Home Blog Page 296

बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाचे गुगल मॅपवरील नाव औरंगजेब अलामगीर करण्याचा खोडसाळपणा- अमोल बालवडकरांनी केली तक्रार


पुणे-म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रिडा संकुलाचे गुगल मॅप वर “छत्रपती औरंगजेब आलमगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स” असे नाव बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गंभीर दखल घेत माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी बाणेर पोलीस स्टेशन कडे धाव घेत संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.बालेवाडी म्हाळुंगे स्थित श्री शिवछत्रपती क्रिडा संकुलाच्या संदर्भात गुगल लोकेशन मॅपवर काही समाज कंटकांनी जाणून बुजून श्री. शिवछत्रपती क्रिडा संकुल ऐवजी “छत्रपती औरंगजेब आलमगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स” असे नाव बदलले आहे. अशी माहिती बालवडकर यांनी दिली.

या प्रकारामुळे समस्त शिवप्रेमी, खेळाडू, ग्रामस्त व नागरिक अत्यंत संतप्त झाले असून अशा या समाज कंटकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी. गुगल ‘मॅप ला जाऊन अशा प्रकारे लोकेशन एडीट केले आहे. असे सांगत त्यांनी काही पुरावेदेखील सादर केले आहेत.या खोडसाळपणामुळे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रकार तंत्रज्ञानाचा चुकीचा उपयोग करून केला जात आहे. असा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच, गुगल मॅपच्या एडीट पर्यायाचा वापर करून इंटरनेट वरील हॅकर्स इतरही अनेक असे गुन्हे करू शकतात तरी याला वेळीच आळा घालावा. असे बालवडकर यांनी म्हटले आहे.यासोबतच, गुन्हे हे शक्यतो Virtual Private Network वापरून केले जाते. तरी सदर प्रकरणातील गुन्हेगारांचा शोध घ्यावा. तरी सदर प्रकरणातील दोषींना तातडीने शोधुन अशा या समाज कंटकांवर तातडीने कारवाई करावी व संबंधित गुगल लोकेशन मॅपवरील नाव लवकरात लवकर बदलण्यात यावे. अशी मागणी बालवडकर यांनी केली आहे.

दिल्लीत वादळ आणि पाऊस, 25 विमाने वळविली :रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहने बुडाली; हिमाचलमध्ये ढगफुटी

नवी दिल्ली- रविवारी सकाळी दिल्लीत वादळासह मुसळधार पाऊस पडला. मिंटो रोड, मोती बाग आणि दिल्ली विमानतळ टर्मिनल-१ च्या रस्त्यांवर पाणी साचल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.अहवालानुसार, यामुळे १०० हून अधिक उड्डाणांवर परिणाम झाला आहे, त्यापैकी २५ हून अधिक उड्डाणे वळवण्यात आली आहेत. काही उड्डाणे उशिरा झाली तर काही रद्द करण्यात आली.

कालच देशात मान्सूनचे आगमन झाले आहे. ते केरळमध्ये त्याच्या नियोजित वेळेच्या ८ दिवस आधी पोहोचले. त्याच वेळी, आजपासून नौतपा देखील सुरू होत आहे, जो २ जूनपर्यंत सुरू राहील. या काळात प्रचंड उष्णता असते.हवामान खात्याने आज देशातील २१ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा जारी केला आहे. याशिवाय, उत्तराखंडमध्ये गारपीट आणि राजस्थानमध्ये धुळीचे वादळ-उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.शनिवारी ढगफुटीमुळे हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. यामुळे २५ हून अधिक वाहनांचे नुकसान झाले. डोंगरावरून ढिगारा पडल्यामुळे हिंदुस्तान-तिबेट रस्ता आणि राष्ट्रीय महामार्ग-५ बंद झाला.हवामान विभागाने २७ आणि २८ मे रोजी राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे, मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

पुण्यात मंगळवार पेठेत पहाटे गोळीबार:सराईत गुन्हेगार रोहित मानेसह, कासीम अन्सारीला पकडले

पुणे-मंगळवार पेठेतील भीमनगर कमानीजवळ आज (शनिवार) पहाटे गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. रोहित माने (वय 32, रा. लोहियानगर) या सराईत गुन्हेगाराने गोळीबार केला असून, पोलिसांनी त्याला घटनास्थळीच अटक केली. या प्रकरणी त्याचा साथीदार कासीम अन्सारी यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांकडून पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे पाचच्या सुमारास किरण केदारी,शाम गायकवाड,अश्पाक शेख, संतोष कांबळे, हे चौघेजण मंगळवार पेठेतील भीमनगर कमानीजवळ बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून ये जा करत होते. त्यांना हटकले. त्याचा राग आरोपींना आला त्यातून त्यांनी या चौघांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र सुदैवाने कोणाला गोळी लागली नाही. घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघा आरोपींना अटक केली.

गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि रोहित माने याला अटक केली. काही वेळातच त्याचा साथीदार कासीम अन्सारी यालाही पकडण्यात आले. पोलिसांनी दोघांकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि काही काडतुसे हस्तगत केली आहेत.

रोहित माने हा पूर्वीपासूनच पोलिसांच्या रडारवर असलेला गुन्हेगार असून, त्याच्यावर आर्म्स ॲक्ट, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. सध्या गुन्हे शाखा आणि फरासखाना पोलिस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असून, या घटनेमुळे मंगळवार पेठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास सुरू आहे.

5 दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारेच्या वाहनावर गोळीबाराची घटना घडली होती. वारजे माळवाडी येथे गोळीबार केल्याने सदर परिसरात तणाव निर्माण झाला. दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी घारे यांच्या चारचाकी कारवर मंगळवारी (20) रात्री 12वाजता फायरींग केले होते.

