाच्या विकासाला खिळ बसणार आहे. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून सरकारने या प्रकरणात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी काँग्रेसे नेते नाना पटोले यांनी केली आहे.
या संदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने १२ डिसेंबर १९९६ च्या निर्णयाच्या धर्तीवरच निकाल दिला आहे. त्यामुळे आता झुडपी जंगलाला वनभूमी घोषित केले असून ती वनविभागाचा हस्तांतरित करण्यात येणार आहे. राज्य सरकारने २०१४ – १८ काळात अनेक परिपत्रके काढून विकास कामांसाठी जमिनीचा वापर बदलण्याचा प्रयत्न केला आहे त्यालाही या निर्णयामुळे धक्का बसला आहे. तसेच महसूल खात्यात्या अख्त्यारीतील वनजमीन खासगी व्यक्ती संस्था यांनी दिली आहे का? याची पडताळणी राज्याच्या मुख्य सचिवांनी एसआयटी स्थापन करून ती जमीन वनखात्याला परत करावी किंवा सार्वजनिक हिताचा विचार करून हे शक्य नसेल तर शुल्क वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. याचा मोठा आर्थिक फटका सर्वसामान्यांना आणि गोरगरीबांना बसणार आहे. ज्यांची शुल्क भरण्याची कुवत नाही ते बेघर आणि भूमिहीन होणार आहेत.
न्यायालयाच्या निर्णयाने काही मोजक्या लोकांना दिलासा मिळेल पण बहुतांशी लोकांना मोठा फटका बसणार आहे. ऑक्टोबर १९८० च्या नंतर या जमिनींवर झालेले सर्व व्यावसायिक आवंटन अतिक्रमण मानले जाईल त्यामुळे हजारो बांधकामे धोक्यात येणार आहेत. भविष्यात ही सर्व जमिनीचे स्वरूप बदलता येणार नाही. अपवादात्मक स्थितीत बदलण्यासाठीही केंद्र सरकारच्या स्तरावरच बदल करण्यात येईल राज्य सरकारला या संबंधी निर्णय घेता येणार नाही. यामुळे पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विकास कामे आणि प्रकल्प उभारणे अशक्यप्राय होणार आहे. उद्योग धंदे उभे राहणार नाहीत, स्थानिक तरुणांना रोजगार मिळणार नाहीत. राज्य सरकारने या संदर्भात सहारिया कमिटी नेमली होती. त्या कमिटीने आपला अहवाल दिला होता या अहवालाच्या आधारे सरकारने सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडली असती तर सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला असता. गडचिरोलीच्या सुरजागड प्रकल्पासाठी लाखो झाडे तोडण्यासाठी पर्यावरण विभागाच्या परवानग्या सरकार सहज मिळवून देते पण लाखो गोरगरीब जनतेसाठी सरकार न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडत नाही हे दुर्देवी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: या भागातून येतात पण त्यांनीही ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली नाही. आता तरी त्यांनी स्वत: याची गंभीर दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी अन्यथा पूर्व विदर्भाला विकासापासून वंचित ठेवण्याचे आणि लाखो कुटुंबाना लोकांना बेघर आणि भूमिहीन करण्याचे पातक त्यांना स्वीकारावे लागेल असे पटोले म्हणाले.
मैत्रिणीने बोलवल्याने तो गेला… अन … बनला होस्टेज ..
पुणे : नवीन घेतलेला फ्लॅट पाहण्यासाठी बाल मैत्रिणीने बोलवल्याने तो गेला. परंतु या मैत्रिणीने पती आणि इतरांच्या सहाय्याने त्याला मारहाण करुन बाथरुममध्ये डांबुन ठेवले. खंडणी उकळण्यासाठी त्याच्या मोबाईलवरुन मेसेज केला. कोंढवा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन चार तासात या तरुणाची सुटका करुन चौघांना गजाआड केले.