स्त्री सक्षम झाली तर तिला आत्महत्येचा पर्याय निवडावा लागणार नाही

  आधार संस्थेच्या संस्थापक डॉ. नंदा शिवगुंडे यांचे मत ; वंचित विकास संस्थेतर्फे महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा ‘अभया सन्मान’ देऊन गौरव 
पुणे :  एक महिला शिकली, तर ती संपूर्ण कुटुंब सुशिक्षित करते. ती सक्षम झाली, तर तिला आत्महत्येसारखा पर्याय निवडण्याची वेळ येत नाही. फक्त मुलींना शिक्षण देऊन चालणार नाही, तर त्यांना स्वावलंबी देखील बनवले पाहिजे. यामुळे प्रत्येक स्त्री सक्षम बनेल, असे मत आधार संस्थेच्या संस्थापिका डॉ. नंदा शिवगुंडे यांनी व्यक्त केले.

वंचित विकास संस्थेतर्फे एकल महिलांचे संघटन करणे, आदिवासी निराधार महिलांचे सक्षमीकरण, तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांना ‘अभया सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. पुणे श्रमिक पत्रकार भवनच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी वुमनिया पुणे च्या संस्थापिका प्रीती क्षीरसागर,  वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संचालिका सुनीता जोगळेकर, मीना कुर्लेकर, मीनाक्षी नवले, देवयानी गोंगले, चैत्राली वाघ, तृप्ती फाटक आदी उपस्थित होत्या. 

बीड मधील केज तालुक्यातील एकल महिलांचे संघटन करणे, त्यांचे प्रश्न सोडवणे, संविधानीक मूल्य समाजात रुजविणे हे काम करणाऱ्या अनिता कांबळे, नागपूर मधील पांढराबोडी, रामनगर येथील आदिवासी निराधार महिला व आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या बबीता धुर्वे, पुण्यात तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या कादंबरी शेख आणि बीडमध्ये अस्तित्त्वाची लढाई लढणारी कार्यकर्ती रत्नमाला गायकवाड यांना अभया सन्मान देऊन गौरविण्यात आले. 

याशिवाय संगीता भरत काळे आणि वैष्णवी प्रसाद काळे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. ओल्या हळदीच्या अंगाने सीमेवर जाण्यासाठी हसतमुखाने निरोप देणाऱ्या भारतीय सैन्यदलातील प्रसाद काळे यांच्या पत्नी वैष्णवी प्रसाद काळे व त्यांच्यावर राष्ट्रभक्तीचे संस्कार करणाऱ्या आई संगीता भरत काळे या दोघींचाही आदर्श समाजापुढे ठेवावा म्हणून सर्व भारतीयांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी ‘ग्राम परिवर्तन प्रबोधिनी’, मु. कटगुण, ता. खटाव, जि. सातारा या ग्रंथालयासाठी उपयुक्त पुस्तके भेट देण्यात आली. 

प्रीती क्षीरसागर म्हणाल्या, मी केवळ महिलांसाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून खूप काम केले आहे. परंतु आज प्रत्यक्ष महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील अनेक अडचणींना सामोरे जात सक्षमपणे उभे राहणाऱ्या प्रत्येकीचे कौतुक वाटते, असेही त्यांनी सांगितले.  

सन्मानाला उत्तर देताना कादंबरी शेख म्हणाल्या,  माणूस जन्माला एकटा येतो आणि एकटाच जातो; पण जीवनाच्या प्रवासात त्याला कुटुंबाची साथ लाभली, तर त्याचा सर्वांगीण विकास शक्य होतो. मात्र, एकल पालकांच्या मनातील एकटेपणाची भावना तेव्हाच संपते, जेव्हा अशा संस्था त्यांच्या पाठीशी कुटुंबाप्रमाणे उभ्या राहतात. आज बहुतांशी संवाद फक्त आभासी माध्यमांतूनच होताना दिसतो. अशा परिस्थितीत या कार्यक्रमासारख्या उपक्रमांतून प्रत्यक्ष भेटीगाठी, संवाद आणि माणुसकीची जाणीव निर्माण होते. माणसाने माणसाकडे माणुसकीच्या नजरेने पाहिलं पाहिजे. 

मीना कुर्लेकर म्हणाल्या, स्त्री जर स्वतंत्र विचार करायला शिकली, निर्भीड बनली, तर शिक्षण असून किंवा नसो ती खंबीर बनेल. स्वतः चे निर्णय स्वतः घ्यायला शिकली तसेच स्वतः विचार करायला शिकली, तर स्त्री आत्महत्या होणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. तृप्ती फाटक यांनी सूत्रसंचालन केले.  

ट्रेकिंगसाठी गेलेली तीन अल्पवयीन भावंडे परतीचा रस्ता चुकन डोंगरावर अडकले…पण पोलिसांनी …

पुणे-

लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत डोंगरावर हा प्रसंग काल घडला ,शुक्रवारी (ता.23) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास याबाबतची माहिती समजताच लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने भर पावसात मुलांचा शोध घेऊन दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मुलांची सुखरूप सुटका केली .

अनुष्का जीवन पवार (वय-16), नैतिक जीवन पवार (वय-14), व आर्यन गणेश गवानदे (वय-16, रा. गुजरात) अशी रस्ता चुकलेल्या मुलांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अनुष्का पवार व नैतिक पवार हे दोघे नात्याने सख्ये बहिण भाऊ आहेत. तर आर्थन गवानदे हा त्यांचा मावसभाऊ आहे. तिन्ही मुले ही सुट्ट्यांमध्ये त्याचे लोणी काळभोर येथील नातेवाईक नेहा भानुदास थोरात (वय-24, रा. जॉयनेस्ट सोसायटी, लोणी काळभोर) व उरुळी कांचन येथील सुनिल दत्तात्रय कांचन (वय – ३१) यांच्याकडे आले होते.

दरम्यान, अनुष्का, नैतिक व आर्यन यांचा रामदरा येथे ट्रेकिंगसाठी जाण्याचा प्लान ठरला. त्यानुषंगाने तिघेही रामदरा डोंगरावर ट्रेकिंगसाठी शुक्रवारी (ता.23) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गेले होते. डोंगरावर दोन तीन तास झाल्यानंतर अचानक पाऊस सुरु झाला. त्यातच अंधार पडायला लागला होता. डोंगरावरून घाईघाईने उतरताना त्यांचा रस्ता चुकला आणि तिन्ही मुले डोंगरावर अडकले.त्यानंतर मुलांनी रामदरा डोंगरावर रस्ता चुकून अडकल्याची माहिती पुणे शहर पोलिसांच्या कंट्रोल रूमला शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दिली. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी, पोलीस अंमलदार मयुर बोरातके, वैभव खोत, प्रदीप गाडे व सोनवणे यांचे एक पथक तयार करून घटनास्थळी पाठवून दिले.पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा पावसाने जोर धरला होता. पोलीस फोनद्वारे मुलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र फोन स्वीच ऑफ लागत होता. या परिस्थितीत पोलिसांनी डोक्यावर पावसाची रिमझिम झेलत, रात्रीच्या अंधारात टोर्चच्या सहाय्याने झाडी झुडपातून वाट करीत डोंगरावर निघाले होते. मुलांना आवाज देत डोंगर चढत होते. डोंगरावर दोन तास शोध घेतल्यानंतर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुले डोंगरावर मिळून आले.

लोणी काळभोर पोलिसांनी तिन्ही मुलांना सुखरूप लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी मुलांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलाविले. तिन्ही मुलांना सुखरूप पालकांच्याकडे स्वाधीन केले.

‘राम गान’: काव्य, गायन, चित्ररूपी त्रिविध सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध !

…………भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांचे आयोजन

पुणे:

भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘आविष्कार क्रिएशन्स, पुणे’ प्रस्तुत ‘राम गान’ या कार्यक्रमात रसिकांनी रामायणातील विविध प्रसंगांचा काव्य, गायन आणि चित्ररूपात आनंद घेतला.२४ मे २०२५ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता भारतीय विद्या भवन, सेनापती बापट रस्ता येथे हा कार्यक्रम झाला.

बंदिशकार व चित्रकार भाग्यश्री गोडबोले यांनी रामायणातील निवडक प्रसंगांवर रचना केलेल्या रागाधारी बंदिशींचे गायन आणि त्यावर आधारित त्यांच्याच चित्रांचे दृकश्राव्य प्रदर्शन सादर करून रसिकांना एक अद्वितीय अनुभव दिला. या कार्यक्रमात पं.अमोल निसळ, डॉ.सानिका गोरेगावकर,सावनी दातार, श्वेता कुलकर्णी आणि भाग्यश्री गोडबोले यांनी विविध रागांवर आधारित गायन सादर केले. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. सुनील देवधर यांनी केले.

अमित जोशी (तबला), शुभदा आठवले (संवादिनी) आणि अंजली सिंगडे-राव (व्हायोलिन) यांनी उत्कृष्ट साथसंगत केली.भारतीय विद्या भवन पुणे केंद्र समितीचे सदस्य ग्रुप कॅप्टन सुहास फाटक, डॉ.जयश्री फिरोदिया, मोठ्या प्रमाणावर श्रोतु वर्ग उपस्थित होता. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकीर्डे यांनी प्रास्ताविक करून कलाकारांचा सत्कार केला.कार्यक्रमात सहभागी रसिकांनी सादरीकरणाची एकात्मता आणि कलात्मक सादरीकरणाची प्रशंसा केली.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमातील हा २४५ वा कार्यक्रम होता.प्रवेश विनामूल्य होता.या कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

पुढील वर्षी बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग- सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार

अ‍ॅड.आशिष शेलार यांची पुणे बाल पुस्तक जत्रेला भेट

पुणे, दि. २४: ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ सारख्या उपक्रमातून बालमनावर चांगले संस्कार होत असल्याने पुढील वर्षांपासून बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी केले.

राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे महानगर पालिका, पुणे पुस्तक महोत्सव संवाद यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित ‘पुणे बाल पुस्तक जत्रा २०२५’ ला अ‍ॅड.आशिष शेलार यांनी भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार हेमंत रासने, महापालिका उपायुक्त पृथ्वीराज संचालक तथा पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, धीरज घाटे, संवाद संस्थेचे संस्थापक संचालक सुनील महाजन, चिंटूकार चारूहास पंडीत आदी उपस्थित होते.

अ‍ॅड.शेलार म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि इंटरनेटच्या युगात लहान मुलांच्या संवेदना जागृत रहाव्यात, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत आणि त्यांच्या गुणांचा विकास व्हावा यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन गरजेचे आहे. त्यामुळे सांस्कृतिक विभाग या बाल पुस्तक जत्रेचा अधिकृत सहयोगी होईल, राज्यात बालसंस्काराचे एक मॉडेल म्हणून हा उपक्रम ओळखला जाईल.