प्रवीण जगन्नाथ लोणकर (वय ३९, रा. कोंढवा खुर्द) अशी सुटका केलेल्या तरुणाचे नाव आहे. सोनल ऊर्फ सोनी कापरे ऊर्फ कटके (वय ३५, रा. सनश्री सनटेक सोसायटी, एनआयबीएम रोड, कोंढवा खुर्द), अतुल दिनकर रायकर (वय ३८), रॉबीन ऊर्फ रवी मंडल (वय २४, रा. कोंढवा खुर्द) आणि सुरेश ऊर्फ कुरेश कुमारस्वामी हान (वय ३१, रा. कोंढवा खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील प्रवीण लोणकर यांना त्यांची बालपणीची मैत्रीण सोनल ऊर्फ सोनी रायकर हिने मंंगळवारी सायंकाळी तिचा एनआयबीएम रोडवरील फ्लॅट पाहण्यासाठी व चहासाठी बोलावले़ लोणकर घरी जाताच त्यांच्या डोळयात मिरची पुड टाकून जखमी केले. त्यावेळी तिचा पती अतुल रायकर व इतर साथीदार हे फ्लॅटच्या बाहेर दबा धरुन बसले होते. त्यांच्या मदतीने सोनी हिने प्रवीण लोणकर यांना मारहाण करुन त्यांच्या तोंडात बोहा कोंबला. त्याचे हातपाय दोरीने बांधुन त्यांना बाथरुमध्ये डांबुन ठेवले. त्यांच्याकडून एटीएम कार्ड व मोबाईल काढून घेतला. त्यांच्या मोबाईलवरुन त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर मेसेज केला की, ‘‘घरातील दागिने व पैसे काढून ठेव. मी एकाला आपल्या घरी ते घेऊन येण्यासाठी पाठवत आहे’’ हा मेसेज पाहून त्यांच्या पत्नीला शंका आली. त्यांनी व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले. परंतु, व्हिडिओ कॉल आला नाही. काहीतरी गडबड असल्याची शंका त्यांना आली. त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. यावेळी रात्र गस्तीवर असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव यांना ही माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे) रौफ शेख यांना कळविले. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ दखल घेऊन लोणकर यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
प्रवीण यांच्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणावरून सहायक पोलिस निरीक्षक मोहसीन पठाण, सुकेशिनी जाधव, राकेश जाधव यांच्यासह तपास पथकाचे अंमलदार लक्ष्मण होळकर, सुरज शुक्ला यांनी त्यांचा शोध घेतला. त्यानुसार एनआयबीएम रोडवरील सनश्री सनटेक सोसायटीतील एका फ्लॅट मधून डांबून ठेवलेल्या प्रवीण लोणकर यांची सुटका केली. आरोपींविरोधात खंडणी, अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.
सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग, मनोज पाटील , पोलीस उप-आयुक्त परि.०५ डॉ. राजकुमार शिंदे सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, धन्यकुमार गोडसे, यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रौफ शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नवनाथ जगताप, सहा. पोलीस निरीक्षक मोहसिण पठाण, सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव, सहा. पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र गावडे, व पोलीस अंमलदार लक्ष्मण होळकर, सुरज शुक्ला यांनी केली आहे.
मराठी नाईटिंगेल:मीना घोडविंदे
परिचारिका म्हटले की, आपल्या डोळ्यापुढे लगेच एखादे रुग्णालय आणि रुग्णाजवळ त्याला प्रेमाने औषध ,इंजेक्शन देणारी, सलाईन लावणारी पांढऱ्या शुभ्र गणवेशातील एका प्रेमळ स्त्रीची मूर्ती उभी राहते.अशाच एक लोकप्रिय, रुग्णांची अतिशय मनोभावे सेवा केलेल्या परिचारिका
सौ मीना घोडविंदे यांची प्रेरणादायी जीवन कहाणी
मीनाताई अवघ्या दहा वर्षांच्या असताना त्यांच्या आईला देवाज्ञा झाली. त्यामुळे वडिलांनी;रामचंद्र वनगे
त्यांना जाणीवपूर्वक सुशिक्षित, सुसंस्कारी, सेवाभावी घडवले.१९५० च्या दशकात वडिलांचे ठाण्यामध्ये सुप्रसिद्ध कापड दुकान,अन टेलरिंग जेन्टस क्लोथ शॉप होते. मीनाताईना त्यांना दुकानात मदत करावी लागत असे. घरकाम, शाळा याबरोबरच मीनाताईंनी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन अनेक बक्षिसे मिळवली.त्या अकरावी बोर्डाची परीक्षा पास झाल्या आणि त्यांनी स्वतःतील सेवाभाव ओळखून ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटल मधील नर्सिंग कॉलेजला प्रवेश घेतला. तेथेही त्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत.