पुणे बाल पुस्तक जत्रेच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक करतांना ते म्हणाले, आज कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली असतांना समाजासमोरच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी असे आयोजन उपयुक्त आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेला वास्तविक बुद्धिमत्तेची जोड दिल्याशिवाय प्रगती साधता येत नाही. मुलांमध्ये अशी बुद्धिमत्ता निर्माण करण्याची क्षमता बाल पुस्तक जत्रेत आहे. बालकांसाठी पुस्तके, खेळ, सांस्कृतिक देवाण घेवाण आणि इतिहासाची माहिती असे सर्व एकाच ठिकाणी पहिल्यानंतर उपक्रमाचे महत्व कळते आणि हे सर्व वातावरण आजच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अविश्वसनीय वाटते, अशा शब्दात अ‍ॅड.शेलार यांनी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

महापालिका उपायुक्त पृथ्वीराज म्हणाले, पुणे महानगरपालिका स्थापनेचे ७५ वे वर्ष असल्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. बाल पुस्तक जत्रेला पहिल्याच वर्षी मिळालेला प्रतिसाद पाहता दरवर्षी हे आयोजन करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. राष्ट्रीय पुस्तक न्यासासाठी जागा महापालिकेने उपलब्ध करून दिली असून पुण्याला पुस्तकाची राजधानी करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात राजेश पांडे म्हणाले, महाराष्ट्रातील बाल पुस्तक जत्रेचा हा पहिलाच प्रयोग असून अडीच दिवसात २५ हजार मुलांनी भेट दिली. मुले जत्रेचा आनंद लुटत आहेत.राज्य शासनाचे सहकार्य असल्याने अशा कार्यक्रमांचे कार्यक्रम शक्य होते.

प्रारंभी मंत्री अ‍ॅड.शेलार यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेट दिली. मुलांचे खेळ पाहतानाच स्वत: त्यांनी विटी-दांडू हाती घेऊन खेळाचा आनंद घेतला. त्यांच्या हस्ते विविध बाल पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

काश्मीरमध्ये काहीतरी घडेल, पर्यटकांना मारतील हे आधीच बोललो होतो:ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न-राज ठाकरेंचे खळबळजनक दावे

मुंबई-ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न चालला आहे, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. पण हे ब्रँड संपणार नाही, हे मी लिहून देतो, असेही त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले. तसेच राज ठाकरे यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याविषयी खळबळजनक दावा केला. मला गेले दीड, दोन वर्ष जे जाणवत होते काश्मीरबद्दल. काश्मीरमध्ये काही तरी मोठी घटना घडेल. पर्यटकांना मारतील. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मी असे बोललो होतो, असे राज ठाकरे म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे रोखठोक शैलीत आपले मत व्यक्त करत असतात. आपल्या स्पष्ट बोलण्यामुळे आणि परखड भूमिका घेण्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत जाण्याबाबत भाष्य केले होते. आता त्यांनी ‘मुंबई तक’ वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत ठाकरे आणि पवार ब्रँड याबाबत विचारलेल्या प्रश्नावरही भाष्य केले आहे. तसेच पहलगाम हल्ल्याबाबत उपरोक्त दावा केला आहे.

नेमके काय म्हणाले राज ठाकरे?

दिल्लीमध्ये जेव्हा-केव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला जातो. तेव्हा दोन आडनावे प्रकर्षाने येतात ठाकरे आणि पवार. सध्याच्या परिस्थितीत या दोन्ही आडनावांचा जो ब्रँड आहे, तो संपवण्याचा प्रयत्न चाललाय का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, ठाकरे आणि पवार हे दोन ब्रँड संपवण्याचा प्रयत्न चालला आहे, यात काही वादच नाही. पण तो ब्रँड संपणार नाही मी हे लिहून द्यायला तयार आहे. आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा महाराष्ट्रावर प्रभाव होता, त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव होता. संगीत क्षेत्राचा विचार केला, तर माझे वडील म्हणजेच श्रीकांत ठाकरेंचा प्रभाव दिसून आला. त्यानंतर माझा प्रभाव आहे, उद्धवचा आहे. व्यक्तिगत प्रभाव असतो पण आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते. ती गोष्ट म्हणजेच आडनाव ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.

पहलगाम हल्ल्याबाबत राज ठाकरेंचा दावा काय?

काश्मीरमध्ये काही तरी मोठी घटना घडेल, असे मला गेले दीड, दोन वर्ष जाणवत होते, असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे हिंट दिली किंवा राज ठाकरेने सगळे सांगितले असे व्हायला नको होते म्हणून मी ही गोष्ट जाहीररीत्या कधी कुठे बोललो नव्हतो. पण तुम्हाला मी आता जे सांगतोय ते सत्य आहे. शपथपूर्वक सांगतोय.. गेले वर्षभर.. आमचे अनिल शिदोरे असतील किंवा.. इतर लोकं असतील. मी त्यांच्या भेटी घालून देईल तुम्हाला, असा दावा राज ठाकरे यांनी केला.

ते पुढे म्हणाले, अनेकांशी मी गेले वर्षभर बोलतोय.. की, काश्मीरमध्ये काही तरी मोठी घटना घडेल. तुमचा विश्वास नाही बसणार.. मी हे ही बोललो होतो की, पर्यटकांना मारतील. जे 370 कलम रद्द झाल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती होती. आपले लोकं तिकडे जात होते, खेळत होते.. सगळ्या गोष्ट होत होत्या.

मला गेले दीड, दोन वर्ष जे जाणवत होते काश्मीरबद्दलचे.. काय आहे की, शांतता आणि सन्नाटा यातील फरक तुम्हाला समजला पाहिजे. शांतता ही चांगली असते, सन्नाटा ही गंभीर गोष्ट असते. काश्मीरबद्दल मला जे जाणवत होतं तो सन्नाटा होता. त्यातून बाहेर काय-काय गोष्टी पडतील ते मला माहीत नाही. पण ज्या दिवशी ही घटना घडली. मी तुम्हाला आतापण मोबाइल फोन दाखवायला तयार आहे. अनिल शिदोरेंचा मेसेज आहे की, ‘तुम्ही बोललात तसे झाले’ त्या दिवशीचा मेसेज आहे त्यांच्याकडे, असे राज ठाकरे म्हणाले.