पुढे तिथूनच त्यांची वर्कर्स टीचर्स ट्रेनिंग साठी निवड झाली.त्या कुर्ला बोर्ड येथे प्रशिक्षणास जात असत.तेथे निरनिराळ्या संस्थातून ४० जणी प्रशिक्षणासाठी येत असत.
मीनाताईंचा नर्सिंगच्या चार वर्षांच्या प्रशिक्षणात त्या चारही वर्षे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या.पुढे,बरीच वर्षे त्यान्च्या उत्तरपत्रिका शिकाऊ परिचारिकांना वाचण्यासाठी ठेवल्या जात असत.शिवाय या प्रशिक्षणात त्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत राहिल्या.
प्रत्येक स्पर्धेत त्यांचे बक्षीस ठरलेलेच असायचे.रांगोळी स्पर्धा, नृत्य, नाट्य, गायन, हस्ताक्षर ई. स्पर्धेत त्या अग्रणी असत.
नर्सिंग चे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अधिपरिचारिका म्हणजे स्टाफ नर्स म्हणून हॉस्पिटल प्रशासनानेच कायम स्वरुपी आदेश देऊन मीना ताईंना रुजू करून घेतले.सर्वात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या प्रसूती कक्षामध्यें सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली. प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवती मातेला धीर देत, तणावमुक्त करत आश्वस्थ करीत असत.अत्यंत संवेदनशिलतेने, अगदी शेवटच्या क्षणाला प्रसूती प्रक्रिया पूर्ण होताना, नवजात शिशुला कौशल्याने हाताळणे आणि इतर सर्व कामे त्या शास्त्रोक्त पद्धतीने करत असत. नवशिशूला स्वच्छ करत त्या मातेच्या जवळ ठेवत, अन स्तनपानाचे तंत्र मातेला शिकवत असत. त्यांच्या या सर्व कौशल्यपूर्ण कामाचे निरीक्षण केवळ शिकावू परिचारिकाच नव्हे तर शिकावू डॉक्टर्ससुद्धा करीत असत. कमालीची सहनशीलता, सहजता, नीटनीटकेपणा, स्वच्छता या मीनाताईंच्या गुणांचे सर्व कौतुक करीत असत.
प्रसूती कक्षातच त्यांना सातत्याने १० वर्षे सेवा करता आली.या दरम्यान त्यांनी जवळपास १० हजार गरीब महिलांच्या कौशल्याने प्रसूत्या
केल्या.
विवाहानंतर मीनाताईंच्या
३ पाळ्यांच्या नोकरीमुळे सासऱ्यांनी सांगितल्या प्रमाणे त्या ठाण्यातच राहिल्या. पती कला शिक्षक असल्याने शाळेत चित्रकला, संगीत कला शिकवीत असत. शिवाय मुलांना ते खाजगीरित्याही शिकवत असत. तसेच मराठी भक्तीसंगीत व सुगम संगीताचे कार्यक्रम स्वतंत्ररित्या सादर करत असत .
मीनाताईंच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ३ वर्षांनी
दुसरा मुलगा झाला.