मी कोणी भविष्यवेत्ता नाही किंवा ज्योतिषी नाही. माझे काही ठोकताळे आहेत, माझे काही अंदाज आहेत. मला आतून काही वाटते की, या गोष्टी घडतील. मी त्या प्रकारे सांगतोय हे.. मी काही निवडणुकीसाठी बोलत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, असा दावा राज ठाकरे यांनी यावेळी केला आहे.

अमेरिकेत कमावलेले पैसे भारतात पाठवण्यावर 3.5% कर: यातून अमेरिकेला मिळणार 8 हजार कोटी

अमेरिकेत कमावलेले पैसे भारतात पाठवण्यावर ३.५% कर लागू करण्यात येत आहे . यापूर्वी ५% कर प्रस्तावित होता. अमेरिकन प्रतिनिधी सभागृहाने २२ मे रोजी ‘वन बिग, ब्युटीफुल बिल ॲक्ट’ मंजूर केला. या विधेयकात अमेरिकेत परदेशी कामगारांनी कमावलेले पैसे त्यांच्या देशात पाठवण्यावर कर लावण्याची तरतूद आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या नवीन धोरणाचा भारतावर सर्वात जास्त परिणाम होऊ शकतो, कारण भारतीय स्थलांतरित अमेरिकेतून सर्वाधिक पैसे पाठवतात. पैसे पाठवणे म्हणजे स्थलांतरितांनी त्यांच्या देशात पाठवलेले पैसे. सिनेटच्या मंजुरीनंतर, ते १ जानेवारी २०२६ पासून लागू होईल.

२०२३-२४ मध्ये भारतीयांकडून सुमारे १३० अब्ज डॉलर्सचे पैसे पाठवले जाण्याचा अंदाज होता. यापैकी सुमारे $३० अब्ज किंवा २३.४% अमेरिकेतून आले. ४५ लाख भारतीयांनी अमेरिकेतून हे पैसे पाठवले.

३.५% कर लागू झाल्यामुळे, ३० अब्ज डॉलर्सच्या रेमिटन्सवर १.०५ अब्ज डॉलर्सचा अतिरिक्त भार पडेल म्हणजेच सुमारे ८,७५० कोटी रुपये, ज्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल.
हे एक कर विधेयक आहे, ज्याअंतर्गत अमेरिकेत काम करणाऱ्या परदेशी कामगारांनी त्यांच्या देशात पाठवलेल्या पैशावर (रेमिटन्स) कर लावला जाईल. सुरुवातीला कर दर ५% होता, परंतु आता तो ३.५% पर्यंत कमी करण्यात आला आहे.गणना:

कर दर: ३.५%
कर = रु. १,००,००० × ३.५% = रु. १,००,००० × ०.०३५ = रु. ३,५००

१,००,००० रुपये पाठवण्यासाठी स्थलांतरितांना ३,५०० रुपये कर भरावा लागेल.
एकूण रेमिटन्स: $३० अब्ज

कर दर: ३.५%

कर = ३० अब्ज × ०.०३५ = $१.०५ अब्ज (सुमारे ८,७५० कोटी रुपये)

सुरुवातीला ५%: ३० अब्ज × ०.०५ = १.५ अब्ज डॉलर्स (सुमारे १२,५०० कोटी रुपये)

३.५% कर दराने, भारताला कमी तोटा होईल, $०.४५ अब्ज (अंदाजे रु. ३,७५० कोटी), परंतु ही रक्कम अर्थव्यवस्थेसाठी अजूनही लक्षणीय आहे.
अमेरिकेतून भारताला सर्वाधिक पैसे पाठवले जातात आणि मोठ्या संख्येने भारतीय प्रवासी तेथे काम करतात. २०२३-२४ मध्ये रेमिटन्स सुमारे $१३० अब्ज असण्याचा अंदाज होता. यापैकी ३० अब्ज डॉलर्स म्हणजेच २३.४% रक्कम अमेरिकेतून येते.३.५% कराच्या अंमलबजावणीमुळे ३० अब्ज डॉलर्सच्या रेमिटन्सवर अंदाजे १.०५ अब्ज डॉलर्स (८,७५० कोटी रुपये) अतिरिक्त भार पडेल, ज्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. या पैशामुळे भारताची अर्थव्यवस्था, रिअल इस्टेट, शेअर बाजार आणि उपभोग वाढतो.

दरमहा १०० कोटी रुपये पगार घेणारा भारतीय ….

नोकरी करून कोणीही करोडपती होत नाही असे आपण नेहमी म्हणतो , परंतु एक भारतीय असा आहे ज्याचा मासिक पगार सुमारे १०० कोटी रुपये आहे.टेस्लाचे सीएफओ म्हणजेच मुख्य वित्तीय अधिकारी, 47 वर्षीय वैभव तनेजा यांनी २०२४ मध्ये १३९ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच १,१५३ कोटी रुपये पगार घेतला. जर आपण मासिक आधारावर तो मोडला तर त्यांना दरमहा सुमारे ९६ कोटी रुपये पगार मिळतो.

हे सुंदर पिचाई आणि सत्या नाडेला यांच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना १०.७३ दशलक्ष डॉलर्स पगार मिळतो तर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांना ७९.१ दशलक्ष डॉलर्स पगार मिळतो.वैभव तनेजा यांचा जन्म 1978 मध्ये दिल्लीत झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण दिल्लीतील आरके पुरम येथील डीपीएस येथून पूर्ण केले. १९९९ मध्ये त्यांनी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स, म्हणजेच दिल्ली विद्यापीठाच्या एसआरसीसीमधून बी.कॉम. केले.