इतर स्त्रियांच्या बाळंतपणासाठी सदैव तत्पर असलेल्या मीनाताईंनी स्वतःच्या बाळाकडेही पूर्ण लक्ष दिले.म्हणूनच त्यांनी त्यांची प्रसूती रजा संपल्यावर शिल्लक होती ती पगारी रजा , तीही संपल्यावर बिन पगारी रजाही घेतली .पण आपल्या मुलांना स्वतःच्या नजरेखाली वाढवले .मुलांना जेव्हा स्वतः ची अंघोळ स्वतः करणे ,कपडे घालणे , प्रातर्विधी करणे ही कामे जमू लागली, तेव्हाच त्या मुलांना पाळणाघरात ठेवून नोकरीस जाऊ लागल्या. ड्युटीवर जाताना मुले पाळणाघरात ठेवायची व घरी येताना घेऊन यायची हा त्यांचा नित्यक्रमच झाला. त्यात त्यांची ठाणे जिल्ह्यातली शिबिरातील कामाची वेळ असली किंवा त्यांच्या पतीस रात्रीच्या गाण्याच्या कार्यक्रमास जायची वेळ आली तर मुले पाळणाघरातच झोपी जायची. त्यामुळे त्यांची खूपच तारेवरची कसरत व्हायची. तेव्हा घरी फोनची सोयही नव्हती. त्यामुळे हे पतिपत्नी एका वहीत एकमेकांसाठी निरोप लिहून ठेवत असत.त्यात परत त्यांच्याकडे गॅसही नव्हता. त्यामुळे सर्व स्वयंपाक त्यांना स्टोव्ह वरच करावा लागत असे. कामाव्यतिरिक्तचा सर्व वेळ हे दोघेही मुलांसाठीच देत असत.३ पाळ्यातील परिचारिकेची नोकरी सांभाळत मुलांना घडविणे ही फार तारेवरची कसरत होती. पण मीनाताईं सातत्याने मुलांचे संस्कारवर्ग, खेळ , अभ्यास यात त्यांच्या सोबत स्वतःही सतत गुंतून राहायच्या. त्यामुळे मुले सरळमार्गी राहून कायम प्रथम
क्रमांक मिळवित राहिली. पुढे दोघांचेही शिक्षण पूर्ण झाल्यावर ते त्यांच्या गुणवत्तेवर नोकरीस लागले.
आजच्या अती महत्वाकांक्षी आईवडिलांनी लक्षात घ्यावी अशी गोष्ट म्हणजे, मीनाताईंनी स्वतःची कुठलीही मते मुलांवर न लादता त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याला नेहमी वाव दिला. त्यामुळे दोन्ही मुलांना ,त्यांच्या मनाप्रमाणे स्वतःचे जीवन घडविता आले. या सर्व कष्टांचे फळ म्हणजे मुले तर चांगली घडलीच पण मीनाताईना डोंबिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या “आई महोत्सवात आदर्श आई” चा पुरस्कार प्रथम क्रमांकाने मिळाला अन जणू त्यांच्या जीवनाचे अन आईपणाचे सार्थकच झाले.आज त्या दोन गोंडस नातवंडाच्या आजी आहेत.त्यांच्या घरात गोकुळ नांदत आहे .या आनंदासोबत त्या व त्यांचे पती स्वतःचे छंद आवडीने जोपासत आहेत.
मीनाताईंच्या उत्कृष्ट सेवेची दखल घेऊन आरोग्य खात्याने त्यांचे नाव प्रथम क्रमांकाने राष्ट्रपती पुरस्कारासाठी पाठविले होते.या बरोबरच त्यांच्या सेवाभावी सेवेबद्दल त्यांचा शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक संस्था, ई. मधून अनेकदा गौरव करण्यात आला आहे.
पूर्ण सेवाभावी वृत्तीने ४१ वर्षे सेवा बजावून त्या नियत वयोमानाप्रमाणे ५८ व्या वर्षी निवृत्त झाल्या .
नोकरीतून सन्मानाने निवृत्त झाल्यावर आरामदायी जीवन न जगता मीनाताईंनी स्वतःला सामाजिक आणि साहित्यिक सेवेत मनस्वीपणे झोकून दिले आहे.अनेक गरजूंना त्या मदत करीत असतात.मदत करण्याची सहज प्रवृत्ती अन मनमिळावू स्वभाव यामुळे त्या खूप लोकप्रिय आहेत. स्वतःतील कलागुणांना विकसित करत जीवन जगण्याची किमया साधत त्या आनंदयात्री ठरल्या आहेत.
समाजात जनजागृती करण्यासाठी मीनाताई महिलांचे स्वातंत्र्य, हक्क, कर्तव्य, विद्यार्थ्यांवर संस्कार मूल्ये व शिक्षणाचे महत्व रुजविणे यासाठी सातत्याने लेखन करीत असतात. विविध काव्य स्पर्धेत, निबंध स्पर्धेत त्या सहभागी होतात आणि पुरस्कारही मिळवितात.
मीनाताईंच्या हाताखाली
४८ वर्षांपूर्वी प्रशिक्षणार्थी परिचारिका म्हणून राहिलेल्या आणि नंतर त्यांच्या जीवलग मैत्रीण बनलेल्या सौ चारुशीला गायकवाड मीनाताईंविषयी बोलताना म्हणतात,
“मीनाताईंचे कौशल्यपूर्ण काम बघत बघत आम्ही परिचारिकेचे काम आत्मसात करीत गेलो. नर्सिंगच्या सेवेसोबतच आपल्यातील कला गुणांना वाव देणे, विविध सामाजिक साहित्यिक उपक्रमात सहभाग घेणे ,हे त्यांचे व्यक्तिमत्त्वातील विशेष गुण पहात आम्हीही नकळत घडत गेलो.”
अशा या अतिशय निष्ठेने परिचारिकेची सेवा बजाविलेल्या, निवृत्ती पश्चात सामाजिक,साहित्यिक सेवेत मनस्वीपणे काम करीत असलेल्या मराठी नाईटेंगल सौ मीनाताई वनगे घोडविंदे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
लेखन:देवेंद्र भुजबळ
-9869484800
हगवणे कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घाला – संदीप खर्डेकर.
वैष्णवीची आत्महत्या ( की हत्या ) बाळ पळविणे, बाळाला अज्ञाताच्या हाती ताब्यात देणे, मयुरी चा छळ करणारे ह्या सर्वांना संघटित गुन्हेगारी ची कलमे लावून मोका लावावा – संदीप खर्डेकर
पुणे–वैष्णवी हगवणेच्या शरीरावरील जखमा बघता ही हत्या का आत्महत्या असा संशय निर्माण होत असून या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करावा. तसेच मोठी सून मयुरी हिची तक्रार असताना देखील कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या सुनेच्या तक्रारीवर योग्य कारवाई न झाल्याने स्थानिक पोलिसांबाबत जनतेच्या मनात संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा अन्य यंत्रणेकडे सोपवावा. सासरच्या छळामुळे आत्महत्या केलेल्या सर्व भगिनींना खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर आरोपी कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घालणे ही शिक्षा सर्वोत्तम असेल. त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील नागरिकांनी, गावकऱ्यांनी, नातेवाईकांनी अशी क्रूर कृत्य करणाऱ्यांवर बहिष्काराचे अस्त्र वापरावे. तसेच यापुढे हुंडाबळीच्या प्रकरणात मुलीच्या सासरच्यांना “मकोका” लावण्याची तरतूद केल्यास जरब बसेल व असे प्रकार घडणार नाहीत. किंबहुना असे गैरप्रकार करणारे दहा वेळा विचार करतील, असेही संदीप खर्डेकर यांनी म्हटले आहे.
हुंड्यापायी विवाहितेचा अशाप्रकारे अमानुष छळ करणे चुकीची बाब आहे. त्यामुळे हगवणे कुटुंबातील सर्व नराधमांना कठोरतम शिक्षा व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत आणि खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