एसआरसीसीमध्ये शिकत असताना ते कॉमर्स सोसायटीचे अध्यक्षही होते. यानंतर, वैभव यांनी आयसीएआय म्हणजेच भारतातील चार्टर्ड अकाउंटंट्स इन्स्टिट्यूटमधून सीए प्रमाणपत्र मिळवले. २००६ मध्ये, त्यांना अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाइड पब्लिक अकाउंटंट्सकडून प्रमाणपत्र देखील मिळाले. कामाव्यतिरिक्त, वैभव यांना पुस्तकांची आवड आहे आणि वेळ मिळेल तेव्हा काहीतरी चांगले वाचायला आवडते. याशिवाय ते समाजसेवेतही पुढे आहेत. ते ‘प्रथम यूएसए’ च्या संचालक मंडळावर आहेत. ‘प्रथम यूएसए’ ही एक स्वयंसेवी संस्था आहे जी भारतातील मागासलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करते.वैभव त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह कॅलिफोर्नियातील पालो अल्टो येथे राहतात.

२०१७ मध्ये जेव्हा वैभव टेस्लामध्ये सामील झाले तेव्हा टेस्लाच्या शेअर्सची किंमत $२५० (सुमारे २०,८०० रुपये) होती. मे २०२५ पर्यंत, शेअरची किंमत $३४२ (रु. २८,४००) पर्यंत पोहोचली. यामुळे वैभव यांचे उत्पन्न वाढले आहे.

वैभव तनेजा यांचे हे पॅकेज कोणत्याही सीएफओसाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे मानले जाते. यापूर्वी, २०२० मध्ये, निकोला कंपनीच्या सीएफओने ८६ दशलक्ष डॉलर्स (७१५ कोटी रुपये) कमावले होते, परंतु २०२४ मध्ये त्या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. तर २०१४ मध्ये ट्विटरच्या सीएफओने ७२ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ६१६ कोटी रुपये) कमावले.

महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची कोअर कमिटीची बैठक संपन्न

पुणे-

आगामी पुणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची कोर कमिटी बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवन पुणे येथे संपन्न झाली.

आगामी महानगरपालिका निवडणुकी संदर्भात प्रामुख्याने आघाडी बाबत शहरातील सद्यपरिस्थितीचा आढावा घेत सकारात्मक चर्चा झाली, प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या प्रभाग रचनेसंदर्भात निर्माण होणाऱ्या संभाव्य तक्रारींबाबत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे, पालिकेत यापूर्वी सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पार्टीने नियोजनबद्ध विकास न करता शहरात केलेल्या चुकीच्या कामामुळे आज शहराची झालेली वाताहत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पावसाळ्यात शहरातील अनेक भागांमध्ये शासनाचे पाणी यातून होणारे नुकसान पर्यावरणासंदर्भात हाती घेण्यात आलेले चुकीचे प्रकल्प या सर्व चुकीच्या कामांची माहिती सर्वसामान्य पुणेकरांपर्यंत पक्ष पोहोचवणार आहे तसेच पक्षाची शहरातील संघटनात्मक बांधणी मजबूत असून पक्षाच्या सर्व सेलला निवडणुकीसाठी तयार ठेवण्याचे देखील या बैठकीत ठरविण्यात आले आहे.

यांसह वेगवेगळ्या विषयांवर या कोअर कमिटीच्या बैठकीदरम्यान चर्चा झाली.
या बैठकीसाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, माजी आमदार जयदेव गायकवाड, आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार कमल ढोले पाटील, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, विशाल तांबे ,अश्विनी कदम, श्रीकांत पाटील ,सचिन दोडके ,भगवानराव साळुंखे ,डॉ.सुनील जगताप, पंडित कांबळे ,प्रकाश म्हस्के आदी नेते तथा पदाधिकारी उपस्थित होते.

उपक्रम सुरु करणे सोपे, मात्र तो सातत्याने आणि तेव्हढ्याच दिमाखात सुरू ठेवणे कठीण – मंत्री चंद्रकांत पाटील

सोमेश्वर फाऊंडेशनच्या आयोजित पुणे आयडॉल स्पर्धेचा समारोप

‘व्हाईस ऑफ चॉइस’ पुरस्काराने डॉ. विनय थोरात, शिवानी पांढरे, निलेश निकम, अॅड. शितल कुलकर्णी यांचा सन्मान

पुणे : संगीत म्हणजे आनंदाचा एक मेळा.कोणतेही संगीत ऐकल्यावर लगेच आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो. एक नवचैतन्य निर्माण होते. गाण्याचा छंद जोपासून अनेक पुणेकरांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटविला आहे. पुणेकरांच्या गायनाच्या छंदाला गेली 23 वर्ष सोमेश्वर फाऊंडेशन मार्फत सनी निम्हण प्रेरणा देत आहेत. याबद्दल समाधान आहे, अशी भावना राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली.

कार्यसम्राट आमदार स्व. विनायक निम्हण यांनी गायक कलाकारांना दिलेले मानाचे व्यासपीठ म्हणजे सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित पुणे आयडॉल स्पर्धा. या स्पर्धेची महाअंतिम फेरी आज बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे संपन्न झाली.यावेळी कृषिमंत्री कोकाटे बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे पुणे शहाराध्यक्ष धीरज घाटे, संयोजक सनी विनायक निम्हण आदि मान्यवर उपस्थित होते. पुणे आयडॉल स्पर्धेच्या निमित्ताने दरवर्षी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व गायन कला जोपासणाऱ्या व्यक्तींचा ‘व्हाईस ऑफ चॉइस’ पुरस्काराने सन्मान करण्यात येतो, यंदा डॉ. विनय थोरात, शिवानी पांढरे, निलेश निकम, अॅड. शितल कुलकर्णी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

पुढे बोलताना कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, पुणे आयडॉलच्या माध्यमातून पुणे शहरातील नवोदित गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची इच्छा दिवंगत नेते विनायकराव निम्हण यांची होती. त्यानुसार गेली अनेक वर्ष ही स्पर्धा सुरू आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, एखादा उपक्रम सुरु करणे सोपे असते. मात्र तो सातत्याने आणि तेव्हढ्याच दिमाखात सुरू ठेवणे कठीण आहे. परंतु स्वर्गीय आमदार विनायक निम्हण यांनी पुणे आयडॉल ही स्पर्धा सुरू केली अन् गेल्या 23 वर्षांपासून ही अशीच सुरू आहे. सनी निम्हण यांनी त्यांचा सामाजिक आणि राजकीय वारसा दोन्ही घेतला आहे. या स्पर्धेत पुणे शहरात व्यतिरिक्त इतर शहर आणि राज्यातून देखील स्पर्धक आलेले आहेत. यातच या स्पर्धेचे यश आहे.

धीरज घाटे म्हणाले, सांस्कृतिक नगरी असलेल्या पुणे शहरात नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते. येथे गेली 23 वर्ष ही स्पर्धा सुरू आहे, हे कौतुकास्पद आहे.

प्रास्ताविक पर भाषणात सनी निम्हण म्हणाले, पुणे आयडॉल या स्पर्धेच्या अंतिम फेरीत 725 स्पर्धकांमधून 18 स्पर्धक निवडण्यात आले. त्यांची निवड करताना परीक्षकांचाच कस लागला आहे. पुणे आयडॉल ही केवळ स्पर्धा नसून आपले गायन कौशल्य सादर करण्याचे एक महत्वाचे व्यासपीठ बनले आहे.

पुणे आयडॉल स्पर्धेतील चारही गटाच्या प्रथम विजेत्यास 15 हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र तर द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी 10 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

अमित मुरकुटे, हेमंत कांबळे, अनिकेत कपोते, वनमाला कांबळे, संजय माजिरे, गणेश शेलार, संजय तरडे आदि कार्यकर्ते स्पर्धेच्या यशासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे परीक्षण ज्येष्ठ गायक राजेश दातार, गायक जितेंद्र भुरुक आणि मंजुश्री ओक यांनी केले.

पुणे आयडॉलचे विजेते

लिटिल चॅम्प

  1. भार्गव जाधव
  2. परी तेलंग

युवा आयडॉल

1 अभितांश श्रीवास्तव
2 नीव कनानी

जनरल आयडॉल

1 पियुष भोंडे
2 निखिल गर्गे

ओल्ड इज गोल्ड

1 सुनील यादव
2 मनोज मोरे

प्रदूषण न रोखल्यास मानवी अस्तित्वालाच धोका,पर्यावरण रक्षण ही देखील देशसेवाच : रमेश खरमाळे

ग्रीन सोल्यूशनतर्फे खरमाळे दाम्पत्याला जीवन गौरव पुरस्कार प्रदान
पुणे : प्लास्टिकचा अनिर्बंध वापर रोखणे ही आजच्या काळाची गरज आहे. पर्यावरण रक्षण ही देशसेवा समजून कार्य केले तरच भविष्यात मानव जीवंत राहू शकेल, असे प्रतिपादन माजी सैनिक, वॉटरमॅन, पर्यावरणवादी, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते रमेश खरमाळे यांनी केले.
ग्रीन सोल्यूशनच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन रमेश खरमाळे व स्वाती खरमाळे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना खरमाळे बोलत होते. रागा पॅलेस येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळ, श्रीफळ आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. ग्रीन सोल्यूशनचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर अहिवळे, आरती भोसले-अहिवळे, प्रसिद्ध लेखक शरद तांदळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी सहसंचालक डॉ. विद्यानंद मोटघरे, सीओईपीचे सहअधिष्ठाता डॉ. संदीप मेश्राम, शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विषयाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रकाश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रीन सोल्यूशन पर्यावरण क्षेत्रात करीत असलेल्या कार्याचा गौरव करून रमेश खरमाळे म्हणाले, शहरापेक्षा ग्रामीण भागातील प्लास्टिकचा प्रश्न गंभीर आहे. यातून वीषयुक्त अन्नधान्याची निर्मिती होत आहे. जनावरांच्या आरोग्यासही धोका निर्माण होत आहे. प्रदूषणात वाढ झाल्यामुळे कार्बन उत्सर्जनही मोठ्या प्रमाणात होत असून त्यातूनच तापमानवाढीच्या जागतिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. या करिता प्रत्येकाने झाडे लावून पर्यावरण वाचविण्याची गरज आहे.
शरद तांदळे म्हणाले, पर्यावरण रक्षण हे आता फक्त सामाजिक कार्य राहिले नसून या क्षेत्रातही उद्योग व्यवसायाच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. डॉ. विद्यानंद मोटघरे म्हणाले, पर्यावरण रक्षणासाठी ग्रीन सोल्यूशनने छोटी छोटी पावले उचलत जागतिक स्तरापर्यंत कार्य करावे.
डॉ. प्रकाश राऊत म्हणाले, माझ्या विद्यार्थ्यांनी ग्रीन सोल्यूशनच्या माध्यमातून पर्यावरणाच्या क्षेत्रात केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश देत ही संस्था अखंडितपणे कार्य करीत आहे.
प्रास्ताविकात आरती भोसले-अहिवळे यांनी ग्रीन सोल्यूशनच्या कार्याविषयी माहिती देत अदम्य इच्छाशक्ती, कष्ट आणि जिद्द या जोरावर वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी योजनांविषयी सागर अहिवळे यांनी अवगत केले. यशोधन रामटेके, डॉ. गणेश कदम यांनी मनोगत व्यक्त केले.

मान्सून आला रे …..

वेळेच्या 8 दिवस आधीच केरळमध्ये पोहोचला मान्सून:16 वर्षांत सर्वात लवकर; 28 राज्यांत वादळ-पाऊस आणि उष्णतेचा रेड अलर्ट
आज केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. तो १ जून या त्याच्या नियोजित वेळेच्या ८ दिवस आधी केरळमध्ये पोहोचला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, १६ वर्षांत पहिल्यांदाच मान्सून इतक्या लवकर पोहोचला आहे. २०२४ मध्ये तो ३० मे रोजी केरळमध्ये पोहोचला.

तो देशापासून सुमारे ४०-५० किलोमीटर अंतरावर चार दिवस अडकला होता आणि शुक्रवारी संध्याकाळी पुढे सरकला. आजच तो तामिळनाडू आणि कर्नाटकच्या अनेक भागात पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्याच वेळी, तो एका आठवड्यात देशाच्या दक्षिण आणि ईशान्य राज्यांना व्यापू शकतो. तो ४ जूनपर्यंत मध्य आणि पूर्व भारतात पोहोचेल.

याशिवाय, विभागाने आजसाठी दोन प्रकारचे रेड अलर्ट जारी केले आहेत. पहिला मुसळधार पावसाचा आणि दुसरा अति उष्णतेचा. गुजरात, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळच्या किनारी भागात २०० मिमी पर्यंत पाऊस पडू शकतो. पुढील सात दिवस या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तसेच, आज देशातील एकूण २९ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात, गेल्या तीन दिवसांत वादळ-पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृतांचा आकडा ६० वर पोहोचला आहे.

त्याच वेळी, राजस्थानच्या पश्चिम भागात २७ मे पर्यंत उष्ण वाऱ्यांमुळे रेड अलर्ट आहे. शुक्रवारी जैसलमेरमध्ये कमाल तापमान ४८ अंश होते. आज ते आणखी वाढू शकते.२७ मेपर्यंत समुद्रात जाण्यास बंदी
हवामान खात्याने केरळच्या किनारी आणि अंतर्गत भागात वादळाचा इशारा जारी केला आहे. मच्छिमारांसह सामान्य लोकांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपच्या किनाऱ्यावर २७ मे पर्यंत मासेमारीसाठी समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

भारत माता की जय च्या जयघोषात रिपाइंची ‘भारत जिंदाबाद रॅली’ संपन्न

0

पुणे : पाहेलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून बदला घेतला. पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिल्याबद्दल भारतीय सैन्याचे अभिनंदन करण्यासाठी, त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी, देश सैन्यासोबत असल्याचे दाखवून देण्यासाठी  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने शनिवारी ‘भारत जिंदाबाद रॅली’  चे आयोजन करण्यात आले होते. 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सुनीता वाडेकर, संघमित्रा गायकवाड, मंगल रासगे व रिपब्लिकन पक्षांच्या महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  ‘भारत जिंदाबाद रॅली’ ला सुरुवात झाली. भारत माता की जय..,   पाकिस्तान मुर्दाबाद..,  भारतीय सैन्याचा विजय असो.., अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.   रॅलीत सहभागी कार्यकर्त्यांनी फक्त तिरंगी झेंडे हातात घेतलेले होते. 

रिपाइंचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, परशुराम वाडेकर, रोहिदास गायकवाड, असित गांगुर्डे, शैलेंद्र चव्हाण,अशोक कांबळे, अशोक शिरोळे, मोहन जगताप, महेंद्र कांबळे, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, बसवराज गायकवाड, वसंत बनसोडे, भगवान गायकवाड, वीरेन साठे, सुनिता वाडेकर, हिमाली कांबळे, संघमित्रा  गायकवाड, मंगल रासगे, सुन्नाबी शेख, संदीप धाडोरे, महादेव दंदी, लियाकत शेख, विनोद टोपे, शामशुद्दीन शेख, अविनाश कदम, कपिल जगताप, फिरोज खान, हबीब सैय्यद, भारत भोसले, चांदणी गायकवाड, सविता शेलार, शाम गायकवाड, निलेश गायकवाड, आकाश बहुले, के. जी. पवळे,  हनुमंत गायकवाड, उद्धव चिलवंत, दादा वारभुवन, रमेश तेलवडे, अतुल भालेराव, शांतीनाथ चव्हाण, राजेश गाढे, वैभव पवार,  स्वप्नील जाधव,  रोहित कांबळे, अप्पा वाडेकर, रामभाऊ कर्वे,  दीपक इसावे,  गोविंद साठे, शशांक माने, सुशील मंडल, तानाजी तापकीरे,  विशाल ओव्हाल, अरविंद शिंदे, आनंद लवटे, आनंद कांबळे, विशाल ओव्हाल, गौतम कदम, संजय बनसोडे, विक्की वालके, फक्कडराव शेळके, नंदा निकाळजे, कलावती भंडारे, निर्मला कांबळे, शोभा गायकवाड, आरती देटे, नंदा गायकवाड, अनिता कांबळे, सुनिता गायकवाड, शांता कांबळे, भारताबाई कराळे, सूरज जाधव, रवी अवसरमल, अक्षय अवसरमल, बाळासाहेब शेलार, रावसाहेब झेंडे, अंकिता भालेराव, शिवाजी गायकवाड, निलेश आल्हाट, अक्षय गायकवाड, बाळासाहेब खंकाल यांच्यासह रिपाइं चे पदाधिकारी कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. 

भर पावसात निघालेल्या या ‘भारत जिंदाबाद रॅली’ मध्ये कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. बंड गार्डन पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड सर व रिपब्लिकन पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यानंतर शहराध्यक्ष संजय सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रगीताने ‘भारत जिंदाबाद रॅली’ चा समारोप झाला.